Monthly Archives: मे 2016

एक आदर्श शिक्षिका

एक आदर्श शिक्षिका

डॉ.देशमुख हे आम्हास Physiology हा विषय शिकवणारे प्राध्यापक होते. अतिशय विद्वान. त्यांच्या विषयाचे प्रचंड ज्ञान संपादन केलेले. त्यांनी त्यांचे प्रबंध दोन वेगवेगळ्या विषयावर दोन विश्वविद्यालयांत सादर करुन, वेगवेगळ्या डॉक्टरेट पदव्या मिळविल्या होत्या. विषयाचे जरी अथांग ज्ञान मिळाले असले तरी शिक्षकीपेशामध्ये ते अयशस्वी झालेले जाणवले. वर्गांत शिकवण्यासाठी येण्यापूर्वी नोकर १०-१२ पुस्तके टेबलावर ठेऊन जात असे. पुस्तकांत Book-Mark ” ठेवलेले असे. प्राध्यापकांची शिकवण्याची पद्धत आगदीच वेगळी होती. एखादा विषय, त्याची व्याख्या, प्रस्तावना, संदर्भ, चर्चात्मक टिकाटिपनी, सारे ते निरनिराळी पुस्तके काढून बुकमार्कने पान उघडून चक्क वाचून दाखवित. सोप्या, वेगळ्या भाषेत त्यावरचे भाष्य ते केंव्हाच करीत नव्हते. कुण्या विद्यार्थ्याने एखादी शंका विचारली तर त्याचे उत्तर कोणत्या पुस्तकांत कोणत्या Chapter मध्ये आहे, हे ते सांगत. विद्यार्थाना ते अत्यंत रुक्ष वाटत होते. त्या प्रचंड ज्ञानी प्राध्यापकाकडून तसूभर ज्ञान मुलाना मिळाल्याचे समाधान दिसून आले नाही.
डॉ. मँडम नाडकर्नी मेडीकल कॉलेजमध्ये बालरोग ( Pediatric ) ह्या विषयाच्या प्राध्यापिका म्हणून नुकत्याच रुजू झाल्या होत्या. तरुण, तडफदार व्यक्तीमत्व होते. त्या केवळ एका महीन्यांच्या काळांतच विद्यार्थ्यांच्या चहात्या झाल्या. त्यांचे भाषा प्रभूत्व होते. अतिशय सरळ सोप्या आणि साध्या शब्दांत विषय फुलविण्याची विलक्षण कला साध्य असलेली. प्रत्येक विषयाची सुरवात एकदम प्राथमिक स्थरावर जाऊन करीत. विषयच्या मुळापासून समजावण्याचे कौशल्य त्यांच्या अंगी होते. कोणताही मुद्दा जोपर्यंत वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या लक्षांत येणार नाही, तो पर्यंत सर्व अंगाने त्या तो फुलवित होत्या. सर्वात महत्वाचे म्हणजे विद्यार्थी, त्यांची समज, त्यांच्या अंगगुणांची झेप, व तो विषय ग्रहन करतो कां ? ह्यात त्या बारकाइने लक्ष देत होत्या. चित्र, फोटो, ग्राफ, आलेख, प्रोजक्षन, एखाद्या बालरुग्णाला वर्गात आणून प्रात्यक्षिके दाखवित असे. विषय आगदी शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत आकलन झाला किंवा नाही हे तगमगीने जाणण्याचा त्या प्रयत्न करीत असत.
प्रत्येक विद्यार्थाचा नावानिशी परिचय करुन घेत होत्या.
त्या इतर वेळीही Extra Classes घेत होत्या. केंव्हाही क्लासेस, केंव्हाही Laboratory, Wards, Out Patient Department, ह्यांच्या सहाय्याने विद्यार्थ्याना बालरोगाविषयी मार्गदर्शन करीत असत. विद्यार्थी देखील त्यांच्याबद्दल सतर्क होते. मिळणारय़ा प्रत्येक क्षणाचा ते उपयाग करुन घेत. ज्या ज्या वेळी जमेल, कॉलेजमधला प्रत्येक विद्यार्थी डॉ. नाडकर्णीचे कोठे लेक्चर आहे याची नोंद ठेवत होता. सर्व विद्यार्थी अटेंड करण्याचा प्रयत्न करीत असे.
विद्यार्थ्यावरचे, शिकवण्यावरचे प्रेम, आपलेपणा, तगमग, ध्यास हे त्यांचे गुणधर्म दिसले. कोठेही राग नाही. तिटकारा नाही. कंटाळा नाही. शिक्षकी व्यवसायातील एक आदर्श व सन्मानित व्यक्तीमत्व.
प्रत्येक शिक्षक ज्या स्थरावर शिकवण्याचे कार्य करतो, हे त्याचे ज्ञानदान असते. त्या वेळच्या त्या स्थराच्या विद्यार्थ्यासाठी तो ज्ञानानी परिपूर्ण असतो. विद्यार्थ्याला शिक्षक किती ज्ञानी आहे, ह्याच्याशी कांही घेणे वा देणे नसते. देणारय़ाची क्षमता केवढी ह्यापेक्षा, तो ते ज्ञान विद्यार्थ्यांच्या समज बुद्धीत कसे घालतो, ह्यातच त्या शिक्षकांचे यश असते.
डॉ. देशमुख हे प्रचंड ज्ञानी असले, तरी मला डॉ. मँडम नाडकर्णी खऱ्या ज्ञानदात्री वाटल्या.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

bhagwan nagapurkar.blogspot.com

प्रेम- अहंकाराचे अंकुरण

प्रेम- अहंकाराचे अंकुरण

संध्याकाळची वेळ होती. घराजवळच रेल्वे स्टेशन. तेथे रेल्वे रुळाच्या एका बाजूस असलेल्या दगडावर बसलो होतो. समोर रेल्वेचे ७-८ मार्ग आणि त्यावरुन जाणाऱ्या येणाऱ्या रेल्वेगाड्या बघताना करमणूक होत होती. तसा तो भाग निर्मनुष्य.
अचानक माझे लक्ष वेधलं गेल ते थोड्याशा अंतरावर खेळणाऱ्या कांहीं शाळकरी मुलांवर. पांच सात मुले पळापळी, पकडा पकडी, मस्ती करीत होती. मला त्यांच्या खेळामध्ये थोडासा विचित्रपणा दिसून येत होता. रेल्वेरुळाखाली टाकलेल्या खडीचे दगड उचलून ते रेल्वेच्या हेडवायरला नेम धरुन मारीत होते. कुणाचा अचूक नेम लागतो, ह्याची त्यांची चढावोढ लागलेली दिसून येत होती. बहूतेक नेम चुकत होते. परंतु रेल्वेरुळामध्ये लहान लहान खडीचे बरेच दगड होते. ते त्या दगडांचा सर्रास वापर करुन त्या हेडवायरला लक्ष्य करीत होते. त्याच्या दिशेने दगड फेकीत होता. सारा खेळ भयानक होता. तो रेल्वेरुळ मार्गाला घातक देखिल होता. दूर अंतराहून मी हे सारे बघत होतो. मी बेचैन झालो. त्या मुलांच्या खोडकर खेळण्यावर अंकूश ठेवण्यासाठी जवळपास कुणीही दिसून येत नव्हते. शेवटी आपणच त्या विचित्र खेळाला टोकावे, मुलांना समज द्यावी ह्या उद्देशाने मी उठलो.
मुले थोड्याशा अंतरावर होती. मी दुरुनच ओरडलो. “ये मुलानो, काय चालले आहे ?, रेल्वे मार्गाचे व हेडवायरचे नुकसान करु नका. जा धरी जा आता. ” त्यांचे लक्ष माझ्याकडे जाताच त्यानी आपला खेळ बंद केला. मी त्याना हाताने जा म्हणून खुणावत होतो. अचानक त्याच्यातील एकाने पुढे येवून हातातील दगड माझ्याच दिशेने भिरकावला. मी ओरडून त्यांच्यावर रागावलो. परंतु आश्चर्य म्हणजे ती मुले निघून जाण्याऐवजी, सर्वांनीच हाती दगड घेवून ते माझ्याच दिशेने फेकूं लागले. एक अनपेक्षित व भयावह परिस्थिती निर्माण झाली. शेवटी मला माझे वय आणि शक्तिच्या मर्यादा जाणून, मीच तेथून माझा पाय काढता घेतला.
लहान शाळकरी मुले. खेळकर वय. परंतु त्यांच्यामधली विध्वंसक वृत्ती बघुन मी चक्रावून गेलो. असे म्हणतात की प्रेम आणि अहंकार ह्या फक्त दोन स्वभावगुणधर्माचे रोपण हे जन्मापासूनच निसर्ग करीत असतो. इतर गुणधर्म त्यांच्या पासूनच उत्पन्न होत असतात. चांगला स्वभाव, चांगल्या वृत्ती, सद्सदविवेकबुद्धी अशा गुणांची वाढ ह्या प्रेमाच्या बिजामधून होत असते. त्याचप्रमाणे राग लोभ मोह इत्यादी षडरिपूं वा विद्धवंसक वृत्तिंची वाढ ही अहंकार ह्या मुळ स्वभावापासूनच होत जाते. जीवनचक्रामध्ये अत्यंत प्रभावी, परंतु गरजेचे असलेले हे दोन स्वभावगुणधर्म प्रेम व अहंकार होत. ह्या जीवन नाण्याच्या दोन बाजू असतात. खेळातल्या चितपट ह्या संकलपणेप्रमाणे जीवनाचा मार्ग ते आखत असतात. कधी अहंकाराचा तर कधी प्रेमाचा विजय होत असताना आपण बघतो. निसर्गाचे एक वैशिट्य म्हणजे तो प्रत्येकाच्या जीवनाच्या अंतीम टप्यावर, प्रेमाचाच विजय नोंदवितो. आजची ही खट्याळ वाटणारी मुलेही निश्चीतच स्वभावानी बदलतील ह्याची मला खात्री वाटते.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

अट्टाहास ?

अट्टाहास ?

एक गमतीचा प्रसंग आठवला. छोटीशी गोष्ट. दैनंदीन जीवनांत घडणारी. तीला आपण सामोरे कसे जातो, ह्यातच अनुभवाची परीपक्वता दिसून येते. असेच प्रसंग आत्मचिंतन करावयास लावणारे व परिस्थितीची जाणीव करण्याची गरज वाटण्यास लावते.
मी परिवाहनच्या बस मधून चाललो होतो. अचानक मला एका कामाची आठवण झाली. करण मी ज्या भागातून चाललो होतो, तेथेच माझे काम होते. आता येईल त्या थांब्यावर आपण उतरुन जावे, हा विचार मनांत आला. त्याच क्षणी माझे लक्ष एका बिल्डींगकडे गेले, जेथे मला जावयाचे होते. समोर सिग्नल आले म्हणून गाडीचा वेग एकदम मंदावला. आपण ह्या मिळालेल्या परिस्थितीचा उपयोग करुन घ्यावा, ह्या विचाराने मी चटकन चालत्या परंतु कमी वेग झालेल्या बसमधून उडी मारुन उतरण्याचा प्रयत्याचा प्रयत्न केली. अर्थात दुर्भाग्य माझे. मला तोल सांभाळता आला नाही. मी पडलो. दुखापत झाली. आणि चार सहा दिवस विश्रांती घ्यावी लागली.
निसर्ग हा महान आहे. कुणाकडून तुम्ही जीतके शिकू शकणार नाही, तीतके जीवनाचे ज्ञान वा तत्वज्ञान तो शिकवत असतो. त्याचा प्रत्येकक्षण आपणास जगायच कस ? ह्याचे मार्गदर्शन करीत असतो. प्रत्येक अनुभव परिपूर्ण असतो. जे त्याबद्दल जागृत असतात, तेच यशस्वी जीवन जगू शकतात. त्याचे कोणतेही मार्गदर्शन दुर्लक्ष केले, तर परिणाम हा वेगळाच होऊ शकतो. ज्याला सर्वसामान्य ‘ भोग भोगणे ‘ असे संबोधून, आपल्या अज्ञानी, भाननिक वागण्यावर पांघरुन टाकण्याचा प्रयत्न केला जातो.
मी पूर्वी उड्या मारल्या नव्हत्या कां ? खिडकीतून उडी, झाडावरुन उडी, गच्चीवरुन उडी, सायकलवरुन उडी, डोहांत डूबण्यासाठी उडी, हे सारे आणि असेच करीत भागदौडीत आयुष्याचा मार्ग चालू होता. ह्यातच उडी आणि उडीचा अंदाज, खोली झेपेची छलांग, हे सारे दृष्टीकोण निसर्गानेच तर आम्हास शिकवले होते. ह्या उड्यांच्या खोलांच्या अंदाजामध्ये सर्वांत महत्वाचे होते ते स्वतःला जाणने की आपली क्षमता किती आहे. शक्ती किती आहे.
निसर्ग तुमच्यामध्ये असलेल्या शक्तीची तुम्हास पूर्ण जाणीव देतो. तशीच ती कशी वाढते वा कमी होते, ह्याचेपण ज्ञान देतो. बालवय वा तारुण्य वयाप्रमाणे वाढणारय़ा हालचाली जादा शक्तीची निर्मिती दाखवतो. त्याचप्रमाणे वृधत्वाकडे झुकणारय़ा वयांत कमी शक्ती निर्मीती होत असल्याचे सुचवितो. ह्यावेळी तुमच्या शारीरिक गरजाना बंधने पडू लागतात. वयाप्रमाणे अवयवांचे कार्य मंदावत जाते. त्याचा परिणाम आवडी निवडी कमी होऊ लागतात. समाधानी वृत्ती निर्माण होते. संघर्ष करण्याची क्षमता जाते. जीद्द हाट्ट ह्या बाबी मंदावतात. आयुष्य रेषेच्या मर्यादा समोर दिसू लागतात. जीवनाभोवती एक बंधनाची चौकट निर्माण झाल्याची जाणीव येऊ लागते. जीवनासाठी संघर्षमय धडपड कमी होऊ लागते. जे जसे आहे, जसे मिळते, जसे होते ते मान्य करण्याची वृत्ती निर्माण होते. दुसरय़ाना सहकार्य, प्रेम संबेध ही भावना जागृत होते. निसर्गाचा हा मार्ग तुमच्या उर्वरीत शांततामय जीवन जगण्याच्या संबंधात असतो.
आयुष्याच्या तर मर्यादा तर ठरलेल्या असतात. त्याची जाणीव देखील निसर्ग वृधाप काळांत करुन देत असतो. आपल्या भावनेना लगाम, तो अवयव अशक्त करुनच करतो. तुम्ही निसर्गाला माना व तसे वागा हाच त्याचा योजनाबद्ध संदेश असतो.

हे सारे सर्व सामान्यासाठी. ज्याना जीवनाची चाकोरी चांगल्या त-हेने समजली असते. परंतु दुर्दैवाने कांहीजण निसर्गाचे हे त्तवज्ञान दुर्लक्ष करतात. ते आपल्या पुर्वानुभवानुसार, अहंकारी स्वभावानुसार वा इतर भावनांच्या अहारी जाऊन, निसर्गाच्या सुचना चाकोरी बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या हिशोबाचा मेळ जमत नाही. परिणाम परिस्थिती सुख-दुःखाच्या हेलकाव्यामध्ये जीवन जगण्यास भाग पाडते.
” वय झाल, उड्या मारण्याचे दिवस आता संपले. प्रचंड शारीरिक हालचाली करण्याचा आता काळ राहीला नाही. सावधतेने जगा. ” हा संदेश माझ अंतरमन अर्थात निसर्ग देतच होता
ना ? पण मी ऐकले नाही. होऊन जाईल सहज हे सारे. त्याक्षणाच्या ह्या भावनिक विचारांना मी बळी पडलो. आणि उडी मारताना खाली पडलो.
कशासाठी हे घडले. निसर्गाला हे दाखऊन द्यायचे होते की
” तू स्वतःला जाणून घे. तुझी क्षमता जाण. वयाचा आदर कर. हे जाणने म्हणजे जसा मी कोण आहे हे समजणे. त्याच प्रमाणे ‘मी ‘ ला जे शरीराचे कवच मिळालेले आहे ते देखील जाणने. हे होय ”

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

एक समाधानी योगदान- —

एक समाधानी योगदान- —

सकाळची वेळ, अचानक चौघेजण माझ्या घरी आले. त्यांचे चेहरे परिचीत होते. त्यानी पुष्पगुच्छ व पेढ्यांचा पुडा आणला होता. ” सर आज आम्ही चौघेही रुग्णालयामधून निवृत्त झालो. आमची नोकरी केवळ तुमच्यामुळेच होती. तुमचा आमच्या जीवनामधील सहभाग आम्ही केंव्हाही विसरु शकत नाही. ” त्यानी ती भेट देत वाकून नमस्कार केला. मी भारावून गेलो. गहीवरलो. माझे डोळे पाणावले.
सहजगत्या घडलेले, सकारात्मक दृष्टीकोणातून केलेले एखादे काम, मानसामध्ये ऋणानुबंधाची भावना निर्माण करु शकतात. हे प्रथमच जाणले होते. माणस कांहीही करत नसतात. ईश्वर त्यांच्याकडून करुन घेतो, ह्याची मला त्या क्षणाला जाणीव झाली. छोटीशी कामे आपण करतो. परंतु जेंव्हा त्याची व्याप्ती महान होत जाते, त्यालाच नैसर्गिक योजना म्हणतात. सर्वांच्या चेहरय़ाकडे बघून मला तो ४० वर्षापुर्वीचा काळ आठवला.
एक प्रसंग १९७० च्या सुमारास घडला होता.
आपल्या प्रलंबीत मागण्या धसास लावण्यासाठी महाराष्ट्र त्रितीय-चतूर्थ कर्मचारय़ानी संप पुकारला. जवळ जवळ ११ दिवस तो संप चालला. एकजुटीचे त्यात दर्शन घडले. बरय़ांच मागण्या मान्य झाल्या. त्या काळांत मी ठाण्याच्या मनोरुग्णालयांत उप प्रमुख (RMO) म्हणून कार्यारत होतो. माझे वरीष्ठ वैद्यकीय अधिक्षक होते. मध्यरात्रीला संप सुरु झाला. संपाची नोटीस आमच्या कार्यालयाला देखील प्राप्त झाली होती.
मनोरुग्णालयाचा भव्य परिसर, ५० हून जास्त वार्डस, त्यावेळी रुग्णसंख्या जवळ जवळ २००० होती. कर्मचारी संख्या ७०० च्या वर होती. सर्व व्यवस्थेचा भार फक्त १० आधिकारी व्यक्तीवरच होता.
सर्व बाबींची जसे रुग्णांचे जेवण खाण, औषधी ह्या आम्ही कांही कॉंट्र्याक्टर्स नेमुन तातडीने करुन घेतले. परंतु रुग्ण व त्यांतही मनोरुग्ण, म्हणून मणूष्यबळ ही प्राथमिक गरज होती. पोलिस खात्याने आम्हास २५ पोलिस कॉन्सटेबलस व एक इन्स्पेक्टर मदत म्हणून देऊ केले होते. हे सारे बिन अनुभवी तर होतेच, परंतु त्यांचा संबंध मनोरुग्णाशी प्रत्यक्ष येणार असल्यामुळे सर्वजण प्रचंड दबावाखाली वाटले. चांगलेच घाबरलेले होते. इन्स्पेक्टर तर म्हणाले ” आम्हाला चोरट्याना, गुंडांना वठनीवर आणण्यास सांगा. आम्ही सर्व ताकतीने करुं. पण हे मनोरुग्ण आमच्यासाठी भिन्न, अनिश्चीत असल्यामुळे एक प्रकारची भिती व शंका वाटते. तरी आम्ही तुमच्या मार्गदर्शनाप्रमाणे करुत. ”
रुग्णसंख्या, आणि कामाचा व्याप बघतां मणूष्यबळ अत्यंत कमी पडू लागले. एखादी दुर्घटना वेगळाच Turning Point बनु शकेल. ही भिती उत्पन्न झाली. शासनानी आम्हास ज्या गोष्टींची तातडीने गरज लागेल ते करुन घेण्याचे आदेश दिले होते. वरीष्ठांचा सतत संपर्क चालू होता.
सर्वात महत्वाची नी तातडीची गरज होती ती मनुष्य बळाची. आम्ही वरीष्ठांशी संपर्क साधला. व त्यांना कमीतकमी १५० लोकांना मदतीसाठी तात्पूरते ( हंगामी ) घेण्याची परवानगी घेतली. हाती वेळ थोडा. मी स्वतः लगेच आनंद नगर, समतानगर, भिमनगर, वर्तक नगर, लोकमान्य नगर ह्या त्या काळातल्या कामगार वस्त्यामध्ये गेलो.

मनोरुग्णालयासाठी मदत करणारय़ा व्यक्तींची रोजंदारीने गरज असल्याचे कळविले. बघता बघता बातमी सर्वत्र पसरली आणि कामगार स्वयंसेवकाची रांगच लागली. आम्ही त्यावेळी बहूतेकाना मदतीसाठी घेतले. ग्रुप ग्रुप करुन वेग वेगळ्या वॉर्डसाठी नेमले.
ठराविक चाकोरीबद्ध व रुग्णांची शारीरिक काळजी घेण्याची जबाबदारी त्याना दिली. सतत मार्गदर्शन करीत गेलो. आधिक्षक स्वतः वरीष्ठांशी व सरकारशी संपासंबंधीत सल्लामसलत व Up-Dated Information and getting guidance ह्यात व्यस्त होते. उप प्रमुख ह्या नात्याने मी व माझे सर्व सहकारी यांनी रुग्णालय, रुग्ण आणि सर्व स्थानीक कामे सांभाळली. अतिशय धावपळीत परंतु सर्व शिस्तशीर तो संपाचा काळ गेला.
संप संपला. बरय़ाच मागण्या मान्य झाल्या. त्याच वेळी माझ्या हे लक्षांत आले की संपकाळांत आम्हास जवळ जवळ १२५ बाहेरच्या तरुण कामगारांनी खूप मदत केली होती. एकदम नविन व तथाकथीत मनोरुग्णाच्या अपरिचीत भयानक वातावरणांत हे सर्व लोक आपले जीवन घोक्यांत घालून रात्रंदिवस मनोरुग्णासाठी कष्ट करीत होते. रात्र रात्र जागून काढल्या. जे नियमीत कामगार रुग्णसेवा करीत होते, त्यापेक्षाही तसूभर जास्त सेवा ही नविन मंडळी उत्साहाने करीत असल्याची जाणीव मला झाली होती.
त्या वेळी हे काम मजवरच वरिष्ठाकडून सोपविण्यात आले होते. त्यांत संपस्थितीचा सर्व आढावा रिपोर्ट तयार करणे व तो त्वरित संबंधीत अधिकारय़ाना वा सरकारला मिळेल हे बघत होतो. मी स्वतः त्या वेळची संप परिस्थिती, तत्कालीन व्यवस्थापना आणि विषेशकरुन हंगामी आणलेल्या सर्व कामगार संबंधीची अमुल्य मदत कार्य यांचे वर्णन सुद्धा होते. ह्याच वेळी एक महत्वाची नोंद व टिपणी केली गेली. ह्या सर्व हंगामी मदत करणारय़ा कामगाराना त्यांचे इनाम म्हणून शासनांत समावून घ्यावे. मी माझ्या आढावा रिपोर्टच्या प्रति वरिष्ठा बरोबर मंत्रालयांत स्थानिक आमदारामार्फत पाठपुरावा केला.
सर्व हंगामी कामगारांचे नशिब चांगले होते. सरकारने स्पेशल नोटीफिकेशन काढले. मनोरुग्णालयांत संपकाळांत मदत करणारय़ा कामगारांना शासकिय नोकरीमध्ये समावून घेण्याचा निर्णय घेण्यांत आला. तसा आदेश आमच्या रुग्णालयास प्राप्त झाला. ज्या कामगारांनी त्या काळांत मदत केली, त्यांची त्वरित वैद्यकीय तपासणी व पाठविलेला नमुना फॉर्म भरुन सादर करण्याचे सांगण्यात आले होते. कामगारांची तपासणी, छाननी. व निवड ही कामे मजवरच सोपवली गेली. आम्ही दोन दिवसांतच सर्व सोपस्कार पुर्ण केले व १०१ हंगामी कामगारांचा अहवाल संबंधीतांकडे पाठविला. थोड्याच दिवसांत सर्वांच्या नेमणूकांचे शासनाचे पत्रक मिळाले.
मी एक अत्यंत साधा व दुय्यम दर्जाचा ( त्या वेळी ) वैद्यकीय आधिकारी, परंतु केवळ निर्माण झालेल्या आपत्तीजनक परिस्थितीमध्ये एकाग्रतेने लक्ष देऊन, एक वेगळीच वातावरण निर्मीती करुं शकलो. कर्मचारय़ांचा संप, मनोरुग्णालयातील सेवा विस्कळीत होणे, प्रचंड संख्येनी असलेले मनोरुग्ण, मणुष्य बळाची आपत्तीजनक गरज, निरनिराळ्या कामगार वस्त्यामधून स्वतःजाऊन बोलावून आणलेले कामगार, त्याच्याकडून घेतलेली सेवा,

आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे त्या कामगारांचा शासकीय सेवेत कायम समावेश होण्यासाठी स्थानिक आमदारामार्फत यशस्वी प्रयत्न हे मी माझ्या जीवन प्रवाहांत केंव्हाच विसरणार नाही.
हीच ती मनोरुग्णालयामधली चार कामगार वर्ग मंडळी, तो दिवस केंव्हाच विसरु शकत नव्हती, ज्याना मी जाऊन बोलावून कामासाठी नेले होते. त्यांचे आणि अशाच इतर १०१ जणांचे जीवन त्या रुग्णालयाच्या वातावरणात रुजले, फुलले, आणि फळले होते. एक निमित्य वा ईश्वरी हस्तक म्हणा मी फक्त बिया घेतल्या व योग्य जमिनीत पेरल्या. शेवटी झाडे आपल्याच पद्धतीने वाढतात व फोफावतात. त्या १०१ जणांचे रोपण हेच माझे समाधानी योगदान नव्हे कां ?

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

श्वासाचा मागोवा आणि चित्तांतील शांतता !

श्वासाचा मागोवा आणि चित्तांतील शांतता !

श्वासोछ्वास ही शरीराची अत्यंत महत्वाची नैसर्गिक क्रिया आहे. जीवंतपणाचे ते सर्वांत प्रमुख लक्षण असते. श्वास आहे तर जीवंतपणा आहे. त्याच्या शिवाय देह केवळ मृत झालेला असेल. जगण्यासाठी प्राथमिक गरज असते ती प्राणवायुची. अर्थात ऑक्सिजनची. वातावरणात तो मुबलक प्रमाणांत असतो. शरीर तो शोषून घेतो. व त्यातून शक्ती अर्थात उर्जा प्राप्त होते. जगण्याचे ते आद्य व प्रमुख साधन. श्वासोछ्वास क्रिया म्हणजे प्राणवायू घेणे व कार्बंनडाय ऑक्साईड मिश्रीत वायू शरीरावाटे बाहेर सोडणे. ह्या प्रक्रियेत फुफ्फूस, श्वास नलिका, नाक ही अवयवे सतत कार्यारत असतात. ह्या क्रियेची आपणास एका मर्यादेपर्यंतच जाणीव होत असते. तरी ही दैनंदिन क्रिया अजाणता (Involuntary Action) सदैव होत असते. आपले त्या क्रियाकडे केंव्हाच लक्ष नसते. वा तशी गरज देखील भासत नाही. सर्वकांही नैसर्गिक, सहज, व सतत होत राहते. केवळ शरीराची हालचाल कमीजास्त प्रसंगानुरुप होते, तेव्हांच त्या क्रियेची जाणीव होऊ लागते. ज्याला Conscious Breathing अर्थात श्वासोछ्वासाची जाणीव म्हणता येईल.
श्वास घेणे व सोडणे ही म्हटले तर छोटीशीच क्रिया. परंतु हीला ध्यान धारणेत फार महत्व असते. श्वासावर लक्ष केंद्रित करणे ह्या प्रक्रियेमध्ये, मेंदूत उत्पन्न होणाऱ्या विचारांच्या जाणीवेवर बाधा येते. विचारावरचे लक्ष सारले जाऊन ते श्वासावर केंद्रित करण्याच्या प्रयत्यांत, भरकटणाऱ्या विचारांवरचे लक्ष त्या क्षणाला तरी टाळता येते. श्वास अर्थात हवा ही नाकाद्वारे कशी आंत जाते, घशातून छातीकडे तीचा मार्ग असतो. तुम्हास त्याच्या मार्गावरच लक्ष केंद्रित करायचे असते. हवा नाकाद्वारे आंत खेचली जाऊन ती पून्हा त्याच वाटेने परत बाहेर टाकली जाते. आंत जाणारी हवा थोडा क्षण क्रिया थांबते. व परत हवा बाहेर पडते. ह्या सर्व क्रिया तूम्हास जाणीव पूर्वक टिपायच्या असतात. हवेचे आंत बाहेर येणे फक्त. म्हणजेच श्वासावर लक्ष केंद्रित करायचे असते. हे सुद्धा विचारावर लक्ष केंद्रित करण्यासारखेच असते. परंतु ह्यात विचाराबरोबर वाहून जाणे टाळले जाते. पून्हा येणाऱ्या विचारावर लक्ष जाण्यापासून अलिप्त राहता येते. ह्यांत विचारावरचे लक्ष श्वासावरच जात असल्यामुळे लक्षाची जाणीव एक मार्गीच होते. आत घेतला जाणारा व बाहेर काडून टाकलेला श्वास फक्त केंद्रित करणे.
खरे म्हटलेतर श्वासोछ्वास ही क्रिया Involuntary अर्थात अजाणता होणारी, परंतु तीच आता प्रथम Voluntary जाणती करायची असते. म्हणजे श्वास दिर्घ करुन घेणे व हलके हलके सोडणे हे ह्यात महत्वाचे.
ज्याप्रमाणे थंड पाण्याचा ग्लास भरुन पाणी पितानांच त्या पाण्याचा थंडपणा व तोंडातून घशातून पूढे जाताना जाणीव होते तशीच जाणीव तुमच्या श्वासाचीपण झाली पाहीजे. हा जाणता श्वासोछ्वास Awareness of breathing हा शक्यतो नेहमीचा भाग असावा. ह्याकडे लक्ष केंद्रित असावे. फक्त ध्यान धारणेच्या वेळीच नसून तुमच्या दैनंदिन जीवनाच्या प्रत्येक हलचालीच्या वेळी देखील ही सवय तुमची कार्यकुशलबुद्धी वा लक्ष केंद्रित करण्याच्या वृत्तीला वाढविते.

मन चंचल असून ते कधीच शांत राहू शकत नाही. हा त्याचा नैसर्गिक गुणधर्म ठरलेला असतो. त्यांत केव्हांच बदल करुन त्याला स्थिर अवस्थेत ठेवता येणे शक्य नसते. मात्र त्याच्या सततच्या धावपळीला, उड्डानाला एकाच दिशेने राहण्याचे मार्गदर्शन प्रयत्न करुन करता येते. हे फक्त जाणीवपूर्वक सवयीने साध्य करता येते. श्वासाच्या हलचालीवर लक्ष केंद्रित करणे ह्याने ते साध्य होते. मनाला सुद्धा ‘ एका वेळी एकच विचार ‘ ह्या तत्वावर हलचाल करण्याची गरज असते. तो त्याचा स्थायी स्वभाव तेव्हां त्या मनाला उत्पन्न होणाऱ्या विचारांच्या मागे धावू देण्यापेक्षा जाणीवपूर्वक श्वासाच्या हलचालीवर केंद्रित करणे शक्य होऊ शकते. ह्यालाच मनाची एकाग्रता साधणे म्हणता येइल.
ह्याच श्वासांच्या हालचालीवर मनाला केंद्रित करताना शरीरांत कांही क्रिया होऊ लागतात. प्रथम चांगल्या सपाट स्वच्छ आसनावर ताठ पाठीच्या कणाने बसलेल्या शरीराला स्थिर वा अचल केले जाते. व डोळे बंद करुन प्रथम ईश्वरी चिंतन वा नामस्मरण केले जाते. थोड्या वेळाने लक्ष श्वासाकडे केंद्रित केले जाते. ह्या प्रयत्न्यात मन एकाग्र होण्यास सुरवात होते. ह्या सर्व क्रिया जाणीवपूर्वक Voluntary action होत असतात. मात्र तुमच्या उत्स्फूर्त प्रामाणीक, आन्तरीक आणि सत्य प्रयत्नाने ह्याच जाणीवपूर्वक सूरु केलेल्या क्रियेमध्ये, लक्ष श्वासावर केंद्रित होत असताना, तुम्ही हळू हळू स्वतःला विसरु लागतात. अर्थात शरीराला विसरतात. स्वतःकडे आंत असलेल्या एका विशाल पोकळीमध्ये जावू लागतात. हे अजाणता Involuntary होऊ लागते. हीच जाणता व अजाणताची सिमा रेषा असते. कदाचित् विचीत्र अशा वातावरणांत तुम्ही शिरत असल्याचा भास होऊ लागतो. Hallucinations प्रमाणे. जाण –अजाण ही सिमा अत्यंत महत्वाची असते. कारण याच पायरीवर तुम्ही कदाचित् बेचैन होतात. भिती वाटते. एका माहीत असलेल्या अस्तीत्वामधून अपरिचीत वातावरणांत तुम्ही शिरत असल्याचा भास होऊ लागतो. हीच तुमची सत्व परिक्षेची वेळ असते. कित्त्येकजण जोराचा प्रयत्न करुन त्या सिमारेषेवरुन झटका देत, शरीर मनाला एकदम जागृत करतात. डोळे उघडतात व त्या अजाण अशा वातावरणांत जाण्याचे हमखास टाळतात. तुम्ही ध्यानमार्गाच्या दारापर्यंत पोहंचले असतात, परंतु तुमचे मन कमकुवत बनते. तुम्ही परत सामान्य व दैनंदिन वातावरणांत येतांत. झोपेच्या क्रियेमध्ये असेच असते. प्रथम व्यक्ती विश्रांती घेते. शरीर शिथील बनते. डोळे बंद होतात. हलके हलके देहातील जाणीवधारक क्रिया बंद पडून, सहज तुम्ही झोपेच्या आधीन जातात. जागृत अवस्था व निद्रा ह्याच्या सिमा रेखा निसर्ग अतिशय कौशल्याने पार करुन, एका स्थितीमधून दुसऱ्या स्थितीमध्ये नेवून सोडतो. ह्याची थोडीदेखील जाणीव आपणास होऊ देत नाही. कारण ही नैसर्गिक क्रिया असते. व जन्मापासून निसर्ग तुम्हाला ह्यात साथ करीत असतो. म्हणून यात सहजता आढळून येते. दोन अवस्थेचे पदार्पण. जागृत आणि निद्रा अथवा निद्रेतून चाळविले जावून जागृत होणे. हे निसर्ग सहज साध्य करतो.

ध्यान प्रक्रिया प्रथमावस्थेत कृत्रीम असते. खऱ्या अर्थाने ती देखील नैसर्गिकच असते. परंतु तीला प्राप्त करावे लागते. आपल्या इच्छेनुसार ध्यानावस्था निर्माण करावी लागते. गाढ निद्रेचा खरा आनंद लूटण्यासाठी म्हणजे जाणीव होण्यासाठी गाढ निद्रा व जागृतावस्था ह्या दोन भिन्न अवस्थेला एकत्र करण्याची कला साध्य झाली पाहीजे. अत्यंत अवघड ही बाब आहे. ह्यात निद्रेमुळे शरीराला संपूर्ण विश्रांतीचे जे सुख समाधान लाभते ते तर साध्य होतेच. त्याच वेळी गाढ निद्रेमधील शांत नितांत आनंद, संतोष ह्याची जाणीव पण जागृत राहून मिळणे हे अप्रतीमच नव्हे काय ? ध्यानामध्ये हेच साध्य होते. दोन्हीही नैसर्गिक गुणधर्म जागृत अवस्था व निद्रा ह्यांचे सुख.
परंतु ध्यान धारणा सर्व सामान्यासाठी सहज व नैसर्गिक क्रिया रहात नाही. झोप वा निद्रा सहज दोन्ही अवस्थेमधले रुपांतर साध्य करते. ध्यानावस्था जागृत अवस्थेमधून ध्यान लागणाऱ्या स्थितीत जाताना त्या सिमारेषेवरुन झेप घेऊन जाते. हालके हालके निद्रेप्रमाणे जात नाही. हीच झेप अत्यंत महत्वाची असते. उडणाऱ्या पक्षाने झाडाचा वा डोंगरकड्याचा आधार सोडून आकाशाच्या पोकळीत छलांग मारल्याप्रमाणे. पक्षी एकदम पडेल अथवा उडेल. निसर्ग त्याला तसे ज्ञान व कला देतो. विमानाला मात्र झेप घेवून उड्डान करावे लागते. एका मोठ्या पोकळीत शिरण्यासाठी. निद्रा पक्षाप्रमाणे व ध्यान धारणा विमानाच्या उड्डानाप्रमाणे. इस पार वा उस पार.
प्राथमिक अवस्थेमधील ध्यान धारक ह्याच ‘ झेप ‘ अनुभवातून जातात. दोघाना एका अज्ञात वातावरणात शिरण्याचा एकदम नविन व प्रथम अनुभव घ्यावयाचा असतो. ह्यात शंका, भिती, अनिश्चीतता ह्या भावनाचा वरचश्मा होतो. म्हणून साधक घाबरुन त्याला सामोरे जाण्याचे टाळतो. येथेच कित्येक साघक हतबल होऊन ध्यानात खऱ्या अर्थाने शिरण्यामध्ये अयशस्वी होतात. ते आपले खोलात जाण्याच्या प्रक्रियेला तोडून टाकतात. निराश होतात. सुरवातीच्या श्वासावरचे लक्ष केंद्रित होण्याची क्रिया प्रथम जाणीवपूर्वक असली तरी सवय व प्रयत्नाने ती अजाणीव अर्थात Involuntary Action बनू लागते. ती मग सहज साध्य क्रिया बनते. साधक श्वासावरच्या लक्ष केंद्रित करण्याच्या क्रियेस थोड्याशा प्रयत्नातच देह मनाची स्थिरता निर्माण करु शकतो.
साधकाची पुढची पायरी म्हणजे तो ध्यानावस्थेमधल्या जाण-अजाण ह्या स्थरापर्यंत तर आलेल्या असतो. आता मनाचा निगृह, आत्मविश्वास आणि संकल्पाची शक्ती एकवटून ह्या पायऱ्यावरुन तसेच वाहून जावू देणे. ध्यान योगांत वा ध्यान धारणेमध्ये निसर्ग सदा तुमची साथ देत असतो. साथ देण्यास तत्पर असतो. तुम्हास कांही करावयाचे नसते. मनात कसलीही शंका वा भिती न बाळगता होवू घातलेल्या शांततेच्या अवस्थेला एकरुप व्हायचे असते. ह्यात कोणताच प्रयत्न वा हालचाल अपेक्षित नसते. जी स्थीती जी देहमनाची अवस्था निर्माण झालेली असते, त्यात झोकून द्यावे लागते. हा काळ देखील फार अल्प असतो. पण जर तुम्हास ध्यानावस्था प्राप्त झाली झाली तर मिळणारे समाधान, आनंद ह्याचे शब्दांत वर्णन करता येणार नसते. आणि त्या आनंदाची तुलना तर करताच येणार नाही. कारण तो तुमचा एकमेव ‘एकमेवाद्वितीयो ‘ आनंद असेल. ज्याला म्हणतात Ecstasy of Joy अर्थात नितांत आनंद वा परमानंद

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com