Monthly Archives: जानेवारी 2011

सर्प आणि उंदीर यांचे द्वंद

 
हैदराबाद येथे एक सर्पालय बघण्यास गेलो होतो. अनेक जातींचे सर्प
कांच- घरात ठेवलेले होते. त्यांना खेकडे, बेडूक, उंदीर, वा छोटे जिवंत  प्राणी  खाण्यासाठी सापाच्या दालनात सोडले जात होते. फक्त भुकेला सर्प हा आपल्या  भक्षावर तुटून पडतो.  नसता तो भक्ष जीवना मारत नसतो. एक सर्प  दालनात  एका उंदराला सोडले होते.  सर्प बराच मोठा होता. सापाचे हालके  हालकेपुढे  जाणे, उंदराच्या दिशेने झेप घेणे, उंदराला दंश  करणे, त्याला जायबंद करणे, त्याच्यावर वेटोळे घालून त्याला खीळ खिळा करणे, व मग गिळणे ह्या  क्रिया तो करतो. असाच प्रयत्न हा सर्प करीत होता. त्याच वेळी उंदीर जीव वाचवण्यासाठी चपळाईने पळणे, सापाची पकड चुकवणे, त्याचा नजरेच्या टापूतून हालने, ह्या प्रयत्नात होता. 
एक जीवन मरण्याचा  संघर्ष चालू असलेला दिसत होता. निसर्गाने प्रत्येक प्राण्याला स्वत: चे रक्षण  करण्याची कला दिलेली असते. तो एक दिलासा असतो. जो जगण्यासाठी धडपडेल तोच जगेल. Survival  of  the  fittest  म्हणतात  ते हेच. निसर्ग तुमच्या प्रयत्नांना सतत सकारात्मक साथ देतो. कित्येकदा वाघ सिंह  यांच्या तावडीत सापडलेल्या हरिणांनी आपली सुटका  करून घातलेली  आम्ही Discovery  वा Animal  Plannet ह्या दूरदर्शन चांनेलवर बघितले. पाण्यामध्ये प्रचंड मगरीने पकडलेला झेब्रा देखील आपल्या तडफदार  धडपडीने ती मगरमिठी सोडू शकला हे पण बघितले. चंचलता, चपळाई, शिकारी प्राण्याचा लक्षवेध  चुकवण्याची कला, प्रासंगिक आक्रमकता,  धैर्य, चातुर्य हे सारे सुप्त रूपाने  प्रत्येक प्राण्यात असतात. हे गुणधर्म  संकट काळी  जागृत  होतात.  नेहमीच्या अंग शक्ती पेक्षा कितीतरी पटीने त्याची शक्ती  उत्येजीत  होती. शरीराच्या प्रत्येक नस नसामधून  त्याचा ओघ निर्माण होतो. हा परिणाम इच्छित ( Volentary action ) नसून आंतरिक चेतना अर्थात Instinct Relex  Action असते. अपोआप उद्दुक्त होते. ही सारी निसर्गाची बचावात्मक योजना होय. कोंडून ठेवलेली भित्री  वा पळपुटी  मांजर तिच्यावर  जीवघेणा हल्ला होत आहे हे समजताच  तिच्यामध्ये  विलक्षण   शक्तीचा ओघ निर्माण होतो. ती झेप घेऊन त्या व्यक्तीचा गळा पकडून  त्याचाच जीव घेण्यास  सक्षम होते.   ही स्व रक्षणाची किमया. 
शिकारी साप आणि शिकार उंदीर ह्यांचे द्वंद्द चालले. चुरस अत्यंत  रोमांचकारी  व उत्च्सुक्ता वाढवणारी होती. एक बलाढ्य मारक  आणि समोर अशक्त  अश्या  दोन प्राण्याची लढत. उंदरासाठी जीवन मरणाचा संघर्ष.  तो सापाच्या प्रत्येक  सूक्ष्म हालचालीचा वेध घेत होता.  सापाने दंश  करण्यासाठी  मारलेला  टोला  चपळाईने चुकवत होता त्याच वेळी सापाचे तोंड आपटून दुखवले  जाई  कांही  वेळाने ते रक्त बमबाळ झाले. एक विस्मयकारक  प्रकार  घडला. उंदरावर  सापांनी आपला जबडा उघडा करून एक दंश टोला मारण्याचा प्रयत्न केला.  त्याच क्षणी उंदराने उलटवार केला. सापाचा  उघडलेला  खालचा जबडा झटकन आपल्या दातांनी गच्च  पकडला.  उंदराला छोटे छोटे दात असतात. त्याचा उपयोग पकडी मध्ये झाला. उलट सापाला तसे चावण्याचे  दात नसतात. तो फक्त भाक्षाला गिळतो. येथे खालचाच जबडा  उंदराच्या  पकडीमध्ये   गेल्यामुळे  साप एकदम निष्क्रिय   झाला.सापाची  ह्या अनपेक्षित  पकडीतून सुटका करून घेण्याची धडपड चालली ,पण जमले नाही. उंदराने  त्याची पकड ढिली केली नाही . बराच वेळाने तो साप हतबल होऊन  मान  टाकू लागला. त्याचा हालचाली थंडावल्या  उंदराने शत्रूची  पकड दिली करीत  लगेच  चेहऱ्याचा दुसरा भाग पकडला. जागा बदलणे, पुन्हा दात रोवणे, कुड्तरणे  हे चालू  ठेवले. सापाचे तोंड छीलुन काढले. घायाळ केले.  शेवटी   सपालाच मृतुच्या स्वाधीन  व्हावे लागले.
आम्ही जी घटना बघितली ती केवळ अतिशय आश्चर्यकारक घडलेली अशी. निसर्गाचा तो एक चमत्कार. कुणास विश्वास वाटणार नाही अशी. मलासुद्धा   आपण हे सत्य बघतो आहोत कां ? का हा दृष्टीचा भ्रम आहे हे एका क्षणी वाटले पण आम्ही vidio चित्रण ही केले होते. अशा घटना  निसर्गाच्या  चक्रात अनेक वेळा घडत असतात. आम्हास ती बघण्यास  मिळणे हे आमचे  नशीब नव्हे काय?   
 
( ललित लेख )
      
 
  

भूतदया जागविली

चिंव चिंव करीत चिमणा चिमणी       खोलीमध्ये माझ्या आली
अवती भवती नजर टाकून        माळ्यावरती ती बसली 
 
वाचन करण्यात रंगून गेलो   लक्ष्य नव्हते तिकडे 
आश्चर्य वाटले बघून मजला    काड्या गवताचे तुकडे  
 
घरटे बांधण्या रंगून गेली      आणती कडी कचरा 
मनांत बांधे एकच खुणगांठ    तयार करणे निवारा  
 
भंग पावता शांत वातावरण      वैताग आला मला 
कचरा आणि घरटे काढून      खिडकीतुनी  फेकला
 
काम संपवूनी सांज समयी    घरी परत मी आलो
त्याच चिमण्या तसेच घरटे     पाहून चकित झालो
 
पहाट होता चिमण्या उडाल्या    काढून टाकले घरटे
असेंच चालले कित्येक दिवस     परी जिद न सोडी ते  
 
चार दिवसाची सुटी घालउन      गांवाहून परतलो 
घरटे बघता संताप येऊन        मुठी  वळवूनी  धावलो 
 
घरट्या मधूनी चिमणी उडाली      बसली पंख्यावरती 
चिव चिव करुनी विनवू लागली      दया दाखवा ती 
 
परी मी तर होतो रागामध्ये       चढलो माळ्यावरी        
 मन चरकले बघून अंडी       छोट्या घरट्यामध्ये  
 
असहाय्य दृष्टीने चिमणी पाही मज     करुणायुक्त नयनी 
यश मीळाले तिनेच शेवटी        भूत दया जागवूनी   
 
 
( कविता )
 
 
  

शिकारी आणि शिकार यांच्या भूमिका

 गिरनार हा सौराष्ट्र मधला जंगल पर्वतमय भाग. येथील अभयारण्यात  सहल  म्हणून अनेक यात्री बरोबर जाण्याचा योग आला होता.  सर्व परिसर शासनाचा संरक्षित ( Protected  area )  टापू म्हणून समजला गेला. प्रचंड जंगले आणि त्यात  सर्व प्रकारची जंगली जनावरे  यांचे स्वैर वास्तव्य  असलेला भाग. जंगलामधून जाण्यासाठी कच्चा रस्ता केलेला होता. दुतर्फा घनदाट झाडी,
सूर्य- प्रकश वा उन्हे यांना रोकणारी दिसून आली. वळणा वळणाचे रस्ते. रस्त्यावर ठीकठीकानी सूचना फलक दिसून  येत  होते.  फलकावर 
निरनिराळ्या  प्राण्यानची चित्रे व वैज्ञानिक माहिती संक्षेपात होती. त्याच  प्रमाणे त्या प्राण्यांचे योग्य संरक्षण व संवर्धन करण्याविषयी आदेशवजा
सूचना दिलेल्या होत्या. जंगली जनावरे आणि वृक्षलता  ही निसर्गाची देन  असून आपला मित्र परिवार आहे. ही भावना जागृत  ठेवली जायची. कांही  ठिकाणी पाण्याचा साठा असलेली तळी  वा कृत्रिम हौदपण दिसून आले. 
आमची यात्रा-बस हालके हालके सर्व परिसराची पाहणी करीत जात होती.  रस्त्यात अनेक प्राणी आम्हास दिसून आले. हात्ती, गेंडे, पान घोडे, वानरे, झेब्रे, हरीन, काळवीट, कोल्हे, ससे आणि वाघ सिंह, अस्वले, इत्यादी. कांही प्राणी एकटे भटकताना  दिसले तर कांही  कळपामध्ये एकत्रित असल्याचे दिसून आले. हे सारे नैसर्गिक रम्य मनोहर व रोमांचकारी  देखावे बघताना खूप आनंद वाटत होता. 
एका ठिकाणी आम्ही जे दृश बघितले. त्यांनी सर्वजण अचंबित झालो. विचार करण्यास लावणारी ती घटना होती. निसर्गाचा व त्याचा  योजनेचा एक  चमत्कार वाटला. एका मोठ्या  दगडाच्या शिळे जवळ एक मोठा बिबळ्या वाघ बसलेला दिसला. शांत असून फार हालचाली नव्हत्या. जवळच लहान  पाणवठा व खूप गवत वाढलेले होते. आमची  उत्सुकता  आणि आश्यर्य  शिगेला पोहोंचले होते. कारण त्या वाघाच्या अगदीच जवळ अंतरावर कांही  हरीण शांत मनाने तेथेच गवत चरत होती.
 आमच्या सहल आयोजकांनी आमची बस जवळच उभी करून तो अप्रतिम नैसर्गिक देखावा बघण्यास वा त्याची छबी काढण्याच्या सूचना दिली होती. बराच वेळ पर्यंत ते दृश्य आम्ही बघत होतो. वाघाचे शांत बसणे, व त्याच्याच समोर हरीणांचे गवत चरणे, विश्वास बसणार नाही, अशी ही  घटना होती. जवळ जवळ अर्धा तास पर्यंत आम्ही ते बघत होतो.  नंतर मात्र सर्व हरीण चरत चरत दूर निघून गेली. वाघ मात्र तेथेच  बसला होता.  काळजी पूर्वक आमच्या संयोजकाने दूर अंतरावरून त्या वाघाच्या दिशेने कांही दगड भिरकावले. त्याला एक दोन लागताच त्याच्या हालचाली दिसल्या. तो तिथून  उठून जाण्याचा प्रयत्न करू लागला. तो वाघ घायाळ झालेला होता. त्याचा मागच्या एका पायाला दुखापत झालेली होती. तो आपली जागा  बदलण्याचा  प्रयत्न करू लागला. तो फरफटत दुसरीकडे जाऊ लागला. त्याची असहायता , दुखापत, आणि स्वरक्षणाचा प्रयत्न हे बघताना देखील एक वेगळीच  रोमांचकारी भावना येत होती. एक भयावह क्रूर जंगली प्राणी परंतु आम्हा सर्वामध्ये भूतदया  निर्माण करून गेला. निसर्गाच्या अप्रतिम कल्पकतेचे ह्या प्रसंगी दर्शन झाले. शिकारी आणि शिकार ( भक्ष ) ह्यामध्ये  एक विलक्षण रोमांचकारी नाते असते. प्रत्येक सजीव प्राणी ह्या दोन्ही ही  भूमिकेमधून सतत  जात असतो. जो शिकार करतो तो भक्ष ही बनतो. व जो भक्ष बनतो तो देखील जगण्यासाठी शिकारी बनत असतो. त्याचमुळे शिकारी व शिकार ह्यांचे गुणधर्म त्या एकाच प्राण्यात आढळून येतात. चपलता,  चंचलता, आक्रमकता, बचावात्मकता, वेध, लक्ष, अचूकता, प्रयत्न, धडपड, आणि हे सारे  करताना स्वता:चे रक्षण  ह्या सर्व गुणांचे मिश्रण प्रत्येक प्राण्यात निसर्गाने जन्मता: दिलेले असते.   आपले भक्ष करणारा, आपल्या दृष्टी  टापूत  बसलेला आहे. मात्र तो विकलांग झालेला, हतबल  झालेला ह्याची जाणीव  हरिणाला होणे हे फार महत्वाचे वरदान आहे. त्याचमुळे ते त्याक्षणी  बेफिकीर  वृत्तीचे होऊ शकले.  आणि इकडे वाघ, त्याला विवंचना होती ती त्याचा दुखापतीची. स्वतःच्या देहाची वा शरीराची.  
शेवटी कोणीही आणि कितीही शक्तिवान  असला तरी त्याला निश्चित  जाणीव  असते स्वतःच्या सामर्थ्याची.  
 
( ललित लेख )            
 
 
 

नदीवरील बांध

विषण्यतेने  बघत होतो       भिंतीवरच्या खुणा
काळ जाऊन वर्षे लोटली     आठवणी देती पुन्हा
 
बसत होतो नदीकांठी        बालपणीच्या वेळी
पात्र भरुनी वहात होती     गोदावरी त्या काळी 
 
सदैव पूर येउनी तिजला       गावास वेढा पडे 
गांव वेशीच्या घरांना मग     पाण्याचे बसती तडे 
 
चित्र बदलले आज सारे       पात्र लहान होई   
बांध घातला धरणावरी      पाणी अल्पसे येई 
 
खिन्नपणे खूप भटकलो        भोवतालच्या भागी 
चकित झाले मन बघूनी         हिरवळ जागोजागी 
 
इच्छित दिशेने पाणी वाही     बांध घातल्यामुळे 
सारे जीवन प्रफुल्ल करीं        आनंदमय सगळे
 
( कविता )
 
 
 

हा तर खरा बौद्धिक व्यायाम

नियमितपणे सकाळी फिरावयास जाणे हे ठरून गेलेले होते. निवृतीच्या काळात अत्यंत सोपा व चांगला शरीराच्या सर्व अवयवांना पोषक असा हा  व्यायाम आहे. कित्येक वर्षे त्याचे नियमित पालन केले जात आहे. 
एक दिवस सकाळी  फिरण्यास बाहेर पडलो असता,  रस्त्यामध्ये एक ९ ते १० वर्षाचा शाळकरी मुलगा रस्त्याच्या कडेला थांबून आपली नादुरुस्त सायकल ठीक करण्याचा प्रयत्न करीत होता. सायकलच्या पायड्ल जवळची साखळी ( चेन ) ही  बेरीन्गच्या चाकावरुन निसटली होती. मुलगा परेशान झालेला  होता . त्याची सर्व बोटे व हात वंगनाणी बरबटलेली होती.  शाळेची वेळ होत असल्यमुळे त्याच्या चेहऱ्यावर तगमग स्पष्ट दिसत होती. लोक जात येत होते. बहुतेकजन आपल्या समयबद्धतेमुळे धावपळीत होते. मी अचानक त्याचा जवळ गेलो. त्याचा सायकलीची निसटलेली चेन थोडासा प्रयत्न करून  पूर्ववत  केली. त्याला  हातरुमाल दिला. त्यांनी हात साफ केले. त्याची सायकल  त्याचा  हाती दिली. मुलाच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे  दिसत होता.  माझे आभार  मानून तो शाळा गाठण्यासाठी वेगाने निघून गेला. 
तस म्हणाल  तर  मी फारस कांही केल नव्हत.  म्हंटल तर क्षुल्लक. परन्तु  कसलेसे समाधान,  शांतता, मनला आनंदीत करीत असल्याची  जाणीव येत होती. रोजच्या  फिरण्याच्या  व्ययामामुळे  मनाला उल्हसित  वाटण्याचे जेवढ़े कार्य झाले नव्हते, तेवढे  त्या छोट्याशा प्रसंगाने  झाले. व मानसिक समाधान लाभले.
शारीरिक व्यायाम ही जरी गरज असली, तरी मानसिक समाधान ज्या योगे प्राप्त होते, तो हाच खारा बौद्धिक व्यायाम नव्हे काय?
   

( ललित लेख )             

 
 

वळून पहा

 
उडून गेली दूर दूर तू
झेप घेउनी आकाशी
बघू लागलो चकीत होऊनी 
पंखामधली भरारी कशी
 
नाजूक नाजूक पंखाना 
आधार होता मायेचा 
चिमुकल्या त्या हालचालींना 
पायबंध तो भीतीचा 
 
क्षणात आले बळ कोठून 
विसरुनी गेलीस घरटे आपुले
बंधन तोडीत प्रेमाचे 
आकाशासी कवटाळले  
 
कधीतरी उडणे, आज उडाली 
बघण्या साऱ्या जगताला 
किलबिल करून वळून पहा
दाणे भरविल्या चोंचीला          
 
( कविता )
 
 
 
 

चोरलेले पुस्तकच भेट म्हणून मिळते तेंव्हा – – –

शालेय शिक्षण पुरे करून,  महाविद्यालयात जाऊ लागलो. नवा उत्साह, नवे मित्रमंडळ आणि उच्च ते वातावरण. मनाचे, विचारांचे आणि बागडण्याचे एक वेगळेच स्वतंत्र.
मला त्यावेळचा एक गमतीचा प्रसंग आठवला. ज्याचे धागेदोरे पुढील  जीवनात पंधरा वर्षानंतर विणले गेलेले आढळले. महाविद्यालयातील  तो दिवस आठवतो. सकाळची वेळ होती. विद्यालयाच्या एका  उघड्या दालनातून  मी दुसऱ्या जागी जात होतो. अचानक जोराचा पावूस सुरु झाला. पळतच मी शेजारच्या खोलीत शिरलो. ती प्राध्यापकाची खोली होती. त्यावेळी आत  कुणीही  नव्हते. बाहेर जोराचा पाऊस. मी तात्पुरता अडकून गेलो होतो.  आतील  टेबलावर एक पुस्तक पडलेले बघितले. Research  studies  in  Organic Chemistry. दोन चार पाने सहज बघितली. पुस्तकावर कुणाचे नाव नव्हते. मी पण विज्ञान विषय घेऊनच त्या विद्यालयात गेलो होतो. एक विचित्र विचार  डोक्यात आला. सभोवतालचे अवलोकन केले आणि ते पुस्तक चक्क  उचलून  पिशवीत टाकले व पावसातच  विद्यालय सोडून घरी आलो. घरी पुस्तक व्यवस्तीत  चाळले. माझ्या समजण्यापेक्षा ते खूपच वरच्या दरज्याचे  होते. कदाचित ते Higher  Studies  साठी असावे. मी निराश झालो. थोडीशी खंत वाटली. मला ते त्यानंतर केंव्हाच वाचण्याचा योग आला नाही. एक तर ते पुस्तक Organic chemistry ह्या विषयात प्रबंधासाठी होते आणि माझ्या स्तराला त्याचा कांहीच उपयोग नव्हता. एक निवळ वेडेपणा. फारसा विचार  न करता ते तसेच कपाटात ठेवून दिले.  
विद्यालयीन, महाविद्यालयीन, आणि वैद्यकीय शिक्षण  पुरे केले.  शासनाच्या  सेवेत वैद्यकीय अधिकारी म्हणून नोकरी करू लागलो. निरनिराळ्या बदलीच्या  ठिकाणी रुग्णालयात कामे करावी लागत.  पंधरा वर्षाचा काळ गेला होता. एक दिवस एका वृद्ध रोग्याला तपासण्यासाठी मला Emergency Call आला. मी त्यांना बघण्यासाठी गेलो.  त्यांचा चेहरा बघताच ते माझ्या परिचित असावे हा भास झाला.  परंतु ओळख लक्षात आली नाही. जवळच त्यांचा मोठा मुलगा होता. मी त्यांचे केसपेपर्स  बघितले. त्यांचे नांव बघताच  माझी शंका खरी ठरली. ते नांव माझ्या चांगल्याच परिचयाचे होते. ते माझे विज्ञान शाखेतील प्राध्यापक होते.  मी त्यांना ओळखणे नैसर्गिक होते. परंतु ते मला त्यांचा विद्यार्थी म्हणून ओळखणे ह्याची शक्यता कमी होती. प्रथम मी त्यांना तपासले.  योग्य ती औषधी चालू करण्याच्या सूचना दिल्या. नंतर लगेच मी त्यांना स्पेशल रूम मध्ये हलविले.
” सर तुम्ही Chemistry चे प्राध्यापक ना ? ”    त्यांना कुणीतरी ओळखतो हे जाणताच त्यांच्या चेहऱ्यावर एकदम आनंद व्यक्त झाला. आता पेशंट आणि डॉक्टर यांचे नाते न राहता पूर्वीचे शिक्षक व शिष्य  असे पवित्र नाते समोर आले. त्यांची सेवा करण्याचा योग मिळाला. ते बरे होताच मी त्यांना माझ्या घरी आणले. खूप गप्पा आठवणी चाळवल्या गेल्या. त्याच ओघांत मी लपवून आणलेल्या त्या पुस्तकाबद्दलची गमतीची घटना सांगितली. 
” ते पुस्तक कां ? Jenar Workman ह्यांनी लिहिलेले 
Research  studies  in  Organic हे पुस्तक. आहो ते तर माझेच होते. त्यावेळी मी खूप शोधले. कुठेतरी हरवले गेले म्हणून, नंतर त्याचा विचारच सोडून दिला. ”  
मी लगेच कपाटातून ते पुस्तक आणले आणि त्यांच्या हाती देत म्हटले  ” सर मला माझ्या त्या अविचारी घटने बद्दल क्षमा करा. ”    प्राध्यापक हसले. माझा हात हाती घेत ते म्हणाले  ” अशा लहान सहान गोष्टी जीवनांत घडतच असतात. हेच अनुभव माणसाला परिपक्वतेच्या मार्गावर घेऊन जातात. हे पुस्तक आता माझ्याकडून तुम्हास सप्रेम भेट समजा.”
आज मला त्या चुकीच्या व अविचारी गोष्टीचे परिमार्जन झाल्याचे जाणवले. त्याच माझ्या प्राध्यापकांच्या मदतीने मी विज्ञान शाखेमधली निरनिराळ्या लेखकांची २०० पुस्तके त्याच महाविद्यालयांतील वाचनालयाला भेट म्हणून दिली. केवळ एक समाधान.
      

 

( ललित लेख )  

 

पोकळ तत्वज्ञान

 
कालेजच्या होस्टेल मध्ये  रहात होतो. सर्व विध्यार्थाना स्वत्तंत्र खोल्या होत्या माझ्या शेजारी  माझा मित्र नंदकिशोर यांची खोली होती. दुपारची जेवणाची   सुट्टी झाली की आम्ही रूमवर यायचो. माझ्याच  खोलीत आम्ही  मिळून जेवण घेत असू .घरून दोघांचे जेवणाचे डब्बे यायचे. नंद्कोशोरच्या  जेवणाची  पद्धतच कांही और होती .त्याच्या डब्ब्यात चार चपात्या असत. तो डब्यातले पूर्ण अन्न केव्हांच खात नसे. जेवण झाल्यावर एक चपाती आणि उरलेले सर्व अन्न गोळा करून चक्क खिडकीतून बाहेर फेकून देत असे. मला त्याचे हे वागणे आवडायचे नाही. ” तुला जर जेवणास कमी लागते,  तर घरच्यांना तशा सूचना का देत नाहीस? कमी जेवण मागवत जा. ”  तो  फक्त हसून उत्तर देण्याचे टाळायचा. परंतु त्याने त्याच्या आपल्या  दैनंदिनीत केंव्हाच फरक केला नाही. मी मात्र माझ्या जेवणाचा डब्बा पूर्ण संपवीत असे. जेवणाची सतत काळजी घेतली. एक दिवस माझा त्याचा विषयीचा दृष्टीकोनाचा बांध फुटला. मला त्याचे  वागणे सहन झाले नाही. नेहमी प्रमाणे त्याने एक चपाती व उरलेले अन्न  खिडकीतून बाहेर फेकून दिले. व तो हात धूउन बसला.  
 ” खर सांगू – तुला मस्ती  आलेली आहे.  तू त्या अन्नाचा न कळत अपमान करतो आहेस. माजोऱ्या प्रमाणे ते फेकून देतोस. अनेक लोकांना पोटभर अन्न मिळत नाही, तू मात्र नासाडी करतोस.  अन्न हे परब्रम्ह समजले गेले आहे. त्याचा असा  अनादर  केंव्हाच करु नये. तो पुन्हा मोठ्याने हसला.    ” अहो ब्रह्मज्ञानी !  दोन्ही हात जोडून तुम्हाला  दंडवत. भगवतगीतेमध्ये सांगितले हे की आपल्या जेवणांत एक भाग अन्न व तीन भाग पाणी असावे. तू जेवताना पाण्याचा थेंब ही घेत नाहीस. अन्न सुद्धापोटभर घ्यावयाच नसत.   पाणी हवा ह्या घटकांना भरपूर  जागा देत जाणे, हे विज्ञान देखील सांगते. तू मात्र हे सर्व जाणून  दुर्लक्ष करतोस. जेवणाचा डब्बा आला की तुला ते परब्रह्म वाटते. आणि तू त्यावर प्रेमाने  तुटून  पडतोस. पोटाला सांभाळून, प्रकृतीला जपून   अध्यात्म करीत जा.  तो हसत निघून गेला. मी माझे जेवण पूर्ण केले. हात धुतला व  खिडकीच्या बाहेर डोकावले.   मी एकदम अचिंबित झालो.  खिडकीच्या  मागील दिशेला एक  मोकळे  मैदान होते. खिडकीखालती  ज्या ठिकाणी   नंदकिशोर ह्याने अन्न फेकून दिले होते, तेथे दोन कुत्री जिभल्या चाटीत खात होती. अधाशाप्रमाणे अन्नाचा प्रतेक कण  उचलत होती. खाणे संपल्यावर  इकडे तिकडे  बघून आणखी कांही मिळतेका? ह्याचा शोध घेत होती. त्यांची नजर  माझ्या  खिडकीवर पडली. ती जणू  विचारीत  होती की आम्हाला अन्न देणारा  तो अन्नदाता कोठे आहे? इतक्या दुरून  मला  त्यांच्या डोळ्यात  काय दिसते  हे समजत नव्हते. परंतु त्यांचा चेहरा व  त्यावरचे भाव  सांगत होते की   आमच्या त्या अन्नदात्याला धन्यवाद द्या. आमचे आशिर्वाद  त्यांच्या पर्यंत पोंचवा.  माझे डोळे एकदम  पाणावले.
ऐकलेल्या वाचलेल्या महान तत्वज्ञानाचा  शब्दिक कीस  काढण्याचा मी प्रयत्न करीत होतो. आनंद घेत होतो. परंतु जाणवले की त्यामध्ये  अनुभवाचा ओलावा नव्हता. सत्य झाकोळले गेले होते. मला त्यावेळी त्याबद्दल खंत वाटली. 
 
( ललित लेख ) 
 
 
  

संधी

गंगा आली मार्गामध्ये         तहान आपली भागवून घे
संधी मिळता जीवनामध्ये     उपयोग त्याचा करून घे 
 
ठक ठक करुनी दार ठोठवी      संधी अचानक केव्ह्ना तरी
गाफील बघुनि चित्त तुझे        निघून जाईल ती माघारी 
 
चालत राही सुवर्ण संधी           हाका देवूनी वाटेवरी 
बोलविती जे प्रेमाने  तिज       सन्मान तयांचा सदैव करी 
 
धुंदी मध्ये राहून आम्ही       चाहूल तिची विसरून जातो 
जीवनातले अपयश बघुनी       नशिबाला परी दोष देतो
 
यशस्वी ठरती तेच जीवनी      उपयोग करुनी  संधीचा 
साथ देऊनी प्रयत्न्याची        मार्ग निवडती योग्य दिशेचा
 
( कविता )
 
 
 

समाधानाचे मूळ

 १९९६ साली मी  जव्हार  गांवच्या सरकारी रुग्णालयात प्रमुख वैद्यकीय अधिकारी होतो. हाताखाली बराच कर्मचारी व अधिकारी  वर्ग होता.  एक तरुण वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राठोड यांची नेमणूक नुकतीच  झालेली  होती.  ते M. B. B. S. शिकलेले होते. पुढे सर्जरी हा विषय घेऊन सर्जन होण्याची मह्त्वाकांक्षा बाळगून होते.
आपल्या मनमिळाऊ, प्रेमळ स्वभावाने रुग्णामध्ये थोड्याच काळात ते सर्वाना हवे हवेसे वाटू लागले. वैद्यकीय कामकाजामध्ये अतिशय मेहनती,  उत्साही, सतर्क आणि निष्णात होते. सर्व प्रकारच्या केसेस आत्मविश्वासाने व यशस्वीरीत्या ते हाताळत. हे सारे माझ्या लक्षत आले होते. भविष्यात ते  चांगले सर्जन होतील हा विश्वास मला आलेला होता. एक दिवस     संध्याकाळी  ते माझ्या घरी आले. त्यांनी M. S. ह्या पदव्युतर  शीक्षणासाठी    अर्ज केलेला होता. तो Bombay हॉस्पिटलच्या प्रशासनाने मान्य केला असून, २४ तासाचे आंत त्यांना रुजू होण्याची सूचना आली होती. मी त्यांना सध्याच्या रुग्णालयातून पदमुक्त ( Releave  )  केले असे पत्र मिळणे हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचे होते. त्यांच्या  पुढील  नेमणुकीसाठी ते गरजेचे होते. 
प्रसंग आणि वेळेचे महत्व ओळखून मी त्यांची फाइल मागविली. मी एका धर्म संकटात सापडलो होतो. वरिष्ठांकडून आलेल्या त्यांच्या appointment letter वरून त्यांनी सध्याच्या  नोकरीचा बॉण्ड दिलेला होता. ते फक्त तीन महिन्याच्या नोटीशीनंतरच  ही नोकरी सोडून जाऊ शकत होते. माझ्या कार्यालइन  सल्लागारांनी आपण     डॉक्टरना  वरिष्ठांच्या परवानगी शिवाय  रिलीव्ह करू शकत नसल्याचे सुचविले. याचा अर्थ त्याचे  पोस्ट ग्राजुयेषण केवळ वेळेच्या चक्रामुळे गमावले जाणार. मी हे सारे जाणून  अशांत  झालो. एका अत्यंत महत्वाच्या संधीला ते वंचित होतील ह्याची खंत  वाटली.  मी बराच विचार केला. मनन केले. शेवटी विचारावर  भावनेने मत  केली. मी त्याची रुग्णालय सोडण्याविषयची विनंती मान्य केली. माझे आभार मानीत  ते निघून गेले.
शंके प्रमाणे एक तुफान निर्माण झाले.   वरिष्ठ नाराज झाले. चौकशी झाली.  मला माझ्या घेतलेल्या निर्णयावर टिपणी होऊन मेमो दिला गेला. पुन्हा 
असे घडू नये याची समज दिली गेली.   
बऱ्याच वर्षानंतर एक मित्राला भेटण्यासाठी   Bombay हॉस्पिटलला  गेलो होतो. अचानक डॉक्टर राठोड यांची भेट झाली. त्यांनी आग्रहाने मला त्यांच्या केबिन मध्ये नेले.  मला आश्चर्य वाटले ते त्यांनी वाकून माझ्या  पायांना स्पर्श करून नमस्कार केला.
” सर मी येथे Assistant Hon. Surgeon म्हणून काम बघतो. हे  फक्त  तुमच्या  आशीर्वादामुळे. ”  त्याचे डोळे पाणावले होते. घटना ह्या घडतच असतात. ते एक निसर्ग चक्र आहे. परिणाम हे त्याच प्रमाणे होत असतात. परंतु खोलवर  दडून बसलेल्या  उदेशामुळेच त्या  घटनांचे खरे मूल्यमापन होत असते.  वरकरणी जरी निराश्या व्यतीत होत असली,  तरी त्या घटनांची मुळे  आत्मिक समाधानाकडे  रुजलेली असतात. हाच खरा जीवनाचा आनंद नव्हे काय?
 
( ललित लेख )