Monthly Archives: जून 2013

* सुप्त शास्त्रज्ञ !

जीवनाच्या रगाड्यातून-

*  सुप्त शास्त्रज्ञ !

बाबूची आज आठवण आली. संध्याकाळची वेळ होती. मावळत्या सूर्याची उन्हे व पाऊसाची झिम झिम सुरु होती. आकाशात इंद्र धनुष्याची सुंदर सप्तरंगी कमान दिसू लागली. बाबू एक चित्रकार होता. निसर्गाचा असला अविष्कार बघितला की त्याच्यातला कलाकार जागा होत असे. तो लगेच दिसणारे चित्र काढण्याचा प्रयत्न करी. बाबू माझा शालेय  जीवनामधील मित्र.   परंतु गरिबी मुळे  तो फक्त शालेय  शिक्षणच  पुरे करु शकला.  माझी आवड माझ्या  स्वभावाची ठेवण  ही बऱ्याच अंशी त्याच्याशी  मिळती जुळती होती. म्हणून आमच्या दोघांचे बरेच सख्य जमले होते. तो स्वत: खूप कष्टाळू होता. इतरांचेही कामे  करण्यात   त्याला  समाधान व आनंद मिळत होता. अभ्यासात फार हुशार नव्हता. परंतु सर्व सामान्य विद्यार्थी म्हणून शिस्तप्रिय व सुस्वभावी होता. त्याचे हस्ताक्षर चांगले होते. रांगोळ्या काढण्यात तरबेज होता. प्रत्येक घटनेमध्ये दिसणाऱ्या वेगळेपणात त्याचा  दृष्टीकोन  शास्त्रीय उकल करण्याच होता. असलेल्या ज्ञानाच्या मर्यादा, कदाचित त्याचा  तर्कबुद्धीला  बंधनकारक होत असाव्यात.

एकदा गावी गारांचा पाऊस पडला. आम्ही अंगणात होतो. टप टप पडणाऱ्या  गारा त्याने  गोळा केल्या. माझ्या हातावर ठेवल्या. याला गारा का म्हटले,  कळत  नाही.  हे  बर्फाचे  खडेच आहेत. ढग तर हवेचे वाफेचे असतात, त्यात पाणी असते. मग गारा कोठे  बनतात. त्याला वेळ लागत असेल ना ? पाणी पडताना गारा बनतात कि वरच बनून जमिनीवर पडतात.”   अशी  प्रकारची अनेक प्रश्ने, त्याचा मनांत येत असत. आणि ते तो प्रकट  करीत  असे. इंद्र धनुषाचे रंग दाखविताना, त्याचे विश्लेषण करतना त्याला समाधान वाटत  होते.  बागेमधली उमललेली फुले बघताना, “ ही किती छोटी काळी, ही त्यापेक्षा मोठी, ही तर टपोरी काळी, हे बघ ही फुलण्याची क्रिया  सुरु झालेली काळी, आणि हे पूर्ण ” उमललेले  फुल. “  फुलांच्या उमलणाऱ्या क्रिया तो अतिशय बारकाव्याने बघत होता. निरीक्षण व वर्णन करण्यात त्याला आनंद होत असल्याचे जाणवत होते. परंतु फुले पाने वा काळ्या  तोडण्यास त्याचा  विरोद्ध असे. निसर्गाला त्याच्याच पद्धतीने फुलू द्या, सुगंध देऊ द्या व झाडावरच कोमेजून  जाऊ द्या. ती नंतर जमिनीत जातील. “  हे त्याचे सांगणे असे. सहलीला गेलो असता, एक धबधब्याजवळ आम्ही उंचा वरून पाण्याचे पडणे बघत होतो.  ” लक्ष दे, तू ऐकलस ते.  पाणी पडण्याच आवाज कसा येतो बघ. सतत  अधून  मधून  कमी  जास्त, किती लयबद्ध, आणि पुन्हा त्याच प्रकारे चक्राप्रमाणे भासणारा. ए ही गमत बघ. कसे पाण्याचे शिंतोडे उडलेले दिसतात. आणि त्यावर पडलेल्या सूर्य किरनामुळे तेथेही आकाशात दिसणारे इंद्र धनुष्य दिसत आहे.”   बाबू हे वर्णन तल्लीन  होऊन करीत असे. फक्त हे घडले, असे दिसले, हाच त्याचा बघण्या बोलण्यातील आनंद दिसला. हे असे कां घडते  ह्याचे शास्त्रीय कारण समजण्याची त्याची झेप दिसली नाही.

कोकिळेच्या  मारलेल्या ताना, पक्षाचा चिवचिवाट वा कलकलाट , ऐकून  तो माझे ही लक्ष त्यांच्या आवाजाकडे देण्यास सुचवीत होता. पौर्णिमेचे चांदणे,  थंडगार हवा  हे त्याचे  लक्ष खेचीत होते. त्यांचा मंजुळ आवाज ऐकून

” बघ ही हवा माझ्या कानात कांही  तरी सांगत आहे. पण मला तिची  भाषा  येत नाही. “  तो हसायचा.

अझ्याक न्युटनने झाडावरून पडणाऱ्या फळाकडे  बघीतले आणि जगाला गुरुत्वाकृष्णाचे ज्ञान मीळाले.  जार्ज स्टीवन्सन याने गरम चहाची किटली व त्यावर वाफेमुळे हलणारे झाकण

बघीतले, आणि वाफेच्या शक्ती  बद्दल शोध लावला. वाफेचे इंजिन  बनविले.  जगातले अनेक शोध फारसे शिक्षण न घेतलेल्या संशोधकांनी लावले. ते दैनंदिन  निसर्ग बघत होते. असे का घडते ह्याची त्यांना उत्सुक्ता लागली. जगाला शोध कळले. बाबू हा देखील त्याच पठडीतला होता. समोरच्या  प्रत्येक  नैसर्गिक  हालचाली मधला  अविष्कार तो हेरत होता. त्याच्या खोलात शिरण्याचा प्रयत्न करीत होता. निसर्ग योजनांचा परिचय करून घेत होता. त्याची बाल वयातील  चौकस बुद्धी, निसर्गाचे निरीक्षण,  त्याचे कारण जाणण्याची जिज्ञासा विलक्षण होती. आज वाटते  की त्याचात एक सुप्त शास्त्रज्ञ लपलेला होता. तो उफाळून बाहेर आला नाही. 

हे बाबूचे नव्हे,- –  तर जगाचे दुर्भाग्य नव्हे काय ? .

डॉ.भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-    bknagapurkar@gmail.com

विवीध-अंगी     ***३४प्रथम केलेली ती सुचना, दुसऱ्यांदा असते आठवण

पुन्हा पुन्हा सांगाल तर भुण भुण म्हणतील सर्वजण

 

गुरुची भविष्यवाणी

गुरुची भविष्यवाणी

 

एक गमतीदार परंतु मनोरंजक संत कथा वाचण्यांत आली. जीवनाचे खुपसे तत्वज्ञान कळले. सारे चिंतनीय होते. एका गावांत एक थोर संत रहात होते. तत्वज्ञानी व अध्यात्मिक क्षेत्रांत नावाजलेले. दुरदृष्टी, सत्य संवाद, आणि भविष्याचा अचूक वेध ह्यामध्ये मान्यताप्राप्त. सभोवताली अनेक शिष्यगण सदैव असत. गुरुना ते देवाप्रमाणे समजत.

एके दिवशी त्यानी सर्व शिष्याना एकत्र बोलावले. त्यानी एक विचीत्र परंतु भावनिक विचार   व्यक्त केला.           ״ आज पर्यंत तुम्ही माझ्यावर खूप प्रेम केल. माझे ऐकले. माझ्या शब्दाला प्रतिसाद दिलात. माझ्या समजूतीने, ज्ञानाने व दूरदृष्टीने मी माझ्याच भविष्यकाळाचा वेध घेतला. माझा हा देह धरणीवर ठेवण्याचा काळ जवळ आलेला आहे. दुर्दैवाने माझा पुढील जन्म एक निराशजनक योनीत होणार आहे. तो असेल डुकराची योनी. मात्र त्यानंतर माझा जन्म एका राज घराण्यांत होईल. त्यानंतरच्या पुढील सर्व योनी अत्यंत चांगल्या व ईश्वर सान्निध्याच्या असतील. मला त्याचा आनंद व अभिमान आहे. फक्त एकाच म्हणजे पुढच्या येऊ घातलेल्या जन्मचक्रातून मला क्लेशदायक जीवन व्यतीत करावे लागेल.   तो जन्म असेल डुकराचा. मी  अमुक काळी, अमक  ठिकाणी, अमुक विशिष्ठ रंगांत असेन. मृत्यु माझ्या हाती नाही. मला ते घाणेरडे , किळसवाणे, घृणास्पद जीवन पूर्ण करावेच लागेल. तुम्ही सर्व शिष्यगण मी सुचविलेल्या वेळी व ठिकाणी जा. माझा त्या दुर्दैवी जीवनाचा त्वरीत अंत करा. माझी त्या योनीतून सुटका करा. ״

सर्व शिष्यगण अत्यंत गंभीरतेने  व आश्चर्याने गुरुंचे विधान ऐकत होते. सर्वांनी गुरुंच्या त्या विलक्षण आज्ञाची नोंद घेतली. गुरु आध्यात्मिक दृष्टे व महान भविष्यवेत्ते होते. त्यांच्या वाणीप्रमाणेच घडले.

एका घाणेरड्या उकीरड्यावर, गटाराच्या शेजारी कांही डूकरे स्वतःचे अन्न शोधीत होती. त्यांत वर्णन केलेले डुक्कर देखील होते. सर्व शिष्यगण हाती काठ्या, लाठ्या घेऊन एकत्र जमा झाले. त्यानी त्याच डुकराला घेरले. ते तथाकथीत डुक्कर सैरा वैरा धावू लागले. आपल्यापरी आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न करु लागले. सर्व शिष्यगण त्याच्यावर घाव घालणार, इतक्यांत चमत्कार झाला. ते डुक्कर मधोमध शांत उभे राहीले. आणि त्याच्या तोंडून मानवी शब्द बाहेर पडले. त्यांच्या गुरुचाच आवाज स्पष्टपणे ऐकू येवू लागला.

״ थांबा । माझ्या प्रिय शिष्यानो. मला मारु नका. मीच तुम्हास पूर्वी माझ्या, आजच्या जन्म चक्राबद्दल सांगितले होते. हे चक्र खंडीत करण्यास सुचविले होते. हे सत्य आहे. पण थांबा. आता पुन्हा ऐका. मी तुमचाच गुरु. आज अत्यंत वेगळ्या आवस्थेत आहे. एका डुक्कराच्या योनीत, जीला मानवानी हिनत्व देत दुर्लक्षीत केले. स्वच्छ-अस्वच्छतेच्या  मोजमापांत अत्यंत घाणेरडा ठरविले. मी माझ्या पूर्व मानवी योनीत, मानवाच्या तथाकथीत श्रेष्ठत्व, महानता, विद्वत्ता ह्यांचा पुरेपुर अनुभव घेतला आहे. मानवाने इतर सर्व सजीव योनींचे ज्ञान व विश्लेशन

ह्यांच्या साह्याने भरपुर माहीती मिळवली. ज्ञान तर मिळत गेले,  परंतु अनुभवाचे काय ?  कारण अनुभव हा ज्ञानानी मिळत नसतो. अनुभवासाठी निसर्गच्या दैनंदीन चक्रातुनच जावे लागते. क्षणा क्षणाची घटना जीवनाची अनुभव संपन्नता देते. आणि विशेष म्हणजे प्रत्येक घटना भिन्न तसाच अनुभव देखील. ज्ञान घटनांचे विश्लेशन करते. घटनांची जाणीव फक्त अनुभवच देऊ शकतात. त्या घटनांच्या छेदातून आरपार गेल्यानंतरच. म्हणून अनुभव ही वैयक्तीक बाब बनते. अनुभव हे ज्ञान देते  मात्र ज्ञान अनुभव देऊ शकत नाही.

״ ईश्वराची, निसर्गाची  श्रेष्ठता हिच आहे की त्याने जीवन चक्रातील प्रमुख बाबी  सर्व जीवाना त्याच पद्धतीने, क्षमतेने देऊ केलेत. स्वतःच्या जीवाविषयी प्रचंड प्रेम, जगण्याची उत्कठ इच्छा, अस्तित्वासाठी झगडा, जीवाची वाढ, पुनुरुत्पादनता, आणि संरक्षण इत्यादी मुलभूत बाबी प्रत्येक सजीव प्राण्यांत तशाच दिलेल्या आहेत.  ‘मी’ वर प्रेम म्हणजे त्याच्यातील ईश्वरी अंशावर प्रेम असते. मग ते कोणत्याही स्वरुपांत वा योनीत असो. माणसाला  विचाराने  समज आली.   इतर सजीवांना ” हे ज्ञान ” कसे असावे हे ज्ञात नाही. माणसे विचारांनी तुलनात्मक बऱ्यावाईट, सोय-गैरसोय,  सहजता वा कष्टमय जीवन ह्याची फक्त चर्चाच करतात. प्रत्याकाला चांगले व सुकर जीवन हवे. परंतु हाती मिळालेले जीवन नष्ट करुन, इतर अनिश्चित जीवनाचा कुणीच स्विकार करणार नाही. हा निसर्ग असतो. जीवनाची सारी प्रमेये मला देखील लागु पडतात. माझे हे जीवन अस्तित्व नष्ट करुन मी भावी अनिश्चिततेत जावू इच्छीत नाही. तुमचे गुरु म्हणून माझा आदेश आहे की मला लाभलेले आजचे जीवन, निसर्गचक्रानुसार पुरे करु द्या. मला जगु द्या आणि परत जा. ״

सारे शिष्यगण अचंबीत झाले. त्यानी हातातल्या काठ्या लाठ्या फेकून दिल्या. त्या योनीतील समोरच्या गुरुला विनम्र अभिवादन केले. सारे आनंदीत होते. कारण त्याना गुरुकडून आज  जीवनाचे एक वेगळेच तत्वज्ञान कळले होते

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-   bknagapurkar@gmail.com

* धरणीकंप

*   धरणीकंप

कांपू नकोस धरणीमाते      ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते   ।। धृ ।।

जागो जागी अत्याचार      सर्वत्र दिसे भ्रष्टाचार

वाढले भयंकर अनाचार

गरीब जनता त्रस्त होऊनी जाते

ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते  ।।१।।

रक्षण नाही स्त्रियांचे      प्रमाण वाढले बलात्काराचे

प्रकार घडती विनयभंगाचे

हतबल होऊनी स्त्री अश्रू ढाळते

ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते  ।।२।।

लुट लुट संपत्तीची      जाळपोळ घरदारांची

खून पाडती अनेकांचे

प्रेमभावना उरली नसे ह्या जगाते

ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते  ।।३।।

गीतेमध्ये दिले वचन    अर्जुनासी प्रभूचे  तोंडून

प्रभूचे होईल पुनरागमन

अत्याचार वाढता जगाते

ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते  ।।४।।

शब्द आपला पाळूनी     येईल  तो अवतार घेउनी

सुखी करील दु:ख नाशूनी

विश्वास ठेवा गीतेतील शब्दाते

ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते  ।।५।।

ठेवा निर्मळ देह आणि मन      पवित्रतेचे करा वातावरण

टाळू नका ह्या स्वागत संधीते

ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते   ।।६।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-  bknagapurkar@gmail.com

१५-०८१२८३

विवीध-अंगी     ***३२

काय म्हणू गे तुला देवकी, भाग्यवान का अभागीनी

ईश्वर तुझिया उदरी येऊनी, सुख न लाभले तव जीवनी

साधनेतील ईश्वरी अनुभव

जीवनाच्या रगाड्यातून-

 साधनेतील ईश्वरी अनुभव

बालपणापासून घराण्याचे उत्तम संस्कार. शरीर मनावर पडत गेले. त्याच प्रमाणे आयुष्याची वाढ होऊ लागली. सर्व कांहीं आदर्शवत, सुसंस्कारीत, तत्वज्ञानाने भरलेले होते. जीवन म्हणजे काय ? कसे जगायचे ?कसा व्यवहार करायचा? कशी दिनचर्या असावी ? याची पुरेपुर संकल्पना त्यांत होती. शरीर मनाला त्या प्रमाणे वाकविले जात होते. आदर्श जीवन चौकटीत त्याला बंदीस्त करण्याचा प्रयत्न होत होता. प्रथम आई वडील, गुरु, शाळा शिक्षण क्षेत्रे कुटूंब समाज ह्या सर्वानी आप आपल्यापरीने आघात करणे चालू ठेवले होते. परंतु ‘हे असे करा’ हे कुणी सांगितले नाही. प्रत्येकाने ‘असे असावे’ हेच तत्वज्ञान माझ्यावर अप्रत्यक्षपणे आदळत ठेवले. त्यांत धर्म, जात, ईश्वरी संकल्पना, व सामाजिक व्यवहार हे प्रामुख्याने असलेले विषय. ह्या सर्वांचा आधार घेऊनच प्रगती करा, यश मिळवा, ध्येय साध्य करा हे मार्गदर्शन असे. मार्ग तर अनेकांनी अनेक व निरनिराळ्या पद्धतीने सांगितले. काय, कोणते, व कसे हे सारे सत्य आहेत. ह्याची उकल मात्र प्रत्येकाच्याच अनुभव ज्ञानसंपदेवर सोडलेली होती. ज्ञान घ्या, त्यांत वृद्धी करा, आणि अनुभव संपन्न व्हा.  तुमचा आपला अनुभव, आपला आत्मिक हूंकार, हीच ईश्वरी चेतना असेल. त्यालाच कदाचित् ईश्वरी दर्शन समजा. ते फक्त तुमचेच असेल. इतरांच्या अनुभवांची थोडी सुद्धा त्यावर छाया पडता कामा नये. कदाचित् थोडेसे मार्गदर्शन. बस एवढेच. म्हणून म्हणतात की तुम्ही ह्या जगांत ‘एक वैशिष्ठपूर्ण आहांत’ तुमची महानता, मोठेपणा  ही तुमचीच असेल. परंतु हे तुम्ही जाणले पाहीजे. प्रथम ज्ञानसंपादन, नंतर अनुभव व शेवटी जाण. अर्थात ईश्वरी जाणीव. ह्या पायऱ्या अत्यंत महत्वाच्या आहेत. परंतु एक उकल लक्षांत ठेवा. तुमच्या ह्या प्रवासांत भावनांची आणि षडरिपूंची सतत घुसखोरी चालू असते. ते तुमच्या प्रगती व ध्येयासाठी हानीकारक असतात. येथेच अनेकजण वाहून जातात. कांहीं जाणून तर कित्त्येक अजाणता. लाखात एक, नव्हे कोट्यावधीमध्ये एखादाच तयार होतो जो ही संसारीक वादळे, महापूर पार करुन किनारी जावू शकतो. बाकी तर फक्त डुबक्या घेतच आयुष्य गैरसमजावर, अज्ञानावर आरुढ होऊन भोवऱ्यांत अडकून जातात.

नुकतीच पंचाहत्तरी (७५) लागली. आयुष्याचे अनेक रंग रुप बघितले, अनुभवले आणि जाणले देखील. उर्वरीत आयुष्य अर्थात अनिश्चिततेचा अल्प काळ. हे दोन आघाड्यावर असल्याचे भासले. १. वेळ – अत्यंत महत्वाचे. वेळ कसा व्यतीत कराल. जीवनांत आजपर्यंत सतत धावपळीत, परिस्थितीशी झगडण्यांत, कांहींतरी प्राप्त करुन घेण्यांत वेळ दवडला. हाती वेळ कमी होता. समोर आलेली वा निर्माण केलेली प्रचंड कार्ये वाट बघून होती. त्याची पुर्तता करण्यांत अनेक कारणे होती . त्यापैकी ‘ वेळ ‘  हे अंग अद्दष्य  व अलिखीत. परंतु प्रमुख होते. वैचारीक समजानुसार महत्वाचे, तरीही दुर्लक्षीत होते. दुर्दैवाने ‘ त्या वेळेची जाण ‘ वेळीच न आल्यामुळे जीवनांत खुपसे गमावून बसलो. ह्याची जाण, ती अर्थांत, वेळ गमाऊन बसल्यानंतर होत आहे. जी ह्या जन्मी पुन्हा केंव्हांच लाभणार नाही. आता त्याची खंत ह्या उतार वयांत वाटूं लागली. आता मात्र ‘ वेळ घालविणे वा व्यतीत करणे ‘ ही समस्या समोर येत आहे. मिळालेला वेळ अनिश्चित हे एक सत्य. तसेच त्या अल्प वेळेचा जास्तीजास्त उपयोग करुन घेणे, हा विचार होता.

२. स्वतःची प्रकृती – ही सांभाळणे, सुदृढ, तन् दुरुस्त ठेवणे.  ही अत्यंत महत्वाची बाब. कल्पनेच्या सर्व समस्यांची सोडवणूक फक्त शरीरप्रकृती नुसार होते. ती ठरविली जाते

‘ वयानुसार अशक्त होऊ जाणारी व व्याधीना तोंड द्यावे लागणारी देणारी, शरीर मनाची अवस्था ह्यावर ‘. दोन आघाड्या, वेळ नी प्रकृती ह्या नैसर्गिक भागाची जाण ठेऊनच आयुष्याची दखल घ्यावी लागणार होती.

शरीर प्रकृतीधर्मानुसार ‘ इतरासाठी कांहीं करणे ‘ सामाजिक कार्यांत रस घेणे ह्या मार्गाना, निसर्गच बंधन घालण्याचा प्रयत्न करतो. वैचारीक ठेवणच तशी बनते. ‘ आता अल्प काळ हाती आहे. शरीर मनाला उत्साहीत, सुदृढ ठेऊन अनंताच्या प्रवासाला जाण्याची तयारी ठेवा ‘ हाच निसर्ग संदेश

एक गमतीदार प्रसंग आठवला. एका मित्राने उपदेश केला

तुम्ही जेष्ठ आहांत. म्हातारे होत चाललात. शारीरिक हालचाली खुपच थंडावल्या आहेत. फक्त गरजेपुरतेच आवयव मर्यादित् साथ देतांत. कांहीं अवयवांनी आपल्या कार्याला कायमचा पू्र्णविराम दिला आहे. मात्र मेंदू प्रमुख. तोही अडखळत चालतो. परंतु सतर्क व उत्साही राहीलांत तर तो तुम्हास शेवटपर्यंत साथ देऊं शकतो. १- वातावरण ( निसर्ग निर्मीत),  २ परिस्थीती (मानव निर्मित), आणि ३ मानवी वैयक्तीक स्वभाव ठेवण,  ह्या जीवन त्रिकोण बद्धतेमध्येच प्रत्येकजण आनंद-समाधान- शांतता ह्याचा शोध घेत जातो. मात्र जीवनांत सदैव सकारात्मक दृष्टीकोण असावा. तरच आयुष्य सुकर होते.

चांगल्या सवई, छंद हे पुर्व आयुष्यांत लावून घ्यावे, बाळगांवे लागतात. त्यामुळे म्हातारपणात ते तुमचा वेळ व काळ समाधानाने व्यतीत घालवितां येतो. दुर्दैवाने तुम्ही कोणताच छंद जोपासला नसेल, तरी चागले छंद हे केंव्हाही जोपासता येतात. फक्त प्रभळ इच्छाशक्ती, आन्तरीक चेतना,  व सकारात्मक द्दष्टीकोण असावी लागते.

ह्या वयाच्या मोडवर, कोणता छंद जोपासावा. चिंतन केल्यानंतर ठरविले.

की संगीत क्षेत्रांत आपले मन रमवावे. संगीत ही ईश्वरी कला आहे. त्याचे एक वेगळेच दालन. श्री सरस्वतीदेवी ही कलेची आराध्य देवता समजली गेली. कलेचे अनेक प्रांत आहेत. सर्व श्रेष्ठ आहेत. त्यापैकी एकाची निवड करावी. आवड व शक्यता ही दोन मोजमापे असावी. एखादी कला मिळवणे, त्यांत रममान होणे, देहमनाने त्याच्याशी एक रुप होणे, हीच खरी ‘ साधना ‘ असेल. आपल्या इच्छेप्रमाणे, माहितीप्रमाणे, अस्तित्वात असलेल्या ज्ञानाप्रमाणे, कदाचित् ते ईश्वरी दर्शन मिळणार नाही. मात्र ज्या साधनेंत एकरुप व्हाल, त्यांत मिळणारा आनंद, समाधान, शांतता हेच ईश्वरी दर्शन असेल. मात्र ते फक्त करणाराचेच. त्याला रंग, रुप, आकार इत्यादी परिमाणे केंव्हांच नसतील. ते सतत बदलणारे, व ‘ आनंद ‘ वाढविणारे असेल. ते फक्त अनुभवता येईल. शब्दांनी व्यक्त करता येणार नाही. जर व्यक्त करण्याचा प्रयत्न केला तर समजा ” तूम्ही अजून कच्चे आहांत.परिपूर्ण झाला नाही. व्यवहारी व संसारीक जगांतच फिरता आहात. पुन्हा प्रयत्न चालू ठेवा . काय अनुभवल? कसा आनंद मिळाला?  ही संकल्पनाच संपू्र्णपणे उपभोगून विसरुन जा. तोच ईश्वर जाणण्याचा यशस्वी क्षण असेल. “अनुभवने, जाणने, मात्र विसरुन जाणे हेच जीवनाचे साध्य असावे. ” 

त्यांत न गुरफटता वा अडकता. नसता तुमचा अहंकार जागृत ठेवण्याचे ते काम होईल. जे तुम्हास मोठेपणाचा भाव  ( ‘अहं ‘ ) आणित सदा अपूर्णते मध्येंच ठेवेल.

कोणती संगीत कला अन्तरमुख करण्याचा प्रयत्न करावा. सारे कांही एकदम अपरिचीत्. कसलाच गंध नाही. आगदी नविन दालन. वय ज्यास्त. हाती वेळ तसा मर्यादित् . केवळ कल्पनेच्या भराऱ्या मारुन समाधान शोधणे हा अविचार ठरेल. तो फक्त निराशेच्या वातावरणांत ढकलेल. मला काळ, वेळ, शक्यता, क्षमता, विषयाची झेप, ह्या बाबींचा सुक्ष्मपणे विचार करावाच लागणार होता. केवळ चांगले वाटले, भावना उसळली, भव्यता दिसली, ह्या गोष्टीवर चिंतन करावे लागणार आहे. हे सर्व शांत चित्ताने, वेळ घेत, प्रत्येक द्दष्टीकोणातून

( From every Angle ) विचार करणे सुरु केले. शिवाय हा फक्त माझाच विचार होता, कारण तो माझ्याच संबंधीत होता.

Vocal Music अर्थात स्वर संगीत हे शक्यच नव्हते. आवाज चांगला नव्हता. त्यांत स्थिरता नव्हती. कंपन होते. त्यामुळे त्याचा विचार बाध केला. Instrumental Music वाद्य संगीत ह्यावर विचार केला. अनेक वाद्ये समोर आली. परंतु प्रत्येकांत कोणत्या ना कोणत्या शरीर अवयवांचा संबंध येत होता. जसे फुंकणे, बोटाच्या हालचाली, हातांच्या पंजाचा ठेका, वा इतर. म्हातार वयांत त्या अवयवावर तान देणे, ते टिकवून राहणे, तासा-तासाची क्षमता बाळगुन ते करण्याचा प्रयत्न करणे, हे सर्व आवघड वाटू लागले. आपली शारीरिक क्षमता किती व कोठपर्यंत साथ देईल, ह्या बद्दल मन साशंक होते. शेवटी सर्व साधारण वाजवण्यांत येणारी दोन वाद्ये समोर आली. 1 न्यु हार्मोनियम (New Harmonium )  आणि 2 पियानो (Piano)

( अथवा कँसियो  (Casio) ,सिन्थसाईझर ( Synthesizer ), दोन्हीची रचना व संकल्पना सारखीच. दोन्हीत बोटांचे कौश्यल्य हवे. Piano मध्ये विजेचा वापर, परंतु श्रम कमी म्हणून ते वाद्य निवडले. त्याला लागणारे सर्व साहीत्य गोळा केले. त्या विषयींची पुस्तके, मासिके, लिफलेट्स, व गुगल वा ईन्टरनेटवर मिळणाऱ्या वेब साईट्स. सर्वावरील माहिती संकलीत केली. परंतु हे सारे नविन असल्यामुळे ती कला शिकवणाऱ्या गुरुचा शोध घेतला. त्यासाठी Musical Academy च्या क्लासमध्ये नांव घातले.

पियानो ह्या वाद्य प्रांतातले अ आ  ई— अर्थात CDEFGABC–ह्या धड्यांना सुरवात केली. प्रथम देवी श्री सरस्वतीची, नंतर वाद्याची पुजा केली. गुरुला अभिवादन करुन  आरंभ केला. हालके हालके प्रगतीपथावर चालू लागलो. त्यांत मन रमु लागले. वेळ समाधाने व्यतीत होऊ लागला. मनाला शांतता वाटू लागली. ह्या छंदमध्ये अत्यंत महत्वाचे म्हणजे ती कला वा वाद्यसाधना, ईश्वरी आनंद व जाणीवेत घेऊन जाणारी असावी ही प्रमुख धारणा होती.

गुरुनी स्वर शब्दांची ओळख सराव करुन दिली. नंतर एक हलके फुलके गाण्याचे नोटेशन दिले व तसा सराव करण्यास सुचविले. एका प्रसिद्ध जुन्या गाण्याचे ते बोल होते.

प्यार हूवा, ईकरार हूवा है , प्यारसे फिर क्युं डरता है दिल,

कहता है दिल रस्ता मुशकिल     मालूम नही है कंहा मन्जील  ।।  —

जुणे गाणे अप्रतिम, बोल सुरेख. शब्द रचना चांगली. दिलेली चाल व संगीत माधुर्य मनाला रममान करणारे होते.

मार्ग दशर्नाप्रमाणे प्रथम दररोज त्या गाण्याचे ध्वनिमुद्रित केलेले बोल ऐकू लागलो.

त्यातील लकबा. ताना, सुर, लयी, ठेके, इत्यादीवर लक्ष्य केंद्रित केले. सतत ते गाणे गुणगुणने, ते पाठ करणे, हे सारे सुरु झाले. सारे फक्त स्वतःकरीताच होते. तेंव्हां फिरावयास जाताना, बागेत वा कोठेतरी एकांतात बसलो असताना, जेंव्हा जसा वेळ मिळेल तसे ते गाणे आत्मसात करण्याचा प्रयत्न चालू होता. तेच तेच बोल ह्याचा सराव करण्यांत वेळ जाऊ लागला. ह्यात एकांतवास आवडू लागला. इतर व्यवहारीक हालचाली, मित्र मंडळींशी गप्पा गोष्टी करणे, चर्चा वादविवाद, इत्यादी बाजुस सारले जाऊ लागले. फक्त एकच ध्येय व त्याची प्रचंड जिज्ञासा लागुन राहीली. प्रथम गाणे आत्मसात करणे व मग त्याचे बोल ( नोटेशन) पियानोवर वाजविणे.

मनाची द्विधा परिसिथीती झाली होती. सर्व हालचाली समोर आल्या. मन फार बेचैन झाले. ह्या प्रयत्न्यात मी अडकून गेलो होतो. समोरचे ध्येय हे  फार उच्य होते. कलेला  जाणने, तीच्याशी एक रुप होणे, सर्व आनंद लुटणे, समाधान व शांता प्राप्त करणे हा प्रमुख उद्देश. मात्र जे होऊं लागले ते एकदम विपरीत वाटू लागले. जो पर्यंत गुरुजीनी स्वर बाराखडी शिकविली. Casio key Board चे नोटेशन, स्केल, काळ्यापांढऱ्या पट्या, त्यातील सुर, बोटांचे ठरलेले स्पर्ष समजून करु लागलो.  गाणे, गाण्याचे बोल त्याचा सराव, रियाज होऊ लागला. मन कसल्यातरी विचारांनी बोलांच्या प्रथःकरणानी बेचैन व विचलीत होऊ लागले. गाण्याचे सर्वांगाने महत्व काळ, वेळ, आयुष्य आवडी निवडी ह्याच्या चौकटीमध्ये असते. तरच त्याचा आनंद लुटता येतो. ही जाणीव येऊ लागली. वाढत्या वयानी त्या गाण्याच्या मधूर चौकटीला आत्मसात करण्याचे नाकारले. मग आनंद कसा येणार. कसला प्यार—, कसला इकरार—, क्या दिल कहता है—, सारे सारे मजसाठी काल बाह्य झालेले, भावना सुकून गेल्या होत्या. हे मला जाणवत होते. अत्यंत महत्वाचे म्हणजे ज्या ध्येयानी प्रेरीत होऊन, त्याकडे मी झेप घेत होतो, ती मला निराशेच्या खाईत ढकलत होती. मला हवी होती कला, संगीत, आत्मिक समाधान. व ते करीत असता ईश्वरी आराधना साधणे. त्या श्री सरस्वतीशी एकचित्त होणे. परंतु हे दुर राहूं लागले. त्या गाण्याच्या शब्दांनी, सुर तालाने, मला आनंद मिळत होता. पण समाधान होत नव्हते.

मी माझ्या अध्यात्मिक गरुकडे ह्याची तक्रार केली. मी प्रयत्न करीत आहे. मुख्य हेतू ईश्वरी आराधना, त्याचे सान्निध्य हे आहे. मग मी निराश कां. कोठे चुकतो प्रयत्न. मला जे मार्ग दर्शन मिळाले ते असे होते.

आपण त्या ईश्वराला, विचारांनी भावनेने व मिळालेल्या ज्ञानानी जाणले. परंतु तो ह्या सर्व ज्ञान संपदेच्या बाहेर आहे. त्याला खऱ्या अर्थाने कुणीही बघीतले नाही. हे सत्य. मात्र त्याला अनेकांनी अनुभवले आहे हेही एक सत्य. तो फक्त अनुभवांत, उर्जा रुपांत असतो. त्यामुळेच सर्व व्यापी सर्व श्रेष्ठ, अविनाशी इत्यादी गुणानी परिपुर्ण आहे. जो जसे वर्णन करेल, जसा भाव प्रकट करेल त्याच्यासाठी परमेश्वर तसांच असेल. वर्णने बदलतात, भावना बदलते, तसा तोही बदलत जातो. म्हणून तो विविध अंगी आहे.

मग ते  गाणे —    प्यार हूवा, ईकरार हूवा है , प्यारसे फिर क्युं डरता है दिल,

कहता है दिल रस्ता मुशकिल     मालूम नही है कंहा मन्जील  ।।  —

अथवा               इंद्रायणी काठी देवाची आळंदी     लागली समाधी ज्ञानेशाची—।।

असो

प्रेम गीत, भजन, अभंग, प्रार्थना, वा इतर कोणती संगीतबद्ध योजना.

सर्व सुर-शब्द बद्ध असतात. मात्र ईश्वर ह्या शब्दांनी पकडता येत नाही. संगीत, सुर ताल, ठेका, इत्यादी अविष्कारांनी देखील पकडता येत नाही.

मात्र हे ही सत्य आहे की ईश्वर  शब्दांत-सुर-तालांत असतो. असणे व पकडला जाणे खुप भिन्न आहेत. तुमची आराधना वरच्या दर्जाची असावी, अतःकरणातून आलेली असावी, भावनांच्या गुंत्यात नसावी, वासनेपासून अलिप्त असावी, हे दिव्य ईश्वरी अनुभवांसाठी प्राथमिक व महत्वाचे. तुम्ही संगीत साधना करताना अर्थ, शब्द, सुर, ताल, इत्यादींचे मुखवटे पुर्णपणे विसरुन, त्याच्या आत्म्यात शिरा. फक्त लयामध्ये, निनादांत, त्या लहरीमध्यें एकरुप व्हा. संगीताला विसरा, स्वतःला पण विसरा. मग बघा कसा ईश्वरी साक्षातकार होतो तो. ते सांगुन होणे शक्य नाही. हे फक्त अनुभवून, जाणूनच शक्य आहे. जेंव्हा शब्द विसरले जातात, सुरताल विसरले जातात, तुमच्या त्याच्याशी तादात्म होणाऱ्या भावनापण हलक्या होऊ लागतात, साऱ्या चौकटीची पकड ढिली होते.

राहते ती फक्त  ‘एक जाणीव’. अर्थात Reality Consciousness . ही स्थिती अत्यंत परिश्रमानी, तपश्चर्येनी साधता येते. तुमचे राग, लोभ, निराशा, तुमच्या समजुती, वासना, यामुळे त्यांत बाधा येते. त्याना बाजूस सारा. कलेची तुलना करु नका. ते शब्दांत गुरफटने

होईल. शब्द नको, भावना नको, फक्त एकाग्रता ह्यांत रममान होण्याचा प्रयत्न असावा. हाच कलेतील ईश्वरी शोध असेल. मला माझ्या साधनेचा खरा अर्थ ज्ञात झाला.

फक्त   ‘आनंद हाच भगवंत ‘ असेल.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail   bknagapurkar@gmail.com

विवीध-अंगी     ***३१जेंव्हा पडले पाऊल पहीले आधाराविण तुझ्या अंगणी

नांदी होती दुर जाण्याची तुज पासूनी त्याच क्षणीं

 

* दहाव्या वाढ दिवसाच्या सदिच्छा

जीवनाच्या रगाड्यातून-

दहाव्या वाढ दिवसाच्या सदिच्छा

मोठ्या नातवाचा आज दहावा वाढदिवस. सर्व घर आनंदाने फुलून गेले होते. त्याचे मित्र मंडळी शेजारचे,  काका मामा आत्या मावशी ह्यांच्या कडील मंडळी नातेसंबंधी एकत्र जमली होती. प्रथम आपल्या पद्धतीने दिवा लावला. त्याला ओवाळले गेले. नंतर आधुनिक पद्धतीने केक ठेवला. त्यावरती दहा मेणबत्या लाऊन एकदम फुंकून  विझउन  टाकल्या. टाळ्यांचा कडकडाट Happy  Birth  Day  चे गाणे म्हंटले गेले. फुगे फोडणे, गाणे, नाचणे झाले. सर्वाना खाण्याच्या डिशेस दिल्या गेल्या. आनंदामध्ये सर्वांनी वेळ घालविला. नातवाला अनेक भेट वस्तू मिळाल्या. आठवणीने त्याने फोन करून, काकांकडे अमेरिकेत गेलेल्या आजोबाना, हा आनंदमय वाढ दिवसाचा वृतांत सांगितला. आजोबा भारावून गेले.  “ आजोबा माझ्या वाढ दिवसाला मला काय देणार ? “

त्यांचे डोळे पाणावले. नातवंड ही दुधावरची साय असते म्हणतात. अर्थात समाधानाचा उच्य बिंदू. हा निसर्ग असतो. त्यात कृत्रिमता नसते.

“ काय देऊ मी तुला बाळा,  माझे कुणालाही काही देण्याचे दिवस आता संपलेले आहेत. आता जर कुणी काही मलाच देईल, तर ते आनंदाने घेण्याचा हा माझा   काळ. हां! मला वयाचा अधिकार आणि अनुभवाची गाठोडी मिळालेली आहे. त्यातूनच मी तुला काही देऊ इच्छितो.  हे मात्र निश्चीत कि जर तू घेण्यामध्ये, ग्रहण करण्यामध्ये,  रुची प्रेम  व आदर  व्यक्त केलास, तर ती भेट तुला मिळालेल्या इतर कोणत्याही भेटीपेक्षा खूपच चांगली व वरचढ  असेल. कदाचित तुझ्या जीवनाला एक वेगळीच दिशा देणारी ठरेल.”

“ आजोबा ती कोणती ते मला सांगा. तुम्ही सांगाल ते मी करेन. ”

“ प्रथम तुला तुझ्या दहाव्या वाढ दिवसाच्या शुभेच्या आणि आशिर्वाद. खूप आभास कर. शहाणा हो. कुटुंबाच्या नावाला पुढे आण. चांगला नागरिक बनून नाव कमव. तुझा हा दहावा वाढ दिवस, जीवन चक्रामधील अत्यंत महत्वाची पायरी  असते.    शुशू म्हणून, बालक म्हणून, लहान मुल म्हणून, तू आजपर्यंत जगलास. बाल्यावस्थेचा हा तूझा काळ  संपवून, तू आता वेगळ्या दालनात पाउल ठेवीत आहेस.

वय काळ साधारण १० ते १५ ह्याला  पौगनडावस्था म्हटले जाते. जीवनाच्या तारूण्यावस्थे मध्ये पदार्पण करण्याच्या पूर्वीचा हा काळ. व्यक्ती म्हणून जगण्याची ही पूर्व पीठिका असते. निसर्गाचा Reharsal of  adulthood period  म्हणा हवे तर. ह्याच काळात तुझ्या शरीर  ( Physical )  आणि मानसिक  ( Psychological )  वाढीमध्ये एकदम वाढ होऊ लागते. त्यावाढीचा काळ  तुला तुझ्या तरुण बनण्यास  मदत  करणारा  असतो.   वाढीच्या आलेखामधली ही एक झेप असते.

तुझी आज पर्यंत वाढत जाणारी समज  अर्थात ज्ञान हे ह्या एकदम वाढत जाणाऱ्या  फरकाला  समजण्यास सक्षम होउ लगते.  फक्त तुला सतर्क राहण्याची गरज  असते. चांगले, सदाचारी  भव्य व्यक्तीमत्व  अंगीकारणे अथवा  वाईट प्रवृतीना, हेकेखोर अहंकारी स्वभावाला

2

जवळ करणे, सद्गुणाचे वा दुर्गुणाचे दोन्हीही मार्ग तुला समोर दिसू लागतात. त्यात तुला आवड निर्माण होऊन  कोणत्या मार्गाने जायचे, हे केवळ तू स्वत: च ठरवू शकतोस.

आजपर्यंत तू अर्जुनाच्या, भीमाच्या, एकलव्याच्या, शिवाजीच्या, कृष्णाच्या, रामाच्या, हनुमानाच्या, व अशाच व्यक्तींच्या कथा ऐकल्या आहेस. तसेच  Harry  Potter, Spider Man, Supper Man, घटोत्कच, इत्यादींच्या कथा ऐकल्या, वाचल्या, वा बघितल्या. त्यात तू आनंद घेत होतास. परंतु आता त्या त्या व्यक्तींच्या  चमत्कारामध्ये, दिव्य शक्तीमध्ये, तू एकरुप होण्याचा प्रयत्न करशील. मीच भीम आहे, मीच अर्जुन आहे, मीच हनुमान आहे, यांच्या भूमिकेत जाशील. त्यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे तुझ्या शारीरिक वा मानसिक हालचाली होऊ लागतील. स्वभावातील हे बदल इतरानाही जाणवतील. ” तू देखील  त्यांच्या प्रमाणे भव्य हो ” हा निसर्गाचा तुला संदेश असला, तरी तुला त्याची सत्यता, आणि वास्तविकता, ह्याचे सतत भान असावे. भावी अर्जुन वा भीम वा हनुमान हो – ह्या संदेशा बरोबरच, आज तू ते नाहीस, ह्याची जाणीव असुदे. कल्पना रम्यतेत आकाशामध्ये भरारी घेण्याचे हे वय असते. वस्त्व्यतेला विसरायला लावणारे हे वय आहे.     ह्यासाठी नेहमी सतर्क राहा. ध्येय मात्र भव्यतेचे असू दे.

वाढ दिवसाच्या निमित्य एक वही लिहिण्यास सुरवात कर. रोज एक पान लिही. आजचा दिवस तू कसा घालविलास. त्यात तुझ्या अभ्यासाची, खेळाची, मित्रांच्या गाठी भेटींची, आई बाबा वा इतर नातेवाईक यांच्या संपर्काची नोंद घेत जा. काही विशेष घडले ते टिपत जा. फक्त जे सत्य तेच लिही. हे केवळ तुझ्यासाठीच असावे. रोज झोपण्यापूर्वी ते तूच वाचवे. चिंतन कर, चर्च्या केव्हाच नको. रात्री झोपताना व सकाळी उठताच तुला प्रिय असलेल्या देवाला वंदन कर. ज्या ज्या वेळी कोणताही चांगला विचार तुझ्या  वाचण्यात आला, तर तो लगेच लिहून घे. त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न कर.

मी स्वत: बघितलेल्या, ज्या थोर व्यक्ती झाल्या आहेत, त्यांचेच हे वर्णन आहे. हाच माझा अनुभव लक्षात राहू दे. तुला आशीर्वाद- आजोबा.

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-   bknagapurkar@gmail.com

 

विवीध-अंगी     ***२७दोन कान दोन डोळे असल्याने जास्त ऐकावे आणि बघावे

जीभ मात्र एकच म्हणून मोजकेच बोलावे

 

,

.

प्लेगमुळे स्थलांतर

जीवनाच्या रगाड्यातून-                                         प्लेगमुळे स्थलांतर

अनेक रोग शरीरावर आघात करतात. ते देहाला घातक वा मारक देखील असतात. मनुष्यप्राणी आपल्या बुद्धीप्रभावानें त्यांच्यावर मात करण्याचा प्रयत्न  करतो. दोन आघाड्यावर हे प्रयत्न झालेले जाणवतात. निश्चीत विज्ञान ज्ञान प्राप्ती व लोक अनुभवानुसार त्याची उकल करतात. कॉलरा, प्लेग, नवज्वर,धनुर्वात, क्षय आणि अशाच रोगाविषयी असेच झाले. प्रथम ते रोग अज्ञात होते, परिणामाची भिती होती. त्याच्या पासून बचाव म्हणजे, त्या वातावरणापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न. तांत्रिक द्रिष्टीने ते फार गैर सोईचे होत असे. आता त्यावर अनेक उपाय निघालेत. लसीकरण हे महत्वाचे हत्यार सापडले.  प्लेग असाच जीव घेणारा रोग. त्याने प्रचंड संखेने बळी घेतले. आता तो काबूत आलेला आहे. त्यारोगाचे भयानक तांडव, त्यानी उडवलेला हाःहाःकार प्रत्यक्ष बघण्याचा, अनुभवन्याच्या दुर्दैवी काळातून आम्ही गेलो. आता विज्ञान प्रगतीमुळे सुदैवाने तो प्रसंग दुर्मिळ झाला आहे. परंतु आज देखील त्याची आठवण अंगावर शहारे आणतात.

फार जुनी गोष्ट, सत्तर वर्षा पुर्वीची. बीड जिल्ह्यातील माजलगांव हे तालुक्याच्या ठिकाण. माझे वडील शासकीय सेवेत तेथील प्रमुख आधिकारी होते. मी बालवयांत होतो. कळले की प्लेग ह्या रोगाची साथ सुरु झाली. अनेकजण मृत्युमुखी पडत होते. त्याला कारणीभुत असलेल्या उंदरांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली होती. अर्थात उंदीर हे लक्ष्य ( Target ) केले जाते. पिसा मुळे हे होते. पिसांचा दुसरा हल्ला माणसावर होतो. ताप, अंगदुखी, वांत्या, काखेमध्ये गोळा (सुज) येऊन रोग झपाट्याने वाढत जातो. हा रोग शरीराला थोड्याच वेळांत नष्ट करतो. त्या रोगवर त्याकाळी योग्य रामबाण उपाय नव्हते. त्या काळी रोगाचा प्रतिकार करताना त्या रोगाच्या वातावरणामधून त्वरित अलिप्त होणे हे केले जात होते. हे कांही काळासाठी असे.

गांवामध्ये त्याकाळी दवंडी पिटून जनजागृण केले गेले. त्याप्रमाणे सर्वाना स्थलांतर करण्यास मार्गदर्शन केले गेले. सर्व गांव सोडून त्या दुषीत व प्लेगयुक्त वातावरणातून दूर जावे लागले. शासकीय आदेश सर्व स्थानिक जनतेला दिले गेले. स्थलांतराची प्रक्रिया त्वरीत होऊ लागली. आम्ही गावातील सर्व जनतेचे स्थलांतर, त्यांची धावपळ, कष्ट, गैरसोयी, निराशा बघीतली. लहान असलो तरी त्यांची दुःखे जवळून अनुभवली. आठवणीने आज त्याची सत्यता व गांभिर्य मनाला पिळवटून टाकते. निसर्गाच्या चक्रांत माणसे कशी हातबल होतात, हे बालपणीचे द्दष्य आजही चटका लावते. मृत्युच्या थैमानाला रोकण्यास सारे असमर्थ वाटत होते. आम्ही पण माजलगांवाच्या बाहेर २-३ मैलाच्या अंतरावर शेतामध्ये झोपड्या उभारुन राहू लागलो. वडीलांचे तेथेच ऑफिसपण उभारले गेले. सर्वजण नजदीकच राहात होते. सर्व शाळा दोन महीने बंद होत्या. तो काळ आम्ही मुलानी निसर्गाच्या सान्निध्यात घालविला. न विसरणाऱ्या त्या आठवणी होत्या.  गेल्या ७५ वर्षामध्ये त्यानंतर प्लेगसाठीचे गांव स्थलांतर झाल्याचे बघण्यात वा ऐकण्यांत आले नाही. आजच्या आधुनिक वैद्यकीय विज्ञान शास्त्राने बरीच प्रगती केली आहे. बऱ्याच जुन्या रोगांना समुळ नष्ट केले आहे. अर्थात त्याच वेळी नविन नविन रोगाबद्दल माहीती पुढे येत आहे. मात्र कोणत्याही नविन रोगाची केवळ चाहूल लागताच, जगातील सर्व विद्वान वा शास्त्रज्ञ एकत्र येतात. चर्चा करतात, अभ्यास करुन, प्रयोग करुन उपाय शोधतात. निसर्ग व मानव ह्यांचा असा संघर्ष चालूच राहणार.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-  bknagapurkar@gmail.com

विवीध-अंगी     ***२६जीवनाचे मुल्य मृत्युच्या छायेत जास्त जाणवते

परंतु मृत्युचे सत्य हे जीवनाच्या मायेत विसरते