Monthly Archives: ऑगस्ट 2012

अनुभवात ईश्वरी दर्शन !

अनुभवात ईश्वरी दर्शन !

प्रत्येक व्यक्तीचे अध्यात्मिक ध्येय असते की तिने त्या चैतन्यमय ईश्वरी शक्तीचे अस्तित्त्व जाणावे, अनुभवावे. कुणाला ईश्वर भेटला  वा दिसला,  ह्याची खऱ्या अर्थाने विचारवंताना  देखील सत्यता पटलेली नाही.  परंतु अनेक प्रसंगातून मात्र त्याच्या योजनेची, शक्तीची, कुशलतेची जाणीव निश्चित झालेली आहे. आणि तो केवळ अनुभव जरी मिळाला तरी त्यात संपूर्ण समाधान व सार्थक असेल. ही भावना हेच ईश्वरी अनुभूतीचे दर्शन ठरविणारे असेल. ईश्वर निराकार अस्तित्त्वामध्ये समाजाला जातो. त्याच्या सगुण अंगाच्या  दर्शनापेक्षा  प्राप्त  होणाऱ्या चैतन्यमय अनुभवाच्या  झलकेमध्येच, समाधानात डुबून जाणे त्याचे दर्शन झाल्याचा आनंद देणारे असेल.

कोठे शोधावयाचे त्याला ?  स्वर्गात, समुद्रात, पर्वतमय रांगात , फुलात, स्वभोवातालच्या जीव जंतू वनस्पतीमध्ये, आमच्या देहात, मनांत, कोठेही. कोठे तो नाही? ज्या दृश अदृश वस्तू वा सभोवतालच्या वातावरणात त्याची आपणाला जाणीव होते, त्या सर्वामध्ये त्या चैतन्यमय ईश्वराचे अस्तित्त्व असते. ते फक्त जाणावे लागते. अनुभवावे लागते. निराश्या तेव्हांच  येते,  जेव्हा त्याला दृश्य स्वरुपात कुणी बघू इच्छितो. कारण खऱ्या अर्थाने कुणीही त्याला न बघताच त्याच्या भव्य वा  दिव्य शक्ती  सामर्थ्यास कल्पनेच्या आधारावर रंग रूप देण्यात आलेले आहे. तसेच स्वरूप इतरांना कसे दिसणार? फक्त दिव्यत्वाचा  वेगवेगळा  अनुभव मात्र कुणालाही येऊ शकतो.  जेव्हां कित्येक प्रसंग सामान्यांना कल्पनाशक्तीच्या बाहेरचे वाटतात, विस्मयकारक असतात, मानवी विचारांच्या पलीकडले घडतात, त्याचवेळी ते निसर्गाच्या चक्रातील विशेष परंतु ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव देणारे असतात. ह्याच प्रसंगामध्ये, अनुभवामध्ये, विचारांनी एकरुप  झालात, तर त्याक्षणी ईश्वराचं  दर्शन झाल्याचा आनंद मिळाल्याचे समाधान मिळेल. प्रतिमेचा अट्टाहास, कल्पनेच्या  स्वरूपाचे  दर्शन,  मात्र निराशाच पदरी पडेल.

ईश्वर म्हणजे काय कोण कसा, ह्या प्रश्नाचे उत्तर आज पर्यंत तरी अगदी निशित स्वरुपात वा  एकमुखाने मिळालेले नाही.आपल्या द्रीष्टीक्षेपात  ज्या ज्या आकारामय  गोष्टी दिसतात,  त्याचे आम्ही नामकरण करीत गेलो. हे सारे एकमेकाच्या  संवादासाठी.  तो पर्वत, तो समुद्र, ती नदी, ते जंगल,  धबधबा, हवा, पाऊस, वादळ, ढग, झाडे, हिमाछादीत पठारे,  सूर्य चंद्र अग्नी वारा, इत्यादी. अनेक अनेक आकारमय गोष्टी आपल्या द्दष्टीपटात येत जातात.    त्याला सामुहिक वा वैयक्तिक आम्ही संबोधित आलेलो आहोत. सर्व वस्तू आम्हाला समजल्या. त्याचे नाव ऐकताच  प्रत्येक वस्तू आमच्या  नजरे  समोर येते. हा समजण्याचा परिणाम होय. परंतु हे वरवरचे ज्ञान आहे. झाड म्हणजे काय, नदी म्हणजे काय, पर्वत  म्हणजे काय, समुद्र म्हणजे काय? ह्या  अनेक  गोष्टी बद्दल आम्ही अज्ञानातच असतो. त्यांना समजतो जाणतो  त्याची बाराकाईने विश्लेषणात्मक  माहिती  मिळते.  येथ पर्यंतच आमच्या मर्यादा पडतात. हे सारे विज्ञान आहे.    आम्ही त्या विज्ञानातच आनंद घेतो. समाधान मानतो. परंतु हा आनंद अज्ञानाच्या रूपाने जणू पडदाच असल्याप्रमाणे आहे.

वस्तू जाणणे आणि ती वस्तू अनुभवाने ह्या संकल्पनेत खूप फरक आहे.  सुंदर गुलाबाचे  फुल  बघताना, उंचावरून  पडणाऱ्या  धबधब्याकडे बघताना, पौर्णिमेच्या  शीतल चन्द्राकडे  बघताना, कोकिळेची मधुर तान ऐकताना, इंद्रधानुशाचे रंग बघताना, मोराचा  पिसारा फुललेला  असताना नाच  बघताना,  एक नाही अनेक अश्या गोष्टी बघताना ऐकताना प्रत्येकजण नुसता आनंदात डुबून जात नसतो, तर तो काही क्षण  स्वता:ला विसरून जातो. हीच त्याची ध्यानधारणा होय. आणि जे अशा नैसर्गिक वातावरणाशी एकरुप होतात, तोच त्याचा ईश्वरी अनुभव होय. समोर पसरलेल्या अथांग आणि अगणित वस्तूमध्ये अगदी अनुरेणुमध्ये तो ईश्वर पसरलेला आहे. त्याला अनुभवण्यासाठी दिव्यद्र्ष्टीची गरज आहे म्हणतात, हे सत्य आहे. आमच्या द्दष्टीला वस्तू दिसते,  ती त्या वस्तूची जाण. त्यालाच जेंव्हा दिव्यद्रीष्टी अनुभवते  तोच ईश्वर नव्हे काय? .  म्हणूनच त्याचे स्वरूप निराकार आहे. अपल्या द्दिष्टीक्षेपात, जाणीवेत ज्या ज्या वस्तू येतात ते सारे त्याचेच अंग असते. थेट तुम्ही मी आणि सारा सभोवताल. हे विश्व अनंत अथांग आणि सर्वत्र. हेच तर परमेश्वराचे स्वरूप आहे. आम्ही सदैव जे आमच्या आत बाहेर बघत असतो तोच तर ईश्वर.

त्याचे ऋषीमुनींनी वर्णन केले आहे ” सत चित  आनंद “  याचा साधा अर्थ जेंव्हा चित्त अर्थात मन सत्यमय होते   आनंदमय होते, त्याच क्षणी  प्रत्येकास त्या ईश्वराच अनुभव आलेला असतो. असे आनंदाचे क्षण आम्हास  क्वचित  प्राप्त  होतात. जेंव्हा आमचा बघण्याचा विचाराचा  स्वभावाचा दोष असतो, आमचे राग लोभ मोह  अहंकार  इत्यादी आम्हास त्या आनंदा पासून सतत वनछीत करतात.  प्रसन्न वा शांत मनच सभोवतालच्या परिस्थितीतून ईश्वरी आनंदाचा अनुभव मिळवू शकते. ईश्वरी अनुभवाचा उद्देश वा साध्य ह्या फक्त परमानंदातच असतो. आणि तो प्रसंगानुसार प्रत्येकाला मिळत असतो. ईश्वरी सानिध्याच्या कल्पना जेंव्हा ” सगुणरूप अपेक्षेमध्ये दर्शन”  अथवा  इच्छित  मनोकामना पूर्तीत असते, तेंव्हाच आपण निराशेच्या वातावरणामध्ये जातो.  संसारिक सुख दुःखाची निर्मितीच मुळी वासनेच्या पायावर आधारलेली असते. देहाच्या कार्यात वासना

( desire )  हीचा सतत सहभाग असतो. माझ्यात सभोवताली द्दिष्टीक्षेपात अगदी जवळ असलेल्या  त्या परमेश्वराला मी माझ्या अज्ञानामुळे जाणत नसतो.  कल्पनेच्या राज्यातून त्याची जवळीक साधतो. त्याला सगुण रुपात बघू इच्छितो.  जे वाचलेले ऐकलेले पौराणिक कथामध्ये ज्याची वर्णने  समजली त्या देहमय रूपाचे आम्ही दर्शन घेऊ इच्छितो. पण हे केव्हांच घडणारे नसेल. तुमची इच्छा भावना ही केवळ अंधश्रधा ठरेल.  कुणाला काही साध्य होणे हे कदाचित प्रासंगिक म्हणून क्वचित असेल ही. तो परमात्मा म्हणजे एक विशाल प्रचंड असा निसर्ग आहे. त्याच्याच आखून दिलेल्या निअमानुसर सर्व चालत असते. विशेष कृपा वा चमत्कार यांना येथे जागा नसते. श्रीमदभग्वतगीतेच्या महान शिकवणीनुसार हे संपूर्ण विश्व ज्यात सूर्य चंद्र प्रथ्वी तारे तुम्ही आम्ही सारे सारे एकाच असून एकाचेच हे अनेक भाग असलेले आम्हास भासते.

हेच अद्वैत तत्वज्ञान आहे. ( Divine presence is monism ) अथवा knowledge of Unity .  प्रत्येक पदार्थ दोन गुणांनी संपन्न असतो. एक दिसतो, भासतो, समजला जातो, हा गुणधर्म. दुसरा त्या पदार्थामध्ये शक्ती रूपाने ( उर्ज्या )  सर्वत्र पसरलेला असतो. दोन्हीही गुणधर्म एकरुप होऊनच त्या पदार्थाचे खरे अस्तित्व झालेले असते. ह्यालाच ” शिव आणि शक्ती “ स्वरूप म्हणतात. पदार्थ ( Materialistic ) म्हणून आपल्या ज्ञानद्रीयाला समजते.  त्याचा रंग रूप आकार इत्यादी परिमाणाने त्या समजतात. प्रत्येक पदार्थाला जसे स्थूल आकारमान असते, त्याच प्रमाणे तो पदार्थ अनेक वा अगणित सूक्ष्म घटकापासून बनलेला असतो. आजच्या घडीला विज्ञान शास्त्राला त्या सूक्ष्म घटकाची माहिती मिळाली त्यानुसार त्याला अणू ( ATOM ) संबोधले गेले. ह्या “अणूच्या ” अंतरंगात प्रचंड शक्तीची साठवणूक असते. आपणास ती सूक्ष्म अवस्तेत भासत असली तरी तिच्या परिमाण करणे केवळ शक्य होणार नाही. आणि सर्व उर्जा शक्ती ही त्या संपूर्ण पादार्थामधली सतात कार्यरत परन्तु अवक्त शाकी समजली जाते. सजीव असो वा निर्जीव असो तो पदार्थ ( materialistic ) आणि त्याची शक्ती ( Energy  ) ह्याच दोन अंगानी विश्वात विखुरलेल्या आहेत. अद्वैत तत्वज्ञानामध्ये ह्यालाच परमेश्वर समजले गेले आहे.                  सभोवतालच्या दृश्य वस्तू  संग्रहातून आणि माझ्यातून त्याचे जसे ज्ञान होते, तसेच त्याला एकरुप होऊन अनुभवाने ( Awareness of that consciasness ) अथवा  (   तो experience of that Divine Suprime ) ह्यालाच परमेश्वराचे दर्शन झाले असे म्हणता येईल.

(ललित लेख)

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

विश्वामित्राची देणगी

विश्वामित्राची देणगी

छम छम बाजे

पैंजण माझे

मी अप्सरा स्वर्गाची

देवलोकींच्या राज्याची  ।। धृ ।।

स्वर्गामघुनी आले भूवरी

धडधड होती तेव्हां उरी

तपोभंग तो करण्यासाठीं

आज्ञा होती इंद्राची ।। १।।

मी अप्सरा स्वर्गाची

देवलोकींच्या राज्याची

तपोबलाच्या सामर्थ्यानी

प्रतिसृष्टी बनविली ज्यांनी

सत्वहरण ते अशा ऋषीचे

परीक्षा ठरली दिव्यत्वाची  ।। २ ।।

मी अप्सरा स्वर्गाची

देवलोकींच्या राज्याची

भाग्य माझे थोर कसे

विश्वामित्राना जिंकले असे

मात्रत्वाचे रंग भरुनी

देई देणगी शकुंतलेची  ।। ३।।

मी अप्सरा स्वर्गाची

देवलोकींच्या राज्याची

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५० 

सौंदर्यातील एक दर्शन

सौंदर्यातील एक दर्शन

 

वयाची पंचाहत्तरी सुरु झाली होती. डोळ्याला चश्मा, कानांत Hearing Aid, तोल सांभाळण्यासाठी हाती काठी घेऊन बँकेत गेलो होतो. दोन महीन्यापासून पेन्शन येणे बंद झाले होते, त्याची चौकशी करावयाची होती. मी सांगितलेल्या टेबलाजवळ जाताच समोर एक तरुण पंचविशीतील मुलगी सेक्क्षनवर होती. माझे तिने हसून स्वागत केले व खुर्चीवर बसण्यास विनविले. काय झाले कुणास ठाऊक. मी त्या मुलीकडे बघतच राहीतो. ती जे सांगत होती त्याकडे माझे लक्ष नव्हते. मी चमत्कारीकपणे तिच्याकडे बघतच राहीलो. मला ती त्यावेळी सौंदर्याचा, प्रतिभेचा, तेजस्वीपणाचा एक जीवंत चेहरा वाटला. माझे मन तेथेच अडकून गेले. एक अप्रतिम सौंदर्य व शरीरबांधकाठी मला आकर्शून गेली. तिचे बोलणे, हालचाली, लकबा, पेहेराव, सारे सारे मनास एकदम प्रफूल्लीत करणारे वाटले. माझे भिरभिरणारे डोळे, थरथरणारी मान, त्या तरुण मुलीच्या तथाकथीत आकर्शकतेमध्ये, सौंदर्यामध्ये, गुंतून गेले. परंतु मला  Sense of Orientation अर्थांत सभोवतालच्या व स्वतःच्या परिस्थीतीची जाणीव होती. मला गम्मत वाटली. विचीत्र वाटले. एक मात्र सत्य की तिला बघून अत्यंत आनंद वाटला, समाधान वाटले.

थोडीशी माझ्या कामाची चर्चा झाली. कांही कागदपत्रे मी आणली नव्हती. ती आणण्यास मला सांगितले गेले. मी तेथून निरोप घेतला.

असे कां व्हावे ? जीवनांतील सौंदर्याचा आस्वाद मी आयुष्यांत तर भरपूर घेतला हेता. मग असे हे विक्षीप्त परंतु प्रचंड आनंद देणारे कां वाटावे ?. एक बेचैनी, एक तगमग, एक आशंका, मनांत तुफान निर्माण करुंन गेले.

मी दुसऱ्या दिवशी लागणारी कागदपत्रे घेऊन पून्हा बँकेत गेलो. उत्सुकतेने तिला भेटलो. आज मात्र वेगळेच चित्र डोळ्यासमोर येऊ लागले. मला ती फक्त एक तरुण मुलगी दिसली. साधीसुधी इतर मुलीप्रमाणे. कांही भिन्न नव्हते. न ते कालचे सौंदर्य, न आकर्शन, न मनाला ओढ, ना आनंद. मी तिच्याकडे निरखून बघू लागलो. कालच्या प्रसंगाची उजळणी करुं लागलो. पण मन कोणतेच ठाव घेण्याचे स्विकारु लागले नाही. सारे तेच होते. मी, माझेच डोळे, आणि समोरचे देखील तेच. तीच तरुण मुलगी, तेच सौंदर्य. परंतु आज मजवर कोणतीच जादू झालेली दिसली नाही. कां असे ? कां मी चोविस तासांत मला माझ्या वयाला, विकलांगपणाला ओळख होते. अर्थात काल तर मी फक्त तिच्यातले सौंदर्य, प्रतिभा, तेज टिपले होते. मग आज ते सारे कां नष्ट झालेले वाटले ?

आकर्शन आणि उपभोग ह्या भिन्न गोष्टी आहेत. जेंव्हा भिन्न, तेंव्हा त्याच्याकडे बघण्याचा द्दष्टीकोण देखील वेगळांच असू शकतो. उपभोगाची साधने, फक्त दोनच आहेत. एक शरीर व दुसरे मन. दोन्हीवर ताबा असतो तो विचारांचा, विवेकाचा. शरीराचा विकलांगपणा बघतांच मन त्याची साथ सोडून देते. बुद्धीमधला विवेक वरचढ बनतो. हाच विवेक मनाच्या चंचल स्वभावाला मुरड घालून, शरीराला जगवण्यासाठी साथ देण्यास सरसावतो. तुमच्या मनाविरुद्ध, इच्छेविरुद्ध तो शरीराला तन्दुरुस्त, आरोग्यवर्धक ठेवण्याचा प्रयत्न करतो. विवेकासमोर असतात फक्त दोन मार्ग. त्या निसर्गाचा शोध घेणे. अर्थात ईश्वर सान्निध्य व शरीराला त्याच्याशी एकरुप करण्याचा प्रयत्न करणे.

विकलांग शरीर आणि दुर्बल मन हे कसे करणार. केवळ कल्पनेने ईश्वर अस्तित्वाच्या जाणीवेचा शोध घेणे ह्या समाधानांत आनंद असतो. आनंदात ईश्वरी रुप दडलेले असते. त्याच ईश्वरी रुपांत एकरुप होण्याचा सतत प्रयत्न व्हावा, हेच तुमच्या जीवन मार्गाचे ध्येय असेल.

जीवनाच्या चाकोरीमधले कित्येक प्रसंग असे येत जातात की जेव्हां त्या निसर्गाच्या भवव्यतेचे, दिव्यतेचे स्वरूप आम्हास जाणवते. आम्ही आनंदी, उल्हासीत होतो. काही क्षण तर आम्ही आम्हाला व सभोवतालच्या जगाला पूर्ण विसरून जातो.  रिम-झिम पडणाऱ्या पावसांत दिसणारे नयन मनोहर इंद्रधनुष्य, गारांचा पडणाऱ्या पावसात गारा जमा करतानाचा आनंद, प्रचंड पडणाऱ्या धबधब्याचा लयबध्द आवाज, जमीनीवर वेगाने पडणाऱ्या पाण्याचे उडणारे तुषार , समुद्रकिनारी सुर्यास्ताचे देखावे, समुद्राच्या खडकाळ किनारी आदळणाऱ्या पाण्याच्या लाटा, कोकीळेच्या मधूर ताना, मोराचे पसारा फुलवित थुई-थुई नाचणे, फुलांच्या ताटव्यात उमललेली रंगीबेरंगी फुले, जंगलामध्ये स्वैर बागडणारे वन्य प्राणी, उंच पर्वताच्या रांगा, नदीचे संथ वाहणे, सूर्य किरणांमुळे सोनेरी छटा प्राप्त झालेले निरनिराळ्या आकाराचे चमकणारे ढग. एक नाही अनेक-अनेक प्रसंग तुम्ही त्या अप्रतीम निसर्गाच्या अविष्कारामध्ये आनंदाने एकरूप होतात. विचार करा, कसले हे निसर्गाचं दिव्य स्वरूप. हेच तर तुम्हाला मिळालेले परमेश्वराचे दर्शन नव्हे काय? ह्यालाच (Reality of Consciousness) वा सत्याची जाणीव म्हणतात. तसे बघीतले तर आपणास प्रासंगीक वाटणारी नैसर्गीक भव्यता ही सर्व ठीकाणी आणि सदैव असते. फक्त आपल्या दृष्टीची जागृतता असावी.

त्या तरुण मुलीच्या सौंदर्यातील ईश्वरी अंश  माझ्या विवेकाने टिपण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच तो क्षणिक होता. त्याच वेळी प्रकाशमान झाला होता. विजेप्रमाणे चमकून माझ्या  ह्रदयाला भिडणारा होता. पुन्हा नंतर ती अत्यंत आनंदाची लहर केव्हांच भासली नाही. कारण ईश्वरी जाणीवेचे दर्शन असे क्वचीत अनुभवते.

मी तिच्यांत काय बघीतले ? मला काय हव होत ? ह्याचा उलगडा आजपर्यंत झाला नाही. कारण ते सौंदर्य, त्या प्रकारचे तेज मला कुणांतही, आगदी तीच्यामध्येही नंतर दिसले नाही.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

सु्र्य-चंद्राचा लपंडाव

सु्र्य-चंद्राचा लपंडाव

 

बघा बघा तो रवि चालला, अतिशय वेगानें   ।

पूर्व दिशेला चंद्रही येई, त्याच तन्मयतेने   ।।

युगानु युगें लपंडाव हा, त्यांचा चालला असे   ।

भावांमधली शर्यत बघूनी, गम्मत परी भासे   ।।

मोठा भाऊ रवि त्याला, पकडण्या धांव घेई   ।

लहान भाऊ चंद्र असूनी, निसटून मात्र जाई   ।।

संताप येता लाल होऊनी, रवि जाई तापूनी   ।

परि शांत असे चंद्र बघा, राग घेई गिळूनी   ।।

लहान असूनी थकून जाई, कांही काळ जाता   ।

नभीं न येतां घरींच झोपे, थकवा जाण्या करीता   ।।

विश्रांतीचा काळ घालवूनी, हलके हलके येई   ।

पुनरपि त्यांचा खेळ बघतां, आनंद मनास होई   ।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

उतारवयांत जगतांना!

उतारवयांत जगतांना!

वृद्धापकाळ जीवनामधला अंतीम टप्पा. जणू जीवनाची संध्याकाळ. एका चक्रमय जीवनाचा शेवट होण्याचा पूर्वकाळ. समिश्र अशा भावनांचा उहापोह करण्याची वेळ. न जाणो एक विचार मनांत येतो की ह्या वयाकडे आदर भावाने बघण्या ऐवजी, गमतीदारपणाची हास्यास्पद वाटणारे वय, एक संभ्रमी अवस्था, समजली जाते. ज्याला थोडासे कुत्सीतपणाने बघीतले जाते.  कदाचित् वाढत्या वयानुसार एका स्थरानंतर निर्माण होणारा शारिरीक विकलांगपणा, विसराळूपणा, हे कारणीभुत असावे.

त्यानी आपल्या पूर्व जीवनांत पहाडा एवढे कर्तव्य केलेले असेल. काहींनी  खेळाचे मैदान नेत्रदिपकाने गाजविले असेल. कित्येकांनी आपल्या कलेने अनेकांना मंत्रमुग्ध केले असेल. आनंदाचा ठेवा ओंझळभरुन वाटला असेल. अशा व्यक्तीनासुद्धा ह्या काळातून जाताना बरेचसे सहन करीत जावे लागते. त्यांच्या तारुण्यातील उज्वल काळानी त्यांच्या म्हातारपणातील उणीवांवर पांघरुण घालण्याची असमर्थता दाखविली आहे.

जीवन व मृत्यु हे जेवढे सत्य आहे, तेवढेच म्हातारपण हे न टळले जाणारे एक आयुष्यातील सत्य जीवन आहे. जे सत्य असते ते ईश्वरांचे प्रतीक असून ते मान्य करताना त्याचे स्वागत झाले पाहीजे. जीवनाचा शेवट गोड व आनंदी करावयाचा असेल तर वृद्धापकाळ जीवनामधला अत्यंत महत्वाचा काळ समजला पाहीजे.

जीवनातील महत्त्वाचे टप्पे आहेत बालपण, तारुण्य, प्रौढत्व आणि म्हातारपण. ह्यात खऱ्या अर्थाने आतिशय आनंददायक काळ म्हणजे वृद्धत्वाचा. परंतु हे केवळ त्याच वेळी शक्य आहे. जेंव्हा सुरवातीपासूनच ह्या काळाची जाणीव ठेऊन तुम्ही तुमचे आयुष्य मार्गक्रमण कराल.

मला उत्कृष्ठ खेळाडू, कलाकार, गायक, चित्रकार, वा कोणत्याही क्षेत्रामधील मान्यताप्राप्त नागरिक बनायचे आहे. हे तुम्ही बालवयांत अथवा तारुण्यांतच ठरवता वा योजता. त्यासाठी सर्व प्रकारे पोषक वातावरण निर्मिती करता. सर्व डावपेच लढून. अडचणीवर मात करुन आपले ध्येय साधण्याचा प्रयत्न करता. त्याच प्रकारे वृद्धापकाळाच्या स्वागतासाठी योजना करवी. त्याच्या स्वागतासाठीचा अभ्यास केलेला असावा. यामध्ये असेल तुमची वैयक्तीक क्षमता, झेप घेण्याची योग्यता, कौटूंबीक परिस्थीतीची जाणीव, सामाजीक धोरणांचा पूर्णपणे विचार , आणि देशहीत. सर्व बाबीवर वृद्धत्व सदैव अंतरमनाच्या स्थरावर असावे. ( In Subconscious level)

१-                प्रकृतिस्वास्थ हे नियमीत व्यायाम व योग्य आहार ह्याचीच देण असते. धावपळीच्या जीवनामध्यें त्याची हेळसांड होणे शक्य असते. हे सतत ध्यानी असावे. सुदृढ प्रकृती हीच म्हातारपणांतील प्रमुख बाब ठरते.  योग्य साधा व सर्व घटक खाद्यपदार्थानी परिपूर्ण आहार नियमीत घेण्याची काळजी व सवय ठेवावी. तो सकस व समतोल असावा.  प्रसंगानुसार खाण्यातले बदल चवी आवडी इत्यादी ह्या येतातच. परंतु तुम्हास सतत जागृत राहणे फार गरजेचे असते.

खाण्यापिण्यातील मौजमजा आणि सवयी ह्यातील फरक जाणण्याच्या वैचारीक पातळीवर लक्ष नेहमी केंद्रित असावे.  खाद्यामधल्या विवीध पदार्थांचे पचन शरिर ठरावीक वयापर्यंत सहज करु शकते. मात्र उतार वयांत त्याचे दुष्परीणाम उभारुन येतात. ते योग्यरीतीने जाणले पाहीजे. तेलकट तुपट चमचमीत पदार्थ, जास्त गोडीचे अंबट, तुरट हे पचनास कठीण, त्यांचा उपयोग कमी व्हावा. द्रव, पाणी भरपूर प्रमाणात घ्यावे.

२-      आर्थिक स्वावलंबन

 स्वाभिमानाने आणि स्वतंत्रपणे जगण्यासाठी बदलत्या काळानुसार आर्थिक स्वावलंबन हा आयुष्य सुखकर ठेवण्यातील महत्वाचा घटक असेल. आर्थिक बळ, त्याची जाण व त्याप्रमाणे योजना आखणे अत्यंत गरजेचे ठरते. पैशाची आवक बंद होणे वा घटणे हे तुमच्या धावपळीच्या  शक्तीवर ठरते. जी वयोमानानुसार घटणारच. औषधपाणयाचा वाढता खर्च ही अत्यांत महत्वाची गोष्ट असते. भारतीय ज्येष्ठांचे वयोमान आता सत्तरीपर्यंत सहजगत्या गेलेले आहे.  इतर खर्च जसे खाणे पिणे कपडालत्ता हे कदाचित् कमी होऊ शकतील. वेळ आल्यास आपले ताट इतरांना द्या. परंतु पाट केंव्हाच सोडू नका. असे कौटूंबीक जीवनाच्या अभ्यासकांचे मत आहे.

वयाची साठी येण्याच्या  आधीच संसारीक चक्रातले जे सर्व सामान्य प्रश्न प्रत्येकाला सोडवावे लागतात. त्याची शक्यतो उकल करणे चांगले. जसे मुलां/मुलींचे शिक्षण, नोकरी वा उद्दोग आणि योग्यतेनुसार कमाई इत्यादी. ह्या कदाचित् मुलभूत समस्या असतील वा प्रत्येकांच्या जगण्याच्या पद्धतीनुसार वेगवेगळ्यादेखील असू शकतील. दैनंदीन, मासिक, प्रासंगिक असे नियमीत खर्च होत राहतात. त्याची पद्धतशीर व्यवस्था अथवा योजना फार पुर्वीच करावी लागते. बॅंक, पोस्ट अथवा असाच संस्था तुमच्या ठेवीवर व्याज देते. विश्वासु व योग्य असा संस्थामध्ये गुणतवणूक करावी. तुमची आर्थीक पुंजी हेच तुमचे जगण्याचे साधन व समाधानाचे बळ असते. शासकिय वा सामाजिक बदलावर नियमीत लक्ष्य ठेवावे. प्रश्न निर्माण झाल्यास, कदाचित् सुटले जातील. परंतु उतारवयांत सहनशक्ती कमी होत गेल्यामुळे, मानसिक तणाव येत जातो. शरीरास हे हानी कारक ठरते. सतत सतर्क असण्याची वृत्ती अंगी बाळगावी.

३           छंद जोपासणे गरजेचे.   

कांही छंद जसे वाचन, लेखन, चित्रकला, हस्तकला, संगीत, गायनकला, वाद्यकला, हे जोपासावे. घरगुती खेळ अथवा मन रमविणारे, कोणतेही नाद हे बालपणीच वा तरुणवयातच जोपासावे. जर तुम्हाला अंतर चेतना Inspiration असेल तर नशीबवानच. परंतु जर आवड वा रुची नसेल तरीही अशा सवयी जोपासाव्या. वृद्धापकाळांसाठी भरपूर वेळ मिळतो. धावपळीचे जीवन संपते. आणि वेळ कसा व्यतीत करावा ही सर्व साधारण समस्या उभी राहते. तुमचे असलेले छंद ह्यावेळी तुम्हास साथ देतील. मी हे त्या वयांत गरजेनुसार करील ह्या समजुतीला कोणताच अर्थ नसतो. ह्याची देखील योजना असावी. आवड निवड ह्या निर्माण करता येत नाही. त्याची बिजे पूर्व आयुष्यातच रोवावी लागतात.

ह्याच प्रकारे वृद्धत्व तर येणारच. तरी देखील,  त्याची तयारी पूर्व नियोजन करुन केली जात नाही. आता मी निवृत्त झालो. म्हातारा होत आहे. ह्या विचारांनी त्याला सामोरे जाण्याचा सर्व साधारण प्रघात बनू पाहात आहे. जसे घरी अचानक आलेल्या  पाव्हण्यांचे स्वागत आणि योजना आखून आलेल्या  पाव्हण्यांचे स्वागत, ह्यांत निश्चीतच खूप तफावत असणार. दुसऱ्या प्रकारामध्ये आनंदा बरोबर योग्य  स्वागताची जाणीव व समाधान असणार.   

एका विद्वान व्यक्तीने एक प्रयोग सुचविला होता. मला वैयक्तिक खूप चांगला अनुभव आला. रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तीन गोष्टींचा विचार करावा.

१ दिवसभर मी काय केले. माझ्या हातून काय घडले. चांगले आणि वाईट वा अप्रिय गोष्टी. कांही वेळ त्यावर चिंतन करावे. त्यांत सुधारणा करणाचा संकल्प करावा. नंतर सर्व गोष्टी ईश्वराचे चरणी अर्पण कराव्यात.

२ येणारा उद्याचा दिवस चांगला जाऊन, आपल्याकडून चांगले काम व्हावे ही प्रार्थना करावी.

३ झोपण्यापूर्वी मृत्युची आठवण काढावी. मृत्यु हा तर निश्चित असतो. तो केंव्हातरी येणारच. त्याचे स्वागतपर विचार असावे. पण हे करताना  त्याची भिती वा निराशेचा थोडा देखील विचार नसावा. एक आनंददायी समाधानकारक वातावरण निर्मिती व्हावी. मृत्यु येणार हे एक सत्य असले तरी माणसे त्याचा केंव्हाच विचार करीत नाही. व जे जीवन अनिश्चीत, असत्य असते, त्याचा मात्र सतत विचार होत असतो. मृत्युच्या चाहूलाची केवळ कल्पना मानसाच्या नितीमत्तेला खूप उंचावते. फक्त ती जाणीवपूर्वक असेल तर त्यातील भय भावना नष्ट झालेली असेल.

४        समाधानी वृत्ती

व्यक्तीला जे जीवन निसर्गाकडून मिळते, त्याची जाणीव प्रत्येकाला होतच असते. हाच खरा निसर्ग होय. तो स्वतःला पूर्णपणे जाणू लागतो. ह्यामध्ये प्रमुख समज येते ती वातावरण, परिस्थीती, स्थिती, आत्मशक्ती, क्षमता, अंतरचेतना, आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे ह्या सृष्टीवरील त्याची स्वतःची योग्यता. प्रत्येकने पांघरुन बघून आपले हातपाय पसरावेत म्हणतात ते याचसाठी. प्रत्येकाला दुरद्दष्टी दिलेली असते ती जगाचा आणि जगण्याचा अंदाज बांधण्यासाठी. ह्या पृथ्वीवर जन्मलो वाढलो, जगलो, सुखांचा शोध घेत घेत झगडलो, जे अंतीम मिळाले त्यामध्ये समाधानी झालो.

प्रत्येकाने ह्याच विचाराने आपली क्षमता पारखून जे निसर्गाने त्याच्या पदरांत घातले असेल त्यावर अत्यंत समाधानी राहावे.

५         मृत्युचे स्वागत.

जीवनाचा शेवट म्हणजे मृत्यु. हे एक अटळ सत्य आहे. ह्याची प्रत्येकाला जाणीव असते. त्या सत्याला मनापासून, अंतःकरणातून मान्यता द्या. त्याची वेळ देखील अनिश्चीत असते हे जाणा. परंतु निसर्ग तुम्हाला मृत्युच्या आगमनाची खूप आधीच चाहूल देत असतो. ती निर्भयपणे जाणून घ्या. त्याच्या स्वागताची तयारी ठेवा.

मृत्युला टाळण्यासाठी आपले सर्वस्व, आपल्या जीवनांत कमावलेली पूंजी वाया घालू नका.  तुमच्या कष्टावर तुमच्यानंतर कुणी अवलंबून असतील तर तशी योजना करा.

तुमचे मृत्युपत्र योग्य विचार व भावनांची कदर करणारे असावे. संपत्तीची योग्यप्रकारे वाटणी करा. ज्यांत तुमच्या इच्छे बरोबरच अस्तित्वात असलेल्या कायद्याची पूर्ण कल्पना ठेवावी. कोणताही एखादा अट्टाहास, येणाऱ्या पिढीमध्ये तुफान वादळ निर्माण करु शकतो. ही समज ज्येष्ठांनी ठेवावी.

शेवटचे व महत्वाचे म्हणजे तुम्हाला मिळालेले जीवन फक्त एकदाच असते, ह्याची जाण असावी.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

श्रीकृष्ण जन्मकथा

श्रीकृष्ण जन्मकथा

 

श्रीकृष्ण जन्मकथा सांगतो   ऐका विनवितो

श्री विष्णु अवतार घेतो    ह्या सृष्टीवर   १

दुष्टांचा होई अनाचार    पृथ्वीते होई पापभार

त्यांचा करण्या संहार    परमेश्र्वर अवतरती   २

कंस राजा दुष्ट    स्वतःस समजे श्रेष्ठ

प्रजेला देई कष्ट    स्वार्थापोटी   ३

छळ करु लागला जनांचा    लुटमार अत्याचार छंद त्याचा

खूनही करी साधूसंतांचा    दुष्टपणे   ४

कंसाची देवकी बहीण    चित्त तिचे परमेश्र्वरी विलीन

सात्विक होते तिचे मन    परमेश्र्वराठायीं   ५

देवकीचे लग्न ठरले    वसुदेवाला तिनें वरले

सर्व कार्य पार पडले    कंस राजा घरी   ६

देवकी वसुदेवासंगे बैसली    भोयांनी डोली उचलली

वरात घरी जाण्या निघाली     कंस भावा घरुन   ७

कंस राजा चाले संगे    वरातीच्या मागोमगे

निरोप देण्या तिजलागें    वसुदेव देवकीसी   ८

वरात येता गांव वेशीला    एक चमत्कार घडला

आकाशवाणी झाली त्या वेळेला    चकीत होती सर्वजण   ९

कंस राजा तूं मातला    नष्ट कराया तुजला

विष्णू अवतरती पृथ्विला    देवकीचे पोटी   १०

देवकी वसुदेवाचे आठवे बाळ   कंसाचा तो कर्दनकाळ

योग्य येता वेळ    ठार करील कंसाला   ११

देवकी पुत्र शत्रु माझा   दचकून गेला कंस राजा

विस्मयचकीत झाली प्रजा    आकाशवाणी ऐकूनी   १२

कंसाने विचार केला    देवकीपुत्र जन्मता मारण्याला

बंदीस्त केले त्याना    ठार करण्या बाळ तयांचे   १३

एका मागुनी एक मारीले    सात पुत्राना ठार केले

पापाचे तेंव्हा घडे भरले    कंसाचे   १४

आठव्या वेळी देवकीस   गर्भ राहता नऊ मास

आगळाच होत असे भास    चमत्कार घडला   १५

पृथ्वी पावली समाधान    सृष्टी गेली बहरुन

प्रफूल्ल झाले वातावरण    स्वागत करण्या प्रभूचे   १६

पूर्वीचे सर्व बदलले    दुःखी मन पालटले

रोम रोम ते आनंदले    चिंता न उरली देवकीस   १७

२                            प्रभू आगमनाची तयारी    सर्व देव मिळूनी करती

देवकीस सांभाळी    आपली शक्ती देवूनीया   १८

सुर्य उधळी प्रकाश    वरुण जल शिंपी सावकाश

वायु लहरी फिरती आकाशी    देवकीसाठी   १९

बागेत पसरला सुगंध    वातावरण होई धुंद

देवकीचा आनंद    द्विगुणीत झाला   २०

देवकीचे सारे चित्त    प्रभुचरणी जात

झाली ती निश्चिंत    भार ईश्वरी सोडूनी   २१

श्रावणमासे कृष्णपक्षे आष्टमीला     मध्यरात्रीचे सुमाराला

देवकीचे बाळ आले जन्माला        ईश्वर अवतार घेई   २२

सर्व वातावरण शांत    बाळ करी आकांत

परी सर्व होते निद्रिस्त    कारागृहाचे द्वारपाल   २३

थकून देवकी झोपली    बाळ तिचे पदराखालीं

वसुदेवासी चिंता लागली    बाळाची   २४

झाला एक चमत्कार    साखळदंड तुटूनी उघडले दार

विजेमुळे मार्ग दिसे सत्वर    वसुदेवाला   २५

त्वरीत उठूनी बाळ उचलले    तयासी टोपलीत ठेवले

डोईवर ठेवूनी चालले    वासुदेव   २६

वसुदेव चालला    नागराज पाठी आला

फणा काढूनी वाचवी बाळाला    पावसापासून   २७

वसुदेव यमुनाकाठी    दुथडी वहात होती

निश्चयी पाण्यांत शिरती   बाळ घेऊन   २८

पाण्यांत टाकता पाय   यमुना ही दर्शना धाव

ईश्वरचरणीं स्पर्श होय   पावण होणेसी   २९

पाण्याची पातळी वाढली   चरणस्पर्श होता दुभंगली

वाट करुनी दिली    वसुदेवाला   ३०

पैलतिरी गांव गोकूळ    नंद गवळ्यातील श्रेष्ठ सकळ

पत्नी यशोदे झाले बाळ    त्याच रात्रीं   ३१

कन्या होती आदिमाया    ईश्वर सुरक्षे जन्म घ्याया

ईच्छित त्याचे कार्य कराया   आली उदरी यशोदेच्या   ३२

घर नंदाचे उघडे   यशेदा निद्रिस्त पडे

लक्ष्य नव्हते कन्येकडे   घरातील लोकांचे   ३३

बाळ ठेवले यशोदेपासी    उचलून घेतले कन्येसी

पांघरुन घालूनी बाळासी   वसुदेव परतला   ३४

मुलीस घेऊन आला    ठेवी देवकीच्या कुशीला

कोण जाणील ह्या लिला    प्रभूविणा   ३५

३                         बंद झाले द्वार पूर्ववत    मुलीने केला रडूनी आकांत

द्वारपाल जागविले त्वरित    ते खबर देई कंसाला   ३६

कंस आला धाऊन    सर्व लष्कर घेऊन

बाळ मारावे म्हणून    आपल्या शत्रुते   ३७

कन्या बघूनी चकीत झाला    कां फसवितोस मजला

शिव्या देत असे प्रभुला    मुलीचे रुप बघूनी   ३८

मुलीस घेतले बळजवरीं    आपटण्या दगडावरी

हात नेता आपले शिरीं कन्या हातून निसटली  ३९

चमत्कार घडला त्या समयीं    कन्या आकाशी जाई

अचानक अकाशवाणी होई    त्यावेळी ४०

आठवे बाळ नंदा घरी    ईश्वर रुप अवतारी

येतां वेळ ठार करी    कंसा तुला ४१

आकाशवाणी ऐकोनी    घडला चमत्कार बघून

कंसा ते कापरे भरुनी    राजगृही परतला ४२

कंस प्रयत्न जाय निष्फळ    विधी लिखीत असे अटळ

कोण रोकती काळ    प्रभूविणा ४३

इकडे यशोदे देखिले    बाळ गोजिरे वाटले

आनंदमय गांव झाले    बाळाचे आगमनें ४४

नांव श्रीकृष्ण ठेविले    नंदाघरी वाढले

गोपाळांत खेळले    आनंदरुप ४५

यशोदाघरी देवकीचे बाळ    ठार केले कंसा येता वेळ

मारले नंतर दुष्ट सकळ    श्रीकृष्णाने ४६

श्रीकृष्णाचा अवतार    दुर्बलांना तो आधार

करसी दुःखाचा निवार    प्राणीमात्रासाठी ४७

जन्माष्ठमीचा उत्सव    ओतून त्यांत दुर्बलांना तो आधार

करसी दुःखाचा निवार   प्राणीमात्रासाठी ४७

जन्माष्ठमीचा उत्सव    ओतून त्यांत भक्तीभाव

साजरा करिती सर्व    प्रेमभरे ४८

श्रीकृष्ण सांगे गीता   युद्धभूमीवर असता

कौरव पांडव युद्धा सज्ज होतां    अर्जूनासी ४९

भगवत् गीता महान    ग्रंथ म्हणून मान

जीवनाचे तत्वज्ञान   तयामध्यें ५०

श्रीकृष्णभक्तांनी   वाचावी ही कहाणी

भक्तिरुपें होऊनी    रोज एकदां   ५१

                                               ।। शुभं भवतु  ।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

डॉ. भगवान नागापूरकर याना मातृशोक

डॉ. भगवान नागापूरकर याना मातृशोक

जीवनाच्या रगाडयातून ह्या मराठी ब्लॉगचे लेखक –

डॉ. भगवान नागापूरकर यांच्या मातोश्री ति. लक्ष्मीबाई केशवराव नागापूरकर यांचे नुकतेच निधन झाले. मृत्यु समयीं त्या औरंगाबादीं होत्या. सर्व मुले मुली नातवंड पतवंड सख्येनातेसंबंधी, मित्रपरीवार ह्यांच्या प्रचंड उपस्थितीने त्याना शेवटचा निरोप दिला. अतिशय शांत आणि धीरोदात्त वातावरणात त्यानी शेवटचा श्वास घेतला. त्याना शेवटपर्यंत कोणतीही व्याधी जडलेली नव्हती. जीवनाचे शतक अर्थात १०० वर्षे पूर्ण करीतच त्यानी सर्वांचा निरोप घेतला. जीवनांत त्यांचे व त्यांचे पति कै. केशवराव नागापूरकर यांचे सामाजिक कार्य महान होते. मृत्युनंतर  त्यांची नोंद अनेक दैनिकांनी घेत संपूर्ण बातमी वर्तमान पत्रांत दीली. त्याच प्रमाणे स्थानिक लोकसभा सदस्य माननिय श्री. चंद्रकांत खैरै ह्यानी व्यक्तीशः सांतवनपर संदेस दिला. अनेक प्रतिष्ठीत व्यक्ती , समाजसेवक, नगरसेवक यांनी येऊन नातेवाईकांचे सांतवन केले.

कै. ति. लक्ष्मीबाई केशवराव नागापूरकर ह्यांच्या संबंधी एक लिखान त्यांचीच लहान मुलगी, लेखक साहित्तीक, उच्य शिक्षीत सौ. सुलोचना कुलकर्णी हीने पाठवले आहे. ते येथे सामान्यासाठी देत आहे.

माझी आई लक्ष्मीबाई उर्फ ठकुताई

‘ स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ‘  आमची आई आम्हाला सोडून गेली आणि खऱ्या अर्थाने वरील वाक्याची प्रचिती आली. आई म्हणजे प्रेम, त्याग, वात्सल्य, करुना, यांचे मुर्तीमंत रुप आहे. आज मात्र सर्व भावंडे खऱ्या अर्थाने पोरके झाले.

माझी आजी आणि आजोबाना वाटले की, आपल्याला मुलगाच होणार, पण मुलगी झाली. माझ्या आईने सर्वाना ठकविले म्हणून तिचे नांव ‘ ठकु ‘ असे ठेवण्यांत आले. अर्थात हे घरांतले. खरे नांव होते लक्ष्मीबाई. लहानपणापासून अतिशय हूशार, चाणाक्ष, आणि कर्तव्यदक्ष आशी माझी आई होती. खेड्यांत बालपण गेले. १०० वर्षा पूर्वीचा काळ होता तो. शिक्षण फक्त चौथी पर्यंत झाले. प्रकृती अतिशय उत्तम होती. लहानपणीच धावपळ, घोडदौडसुद्धा, खेड्यामधले शारिरीक खेळ व व्यायाम ह्यात प्राविण्य मिळवले. सावळा रंग परंतु अतिशय बांधेसुद शरीर यष्टी लाभली होती. घरची लाभलेली वडीलोपार्जीत श्रीमंती.  सर्वांत महत्वाचे म्हणजे लक्ष्मीबाईचे अर्थात ठकुचे नशिब फार बलवत्तर होते. तीला तरुण तडफदार शिक्षीत भव्य व्यक्तीमत्वाचा सहकारी मिळाला. त्यानी पुढे शासकिय सेवेत मराठवाड्यांत प्रचंड नांव लौकीक कमविले. त्यांचे नांव होते कै. केशवराव कुलकर्णी नागापूरकर. ते डेप्युटी कमिशनर म्हणून औरंगाबाद येथे कार्यारत होते.

एक फार जुनी घटना आठवली. मी ऐकलेली. पासष्ट वर्षापूर्वीची असावी.माझे वडील बिड जिल्ह्यातील माजलगांव येथे तहसीलदार ( मामलेदार ) म्हणून होते. गांवाच्या जवळून सिंदफना ही नदी वाहते. नदीला प्रचंड पूर आला होता. पाण्याने सर्व गावाला वेढा दिला होता. पाणी गांवात शिरले. कित्येक घरे पाण्यांत बुडू लागली. लोकांचे संसार उध्वस्त होऊ लागले. पाण्याची पातळी वाढण्याचे कांही केल्या थांबेना. आमचे घर आमच्या नशिबाने उंच टेकडीवर होते. परंतु एका स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्याचे घर,  प्रचंड लोकांची गर्दी मदतीची अपेक्षा करित तेथे जमा झाली. तेथील जमलेल्या अनेक स्त्रीया माझ्या आईशी परिस्थीतीची चर्चा करु लागल्या. वादळ, वारा, पाऊस आणि पूर ह्यानी सर्व रहवाशी हैरान झाले होते. कोणताच मार्ग सुचत नव्हता. अशावेळी माणस ईश्वराचा आसरा घेतात. माझी आई सर्वाना घेऊन नदी किनारी गेली. भक्तीभावाने तिची खणा नारळाने ओटी भरुन पुजा केली. सरीता देवीस शांत होण्याची प्रर्थना केली. सारेजण तेथेच बसून होते. चार तासांत दैवी चमत्कार झालेला दिसू लागला. पाणी प्रचंड वेगाने ओसरु लागले. गावांतील मंडळीना त्याक्षणी आमच्या आईत एक दैवी शक्ती असल्याचे भासले. एक वेगळाच मान तीला मिळू लागला. सकाळी पाणी खूपच ओसरले होते.

अंबेजोगाइला माझ्या आई-वडीलांच्या प्रयत्न्याने पहीली कन्या शाळा स्थापीली गेली. शाळेच्या पायाभरणी समारंभ माझ्या आईच्याच हस्ते झाला. आजही तेथील एका सभागृहाला त्यांचे नांव दिले गेले आहे.

खूप वर्षापूर्वीची एकलेली गोष्ट आठवली. गुलबर्ग्याला भारताचे पहीले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु आले होते. एका मोठ्या  Project उभारणीचा पायाभरणी  समारंभ होता.

तीन स्त्रीयांनी तीन रंगाच्या ( लाल-पांढरा-हीरवा ) वेगवेगळ्या नऊवारी साड्या परीधान केल्या होत्या. तीघीनी प. जवाहरलाल नेहरुना औक्षण करुन त्यांचे स्वागत केले गेले. ह्यांत माझ्या आईचा प्रमुख सहभाग होता. प. नेहरुनीही हात ऊंचावून आशिर्वाद दिले. तिच्या आयुष्यातील हा क्षण अत्यंत आनंदाचा होता.

माझे आजोबा (आईचे वडील) लवकर वारले. त्यामुळे छोट्या भावाची ( माझ्या मामांची ) सर्व जबाबदारी तिने पार पाडली. आपल्या मुलापैकी एक समजून त्याचा सांभाळ केला. बंधूप्रेम काय असते हे आम्ही तिच्याकडून शिकलो.

आमचे नागापूरकर कुटूंब हे एकत्र होते व आजही आहे. त्यामुळे घरामध्यें दीर, नणद, जावा, यांचे सर्वांचे संबंध अतिशय जीव्हाळ्याचे होते. आमच्या आईचे दोनही काकांवर  खूप प्रेम होते. काकांनी मोठ्या वहीनीवर तितकेच प्रेम केले. आईला कधी अंतर दिले नाही. धाकट्या जावांवर बहीणीसारखे प्रेम होते. कंटाळा वा कामचुकारपणा हे शब्द तिच्या शब्दकोशांतच नव्हते. ती म्हणायची काम केल्यानी शरीर निरोगी राहते. त्यातूनच आपल्याला उर्जा मिळत असते. तिने तीच्या दोनही नणदेवर खूप प्रेम केले. तिच्यामते  ‘सासर आणि माहेर’  हे तराजुचे दोन पारडे आहेत. त्याचा समतोल राखला पाहीजे.

‘ एकीकडे प्रेम आणि दुसरीकडे लोकेशन ‘

एकंदरीत तिच्या जीवनाचा प्रवास खुपच सुखांत, एश्वर्यांत झाला. शेवटपर्यंत लक्ष्मीने तिला साथ दिली. ती नुसतीच लक्ष्मीबाई नव्हती तर ‘ भाग्यलक्ष्मी ‘ होती. तिच्या मुलांनीही तिच्यावर खऱ्या अर्थाने प्रेम केले. सुनानी तिचा शब्द ‘ प्रमाण ‘ मानला जाई. डॉ. भगवान व डॉ. सौ. शालिनीवहिनीने तिला विमानातून यात्रा करुन आणली. सौ. पुष्पा वहिनी व सदूभाऊनी   ‘ पुंडलीकासारखी ‘  सेवा केली. नातु जीवन व नात जयश्री तिचा शब्द झेलावयास सदैव तयार असत. नुकताच एक नातु चि. रवी ( अमेरिकेत स्थायिक ) पत्नी सौ. दिप्तीसह  येथे आला व त्याने दोन मुलांच्या मौंजी पणजीच्या आशिर्वाद छायेत पार पाडल्या. शेवटच्या काळांत तिची लहान बहीण अर्थात चंदामावशी हीने तिची खूप सेवा केली.

खऱ्या अर्थाने ती भाग्यवान होती. सर्व पणतु चि. सार्थक, आदित्य, आणि आकाश ह्यांचा जन्मप्रसंगी ‘ सुवर्ण फुले वाहण्याचा ‘  धार्मिक कार्यक्रम सर्व नातेसंबंधाच्या उपस्थितीत पार पडला. तिचा

सहस्र चंद्रर्शन ‘  हा कार्यक्रम देखील तिच्यांत आनंद व समाधान देऊन पार पडला. तिने नुकतेच जीवनाचे शतक अर्थात शंभर वर्षे पूर्ण केले होते. निसर्गाने मानव योनीसाठी जीवनाची जी शतकपुर्ती मर्यादा  देऊ केलेली आहे, तीचा तिने हिम्मत आणि कष्टाने आदर केला. ती पूर्ण करुन त्या निर्सगाचा , त्या ईश्वराचा सन्मान केला. तिने जीवन सार्थकी घातले.

आमच्या सर्व परिवारातर्फे ती. आईला श्रद्धांजली अर्पण करते. ‘ परमेश्र्वर तिच्या आत्म्यास शांती देवो.

आई तूझ्या प्रेमाची सदैव ऋणी

सौ. सुलोचना कुलकर्णी

९००४०७९८५०

त्या दुर्दैवी जीवांना दया- मरण द्या

त्या दुर्दैवी जीवांना दया- मरण द्या

 मी बरीच वर्षे मनोरुग्णालयांत वैद्यकीय अधिकारी म्हणून, मनोरुग्णाच्या सहवासांत घलविली आहेत.  ‘ मनोरुग्ण ‘ हा सर्वसामान्यजनांना विनोदाचा विषय असतो. हे एक कटू सत्य आहे. मनोरुग्णाकडे बघण्याचा मनोरंजनात्मक दृष्टीकोण सर्वसामान्यामध्ये आढळून येतो. तुम्ही वेड्याच्या सहवासांत आहात, तुम्हाला कोणता त्रास होतो कां ?  तुम्हाला त्याची भिती वाटते कां ? ते दगड मारतात कां ?  गाणी म्हणतात कां ? नाचतात कां, ते नाचत असताना करमणूक होत असेल ना ?  त्यांची असंबद्ध भाषा ऐकून तुम्हाला गम्मत वाटत असेल नाही का ? कुणी स्वतःला श्रीमंत समजत तर कुणी अधीकारी वा नेता समजून तशा पद्धतीने हातवारे करुन बोलत असेल ? कुणी रडत असेल तर कुणी हसत असेल ? कुणी तासंतास एकाच ठिकाणी हलचाल न करता बसलेला असेल ?  कुणी अंगावरचे कपडे काढून फेकून देत असेल नाही का  ? कितीतरी वैचित्रपूर्ण वागण्याचे नमुने दिसत असतील ना ? अशा प्रकारचे अनेक प्रश्न विचारुन माहीती घेणारे अनेक भेटतात. आम्हाला पण एकदा मेंटल हॉस्पिटल बघावयाचे आहे. मिळेल कां त्यासाठी परवानगी ? इत्यादी. ह्या सर्व चौकश्यामध्ये जे दिसून येते ती केवल करमणूक, विनोद, मनोरंजनाची भावना. बंदीस्त झालेल्या प्राणी वा पक्षांच्या संग्रहालयाप्रमाणे.

त्यांचा काय दोष ?  

दुर्दैवैने आणि नशीबाने त्यांच्यावर  ‘ मनोरुग्ण ‘ ?  होण्याची पाळी आणली आहे. नियतीच्या खेळाला बळी पडलेली ही मंडळी आहेत. ह्यांचा ह्यात काय दोष असेल ? गुन्हा असेल ? हे एक निसर्गालाच माहीत. कारण कुणीही मनोरुग्ण होऊ शकतो. कदाचित् सभोवतालच्या परिस्थितीमुळे मानसिक संतूलन बिघडलेल्या व्यक्तीला, ती परिस्थिती हानीकारक म्हणून बोट दाखविता येईल व तो योग्य प्रकारे सामना करु न शकल्यामुळे दोष देता येईल. परंतु कित्येक मनोरुग्णाच्या माहीतीनुसार त्याच्या जन्माच्या वेळची परिस्थिती, आई वडीलातील वा अनुवंशीक दुर्गुण, रक्तातील गुणदोष इत्यादी प्रामुख्याने कारणीभुत असलेले दिसतात. त्यावेळी ह्या रुग्णाबद्दल एक वेगळीच भावना येते की, ह्यात त्या रुग्णाचा स्वतःचा कोणता गुन्हा की ज्यामुळे त्याच्या नशिबी  ‘मनोरुग्ण’ होण्याचे आले आहे. ?  परंतु सामान्य माणसे मनोरुग्णाच्या, त्यांच्या मनोरुग्ण होण्याच्या कारणमिमांसेविषयी, परिस्थितीविषयी कुणीही फारसे खोलांत जाऊन तसदी घेत नाही. खरे म्हणजे त्यावर होणाऱ्या नैसर्गिक कोपाबद्दल कुणीही सहानुभूतीने विचार करीत असल्याचे दिसून आले नाही.

अर्थात ज्याच्या नात्यागोत्यामधली व्यक्ती मनोरुग्ण असेल व त्याना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रितीने मनोरुग्णाचा मानसिक वा शारीरिक त्रास होतो, त्यांची मात्र मनोरुग्णाकडे बघण्याची द्दष्टी निराळी असते. ज्याचे ‘ जळते त्यानाच कळते ‘ ह्या उक्ती प्रमाणे ते मनोरुग्णाकडे सहनुभूतीने बघतात. त्यांच्याविषयी चौकशी करतात. अशा रुग्णाच्या उपचारासाठी व आरोग्यासाठी ते उत्सुक असतात. ह्यात शंकाच नाही.

आजकाल बऱ्याच सामाजिक संस्था, समाजकार्य करणाऱ्या व्यक्ती निरनीराळ्या सामाजीक समस्यांकडे आपली शक्ती, कौश्यल्याचा वापर आणि सहानुभूती व्यक्त करतात. जसे कुटूंब कल्याण, बाल कल्याण, वृद्धाश्रम, अंध व्यक्ती, अपंग, अंधश्रद्धा निर्मुलन, व्यसनमुक्ती, एड्स विषयी जाण निर्माण करणे, स्त्रियांवरील अत्याचार, इत्यदी समस्यांचा सामाजीक संस्था अभ्यास करुन त्याबद्दल निरनीराळ्या प्रचार माध्यमाद्वारे सर्व नागरिकांना त्याची माहीती देतात. चर्चासत्र होऊन सहानुभूतीपूर्वक मदत करतात. मात्र दुर्दैवाने अशा पद्धतीने मनोरुग्णाबद्दल लोकजागृती करण्याचे प्रयत्न क्वचितच दिसून येतात.

सहानुभीतीची गरज.

ज्या कुटूंबात दुर्दैवाने एखादा मनोरुग्ण असेल, त्याचा त्या कुटूंबाला त्रास तर होतोच. परंतु सर्व शेजारी पण त्याच्या विषयी त्रस्त झाल्याची भावना व्यक्त करतात. त्याला कुणाचीच सहानुभूती मिळत नाही. अशा मनोरुग्णास कसेही करुन त्या वातावरणातून काढून मनोरुग्णालयांत दाखल करण्याचा प्रचत्न होतो. ह्याचा अर्थ त्या मनोरुग्णाच्या विक्षिप्त वागण्याकडे दुर्लक्ष करुन त्याला घरीच ठेवावे असे नाही. परंतु त्याच्या आजाराकडे इतर आजारा प्रमाणे बघीतले जात नाही. एक ब्याद म्हणून समजले जाते. शिवाय अशा मनोरुग्णाला मनोरुग्णालयांत दाखल केले की, संबंधित नातेवाईकापैकी बहूतेक मंडळी त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करतात. त्याच्या भेटीस येण्याचे टाळतात. तो बरा होत असेल व त्याला घरी नेण्यास सांगीतले तरी कित्येकजण ते टाळतात असे दिसते. मनोरुग्णास उपेक्षित वागणूक दिल्याचे जाणवते. ह्या प्रक्रियेमध्ये कोणतीही सामाजिक संस्था भाग घेऊन मनोरुग्णाच्या पुनर्वसनाकडे फारसे लक्ष देत असल्याचे दिसून येत नाही. हे चित्र निश्चितच निराशजनक आहे.

मनोरुग्णाचे प्रकार      

मनोरुग्णालयांत येणाऱ्या रुग्णांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे रोगी आलेले दिसतात. १) कांही रोगी येतात. उपचारानी बरे होतात व पुन्हा समाजात कार्याकत होतात. २) कांही रोगी अल्पकाळासाठी बाहेर चांगले राहू शकतात. परंतु पुन्हा आपले मानसिक संतुलन बिघडल्यामुळे मनोरुग्णालयांत येतात. ठराविक काळानंतर त्यांचे येणे जाणे चालूच असते. ३)  तिसऱ्या प्रकारातील रुग्णामध्ये बुद्धीची वा मेंदूची जन्मापासूनच परिपूर्णता नसते. आजच्या घडीला असलेल्या उपचारपद्धती त्यांच्यात मुळीच सुधारणा करु शकत नाही. असे मनोरुग्ण हे मनोरुग्णालयांत वर्षानुवर्षे जगत असलेले दिसतात. ह्या वर्गामध्ये असलेल्या रुग्णाची संख्यापण बरीच आहे. कित्येकजण तर २०ते ३५ वर्षे ह्या रुग्णालयांत आहेत. कुणी तरी त्यांना येथे आणून सोडले. कुणाही त्याना बघण्यासाठी येत नाही. त्याना आणताना दिलेल्या पत्यावर कुणीही मिळत नाही. कित्येकजण वेडे, अज्ञानी, न बोलणारे, रस्त्यावर पडलेले, अशा कितीतरी वेगवेगळ्या परिस्थीतीत, लहान वयांत पोलिसानी आणलेले, रुग्ण आहेत की ज्यांचा ठावठिकाणा नाही. मग त्याना कोण बघणार. त्याना कुणाकडे सोडले जाणार. ही सर्वजण मंडळी गरीब आहेत म्हणून नव्हे, तर ते मनोरुग्ण आहेत म्हणून. आज तरी अशा असंख्य रुग्णाना सरकार आसरा देत आहे. येथे मानसिक रोगतज्ञ आहेत. वैद्यकीय मंडळी आहेत. परिचारक वा परिचारीका, आणि इतर सेवक मंडळी आहेत.

सारेजण आपल्या शक्ति व कर्तव्यानुसार  काळजी घेतात. त्या सर्व मनोरुग्णाना जगवितात. म्हणूनच आज कांहीजण ३० वर्षापेक्षाही जास्त काळ मनोरुग्णालयांत रुग्ण म्हणून जीवन जगत आहेत. त्यांच्या शारीरिक प्रकृतीची, खाण्यापिण्याची, इतर नैसर्गिक विधींची काळजी घेतली जाते. आणि म्हणून हे रुग्ण जीवन जगत आहेत.

भयानक वातावरण   

मी येथे उल्लेख करीत असलेल्या माझ्या विचाराला प्रथम समजा. ते खो़डण्यापूर्वी, टिकात्मक दृष्टीकोण घेण्यापूर्वी,  सहानुभूती, भूतदया इत्यादी उच्यप्रतीच्या मुल्याधिष्टीत भावनिक विचार करण्यापूर्वी त्यांच्या जीवनाचा अभ्यास करा.  त्या विरोधक व्यक्तीनी मला प्रत्यक्ष भेटून मनोरुग्णालयातील त्या मनोरुग्णाच्या सहवासांत अल्पसा काळ घालवून स्वतः हे जाणून घेऊन मगच माझा विचार योग्य आहे कां हे ठरवावे. मी हे त्या रुग्णाबद्दल बोलतो ज्यांची परिस्थिती जनावरापेक्षाही वाईट आहे. त्याना फक्त मानव म्हणावे लागते कारण ते माणूस म्हणून जन्मले आहेत. त्यांच्यात बुद्धीचा भाग मुळीच नसल्याप्रमाणे असतो. त्याना भावना विचार इत्यादी असतात हे समजण्यापलीकडचे असते. कित्येकजणाना तर पाणी पाजावे लागते. जेवण चक्क भरवावे लागते. पाणी वा जेवण जरी समोर ठेवले तरी ते घेणार नाहीत. दिले तर ते सांडून देतील. अंगावर कपडे ठेवणार नाहीत. कुठेही संडास लघवी करतील. सारे शरीर बरबटून घेतील. जनावराप्रमाणे दुसरा रोगी ते चाटेलही. कोठेही ओकतील. झोपतील. बैल म्हशींच्या गोठ्यांत चांगले वातावरण अशू शकेल, इतके भयानक वातावरण ह्या रोग्यांच्या सहवासांत असते. ह्याचा अर्थ त्यांच्याकडे मनोरुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असेल असे नाही. अशा रोग्यासाठी चार चार कर्मचारी एका एका वॉर्डत असतात.  रोग्याना खाऊ-जेऊ घातले जाते. नियमित वेळवर पाणी दिले जाते. स्वच्छता राखली जाते. स्नान घातले जाते. कपडे बदलले जातात. ज्याप्रमाणे आई आपल्या लहान मुलाचे सर्व कांही करते,त्याप्रमामेच येथील कर्मचारी रुग्णासाठी सर्व ते करीत असतात. येथे रुग्णाच्या शारिरीक वाढीचा प्रश्नच उदभवत नाही. परंतु ते मेंदूच्या विकारांनी त्रस्त आहेत. एक कधीही बरी न होणारी नैसर्गिक व्याधी. ते आहेत तसेच जगणार. एका कष्टमय, भयानक विकलांग परिस्थितीमध्ये जीवन कंठणार. फक्त अन्न-पाणी मिळते म्हणून जगणार. ह्या पलीकडे कोणतेही सत्य द्दष्टीक्षेपांत नाही.

केवळ भोग भोगणे हेच जीवन

जेंव्हा असल्या संपूर्ण वाया गेलेल्या रुग्णांना वा बऱ्या होऊ न शकणाऱ्या रुग्णाकडे बघीतले जाते तेंव्हा विचार पडतो की, ह्यांचे जीवन कशासाठी ? हे केवळ मनुष्य आहेत म्हणून ? त्याना कायद्याने कुणी मारु शकत नाही म्हणून ? नरकवास भोगणाऱ्या ह्या मानवाकडे वेगळ्या भुमिकेतून कुणी बघणार नाही कां ? त्यांच्या पोटांत दुखत असेल, त्यांना असंख्य वेदना होत असतील, तर कळण्यास मार्ग नाही. ते आपले दुःख व्यक्त करण्यास पूर्णपणे असमर्थ आहेत. केवळ भोगणे हेच त्यांच्या नशीबी आलेले दिसते. एक अत्यंत असमाधानी, भयावह, आणि ज्याची उकल करण्याची शक्ती कुणांत नाही, अशी ही परिस्थिती. त्यांच्या ह्या नर्क यातना त्यांच्या मृत्युमुळेच सुटलेल्या आम्ही बघतो.

स्वतंत्र यंत्रणा असावी

आपण सारी सुसंकृत, शिक्षित आणि समाज मुल्यांची जाण असलेली माणसे आहोत. ह्या अशा दुर्दैवी व्यक्तीसाठी दयामरण हेच आजच्या घडीला उत्तर आहे. त्याचा प्रत्येकाने विचार करावा. सरकारने अशा दुर्दैवी जीवांची सुटका भूतदया ह्या जाणिवेमधून करावी. अशासाठी एखादी स्वतंत्र यंत्रणा असावी. ज्यामध्ये मानसोपचार तज्ञ, उच्य न्यायालयाचे न्यायाधीश, पोलीस अधिकारी, प्रतिष्ठीत बुद्धीवादी नागरीक, समाजसेवक इत्यादींचा समावेश असावा. सर्वानी स्वतंत्रपणे अभ्यास करुन आपला अहवाल सादर करावा. दयामरण मान्य करण्याचे त्यानुसार ठरवावे. केवळ विरोधासाठी विरोध करु नये. असा खऱ्या दुर्दैवी व्यक्तीची मुक्तता ही त्यांच्या आत्म्याला मुक्त केल्या सारखे ठरेल.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०