Monthly Archives: जून 2021

आषाढी एकादशी यात्रा- एक विचार.

जीवनाच्या रगाड्यातून

आषाढी एकादशी यात्रा- एक विचार.

आषाढी एकादशी. पंढरपूरची एक भव्य दिव्य यात्रा. पावसाळ्याची सुरवात. कदाचित् त्यावेळी मुसळघार पाऊस पडण्याची शक्यता असते. त्या वातावरणांत दिवस काढण्याची, राहण्याची अत्यंत गैरसोय, सर्वत्र ओलावा असतो. कॉलरा हगवण ह्या रोगांच्या फैलावाची भिती. सर्व कांही भयावह आणि निराशजनक परिस्थिती. तरी देखील ह्या सर्व बाबिना तोंड देत, प्रचंड जनसागर कोणत्याही परिणामाची तमा न बाळगता पंढरपूरला जमा होतो. केवळ त्या विठोबाचे दर्शन घेण्यासाठी.

            काय मिळते त्याना शरीराला एवढे कष्ट देवून ?. आणि कित्येक भक्तगण असे आहेत की जे त्या पंढरपूरची वारी दर वर्षी न चुकता करतात. हे केवळ मानसिक समाघान आहे कां ? कां ह्याला अंधश्रद्धा म्हणतां येईल ? विठोबा कोण ?, परमेश्वर कोण ? भक्ती म्हणजे काय ?, कशाने काय प्राप्त होते ?, असे एक नाही असंख्य प्रश्न आज तागायत अनुत्तरीत राहीलेले आहेत. ज्याला जसे ज्ञान प्राप्त झाले, जसे वातावरण मिळाले, त्या परिस्थितीप्रमाणे तो प्रश्नांची उकल करीत गेला. अनेक विचार, परंतु एक वाक्यता केंव्हांच झाली नाही. विज्ञानाच्या शोध बुद्धिने इंद्रियांना जे कळले, काहींनी त्याला महत्व दिले. कल्पनेच्या विचारांच्या झेपेमुळे सत्य काय असू शकेल. त्या अज्ञात शक्तींच्या अस्तित्वाला कांहीनी महत्व दिले. गम्मत म्हणजे ज्याचा शोध घेणे, ह्यात प्रगती करण्यापेक्षा, तथाकथीत विचरवंतच आपसांत संघर्ष करताना दिसतात.

                  माझ्या समोर आज तरी एक प्रश्न आला. जो मी वर व्यक्त केला. कां इतक्या प्रचंड संखेने लोक पंढरपूरला यात्रेसाठी जमा होतात ? पंढरपूरलाच नव्हे तर कोणत्याही घार्मिक स्थळ यात्रेला, कुंभमेळाला लोक भक्तीभावाने जमतात. पन्नास, शंभर लोक संख्या असेल तर कदाचित अंधश्रद्धा हे नाव देवून स्वतःचे भावनिक सांतवन केलेही असते. परंतु जेंव्हा संख्या लाखोच्या घरांत जाते, तेंव्हा आश्चर्य व कौतूक पण वाटू लागते. कित्येक उच्च शिक्षित, वैज्ञानिक दृष्टीकोण बाळगणारे, विद्वान मंडळी यामध्ये सहभागी होताना दिसतात. कांही तरी या मध्ये सत्य असेल, प्रेरणा असेल, जी इतक्या समुदायाला खेचून घेते.

                 पुंडलीक आणि विठ्ठोबाची जी घटना घडली, त्याचा मी गांभिर्याने विचार करु लागलो. निसर्गाचा सहभाग आणि मानवी योजना ह्यांत काय असतील ह्याची उकल करण्याचा प्रयत्न केला. सारे कांही घडत असते ते निसर्गाच्या नियमाना धरुनच.

निसर्गाच्या तीन गुणधर्म वा नियममांचा मी विचार केला.

१ निसर्ग सदा सर्वकाळ निश्चीत व सत्य स्वरुपांत असतो. ( Nature is always regular and definite )

२ निसर्गाचा मार्ग नेहमी चक्रमय ठरलेला असतो. म्हणूनच आपण जीवनाला जीवन चक्र म्हणतो. चक्र याचा अर्थ नैसर्गिक अविष्कार वा घटना घडतात, व त्याची पुनरावृत्ती होत राहते. जे घडले ते पुन्हा घडणे ही किमया ह्या निसर्ग चक्रामुळेच साधली जाते. ( Nature repeats itself )

3   अत्यंत महत्वाचा गुणधर्म निसर्गांत दिसून येतो, तो म्हणजे नैसर्गिक चमत्कार .

Miracle by Nature

     काय अर्थ याचा  ?  केव्हां केव्हां निसर्ग- चाकोरीमध्ये अशी एखादी घटना घडते की त्याचा शोध बोध कदाचित् त्या झालेल्या क्षणी होत नसतो. सामान्यजन त्या घटनेला आश्चर्य समजतात. चमत्कार समजतात. दिव्यता भव्यता समजतात. परमेश्वराची अमर्याद शक्तीच हे करु शकते हे ठरवितात. थोडक्यांत चमत्कार आणि नमस्कार हे समिकरण जन्माला येवूं लागते. ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल निश्चीतता येवू लागते. इत्यादी इत्यादी. परंतु एक मात्र सत्य दिसून येते, ते म्हणजे निसर्ग एखाद्या घटनेमधून चमत्काराचे दर्शन घडवित असतो.

                                 पौरानीक कथांचे ग्रंथ वाचताना भक्त पुंडलीकाची कथा वाचीत होतो. पुंडलीक एक महान व्यक्तीमत्व. एका प्रेरणेने भारुन गेलेले. आपल्या जन्मदात्या आई-वडीलाना आपल्या जीवनाचे सर्वस्व मानणारा. त्यांची सेवा हेच जीवनाचे ध्येय असल्याची जाणीव समजणारा. ईश्वरी अस्तीत्वाला देखील त्याने माता पित्याच्या समोर दुय्यम स्थान दिले होते.  कित्येक वर्षे त्याची माता पिता सेवा चालू होती. जीवनातील सर्वस्व त्यागुन फक्त आईवडील सेवा हे वृत त्याने धारण केले होते. त्याचे हे श्रम व प्रेम एवढे महान होऊ तागले की ते ईश्वरी दरबारांत मान्यता प्राप्त होऊ लागले.

ईश्वर नेहमी चांगल्या गुणांची सदैव दखल घेत असतो. हा अध्यात्मिक इतिहास आहे. सती सावित्रीची पतीभक्ती व सेवा ह्यानी देखील ईश्वराला झुकावेंच लागले. पुंडलीकाने केवळ माता-पिता सेवा-भक्ती केली.  हेच त्यांचे सामर्थ्य परमेश्वराच्या प्रसन्नतेत झाले.

                    पुंडलीकाची माता पिता सेवाभक्ती यानी प्रेरीत होऊन, परमेश्वराने त्याला श्री विठ्ठलाच्या रुपांत दर्शन देऊन धन्य केले. पुंडलीकाचे ह्रदय मन भरुन आले. त्याने सविनय नमस्कार केला.परंतु हाच त्याच्या भक्तीच्या कसोटीचा क्षण होता. ज्या क्षणी पांडूरंगाने पुंडलीकास दर्शन दिले, त्यावेळी पंढरपूर नजीक चंद्रभागेच्यातीरी, त्याचे आईवडील त्याच्या मांडीचा आसरा घेत झोपले होते. समोर उभा प्रत्यक्ष परमेश्वर श्री विठ्ठल आणि मांडीवर निद्रेत आईवडील. तो त्यांची झोप मोडू शकत नव्हता. शेवटी पुंडलीकाने विठ्ठलाला नमस्कार करीत, जवळ असलेली एक विट त्याच्या पुढ्यांत टाकली. त्याला त्यावर उभे राह्यण्याची विनंती केली. आईवडीलांची झोप चाळवली गेली. ते जागे झाले. त्याना ईश्वरी दर्शन होणे शक्यच नव्हते. कारण त्यांच्यात ते दिव्य सामर्थ्य नव्हते. त्यानी जाग येताच स्नानाला जाण्याची इच्छा व्यक्त केली. पुंडलीकाने त्यांना मान देवून, तो त्यांना चंद्रभागेतीरी घेऊन गेला. जाताना त्या परमात्म्याला श्री विठ्ठलाला विनंती केली की त्याने त्याच विटेवर उभे राहून पुंडलीक येण्याची वाट बघावी. तो आईवडीलांना स्नान घालून परत येईल.                   आजतागायत आठ्ठाविस युगे झालेली आहेत. श्री विठ्ठल आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून, त्याच महान आईबाप सेवक भक्ताची,  पुंडलीकाची वाट बघत आहे. त्याच्या वाटेवर लागलेले विठ्ठलाचे डोळे आजही आम्ही बघून, ईश्वर दर्शनाचा आनंद लुटतो. लाखो लाखोच्या संखेने तेथे जमा होतो.

              निसर्गाचे वर वर्णन केलेले तीन नियम  आणि पुंडलीक-विठ्ठलाची  पौरानिक कथा याची कांही सांगड असेल कां ?  हा विचार डोकाऊ लागला. एक चमत्कार झाला. एक आश्चर्य सर्वानी बघीतले, जाणले, अनुभवले. ईश्वर स्वरुप तर बघण्याची भव्यता कुणातच असण्याची शक्यता नव्हती. ती फक्त पुंडलीकातच होती. तोच ते भव्य दिव्य बघू शकत होता. परंतु त्या वेळच्या, त्या सभोवतालच्या अनेकांना फक्त त्या ईश्वरी चमत्कारांची चाहूल लागली असेल. एक प्रकाश, एक शितल आल्हादकारक वातावरण, बेहोष करणारा दरवळणारा सुगंध, एक उत्साहाची चैतन्याची लाट, समाधान शांतता यांच्या लहरी, हे सर्व त्या ईश्वर आगमन प्रसंगी एक झलक, नितांत आनंद म्हणून झाले असेल. ज्याचे शब्दानी कुणालाही वर्णन करता येणार नाही. अशी वातावरण निर्मिती त्या क्षणी निर्माण झाली असावी. हा अनुभव कल्पनातीत व अप्रतीम असावा. पुंडलीकाने तो बघीतला, भोगला. इतरांनी कदाचित् त्यांचा संवाद, संपर्क, हाच एखादा नैसर्गिक चमत्कार वाटला असावा. जो की तो अनुभव इतर जन केंव्हाच विसरु शकणार नव्हते. क्षण शांत झाला, परंतु तो अनुभव कुणाच्याने सोडविना.

                        कालचक्राप्रमाणे वर्ष सरता, पुन्हा लोक त्याच ठिकाणी, त्याच वेळी जमा झाले. चाचपडत राहीले. शोध घेत राहीले. कारण जर तो आनंद चेतनामय चमत्कारी, विलक्षण अनुभवी क्षण नैसर्गिक असेल, तर निसर्ग चक्रानुसार तो पुन्हा बरसेल. पुन्हा मिळेल. ह्या आशेत. त्याच जागी त्याच वेळी जो पुंडलीकावर बरसला.  तसा कदाचित् पुन्हा बरसेल. प्रत्येकजण त्या नितांत आनंदाचा  Ecstasy of Joy  चा एक साक्षिदार, भागीदार, होऊ इच्छितो. त्याच्या दयेचा एखादा शिंतोडा कदाचित् आपल्याही अंगावर पडेल ह्या अपेक्षेने. त्याच भावनेने लाखोंच्या संखेने जमतात. त्याच स्थळी म्हणजे पंढरपूरला  त्याच वेळी म्हणजे आषाढी एकादशीला, ज्या काळी पुंडलिकाला विठ्ठोबानी दर्शन दिले असेल. सर्व भक्त शोध बोध घेत असतात.

               निसर्गाच्या  नियमित, चक्रमय, आणि पुनुरावृत्ती ह्या गुणधर्मच्या शोधांत. आम्ही सर्वजण तेथे जमतो. तो निश्चीत बरसेल आणि तो बरसतो देखील. जो तो आपले नशिब आजमावतो. कुणावर तो बरसला असेल हे समजण्यास आजतरी मार्ग वा साधन नाहीत. हेच त्या स्थळाचे ( पंढरपूर ) व वेळेचे ( आषाढी एकादशी ) महात्म्य असेल कां  ? अशाच अनेक धार्मिक यात्रांच्या, कुंभमेळाच्या मागे दडलेली कारणमिमांसा व नैसर्गिक चक्ररचना कारणीभूत असू शकेल कां ?    

डॉ. भगवान नागापूरकर 

९००४०७९८५० 

bknagapurkar@gmail.com

एक आदर्श शिक्षिका

जीवनाच्या रगाड्यातून

एक आदर्श शिक्षिका

डॉ.देशमुख हे आम्हास Physiology  हा विषय शिकवणारे प्राध्यापक होते. अतिशय विद्वान. त्यांच्या विषयाचे प्रचंड ज्ञान संपादन केलेले. त्यांनी त्यांचे प्रबंध दोन वेगवेगळ्या विषयावर दोन विश्वविद्यालयांत सादर करुन,  वेगवेगळ्या डॉक्टरेट पदव्या मिळविल्या होत्या.  विषयाचे जरी अथांग ज्ञान मिळाले असले तरी शिक्षकीपेशामध्ये ते अयशस्वी झालेले जाणवले. वर्गांत शिकवण्यासाठी येण्यापूर्वी नोकर १०-१२ पुस्तके टेबलावर ठेऊन जात असे. पुस्तकांत Book-Mark ”  ठेवलेले असे. प्राध्यापकांची शिकवण्याची पद्धत आगदीच वेगळी होती. एखादा विषय, त्याची व्याख्या, प्रस्तावना, संदर्भ, चर्चात्मक टिकाटिपनी, सारे ते निरनिराळी पुस्तके काढून बुकमार्कने पान उघडून चक्क वाचून दाखवित. सोप्या, वेगळ्या भाषेत त्यावरचे भाष्य ते केंव्हाच करीत नव्हते. कुण्या विद्यार्थ्याने एखादी शंका विचारली तर त्याचे उत्तर कोणत्या पुस्तकांत कोणत्या Chapter मध्ये आहे, हे ते सांगत.  विद्यार्थाना ते अत्यंत रुक्ष वाटत होते. त्या प्रचंड ज्ञानी प्राध्यापकाकडून तसूभर ज्ञान मुलाना मिळाल्याचे समाधान दिसून आले नाही.                    

डॉ. मँडम नाडकर्नी मेडीकल कॉलेजमध्ये बालरोग ( Pediatric ) ह्या विषयाच्या प्राध्यापिका म्हणून नुकत्याच रुजू झाल्या होत्या. तरुण, तडफदार व्यक्तीमत्व होते. त्या केवळ एका महीन्यांच्या काळांतच विद्यार्थ्यांच्या चहात्या झाल्या. त्यांचे भाषा प्रभूत्व होते. अतिशय सरळ सोप्या आणि साध्या शब्दांत विषय फुलविण्याची विलक्षण कला साध्य असलेली. प्रत्येक विषयाची सुरवात एकदम प्राथमिक स्थरावर जाऊन करीत. विषयच्या मुळापासून समजावण्याचे कौशल्य त्यांच्या अंगी होते. कोणताही मुद्दा जोपर्यंत वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या लक्षांत येणार नाही, तो पर्यंत सर्व अंगाने त्या तो फुलवित होत्या. सर्वात महत्वाचे म्हणजे विद्यार्थी, त्यांची समज, त्यांच्या अंगगुणांची झेप, व तो विषय ग्रहन करतो कां ?  ह्यात त्या बारकाइने लक्ष देत होत्या. चित्र, फोटो, ग्राफ, आलेख, प्रोजक्षन, एखाद्या बालरुग्णाला वर्गात आणून प्रात्यक्षिके दाखवित असे. विषय आगदी शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत आकलन झाला किंवा नाही हे तगमगीने जाणण्याचा त्या प्रयत्न करीत असत.

प्रत्येक विद्यार्थाचा नावानिशी परिचय करुन घेत होत्या.

त्या इतर वेळीही  Extra Classes  घेत होत्या. केंव्हाही क्लासेस, केंव्हाही  Laboratory, Wards, Out Patient Department, ह्यांच्या सहाय्याने विद्यार्थ्याना बालरोगाविषयी मार्गदर्शन करीत असत. विद्यार्थी देखील त्यांच्याबद्दल सतर्क होते. मिळणारय़ा प्रत्येक क्षणाचा ते उपयाग करुन घेत. ज्या ज्या वेळी जमेल, कॉलेजमधला प्रत्येक विद्यार्थी डॉ. नाडकर्णीचे कोठे लेक्चर आहे याची नोंद ठेवत होता. सर्व विद्यार्थी अटेंड करण्याचा प्रयत्न करीत असे.

विद्यार्थ्यावरचे, शिकवण्यावरचे प्रेम, आपलेपणा, तगमग, ध्यास हे त्यांचे गुणधर्म दिसले. कोठेही राग नाही. तिटकारा नाही. कंटाळा नाही. शिक्षकी व्यवसायातील एक आदर्श व सन्मानित व्यक्तीमत्व.

प्रत्येक शिक्षक  ज्या स्थरावर शिकवण्याचे कार्य करतो, हे त्याचे ज्ञानदान असते. त्या वेळच्या त्या स्थराच्या विद्यार्थ्यासाठी तो ज्ञानानी परिपूर्ण असतो.  विद्यार्थ्याला शिक्षक किती ज्ञानी आहे, ह्याच्याशी कांही घेणे वा देणे नसते. देणारय़ाची क्षमता केवढी ह्यापेक्षा, तो ते ज्ञान विद्यार्थ्यांच्या समज बुद्धीत कसे घालतो, ह्यातच त्या शिक्षकांचे यश असते.

डॉ. देशमुख हे प्रचंड ज्ञानी असले, तरी मला डॉ. मँडम नाडकर्णी खरय़ा ज्ञानदात्री वाटल्या.                 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                              

प्रेम- अहंकाराचे अंकुरण

जीवनाच्या रगाड्यातून

प्रेम- अहंकाराचे अंकुरण

संध्याकाळची वेळ होती. घराजवळच रेल्वे स्टेशन. तेथे रेल्वे रुळाच्या एका बाजूस असलेल्या दगडावर बसलो होतो. समोर रेल्वेचे ७-८ मार्ग आणि त्यावरुन जाणाऱ्या येणाऱ्या रेल्वेगाड्या बघताना करमणूक होत होती. तसा तो भाग निर्मनुष्य.

         अचानक माझे लक्ष वेधलं गेल ते थोड्याशा अंतरावर खेळणाऱ्या कांहीं शाळकरी मुलांवर. पांच सात मुले पळापळी, पकडा पकडी, मस्ती करीत होती. मला त्यांच्या खेळामध्ये थोडासा विचित्रपणा दिसून येत होता. रेल्वेरुळाखाली टाकलेल्या खडीचे दगड उचलून ते रेल्वेच्या हेडवायरला नेम धरुन मारीत होते. कुणाचा अचूक नेम लागतो, ह्याची त्यांची चढावोढ लागलेली दिसून येत होती. बहूतेक नेम चुकत होते. परंतु रेल्वेरुळामध्ये लहान लहान खडीचे बरेच दगड होते. ते त्या दगडांचा सर्रास वापर करुन त्या हेडवायरला लक्ष्य करीत होते. त्याच्या दिशेने दगड फेकीत होता. सारा खेळ भयानक होता. तो रेल्वेरुळ मार्गाला घातक देखिल होता.  दूर अंतराहून मी हे सारे बघत होतो. मी बेचैन झालो. त्या मुलांच्या खोडकर खेळण्यावर अंकूश ठेवण्यासाठी जवळपास कुणीही दिसून येत नव्हते. शेवटी आपणच त्या विचित्र खेळाला टोकावे, मुलांना समज द्यावी ह्या उद्देशाने मी उठलो.

            मुले थोड्याशा अंतरावर होती. मी दुरुनच ओरडलो.  “ये मुलानो, काय चालले आहे ?, रेल्वे मार्गाचे व हेडवायरचे नुकसान करु नका. जा धरी जा आता. ”    त्यांचे लक्ष माझ्याकडे जाताच त्यानी आपला खेळ बंद केला. मी त्याना हाताने जा म्हणून खुणावत होतो. अचानक त्याच्यातील एकाने पुढे येवून हातातील दगड माझ्याच दिशेने भिरकावला. मी ओरडून त्यांच्यावर रागावलो. परंतु आश्चर्य म्हणजे ती मुले निघून जाण्याऐवजी, सर्वांनीच हाती दगड घेवून ते माझ्याच दिशेने फेकूं लागले. एक अनपेक्षित व भयावह परिस्थिती निर्माण झाली. शेवटी मला माझे वय आणि शक्तिच्या मर्यादा जाणून, मीच तेथून माझा पाय काढता घेतला.

               लहान शाळकरी मुले. खेळकर वय. परंतु त्यांच्यामधली विध्वंसक वृत्ती बघुन मी चक्रावून गेलो. असे म्हणतात की प्रेम आणि अहंकार ह्या फक्त दोन स्वभावगुणधर्माचे रोपण हे जन्मापासूनच निसर्ग करीत असतो. इतर गुणधर्म त्यांच्या पासूनच उत्पन्न होत असतात. चांगला स्वभाव, चांगल्या वृत्ती, सद्सदविवेकबुद्धी अशा गुणांची वाढ ह्या प्रेमाच्या बिजामधून होत असते. त्याचप्रमाणे राग लोभ मोह इत्यादी षडरिपूं वा विद्धवंसक वृत्तिंची वाढ ही अहंकार ह्या मुळ स्वभावापासूनच होत जाते. जीवनचक्रामध्ये अत्यंत प्रभावी, परंतु गरजेचे असलेले हे दोन स्वभावगुणधर्म प्रेम व अहंकार होत. ह्या जीवन नाण्याच्या दोन बाजू असतात. खेळातल्या चितपट ह्या संकलपणेप्रमाणे जीवनाचा मार्ग ते आखत असतात. कधी अहंकाराचा तर कधी प्रेमाचा विजय होत असताना आपण बघतो. निसर्गाचे एक वैशिट्य म्हणजे तो प्रत्येकाच्या जीवनाच्या अंतीम टप्यावर, प्रेमाचाच विजय नोंदवितो. आजची ही खट्याळ वाटणारी मुलेही निश्चीतच स्वभावानी बदलतील ह्याची मला खात्री वाटते. 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०