कर्त्यापेक्षा कला श्रेष्ठ
(ईश्वर निर्मितीला जाणा)
ईश्वर, चिंतन सानिध्य ईश्वराची महानता, सर्व व्यापीपणा असे अनेक दिव्य भव्य गुणांनी परिपूर्ण असलेले वर्णन, बालपणापासून समजावले गेले, अंगीकारले गेले. सतत त्याचा भडीमार मन- विचारांवर होत होता.पौराणीक कथा, श्लोक, काव्य, रचना, सुत्रे अशा अनेक माध्यमातून ईश्वरी श्रेष्ठत्व गायले गेले. पटवले गेले, सांगितले गेले. पुस्तके, ग्रंथ, वृत्तपत्रे, मासिके, रेडीओ, टीव्ही इत्यादी अनेक माध्यमे वैचारिक जडण-घडणामध्ये भाग घेत होते. शाळेत शिक्षकांचे तत्त्वज्ञान व घरांत वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन ह्याचा मारा सतत होत होता. घरामधली नातेमंडळी मित्र – परिवार हे त्या त्या महान तत्त्वाला अनुसरुन वागणाऱ्या आणि इतरांना वागविण्याचा प्रयत्न करताना दिसत होती. हे सारे दैनंदिन डोळ्यांदेखत होत होते, घडत होते. अनेक प्रश्न समोर येत, परंतु ते काळाप्रमाणे, वयाप्रमाणे सोडविले जातील, याची जबरदस्त खूणगाठ मनामध्ये बांधण्यात परिसर, वातावरण व संस्कार यशस्वी झाले होते.
हिरा असा सहज प्राप्त होत नसतो. प्रचंड खोदकाम, श्रम केल्यानंतरच तो हाती लागतो. ह्या विषयीचे तत्त्वज्ञान मनाला शंभर टक्के पटले होते. श्रम आणि साध्य ह्याचे अतूट नाते मनावर चांगलेच बिंबले होते. हिऱ्याची तुलना ईश्वरासाठी करताना, जरी ते प्राप्त होण्यासाठी श्रमाची संकल्पना पटली, तरी मन साशंक होत राहिले. कारण श्रमानी हिरे प्राप्त केलेले अनेक दिसले, कळले होते. ईश्वरांचे मात्र तसेच असेल का? हा प्रश्न मनांत घोळत होता. कारण हिऱ्याचे अस्तित्व बघीतले होते. ईश्वराचे तसे नव्हते. तो सर्वत्र आहे, महान आहे, हे तत्वज्ञान शंभर टक्के पटले होते. परंतु तो कुणाला भेटला, दिसला ह्याचा शोध वा बोध मात्र मनाला केव्हाच मान्य झाला नाही. फक्त सांत्वनासाठी त्याचा अनुभव घ्या, तेव्हा ईश्वराबद्दल कळेल हे मान्यवरांचे पांडीत्यपूर्ण तत्त्वज्ञान समजत होते, परंतु पटत नव्हते. कदाचित स्वत:मध्ये ते कळण्याची वा कळून घेण्याची पात्रता नसेल. हे मन सांगत होते. प्रयत्न केले, प्रचंड श्रम घेतले व हीरा प्राप्त झालेला आम्ही बघीतला होता. परंतु ईश्वराचे काय? तो कुणांला आज तागायत तरी दिसला, प्राप्त झाला हे ठामपणे कळले नव्हते. त्याच्या प्राप्तीची जगाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये, जागेमध्ये आणि केंव्हाही एक वाक्यता त्यावर झालेली दिसली नाही. हा एक मात्र प्रखरतेने मान्यता पावलेले तत्वज्ञान दिसून आले की ईश्वर जरी प्रत्यक्ष दिसला भेटला नसला, तरी त्याच्यासंबधी अनुभव मात्र अनेक थोर व्यक्तीना आलेले आहे. जे त्या ईश्वराचे दिव्य भव्य असे वर्णन केले गेले ते त्यांच्या आत्मिक प्रयत्नामध्ये अनुभवांनी साध्य केले. जे अनुभव सर्व सामान्यांना सहज मिळणार नाही असे अनुभव, अनेक व्यक्तींना आल्याचे ऐकू येते. मात्र जर ते त्या ईश्वरासंबंधीचे अनुभव होत असतील तर ते सर्वत्र परंतु सारखे असे असणारच नाही. ते भिन्नभिन्न असतील
२ व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात, तसेच तितकेच अनुभव होतील आणि जेथे भिन्नता तेथे अनेक मार्ग वर्णीले जातील.
कोणते तत्वज्ञान मला ह्यातून मिळाले, ईश्वर दर्शनाच्या प्रयत्नाचा शेवट, एक भव्य दिव्य अनुभवाच्या रुपांतच मिळणार. जर मी तसाच अनुभव मला प्राप्त व्हावा ही संकल्पना केली, ध्येय आखले तर ते कदाचित पूर्ण होणार नाही. कारण शेवटी अनुभवांतील भिन्नता, माझ्या ध्येयाआड येईल, त्याच क्षणी मात्र साशंकता मनांत येवू लागते. जर ‘ फक्त विश्वास ठेवा, प्रयत्न करा ‘ हा कुणी संदेश दिला, तर मात्र अंधश्रद्धा हीची निर्मीती होईल व ती भरकटत घेवून जाईल. काही तरी ऐकले, काहीतरी वाचले, काही तरी समजणे झाले, हे ते होईल. केवळ त्या विचारातील भव्यता, दिव्यता मनाचा कोंडमारा करेल. मग ते त्याच विचारांना सत्याची झालर लावून, व्यक्त केले जात असल्याचे होईल. अनिश्चित ध्येय हे महान तत्त्वज्ञानाची वस्त्रे धारण करेल.
मग मी काय करावे. मी एक सामान्य व्यक्ती आहे. साधा विचारक आहे. कोणाच्यातरी महान तत्वज्ञानासमोर झुकणारा. त्यांचे विचार मानणारा. कारण त्या त्या व्यक्तीने परिश्रम केलेले असतात. प्रयत्न केलेले असतात. जीवनातील सारे तन, मन, धन, परिश्रम त्याने खर्च केले असते. आपले सर्व आयुष्य त्या संकल्पनेच्याच ध्येयात घातले असते. हे सारे मी बघीतले असते. त्या ठराविक महान व्यक्तीविषयी मी समजलेलो असेन. मी त्याचे सारे श्रमसाध्य घेऊन, त्याच्याच विचाराने, मार्गदर्शनाने माझा मार्ग निश्चीत करु इच्छितो. मग कोठे चुकले? एखादा व्यक्ती अ, आ, ई हे शब्द घेवून अभ्यासास सुरुवात करते, प्राथमिक धड्याचा आधार घेत घेत पुढे एखाद्या प्रांतात डॉक्टरेट करते. याचाच अर्थ ती आपले सारे आयुष्य तीच्या ध्येयासाठी पणाला लावते. तीला एक प्रकारची मान्यता मिळते. मला जर तेच हवे असेल, तर माझी वाट त्याच्या प्रमाणेच प्राथमिक पासून शेवटपर्यंत तशाच प्रकारे असेल. सार आयुष्य खर्च होईल. नाही – मी त्याच्या प्राप्त शेवटच्या धाग्याला धरुन पुढे जाऊ इच्छितो. त्याचप्रमाणे प्रयत्नाने त्याला दाद देत, तोच मार्ग पुढे घेवून जाण्याचे ठरवितो. ह्यात माझे प्राथमिक श्रम वाचतात व वेळही. कारण आयुष्य मर्यादेचे आहे.
हा! थांबा – – थोडा विचार करा! हेच जीवनाच्या वाटचालीमधले अत्यंत महत्त्वाचे व निर्णयपूर्व वळण असते. तेच तुम्हांला श्रमाकडे अथवा अंधश्रद्धेकडे घेवून जाणारे सिद्ध होईल. कारण यातील गोष्ट आहे की हा त्या महान व्यक्तीचा आपला अनुभव, आपला साक्षात्कार असेल. ह्यासाठीचे हे त्याचे आपले प्रयत्न असतील व त्यासाठी त्यांनी तयार केलेली वाट, ही देखील त्याचीच असेल. त्याच वाटेवरुन जावून कुणासही खऱ्या अर्थाने काहीच साध्य होणार नाही. त्याचा वैचारिक बांध, हा त्याच्या मनातून – नव्हे अंतःकरणातून निर्माण झालेला होता. मन म्हटले की भिन्नता येतेच, हाच तर निसर्गाचा चमत्कार नव्हे का?
3 ईश्वर त्याच्या अस्तित्वाची झलक नेहमीच देत आलेला आहे. मात्र पूर्वी म्हटल्याप्रमाणे दर्शनाने नव्हे तर अनुभवांनी.
एक प्रसंग आठवतो. – कोणता विचार मी करु इच्छितो. फार बैचेन मनातल्या अवस्थेमध्ये गुरफुटून जात चाललो होतो. एका निवांत जागी चिंतच करीत बसलो होतो. अचानक संगीताचे अत्यंत मधुर स्वर ऐकू आले. मन आनंदाने भरुन आले….. ज्याला अत्यानंद……म्हणतात. त्यात तल्लीन व्हावे. तंद्रीत जावे, परिसर, जग यांना विसरुन जावे. हे सारे त्या संगीताने केले होते. आनंद, समाधान ज्याला आपण म्हणतो तो सर्व प्राप्त झाला होता. काय हवयं मला आता? येथेच माझे पूर्व संस्कार, पूर्व ज्ञान झालेला वैचारिक मारा, वाचलेले ऐकलेले ईश्वरी दिव्यत्वाचे भव्यतेचे वर्णन बैचेन करु लागले. ईश्वरी दर्शन, साक्षात्कार त्यांच्यात एकरुप होणे ही ज्ञांनाची, ग्रंथांची मार्गदर्शक तत्वे चोहोबाजून मजवर आघात करु लागलो. प्रयत्न करा, श्रम करुन तुम्हाला हा हिरा प्राप्त होईल. असेच तत्त्वज्ञान. श्रम, तपश्चर्या, भक्ती, विश्वास इत्यादींच्या … आलेल्या ईश्वराला प्राप्त करण्याच्या मार्गाकडे घेऊन जगण्यास उत्सुक होता.
फार बैचेन झालो. नुकताच मिळालेल्या संगीताच्या आनंदात तंद्री लागलेली असताना, विचार आला की त्या संगीताला आपलस करण्यापेक्षा, त्याला माझ्यातच सामावण्यापेक्षा, मी त्या संगीतातच सामावू इच्छित होतो. ईश्वराने दिलेल्या कांनानी, श्रवणद्रींयांनी संपूर्ण आनंद लूटण्यापेक्षा, माझे चंचल मन, डोळ्याकडे अर्थात दृष्य स्वरुपाकडे झेप घेण्याचा विचार करीत होतो. मला आता ते ध्वनी लहरी जे अत्यांनंद देत होते, ते कुणी निर्माण केले त्याचा शोध घेण्याची इच्छा होऊ लागली. कारण इतका आनंद निर्माण करणारा तो फक्त ईश्वरच असेल ना, त्याला मी बघू इच्छितो. पुन्हा परत बैचेनी. कारण माझी इच्छा, आशा यांची झेप अशीच उंचावत राहणार.
जे पंचेद्रीये मला निसर्गाने दिलेले आहेत, त्या सर्वांना त्यांच्या त्यांच्या परी एकरुप होता येईल. व आनंदाच्या सीमा मिळत राहतील, हीच सैरावैरा धावणाऱ्या मनाची विचार स्थिती. मला प्राप्त पंचेद्रीयांतील एक इंद्रीय ऐकण्याचे साधन, वाद्याचा, ध्वनीचा आस्वाद घेण्याचे इंद्रीय, शब्दांचा झंकार आत्मसात करण्याचे एक अवयव. शब्दांमध्येच उत्कठता असते. ही समज आणि त्याच ईश्वराचे ध्वनी स्वरुप मी माझ्यांत एकरुप करत घेण्याचा प्रयत्न करीत होतो. मी स्वत: त्या ध्वनी माध्यमांत, अक्षर स्वरुपात एकरुप होण्यास असमर्थ होतो. ती कला, ते ज्ञान मला प्राप्त नव्हते व कुणासही नसले तरी मी त्या ध्वनी स्वरांत शिरु शकत नव्हतो. अर्थात त्या ध्वनी स्वरांचे जे स्वरुप ईश्वरी संकल्पनेचे वाटले होते, त्यात म्हणजे त्या विश्वात मिसळून जाऊ शकत नव्हतो. मात्र त्याची दुसरी बाजू ते ध्वनी मी माझ्यात माझ्या देहांत, आत्म्यांत एकरुप करणे शक्य होते. अर्थात त्यास लागते आनंदाची तंद्री, मग्नता, लय. त्या ध्वनी लहरी ते संगीत ज्याला मी ईश्वरी स्वरुप समजलो होतो.
4 मनामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करीत होतो. ईश्वरी संकल्पना दुरावते हे जाणले तो फक्त प्रयत्न असतो, विचार असतो, आत्मा असतो. मात्र त्या संगीतामध्ये जेव्हा एकरुप होऊन जातो, स्वत:ला विसरुन जातो, त्याचवेळी ते ईश्वरी सानिध्यात असते. त्याची उकलन करता येणार नाही, ज्याचे विश्लेषणही करता येणार नाही. ज्या विषयाचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात. ती स्थीती ब्रह्मानंदाची Ecstasy of joy म्हणतात , ते हे नव्हे का?
माझ्या तंद्रीमधून मी बाहेर आलो, माझ्या दुसऱ्या अवयवाचा विचार करु लागलो. माझी दृष्टी माझी नजर, माझे बघणे, माझे डोळे हे सारे आतूर असतात. सतत त्या ईश्वराच्या शोध संकल्पनेला गुरफटलेले असतात. माझ्या साऱ्या प्रयत्नांचे ध्येय … फक्त एकच असते. त्या ईश्वराचे दर्शन मिळवणे. त्याला डोळे भरुन बघणे. त्याचे स्वरुप जाणणे आणि तो ईश्वर कोण, कसा हे विचाराने नजरेसमोर येवू लागते. तो ईश्वर ज्याला नाव दिलेले असते. त्याला रंग रुप, आकार, वेषभूषा, पेहेराव, अयुध्ये अथवा कोणत्यातरी पवित्र वस्तू ज्या संगीतल्या गेल्या आहेत. जसे कमलपुष्प, ओमकार, स्वस्तीक, शंख, इत्यादी. अशाच त्या ईश्वराला, त्याच्या वर्णन केलेल्या दृष्यामध्ये मी माझ्या चक्षुपटलांवर आणू इच्छितो. ग्रंथकारांनी महान थोर संतांनी देखील त्याला खऱ्या अर्थाने बघीतलेले नाही. तो निर्गुण निराकार, सर्वव्यापी, सर्व साक्षी असे अंतीम वर्णन केलेले आहे. आणि हे वर्णन जगातील सर्वच धर्म ग्रंथ मान्य करतात. सगुण, रुप हे फक्त , लक्ष केंद्रीत करण्यासाठी. पंरतु आपण आपली विचारांची हद्द तेथ पर्यंतच नेवून ठेवतो. व त्याला कोणत्यातरी स्वरुपांत दृष्टीपटलावर बघायचा प्रयत्न करतो. हे देखील त्याला ईश्वरानी दिलेल्या पंचेद्रीयातील एक इंद्रीय, ज्याच्या मार्फत हा आपला प्रयत्न असतो. ते दृष्य स्वरुप म्हणून त्याला अंतीम ध्येयामध्ये नेवून ठेवले जाते. त्याचवेळी जीवनाचे ध्येय ईश्वराच्या स्वरुप दर्शनात जावून बसते. त्याच्या लहरीप्रमाणेच त्याच्या दृष्यमय आविष्कारात. वस्तू जाणणे आणि ती वस्तू अनुभवाने ह्या संकल्पनेत खूप फरक आहे. सुंदर गुलाबाचे फुल बघताना, उंचावरून पडणाऱ्या धबधब्याकडे बघताना, पौर्णिमेच्या शीतल चन्द्राकडे बघताना, कोकिळेची मधुर तान ऐकताना, इंद्रधानुशाचे रंग बघताना, मोराचा पिसारा फुललेला असताना नाच बघताना, एक नाही अनेक अश्या गोष्टी बघताना ऐकताना प्रत्येकजण नुसता आनंदात डुबून जात नसतो, तर तो काही क्षण स्वता:ला विसरून जातो. हीच त्याची ध्यानधारणा होय. आणि जे अशा नैसर्गिक वातावरणाशी एकरुप होतात, तोच त्याचा ईश्वरी अनुभव होय. समोर पसरलेल्या अथांग आणि अगणित वस्तूमध्ये अगदी अनुरेणुमध्ये तो ईश्वर पसरलेला आहे. त्याला अनुभवण्यासाठी दिव्यद्र्ष्टीची गरज आहे म्हणतात, हे सत्य आहे. आमच्या द्दष्टीला वस्तू दिसते, ती त्या वस्तूची जाण. त्यालाच जेंव्हा दिव्यद्रीष्टी अनुभवते तोच ईश्वर नव्हे काय? . म्हणूनच त्याचे स्वरूप निराकार आहे. अपल्या द्दिष्टीक्षेपात, जाणीवेत ज्या ज्या वस्तू येतात ते सारे त्याचेच अंग असते. थेट तुम्ही मी आणि सारा सभोवताल.
५ हे विश्व अनंत अथांग आणि सर्वत्र. हेच तर परमेश्वराचे स्वरूप आहे. आम्ही सदैव जे आमच्या आत बाहेर बघत असतो तोच तर ईश्वर.
ह्यालायच तर आपण ईश्वरी अनुभव म्हणतो. लोक जेव्हा मला ईश्वरी साक्षात्कार झाला म्हणतात. सदैव ज्या चित्रांचे, मूर्तीचे आकृतीचे त्यांचे चिंतन असते ते दिसण्याची मनांत प्रचंड आशा असते. त्याचप्रमाणे तशा प्रतिमा दिसू लागतात. आत्मसात होऊ लागतात. जे होते एका परिने समाधानकारक असते. मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणतात. त्याप्रमाणे विचारांच्या रम्य कल्पनेमध्ये व्यक्ती आनंदून जाते. हे चांगले परंतू हेच तो सारे काही साध्य झाले असे धरुन जातो. येथेच अटकतो. सर्वस्व प्राप्त झाले, ह्यात समाधान मिळवतो. असेच काही ईश्वरी अनुभवाचे देखील असते. पंचेद्रीयांच्याच माध्यमातून त्याला दैवी आविष्कार झाल्याचे वाटू लागते. यात देखील एक मात्र प्रखरतेने जाणवते. ते म्हणजे जेवढी श्रद्धा जास्त बाळगली असते. जेवढे ईश्वरी विचार गहन झालेले असतात, जेवढी वैचारीक आच ईश्वरी अनुभवाची बाळगलेली असते, तेवढेच त्याच्या देह मनाभोवती
अनुभवाचे चक्र गुंफले जाते. मला वाटले, मला अनुभवले ह्या दोन टोकांत तो फिरत राहतो. चांगल वागणं, चांगला विचार करणं, चांगलं राहणं हेच ते ईश्वरी गुणधर्म समजतो. त्यांत रममाण होतो. मात्र फक्त चांगलचं म्हणजे ईश्वर ही संकल्पना अयोग्य आहे. हा मानवी संस्कृतीचाही परिणाम आहे. सर्व काही म्हणजेच तर ईश्वर, हे सत्य आहे. मात्र ते चांगल असो वा वाईट असो. फक्त लय, सातत्य, मग्नता आणि त्या गुणधर्मातच सर्व जगाला विसरणे, हेच तर ईश्वरी गुणधर्म ठरतात. पौराणिक कथांमध्ये अनेक दुष्ट, वाईट प्रवृत्तीच्या देखील व्यक्ती, वर्णन केलेल्या आहेत ज्यांना ईश्वरांनी दर्शन दिले, वरदान दिलेले आहेत. ते केवळ त्यांच्या तनमय होणाऱ्या गुणधर्मामुळे. ईश्वर साध्यता ही कोणत्याही वैचारीक चौकटीत बसत नसते. अनुभव, साक्षात्कार ह्या धारणा मात्र वैचारिक जडण घडणांत बंदीस्त होतात.
आपल्याला ज्ञानाच्या साधनेसाठी, निरसर्गाने ठरावीक दालने करुन दिलेले आहेत. त्याच पद्धतीने आम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकतो. सारे दिलेल्या पंचेद्रीयांच्या चौकटीनुसार असणार. ते आहेत डोळे, कान, नाक, जिव्हा व स्पर्श ज्ञान. मात्र वैचारिक ज्ञानाची झेप प्रचंड दिलेली आहे. पाच इंद्रीयांची चौकट मर्यादीत असते. मात्र सहावे इंद्रीय ज्याला वैचरिक झेप म्हणतात, ही अमर्याद असते. पंचेद्रीयाच्या मर्यादा आखलेल्या असल्या कारणाने तुमच्या त्या त्या ज्ञानाला मर्यादा आपोआपच पडतात. हे सत्य आहे. विचार मात्र आकाश, विश्व वा सागर ईश्वरी कोठेही जाऊ शकतात. येथेच एक शंका मनांत येवू लागते. पंचेद्रीयामार्फत जे प्राप्त होते ते त्वरीत व समोरच आपल्या देहाशी निगडीत असते. त्यामुळे विश्वास प्राप्त ठरते. दुर्दैवाने व्यक्ती यातच अडकून जाते. त्याचमुळे त्या प्राप्त साधन योजनेच्या मर्यादेमुळे जे काही अवगत होईल ते देखील मर्यादेचे स्वरुप धारण करुनच .
६ विचारांची झेप, विश्लेषण, तर्क ह्या ज्ञानाच्या माध्यमाला मर्यादा नसल्यामुळे, त्याचा आविष्कार देखील प्रचंड होऊ शकतो.
आता प्रश्न पडतो तो त्या ईश्वराच्या शोधाचा. मर्यादेचे साधन पंचेद्रीयाच्या माध्यमातून हे शक्य आहे का? सांगितल्या गेलेल्या, वर्णन केले गेलेल्या, सगुणात्मक ईश्वरी रुप हे केव्हाही प्राप्त होणारे नाही. कारण ते झाले विचारांच्या प्रचंड झेपामधून महान व्यक्तीकडून. व्यक्त झालेले वर्णन आहे. एकाचे वर्णन त्याला दुसऱ्याच्या खऱ्या अर्थाने वा आत्मिक स्तरावर दुजारा मिळाल्याचे जाणवला नाही. कारण हे केवळ त्यांचे अनुभव वर्णन असते. मानवी इंद्रियांच्या मर्यादा जाणताना फक्त एकच बाब मनांत ठसते व पटते. ते म्हणजे ईश्वरी अनुभव येतो त्याचा खरा आनंद समाधान होणे, येथे पर्यतच. मात्र हे ही त्यांनाच जे आपल्या प्रयत्नात ते ईश्वरी अनुभव प्राप्त करण्याच्या मार्गावर जात असतात. अनेक व्यक्ती मी बघीतल्या, त्याचे जीवन चक्र बघीतले, त्या सर्व ईश्वर दर्शन वा अनुभव साक्षात्कार ह्या संकल्पनेतच गुरफटून गेलेल्या आहे. जीवनामधला बराच काळ ते साधनेत व्यतीत करतात.
अनेकांना निराशाच हाती लागलेली जाणवते. त्याचे प्रमुख कारण ही मंडळी कर्मकांडात, नामस्मरणात वा अशाच सांगितलेल्या, वाचलेल्या, ऐकलेल्या मार्गात सतत व्यस्त राहतात. आयुष्याचा फार मोठा काळ ते ह्यात खर्च करतात. हे सारे चांगले आहे. समाधान देणारे आहे. त्याच्या मनाला शांतता देणारे असेल. त्याच्याशी सहमती आहे. त्यांनी तसा प्रयत्न करावा. कुणाच्या प्रयत्नाना व योग्य संकल्पनेला मी का विरोध करावा. मला तो अधिकारही नाही व माझी क्षमताही नाही. मात्र स्वअनुभव असा की ह्या सर्व प्रयत्नात शेवटी काहीच निश्चित होत नसते. फक्त समाधानाचा ध्यास केलेल्या प्रयत्नाला यश लाभते, ही केवळ जाणीव. काय करावे मग मी ? प्रश्न पडतो, ईश्वराचे अस्तित्व मान्य, त्याचे सर्व महान गुणधर्म मान्य केलेले आहेत. मात्र ते सर्व निर्गुण ह्या संकल्पनेत. कारण हेच तर त्याचे अद्दष्य स्वरुप असते. जेव्हा अदृष्य स्वरुप हे वर्णन मी मनातून मान्य करतो. त्याचवेळी त्याच्या कल्पीलेल्या सगुण वा दृष्य स्वरुपासाठी फार अट्टाहास करणे गैर होईल. ते फक्त आयुष्य खर्ची केल्याप्रमाणे असेल. मग ह्या संभ्रमात, द्विधा मनस्थीत मी काय करावे ? ह्या चिंतनात मी पडलो.
अचानक मला तेच संगीत तेच चित्र कला, तेच नैसर्गिक दृष्य …..सारे सारे आठवू लागले. ज्या घटनांनी मला प्रचंड समाधान, अत्यानंद दिला. मनाची शांतता त्यात मला दिसली.
एक ईश्वरी अनुभव आल्याचे वाटले. येथेच मनाने एक संकल्प केला. ईश्वराचे जे काही अस्तित्व असेल ते त्याच्याच केलेल्या सर्व जगात, विश्वात विखूरलेले असेल. प्रत्यक अणुरेणुमध्ये तो व्याप्त असेल. हे सारे पटले कारण प्रत्येक वस्तू, प्रत्येत गोष्ट, प्रत्येक
७ सभोवताल हा ईश्वरमय असेल. तर त्याला त्याच्याच कलाकृतीमध्ये शोध घेणे उचित ठरेल “कलेचा आनंद लूटा कलाराच्या शोधांत पडू नका” हा एक संदेश प्राप्त झाला. कारण ती कला देखील असामान्य आहे. मानव निर्मीतीच्या विचारांच्याही मर्यादेबाहेरची आहे. हीच कला अर्थात हे विश्व ह्याला संपूर्णपणे जाणणे, त्याचा आस्वाद घेणे, त्या कलेत एकरुप होणे हेच तर ईश्वरी सानिध्य असेल. न दिसणाऱ्या ईश्वर प्राप्तीसाठी जीवन व्यतीत करण्यापेक्षा, ईश्वर निर्मित सजीव निर्जीव ह्या सर्वांच्या ज्ञान प्राप्तीत, संबंधात एकरुपतेत, जाणीवेमध्येच तो दडला आहे. तेच मिळवण्याचा प्रयत्न व्हावा. असे मला वाटते. कर्म करा म्हणतात, त्यातच ईश्वर प्राप्ती आहे हे ऐकले आहे. कर्म अर्थात चांगले मनाला आनंद देणारे, समाधान मिळणारे कर्म कऱणे म्हणजे दैनंदीन व्यहार ईश्वरी कलाकृती निर्मीतीच्या सानीध्यात जाण्याचा एक मार्ग खऱ्या अर्थाने त्या ईश्वराला समजण्याचा एक प्रकार. ईश्वरी अनुभव म्हणतात ते हेच नव्हे का ?.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail – bknagapurkar@gmail.com