Monthly Archives: डिसेंबर 2010

आठवण चाळवणारे अनामिक !

 
एक दिवशी एका अनामिक व्यक्तीला  मी बागेत बघितले. एका बाकावर डोळे  मिटून चिंतन करीत, शांत बसलेले होते. मी अतिशय अचंबित झालो. तीच   आकृती तीच चेहऱ्याची ठेवण, तशीच शांत मुद्रा, तशीच बसण्याची पद्धत. अगदी तसेच जसे माझे वडील होते. पंचवीस वर्षापूर्वीच ते वारले.  ज्यांनी माझ्या  स्मरणात आठवणीचे कायमचे घर केलेले आहे. तीच छबी जागृत झाल्याचे  जाणवले. दूर बसून मी त्यांना बराच वेळपर्यंत न्याहाळले. कांही वेळाने ते उठले. चालू लागले. काय आश्चर्य त्यांच्या  चालण्याची पद्धत  देखील हुबेहूब  तशीच. ज्यांनी माझ्या वडिलांना बघितले असेल असा कुणीही  माझ्याशी  सहमत होईल की  त्या  अनामिक व्यक्तीची शरीर संपदा माझ्या वडिलांशी    मिळती जुळती होती.  मी देखील उठून त्यांचा पिच्छा  करू लागलो. मला फार  उत्सुकता लागलेली होती की ही व्यक्ती कोठून आली. कोठे राहते? मला दुरूनच त्यांचा ठावठिकाणा कळला. माझ्या  स्मृतींना प्रेमाचा  उजाळा देणारी, वडिलांच्या सहवासाचा आनंदमय इतिहास ज्यागृत करणारी व्यक्ती, मी गमाऊ इच्छित नव्हतो. अचानक भेटली व गायब झाली असे होऊ नये. त्या आनंदायी   आठवणी मला जिवंत ठेवायच्या होत्या. आठवणीसाठी माणसे  आपल्या प्रेमाच्या  माणसांच्या तसबिरी भिंतीवर टांगतात. दृष्टी समोर नसलेल्यांना सतत जागृत  ठेवतात. क्वचित प्रसंगी हेच कार्य कुणाचे पुतळे करतात. केंव्हा केंव्हा  तर अशा  व्यक्तींच्या कांही वस्तू जसे काठी, चष्मा पेन कपडे इत्यादी  तुम्हास त्यांच्या  काल्पनिक सहवासाचा लाभ देतात. 
त्या प्रसंगानंतर मी त्यांना बराच वेळा बघितले. फक्त येथेच थांबलो. त्यांना भेटणे, त्यांची ओळख वाढविणे, त्यांचा सहवास जवळून घेणे, हे टाळले. एक भीती वाटत  होती की त्या अनामिक व्यक्तीच्या जवळीकतेने मला त्यांच्या बाह्यांगा प्रमाणेच अंतरंग कळेल. त्यांच्या स्वभावगुणाच्या मी जवळ जाईन. कदाचित हे धोक्याचे ही ठरू शकेल.
ईश्वराने जी प्रचंड जग निर्मिती केलेली आहे, त्यात विविधता  हाच त्याचा  कलागुणांचा अविष्कार  आहे. जगण्याचे आणि आपसातील प्रेमाचे ते एक महान तत्व ठरू शकते. जर सारखेपणा  हा खूपच प्रमाणात दिसून आला तर तो मनातला आनंद नष्ट करण्यास करण्यास कारणीभूत होईल. मला भेटलेल्या  त्या अनामिक व्यक्तीच्या बाह्य ठेवणीमध्ये  ज्या लकबी आढळल्या, त्या मला आठवणीच्या भूत काळात नेवून आनंदित करीत होत्या, येथपर्यंत  ठीक होते.  पण जर मी त्या व्यक्तीचा स्वभाव विशेष बघितला तर माझ्या मनांत त्यांच्या विषयी कोरली गेलेली माझ्या वडिलांची छबी कदाचित एकदम बदलून जाईल. आणि हा बदल कायम स्वरुपीही असेल.  निसर्गाने एक गम्मत म्हणून  कां होईना जी व्यक्ती माझ्या समोर उभी केली, तिला मी तेवढ्याच अंतराने आणि तेवढेच समजून आनंद घेऊ इच्छितो. फक्त एक आठवण चाळवणारे अनामिक.     
 
( ललित लेख )
 
 
 
 

लग्नाचा वाढदिवस

४४ वर्षे एकत्र  नांद्लो       
आयुष्यातील मार्गप्रवाही                     
कसा काळ निघूनी गेला 
केव्हांच समजले नाही          १  
 
काळ विसरलो परी वेळ न विसरे 
क्षणा क्षणाच्या   प्रसंगांची  
सुख दु:खानी भरलेल्या
अनेक अशा घटनांची        २
 
सैल झाला जीवन गुंता
कधी तो गेला आवळूनी  
उकलणार नाही कधीच तो
जाणीव आली मनी       ३
 
हेच असेल विधी लिखित 
जिंकणे वा हारणे
आयुषाचा मार्ग खडतर
समजुनी त्याला घेणे      ४
 
सुख अथवा दु:खमय लहरी
विचारांच्या चेतना
मीच करतो मीच अनुभवतो 
हीच दैवि योजना        ५
 
तुटू न देता आयुष्य दोर 
जगणे व्हावे वर्षे शंभर 
असेच जगू एकत्र मिळूनी 
काळ चालतो भराभर     ६  
 
( कविता )
 
 
 

सब खाओ ! मगर मेरा भेजा मत खाओ

डॉक्टर आर. डी. लेले हे आंतरराष्ट्रीय   कीर्तीचे चीकीत्सक   Physician म्हणून प्रसिद्ध. ते भारताच्या राष्ट्रपतीचे विशेष आरोग्य सल्लागार म्हणूनही नांव लौकिकाला आलेले. त्यांच्या सुरवातीच्या सेवेच्या काळांत  ते औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात  प्राध्यापक होते.  ते अतिशय उत्तम शिक्षक  होते. प्रत्येक  विषयाची उकल अगदी सहजतेने व विद्यार्थ्याला  व्यवस्थित  लक्षांत यईल ह्या पद्धतीने त्यांची शिकवण्याची हातोटी होती. विषयाला  कंटाळवाणे न होऊ देता  अधून मधून  मार्मिक विनोद करणे  ही त्यांची पद्धती होती.  एके दिवशी ओ. पी. डी. (Out Patient Department )   मध्ये ते पेशंटला तपासत होते. विद्यर्थ्यांचा एक  गट त्यांचे मार्गदर्शन  ऐकत  होता.  प्रत्येक रुग्णाला तपासून त्याला वैद्यकीय सल्ला देत असताना, विद्यार्थ्यांना त्याच्या रोगा विषयी टिपणी करून समजून सांगत होते. एक मुसलमान महिला  आपल्या  मुलाला घेऊन आली होती. तपासणी  झाली,  रोग निदान झाले. तिला मार्ग दर्शन करून औषधी लिहून दिली गेली. विद्यार्थ्याकडे  वळून ते त्या रोगावर चर्चा  करु लागले. ती तिच्या मुलाला घेऊन जाऊ  लागली.  
परंतु लगेच थांबून तिने विचारले ” लडकेको खानेको तेल घी दे  सकते   क्या ?”
डॉक्टर लेले   ”  हां दे सकते “. डॉक्टर लेले पुन्हा विद्यार्थ्याकडे वळून शिकऊ लागले. परंतु तीच बाई परत आली व विचारू लागली. ” डॉक्टर साहेब क्या  लडकेको  अंडा, मटण, ये दे सकते क्या?”  ते तिच्याकडे मानेने वळून म्हणाले  ” चलेगा दे सकते. ”  आणि पुढे शिकवणे चालू ठेवले. आश्चर्य म्हणजे तिच्या शंका  अद्यापि संपल्या नव्हत्या. पुन्हा ती परतून आत आली. तिला बघताच डॉक्टर लेले एकदम म्हणाले  
 ” देखो बहनजी आप हर चीज खाओ मगर मेरा भेजा मत खाओ.
एकदम सर्व  विद्यार्थ्यामध्ये  हास्याचा   स्फोट झाला.   
 
(ललित लेख )               
                                        
 
 

बहिरा ऐके कीर्तन

 गम्मत वाटली प्रथम मजला       बहिरा ऐके कीर्तन
अश्रू वाहू लागले माझे नयनी      भाव त्याचे जाणून
नियमित येई प्रभूचे मंदिरी         श्रवण करी कीर्तन
केवळ बघुनि वातावरण ते          तल्लीनच होई मन
सतत टिपत होते मन त्याचे        इतर मनांचे भाव
केवळ जाणण्या भगवंताला           डोळे आतुर सदैव  
रोम रोमातून शिरत होत्या           प्रभू निनाद लहरी
संदेश प्रभूचा पोह्चूनी                  आत्म्यास जागृत करी
होऊन गेला प्रभूमय बहिरा            धुंद त्या वातावरणी 
ऐकत होता तो शब्द प्रभूचे           श्रवण दोष असुनी
 
(कविता)
 
 
 
 

काळाची काठी!

एका सभागृहामध्ये सत्संगचा कार्यक्रम होता. मी त्याचा आस्वाद घेण्यसाठी गेलो होतो. हालके हालके श्रोते जमू लागले. प्रवेश दारावर मी आलो. अचानक माझी नजर एका छोट्या किड्यावर पडली. दाराच्या बाजूस तो पडला होता. त्याच्या हालचाली वरून त्याला दुखापत झालेली असावी असे वाटले. त्याची तगमग चालू असून तो उलटा पडलेला होता. त्याच्या अवस्थे विषयी भूतदया वाटली. क्षणात एक विचार आला की हा किडा दाराजवळ पडलेला आहे, लोकांची जा ये चालू आहे. दुर्दैवाने कुणाच्यातरी पायंदळी तो चिरडला जाईल. मी त्याला एका काडीवर उचलून बागेतल्या एका छोट्या झाडावर नेऊन ठेवले. मानसिक समाधान वाटले, की आपण त्याला त्यावेळी तरी मृत्यूपासून दूर नेले. पण केवळ कांही क्षणच गेले असतील, एक पक्षी तेथे झेपावून आला व त्याने त्या किड्याला अलगद उचलून नेले. एका जीवाचा अंत होताना दिसला. माझे मन खंतावले. माझा तर्काधीष्टीत हिशोब चूक वा बरोबर? समाधान हे देखील एक मानसिक शास्त्र असते. निर्माण झालेली परिस्थिती माणूस बदलू शकत नाही. परंतु त्याला वेगळा मार्ग देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या विचारांचे जे स्तर असतील त्याप्रमाणे तो योजना आखण्याचा विचार करतो. निसर्गाला मात्र तसेच अभिप्रेत असेल असे नाही. निसर्ग आपली चाल त्याच्याच पद्धतीने चालू ठेवतो. येथेच वैचरिक विविधता निर्माण होते. काळाच्या हाती एक दंडक (काठी) असतो असे म्हणतात . ज्याच्या एका टोकावर स्थळ व दुसऱ्या टोकावर वेळ ही कोरलेली असते. जेंव्हा एक टोक स्थळ निर्देश करते, त्याच वेळी दुसरे टोक वेळेची चाहूल टिपते. जीवनाच्या अंतिम मार्गावर स्थळ आणि वेळ यांची विधात्याने नोंद केलेली असते. म्हणूनच ते प्रत्येकाला अनिश्चित घटना परंतु निश्चत सत्याकडे नेते. काळाचा दंडक स्थळ व वेळ ह्याची जेथे गांठ पडेल तेथेच आघात करतो.

 

 

बघून सूर्यपूजा पावन झालो

हांसत  आली सूर्य किरणे
झरोक्यातून देव्हारयांत
नाव्हू घालूनी जगदंबेला
केली किरणांची बरसात
 
पूजा केली किरणांनी 
जगन्माता देवीची
प्रकाश  स्पर्शुनी  चरणाला 
केली उधळण सुवर्णांची 
 
तेजोमय दिसू लागले 
मुखकमल जगदंबेचे 
मधुर हास्य केले वदनी 
पूजन स्वीकारते  सूर्याचे 
 
रोज सकाळी प्रात:काळी 
येउनी पूजा तो करितो 
भाव भक्तीने दर्शन देउन 
स्रष्टीवर किरणे उधळतो 
 
कोटी कोटी किरणांनी 
तो देवीची पूजा करितो
केवळ त्याची पूजा बघुनी 
मनी पावन मी होतो  
 
 
(कविता )
  
 
 

गांवमामा

हा  एक सत्य घटनेवर आधारित प्रसंग
गोविंदमामा हे खऱ्या अर्थाने  गांवमामा   झालेले होते. शिकलेले आणि तडफदार व्यक्तिमत्व. अतिशय प्रेमळ स्वभाव आणि त्यागवृत्ती. कुणीही समोरच्या व्यक्तीबद्दल आदरभाव, मदत करण्याची आंतरिक  इच्छा आणि सदैव हासत आनंदी स्वभाव. सर्वच सदगुणांचे  मिश्रण क्वचितच एका व्यक्तीच्या अंगी सापडणे सहसा कठीण. म्हणूनच त्यांना  आपल्या वागनुकीने सर्व समाज अर्थात  ते रहात असलेले खेडेगांव गोविंदमामा ह्या टोपण नावानी संबोधित असे. स्वतःचे घर व कांही एकर जमीन होती. मुलगा व पत्नी जानकीबाई एवढाच  परिवार. लहान कुटुंब व सुखी कुटुंब ह्या व्याख्येमध्ये सीमित.शेती हा प्रमुख    व्यवसाय होता. गांवातील लहान सहान कामे करून पैसे मिळत ते मिळवीत.  मुलगा मोठा झाला. शहारांत जाऊन वेगळा व्यवसाय करू लागला. शेती करण्यात त्याला न रुची ना सवड. लग्न झाल   स्वत: चा वेगळाच संसार  शहरामध्ये थाटला. आधुनिकतेमध्ये  जाण्यात  आनंद घेत असे ज्या गोष्टी  खेड्यात त्याला मिळत नव्हत्या  त्या  सर्व शहरी जीवनात मुबलक   मिळू लागल्या. त्याला दोन मुले झाली.  गोविंद मामा व जानकीबाई  दोघेच खेड्यात रहात होते. सर्व गावाला भूषण  असलेले व सतत आनंद देणारे गोविंदमामा गांव मंडळीना उत्तम संस्कार  देण्यात यशस्वी झाले. परंतु आपल्या स्वता:च्या मुलाला आपुलकी व सह जीवनाचा पाठ शिकऊ शकले नाही. तो अलिप्त रहाण्यात  समाधान  मानीत  होता. 
गोविंद मामांचे अकाली निधन झाले. त्यांच्या पत्नीवर जणू आकाश कोसळले. परंतु काय करणार. मुलाचा आधार  असून तिला मिळाला नाही. अच्यानक एक दिवशी त्यांना शासकीय पत्रक  मीळाले.  त्यांच्या खेडे गांवाजवळून  एक पाण्याची  मोठी धरण योजना  शासनाने आखली होती. गोविंद मामाची शेती त्या योजना अंतर्गत शासकीय कार्यसाठी जमा केली जाणार असल्यची नोटीस होती. जानकीबाई साठी ते संकटच  होते. गोविंदमामानी जे प्रेम गांवात पेरले होते, त्याला चांगलीच फळे येणार होती. सर्व गांवकरी एकत्र जमा झाले. त्यांना धरण  योजने बद्दल सहानुभूती होती. ती योजना राबवावी परंतु त्याच वेळी जानकीबाईना   त्यांच्या शेतीची योग्य व चांगली किंमत दिली जावी हा त्यांचा प्रयत्न.
 होता. सर्वजन एक झाले. प्रकरण थेट  मंत्र्यापर्यंत  मंत्रालयात गाजले. प्रचंड धावपळ व प्रयत्न झाले. जानकी बाईंच्या नावे त्या शेतीच्या मोबदल्यात २६ लाख रुपयाचा धनादेश जरी केला गेला. शेती जी कोणतेही उत्पन्न देत नव्हती, केवळ डोंगराळ भागाजवळ असल्यामुळे धारण योजनेत गेली. परंतु एक प्रचंड रक्कम जानकी बाईना देवून गेली. गोविंद मामाचे प्रेम आणि  गांवमामा बनण्याचे योग्य इनाम देऊन गेले. त्यांच्या पश्च्यात  जानकीबाई त्या ठेवीच्या  व्याजावर समाधानी जीवन जगत होत्या.  
 

रिक्त प्रेमाचा घट

रिक्त प्रेमाचा घट     
रिक्त झालीस तू ,  लुटवूनी प्रेमाचा घट  //    
भावंडाचे संगोपन 
रमवूनी त्यांचे मन
आईच्या  कामी मदत देऊन 
आनंदिले बालपणी, गीत गावूनी नीट  //१//  
रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट 
 
लक्ष्य संसारी
प्रेम पतीवरी
मुलांची जोपासना करी
संसार सुखाचे प्याले, भरी काठोकांठ //२//
 रिक्त झालीस तू ,  लुटवूनी प्रेमाचा घट 
 
होता मुले मोठी
संसार त्यांचा थाटी
राहुनी त्यांचे पाठी 
सुखासाठी त्यांच्या,  करी देहकष्ट   //३//
रिक्त झालीस तू ,  लुटवूनी प्रेमाचा घट 
 
ईच्छा उरली नसे मनी
लक्ष्य सारे प्रभू चरणी 
सर्वस्वी त्यासी अर्पुनी 
विनवी ईश्वारासी,  डोळे आता मिट  //४//    
रिक्त झालीस तू ,  लुटवूनी प्रेमाचा घट 
 

(कविता)

माझ्या सोनूला पोलिओ डोस पाजा !

रविवारचा दिवस, ठरल्या प्रमाणे सर्वत्र पल्स पोलिओ देण्याचा दिवस होता. दारावर शासनाच्या आरोग्य खात्यातील दोन कर्मचारी, पोलिओ लस देण्यासाठी आले होते. त्यांनी घरांत पांच वर्षापर्यंत कुणी बालके आहेत कां ? म्हणून चौकशी केली. मी लगेच पुढे झालो व माझ्या नातीस बोलावले.  तिने नुकतेच चार वर्षे पूर्ण केले होते. तिला त्यांनी पोलिओचा डोस पाजला. त्यांनी  तिचे नांव लिहून घेतले. पुन्हा त्यांनी विचरण केली की ” घरांत आणखी कुणी लहान मुल  आहे कां? ”    आम्हाला न सांगताच , मानसी, माझी नात घरात गेली व लगेच परत आली. ती त्यांना विचारू लागली ” काका  माझ्या सोनुलापण पोलिओचा डोस देणार कां? ” थोडेसे कौतुक परंतु संभ्रमित होऊन ते तिच्या प्रश्नाकडे निरखून बघू लागले. आपल्या हातातील बाहुली उंचावून  दाखवीत ती म्हणाली ” ही माझी सोनू ” 
 आणि सर्वजणच हास्याच्या लाटेत वाहून गेलो. कालचक्राचा वेग बघून  खूपच  आश्चर्य  वाटते. लहान मुलांचे बोल ऐकून  त्यांच्यातील वैचारिक समज ही अनेक वेळा चकित करून टाकते. केंव्हा केंव्हा त्यांत विनोद ही निर्माण होतात. दूर दर्शन आणि त्यावरील जाहिराती मुलांना मुखोतगत होऊ लागल्या 
आहेत. त्या सुरांत म्हणताना एक आनंद लुटीत असल्याचे अनेकदा दिसते.  नातीने जी विचारणा केली होती, त्यात सत्य होते, चौकस बुद्धी होती, त्यात सहजता होती. विनोदी  बोलण्याची इच्छा नव्हती, परंतु जे तिने विचारले, त्यात विनोद झाला होता.  
जेष्ठाच्या  ह्याच चौकशीला मार्मिकता व गम्मत म्हणून  ठरविले   गेले असते.   कसे कां होईना  ऐकनाऱ्याला ते आनंदच देणार नाही कां?
 
 
 

धरणीकंप

कांपू नकोस धरणीमाते 

 ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते //दृ //

जागो जागी अत्याचार 
सर्वत्र दिसे भ्रष्टाचार    
वाढले भयंकर अनाचार 
गरीब जनता त्रस्त होऊनी जाते  
ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते  //१//
 
रक्षण नाही स्त्रियांचे 
प्रमाण वाढले बलात्काराचे
प्रकार घडती विनयभंगाचे
हतबल होऊनी स्त्री अश्रू ढाळते
ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते  //२//
 
लुट लुट संपत्तीची
जाळपोळ घरदारांची 
खून पाडती जीवांची 
प्रेमभावना उरली नसे ह्या जगाते 
ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते  //३//
 
गीतेमध्ये दिले वचन
अर्जुनासी प्रभूचे  तोंडून
प्रभूचे होईल पुनरागमन
अत्याचार वाढता जगाते
ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते  //४//
 
शब्द आपला पाळूनी 
येईल  तो अवतार घेउनी
सुखी करील दु:ख नाशूनी  
विश्वास ठेवा गीतेतील शब्दाते
ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते  //५//
 
ठेवा निर्मळ देह आणि मन  
पवित्रतेचे करा वातावरण     
टाळू नका ह्या स्वागत संधीते
ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते   //६//
 
(कविता)