फ्लॅटचे ध्येय
त्याच्या आणि माझ्या जीवनांत खूप तफावत होती.
तो कसा जगतो ? – – – ह्याची मलाच काळजी होती.
बिनधास्त, बेफिकीर, मनमानी त्याचे जीवन
खाओ, पिओ, और मौज करो, हे त्याचे समिकरण.
अनअधिकृत झोपडपट्या मधल्या दोन झोपड्या शेजारी
मागील वर्षीच अधीकृत होऊन नोंद झाली सरकारी.
तूर्तास तरी पाडून टाकण्याची भिती गेली
ह्यामुळे छताची तरी सोय झाली.
आम्ही दोघेही एकाच कंपनीत कामाला.
पगार मिळकत तेवढीच, तरी निराळी दिशा विचाराला.
कसा छोटासा – – – भले वन रुम किचन कां असेना
परंतु पक्या बांधणीचा आपला फ्लॅट असावा, ही माझी धारणा
आणि माणूस म्हणून जगावे ही त्यातील कल्पना
– – – जीवन म्हणजे काव्य नव्हे . शब्दावर बुद्धि जगते.
पण पोट मात्र पैशावर राहते.
तत्वज्ञान, वाचन, विचारांचा माझ्यावर प्रभाव होता.
आणि जगण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी विषयी माझा कंम्पुटर सदैव हिशोब करीत होता.
नॅशनल सेव्हींग सर्टीफिकीटस, युनीट ट्रस्ट, फिक्स डिपॉजीटस आणि सेव्हींग आकाऊन्टस ह्या बाबतीत मला रस होता
व पैशाचे पाठबळ हा विषय आवडता.
दहा विस लाखांचा फ्लॅट बचतीच्या माध्यमातून घेणे
ह्यासाठी गरज होती काटकसरीने जगणे.
हे तत्व अनुसरले आणि पैशाचे प्लॅनींग त्या प्रमाणे आखले.
– – – मला मोठी गम्मत वाटते त्याची आणि त्याच्या जगण्याचा पद्धतीची.
नो प्लॅनींग नो Aim. जो चल रही है, गाडी उसका नाम
खर्च करेंगे हातसे , जो मिले दाम. कलका सोचा किसने
आज मिला उसको पहचाने
रोज रोजच्या जेवणांत फळे हवीत त्याला
चटक मटक माल मसाला.
रत्नागिरीचा आंबा आणि मोठे नागपूरी संत्र
फळबाजारांत जाऊन उत्कृष्ट फळे आणण्याचे त्याचे तंत्र
मी म्हणतो रेल्वेतून येताना डब्यांत फळे विकणारे येतातच की.घ्यावी तीच फळे.
पण ह्याला हवे नेहमी निराळे.
क्वॉलीटीच्या गप्पा मारतो आणि पैसा उडवतो.
अरे कांही तरी पोटांत जाण्यास कारण.
कशाला खरा खर्च जादा.
मिळेल थोडक्यांत तर समाधान सदा.
रेशनचेही धान्य जगण्यास हमी देते
परंतु त्याला बासमतीचे जेवण लागते.
अन्नाचा म्हणे सुगंध हवा.
मी म्हणतो ज्याला भूक त्याला सर्वच मेवा.
आरे झोपेला धोंडा आणि जेवण्यासाठी कोंडा.
परंतु त्याला पाहीजे मटन मच्छी आणि अंडा.
त्याला हवा रंगीत टी. व्ही. आणि कंप्युटर आयपॅड नवा,
चैनीच्या इलेक्ट्रॉनीक संचाचा ठेवा.
झोपण्यासाठी हवी स्पंजची गादी आणि मऊ मऊ उशी.
आरे आम्हाला तर सतरंजी पुरते कशी.
१० x १२ ची झोपडी फडतूस काय ती
पण सदा करतो त्यांत रंग रंगोटी.
फुलांचे कुंडे काय आणि माशांचा टॅंक
पडदे लाऊन ठेवतो चकाचक
सगळाच खर्च करुन टाकला त्याने झोपडीत
तर कसा काय ब्लॉक होईल ह्या जन्मात.
मी म्हणतो आज कळ सोसून साधे रहा
आणि उद्याच्या फ्लॅटची स्वप्ने पहा.
* * * *
चालला होता काळ हलके पावलांनी
आणि कित्तेक वर्षे गेली उलटूनी
एका चांगल्या फ्लॅटमध्ये केली होती नांव नोंदणी.
प्राव्हीडंट पंड आणि हाऊसिंग लोनच्या साह्याने केली अर्थ उभारणी
दारावरची पाटी हसत आहे दिमाखाने
सांगत होती इतिहास, कसे घडविले जीवन
तारुण्य आणि प्रौढत्व प्लॅनिंग मध्ये खर्चीले.
जीवनाचे आयुष्य बंदीवासांत घालविले.
काटकसरीची ती चौकट मर्यादा टाकीत गेली
आयुषामधले रंग फिकट करीत गेली
जीवनाचे उदिष्ट पहाडा एवढे केले
साध्य करण्या तेच सारे आयुष्य खर्चिले.
क्षीण झाली होती दृष्टी
ब्लॅकची आकर्षकता टिपू शकत नव्हती.
बधीर झालेले कान डोअर बेलचा आवाज ऐकण्यास सांगण्यास असमर्थ होते.
दात आहेत तर चणे नाहीत ही झाली होती अवस्था
पण सांगा कुणाला ही व्यथा.
खर्चिले सारे आयुष्य ज्याचे साठी
नकोसा वाटू लागला तोंच फ्लॅट आता वृद्धत्वाच्या काठी
– – – आणि तो माझा शेजरी,
आजही राहतो तसाच त्याच्या घरी.
तीच टिप टॉप झोपडी, तीच रंगरंगोटी.
सारे सारे तसेच, वयाची संपता साठी.
नागपूरी संत्र आणि उत्कृष्ट फळे, बासमतीचा वास आजही दरवळे.
तसाच बिनधास्त, तसाच बेफिकीर, हासत खेळत जीवनाचे रंग चाखणारा.
अन् प्लॅन्ड तरीही विचारी.
त्याला ठाऊक होता तो वर्तमान काळ – – – एक सत्य परंतु निश्चीत.
सदा बहरलेला व कधीही न संपणारा.
मी मात्र चाचपडत राहीलो, भविष्य काळासाठी.
जो अनिश्चीत होता. कधीही न येणारा
आणि व्यर्थ घालविला तो भूतकाळ
पुन्हा कधीही न मिळणारा.
दोन्ही काळांनी शिकवले
भूत आणि भविष्य काळावर हात ठेव
परंतु पाय मात्र सदैव वर्तमान काळातच राहू देत
(कविता)
डॉ. भगवान नागापूरकर 9004079850