Monthly Archives: मार्च 2017

उतारवयांत जगतांना!

उतारवयांत जगतांना!

वृद्धापकाळ जीवनामधला अंतीम टप्पा. जणू जीवनाची संध्याकाळ. एका चक्रमय जीवनाचा शेवट होण्याचा पूर्वकाळ. समिश्र अशा भावनांचा उहापोह करण्याची वेळ. न जाणो एक विचार मनांत येतो की ह्या वयाकडे आदर भावाने बघण्या ऐवजी, गमतीदारपणाची हास्यास्पद वाटणारे वय, एक संभ्रमी अवस्था, समजली जाते. ज्याला थोडासे कुत्सीतपणाने बघीतले जाते. कदाचित् वाढत्या वयानुसार एका स्थरानंतर निर्माण होणारा शारिरीक विकलांगपणा, विसराळूपणा, हे कारणीभुत असावे.
त्यानी आपल्या पूर्व जीवनांत पहाडा एवढे कर्तव्य केलेले असेल. काहींनी खेळाचे मैदान नेत्रदिपकाने गाजविले असेल. कित्येकांनी आपल्या कलेने अनेकांना मंत्रमुग्ध केले असेल. आनंदाचा ठेवा ओंझळभरुन वाटला असेल. अशा व्यक्तीनासुद्धा ह्या काळातून जाताना बरेचसे सहन करीत जावे लागते. त्यांच्या तारुण्यातील उज्वल काळानी त्यांच्या म्हातारपणातील उणीवांवर पांघरुण घालण्याची असमर्थता दाखविली आहे.
जीवन व मृत्यु हे जेवढे सत्य आहे, तेवढेच म्हातारपण हे न टळले जाणारे एक आयुष्यातील सत्य जीवन आहे. जे सत्य असते ते ईश्वरांचे प्रतीक असून ते मान्य करताना त्याचे स्वागत झाले पाहीजे. जीवनाचा शेवट गोड व आनंदी करावयाचा असेल तर वृद्धापकाळ जीवनामधला अत्यंत महत्वाचा काळ समजला पाहीजे.
जीवनातील महत्त्वाचे टप्पे आहेत बालपण, तारुण्य, प्रौढत्व आणि म्हातारपण. ह्यात खऱ्या अर्थाने आतिशय आनंददायक काळ म्हणजे वृद्धत्वाचा. परंतु हे केवळ त्याच वेळी शक्य आहे. जेंव्हा सुरवातीपासूनच ह्या काळाची जाणीव ठेऊन तुम्ही तुमचे आयुष्य मार्गक्रमण कराल.
मला उत्कृष्ठ खेळाडू, कलाकार, गायक, चित्रकार, वा कोणत्याही क्षेत्रामधील मान्यताप्राप्त नागरिक बनायचे आहे. हे तुम्ही बालवयांत अथवा तारुण्यांतच ठरवता वा योजता. त्यासाठी सर्व प्रकारे पोषक वातावरण निर्मिती करता. सर्व डावपेच लढून. अडचणीवर मात करुन आपले ध्येय साधण्याचा प्रयत्न करता. त्याच प्रकारे वृद्धापकाळाच्या स्वागतासाठी योजना करवी. त्याच्या स्वागतासाठीचा अभ्यास केलेला असावा. यामध्ये असेल तुमची वैयक्तीक क्षमता, झेप घेण्याची योग्यता, कौटूंबीक परिस्थीतीची जाणीव, सामाजीक धोरणांचा पूर्णपणे विचार , आणि देशहीत. सर्व बाबीवर वृद्धत्व सदैव अंतरमनाच्या स्थरावर असावे. ( In Subconscious level)
१- प्रकृतिस्वास्थ हे नियमीत व्यायाम व योग्य आहार ह्याचीच देण असते. धावपळीच्या जीवनामध्यें त्याची हेळसांड होणे शक्य असते. हे सतत ध्यानी असावे. सुदृढ प्रकृती हीच म्हातारपणांतील प्रमुख बाब ठरते. योग्य साधा व सर्व घटक खाद्यपदार्थानी परिपूर्ण आहार नियमीत घेण्याची काळजी व सवय ठेवावी. तो सकस व समतोल असावा. प्रसंगानुसार खाण्यातले बदल चवी आवडी इत्यादी ह्या येतातच. परंतु तुम्हास सतत जागृत राहणे फार गरजेचे असते.
खाण्यापिण्यातील मौजमजा आणि सवयी ह्यातील फरक जाणण्याच्या वैचारीक पातळीवर लक्ष नेहमी केंद्रित असावे. खाद्यामधल्या विवीध पदार्थांचे पचन शरिर ठरावीक वयापर्यंत सहज करु शकते. मात्र उतार वयांत त्याचे दुष्परीणाम उभारुन येतात. ते योग्यरीतीने जाणले पाहीजे. तेलकट तुपट चमचमीत पदार्थ, जास्त गोडीचे अंबट, तुरट हे पचनास कठीण, त्यांचा उपयोग कमी व्हावा. द्रव, पाणी भरपूर प्रमाणात घ्यावे.
२- आर्थिक स्वावलंबन
स्वाभिमानाने आणि स्वतंत्रपणे जगण्यासाठी बदलत्या काळानुसार आर्थिक स्वावलंबन हा आयुष्य सुखकर ठेवण्यातील महत्वाचा घटक असेल. आर्थिक बळ, त्याची जाण व त्याप्रमाणे योजना आखणे अत्यंत गरजेचे ठरते. पैशाची आवक बंद होणे वा घटणे हे तुमच्या धावपळीच्या शक्तीवर ठरते. जी वयोमानानुसार घटणारच. औषधपाणयाचा वाढता खर्च ही अत्यांत महत्वाची गोष्ट असते. भारतीय ज्येष्ठांचे वयोमान आता सत्तरीपर्यंत सहजगत्या गेलेले आहे. इतर खर्च जसे खाणे पिणे कपडालत्ता हे कदाचित् कमी होऊ शकतील. वेळ आल्यास आपले ताट इतरांना द्या. परंतु पाट केंव्हाच सोडू नका. असे कौटूंबीक जीवनाच्या अभ्यासकांचे मत आहे.
वयाची साठी येण्याच्या आधीच संसारीक चक्रातले जे सर्व सामान्य प्रश्न प्रत्येकाला सोडवावे लागतात. त्याची शक्यतो उकल करणे चांगले. जसे मुलां/मुलींचे शिक्षण, नोकरी वा उद्दोग आणि योग्यतेनुसार कमाई इत्यादी. ह्या कदाचित् मुलभूत समस्या असतील वा प्रत्येकांच्या जगण्याच्या पद्धतीनुसार वेगवेगळ्यादेखील असू शकतील. दैनंदीन, मासिक, प्रासंगिक असे नियमीत खर्च होत राहतात. त्याची पद्धतशीर व्यवस्था अथवा योजना फार पुर्वीच करावी लागते. बॅंक, पोस्ट अथवा असाच संस्था तुमच्या ठेवीवर व्याज देते. विश्वासु व योग्य असा संस्थामध्ये गुणतवणूक करावी. तुमची आर्थीक पुंजी हेच तुमचे जगण्याचे साधन व समाधानाचे बळ असते. शासकिय वा सामाजिक बदलावर नियमीत लक्ष्य ठेवावे. प्रश्न निर्माण झाल्यास, कदाचित् सुटले जातील. परंतु उतारवयांत सहनशक्ती कमी होत गेल्यामुळे, मानसिक तणाव येत जातो. शरीरास हे हानी कारक ठरते. सतत सतर्क असण्याची वृत्ती अंगी बाळगावी.
३ छंद जोपासणे गरजेचे.
कांही छंद जसे वाचन, लेखन, चित्रकला, हस्तकला, संगीत, गायनकला, वाद्यकला, हे जोपासावे. घरगुती खेळ अथवा मन रमविणारे, कोणतेही नाद हे बालपणीच वा तरुणवयातच जोपासावे. जर तुम्हाला अंतर चेतना Inspiration असेल तर नशीबवानच. परंतु जर आवड वा रुची नसेल तरीही अशा सवयी जोपासाव्या. वृद्धापकाळांसाठी भरपूर वेळ मिळतो. धावपळीचे जीवन संपते. आणि वेळ कसा व्यतीत करावा ही सर्व साधारण समस्या उभी राहते. तुमचे असलेले छंद ह्यावेळी तुम्हास साथ देतील. मी हे त्या वयांत गरजेनुसार करील ह्या समजुतीला कोणताच अर्थ नसतो. ह्याची देखील योजना असावी. आवड निवड ह्या निर्माण करता येत नाही. त्याची बिजे पूर्व आयुष्यातच रोवावी लागतात.
ह्याच प्रकारे वृद्धत्व तर येणारच. तरी देखील, त्याची तयारी पूर्व नियोजन करुन केली जात नाही. आता मी निवृत्त झालो. म्हातारा होत आहे. ह्या विचारांनी त्याला सामोरे जाण्याचा सर्व साधारण प्रघात बनू पाहात आहे. जसे घरी अचानक आलेल्या पाव्हण्यांचे स्वागत आणि योजना आखून आलेल्या पाव्हण्यांचे स्वागत, ह्यांत निश्चीतच खूप तफावत असणार. दुसऱ्या प्रकारामध्ये आनंदा बरोबर योग्य स्वागताची जाणीव व समाधान असणार.
एका विद्वान व्यक्तीने एक प्रयोग सुचविला होता. मला वैयक्तिक खूप चांगला अनुभव आला. रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तीन गोष्टींचा विचार करावा.
१ दिवसभर मी काय केले. माझ्या हातून काय घडले. चांगले आणि वाईट वा अप्रिय गोष्टी. कांही वेळ त्यावर चिंतन करावे. त्यांत सुधारणा करणाचा संकल्प करावा. नंतर सर्व गोष्टी ईश्वराचे चरणी अर्पण कराव्यात.
२ येणारा उद्याचा दिवस चांगला जाऊन, आपल्याकडून चांगले काम व्हावे ही प्रार्थना करावी.
३ झोपण्यापूर्वी मृत्युची आठवण काढावी. मृत्यु हा तर निश्चित असतो. तो केंव्हातरी येणारच. त्याचे स्वागतपर विचार असावे. पण हे करताना त्याची भिती वा निराशेचा थोडा देखील विचार नसावा. एक आनंददायी समाधानकारक वातावरण निर्मिती व्हावी. मृत्यु येणार हे एक सत्य असले तरी माणसे त्याचा केंव्हाच विचार करीत नाही. व जे जीवन अनिश्चीत, असत्य असते, त्याचा मात्र सतत विचार होत असतो. मृत्युच्या चाहूलाची केवळ कल्पना मानसाच्या नितीमत्तेला खूप उंचावते. फक्त ती जाणीवपूर्वक असेल तर त्यातील भय भावना नष्ट झालेली असेल.
४ समाधानी वृत्ती
व्यक्तीला जे जीवन निसर्गाकडून मिळते, त्याची जाणीव प्रत्येकाला होतच असते. हाच खरा निसर्ग होय. तो स्वतःला पूर्णपणे जाणू लागतो. ह्यामध्ये प्रमुख समज येते ती वातावरण, परिस्थीती, स्थिती, आत्मशक्ती, क्षमता, अंतरचेतना, आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे ह्या सृष्टीवरील त्याची स्वतःची योग्यता. प्रत्येकने पांघरुन बघून आपले हातपाय पसरावेत म्हणतात ते याचसाठी. प्रत्येकाला दुरद्दष्टी दिलेली असते ती जगाचा आणि जगण्याचा अंदाज बांधण्यासाठी. ह्या पृथ्वीवर जन्मलो वाढलो, जगलो, सुखांचा शोध घेत घेत झगडलो, जे अंतीम मिळाले त्यामध्ये समाधानी झालो.
प्रत्येकाने ह्याच विचाराने आपली क्षमता पारखून जे निसर्गाने त्याच्या पदरांत घातले असेल त्यावर अत्यंत समाधानी राहावे.
५ मृत्युचे स्वागत.
जीवनाचा शेवट म्हणजे मृत्यु. हे एक अटळ सत्य आहे. ह्याची प्रत्येकाला जाणीव असते. त्या सत्याला मनापासून, अंतःकरणातून मान्यता द्या. त्याची वेळ देखील अनिश्चीत असते हे जाणा. परंतु निसर्ग तुम्हाला मृत्युच्या आगमनाची खूप आधीच चाहूल देत असतो. ती निर्भयपणे जाणून घ्या. त्याच्या स्वागताची तयारी ठेवा.
मृत्युला टाळण्यासाठी आपले सर्वस्व, आपल्या जीवनांत कमावलेली पूंजी वाया घालू नका. तुमच्या कष्टावर तुमच्यानंतर कुणी अवलंबून असतील तर तशी योजना करा.
तुमचे मृत्युपत्र योग्य विचार व भावनांची कदर करणारे असावे. संपत्तीची योग्यप्रकारे वाटणी करा. ज्यांत तुमच्या इच्छे बरोबरच अस्तित्वात असलेल्या कायद्याची पूर्ण कल्पना ठेवावी. कोणताही एखादा अट्टाहास, येणाऱ्या पिढीमध्ये तुफान वादळ निर्माण करु शकतो. ही समज ज्येष्ठांनी ठेवावी.
शेवटचे व महत्वाचे म्हणजे तुम्हाला मिळालेले जीवन फक्त एकदाच असते, ह्याची जाण असावी.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

त्या दुर्दैवी जीवांना दया- मरण द्या

त्या दुर्दैवी जीवांना दया- मरण द्या

मी बरीच वर्षे मनोरुग्णालयांत वैद्यकीय अधिकारी म्हणून, मनोरुग्णाच्या सहवासांत घलविली आहेत. ‘ मनोरुग्ण ‘ हा सर्वसामान्यजनांना विनोदाचा विषय असतो. हे एक कटू सत्य आहे. मनोरुग्णाकडे बघण्याचा मनोरंजनात्मक दृष्टीकोण सर्वसामान्यामध्ये आढळून येतो. तुम्ही वेड्याच्या सहवासांत आहात, तुम्हाला कोणता त्रास होतो कां ? तुम्हाला त्याची भिती वाटते कां ? ते दगड मारतात कां ? गाणी म्हणतात कां ? नाचतात कां, ते नाचत असताना करमणूक होत असेल ना ? त्यांची असंबद्ध भाषा ऐकून तुम्हाला गम्मत वाटत असेल नाही का ? कुणी स्वतःला श्रीमंत समजत तर कुणी अधीकारी वा नेता समजून तशा पद्धतीने हातवारे करुन बोलत असेल ? कुणी रडत असेल तर कुणी हसत असेल ? कुणी तासंतास एकाच ठिकाणी हलचाल न करता बसलेला असेल ? कुणी अंगावरचे कपडे काढून फेकून देत असेल नाही का ? कितीतरी वैचित्रपूर्ण वागण्याचे नमुने दिसत असतील ना ? अशा प्रकारचे अनेक प्रश्न विचारुन माहीती घेणारे अनेक भेटतात. आम्हाला पण एकदा मेंटल हॉस्पिटल बघावयाचे आहे. मिळेल कां त्यासाठी परवानगी ? इत्यादी. ह्या सर्व चौकश्यामध्ये जे दिसून येते ती केवल करमणूक, विनोद, मनोरंजनाची भावना. बंदीस्त झालेल्या प्राणी वा पक्षांच्या संग्रहालयाप्रमाणे.
त्यांचा काय दोष ?
दुर्दैवैने आणि नशीबाने त्यांच्यावर ‘ मनोरुग्ण ‘ ? होण्याची पाळी आणली आहे. नियतीच्या खेळाला बळी पडलेली ही मंडळी आहेत. ह्यांचा ह्यात काय दोष असेल ? गुन्हा असेल ? हे एक निसर्गालाच माहीत. कारण कुणीही मनोरुग्ण होऊ शकतो. कदाचित् सभोवतालच्या परिस्थितीमुळे मानसिक संतूलन बिघडलेल्या व्यक्तीला, ती परिस्थिती हानीकारक म्हणून बोट दाखविता येईल व तो योग्य प्रकारे सामना करु न शकल्यामुळे दोष देता येईल. परंतु कित्येक मनोरुग्णाच्या माहीतीनुसार त्याच्या जन्माच्या वेळची परिस्थिती, आई वडीलातील वा अनुवंशीक दुर्गुण, रक्तातील गुणदोष इत्यादी प्रामुख्याने कारणीभुत असलेले दिसतात. त्यावेळी ह्या रुग्णाबद्दल एक वेगळीच भावना येते की, ह्यात त्या रुग्णाचा स्वतःचा कोणता गुन्हा की ज्यामुळे त्याच्या नशिबी ‘मनोरुग्ण’ होण्याचे आले आहे. ? परंतु सामान्य माणसे मनोरुग्णाच्या, त्यांच्या मनोरुग्ण होण्याच्या कारणमिमांसेविषयी, परिस्थितीविषयी कुणीही फारसे खोलांत जाऊन तसदी घेत नाही. खरे म्हणजे त्यावर होणाऱ्या नैसर्गिक कोपाबद्दल कुणीही सहानुभूतीने विचार करीत असल्याचे दिसून आले नाही.
अर्थात ज्याच्या नात्यागोत्यामधली व्यक्ती मनोरुग्ण असेल व त्याना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रितीने मनोरुग्णाचा मानसिक वा शारीरिक त्रास होतो, त्यांची मात्र मनोरुग्णाकडे बघण्याची द्दष्टी निराळी असते. ज्याचे ‘ जळते त्यानाच कळते ‘ ह्या उक्ती प्रमाणे ते मनोरुग्णाकडे सहनुभूतीने बघतात. त्यांच्याविषयी चौकशी करतात. अशा रुग्णाच्या उपचारासाठी व आरोग्यासाठी ते उत्सुक असतात. ह्यात शंकाच नाही.
आजकाल बऱ्याच सामाजिक संस्था, समाजकार्य करणाऱ्या व्यक्ती निरनीराळ्या सामाजीक समस्यांकडे आपली शक्ती, कौश्यल्याचा वापर आणि सहानुभूती व्यक्त करतात. जसे कुटूंब कल्याण, बाल कल्याण, वृद्धाश्रम, अंध व्यक्ती, अपंग, अंधश्रद्धा निर्मुलन, व्यसनमुक्ती, एड्स विषयी जाण निर्माण करणे, स्त्रियांवरील अत्याचार, इत्यदी समस्यांचा सामाजीक संस्था अभ्यास करुन त्याबद्दल निरनीराळ्या प्रचार माध्यमाद्वारे सर्व नागरिकांना त्याची माहीती देतात. चर्चासत्र होऊन सहानुभूतीपूर्वक मदत करतात. मात्र दुर्दैवाने अशा पद्धतीने मनोरुग्णाबद्दल लोकजागृती करण्याचे प्रयत्न क्वचितच दिसून येतात.
सहानुभीतीची गरज.
ज्या कुटूंबात दुर्दैवाने एखादा मनोरुग्ण असेल, त्याचा त्या कुटूंबाला त्रास तर होतोच. परंतु सर्व शेजारी पण त्याच्या विषयी त्रस्त झाल्याची भावना व्यक्त करतात. त्याला कुणाचीच सहानुभूती मिळत नाही. अशा मनोरुग्णास कसेही करुन त्या वातावरणातून काढून मनोरुग्णालयांत दाखल करण्याचा प्रचत्न होतो. ह्याचा अर्थ त्या मनोरुग्णाच्या विक्षिप्त वागण्याकडे दुर्लक्ष करुन त्याला घरीच ठेवावे असे नाही. परंतु त्याच्या आजाराकडे इतर आजारा प्रमाणे बघीतले जात नाही. एक ब्याद म्हणून समजले जाते. शिवाय अशा मनोरुग्णाला मनोरुग्णालयांत दाखल केले की, संबंधित नातेवाईकापैकी बहूतेक मंडळी त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करतात. त्याच्या भेटीस येण्याचे टाळतात. तो बरा होत असेल व त्याला घरी नेण्यास सांगीतले तरी कित्येकजण ते टाळतात असे दिसते. मनोरुग्णास उपेक्षित वागणूक दिल्याचे जाणवते. ह्या प्रक्रियेमध्ये कोणतीही सामाजिक संस्था भाग घेऊन मनोरुग्णाच्या पुनर्वसनाकडे फारसे लक्ष देत असल्याचे दिसून येत नाही. हे चित्र निश्चितच निराशजनक आहे.
मनोरुग्णाचे प्रकार
मनोरुग्णालयांत येणाऱ्या रुग्णांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे रोगी आलेले दिसतात. १) कांही रोगी येतात. उपचारानी बरे होतात व पुन्हा समाजात कार्याकत होतात. २) कांही रोगी अल्पकाळासाठी बाहेर चांगले राहू शकतात. परंतु पुन्हा आपले मानसिक संतुलन बिघडल्यामुळे मनोरुग्णालयांत येतात. ठराविक काळानंतर त्यांचे येणे जाणे चालूच असते. तिसऱ्या प्रकारातील रुग्णामध्ये बुद्धीची वा मेंदूची जन्मापासूनच परिपूर्णता नसते. आजच्या घडीला असलेल्या उपचारपद्धती त्यांच्यात मुळीच सुधारणा करु शकत नाही. असे मनोरुग्ण हे मनोरुग्णालयांत वर्षानुवर्षे जगत असलेले दिसतात. ह्या वर्गामध्ये असलेल्या रुग्णाची संख्यापण बरीच आहे. कित्येकजण तर २०ते ३५ वर्षे ह्या रुग्णालयांत आहेत. कुणी तरी त्यांना येथे आणून सोडले. कुणाही त्याना बघण्यासाठी येत नाही. त्याना आणताना दिलेल्या पत्यावर कुणीही मिळत नाही. कित्येकजण वेडे, अज्ञानी, न बोलणारे, रस्त्यावर पडलेले, अशा कितीतरी वेगवेगळ्या परिस्थीतीत, लहान वयांत पोलिसानी आणलेले, रुग्ण आहेत की ज्यांचा ठावठिकाणा नाही. मग त्याना कोण बघणार. त्याना कुणाकडे सोडले जाणार. ही सर्वजण मंडळी गरीब आहेत म्हणून नव्हे, तर ते मनोरुग्ण आहेत म्हणून. आज तरी अशा असंख्य रुग्णाना सरकार आसरा देत आहे. येथे मानसिक रोगतज्ञ आहेत. वैद्यकीय मंडळी आहेत. परिचारक वा परिचारीका, आणि इतर सेवक मंडळी आहेत.
सारेजण आपल्या शक्ति व कर्तव्यानुसार काळजी घेतात. त्या सर्व मनोरुग्णाना जगवितात. म्हणूनच आज कांहीजण ३० वर्षापेक्षाही जास्त काळ मनोरुग्णालयांत रुग्ण म्हणून जीवन जगत आहेत. त्यांच्या शारीरिक प्रकृतीची, खाण्यापिण्याची, इतर नैसर्गिक विधींची काळजी घेतली जाते. आणि म्हणून हे रुग्ण जीवन जगत आहेत.
भयानक वातावरण
मी येथे उल्लेख करीत असलेल्या माझ्या विचाराला प्रथम समजा. ते खो़डण्यापूर्वी, टिकात्मक दृष्टीकोण घेण्यापूर्वी, सहानुभूती, भूतदया इत्यादी उच्यप्रतीच्या मुल्याधिष्टीत भावनिक विचार करण्यापूर्वी त्यांच्या जीवनाचा अभ्यास करा. त्या विरोधक व्यक्तीनी मला प्रत्यक्ष भेटून मनोरुग्णालयातील त्या मनोरुग्णाच्या सहवासांत अल्पसा काळ घालवून स्वतः हे जाणून घेऊन मगच माझा विचार योग्य आहे कां हे ठरवावे. मी हे त्या रुग्णाबद्दल बोलतो ज्यांची परिस्थिती जनावरापेक्षाही वाईट आहे. त्याना फक्त मानव म्हणावे लागते कारण ते माणूस म्हणून जन्मले आहेत. त्यांच्यात बुद्धीचा भाग मुळीच नसल्याप्रमाणे असतो. त्याना भावना विचार इत्यादी असतात हे समजण्यापलीकडचे असते. कित्येकजणाना तर पाणी पाजावे लागते. जेवण चक्क भरवावे लागते. पाणी वा जेवण जरी समोर ठेवले तरी ते घेणार नाहीत. दिले तर ते सांडून देतील. अंगावर कपडे ठेवणार नाहीत. कुठेही संडास लघवी करतील. सारे शरीर बरबटून घेतील. जनावराप्रमाणे दुसरा रोगी ते चाटेलही. कोठेही ओकतील. झोपतील. बैल म्हशींच्या गोठ्यांत चांगले वातावरण अशू शकेल, इतके भयानक वातावरण ह्या रोग्यांच्या सहवासांत असते. ह्याचा अर्थ त्यांच्याकडे मनोरुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असेल असे नाही. अशा रोग्यासाठी चार चार कर्मचारी एका एका वॉर्डत असतात. रोग्याना खाऊ-जेऊ घातले जाते. नियमित वेळवर पाणी दिले जाते. स्वच्छता राखली जाते. स्नान घातले जाते. कपडे बदलले जातात. ज्याप्रमाणे आई आपल्या लहान मुलाचे सर्व कांही करते,त्याप्रमामेच येथील कर्मचारी रुग्णासाठी सर्व ते करीत असतात. येथे रुग्णाच्या शारिरीक वाढीचा प्रश्नच उदभवत नाही. परंतु ते मेंदूच्या विकारांनी त्रस्त आहेत. एक कधीही बरी न होणारी नैसर्गिक व्याधी. ते आहेत तसेच जगणार. एका कष्टमय, भयानक विकलांग परिस्थितीमध्ये जीवन कंठणार. फक्त अन्न-पाणी मिळते म्हणून जगणार. ह्या पलीकडे कोणतेही सत्य द्दष्टीक्षेपांत नाही.
केवळ भोग भोगणे हेच जीवन
जेंव्हा असल्या संपूर्ण वाया गेलेल्या रुग्णांना वा बऱ्या होऊ न शकणाऱ्या रुग्णाकडे बघीतले जाते तेंव्हा विचार पडतो की, ह्यांचे जीवन कशासाठी ? हे केवळ मनुष्य आहेत म्हणून ? त्याना कायद्याने कुणी मारु शकत नाही म्हणून ? नरकवास भोगणाऱ्या ह्या मानवाकडे वेगळ्या भुमिकेतून कुणी बघणार नाही कां ? त्यांच्या पोटांत दुखत असेल, त्यांना असंख्य वेदना होत असतील, तर कळण्यास मार्ग नाही. ते आपले दुःख व्यक्त करण्यास पूर्णपणे असमर्थ आहेत. केवळ भोगणे हेच त्यांच्या नशीबी आलेले दिसते. एक अत्यंत असमाधानी, भयावह, आणि ज्याची उकल करण्याची शक्ती कुणांत नाही, अशी ही परिस्थिती. त्यांच्या ह्या नर्क यातना त्यांच्या मृत्युमुळेच सुटलेल्या आम्ही बघतो.
स्वतंत्र यंत्रणा असावी
आपण सारी सुसंकृत, शिक्षित आणि समाज मुल्यांची जाण असलेली माणसे आहोत. ह्या अशा दुर्दैवी व्यक्तीसाठी दयामरण हेच आजच्या घडीला उत्तर आहे. त्याचा प्रत्येकाने विचार करावा. सरकारने अशा दुर्दैवी जीवांची सुटका भूतदया ह्या जाणिवेमधून करावी. अशासाठी एखादी स्वतंत्र यंत्रणा असावी. ज्यामध्ये मानसोपचार तज्ञ, उच्य न्यायालयाचे न्यायाधीश, पोलीस अधिकारी, प्रतिष्ठीत बुद्धीवादी नागरीक, समाजसेवक इत्यादींचा समावेश असावा. सर्वानी स्वतंत्रपणे अभ्यास करुन आपला अहवाल सादर करावा. दयामरण मान्य करण्याचे त्यानुसार ठरवावे. केवळ विरोधासाठी विरोध करु नये. असा खऱ्या दुर्दैवी व्यक्तीची मुक्तता ही त्यांच्या आत्म्याला मुक्त केल्या सारखे ठरेल.

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

एक जुनी आठवण

एक जुनी आठवण

डॉ. भगवान नागापूरकर याना मातृशोक

जीवनाच्या रगाडयातून ह्या मराठी ब्लॉगचे लेखक –
डॉ. भगवान नागापूरकर यांच्या मातोश्री ति. लक्ष्मीबाई केशवराव नागापूरकर यांचे नुकतेच निधन झाले. मृत्यु समयीं त्या औरंगाबादीं होत्या. सर्व मुले मुली नातवंड पतवंड सख्येनातेसंबंधी, मित्रपरीवार ह्यांच्या प्रचंड उपस्थितीने त्याना शेवटचा निरोप दिला. अतिशय शांत आणि धीरोदात्त वातावरणात त्यानी शेवटचा श्वास घेतला. त्याना शेवटपर्यंत कोणतीही व्याधी जडलेली नव्हती. जीवनाचे शतक अर्थात १०० वर्षे पूर्ण करीतच त्यानी सर्वांचा निरोप घेतला. जीवनांत त्यांचे व त्यांचे पति कै. केशवराव नागापूरकर यांचे सामाजिक कार्य महान होते. मृत्युनंतर त्यांची नोंद अनेक दैनिकांनी घेत संपूर्ण बातमी वर्तमान पत्रांत दीली. त्याच प्रमाणे स्थानिक लोकसभा सदस्य माननिय श्री. चंद्रकांत खैरै ह्यानी व्यक्तीशः सांतवनपर संदेस दिला. अनेक प्रतिष्ठीत व्यक्ती , समाजसेवक, नगरसेवक यांनी येऊन नातेवाईकांचे सांतवन केले.

कै. ति. लक्ष्मीबाई केशवराव नागापूरकर ह्यांच्या संबंधी एक लिखान त्यांचीच लहान मुलगी, लेखक साहित्तीक, उच्य शिक्षीत सौ. सुलोचना कुलकर्णी हीने पाठवले आहे. ते येथे सामान्यासाठी देत आहे.

माझी आई लक्ष्मीबाई उर्फ ठकुताई

‘ स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ‘ आमची आई आम्हाला सोडून गेली आणि खऱ्या अर्थाने वरील वाक्याची प्रचिती आली. आई म्हणजे प्रेम, त्याग, वात्सल्य, करुना, यांचे मुर्तीमंत रुप आहे. आज मात्र सर्व भावंडे खऱ्या अर्थाने पोरके झाले.
माझी आजी आणि आजोबाना वाटले की, आपल्याला मुलगाच होणार, पण मुलगी झाली. माझ्या आईने सर्वाना ठकविले म्हणून तिचे नांव ‘ ठकु ‘ असे ठेवण्यांत आले. अर्थात हे घरांतले. खरे नांव होते लक्ष्मीबाई. लहानपणापासून अतिशय हूशार, चाणाक्ष, आणि कर्तव्यदक्ष आशी माझी आई होती. खेड्यांत बालपण गेले. १०० वर्षा पूर्वीचा काळ होता तो. शिक्षण फक्त चौथी पर्यंत झाले. प्रकृती अतिशय उत्तम होती. लहानपणीच धावपळ, घोडदौडसुद्धा, खेड्यामधले शारिरीक खेळ व व्यायाम ह्यात प्राविण्य मिळवले. सावळा रंग परंतु अतिशय बांधेसुद शरीर यष्टी लाभली होती. घरची लाभलेली वडीलोपार्जीत श्रीमंती. सर्वांत महत्वाचे म्हणजे लक्ष्मीबाईचे अर्थात ठकुचे नशिब फार बलवत्तर होते. तीला तरुण तडफदार शिक्षीत भव्य व्यक्तीमत्वाचा सहकारी मिळाला. त्यानी पुढे शासकिय सेवेत मराठवाड्यांत प्रचंड नांव लौकीक कमविले. त्यांचे नांव होते कै. केशवराव कुलकर्णी नागापूरकर. ते डेप्युटी कमिशनर म्हणून औरंगाबाद येथे कार्यारत होते.
एक फार जुनी घटना आठवली. मी ऐकलेली. पासष्ट वर्षापूर्वीची असावी.माझे वडील बिड जिल्ह्यातील माजलगांव येथे तहसीलदार ( मामलेदार ) म्हणून होते. गांवाच्या जवळून सिंदफना ही नदी वाहते. नदीला प्रचंड पूर आला होता. पाण्याने सर्व गावाला वेढा दिला होता. पाणी गांवात शिरले. कित्येक घरे पाण्यांत बुडू लागली. लोकांचे संसार उध्वस्त होऊ लागले. पाण्याची पातळी वाढण्याचे कांही केल्या थांबेना. आमचे घर आमच्या नशिबाने उंच टेकडीवर होते. परंतु एका स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्याचे घर, प्रचंड लोकांची गर्दी मदतीची अपेक्षा करित तेथे जमा झाली. तेथील जमलेल्या अनेक स्त्रीया माझ्या आईशी परिस्थीतीची चर्चा करु लागल्या. वादळ, वारा, पाऊस आणि पूर ह्यानी सर्व रहवाशी हैरान झाले होते. कोणताच मार्ग सुचत नव्हता. अशावेळी माणस ईश्वराचा आसरा घेतात. माझी आई सर्वाना घेऊन नदी किनारी गेली.

भक्तीभावाने तिची खणा नारळाने ओटी भरुन पुजा केली. सरीता देवीस शांत होण्याची प्रर्थना केली. सारेजण तेथेच बसून होते. चार तासांत दैवी चमत्कार झालेला दिसू लागला. पाणी प्रचंड वेगाने ओसरु लागले. गावांतील मंडळीना त्याक्षणी आमच्या आईत एक दैवी शक्ती असल्याचे भासले. एक वेगळाच मान तीला मिळू लागला. सकाळी पाणी खूपच ओसरले होते.
अंबेजोगाइला माझ्या आई-वडीलांच्या प्रयत्न्याने पहीली कन्या शाळा स्थापीली गेली. शाळेच्या पायाभरणी समारंभ माझ्या आईच्याच हस्ते झाला. आजही तेथील एका सभागृहाला त्यांचे नांव दिले गेले आहे.
खूप वर्षापूर्वीची एकलेली गोष्ट आठवली. गुलबर्ग्याला भारताचे पहीले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु आले होते. एका मोठ्या Project उभारणीचा पायाभरणी समारंभ होता.
तीन स्त्रीयांनी तीन रंगाच्या ( लाल-पांढरा-हीरवा ) वेगवेगळ्या नऊवारी साड्या परीधान केल्या होत्या. तीघीनी प. जवाहरलाल नेहरुना औक्षण करुन त्यांचे स्वागत केले गेले. ह्यांत माझ्या आईचा प्रमुख सहभाग होता. प. नेहरुनीही हात ऊंचावून आशिर्वाद दिले. तिच्या आयुष्यातील हा क्षण अत्यंत आनंदाचा होता.
माझे आजोबा (आईचे वडील) लवकर वारले. त्यामुळे छोट्या भावाची ( माझ्या मामांची ) सर्व जबाबदारी तिने पार पाडली. आपल्या मुलापैकी एक समजून त्याचा सांभाळ केला. बंधूप्रेम काय असते हे आम्ही तिच्याकडून शिकलो.
आमचे नागापूरकर कुटूंब हे एकत्र होते व आजही आहे. त्यामुळे घरामध्यें दीर, नणद, जावा, यांचे सर्वांचे संबंध अतिशय जीव्हाळ्याचे होते. आमच्या आईचे दोनही काकांवर खूप प्रेम होते. काकांनी मोठ्या वहीनीवर तितकेच प्रेम केले. आईला कधी अंतर दिले नाही. धाकट्या जावांवर बहीणीसारखे प्रेम होते. कंटाळा वा कामचुकारपणा हे शब्द तिच्या शब्दकोशांतच नव्हते. ती म्हणायची काम केल्यानी शरीर निरोगी राहते. त्यातूनच आपल्याला उर्जा मिळत असते. तिने तीच्या दोनही नणदेवर खूप प्रेम केले. तिच्यामते ‘सासर आणि माहेर’ हे तराजुचे दोन पारडे आहेत. त्याचा समतोल राखला पाहीजे.
‘ एकीकडे प्रेम आणि दुसरीकडे लोकेशन ‘
एकंदरीत तिच्या जीवनाचा प्रवास खुपच सुखांत, एश्वर्यांत झाला. शेवटपर्यंत लक्ष्मीने तिला साथ दिली. ती नुसतीच लक्ष्मीबाई नव्हती तर ‘ भाग्यलक्ष्मी ‘ होती. तिच्या मुलांनीही तिच्यावर खऱ्या अर्थाने प्रेम केले. सुनानी तिचा शब्द ‘ प्रमाण ‘ मानला जाई. डॉ. भगवान व डॉ. सौ. शालिनीवहिनीने तिला विमानातून यात्रा करुन आणली. सौ. पुष्पा वहिनी व सदूभाऊनी ‘ पुंडलीकासारखी ‘ सेवा केली. नातु जीवन व नात जयश्री तिचा शब्द झेलावयास सदैव तयार असत. नुकताच एक नातु चि. रवी ( अमेरिकेत स्थायिक ) पत्नी सौ. दिप्तीसह येथे आला व त्याने दोन मुलांच्या मौंजी पणजीच्या आशिर्वाद छायेत पार पाडल्या. शेवटच्या काळांत तिची लहान बहीण अर्थात चंदामावशी हीने तिची खूप सेवा केली.
खऱ्या अर्थाने ती भाग्यवान होती. सर्व पणतु चि. सार्थक, आदित्य, आणि आकाश ह्यांचा जन्मप्रसंगी ‘ सुवर्ण फुले वाहण्याचा ‘ धार्मिक कार्यक्रम सर्व नातेसंबंधाच्या उपस्थितीत पार पडला. तिचा
‘ सहस्र चंद्रर्शन ‘ हा कार्यक्रम देखील तिच्यांत आनंद व समाधान देऊन पार पडला. तिने नुकतेच जीवनाचे शतक अर्थात शंभर वर्षे पूर्ण केले होते. निसर्गाने मानव योनीसाठी जीवनाची जी शतकपुर्ती मर्यादा देऊ केलेली आहे, तीचा तिने हिम्मत आणि कष्टाने आदर केला. ती पूर्ण करुन त्या निर्सगाचा , त्या ईश्वराचा सन्मान केला. तिने जीवन सार्थकी घातले.
आमच्या सर्व परिवारातर्फे ती. आईला श्रद्धांजली अर्पण करते. ‘ परमेश्र्वर तिच्या आत्म्यास शांती देवो. ‘
आई तूझ्या प्रेमाची सदैव ऋणी
सौ. सुलोचना कुलकर्णी

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

” तन्मयता करी साकार “

” तन्मयता करी साकार ”

“नारायण” “नारायण” म्हणत श्री नारदमुनी श्री विष्णूना भेटण्यासाठी गेले. नारदानी विष्णूना अभिवादन केले. विष्णूनी हास्यमुखानी त्यांच स्वागत केल.
“हे महान ईश्वर जगदिशा आज मी माझ्या मनातली एक शंका घेऊन तुझ्याकडे आलो आहे. ” विष्णूनी हासत मानेनेच त्यांना मान्यता दिली.
“मी रात्रंदिवस सतत तुझ नामस्मरण करीत असतो. मी स्वतःला तुझा थोर परम भक्त समजतो. परंतु तुझे लक्ष्य इतर भक्तांमध्ये खूपच व्यक्त झालेले दिसते. माझ्याकडे तुझे दुर्लक्ष्य होत असावे अशी माझी आपली शंका. प्रभू मी काय करावे म्हणजे माझी शंका दुर होईल. ”
श्री विष्णू हासले. ” नारदा चल आज मी तुझी एक छोटीशी परिक्षा घेतो. त्यांत जर तु यशस्वी झालास तर तुला मी सर्वांत श्रेष्ठ भक्त ही उपाधी देईन. पाण्याने काठोकाठ भरलेले एक कटोर त्यानी नारदाच्या हाती दिले. जा ! ह्या पृथ्वी भोवती एक चक्कर मारुन ये. फक्त एकच अट. ह्या कटोऱ्यातून पाण्याचा एक थेंबही बाहेर पडता कामा नये. संभाळून ने. नारदानी कटोरे हाती घेतले. शांत मनाने कटोऱ्यातील पाण्यावर लक्ष्य केंद्रीत करीत त्यानी पृथ्वीची प्रदक्षीणा पूर्ण केली. अत्यंत आनंद व समाधानाने ते श्री विष्णूला पून्हा भेटले.
” नारदा मला खूप समाधान वाटले. तू अतिशय काळजीपूर्वक, मन एकाग्र करुन पृथ्वी प्रदक्षिणा केलीस. पाणी मुळीच हालले नव्हते. त्याचा एकही थेंब बाहेर पडला नाही. ” नारदाचे ह्रदय भरुन आले. ” परंतु खर सांगू नारदा. तू ह्या शर्यतीत हरलास. कारण जेवढा वेळ तू पाण्यावर मन एकाग्र करीत होतास, तुझ्याकडून नामस्मरणांत खंड पडला.
विष्णू लगेच नारदाला म्हणाले. “चल माझ्याबरोबर पृथ्वी लोकांत. तुला एक खरा भक्त दाखवतो. ” दोघानी साधूची वेशभूषा धारण केली. ते एका मंदीराजवळ आले. आंत चैतन्य महाप्रभू भजन करीत बसले होते. साधूना बघताच ते उठले. त्यानी दोघांचे स्वागत केले.
साधू वेषातील विष्णू म्हणाले ” तुमची भक्ती बघून आम्ही आनंदी झालो. प्रसन्नता वाटली. तुमच्या मनाची विचारांची लक्ष्य केंद्रीत करण्याची क्षमता आम्ही जाणली. तुम्ही आपले मन कसे एकाग्र करु शकता, हे आम्ही बघू इच्छीतो. त्यानी तोच साधा कटोऱ्यातील पाण्याचा प्रयोग चैतन महाप्रभूला करण्यास विनविले. मात्र येथे चक्कर फक्त त्या मंदीरा भोवती करण्यास सांगीतले. साधूना अभिवादन करुन ते अतीशय काळजीने पाण्यावर लक्ष्य केंद्रीत करीत निघाले. साधूवेषधारी दोघेजण मंदीराच्या दाराजवळ बसले.
बराच वेळ झाला. परंतु चैतन महाप्रभू मंदीर प्रदक्षिणा करुन आले नाही. दोघाना शंका वाटू लागली. ते उठले व त्यांचा मागोवा घेत मंदीराच्या मागे गेले. जे त्यानी बघीतले त्याचे दोघाना आश्चर्य वाटले. श्री चैतन महाप्रभू तो कटोरा हातात घेऊन हातवारे करुन भजन म्हणत, नाचत तल्लीन झालेले होते. कटोऱ्यातील पाणी सर्वत्र विखूरले गेले होते. हाती रिकामा कटोरा, मन ईश्वराचे चिंतन,मनन, भजन यानी भरले होते. सर्व शरीर बेभान होऊन नाचत होते. हे दृष्य बघताना नारदांच्या डोळे पाणावले होते.
ईश्वर भक्तीत ” तन्मयताच करी साकार ” ह्याची प्रचीती त्याना त्या भक्ताकडून आली.

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com