Monthly Archives: मे 2013

‘आनंद’ हाच भगवंत

जीवनाच्या रगाड्यातून-

‘आनंद’ हाच भगवंत

गेले सारे आयुष्य

परि न कळला ईश

इच्छा राहिली अंतर्मनीं

प्रभू भेटावा एके दिनीं   ।।

बालपणाचा काळ

करुनी अभ्यास नि खेळ

मनाची एकाग्रता

केली शरीरा करीता  ।।

तरुणपणाची उमेद

जिंकू वा मरुं ही जिद्द

करुनी प्रयत्न्यांची पराकाष्ठा

बनवी जीवनमार्ग निष्ठा   ।।

संसारातील पदार्पण

इतरासाठी समर्पण

वाढविता आपसातील भाव

जाणले इतर मनाचे ठाव  ।।

काळ येता वृद्धत्वाचा

दाखवी मार्ग अनुभवाचा

भजन पूजेत जाई वेळ

ज्ञान गोष्टी सांगे सकळ  ।।

आता झालो देह दुर्बल

प्रभू चिंतनांत जाई वेळ

वाट बघतो निरोपाची

ओढ फक्त जगदंबेची  ।।

आयुष्य संपता सारे

खंत येवून मन विचारे

कां न प्रभू भेटला ?

ह्याची रुख रुख मनाला  ।।

आत्मचिंतन करिता

जाणले मी भगवंता

ईश्वर निर्गुण निराकार

कर्म करी त्यास साकार  ।।

सत्य दया क्षमा शांती

ह्याच ईश्वराच्या शक्ती

आयुष्यातील आनंदी क्षण

हीच ईश्वरी खूण  ।।

जीवनातील समाधान

ईश्वरप्राप्तीचे लक्षण

नसावी मनी खंत

‘ आनंद ‘ हाच भगवंत  ।।

डॉ. भगवान नागापूरकर

9004079850

e-mail-  bknagapurkar@gmail.com

                                        १-२८२१८३

विवीध-अंगी     ***२८

एकदा माझ्या तोंडून शिवी बाहेर पडली, तेंव्हा मुलांने टोकलं.

शिकवल्यापैकीं फक्त चागलंच त्यानी घेतलं, हे मला जाणवलं

।। भगवान श्री गौतम बुद्घ ।।

जीवनाच्या रगाड्यातून-

।।  भगवान श्री गौतम बुद्घ  ।।

 माझे नमन बौद्धाला   सत्य अहिंसेच्या देवाला

कोहिनुर हिरा चमकला   ह्या विश्वामध्यें   ।।१।।

गौतमाचे जीवन   बौद्धाचे तत्वज्ञान

दोन्ही असती महान   उद्धरुनी नेई जगातें   ।।२।।

दाखवोनी जीवनाचे द्वार   सांगोनी आयुष्याचे सार

भटकलेल्या व्यक्तींचा आधार   बौद्ध  होई   ।।३।।

बौद्धाचे तत्वज्ञान   असे ते महान

नेई उद्धरुन   सर्व जनांना   ।।४।।

उद्धरुन जाती   जे बौद्धास जाणती

शिकवणीची महती   बौद्धाने सांगितलेल्या   ।।५।।

प्रथम सांगतो जीवन   नंतर ऐकवी शिकवण

मात्र करावे आचरण    हीच सार्थकता तुमची   ।।६।।

गौतमाचा इतिहास काव्यमय   कथा त्याची भावमय

ऐकतां मन भरुन जाय    कठीण आहे समजण्या   ।।७।।

ज्याच्यासाठीं  झगडे व्यक्ति   तीच जन्मतां त्याचे हातीं

धन सत्ता नि संपत्ति   त्याग केला सर्वस्वाचा   ।।८।।

सामान्य माणूस    सर्वस्व समजे देहास

चिंता त्याची ऐहिक सुखास   रात्रंदिनीं   ।।९।।

धनाच्या कुणी पाठीं   झगडतो कुणी सत्तेसाठीं

घालवी जीवन सुखापोटी   ऐश्वर्यास ध्येय समजोनी   ।।१०।।

गौतम मोठे नशिबवान   राजघराणीं जन्म घेऊन

लोळण घेती सत्ता नि धन   गौतमाचे जवळी   ।।११।।

कपिलवस्तु नगरी   शुद्धोधन राजा राज्य करी

प्रेम होते प्रजावरी   पुत्राप्रमाणें   ।।१२।।

केली प्रभुवर भक्ति   त्याचे आशिर्वाद मिळती

प्राप्त झाली संतती   राजा शुद्धोधनास   ।।१३।।

बाळाचे तेज दिव्य   जन्मता भासले भव्य

अपुर्व चमके भाव   त्याचे मुखावरी   ।।१४।।

कुणी संबोधती भगवान   अवतार विष्णूचा म्हणून

परी निसर्गाचे ते एक देणं   ह्यात शंका नाहीं   ।।१५।।

मानव रुप घेती   ईश्वरी शक्ती असती

ऐसे क्वचित होती   ह्या संसारी   ।।१६।।

साधू संत जमती   कांही भविष्य जाणती

आशिर्वाद बाळा देती   सर्व मिळूनी   ।।१७।।

 हस्त रेखा बघूनी   बाळा जन्मकुंडली जागोनी

विस्मित होऊनी   जाई ज्योतिषी   ।।१८।।

बाळाचे भविष्य निराळे   सामान्यांस न कळे

पंचभूताचे जाळे   असती त्याचे भवती   ।।१९।।

बाळासी मिळे अप्रतीम शक्ति   परंतु राजा न बनती

संसाराची येऊन विरक्ति   रमुन जाईल वनांत   ।।२०।।

न होई राजा नगरीचा   राजा बनेल निसर्गाचा

महाराजा तो विश्वाचा   अंतरात्म्यावर राज्य करी   ।।२१।।

जाणवेस निसर्ग सृष्टी   बाळाची असेल व्यापक द्दष्टी

न व्हावे राजा कष्टी   संकुचित् भाव सोडावा   ।।२२।।

सोडूनी स्वतःचा संसार   शिरी घेईल विश्वभार

विश्वाचा करील उद्धार   तोच एकला   ।।२३।।

राजास न पटे हे तत्व   न आवडे त्यास हे कवित्व

बाळ त्याचे जीवनसत्व   मायेपोटीं खिन्न झाला   ।।२४।।

नांव सिद्धार्थ ठेवले   उपाय मनीं योजिले

बाळासाठी संकल्प केले ठेवण्या त्यास संसारी   ।।२५।।

राजाचा भव्य महाल   ऐश्वर्याची रेलचेल

सर्वत्र सुख दिसेल   ह्याची घेई काळजी   ।।२६।।

दुःखाची छटा नको   विरक्तीचा भाव नको

एकांतवास नको   ह्याची चिंता राजाला   ।।२७।।

सुंदर बागेमधील   कोमेजलेले फुल

न पाही सिद्धार्थ मुल   ही सुचना सर्वांना   ।।२८।।

सिद्धार्थ वाढला विलासांत   जीवन ऐश्वर्य कंठीत

लग्न होऊनी पिता बनत   संसारांत रमला   ।।२९।।

उत्सव राजधानीतील   बघण्या सोहळा नगरीतील

प्रथम ठेवले पाऊल    सिद्धार्थाने प्रासादाबाहेर  ।।३०।।

आयुष्याचा तो क्षण   टाकी जीवन पलटून

विधी लिखीत अटळ असोन   कुणी न बदले त्यासी   ।।३१।।

उत्सवातील जनसागरांत   पाही एक म्हातारा नि प्रेत

दुःख दिसे जीवनांत   प्रथमच सिद्धार्थाला   ।।३२।।

माहीत नव्हते त्यासी   दुःखे असती जीवनासी

जर्जर करुनी देहासी   मृत्यु येई शेवटीं   ।।३३।।

जन्म स्थिति व लय   जीवनाचे चक्र होय

निसर्ग चालत राहाय   प्रथमची जाणले सिद्धार्थानें   ।।३४।।

सरळ मार्गी जीवनांत   विस्फोट होऊनी जात

लुप्त असलेल्या ज्ञानांत   चेतना जागृत झाली   ।।३५।।

रात्रीच्या काळोखांत   विज चमकावी आकाशांत

उजेड होई वातावरणांत    एका क्षणामध्यें   ।।३६।।

तशी ती दुःखद घटना  पेटवी सिद्धार्थाची चेतना

लहरी उठती मना   जीवनाबद्दलच्या   ।।३७।।

नविन प्रकाश पडला मनीं   राजपुत्र गेला भांबावूनी

सत्य शोधण्याची आंस ध्यानी  संकल्प त्याने केला   ।।३८।।

उत्पन्न झाली वैराग्य वृत्ती   ऐहिक सुख त्यागती

सोडूनी राज्य आणि संपत्ति   जाई निघोनी वनांत   ।।३९।।

त्याग केला पत्नीचा   सोडला मोह बाळाचा

मार्ग पत्कारी एकांताचा   जाई निघूनी अज्ञातस्थळी   ।।४०।।

हे सारे अघटित   आपण म्हणूं दैवलिखीत

परंतु हे अपूर्व होत   सामान्याचे काम नव्हे   ।।४१।।

सर्व साधारण धडपडतो   ज्याचे साठी जगतो

तेचि सिद्धार्थ लाथाडतो  ह्यासी म्हणावे असामान्य   ।।४२।।

म्हणूनची सिद्धार्थ युगपुरुष   परमेश्वरी अंश

दाखवोनी खरे आयुष्य   सुखाचा मार्ग दिला   ।।४३।।

सर्वची सोडोनी   गेला तो वनीं

एकची विचार मनी   जीवनांचे सत्य शोधणे   ।।४४।।

निसर्ग रम्य स्थळी   बौधीवृक्षाखालीं

तपः साधना केली   सिद्धार्थाने   ।।४५।।

एकाग्र करुनी मन   लावले ध्यान

केले चिंतन   अंतरात्म्याचे   ।।४६।।

अंन्तर्मुख झाला   बाह्य जगा विसरला

सत्यास शोधूं लागला   सिद्धार्थ   ।।४७।।

अंतर्मनातील सुप्त शक्ति   बिंदूप्रमाणें असती

रुप प्रचंड घेती   जागृत झाल्याने   ।।४८।।

शक्ति असे आत्मबिंदु   त्याचा होई परमात्मा सिंधु

भाव बने आनंदु   चेतना उद्दीप्त होता   ।।४९।।

राग लोभ अहंकार   मद मत्सर विकार

षडरिपूंचे रुप भयंकर   आत्मबिंदूवर वेष्टन त्यांचे   ।।५०।।

संसारातील मायाजाळ   त्याचा आत्मबिंदूभोवती गाळ

सुप्त राही ते कमळ   चिखलाच्या वेष्ठनामुळें   ।।५१।।

फुटावा लागतो अंकुर   यावे लागते पाण्यावर

तेंव्हा कमळ दिसणार   आनंदमय   ।।५२।।

नारळा बाहेरील करवंटी   आंत मधुर खोबरेवाटी

तैसी मोहमायाची जळमटी  व्यापूनी टाकी आत्मबिंदू   ।।५३।।

 मोहाचे असतां वेष्ठन   आत्म्यासी येई असुद्धपण

मोह आणि आत्मज्ञान   दोन्ही नसती एके ठिकाणी   ।।५४।.

अग्नि आणि पाणी   जाई विरुद्ध दिशेनी

तत्वे वेगवेगळी असोनी    निर्गाची   ।।५५।।

तैसेची संसारातूनी   मायाजाळ दूर करुनी

आत्मतत्वास जाणूनी   आत्मशुद्धी करावी   ।।५६।।

सिद्धार्थाचे ध्यान   काढूनी मायाजाळाचे वेष्ठन

आत्मबिंदूसी होई विलीन   ज्ञानाग्नी पेटला चित्ती   ।।५७।।

बौद्धी वृक्षाखालीं   ज्ञनगंगा मिळाली

अंतर्चेतना जागृत झाली   सिद्धार्थाची   ।।५८।।

गौतमबुद्ध संबोधले    महात्मापद मिळविले

महान तत्व शिकविले   बौद्धधर्म स्थापुनी   ।।५९।।

बौद्धाचा पाया महान   सत्य अहिंसा हे तत्वज्ञान

जाणण्याते करावे ध्यान   सार्थक करण्या जीवनाचे   ।।६०।।

                                                       ।। शुभं भवतु  ।।

 डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-   bknagapurkar@gmail.com

विवीध-अंगी     ***२७दोन कान दोन डोळे असल्याने जास्त ऐकावे आणि बघावे

जीभ मात्र एकच म्हणून मोजकेच बोलावे

 

।। श्री नृसिंह अवतारकथा ।।

जीवनाच्या रगाड्यातून-

दिनांक २३-५-२०१३ रोजी च्या श्री नृसिंह जयंती प्रित्यर्थ

।। श्री नृसिंह अवतारकथा  ।।

( भक्त प्रल्हाद )

प्रल्हादासी करितो नमन   बालक असुनी महान

अणुरेणूंत असे भगवान   दाखवूनी देई जगाला   ।।१।।

बघावी सृष्टी   ठेऊनी संत द्दष्टी

त्यासी दिसेल जगत् जेठी   सर्व ठिकाणीं   ।।२।।

प्रल्हादाचे तत्वज्ञान   प्रभुमय सारे जग् जीवन

त्यासी घ्यावे ओळखून  श्रद्धा द्दष्टीनें   ।।३।।

अपूर्व प्रभू भक्ति  उन्मत्त असूरी शक्ति

संघर्षकथा होती   भक्त  प्रल्हादाची   ।।४।।

बहूत महान वीर  प्रभुपुढे कोण टिकणार

परि प्रभूसीच वाकवणार  प्रल्हाद बालक    ।।५।।

नारद ऋषीं एके दिनीं  हिरण्यकश्यपूचे राजधानीं

पाद्यपुजा स्वीकारुनी  गेले प्रसन्न होऊनी    ।।६।।

शिवाची करावी भक्ति  मिळवावी तप शक्ति

सामर्थ्यवान ह्या जगतीं  होऊनी करावे राज्य   ।।७।।

नारद राणीस उपदेशीती  जो नारायणाचे नाम घेती

उद्धार ह्या जगती  त्याचा होत असे   ।।८।।

गर्भवती तूं राणी   भक्तिभाव ठेवतां मनीं

ईश्वर संस्कार पडूनी  बनेल बालक महान   ।।९।।

राजा उपदेश ऐकूनी  गेला तपश्चर्येस वनीं

राणी राजधानी  नारायणाचे नामस्मरण करी   ।।१०।।

करुनी तप महान  शिवासी केले प्रसन्न

वरदान घेई मागून  वाढवी आपली शक्ति   ।।११।।

असे मागीं वरदान  जेणे टळावे मरण

परि प्रभू लिला महान  कसे टाळी ब्रह्मालिखीत   ।।१२।।

पशू अथवा नर   राजगृहीं वा बाहेरी

कुणी न करी ठार   हिरण्यकश्यपूला   ।।१३।।

मृत्यु न यावा शस्त्रानीं  भय नसावे अग्नीपासूनी

टाळावे मरण बुडोनी  ही इच्छा करी राजा   ।।१४।।

दिवस असो वा रात्र   मृत्यु टाळावा मात्र

निष्प्रभ ठरावे अस्त्र    फेकता राजा वरी   ।।१५।।

शिवाचे मिळतां वरदान  राजा झाला बेभान

सामर्थ गेले वाढून   शिवकृपेमुळे   ।।१६।।

सामर्थ्यांत असे शक्ति   शक्ती ओघांत वाहती

ओघास दिशा लागती   परिणाम दिसण्या योग्य   ।।१७।।

२                            मिळतां योग्य मार्ग   होईल चांगला उपयोग

नम्रतेचा असता भाग   मिळालेल्या शक्तिमध्ये   ।।१८।।

दुरुपयोग होता शक्तिचा   दुष्परिणाम दिसेल तिचा

उद्वस्त करी जीवनाचा   केंद्र बिंदू अहंकार असतां   ।।१९।।

पावन करुनी शिववर   जागृत झाला अहंकार

मूळचा होता असूर   हिरण्यकश्यपू   ।।२०।।

गरोदरपणीं नामस्मरण   मंत्र जपूनी नारायण

महान संस्कार करुन   बाळास संगोपिले   ।।२१।।

लागला ईश्वरी ध्यास   सतत प्रल्हाद बाळास

बघे सर्वत्र प्रभूस   रात्रंदिनी   ।।२२।।

गोष्ट येता ध्यानीं   राजा गेला संतापूनी

मजविण श्रेष्ठ नाही कुणी   सांगु लागला प्रल्हाद बाळासी   ।।२३।।

मीच प्रभूचे ठायी    तुझी भक्ति अर्पावी

इच्छा नारायणाची सोडावी    ताकद देई प्रल्हादबाळा   ।।२४।।

नाम नारायणाचे   शब्द ते अंतर्मनांचे

भाव गुंतले ह्रदयाचे   प्रल्हादबाळाचे   ।।२५।।

जन्मबीजाचे संस्कार   सहजतेने न जाणार

बाह्य शक्तीचा करी अव्हेर   प्रल्हादबाळ   ।।२६।।

धमकावले प्रल्हादासी   त्यास जीवे मारण्यासी

चालू ठेवता नामस्मरणासी   नारायणाच्या   ।।२७।।

आत्मा हा अविनाशी   समर्पित झाला नारायणाशी

न देई महत्व देहाशी   प्रल्हादबाळ   ।।२८।।

सर्वत्र सोडता प्रभूवर   काळजी तोच घेणार

संशय नसावा त्याचेवर   समर्पण करते समयीं   ।।२९।।

प्रल्हादाचा हट्ट बघूनी   राजा जाई क्रोधूनी

ठार करण्या ठरवूनी   हूकुम देई प्रधाना   ।।३०।।

पर्वतावरुन लोटले   उकळत्या तेलांत ठाकले

ऐरावताच्या पायीं बांधले   सर्व प्रयत्न जाई निष्फळ   ।।३१।।

प्रभू असतां तारणधारी   कोण त्यास जीवें मारी

राजाचे प्रयत्न निष्प्रभ ठरी   परमेश्वर शक्तीपुढे   ।।३२।।

राजाचा क्रोधाग्नी पेटला   प्रश्न करी प्रल्हादाला

नारायण कोठें  दाखव ?    नाश करीन मी त्याचा   ।।३३।।

हे विश्वची प्रभूमय   अणूरेणूंत तो होय

सर्वत्र समावून जाय   हीच त्याची लीला   ।।३४।।

ईश्वर आहे महान   ब्रह्मांड त्याचा भाग असून

अंशरुपें जायीं समावून   प्रत्येक वस्तूमध्ये   ।।३५।।

महासागरातील नीर   अगणीत थेंबांचा बनणार

थेंबांत सागरी अंश असणार   हे घ्यावे समजावूनी   ।।३६।।

३                            ‘तो नाही’ ऐसे ठिकाण   न सापडेल ते शोधून

तुझ्या माझ्यांत ही तो असून   वास करीत राही   ।।३७।।

नारायण आहे सर्व ठिकाणीं   घ्यावे हे समजावूनी

हया खांबी तो बसूनी   हास्य वदन करी   ।।३८।।

प्रल्हादाचे शब्द ऐकूनी   राजा गेला चवताळूनी

जोरानें लाथ मारुनी   प्रहार केला खांबावरी   ।।३९।।

भयंकर होऊनी आवाज   कडाडून चमके वीज

हिरण्यकश्यपू न येई समज   ह्या चमत्काराची   ।।४०।।

मानव देही सिंह शिर   नखें त्याची भयंकर

गर्जना देत बाहेर   पडला खांबांतूनी   ।।४१।।

रुप आक्रळ विक्राळ   जणु भासला महाकाळ

घाबरुनी सोडी सकळ   ओढूनी घेई असुराला   ।।४२।।

सायंकाळचे समयीं   भयंकर रुप घेई

हिरण्यकश्यपूस मारण्या येई   नारायण   ।।४३।।

बसूनी उंचावरी   घेऊन राजास मांडीवरी

नखानी पोट चिरी   नृसिंह   ।।४४।।

वचनाचे करुन पालन   वरदानाचा ठेऊन मान

नृसिंह आवतार घेवून  ठार करी राजाला   ।।४५।।

डोळे मिटूनी नामस्मरण  ऐकूनी प्रल्हादाचे भजन

प्रसन्न होई नारायण  दर्शन देई विष्णूरुपे   ।।४६।।

प्रल्हाद झाला पावन   प्रभूचे नामस्मरण करुन

भक्तीचा विजय होऊन   अहंकारासी केले नष्ट   ।।४७।।

।।  शुभं भवतु  ।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-   bknagapurkar@gmail.com

विवीध-अंगी     ***२६

जीवनाचे मुल्य मृत्युच्या छायेत जास्त जाणवते

परंतु मृत्युचे सत्य हे जीवनाच्या मायेत विसरते

* ‘ भूमिका ‘ – – – आजोबांची !

जीवनाच्या रगाड्यातून-

*  ‘ भूमिका  ‘  – – – आजोबांची !

 आज घरातील वातावरण खूप तापलेले होते. नातवांनी खूप मस्ती केली होती. आरडा- ओरडी, झोंबा- झोंबी, मारा- माऱ्या सारे झाले.  क्रिकेट चेंडू  फेकणे घरातच झाले. फ्रेम पडली व फुटली. हे सारे बालवयातील त्यांना आनंद व मजा  देणारे, परंतु इतरांना वैताग आणणारे होते. सुटीचा दिवस तेंव्हा घरी त्यांचे आई बाबा दोघेही होते. सहन शक्तीचा अंत बघणारे झाले, तेंव्हा बाबा उठले, रागावले, थोडीशी शिक्षा पण केली. त्यांचे सारे खेळ बंद केले.

” आज कोठेही बाहेर बागेत जायचे नाही.”  हीच शिक्षा, बाबा ओरडले.

रोज संध्याकाळी मी फिरावयास जात असे. कधी कधी नातव बरोबर येत असत. मी कपडे घालून निघालो. लहान पाच वर्षाचा नातू, पळत आला व मला बिलगला.

” आजोबा मला पण यायचं आहे बागेत तुमच्या बरोबर.”  मजसाठी ती हृदयद्रावक घटना होती. त्यांना आज बाहेर बागेत जाण्याची बंदी घालण्यात आलेली होती. आजोबा म्हणजे बाबांचे बाबा. सर्वात मोठे. हा विश्वास व अपेक्षा घेऊन नातू धावत बिलगला.  मुलांना फक्त येथपर्यंतच थोडस गणित समजत होत. वय अधिकार आणि भूमिका हेच  ते गणित. वयाबद्दल खूपस कळलेल होत. मोठे म्हणजे सर्व आधिकार असलेली व्यक्ती, ही त्यांची समाज. भूमिका ही संकल्पनाच  त्यांना माहित नव्हती. जीवनाच्या त्रिकोण मधली महत्वाची बाजू. वय आणि आधिकार ह्या जर दोन बाजू असतील, तर त्या त्रिकोणाचा पाया ” भूमिका ”  असते.  व्यक्तीच्या संपूर्ण जीवनामध्ये ह्या तिन्हीही बाबी महत्वाच्या असतात. ह्या मानवी सामाजिक व कौटुंबिक संकल्पना होत. वयाप्रमाणे व्यक्तीवर बंधने, कर्तव्ये, आणि त्याप्रमाणे मिळणारे अधिकार आपोआपच मिळत राहतात. ह्यामधून निर्माण होती, ती भूमिकांची साखळी. ती त्याला तशीच वठवावी लागते. त्या भूमिका असतात- बाल वय, विद्यर्थी, तारुण्य, प्रौढत्व, आणि जीवनाच्या अनुभवाचे गाठोडे बांधीत,  शेवटी येते ते जेष्टत्व. जसे वय निघून जाते, त्याच वेळी त्या त्या वयाची कर्तव्ये व अधिकार, ही देखील निघून जातात. भूमिका बदलत जातात. जेष्टाच्या भूमिकेत असते, ते फक्त बघणे, जे समोर घडत आहे ते. ऐकणे जे ऐकू  येईल तेवढेच.  मात्र न बोलणे.  सर्वात  महत्वाचे  म्हणजे जे होत आहे, ते चांगल्याकरिता  व  चांगलेच होत आहे, ही मानसिकता बाळगणे. आणि हीच भूमिका वठवणे. त्यातच मनाची शांतता लाभेल.

प्रेमाचा आलेला कढ, आणि किंचित पाणावलेले डोळे, ह्यांना रोखीत,

मी नातवाच्या डोक्यावरून  हात फिरवीत म्हटले

” तुझ्या बाबाना विचारून,  मज बरोबर बागेत चल. “

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-   bknagapurkar@gmail.com

विवीध-अंगी     ***२५एकसष्टीनंतर जीवनातील प्रमुख बाबींची प्रश्नावली मुलांच्या हाती द्यावी

ती कशी सोडवतात, त्याकडे सजगतेने नजर ठेवावी

 

स्त्री ईश्वराची एक अप्रतिम कलाकृती

जीवनाच्या रगाड्यातून-

स्त्री ईश्वराची एक अप्रतिम कलाकृती

 

**  मादी व नर ह्यांत फक्त मादीचीच खऱ्या अर्थाने योजना केलेली. तीला जीवन चक्रासाठी मातृत्व दिले.  नराची संकल्पना नंतरची. एक सहाय्यक, मदतनीस, रक्षक, ह्या भूमिकेंमध्ये

**  मातृत्वाला अनुसरुन वात्सल्य, जीव्हाळा, प्रेम, माया, करुणा, त्याग वृत्ती, संसारीक कौटूंबीक ओढ दिली

**  जगदंबा सर्व श्रेष्ठ देवता. तीची तीन रुपे. शक्ती, धन, ज्ञान. हे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती,  ह्यांच्या प्रतीकात्मक रुपाने दिसते.  जीवनाची त्रीकोणात्मक  रचना व्यक्त करणारी.

**  जन्मताच स्त्रीची सर्वांगीन ताकत जास्त असते. जीवनाच्या प्रत्येक पाऊलावर हे सिद्ध झालेले आहे की तीच्यात प्रचंड क्षमता व उरक शक्ती असते. बौद्धीक, शारीरिक, मानसिक शक्तीमध्ये तीचा वरचढपणा स्पष्ट झालेला आहे.ज्या वेळी संधी मिळाली, तीने आपली योग्यता सिद्ध  केली आहे.

**  स्त्रीचे मात्रत्व ह्याचा पुरुषांनी गैर फायदा घेतला. तीला दुय्यम स्थान दिले. तीला अबला केले अशक्त ठरविले. गरजेच्या चक्रांत अडकलेल्या स्त्रीला गुलाम बनविले. आत्याचार झाले. भोग वस्तू म्हणून तीची संभावना झाली. तीला सौंदर्याचे प्रतिक बनवून शोभेची वस्तू समजले गेले.

**  स्त्री आपले सौंदर्य हेच हत्यार समजू लागली. त्यांत ती फसली. पुरुषाना आकृर्षित करणे ह्यातच तीला मोठेपणा वाटू लागला. सौंदर्य, मादकता ह्या गैरसमजात ती राहीली. ह्याच कारणाने  ताला सतत दुय्यम स्थान मिळत गेले. आपल्या अंगच्या गुणाना ती विसरु लागली.

मत्सर, राग इर्षा ह्या गुणाना ती जवळ करु लागली.

**   ज्या ज्या वेळी व्यासपिठ मिळत गेले त्या त्या वेळी तीने आपल्या कर्तव्याची, महानतेची झलक दाखविलीच. महान स्त्रीया प्रत्येक क्षेत्रात चमकल्या. जसे राजकारण, विज्ञान, शिक्षण, अर्थक्षेत्र, अध्यात्म, तत्वज्ञान, गिर्यारोहन, सैनिकी, अशा अनेक क्षेत्रांत त्यानी आपले कर्तव्य सिद्ध केलेले आहे.

**  समानतेच्या विचारांत ती  आजकाल प्रत्येक क्षणी कौटूंबीक आधार न मान्य करता राजश्रय अर्थात कायदे , कानून, ह्यांत गुंतली आहे. कायद्यानी तीला खूपच संरक्षण दिले असले तरी प्रत्येक वेळा ती ते शस्त्र विनाकारण पारजीत आहे. त्यामुळे एक प्रकारचा कौटूंबीक कलह निर्माण होत असल्याचे चित्र दिसू लागलेले आहे.

**   अनेक वर्षांची सहन केलेली दुय्यम जागा दुर्दैवी होती. परंतु ती तो बदल इतका शिघ्र करु इच्छीते , जे घातक ठरेल. तीच्यात सुडबुद्धीची भावना  येत असल्याची जाणीव होणे हे योग्य नाही. सारे चित्र मैत्रीपूर्ण बदलने जरुरीचे आहे. त्यासाठी घैर्य व धिरता असावी हे वाटते.

डॉ. भगवान नागापूरकर

9004079850

e-mail –    bknagapurkar@ gmail.com

विवीध-अंगी     ***२४विचार मंथन करतां निघते रत्न भांडार शब्दांचे

दुजास भावे तें त्याच क्षणीं असतां सारे अनुभवाचे

 

* असुरक्षीत जीवन

जीवनाच्या रगाड्यातून-

असुरक्षीत जीवन

आज कुणाच काय भरवसा

रडते जीवन ढसाढसा    // धृ //

प्रेम दिसेना जगांत कोठे

ह्रदया मधले सरले साठे

ओढ कुणाची कुणा न वाटे

ओरड करुनी कंठ न दाटे

सुकुनी गेला घसा

रडते जीवन ढसाढसा  – – – १

बाप ना भाऊ इथे कुणाचा

लोप पावला कढ रक्ताचा

मायमाउली सहज विसरते

काळ तिचा तो नऊ मासाचा

फुटला नात्याचा आरसा

रडते जीवन ढसाढसा – – – 2

सुरक्षतेचे कवच दिसेना

शब्दावरी विश्वास बसेना

दुर्मिळ झाली त्याग भावना

कदर कुणाची कुणी करेना

इथे लागतो केवळ पैसा

रडते जीवन ढसाढसा – – – ३

डॉ. भगवान नागापूरकर

9004079850

e-mail-   bknagapurkar@gmail.com

विवीध-अंगी     ***२३

सुर्यग्रहणाच्या वेळी त्याचे रुप चंद्राप्रमाणे भासले

आणि तो चंद्राचा भाऊच आहे हे जगाला समजले.

* युगपुरुषाचे दर्शन

जीवनाच्या रगाड्यातून-

युगपुरुषाचे दर्शन

१९५५ सालचा प्रसंग आठवतो. औरंगाबादला मी शासकीय महाविद्यालयात इंटरला ( आजच्या बारावीला ) शिकत होतो. त्यावेळी तेथे दोनच महाविद्यालये होती. दुसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सिद्धार्थ महाविद्यालय  ( ज्याचे नामकरण नंतर  मिलिंद महाविद्यालय  असे बाबासाहेबानीच केले होते.)     डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी  बरेच ऐकले होते. ते एक महामानव, युगपुरुष, असल्याचे कळले. ( त्यावेळी त्यांना भारतरत्न म्हणून संबोधित केले नव्हते.) अशा ह्या थोर पुरुषाला बघवे, दुरून का होईना दर्शन घ्यावे, ही मनांत तीव्र इच्छा होती. परंतु त्यांच्या दिव्य भव्य आणि  महानते पासून माझ्या सारख्या सामान्य विद्यार्थ्यापर्यंतचे  अंतर इतके प्रचंड होते, की त्यांचे केवळ दर्शन मिळणे, ही देखील एक अशक्य गोष्ट होती.

सिद्धार्थ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन होते. कळले की त्या कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर  आवर्जून उपस्थित राहणार आहेत. मी त्यांना बघण्यासाठी त्या महाविद्यालयात गेलो. एक भव्य  सभागृह भरू लागले. दरवाजावर वा इतर जागी त्याच कॉलेजचे विद्यार्थी सर्व समुदायाला मार्गदर्शन करून योग्य त्या जागेवर बसण्यास मदत करीत होते. त्याच विद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापकवर्ग, कर्मचारी आणि निमंत्रित यांनाच आत प्रवेश मिळत होता. माझ्याकडे न पास, न मी त्या कॉलेजचा विद्यर्थी. कार्यक्रम  बघण्यात मला तसा फारसा रस नव्हता.  फक्त बघायचे होते ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना. हॉलच्याबाहेरून मी हेरु लागलो. कार्यक्रम हॉलच्या शेजारी एक मोठी खोली होती. तेथेच सोफ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर बसल्याचे कळले. परंतु स्वयंसेवकाच्या  गराड्यात तेथे जाणे शक्यच नव्हते.

काय घडले कुणास माहित.  परंतु माझी आंतरिक ईच्छा इतकी प्रबळ झाली, की मी होऊ शकणाऱ्या भावी परिणामाचा विचार त्या क्षणी न करता, अतिशय  चपळतेने त्या खोलीत शिरलो. मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर   ह्यांच्या समोर अगदी जवळ गेलो. माझ्या पाठोपाठ दोन स्वयंसेवक  पटकन आत धावून आले. एक विचित्र परिस्थिती. एकाने मला रोखण्यासाठी हात पकडला. समोरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर  असल्यामुळे,  त्याने आपला संताप न दाखवता,  प्रेमाने पाठीवरून  हात फिरवला. व बाहेर जाण्यास सुचविले.     ( माझी त्यावेळी चांगलीच धुलाई झाली असती.)

मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बघीतले. मी पटकन म्हटले

” सर मी शासकीय  विद्यालयाचा विद्यार्थी असल्या कारणाने,  मला  आपल्या कार्यक्रमाला  प्रवेश दिला जात नाही. ”  बाबासाहेबानी क्षणभर मजकडे बघीतले. किंचितसे हास्य केले. ते स्वयंसेवकला म्हणाले

” ह्याला कार्यक्रमाला  प्रवेश द्या. हा माझा  पाहुणा आहे.”  बस! त्यांचा  आशिर्वाद मिळताच वातावरण एकदम बदलल्याचे मला जाणवले.  मला विद्यार्थ्याच्या समूहामध्ये चांगली जागा मिळाली. संमेलनाचा आनंद काही वेगळाच होता. मी काय बघितले, काय ऐकले, ह्यापेक्षा मला काय मीळालेहेच महत्वाचे! हाच तो अविस्मरणीय ऐतिहासिक क्षणपरमपूज बाबासाहेबांचा…. त्या युग पुरुषाचा क्षणिक सहवास.  जीवनामधील सोनेरी क्षण  

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-   bknagapurkar@gmail.com

विवीध-अंगी     ***२२खाणे, पिणे, मौज करणे ह्यातच आयुष्य संपून जातं

कोठून आलो व कोठे जाणार हे समजायच मात्र राहून जातं