Monthly Archives: ऑगस्ट 2013

* सैतनामधील प्रेम ओलावा!

                                         सैतनामधील प्रेम ओलावा!

रस्त्याच्याकडेला एक फळविक्याची गाडी,  दर दिवशी असायची. मी खिडकीतून बाहेर बघत होतो. एक टाटासुमो गाडी तेथे आली. त्यातून ८/१० जण उतरले. तरुण धिप्पाड थोडेसे रांगडे दिसत होते. हातात काठ्या व सुरेचाकू  दिसले. एक भयावह दृश्य वाटले. त्या परिसरांत कांही   अघटीत होणार ह्याची चाहूल लागली. अनेक जाणारी येणारी माणसे थांबली आणि मार्ग बदलून जाऊ लागली. मी देखील आंत जाऊन खिड्की बन्द करुन काचेतून वातावरनाचे निरिक्षण करु लगलो. उत्सुकता, भिती आणि   स्वसंरक्षण  ह्याची मनात  घालमेल सुरु होती.  शिवाय रोजच्या विविध बातम्यानी,  गुण्डगिरिनी,  आतंकवादी   वातावरणानी सर्व काही अनिश्चित होते.

” पडते  घे विनाकारण विरोध करु नकोस , सत्याच्या व तत्वाच्या मागे जाण्याचा मोह टाळ. यात कदाचित बळीपण जावे लगेल. “  हा संदेश व्यक्त होत होता. स्वत:चा बचाव हेच त्या अघटीत परिस्थितीला उत्तर होते.

ते सर्व राकट आडदांड त्या फळगाडी भोवती जमले. त्यांचा आरडा ओरडा विक्षिप्त चाळे,  आक्रमक भूमिका, या वागण्याने परिस्थितीचे गांभीर्य त्या फळविक्रेत्याने देखिल जाणले. तो चटकन बाजूस सरकला.  खाली मान घालून बसला. भीती व जीव वाचवणे, आणि होणाऱ्या नुकसानीबद्दल डोळे भरून आलेले अश्रू लपविणे, हेच तो करु बघत होता. सर्वांनी त्याची गाडी अक्षरश: लुटली. भराभर फळांच्या टोपल्या आपल्या गाडीत टाकल्या आणि सर्वजण गाडीत बसून  होर्न वाजवीत, सुसाट निघून गेले.  सामसूम झाल्याची चाहूल लागताच मी चटकन पश्यात बुद्धीची सहानुभूती व्यक्त  करण्यासाठी  त्या फळवाल्याकडे धावलो.  तो गाडीजवळ मटकन बसला होता. त्याचे लक्ष त्या सुसाट गेलेल्या गाडीकडे होते. डोळातून अश्रू वहात असलेले  दिसत होते. मी सहानुभूती व्यक्त करीत म्हणालो  ” काय ही सैतानी वृतीची माणसे. जंगली व दादागिरी करणारी. गरिबांना लुटणारी. ह्यांना तर गोळ्याच घालून ठार करावयास हवे.”

” थांबा साहेब! प्रसंगावर  चुकीचे बोलू नका ”  तो फळविक्या बोलू लागला.   देव  माणस होती ती. प्रथम दैत्या प्रमाणे वागली खरी. परंतु त्यांच्या वृतीमध्ये देवत्व दिसून आले.”

मला त्या क्षणी विचित्र वाटणाऱ्या त्याचा शब्दाचा बोध झाला नाही. मी चक्राऊन गेलो. त्यांनी इतका धिंगाणा घातला, लुटालूट केली तरी त्याबद्दल सहानुभूती? त्याने कांहीच उत्तर दिले नाही. फक्त जवळच्या टोपलीकडे बोट दाखवू लागला. माझी दृष्टी तिकडे वळली. त्यात शंभर रुपयांच्या नोटांची गड्डी  पडली होती. ” हे सहा हजार रुपये आहेत साहेब. ही  गड्डी माझ्या हाती देत ते वेगाने निघून गेले.

हीमाझ्यारोजच्यामालाच्याधंद्याच्याकमाईपेक्षा दुप्पटरक्कमआहे.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

लाडकी चांदणी

लाडकी चांदणी

एक चांदणी रोज बघे मी,      क्षितीजावरती

चमचम चमके, मिश्कील हासे,      लक्ष्य खेचून घेई

वाट बघे मी रोज रात्रीची,      बघण्या तिजला

दिवसभराचा विरह तिचा,          नाही सहन झाला

जवळी येउनी माझ्यासंगे,        खेळ तू अंगणी

होकार दिला चटकन तिने,        किंचित हास्य करुनी

नंतर मजला रोजच्या जागी,        पुन्हा न ती दिसली

सहवासातील वियोगाचा,          चटका लाऊन गेली

नजर पडता नातीवरी,         चकित  झालो एकाक्षणी

अंतरयामी  जणीव झाली,        हीच ती माझी चांदणी

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

नेत्रहीनता !

नेत्रहीनता !

ठाण्याहून नाशिकला महत्वाच्या कामासाठी चाललो होतो. हायवेवर गाड्यांची प्रचंड प्रमाणात जा ये चालू होती. लवकर पोहचणे जरुरी होते. त्यामुळे गाडी वेगातच चालली होती. अचानक माझी नजर दूर अंतरावरील एका गाव फाट्यावर गेली. एक माणूस हलके हलके मुख्य रस्ता ओलाड्ताना दिसला. तो एकटाच असून, बेफिकीर भासत होता. कोणत्या क्षणी एखादे वाहन जवळ येऊन धडकेल ह्याचा भरवसा नव्हता. विशेष म्हणजे कुणीही व्यक्ती हायवे क्रॉसिंग करताना डावीकडे उजवीकडे बघेल,  स्वत:ला विश्वासात घेईल, व मग रस्ता ओलांडेल. परंतु हा कसलीही  तमा न  बाळगता  शांतपणे इकडे तिकडे नजर न टाकता, रस्ता ओलांडत होता. दररोज  पेपरमध्ये अनेक  अपघतांच्या बातम्या  वाचण्यात  येतात. अशाच बेफिकीर वृतीमुळे व वाहन चालकाच्या  नजर चुकामुळे  त्याक्षणाला  काहीही  होण्याची शक्यता असते. काळजी अर्थात दोघानीही घ्यावयाची असते.  क्षणार्धात अनेक विचारांचे काहूर मनांत येऊन गेले. मला भासणाऱ्या त्या मूर्ख  माणसाला  चांगलीच  हडसून खडसून समज द्यावी, झापावे, हा विचार आला. एकदम  मी ब्रेक दाबून  गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. अगदी मुठ वळून त्या माणसाच्या पाठीमागे घावलो.  प्रथम त्याला ग्राम्य भाषेत एक शिवी हासडली. ” ये साले तुमको क्या मरना है हायवेपर. शरम नही आती,  इस बेफिकीर ढंगसे रस्ता क्रॉस करते हो.”  मी त्याचा जवळ  धाऊन  गेलो. त्याला एक लाफा देण्याच्याच पोज मध्ये होतो. माझा आवाज एकूण ऐकून तो थांबला. त्याने माझ्या आवाजाच्या दिशेने मान वळविली. मला एकदम धक्का बसला. तो माणूस नेत्रहीन होता. क्षणात माझा राग पूर्ण विरघळून गेला. आपल्याच  विक्षिप्त  विचारांची लाज वाटू लागली.

प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी असतेच. नेत्रहीन  असला, द्रीष्टीहीन असला तरी  मनाने केव्हांच जगण्याच्या प्रक्रीयेमध्ये बेफिकीर नसतो. आपण डोळस असूनही आपल्या विचारीनी अंध असतो. ही जाणीव झाली. मी चटकन शंभर रुपयाची एक नोट त्याचा हाती ठेवली.

” हे काय आहे?”  हे तो विचारत असतानाच मी त्याचा द्रीष्टीहीनतेचा  फायदा उठवत हळूच माघारी फिरलो.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

* जगरहाटी !

जगरहाटी !

काळचक्रामध्ये  दैनंदिनीच्या अनेक गोष्टीत बदल  होत चाललेले दिसतात. काही बदलांनी  तर वेगळ्याच वातावरणाची निर्मिती झाल्याचे दिसून येते. केव्हा केव्हा काही गोष्टी फक्त एक इतिहास म्हणून शील्लक राहतो. असल्या काही गोष्टी पूर्वी झालेल्या असतील, व होऊ शकतात ही शंका देखील मनांत येत नाही. कारण समाज कौटुंबिक रचना, व बाह्य  वातावरण बदलले असते.

साधी बाब बघा. मुलांची नावे. ही ठेवताना साधारण पौराणिक कथामधील देवादिकांची  नावे  ठेवण्याची प्रथा होती. जसे नारायण, त्रिंबक, भास्कर, भगवान, महादेव, अथवा  सावित्री, रुख्मिणी, कौशल्या, लक्ष्मी, सरस्वती, भागीरथी, इत्यादी.  प्रत्येक  नावात कोणत्या तरी देवी वा देवाचे स्वरूप समोर येत होते. त्यात देवाची  आठवण  केल्याची भावना होती. नावे तशी अर्थपूर्ण होती. अशाच  प्रकारची नावे आजकाल दिलेली दिसून येत नाहीत.  आजकाल कित्येक नावांचे  अर्थही लक्षात येत नाहीत.

ह्या संदर्भात मला माझ्या बालपणीची आईने सांगितलेले आठवण खूपच  गमतीदार वाटते. मी दीड दोन वर्षाचा असेन, आमचे घर प्रमुख रस्त्याच्या  कडेला होते. एक भिकारी भिक मागत रोज दारावरून जात असे.   ” आंधळ्याला  भाकरी दे भगवान “   ही त्याची ललकार असे. अर्थात हे मागणे “ भगवान “   ह्या नावाने त्या अद्रष्य  अशा  ईश्वराला  उद्देशून होते. ह्यात संशय नसावा. त्यांनी कृपा करावी, दया दाखवावी  आणि कुणाच्या  तरी  मध्यमातून त्याची गरज पूर्ण करावी, हा उद्देश. त्या देवाला संबोधन्यासाठी  त्याच्याच  नावाचा सर्व सामान्य उपयोग केला गेला. गम्मत म्हणजे माझे नाव देखील जुन्या प्रथेप्रमाणे आई वडिलांनी  ” भगवान ” असे ठेवले. त्याच नावाने  माझ्याशी  सतत संपर्क केला जाई.  ईश्वराच्या अस्तीत्वाची, भव्यतेची, कृपाद्रीष्टीची आठवण सतत राहण्याची ही योजना. अर्थात माझी बाल बुद्धीच ती. त्याची ललकार मलाच उद्देशून केली असावी, ही माझी समाज. मी घरातील डब्यामधली   भाकरी घेऊन त्या भिकाऱ्याला दिली. त्याने समाधन व्यक्त केले व तो निघून गेला. थोड्या वेळाने पुन्हा आला. पुन्हा तीच ललकार

” आंधळ्याला भाकरी दे भगवान “  मी ऐकली. मी पळत जाउन पुन्हा भाकरी आणण्यास गेलो. आईचे माझ्या हालचालीकडे लक्ष गेले. “ अरे तू त्याला भाकरी दिलीस ना ?  पुन्हा का देतोस. “  आईने माझ्यावर रोख लावला. ” बघ तो भिकारी मलाच भाकरी मागतो आहे. दुसऱ्यांना कां नाही मागत.?”

माझ्या गमतीदार तर्काने सर्वचजन हसू लागले. मला त्याची जाण आली नाही.

तसा विचार केला तर ते एक सत्य होते. कोणाच्याही बालवयात त्या बालकामध्ये  ईश्वर असतो. ही समाज. तेच बालक वयाप्रमाणे जगाचे ज्ञान घेऊ   लागते. सत्यामधून (  ईश्वरातून ) ते असत्यात ( जगांत) ते जाऊ लागते. त्याचा निरागसपणा लोप पाऊ  लागतो. सत्य भाषा जाऊ  लागते. तो शिकतो तो व्यवहार, उद्देश्पूर्ण सहवास, खोटे व चाणाक्ष मुखवटे. ह्यालाच आम्ही म्हणतो      जगरहाटी.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५

e-mail-   bknagapurkar@gmail.com