Monthly Archives: मे 2017

मानसिक तणाव (क्रमशः पुढे ४ वर चालू )

मानसिक तणाव (क्रमशः पुढे ४ वर चालू )

मी एका बँकेमध्ये गेलो होतो. पैसे काढायचे होते. इतर बरेच जण रांगेत होते. मी कॅशरकडे बघत होतो. पैसे घेणे, पैसे देणे, नोटा भराभर मोजणे, त्या एकत्र बांधणे, बांधलेल्या गड्यामधून नोटा घेणे, मोजता मोजता गिऱ्हाईकांशी मध्येच बोलणे, फोन मोबाईल घेणे, बोलणे, कुणीतरी कर्मचारी मागून आला तर त्याच्याशी बोलणे. अशी अनेक छोटी छोटी व त्याच्या प्रमुख कामाना व्यत्यय आणणाऱ्या गोष्टी तो सहज करीत होता. हजारो नव्हे लाखोच्या नोटा तो हाताळत होता. कल्पना येते की थोडीशी चुक त्याच्या हिशोबांत प्रचंड तफावत निर्माण करु शकते. पण ते तो सार सहजतेने करीत होता.
डॉक्टर सुध्दा मोठे मोठे ऑपरेशन करताना देहामधल्या अवयवांची काटछाट, रक्तस्त्राव, तो टिपणे, रक्त नलीका बांधने, रक्तस्त्राव थांबवणे, अवयवांची जुळवा-जुळव असे एक नव्हे अनेक थरारक गोष्टी सहजतेने करताना दिसतात. गंमत म्हणजे हे सारे ते करीत असताना, इतर सहकाऱ्यांबरोबर गप्पा मारीत असतात. चालू खेळ, चालू राजकारण वा सिनेमे इत्यादी अनेक विषयांवर ती बोलतात. मात्र ऑपरेशनमध्ये बाधा न येता, सारे कसे सहज केल्या प्रमाणे वाटते.
अशाच प्रकारे अनेक व्यवसाय असतात, ज्यांच्या कामामध्ये जेवढे लक्ष केंद्रीत करण्याची गरज असते, त्याचवेळी धोका होण्याचा, नुकसान होण्याची खूपच शक्यता वाटते. अशी माणसे मानसिक तणावामध्ये सतत असतील असा ग्रह इतरांचा असतो. परंतु असे मुळीच नसते. व्यवसाय आणि मानसिक तणाव ह्या भिन्न गोष्टी आहेत.
एक तत्व असे आहे. प्रत्येक व्यक्ती त्याची जेवढी बुध्दी असेल, त्याच्या फक्त १५ ते २० टक्केच तो ती वापरत असतो. मग तो कोणत्याही क्षेत्रातला असो. ह्याचाच दुसरा अर्थ प्रत्येक व्यक्ती कार्य कुशल झाल्यानंतर जी बुध्दीची क्षमता वापरतो ती एखाद्या यंत्राप्रमाणे होवून जाते. वैचारिक बुध्दीचा,भावनेचा तेथे सहभाग नसतो. ते त्याचे काम मेकॅनीकल होवून जाते.
थोडेसे सतर्क राहून तो ज्या ज्या गोष्टी करतो त्या केवळ रोबोट अर्थात मानव यंत्राप्रमाणेच असतात. आधी फिड केलेलेच नंतर आपोआप बाहेर येवू लागते. जर नवीन क्रियेशन वा नुतन निर्मीती असेल, तरच जादा बुध्दीची अवशक्ता असते. दैनंदीन कार्याला अत्यल्प बुध्दीचा वापर होतो हे जर लक्षात आले, तर “तुमचे कार्य तणाव निर्माण करणारे आहे ” हा विचार शिथील होईल. कोणत्याही क्षेत्रात जा डॉक्टर, इंजिनीयर, वकील, सी.ए वा कलाकार, नट त्यांचे कार्य फक्त चाकेरी बध्द असते.इतरांना कदाचित्, महान अप्रतीम असे वाटेल, परंतु ते त्या व्यक्तीच्या अंगवळणी पडते व त्यात सहजता येते. दैनंदीन कार्यात मेंदूचा वापर कमी असल्यामुळे तणाव नसतो.अभ्यासानंतर कोणत्याही दैनंदीन कार्यात बुध्दी क्षमतेचा सहभाग फारच अल्प असतो.येथे ती व्यक्ती तणावमुक्त असते.मानसिक तणाव अशा वेळी कल्पनेने निर्माण केले जातात.चाकोरीबध्द कामे करताना बुध्दीवर ताण पडत नसतो.
परंतु विचारांचा मार्ग थोडासा वेगळा झाला की तो तणाव निर्माण करु शकतो.

क्रमशः पुढे ५ वर चालू-

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

मानसिक तणाव- (क्रमशः पुढे ३ वर चालू-)

मानसिक तणाव- (क्रमशः पुढे ३ वर चालू-)

एखादा पाच किलो वजन घेवून काही अंतर चालतो. त्याचे हात दुखू लागतात. त्याला दम लागतो. थकवा वाटू लागतो. कारण तो त्या त्या अवयवावर तान देत असतो.आणि ती अवयवे तसे दर्शवितात.मात्र मेंदूमध्ये प्रचंड वैचारीक क्षमता असते. त्यामुळे तुमच्या मेंदूला क्षिणता आली हे लगेच होत नसते. मात्र क्षिण झालेला मेंदू ( Fatigued Brain) त्याचे परिणाम इतरत्र पसरवून इतर अवयवावर परिणाम करतो. त्यालाच ‘ मानसिक तणाव ‘ म्हणता येईल.
आजकालचे वैद्यकिय शास्त्र तर असे म्हणते की जवळ जवळ सर्वच रोगाचे मूळ हे मानसिक तणावातून उत्पन्न होते. ज्या वेळी त्याच्या म्हणजे उत्पन्न झालेल्या विचार लहरी जशा जशा त्या त्या अवयवावर आघात करतात, ते ते अवयव त्या त्या रोगांचा प्रादुर्भाव झालेला दाखवतात. मग ह्रदय विकार, रक्तदाब डायबेटीस, किडनीचे विकार, डोळ्या, कानाचे विकार वा आतड्यांचे विकार असोत, सर्वांचा केंद्रबिंदू शेवटी वैचारीक जडन-घडनापर्यंत जावून पोहचतो. अर्थात मेंदूचे आपले विकार ह्यातून सूटलेले नाहीत. म्हणून मानसिक तणावाला फार महत्व आसते.

मन हे शरीराच्या निरनीरीळ्या अवयांवर कशाप्रकारे परिणाम करते व त्या अवयवाला व्याधीगृस्त बनविते हे आपण आता बघणार आहोत.
भरकटणारे आणि अशांत विचारांचे वादळ मेंदूला त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक काम करण्यास भाग पाडते. मेंदू थकून जातो. क्षिणता भासते. Fatigue Sense येतो. बेचैनी अवस्था वाढते. आपण त्याला कस् कस् वाटते असे म्हणतो. कुणी त्याला कंटाळा आला म्हणतात. कुणाला ताप आला वाटते. पण ताप मोजता ताप Normal असतो. दिवस कसा सुना सुना निरुच्छाही वाटतो. हे सारे मनाचे मेंदूवर होणारे आघांत. कोणतेही देहकार्य चालते ते उर्जा शक्तिवर. मेंदूवर पडत असलेला मनाचा वाढता तणाव हा देखील मेंदूसाठी जादा उर्जाशक्तीची मागणी करतो. उर्जेचा स्रोत हवा, पाणी, व अन्न ह्या नैसर्गिक घटक पदार्थामध्ये असतो. हे सारे बाहेरुन मिळणारे पदार्थ निरनीराळ्या अवयवामार्फत रक्तात जमा होतात. रक्ताच्या माध्यमातून शरीराला त्याचा पुरवठा होत असतो. मागणी त्याप्रमाणे पुरवठा हे तत्व शरीराला देखील लागू पडते. मेंदूच्या वाढत्या उर्जा मागणीमुळे ह्रदय, फुफूस, आतडी, किडणी, ह्या सर्व अवयवावर ताण पडू लागतो. अर्थात कालांतरानंतर त्या त्या प्रकारचे परिणाम व्यक्त होऊ लागतात. रक्त दाब, डायबेटीस, डोळ्याचे विकार, किडणीचा त्रास, अशी अनेक व्याधी मानसिक तणावामुळे उत्पन्न होतात. वैद्यकिय शास्त्र तर सांगते की जवळ जवळ सर्वच रोगाचे मुळ हे मानसिक तणावांत असते. तणावामुळे अवयव अशक्त बनत जातात. बाहेरुन होणारे आजार हे देखील अशा पिढागृस्त अवयवावरच आघांत करतात. सर्वांचे मुळ असते मानसिक तणाव.

काही दिवसापूर्वी फिरण्यास गेलो असताना बस स्टँड जवळून जात होतो. माझे एक मित्र एकनाथराव ह्यांची भेट झाली. ते आपली छोटी ब्रिफकेस कुठेतरी गावाला जाण्याच्या गडबडीमध्ये होते.
” काय गडबडीत आहात? ”
”हो मी जरा नाशिकला जावून येतो. संध्याकाळीच परत येईन. एका यात्रेसाठी देव दर्शनाला जावून येतो ”
बस स्टँडवर प्रवाश्यांची प्रचंड गर्दी होती. अनेक बसेसची ये-जा चालू होती. मी तसा रीकामाच होतो.त्यांना साथ देत त्यांची गाडी येई पर्यंत गप्पा मारीत उभा होतो. गाडी आली, स्टँडवर लागली. सर्व प्रवासी गर्दी करुन गाडीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करु लागली. तुफान गर्दी. सर्वांची धावपळ जागा पकडण्यासाठी व दारामधून आत शिरण्यासाठी. माझे मित्र एकनाथराव देखील धावून त्या गर्दीत सामील झाले. लोक एकमेकावर तुटून पडले होते. आत शिरण्याची सर्वांची एकच गर्दी. एकनाथराव दारापर्यंत गेले, दारात कन्डक्टर (वाहक) होता. धक्का बुक्कीला तोंड देत ते तिथ पर्यंत गेले. तेथूनच ते ओरडले,
” कन्डक्टर माझे रिझरव्हेशन आहे. ११ नंबरची माझी जागा आहे. मला आत येवू द्या. ”
मी सर्व गडबड, प्रवाश्यांची गर्दी धावपळ बघत होतो. एकनाथरावांचे मी देखील ऐकले. मी लगेच पूढे गेलो व त्यांचा हात पकडून मागे येण्याची सूचना केली.
ते ” का? ” म्हणून म्हणाले. परंतू मी त्यांना त्या प्रचंड गर्दीतून बाहेर काढले. ” अहो येवढी प्रचंड गर्दी, गोंधळ आहे, तुम्ही इजा करुन बसाल. तुमच्या जवळ रिझरव्हेशन आहे ना? मग तुम्हीपण त्या गर्दीत का जात आहात. ”
बघा हा मानवी स्वभावाचा एक नमुना . एकनाथरावांचे रिझरव्हेशन आहे. त्यांना बसण्यासाठी जागा निश्चीतच दिली जाणार. परंतु कित्येकजण धावपळ करीत, गडबड करीत आपल्या ठरलेल्या जागेपर्यंत जाणार, सिटवर बसणार किंवा सामान पिशवी ठेवणार, मगच
त्याना समाधान वाटते, शांतता वाटते. एकदा जागा मिळवली की बस ठिक झाले, ही त्यांची धारणा.
जागा आरक्षीत केलेली असताना हे महत्वाचे. इतर प्रसंगी असे असू शकेल. मानसीक तणावाखाली राहणारी ही माणस एखादी गोष्ट मिळवणे, मिळणे त्यासाठीचे प्रयत्न समजने योग्य. परंतू ती गोष्ट जर तुम्हाला निश्चीतच मिळत असेल तर मग धडपड कशासाठी.
एक दुसरे उदाहरण देतो, माझा मित्र डॉक्टर सदानंद लिमये. आम्ही १२ वीत म्हणजे Premedical च्या वेळी तो संपूर्ण राज्यात प्रथम आला होता. कौतुक, बक्षीसे झाली. कॉलेजसाठीच्या प्रवेश पत्रीका भरल्या. सर्वांत प्रथम येणारा म्हणजे वैद्यकीय विद्यालयात जागा मिळणार, ह्यात थोडी देखील शंका नव्हती. ते त्याने केले परंतू त्याच बरोबर साधा B.SC ह्या विषयाचा फॉम भरुन एका सायन्स कॉलेज मध्ये देखील फॉम भरला. आपली प्रवेशाची निश्चीती माहीत असून देखील.
अशाच पध्दती प्रमाणे अनेक विद्यार्थी निरनिराळ्या शाखामध्ये प्रवेश घेवून ठेवतात. प्रसंगी फी भरुन देखील. विशेष गंमत म्हणजे त्या वेळच्या पध्दतीनुसार जे १० विद्यार्थी
प्रथम क्रमांकात उत्तीर्ण होत असत, त्यांना काही वैद्यकीय वा इंजिनीयरींग कॉलेज शुभेच्छा देवून त्या हूशार विद्यार्थांनी त्यांच्या कॉलेज मध्ये प्रवेश
घ्यावा हे कळवीले जात असे. सदानंद यालापण हे भाग्य लाभले. म्हणजे इतकी निश्चिती असून देखील त्याने साध्या सायन्स मार्गासाठीदेखील अर्ज भरला होता.

संशय,भिती, अनिश्चीतता हे भावनीक गुणधर्म मानसिक तणाव निर्माण करतात. जे स्वभावाने प्रत्येक गोष्टीत सांशक असतात त्यांना आत्मविश्वास कमी वाटतो. अशाच स्वभावाच माणसे मानसिक तणावाचे बळी पडतात.

क्रमशः पुढे ४ वर चालू- – –

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

मानसिक तणाव- (क्रमशः पुढे २ वर चालू- – -)

मानसिक तणाव- (क्रमशः पुढे २ वर चालू- – -)

दैनंदिनीच्या जीवनामध्ये एक प्रकार दिसून येतो. जेथे Repetition of action होत असते. तेथे काहीतरी खूणा पडतात. गावात बघितले असेल की विहिरीवरील दगडावर घर्षण होऊन दगड झिजून जातो. दगडावर फक्त ज्या ठिकाणी दोर घासली जाते त्याच ठिकाणी खूणा पडतात. मजूर वा शेतकरी कामे करत असताना, हातापायांच्या ठराविक भागी जेथे सततचे घर्षण होत राहते. भाग कठीण होतो. जाडसा होतो अथवा त्याचे पापूद्रे निघून – Pilling Off होत जाते. ह्याचा एकच अर्थ, जेव्हा त्या भागावर सतत त्याच प्रकारचा आघात होत राहतो, परिणाम दिसून येतो.
मेंदूचे कार्य अर्थात विचार करण्याचे. आणि हे कार्य सतत होत असते. विचारांची उत्पती हे जिवंतपणाचे लक्षण असून, त्यामुळे मेंदूला सतत चेतना मिळत राहते. मेंदूचे हे एक प्रकारे खाद्यच आहे. असे म्हटले तर वावगे ठरु नये. विचारांचे मार्ग एका दिशेने जाणे चागंले. त्याला लय असते. विचार भरकटत राहणे चांगले नव्हे. मनन, चिंतन, ध्यान creative विचार शोधबुद्धीचे विचार आध्यात्मिक विचार हे मेंदूला एकप्रकारे शांतता देते. त्याला कारण विचारांना एक दिशा, लय असते. विचार जेव्हा विखूरलेले असतात धावपळ करतात असंबध असता आणि सर्वांत निर्माण होणे हे धोक्याचे ठरते. अशी वैचारिक ठेवण शरिराला म्हणजे इतर अवयवांना धोका वा आघात निर्माण करु शकतात. ह्यालाच आपण तणाव म्हणतो. विचार करणे हेच तर मेंदूचे कार्य परंतू जेव्हा तोच तोच विचार सतत घोळत राहतो तणाव निर्माण करतो.
माणसाला विवेक शक्ती दिलेली आहे. घटनांचे विश्लेषण करणे, त्यामधली सत्यता, नैसर्गिक परिणाम, जीवन चाकोरीवरील त्याचा आघात हे सारे आपण विवेकी विचारांनी ठरवू शकतो.
होणाऱ्या घटनेत तुमच्या विचार करण्याने काही बदल होऊ शकतो. आणि जेव्हा हे आपल्या मनाला चांगले मान्य होते, तेव्हा तो विचार बाद करणे काढून टाकणे,त्याला प्रयत्नपूर्वक मनात येवू न देणे चांगले. जर तुमची विवेकबुद्धी, समजदारी सुस्थिर असेल तर तुमचे गैरविचार उत्पन्न होण्याच्या प्रक्रियेला तुम्ही रोखू शकता. अशा विचारांना चालना न देणे, त्याच्या लयीमध्ये न जाणे हे तुमच्या हाती असू शकते. तुमच्या स्वभावाची ठेवण ह्यास कारणीभूत असते. जो स्वभाव तुम्ही तुमच्या वागण्याच्या पद्धतीने निर्माण केलेला असतो. कित्येकजण प्रत्येक घटनाच्या प्रसंगाच्या मागे जावून त्यांत गुंतून राहण्यात समाधानी होतात. मग त्याचा संबंध नजदीकचा असो वा नसो. त्याच वृत्तीमधून त्या त्या घटनेबद्दल सतत विचार करण्याची सवय जडते. हेच विचारांचे चर्वण शरिराला धोकादायक ठरु शकते. ह्याचा परिणाम म्हणजेच मानसिक तणाव .
२ एक उदाहरण देतो. कुणाचे १०० रुपये हरवतात तर कुणाचे १००० रुपये हरवतात. हे दोन्ही निश्चित की दोन्ही घटनांनी दुख होईल आणि विचारांच्या लगभगीमुळे तुमचे मन विचलीत होईल. कदाचित, ह्यालाच क्षणिक मानसिक तणाव संबोधता येईल. अशा मानसिक तणावांचा शरीरावर परिणाम होण्यासाठी असा तणाव सतत उत्पन्न झालेला असावा केवळ निर्माण झालेला विचार घातक नसतो तर तोच तोच विचार घोळत राहणे हे त्रासदायक असू शकते. येथे तुमचा स्वभाव विशेष असे होण्यास भाग पाडतात, पैसे हरवले ह्या बद्दल थोडीशी खंत करुन आपल्या विश्लेषणात्मक विचारांनी स्वत:ची समज घालतात आणि तो विचार मनांतून काढून टाकतात. ह्या उलट काही पैसे कसे हरवले ह्या बद्दल सतत सर्वांना वाच्यता करुन तोच तोच विषय घोळत राहतात. तणाव म्हणतात तो हाच. पैसे किती हरवले, नुकसान किती झाले ह्यावर मानसिक तणाव अवलंबून नसतो.
निसर्गाने त्याच्या चक्रात अनेक लहान मोठे आणि काही तर भयावह प्रसंग निर्माण केलेले असतात. परंतू त्याचवेळी स्व सान्तवन, समजदारी प्रसंगामधून पुन्हा उभारी येण्याची कला माणसाला दिली आहे. अशी कला ही उन्नत करावी लागते. त्याचवेळी कोणत्याही दुर्धर प्रसंगाची धार बोथट होऊ शकते. सुसह्य होवू शकते. अशाच वृत्तीची माणसे मानसिक तणावापासून आपला बचाव करु शकतात.
१०० रु याच्यापेक्षा १००० रु हरवणे म्हणजे जास्त मानसिक तणाव हे वैद्यकिय शास्त्रामध्ये साधे अंकगणित नव्हे. किती रुपयाच्या हानीचा विचार कितीवेळा हेच गणिताचे उत्तर ठरवितो.
थोडेसे वैद्यकिय विश्लेषनाकडे जावू या. मेंदूमध्ये विचार करण्याचे एक अवयव असते. ते सतत चेतना मिळून कार्यरत असते. म्हणून विचार धारा सतत वाहत असते. जसे ह्रदयाचे ठोके, श्वासोच्छवास, तसेच मेंदूचे विचार कार्य सतत Non-Stop चालू असते. अगदी झोपेमध्ये -विचार उत्पन्न होतो, पसरतो आणि नाहीसा होतो. ही समजण्यास सोपी चक्र- रचना. विचारांची साठवण होत जाते. काळाप्रमाणे व प्रसंगाच्या तिव्रतेनुसार आठवणी लोप पाऊ लागतात.
जर विचार मंथनाचा आलेख काढला, तर हे एक सत्य आहे की विचार उत्पन्न होताच, तो पूर्णतेने आघात करतो. मग त्याला उत्पन्न करणारी चेतना कितीही छोटी असो. ग्राफ काढला तर काटा प्रत्येक विचार चेतनेला प्रथम सर्वोच्य जागी नेतो. व नंतर पायापाशी येत असतो. लहान चेतनेचा विचार आलेख चटकन पायाजवळ जाईल व जर चेतना फार प्रभावी असेल तर तीला पायाजवळ येण्यास वेळ लागेल. अर्थ असा की १०० रु. हरवले हे दोन दिवसांत विसरले जातील. वा १००० रु हरवलो हे चार दिवसात (समजण्यासाठी)
३ मात्र दोन्ही चेतना उत्पन्न होताना, विचारातील सर्वोच्य जागी गेल्याचे दर्शविले. जेव्हा विचार उत्पन्न होतो, तेव्हा तो प्रथम सर्वोच्य बिंदू गाठतो. असेच विचार सतत उत्पन्न होत राहतील तर प्रत्येक वेळी ते सर्वोच्य बिंदू गाठत राहतील. येथे मानसिक तणावाचा संबंध येतो. सतत तोच तोच विचार करण्यामुळे, विचार चेतना सतत जागृत राहते. हेच धोक्याचे ठरु शकते. त्यालाच मानसिक तणाव निर्मिती म्हणतात. तुमची वैचारिक ठेवण कशी असते, तुमच्या स्वभावाची ठेवण कशी तयार झालेली असते हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. वैचारिक घटनांची सतत उजळणी करण्याचे त्या घटनांचे विश्लेषण करीत राहण्याचे काहींचे स्वभाव बनलेले असतात. अशी माणसे विचारांच्या विश्लेशनात्मक बाबींना फारसे महत्त्व देत नसतात. ते भावनिक बाबींना सतत समोर आणून भावनिक विश्लेषण करीत राहतात. त्यामुळे अशी माणसे तो विशिष्ट विचार मनातून दूर शकत नाहीत. स्वत:ला असमर्थ ठरवितात. विचार केला तर अशा भावनिक बाबींवर विचारला व्यवहारिक दबावाने, सत्य परिस्थितीचे अवलोकन करुन छेद देणे अशक्य नसते. ते अशी माणसे करीत नाहीत. अशानाच मानसिक तणावाला सामोरे जावे लागते.
मी माझे एक मित्र बघितले मी. वैद्य ते आणि मी गेली पाच वर्षे सततच्या सहवासात आहोत. दररोज संध्याकाळी भेटतो. बागेत फिरण्यास जातो. गप्पा-टप्पा होतात. सामाजिक विषय, राजकारण, देवधर्म बदलत जाणारा समाज, भूतकाळातील नोकरी व्यवसाय ह्यामधल्या रोमांचित प्रसंग इत्यादी विषयावर सततच्या गप्पा गोष्टी होत असतात. कुटूंब वा वैयक्तीक जीवनावर केव्हाच भाष्य होत नाही. संध्याकाळची निरामय वेळ कशी घालवावी व आनंद घ्यावा ही सर्वसाधारण धारणा.
एका प्रसंगामध्ये मी सहज विचारणा केली, वैद्य साहेब आपण कुठे राहता? त्यांनी सोसायटीचे नाव सांगितले. घरी कोण कोण असते? आम्ही दोघेच. मी व माझी पत्नी. तुम्हाला काही मुले? मी चौकशी केली. वैद्य एकदम गप्प झाले. “नशीब आमचे, २७ वर्षांचा मुलगा होता. तरूण मुलगा, चांगल्या कंपनीमध्ये नोकरीला.
आमच्याकडे राहयचा. दुर्दैवाने अपघात झाला व त्यातच तो खलास झाला.” वैद्यांचे डोळे पाणावले होते. आज त्याला जाऊन तीन वर्षे झाली. ते खिन्न मनाने सांगत होते.
स्वत:चा एकूलता एक मुलगा, तरूण जीवनाच्या चक्राला हातभार लावणार आणि काळाच्या आघातामध्ये एकदम पडद्याआड होणे ही किती भयावह व दुख:द घटना आहे. मला नाही वाटत ह्या घटनेपेक्षा कोणत्याही घटनेची तिव्रता जास्त भयावह व परिणामर करणारी असू शकेल. परंतू एक गोष्ट मला जाणवली की माझा व वैद्यांचा सहवास पाच वर्षांपासून सततचा होता. परंतू तरीही मला ह्या घटनेची केव्हाच चाहूल लागली नाही. त्यांनी कधीच वाच्यता केली नाही. न कोणता प्रसंग निर्माण झाला की ह्यांनी ती मला इतरांना सांगावी.

ह्यालाच स्वभाव विशेष म्हणतात. घटना घडली, तुफान निर्माण झाले, ते वादळच होते. थोड्याशा वेळेनंतर स्थिरस्थावर झाले. वैद्य रडले असतील, ओरडले असतील, त्यांची झोप, भुक काही दिवस त्यांना साथ सोडून गेली असेल. दुख:च्या त्या कोसळलेल्या डोंगरानी कोपाता आघात केला नसेल. परंतू ते दुखः ही पचविले होते. काळ प्रत्येक गोष्ट, प्रत्येक आठवणी विसरण्यास सतत मदत करीत असतो. निसर्गाचे हे चक्र आहे. ही इश्वरी इच्छा म्हणून त्याला आपण मान्यता द्यावी ही समजदारी. जी माणसे त्याला वैचारीक विश्लेशन करुन विसरत नाहीत, प्रसंगाना बाजूस सारत नाहीत, भावनीक चक्रातच अडकून राहतात,त्यानाच मानसिक तणावाला सामोरे जावे लागते.
एखादी भयानक, दुर्भाग्यपूर्ण, सहनशक्तीचा अंत बघणारी घटना घडते – जसे सख्यातल्याचा अनैसर्गिक मृत्यू, जन्मभर साठवलेली पूंजी नष्ट होणे, इत्यादी – एकदम प्रचंड आघात होतो, दुःखाचा डोंगर कोसळतो, हे नैसर्गिक आहे. परंतु ह्यातून स्वतःला सावरणे है काहीजण करतात. जीवनाच्या सुख दुःखाच्या चक्राचा विचार करतात. दुनियामे आये है तो जीनाही पडेगा । जीवन हे जहर तो पिनाही पडेगा । हे तत्वज्ञान ही मानसे बाळगतात. अशीच माणसे तणावमुक्त जीवन जगू शकतात.

क्रमशः पुढे ३ वर चालू –

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

मानसिक तणाव -२

प्रिय वाचक – – -मानसिक तणाव ही लेखमाला मी आपणासाठी क्रमशः आठ भागात देत आहे. कृपया आपला अभिप्राय द्यावा. धन्यवाद.

मानसिक तणाव -२

(हा लेख क्रमशः आहे )

माणसाच मन अतिशय चंचल आणि प्रचंड वेगवान असते.
अस्तित्वात असलेल्या ज्ञानानुसार त्याचा वेग, प्रकाश वेगापेक्षा कितीतरी जास्त असतो. त्याची मोजमाप कुणीही करु शकत नाही.
शरिरातील सर्व अवयवांचा शोध लागला, परंतु मन हा अवयव म्हणून सापडले नाही. ते एक विचारवाहक म्हणून आहे ही संकल्पना. अदृष्य परंतु प्रचंड कार्य क्षमताप्राप्त असे असते.
दोन गोष्टींचा शोध आजतागायत २खील लागलेला नाही. त्यांच्या बद्दल खूप माहीती, ज्ञान प्राप्त आहे. परंतु त्यांना कुणीही बघीतल नाही. ते म्हणजे एक परमेश्वर आणि दुसरे माणसाचे मन.
मनाचे Physicial Existance अर्थांत शारीरिक अस्तित्व दिसत नसले, तरी त्याचा क्रियात्मक सहभाग Activity in form of Energy दिसून येतो.
मानवाने प्रकाश शक्तीला, उष्णता शक्तीला, विजेच्या शक्तीला, वादळ-वाऱ्याच्या शक्तीला, जवळ जवळ सर्व प्रकारच्या शक्तीना अंकित करण्याची कला बऱ्याच अंशी साध्य केली. मनाच्या शक्तीची कल्पना ही मानवाला युगानुयुगे आलेली आहे, परंतु आजतागायत त्या मनःशक्तीला कुणीही अंकीत करु शकले नाही. अनेक ऋषी, संत महात्मे, विद्वान मंडळी, मोठ मोठे धर्मग्रंथ यांनी मनास शांत करण्याबद्दल अनेक मार्ग सुचविले आहेत. तरी देखील त्या मनावर कुणालाही ताबा मिळवता आलेला नाही. त्या आणि कोणत्याही सामान्य व्यक्तीला. विचारांनी प्रचंड बुद्धीमान, जागतीक मान्यतेची असलेले अनेक थोर महात्मे आपल्या चंचल मनासमोर हत्-बल झालेले आम्हाला माहीत आहेत. अध्यात्म शास्त्र, विज्ञान शास्त्र यांनी देखील मनासमोर हात टेकलेले आजतरी दिसते.
चंचलता हा मनाचा गुणधर्म. मन केव्हांच शांत, स्थीर
असणार नाही. ह्या चंचल मनाच्या हालचालीमुळे जेव्हां शरिरावर शरिरामधल्या अवयवावर परिणाम होतो, त्यालाच मानसिक तणाव असे सर्वसाधारण म्हणतात. शरिरामध्ये होणऱ्या व्याधीला जेव्हां मन ही संकल्पना जबाबदार असते वा ठरते, तेव्हां आपण हे सारे मानसिक तणावामुळे झाले असे संबोधतो. जर सुक्ष्म पद्धतीने विचार केला तर आजचे शरिर विज्ञान सांगते की जवळ जवळ सर्वच रोगांचे कारण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मनाच्या हलचालीमुळे मानसिक तणावामुळे निर्माण झालेले असते.
याचा अर्थ सुदृढ शरिर केवळ सुदृढ मनामुळेच असू शकते. Healthy Mind in Healthy body म्हणतात. ते ह्यालाच.
शरिरावर राज्य करते ते तुमचे मन. तुम्हाला सम्राट बनवते ते मन आणि भिकारी करुन टाकते तेही तुमचे मन. जगाच्या इतिहासांत आजपर्यंत अनेकजणानी जसे ऋषीमुनी, संत महात्मे, विचारवंत, विद्वान, निरनिराळे धर्म व त्यांचे गुरुजन यांनी मनावर ताबा मिळवण्याचे अनेक मार्ग सुचविले.
पण खऱ्या अर्थाने कुणासही त्यात आजपर्यंत यश आलेले नाही. मनाच्या चंचल गुणधर्माचे आणि त्याच मनामुळे निर्माण होणाऱ्या मानसिक तणावाचे महत्व येथेच दिसून येते.
ज्या घटना जीवनामध्ये घडत असतात, त्याना तीन कारणे प्रामुख्याने असतात.
१) वातावरण, जे निसर्ग निर्मीत असते.
२) परिस्थिती, जी मानव निर्मीत असते, आणि
३) वैयक्तीक स्वभाव विशेष.
ह्या जणू घटनेच्या त्रिकोणाच्या तिन बाजू ठरून घटना होत जाते. जीवनचक्रामध्ये घडणाऱ्या घटना ह्या निसर्ग निर्मीत वा ईश्वर निर्मीत केव्हांच नसतात. मात्र आपण त्या घटना निर्माण करण्यास कारणीभूत असतो. व्यक्ती तितके स्वभाव. स्वभाव तितक्या घटना. प्रत्येक घटना अनेक अनुभवाना जन्म देत असते. हेच भिन्न भिन्न स्वभाव पुन्हा विविध घटना घडण्यास कारणीभूत होत असतात. असेच जीवनाचे चक्र चालू राहते. घटनांच्या क्रियांचा आपल्या मनावरचा परिणाम म्हणजे सुखदुःखाच्या लाटांची निर्मीती.
घटना व प्रसंग कसे घडतात हे प्रथम जाणले पाहीजे. त्या ईश्वराची वा निसर्गाची एक महान कलाकृती व योजना ही घटनांच्या माध्यमामधून दिसून येत असते. निसर्गाने त्याचे नियम केलेले आसतात.ते सतत, सारखे आणि निश्चीत पद्धतीने चालत असतात. ह्या मध्ये क्रिया वा प्रतिक्रीया घडत असतात. घटना ज्या घडत असतात, त्या फक्त निसर्गाच्या चाकोरीमधूनच. प्रत्येकजण हाच घटनांचा निर्माता असतो. ह्यामध्ये ईश्वराची भूमिका वा प्रत्यक्ष सहभाग केव्हांच नसतो. घटना धडण्याचे स्वातंत्र आणि परिणाम ह्याचा प्रत्यक्ष आपल्याशीच असतो.
घटना ह्या आवडणाऱ्या, भावणाऱ्या असतात तशाच त्या न आवडणाऱ्या देखील असतात. घटना ह्या सुख दुःखाच्या लाटा निर्माण करीत असतात. त्या नेहमी प्रासंगीक असतात. परंतु कोणतीही सुख दुःखाची लाट ही “मानसिक तणाव निर्माण करते” ह्या सदरांत मोडत नसते. निसर्ग वा काळ अशा घटनाना शारिरीक हानी न पोहंचू देता, सर्व सुसाह्य करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु ह्याच घटनामधून जन्म होतो, निर्मीती होते ती तुमच्या स्वभाव रचनेची. हाच अत्यंत महत्वाचा धागा आहे, पायरी आहे, मानसिक तणावाची. तुमचा निर्माण झालेला स्वभाव, तुमच वागण, हे जेव्हां सभोवतालच्या परिस्थितीवर आघात करतो, त्याचवेळी जन्म होतो मानसिक तणावाचा.
म्हणून अत्यंत महत्वाचे – अत्यंत महत्वाचे – म्हणजे प्रत्येकांचे स्वभाव हेच मानसिक तणाव याची चौकट निर्माण करीत असतात. कोणतीही आवती भोवतीची परिस्थिती नव्हे. हे निसर्गाचे वरदान समजा.

क्रमशः पुढे २ वर चालू –

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com