Monthly Archives: जानेवारी 2013

कैलास मानसरोवर यात्रा

कैलास मानसरोवर यात्रा

देवाधिदेव महादेव श्री शिवशंभू आणि जगनमाता पार्वतीदेवी यांचे परमपवित्र निवास स्थान म्हणजेच कैलास पर्वत. जगामध्ये अस्तित्वात असलेल्या निरनिराळ्या धार्मिक पवित्र स्थळांमध्ये कैलास पर्वत आणि त्याच्या नजिकच पसरलेले मानसरोवर ही दोन तीर्थक्षेत्रे सर्वाधिक महत्त्वाची, मोठी आणि प्रथम क्रमांकाची मानली गेली आहेत. शिवपुराणामध्ये असा उल्लेख आहे की कैलास दर्शन आणि मानसरोवर स्नान ज्याला नशिबाने प्राप्त झाले त्या व्यक्तीच्या सात पिढ्यांचा उद्धार होऊन जातो. अर्थात हा श्रद्धा व भावनेचा भाग आहे. परंतु, एक मात्र सत्य आहे की कैलास दर्शन हा जीवनामधला अत्यंत रोमांचकारी, दुर्मिळ आणि कृतकृत्य वाटणारा अनुभवी प्रसंग आहे. सारे जीवन यथार्थ झाल्याचे मानसिक समाधान मिळते. नास्तिक देखील त्या सत्य शिव आणि सुंदर यांचे प्रतिक दिसणाऱ्या कैलास पर्वताच्या दर्शनाने नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक भाविक तर कैलास दर्शन घेताना आनंदाच्या अश्रुंनीच त्या शिव परमात्याला अभिषेक करताना दिसतात. त्यांचे ह्रदय भक्तिभावाने उंचबळून येते. कुलस्वामिनी अथवा कुलदेवता यांची कृपादृष्टी आणि वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद यांच्यामुळे कैलास-मान सरोवर ही यात्रा निर्विघ्न पार पडते. सनातन धर्मी, बौद्ध धर्मी, निरनिराळ्या धर्माचे अनुयायी ही यात्रा करताना स्वत:ला धन्य समजतात. जगामधील सर्व तीर्थयात्रांमध्ये सर्वाधिक दुर्गम, अत्यंत कठीण आणि म्हणून साहसी अशी ही यात्रा आहे. परंतु त्याचबरोबर सर्वाधिक पवित्र व मंगलमय आनंदी असल्यामुळे, भाविक सारे कष्ट सहन करुन तो परमानंद मिळवतात.

कोणत्याही तिर्थयात्रेचे स्थान म्हणताच डोळ्यापुढे उभे राहतात ते मंदीर आणि त्यामधील निरनिराळ्या देवतांच्या मूर्ती, मंदीराचे उंच कळस, डोंगरावर उभी असलेली भव्य कलाकृती, पूजा अर्चा, पुजाऱ्यांची धावपळ, आरत्या, शंख-घंटेचा निनाद, फुले, पूजा साहित्ये यांची दुकाने आणि भाविकांची वर्दळ. कैलास तीर्थ यात्रेचे चित्र एकदम वेगळेच आहे. वरिल कोणत्याच गोष्टी त्या तीर्थ क्षेत्रात दिसून येत नाही. नाही तेथे मूर्ती, ना मंदीर, ना पूजा- अर्चा, ना भाविकांची वर्दळ. एक अतिउंच, गोलाकार बर्फाच्छादित असा पर्वताचा एक भाग आहे. हिमालयाच्या पर्वताचाच एक भाग कैलास पर्वत आहे. दुरवरुन बघताना एक अवाढव्य अशी शिवलिंगाकार आकृती भासते. भस्माचे पट्टे आणि ध्यानमूर्ती शिवप्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. शिवपार्वतीचे असे हे पवित्र निवासस्थान आणि त्या कैलास पर्वातानजिकच पसरलेले एक प्रचंड सरोवर – मान सरोवर म्हणून प्रसिद्ध आहे. कैलास पर्वत शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १९ हजार फूट असून, मान सरोवरचा परिघ ९० किलो मीटर इतका लांब आहे. तिबेटच्या  हद्दीत असलेल्या त्या कैलास पर्वतावर आजतरी राजकीय हक्क चीन या देशाचा आहे. मान सरोवराच्या उत्तरेस कैलास पर्वत आहे.

२         हा सदैव बर्फाच्छादीत असतो. इतर सर्व परिसरावर लहान मोठे दगड, माती रेती असून तिथे एक देखील मोठे झाड कुठेच दिसून येत नाही. सारे काही बोडखे वाटते. गवत आणि लहान लहान झुडपी मात्र सर्वत्र दिसून येते. अतिशय थंडी, वारा, पाऊस, हिम बर्फाचा वर्षाव, बर्फावरुन परावर्तित झालेली सूर्याची प्रकाश किरणे डोळ्यास झगझगाट निर्माण करतात. सर्व वातावरण सदैव बदलत राहणारे असते. हे सारे असून देखील प्रत्येक रात्री भक्तीभावाने त्या शिव परमात्म्याच्या अत्यंत पवित्र अशा निवासस्थानाचे दर्शन घेण्यास अती उस्तुक असलेला जाणवतो.

जीवनातील सर्वोत्तम पवित्र तीर्थक्षेत्र कैलास-मान सरोवर आपण देखील जावून बघावे, दर्शन घ्यावे, त्याची परिक्रमा करावी आणि मानसिक शांती समाधानाचा परमोच्च अनुभव घ्यावा ही सुइच्छा प्रत्येक भाविक नागरिकाच्या मनामध्ये येणे साहजिकच आहे.  त्यादृष्टीने कैलास-मानसरोवरच्या तीर्थयात्रेसंबंधी ज्या सर्वसामान्य शंका असतात, त्या येथे सांगण्याचा प्रयत्न करतो. भाविकास ती यात्रा करुन धन्यता मिळवता येईल. ॐ शिवपार्वतीच्या कृपेने कैलास मानसरोवर यात्रा १९९७ च्या पहिल्याच गटामध्ये आम्हा दोघा पती-पत्नाला प्रवेश मिळून, ती कठीण परंतु अत्यानंद देणारी यात्रा, आम्ही जून १९९७ मध्येच सुखरुपपणे करुन आलो. त्यामुळे स्वानुभवानेच त्या यात्रेची माहिती इतरांसाठीही देत आहोत.

कोणतीही यात्रा म्हटली  ते ठिकाण, तिथे जाण्याचे मार्ग, राहण्या-उतरण्याची व्यवस्था, यात्रेसाठी येणारा सर्वसाधारण खर्च, प्रवासात लागणाऱ्या गरजेच्या वस्तू, वाहनाची सोय आणि त्या विशीष्ट प्रवासात लागणाऱ्या बाकींची पूर्तता या सर्वांच्या मार्गदर्शनासाठी यात्री उत्सुक असतो.

कैलास मानसरोवर यात्रेची पूर्वतयारी

१.    पहिली गोष्ट म्हणजे त्या कठीण आणि दुर्गम यात्रेस जाण्याच्या विचाराप्रमाणे च पक्का दृढनिश्चय आणि उत्स्फूर्त मानसिक इच्छा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

२.    उंच पहाडी भागातील चढण-उतरण सारखी करावी लागते. प्रवास साधारण दहा किलोमीटर दररोज पायीच करावयाचा असतो. त्यामुळे जाण्यापूर्वीच दोन महीनेतरी दररोज दूरवर पायी फिरण्याचा व्यायाम वा सवय निर्माण करावी म्हणजे यात्रा सुकर होण्यास मदत मिळेल.

३.    १९००० फूट उंचीवर (हाय आल्टीट्यूड) हवामान विरळ असून प्राणवायूचे प्रमाण कमी असते. श्वासोच्छवास करताना कठीण जाते व छाती भरुन आल्याप्रमाणे

३         जाणवते. तेव्हा श्वासाचे व्यायाम, दीर्घ श्वास ठेवून सोडणे, प्राणायाम इत्यादीची सवय केल्यास ऑक्सीजन टेन्शनचा परिणाम कमी जाणवतो.

शारिरीक प्रकृती नियमित व्यायाम आणि आहार यांच्या साह्यायाने सुदृढ व निरोगी ठेवण्याचा सतत प्रयत्न करावयास हवा.

लागणारी प्रमाणपत्रे  (ही दिल्लीच्या परराष्ट्र व्यवहार खात्यास लागतात.) पासपोर्ट, वैद्यकीय प्रमाणपत्र हे एखाद्या रजिस्टर मेडीकल प्रॅक्टीशनरकडून मिळवणे. सोबत काही वैद्यकीय चाचण्याचे रिपोर्टस हवेत. हिमोग्लोबीन, इएस आर, टि.एल. सी. डि.एल.सी, लघवी, संजास, रक्तामध्ये बल्ड शुगर, युरिया,  क्रियेटीनीन, बीलीरुबीन, ब्लड ग्रुप महत्त्वाचे. छातीचा क्ष किरण आणि स्ट्रेस इसीजी (टि.एम.टी)

४.    जर तुमच्याकडे कॅमेरा किंवा व्हीडीओ कॅमेरा असेल तर त्याचा मेक, सिरीअल नंबर कागदावर लिहून खाली मालकाचे व, गाव, पत्ता लिहून ठेवावा काळजीसाठी.

प्रवासामध्ये लागणारे कपडे आणि इतर वस्तू

सर्व कपडे साधारण वजनाने हलके, गरम, वारा व पाणी ह्यापासून बचाव करणारे असावेत. विन्ड फ्रुप जाकेट, स्वेटर्स, (२ नग लांब बाह्याचे व १ नग हाफ बाह्याचे, माकड टोपी, व वुलनच हात मोजे (२ नग), वुलनचे लाँग पायमोजे (२ नग), कॉटन पायमोजे (४ नग), जीन्स किंवा पँट (३ नग) शॉर्टस (२ नग), शर्टस किंवा टी-शर्ट (४ नग), सन ग्लासेस, हंटर किंवा मार्चिंग किंवा ट्रेकिंग बुट (२ नग), क्रिकेटमध्ये घालतात तशी टोपी वेताची फेल्ट हॅट (सूर्य प्रकाशाच्या बर्फावरुन परावर्तीत झालेल्या कीरणांपासून संरक्षण करता यावे म्हणून) पाण्याची बाटली, विजेरी (दोन जादा सेल्स व एक बल्ब जादा घेणे), रेन कोट (लांब आकाराचा, शक्य असल्यास शर्ट पँट असे वेगळे असल्यास चांगला) बेल्ट पाऊच ज्यात कॅमेरा, पैसे, पासपोर्ट व गरजेची थोडी औषधी घेता येईल, प्लास्टीकचे मोठे शिट सामानावर गुंडाळता येऊन पाण्यापासून रक्षण होऊ शकेल, चालण्याची एक काठी, प्लेट-मग-चमचा-वाटी, टॉयलेट पेपर वा टिश्यू पेपर (२ रोल) सूर्य प्रकाशापासून रक्षण करणारे तोंडास लावणारे लोशन (हाय आल्टीट्यूड अर्थात उंचावर सूर्य प्रकाशामधील अल्ट्रा व्हायलेट किरणांमुळे उघड्या भागातील चमडी काळी पडते, जळून जाते व चेहरा काळा होतो म्हणून) मेणबत्ती, काड्याची पेटी किंवा लायटर, लहान चोकू, रबर स्लिपर, वाजवण्याची शिट्टी, वही, पेन

 

 

 

४       प्रवासाची व्यवस्था

वर्षभरात फक्त जून ते सप्टेंबर ह्या चार महिन्याच्याच कालावधीमध्ये कैलास- मानसरोवर यात्रेचे आजोजन केले जाते. त्याच काळामध्ये चीनचे सरकार यात्रेकरुस त्या भागामध्ये जाण्याची परवानगी देते आणि तेही फक्त पाचशे यात्रेकरुनांच. तेव्हा भारत सरकारतर्फे अंदाजे ३५ यात्रेकरुचा एक गट याप्रमाणे विभआगून १५ गट थोडे दिवसाच्या अंतराने दिल्लीहून पाठविले जातात. उत्तर प्रदेशातील शासनांर्गत कुमाऊ मंडळ विकास निगम संस्था आहे. या संस्थेतर्फेच सर्व यात्रेचे आयोजन केले जाते. ही संस्था भारतीय परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून चीनच्या हद्दीत जाण्यासाठी लागणारा व्हीसा आणि इतर सोपस्कार पूर्ण करते. यात्रा दिल्लीपासून सुरु होत असल्यामुळे यात्रींची दिल्लीतच राहण्याच्या व्यवस्थेपासून यात्रेमधील पुढील सर्व टप्याटप्याची राहण्याची, जेवणाची आणि प्रवास वाहनांची सोय कुमाऊ मंडळातर्फेच केली जाते.

साधारणपणे मार्च महिन्यापासून संपूर्ण भारतामधून भारतीय परराष्ट्र खात्याच्या ईस्ट एशीया डिव्हीजनतर्फे कैलास मान सरोवरच्या तीर्थयात्रेस जाण्यास उत्सुक असलेल्या व्यक्तींकडून अर्ज मागविले जातात. त्याची छाननी होऊन निवडलेल्या व्यक्तींना निरनिराळ्या गटांत विभागले जाते. क्रमाक्रमाने त्या व्यक्तीस त्याच्या निवडीबद्दल अवगत केले जावून पुढील कार्यक्रमाचे मार्गदर्शन केले जाते.

प्रवासामध्ये घोडा भाड्याने उपलब्ध असतो. किंवा आपल्या हातातील सामान घेवून जाण्यासाठी त्याचप्रमाणे प्रसंगी अवघड चढणावर आपले धरुन मदतीसाठी मदतनीस अथवा पोर्टर पण मिळतात. त्यांना रोजदारी घ्यावा लागते. घोडा किंवा पोर्टर हे सुरवातीपासून आपल्या सेवेत घ्यावे लागतात. प्रवासाच्या अधेमध्ये ते मिळत नाहीत. वयस्कर अथवा अशक्त यात्रेकरुंनी त्यांची सोय निश्चित करणे अत्यंत जरुरीचे असते. अर्थात हा येणारा खर्च प्रत्येकास स्वतंत्रपणे करावा लागतो. सर्व दर जाणून घ्यावे, ते बदलत असतात.

चीनच्या हद्दीमध्येसुद्धा घोडा / पोर्टर / याक प्राणी प्रवासामध्ये मिळतात. त्यांचादेखील खर्च यात्रीस करावा लागतो. कुमाऊ मंडळाचे कर्मचारी यात्रीस याबद्दल मदत करतात.

राहणे व खाणे यांची सोय

कुमाऊ मंडळ या बाबींची सोय करते. ठराविक अंतरावर मुक्कामाची व्यवस्था केली गेली आहे. या ठिकाणी मोठे बॅऱ्याक्स बांधलेले असून झोपण्यास अंथरुण, गरम पांघरुण दिले जातात. स्वतंत्र पलंगही काही ठिकाणी उपलब्ध असतात. पाणी, संडास, बाथरुम यांची उत्तम सोय असते. वीज नसल्यामुळे काही ठिकाणी जनरेटरच्या साह्यायाने वीज पुरवठा

५        करुन देण्याची सोय केली जाते. यात्रींसाठी देन वेळा गरम जेवण, सकाळचा नाष्टा, दोन्ही वेळा चहा, गरम सूप दिले जाते. जेवण हे संपूर्ण शाकाहारी असून भात, भाजी, चपाती, पापड, लोणचे, उसळी, सॅलड आणि एखादा गोड पदार्थ देखील दिला जातो. प्रवासी थकवा आणि हाय आल्टीट्यूडचा परिणाम होऊन सर्वांचीच भूक मात्र बरीच मंदावते असे दिसून येते.

चीनच्या हद्दीमध्ये मात्र खाण्याची बरीच गैरसोय झाल्याचे जाणवते. फक्त सुरवातीच्या मुक्कामात तकलाकोट येथे चीनी पद्धतीचे जेवण मिळते. सर्व उकडलेले नुडल्स, भात, ब्रेड इत्यादी. शाकाहारी असते. नंतरच्या प्रवासात मात्र जेवणाची गैरसोय झाल्याचे जाणवते. आमच्यावेळी आम्ही शिधा बरोबर नेला होता. त्यांनी भांडी व इतर साहित्य दिले. सर्व यात्रींच्या एकोप्याने आम्ही जेवणाची सोय करुन वेळ निभावून नेली.

या प्रवासात विशेषकरुन चीनच्या भागात खाण्याचे हाल होऊ नये म्हणजे सर्वांनीच ड्राय फूड्स जेस काजू, बदाम, मनुका, चिकी, बिस्कीटटे, खाऱ्या डाळी, चिवडा, गोळ्या, फरसाण, खाकरे, लाडू, खारीक, पेंडखजूर इत्यादी खाद्य साहित्य घेवून आपली भूक थोडीशी हलकी केली. त्याचप्रमाणे यात्रेकरुने १०-१२ दिवसाच्या काळासाठी पूरेल असा. सुका मेवा बरोबर न्यावा.

चीनच्या संपूर्ण प्रवासात कुठेही चहा किंवा काही खाण्याची हॉटेल्स, धाबे व टपऱ्या दिसून येत नाही. भारतीय हद्दीत काही ठिकाणी चहा, बिस्किटे वा भाजीपूरी देणाऱ्या टपऱ्या दिसल्या.

औषधी 

भारतीय हद्दीमध्ये मंडळातर्फे एक वैद्यकीय अधिकारी बोरबर असतो. त्याचप्रमाणे सर्व गटामध्ये यात्रेकरुमची निवड करताना एक दोन तरी वैद्यकीय ज्ञान असलेले यात्रेकरु प्रत्येक गटात सामील केले जातात की ज्याचा इतरांना आपातकाली उपयोग व्हावा. दिल्लीलाच प्रत्येक यात्रेकरुला एक फर्स्ट एड किट दिले जाते. तरी देखील प्रत्येक यात्रेस आपणांस लागणारी नेहमीची औषधी त्यावर ते कशासाठी हे लिहून व्यवस्थीत घ्यावात. त्याचप्रमाणे व्हॅसलीन पेट्रोलियम जेली थंडीत अंगास लावण्यासाठी घ्यावी.

सामान

प्रत्येक यात्रेकरुनी कोण-कोणत्या वस्तू न्यावयाच्या ते वरील यादीवरुन लक्षात ओलेच असेल. सर्वसाधारण प्रत्येक कपड्याचे चार चार जोड ठेवावे लागतात. कारण पाऊस पाण्याने खराब झाल्यास सुकवण्यास वेळ नसतो व योग्य जागा मिळत नाही. अंथरुण पांघरुण घेण्याची गरज नसते. ती दिली जातात. सामान अतिशय कलात्मक तऱ्हेने बांधावे लागते.

६        बॅग, पेटी वा सूटकेस घेण्यास परवानगी नसते. सामान खेचरावर लादावे लागते. कॅनव्हास बॅगच्या थैल्यामध्ये सामान घेवून वर पोत्याने बांधावे लागते. त्यावर प्लास्टीकच्या कव्हराने गुंडाळून, पुन्हा पॉलीथेन बॅगमध्ये बांधून घ्यावे लागते. त्यावर आपले नाव व खूण असावी. खेचरावर लादताना व काढताना सामानाची खूप फेकाफेक होते त्यामुळे ते निसटणार नाही. अशीच पक्की पॅकिंग करावी लागते आणि पावसापासून रक्षण करावे लागते. प्रत्येक व्यक्तीस २५ किलो पर्यंतच सामान घेण्याची परवानगी आहे. एका मुक्कामापासून दुसऱ्या मुक्कामापर्यंत कुमाऊ मंडळ सामान ताब्यात घेवून त्याची वाहतूक करण्याचे काम करते. प्रवास दिवसभराचा असल्यामुळे अत्यंत गरजेच्या गोष्टीच फक्त स्वत:जवळ बाळगाव्यात बाकी सर्व मुख्य सामान प्रवाहात द्याव्यात.

यात्रेचा प्रवास

दिल्ली पासून कैलास मानसरोवर जवळ जवळ ८६५ किमी दूर अंतरावर आहे. दिल्ली ते धारचुला हे ६४० मैलाचे अंतर रेल्वे आणि बसने पूर्ण करावयाचे असते. नंतर मात्र धारचुला जवळ तवाघाट पासून यात्रा पायी किंवा घोड्यावरुन करावी लागते. ही पायी यात्रा एकूण २२५ किमी इतकी आहे.

दिल्लीस दिलेल्या तारखेस उतरताच कुमाऊ मंडळाने देवू केलेल्या सोईस प्रारंभ होतो. प्रथम अशोक यात्री निवास येथे उतरण्याची व्यवस्था केली जाते. दुसऱ्या दिवशी इंडो-तिबेटीयन बॉर्डस पोलिस हॉस्पीटलमध्ये जावून तुमचे सर्व वैद्यकीय प्रमाण पत्रे व प्रयोगशाळा रिपोर्टस तपासून पुन्हा व्यवस्थीत आरोग्य तपासणी होते. आरोग्याच्या दृष्टीने जे यात्री अती उंच व कठीण दुर्गम यात्रा करण्यास जे अपात्र ठरतील त्यांना यात्रेमधून वगळले जाते. अशाच प्रकारे प्रवासामधील भारत चीनच्या हद्दीजवळ गुंजी नावाचे पोलीस मुख्यालय आहे. ते जवळ जवळ समुद्र सपाटीपासून ११८८० फूट उंचावर आहे. तिथे पुन्हा दुसरी वैद्यकीय शारिरीक तपासणी होते. पहिल्या तपासणीत योग्य वाटलेल्या यात्रेकरुपैंकी काही अपात्र ठरण्याची शक्यता असते. त्यांना तिथून परत पाठविले जाते. या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची सूचना करावीशी वाटते की शारिरीक आरोग्य आणि सुदृढपणा याबद्दल अतिशय काटेकोरपणे बघीतले जाते. त्यामध्ये थोडीदेखील ढिलाई होत नाही.

भारतीय हद्दीमधला प्रवास दिल्ली ते लिपूलेखपासपर्यंत असतो. तेथून पुढे चीनची हद्द सुरु होते. हा प्रवास ११ दिवसाचा असतो. अंतर व सोयीनुसार रात्रीचा मुक्काम जेथे होतो ती ठिकाणे म्हणजे दिल्ली नंतर अलमोडा (३७० किमी), धारचुला (२७० किमी), थोड्याच अंतरावर तवाघाट. येथून प्रवास डोंगराळ असून पायी प्रवास सुरु होतो. कोणतेही वाहन पुढे जात नाही. नंतर पांगू (२६ किमी), सिर्खा (१० किमी), गाला (१० किमी),

७            मालपा (११ किमी), बुधी (९ किमी), गुंजी (१५ किमी), काला पाणी (१० किमी), नवी डांग (८ किमी), लिपू लेख पास (७ किमी)

लिपूलेख पास हा भाग समुद्र सपाटीपासून १६७३० फूट उंचावर आहे व येवून तिबेट अर्थात चीनचे राज्य सुरु होते.

“ॐ नम: शिवाय” च्या मधूर आणि भक्तीपूर्ण भावनेने प्रत्येक यात्री नामस्मरण करत चालत राहतो. रस्त्यात जो कुणी वाटसरु भेटेल त्याला पण राम राम म्हणतो, त्याप्रमाणे “ॐ नम: शिवाय” म्हणताना व आपला आदर भाव व्यक्त करताना दिसतो. यात्रा ग्रुप सकाळी ५.३० ते ६ च्या सुमारास एका मुक्कामाहून कूच करते. सकाळी चहा व फराळ दिले जाते. हलके हलके. यात्री दुसऱ्या स्थानापर्यंत १ ते २ पर्यंत पोहोचतात. या ठिकाणी गरम गरम जेवण तयार ठेवलेले असते व यात्रेकरुंना येताच जेवण मिळते. दुपार व रात्र दुसऱ्या मुक्कामी थांबते व पुन्हा दुसऱ्या दिवशी सुरु होते.

लिपूलेखपास नंतर सुरु होणारा प्रवासातील पहीला मुक्काम तकलाकोट येथे असतो. मोठे शहर असून सर्व तिबेटी वस्ती व चीनी भआषा प्रमूख असते. दुभाषीचा उपयोग करुन घ्यावा लागतो. चीनतर्फे दोन मार्गदर्शक दुभाषी मिळतात. सर्व सामानाची त्यांच्या कस्टमतर्फे तपासणी केली जाते. यात्रेबरोबर असलेल्या अधिकारी यात्रींची दोन ग्रुपमध्ये विभागणी करतो. एक ग्रुप (अ) कैलास पर्वताची परिक्रमा करण्यास जातो व दुसरा ग्रुप (ब) मान सरोवराची परिक्रमा करण्यासाठी जातो. प्रत्येक परिक्रमा करण्यासाठी चार-चार दिवस लागतात. कैलास परिक्रमेमध्ये तारचेन, दिरेबू, झॉग झेरबू ह्या ठिकाणी मुक्काम केला जातो. मान सरोवर परिक्रमेमध्ये होरे, चिगू, जैदी या ठिकाणी मुक्काम होतो. दोन्ही ग्रुप परिक्रमा करुन एका मुक्कामात एकत्र येवून पुन्हा परत तकलाकोटला परत येतात व परतीचा प्रवास सुरु होतो. कैलास पर्वत परिक्रमा खऱ्या अर्थाने अत्यंत कठीण असून पर्वत शिखर चढण्यासाठी ‘याक’ या तिबेटीयन केसाळ प्राण्याचा उपयोग केला जातो. बैलाप्रमाणेच हा प्राणी असतो. परंतु घोडा जेथे चढून जावू शकत नाही तिथे या प्राण्याचा वाहन म्हणून उपयोग केला जातो. अत्यंत शक्तीवान परंतु गरीब प्राणी म्हणून हा उपयोगात आणला जातो. रस्त्यात उंचावरचे ‘डोलमा पास’ अर्थात दयेची देवी ही भव्य शिळारुपी असून सर्वजण तिली श्री. पार्वती देवीचे महत्त्व देवून पूजा करतात. तसेच तिथे  गौरीकुंड असून ते रस्त्यात लागते. रस्त्यामधील दिरेबू . मुक्कामाहून कैलास पर्वताचे अप्रतिम असे स्वरुप अत्यंत जवळून दिसते. तिथेच सर्व यात्री मिळून शिवपार्वतीला यज्ञ / हवनाद्वारे पूजा आरती करुन समाधान व आनंद मिळवितात.

मानसरोवराची परिक्रमा त्या अथांग जलाशयाच्या काठाकाठाने करीत जैदी मुक्कामी तीर्थस्थान, पूजा पुन्हा हवन इत्यादी स्वइच्छेनुसार केले जातात व मानसिक समाधान

८       मिळवले जाते. तिथूनच कैलास मानसरोवराचे पवित्र जलतीर्थ यात्री आपल्या बरोबर घेवून जातात.

परतीच्या प्रवास तकलाकोट नंतर पुन्हा त्याच मार्गाने धारचुलापर्यंत व तेथून बसने काठगोदामपर्यंत करुन पुढे रेल्वेने दिल्लीला येवून सर्व यात्रेचा समारोप होतो.

आमची बॅच पहीलीच होती त्यामुळे जाताना भारतीय जनता पक्षातर्फे आम्हांस निरोप देवून रवाना केले गेले. आम्ही भाग्यवान समजतो की पूर्व पंतप्रधान मा. अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या हस्ते आमचे स्वागत होवून प्रवासाचा हिरवा कंदील दाखविला गेला. सर्व प्रवास अत्यंत समाधानाचा व आनंदाचा झाला.

विनंती-  वरील प्रवास वृतांत १९९७ सालवरील आधारीत आहे. त्यावेळी प्रवास फक्त शासकिय मदतीने होता. आज काल बऱ्याच खाजगी यात्रा कंपनी सहभागी झालेल्या आहेत. त्याचा अभ्यास व्हावा.

जय हिंद जय महाराष्ट्र

विवीध-अंगी१***Path of Knowledge- ज्ञान मार्ग अर्थात ह्या मिथ्या, सत्य नसलेल्या जगाला ओळखण्याचा प्रयत्न करणे. त्याच वेळी स्ववर ‘ मी कोण ‘ ह्याचा शोध घेण्यासाठी लक्ष केंद्रित करणे, मनामधले विचार नष्ट करुन निर्माण होणाऱ्या शांततेची जाणीव ठेवणे हे असेल. ह्यालाच Objectless Awareness म्हणता येईल. अर्थात ध्येय रहीत जाणीव

 

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-   bknagapurkar@gmail.com

जेलची हवा

जेलची हवा

आजकाल निरनिराळ्या गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे. सरकार, समाज आणि कुटुंब घटक हतबल झालेला दिसत आहे. ‘जिसकी लाठी उसकी भैस’ या उक्ती प्रमाणे किंवा बळी तो कान पिळी, या तत्त्वाने प्रत्येक जण वागत आहे. संस्कार, नितीमत्ता, चांगुलपणा असले गुणधर्म फक्त पुस्तकातच बंदीस्त झालेले आहेत. न ते कुणी वाचत, न ते ऐकू येतात न ते सांगितले जातात. लोकांनादेखील असल्या महान तत्त्वज्ञानाचा कंटाळा आलेला दिसतो. कारण एकच. असले तत्त्वज्ञान जीवनात आणले जाऊच शकत नाही, ही धारणा. जर ईश्वराच्या अस्तित्वाविषयीच प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. तर मग कसला मानसिक धाक उरत नाही. सरकार फक्त नावालाच असल्याचे जाणवते. खा, प्या, मजा करा, मी खूर्चीवर बसतो. मरु द्या इतरांना. ज्यांनी त्यांनी स्वत:ला सांभाळतच जगायच. हाच मंत्र दिला जातो. असल्या बेछुट, बेशरम तत्त्वज्ञानांनी प्रत्येक व्यक्तींनी आपली सत्ता काबीज केली आहे. जर निमीमत्ता, प्रतिष्ठा, सद्‍गुण लोपच पावले असतील तर निर्लजपणाच्या चक्रातच व्यक्ती वावरत असतो.

‘अटक’ अर्थात ‘Arrest’ हा हास्यापद शब्द होऊ पाहात आहे. काही होत नाही त्या संकल्पनेमुळे. ती व्यक्ती पोलीसांच्या संरक्षणात जास्त सुरक्षित राहते. त्यांच्या खाण्या, पिण्याची सर्व गरजांची, दुखल्या-खुपल्याची सोय पद्धतशीर होते. गाडीत फिरणे होते इत्यादी. शिक्षा झाली तर तो जेलमध्ये जातो. कशासाठी फक्त त्याला बंदीस्त करण्यासाठी इतरांपासून दूर करण्यासाठी. “काय तर म्हणे त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा येते.”  अभ्यास केला तर वाटते किती हास्यापद हे सांगणे आहे.

स्वातंत्र्य पूर्व काळ, ब्रिटीशांचा तो काळ होता. जेव्हा अटक, बंदीस्त व जेलची सजा या संकल्पना होत्या. त्यावेळी किती वेगळी परिस्थिती होती. खरी सजा ही त्यावेळी गुन्हेरागाला मिळे. त्याला छडीचे फटके मारले जात. हे दोन्ही हात पाय बांधून होत असे. एक छडीचा फटका बसला, तर कातडे फाटले जावे, ही जेलच्या शिपायांना समज होती. नसता त्यालाच शिक्षेला वा चौकशीला सामोरे जावे लागे. शिक्षा अत्यंत गंभीरतेने घेतली जात असे. गुन्हेगार हा गुन्हेगारच समजला जाई. त्याच्याकडून सतत कामे करुन घेतली जात. मग ती बाग कामे, शेती, सफाई, रंग-रंगोटी, विणकाम, फर्निचर, कपडे शिलाई, चटया विणणे, सतरंज्या इत्यादी अनेक अनेक हातमाग युक्त होत्या. प्रत्येक कैद्याला व त्यावर नियंत्रण करण्याऱ्याला एक Target दिले जाते व ते पूर्ण करण्याची त्याच्यावर जबाबदारी निश्चित केलेली असे. कैद्यांना कुणासही भेटू दिले जात नसे. फक्त ठराविक काळानंतर एखाद दुसरा भेट घेई. न पत्र न चिठ्ठी संपर्क. संपूर्ण कट केलेला असे.

२           कैद्याचे तो एकदा ‘गुन्हेगार’ ठरला, की त्याचा शिक्षेचा काळ हा निश्चित होता व तो पूर्ण करीपर्यंत त्याच्या शारिरीक व मानसिक हालाला पर्याय नव्हता. जे मिळेल तेच खावयास मिळे. दुखऱ्या खुपऱ्याकडे ही फारसे लक्ष दिले जात नव्हते.

का हे सारे होते? राक्षसी वाटते ना? भयंकर वाटते ना? माणुसकीला सोडून वाटते ना? अन्यायकारक वाटते ना? होय मान्य सारे काही रानटी वाटते. ज्याला सारासार विचार आहे, त्याला हे पटणार नाही.  राग येईल.

पण आपण सारेच व्यवहारहीन, भावनाहीन होत चाललो आहे. फुकटचे तत्त्वज्ञान व माणुसकी, प्रेम, दया या भावनांचे पुळके बाळगणारे झालो आहोत. चार माणुसकीचे तत्त्वज्ञानवाचले की आपली मती कुंठीत होते. माणसांनी जनावरांप्रमाणे वागू नये. त्यात माणुसकी, प्रेम, दया या भावना सतत जागृत असाव्या, अत्यंत चांगले व उच्च दर्जाचे हे तत्त्वज्ञान आहे. परंतू असल्या तत्त्वज्ञानाचा विचार करताना जग, व्यवहार आपापसातील संबंध हे सारे समजणे अत्यंत गरजेचे असते. चांगले वागण्यास कोणीही विरोध करणार नाही. परंतू जर ते चांगले वागणे या सदरात असेल तर. पण तेच जर रानटी, जंगली या सदरात जात असेल तर मात्र त्याच्याशी त्याच पद्धतीने वागणे, त्या वाईटाचा प्रतिकार करणे याला समज, शहाणपण म्हणतात. आईने वा वडील व्यक्तीने शिक्षा केली, थोबाडीत मारले तर त्याचा विचार निश्चित व्हावा. त्यावर विचारणा, सुधारणा व्हावी. परंतु जर कुणी अज्ञात व्यक्तीने तुमच्या थोबाडांत मारली तर त्याच्या बाबतीतही प्रेमाचे गोडवे, दया या आदर्श भावना व्यक्त करणे केवळ बुळेपणाचे लक्षण समजले जाईल. त्यालाच मूर्ख समजतील.

‘पाचामुखी परेश्वर’ हे महान तत्त्वज्ञान आहे. परंतु जर पाच जणाने कुणा अबलेवर अत्याचार केला, बलात्कार केला,  तर त्याला तुम्ही काय म्हणता. जीवनात जशास तसे याच पद्धतीने जगण्याचा रिवाज आहे आणि तसेच जगले तरच तुम्ही जगू शकतात. संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यानी देखील म्हटले आहे. ” नाठाल्याचे माथी हानू काठी ” . ईश्वरांनी देखील दुष्टांचा नाश करण्यासाठीच जन्म घेतलेला हे सत्य आहे. वाईट प्रवृत्ती सुधारण्याचा प्रयत्न व्हावा. परंतु जर सुधारणा होतच नसतील तर त्याचा संपूर्ण बिमोड करणे हे व्हावे.

आज काल चांगुलपणा, संस्कार, आदर्शवाद याच्या भावना उदाहरणासाठी देखील मिळत नाहीत. यात देवालयाचा परिसर, धार्मिक स्थळे, मंदीर, मशीदे, गुरुद्वारे, शाळा, कॉलेज हे भाग पण अलिप्त राहीले नाहीत. अनेक वाईट गोष्टी अशा परिसरांत होत असल्याची अनेक उदाहरणे दिसून येतात.

माझा आपला छोटासा अनुभव. परंतु खुपसे काही सांगणारा वाटतो. मी सेंट्रल जेलमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काही काळ व्यतीत केला. जे मी जाणले, दिसले, अनुभवले त्याचे चिंतन करण्याची गरज आहे. पूर्वीचा काळ एकदम बदलला आहे.

3           अर्थात बदल ही काळाची गरज असते. याच्याशी सहमती आहे. परंतू बदल कुणासाठी व का व कोणता याचा देखील विचार होणे आवश्यक आहे.

जेलमधली कागदावर यादी केलेली शिस्त ही फक्त त्या कागदावरच असल्याचे आढळते. मुख्य म्हणजे जेलमध्ये आलेले सारे कैदी हे देखील तुमच्या आमच्या प्रमाणेच माणसे आहेत. त्यांना माणुसकी, माणवतावादी दृष्टीकोण याचा संपूर्ण अधिकार आहे. ते जनावेर नाहीत व आपण इतर रानटी नाहीत ही धारणा अत्यंत दृढ व पक्की सर्वांच्या मनात भरलेली आहे. हे सारे त्यांची मानसिकता सुधारावी म्हणून. त्यांनी केलेली चूक ही कदाचित प्रासंगिक असेल त्यांना सुधारण्याचा फक्त प्रयत्न व्हावा. अत्यंत योग्य व मानवतावादी दृष्टीकोण आहे. यात दुमत नाही.

परंतू हीच मंडळी ज्यांनी सर्व नियम, वागण्याच्या तऱ्हा, माणुसकी पायदळी तुडवलेली असते. इतर कुणाचे भयानक नुकसान केलेले असते. काहींनी हत्या, बलात्कार, चोरी, मारामारी या सर्व क्लेशदायक गोष्टी केल्या असतात. आपल्या भावना, लोभ, स्वार्थीपणा, इर्शा, राग इत्यांदीना खतपाणी देत समाजाची प्रकृती नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला असतो. म्हणून त्यांना बंदी केलेली असते. त्यांचे सर्व म्हणणे, त्यांचे सर्व विचार, भावना या समजावून घेतल्या असतात. त्यांना त्यांची बाजू व्यक्त करण्यास संपूर्ण मुभा दिलेली असते. सारे होऊनच काही काळासाठी त्यांना सजा व बंदी केलेले असते.

एखाद्या सामान्य माणसापेक्षा या कैद्यांचे जीवन अत्यंत आनंदाचे, समाधानाचे व सुखसोईंनीयुक्त असे वाटते. फक्त चार भिंतीच्या आत राहणे येवढेच बंधन. परंतु जे बाहेर कुणाला सहज मिळत नाही ते त्यांना मिळते. नव्हे ते त्यांना मिळण्याचा जवळ जवळ अलिखीत अधिकार प्राप्त झालेला असतो. चांगले जेवण, चांगले पाणी, चहा, कॉफी व दूध देखील भरपूर प्रमाणात मिळते. जर खाण्यापिण्यात कर्माचाऱ्यांनी हलगर्जीपणा केला व चूक झाली तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होते. त्यांना जाब विचारला जातो. चांगली कारवाई होते. कॉलीटी योग्य, योग्य धान्य, फळे, भाजी हे पुरवले जाते. त्याची नियमित वैद्यकीय तपासणी होत असते. त्यात कोणतीच कमतरता पडू दिली जात नाही. जे सामान्यांना बाहेर श्रम करुन देखील संपूर्ण कुटुंबाला जे मिळत नसते ते या कैद्यांना मिळते. याच कारणाने अनेक कैदी सतत बाहेर कोणता तरी गुन्हा करुन तिथे येण्याचा प्रयत्न करतात हे अभ्यासले आहे. बाहेर न नोकरी न धंद्याच्या सोई, न तो करण्याची मोकळीक. पोटभर कमविण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागतात. अनेक प्रशासकीय शिस्तीचा बडगा त्यांच्या भोवती असतो. गंमतीची गोष्ट म्हणजे तो फक्त ‘शिस्तीचा, नियमाचा बडगा’ एवढेच हत्यार असते. त्याचा केव्हाच खऱ्या मार्गाने उपयोग केला जात नाही. फक्त धाक आणि तो कशासाठी तर त्या धाकातून होणाऱ्या भ्रष्टाचारासाठी. सर्व केवळ लूटालूट असते.

4        मग ‘हम सब चोर है’ या तत्त्वांनी ही माणसे बिनधास्त गुन्हे करतात व जेलमध्ये येतात. कशाला भ्यायचे, कुणाला भ्यायचे? हे मूळ प्रश्न त्यांच्याकडे नसतात व का असावे. कारण जर सर्वच चोर असतील म्हणजे काही शाहू, सभ्य तर काही शिरजोर गुंड. कोणतीच नितीमत्तेची रेखा कोठेच आढळत नाही. खानदानी, संस्कारीत, परंपराचे श्रेष्ठत्व हे सारे शब्द इतिहास जमा होवू लागले आहे. मग सारेच बदमाश हरामखोर या सदरांत येवून जातात. जो पकडला गेला तो चोर. जो पडला तोच मुर्ख ठरतो. इतर सारे मान सन्मान प्राप्त, हे बिरुद घेऊन आपल्या मनाला, आत्माला चक्क फसवित जगत असतात.

‘कैदी देखील मानव आहेत’  हे तत्त्वज्ञान A.C रुममध्ये सुरक्षित बसणारे महान व्यक्ती गुणगान करताना दिसतात. त्या दृष्टीने कैद्यांच्या मनाचा मागोवा घेत, जेलचे वातावरण फिरते. त्यांना चांगल्या खाण्या-पिण्या बरोबर परवानगीने त्यांच्या तल्लफींच्या सवयींची काळजी घेतली जाते. नाते संबंधी, मित्र मंडळी यांना नियमीत भेट दिली जाते. सहीली देखील काढल्या जातात. झोपण्यासाठी चांगले पांघरुण दिले जाते. स्नान, स्वच्छतासाठी भरपूर पाणी असते. सर्व प्रकारचे पेपर्स, लायब्ररी, खेळासाठी सर्व साहित्य, रेडीओ, टिव्ही इत्यादी व्यवस्थित असते. कोणत्याही मध्यम वर्गामधल्या व्यक्तीला आपल्या जीवनचक्रात जे मिळते, प्राप्त होते ते सारे सारे त्याला त्यांच्या गरजांना पूर्ण केले जाते. डॉक्टर आहेत, औषध आहे, काय नाही सर्व काही मोफत असते. शिवाय कोणतीच शिक्षा नाही. अंगाला स्पर्शही केला जात नाही. नियमीत सांस्कृतिक कार्यक्रम, गाणे, नाटक, भाषणे, करमणूक व ज्ञान प्रदान गोष्टी होतात. थोडासा विचार करा जे त्यांना बाहेर कष्ट करुन. मर मर मरुन मिळत नाही ते सर्व फुकट त्यांना मिळते. मग जेल कशासाठी – फक्त चार भिंतीच्या आत ठेवण्यासाठी. बस शब्दांचाच हा खेळ आहे. अटक, बंदीस्त, जेलची हवा इत्यादी, ज्यांना थोडीशी शरम असेल, इज्जत असेल तीच माणसे या शब्दांना घाबरतात. त्यांना महत्त्व देतात. परंतु आजपर्यंत तरी कुणी महाभाग दिसला नाही. जो या बंदीस्तपणाच्या संकल्पनेला दचकून आहे. अनेक पुढारी, नेते, तथाकथीत संतमंडळी, महाराज इत्यांदीनी पण जेलची हवा चाखली व ते तेथेही अत्यंत समाधानी असल्याचे चित्र अनेकांनी बघीतले आहे.

सामान्य नागरीकांच्या पैशावर पोसत असलेली ही बांडगुळे आहेत. जेल म्हणजे काय या संकल्पनेचा विचार करण्याची खरी गरज आहे. गुन्हा, गुन्हेगार व शिक्षा या बंदिस्त त्रिकोणाचा समाजाच्या आरोग्यासंबंधी गंभीरतेने विचार व्हावा. मानव, मानसिकता, दया, प्रेम या भावनिक शब्दांचा खेळ, तीच माणसे करतात. ज्यांना या असल्या गुन्हेगारांचा दुरान्वये संबंध येत नाही. ज्यांचे जळते त्यांनाच कळते म्हणतात.

कोणत्याही शिक्षेत रानटीपणा भयानकता, तिरस्कार वाटेल तशी योजना नसावी. परंतू शिक्षा ही एक धाक, जरब, भीती या भावना स्थापन करणाऱ्या मिश्रीत असाव्यात.

5            बलात्कार करणाऱ्यालासुद्धा भावना असतात. तो देखील माणूस आहे. चुका करु शकतो. त्यांना पण दया दाखवा. असे बेछूट तत्त्वज्ञान सांगणारे आता बदलत आहे. बलात्कार पीडीत व्यक्तीला न्याय मिळावा असे त्यांना पण वाटू लागलेले आहे. शिक्षा व गरज पडल्यास फाशीची शिक्षा द्या असे लोक म्हणू लागले या कारणाने.

शिक्षा, अटक, जेल याचा खऱ्या अर्थाने पुर्नविचार व्हावा. ती एक गरज आहे. समाजाच्या चांगल्या आरोग्यासाठी.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail- bknagapurkar@gmail.com

 

देव ही संकल्पना

देव ही संकल्पना

 

अनेक योनी ही निसर्गाची निर्मिती आहे. सजीव प्राण्यांमध्ये झाडे, वनस्पती, क्रिमी, किटक, पक्षी, जनावरे इत्यादी अनेक प्रकारचे सजीव आहेत. यांची चक्रमय योजना त्याने आखलेली आहेत. सुक्ष्मापासून प्रचंड देहधारी व ज्ञानाच्या प्रातांत अत्यल्प ज्ञानापासून प्रचंड ज्ञान प्राप्त रचना निसर्गाने आखलेली आहेत. प्रत्येक सजीव हा आपापल्यापरी एक सर्वक्षम, परिपूर्ण असतो. स्वत:च्या जीवनाची चाकोरी व चक्र अतिशय काटेकोरपणे पूर्ण करण्याची  क्षमता प्राप्त अशी ही रचना आहे. जर अत्यंत बारकाईने त्याच्या ह्या जीवन रचनेचा विचार केला तर हे चक्र जवळ जवळ सारखेच प्रतीत होते. उत्पत्ती, स्थिती व लय  ह्या चक्रांत जीवनाचा उच्च निचतेचा भाव कोठेच निर्माण होत नसतो. ते निसर्गाला केव्हांच मान्य नाही. प्रचंड उत्क्रांत झालेला मानव हा देखील काळानुसार अत्यंत सुक्ष्म अशा क्रिमी, जंतूचे देखील खाद्य होवून जाते. एक जीव दुसऱ्यावर जगवा हीच तर त्या ईश्वराची मूलभूत कल्पना आहे.

“ जीवः जीवस्य जीवनम ” म्हणतात ते ह्याचमुळे. ईश्वरांनी विचार क्षमता अर्थात ज्ञान ह्याची देणगी मानव जातीला जास्त प्रमाणात बहाल केली. कदाचित त्याची योजना असावी की मानव प्राण्याने निसर्गाच्या दैनंदीन सृजनात्मक क्रियामध्ये त्याला मदत करावी. परंतु झाले मात्र विपरीत. तो त्याच ज्ञान साठ्याचा दुरुपयोग करु लागला. वेगळाच उपयोग घेण्याचे योजू लागला. हेच ज्ञान आपल्या जगण्याच्या समस्या उलगडू शकते. आपल्या अस्तित्वामध्ये श्रेष्ठता ही निर्माण करु शकते. आपल्या इतर सर्व सजीव वा निर्जिवामध्ये आपले महत्त्व, मानसन्मान स्थापित करण्यास मदत करु शकते, हे त्याच्या लक्षात आले. निरनिराळ्या क्लुप्त्या करुन आपण सर्वात श्रेष्ठ आहोत, ह्याचा त्याने निरनिराळ्या माध्यमाने प्रयत्न केला . केवळ ज्ञानाच्या जोरावर प्रचंड जगांत, ज्यात डायनोसार, ड्रॅगन, वाघ, सिंह, हत्ती, मगर, अजगर, एनाकोंडा, गेंडा, हिप्पोपोटामस, सर्प, अवाढव्य असे मासे, जलचर प्राणी इत्यादी प्रचंड शक्ती प्राप्त, भयानक प्राणी ह्यांच्यावर संपूर्णपणे ताबा मिळवला. त्यांना अंकीत केले. आपल्या अधिकार क्षमतेमध्ये आणले. परिणाम झाला तो मानव सर्वांमध्ये श्रेष्ठ ठरला. हे सारे केवळ विचार ज्ञान संपदेच्या अधिपत्यामुळे. तसा शारिरीक शक्तीमध्ये तो कित्येक प्राण्याच्या तुलनेत अत्यंत कमी पडतो. एखादा क्षुल्लक डास वा क्रिमी किटक देखील त्याला जगणे मुश्किल करु शकतो. शक्ती सामर्थ्यांत तो इतर प्राण्याच्या केव्हांच वरचढ होऊ शकणार नाही. फक्त गनीमी कावा, चकवा तंत्र, विश्वासघात इत्यादी आयुष्याचा तो कौशल्याने उपयोग करतो. केवळ विचार, ज्ञान यांच्या सामर्थ्यांमुळे मात करतो.

विचार व ज्ञानसाठा जेव्हा विकसीत होऊ लागला, तेव्हा त्याला जीवनचक्रांत कोणताही सजीव वा निर्जीव द्वंदात्मक, बरोबरी करणारा, आवाहन देणारा राहीला नाही. सर्वांवर त्याचे वर्चस्व स्थापीत होऊ लागल्यामुळे तो एक अजींक्य असा बनू लागला.

२                                   परंतु म्हणतात ना, ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’

मानवाच्या विचार व ज्ञानश्रेष्ठतेमध्ये त्यालाच आवाहन देणारे, त्याला स्पर्धा करणारे, ह्यालाच वरचढ बनू शकणारे व त्याच्यावरच अधिकार गाजवणआरे, त्याचेच श्रेष्ठत्व हिसकावून घेणारे निर्माण झाले. हा कोणता दुसरा वर्ग, प्राणी व उत्पत्ती नव्हती. तर त्याच्या आपल्याच योनीमधले होते. मानव आता सर्वावर अधिपत्य गाजवित आपसातच संघर्ष करु लागला. मानवप्राणी इतर मानव प्राण्यांशीच झुंज देवू लागला. आता श्रेष्ठत्वाचा गुंता एकदम वाढू लागला. इतरांमधले श्रेष्ठत्व ही संकल्पना यशस्वी झाल्यानंतर हेच श्रेष्ठत्व वैयक्तिकतेकडे जाऊ लागले. श्रेष्ठ कोण  “तू का मी”  ह्याचे बिज रोवले गेले. एक भयानक प्रचंड ओझे ज्याची बिजे कदाचित सर्वच प्राण्यांचा, विश्वाचा नकाशाच बदलून टाकील. भविष्य काळात प्रचंड उत्पात निर्माण करतील. अशा विचार संकल्पनेची ती बिजे रोवली गेली. त्या बिजांचे नाव होते “तू का मी” आणि पुढे त्याचेच हायब्रिड होऊन फक्त “मीच“  अर्थात “माझेच सारे” मीच श्रेष्ठ ह्या संकल्पनेत. उत्पात माजवला. ह्या एक प्रकारच्या स्वार्थी विचाराने मानव प्राण्यातील श्रेष्ठत्वाची भावना दृढ होऊ लागली. आता ते साध्य करण्यासाठी स्वकीय अर्थात आपलेच लोक, आपलाच समुदाय, समोर येवू लागला. प्राथमिक अवस्थेत त्यांनी निरनिराळ्या क्लुप्त्या अवलंबिल्या. दोन प्राणी झगडतात तेव्हां हात पाय, दांत, नखे इत्यादी अवयवांचा उपयोग केला जाई, नंतर हातात वस्तू येवू लागल्या, त्यात दगड, लाकूड, लोखंड, तांबे इत्यादी धातू आले. मग कठीण पदार्थ येवू लागले. जस जसे ज्ञान वृधींगत होऊ लागले, शस्त्र यांची निर्मिती होऊ लागली. ह्या सर्वांचा फक्त एकच हेतू असे. तो म्हणजे अधिपत्य, सत्ता, श्रेष्ठत्व स्थापन करणे. एकदा सर्वांहून श्रेष्ठ ही मान्यता मिळाली की मग इतर सर्व काही  त्याच्या पाठोपाठ येवू लागते. आजच्या प्रगत व वैज्ञानिक काळामध्ये देखील तीच प्रमुख संकल्पना जीवीत ठेवली जात आहे. श्रेष्ठत्व सत्ता आणि मग जीवनाला लागणारे सारे काही हक्काने, नव्हे शक्तीने प्राप्त होऊ लागले.

रानटी टोळ्या, त्याची आयुधे ह्याचा प्रचंड दबदबा होऊ लागला. शस्त्रांची संकल्पना, योजना परिणाम इत्यादी काळानुसार वाढत गेले. बदलत गेले. साधे, सोपे सरळ परंतु प्रचंड ताकदीची शस्त्रे निर्माण होऊ लागली. “बळी तो कान पिळी“  ह्या तत्त्वाने, शक्ती सामार्थ्य प्राप्त संघटनेकडे सत्ता जाऊ लागली. श्रेष्ठत्व येवू लागले. प्रशासन जावू लागले.

“ज्ञान” ते तर सर्वाहून श्रेष्ठ आहे ना. लहरी रुपामधले अस्तित्व असलेले. आजपर्यंत ह्याच ज्ञानाने महान शक्तीधारण करण्यावर देखील आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले होते. कित्येक व्यक्ती त्या संघटन समुदायात होत्या. परंतु शरिराने अत्यंत अशक्त व भित्रे होते. फक्त विचार ज्ञान यांचा त्या काळानुसार व त्यावेळेनुसार प्रचंड साठा होता. हा शरिराने अत्यंत नाजूक, किरकोळ अशी देहकाठी परंतु ज्ञान प्राप्त होता. शारिरीक शक्तीसामर्थ्यांसमोर ज्ञान सामर्थ्याला फारसे महत्त्व दिले जात नव्हते. शक्तीवान कुणाचेही ज्ञानी समजदार बोल दुर्लक्षीत करीत.

३             आणि एके दिवशी एक घटना घडली. सांज समयी संधी प्रकाशात डोंगरावर प्रचंड ढगांची जमवाजमव दिसू लागली. निरनिराळे आकार, काळे-पांढरे ढग. त्याचवेळी अचानक चमकणाऱ्या विजांचे दिसणे, त्यांच्या रेषामय दिसणे, त्यांचे ढगामधून चंचलतेने होणारे वहन व प्रकाश आणि नंतर प्रचंड आवाज. सारे वातावरण एक भयानक भीती निर्माण करणारे भासत होते. सर्व चकीत होऊन त्याकडे बघू लागले. जे स्वत:ला शक्तीवान, सामार्थ्यवान समजत होते ते देखील त्या अनामिक ज्ञात नसलेल्या निसर्गाच्या एक प्रकारे रौद्र रुपाला घाबरुन गेले. जीवाला मृत्यूची भीती ही तर निसर्गाचीच देण असते. “सुरक्षित जगा वाढत जा आणि आपली योनी वृद्धींगत करीत जा” हाच तर निसर्गाचा मूलमंत्र असतो. तो प्रत्येक सजीव प्राणी त्याचा आधार घेत जगत असतो. सारे दृष्य बघून लोक घाबरुन गेले. त्याचक्षणी त्यावेळी तथा कथीत विद्‍वान परंतू शरिराने तसे अशक्त पुढे सरसावले. त्यांनी सर्वांना दिलासा दिला. ही सारी कोणतीतरी अदृष्य शक्ती आहे. प्रचंड ऊर्जा धारण केलेली आहे. ती सर्वांचे भले करील वा आपणांस नष्ट ही करु शकेल. आपण त्या शक्तीला विरोध न करता त्याला मान्यता देवू या. त्याच्या समोर नतमस्तक होवू या. त्या विद्‍वानाला सर्वांनी एक मुखाने मान्यता दिली. त्याचे विचार सर्वांना पटले. ह्यात मुख्यत्वेकरुन काही विचार धारा होत्या. जे दिसतं, जे जाणवतं, जे अनुभवले १) ते सार कोणत्यातरी अदृष्य, अज्ञात शक्तीमुळे २) त्याची शक्ती प्रचंड असे ३) ती सर्वांना मदत करेल ४) तिला विरोध केला तर ती सर्वाना नष्ट करेल ५) तिचा आकार, प्रकार बदलणारे असतील. सर्वांनी त्याच्या ह्या संकल्पनेला मान्यता दिली. रानटी वृत्ती मधून सामाजिक संकल्पनेला एक प्रकारे आरंभ होत होता. पुढे अशाच अनेक प्रसंगी अनेक वेळा नैसर्गिक तथा कथीत चमत्कारपूर्ण घटना घडत गेल्या. मग ती आग असो. विजेचे चमकणे असो, धरणीकंप असो, वादळ वारे असो, सुनामी वा समुद्राचे उसळणे असो, ज्वालामुखी असो वा असेच काही. जेव्हां मानव हा भयभीत होत गेला. त्या प्रसंगावर उपाय करण्याची त्याची बौद्धिक पाकळी वा क्षमता विकसित झालेली नव्हती. कोणत्याही प्रसंगाना विरोध न करता सारे मान्य होऊ लागले. नैसर्गिक तत्त्वानुसार जर सर्वच चक्रमय असेल तर हे प्रसंगही चक्रमय होते. ते येथे घडतं, प्रचंडता दर्शवितं, आघात करीत आणि अल्पकाळानंतर निघून जात. सर्व मानव जातीमध्ये एक विशाल चर्चेचा विषय मागे ठेवून ह्यातच दोन गोष्टी झाल्या. देवत्व अर्थात कोणत्यातरी अज्ञात, सामार्थवान, सर्व श्रेष्ठ संकल्पनेचा जन्म झाला. कदाचित वर वर्णिलेला ढगाचा वा विजेचाच प्रसंग असेल असे नाही. असे अनेक प्रसंग काळ व  वेळेप्रमाणे घडत गेले. प्रत्येकाला कारण कोणते हे समजू शकले नाही. तशी त्यावेळी प्रगल्भता कमी पडू लागली. हतबलता मात्र प्रामुख्याने दिसू लागली. यातूनच जन्म पावला तो देवत्वाच्या माध्यमाचा.  देवत्व हे श्रेष्ठत्व वा सामर्थ्य ह्या अंगाने त्याला मान्यता मिळू लागली. आज देखील आपण जेव्हा कांही प्रचलित संकल्पना व त्यात होणारा काळानुसार बदल लक्षात आणला, तर हे लक्षात येवू लागते.

४              ग्रहणामुळे निर्माण झालेला नैसर्गिक बदल, पृथ्वीवर पडणाऱ्या छाया-पडछाया. या बदलना प्रथम धार्मिक संकल्पनेचा मुखवटा दिला गेला होता. तो राहू, केतू, सूर्य चंद्र, पृथ्वी इत्यादी.  लोकांचे भजन, पूजन स्नानादी क्रमे, प्रार्थना इत्यादी हे सारे प्रचंड प्रमाणात व नियमित होत होते. ज्ञानाची वाढ झाली, समज वाढवली, निसर्गाचे चक्र समजले. सारे सारे बदलू लागले. त्या कथांवरील विश्वास कमी होऊ लागला. लोक सत्य घटनेचा आधार मान्य करु लागले. अशाच अनेक संकल्पना देखील त्यांची उकल होऊन मान्यता प्राप्त होऊ लागल्या आहेत. ज्ञान, विद्वानानामुळे परिवर्तन होत असलेले जाणवते.

रानटी काळांत जेव्हा देवत्वाची प्रथम कल्पना कुणीतरी रोवली व ती मान्य होऊ लागली. तेव्हा एक वैचारिक परिवर्तन जाणवू लागले. सशक्त, ताकदवान लोकांनाच श्रेष्ठत्व दिले जाते व त्यांचा अधिकार शक्तीच्या जोरावर मानला जाई. प्रथमच हे घडले. अशक्त किरकोळ परंतु विचार संपन्न व ज्ञानसंपन्न अशा व्यक्तीला महत्त्व दिले जाऊ लागले. कारण त्यानेच त्या नैसर्गिक घटना वा चमत्कारावर भाष्य केले होते. सर्वाना अभय देण्याचा प्रयत्न केला होता. समोरच्या शक्तीपुढे विनम्र होण्याचे, रानटीपणा बाजूस करण्याचे पटविले होते आणि हे त्याकाळच्या तथाकथीत मुखीयांना पण पटले. त्यांनी मान्यता दिली. हे बघून सर्वजण त्या तथाकथीत विद्ववानाला आदर देवू लागले. नतमस्तक होऊ लागले.

हा वैचारिक बदल, समजण्याची संकल्पना ही त्यावेळच्या समजदार वा ज्ञानी जनांच्या लक्षात येवू लागली. शारिरीक बळ वा शक्तीपेक्षाही नवीन शोधलेला वैचारिक मार्ग हा त्यांच्यावरही श्रेष्ठत्व गाजवणारा असेल ही समज दृढ होऊ लागली. ज्ञानाचे मग त्यात विज्ञान असो वा जामाजिक, कौटुंबिक धारणा विषयी असो. पारडे जड होऊ लागले. सशक्त देखील अशक्तांना मान्यता देवू लागले. विचार व विषय वाढत जावू लागले. जितके विद्‍वान, तितकेच विषय व समज. लोक जागृती निरनिराळ्या मार्गाने होऊ लागली. सहज झाले असेल वा हेतूपरस्पर घडले असेल. मात्र जे घडले त्याने सामाजिक इतिहास स्थापन होऊ लागला. अशाच त्याकाळच्या तथाकथित विद्‍वान मंडळीनी अद्रष्य शक्तीच्या मान्यतेचा विचार दृढ करणे सुरु केले. त्याच संकल्पनेतून उत्पन्न झाले आदर तंत्र, विश्वास तंत्र, श्रद्धा योजना, पुजाअर्चा, भजन इत्यादी. मग सर्वच जण त्या अदृष्य शक्तीचे गुणगाण करु लागले. सर्वांचे भले करण्याची त्यामध्ये संकल्पना आहे हा विचार स्थापन होऊ लागला. चांगले विचार, भले विचार, संस्कार, प्रेम, आपलेपणा आणि अशाच अनेक बाबींचा उगम होऊ लागला. अनेक विचार अनेक संकल्पना, अनेक मार्ग हे निर्माण होऊ लागले. निरनिराळे विचार धारक ह्यात सहभागी होऊ लागले. नावे दिली गेली. प्रचार होत गेला.

प्रगती तरी समाधानकारक होती हे सत्य नाकारण्यात अर्थ नाही. पण याचा मुळ गाभा होता श्रेष्ठत्व, अधिपत्य, सत्ता गाजविणे. जे शरिर शक्तीसामर्थ्याने इतरांना प्रभावित करीत होते. ते देखील अशा विद्वत्तापूर्ण विचारांना मान्यता देवू लागले. आदर देवू लागले.

५        त्यांच्या समोर नतमस्तक होऊ लागले. इतिहास सांगतो की, राजसत्ता ही धर्मसत्तेला प्रचंड महत्व देवू लागली. काहीतरी करुन दाखवण्याची शक्तीप्राप्त लोक हे विचार, कल्पना, भव्यता, दिव्यता इत्यादी संकल्पनाना शरण जावू लागले. ह्यामधूनच एक वर्ग निर्माण झाला. जो आपल्या ज्ञानांनी ज्यात अदृष्य शक्तीची गुणगाण, वर्णन, परिणाम, प्राप्त करण्याची साधने, मार्ग इत्यादी अनेक मार्गाचा उहापोह करु लागला. काही मिळणे वा न मिळणे, प्रयत्नांना यश येवो वा न येवो हे सारे नैसर्गिक सत्य आहे व चक्रमय आहे. परंतु एखाद्या प्राप्त घटनेला कुणाच्या तरी दयेचा, अदृष्य शक्तीची देण ह्या संकल्पनेत घालून विचारांना त्यापद्धतीने मार्ग क्रमण करण्यास प्राप्त केले जाते. तसा विश्वास निर्माण केला जातो. येथेच जन्म होते. श्रद्धा हा संकल्पनेचा. सहजता, साधेपणा, दिव्यता, महानता, चांगलेपणा ह्या कल्पनेला विरोध होत नसतो. ती मानसिकता असते. तीच अशा लोकांनी हेरली आणि आत्मसात केली. आजही असेच शारिरीक अशक्त वा किरकोळ परंतू ज्ञान संपन्न व्यक्ती सर्व समुदायात आपले स्थान प्राप्त करत असतात.

शक्तीचाच नेहमी विजय होत असतो. “ज्ञान” ही पण एक शक्ती आहे. तिने आपल्यापरी अस्तित्व स्थापन केले आहे. मूळ मानसिकता हा नैसर्गिक गुणधर्मात दडलेला आहे. जीवनाची गरज, ती अंकीत राहते. संरक्षणात, अस्तित्वाच्या काळजीत सर्व सजीवाची प्राथमिक गरज असते. ती दिलेले, मिळालेले जीवन जगण्याची  “सर सलामत तो पगडी पचास” म्हणण्याची एक वाक्यरचना त्यामुळे आणि त्या स्वसंरक्षणासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. कोणतीही शक्ती तुम्हास तारेल हा विचार मनावर प्रचंड परिणामकारक ठरतो. अर्थात त्या तरण्यातच त्याच अदृष्य शक्तींकडून मिळवायचे असते. त्या जीवनाला लागणाऱ्या गरजा मग ते हवा, पाणी, अन्न ह्या प्राथमिक वा कपडा, घर, संसार इत्यादी जीवनाच्या सोई हे सारे कोणतीही अदृष्य, प्रचंड शक्तीप्राप्त संकल्पनेमधून साध्य होऊ शकते हा विचार मनास आनंद व समाधान देणारा ठरतो. त्यास वैचारिक मान्यता त्वरीत मिळते. त्याच संकल्पनेमधून उत्पती झाली त्या शक्तीच्या प्राप्तीची, आशीर्वादाची, दयेची इत्यादी.

ज्या विद्‍वान मंडळींना अनेक चांगले, सुंसकृत असे विचार येवू लागले. यांनीच त्यांच्या प्राप्तीचे अनेक मार्ग सुचविले. निरनिराळ्या विचार धारा निर्माण होऊ लागल्या. अनेक मार्ग अनेक पंथ इत्यादी त्यामधून उत्पन्न झाले. ज्यांना जशी समज येवू लागली. ते ते त्या त्या विचार धारणेकडे वळू लागले. ह्या सर्वांचा वेगवेगळा परिणाम होऊ लागला. मात्र मूळ गाभा कायमच राहीला. तो म्हणजे श्रेष्ठत्वाचा. प्रत्येक जण आपला विचार श्रेष्ठ, प्रथम, महान, प्रगल्भ इत्यादी असल्याचे सांगू लागले. भासवू लागले. कारण श्रेष्ठत्वात होता अधिकार, सत्ता गाजविण्याची क्षमता.

काही विचार करताना, ह्या विचारांना छेद जाईल अशा कल्पना काढल्या. जशा चांगल्या अदृष्य शक्ती असतात, तशाच त्रासदायक, तापदायक, हानीकारक देखील शक्तींचा     ६            उहापोह झाला. भूताटकी, चेटूक, चकवा, भूतबाधा, पिशाच्य, राक्षसी वृत्ती इत्यादींच्या कल्पना पुढे आल्या. त्याच्या भयावह शक्तीसामर्थाच्या वर्णनाने अनेकजण हाबकून  गेले. अशा वृत्तींना देखील अंकीत करावे, त्याचीपण दया मिळावी. कृपादृष्टी असावी ही विचारसरणी पण जोर धरु लागली. ह्या साऱ्यांचा वेगळाच मार्ग शेवटी जात होता. आपले श्रेष्ठत्व दुसऱ्यावर स्थापन करण्याचा प्रयत्नात, अनेकजण त्यातही अयशस्वी झाले. चांगले असो वा वाईट, सर्वानाच अंकित करुन स्वरक्षण करुन घेण्यालाच त्यात यश मिळत गेले. अनेक उलाढाली, अनेक घटना अनेक प्रसंग चक्रमय रुपात चालतात. ज्यात उत्पती स्थिती व लय हे सुत्र अबादित आहे. मानवाने आपल्या अहंकारी बुद्धीने त्यात खूप विघ्ने, वितुष्ट, बदल करु घातले. त्या सर्व शक्तीमान निसर्गाला (का परमेश्वराला) आपल्या इच्छेप्रमाणे बदल करण्यास भाग पाडले. जे काही दिसू लागेल, भासले, वाटले ते सारे मिथ्या होत चालले आहे. फार क्षणीक बदल ही तर निसर्गाचीच योजना आहे. उत्पत्ती, स्थिती व लय ह्यावर देखील मानव अधिकार गाजविण्याचा प्रयत्न ह्या मधून होता.

समाज आज खूप प्रगती करीत आहे. पुरोगामी   बनत चालला आहे. परंतु अशा अनेक विचारांची जी मुळे खूप अनेक अनेक वर्षापासून खोलवर रोवली गेली, ती समुळ नष्ट होणे फार अवघड. अज्ञानात सुख, कल्पनेतील आनंद, भित्र्या मनाला आधार, अनिश्चितेतच समाधान शोधनाचा प्रयत्न होत गेला.

कोणता विचार येथे रुप धारण करीत आहे. जीवनाचे, निसर्गाचे एक महत्त्वाचे ध्येय, श्रेष्ठत्व स्थापणे, अस्तित्वाची जाणीव, हेच. त्यावर श्रद्धा, कालचा विचार, आज पूर्ण वेगळा असेल. अत्यंत विचित्र वाटणाऱ्या, केवळ कल्पना करता देखील न येणाऱ्या सर्व संकल्पना आज सत्यात उतरत आहेत. देव संकल्पना अशीच असावी. कदाचित आपणच देव असूत. देवांच्या सर्व कृती, त्यांच्यावर थोपविली गेलेली अनेक पुराणकथा, ह्या मानवाला साजेशीच असतात. फक्त अनेक चमत्कार दिव्यशक्ती धारणा, ह्या कदाचित आज दिसत नसतील. परंतु प्रगत मानव तेही अनेक मार्गाने साध्य करु लागलेला दिसतो. ज्ञान हे volatile प्रमाणे असते. ते लहरी मध्ये प्रचंड वेग क्षमतेत असते.  अस्तित्व रचना इत्यादीमध्ये आमुलाग्र बदल धारण करण्याची शक्ती प्राप्त. मनापेक्षाही प्रचंड ताकदीचे. मन हे देह शरीर माध्यमाचाच आधारावर राहते. मनाला जगण्यासाठी आधार हा शरीराचा. परंतु ज्ञानाला कसलाच आधार लागत नसतो. ते कोठेही, कोणाकडेही केव्हाही जाते, उलथापालथ करणे, वेगळेच होते. कुठले ज्ञान , कुठेही जाणे व त्याच देहातील ऊर्जा शक्तीचा आधार घेत वेगळीच रचना निर्माण करते. ज्ञान हे मनापेक्षा कित्येक पटीने श्रेष्ठ ठरते. माझे विचार, माझे ज्ञान हेच माझे मन म्हणतात. सत्य परंतु ज्ञान जेव्हा स्वतंत्र रुप धारण करते तेव्हा ते तुझे माझे कुणाचेच नसते. तेच तर मनावर देखील ताबा करते वा नष्ट करते.

७        ज्ञानाला तुमच्या शरिराची गरज नाही आणि मोह ही नाही. मनाला तशी गरज असते. म्हणूनच सर्वश्रेष्ठ ज्ञान. काही अंशी ते त्याला साध्य होत आहे. परंतु हे सारे आत्मघातकी ठरणारेच असेल. मानवाची वर्चस्वाची हाव मात्र वाढतच चाललेली आहे. त्याने अनेक क्लुप्त्या करुन आपण त्या निरगुण परमात्म्यापेक्षा श्रेष्ठ होण्याचा आव आणला आहे. देवत्वाच्या कल्पना जर मानव प्रेरित असतील, तर त्या सर्व ज्ञान लहरी मधून उत्पन्न झालेल्या आहेत. ज्ञान हे मानवासाठी सदा अपूर्ण असलेले आहे. कारण हाच तर ज्ञानाचा मूळ गाभा आहे. त्यात फरक पडणे केव्हाही होणे नाही. मनावर ताबा करता येत नाही. कारण ही तेच आहे. ज्ञानाचे देखील तसेच नव्हे का. शिवाय मनाला  माध्यम लागले. ज्ञानाला तर कोणतेच माध्यम लागत नाही. चांगल मनच चांगल्या ज्ञानाच्या सहकाऱ्यात राहू शकते. समाधान, शांततेचा तोच अंतीम उद्देश असेल.

मानव कोण आहे. ह्याचा विचार होताना, त्याच्या ज्ञानाचा विचार व्हावा, एका रानटी अवस्थेमधूनच तो प्रगत होत होत आजच्या आधूनिक जगातील प्रगतीचा कर्ता ठरला. जे कुणी विचार करु शकणार नाही. ज्या गोष्टीची फक्त वाच्यचा पौराणीक ग्रंथ संपदेत दिसून आली ते सारे काही हाच मानव आज आपल्या ज्ञान सामर्थ्याने करु पाहात आहे.  पौराणिक ग्रंथामधील देवत्वाची कल्पना सामान्य मानव करु शकत नाही. ती दिव्य शक्ती ह्या देवदवतांना प्रदान केली होती. अर्थात त्यांच्याच ज्ञान सामार्थ्याने कित्येक तथाकथीत आश्चर्यकारक घटना होत गेल्या. त्यांची वर्णने ऐकून आम्ही अंचबित होऊ लागलो. कारण त्या गोष्टी मानव शक्तीच्या क्षमतेच्या खूपच भिन्न होत्या. मानव तशा गोष्टी केव्हाच करु शकणार नव्हता. देवत्वाचा मोठेपणा, ह्या त्याच्याच भव्यता दिव्यता ह्यात सामावलेला होत्या. मात्र हेच ज्ञान सागर वाढू लागाले. प्रसरण पावू लागले आणि मानवाच्या क्षमतेच्या दिशा खूप दूर दूर जाऊ लागल्या. काळ आणि वेळ ह्यांच्यावर त्याने बऱ्याच प्रमाणात विजय संपादन केला. देवत्वाच्या वर्णनामधल्या जवळ जवळ अनेक बाबी ह्या मानवाने हस्तगत करण्याचा सपाटा चालू केला. ह्याचवेळी देवत्वामधली उर्जाशक्ती व विवेश गुणधर्मावरही मानवी प्रभूत्व दिसू लागले. त्या क्षणी देवत्वाच्या काही संकल्पना लोप पाऊ लागल्या. त्या देवत्वामधून निघून जात आहेत, असा त्याचा अर्थ नव्हे तर त्या सर्व मानवात देखील असल्याची जाणीव होऊ लागली. एक संकल्पना अद्यापी जागृत आहे आणि तो म्हणजे प्रत्येक देवात दैवी शक्तींचे अस्तीत्व असते. ही समज ह्या शक्तीमात्र मानवाने सांघीक पद्धतीने आत्मसात केल्या आहेत. म्हणूनच ते ज्ञान प्रचंड प्रमाणात वाढत असलेले जाणवते. ते कुणा एका व्यक्तीकडून नव्हे. प्रत्येक व्यक्ती ही जरी सक्षम असली तरी त्याची वैयक्तीक चेतना निरनिराळ्या प्रातांत धाव घेवून व्यक्त होत असलेल्या ज्ञानाला वृद्धींगत करते. हे कुणा एका मुळे मात्र नाही. ह्या सर्व सांघीक प्रयत्नात आणि तथाकथीत ज्ञानाच्या निरनिराळ्या दालनांत होत असलेली प्रगती जाणवते. अनेक महान व्यक्ती अनेक प्रातांत अनेक विषयांत जगाच्या कानाकोपऱ्यातून प्रगत होत आहेत.

८                   ती आपली ज्ञान शक्ती व्यक्त करताना, वृद्धींगत करताना, दिसते. हे फक्त ज्ञानच करु जाणे, मनाला हे कितपत जमेल ह्याची शंका वाटते. कारण ते मन कोणत्यातरी वैयक्तीक देहामध्ये बंदीस्त असते व देहाला नाश होण्याचा शाप आहे. काळ वेळ ह्यांचे मिलन होताच देहधर्म नष्ट होतो. लहरी रुपी ज्ञान छलांग मारीत दुसऱ्या देहांत शिरते व चक्रमय गतीत जाते.

शेवटी पूर्वीचाच प्रश्न समोर येतो व त्याची सोडवणूक पण तशीच होते. हे सारे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठीच. श्रेष्ठत्वात सत्ता, सत्तेत जीवन जगण्याचे मार्ग हे असतात आणि सारे कशासाठी तर  “मी”  ह्याच्या साठी

रानटी अवस्थेपासून “मी” चा जो उगम जाणवू लागला तो नैसर्गिक होता व केवळ चांगल्या अस्तित्वासाठी  struggle for existence म्हणतात तसे

केव्हा केव्हा मनात विचार येतो की देवत्व कोठे, ह्याच जगांत नव्हे का?  ज्याने स्थूलत्व व सूक्ष्मपणा ह्यावर विजय मिळवण्याचा प्रयत्न यशस्वी केला, नवीन सजीवता निर्माण केली, देह व देहातील अवयावर ताबा केला. ह्याला कोण म्हणावे, पूर्व काळातील देवत्वाच्या सर्व संकल्पना मानवात जर दिसून येत असतील, तर तोच देव असेल का?

ह्याच क्षणी म्हणजे देवाच्या कालसमयी दैत्याची पण संकल्पना होती.

केवळ चांगले व वाईट ह्या भावनांना उचलण्यासाठी देवाबरोबर दैत्याची संकल्पना रुढ केली गेली. आज देखील अनेक व्यक्तींचे आचरण हे दैत्याच्या संकल्पनेत जाते. हे सत्य आहे. म्हणून देव आणि देत्य ह्या दोन्हीही कल्पना आज मानवात दिसून येतात. येथेच स्वर्ग असतो. येथेच नर्क असतो म्हणतात. हे गुढ अर्थानी समजून घेतले पाहीजे. अंगीकारले  पाहिजे. ह्यामुळे वैचारिक भरकटने, गैरसमज, गैरविश्वास व अंधश्रद्धा यावर पायबंद पडू शकेल. मानवाच्या ज्ञान प्रगतीमध्ये संस्कारीत, आदर्शवादी, भक्ती प्रेमभरीत, समानतायुक्त भावना अशा मुल्यांची नितांत गरज आहे. दैत्य वृत्तीला जाणून,  सर्वांनीच देवत्व होण्याची आज जगाला नितांत गरज आहे.  मानवाचा देव व्हावा हीच त्या परम् श्रेष्ठ परमेश्वराच्या चरणी प्रार्थना.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail –  bknagapurkar@gmail.com

* आफ्रिकन स्त्रीचे आभूषण प्रेम!

*   आफ्रिकन स्त्रीचे आभूषण प्रेम!

नुकताच  दक्षिण  आफ्रिकेला  जाण्याचा  योग  आला  होता. निसर्गच वरदान लाभलेली  भूमी.  असे वर्णन तिचे करता येईल. ऊतम हवा, भरपूर पाणी, नद्या नाले आणि नेत्रदीपक धबधबे दिसत होते. त्याच प्रमाणे प्रचंड झाडेझुडपे, वेली, क्षितिजा पर्यंत  पसरलेली जंगले,  आणि त्या जंगलात साम्राज्य गाजवणारी अनेक जंगली जनावरे. बळी तो कान पिळी, ह्या तत्वाने जगणारे पशु, काळपा काळपाने आनंद घेताना दिसत होती.  सर्व  बघताना हृदय भरून येत होत. ह्यात भर पडली ती तेथील  अतिशय प्रेमळ, लाघवी, माणुसकीने भरलेल्या, अश्या माणसांची. हवामान थंड समशीतोष्ण असून देखील तेथील लोकांना सामान्यपणे, वर्ण मिळाला तो काळा. नव्हे खूपच काळा. चेहऱ्यावर एक प्रकारे राकटपणा, तेलकट वा नितळ कातडी. केस जवळ जवळ  कुरुळे.  भारतीय   स्त्रीला लाभलेला नाजूक गहू

वर्ण वा गोरारंग त्यांच्या चेहरेपट्टीवर कधीच दिसणार नाही.अर्थात त्यांचे ते स्वरूप त्यांच्या सौंदर्याच्या द्रीष्टीकोनानुसार  नजरेमध्ये कदाचित मोहक व सुंदर  ह्या  संकल्पनेत असेलही.

अशाच एका आफ्रिकन महिलेशी आलेला, न विसरणारा एक प्रसंग:-

आफ्रिकन सफरीच्या मार्गावर एका हस्तकला वस्तूच्या दुकानावर आम्ही थांबलो होतो. मी आणि सौ. तेथील  प्रदर्शनामधील अनेक हस्तकलेच्या वस्तू बघत होतो. सौ.ला एक माळ खूपच आवडलनिरनिराळ्या प्राण्यांची छोटी कोरीव कालाकृती माळेच्या मण्यामध्ये

अतिशय सुरेख दिसत होती. त्या दुकानाची  प्रमुख एक आफ्रिकन महिला होती. तीने आदरपूर्वक तिच्या अनेक वस्तू आम्हाला दाखविल्या. ती आवडलेली माळ तीने दहा डॉलरला देऊ केली.  सौ. तिच्या पाकीटमधून पैसे काढीत असता, सौ.च्या हातातील काचेच्या  बांगड्यावर त्या महिलेची नजर गेली.  तिच्या चेहऱ्यावर स्मिथ हास्य दिसले. काचेच्या बांगड्या तिच्या पाहण्यात नव्हत्या. “ हे काय आहे ? व हे तुम्ही का घालता.? “  तिच्या चौकस प्रश्नात आश्चर्य वा कौतुक पण दिसून आले.  विशेष करुन जेंव्हा बांगड्या ह्या भारतीय महिलासाठी सौन्दर्य  सौभाग्याचे  लक्षण असते हे  समजल्यावर. अचानक तिने इच्छा  प्रदर्शीत् केली.  ”  तुम्ही बांगड्याचा एक जोड मला देऊ शकता? “  आम्हाला तिच्या उत्छुकतेची    गम्मत वाटाली. सौ.ने  क्षणाचाही विलब न लावता, हातातल्या दोन काचेच्या बांगड्या   तिला प्रेमाने दिल्या. तिनेही त्याचा स्वीकार ” थंक्स”  म्हणत केला, तिने आम्ही निवडलेली हस्तकलेची माळ  बांधुन दिली. ती म्हणाली ”  तुमच्या बांगड्याबद्दल आभारी. कृपा करुन ही मजकडून मित्रत्वाची सप्रेम भेट स्वीकारा. ”  आम्ही देखील हासत तिच्या प्रेमळ  भेट वस्तुचा ( Return gift चा ) स्वीकार केला.   प्रेमाच्या संस्कृतीचेही एक समीकरण असते. त्याच्या अनुशंगाने जे उत्पन्न होते, जो परिणाम होत असतो, तो निश्चितच सर्वत्र तसाच असतो. जगातील कोणत्याही देशात जा. कारण प्रेम आहे निसर्गाचा एक आविष्कार.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail –  bknagapurkar@gmail.com

 

* चुकलेला अंदाज!

चुकलेला अंदाज!

रविवारचा दिवस होता. संध्याकाळची वेळ होती. मी नातवाना घेऊन बागें मध्ये चाललो होतो.  घराच्या  जवळच्या चौकामध्ये आम्ही आटोरिक्षा मिळेल का, ह्याची वाट बघत होतो. रिकाम्या रिक्षा उभ्या नव्हत्या. काही रिक्षा भरलेल्या येत वा निघून जात. जवळच असलेल्या पानाच्या टपरीवर चार पाच सोसायटीतील मुले गप्पा मारीत उभी होती. दोन रिक्षा रिकाम्या आल्या, पण न थांबतच निघून गेल्या. एका पाठोपाठ तीन रिकाम्या रिक्षा आल्या.  परंतु जवळच बागेत जायचे म्हणून त्या निघून गेल्या. आमच्या विनंतीला दुर्लक्ष करीत होत्या. नातवंडे कंटाळली होती. शेजारी उभ्या असलेल्या मुलांचे आमच्याकडे लक्ष होते. एक रिकामी रिक्षा आली. त्या मुलातील एकाने पुढे येऊन ती रिक्षा थांबवली. रिक्षावाला थांबण्यास नाखूष होता. त्याला वेळ नाही ही सबब सांगून, आम्हास बागेंपर्यंत सोडण्यास त्याने नकार दिला. आतापर्यंत बघितलेल्या रिक्षावाल्यांची वागणूक क्लेशदायक होती. मुलांचा अहंकार छेडला गेला.  सर्व मुले त्या रिक्षा भोवती जमली. निर्माण झालेल्या परिस्थितीचे  गांभीर्य त्या रिक्षावाल्याने जाणले. वादविवाद न करता, त्याने आम्हास रिक्षात घेतले.

आम्ही बागेच्या दिशेने जाऊ लागलो. इतक्यात त्या रिक्षावाल्याच्या खिशातील मोबाईल वाजला. रिक्षावाल्याने रिक्षा एक बाजूस घेतली. तो बोलू लागला.

” हं भास्कर ! अरे मी येतच आहे. दहा मिनिटात घरी पोहोचेन. काय म्हणालास घरी येऊ नकोस, का? “   रिक्षावाला त्या माणसाचे ऐकत होता. थोड्यावेळाने   ” बर सर्व समजल, मी सरळच त्या दवाखान्यात येतो. तू थांब आई जवळ.”   रिक्षावाल्याने मोबाईल बंद केला. मागे न वळता तो आम्हास म्हणाला  “ मघाच आमच्या शेजारच्या भास्करचा मोबाईल आला होता. माझी आई घसरून पडली. तिला बरीच दुखापत झाली सांगत होता. म्हणून मी घाईत होतो.”

मी त्याच्याकडे आश्चर्य व निराशेच्या भावनेने बघत होतो.  बाग आली, दाराजवळ त्याने रिक्षा थांबविली. आम्ही सर्वजन व्यवस्थित उतरलो. मी माझे पाकीट काढून, त्याला पैसे देण्यासाठी पुढे जाऊ लागलो. पण क्षणाचाही विलंब न करता, तो रिक्षावाला सुसाट वेगाने निघून गेला. त्याला देण्यासाठीचे पैसे मात्र माझ्याच हाती राहून गेले. मी जड अंत:करणाने त्या रिक्षा कडे, ती नजरेच्या टापूत दिसेपर्यंत बघत राहिलो. माझ्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.

जीवनाच्या दैनंदिनीत अनेक घटना घडतात. त्याकडे बघण्याचा द्रीष्टीकोन,  त्याला सामोरे जाताना भिन्न असतो. त्यामध्ये दडला असतो, लपला असतो, एक बंदिस्त त्रिकोण. ज्यात असतो स्वार्थ, प्रासंगिक भावना, आणि परिस्थिती बद्दलचे अज्ञान. ह्याची जाणीव तिव्रतेने होती. जेंव्हा आपले अन्दाज चुकतात. विशेषकरुन जे इतर अपरिचिताना अनपेक्षित हानिकारक ठरतात त्या वेळीच.

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail – bknagapurkar@gmail.com 

 

 

हसत-खेळत म्हातारपण

जीवनाच्या रगाड्यातून-

हसतखेळत म्हातारपण

जीवनातील अंतिम परंतु महान सत्य म्हणजेच “मृत्यू”.  जो ह्या विश्वात आला तो एक दिवस जाणारच ह्यात तिळमात्र शंका नाही. ज्ञान असो वा विज्ञान आजपर्यंत तरी कुणीही मृत्यूच्या सत्यतेविषयी आक्षेप घेतला नाही. अथवा हे सिद्ध करु शकला नाही की जो आला आहे तो येथेच स्थिर आहे. वा मृत्यूच्या आहारी तो गेला नाही. हा एक मात्र खरं आहे की येण्या व जाण्यामधला काळ हा सर्वसाधारण सर्वांसाठी वेगळा वेगळा व अनिश्चित असल्याचे मात्र दिसून येते.  ह्याच काळाला ‘जीवन रेखा’ हे नाव दिले गेले आहे.

परमेश्वर हा सर्व श्रेष्ठ कलाकार दयाळू, न्यायी, शक्तीमान इत्यादी असल्याचे आजपर्यंत मोठे संत महात्मे, विद्‍वान व सर्वसामान्यजण पण मानीत आले आहे. हे कुणी दुसरा म्हणतो म्हणून मी  म्हणतो असा सर्वसामान्याचा भाव नसतो.  हा अतिशय सत्यपणे थोड्याफार प्रमाणात प्रत्येकाला आलेला अनुभव असतो. मनुष्य नास्तिक असेल तर कोणती तरी ‘शक्ती’ वा निसर्ग, पंचमहाभूते म्हणल. व आस्तिक असेल तर त्या परमेश्वराला स्वत:च्या आंतरिक इच्छेप्रमाणे एखादे प्रचलीत नाव देईल. पण एक मात्र ‘सत्य’ आहे की त्या निसर्गाने प्रत्येक कलाकृती निर्माण करताना ‘आयुष्य रेखा’  मात्र त्या त्या कलाकृती प्रमाणे आखून दिलेल्या आहेत. त्याची ही देणगी अटळ व निश्चीत स्वरुपाची आहे. जसे कुत्रा ह्या प्राण्यासाठी १० वर्षे व अमीबा ह्या एक पेशीमय जीवासाठी कांही क्षण , तर मानवाच्या वाट्यास १००वर्षाचे आयुमान दिलेले आहे. ना जास्त ना कमी म्हणूनच ‘शतायुषी’ व्हा. हा वडीलधाऱ्याकडून आशीर्वाद दिला जातो. तेव्हा प्रत्येकाने आत्मविश्वासाने हे गृहीत धरले पाहिजे की त्याच्या वाट्याला १०० वर्षाचे आयुष्य लाभलेले आहे.  तो एवढी वर्षे ह्या विश्वांत जगणारच आहे. हे झाले तर्कज्ञान, तत्त्वज्ञान. परंतु शतायुषी माणसे शोधून पण सापडत नाहीत. अगदी क्वचित आणि त्याच्याविषयी लगेच कौतुकास्पद मजकूर वृत्रपत्रांत येतात. कारण सर्व सामान्य अशा घटनेस निसर्गाचा चमत्कार वा परमेश्वराची विशेष कृपा ह्या सदरात नेवून सोडतात.

‘परिस्थीत’ ह्या शब्दाची व्याप्ती जेवढी मोठी करता येईल ती कारणे अतिशय महत्त्वाचे आहे. ज्याच्या त्याच्या ज्ञान क्षमतेप्रमाणे त्याची दिशापण बरीच वाढू शकते आणि जेव्हा ही क्षमता अपूरी पडते तेव्हा अस्तित्वात असलेल्या विज्ञानाची मर्यादा दिसून येते. केवळ समाधानाचा आसरा घेण्यासाठी मनूष्य म्हणतो “परमेश्वराची इच्छा” ह्याच परिस्थीतीचा विचार करावयाचा म्हणजे शरीरावर सदैव बाहेरुन व आतून बरेचसे घटक परिणाम करीत असतात. याच्याचमुळे शरीराची झीज होत राहते. दीर्घ आयुष्यला हेच घटक खीळ निर्माण करतात.  मनुष्य शतायुषीची जीवन रेखा हलके हलके  आखूड होते चाललेली जाणवतो.

शुद्ध हवा, चांगले व स्वच्छ पाणी, सकस आहार, योग्य असे तापमान, आद्रता इत्यादी काही बाह्य वातावरणाशी निगडीत असलेले घटक आहेत. ह्याचा पर्यावरणाशी संबंध आहे.  वैज्ञानिक युगाच्या रगाड्यामध्ये वरील घटकांची चांगलेपणाची व्याख्याच बदलून गेली आहे. आजकाल शुद्ध हवा ही हिमालयाच्या परिसरांत देखील सर्व दृष्टीने चांगली असेल का हा एक प्रश्नच पडतो. शहरामधली हवा फार दुषीत व ज्यात प्राणवायूचे प्रमाण अतिशय कमी झालेले असते. खेड्यामध्ये देखील धुराळा, शेकोट्या, अस्वच्छता इत्यादीमुळे हवा दुषीतच असते. शुद्ध पाण्याविषयी तर विचारण्याची सोयच नाही. स्वच्छ पाण्यालाच मिळालेले सांडपाणी, गटारे इत्यादी. पाण्याचा साठ्या नजीकच वाढत जाणाऱ्या प्रचंड झोपडपट्ट्या आणि सारा अस्वच्छ परिसर पाण्याला स्वच्छपणापासून खूप दूर नेवून ठेवतो. जेव्हा नैसर्गिक स्वच्छ पाणी उपलब्ध होत नाही, तेव्हा त्यात औषधांची प्रक्रिया करुन ते सर्वांना मिळते व असे औषधीयुक्त पाणी पचविणे शरिराचे एक कर्तव्य बनून शरिरास अपायच करते.

सकस आहार तर आता इतिहास जमा होत आहे. चांगले खाद्य पदार्थ मिळतच नाही. भेसळयुक्त व अतिशय निकस असे मिळणारे धान्य, तेले, तुप इत्यादींवर जगणे भाग पडते. तेव्हा असल्या खाण्यामुळे शरिराची जी झीज होते, तीच आयुष्याची जीवन रेषा आखूड करण्यास कारणीभूत ठरते. निसर्गाचा समतोलपणा बऱ्याच अंशी विज्ञानांनी नष्ट केलेला आहे. निरनिराळे प्रयोग हे पर्यावरणाला असमतोल करतात आणि त्याचमुळे तापमान, आद्रता इत्यादींमध्ये सदैव बदल होत जातो. शेवटी त्याचा परिणाम शरिरावर होतो. थोडक्यात म्हणजे ह्या सर्व बाह्य घटकांची यादी बरीच मोठी करता येईल.  हे सर्व आजकालच्या माणसाच्या शक्तीबाहेर होऊन गेले आहे. हा कवेळ सामाजिक वा राष्ट्रीयच प्रश्न न राहता सर्व जगातील ही समस्या बनत चालली आहे आणि त्याला झगडा देणे हे केवळ अशक्य आहे. परिणाम फक्त एक “आयुष्य कमी करणारी कारणे”

शरीराच्या आतून हल्ले कऱणारे घटक हे तर माणसाच्या आवाक्याबाहेरचीच बाब आहे. उदा. रक्तामधले गुणधर्म, जेनेटीक कॅरेक्टरीस्टक्स ( Genetic Characteristic ) इत्यादी हे सारे रक्ताच्या समजल्या जाणाऱ्या गुणधर्मामुळे कौटुंबीक (Family) बनतात. कुणाचे आई – वडील, आजा आजी, पंजा-पंजी इत्यादीच्या रक्तामधून येणारा विकार, हा तुमच्या पर्यंत येतो व तुमच्या शरीरावर आघात करतो. तुम्ही अशा स्थितीत काहीच करु शकत नाहीत. परिणामी तुमच्या आयुष्याची रेषा आखूड करण्यासाठी हे सारे कारणीभूत होतात.हे सारं बघीतल्यावर असे वाटू लागते की प्रत्येकजण आपल्यापरी,  जीवन रेखा मर्यादीत करण्यास प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कारणीभूत झालेला आहे. ज्या घटणाचे त्याला अवलोकन होत नाही. त्याबद्दल तो नशीबाला वा परमेश्वराला बोल लावतो ते केवळ समाधानासाठीच.

अकाली, अकस्मित आणि अनैसर्गिक मृत्यू सोडल्यास प्रत्येकाच्या जीवनरेखेवर वृधत्वाचा एक अखेरचा टप्पा असतोच. मृत्यू हे एक अंतीम सत्य समजले गेले. त्याला

आनंदाने व हासत सामोरे जाण्यासाठीच ह्या वृध्वत्वकाळाची जाण सर्वांनी करुन घ्यावयास हवी. कित्येक कारणांनी वृधत्वाचा काळ प्रत्येकाला क्लेशदायक व निराशा निर्माण करणारा वाटतो. परंतू जर कुणी योजनाबद्ध जीवन आखण्याचा प्रयत्न केला तर वृधत्व हा भार न वाटता सुसह्य वाटेल. बालपण, तारुण्य, पौढत्व हे पहिले तीन टप्पे निसर्गाने जीवनांत काहीतरी निर्माण करण्यासाठी, कमविण्यासाठीच दिले आहे. मग तो विकास शारिरीक, वैचारिक, आत्मिक, शैक्षणिक, आर्थिक वा आणखी इतर कारणासाठी असो.  ह्या ज्याचा त्याचा वैयक्तीक विचार असेल. परंतू शेवटी समाधानाची पायरी चढताना वैयक्तीक, कौटूंबीक, सामाजिक किंवा राष्ट्रीय थरापर्यंत जाण्याचा प्रत्येकजण विचार करीतच असतो. अतिशय उच्च कोटीला गेलेली मंडळीच फक्त ह्या जगाचा आणि सर्व विश्वाचा अतिशय उज्वलतेमधून विचार करतात. जे कांही साध्य करावयाचे असेल, त्यांच्यासाठीच जीवनातील पहीले तीन टप्पे आहेत. आपण जे कमविले वा गमविले त्याचे विश्लेषण करणे. दुसऱ्यांच्या जीवनातील यश –अपयशाचा अभ्यास करणे. सर्व आठवणी आणि अनुभवांचे तुमच्यामागून येणाऱ्या पिढीसाठी मार्गदर्शन करण्यात आनंद प्राप्त करण्याचा काळ, म्हणजेच वृधत्वाचा काळ आहे. परमार्थ ज्ञान, ईश्वरी चिंतन व मनाच्या शांतीसाठी सदैव व्यस्त राहण्याचे कसब बाळगणे वा निर्माण करणे हाच हा काळ चांगल्यारितीने व्यतीत करण्याचा एकमेव मार्ग.

काळ हा अतिशय वेगाने पुढे जात आहे. तो तितक्याच वेगाने बदलत आहे. ज्यांना ह्या वेगाची जाणीव त्वरीत येते ते आपली परिस्थीती चटकन बदलून आलेल्या नवीन विचारांशी जास्तीत जात सहमत होण्याचा प्रयत्न करतात.  अशांनाच हा वृध्वत्वाचा काळ सुसह्य होतो. कांही  मंडळी बदलत्याकाळाप्रमाणे वहात जाण्यापेक्षा, आपलाच विचार वा परंपरागत गोष्टी इतरांवर लादू पाहतात. त्यांना शेवटी निराशेलाच तोंड द्यावे लागते. वृध व्यक्तीने  “ आपण मावळते सुर्य असून आपल्या मागची पिढी हे उगवणारे सुर्य आहेत ह्याची सदैव जाण ठेवावी ” . मार्गदर्शन म्हणजे अट्टाहास नव्हे. अनुभवाची शिदोरी म्हणजे तुम्हाला आलेले काही अनुभव. इतरांना अगदीचे तसेच अनुभव येतील असे मुळीच नाही. फक्त “ सांभाळून राहा, विचारांतीच निर्णय घेत जा ”  अशाप्रकारचे मार्गदर्शनपर वक्तव्य त्यांनी करुन फक्त मागुन  येण्याऱ्याला मार्ग दाखवावे इतकेच.

वृधांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या तीन मुख्य समस्या आहेत. शारिरीक, मानसीक आणि आर्थिक. ह्याच्याच अनुषंगाने विचार होऊन वृधत्वाचा काळ हा कसा सुखकर होऊ शकतो हे बघावे लागेल. शारिरीक समस्या :- माणसाच शरीर हे एक अतिशय उकृष्ट नमुन्याचे ‘यंत्र’ आहे आणि जर आपण शरिराकडे ते केवळ एक यंत्र ‘मशीन’ आहे. ह्या दृष्टीकोणातूनच बघीतले तर आपले कितीतरी प्रश्न उकळून जावू शकतात.  त्याचप्रमाणे प्रत्येकाला वाटणारी काळजी ही देखील बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकेल.

आता प्रथम कोणत्यातरी एखाद्या मशीनविषयी थोडेसे समजून घेवू या. उदाहरणात  ‘स्कूटर’ अतिशय उपयुक्त. एक ठरावीक प्रकारचे कार्य याच्यांकडून घेतले जाते. त्याच्या मशीनमध्ये निरनिराळे भाग असून सर्व भागांचे एकमेकांशी सहकार्य व पूरक कार्य असून त्याचा परिणाम म्हणून स्कूटर चालविली जाऊ शकते. प्रत्येक स्वतंत्र भागाचा एकमेकांशी अशा रितीने संबंध असतो की त्या भागात जर काही बिघाड झाला तर त्याच्या विशीष्ट कार्यात बिघाड होतो व जर तो भाग फार महत्त्वाचा असेल तर पूर्ण मशीन काम करणे थांबते. शरीराचे देखील असेच आहे. त्याच्यात देखील बरेच भाग ज्याला अवयव म्हणतात. ते असतात निरनिराळ्या अवयवाचे निरनिराळे कार्य असते आणि त्याचप्रमाणे त्यांचे एकमेकांशी सहकार्य वा पूरक कार्य असते. जसे हाताने वस्तू तोंडात जाते, दातांनी तिचे बारीक तुकडे होतात व पोटांत सोडले जाते. पुढे त्याच वस्तूवर निरनिराळ्या अवयवामध्ये निरनिराळ्या क्रिया होऊन, त्यामधली असलेली शक्ती काढून घेणे व आपल्या शरीराला त्याचा उपयोग करुन घेणे, ही थोडक्यात होणारी घटना. ह्या प्रक्रीयेमध्ये जर का कोठेही अडथळा निर्माण झाला, तर त्याचा परिणाम त्या त्या प्रमाणात संपूर्ण शरीरावर  होतो.

स्कूटरमध्ये देखील ऑईल आणि करंट मिळणे ह्या अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रीया आहेत.  त्याविणा दुचाकी चालूच शकणार नाही. परंतू स्कूटरचे सीट, लाईटस् एवढेच काय ब्रेक्स इत्यादी भाग हे वाहनाची अत्यंत सोय निर्माण करणारे, परंतू काही कारणाने त्यात बिघाड झाला तर वाहन चालू तर शकते. फक्त गैरसोय मान्य करुन. यांत  हात,  पाय, डोळे, कान, दात इत्यादी अवयव म्हटल्यास अशाच यादीमध्ये जावू शकतात. शरिराला त्याच्या व्यवस्थीत कार्य पद्धतीमध्ये अशा अवयवाचा सहभाग असतो, परंतू त्यांच्या शिवाय देखील माणसाला आपले आयुष्य व्यवस्थीत जगता येते. म्हणूनच आंधळे, बहीरे, लंगडे इत्यादी बरीच अभागी माणसे देखील त्यांचे व्यंग बाजूला ठेवून जीवनाच्या इतर सर्व बाबींमध्ये रस घेताना, आनंद घेताना दिसतात. दुर्दैवाने कांही वेळा शरीरात व्याधी निर्माण होतात. त्यावेळी एखाद्या कार्यांत होणाऱ्या बिघाडाविषयी केवळ खंत करीत बसू नका. त्या वेगळ्या परिस्थितीत जीवन कसे सुसह्य बनविता येईल हे बघा. मधूमेह झाला व त्यासाठी डॉक्टरांनी साखर वर्ज केली अथवा रक्त दाब म्हणून मीठ सोडण्याचा जर सल्ला दिला. हे सल्ले शास्त्रीय व वैद्यकीय दृष्टीने योग्य असतील. ते केवळ मान्य करुनच नव्हे तर अशा सूचनांना मनांत एवढे पक्के केले पाहिजे की ते तुमच्या जीवनांचे एक अंगच बनले पाहिजे. त्या गैरसोयीच्या अनुषंगाने जीवन व्यथीत करण्याचा निश्चयी प्रयत्न करा.

कोणतेही मशीन पाहीजे तर तेच उहाहरण सोईसाठी घेतो. स्कूटर ह्या पूष्कळशा कंपनीच्या आहेत. काहींना आपण चांगले मशीन म्हणतो ते मुख्यत्वेकरुन ते जास्त काळासाठी व्यवस्थीत कार्यान्वीत राहते म्हणून आणि त्यात बिघाड कमी प्रमाणात होत असतो. परंतू एक मात्र सत्य आहे की कितीही चांगले यंत्र असले तरी ठरावीक काळानंतर त्याचे कार्य कमी ५              कमी होत जाते व ते शेवटी निकामी बनते. आपले शरीर पण त्याच्या निगा राखण्यावर अवलंबून राहते व ठरविक काळानंतर ते पण जर जर होऊन निकामी होते. ज्याप्रमाणे मशीनच्या कार्यशक्तीच्या आपण नेहमी आढावा घेत जातो व त्याची ठराविक काळासाठी जर आपली गरज भागविली तर त्याच्या निकामी होण्याच्या कालक्रमणेमध्ये आपण त्याविषयी खंत बाळगीत नाही. माणसाने शरीराबद्दल देखील हीच भावना बाळगली पाहिजे व वयाप्रमाणे जेव्हा शरिर क्षीण, अशक्त वा कार्यहीन होऊ लागते, त्यावेळी त्याच्या बद्दल खंत बाळगता कामा नये. म्हणजेच जो वृधत्वाचा काळ आहे त्यामध्ये शरिर यंत्र नादुरुस्त होते, क्षीण होणे वा अवयवांचे सहकार्य न राहणे ही एक अपरिहार्य व निश्चीत होणारी घटना आहे व तीची जाणीव प्रत्येकाने मनामध्ये अतिशय खोलवर रुजवावयास हवी. तेव्हाच शरीराबद्दल निराशा न वाटता त्याच्या विकलांगपणाला सामोरे जाण्याचा प्रयत्न करण्याची मानसिक तयारी केली गेली पाहिजे.

मशीनच्या ना दुरुस्त होण्याचे पण सर्व साधारण काही ठओकताळे दिसून येतात. ते थोडेसे विचार करण्याजोगे आहेत. उदा. स्कूटरचे ब्रेक्स,ल्पग पॉईंट, ऑईल सील, गीअर्स, एक्सेलरेटर इत्यांदीमध्ये सरासरीने जास्त बिघाड होतो. कारण स्पष्ट आहे की ह्या भागावर सतत आघांत होत असतात. त्याचप्रमाणे माणसाच्या शरिरामध्ये सांध्याचे दुखणे त्यातल्या त्यात गुढगा व ढोपर? पाठीचा कणा, संधी वात, पोटाचे विकार, अपचन, गॅस ट्रबल, पोट दुखी constipation, ….loose frequent motions ………… इत्यादी.  छातीमध्ये खोकला, थरथर कापणे, निद्रा नाश, लघवी सारखी होणे, लघवी करताना वेळ लागणे, कमी ऐकू येणे, कमी दिसणे, विसराळूपणा, दमा, अशक्तपणा, रक्तदाब आणि मधूमेह इत्यादी इत्यादी. खरे म्हणजे म्हातारपणात कोणत्याही व्याधीने त्रास होण्याची शक्यता असते. मी बऱ्याच वृध्व मंडळींना बघीतले, तपासले परंतू काही गोष्टी मनास खटकतात त्या येथे सांगतो उदा. एक वृध्द गृहस्थांना सांधे दुखण्याचा त्रास होता. त्याच्या सर्व चाचण्या व तपासणी होऊन दोन, तीन मोठमोठाले orthopedic surgeon चे वेगवेगळे घेतलेले मत आणि टिपणी बघीतली. सर्वांच्या मते त्यांना कोणता रोग जडलेला नाही. कोणतीही व्याधी जडलेली नाही.  कि ज्याला औषधपाणी देवून बरे करता येईल. सर्वानुमते ठराविक वय झाल्यानंतर  सांध्याचे अशा प्रकारचे दुखणे सुरु होते. सांध्याच्या हाडांमधील मऊपणा कमी होतो. सांध्याला वाकविणारे व जागेवर ठेवणारे स्नायू आणि लिगामेंटस अशक्त व कमकुवत होतात आणि परिणामी सांधा सारखा दुखू लागतो. ह्या व्याधीवर संपूर्ण बरे करणारा उपाय नाही. जे काही औषध दिले जाते ते तात्पुरते व व्याधीची तीव्रता फक्त कमी करणारे . परंतु दुर्दैवाने बहुतांशी वृद्ध माणसे हे सर्व समजून देखील मान्य करण्यास तयार नसतात. त्याची अशी कल्पना झालेली असते की हा रोग त्यांना जडला असून त्याचे निदान त्या डॉक्टरांना झालेले नसावे व परिणामी ते निरनिराळ्या तज्ञाच्या भेटी घेत फिरतात.

औषधामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या बदलामुळे थोडासा दिलासा मिळतो, परंतु परत येरे माझ्या मागल्या म्हणत, त्याच व्याधीनाच सहन रकीत बसाव लागते. माणसाची आशा वेडी असते व ती त्या व्याधीच्या सुटकेसाठी प्रयत्नशील असते. पण शेवटी निराशाच पदरी येणार हे अटळ असते आणि नेमके हेच ह्या गृहस्थांचे झाले. सांधेदुखी ही त्यांच्या म्हातारवयांत ही त्यांना नेहमीसाठी त्यांच्या उर्वरीत आयुष्यापर्यंत ताप देणारीच ठरणार होती व ठरली.

असेच दुसऱ्या वृधांच्या बाबतीत घडते. ज्यांना अपचन, गॅस ट्रबलचा त्रास होतो. खाल्लेले पचन करण्यासाठी पोटाच्या आतड्यामध्ये जे रस तयार होत असतात ते वयाप्रमाणे कमी कमी होत जातात. तसेच आतड्यांच्या हालचाली पण मंदावतात आणि परिणामी पोटांत घातलेले अन्न  पचण्यामध्ये अडथळे निर्माण होतात. ह्याचा शेवट म्हणजे अपचनाचा त्रास होत राहतो. हा पण काही रोग नव्हे. परंतु जी क्रिया पूर्वी तारुण्यात अतिशय वेगाने व व्यवस्थीत चालत होती ते सारे कमी होताना माणूस जाणवतो. वाटेल ते आणि वाटेल त्या

प्रकारचे घेतलेले अन्न काहीही तक्रार न होता जे पचन होत असे ते आता अगदी साधे अन्न मऊभात, दुध, ताक इत्यादी पचवताना देखील कठीण होऊ लागते आणि परिणामी वृद्ध लोक डॉक्टरांच्या दवाखाण्याच्या चकरा मारतात.  वृध्दांना जो शारिरीक त्रास होत असतो तो त्यांनी सहन करा असे मी सुचवू इच्छित नाही. परंतु त्या त्रासाकडे बघण्याचा आणि विचार करण्याचा दृष्टिकोन जर बदलला तर मात्र त्या व्याधी बऱ्याच अंशी सुसह्य होतील. तेव्हा वरिल दिलेल्या दोन उदाहरणावरुन प्रथम हे निश्चित करुन मनांत पक्के ठसवून घ्या की तुम्हाला झालेला व होत असलेला त्रास हा एखाद्या रोगामुळे नसून उतारवयामुळे आहे. ती पण एक नैसर्गिक प्रक्रियेची परिणीती आहे. कोणत्या रोगाची नव्हे म्हणजे मानसिक खंत वाटणार नाही. कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट नैसर्गिक समजतो तेव्हा ती आपण सुसह्य करुन घेतो. “वृद्धत्वपणा ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे व त्यामुळे निर्माण होणाऱ्या सर्व समस्या ह्यादेखील नैसर्गिक स्वरुपाच्या समजा.”

श्री. शिरोडकर यांना माझ्याकडे ड्रेसींग करण्यासाठी आणले होते. त्यांना हाताला फ्रॅकचर झाले होते  त्याला प्लास्टर (Plaster) केले होते. डोक्याला लागलेल्या जखमेला मलमपट्टी करण्यासाठी त्यांना आणले होते. बोलताना तेच म्हणाले, “डॉक्टर माझ वय ८० च्या जवळ आलं आहे हे तुम्हाला खरं वाटेल? पण आजही माझी प्रकृती कशी एकदम तंदुरुस्त आहे बघा. परवा मुलीकडे जाण्यासाठी म्हणून चालती बस पकडण्याचा प्रयत्न केला व तोल जावून पडलो आणि हाताचे हाड मोडले, काय गंमत आहे बघा. मी एके काळचा राष्ट्रीय Heavy weight lifting champion आणि थोड्याशा माराने हाड मोडले”

माणसांनी आपल्या पूर्व जीवनांत केलेल्या कर्तृत्वाबद्दल निश्चितच अभिमान बाळगावा. हे कुणीही मान्य करेल, परंतु कित्येकजण त्याच उत्साहाने नेहमीच जगण्याचा प्रयत्न करतात. हे चुकीचे आहे. आठवणी ताज्या ठेवणे वेगळे आणि बदलत्या परिस्थितीची जाण, पण त्यापाई विसरुन जाणे हे अयोग्य आहे. शरीर आणि मन हे दोन भिन्न आहेत. काळाच्या ओघामध्ये शरीर हे सतत बदलत जावून अशक्त होत राहते. परंतू मन मात्र नेहमीच तजेले, तरुण किंवा बालरुपी देखील होऊ शकते. मनाचा उत्साह हा सतत कायम राहू शकतो. म्हाताऱ्या माणसाला पण चॉकलेट, बिस्कीट, भजी इत्यादी खावे वाटते. त्याला पण खाण्याची तितकीच तीव्र इच्छा होते. जेवढी लहान मुलाला वा तरुणाला परंतु त्याच्या शरिरात झालेला बदल, आतड्यामध्ये आलेला अशक्तपणा हे असते. रुचकर पदार्थ पचविण्यास असमर्थ असतात आणि जर ह्याची जाण वृद्धाने न ठेवता तरुणाप्रमाणे खाण्याचा वेडेपणा केला तर त्या बळजबरीने पोटात कोंबलेल्या अन्नाचा शरीर स्वीकार करीत नाही व त्याचे अपचनाचे परिणाम त्या वृद्धाला भोगावे लागतात. त्याचप्रमाणे शरीराचे हात, पाय इत्यादी अवयव मजबूत असताना तुम्ही केलेली धावाधाव, उचलेल्या जड वस्तू किंवा उंचावर जाण्याचे केलेले विक्रम इत्यादी हालचाली काळाप्रमाणे तुमचा फक्त इतीहास म्हणून          राहतात. उतारवयातही त्याच उत्साहाने हालचाली कराव्यात असे केव्हा केव्हा वाटते. कारण ‘मन’, मन हे तसेच उत्साही असते. परंतु त्याला बळीपडून शरीराची बदललेली क्षमता विसरुन जर तुम्ही पावल उचलाल तर त्याचे विपरीत परिणाम निश्चितच होतील. श्री. शिरोडकरांची धावपळ करुन बस पकडण्याची इच्छा व त्या इच्छेला शरीराने न दिलेली साथ हेच त्यांचा तोल जावून पडण्याचे व मार लागण्याचे कारण आहे. तेव्हा प्रत्येक वृद्ध व्यक्तीने आपल्या शरिरातील झालेल्या बदलाची व आज असलेल्या क्षमतेची निश्चित जाणीव ठेवावी व त्याचप्रमाणे आपल्या सर्व हालचाली अतिशय शिस्तित आणि काळजीपूर्वक कराव्यात.   जेव्हा वय खूपच पुढे जाते तेव्हा तर अतिशय क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टी खूप मोठा शारिरीक आघात करु शकतात. उदा. झोपेमध्ये एकदम कुशी बदलणे, मोठ्याने खोकणे वा शिंकणे हे सुद्धा हाडांचे फ्रॅक्चर होण्यास कारणीभूत होऊ शकतात. तुमच्या हालचालीतील तिव्रता आणि त्याचा होणारा परिणाम ह्याचा संबंध खूपच जवळ जवळ येवू लागतो. साधी वाटणारी गोष्ट भयानक होऊ शकते. “न पचणारे चमचाभर खाद्य पदार्थ उतारवयात तुम्हास हैराणा करु शकतात” “थोडक्यात माणसांनी आपल्या पूर्व जीवनाच्या कर्तृत्वाला आठवून, विसंबून, सद्यस्थितीचा विचार न करता केलेली हीम्मत त्याच्या शरिराला हानी पोहचवू शकते.   भूतकाळामधाली प्रकृती विसरत चला व फक्त वर्तमान काळाचा विचार करा”

काळ हा अतिशय वेगाने बदलत आहे, समाजाची धारणा व ठेवण बदलत चालली आहे आणि विशेष म्हणजे ‘कौटुंबीक रचना’ ही पूर्णपणे बदलू पहात आहे. कुटूंबामधल्या व्यक्ती व्यक्तीमध्ये जे संबंध होते, जी बंधने होती, जी कर्तृत्व होती जो आदर व प्रेम होते त्यामध्ये आमुलाग्र बदल होऊ पाहत आहे. त्या सर्व बदलू पाहणाऱ्या गोष्टींना तशी सामाजीक 8            कारणे  असतील व आहेतच. परंतु ह्या ठिकाणी मी फक्त जे होत आहे त्याचा वृद्ध व्यक्तीशी होणाऱ्या परिणामाचा विचार करु इच्छितो. पूर्वी घरांत ‘आजोबा’ असणे हा अतिशय कौतूक व अभिमानाचा विषय असे. आज ते चित्र बदलत हे. आज प्रत्येक गोष्टीचे मोजमाप होत असते. ‘कुणाचा किती उपयोग हेच सूत्र लावले जाते.’ कुणाचा एके काळी किती उपयोग झाला, कुणामुळे कोण जीवनांमध्ये भरभरक्कम पायावर उभा आहे, आयुष्य बनन्यासाठी कुणाचा किती उपयोग झाला इत्यादी बरेच प्रश्न ज्यांचे स्वरुप ‘भूतकाळ’ ह्या सदरात मोडते त्यांचा विचार करण्याची कुणालाही जरुरी वाटत नाही. आज प्रत्येकाला हवा आहे ‘वर्तमान काळ’. भूतकाळाशी त्याची सांगड घालण्याचे कुणालाही प्रयोजन वाटत नाही आणि भविष्यकाळावरचा तर त्याचा विश्वासच उडाला आहे. वृद्ध हे मावळते सूर्य असून नवीन पिढी ही उगवत्या सूर्याप्रमाणे आहे आणि म्हणूनच वृद्ध लोकांनी प्रथम ह्या बदलांची जाणीव करुन घेतली पाहिजे. चार दिवस सासूचे चार दिवस सूनेचे आणि हे अधिकारांचे चक्र सदैव फिरत राहते. परंतु ह्या दोन्ही म्हणीमध्ये दोन गोष्टींची समज अतिशय पद्धतशीर दिली गेली आहे. एक म्हणजे अधीकार हा प्रत्येकाला मिळणार व दुसरे म्हणजे त्याला मिळालेल्या अधीकाराच्या मर्यादेचा काळ हा देखील ठराविकच असणार. हे महान तत्व आहे. परंतु संघर्ष            तेव्हा होतो जेव्हा मनुष्य  हा त्या काळाच्या मर्यादा विसरतो (Time Limit)  आणि आपल्या शक्ती युक्तीने जास्त काळपर्यंत आपल्या अधिकाराच्या कक्षा वाढविण्याचा प्रयत्न करतो. नव्या पिढीचा मागून येणाऱ्या व्यक्तींचा येथेच वैचारिक खटका उडण्याची शक्यता होते. शेवटी परिणाम हे वृद्धालाच भोगावे लागतात. म्हणून एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची सांगावी वाटते की प्रत्येत वृद्ध व्यक्तीने हे पूर्ण जाणून घ्यावे आणि मान्य करीत मनावर बिंबवावे की “मला नशीबाने मिळालेला कर्तृत्वाचा आणि अधिकाराचा काळ हा आता संपला आहे.” तुम्हाला जे मिळाल ते तुम्ही तुमच्या शक्ती, बुद्धीनुसार उपभोगाल, किती योग्य मिळवल किती गमावल ह्याचाच आता ताळेबंद करण्याच तुमच्या हाती उरत. तुमच्या उतार वयाप्रमाणे त्यात आता खूपसा फरक होणार नाही. तेव्हा आपल उर्वरित आयुष्य मर्यादीत करुन जगणं हेच आता बाकी राहते.    तुम्ही काही काळ अधीपत्य केलं आता इतरांना संधी घ्या.

जीवनाच्या प्रत्येक दिवसाचे जर विश्लेषन केले तर असे दिसून येते की, प्रत्यक दिवस हा आपल्यापरिने अगदीच वेगळा असतो. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी ह्या अगदी भिन्न असतात. आपण जर आपलेच जीवन बघीतले तर ते कितीतरी वेगवेगळ्या अनुभवाने भरलेले दिसून येते. मला काल आलेला अनुभवाचा उपयोग आजच्या अनुभवाला होईलच हे सांगता येत नाही. किंबहुना प्रत्येक अनुभव नवीनच काहीतरी शिकवून जातो. अर्थात पूर्वीच्या अनुभवाने माणूस थोडासा दक्ष होऊ शकतो एवढेच. परंतु माझा पूर्वीचा अनुभव मला नविन वातावरणात यश देईल याची खात्री सांगता येत नाही. आणि विशेषत: जेव्हा सभोवतालची परिस्थिती अतिशय वेगाने जर बदलत चालली असेल. तर मग पूर्वीच्या अनुभवाला

निश्चितच मर्यादा पडतात. हा एक विचार आहे आणि ते एक सत्य आहे. म्हातारी माणसे ही अनुभव संपन्न असतात. त्यांच्या दीर्घ आयुष्यामध्ये त्यांना नानातऱ्हेचे अनुभव आलेले असतात आणि जीवनातील यश अपयश त्यांनी स्वत: जाणले असतात. त्यांना त्यांच्या मागून येणाऱ्या पिढी बद्दल प्रेम व आदर असतो आणि म्हणून त्यांना जे वाईट अनुभव आलेले असतात त्याचा आधार घेवून ते तरुणांना उपदेश करण्याचा प्रयत्न करतात. तसे म्हटले तर हा प्रयत्न स्तुत्य आहे. परंतु मी वर सांगितल्याप्रमाणे ह्या वृद्धाला आलेला अनुभव त्याच्या मुलाला तसाच येईल ह्याची शक्यता सांगता येत नाही. कदाचित काही वेगळे व चांगले पण उत्पन्न होऊ शकते. म्हाताऱ्या माणसांनी एखादवेळी मार्गदर्शन करणे, क्वचित प्रसंगी सूचना देणे निराळे परंतु दिसून मात्र असे येते की म्हातारी माणसे आपल्या अनुभवाचा आणि वयाचा अधिकार सुप्तरितीने जागवून तरुण वर्गाला प्रत्येक बाबतीत उपदेश वा सल्ला देण्याचा प्रयत्न करतात आणि ते तरुण व वृद्ध ह्या दोघांसाठी अयोग्य आहे. ह्या त्यांच्या वागण्याने दोघांत एक प्रकारची दरी निर्माण होते. आणि वैचारिक संघर्ष निर्माण होतो. जर वास्तविकत: मी म्हटल्या प्रमाणे तुमचाच पूर्वीचा अनुभव तुम्हालाच पुढच्या आयुष्यात फार मदत करित नाही तर तुमच्या आणि केवळ स्वत:ला आलेल्या एखाद्या परिस्थीतीमधील

अनुभवावरुन तुमच्या मागे येणाऱ्यावर वैचारिक बंधने कशासाठी शिवाय काळ किती झपाट्याने बदलतो याची दखल तुम्हास घ्यावीच लागेल.तुमच्या अनुभवाचा सल्ला तुम्हाला जर विचारलेच तर घ्या. विनाकारण आणि सदैव उपदेशाचे ढोस इतरांना पाजू नका. क्वचित प्रसंगी काळजी घेत जा सांभाळून रहा इत्यादी प्रेमाने सांगा तुमचा आदर राहील. तुमच्याविषयी काय ह्यांची कटकट ही भावना राहणार नाही.

वृद्धकाळामध्ये होणारे शारिरीक त्रास हे प्रत्येकाचे निरनिराळे असू शकतात. कुणाला दम्याचा त्रास, कुणाला अपचनाचे विकार, कुणास चढउतार करताना सांधे दुखणे, चक्कर येणे इत्यादी इत्यादी आणि त्यांच्या ह्या विकारांनी त्यांना एकप्रकारे जायबंदी केले जाते. त्यांच्या शारिरीक हालचालींना मर्यादा पडतात. प्रत्येक म्हाताऱ्या माणसांनी आपल्यामध्ये निर्माण होत असलेला विकार चांगल्या तऱ्हेने जाणून घ्यावा. जेवढा प्रयत्न करुन तो कमी करण्याचा मार्ग सुरवातीस केला जातो. पण नंतर औषध पाण्याच्या मर्यादा संपतात. एकदा त्या विकाराबद्दल निश्चीत विश्लेषण झाले की नंतर तो तुमचा एक मित्रच आहे हे मानावयास हवे आणि त्या त्या विकाराप्रमाणे जीवन जगण्याचे अगदी वैयक्तीक तंत्र निर्माण करावे. त्याच्या अनुषंगाने मार्ग आखावा. उदा. तुम्हाला दम्याचा विकार आहे. सर्व डॉक्टर सांगतात की हा त्रास पित्तामुळे (Allergic in nature) होतो आणि तुमच्या शरीराला नको असलेल्या वस्तूंचा संपर्क आला तर तुमच्यामध्ये ह्या विकाराचे लक्षण सुरु होतात वस्तू ह्या असंख्य आहेत परंतु त्यातील एखाद दुसरी वस्तूच तुमच्या शरीराला सहन न होणारी असू शकेल आणि ती नेमकी कोणती असेल ही शोधून काढणे अत्यंत कठीण काम आहे. परंतु नेमक प्रत्येक दम्याच्या

रुग्णाबद्दल घडत ते वेगळच आणि ह्यात रोग्याचा जेवढा सहभाग असतो ह्यापेक्षा डॉक्टरांचे ठराविक पद्धतीचे मार्ग दर्शन हेही कारणीभूत होत असते. काही पदार्थ हे पित्त (Allergy) करण्यास कारणीभूत असतात आणि त्याची एक यादी डॉक्टराकडून रुग्णास मिळते. हे सेवन करु नका, हे वापरु नका, हे टाळा, ते करा अशी एक मोठीच यादी डॉक्टर लोक ठराविक ठशाने त्याला देतात. रुग्ण हे सारे इमानइतबारे मान्य करुन खाण्यापिण्यामधल्या बऱ्याच गोष्टी वर्ज करतो वा इतर गोष्टींचा संपर्क टाळतो. त्यात आणखी भर पडते. ती त्याच्या मित्र मंडळींची जो तो आपला स्वतंत्र अनुभव सांगून ‘मी हे टाळले मी हे वर्ज केले तेव्हा मला आता बरे वाटते’ हे विविध लोकांचे सल्ले ह्या वृद्ध दमेकरी व्यक्तीच्या मनावर परिणाम करीत असतात. त्याला सर्व प्रथम त्याच्या स्वत:च्या त्रासातून सूटका हवी असते. आणि तो सर्वाचे थोडेफार मान्य करतो. परिणामी त्याच्यावरच्या बंधनाची यादी बरीच मोठी होऊन तो आपल्या खाण्यापिण्याच्या व इतर वस्तूसंपर्कांना बरीच मोठी मर्यादा घालतो. असे मी बरेच रोगी बघीतले आहेत. पण आश्चर्यांची गोष्ट म्हणजे आख्या शारिरीक त्रासामध्ये थोडासा देखील फरक झालेला नसतो. तसेच डॉक्टरांच्या विविध चाचण्या घेण्याचे प्रकार दोन तीनशे लशींची चाचणी होऊन खरे म्हणजे हाती काही लागत नाही. वेळ व पैसा मात्र वाया जातो.

ह्या साऱ्या ‘रामायणा’ मध्ये फक्त दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे तुम्ही वृद्ध आहात व तुमची प्रतिकार शक्ती ही मर्यादेमध्ये राहीली आहे आणि दुसरे म्हणजे तुम्हाला दम्याचा (पित्ताचा, Allergic in nature) जो विकार आहे तो मी वर सांगीतल्याप्रमाणे एखाद्या विशीष्ट वस्तूमुळेच जास्त नाही. परंतु लोक सांगतात, मी दुध घेत नाही, अंडी खात नाही, केळी खात नाही, दही नाही, थंड वस्तू नाही, हे नाही ते नाही इत्यादी. हे सर्वस्वी चुकीचे आहे. जर रुग्णाला स्वत: निश्चित अनुभवले की एखाद्या ठराविक वस्तूमुळेच त्याला त्रास झाला वा होतो तर तेवढीच गोष्ट वर्ज करणे तत्त्वाला धरुन आहे. पण केवळ कल्पनने वस्तू विनाकारण वर्ज करणे एकदम चुकीचे आहे.  थोडक्यात तुमच्या शरीराला जे भावते, पचते, सहन होते. ह्या विषयी तुम्हालाच तुमचे वैद्य बनून बारकाईने स्वत:हाच्या शरिराबद्दल अभ्यासपूर्वक रुपरेखा आखावी लागेल. मर्यादीत व पद्धतशीर जीवन जगण्याचे तंत्र ठरवावे लागेल.

श्री. देशपांडे माझे कौटुंबीक रुग्ण. एकदा त्यांचे नवे घर बघण्याची संधी मिळाली. बरेच दिवसापासून घरी या असे त्यांचे आमंत्रण होतेच. परंतु काहीना काही कारणांमुळे जाणे झाले नाही. अचानक एकदा त्यांच्याच सोसायटीमध्ये एका रुग्णास बघण्यासाठी गेलो. तेव्हा त्याचवेळी श्री. देशपांडे यांच्याकडे गेलो. दरवाज्यावर ए छोटीशी पाटी होती ‘स.गो. देशपांडे’ बेल वाजविताच थोड्यावेळाने स्वत: देशपांडे आले व त्यांनी दार उघडले. अतीशय प्रेमाणे व अगत्याने माझे स्वागत केले गेल. घरात त्यावेळी ते व त्यांच्या सौ. दोघच होते.

एक दिड तास गप्पा मारण्यात वेळ मजेत गेला. अतिशय मन मोकळेपणाने ते मज बरोबर बोलत होते. त्यांनी आपल्या जीवनातील काही गोष्टी इतक्या व्यवस्थीत सांगितल्या की त्यावर मी बराच काळपर्यंत नंतर विचार करीत राहिलो. एक सत्य, एक कौटुंबीक समस्या त्यांनी मजसमोर चित्रीत केली. काही मुद्दे हे मनाला पटणारे नव्हते परंतु जेव्हा शांतचित्ताने, बदललेल्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता त्यांच्या प्रत्यक बाबीवर मला मान्यता द्यावी लागली. हा विचार श्री. देशपांडे ह्याच्या वैयक्तीक जीवनाचा नव्हता तर त्यांच्या समस्येवरुन हा सद्य स्थितीतील कौटुंबीक आणि त्यातही वृद्धत्वामधील स्थितीला चालणा देणारा विचार होता. त्यांच्या चर्चेतील त्यांचेच विचार :“एका चाळीमधल्या दोन छोट्या खोल्यांमध्ये माझं सार जीवन गेलं. बालपणापासून नोकरीच्या निवृती काळापर्यंत त्याच घरात आयुष्य गेलं. सारी सुख दु:खे बघीतली. शिक्षण, नोकरी, संसार आणि मुले ह्या जीवनामधल्या महत्त्वाच्या पायऱ्या. ह्याच घरी राहून चढून गेलो. अतिशय सुखी व समाधानी, सर्वसाधारण जीवन जगलो. मध्यम वर्गीय कुटुंब आणि त्याचप्रमाणे प्रपंच केला. जेवढं मिळवणं शक्य आहे ते मिळवल व  जेवढे कष्ट करावयास हेव ते केले. फक्त एक गोष्ट नोकरीला लागल्यापासून व लग्न झाल्यापासून नेहमी मनात येत असे आणि ती म्हणजे स्वत:ची एखादी वास्तू असावी. आपण आपल्या पैशानी, कष्टाच्या कमाईने             छोटे का होइना एखादा फ्लॅट असावा. चाळीच्या जीवनाला कंटाळलो नव्हतो. त्यातला आनंद काही वेगळाच. परंतु ते घर मला वडीलांकडून वडीलोपार्जित असल्यामुळे मिळाले. मला आपले स्वत:चे घर असावे ही इच्छा मनांत खोलवर होती. इच्छा आणि परिस्थिती ह्याच्या झगड्यात इच्छेलाच हार खावी लागत असे आणि परिस्थिती जेव्हा मान्यता देईल. तेव्हा बघू हे सात्वनपर तत्त्वज्ञआन मनाशी बांधून मी शांत होऊन बसे.’नोकरी निवृत्ती मिळाली. बराचसा पैसा एकदम हाती आला. नोकरीच्या काळामधली बँकेमधली साठवण पण माझ्या इच्छेला मदत करण्यासाठी सरसावली. तरीही फ्लॅटसाठी बरीच रक्कम उभारणे जरुररीचे होते. खूप विचार केला आणि चाळीमधले घर काढून टाकले. परिस्थितीला सर्व आघाड्यावरुन हल्ला केला गेला. तिला पण कदाचित मजवर दया आली असावी आणि ती नमली. इच्छेला जबरदस्त चालना मिळाली. इच्छेचा विजय झाला. जीवनामध्ये जे कष्ट करुन मिळविले ते एकत्र केले आणि सारी आयुष्याची पूंजी घालून हा तीन खोल्यांचा, स्वतंत्र, सर्व सुविधांनी युक्त असा फ्लॅट खरेदी केला. जेव्हा हे घर माझ्या नावाने झाले त्यावेळी मी केवढी आनंदी होतो हे शब्दाने व्यक्त करणे केवळ अशक्य होते. तो दिवस मला आजही आठवतो. ज्या दिवशी मी माझ्या नावाची पाटी ‘स.गो. देशपांडे’ ही स्वत:च  बाहेर दारावर लावली. एक अत्यंत मोठी इच्छा, क ध्येय मी मिळवले याचा अभिमान वाटू लागला. हे घर माझ आहे आणि आस्मादिक स.गो.देशपांडे हे मालक आहेत. परंतु हा माझा आनंद फारच थोडा काळ टिकला. सभोवतालच्या परिस्थितीने आणि जीवनातल्या चाकोरीने मला हे दाखून दिले की मी काल जो निर्णय घेतला तो संपूर्ण चूक होता. एका निराशामय

वातावरणाची छाया जीवनावर परसरु लागली. स्वतंत्र घराची कल्पना चांगली होती. आजही माझे जीवन तसे आनंदी आहे. परंतू घराच्या स्वातंत्र्याने माझे वैयक्तीक स्वातंत्र्य नष्ट केले होते. आज घराचा मालक मी आहे परंतु माझ्या खिशात एक रुपया पण नाही. बँक रिकामी, नोकरी नाही, विचित्र परिस्थिती होऊन बसली आहे. सार माझ असून देखील मला अतिशय छोट्याशा गोष्टीसाठी मुलाकडे वा सूनेकडे हात पुढे करावा लागतो. माझा आदर आहे. मी जे मागील ते मला चटकन व सर्वकाही त्वरीत मिळते. ह्यात शंका नाही. पंरतु असे पूर्वीच्या जीवनात केव्हाच घडले नव्हते त्यामुळे पैसे मागणे ही बाबचमुळी मला बैचेन करते. नातीला खावूसाठी, कपड्यासाठी मी पैशाची याचना करावी ही निराशा करणारी गोष्ट नव्हे का? ह्या तर अतिशय क्षुल्लक घटना आहेत. उद्या जर दुखले, खूपले, शारिरीक त्रास झाला तर सारे कसे निभावून नेणार? आज प्रखरतेने जाणीव होऊ लागली की वृद्धकाळासाठी कमीत कमी जीवनाला आवश्यक पैसा हा हाती असणे हे किती जरुरी आहे.

जीवनामध्ये प्रत्यक गोष्टींची गरज त्यात्या काळात तीव्रतेने भासते. माणसाच्या आवडी-निवडी, समाधान, आनंद इत्यादी कल्पना ठराविक वयातच महत्त्व निर्माण करतात. प्रत्येकानी त्यासाठी योग्यवेळीच प्रयत्न करावा व ते मिळवावे परंतू जर काही परस्थितीमुळे 1                शक्य झाले नाही तर काळाचा विचार करुन, आपल्या हाती असलेल्या साधनाचा व आयुष्याचा विचार करुन इच्छेला वेगळा मार्ग द्यावा. नोकरीच्या प्रारंभीच्या काळात जास्त कष्ट करुन, बँक अथवा गृहनिर्माण संस्थाकडून कर्ज घेवून फ्लॅट घेतला असता ते सोईचे झाले असते. हलके हलके हफ्ते भरुन काही काळाने मला माझे घर मिळवता आले असते. पंरतू घराचा विचार तडीला लावण्याचा निर्णय व क्रिया ह्या अवेळी झाल्या व आज हाती काहीच राहिले नाही. आज तरी मला त्या घराची तितकी गरज भासेनासी झाली. अर्थात हे सत्य आहे की हे घर माझ्या मुलासाठी असेल. परंतु आज मला जो आंतरीक परकेपणाचा व अवलंबून राहण्याचा भाव डोक्यात येत राहतो त्याचे काय? जसे ६० वर्षे त्या चाळीत राहिलो तसाच उरलेला आयुष्याचा भाग मी आनंदात चालू ठेवू शकलो नसतो का? हाती पैसा असता व त्याचे मानसिक समाधान निश्चितच अवर्निय आहे. कुणीही काहीही ह्या जगातून जाताना आपल्या बरोबर नेत नसतो. तेव्हा तुम्ही जे कमविले ते कालांतरानंतर तुमच्यात मुलांना वा सख्यातील व्यक्तींना मिळणार आहे. एके काळी ही एक जबरदस्त मानसिक धारणा होती की हे सारे मी माझ्या मुलांसाठी करतो. परंतू आता काळाची गती परिस्थितीचे लक्ष्य वेगळेच होत चालले आहे. आजही हे वाक्य सत्य आहे की सर्व काही मुलांसाठी परंतू माझ्या उरल्या सरल्या आयुष्याची सांगता झाल्या नंतरच एकत्र कुटुंब पद्धती लोप पावू लागली आहे आणि असंख्य संसारीक प्रश्नाच्या चक्रात व्यक्ती व्यक्तीला एकमेकांकडे लक्ष्य देण्यास काळजी घेण्यास अथवा देखभाल करण्यास खरोखरच वेळ काढणे अवघड होत आहे. कुणी जाणून  बुजून दुर्लक्ष करतो अशातला भाग नसतो. परिणामी ‘तुमचे तुम्ही बघून घ्या’ असा कठोर भासणारा परंतू सत्य परिस्थितीवर आधारीत मार्ग केवळ वृद्धासाठी उरतो.                            शेवटचे १० – १५ वर्षे जर मानाने व स्वतंत्र विचाराने जगावयाचे असतील तर हाती पैसा हा पैसा ह्याच रुपाने तुमच्या जवळ असावा, एक मोठी मालमत्ता म्हणून नव्हे.

तुमचे वृद्ध काळातले जीवन चागले व समाधानी जाण्यासाठी, गरज असते ती प्रथम शारीरिक सुद्दढतेची. मनाच्या आनंदाचा विचार हा तरी दुय्यमच असेल. तरी सारे कांही तुमच्या धडपडीच्या जीवन कालखंडात याची योजनाबद्ध आखणी केलेली असावी. जे जीवनरेषा जाणीत आयुषाची वाटचाल करतात, त्याना सुकर आयुष्य लाभते. दुर द्दष्टी हीच हसत खेळत म्हातारपण घालविण्याचा मार्ग असेल.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail – bknagapurkar@gmail.com

आत्याआजी

 आत्याआजी

                     ९४ वर्षे आयुष्य लाभलेली आत्याआजी नुकतीच वारली. चांगली प्रकृती, सुदृढ बांधा, अत्यंत कष्ट करणारी ती होती. ती उठते केंव्हा, झोपते केंव्हा, हे मला केव्हांच दिसले नव्हते. फक्त ती सतत कोणते ना कोणते घरकाम करण्यांत व्यस्त असायची. तीच्या कष्टामध्ये तीला व्यस्त राहण्याची कला साध्य झाली होती. मृत्यु आपल्या हाती नाही, म्हणून जगणे व जगावयाचे म्हणजे कष्ट करणे हे तीचे समिकरण होते. तसे तीचे आपले स्वतःचे कुणीही नव्हते. न मुलबाळ. नवरा तर ३०-३१ वर्षापुर्वीच वारला. काळ जबरदस्त धक्का तीच्या जीवनाला देत पुढे पुढे चालला होता. कट्टर सनातनी घराणे. तीला काळानुसार केशवपन करावे लागले होते. फक्त दोन लाल रंगाची लुगडी, तेवढीच तीची संपत्ती. व कष्ट करण्यास चांगली प्रकृती.

आत्याआजी आमच्या घरी असलेली, मी माझ्या बालवयापासून बघत आलो होतो. एक विचीत्र गुंतागुंतीची भावना, अनेक प्रश्न तीच्या विषयी माझ्या मनांत डोकावत. मलाच त्याची उत्तरे शोधावयाची होती. आणि तशी योग्य संधी मला मिळाली. मी वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केला व शासकीय नोकरींत गेलो होतो. एक दिवस-

‘ आत्या आजी तुला एक प्रश्न विचारुं कां ‘?  ती ‘हो ‘ म्हणाली.

‘तुला मुलबाळ, अपत्ये झालीच नाहीत ?  की तुझी मुले जगली नाहींत ‘?

ती मजकडे बघून हासू लागली. कारण मी डॉक्टर होतो. व एक वेगळाच अलिखीत व्यवसायीक आधिकार प्राप्त होता.

‘खर सांगु तुला. ते आमच्या लग्नानंतर, माझ्या सहवासांत ४० वर्षापेक्षा जास्त काळ होते. परंतु माझा त्यांच्याशी केंव्हांच संसार झाला नाही. ‘

मी तीचे असे शब्द ऐकून अवाक झालो. भयंकर अचंबा वाटला.   ‘ काय म्हणतेस तू हे आत्याआजी. ?  अण्णा आजोबाशी तुझा केंव्हाच संसार झाला नाही ?  तु तुझे सारे जीवन संसार सुखाच्या अनुभवाशिवाय घालविलेस ? ‘

ती पुनः हासू लागली.    ‘ अरे कसले संसारीक सुख. विवाहमधला सर्वांत महत्वाचा धागा असतो. तो संसार सुखाच्या त्रिकोणचा. हा  लैंगिकता, प्रेम, व आकर्षण ह्या भावनांच्या बाजूवर उभारलेला असतो. हे सारे मी फक्त ऐकत होते. कोणताही आणि कधीही त्याच्या अनुभव सुखातून जाणे झाले नाही. ‘

‘ अग आत्याआजी परंतु अशी कोणती खोट वा अडचण तुमच्या वैवाहिक जीवनांत आली. ‘  ती त्या क्षणी पुन्हा हासू लागली. ‘ ते चांगले पुरुष होते. चांगल्या मोठ्या मिशा बाळगून होते. प्रकृति दणकट व पिळदार होती. परंतु ते एकदम नपुंसक होते. त्या काळी वैद्यकिय तपासणी देखील करुन घेतली. डॉक्टरानी त्यांच्या नपुंसकतेवर शिक्कामोर्तबही केले होते. कोणतेच उपाय शक्य नव्हते. लैंगिकसंबंधामध्ये एकदम हत्बल होते. घराणे मोठे, नांवलौकीक मोठा. वंश पुढे चालावा ही सर्वांची प्रबळ ईच्छा, भले मुलगा असो वा मुलगी. प्रथम सर्वानी मलाच दोशी ठरविले. त्यांचा दुसरा विवाह करणाचा प्रयत्न चालविला. मी कोणताच विरोध केला नाही. परंतु त्यानी स्वतः ला चांगलेच व पूर्ण जाणून घेतले होते. त्यानी हा ठराव धुडकावून लावला. पाण्यांत राहून तहानलेला म्हणतात, तसे मी माझे

आयुष्य आतल्या आंत कुढत चालू ठेवले. ते माझ्यासाठी अवघड ठिकाणचे दुखणे झाले होते. फक्त वाच्यता न करता निमुटपणे सहन करणे. माझ्या कुचंबणेची कुणीही विचारपुस वा चौकशी केली नाही. ही होती त्या काळची संस्कृती व धर्माचरण. ‘

आज मला आत्याआजीची प्रखरतेने आठवण येऊ लागली होती. कारण  होते एका मासिकामधला वैद्यकिय अहवाल. जो केंद्रीय शासनाच्या Social Sciences  ह्या विभागानी २००७ साली  प्रसिद्ध केला होता. थोडे थोडके नाही, जवळ जवळ दोन कोटी लोकसंख्या असलेला हा वर्ग भारतातला. यांची शारिरीक तपासणी अहवाल सांगतो की इतकी पुरुष माणसे ” लैंगिकतेमध्ये नपुंसक ”  (Incompetent for Sexual Intercourse ) ह्या सदरांत जातात. ही प्रचंड संख्या होती. हा वर्ग लैंगिकता ह्या कार्यप्रणालीसाठी प्रकृतीने सक्षम नव्हता. त्यांची इतर शरीर प्रकृती, अंगकाठी, सर्व अवयव नॉर्मल होती. ही मंडळी बुद्धीने देखील तल्लख, समजदार, हूशार होती. मात्र त्यांच्यात लैंगिकता करण्यास

( Sexual  Intercourse  वा Transaction ) संपुर्ण अपात्रता होती. लैगिक अवयवांत ( शिश्न – Penis) उत्थापन होण्याची क्षमता नव्हती. त्यांचे आकार, रचना हे नॉर्मल नव्हते. विर्यरस उत्पत्ती  ( (Semen’s Quantity and Quality in counts ) ही देखील खुपच कमी प्रमाणात होती.

शरीर संपदा, देहयष्टी, व्यक्तीमत्व ह्यात ते नॉर्मल होते. कमी पडत नव्हते. फक्त पौरुष्य ज्याला म्हणतात त्याची त्यांच्यात उणीव होती. त्याच लेखांत त्यांची अनेक कारणमिमांसा व्यक्त केली होती. त्यांत कौटूंबिक, वडीलोपार्जीत,  Genetic, Familial,  इत्यादी गुणधर्मा बरोबर जात, धर्मपंथ, खाण्यापिण्याच्या संवयी, स्थान, वातावरण, परिस्थीती, व्यसन, सवयी, मानसिकता, कांही रोग अशा बऱ्याच गोष्टींचा उहापोह होता.

मी हा रिपोर्ट वाचून फार बेचैन झालो. Sexual incompetence and Infertility विषयी तसे वैद्यकिय अभ्यासांत बरेच वाचले होते. परंतु अहवालामधल्या संख्याशास्त्राने त्यावर वेगळाच प्रकाश पाडला. मन सुन्न झाले.

स्त्रीया वरील अत्याचार, बलात्कार, बळजबरी संभोग, ह्या मनाविरुद्धच्या भयानक गोष्टी आहेत. आजकाल त्या खूपच वाढल्या आहेत. स्त्रीला ही उपभोगाची वस्तू, ही संकल्पना समजली जाई.  परंतु त्याच वेळी स्त्रीयांवरील अत्याचाराची, एक दुसरी बाजू मज समोर आली. अनेक अनेक स्त्रीया आहेत की ज्या लैंगिक सुखापासून वंचित रहात असलेल्या दिसल्या. येथेही पुरुष प्रधानता, बळजबरी होऊन त्यांच्यावर गुलामा प्रमाणे अत्याचार मात्र होत राहतात. संसारगाडा चालविणे, घर चालविणे, कामे करणे, सारे होत राहते. फक्त लैंगिक सुख न मिळता. अनेक व्यक्ती व्यसन, दारु, गांजा, अफू, चरस, गर्द इत्यादीमध्ये सतत अडकले असतात. पैसा मुबलक. घरदार प्रशस्त. सार कांही जीवनाच्या गरजेच त्वरीत उपलब्ध. मात्र तरीही जीवनांत अंधःकार असलेला. ही माणसे लैंगिकतेमध्ये एकदम शुन्य. त्यांना कोणताच उत्साह, स्फूर्ती वा चेतना नाही. आहे मनोहर परी गमते उदास,  अशी त्या स्त्रीयांची गत होते. बघणाऱ्याला तीच्या दुःखाची खरी कल्पना येऊच शकत नसते.

कित्येक व्यक्ती लैंगिकतेमध्ये सक्षम असतात, परंतु बाहेख्याली वृत्तीचे असतात. त्यांचे लक्ष बाहेर असते. निसर्ग पुरुषांत  Sexual Intercourse  साठी शरीरांत विर्यरस ( Semen ) तयार करीत असतो. तरुणपणांत ह्याची उत्पत्ती सुरु होते.

पुढे वयवाढी प्रमाणे कमी होत जाते. ठराविक दिवसांच्या  अंतरानेच हा विर्यरस बनतो. विर्यरस व लैंगिकता याचा संबंध असतो. विर्यरस नसेल तर अवयवांत उत्तेजकता येत नसते. ही बाहेरख्याली माणसे त्यांचा विर्यरस कोटा बाहेरच गमवून बसतात. ह्यांत घरामधली हक्काची स्त्री, जीला संसारीक अधिकार प्राप्त असेल, ती वंचित राहते. तीला शरीर सुख मिळत नाही. हे एखाद्या बंदूकी प्रमाणेच असते. बंदूकीला महत्व त्याच वेळी जेंव्हा त्यांत गोळी असेल. अशी बाहेरख्याली अथवा नपुंसक माणसे ही फक्त शोभेसाठीच. एखाद्या भिंतीवर टांगलेल्या बंदूकीप्रमाणे. हे सारे न सांगता येणारे, काळानुसार लज्जेखातर स्त्रीयांनी सहन केले होते. सर्व आयुष्य बलीदान केले.

आता स्त्री आपल्या हक्काप्रित्यर्थ खुपच जाग्रुक झालेली आहे. धाडसी झालेली आहे. समजदार तर ती होतीच. आता जगाची व समोरच्याची तीला पूर्ण जाण आलेली आहे. कुणी दाद दिली नाही, तर ती हाती शस्त्रपण घेईल. आंता ती मागणार नाही, सारे खेचून घेईल.

बिचारी माझी आत्याआजी, त्या वेळच्या काळाला अर्थात परिस्थीतीला बळी गेली होती. भावनेचा कोंडमारा करीत जगली. मिठाची गुळणी तोंडात ठेऊनच आयुष्य जगत राहीली. फक्त धर्मबंधन म्हणून लादलेले ईश्वर नामस्मरण घेत.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail –  bknagapurkar@gmail.com