Monthly Archives: जून 2015

” भूमिका “- – – आजोबांची !

” भूमिका “- – – आजोबांची !

 

 आज घरातील वातावरण खूप तापलेले होते. नातवांनी खूप मस्ती केली होती. आरडा- ओरडी, झोंबा- झोंबी, मारा- माऱ्या सारे झाले.  क्रिकेट चेंडू  फेकणे घरातच झाले. फ्रेम पडली व फुटली. हे सारे बालवयातील त्यांना आनंद व मजा  देणारे, परंतु इतरांना वैताग आणणारे होते. सुटीचा दिवस तेंव्हा घरी त्यांचे आई बाबा दोघेही होते. सहन शक्तीचा अंत बघणारे झाले, तेंव्हा बाबा उठले, रागावले, थोडीशी शिक्षा पण केली. त्यांचे सारे खेळ बंद केले.

” आज कोठेही बाहेर बागेत जायचे नाही.”  हीच शिक्षा, बाबा ओरडले.

रोज संध्याकाळी मी फिरावयास जात असे. कधी कधी नातव बरोबर येत असत. मी कपडे घालून निघालो. लहान पाच वर्षाचा नातू, पळत आला व मला बिलगला.

” आजोबा मला पण यायचं आहे बागेत तुमच्या बरोबर.”  मजसाठी ती हृदयद्रावक घटना होती. त्यांना आज बाहेर बागेत जाण्याची बंदी घालण्यात आलेली होती. आजोबा म्हणजे बाबांचे बाबा. सर्वात मोठे. हा विश्वास व अपेक्षा घेऊन नातू धावत बिलगला.  मुलांना फक्त येथपर्यंतच थोडस गणित समजत होत. वय अधिकार आणि भूमिका हेच  ते गणित. वयाबद्दल खूपस कळलेल होत. मोठे म्हणजे सर्व आधिकार असलेली व्यक्ती, ही त्यांची समाज. भूमिका ही संकल्पनाच  त्यांना माहित नव्हती. जीवनाच्या त्रिकोण मधली महत्वाची बाजू. वय आणि आधिकार ह्या जर दोन बाजू असतील, तर त्या त्रिकोणाचा पाया ” भूमिका ”  असते.  व्यक्तीच्या संपूर्ण जीवनामध्ये ह्या तिन्हीही बाबी महत्वाच्या असतात. ह्या मानवी सामाजिक व कौटुंबिक संकल्पना होत. वयाप्रमाणे व्यक्तीवर बंधने, कर्तव्ये, आणि त्याप्रमाणे मिळणारे अधिकार आपोआपच मिळत राहतात. ह्यामधून निर्माण होती, ती भूमिकांची साखळी. ती त्याला तशीच वठवावी लागते. त्या भूमिका असतात- बाल वय, विद्यर्थी, तारुण्य, प्रौढत्व, आणि जीवनाच्या अनुभवाचे गाठोडे बांधीत,  शेवटी येते ते जेष्टत्व. जसे वय निघून जाते, त्याच वेळी त्या त्या वयाची कर्तव्ये व अधिकार, ही देखील निघून जातात. भूमिका बदलत जातात. जेष्टाच्या भूमिकेत असते, ते फक्त बघणे, जे समोर घडत आहे ते. ऐकणे जे ऐकू  येईल तेवढेच.  मात्र न बोलणे.  सर्वात  महत्वाचे  म्हणजे जे होत आहे, ते चांगल्याकरिता  व  चांगलेच होत आहे, ही मानसिकता बाळगणे. आणि हीच भूमिका वठवणे. त्यातच मनाची शांतता लाभेल.

प्रेमाचा आलेला कढ, आणि किंचित पाणावलेले डोळे, ह्यांना रोखीत,

मी नातवाच्या डोक्यावरून  हात फिरवीत म्हटले

” तुझ्या बाबाना विचारून,  मज बरोबर बागेत चल. “

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail- bknagapurkar@gmail.com

 

 

 

 

 

युगपुरुषाचे दर्शन-

   युगपुरुषाचे दर्शन-

१९५५ सालचा प्रसंग आठवतो. औरंगाबादला मी शासकीय महाविद्यालयात इंटरला ( आजच्या बारावीला ) शिकत होतो. त्यावेळी तेथे दोनच महाविद्यालये होती. दुसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सिद्धार्थ महाविद्यालय  ( ज्याचे नामकरण नंतर  मिलिंद महाविद्यालय  असे बाबासाहेबानीच केले होते.)     डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी  बरेच ऐकले होते. ते एक महामानव, युगपुरुष, असल्याचे कळले. ( त्यावेळी त्यांना भारतरत्न म्हणून संबोधित केले नव्हते.) अशा ह्या थोर पुरुषाला बघवे, दुरून का होईना दर्शन घ्यावे, ही मनांत तीव्र इच्छा होती. परंतु त्यांच्या दिव्य भव्य आणि  महानते पासून माझ्या सारख्या सामान्य विद्यार्थ्यापर्यंतचे  अंतर इतके प्रचंड होते, की त्यांचे केवळ दर्शन मिळणे, ही देखील एक अशक्य गोष्ट होती.  सिद्धार्थ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन होते. कळले की त्या कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर  आवर्जून उपस्थित राहणार आहेत. मी त्यांना बघण्यासाठी त्या महाविद्यालयात गेलो. एक भव्य  सभागृह भरू लागले. दरवाजावर वा इतर जागी त्याच कॉलेजचे विद्यार्थी सर्व समुदायाला मार्गदर्शन करून योग्य त्या जागेवर बसण्यास मदत करीत होते. त्याच विद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापकवर्ग, कर्मचारी आणि निमंत्रित यांनाच आत प्रवेश मिळत होता. माझ्याकडे न पास, न मी त्या कॉलेजचा विद्यर्थी. कार्यक्रम  बघण्यात मला तसा फारसा रस नव्हता.  फक्त बघायचे होते ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना. हॉलच्याबाहेरून मी हेरु लागलो. कार्यक्रम हॉलच्या शेजारी एक मोठी खोली होती. तेथेच सोफ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर बसल्याचे कळले. परंतु स्वयंसेवकाच्या  गराड्यात तेथे जाणे शक्यच नव्हते. काय घडले कुणास माहित.  परंतु माझी आंतरिक ईच्छा इतकी प्रबळ झाली, की मी होऊ शकणाऱ्या भावी परिणामाचा विचार त्या क्षणी न करता, अतिशय  चपळतेने त्या खोलीत शिरलो. मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर   ह्यांच्या समोर अगदी जवळ गेलो. माझ्या पाठोपाठ दोन स्वयंसेवक  पटकन आत धावून आले. एक विचित्र परिस्थिती. एकाने मला रोखण्यासाठी हात पकडला. समोरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर  असल्यामुळे,  त्याने आपला संताप न दाखवता,  प्रेमाने पाठीवरून  हात फिरवला. व बाहेर जाण्यास सुचविले.     ( माझी त्यावेळी चांगलीच धुलाई झाली असती.)

मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बघीतले. मी पटकन म्हंटले

” सर मी शासकीय  विद्यालयाचा विद्यार्थी असल्या कारणाने,  मला  आपल्या कार्यक्रमाला  प्रवेश दिला जात नाही. ”  बाबासाहेबानी क्षणभर मजकडे बघीतले. किंचितसे हास्य केले. ते स्वयंसेवकला म्हणाले  ” ह्याला कार्यक्रमाला  प्रवेश द्या. हा माझा  पाहुणा आहे.”  बस! त्यांचा  आशिर्वाद मिळताच वातावरण एकदम बदलल्याचे मला जाणवले.  मला विद्यार्थ्याच्या समूहामध्ये चांगली जागा मिळाली. संमेलनाचा आनंद काही वेगळाच होता. मी काय बघितले, काय ऐकले, ह्यापेक्षा मला काय मीळालेहेच महत्वाचे! हाच तो अविस्मरणीय ऐतिहासिक क्षणपरमपूज बाबासाहेबांचा…. त्या युग पुरुषाचा क्षणिक सहवास.  जीवनामधील सोनेरी क्षण  

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail- bknagapurkar@gmail.com

आफ्रिकन स्त्रीचे आभूषण प्रेम!

आफ्रिकन स्त्रीचे आभूषण प्रेम!

नुकताच  दक्षिण  आफ्रिकेला  जाण्याचा  योग  आला  होता. निसर्गच वरदान लाभलेली  भूमी.  असे वर्णन तिचे करता येईल. ऊतम हवा, भरपूर पाणी, नद्या नाले आणि नेत्रदीपक धबधबे दिसत होते. त्याच प्रमाणे प्रचंड झाडेझुडपे, वेली, क्षितिजा पर्यंत  पसरलेली जंगले,  आणि त्या जंगलात साम्राज्य गाजवणारी अनेक जंगली जनावरे. बळी तो कान पिळी, ह्या तत्वाने जगणारे पशु, काळपा काळपाने आनंद घेताना दिसत होती.  सर्व  बघताना हृदय भरून येत होत. ह्यात भर पडली ती तेथील  अतिशय प्रेमळ, लाघवी, माणुसकीने भरलेल्या, अश्या माणसांची. हवामान थंड समशीतोष्ण असून देखील तेथील लोकांना सामान्यपणे, वर्ण मिळाला तो काळा. नव्हे खूपच काळा. चेहऱ्यावर एक प्रकारे राकटपणा, तेलकट वा नितळ कातडी. केस जवळ जवळ  कुरुळे.   भारतीय स्त्रीला  लाभलेला  नाजूक गहूवर्ण वा गोरारंग त्यांच्या चेहरेपट्टीवर कधीच दिसणार नाही.अर्थात

त्यांचे ते स्वरूप त्यांच्या सौंदर्याच्या द्रीष्टीकोनानुसार  नजरेमध्ये कदाचित मोहक व सुंदर  ह्या  संकल्पनेत असेलही.

अशाच एका आफ्रिकन महिलेशी आलेला, न विसरणारा एक प्रसंग:-

आफ्रिकन सफरीच्या मार्गावर एका हस्तकला वस्तूच्या दुकानावर आम्ही थांबलो होतो. मी आणि सौ. तेथील  प्रदर्शनामधील अनेक हस्तकलेच्या वस्तू

बघत होतो. सौ.ला एक माळ खूपच आवडली. निरनिराळ्या प्राण्यांची  छोटी कोरीव कालाकृती माळेच्या मण्यामध्ये अतिशय सुरेख दिसत होती. त्या दुकानाची  प्रमुख एक आफ्रिकन महिला होती. तीने आदरपूर्वक तिच्या अनेक वस्तू आम्हाला दाखविल्या. ती आवडलेली माळ तीने दहा डॉलरला देऊ केली.  सौ. तिच्या पाकीटमधून पैसे काढीत असता, सौ.च्या हातातील काचेच्या  बांगड्यावर त्या महिलेची नजर गेली.  तिच्या चेहऱ्यावर स्मिथ हास्य दिसले. काचेच्या बांगड्या तिच्या पाहण्यात नव्हत्या. “ हे काय आहे ? व हे तुम्ही का घालता.? “  तिच्या चौकस प्रश्नात आश्चर्य वा कौतुक पण दिसून आले.  विशेष करुन जेंव्हा बांगड्या ह्या भारतीय महिलासाठी सौन्दर्य  सौभाग्याचे  लक्षण असते हे  समजल्यावर. अचानक तिने इच्छा  प्रदर्शीत् केली.  ”  तुम्ही बांगड्याचा एक जोड मला देऊ शकता? “  आम्हाला तिच्या उत्छुकतेची    गम्मत वाटाली. सौ.ने  क्षणाचाही विलब न लावता, हातातल्या दोन काचेच्या बांगड्या   तिला प्रेमाने दिल्या. तिनेही त्याचा स्वीकार ” थंक्स”  म्हणत केला, तिने आम्ही निवडलेली हस्तकलेची माळ  बांधुन दिली. ती म्हणाली ”  तुमच्या बांगड्याबद्दल आभारी. कृपा करुन ही मजकडून मित्रत्वाची सप्रेम भेट स्वीकारा. ”  आम्ही देखील हासत तिच्या प्रेमळ  भेट वस्तुचा ( Return gift चा ) स्वीकार केला.   प्रेमाच्या संस्कृतीचेही एक समीकरण असते. त्याच्या अनुशंगाने जे उत्पन्न होते, जो परिणाम होत असतो, तो निश्चितच सर्वत्र तसाच असतो. जगातील कोणत्याही देशात जा. कारण प्रेम आहे निसर्गाचा एक आविष्कार.

 

डॉ. भगवान नागापूरकर

भ्रमणध्वनी- ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com