Monthly Archives: जून 2012

श्री विठ्ठल अवतार

श्री विठ्ठल अवतार

श्री विठ्ठलाचे चरणीं   विनम्र होऊनी

     दर्शन घेई मागुनी    मी तुझा भक्त   १

पुंडलीकास देई दर्शन    नसूनी भक्ती तव चरण

सेवा माता-पित्यांची करुनी    तुजसी पावन केले   २

सेवा आई-वडीलांची करीसी    परी प्रभू पावन झालासी

ही भक्तिची रित कैसी    समज न येई कुणा   ३

तपाचे मार्ग वेगवेगळे    सर्व प्रभू चरणी मिळे

हे कुणास न कळे    प्रभूविना   ४

असोत ती गुरुसेवा    माता पिता वा मानव सेवा

कुणी करी प्राणी सेवा    अर्पण होई प्रभूते   ५

कुणी करती मुर्तीपुजा    कुणी पाही निसर्गांत मजा

प्रभूसी नको भाव दुजा    मनोभावाविना   ६

सत्य आणि तपशक्ती    प्रभूस वाकवती

पाहून पुंडलीक भक्ती    धाऊन आले पांडूरंग   ७

माता पित्याची सेवा    हाच भक्तीचा ठेवा

ती भक्ती खेचती देवा    दर्शन देण्या भक्ताना   ८

मातापिता सेवेचे प्रतीक     मिळोनी धन्य होई पुंडलीक

विश्वाचे उदाहरण एक    प्राप्त करण्या प्रभुसी

भक्तपुंडलीक   कथा त्याची रंजक

होई जीवन सार्थक    करुनी अचरणांत   १०

पुंडलीक होता विलासी    लक्ष्य त्याचे बायकोपाशीं

सर्वस्व समजे धनासी    सुख मिळण्या देहाला   ११

एके दिनी नारदमुनी    गेले उपदेश करुनी

महती आईबापाची पटवूनी    पुंडलीकास   १२

झाली पुंडलीका उपरती    केल्या कर्माचे दुःख होती

पश्चाताप मनी येती    भाव भरले प्रेमाचे   १३

अंधःकार भयाण    जाई दुर होऊन

                                  मिळता एक किरण   प्रकाशाचा   १४

गुरुकडून मार्ग मिळे    ज्ञान झाले आगळे

     भक्तीसेवा ही शक्ती कळे   पुंडलीकासी   १५

मातापित्याची सेवा   हाची पुंडलीकाचा मेवा

सारे जीवन खर्ची पडावा    ही त्याची इच्छा   १६

स्वतःसी गेला विसरुनी    आईबापाची काळजी करुनी

सर्वस्व अर्पिले रात्रंदिनीं    मातापित्यासाठीं   १७

सेवा हेची तप    न लागे नामाचा जप

श्रद्धाभाव आपोआप    यावेमनामध्यें   १८

प्रभू भक्तिचा भुकेला   जातां तप फळाला

दर्शन देई पुंडलीकाला   विठ्ठल रुप घेऊनी    १९

तल्लीन होऊनी सेवा करी   आईबाप झोपतां मांडीवरी

त्याक्षणी पांडूरंग आले दारी    पुंडलीकांच्या   २०

पांडूरंगाचे रुप बघूनी   अश्रुधारा आल्या नयनीं

भावनावश होऊनी   नमन केले प्रभूला   २१

हलविली नाही मांडी   आईवडीलांची निद्रा न मोडी

मनी प्रभुच्या स्वागताची गोडी   पुंडलीकांस पडली   २२

समोर उभे परमात्मारुप   मांडीवरी आईवडीलांची झोप

निद्रामोडता होईल ताप   खंत याची पुंडलीकास   २३

विट घेतली हातीं   विठ्ठलासमोर टाकती

उभे राहण्यास विनविती   विनंम्र होऊनी   २४

क्षमा मागती प्रभूसी    कसे उठवूं आईबांबासी

दुःख त्याचे मनासी    झोप मोडता येई   २५

आई वडील इच्छा करी   जाण्या चंद्रभागेतीरीं

विठ्ठला उभाकरुनी विटेवरी   नदीकाठी गेला पुंडलीक    २६

माता पिताना घेऊन गेला  चंद्रभागेकाठी रमला

विसरुनी जाई विठ्ठला    पुंडलीक २७

पुंडलीक विनंती करी   उभे रहावे विटेवरीं

परतोनी येई तो  चंद्रभागेवरुनी   २८

कर कटेवरी   उभें विटेवरी

लक्ष्य वाटेवरी    पुंडलीकाच्या   २९

आईवडील भक्ती पोटीं   रमला त्यांच्या पाठी

विसरला जगत् जेठीं     पुंडलीक ३०

आजही जाता पंढरपूरीं   विठोबाचे दर्शन करी

दिसेल तो उभा विटेवरी   रुख्मिणीसंगे वाट बघत   ३१

सुर्यचंद्र आकाशी   अथांग तारे नभाशी

येऊन जाती रात्रंदिवशी    हेच चक्र निसर्गाचे   ३२

ऋतु नियमीत येती   मार्ग ते ना बदलती

हीच असे निसर्ग महती   प्रभूशक्तीमुळे   ३३

निसर्गाची नियमितता    हीच त्याची श्रेष्ठता

प्रभूचे अस्तित्व जाणतां   त्या ठिकाणी   ३४

जेव्हां अघटीत घटणा होई   प्रभू त्यांत भाग घेई

तें चक्रची सुरु होई    नियमित रुपे   ३५

भक्तासी पावन झाला   पंढरपूरी प्रभू अवतरला

आषाढी एकादशीला    दर्शन देई पुंडलीका    ३६

ही झाली अपूर्व घटना   परी विचार येई मनां

सुरु होईल नवीन निसर्ग रचना   प्रभूचे अगमन होण्याची   ३७

होता प्रभूचे अवतरण   शक्यता त्याची पुनरागमन

होईल निसर्ग नियमन   हीच महती तिर्थाची    ३८

त्याच स्थळी प्रतिवर्षी    प्रभू अवतरेल त्याच दिवशी

भावना बाळगुनी उराशीं   लाखो जमती वारकरी   ३९

ही निसर्ग किमया    प्रभू अवतरेल जाणूनिया

प्राप्त होईल त्याची दया   ही भावना उराशीं   ४०

चंद्रभागातीरीं पंढरपूर    जैसे काशी गंगातीर

वारकऱ्यांचे माहेर   भक्तांचा जमे मेळा   ४१

विठ्ठल रुखमाई मंदीरीं   दर्शन घेई वारकरी

     तैसैचि पूजा पुंडलीकापरी   भक्त प्रभूसी भजती   ४२

।। शुभं भवतु ।।

 डॉ.भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

आषाढी एकादशीयात्रा- एक विचार.

आषाढी एकादशीयात्रा- एक विचार.

आषाढी एकादशी. पंढरपूरची एक भव्य दिव्य यात्रा. पावसाळ्याची सुरवात. कदाचित् त्यावेळी मुसळघार पाऊस पडण्याची शक्यता असते. त्या वातावरणांत दिवस काढण्याची, राहण्याची अत्यंत गैरसोय, सर्वत्र ओलावा असतो. कॉलरा हगवण ह्या रोगांच्या फैलावाची भिती. सर्व कांही भयावह आणि निराशजनक परिस्थिती. तरी देखील ह्या सर्व बाबिना तोंड देत, प्रचंड जनसागर कोणत्याही परिणामाची तमा न बाळगता पंढरपूरला जमा होतो. केवळ त्या विठोबाचे दर्शन घेण्यासाठी.

काय मिळते त्याना शरीराला एवढे कष्ट देवून ?. आणि कित्येक भक्तगण असे आहेत की जे त्या पंढरपूरची वारी दर वर्षी न चुकता करतात. हे केवळ मानसिक समाघान आहे कां ? कां ह्याला अंधश्रद्धा म्हणतां येईल ? विठोवा कोण ?, परमेश्वर कोण ? भक्ती म्हणजे काय ?, कशाने काय प्राप्त होते ?, असे एक नाही असंख्य प्रश्न आज तागायत अनुत्तरीत राहीलेले आहेत. ज्याला जसे ज्ञान प्राप्त झाले, जसे वातावरण मिळाले, त्या परिस्थितीप्रमाणे तो प्रश्नांची उकल करीत गेला. अनेक विचार परंतु एक वाक्यता केंव्हांच झाली नाही. विज्ञानाच्या शोध बुद्धिने इंद्रियांना जे कळले, काहींनी त्याला महत्व दिले.  तर कल्पनेच्या विचारांच्या झेपेमुळे सत्य काय असू शकेल, त्या अज्ञात शक्तींच्या अस्तित्वाला कांहीनी महत्व दिले. गम्मत म्हणजे ज्याचा शोध घेणे, ह्यात प्रगती करण्यापेक्षा, तथाकथीत विचरवंतच आपसांत संघर्ष करताना दिसतात.

माझ्या समोर आज तरी एक प्रश्न आला. जो मी वर व्यक्त केला. कां इतक्या प्रचंड संखेने लोक पंढरपूरला यात्रेसाठी जमा होतात. पंढरपूरलाच नव्हे तर कोणत्याही घार्मिक स्थळ यात्रेला, कुंभमेळाला लोक भक्तीभावाने जमतात. पन्नास, शंभर लोक संख्या असेल तर कदाचित अंधश्रद्धा हे नाव देवून स्वतःचे भावनिक सांतवन केलेही असते. परंतु जेंव्हा संख्या लाखोच्या घरांत जाते, तेंव्हा आश्चर्य व कौतूक पण वाटू लागते. कित्येक उच्च शिक्षित, वैज्ञानिक दृष्टीकोण बाळगणारे, विद्वान मंडळी यामध्ये सहभागी होताना दिसतात. कांही तरी या मध्ये सत्य असेल, प्रेरणा असेल, जी इतक्या समुदायाला खेचून घेते.

पुंडलीक आणि विठ्ठोबाची जी घटना घडली, त्याचा मी गांभिऱ्याने विचार करु लागलो. निसर्गाचा सहभाग आणि मानवी योजना ह्यांत काय असतील ह्याची उकल करण्याचा प्रयत्न केला. सारे कांही घडत असते ते निसर्गाच्या नियमाना धरुनच.

निसर्गाच्या तीन गुणधर्म वा नियममांचा मी विचार केला.

१ निसर्ग सदा सर्वकाळ निश्चीत व सत्य स्वरुपांत असतो. ( Nature is always regular )

२ निसर्गाचा मार्ग नेहमी चक्रमय ठरलेला असतो. म्हणूनच आपण जीवनाला जीवन चक्र म्हणतो. चक्र याचा अर्थ नैसर्गिक अविष्कार वा घटना घडतात, व त्याची पुनरावृत्ती होत राहते. जे घडले ते पुन्हा घडणे ही किमया ह्या निसर्ग चक्रामुळेच साधली जाते. ( Nature repeats itself )

3   अत्यंत महत्वाचा गुणधर्म निसर्गांत दिसून येतो, तो म्हणजे नैसर्गिक चमत्कार .

Miracle by Nature

काय अर्थ याचा  ?  केव्हां केव्हां निसर्ग- चाकोरीमध्ये अशी एखादी घटना घडते की त्याचा शोध बोध कदाचित् त्या झालेल्या क्षणी होत नसतो. सामान्यजन त्या घटनेला आश्चर्य समजतात. चमत्कार समजतात. दिव्यता भव्यता समजतात. परमेश्वराची अमर्याद शक्तीच हे करु शकते हे ठरवितात. थोडक्यांत चमत्कार आणि नमस्कार हे समिकरण जन्माला येवूं लागते. ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल निश्चीतता येवू लागते. इत्यादी इत्यादी. परंतु एक मात्र सत्य दिसून येते ते म्हणजे निसर्ग एखाद्या घटनेमधून चमत्काराचे दर्शन घडवित असतो.

पौरानीक कथांचे ग्रंथ वाचताना भक्त पुंडलीकाची कथा वाचीत होतो. पुंडलीक एक महान व्यक्तीमत्व. एका प्रेरणेने भारुन गेलेले. आपल्या जन्मदात्या

आई-वडीलाना आपल्या जीवनाचे सर्वस्व मानणारा. त्यांची सेवा हेच जीवनाचे ध्येय असल्याची जाणीव समजणारा. ईश्वरी अस्तीत्वाला देखील त्याने माता पित्याच्या समोर दुय्यम स्थान दिले होते.  कित्येक वर्षे त्याची माता पिता सेवा चालू होती. जीवनातील सर्वस्व त्यागुन फक्त आईवडील सेवा हे वृत त्याने धारण केले होते. त्याचे हे श्रम व प्रेम एवढे महान होवू तागले की ते ईश्वरी दरबारांत मान्यता प्राप्त होऊ लागले. ईश्वर नेहमी चांगल्या गुणांची सदैव दखल घेत असतो. हा अध्यात्मिक इतिहास आहे. सती सावित्रीची पतीभक्ती व सेवा ह्यानी देखील ईश्वराला झुकावेंच लागले. त्यांनी फक्त एक लक्ष्य केंद्रित केले होते. पुंडलीकाने केवळ माता-पिता सेवा-भक्ती वा सती सावित्रीने पती सेवा भक्ती. हेच त्यांचे सामर्थ्य परमेश्वराच्या प्रसन्नतेत झाले.

पुंडलीकाची माता पिता सेवाभक्ती यानी प्रेरीत होऊन परमेश्वराने त्याला श्री विठ्ठलाच्या रुपांत दर्शन देऊन धन्य केले. पुंडलीकाचे ह्रदय मन भरुन आले. त्याने सविनय नमस्कार केला.परंतु हाच त्याच्या भक्तीच्या कसोटीचा क्षण होता. ज्या क्षणी पांडूरंगाने पुंडलीकास दर्शन दिले, त्यावेळी पंढरपूर नजीक चंद्रभागेच्यातीरी, त्याचे आईवडील त्याच्या मांडीचा आसरा घेत झोपले होते. समोर उभा प्रत्यक्ष परमेश्वर श्री विठ्ठल आणि मांडीवर निद्रेत आईवडील. तो त्यांची झोप मोडू शकत नव्हता. शेवटी पुंडलीकाने विठ्ठलाला नमस्कार करीत, जवळ असलेली एक विट त्याच्या पुढ्यांत टाकून व त्याला त्यावर उभे राह्यण्याची विनंती केली. आईवडीलांची झोप चाळवली गेली. ते जागे झाले. त्याना ईश्वरी दर्शन होणे शक्यच नव्हते. कारण त्यांच्यात ते दिव्य सामर्थ्य नव्हते. त्यानी जाग येताच स्नानाला जाण्याची इच्छा व्यक्त केली. पुंडलीकाने त्यांना मान देवून तो त्यांना चंद्रभागेतीरी घेऊन गेला. जाताना त्या परमात्म्याला श्री विठ्ठलाला विनंती केली की त्याने त्याच विटेवर उभे राहून पुंडलीक येण्याची वाट बघावी. तो आईवडीलांना स्नान घालून परत येईल.

आजतागायत आठ्ठाविस युगे झालेली आहेत. श्री विठ्ठल आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून, त्याच महान आईबाप सेवक भक्ताची  पुंडलीकाची वाट बघत आहे. त्याच्या वाटेवर लागलेले विठ्ठलाचे डोळे आजही आम्ही सर्व बघून ईश्वर दर्शनाचा आनंद लुटतो. लाखो लाखोच्या संखेने तेथे जमा होतो.

निसर्गाचे वर वर्णन केलेले तीन नियम  आणि पुंडलीक-विठ्ठलाची  पौरानिक कथा याची कांही सांगड असेल कां ?  हा विचार डोकाऊ लागला. एक चमत्कार झाला. एक आश्चर्य सर्वानी बघीतले, जाणले, अनुभवले. ईश्वर स्वरुप तर बघण्याची भव्यता कुणातच असण्याची शक्यता नव्हती. ती फक्त पुंडलीकातच होती. तोच ते भव्य दिव्य बघू शकत होता. परंतु त्या वेळच्या, त्या सभोवतालच्या अनेकांना फक्त त्या ईश्वरी चमत्कारांची चाहूल लागली असेल. एक प्रकाश, एक शितल आल्हादकारक वातावरण, बेहोष करणारा दरवळणारा सुगंध, एक उत्साहाची चैतन्याची लाट, समाधान शांतता यांच्या लहरी, हे सर्व त्या ईश्वर आगमन प्रसंगी एक झलक नितांत आनंद म्हणून झाले असेल. ज्याचे शब्दानी कुणालाही वर्णन करता येणार नाही. अशी वातावरण निर्मिती त्या क्षणी निर्माण झाली असावी. हा अनुभव कल्पनातीत व अप्रतीम असावा. पुंडलीकाने तो बघीतला, भोगला. इतरांनी कदाचित् त्यांचा संवाद, संपर्क, हाच एखादा नैसर्गिक चमत्कार वाटला असावा. जो की तो अनुभव इतर जन केंव्हाच विसरु शकणार नव्हते. क्षण शांत झाला, परंतु तो अनुभव कुणाच्याने सोडविना.

कालचक्राप्रमाणे वर्ष सरता, पुन्हा लोक त्याच ठिकाणी, त्याच वेळी जमा झाले. चाचपडत राहीले. शोध घेत राहीले. कारण जर तो आनंद चेतनामय चमत्कारी विलक्षण अनुभवी क्षण नैसर्गिक असेल, तर निसर्ग चक्रानुसार तो पुन्हा बरसेल. पुन्हा मिळेल. ह्या आशेत. त्याच जागी त्याच वेळी जो पुंडलीकावर बरसला.  तसा कदाचित् पुन्हा बरसेल. प्रत्येकजण त्या नितांत आनंदाचा  Ecstasy of Joy  चा एक साक्षिदार, भागीदार, होऊ इच्छितो. त्याच्या दयेचा एखादा शिंतोडा कदाचित् आपल्याही अंगावर पडेल ह्या अपेक्षेने. त्याच भावनेने लाखोंच्या संखेने जमतात. त्याच स्थळी म्हणजे पंढरपूरला  त्याच वेळी म्हणजे आषाढी एकादशीला, ज्या काळी पुंडलिकाला विठ्ठोबानी दर्शन दिले असेल. सर्व भक्त शोध बोध घेत असतात.

निसर्गाच्या  नियमित, चक्रमय, आणि पुनुरावृत्ती ह्या गुणधर्मच्या शोधांत. आम्ही सर्वजण तेथे जमतो. तो निश्चीत बरसेल आणि तो बरसतो देखील. जो तो आपले नशिब अजमावतो. कुणावर तो बरसला असेल हे समजण्यास आजतरी मार्ग वा साधन नाहीत.

हेच त्या स्थळाचे ( पंढरपूर ) व वेळेचे ( आषाढी एकादशी ) महात्म्य असेल कां  ? अशाच अनेक धार्मिक यात्रांच्या, कुंभमेळाच्या मागे दडलेली कारणमिमांसा व नैसर्गिक चक्ररचना कारणीभूत असू शकेल कां ?

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

* बागेतल्या तारका

बागेतल्या तारका

बागेमधला निसर्ग सारा          टिपत होतो मी

रात्र पडुनी चंद्र आकाशी          बाग झाली रिकामी      १

बाकावरती बसून एकटा          मोजत होतो तारे

लुकलुकणारा प्रकाश तो            अंक चुकवी सारे         २

अगणित बघुनी  संख्यावारती     प्रसन्न झाले मन

किती वेळ तो निघुनी गेला        राहिले नाही भान      ३

शितलेतेच्या  वातावरणी           शांत झोप लागली

नयन उघडता बघितले मी      पहाट ती झाली            ४

गेल्या निघून सर्व तारका       आकाशाला सोडूनी

शोधू लागले नयन माझे         त्यांना सर्व दिशांनी         ५

चकित झालो फुले बघुनि मी      सुंदर फुललेली

सुचवित होती मिश्कील्तेने          का तारकांच खाली ?    ६

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

* अंगठ्याचा ठसा

* अंगठ्याचा ठसा

गावाकडील एक प्रसंग. बँकेमध्ये  पेसे काढण्यासाठी गेलो होतो. खुर्चीवर बसून पैसे काढण्याचा फॉर्म भरू लागलो. एक खेडूत बाई, नौवारी लुगडे व कपाळावर मोठे कुंकू, माझ्या जवळ येवून विनऊ लागली. “माझा फॉर्म भरून देता का?” “किती रुपये काढायचे आहेत?” मी विचारले. “पंचवीस हजार रुपये काढायचे आहेत.”  मी थोडेसे आश्चर्याने तिच्याकडे बघितले.   त्या बाईंचा पेहेराव, अशिक्षितपणाची  झलक आणि बोलण्यातील गावान्ढालपण ह्याची माझ्यामनावर त्या बाई  विषयी प्रथमदर्शनी जी प्रतिमा निर्माण  झाली होती, त्याला केवळ त्या आकड्याने धक्का बसला. मी तिचा फार्म घेत पासबुक मागितले. अपडेटेड  असलेले  पास बुक  बघून  मी पुन्हा आवक झालो. त्यात थोडे थोडके पैसे नसून पांच लाख पेक्षा जास्त रक्कम होती. क्षणभर स्वताहाच्या समजा  बद्दल आणि परिस्थितिच्या अव्लोकित सामर्थ्या बद्दल थोडिशी  खंत वाटली. जास्त चौकाशी न करता, मी तिचा पैसे  काढण्याचा फार्म भरुण  दिला. तिला स्वक्षारी करण्यास संगीतले. ती  चटकन पुढे आली. वा तिने अपल्या दाव्या हाताचा अंगठा पुढे केला  “ मल लिव्हन एत नाही.  मी नेहमी डाव्या  हाताच्या  अंगठ्याचा ठसाच् देत असते.”  ती सहज  म्हणाली..

“अग मावशे तुझी कामालच  आहे.  तुझ्या पासबुकात भरपूर पैसे आहेत. तुला लिहिता वाचता  एत नाही. तू अंगठ्याचा ठसा देतेस. कुणीतरी फसवील याची भीती वाटत नाही का?”  मी गंमत  म्हणून विचारले. हा ती मिश्कील्तेने म्हणाली, “ अहो सहीसारखी सही करून माणस  फसवितात कि. साह्यान धोका होऊ शकतो.  परंतु अंगठ्याच्या ठशाला नाही. माणस माणसालाच फासावितील परंतु माणूस देवाला फसवू शकेल का? साऱ्या जगात माझ्या हाताच्या अंगठ्यावानी दुसरा अंगठा कोठे मिळेल? हा अंगठा देवाची ठेव आहे. त्याच्या सारखा दुसरा मिळणार नाही. लोक लबाडी करतात ती साह्याची आणि लिखापढीची. मला कोण फसणार? “

एक नैसर्गिक सत्य. महान तत्वज्ञान. तिच्या तथाकथित अशिक्षीत मुखातून   माझ्या तथाकथित सुशक्षित डोक्यावर आदळले जात असल्याच्या भास होऊ लागला.  समाज गैरसमज ह्याची दरी कोणत्या दिशेने रुंदावत जाते. ह्याचे माणसाला भान राहत नाही.  आजच्या आधुनिक युगाने   आणि संगणकासारख्या इलेक्ट्रोनिक माध्यमांनी सुध्या  ओळख  माण्यतेसाठी अंगठ्याचा  ठसा हाच एकमेव प्रभावी साधन असल्याचे मान्य केले आहे. त्याच्या समोर अंक, शब्द, खुणा, प्रतिमा, इत्यादी दुयमच ठरतात. त्या अनामिक अशिक्षित परंतु अनुभव संपन्न मावशीला अभिवादन करून मी घरी आलो.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

* गायीचे प्रेम

* गायीचे प्रेम

रस्त्याच्या वळणावर एका झाडाखाली एक गाय शांत उभी होती.  फक्त मानेची व शेपटीची  हालचाल अधून मधून चालू होती.  कितीतरी वेळ ती तशीच उभी होती. जाणारा  येणारा तिच्या कपाळाला, शिंगाला व  अंगाला  हात लावून तिला नमस्कार करू बघत  होता. डोळे मिटून शांत विश्रांती घेत असालेल्या   त्या गायीला,  प्रत्येकाचा स्पर्श होत असल्याची जाणीव, तिच्या किंचितशा हालचालीवरून दिसून येत होती. तिला त्यांच्या स्पर्शाबद्दल काय वाटत असावे,  हे समजण्यास मार्ग नव्हाता. परंतु प्रत्येक वाटसरूला तिला स्पर्श करून,   जणू तेहतीस  कोटी देवांचे  दर्शन घेतल्याचा आनंद झाल्याचे दिसून येत होते.

तेहतीस कोटी देवांचे दर्शन घेण्यासाठी, कुणालाच कसलेही श्रम व मेहनत घ्यावी लागत नव्हती.  ती गाय, जिच्यात तेहतीस कोटी देवांचे अस्तित्व असल्याची भावना, जणू दर्शन देण्यासाठीच  येणाऱ्या जाणाऱ्याच्या वाटेवर उभी होती. प्रत्येकजण दर्शन घेवून  स्वतःचे समाधान आपल्याच कृतीत शोधात होता.

एक दहा वर्षाचा मुलगा हातात पिशवी घेवून तेथे आला. त्याने पिशवीतून प्रथम एक मोठा ब्रेड काढला. गाईचे लक्ष जातच ती त्याचावर झेपावली.  अतिशय अधाशीपणे तिने तो सर्व ब्रेड क्षणात  खावून टाकला. मुलगा बघतच होता. गायीला हात लावून तो निघून गेला.  गाय हलके हलके वळून दूर जाण्याऱ्या त्या अनामिक मुलाला बघत होती. तिच्या डोळ्यातून बाहेर पडनार्या  नजरेमधून तेहतीस कोटी देवांचे आशीर्वाद दिले जात असल्याचा संकेत स्पष्टपणे जाणवत होता.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

व्यसनासक्ति विषयी !

व्यसनासक्ति विषयी !

दारु, बिडी-सिगार, अफू, गांजा, त्यांचा राजा गर्द !

लत लागतां, कित्येक संसार, त्याने केले सारे बरबाद

अजगराच्या विळख्याहूनी, महाभयंकर सत्य

एक नव्हे, अनेक सारे, नष्ट होतील त्यांत

होत आहे उध्वस्त आमची, तरुण ही मंडळी

नशेच्या ह्या चक्रामध्ये, गुंतली जी सगळी

जाणूनी घ्या त्या शत्रुला, छुपा रुस्तूम तो

प्रवेश एकदा शरिरीं मिळतां, कायमचा तो राहतो

सहज काढून टाकीन त्याला, नका करुं वल्गना

घेऊन जाईल प्राण तुमचे, हीच त्याची गर्जना

कविता

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

” तन्मयता करी साकार “

तन्मयता करी साकार

“नारायण”  “नारायण”  म्हणत श्री नारदमुनी श्री विष्णूना भेटण्यासाठी गेले. नारदानी विष्णूना अभिवादन केले. विष्णूनी हास्यमुखानी त्यांच स्वागत केल.

“हे महान ईश्वर जगदिशा आज मी माझ्या मनातली एक शंका घेऊन तुझ्याकडे आलो आहे. ”   विष्णूनी हासत मानेनेच त्यांना मान्यता दिली.

“मी रात्रंदिवस सतत तुझ नामस्मरण करीत असतो. मी स्वतःला तुझा थोर परम भक्त समजतो. परंतु तुझे लक्ष्य इतर भक्तांमध्ये खूपच व्यक्त झालेले दिसते. माझ्याकडे तुझे दुर्लक्ष्य होत असावे अशी माझी आपली शंका. प्रभू मी काय करावे म्हणजे माझी शंका दुर होईल. ”

श्री विष्णू हासले. ” नारदा चल आज मी तुझी एक छोटीशी परिक्षा घेतो. त्यांत जर तु यशस्वी झालास तर तुला मी सर्वांत श्रेष्ठ भक्त ही उपाधी देईन. पाण्याने काठोकाठ भरलेले एक कटोर त्यानी नारदाच्या हाती दिले. जा !  ह्या पृथ्वी भोवती एक चक्कर मारुन ये. फक्त एकच अट. ह्या कटोऱ्यातून पाण्याचा एक थेंबही बाहेर पडता कामा नये. संभाळून ने. नारदानी कटोरे हाती घेतले. शांत मनाने कटोऱ्यातील पाण्यावर लक्ष्य केंद्रीत करीत त्यानी पृथ्वीची प्रदक्षीणा पूर्ण केली. अत्यंत आनंद व समाधानाने ते श्री विष्णूला पून्हा भेटले.

” नारदा मला खूप समाधान वाटले. तू अतिशय काळजीपूर्वक, मन एकाग्र करुन पृथ्वी प्रदक्षिणा केलीस. पाणी मुळीच हालले नव्हते. त्याचा एकही थेंब बाहेर पडला नाही. ”  नारदाचे ह्रदय भरुन आले. ” परंतु खर सांगू नारदा. तू ह्या शर्यतीत हरलास. कारण जेवढा वेळ तू पाण्यावर मन एकाग्र करीत होतास, तुझ्याकडून नामस्मरणांत खंड पडला.

विष्णू लगेच नारदाला म्हणाले. “चल माझ्याबरोबर पृथ्वी लोकांत. तुला एक खरा भक्त दाखवतो. ”  दोघानी साधूची वेशभूषा धारण केली. ते एका मंदीराजवळ आले. आंत चैतन्य महाप्रभू भजन करीत बसले होते. साधूना बघताच ते उठले. त्यानी दोघांचे स्वागत केले.

साधू वेषातील विष्णू म्हणाले   ” तुमची भक्ती बघून आम्ही आनंदी झालो. प्रसन्नता वाटली. तुमच्या मनाची विचारांची लक्ष्य केंद्रीत करण्याची क्षमता आम्ही जाणली. तुम्ही आपले मन कसे एकाग्र करु शकता, हे आम्ही बघू इच्छीतो. त्यानी तोच साधा कटोऱ्यातील पाण्याचा प्रयोग चैतन महाप्रभूला करण्यास विनविले. मात्र येथे चक्कर फक्त त्या मंदीरा भोवती करण्यास सांगीतले. साधूना अभिवादन करुन ते अतीशय काळजीने पाण्यावर लक्ष्य केंद्रीत करीत निघाले. साधूवेषधारी दोघेजण मंदीराच्या दाराजवळ बसले.

बराच वेळ झाला. परंतु चैतन महाप्रभू मंदीर प्रदक्षिणा करुन आले नाही. दोघाना शंका वाटू लागली. ते उठले व त्यांचा मागोवा घेत मंदीराच्या मागे गेले.  जे त्यानी बघीतले त्याचे दोघाना आश्चर्य वाटले. श्री चैतन महाप्रभू तो कटोरा हातात घेऊन हातवारे करुन भजन म्हणत, नाचत तल्लीन झालेले होते. कटोऱ्यातील पाणी सर्वत्र विखूरले गेले होते. हाती रिकामा कटोरा, मन ईश्वराचे चिंतन,मनन, भजन यानी भरले होते. सर्व शरीर बेभान होऊन नाचत होते. हे दृष्य बघताना नारदांच्या डोळे पाणावले होते.

ईश्वर भक्तीत  “ तन्मयताच करी साकार  ” ह्याची प्रचीती त्याना त्या भक्ताकडून आली.

(ललित लेख)

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

// सती सावित्री // ( अर्थात वटपौर्णिमा व्रत )

//  सती सावित्री  //

( अर्थातd वटपौर्णिमा व्रत )

 

स्त्री जातीचा मुकुटमणीं    महासती मान मिळोनी

धन्य झाली जीवनीं    पतीव्रता सावित्री   //१//

ब्रह्मा लिखित अटळ   ह्या सूत्रीं केला बदल

हे तिच्या तपाचे फळ   सावित्रीने मिळविले   //२//

जरी येतां काळ   चुकवावी वेळ

बदलेल फळ    हेच दाखविले तीने   //३//

समजण्या धर्म पतिव्रता   ऐकावी सावित्री कथा

मनीं भाव भरुनी येतां   आदर वाटे तिच्या परीं   //४//

मद्रदेशाचा नृपति   नांव तयाचे अश्वपति

कन्या त्याची सावित्री   प्रेम करी तिजवर   //५//

कन्या होती उपवर    धाडीले शोधण्या वर

राजा करी कदर    कन्येच्या इच्छेची    //६//

फिरुनी सर्व देशी    न मिळे कुणीही तीजशी

आली एका आश्रमापाशी    दृष्टीस पडला एक युवक   //७//

नजर त्यावरी पडूनी    स्तंभित राजकन्या होऊनी

रुप लागली न्याहाळूनी   सत्यवान युवकाचे   //८//

तेजोमय युवक पाहूनी    भान जाय हरपूनी

राजकन्येने वरिले मनोमनी   संकल्प लग्नाचा करी   //९//

राजपूत्र होता सत्यवान   पिता जाई राज्य गमावून

अंधत्व पित्याचे त्यास कारण    वनवासी झाले सारे    //१०//

सावित्री परतूनी घरीं     सर्व हकीकत कथन करी

आवड तिची सत्यवानापरी    मनीं त्यास वरिले   //११//

चर्चा करीत समयीं    नारदाचे आगमन होई

आनंदी भाव भरुनी येई    पुता पुत्रीचे   //१२//

वंदन करुनी देवर्षीला     कन्येचा संकल्प सांगितला

आशिर्वाद मागती लग्नाला    सावित्री सत्यवानाच्या   //१३//

नारद वदले खिन्न होऊनी   लग्न संकल्प द्यावा सोडूनी

विचार काढावा मनातूनी   सत्यवानाविषयी    //१४//

दुर्दैवी आहे सत्यवान    त्याची आयुष्यरेषा लहान

एक वर्षांत जाईल मिटून   जीवन त्याचे   //१५//

हे आहे विधी लिखीत    म्हणून होत निश्चीत

कोण करील बदल त्यांत   प्रभूविना   //१६//

ब्रह्मा लिखीत अटळ   झडप घालीतो काळ

न चुके कधी ही वेळ   हीच निसर्ग शक्ती   //१७/

थर्रर्र कापला नृपति    चकीत झाली सावित्री

ऐकून भयंकर भविष्याती     सत्यवानाच्या   //१८//

सावरोनी स्वतःशी   विचार करी मनासी

वदू लागली नारदासी   निश्चयीं स्वरानें   //१९//

प्रथम दर्शनी वरिले    मनोंमनीं पती मानिले

        सर्वस्वी अर्पिण्या संकल्पले   कशी त्यागू मी त्याना   //२०//

काया वाचा मन   सत्यवाना अर्पून

पतिठायी त्याना वरुन   ह्रदयीं बसविले   //२१//

निवड करता पतीची   मनीं बसवुनी प्रतिमा त्याची

कल्पना न यावी दुजाची   हाच स्त्रीधर्म   //२२//

सप्त-पावली हा उपचार   होण्या सर्व जगजाहीर

   धार्मिक विधी एक प्रकार   राहीला असे   //२३//

स्त्रीचा असता हा धर्म   कां सुचविता अधर्म

           सांगा यातूनीच मार्ग    सावित्री विनवी नारदासी   //२४//

पतिव्रता ही श्रेष्ठ शक्ति    करोनी पति भक्ति

          ईश्वर मिळविण्याची युक्ती    सांगू लागले नारद   //२५//

पतिभक्ति करुन      तपसामर्थ्य येइल महान

तेच नेईल उध्वरुन     पावन होता प्रभू   //२६//

बघूनी सावित्रीचा निश्चय    नारद आनंदी होय

आशिर्वाद देऊनी जाय    नारायण नाम घेत   //२७//

दृढ निश्चयाची शक्ति   सावित्रीस चेतना देती

            माहित असून भविष्याती  उडी घेई जीवनयज्ञांत   //२८//

राजकन्या सावित्री    सत्यवानासंगे वनाती

       लग्न करोनी राहती   संसार करण्या   //२९//

पतीसी समजूनी देव   त्याचे ठायीं आदर भाव

मनीं बसवी त्यांचे नांव     अवरित   //३०//

नामात असते लय    लयांत एकाग्रता होय

             एकाग्र मनी ईश्वरी भाव    परमेश्वर सान्नीध्याचा   //३१//

पति हाच परमेश्वर   न पूजे दुजा ईश्वर

              सावित्री त्याचे चरणावर    अर्पण करी सेवा   //३२//

सेवेत असते तप   शक्तीचा तो दीप

                         प्रज्वलीत होईल आपोआप   तपः सामर्थ्य वाढता   //३३//

                      सोडूनी काळजी काळाची  पर्वा नव्हती वेळेची

                             अंतरीक इच्छा समर्पणाची    पतीच्या अल्प अयुष्यी   //३४//

                     वर्षा अखेरचा दिवस भयाण   घेत विश्रांति सत्यवान

                             वटवृक्षाखाली होता झोपून   सावित्री देत मांडीचा आसरा    //३५//

            आयुष्याची रेखा संपता   जीवन दोर जाई तुटतां

                   प्राणज्योत नेई यमदुता    त्याक्षणीं   //३६//

फांस घेऊन यमदूत    नेण्या सत्यवान प्राणज्योत

टाकले फांस गळ्यांत   सत्यवानाच्या   //३७//

सावित्रीची तपशक्ति    देई तिज दिव्य दृष्ठी

सोडून फास गळ्याभोवती    देई दूर फेकून    //३८//

यमदूत जाई घाबरुन     हतबल झाले ते बघून

           सावित्रीची शक्ति जाणून   रिक्त हस्तें गेले यमपूरीं   //३९//

यमराज मृत्युदंडाधिपती    संतापून ते येती

नेण्या प्राणज्योती     सत्यवानाची   //४०//

यमराज प्रभूचे दिक् पाळ   मृत्युरुपी ते महाकाळ

अपूर्व त्यांचे बळ    राज्यकरीं यमपूरी   ///४१//

नेवून मानव प्राणज्योत    कर्माप्रमाणे शिक्षा देत

         पाठवूनी नविन देही    परत जीवन गाडा चालवी   //४२//

रेड्यावर बैसूनी    यमराज आले धाऊनी

हातीं फांस घेऊनी   प्राण नेण्या सत्यवानाचे   //४३//

बसूनी सत्यवाना शेजारीं    पतीधर्माचे ध्यान धरीं

रक्षण कवच उत्पन्न करी   पती पत्नी भोवती   //४४//

तपाची दिव्य शक्ति   यमराजासी येण्या रोकती

फांस त्याचे न पोहोंचती   सत्यवाना पर्यंत   //४५//

बघूनी ते तेजोवलय    यमराज चकीत होय

      शोधूं लागला उपाय   सत्यवानाची नेण्या प्राण ज्योत   //४६//

पतीकडून पाणी मागवून   सावित्रीस दूर सारुन

प्राण ज्योती घेई काढून    सत्यवानाची   //४७//

यमराज निघाला स्वर्गी    सावित्री त्याच्या मागे मार्गी

             पतिव्रता शक्ति तिचे अंगीं    चेतना देई मार्गक्रमण्यास   //४८//

मनीं तिच्या पतिभक्ति    बघून अपूर्व शक्ति

   यमराज प्रसन्न होती    सांगतले वर मागण्या   //४९//

श्वशुराचे अंधत्व गेले   राज्य तया परत मिळाले

वडीलांस पुत्र प्राप्त झाले   सावित्री मिळवी तीन वर   //५०//

न पावली समाधान    पाठलाग चालूं ठेवून

यमासी ठेवीत झुलवून    चर्चुनी विषय निराळे    //५१//

शेवटचा मी वर देईन    परी तू जावे परतून

मानव देहा स्वर्ग कठीण   कसे राहशील तूं तेथें ?  //५२//

जीवन आतां माझें व्यर्थ   न उरे जगण्या अर्थ

एकटेपणा ठरेल अनर्थ   माझ्या आयुष्यीं   //५३//

इच्छा माझी व्हावे माता    सानिध्य मुलाचे मिळतां

एकटेपणाचा भाव न राहता  उर्वरीत जीवनामध्यें    //५४//

पाठलाग घेण्या सोडूनी   तथास्तू म्हटले यमानी

मान्य तिची विनंती करुनी   वर देई तिला   //५५//

तथास्तू म्हणतां क्षणी   धरती गेली हादरुनी

          भयंकर विजा चमकोनी   निसर्ग उत्पात माजला   //५६//

मान्य केले मातृत्व   नसता जीवित पितृत्व

         शक्य कसे हे अस्तित्व   चुक उमगली यमराजा   //५७//

निसर्गाच्या नियमाला   तथास्तूने धक्का दिला

         नियतीचा डाव उलटला   सावित्रीच्या शक्तिनें   //५८//

जसा सुटावा बाण   तसा शब्द जाऊन

         यमराज पेचांत पडून    हारला सावित्रीपूढे   //५९//

सोडून देई प्राणज्योत  सत्यवान जीवदान मिळत

      अखंड सौभ्याग्यवती वरदान    मिळाले सावित्रीला   //६०//

वटवृक्षाखालती   पाऊनी सतीशक्ति

जीवदान मिळती    सत्यवाना   //६१//

ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला   स्त्रीया पूजती वटवृक्षाला

अखंड मिळण्या सौभाग्याला    सावित्रीप्रमाणे   //६२//

पतिपत्नीतील प्रेमभाव    समजोनी मनाचा ठाव

                एकमेका आदरभाव     हीच दिर्घायुष्याची गुरु किल्ली   //६३//

// शुभंभवतु  //

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०