Monthly Archives: जुलै 2012

* पडछाया!

*   पडछाया!

चालत असता संथ गतीने, एका वाटेवरती

संगे माझ्या, माझी छाया,  मागून येत होती.

वेगामधली बघुनी तीव्रता, ती ही वाढावी वेग

खंड न पडता साथ देणे, हेच तिचे अंग

तळपत असता रवि आकाशी, जवळ ती आली

समरस होण्या माझ्यामध्ये,  पायी घुटमळली

ढळू लागला सूर्य हळू हळू, पश्चिम दिशेला

प्रकाशातील तीव्रपणा तो कमी होऊ लागला

पडू लागले पावूल माझे मंद मंद आता

श्रमलो दमलो बसलो खाली, अंधार तो होता

दूर दूर ती जावू लागली, छाया मजला सोडूनी

काळोखाच्या गर्भामघ्ये, गेली ती विरुनी

एकटाच मी होतो तेथे, अंधाऱ्या रात्री

प्रकाश्यातली साथ लाभली, ती छाया नव्हती

सुखामधली सोबत सुटते,  दु:खाच्या वेळी

सगेसोयरे साथ सोडती, पडत्या संकट काळी

पहाट होता बघू लागलो, पुनरपि छायेला

सोडून गेली रात्री, त्याचा निषेध नोदविला

 छाया म्हणते:

रविकिरणांच्या संगे गेली, मीही त्यांच्या  मागे

आठव देण्या रवि उदयाची,  त्याला मी सांगे

तुझे नि माझे अतूट नाते, त्याच्या अस्तित्वाने

पुनरपि आले  तव सहवासे, त्याचाच साक्षीने

( कविता )

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

* आजी ग आजी!

*   आजी ग आजी!

सर्वाना आपली आजी खुप आवडत असते. जेथे फक्त प्रेम व माया भरपूर प्रमाणात तुमच्यावर सतत बरसत असते. त्यात कोणताच राग नसतो. शिस्त लावण्याची गरज भासण्याची वृत्ती नसते. कोणताही लोभ व्यक्त झालेला दिसत नाही. फक्त निर्मळ प्रेम. वासना विकार रहीत. कदाचित हे वयाचे व परिस्थितीचे गुणधर्म असू शकतील. आजी म्हणून ती जी भूमिका करते, ती एकदम त्यात एकरूप होऊन गेल्या प्रमाणे भासते. लहान मुलगी कुमारिका विवाहित स्त्री माता, ह्या सर्व भूमिका, तिने जगाच्या व्यासपिठावर  केलेल्या  असतात. तिने जीवनाचा  संसारिक अनुभव अनेक प्रसंगातून घेतलेला असतो. आजपर्यंत ती जीवनाची गाठोडी, केवळ जमा करण्यातच  व्यस्त होती.  आज्ञा ऐकणे पाळणे,  वा  करणे,  ह्याच कार्यचक्रात ती गुंतलेली होती.   आता ती परिपक्व भूमिकेत आलेली आहे. येथे जे जे आजपर्यंत जमा केलेले होते ते सारे वाटीत जाणे आता तिचे काम झाले आहे. निसर्ग चक्रानुसार घटनाची सतत पुनुरावृती होत असते.  तशाच गोष्टी थोड्याश्या फरकाने होत असतात. ज्या इतरांना सर्वस्वी नवीन व वेगळ्या वाटणाऱ्या असतात, त्याचा आंतरिक गुंता आजीच्या अनुभव चौकटी मधलाच असतो. त्यामुळे त्याचा धागा तिच्या लक्षात येत असतो. अनुभवाच्या मार्ग दर्शनाचे पैलू येथेच मदत करतात.

आज मला माझ्या बालपणीची आठवण झाली. मी त्यावेळी दहा वर्षाचा असेन. मला शिकवण्यासाठी  एक शिक्षक  ( त्यांना आम्ही गुरुजी  म्हणत असू ) घरी येत होते.   चांगले शिक्षक परंतु अतिशय शिस्तप्रिय व कडक अश्या स्वभावाचे होते. त्याकाळी मुलांना त्यांच्या चुकाबद्दल बेशिस्तपनाबद्दल सतत मार बसे. रागावले जायचे. कोणतीही गोष्ट मुलांना समजावून सांगणे,  त्यांच्या भावना जाणणे, ह्याबाबतीत पालकांना, शिक्षकांना, आणि कोणत्याही वडील व्यक्तींना मुळीच आस्था नव्हती. हा केवळ वेळ व्याया घालविण्याचा मार्ग आहे ही त्यांची धारणा असे. ” छडी लागे  छम छम,  विद्या एयी घम घम.”  ह्या पुर्वकालीन तत्वज्ञानात त्यांचा विश्वास होता. त्याच प्रसंगी योग्य वेळी योग्य शिक्षा ही धाक व शिस्त निर्माण करते ही त्यांची अनुभव संपन्न समजूत होते. ( आता काळ पूर्ण बदलला, शिक्षक बदलये, आणि विद्यार्थीही.).

माझे शिक्षक अर्थात पूर्वकालीन होते. रोज रात्री सात वाजता ते एकतास शिकवीत असे. त्या वेळचे पाठ शिकवीत व गृहपाठ देत असे. बालवय  व विद्यार्थी म्हणून अनेक चुका करीतच शिक्षणाचा मार्ग चालला होता. मात्र चुकले की ” गाढवा, मूर्ख ” असल्या शिव्या ते देत व अधून मधून पाठीत धपाटा ही लागावीत. मी निराश होत होतो. केव्ह्ना केव्ह्ना रडू येत होते. परंतु   ” रडतोस काय असा ?” म्हणून त्यावरचा शांत करण्याचा उपाय म्हणून आणखी एखदा धपाटा पाठीत बसत असे. शिकणे तसे सारे दिव्यच  होते.   त्या वेळेला कळवळंल्याच्या आजही आठवणी येतात व हसू येते.

माझी वेगळी  खोली  होती. खाली सतरंगी अंथरून आम्ही बसत असू. एक दिवस अचानक माझी आजी तेथे आली. तिच्याजवळ कापूस होता. ती वाती व फुलवाती करीत तेथेच बसली. नेहमीच्या सवयी प्रमाणे, माझे चुकतच “ गाढवा ही बेरीज अशी होती का?”  म्हणत गुरुजींनी  माझा कान पिळला व मला धपाटा लगावला. मी कळवळंलो. मला रडू आले. आजी जवळ होती. तिला वयाचा एक अलिखित अधिकार  मिळालेला होता.  ती उसळून गुरुजीना म्हणाली “ अहो एवढे काय मारता त्या लहान मुलाला. चुकला असेल तर समजावून सांगा.”  गुरुजी एकदम सटपटले. त्यांनी उत्तर दिले नाही. मात्र त्यानंतर त्यांच्या वागण्यातला झालेला बदल जाणवला. आता आजीच्या केवळ तेथे अस्तित्वामुळे वातावरण बदलल्याचे माझ्या लक्षात येऊ लागले. शिक्षेऐवजी प्रेमळ शब्दात  समजावणे हे होऊ लागले. दुसऱ्या दिवसा पासून सतरंजी टाकून ठेवणे, वह्या पुस्तक पेन्सिल घेणे, ह्याच बरोबर ताटात कापूस, वाटीत थोडीशी रांगोळी आणि खिडकीजवळ आजीसाठी पाट ठेवणे हे आठवणीने केले जायचे. कदाचित त्यासाठीच व अशाच प्रसंगांना आई बाबा पासून वेगळ्याच संरक्षणाची भिंत बनणारी आजी मला खूप आवडायची.

(ललित लेख)

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

* सोनेरी तसवीर !

*   सोनेरी तसवीर !

त्रेसष्ठ सालची गोष्ट आठवली. पुण्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात एका कॉन्फरन्स साठी गेलो होतो. त्यावेळी विद्यालयाच्या       ग्रंथभांडारात जाण्याचा योग आला होता. अतिशय भव्य आणि प्रचंड असेते ग्रंथालय होते.  भरपूर वैद्यकीय आणि संलग्न विषयांची पुस्तके  मासिके कपाटामध्ये अतिशय व्यवस्थित ठेवलेली होती. ग्रंथालयात शिरताच भिंतीवर एक भव्य काचेची फ्रेम केलेली तसवीर दिसली. फ्रेमची चौकट सोनेरी असून, अतिशय आकर्षक होती.  मध्यभागी एका वहीचा वेडावाकडा फाडलेला कागद  चिकटवलेला  होता. त्यावर चार रेघोट्या आखून कसलासा आलेख काढलेला होता. अतिशय उत्कृष्ट सजविलेल्या कालाकृतीपूर्ण, अशा फ्रेम मधल्या त्या  लहानश्या  तुकड्याने, मनाची उत्सुकता शिगेला पोहोंचली. खालती टीप म्हणून एक संदेश होता.   वैद्यकीय शास्त्रातला एक महान संशोधक अलेक्झांदर फ्लेमिंग याने पेनिसिलीन  ह्या जीवदायी व मानववादी जीवसृष्टीला वरदान ठरेल असे औषध शोधून काढले. त्याच्या ह्या शोध कार्याची दाखल घेऊन त्याला नोबेल पारितोषिक ही दिले गेले.  त्यांनी भारताला भेट दिली, तेव्हा ते पुण्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात आले होते. जमलेल्या एका विद्यार्थी समुदायात अनौपचारिक गप्पा मारीत असताना, कुणीतरी त्यांना  पेनिसिलीन  विषयी  प्रश्न विचारला. एका विद्यार्थ्याच्याच हातातली वही घेऊन, त्यांनी चटकन छोटा ग्राफ काढला. आणि प्रश्नाची उकल केली. तोच तो भाग्यवान    कागदाचा तुकडा, ज्यावर त्या महान संशोधकाचे हस्तलिखीत उतरले होते. सोनेरी तास्वीरीमधला ग्राफ, वैद्यकीय इतिहासाच्या  पाऊलखुणा दाखवीत होता.

(ललित लेख)

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

* आनंद लुटणारे मन !

*   आनंद लुटणारे मन !

सहयोग मंदिर ठाणे, येते नुकताच जुन्या गाण्यांचा, संगीताचा बहारदार  कार्यक्रम झाला होता. सभागृह तुडुंब भरले होते. मी पण तो आस्वाद घेण्यासाठी गेलो होतो. सर्व श्रोत्यांना बसण्यासाठी भारतीय बैठक होती. माझ्यासमोर एक प्रौढ स्त्री बसलेली होती. तिच्या शेजारी दोघेजण होते. ती त्यांच्याशी अधून मधून संवाद करीत होती. सर्वजण त्या अतिशय मधुर संगीताचा आनंद लुटीत होते. परंतु  माझासमोर बसलेल्या त्या बाई थोड्याश्या जास्तच उत्साही  वाटत होत्या. त्यांच्या सतत हालचाली चालू होत्या. सहकाऱ्याबरोबर त्या प्रत्येक गाण्यावर  टिप्पणी करीत होत्या.  मान डोलावाने,  टाळ्या  वाजवणे, वाहवा ! म्हणत आपला आनंद व्यक्त करणे, चालू होते. “ काय गाण्याची चाल, किती सुंदर वाद्यसंगती जमली आहे, काय चांगली तान मारली आहे ह्यातील बासरी तर किती सुमधुर वाजवली, तबल्याचा ठेका कसा धरला आहे सतारीचे बोल किती मधुर जमलेत, पेटीवादन तर अप्रतिम साधले, शंकर जयकिशन याचं संगीत खूपच मनाला मोहून टाकते, नौशादअलीचे हे गाणे काय सुरेख  जमले —– एक नाही अनेक हालचालीच्या  पैलू  मधून त्या बाई आपले संगीतातले,  गाण्यामधले आत्मिक समाधान अभिव्यक्त करीत होत्या.  न जाणो मी मात्र त्यांच्या अतिउत्साहामुळे  निराशलो होतो.  कारण त्यांच्या सततच्या हालचालीमुळे माझे लक्ष विचलीत होत होते. संगीतातील मला मिळणाऱ्या आनंदात बाधा निर्माण होत होती. तरीही माझ्या मनाला आवर घालून सारे सहन करीत होतो.

कार्यक्रम संपला. सर्व श्रोते उठून जावू लागले. मी मात्र त्या बाईंच्या उत्साहाणे बेचैन झालो होतो.   शेवटच्या क्षणी  वैचारिक बांध फुटला. मी तिला विचारले. “ तुम्हाला संगीत कार्यक्रम खूपच आवडलेला दिसतो. परंतु  राग येणार नसेल तर सांगू का? तुमच्या सततच्या टिप्पणीमुळे  व हालचालीमुळे शेजारच्याना त्रास होतो का हे ध्यानात घेत चला. “   ती मागे वळून किंचित हसली. आभारी महाशय,  मी यापुढे काळजी घेईन. मी त्याक्षणी विसरले होते की  आपणामुळे  कुणाला त्रास होत असेल. “   ती शांत होती. मी उठून जाऊ लागलो. दाराजवळ गेल्यावर मी सहज मागे बघितले. मला जे दृश्य दिसले,  त्याने मला धक्काच बसला. तिच्याजवळ बसलेले दोघेजण तिला हाथ देवून उठवीत होते. त्यांच्या  खांद्याचा  आधार घेवून ती पाऊले टाकण्याचा प्रयत्न करीत होती. तिचे दोन्ही पाय अपंग झाले असावे.  माझ्या डोळ्यात  एकदम अश्रू आले. माझ्या विचारांची मलाच लाज वाटली. तिचे शरीर अपंग होते, पण मन किती तजेले, उत्स्ताही  होते. जीवनात निर्माण झालेली जबदस्त उणीव ते भरून काढीत होते. मनाची उभारी, आनंदाची फवारणी करून, कोमेजून जाण्याऱ्या शरीर संपदेला टवटवीत ठेवण्याचा    प्रयत्न  करीत होती.  फुलवीत होती. ह्या जगात जगायचे कसे? ह्याचा एक आदर्शवत संदेश देत होती.    

(ललित लेख)   

डॉ.भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

* चिखलातले कमळ

चिखलातले कमळ

जव्हार (  ठाणे  )   ग्रामीण रुग्णालय यामध्ये प्रमुख अर्थात  Medical Superintendent  म्हणून कार्यारात होतो.  रात्री दहाचा सुमार होता. मला सूचना मिळाली   की  दोन दिवसापूर्वी  ज्या बाईने एका निरोगी व गोंडस अशा मुलीला रुग्णालयात जन्म दिलेला होता,  ती बाई अचानक पळून गेली. धक्कादायक परंतु एक सत्य घटना होती. धावपळ झाली. सर्वांनी शोधा शोध केली. शासकीय स्थरावर जे करावयाचे ते केले गेले.

अतिशय दु:खद व मनास निराश करणारी घटना होती.  त्या बाईने हे सारे योजूनच केले असल्यामुळे,  नाव गाव पत्ता हे सारे असत्य होते. कोणता दोष त्या नवबालीकेचा ?  जन्मताच तिला तिच्या जन्मदात्या आईने तिला टाकून दिले. जगात जगण्यासाठी लढण्याचा संदेश देवून,  ती माय मावूली निघून गेली.  तिच्या सर्वतो वाढीसाठी योग्य ते प्रयत्न केले गेले. मुल वाढू लागले.  शुश्रुषा करणाऱ्यानी तिचे नाव दुर्गा ठेवले. कुणाचे प्रारब्ध्   कुणीही हिरावून घेवू शकत नाही. त्या लहान बालिकेच्या ललाटी जे निसर्गाने  लिहिले तेच तिला मिळणार. हे सत्य आहे.

एक दिवस एक प्रौढ जोडपे रुग्णालयात आले.  त्यांना मुलबाळ नव्हते.  त्या मुलीला ते दत्तक घेवू इच्छित होते.   स्थानिक श्रीमंत शेतकरी कुटुंब घरदार व स्वत: गेली दहा वर्षे अमेरिकेत  New Jersey   येते  मोठ्या      कंपनीत अधिकारी होते.  भारतात दर दोन वर्षांनी येत  असे. चर्चा झाली.  त्यांनी कायदेशीर अर्ज केला. सर्व संबंधित  शासकीय यंत्रने मार्फत परवानग्या मिळाल्या.  मुलीला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.  तीच मुलगी  करोडो  रुपयाच्या  संपत्तीची  कायदेशीर मालक बनली.  ह्याला काय म्हणावे?  निसर्गाची एक विचित्र परंतु आकर्षक  खेळी.  हृदह्याला   भिडणारी जीवनकथा.

सहा वर्षानंतर मुलीच्या फोटोचा अल्बम बघण्यात आला.  दत्तक मातापित्यासह तिचे अमेरिकेतील प्रशस्त बंगल्यातील फोटो, एक अलिशान मोठ्या गाडीत स्कूलयुनिफार्म मधले फोटो, जगप्रसिद्ध नायगारा धबधबा बघातानाचे फोटो, जगातले सातवे आश्चर्य Grand Canyon च्या विशाल सुळ्याकडे मान उंचावून बघतानाचे फोटो,  Washington येथील President’s  White House   बघातानाचे फोटो, अनेक अनेक छबीमध्ये तिचा भाग्य आलेख फुलविणारे प्रसंग बघण्यात आले. जे तिच्या झोळीत निसर्गाने ओंतले ते  कल्पनातीत होते

(ललित लेख)

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०