Monthly Archives: फेब्रुवारी 2014

भाकरीसाठी मिळाला मार्ग.

जीवनवाच्या रगाड्यातून-

भाकरीसाठी मिळाला मार्ग.

रेल्वे स्टेशनलगतच्या पाऊल वाटेवरुन जात होतो. एका वयस्कर माणसाने माझे लक्ष्य वेधून घेतले. त्याच्या हातात मोठी प्लास्टीकची थैली होती. तो रेल्वेच्या मार्गावर पडलेल्या प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या वेचून, त्या थैलीमध्ये जमा करीत होता.माझी ऊत्सुकता जागी झाली. त्या माणसाला थांबवून मी चौकशी केली. अनेक प्रवाशी आजकाल पाण्याच्या बाटल्या खरेदी करतात. रिकाम्या झालेल्या बाटल्या चक्क रेल्वे मार्गावर फेकून देतात. हा त्या रिकाम्या झालेल्या बाटल्या, भंगारच्या दुकानाला नेऊन विकत असे. त्याने सांगितल्या प्रमाणे, तो दुकानदार त्या बाटल्या, प्रति किलो प्रमाणे विकत घेतो. साधारण ११० ते ११५ बाटल्याना शंभर रुपये पर्यंत त्यांत उत्पन्न होते.

टाकाऊ वस्तूंचे Recycle करुन पुन्हा त्याचा उपयोग केला जातो.

आपल्याकडे अशी अनेक धातू जसे तांबे, जस्त, लोखंड इत्यादी वस्तू टाकाऊ झाल्यास त्यानाही त्यांच्यापरी मोल असते. ते सामान्यजनाना मिळते. विकसीत झालेल्या परदेशांत ही संकल्पना नाही. भंगार खरेदी विक्री यांचे दुकान नसते. कोणतीही वस्तू नादुरुस्त झाली की ती पुन्हा वापरणे ही क्रिया तिकडे दिसून येत नाही. Use and Throw  अर्थात वापरा आणि फेकून द्या. तेथील स्थानिक शासन अशा वस्तू एकत्र करुन त्याचे  Recycle करीत. भंगारवाले वा मध्यस्ती नसल्यामुळे सामान्य माणसाना साऱ्या नादुरुस्त वस्तू चक्क टाकून द्याव्या लागतात. ह्या बाबतीत आपणाकडे बरे असते. असे म्हणावे लागेल. आपला विकसनशील देश आहे. गरीबी, बेरोजगारी, यांनी अनेक कुटुंबे हैराण झालेली आहेत. त्यामुळे हा भंगार व्यवसाय देखील गुंतवणूक व कामधंदा यांना पुरकच आहेत.

कांही दिवसांत मी ती घटना विसरुन गेलो. सकाळची वेळ होती. मी फिरावयास गेलो होतो. अचानक एक अनामिक इसम माझ्या समोर उभा राहून, खाण्यासाठी दोन तीन रुपये मागू लागला. त्याच्या कपड्यावरुन, अवतारावरुन तो कदाचित् भिकारी असावा. असे वाटले. तशी त्याची शरीर प्रकृती बऱयापैकी होती. परंतु परिस्थितीने गांजला असावा. बाहेर गांवचा दिसत होता.

मला एकदम कांही दिवसापुर्वी रेल्वेमार्गावर प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या जमा करणाराची आठवण आली. ” मी तुला दहा रुपये देतो. पण त्यासाठी तुला एक काम करावे लागेल.”  तो एकदम तयार झाला. काम धंद्याच्या शोधांत होता. काम मिळत नव्हते. हतबल झालेला वाटला. परक्या ठिकाणी असल्याची जाणीव होती. ” चल मज बरोबर. मी तुला एक काम देतो.” तो मज बरोबर येऊ लागला. जवळच असलेल्या रेल्वेस्टेशनच्या परिसरांत आम्ही आलो. मज जवळ सामान आणण्यासाठी कांही पिशव्या होत्या. त्यातील एक मोठी पिशवी मी त्याला दिली.

मला रेल्वेमार्गांत कांही रिकाम्या प्लास्टीकच्या बाटल्या दिसल्या. त्याला त्या जमा करण्यास सांगीतले. ह्याच  प्रमाणे सभोवतालच्या परिसरातील पडलेल्या रिकाम्या बाटल्या गोळा करुन आणण्यास सांगितले. मी तेथे एका दगडावर बसून त्याच्या हालचालीकडे बघत होतो. त्याला हे अपरिचित असावे असे वाटले. पण आपणास दहा रुपये मीळणार ह्या आशेने तो त्या बाटल्या जमा करु लागला. अर्धापाऊण तासाने तो परत आला. त्याने जमा केलेल्या बाटल्या घेऊन आम्ही जवळच असलेल्या भंगारच्या दुकानांत गेलो. एकूण ५६ बाटल्या जमा केल्या गेल्या होत्या. दुकानदाराने त्याचे ५० रुपये दिले. मी ते पैसे त्या वेळी त्याच्या हातीं ठेवले. दहा रुपयांची अपेक्षा मनी बाळगुन असलेल्या त्या माणसाला, हाती पन्नास रुपये मिळतांच त्याचे डोळे भरुन आलेले जाणवले.

खरा आनंद त्याला झाला होता, ते एवढे पैसे मिळाले म्हणून नव्हे. तर असे पैसे कसे कमवावे ह्याचे अत्यंत साधे मार्गदर्शन मिळाले ह्याबद्दल. परिस्थितीने तो गांजला होता. सामाजीक घडी त्याला उदरनिर्वाह करण्यास अक्षम झाली होती.

खाण्यासाठी त्याला इतरासमोर हात पसरण्याची वेळ आली होती. अचानक भाकरीसाठी अर्थात जगण्यासाठीचा एक मार्ग त्याला मिळाला. त्याच्या आशा पुलकित झाल्या होत्या. मला अभिवादन करीत तो निघून गेला.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

३३८ मीरेची तल्लीनता

 

३३८  मीरेची तल्लीनता

नाच नाचती तालावरती

मीरेची पाऊले

चित्त ते हरीमय जाहले. – – – धृ

लागला प्रभुचा ध्यास

हरि दिसे नयनास

चलबिचल नजर होऊन

अंग सारे मोहरले   – – -१

चित्त ते हरीमय जाहाले

न राही आपले भान

झाली भजनी तल्लीन

तनमन प्रभुचे ठायी जाता

संसार ते विसरले.  –  –  – २

चित्त ते हरीमय जाहाले

विषाचा घेता प्याला

हरि तो त्यातची दिसला

झेपावूनी गेली त्याच क्षणी

घट घटा प्राशन केले. – – –  ३

चित्त ते हरीमय जाहाले

जहाल होते विष

मृत्युचा तो पाश

प्रभूभक्तीच्या शक्तीने परि

अमृत ते बनले  – – –  ४

चित्त ते हरीमय जाहाले

डॉ. भगवान नागापूरकर

 ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

निर्णय

निर्णय

 

रसत्यावरच्या हातगाडीवरील केळीवाल्याकडे मी केळी घेत होतो. त्याला पैशांची मोड देत असताना, त्याचे लक्ष्य नाही, हे बघून एका ९-१० वर्षाच्या मुलाने, त्याच्या गाडीवरील दोन केळी उचलून घेतली. मुलगा लपून जाऊ लागला.

“बघ त्या मुलाने तुझी केळी घेतली व तो चालला.”   सामाजिक जाणिवेने एकदंम प्रेरीत होऊन, मी ते त्या केळीवाल्याच्या  निदर्शनास आणून दिले. केळीवाला धावत गेला. त्याने त्या मुलास पकडून एक शिवी हसडली. व केळी हिसकाऊन परत आला. “फार हरामखोर असतात हो ही मुले.” पुटपुटत माझे आभार मानले.

मी केळी घेऊन निघालो. मनाला एक समाधान होत असल्याची जाणीव होत होती. एक तर त्या मुलास पकडवून शिक्षा देवविली. अप्रत्यक्षपणे चोरी करणे वाईट, ही जाणीव करुन दिली. शिवाय केळीवाल्याचे होऊ घातलेले नुकसान पण टाळले.

थोड्याश्या अंतरावर गेल्यावर, तोच मुलगा ऊभा असलेला मला दिसला. माझ्या समोर येऊन मला म्हणाला   “आजोबा काय मिळवलत मला पकडवून देवून. मी सकाळपासून ऊपाशी होतो. दुसऱ्या गावाहून येथे आलो. मजजवळ पैसे नव्हते. नाईलाज म्हणून मी हे केले.”      त्याच्या डोळ्यांत सत्याची चमक होती. परिस्थितीची जाण होती. अपराधित्वाची भावना होती. परंतु भुकेपुढे तो हतबल झालेला होता. क्षणार्धांत माझे डोळे पाणावले. मी चटकन तीन केळी काढून त्याच्या हाती दिली.

अशांत, तरीही एका वेगळ्याच समाधानांत मी निघालो. दोन्हीही वेळचे माझे निर्णय मला समाधान देऊ बघत होते. मनाची चलबिचल वेग धरु लागली. माझा निर्णय सामाजिक चौकटीवर आधारलेला होता. जो की मानव निर्मित  होता. परंतु त्याच वेळेला निसर्गाला कांही वेगळच अपेक्षित होत.

एक जगप्रसिद्ध निसर्ग शास्त्रज्ञ डार्विन म्हणतो

” निसर्ग सदा सुचवित असतो. अस्तित्वासाठी आणि जगण्यासाठी झगडणे गरजेचे ”

” Theory of Darwin says Struggle for Existance & Survival of fittest”

बरेच दिवस मी माझ्या या निर्णयावर बैचेन होतो.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com