Monthly Archives: ऑक्टोबर 2013

चोरलेले पुस्तकच भेट म्हणून मिळते तेंव्हा – – –

चोरलेले पुस्तकच   भेट म्हणून मिळते तेंव्हा – – –

शालेय शिक्षण पुरे करून,  महाविद्यालयात जाऊ लागलो. नवा उत्साह, नवे  मित्रमंडळ  आणि उच्च ते वातावरण. मनाचे, विचारांचे आणि बागडण्याचे एक वेगळेच स्वतंत्र.

मला त्यावेळचा एक गमतीचा प्रसंग आठवला. ज्याचे धागेदोरे पुढील  जीवनात पंधरा वर्षानंतर विणले गेलेले आढळले. महाविद्यालयातील  तो दिवस आठवतो.  सकाळची  वेळ  होती. विद्यालयाच्या एका  उघड्या दालनातून  मी दुसऱ्या जागी जात  होतो. अचानक जोराचा पावूस सुरु झाला. पळतच मी शेजारच्या खोलीत शिरलो. ती  प्राध्यापकाची  खोली  होती. त्यावेळी आत  कुणीही नव्हते. बाहेर जोराचा पाऊस. मी तात्पुरता अडकून गेलो होतो.  आतील  टेबलावर एक पुस्तक पडलेले बघितले. Research  studies  in  Organic Chemistry. दोन चार पाने सहज बघितली. पुस्तकावर कुणाचे नाव नव्हते. मी पण  विज्ञान  विषय घेऊनच त्या विद्यालयात गेलो होतो. एक विचित्र विचार  डोक्यात  आला.  सभोवतालचे अवलोकन केले आणि ते पुस्तक चक्क  उचलून  पिशवीत टाकले व पावसातच  विद्यालय सोडून घरी आलो. घरी पुस्तक व्यवस्तीत  चाळले. माझ्या समजण्यापेक्षा ते खूपच  वरच्या दरज्याचे  होते. कदाचित ते Higher  Studies  साठी असावे. मी निराश झालो. थोडीशी खंत वाटली. मला ते त्यानंतर केंव्हाच वाचण्याचा योग आला नाही. एक तर ते पुस्तक Organic chemistry ह्या विषयात प्रबंधासाठी होते आणि माझ्या स्तराला त्याचा कांहीच उपयोग नव्हता. एक निवळ वेडेपणा. फारसा विचार  न करता ते तसेच कपाटात  ठेवून दिले.

विद्यालयीन, महाविद्यालयीन, आणि वैद्यकीय शिक्षण  पुरे केले.  शासनाच्या  सेवेत वैद्यकीय अधिकारी म्हणून नोकरी करू लागलो. निरनिराळ्या बदलीच्या  ठिकाणी  रुग्णालयात  कामे  करावी लागत.  पंधरा वर्षाचा काळ गेला होता. एक दिवस एका वृद्ध रोग्याला तपासण्यासाठी मला Emergency Call आला. मी त्यांना बघण्यासाठी गेलो.  त्यांचा चेहरा बघताच ते माझ्या परिचित असावे हा भास झाला.  परंतु ओळख लक्षात आली नाही. जवळच त्यांचा मोठा मुलगा होता. मी त्यांचे केसपेपर्स  बघितले. त्यांचे नांव बघताच  माझी शंका खरी ठरली. ते नांव माझ्या चांगल्याच परिचयाचे होते. ते माझे विज्ञान शाखेतील प्राध्यापक होते.  मी त्यांना ओळखणे नैसर्गिक होते. परंतु ते मला त्यांचा विद्यार्थी म्हणून ओळखणे ह्याची शक्यता कमी होती. प्रथम मी त्यांना तपासले.  योग्य ती औषधी चालू करण्याच्या सूचना दिल्या. नंतर लगेच मी त्यांना स्पेशल रूम मध्ये हलविले.
” सर तुम्ही Chemistry चे प्राध्यापक ना ? “    त्यांना कुणीतरी ओळखतो हे जाणताच त्यांच्या चेहऱ्यावर एकदम आनंद व्यक्त झाला. आता पेशंट आणि डॉक्टर यांचे नाते न राहता पूर्वीचे शिक्षक व शिष्य  असे पवित्र नाते समोर आले. त्यांची सेवा करण्याचा योग मिळाला. ते बरे होताच मी त्यांना माझ्या घरी आणले. खूप गप्पा आठवणी चाळवल्या गेल्या. त्याच ओघांत मी लपवून आणलेल्या त्या पुस्तकाबद्दलची गमतीची घटना सांगितली.
” ते पुस्तक कां ? Jenar Workman ह्यांनी लिहिलेले  Research  studies  in  Organic हे पुस्तक. आहो ते तर माझेच होते. त्यावेळी मी खूप शोधले. कुठेतरी हरवले गेले म्हणून, नंतर त्याचा विचारच सोडून दिला. ”
मी लगेच कपाटातून ते पुस्तक आणले आणि त्यांच्या हाती देत म्हटले  ” सर मला माझ्या त्या अविचारी घटने बद्दल क्षमा करा. “    प्राध्यापक हसले. माझा हात हाती घेत ते म्हणाले  ” अशा लहान सहान गोष्टी जीवनांत घडतच असतात. हेच अनुभव माणसाला परिपक्वतेच्या मार्गावर घेऊन जातात. हे पुस्तक आता माझ्याकडून तुम्हास सप्रेम भेट समजा.”
आज मला त्या चुकीच्या व अविचारी गोष्टीचे परिमार्जन झाल्याचे जाणवले. त्याच माझ्या प्राध्यापकांच्या मदतीने मी विज्ञान शाखेमधली निरनिराळ्या लेखकांची २०० पुस्तके त्याच महाविद्यालयांतील वाचनालयाला भेट म्हणून दिली. केवळ एक समाधान.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

पोकळ तत्वज्ञान

पोकळ तत्वज्ञान

कालेजच्या होस्टेल मध्ये  रहात होतो. सर्व विध्यार्थाना स्वत्तंत्र खोल्या होत्या माझ्या शेजारी  माझा मित्र नंदकिशोर यांची खोली होती. दुपारची जेवणाची   सुट्टी झाली की आम्ही रूमवर यायचो. माझ्याच  खोलीत आम्ही  मिळून जेवण घेत असू .घरून दोघांचे जेवणाचे डब्बे यायचे. नंद्कोशोरच्या  जेवणाची  पद्धतच कांही और होती .त्याच्या डब्ब्यात चार चपात्या असत. तो डब्यातले पूर्ण अन्न केव्हांच खात नसे. जेवण झाल्यावर एक चपाती आणि उरलेले सर्व अन्न गोळा करून चक्क खिडकीतून बाहेर फेकून देत असे. मला त्याचे हे वागणे आवडायचे नाही. ” तुला जर जेवणास कमी लागते,  तर घरच्यांना तशा सूचना का देत नाहीस? कमी जेवण मागवत जा. ”  तो  फक्त हसून उत्तर देण्याचे टाळायचा. परंतु त्याने त्याच्या आपल्या  दैनंदिनीत केंव्हाच फरक केला नाही. मी मात्र माझ्या जेवणाचा डब्बा पूर्ण संपवीत असे. जेवणाची सतत काळजी घेतली. एक दिवस माझा त्याचा विषयीचा दृष्टीकोनाचा बांध फुटला. मला त्याचे  वागणे सहन झाले नाही. नेहमी प्रमाणे त्याने एक चपाती व उरलेले अन्न  खिडकीतून बाहेर फेकून दिले. व तो हात धूउन बसला.

” खर सांगू – तुला मस्ती  आलेली आहे.  तू त्या अन्नाचा न कळत अपमान करतो आहेस. माजोऱ्या प्रमाणे ते फेकून देतोस. अनेक लोकांना पोटभर अन्न मिळत नाही, तू मात्र नासाडी करतोस.  अन्न हे परब्रम्ह समजले गेले आहे. त्याचा असा  अनादर  केंव्हाच करु नये. तो पुन्हा मोठ्याने हसला.    ” अहो ब्रह्मज्ञानी !  दोन्ही हात जोडून तुम्हाला  दंडवत. भगवतगीतेमध्ये सांगितले हे की आपल्या जेवणांत एक भाग अन्न व तीन भाग पाणी असावे. तू जेवताना पाण्याचा थेंब ही घेत नाहीस. अन्न सुद्धापोटभर घ्यावयाच नसत.   पाणी हवा ह्या घटकांना भरपूर  जागा देत जाणे, हे विज्ञान देखील सांगते. तू मात्र हे सर्व जाणून  दुर्लक्ष करतोस. जेवणाचा डब्बा आला की तुला ते परब्रह्म वाटते. आणि तू त्यावर प्रेमाने  तुटून  पडतोस. पोटाला सांभाळून, प्रकृतीला जपून   अध्यात्म करीत जा.  तो हसत निघून गेला. मी माझे जेवण पूर्ण केले. हात धुतला व  खिडकीच्या बाहेर डोकावले.   मी एकदम अचिंबित झालो.  खिडकीच्या  मागील दिशेला एक  मोकळे  मैदान होते. खिडकीखालती  ज्या ठिकाणी   नंदकिशोर ह्याने अन्न फेकून दिले होते, तेथे दोन कुत्री जिभल्या चाटीत खात होती. अधाशाप्रमाणे अन्नाचा प्रतेक कण  उचलत होती. खाणे संपल्यावर  इकडे तिकडे  बघून आणखी कांही मिळतेका? ह्याचा शोध घेत होती. त्यांची नजर  माझ्या  खिडकीवर पडली. ती जणू  विचारीत  होती की आम्हाला अन्न देणारा  तो अन्नदाता कोठे आहे? इतक्या दुरून  मला  त्यांच्या डोळ्यात  काय दिसते  हे समजत नव्हते. परंतु त्यांचा चेहरा व  त्यावरचे भाव  सांगत होते की   आमच्या त्या अन्नदात्याला धन्यवाद द्या. आमचे आशिर्वाद  त्यांच्या पर्यंत पोंचवा.  माझे डोळे एकदम  पाणावले.

ऐकलेल्या वाचलेल्या महान तत्वज्ञानाचा  शब्दिक कीस  काढण्याचा मी प्रयत्न करीत होतो. आनंद घेत होतो. परंतु जाणवले की त्यामध्ये  अनुभवाचा ओलावा नव्हता. सत्य झाकोळले गेले होते. मला त्यावेळी त्याबद्दल खंत वाटली.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५९

bknagapurkar@gmail.com

संधी

जीवनाच्या रगाड्यातून-

संधी

गंगा आली मार्गामध्ये         तहान आपली भागवून घे

संधी मिळता जीवनामध्ये     उपयोग त्याचा करून घे

ठक ठक करुनी दार ठोठवी      संधी अचानक केव्ह्ना तरी

गाफील बघुनि चित्त तुझे        निघून जाईल ती माघारी

चालत राही सुवर्ण संधी           हाका देवूनी वाटेवरी

बोलविती जे प्रेमाने  तिज       सन्मान तयांचा सदैव करी

धुंदी मध्ये राहून आम्ही       चाहूल तिची विसरून जातो

जीवनातले अपयश बघुनी       नशिबाला परी दोष देतो

यशस्वी ठरती तेच जीवनी      उपयोग करुनी  संधीचा

साथ देऊनी प्रयत्न्याची        मार्ग निवडती योग्य दिशेचा

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५९

bknagapurkar@gmail.com

अहं ब्रह्मास्मि

जीवनाच्या रगाड्यातून-

अहं ब्रह्मास्मि

एके काळी हवे होते,     मजलाच   सारे कांही

आज दुजाला मिळताच,    आनंद मनास होई

माझ्यातील  ” मी “ पणाने,        विसरलो सारे जग

तुझ्यामध्येही ” मी ”  आहे,       जाण येई कशी मग

जेंव्हा उलगडा झाला,       साऱ्या मध्ये असतो मी

आदर वाटू लागला,          जाणता  अहं  ब्रह्मास्मि

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

समाधानाचे मूळ

जीवनाच्या रगाड्यातीन-

समाधानाचे मूळ

१९९६ साली मी  जव्हार  गांवच्या सरकारी रुग्णालयात प्रमुख वैद्यकीय   अधिकारी होतो.

हाताखाली बराच कर्मचारी व अधिकारी  वर्ग होता.  एक तरुण वैद्यकीय अधिकारी डॉक्टर  राठोड यांची नेमणूक नुकतीच  झालेली  होती.  ते M. B. B. S. शिकलेले होते. पुढे सर्जरी हा

विषय घेऊन सर्जन होण्याची मह्त्वाकांक्षा बाळगून होते. आपल्या मनमिळाऊ, प्रेमळ स्वभावाने   रुग्णामध्ये थोड्याच काळात ते सर्वाना हवे हवेसे वाटू लागले. वैद्यकीय कामकाजामध्ये अतिशय

मेहनती, उत्साही, सतर्क आणि निष्णात होते. सर्व प्रकारच्या केसेस आत्मविश्वासाने व यशस्वी

रीत्या ते हाताळत. हे सारे माझ्या लक्षत आले होते. भविष्यात ते  चांगले सर्जन होतील हा विश्वास मला आलेला होता. एक दिवस  संध्याकाळी  ते माझ्या घरी आले. त्यांनी M. S. ह्या पदव्युतर  शीक्षणासाठी  अर्ज केलेला होता. तो Bombay हॉस्पिटलच्या प्रशासनाने मान्य केला

असून, २४ तासाचे आंत त्यांना रुजू होण्याची सूचना आली होती. मी त्यांना सध्याच्या रुग्णालयातून  पदमुक्त ( Releave  )  केले असे पत्र मिळणे हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचे होते. त्यांच्या  पुढील  नेमणुकीसाठी ते गरजेचे होते.

प्रसंग आणि वेळेचे महत्व ओळखून मी त्यांची फाइल मागविली. मी एका धर्म संकटात सापडलो होतो. वरिष्ठांकडून आलेल्या त्यांच्या appointment letter वरून त्यांनी सध्याच्या नोकरीचा बॉण्ड दिलेला होता. ते फक्त तीन महिन्याच्या नोटीशीनंतरच ही नोकरी   सोडून जाऊ शकत होते. माझ्या कार्यालइन  सल्लागारांनी आपण  डॉक्टरना  वरिष्ठांच्या परवानगी शिवाय रिलीव्ह करू शकत नसल्याचे सुचविले. याचा अर्थ त्याचे  पोस्ट ग्राजुयेषण केवळ वेळेच्या चक्रामुळे गमावले जाणार. मी हे सारे जाणून  अशांत  झालो. एका अत्यंत  महत्वाच्या संधीला ते वंचित होतील ह्याची खंत  वाटली.  मी बराच विचार केला. मनन केले. शेवटी विचारावर  भावनेने मत  केली. मी त्याची रुग्णालय  सोडण्याविषयची  विनंती  मान्य केली. माझे आभार मानीत  ते निघून गेले. शंके प्रमाणे  एक तुफान निर्माण झाले.   वरिष्ठ नाराज झाले. चौकशी झाली.  मला माझ्या  घेतलेल्या निर्णयावर टिपणी होऊन मेमो दिला गेला. पुन्हा असे घडू नये याची समज  दिली गेली.

बऱ्याच वर्षानंतर एक मित्राला भेटण्यासाठी   Bombay हॉस्पिटलला  गेलो  होतो.  अचानक डॉक्टर राठोड यांची भेट झाली. त्यांनी आग्रहाने मला त्यांच्या केबिन मध्ये नेले.  मला आश्चर्य वाटले ते त्यांनी वाकून माझ्या  पायांना स्पर्श करून नमस्कार केला.

” सर मी येथे Assistant Hon. Surgeon म्हणून काम बघतो. हे  फक्त  तुमच्या  आशीर्वादामुळे. “  त्याचे डोळे पाणावले होते.

घटना ह्या घडतच असतात. ते एक निसर्ग चक्र आहे. परिणाम हे त्याच प्रमाणे होत असतात. परंतु खोलवर  दडून बसलेल्या  उदेशामुळेच त्या  घटनांचे खरे मूल्यमापन होत असते.  वरकरणी जरी निराश्या व्यतीत होत असली,  तरी त्या घटनांची मुळे  आत्मिक समाधानाकडे  रुजलेली असतात. हाच खरा जीवनाचा आनंद नव्हे काय?

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

जीवन चक्र

जीवनाच्या रगाड्यातून-

जीवन चक्र

अमेरिकेमध्ये मिनियापोलीस ह्या शहरांत कांही काळ राहण्याचा योग  आला  होता. मुलगा  तेथे नोकरीला होता. प्रशस्त बंगलावजा घर. सर्व कॉलनितली घरे स्वतंत्र. सर्व  सभोवताल  निसर्ग रम्य केलेला. बाग फुलझाडे, गवताचे गालिचे, सर्वत्र हिरवळ, झोपाळा, मुलांना  खेळण्याची  सोय, विखुरलेले पाण्याचे नळ. तेथे जे सर्व सामान्य नागरिकाला  सहजपणे  उपभोगता येते, तसे भारतात  गर्भ श्रीमंतांना उपभोगता येत नसल्याचे  जाणवले. कारण तेथे जागा, हवा पाणी  उर्जा( वीज ) फळे फुले धान्य, आणि सर्व प्रकारच्या  अत्याधुनिक सोई  भरपूर. सर्वाना आणि सहज उपलब्ध असलेल्या  दिसतात. विकासाचा मूळ ढाचा मजबूत  आणि मुबलक . स्वच्छता आणि प्रशस्त रस्ते व वाहने  मनास  आनंदित करतात.

एक गम्मत आठवली. मी भारतातून तेथे जाताना, सवई प्रमाणे मच्छरदानी नेली होती. डासा मुळे शांत झोपेला अडचण भासू नये म्हणून मच्छरदानीत झोपण्याची सवय. मुलगा ते बघून हसला.  ” बाबा इथे घरांत एक मच्छर मला  दाखवा मी त्याबद्दल एक डॉलर देईन. “  गमतीने तो म्हणाला. डास बाहेर  असतील परंतु  घरांत डास, माश्या, झुरळ, कोळी, ( Spider )  इत्यादी केंव्हाच  सापडत नाहीत. दारे खिडक्या सतत  बंद  ठेवण्याची  काळजी घेतली जाते. सर्व घर Air-Condition ने सतत समशीतोष्ण व हवेशीर  ठेवले  जाते. परिस्थिती व वातावरणाचे कौतुक वाटले.

एक दिवस अचानक छताच्या कोपऱ्यावर, एका कोळ्याने जाळे विनून तो  मध्यभागी  असल्याचे दिसले. कदाचित तो बाहेरून घरांत शिरला असेल. आपल्या जगण्यासाठी खाण्या व राहण्यासाठी ही त्याची योजना असेल. हा एक निसर्ग  होता.  मला आश्चर्य  वाटले  ते याचे  की त्याला खाद्य कसे मिळणार? स्वछतेच्या  कल्पनेखाली  बाह्य  वातावरणाचा  घरामधील  संपर्क नव्हता. डास, माश्या, कीटक हेच त्याचे खाद्य. परंतु ते मिळण्याची  शक्यताच  नव्हती.       मुलगा परप्रांतात आला तेंव्हा त्याला  निसर्गाची चेतना व प्रयत्न ह्यांनी जगण्याचे  मार्ग दाखवून दिले. Struggle  for  existance हा तर जीवन जगण्याचा  ईश्वरी मंत्र असतो. तो निसर्ग प्रत्येकाला देतो. कितेकजण बर्फाछादित प्रदेशांत, घनदाट जंगलात, विरळ हवामान असलेल्या उंच पर्वतावर,  सतत पावसाचा  मारा असलेल्या भागात , दलदल प्रदेशात, ज्या ठिकाणी लाव्हा सतत जमिनीतून  उफाळून बाहेर पडतो तेथे, जो  भाग  भूकंपाचे धक्के जाणवतो, त्या भागात, इत्यादी मध्ये मानवी वस्ती करून राह्तोचकी.

सर्व सामान्यांना जगण्यासाठी  वातावरण तेथे नसते. तरीही लोकवस्ती करून जीवन  चक्रामधल्या  नैसर्गिक  गरजा  पूर्ण करीत समाधान व आनंदाने जगतात.  प्रत्येकाच्या  जीवन  जगण्याच्या  गरजा सर्व सारख्याच असतात. त्यावर तो  जगतो.  संकल्पना  व सोई भिन्न  भिन्न असू शकतात.

त्या कोळ्याने जगण्या खाण्यासाठी  बांधलेले घर ही त्याची गरज होती, सोय नव्हे.

निसर्ग व त्याची चेतना ह्याचा परिणाम  म्हणजे त्या कोळ्याच्या  ( Spider  च्या) चेतनेला निसर्गाची साथ असल्यामुळे विचित्र परिस्थितीत देखील तो आपले जीवन चक्र जगेल.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

रोपण – एक डागडूजीची प्रक्रिया

जीवनाच्या रगाड्यातून-

रोपण – एक डागडूजीची प्रक्रिया

बालकवीची कविता वाचीत होतो.

हिरवे हिरवे गार गालिचे

हरित तृणाच्या मखमालीचे

त्या मखमालीवरती

फुलराणी ही खेळत होती.

सुंदर गवतांची हिरवळ असलेले गालिचे बघण्याचा व अनुभवण्याचा योग अमिरीकेतील वास्तव्यात असलेल्या मुलाकडे   प्रखरतेने येत असे. प्रशस्त घरे सभोवतालची बाग, त्यातील रंगबिरंगी फुले आणि सारा परिसर गवतानी अच्छादलेला जणू गवताचे गालिचे सर्वत्र पसरलेले बघून मन खूपच प्रसन्न होत असे. वाढणाऱ्या गवताची नियमित कटिंग केली जात असे. त्यामुळे जमिनीवर फक्त एक दीड इंच उगवलेले तृण, त्यातील सारखेपणा व मउ   परंतु नाजूक बोचरेपणा त्यावर चालताना एक वेगळ्याच स्पर्शाची जणीव होत असे. कदाचित म्हणूनच त्याला गालिच्याची उपमा दिली असावी. बागेतील पट्ट्यामध्ये  तीन चार  ठिकाणी गवताची वाढ अनियमित झालेली दिसली.  त्यामुळे तीन वा चार चौरस फुटांचे पट्टे उघडे पडून त्यावर  गावत वाढलेले नसल्याचे जाणवले. पाणी व कीटक नाशक फवाऱ्याचा  मारा नियमित मिळत असून देखील.
सुटीचा दिवस मुलाने नर्सरीकडून तयार गवताच्या गालिच्याचे 3×3 असे कांही शिट्स अर्थात तुकडे आणले होते. कारखान्यात केलेले हे तुकडे होते. माती व खत  यांचे मिश्रण प्रेस करून. त्यावर गवताचे रोपण केलेले होते. त्यामुळे एखाद्या गालिच्याच्या तुकड्या प्रमाणे हे भासत होते. फक्त त्यांत गवताचा  अर्थात जीवन्तपणाचा भाग नजरेत भरत होता. मुलाने प्रथम बागेतल्या  अनियमित झालेल्या व गवताची योग्य वाढ न झालेल्या पट्याची थोडीशी खोदाई केली. सर्व स्थर सारखे केले. पाण्याची फवारणी केली. ते गवताचे आणलेले शिट्स त्या जागेवर  घट  बसवून  दिले.  थोड्याच दिवसात सारा परिसर  एकसंघ झालेला  जाणवला. एक मोठा गवताचा गालीच्या तेथे अंथरल्याचा  भास होऊ लागला.

हे सर्व बघताना वैद्यकीय जिवनातील एक अनुभव आठवला. अपघातामध्ये भाजलेल्या एका व्यक्तीला आणले होते. चेहरा छाती व पोटाच्या  भागावर जाळल्याच्या जखमा झाल्या होत्या. कांही भागाची कातडी  पूर्ण जळून गेल्यामुळे जो ग्याप पडला होता,  त्या ठिकाणी कातडीचे रोपण ( Skin transplant )   केले गेले.

जखमा चांगल्या, निर्जंतुक केल्या गेल्या. नंतर त्याच व्यक्तीच्या मांडीवरची, पायावरची, हातावरची पाठीवरची कातडी शस्त्र मशीनने छीलुन  काढली गेली. त्याचे लहान लहान तुकडे जळलेल्या व न भरलेल्या जागेवर व्यवस्थित लाऊन मलमपटी केली गेली. चांगली ड्रेसिंग केलेली चामडी रोपन पकडली जाऊन कातडीचा भाग पुर्वव्रत झाला. जेथून कातडी काढली होती त्या जागी पुन्हा कातडी येऊ लागते. कातड्याच्या  रोपनामध्ये त्याच रोपनाची कातडी रोपनासाठी गरजेचे असे नाही. कुण्याही व्यक्तीची निरोगी कातडी देखील घेतली जाते. फक्त ती घेण्यास योग्य असावी. गवताच्या रोपन केलेल्या गालिच्यात व देहाच्या कातड्याच्या रोपन केलेल्या प्रक्रियेमध्ये बरेच साम्य असते. जिवंत प्राण्यातील अवयांची सतत होणारी वाढ झीज व सुधारणा हे अत्यंत  महत्वाचे गुणधर्म आहेत.

ह्याचाच आधार रोपन ह्या प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने घेतला जातो. निकामी झालेले अपघात ग्रस्त झालेले अवयव पूर्णपणे बदलण्याची प्रक्रिया ह्याचमुळे साध्य केली जाते.
नेत्रदान किडनीदान,  हार्ट ट्रान्सप्लांट कातडी दान आणि ह्याच प्रकारे जवळ जवळ सर्व अवयवांचे रोपन करणे साध्य झाले आहे. मेंदूच्या बाबतीत मात्र वैद्यकीय शास्त्र अजून परिपूर्ण झालेले नाही.
बागेतल्या कुंड्यात झाडे लावावी, नको असलेली काट छाट करावी दोन झाडांचे एकत्र रोपण करावे, हे सारे जितके सहज व शक्य झालेले आहे तसेच मानवी देहावर देखील सर्व प्रक्रिया शक्य होत आहेत. तो काळ आता नजीक येऊ लागला आहे जेव्ह्ना प्रयोग शाळेत जिवंत देहाची निर्मिती सहजतेने होईल. ह्यात शंका नसावी.

डॉ. भगवान नागापूरकर

9004079850

bknagapurkar@gmail.com