Monthly Archives: सप्टेंबर 2017

बालकांची दोेन पत्र

बालकांची दोेन पत्र

१) बालक पुतण्याचे पत्र-
( आठ दिवसाच्या पुतण्याने (भारतातल्या) काकूस (अमेरिकेतील) लिहीलेले पत्र )
प्रिय काकू,
Hi, आणि सा. नमस्कार. तुला वाटत असेल हा कोण? मला अद्याप नाव नसलं तरी रक्ताच, घराण्याच अस नातं मात्र निश्चितच निर्माण झालेलं आहे. त्यामुळे त्या नात्याचाच आधार घेवून मी तुला काकू म्हणालो. खर म्हणजे मला प्रथम पत्र लिहावयाच होत ते माझ्या आईला. परंतु मी या जगात आल्यापासून, नव्हे त्याच्या पूर्वीही जेव्हा मी तिच्या पोटांत होतो ना, ती क्षणभर देखील मजपासून दूर झालेली नाही. मी सतत तिच्याच सहवासामध्ये आहे. त्यामुळे तिला जे माहित आहे ते सर्व मला देखील ठाऊक आहे . व मला जे ज्ञात आहे ते तिला देखील समजल आहे. तेव्हा मजकूर काय? विचार काय? आमची देवाण-घेवाण होवूच शकत नाही. मग मीच विचार केला की तू येथून खूप खूप दूर आहेस ना ? मग तुलाच पत्र लिहून आपलं मनोगत सांगाव. म्हणजे तुला माझा Bio-data, नव्हे जन्म कुंडली, नव्हे जन्म प्रवास समजेल. खरं सांगू काकू मी जसा आलो तसेच तुझेही बाळ माझ्याप्रमाणे येण्याच्या मार्गावर आहेच. म्हटले माझा प्रवासी अनूभव जर तुझ्या कानावर घातला, तर माझ्या लहान भावडांचा या जगांत येण्याचा मार्ग थोडातरी सुकर, सुखकर आणि सुयोग्य होईल. कोणतीही घटना घटताना जेव्हा संपूर्ण नावीन्यपूर्ण असते ना, त्यावेळी मन नेहमी साशंक असून एका अज्ञानाच्या मार्गामुळे खूपच काळजी वाटत असते. पण मी जेव्हां त्या प्रवास मार्गाबद्दलचा तपशील तुला सांगेल ना तेव्हा तू योग्य त्या तयारींची काळजी घेशील. व मग कोणतीही प्रसंग अघटीत होणार नाही.
काकू तुला आश्चर्य वाटेल पण मला तर तुझे आणि काकांचे नाव तर खूप पूर्वीच समजले होते. मी जेव्हां आईच्या पोटांत होतो ना, जगांत येण्याच्या आधीच तेव्हाच कळले. आई-बाबा, आजोबा-आजी जेव्हां गप्पा मारायचे, तेव्हां तुमचा विषय निघायचा. त्याचवेळी मी पण ऐकत होतो. अग, तुला माहितच असेल ना की अभिमन्यू जेव्हां त्याच्या आईच्या पोटांत होता, तेव्हांच तो जगातल्या खूप गोष्टी ऐकून शिकला होता ना. मला बोलता आले असते ना तर मी सर्व काही व्यवस्थीत सांगू शकलो असतो. माझी सर्व इंद्रिये अतिशय चांगल्या प्रकारे कार्यारत होते. मला सभोवतालच्या सर्व जगाची पूर्ण जाणीव होत होती. सर्व व्यक्तींच्या हालचाली, त्यांचे बोलणे, अस्तित्व, मला सार काही कळत होते. तुला गंमत सांगू मला नुसते बाहेरचे जग, बाहेरील व्यवहार कळत होते असे नाही, तर माझ्या आईच्या अंतर मनाची, अंतर जगाची देखील पूर्णपणे जाणीव होत होती. माझ्या आई – बाबांनी माझ्या बद्दल केलेली व्यक्तव्ये, अंदाज, स्वप्ने इत्यादी. त्याचप्रमाणे माझ्या प्रकृतीसाठी, माझ्या उदयास येणाऱ्या मनाच्या स्वास्थ्यासाठी, ते चांगले विचार, संस्कार करीत होते.
2 ज्या उच्य प्रतीच्या आध्यात्मीक प्रेरणांच्या लहरी मला देत होत्या ना, त्या सर्व शक्तींची मला तीव्रतेने जाणीव होती. सारी शक्ती मजमध्ये संकलीत होत होती. ज्या गोष्टी त्यानांही समजत नव्हत्या, नव्हे माझ्या बाबांच्या बाबांना अर्थात आजोबांना देखील समजत नव्हत्या, अशा सर्व सूक्ष्म बाबींचे संकलन मी माझ्या मनांत (वा बुद्धीला) करुन ठेवीत होतो. माझं फक्त आताच्या घडीला एकच Bad Luck आणि ते म्हणजे मला बोलताच येत नाही. नाहीतर थेट तीन-चार महीन्यापूर्वीचा सारा वृतांत मी धडा-धडा बोलून दाखविला असता. आणि केवळ मला बोलता येत नाहीना, तर हे सारे आजूबाजूचे लोक मला ‘नासमज’, अज्ञानी याला काय कळतं, इत्यादी उपाधी देवून माझ्याकडे अतिशय दुर्लक्षून बघत असतात. व आजही तसेच समजतात. पण मी सर्वांना सांगू इच्छीचो की थोडे थांबा, मला बोलण्याची कला येऊ देत, भले ते बोबडे बोल का असेना, मग सारे काही बोलेन, तेव्हा सर्वजण तोंडात बोटे घालून म्हणतील, “आरे कुठे शिकला हे सारे. याला सारे समजते. आपणच त्याला नासमज म्हणून म्हणत होतो…..” इत्यादी. अग बाहेरच्या गप्पा ऐकताना मला पण जेव्हां आवडलं ना तेव्हा मी पण टाळी वाजवायचा, नाचाया देखील. परंतु हे कुणालाच कळत नव्हते. आई म्हणायची “बाळ काय सारख फिरतय” कमाल आहे नाही. त्यांच मला कळायच पण माझ मात्र त्यांना काही कळायचं नाही.
मला या जगात येवून केवळ चारच दिवस होत आहेत. बराच काळ मला आईच्या पोटांतच राहून बाहेर येण्याची वाट बघावी लागली. माझी शेवटी शेवटी सर्व तयारी झाली होती. पण कुणीच लक्ष देत नव्हते. माझ्या जन्माच्या आदल्याच दिवशी, आईने स्व:ता पावभाजी, आईस्क्रीमीची ट्रीट दिली होती. ती जे जे करीत होती व जे जे बोलत होती, ऐकत होती त्याचा मी स्वत: साक्षीदार आहे. पण माझ्याकडे लक्ष देण्यास कुणासच फूरसत नव्हती. त्यांना काय माहीत की या सर्व Activities वर माझीपण नजर खिळून होती. रात्रीतर मध्यरात्र उलटेपर्यंत सारे काही आनंदमय वातावरण होते. मग मीच का म्हणून मागे राहू. मलाही खूप खूप आनंद झाला होता आणि त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी मी पण नाचू लागलो, टाळ्या वाजवू लागलो. पण गंमत सांगू काकू तुला, सर्वांनी आनंद साजरा केला. परंतु माझ्या आनंदाला वेगळेच रुप देवून, मला चक्क आईसह हॉस्पीटलमध्ये सकाळी नेऊन सोडले. अर्थात मी माझा उत्साह आवरता घेतला व शांत झालो. मी माझ्या आईस बघण्यासाठी फार उत्सुक होतो. येताच मी आनंदाने किंचाळलो. नंतर माझा जीव शांत झाला. मला मोठी गमंत आणि आश्चर्य वाटले ती डॉक्टर काकूंचे. ती माझ्याशी, माझ्या आगमनाच्या दिवशी अतिशय रफ (वाईट) वागली.
थोडा देखील हळूवारपणा दाखविला नाही. किती नाजूक होतो मी, अगदी कळीचे फुलात रुपांतर होताना कसे मोहक व आल्हादकारक वाटते ना तसा. पण तीने मला पूरता उलटा सुलटा केला, प्रत्येक अवयव वाकडे तिकडे करुन बघीतले. तीला माझ्यांत कोणते
3 व्यंग आहे का हे बघण्याचीच उत्सुकता होती. म्हणाले कुठेही व्यंग नाही. No Congenital Anomaly, सर्व अवयव ठीक ठाक आहेत. माझ्या पायावर त्यांनी एकदम चापटी मारली. मी एकदम तळतळून रडलो तर म्हणतात कसे “रडतो चांगला बरे” कमालच आहे की नाही. रडण हे देखील चांगल असत हे मला माझ्या जीवनाच्या पहील्याच दिवशी कळलं. तीच वागणं मला फार विचित्र वाटलं. डॉक्टर काकूंचा शोध माझ्यांत काही व्यंग आहे का, वाईट आहे का त्यांच्यासाठी होत असल्याची मला जाणीव झाली. आणि ती माझी आजी, ती देखील तशीच. आज आल्या आल्या तीच लक्ष मी ‘सू’ केली का ?, ‘शी’ केली का ?, ‘उलटी’ झाली का ?, अधून मधून ‘रडतो’ का ?, बस अशीच चौकशी. कुणी म्हणाले मी बाबाप्रमाणे दिसतो. म्हणजे माझे नाक व चेहरापट्टी त्यांच्या सारखी आहे. कुणी म्हणाले चेहरा गोल असून रंग गोरा आहे. आईप्रमाणे आहे. माझ्या प्रत्येक अवयवांच पृथकरण होऊन कोणता भाग कुणासारखा आहे त्याची यादीच मोठी होत होती. प्रत्येकजण आपला त्यात सहभाग व्यक्त करीत होता. डॉक्टर आजीची तर एकदम कमाल. तिला तस काहीच सापडलं नाही, तरी तिचा प्रयत्न आपला नंबर वर ठेवण्याचा होता म्हणाली. बाळाचा Blood group A +ve आहे. मला हे सार ऐकून खूप मौज वाटत होती. आणि माझे ते भाव माझ्या चेहऱ्यावर दिसत होते. माझ्या मनांतून उत्सुर्त आलेलं हास्य, प्रथम टिपले ते आत्याबाईंनी. माझ्या चेहऱ्यावर निर्माण झालेल्या प्रत्येक हालचालींची त्यांनी योग्य ती कदर केली. त्याच योग्य विश्लेषण केले. मी पण त्याच्यांवर फार खूश झालो. काहीतरी Gift घ्यावी वाटले. काकू तुला सांगू, माझ्याकडे तर त्यावेळी काहीच नव्हतं. मी चक्क तिच्या अंगावर पहीली ‘सू’ केली व Congratulation च्या स्वरात किंचाळलो.
काकू खर सांगू, हे सर्व माझ्या या जगांत येण्याच प्रवास वर्णन वाचून तुला खूप बर वाटल असंल. गमंत वाटली असेल व आनंदपण झाला आसेल. तुला अजून न बघता देखील मी तूझा प्रफूल्लीत झालेला चेहरा कसा असेल, याचे चित्र माझ्या चिमकुल्या डोळ्यापुढे आणू शकतो. पण तुला माहीत असेलच कि जेव्हां आपण सर्कस बघतोना त्या कलाकाराच्या उलट्या सूलट्या उड्या बघून खूप करमणूक होते. आनंद वाटतो. पण कुणीच विचार करीत नाही की त्यांच्या उड्या, करामत इतकी साधी गोष्ट नाही. त्याच्यामागे श्रम, तपश्चर्या आणि साहस यांचा मधूर मिलाप दडलेला असतो. दिसणारे चित्र आणि असणारे चित्र यांत खूप तफावत असते. तू म्हणशील काकू की मी कोणते तत्वज्ञान सांगू इच्छीतो. मी पडलो अज्ञानी मी काय ह्या जगांत नवीन सांगणार. पण मी आहे एक ‘साक्षी’, एक साक्षीदार जो आईच्या पोटांत राहून अंतर जगातील व बाह्य जगातील सर्व घटणांचा अनूभवी.
त्यामुळे मी जे सांगतो ना ते एक दीर्घ काळापर्यंत अनूभवलेले आणि परिणामी अत्यंत आनंद देणारे एक सत्य आहे.
4 डॉक्टर Anti अर्थात Gynecologist यांच्याकडे माझ्या आईला बाबा किंवा आजीला घेवून जात असे. जशी मला समज येवू लागली. मी त्यांनी दिलेला उपदेश माझ्या बुद्धीत साठवून ठेवला. माझ्या आईने तिच्या बुद्धीत तो साठविला. त्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी.
१) सदैव प्रफूल्लीत व आनंदात रहा. त्याने आईची व बाळाची प्रकृती पण चांगली राहते.
२) सदैव चांगल्या गोष्टींचा विचार करावा, चांगले वाचावे, चांगले लिहावे. (जमल्यास) अध्यात्म्याची नितीज्ञानाची, संस्कार रुजविण्याची पुस्तके, देवादीकांच्या कथा, स्तोत्रे वाचवित. चांगले चारित्र्यवान गोष्टी एक प्रकारच्या लहरी निर्माण करतात व त्याचा बाळाच्या मानसिक विकासासाठी अप्रत्यक्ष खूप उपयोग होतो. जे तुम्ही ९ वर्षात बाहेर मिळवू शकणार नाहीत, ते केवळ ९ महीन्याच्या काळांत मिळविता येतो. हे पौराणिक विचार नव्हेत तर प्रयोगांनी सिद्ध झालेले एक शास्त्रीय सत्य आहे.
३) रोजच्या आहारात भाज्या, फळे, दुध, ताक, डाळीचे पदार्थ आणि पिष्टमय पदार्थ योग्य त्याप्रमाणात असावे. आहार सकस व प्रमाणशीर असावा, नियमीत असावा. आपल्या जेवणांत जवळ जवळ सर्व गोष्टी असतात. परंतु जेवणाच्या बाबतीत दुर्लक्ष करु नये. तुला भूक नाही म्हणून न जेवणे वा कमी जेवणे हे मुळीच चालणार नाही. कारण तुझे जेवण फक्त तुझेच असते असे नाही, ते दुसऱ्याचे जेवण पण असते. त्याच्या शारिरीक वाढीसाठी लागणारे घटक पदार्थ केवळ तुझ्यामार्फत त्याला मिळत असतात. याचा विचार मनाच्या कोपऱ्यामध्ये पक्का कोरुन ठेवणे. तुझी कोणतीही दुर्लक्षीत केलेली कृती ही खूप खूप त्रासदायक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
माझी आई खाण्याच्या बाबतीत फारच निवडक होती. तिला भूकपण लागत नव्हती. परंतु तिला सर्वांनी व्यवस्थीत समज दिली. आणि तिने पण स्वत:चा हट्ट, सोडून केवळ माझ्यासाठी आहारांत योग्य बदल व योग्य सेवन सुरु केले. ए तू आईला सांगू नकोस, पण ती ५५ किलो वजनापासून मी जगात येण्याच्या दिवशी ७६ किलो वजनाची झाली होती. आता तिचे वजन ६९ किलो आहे.
४) अत्यंत कंटाळवाणी गोष्ट, परंतु अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘व्यायाम’ याच्याचसाठी मी सुरवातीला सर्कशीचे उदाहरण दिले होते. बाकी सर्व गोष्टी करणे शक्य होते. पण व्यायाम करणे म्हणजे एक दिव्यच. त्यातही डॉक्टरांनी अतिशय मध्यम मार्ग काढला होता. घरामधील प्रत्येक गोष्ट स्वत: करण्याचे बंधनच आईवर टाकले होते. ती माझी आई कामाच्या बाबतीत फार उत्साही. तो उत्साह Casual नसावा म्हणून त्याला Medical Advice ची
झालार लावली, म्हणजे मुळीसुद्धा कंटाळा करता कामा नये. घरातले झाडणे, स्वयंपाक, साफसफाई, कपडे धुणे इत्यादी कामे दिसायला लहान असतात.
5 तरी सतत व्यस्त ठेवून शरिराच्या प्रत्येक अवयवाला व्यायाम देतात. Movements देतात. पोटांत वाढणाऱ्या बाळाला आईच्या सततच्या योग्य त्या हालचालींमुळे स्वत:ची बैठक पण व्यवस्थीत set करता येते. तिचा हालचालीच्या वेळीच, तो आपला मार्ग अतिशय सुकर करतो. जेणेकरुन वेळ येताच बाळ चटकन व चांगल्याप्रकारे बाहेर येवू शकते. बाळाच्या या अतिशय मुख्य प्रवासासाठी, आईची योग्य साथ मिळणे हे फार जरुरी आहे. माझ्या आईने खरेच यासाठी थोड्याशा काळासाठी का होईना खूप श्रम घेतले. कष्ट सोसले. तिची पाठ दुखत असे. ती विव्हळायची, रात्री झोप लागण्यास त्रास व्हावयचा. पण तिने माझे व पर्यायाने तिचेदेखील भावी सूखकर आगमन डोळ्यासमोर ठेवले. व त्यामुळेच माझ्या प्रवासाचा शेवट अतिशय समाधानकारक व चांगला झाला.
तसे म्हटले तर घरांत नोकर, आजी बाबा होते पण तरीही केवळ शारिरीक हालचालींना प्राधान्य देण्यासाठी, ती कुणालाच काम करु देत नव्हती. स्वत:च घरातील सर्व कामे करावयाची. अग काकू मला पण तिची किव येत असे पण काय करणार
व्यायामामधला सर्वात चांगला प्रकार म्हणजे ‘फिरणे’ रोज एक तास आई केव्हा बाबा बरोबर तर केव्हा आजी बरोबर बाहेर फिरण्यास जात होती. कुणीच मिळाली नाही तर घरातल्या घरातच, या खोलीतून त्या खोलीतून चकरा घालायची पण व्यायाम पूर्ण करावयाची. कुणावर अवलंबून नाही. काकू तू पण व्यायामाबाबतीत हालचालीबाबतीत मत्र निश्चिचपणे आईप्रमाणेच Follow up कर. म्हणजे माझ लहान भावंड व्यवस्थीत येवून सर्वांना आनंदीत करेल.
५) तू ज्यांच्या supervision खाली तिथे Medical सल्ला घेतेस ना, त्यांच्याच सल्ल्याप्रमाणे वाग. मात्र त्यात कोणतीही हयगय नको. आजचे श्रम, कष्ट, उद्याचे आनंदी वातावरण निर्मितीचे असणार.
काकू तुला सांगू, माझी वाढ व प्रकृती (Growth Development and Health) केवळ नॉर्मलच नाही तर मी केवळ चार दिवसामध्ये बरीच प्रगती केल्याचे Remarks डॉक्टराकडून ऐकू येतात. याला कारण मी अनूभवलेल्या डॉक्टरांच्या सूचनांचे आईने केलेले तंतोतंत पालन.
बाबा आईच्या थकव्याकडे, पाठ दुखण्याकडे व प्रकृतीकडे जास्त लक्ष देवू लागले. त्यांची इच्छा असो वा नसो ते रोज आईला एक तास बाहेर फिरवून आणू लागले. आईचा थकवा कदाचित वाढत होता. परंतु त्याच प्रमाणात तजेलेपणा देखील वाढत जात असल्याचे स्पष्ट दिसत होते. मी पण खुशीने नाचत असे आणि माझ्या या नाचण्यानेच माझी प्रकृती देखील चांगल्याप्रकारे आकार घेत आहे याची सर्वांना जाणीव होत होती.
6 मला उत्सुकता आहे ती मला लहान भावडांशी खेळण्याची. माझी इच्छा आणि अपेक्षा तुमच्या दोघांच्या लक्षात आलीच असेल. ते भावंड कुणीही असो परंतु ते निश्चित सुदृढ असले पाहिजे. म्हणजे मग खेळण्यात खूप मज्जा येईल. आणि त्याचसाठी तू खूप काळजी घेत जा. जसे मी वर वर्णन करुन सांगीतले त्याप्रमाणे.
मला आई बाबा, आजी आजोबा ‘शांत’ आहे, रडत नाही आणि अशाचप्रकारे खूप मोठेपणाची विशेषणे माझ्या माथी मारतात. त्याचा अर्थ तू असे मुळीच समजू नकोस की मी एखादा आदर्शाचा पुतळा होणार आहे. नव्हे मी एकदम आपल्या सर्व वडीलधाऱ्याप्रमाणे त्यांच्या बालपणाच्या काळाप्रमाणे असेल. अरे श्रीकृष्ण पण मोठा झाल्यावरच मोठा झालाना. त्यापूर्वी त्यांनी त्यांच्या लहान वयांत केलेले सर्व कारनामे, प्रताप मी पण करणार आहे. सर्वांना त्रस्त करणार, रडकुंडीला आणणार, तोडमोड करणार, नुकसान करणार, मारामारी करणार, खेळणार, हसवणार देखील. माझ्या बुद्धीने सुचविले त्याप्रमाणे परिस्थितीचा विचार करुन सर्वांना खूप खूप आनंद देणार. माझ्यात हे सर्व गुण असतील. ज्याला जसे भावेल त्याप्रमाणे त्यांनी ते मान्य करावे. मग माझ कौतुक करा, नाहीतर मला धम्मक लाडू द्या. साऱ्या साठी मी तयार असेन.
असो आता येथेच थांबतो. नवजीवनाचा एक साथीदार म्हणून व्यक्त केलेले माझे मनोगत तुम्हाला पटते. तर त्याकडे एक सत्य अनुभव म्हणून बघा. योग्यवेळी योग्य गोष्टींचा विचार , म्हणजेच Stitch is time saves nine ह्या संकल्पने प्रमाणे.
पुन्हा काका, काकू यांना माझे सविनय प्रेमळ नमस्कार. तुमच्या भेटींसाठी खूप खूप उत्सुक आहे. तुमच्या नवीन येवू घातलेल्या बाळासाठी आणि माझ्या लहान भावंडासाठी माझ्या सदिच्छा. अद्यापतरी माझे नामकरण झालेले नाही , होईल तेव्हा नाव व इतर उपाध्यायासहीत कळवीन. तुमचा प्रेमळ पुतण्या. – अनामिक
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

गर्भातून ज्ञान विकास

गर्भातून ज्ञान विकास

मानसीने नुकतेच दोन वर्ष पूर्ण केले होते. तिच्या सर्व हालचाली मनास खूप प्रसन्नता देत होत्या. तिचे दुडु दुडु पळणे, पडणे, रडणे, हट्ट करणे, कोणत्याही वस्तूला बघणे, हाताळणे, तोडफोड करणे सारे काही तिच्या वाढीचा वेग दर्शवीत होते. मला मात्र एका गोष्टीचे सतत आश्चर्य वाटत होते. हे तिच्या बोबडे बोलण्याचे. ती पूर्ण वाक्ये उच्चारीत होती व भावना तोडक्या मोडक्या शब्दांत व्यक्त करीत होती. बरेच ज्ञान, माहितीही तिने सभोवतालचा परिसर, ह्याच्या संपर्कामधून ग्रहण केली होती. जे ती बघे, ऐके तेच ती पुनुरुच्चारीत असे. हे सारे सामान्य होत. मात्र एक गोष्ट तिव्रतेने जाणवली. ती म्हणजे तिचे टेबल टेनीस खेळावरील प्रेम, ज्ञान व आवड. ते ती सतत व्यक्त करीत असे. समजण्याच्याच काळात तिने त्या खेळाबद्दल बरीच माहिती संकलीत केल्याचे आढळून आले. तसा तीचा दर दिवशी टे.टे. चा संपर्क नव्हता तरी देखील. मात्र एक सत्य होते की तीची आई टे.टे. ची खेळाडू champion होती. तिने जिल्हा, प्रांत यातसुद्धा यश मिळवून देशस्थरावर गेली होती. टे.टे. हा विषय तिच्या रक्तात, मेंदूत पक्यापद्धतीने स्थित व स्थीर झालेला होता. मात्र आजकाल इतर कार्यबाहुल्यांमुळे तिचे टे.टे.कडे फारसे लक्ष नव्हते. तसा तो विषय बाजूस पडला होता. तरी त्याविषय बद्दल मानसीमध्ये निर्माण होणारी आवड attachment मन वेधून घेत होती.
आज अचानक एका शास्त्रिय मासिकांत वाचण्यात आले. नुकत्याच डेन्मार्क येथील वैद्यकीय शास्त्रज्ञाचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यांनी सहा हजारपेक्षा जास्त गर्भवती स्त्रिया व नवजात बालके यांचा सखोल अभ्यास व सर्वेक्षण केले होते. बालकामध्ये गर्भात असताना, होणाऱ्या वाढीच्या वेळीच त्याच्या मेंदूची वाढ होत असते. मेंदूचे कार्य हे गर्भात असतानाच सुरु होते. आईकडून येणाऱ्या प्रत्येक चेतना, या त्या नव बालकाच्या मेंदूत देखील साठवणूक होत जातात. आईला बाह्यांगातून अर्थात सभोवताल परिसर येथून ज्या चेतना प्राप्त होतात, त्या जसे आई आपल्या मेंदूत साठविते, त्याचप्रमाणे त्याचवेळी आईच्या मेंदूतून परावर्तीत होत त्या चेतना नव बालकांच्या मेंदूतही साठवणूक करतात. कंप्यूटरच्या भाषेत बोलावयाचे, तर आईच्या कंप्यूटर मेंदूत डाऊनलोड झालेले सर्व विचार अर्थात चेतना बालकाच्याही मेंदूत transfer होऊन तेथेही डाऊनलोड होतात, फिक्स होतात. हे कायम स्वरुपी असतात. मुलाच्या जन्मानंतर त्याच्यात वाढत जाणाऱ्या समजानंतर, भाषेनंतर त्याला पुन्हा display करता येतात. व हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे.
अनेक अनेक वर्षापूर्वी महाभारत काळातील अभिमन्यूची कथा जीला पुराण कथा म्हणून संबोधीले गेले होते. अभिमन्यू गर्भात असताना श्री कृष्णाकडून सुभेद्रेने ऐकलेले
२ चक्रव्यूह भेदण्याचे ज्ञान, हे त्यालाही प्राप्त झाले होते. त्याच्या त्या ज्ञानाचा उपयोग त्याने युद्धासमयी केला. अर्थात ते ज्ञान त्याला पूर्णत: न प्राप्त झाल्याने, त्याचा अंत झाला. कितीतरी कथा ज्या भारतीय संस्कृतीत महाभारत, रामायण इत्यादी ग्रंथात नमुद केलेल्या आहेत व ज्यांना भाकड कथा म्हणून उपहासले गेले. त्याच कथांचे सूत्र, संकल्पना आज विज्ञान सत्त्यतेच्या इमारतीमध्ये प्रदर्शित करत आहे. त्याचा सन्मान, Credit घेत आहेत. पूर्वजांनी आपल्या ज्ञानाने मिळालेल्या अनेक गोष्टी, जसे अस्त्र, शस्त्र, विमान (पुष्पक) आकाशातील भ्रमण, दिव्यदृष्टी, दिव्य श्रवण दृष्टी, अदृश्य होण्याची संकल्पना इत्यादी या एकापाठोपाठ विज्ञान शास्त्राच्या परिभाषेत सत्याकडे झुकत आहेत. आपण आपणास विसरतो व परकिय आपणास सदा श्रेष्ठ वाटत गेले. हे सारे निराशामय वाटते. साठवणूक, विकास व उपयोगींना, असे त्रिकोणातील ही तीन अंगे आहेत. चेतना जर मिळाली तरच साठवणूकीला प्रारंभ होईल. त्यामुळे चेतना ही महत्त्वाची वाटते. वैद्यकीय शास्त्र त्याचमुळे चेतनेची महती गाते. त्याचवेळा शिक्षण क्षेत्रातील मानसशास्त्र त्या चेतनेचे तत्त्वज्ञान मान्य करीत, योग्य व अयोग्य चेतनेचा उहापोह करते. बालकाचा विकास हा नेहमी योग्य अशाच चेतनेमुळे झाला पाहिजे. ज्याला सुसंस्कार म्हणता येईल. चेतनेमुळे मानसिक तणाव ग्रस्तता त्याचवेळी निर्माण होईल, जेव्हा त्या चेतना अहितकारक, असंस्कारीकता किंवा विकसीत होणाऱ्या मेंदूला तो विचार ग्रहण शक्तीच्या मर्यादेबाहेरचा असेल. समजण्याच्या युक्तीच्या बाहेरचा असेल. बालक तो विचार साठवताना एक प्रकारे तणावग्रस्त होईल. त्याला समज येईपर्यंत त्याचे ग्रहण होणार नाही. याच कारणाने हे सर्व शिक्षण क्षेत्र सूचविते की मेंदूची काही अंगे विकसीत होईपर्यंत शिक्षण ही संकल्पना नको. साधारणपणे पाच वर्षे, मुलाना शालेय शिक्षण न देता, त्याच्या आपल्या बुद्धीला परिस्थिती व वातावरणात विकसीत होवू देते. केवळ बाह्य चेतनामय संस्कार त्याच्या पंचेद्रीयावर प्रक्रीया करीत राहतात. साठवणूक होते. हेच तर ज्ञानप्राप्तीचे प्राथमिक द्वार असते. त्याचा प्रथम मुळ असतो निसर्ग. तो मातृत्वाच्या माध्यमातून हे साध्य करतो. विकसीत करतो. बालकाला अवलंबीत्वाच्या धारणेपासून स्वतंत्र जीवन जगण्यासाठी, कला शिकवत असतो. जी पुढे उत्पतीपासून स्थितीकडे व शेवटी लय या संकल्पनेत अंत पावते. मानसीची प्रथम ज्ञान प्राप्ती जरी गर्भातून सुरु झालेली दिसली, तरी तिला तो मार्ग बदलावाच लागतो व ज्ञान वृद्धी तिची तिलाच करावी लागते. तेच तिचे भावी व्यक्तीमत्व ठरेल.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

कैलास मानसरोवर यात्रा

कैलास मानसरोवर यात्रा

देवाधिदेव महादेव श्री शिवशंभू आणि जगनमाता पार्वतीदेवी यांचे परमपवित्र निवास स्थान म्हणजेच कैलास पर्वत. जगामध्ये अस्तित्वात असलेल्या निरनिराळ्या धार्मिक पवित्र स्थळांमध्ये कैलास पर्वत आणि त्याच्या नजिकच पसरलेले मानसरोवर ही दोन तीर्थक्षेत्रे सर्वाधिक महत्त्वाची, मोठी आणि प्रथम क्रमांकाची मानली गेली आहेत. शिवपुराणामध्ये असा उल्लेख आहे की कैलास दर्शन आणि मानसरोवर स्नान ज्याला नशिबाने प्राप्त झाले त्या व्यक्तीच्या सात पिढ्यांचा उद्धार होऊन जातो. अर्थात हा श्रद्धा व भावनेचा भाग आहे. परंतु, एक मात्र सत्य आहे की कैलास दर्शन हा जीवनामधला अत्यंत रोमांचकारी, दुर्मिळ आणि कृतकृत्य वाटणारा अनुभवी प्रसंग आहे. सारे जीवन यथार्थ झाल्याचे मानसिक समाधान मिळते. नास्तिक देखील त्या सत्य शिव आणि सुंदर यांचे प्रतिक दिसणाऱ्या कैलास पर्वताच्या दर्शनाने नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक भाविक तर कैलास दर्शन घेताना आनंदाच्या अश्रुंनीच त्या शिव परमात्याला अभिषेक करताना दिसतात. त्यांचे ह्रदय भक्तिभावाने उंचबळून येते. कुलस्वामिनी अथवा कुलदेवता यांची कृपादृष्टी आणि वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद यांच्यामुळे कैलास-मान सरोवर ही यात्रा निर्विघ्न पार पडते. सनातन धर्मी, बौद्ध धर्मी, निरनिराळ्या धर्माचे अनुयायी ही यात्रा करताना स्वत:ला धन्य समजतात. जगामधील सर्व तीर्थयात्रांमध्ये सर्वाधिक दुर्गम, अत्यंत कठीण आणि म्हणून साहसी अशी ही यात्रा आहे. परंतु त्याचबरोबर सर्वाधिक पवित्र व मंगलमय आनंदी असल्यामुळे, भाविक सारे कष्ट सहन करुन तो परमानंद मिळवतात.
कोणत्याही तिर्थयात्रेचे स्थान म्हणताच डोळ्यापुढे उभे राहतात ते मंदीर आणि त्यामधील निरनिराळ्या देवतांच्या मूर्ती, मंदीराचे उंच कळस, डोंगरावर उभी असलेली भव्य कलाकृती, पूजा अर्चा, पुजाऱ्यांची धावपळ, आरत्या, शंख-घंटेचा निनाद, फुले, पूजा साहित्ये यांची दुकाने आणि भाविकांची वर्दळ. कैलास तीर्थ यात्रेचे चित्र एकदम वेगळेच आहे. वरिल कोणत्याच गोष्टी त्या तीर्थ क्षेत्रात दिसून येत नाही. नाही तेथे मूर्ती, ना मंदीर, ना पूजा- अर्चा, ना भाविकांची वर्दळ. एक अतिउंच, गोलाकार बर्फाच्छादित असा पर्वताचा एक भाग आहे. हिमालयाच्या पर्वताचाच एक भाग कैलास पर्वत आहे. दुरवरुन बघताना एक अवाढव्य अशी शिवलिंगाकार आकृती भासते. भस्माचे पट्टे आणि ध्यानमूर्ती शिवप्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. शिवपार्वतीचे असे हे पवित्र निवासस्थान आणि त्या कैलास पर्वातानजिकच पसरलेले एक प्रचंड सरोवर – मान सरोवर म्हणून प्रसिद्ध आहे. कैलास पर्वत शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १९ हजार फूट असून, मान सरोवरचा परिघ ९० किलो मीटर इतका लांब आहे. तिबेटच्या हद्दीत असलेल्या त्या कैलास पर्वतावर आजतरी राजकीय हक्क चीन या देशाचा आहे. मान सरोवराच्या उत्तरेस कैलास पर्वत आहे.
२ हा सदैव बर्फाच्छादीत असतो. इतर सर्व परिसरावर लहान मोठे दगड, माती रेती असून तिथे एक देखील मोठे झाड कुठेच दिसून येत नाही. सारे काही बोडखे वाटते. गवत आणि लहान लहान झुडपी मात्र सर्वत्र दिसून येते. अतिशय थंडी, वारा, पाऊस, हिम बर्फाचा वर्षाव, बर्फावरुन परावर्तित झालेली सूर्याची प्रकाश किरणे डोळ्यास झगझगाट निर्माण करतात. सर्व वातावरण सदैव बदलत राहणारे असते. हे सारे असून देखील प्रत्येक रात्री भक्तीभावाने त्या शिव परमात्म्याच्या अत्यंत पवित्र अशा निवासस्थानाचे दर्शन घेण्यास अती उस्तुक असलेला जाणवतो.
जीवनातील सर्वोत्तम पवित्र तीर्थक्षेत्र कैलास-मान सरोवर आपण देखील जावून बघावे, दर्शन घ्यावे, त्याची परिक्रमा करावी आणि मानसिक शांती समाधानाचा परमोच्च अनुभव घ्यावा ही सुइच्छा प्रत्येक भाविक नागरिकाच्या मनामध्ये येणे साहजिकच आहे. त्यादृष्टीने कैलास-मानसरोवरच्या तीर्थयात्रेसंबंधी ज्या सर्वसामान्य शंका असतात, त्या येथे सांगण्याचा प्रयत्न करतो. भाविकास ती यात्रा करुन धन्यता मिळवता येईल. ॐ शिवपार्वतीच्या कृपेने कैलास मानसरोवर यात्रा १९९७ च्या पहिल्याच गटामध्ये आम्हा दोघा पती-पत्नाला प्रवेश मिळून, ती कठीण परंतु अत्यानंद देणारी यात्रा, आम्ही जून १९९७ मध्येच सुखरुपपणे करुन आलो. त्यामुळे स्वानुभवानेच त्या यात्रेची माहिती इतरांसाठीही देत आहोत.
कोणतीही यात्रा म्हटली ते ठिकाण, तिथे जाण्याचे मार्ग, राहण्या-उतरण्याची व्यवस्था, यात्रेसाठी येणारा सर्वसाधारण खर्च, प्रवासात लागणाऱ्या गरजेच्या वस्तू, वाहनाची सोय आणि त्या विशीष्ट प्रवासात लागणाऱ्या बाकींची पूर्तता या सर्वांच्या मार्गदर्शनासाठी यात्री उत्सुक असतो.
कैलास मानसरोवर यात्रेची पूर्वतयारी
१. पहिली गोष्ट म्हणजे त्या कठीण आणि दुर्गम यात्रेस जाण्याच्या विचाराप्रमाणे च पक्का दृढनिश्चय आणि उत्स्फूर्त मानसिक इच्छा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
२. उंच पहाडी भागातील चढण-उतरण सारखी करावी लागते. प्रवास साधारण दहा किलोमीटर दररोज पायीच करावयाचा असतो. त्यामुळे जाण्यापूर्वीच दोन महीनेतरी दररोज दूरवर पायी फिरण्याचा व्यायाम वा सवय निर्माण करावी म्हणजे यात्रा सुकर होण्यास मदत मिळेल.
३. १९००० फूट उंचीवर (हाय आल्टीट्यूड) हवामान विरळ असून प्राणवायूचे प्रमाण कमी असते. श्वासोच्छवास करताना कठीण जाते व छाती भरुन आल्याप्रमाणे
३ जाणवते. तेव्हा श्वासाचे व्यायाम, दीर्घ श्वास ठेवून सोडणे, प्राणायाम इत्यादीची सवय केल्यास ऑक्सीजन टेन्शनचा परिणाम कमी जाणवतो.
शारिरीक प्रकृती नियमित व्यायाम आणि आहार यांच्या साह्यायाने सुदृढ व निरोगी ठेवण्याचा सतत प्रयत्न करावयास हवा.
लागणारी प्रमाणपत्रे (ही दिल्लीच्या परराष्ट्र व्यवहार खात्यास लागतात.) पासपोर्ट, वैद्यकीय प्रमाणपत्र हे एखाद्या रजिस्टर मेडीकल प्रॅक्टीशनरकडून मिळवणे. सोबत काही वैद्यकीय चाचण्याचे रिपोर्टस हवेत. हिमोग्लोबीन, इएस आर, टि.एल. सी. डि.एल.सी, लघवी, संजास, रक्तामध्ये बल्ड शुगर, युरिया, क्रियेटीनीन, बीलीरुबीन, ब्लड ग्रुप महत्त्वाचे. छातीचा क्ष किरण आणि स्ट्रेस इसीजी (टि.एम.टी)
४. जर तुमच्याकडे कॅमेरा किंवा व्हीडीओ कॅमेरा असेल तर त्याचा मेक, सिरीअल नंबर कागदावर लिहून खाली मालकाचे व, गाव, पत्ता लिहून ठेवावा काळजीसाठी.
प्रवासामध्ये लागणारे कपडे आणि इतर वस्तू
सर्व कपडे साधारण वजनाने हलके, गरम, वारा व पाणी ह्यापासून बचाव करणारे असावेत. विन्ड फ्रुप जाकेट, स्वेटर्स, (२ नग लांब बाह्याचे व १ नग हाफ बाह्याचे, माकड टोपी, व वुलनच हात मोजे (२ नग), वुलनचे लाँग पायमोजे (२ नग), कॉटन पायमोजे (४ नग), जीन्स किंवा पँट (३ नग) शॉर्टस (२ नग), शर्टस किंवा टी-शर्ट (४ नग), सन ग्लासेस, हंटर किंवा मार्चिंग किंवा ट्रेकिंग बुट (२ नग), क्रिकेटमध्ये घालतात तशी टोपी वेताची फेल्ट हॅट (सूर्य प्रकाशाच्या बर्फावरुन परावर्तीत झालेल्या कीरणांपासून संरक्षण करता यावे म्हणून) पाण्याची बाटली, विजेरी (दोन जादा सेल्स व एक बल्ब जादा घेणे), रेन कोट (लांब आकाराचा, शक्य असल्यास शर्ट पँट असे वेगळे असल्यास चांगला) बेल्ट पाऊच ज्यात कॅमेरा, पैसे, पासपोर्ट व गरजेची थोडी औषधी घेता येईल, प्लास्टीकचे मोठे शिट सामानावर गुंडाळता येऊन पाण्यापासून रक्षण होऊ शकेल, चालण्याची एक काठी, प्लेट-मग-चमचा-वाटी, टॉयलेट पेपर वा टिश्यू पेपर (२ रोल) सूर्य प्रकाशापासून रक्षण करणारे तोंडास लावणारे लोशन (हाय आल्टीट्यूड अर्थात उंचावर सूर्य प्रकाशामधील अल्ट्रा व्हायलेट किरणांमुळे उघड्या भागातील चमडी काळी पडते, जळून जाते व चेहरा काळा होतो म्हणून) मेणबत्ती, काड्याची पेटी किंवा लायटर, लहान चोकू, रबर स्लिपर, वाजवण्याची शिट्टी, वही, पेन
४ प्रवासाची व्यवस्था
वर्षभरात फक्त जून ते सप्टेंबर ह्या चार महिन्याच्याच कालावधीमध्ये कैलास- मानसरोवर यात्रेचे आजोजन केले जाते. त्याच काळामध्ये चीनचे सरकार यात्रेकरुस त्या भागामध्ये जाण्याची परवानगी देते आणि तेही फक्त पाचशे यात्रेकरुनांच. तेव्हा भारत सरकारतर्फे अंदाजे ३५ यात्रेकरुचा एक गट याप्रमाणे विभआगून १५ गट थोडे दिवसाच्या अंतराने दिल्लीहून पाठविले जातात. उत्तर प्रदेशातील शासनांर्गत कुमाऊ मंडळ विकास निगम संस्था आहे. या संस्थेतर्फेच सर्व यात्रेचे आयोजन केले जाते. ही संस्था भारतीय परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून चीनच्या हद्दीत जाण्यासाठी लागणारा व्हीसा आणि इतर सोपस्कार पूर्ण करते. यात्रा दिल्लीपासून सुरु होत असल्यामुळे यात्रींची दिल्लीतच राहण्याच्या व्यवस्थेपासून यात्रेमधील पुढील सर्व टप्याटप्याची राहण्याची, जेवणाची आणि प्रवास वाहनांची सोय कुमाऊ मंडळातर्फेच केली जाते.
साधारणपणे मार्च महिन्यापासून संपूर्ण भारतामधून भारतीय परराष्ट्र खात्याच्या ईस्ट एशीया डिव्हीजनतर्फे कैलास मान सरोवरच्या तीर्थयात्रेस जाण्यास उत्सुक असलेल्या व्यक्तींकडून अर्ज मागविले जातात. त्याची छाननी होऊन निवडलेल्या व्यक्तींना निरनिराळ्या गटांत विभागले जाते. क्रमाक्रमाने त्या व्यक्तीस त्याच्या निवडीबद्दल अवगत केले जावून पुढील कार्यक्रमाचे मार्गदर्शन केले जाते.
प्रवासामध्ये घोडा भाड्याने उपलब्ध असतो. किंवा आपल्या हातातील सामान घेवून जाण्यासाठी त्याचप्रमाणे प्रसंगी अवघड चढणावर आपले धरुन मदतीसाठी मदतनीस अथवा पोर्टर पण मिळतात. त्यांना रोजदारी घ्यावा लागते. घोडा किंवा पोर्टर हे सुरवातीपासून आपल्या सेवेत घ्यावे लागतात. प्रवासाच्या अधेमध्ये ते मिळत नाहीत. वयस्कर अथवा अशक्त यात्रेकरुंनी त्यांची सोय निश्चित करणे अत्यंत जरुरीचे असते. अर्थात हा येणारा खर्च प्रत्येकास स्वतंत्रपणे करावा लागतो. सर्व दर जाणून घ्यावे, ते बदलत असतात.
चीनच्या हद्दीमध्येसुद्धा घोडा / पोर्टर / याक प्राणी प्रवासामध्ये मिळतात. त्यांचादेखील खर्च यात्रीस करावा लागतो. कुमाऊ मंडळाचे कर्मचारी यात्रीस याबद्दल मदत करतात.
राहणे व खाणे यांची सोय
कुमाऊ मंडळ या बाबींची सोय करते. ठराविक अंतरावर मुक्कामाची व्यवस्था केली गेली आहे. या ठिकाणी मोठे बॅऱ्याक्स बांधलेले असून झोपण्यास अंथरुण, गरम पांघरुण दिले जातात. स्वतंत्र पलंगही काही ठिकाणी उपलब्ध असतात. पाणी, संडास, बाथरुम यांची उत्तम सोय असते. वीज नसल्यामुळे काही ठिकाणी जनरेटरच्या साह्यायाने वीज पुरवठा
५ करुन देण्याची सोय केली जाते. यात्रींसाठी देन वेळा गरम जेवण, सकाळचा नाष्टा, दोन्ही वेळा चहा, गरम सूप दिले जाते. जेवण हे संपूर्ण शाकाहारी असून भात, भाजी, चपाती, पापड, लोणचे, उसळी, सॅलड आणि एखादा गोड पदार्थ देखील दिला जातो. प्रवासी थकवा आणि हाय आल्टीट्यूडचा परिणाम होऊन सर्वांचीच भूक मात्र बरीच मंदावते असे दिसून येते.
चीनच्या हद्दीमध्ये मात्र खाण्याची बरीच गैरसोय झाल्याचे जाणवते. फक्त सुरवातीच्या मुक्कामात तकलाकोट येथे चीनी पद्धतीचे जेवण मिळते. सर्व उकडलेले नुडल्स, भात, ब्रेड इत्यादी. शाकाहारी असते. नंतरच्या प्रवासात मात्र जेवणाची गैरसोय झाल्याचे जाणवते. आमच्यावेळी आम्ही शिधा बरोबर नेला होता. त्यांनी भांडी व इतर साहित्य दिले. सर्व यात्रींच्या एकोप्याने आम्ही जेवणाची सोय करुन वेळ निभावून नेली.
या प्रवासात विशेषकरुन चीनच्या भागात खाण्याचे हाल होऊ नये म्हणजे सर्वांनीच ड्राय फूड्स जेस काजू, बदाम, मनुका, चिकी, बिस्कीटटे, खाऱ्या डाळी, चिवडा, गोळ्या, फरसाण, खाकरे, लाडू, खारीक, पेंडखजूर इत्यादी खाद्य साहित्य घेवून आपली भूक थोडीशी हलकी केली. त्याचप्रमाणे यात्रेकरुने १०-१२ दिवसाच्या काळासाठी पूरेल असा. सुका मेवा बरोबर न्यावा.
चीनच्या संपूर्ण प्रवासात कुठेही चहा किंवा काही खाण्याची हॉटेल्स, धाबे व टपऱ्या दिसून येत नाही. भारतीय हद्दीत काही ठिकाणी चहा, बिस्किटे वा भाजीपूरी देणाऱ्या टपऱ्या दिसल्या.
औषधी
भारतीय हद्दीमध्ये मंडळातर्फे एक वैद्यकीय अधिकारी बोरबर असतो. त्याचप्रमाणे सर्व गटामध्ये यात्रेकरुमची निवड करताना एक दोन तरी वैद्यकीय ज्ञान असलेले यात्रेकरु प्रत्येक गटात सामील केले जातात की ज्याचा इतरांना आपातकाली उपयोग व्हावा. दिल्लीलाच प्रत्येक यात्रेकरुला एक फर्स्ट एड किट दिले जाते. तरी देखील प्रत्येक यात्रेस आपणांस लागणारी नेहमीची औषधी त्यावर ते कशासाठी हे लिहून व्यवस्थीत घ्यावात. त्याचप्रमाणे व्हॅसलीन पेट्रोलियम जेली थंडीत अंगास लावण्यासाठी घ्यावी.
सामान
प्रत्येक यात्रेकरुनी कोण-कोणत्या वस्तू न्यावयाच्या ते वरील यादीवरुन लक्षात ओलेच असेल. सर्वसाधारण प्रत्येक कपड्याचे चार चार जोड ठेवावे लागतात. कारण पाऊस पाण्याने खराब झाल्यास सुकवण्यास वेळ नसतो व योग्य जागा मिळत नाही. अंथरुण पांघरुण घेण्याची गरज नसते. ती दिली जातात. सामान अतिशय कलात्मक तऱ्हेने बांधावे लागते.
६ बॅग, पेटी वा सूटकेस घेण्यास परवानगी नसते. सामान खेचरावर लादावे लागते. कॅनव्हास बॅगच्या थैल्यामध्ये सामान घेवून वर पोत्याने बांधावे लागते. त्यावर प्लास्टीकच्या कव्हराने गुंडाळून, पुन्हा पॉलीथेन बॅगमध्ये बांधून घ्यावे लागते. त्यावर आपले नाव व खूण असावी. खेचरावर लादताना व काढताना सामानाची खूप फेकाफेक होते त्यामुळे ते निसटणार नाही. अशीच पक्की पॅकिंग करावी लागते आणि पावसापासून रक्षण करावे लागते. प्रत्येक व्यक्तीस २५ किलो पर्यंतच सामान घेण्याची परवानगी आहे. एका मुक्कामापासून दुसऱ्या मुक्कामापर्यंत कुमाऊ मंडळ सामान ताब्यात घेवून त्याची वाहतूक करण्याचे काम करते. प्रवास दिवसभराचा असल्यामुळे अत्यंत गरजेच्या गोष्टीच फक्त स्वत:जवळ बाळगाव्यात बाकी सर्व मुख्य सामान प्रवाहात द्याव्यात.
यात्रेचा प्रवास
दिल्ली पासून कैलास मानसरोवर जवळ जवळ ८६५ किमी दूर अंतरावर आहे. दिल्ली ते धारचुला हे ६४० मैलाचे अंतर रेल्वे आणि बसने पूर्ण करावयाचे असते. नंतर मात्र धारचुला जवळ तवाघाट पासून यात्रा पायी किंवा घोड्यावरुन करावी लागते. ही पायी यात्रा एकूण २२५ किमी इतकी आहे.
दिल्लीस दिलेल्या तारखेस उतरताच कुमाऊ मंडळाने देवू केलेल्या सोईस प्रारंभ होतो. प्रथम अशोक यात्री निवास येथे उतरण्याची व्यवस्था केली जाते. दुसऱ्या दिवशी इंडो-तिबेटीयन बॉर्डस पोलिस हॉस्पीटलमध्ये जावून तुमचे सर्व वैद्यकीय प्रमाण पत्रे व प्रयोगशाळा रिपोर्टस तपासून पुन्हा व्यवस्थीत आरोग्य तपासणी होते. आरोग्याच्या दृष्टीने जे यात्री अती उंच व कठीण दुर्गम यात्रा करण्यास जे अपात्र ठरतील त्यांना यात्रेमधून वगळले जाते. अशाच प्रकारे प्रवासामधील भारत चीनच्या हद्दीजवळ गुंजी नावाचे पोलीस मुख्यालय आहे. ते जवळ जवळ समुद्र सपाटीपासून ११८८० फूट उंचावर आहे. तिथे पुन्हा दुसरी वैद्यकीय शारिरीक तपासणी होते. पहिल्या तपासणीत योग्य वाटलेल्या यात्रेकरुपैंकी काही अपात्र ठरण्याची शक्यता असते. त्यांना तिथून परत पाठविले जाते. या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची सूचना करावीशी वाटते की शारिरीक आरोग्य आणि सुदृढपणा याबद्दल अतिशय काटेकोरपणे बघीतले जाते. त्यामध्ये थोडीदेखील ढिलाई होत नाही.
भारतीय हद्दीमधला प्रवास दिल्ली ते लिपूलेखपासपर्यंत असतो. तेथून पुढे चीनची हद्द सुरु होते. हा प्रवास ११ दिवसाचा असतो. अंतर व सोयीनुसार रात्रीचा मुक्काम जेथे होतो ती ठिकाणे म्हणजे दिल्ली नंतर अलमोडा (३७० किमी), धारचुला (२७० किमी), थोड्याच अंतरावर तवाघाट. येथून प्रवास डोंगराळ असून पायी प्रवास सुरु होतो. कोणतेही वाहन पुढे जात नाही. नंतर पांगू (२६ किमी), सिर्खा (१० किमी), गाला (१० किमी),
७ मालपा (११ किमी), बुधी (९ किमी), गुंजी (१५ किमी), काला पाणी (१० किमी), नवी डांग (८ किमी), लिपू लेख पास (७ किमी)
लिपूलेख पास हा भाग समुद्र सपाटीपासून १६७३० फूट उंचावर आहे व येवून तिबेट अर्थात चीनचे राज्य सुरु होते.
“ॐ नम: शिवाय” च्या मधूर आणि भक्तीपूर्ण भावनेने प्रत्येक यात्री नामस्मरण करत चालत राहतो. रस्त्यात जो कुणी वाटसरु भेटेल त्याला पण राम राम म्हणतो, त्याप्रमाणे “ॐ नम: शिवाय” म्हणताना व आपला आदर भाव व्यक्त करताना दिसतो. यात्रा ग्रुप सकाळी ५.३० ते ६ च्या सुमारास एका मुक्कामाहून कूच करते. सकाळी चहा व फराळ दिले जाते. हलके हलके. यात्री दुसऱ्या स्थानापर्यंत १ ते २ पर्यंत पोहोचतात. या ठिकाणी गरम गरम जेवण तयार ठेवलेले असते व यात्रेकरुंना येताच जेवण मिळते. दुपार व रात्र दुसऱ्या मुक्कामी थांबते व पुन्हा दुसऱ्या दिवशी सुरु होते.
लिपूलेखपास नंतर सुरु होणारा प्रवासातील पहीला मुक्काम तकलाकोट येथे असतो. मोठे शहर असून सर्व तिबेटी वस्ती व चीनी भआषा प्रमूख असते. दुभाषीचा उपयोग करुन घ्यावा लागतो. चीनतर्फे दोन मार्गदर्शक दुभाषी मिळतात. सर्व सामानाची त्यांच्या कस्टमतर्फे तपासणी केली जाते. यात्रेबरोबर असलेल्या अधिकारी यात्रींची दोन ग्रुपमध्ये विभागणी करतो. एक ग्रुप (अ) कैलास पर्वताची परिक्रमा करण्यास जातो व दुसरा ग्रुप (ब) मान सरोवराची परिक्रमा करण्यासाठी जातो. प्रत्येक परिक्रमा करण्यासाठी चार-चार दिवस लागतात. कैलास परिक्रमेमध्ये तारचेन, दिरेबू, झॉग झेरबू ह्या ठिकाणी मुक्काम केला जातो. मान सरोवर परिक्रमेमध्ये होरे, चिगू, जैदी या ठिकाणी मुक्काम होतो. दोन्ही ग्रुप परिक्रमा करुन एका मुक्कामात एकत्र येवून पुन्हा परत तकलाकोटला परत येतात व परतीचा प्रवास सुरु होतो. कैलास पर्वत परिक्रमा खऱ्या अर्थाने अत्यंत कठीण असून पर्वत शिखर चढण्यासाठी ‘याक’ या तिबेटीयन केसाळ प्राण्याचा उपयोग केला जातो. बैलाप्रमाणेच हा प्राणी असतो. परंतु घोडा जेथे चढून जावू शकत नाही तिथे या प्राण्याचा वाहन म्हणून उपयोग केला जातो. अत्यंत शक्तीवान परंतु गरीब प्राणी म्हणून हा उपयोगात आणला जातो. रस्त्यात उंचावरचे ‘डोलमा पास’ अर्थात दयेची देवी ही भव्य शिळारुपी असून सर्वजण तिली श्री. पार्वती देवीचे महत्त्व देवून पूजा करतात. तसेच तिथे गौरीकुंड असून ते रस्त्यात लागते. रस्त्यामधील दिरेबू . मुक्कामाहून कैलास पर्वताचे अप्रतिम असे स्वरुप अत्यंत जवळून दिसते. तिथेच सर्व यात्री मिळून शिवपार्वतीला यज्ञ / हवनाद्वारे पूजा आरती करुन समाधान व आनंद मिळवितात.
मानसरोवराची परिक्रमा त्या अथांग जलाशयाच्या काठाकाठाने करीत जैदी मुक्कामी तीर्थस्थान, पूजा पुन्हा हवन इत्यादी स्वइच्छेनुसार केले जातात व मानसिक समाधान
८ मिळवले जाते. तिथूनच कैलास मानसरोवराचे पवित्र जलतीर्थ यात्री आपल्या बरोबर घेवून जातात.
परतीच्या प्रवास तकलाकोट नंतर पुन्हा त्याच मार्गाने धारचुलापर्यंत व तेथून बसने काठगोदामपर्यंत करुन पुढे रेल्वेने दिल्लीला येवून सर्व यात्रेचा समारोप होतो.
आमची बॅच पहीलीच होती त्यामुळे जाताना भारतीय जनता पक्षातर्फे आम्हांस निरोप देवून रवाना केले गेले. आम्ही भाग्यवान समजतो की पूर्व पंतप्रधान मा. अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या हस्ते आमचे स्वागत होवून प्रवासाचा हिरवा कंदील दाखविला गेला. सर्व प्रवास अत्यंत समाधानाचा व आनंदाचा झाला.
विनंती- वरील प्रवास वृतांत १९९७ सालवरील आधारीत आहे. त्यावेळी प्रवास फक्त शासकिय मदतीने होता. आज काल बऱ्याच खाजगी यात्रा कंपनी सहभागी झालेल्या आहेत. त्याचा अभ्यास व्हावा.
जय हिंद जय महाराष्ट्र
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

जेलची हवा

जेलची हवा

आजकाल निरनिराळ्या गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे. सरकार, समाज आणि कुटुंब घटक हतबल झालेला दिसत आहे. ‘जिसकी लाठी उसकी भैस’ या उक्ती प्रमाणे किंवा बळी तो कान पिळी, या तत्त्वाने प्रत्येक जण वागत आहे. संस्कार, नितीमत्ता, चांगुलपणा असले गुणधर्म फक्त पुस्तकातच बंदीस्त झालेले आहेत. न ते कुणी वाचत, न ते ऐकू येतात न ते सांगितले जातात. लोकांनादेखील असल्या महान तत्त्वज्ञानाचा कंटाळा आलेला दिसतो. कारण एकच. असले तत्त्वज्ञान जीवनात आणले जाऊच शकत नाही, ही धारणा. जर ईश्वराच्या अस्तित्वाविषयीच प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. तर मग कसला मानसिक धाक उरत नाही. सरकार फक्त नावालाच असल्याचे जाणवते. खा, प्या, मजा करा, मी खूर्चीवर बसतो. मरु द्या इतरांना. ज्यांनी त्यांनी स्वत:ला सांभाळतच जगायच. हाच मंत्र दिला जातो. असल्या बेछुट, बेशरम तत्त्वज्ञानांनी प्रत्येक व्यक्तींनी आपली सत्ता काबीज केली आहे. जर निमीमत्ता, प्रतिष्ठा, सद्गुरण लोपच पावले असतील तर निर्लजपणाच्या चक्रातच व्यक्ती वावरत असतो.
‘अटक’ अर्थात ‘Arrest’ हा हास्यापद शब्द होऊ पाहात आहे. काही होत नाही त्या संकल्पनेमुळे. ती व्यक्ती पोलीसांच्या संरक्षणात जास्त सुरक्षित राहते. त्यांच्या खाण्या, पिण्याची सर्व गरजांची, दुखल्या-खुपल्याची सोय पद्धतशीर होते. गाडीत फिरणे होते इत्यादी. शिक्षा झाली तर तो जेलमध्ये जातो. कशासाठी फक्त त्याला बंदीस्त करण्यासाठी इतरांपासून दूर करण्यासाठी. “काय तर म्हणे त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा येते.” अभ्यास केला तर वाटते किती हास्यापद हे सांगणे आहे.
स्वातंत्र्य पूर्व काळ, ब्रिटीशांचा तो काळ होता. जेव्हा अटक, बंदीस्त व जेलची सजा या संकल्पना होत्या. त्यावेळी किती वेगळी परिस्थिती होती. खरी सजा ही त्यावेळी गुन्हेरागाला मिळे. त्याला छडीचे फटके मारले जात. हे दोन्ही हात पाय बांधून होत असे. एक छडीचा फटका बसला, तर कातडे फाटले जावे, ही जेलच्या शिपायांना समज होती. नसता त्यालाच शिक्षेला वा चौकशीला सामोरे जावे लागे. शिक्षा अत्यंत गंभीरतेने घेतली जात असे. गुन्हेगार हा गुन्हेगारच समजला जाई. त्याच्याकडून सतत कामे करुन घेतली जात. मग ती बाग कामे, शेती, सफाई, रंग-रंगोटी, विणकाम, फर्निचर, कपडे शिलाई, चटया विणणे, सतरंज्या इत्यादी अनेक अनेक हातमाग युक्त होत्या. प्रत्येक कैद्याला व त्यावर नियंत्रण करण्याऱ्याला एक Target दिले जाते व ते पूर्ण करण्याची त्याच्यावर जबाबदारी निश्चित केलेली असे. कैद्यांना कुणासही भेटू दिले जात नसे. फक्त ठराविक काळानंतर एखाद दुसरा भेट घेई. न पत्र न चिठ्ठी संपर्क. संपूर्ण कट केलेला असे.
२ कैद्याचे तो एकदा ‘गुन्हेगार’ ठरला, की त्याचा शिक्षेचा काळ हा निश्चित होता व तो पूर्ण करीपर्यंत त्याच्या शारिरीक व मानसिक हालाला पर्याय नव्हता. जे मिळेल तेच खावयास मिळे. दुखऱ्या खुपऱ्याकडे ही फारसे लक्ष दिले जात नव्हते.
का हे सारे होते? राक्षसी वाटते ना? भयंकर वाटते ना? माणुसकीला सोडून वाटते ना? अन्यायकारक वाटते ना? होय मान्य सारे काही रानटी वाटते. ज्याला सारासार विचार आहे, त्याला हे पटणार नाही. राग येईल.
पण आपण सारेच व्यवहारहीन, भावनाहीन होत चाललो आहे. फुकटचे तत्त्वज्ञान व माणुसकी, प्रेम, दया या भावनांचे पुळके बाळगणारे झालो आहोत. चार माणुसकीचे तत्त्वज्ञानवाचले की आपली मती कुंठीत होते. माणसांनी जनावरांप्रमाणे वागू नये. त्यात माणुसकी, प्रेम, दया या भावना सतत जागृत असाव्या, अत्यंत चांगले व उच्च दर्जाचे हे तत्त्वज्ञान आहे. परंतू असल्या तत्त्वज्ञानाचा विचार करताना जग, व्यवहार आपापसातील संबंध हे सारे समजणे अत्यंत गरजेचे असते. चांगले वागण्यास कोणीही विरोध करणार नाही. परंतू जर ते चांगले वागणे या सदरात असेल तर. पण तेच जर रानटी, जंगली या सदरात जात असेल तर मात्र त्याच्याशी त्याच पद्धतीने वागणे, त्या वाईटाचा प्रतिकार करणे याला समज, शहाणपण म्हणतात. आईने वा वडील व्यक्तीने शिक्षा केली, थोबाडीत मारले तर त्याचा विचार निश्चित व्हावा. त्यावर विचारणा, सुधारणा व्हावी. परंतु जर कुणी अज्ञात व्यक्तीने तुमच्या थोबाडांत मारली तर त्याच्या बाबतीतही प्रेमाचे गोडवे, दया या आदर्श भावना व्यक्त करणे केवळ बुळेपणाचे लक्षण समजले जाईल. त्यालाच मूर्ख समजतील.
‘पाचामुखी परेश्वर’ हे महान तत्त्वज्ञान आहे. परंतु जर पाच जणाने कुणा अबलेवर अत्याचार केला, बलात्कार केला, तर त्याला तुम्ही काय म्हणता. जीवनात जशास तसे याच पद्धतीने जगण्याचा रिवाज आहे आणि तसेच जगले तरच तुम्ही जगू शकतात. संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यानी देखील म्हटले आहे. ” नाठाल्याचे माथी हानू काठी ” . ईश्वरांनी देखील दुष्टांचा नाश करण्यासाठीच जन्म घेतलेला हे सत्य आहे. वाईट प्रवृत्ती सुधारण्याचा प्रयत्न व्हावा. परंतु जर सुधारणा होतच नसतील तर त्याचा संपूर्ण बिमोड करणे हे व्हावे.
आज काल चांगुलपणा, संस्कार, आदर्शवाद याच्या भावना उदाहरणासाठी देखील मिळत नाहीत. यात देवालयाचा परिसर, धार्मिक स्थळे, मंदीर, मशीदे, गुरुद्वारे, शाळा, कॉलेज हे भाग पण अलिप्त राहीले नाहीत. अनेक वाईट गोष्टी अशा परिसरांत होत असल्याची अनेक उदाहरणे दिसून येतात.
माझा आपला छोटासा अनुभव. परंतु खुपसे काही सांगणारा वाटतो. मी सेंट्रल जेलमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काही काळ व्यतीत केला. जे मी जाणले, दिसले, अनुभवले त्याचे चिंतन करण्याची गरज आहे. पूर्वीचा काळ एकदम बदलला आहे.
3 अर्थात बदल ही काळाची गरज असते. याच्याशी सहमती आहे. परंतू बदल कुणासाठी व का व कोणता याचा देखील विचार होणे आवश्यक आहे.
जेलमधली कागदावर यादी केलेली शिस्त ही फक्त त्या कागदावरच असल्याचे आढळते. मुख्य म्हणजे जेलमध्ये आलेले सारे कैदी हे देखील तुमच्या आमच्या प्रमाणेच माणसे आहेत. त्यांना माणुसकी, माणवतावादी दृष्टीकोण याचा संपूर्ण अधिकार आहे. ते जनावेर नाहीत व आपण इतर रानटी नाहीत ही धारणा अत्यंत दृढ व पक्की सर्वांच्या मनात भरलेली आहे. हे सारे त्यांची मानसिकता सुधारावी म्हणून. त्यांनी केलेली चूक ही कदाचित प्रासंगिक असेल त्यांना सुधारण्याचा फक्त प्रयत्न व्हावा. अत्यंत योग्य व मानवतावादी दृष्टीकोण आहे. यात दुमत नाही.
परंतू हीच मंडळी ज्यांनी सर्व नियम, वागण्याच्या तऱ्हा, माणुसकी पायदळी तुडवलेली असते. इतर कुणाचे भयानक नुकसान केलेले असते. काहींनी हत्या, बलात्कार, चोरी, मारामारी या सर्व क्लेशदायक गोष्टी केल्या असतात. आपल्या भावना, लोभ, स्वार्थीपणा, इर्शा, राग इत्यांदीना खतपाणी देत समाजाची प्रकृती नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला असतो. म्हणून त्यांना बंदी केलेली असते. त्यांचे सर्व म्हणणे, त्यांचे सर्व विचार, भावना या समजावून घेतल्या असतात. त्यांना त्यांची बाजू व्यक्त करण्यास संपूर्ण मुभा दिलेली असते. सारे होऊनच काही काळासाठी त्यांना सजा व बंदी केलेले असते.
एखाद्या सामान्य माणसापेक्षा या कैद्यांचे जीवन अत्यंत आनंदाचे, समाधानाचे व सुखसोईंनीयुक्त असे वाटते. फक्त चार भिंतीच्या आत राहणे येवढेच बंधन. परंतु जे बाहेर कुणाला सहज मिळत नाही ते त्यांना मिळते. नव्हे ते त्यांना मिळण्याचा जवळ जवळ अलिखीत अधिकार प्राप्त झालेला असतो. चांगले जेवण, चांगले पाणी, चहा, कॉफी व दूध देखील भरपूर प्रमाणात मिळते. जर खाण्यापिण्यात कर्माचाऱ्यांनी हलगर्जीपणा केला व चूक झाली तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होते. त्यांना जाब विचारला जातो. चांगली कारवाई होते. कॉलीटी योग्य, योग्य धान्य, फळे, भाजी हे पुरवले जाते. त्याची नियमित वैद्यकीय तपासणी होत असते. त्यात कोणतीच कमतरता पडू दिली जात नाही. जे सामान्यांना बाहेर श्रम करुन देखील संपूर्ण कुटुंबाला जे मिळत नसते ते या कैद्यांना मिळते. याच कारणाने अनेक कैदी सतत बाहेर कोणता तरी गुन्हा करुन तिथे येण्याचा प्रयत्न करतात हे अभ्यासले आहे. बाहेर न नोकरी न धंद्याच्या सोई, न तो करण्याची मोकळीक. पोटभर कमविण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागतात. अनेक प्रशासकीय शिस्तीचा बडगा त्यांच्या भोवती असतो. गंमतीची गोष्ट म्हणजे तो फक्त ‘शिस्तीचा, नियमाचा बडगा’ एवढेच हत्यार असते. त्याचा केव्हाच खऱ्या मार्गाने उपयोग केला जात नाही. फक्त धाक आणि तो कशासाठी तर त्या धाकातून होणाऱ्या भ्रष्टाचारासाठी. सर्व केवळ लूटालूट असते.
4 मग ‘हम सब चोर है’ या तत्त्वांनी ही माणसे बिनधास्त गुन्हे करतात व जेलमध्ये येतात. कशाला भ्यायचे, कुणाला भ्यायचे? हे मूळ प्रश्न त्यांच्याकडे नसतात व का असावे. कारण जर सर्वच चोर असतील म्हणजे काही शाहू, सभ्य तर काही शिरजोर गुंड. कोणतीच नितीमत्तेची रेखा कोठेच आढळत नाही. खानदानी, संस्कारीत, परंपराचे श्रेष्ठत्व हे सारे शब्द इतिहास जमा होवू लागले आहे. मग सारेच बदमाश हरामखोर या सदरांत येवून जातात. जो पकडला गेला तो चोर. जो पडला तोच मुर्ख ठरतो. इतर सारे मान सन्मान प्राप्त, हे बिरुद घेऊन आपल्या मनाला, आत्माला चक्क फसवित जगत असतात.
‘कैदी देखील मानव आहेत’ हे तत्त्वज्ञान A.C रुममध्ये सुरक्षित बसणारे महान व्यक्ती गुणगान करताना दिसतात. त्या दृष्टीने कैद्यांच्या मनाचा मागोवा घेत, जेलचे वातावरण फिरते. त्यांना चांगल्या खाण्या-पिण्या बरोबर परवानगीने त्यांच्या तल्लफींच्या सवयींची काळजी घेतली जाते. नाते संबंधी, मित्र मंडळी यांना नियमीत भेट दिली जाते. सहीली देखील काढल्या जातात. झोपण्यासाठी चांगले पांघरुण दिले जाते. स्नान, स्वच्छतासाठी भरपूर पाणी असते. सर्व प्रकारचे पेपर्स, लायब्ररी, खेळासाठी सर्व साहित्य, रेडीओ, टिव्ही इत्यादी व्यवस्थित असते. कोणत्याही मध्यम वर्गामधल्या व्यक्तीला आपल्या जीवनचक्रात जे मिळते, प्राप्त होते ते सारे सारे त्याला त्यांच्या गरजांना पूर्ण केले जाते. डॉक्टर आहेत, औषध आहे, काय नाही सर्व काही मोफत असते. शिवाय कोणतीच शिक्षा नाही. अंगाला स्पर्शही केला जात नाही. नियमीत सांस्कृतिक कार्यक्रम, गाणे, नाटक, भाषणे, करमणूक व ज्ञान प्रदान गोष्टी होतात. थोडासा विचार करा जे त्यांना बाहेर कष्ट करुन. मर मर मरुन मिळत नाही ते सर्व फुकट त्यांना मिळते. मग जेल कशासाठी – फक्त चार भिंतीच्या आत ठेवण्यासाठी. बस शब्दांचाच हा खेळ आहे. अटक, बंदीस्त, जेलची हवा इत्यादी, ज्यांना थोडीशी शरम असेल, इज्जत असेल तीच माणसे या शब्दांना घाबरतात. त्यांना महत्त्व देतात. परंतु आजपर्यंत तरी कुणी महाभाग दिसला नाही. जो या बंदीस्तपणाच्या संकल्पनेला दचकून आहे. अनेक पुढारी, नेते, तथाकथीत संतमंडळी, महाराज इत्यांदीनी पण जेलची हवा चाखली व ते तेथेही अत्यंत समाधानी असल्याचे चित्र अनेकांनी बघीतले आहे.
सामान्य नागरीकांच्या पैशावर पोसत असलेली ही बांडगुळे आहेत. जेल म्हणजे काय या संकल्पनेचा विचार करण्याची खरी गरज आहे. गुन्हा, गुन्हेगार व शिक्षा या बंदिस्त त्रिकोणाचा समाजाच्या आरोग्यासंबंधी गंभीरतेने विचार व्हावा. मानव, मानसिकता, दया, प्रेम या भावनिक शब्दांचा खेळ, तीच माणसे करतात. ज्यांना या असल्या गुन्हेगारांचा दुरान्वये संबंध येत नाही. ज्यांचे जळते त्यांनाच कळते म्हणतात.
कोणत्याही शिक्षेत रानटीपणा भयानकता, तिरस्कार वाटेल तशी योजना नसावी. परंतू शिक्षा ही एक धाक, जरब, भीती या भावना स्थापन करणाऱ्या मिश्रीत असाव्यात.
5 बलात्कार करणाऱ्यालासुद्धा भावना असतात. तो देखील माणूस आहे. चुका करु शकतो. त्यांना पण दया दाखवा. असे बेछूट तत्त्वज्ञान सांगणारे आता बदलत आहे. बलात्कार पीडीत व्यक्तीला न्याय मिळावा असे त्यांना पण वाटू लागलेले आहे. शिक्षा व गरज पडल्यास फाशीची शिक्षा द्या असे लोक म्हणू लागले या कारणाने.
शिक्षा, अटक, जेल याचा खऱ्या अर्थाने पुर्नविचार व्हावा. ती एक गरज आहे. समाजाच्या चांगल्या आरोग्यासाठी.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com