Monthly Archives: ऑक्टोबर 2010

सुप्त शास्त्रज्ञ !

बाबूची आज आठवण आली. संध्याकाळची वेळ होती. मावळत्या सूर्याची उन्हे व पाऊसाची झिम झिम सुरु होती. आकाशात इंद्र धनुष्याची सुंदर सप्तरंगी कमान दिसू लागली. बाबू एक चित्रकार होता. निसर्गाचा असला अविष्कार बघितला की त्याच्यातला कलाकार जागा होत असे. तो लगेच दिसणारे चित्र काढण्याचा प्रयत्न करी. बाबू माझा शालेय जीवनामधील मित्र. परंतु गरिबी मुळे  तो फक्त शालेय शिक्षणच पुरे करु शकला.  माझी आवड माझ्या स्वभावाची ठेवण  ही बऱ्याच अंशी त्याच्याशी  मिळती जुळती होती. म्हणून आमच्या दोघांचे बरेच सख्य जमले होते. तो स्वत: खूप कष्टाळू होता. इतरांचेही कामे  करण्यात  त्याला समाधान व आनंद मिळत होता. अभ्यासात फार हुशार नव्हता. परंतु सर्व सामान्य विद्यार्थी म्हणून शिस्तप्रिय व सुस्वभावी होता. त्याचे हस्ताक्षर चांगले होते. रांगोळ्या काढण्यात तरबेज होता. प्रत्येक घटनेमध्ये दिसणाऱ्या वेगळेपणात त्याचा दृष्टीकोन शास्त्रीय उकल करण्याच होता. असलेल्या ज्ञानाच्या मर्यादा, कदाचित त्याचा  तर्कबुद्धीला बंधनकारक होत असाव्यात. एकदा गावी गारांचा पाऊस पडला. आम्ही अंगणात होतो. टप टप पडणाऱ्या गारा त्याने गोळा केल्या. माझ्या हातावर ठेवल्या. याला गारा का म्हटले, कळत नाही. हे बर्फाचे खडेच आहेत. ढग तर हवेचे वाफेचे असतात, त्यात पाणी असते. मग गारा कोठे बनतात.त्याला वेळ लागत असेल ना ? पाणी पडताना गारा बनतात कि वरच बनून जमिनीवर पडतात.”   अशी  प्रकारची अनेक प्रश्ने, त्याचा मनांत येत असत. आणि ते तो प्रकट करीत असे. इंद्र धनुषाचे रंग दाखविताना, त्याचे विश्लेषण करतना त्याला समाधान वाटत  होते.  बागेमधली उमललेली फुले बघताना, ” ही किती छोटी काळी, ही त्यापेक्षा मोठी, ही तर टपोरी काळी, हे बघ ही फुलण्याची क्रिया  सुरु झालेली काळी, आणि हे पूर्ण ” उमललेले  फुल. ”  फुलांच्या उमलणाऱ्या क्रिया तो अतिशय बारकाव्याने बघत होता. निरीक्षण व वर्णन करण्यात त्याला आनंद होत असल्याचे जाणवत होते. परंतु फुले पाने वा काळ्या तोडण्यास त्याचा  विरोद्ध असे. निसर्गाला त्याच्याच पद्धतीने फुलू द्या, सुगंध देऊ द्या व झाडावरच कोमेजून  जाऊ द्या. ती नंतर जमिनीत जातील. ”  हे त्याचे सांगणे असे. सहलीला गेलो असता, एक धबधब्याजवळ आम्ही उंचा वरून पाण्याचे पडणे बघत होतो.  ” लक्ष दे, तू ऐकलस ते.  पाणी पडण्याच आवाज कसा येतो बघ. सतत अधून मधून कमी जास्त, किती लयबद्ध, आणि पुन्हा त्याच प्रकारे चक्राप्रमाणे भासणारा. ए ही गमत बघ. कसे पाण्याचे शिंतोडे उडलेले दिसतात. आणि त्यावर पडलेल्या सूर्य किरनामुळे तेथेही आकाशात दिसणारे इंद्र धनुष्य दिसत आहे.”   बाबू हे वर्णन तल्लीन  होऊन करीत असे. फक्त हे घडले, असे दिसले, हाच त्याचा बघण्या बोलण्यातील आनंद दिसला. हे असे कां घडते ह्याचे शास्त्रीय कारण समजण्याची त्याची झेप दिसली नाही. कोकिळेच्या  मारलेल्या ताना, पक्षाचा चिवचिवाट वा कलकलाट , ऐकून तो माझेही लक्ष त्यांच्या आवाजाकडे देण्यास सुचवीत होता. पौर्णिमेचे चांदणे,  थंडगार हवा हे त्याचे लक्ष खेचीत होते. त्यांचा मंजुळ आवाज ऐकून 
  ” बघ ही हवा माझ्या कानात कांही  तरी सांगत आहे. पण मला तिची  भाषा  येत नाही. ”  तो हसायचा.
अझ्याक न्युटनने झाडावरून पडणाऱ्या फळाकडे  बघीतले आणि जगाला गुरुत्वाकृष्णाचे ज्ञान मीळाले.  जार्ज स्टीवन्सन याने गरम चहाची किटली व त्यावर वाफेमुळे हलणारे झाकण 
बघीतले, आणि वाफेच्या शक्ती  बद्दल शोध लावला. वाफेचे इंजिन बनविले. जगातले अनेक शोध फारसे शिक्षण न घेतलेल्या संशोधकांनी लावले. ते दैनंदिन निसर्ग बघत होते. असे का घडते ह्याची त्यांना उत्सुक्ता लागली. जगाला शोध कळले. बाबू हा देखील त्याच पठडीतला होता. समोरच्या प्रत्येक नैसर्गिक हालचालीमधला अविष्कार तो हेरत होता. त्याच्या खोलात शिरण्याचा प्रयत्न करीत होता. निसर्ग योजनांचा परिचय करून घेत होता. त्याची बाल वयातील  चौकस बुद्धी, निसर्गाचे निरीक्षण,  त्याचे कारण जाणण्याची जिज्ञासा विलक्षण होती. आज वाटते की त्याचात एक सुप्त शास्त्रज्ञ लपलेला होता. तो उफाळून बाहेर आला नाही. 
हे बाबूचे नव्हे,- –  तर जगाचे दुर्भाग्य नव्हे काय ? .             
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
  

दहाव्या वाढ दिवसाच्या सदिच्छा

मोठ्या नातवाचा आज दहावा वाढदिवस. सर्व घर आनंदाने फुलून गेले होते. त्याचे मित्र मंडळी शेजारचे,  काका मामा आत्या मावशी ह्यांच्या कडील मंडळी नातेसंबंधी एकत्र जमली होती. प्रथम आपल्या पद्धतीने दिवा लावला. त्याला ओवाळले गेले. नंतर आधुनिक पद्धतीने केक ठेवला. त्यावरती दहा मेणबत्या लाऊन एकदम फुंकून विझउन टाकल्या. टाळ्यांचा कडकडाट Happy  Birth  Day  चे गाणे म्हंटले गेले. फुगे फोडणे, गाणे, नाचणे झाले. सर्वाना खाण्याच्या डिशेस दिल्या गेल्या. आनंदामध्ये सर्वांनी वेळ घालविला. नातवाला अनेक भेट वस्तू मिळाल्या. आठवणीने त्याने फोन करून, काकांकडे अमेरिकेत गेलेल्या आजोबाना, हा आनंदमय वाढ दिवसाचा वृतांत सांगितला. आजोबा भारावून गेले.  ” आजोबा माझ्या वाढ दिवसाला मला काय देणार ? ”  
त्यांचे डोळे पाणावले. नातवंड ही दुधावरची साय असते म्हणतात. अर्थात समाधानाचा उच्य बिंदू. हा निसर्ग असतो. त्यात कृत्रिमता नसते.  ” काय देऊ मी तुला बाळा,  माझे कुणालाही काही देण्याचे दिवस आता संपलेले आहेत. आता जर कुणी काही मलाच देईल, तर ते आनंदाने घेण्याचा हा माझा   काळ. हां! मला वयाचा अधिकार आणि अनुभवाची गाठोडी मिळालेली आहे. त्यातूनच मी तुला काही देऊ इच्छितो.  हे मात्र निश्चीत कि जर तू घेण्यामध्ये, ग्रहण करण्यामध्ये, रुची प्रेम व आदर व्यक्त केलास, तर ती भेट तुला मिळालेल्या इतर कोणत्याही भेटीपेक्षा खूपच चांगली व वरचढ  असेल. कदाचित तुझ्या जीवनाला एक वेगळीच दिशा देणारी ठरेल.”
” आजोबा ती कोणती ते मला सांगा. तुम्ही सांगाल ते मी करेन. “
” प्रथम तुला तुझ्या दहाव्या वाढ दिवसाच्या शुभेच्या आणि आशिर्वाद. खूप आभास कर. शहाणा हो. कुटुंबाच्या नावाला पुढे आण. चांगला नागरिक बनून नाव कमव. तुझा हा दहावा वाढ दिवस, जीवन चक्रामधील अत्यंत महत्वाची पायरी  असते.    शुशू म्हणून, बालक म्हणून, लहान मुल म्हणून, तू आजपर्यंत जगलास. बाल्यावस्थेचा हा तूझा काळ संपवून, तू आता वेगळ्या दालनात पाउल ठेवीत आहेस.  वय काळ साधारण १० ते १५ ह्याला  पौगनडावस्था म्हटले जाते. जीवनाच्या तारूण्यावस्थेमध्ये पदार्पण करण्याच्या पूर्वीचा हा काळ. व्यक्ती म्हणून जगण्याची ही पूर्व पीठिका असते. निसर्गाचा Reharsal of  adulthood period  म्हणा हवे तर. ह्याच काळात तुझ्या शरीर  ( Physical )  आणि मानसिक  ( Psychological )  वाढीमध्ये एकदम वाढ होऊ लागते. त्यावाढीचा काळ  तुला तुझ्या तरुण बनण्यास  मदत करणारा असतो.  वाढीच्या आलेखामधली ही एक झेप असते.  तुझी आज पर्यंत वाढत जाणारी समज  
अर्थात ज्ञान हे ह्या एकदम वाढत जाणाऱ्या फरकाला समजण्यास सक्षम होउ लगते.  फक्त तुला सतर्क राहण्याची गरज  असते. चांगले, सदाचारी भव्य व्यक्तीमत्व अंगीकारणे अथवा वाईट प्रवृतीना, हेकेखोर अहंकारी स्वभावाला जवळ करणे, सद्गुणाचे वा दुर्गुणाचे दोन्हीही मार्ग तुला समोर दिसू लागतात. त्यात तुला आवड निर्माण होऊन  कोणत्या मार्गाने जायचे, हे केवळ तू स्वत: च ठरवू शकतोस.  
आजपर्यंत तू अर्जुनाच्या, भीमाच्या, एकलव्याच्या, शिवाजीच्या, कृष्णाच्या, रामाच्या, हनुमानाच्या, व अशाच व्यक्तींच्या कथा ऐकल्या आहेस. तसेच  Harry  Potter, Spider Man, Supper Man, घटोत्कच, इत्यादींच्या कथा ऐकल्या, वाचल्या, वा बघितल्या. त्यात तू आनंद घेत होतास. परंतु आता त्या त्या व्यक्तींच्या  चमत्कारामध्ये, दिव्य शक्तीमध्ये, तू एकरुप होण्याचा प्रयत्न करशील. मीच भीम आहे, मीच अर्जुन आहे, मीच हनुमान आहे, यांच्या भूमिकेत जाशील. त्यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे तुझ्या शारीरिक वा मानसिक हालचाली होऊ लागतील. स्वभावातील हे बदल इतरानाही जाणवतील. ” तू देखील  त्यांच्या प्रमाणे भव्य हो ” हा निसर्गाचा तुला संदेश असला, तरी तुला त्याची सत्यता, आणि वास्तविकता, ह्याचे सतत भान असावे. भावी अर्जुन वा भीम वा हनुमान हो — ह्या संदेशा बरोबरच, आज तू ते नाहीस, ह्याची जाणीव असुदे. कल्पना रम्यतेत आकाशामध्ये भरारी घेण्याचे हे वय असते. वस्त्व्यतेला विसरायला लावणारे हे वय आहे.     ह्यासाठी नेहमी सतर्क राहा. ध्येय मात्र भव्यतेचे असू दे.
वाढ दिवसाच्या निमित्य एक वही लिहिण्यास सुरवात कर. रोज एक पान लिही. आजचा दिवस तू कसा घालविलास. त्यात तुझ्या अभ्यासाची, खेळाची, मित्रांच्या गाठी भेटींची, आई बाबा वा इतर नातेवाईक यांच्या संपर्काची नोंद घेत जा. काही विशेष घडले ते टिपत जा. फक्त जे सत्य तेच लिही. हे केवळ तुझ्यासाठीच असावे. रोज झोपण्यापूर्वी ते तूच वाचवे. चिंतन कर, चर्च्या केव्हाच नको. रात्री झोपताना व सकाळी उठताच तुला प्रिय असलेल्या देवाला वंदन कर. ज्या ज्या वेळी कोणताही चांगला विचार तुझ्या  वाचण्यात आला, तर तो लगेच लिहून घे. त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न कर.
मी स्वत: बघितलेल्या, ज्या थोर व्यक्ती झाल्या आहेत, त्यांचेच हे वर्णन आहे. हाच माझा अनुभव लक्षात राहू दे. तुला आशीर्वाद- आजोबा. 

पंख फुटता !

 
 ते जातील उडूनी पंख फुटता   पाहत राहशील, डोळे भरुनी     
आजवरी जे प्रेम दिले तू   शक्ती त्याची उरी बाळगुनी 
 
माया, वेडी कशी असे बघ   वाटते तुजला तुझीच पिले ती 
हसून, खेळून बागड्तील  सदैव तुझ्या पदारा खालती 
 
जेंव्हा पडले पाउल पहिले   आधाराविण तुझ्या अंगणी 
नांदी होती दूर जाण्याची   तुजपासुनी त्याच क्षणी
 
परी दूर दृष्टी ही नव्हती तुजला   मायेचा तो पडदा असता
टिपून घेशी अश्रू आज ते   परिस्थितीची जाणीव होता
 
(  कविता )
       

” भूमिका “- – – आजोबांची !

 आज घरातील वातावरण खूप तापलेले होते. नातवांनी खूप मस्ती केली होती. आरडा- ओरडी, झोंबा- झोंबी, मारा- माऱ्या सारे झाले.  क्रिकेट चेंडू  फेकणे घरातच झाले. फ्रेम पडली व फुटली. हे सारे बालवयातील त्यांना आनंद व मजा  देणारे, परंतु इतरांना वैताग आणणारे होते. सुटीचा दिवस तेंव्हा घरी त्यांचे आई बाबा दोघेही होते. सहन शक्तीचा अंत बघणारे झाले, तेंव्हा बाबा उठले, रागावले, थोडीशी शिक्षा पण केली. त्यांचे सारे खेळ बंद केले. 
” आज कोठेही बाहेर बागेत जायचे नाही.”  हीच शिक्षा, बाबा ओरडले. 
रोज संध्याकाळी मी फिरावयास जात असे. कधी कधी नातव बरोबर येत असत. मी कपडे घालून निघालो. लहान पाच वर्षाचा नातू, पळत आला व मला बिलगला.    
 ” आजोबा मला पण यायचं आहे बागेत तुमच्या बरोबर.”  मजसाठी ती हृदयद्रावक घटना होती. त्यांना आज बाहेर बागेत जाण्याची बंदी घालण्यात आलेली होती. आजोबा म्हणजे बाबांचे बाबा. सर्वात मोठे. हा विश्वास व अपेक्षा घेऊन नातू धावत बिलगला.  मुलांना फक्त येथपर्यंतच थोडस गणित समजत होत. वय अधिकार आणि भूमिका हेच  ते गणित. वयाबद्दल खूपस कळलेल होत. मोठे म्हणजे सर्व आधिकार असलेली व्यक्ती, ही त्यांची समाज. भूमिका ही संकल्पनाच  त्यांना माहित नव्हती. जीवनाच्या त्रिकोण मधली महत्वाची बाजू. वय आणि आधिकार ह्या जर दोन बाजू असतील, तर त्या त्रिकोणाचा पाया ” भूमिका ”  असते.  व्यक्तीच्या संपूर्ण जीवनामध्ये ह्या तिन्हीही बाबी महत्वाच्या असतात. ह्या मानवी सामाजिक व कौटुंबिक संकल्पना होत. वयाप्रमाणे व्यक्तीवर बंधने, कर्तव्ये, आणि त्याप्रमाणे मिळणारे अधिकार आपोआपच मिळत राहतात. ह्यामधून निर्माण होती, ती भूमिकांची साखळी. ती त्याला तशीच वठवावी लागते. त्या भूमिका असतात- बाल वय, विद्यर्थी, तारुण्य, प्रौढत्व, आणि जीवनाच्या अनुभवाचे गाठोडे बांधीत,  शेवटी येते ते जेष्टत्व. जसे वय निघून जाते, त्याच वेळी त्या त्या वयाची कर्तव्ये व अधिकार, ही देखील निघून जातात. भूमिका बदलत जातात. जेष्टाच्या भूमिकेत असते, ते फक्त बघणे, जे समोर घडत आहे ते. ऐकणे जे ऐकू  येईल तेवढेच.  मात्र न बोलणे.  सर्वात  महत्वाचे  म्हणजे जे होत आहे, ते चांगल्याकरिता  व  चांगलेच होत आहे, ही मानसिकता बाळगणे. आणि हीच भूमिका वठवणे. त्यातच मनाची शांतता लाभेल. 
प्रेमाचा आलेला कढ, आणि किंचित पाणावलेले डोळे, ह्यांना रोखीत,
 मी नातवाच्या डोक्यावरून  हात फिरवीत म्हटले  ” तुझ्या बाबाना विचारून,  मज बरोबर बागेत चल. ”        

युगपुरुषाचे दर्शन

 १९५५ सालचा प्रसंग आठवतो. औरंगाबादला मी शासकीय महाविद्यालयात इंटरला ( आजच्या बारावीला ) शिकत होतो. त्यावेळी तेथे दोनच महाविद्यालये होती. दुसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सिद्धार्थ महाविद्यालय  ( ज्याचे नामकरण नंतर  मिलिंद महाविद्यालय  असे बाबासाहेबानीच केले होते.)     डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी  बरेच ऐकले होते. ते एक महामानव, युगपुरुष, असल्याचे कळले. ( त्यावेळी त्यांना भारतरत्न म्हणून संबोधित केले नव्हते.) अशा ह्या थोर पुरुषाला बघवे, दुरून का होईना दर्शन घ्यावे, ही मनांत तीव्र इच्छा होती. परंतु त्यांच्या दिव्य भव्य आणि  महानते पासून माझ्या सारख्या सामान्य विद्यार्थ्यापर्यंतचे  अंतर इतके प्रचंड होते, की त्यांचे केवळ दर्शन मिळणे, ही देखील एक अशक्य गोष्ट होती.  सिद्धार्थ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन होते. कळले की त्या कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर  आवर्जून उपस्थित राहणार आहेत. मी त्यांना बघण्यासाठी त्या महाविद्यालयात गेलो. एक भव्य  सभागृह भरू लागले. दरवाजावर वा इतर जागी त्याच कॉलेजचे विद्यार्थी सर्व समुदायाला मार्गदर्शन करून योग्य त्या जागेवर बसण्यास मदत करीत होते. त्याच विद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापकवर्ग, कर्मचारी आणि निमंत्रित यांनाच आत प्रवेश मिळत होता. माझ्याकडे न पास, न मी त्या कॉलेजचा विद्यर्थी. कार्यक्रम  बघण्यात मला तसा फारसा रस नव्हता.  फक्त बघायचे होते ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना. हॉलच्याबाहेरून मी हेरु लागलो. कार्यक्रम हॉलच्या शेजारी एक मोठी खोली होती. तेथेच सोफ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर बसल्याचे कळले. परंतु स्वयंसेवकाच्या  गराड्यात तेथे जाणे शक्यच नव्हते. काय घडले कुणास माहित.  परंतु माझी आंतरिक ईच्छा इतकी प्रबळ झाली, की मी होऊ शकणाऱ्या भावी परिणामाचा विचार त्या क्षणी न करता, अतिशय  चपळतेने त्या खोलीत शिरलो. मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर   ह्यांच्या समोर अगदी जवळ गेलो. माझ्या पाठोपाठ दोन स्वयंसेवक  पटकन आत धावून आले. एक विचित्र परिस्थिती. एकाने मला रोखण्यासाठी हात पकडला. समोरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर  असल्यामुळे,  त्याने आपला संताप न दाखवता,  प्रेमाने पाठीवरून  हात फिरवला. व बाहेर जाण्यास सुचविले.     ( माझी त्यावेळी चांगलीच धुलाई झाली असती.) 
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बघीतले. मी पटकन म्हंटले
” सर मी शासकीय  विद्यालयाचा विद्यार्थी असल्या कारणाने,  मला  आपल्या कार्यक्रमाला  प्रवेश दिला जात नाही. ”  बाबासाहेबानी क्षणभर मजकडे बघीतले. किंचितसे हास्य केले. ते स्वयंसेवकला म्हणाले  ” ह्याला कार्यक्रमाला  प्रवेश द्या. हा माझा  पाहुणा आहे.”  बस! त्यांचा  आशिर्वाद मिळताच वातावरण एकदम बदलल्याचे मला जाणवले.  मला विद्यार्थ्याच्या समूहामध्ये चांगली जागा मिळाली. संमेलनाचा आनंद काही वेगळाच होता. मी काय बघितले, काय ऐकले, ह्यापेक्षा मला काय मीळाले, हेच महत्वाचे! हाच तो अविस्मरणीय ऐतिहासिक क्षण… परमपूज बाबासाहेबांचा…. त्या युग पुरुषाचा क्षणिक सहवास.  जीवनामधील सोनेरी क्षण  
       
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आफ्रिकन स्त्रीचे आभूषण प्रेम!

 नुकताच  दक्षिण  आफ्रिकेला  जाण्याचा  योग  आला  होता. निसर्गच वरदान लाभलेली  भूमी.  असे वर्णन तिचे करता येईल. ऊतम हवा, भरपूर पाणी, नद्या नाले आणि नेत्रदीपक धबधबे दिसत होते. त्याच प्रमाणे प्रचंड झाडेझुडपे, वेली, क्षितिजा पर्यंत  पसरलेली जंगले,  आणि त्या जंगलात साम्राज्य गाजवणारी अनेक जंगली जनावरे. बळी तो कान पिळी, ह्या तत्वाने जगणारे पशु, काळपा काळपाने आनंद घेताना दिसत होती.  सर्व  बघताना हृदय भरून येत होत. ह्यात भर पडली ती तेथील  अतिशय प्रेमळ, लाघवी, माणुसकीने भरलेल्या, अश्या माणसांची. हवामान थंड समशीतोष्ण असून देखील तेथील लोकांना सामान्यपणे, वर्ण मिळाला तो काळा. नव्हे खूपच काळा. चेहऱ्यावर एक प्रकारे राकटपणा, तेलकट वा नितळ कातडी. केस जवळ जवळ  कुरुळे.   भारतीय स्त्रीला  लाभलेला  नाजूक गहूवर्ण वा गोरारंग त्यांच्या चेहरेपट्टीवर कधीच दिसणार नाही.अर्थात 
त्यांचे ते स्वरूप त्यांच्या सौंदर्याच्या द्रीष्टीकोनानुसार  नजरेमध्ये कदाचित मोहक व सुंदर  ह्या  संकल्पनेत असेलही.
अशाच एका आफ्रिकन महिलेशी आलेला, न विसरणारा एक प्रसंग:-  
आफ्रिकन सफरीच्या मार्गावर एका हस्तकला वस्तूच्या दुकानावर आम्ही थांबलो होतो. मी आणि सौ. तेथील  प्रदर्शनामधील अनेक हस्तकलेच्या वस्तू 
बघत होतो. सौ.ला एक माळ खूपच आवडली. निरनिराळ्या प्राण्यांची  छोटी कोरीव कालाकृती माळेच्या मण्यामध्ये अतिशय सुरेख दिसत होती. त्या दुकानाची  प्रमुख एक आफ्रिकन महिला होती. तीने आदरपूर्वक तिच्या अनेक वस्तू आम्हाला दाखविल्या. ती आवडलेली माळ तीने दहा डॉलरला देऊ केली.  सौ. तिच्या पाकीटमधून पैसे काढीत असता, सौ.च्या हातातील काचेच्या  बांगड्यावर त्या महिलेची नजर गेली.  तिच्या चेहऱ्यावर स्मिथ हास्य दिसले. काचेच्या बांगड्या तिच्या पाहण्यात नव्हत्या. ” हे काय आहे ? व हे तुम्ही का घालता.? ”  तिच्या चौकस प्रश्नात आश्चर्य वा कौतुक पण दिसून आले.  विशेष करुन जेंव्हा बांगड्या ह्या भारतीय महिलासाठी सौन्दर्य व सौभाग्याचे  लक्षण असते हे  समजल्यावर. अचानक तिने इच्छा  प्रदर्शीत् केली.  ”  तुम्ही बांगड्याचा एक जोड मला देऊ शकता? ”  आम्हाला तिच्या उत्छुकतेची    गम्मत वाटाली. सौ.ने  क्षणाचाही विलब न लावता, हातातल्या दोन काचेच्या बांगड्या   तिला प्रेमाने दिल्या. तिनेही त्याचा स्वीकार ” थंक्स”  म्हणत केला, तिने आम्ही निवडलेली हस्तकलेची माळ  बांधुन दिली. ती म्हणाली ”  तुमच्या बांगड्याबद्दल आभारी. कृपा करुन ही मजकडून मित्रत्वाची सप्रेम भेट स्वीकारा. ”  आम्ही देखील हासत तिच्या प्रेमळ  भेट वस्तुचा ( Return gift चा ) स्वीकार केला.   प्रेमाच्या संस्कृतीचेही एक समीकरण असते. त्याच्या अनुशंगाने जे उत्पन्न होते, जो परिणाम होत असतो, तो निश्चितच सर्वत्र तसाच असतो. जगातील कोणत्याही देशात जा. कारण प्रेम आहे निसर्गाचा एक आविष्कार.
 
 
 
 
 
 
 
 
 
 

चुकलेला अंदाज!

 
रविवारचा दिवस होता. संध्याकाळची वेळ होती. मी नातवाना घेऊन बागें मध्ये चाललो होतो.  घराच्या  जवळच्या चौकामध्ये आम्ही आटोरिक्षा मिळेल का, ह्याची वाट बघत होतो. रिकाम्या रिक्षा उभ्या नव्हत्या. काही रिक्षा भरलेल्या येत वा निघून जात. जवळच असलेल्या पानाच्या टपरीवर चार पाच सोसायटीतील मुले गप्पा मारीत उभी होती. दोन रिक्षा रिकाम्या आल्या, पण न थांबतच निघून गेल्या. एका पाठोपाठ तीन रिकाम्या रिक्षा आल्या.  परंतु जवळच बागेत जायचे म्हणून त्या निघून गेल्या. आमच्या विनंतीला दुर्लक्ष करीत होत्या. नातवंडे कंटाळली होती. शेजारी उभ्या असलेल्या मुलांचे आमच्याकडे लक्ष होते. एक रिकामी रिक्षा आली. त्या मुलातील एकाने पुढे येऊन ती रिक्षा थांबवली. रिक्षावाला थांबण्यास नाखूष होता. त्याला वेळ नाही ही सबब सांगून, आम्हास बागेंपर्यंत सोडण्यास त्याने नकार दिला. आतापर्यंत बघितलेल्या रिक्षावाल्यांची वागणूक क्लेशदायक होती. मुलांचा अहंकार छेडला गेला.  सर्व मुले त्या रिक्षा भोवती जमली. निर्माण झालेल्या परिस्थितीचे  गांभीर्य त्या रिक्षावाल्याने जाणले. वादविवाद न करता, त्याने आम्हास रिक्षात घेतले.
आम्ही बागेच्या दिशेने जाऊ लागलो. इतक्यात त्या रिक्षावाल्याच्या खिशातील मोबाईल वाजला. रिक्षावाल्याने रिक्षा एक बाजूस घेतली. तो बोलू लागला.
 ” हं भास्कर ! अरे मी येतच आहे. दहा मिनिटात घरी पोहोचेन. काय म्हणालास घरी येऊ नकोस, का? ”   रिक्षावाला त्या माणसाचे ऐकत होता. थोड्यावेळाने   ” बर सर्व समजल, मी सरळच त्या दवाखान्यात येतो. तू थांब आई जवळ.”   रिक्षावाल्याने मोबाईल बंद केला. मागे न वळता तो आम्हास म्हणाला  ” मघाच आमच्या शेजारच्या भास्करचा मोबाईल आला होता. माझी आई घसरून पडली. तिला बरीच दुखापत झाली सांगत होता. म्हणून मी घाईत होतो.”
मी त्याच्याकडे आश्चर्य व निराशेच्या भावनेने बघत होतो.  बाग आली, दाराजवळ त्याने रिक्षा थांबविली. आम्ही सर्वजन व्यवस्थित उतरलो. मी माझे पाकीट काढून, त्याला पैसे देण्यासाठी पुढे जाऊ लागलो. पण क्षणाचाही विलंब न करता, तो रिक्षावाला सुसाट वेगाने निघून गेला. त्याला देण्यासाठीचे पैसे मात्र माझ्याच हाती राहून गेले. मी जड अंत:करणाने त्या रिक्षा कडे, ती नजरेच्या टापूत दिसेपर्यंत बघत राहिलो. माझ्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. 
जीवनाच्या दैनंदिनीत अनेक घटना घडतात. त्याकडे बघण्याचा द्रीष्टीकोन,  त्याला सामोरे जाताना भिन्न असतो. त्यामध्ये दडला असतो, लपला असतो, एक बंदिस्त त्रिकोण. ज्यात असतो स्वार्थ, प्रासंगिक भावना, आणि परिस्थिती बद्दलचे अज्ञान. ह्याची जाणीव तिव्रतेने होती. जेंव्हा आपले अन्दाज चुकतात. विशेषकरुन जे इतर अपरिचिताना अनपेक्षित हानिकारक ठरतात त्या वेळीच.   
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

तू लपलास गुणांत

कुठे शोधू तुला,   ध्यास लागला मनी
 वाटे मजला,    तू बसलास लपुनी
इंद्र धनुष्याचे रंग,    आकर्षक वाटती
बघण्यात दंग,    लक्ष वेधुनी घेती 
ओढ्याची झुळझुळ,    पडे कानावरी   
ऐकून नाद मंजुळ,    मना वेडे करी
फुलातील गंध,    तल्लीन करी मना
होऊनी मी धुंद,    विसरे सर्वाना
फळातील रस,    देई मधुर स्वाद
उल्हासी मनाला,    देऊनी आनंद
वाऱ्याची झुळूक,    रोमांचकारी
देई देहा सुख,    अल्हाद्कारी    
रंग, गंध, रस, स्पर्शात,    तुझ्या अस्तित्वाची जाण
तू लपलास गुणांत,    तुला शोधणे कठीण
 ( कविता )
 
 
 
 
 
 
 
 

नातीच्या खोड्या

सकाळचा फेरफटका मारून घरी आलो. घरी येताच आठ महिन्याची नात मानसी रांगत रांगत माझ्याकडे आली आणि झेपावली. तिला मी लगेच उचलून घेतले. जवळ केले व तिचे पापे घेतले. किती आनंद आणि समाधान ती मला देत होती. नातवंड म्हणजे दुधावरची साय. ज्यांना त्यांचा सहवास लाभतो ते आजोबा आजी खरोखरच नशीबवान व भाग्यवान. आयुष्याची दोर पक्की करणे, आणि वाढविणे ह्या दोन्हीही गोष्टी निसर्ग त्यांच्या कडून करून घेत असतो. ह्यात शंकाच नाही.
लगेच सून बाहेर आली. ती मानसीची तक्रार  करु लागली.  ” बाबा हिने आज खूप उच्छाद मांडला. तिला शिक्षा करा. ” 
 ” काय केले मानसीने?”  मी तिच्याकडे कौतुकाने बघत विचारले.
” बाबा मी स्वयंपाक करीत असताना, ती नजर चुकावून देवघरात गेली, आणि तिने देव्हाऱ्यातले देव  ओढून पाडून अस्ताव्यस्त केले.”
देवघरातील देव ज्यांना भक्तिभावाने देवत्व दिले जात होते. आणि हे शुषु अवस्थेतील मुल, ज्यालाही एका  द्र्ष्टीकोनातून देवत्व दिले जाते. अशा ह्या दोन देवांचे ते एक प्रकारे द्वंदच नव्हते काय? त्यात फक्त दर्शनी अस्ताव्यस्तपणा दिसला होता. त्यांच्या त्या लढाईमध्ये मी हतबल झालो असल्याचा भास होत होता. डोळे मिटून मी क्षमा मागत प्रार्थना करीत होतो. नातीला न समजणारी व देवाला ती पोहोंचली असेल का? हे मला न समजणारी.
आज तरी ह्या जगाचा, ह्या  मिथ्या विश्वाचा तिला स्पर्श नाही.  जो पर्यंत हे सभोवतालचे खोटे मुखवटे, आचरण, तिच्यावर आघात करून तिला तथाकथित सुसंस्कृत मानवामध्ये बदलणार नाहीत, तोपर्यंत हे लहानगे लेकरू, म्हणजे निसर्गाचीच एक अप्रतिम देणगी  आहे.  निसर्गाचा तो ठेवा आहे. एक ईश्वरी  गुणधर्म,  असे समजण्यास  हरकत नाही. कश्यावरून मानसीच त्या आदिमायेचे जगदंबेचे स्वरूप  नसावे? आज तरी आहे. काळाच्या ओघात तीचातले, नैसर्गिक ईश्वरी गुणधर्म लोप पावू लागतील व त्याची जागा कृत्रिमता घेईल.
तेव्हा मीच म्हणेन – –
ती म्हणजे- – –  मानसी- – –  शिकलेली शहाणी माझी नात. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

स्वाईन फ्लूचा भस्मासुर !

सकाळची देवपुजा आटोपून, दारात टाकलेले वर्तमानपत्र उचलून वाचू लागलो. प्रमुख बातम्यांनी मन विचलीत केले. स्वाईन फ्लू नावाच्या नवीनच उद्भवलेल्या रोगाने सर्व देशात आणि परदेशातही थैमान  घातले होते. अनेकांचे बळी घेतले गेल्याचा वृतांत होता. खिन्न मानाने खिडकीतून उगवणाऱ्या सूर्य प्रकाशाकडे बघत होतो. एक विचार मनामध्ये डोकावला.   मी त्या नारायाणालाच प्रश्न केला.
 ” हे परमेश्वरा  काय चालले आहे हे तुझ्या राज्यात ?  ” बघ किती माणसे  दगावलीत,  त्या दुष्ट स्वाईन फ्लूच्या विषाणूमुळे. ? काय बिचाऱ्यांचा दोष?  तू तर ह्या जगाचा कर्ता करविता.  ही तर क्षुलक बाब तुझ्यासाठी. कर ह्यावर काहीतरी उपाय. दे त्यांना आशिर्वाद.” 
 अचानक प्रकाशाचे तेज वाढल्याचे जाणवले. समोर काही तरी हालचाल जाणवली. आणि शब्द ऐकू   येऊ लागले. मी एकाग्रतेने ऐकू लागलो.
” मीच ह्या सर्व विश्वाचा निर्माता. नदी नाले तलाव डोंगर वृक्ष वेली विविध वन्य प्राणी, आणि मानव. सर्वानीच आनंदाने जगावे ही योजना. माणसाला विचार करण्याची झेप  बऱ्याच वरच्या  दर्ज्याची  दिली  गेली.   हेतू हा कि त्याने माझ्या निर्मितीला सहकार्य करावे. साह्य करावे. परंतु तो स्वार्थी वा अहंकारी बनत चालला. हे सारे जग त्याचाचसाठी असल्याचा त्याने गृह करून घेतला. सर्व नैसर्गिक योजनांना  त्याने खीळ घालण्यास सुरवात केली. झाडे झुडपे, वृक्षलता, जीवप्राणी,  ह्यांची बेसुमार कत्तल चालविली, हवा पाणी अन्न ह्यांचे संतुलन बिघडून टाकण्याचा सपाटा चालविला. पर्यावरण खलास होऊ पाहत आहे. एक जीव निर्माण केला गेला.  त्यात कांही गुणधर्म दिले गेले. ते त्याच्या रक्त मास पेशीत घातले. त्यातून तसेच पुनर्निर्मिती करण्याची योजना दिली. परंतु ह्या सरळ साध्या  मार्गाची  वाट चालण्या ऐवजी  मानवाने दिलेल्या  ज्ञानाचा अहंकारी दुरुपयोग सुरु केला. त्याच रक्त मास पेशी यांच्या गुणधर्माचा  गैर उपयोग करून, संमिश्र करून एक नवीन रक्त पेशी वा मास निर्माण करण्याचे  दु:साहस केले. कोणत्याही पेशीचे एकत्रीकरण करून वेगळ्याच जीवाची निर्मिती केली. सर्वात जो सूक्ष्म विषाणू  निर्मिला  होता,  त्याचे म्यूटेषण होत होत त्यापासून विविध विषाणूची निर्मिती होत गेली. ह्याच दुर्देवी मानवी  दु:साहसात आणि त्याच्या निरनिराळ्या रासायनिक प्रयोगात स्वाईन फ्लूच्या विषाणूची निर्मिती झाल्याची  शक्यता नाकारता येत नाही. तोच आता फोफावत आहे. ” –  – –
”  मी एकदाच भस्मासुराला निर्माण केले होते, त्याची खंत आजही वाटते. पुन्हा तो तसा निर्माण झाला नाही. परंतु हा स्वार्थी अहंकारी मानव तर आपल्याच दुष्ट प्रवृतीने अनेक भस्मासुर निर्माण करीत आहे. जे ह्या माझ्या सुंदर निर्मित जगाचा नाश करतील. ह्याला मी पायबंध घालण्यास असमर्थ आहे. कारण जे मी ज्या नियमाच्या आधारे निर्मिले,  त्यात बदल मुळीच केला जाणार नाही. पुढे काय होणार हे फक्त तो मानवच जाणे. ” 
अत्यंत निराश मानाने मी हे शब्द ऐकत होतो