Monthly Archives: फेब्रुवारी 2011

भाकरीसाठी मिळाला मार्ग.

 रेल्वे स्टेशनलगतच्या पाऊल वाटेवरुन जात होतो. एका वयस्कर माणसाने माझे लक्ष्य वेधून घेतले. त्याच्या हातात मोठी प्लास्टीकची थैली होती. तो रेल्वेच्या मार्गावर पडलेल्या प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या वेचून, त्या थैलीमध्ये जमा करीत होता.माझी ऊत्सुकता जागी झाली. त्या माणसाला थांबवून मी चौकशी केली. अनेक प्रवाशी आजकाल पाण्याच्या बाटल्या खरेदी करतात. रिकाम्या झालेल्या बाटल्या चक्क रेल्वे मार्गावर फेकून देतात. हा त्या रिकाम्या झालेल्या बाटल्या, भंगारच्या दुकानाला नेऊन विकत असे. त्याने सांगितल्या प्रमाणे, तो दुकानदार त्या बाटल्या, प्रति किलो प्रमाणे विकत घेतो. साधारण ११० ते ११५ बाटल्याना शंभर रुपये पर्यंत त्यांत उत्पन्न होते.

टाकाऊ वस्तूंचे Recycle करुन पुन्हा त्याचा उपयोग केला जातो.

आपल्याकडे अशी अनेक धातू जसे तांबे, जस्त, लोखंड इत्यादी वस्तू टाकाऊ झाल्यास त्यानाही त्यांच्यापरी मोल असते. ते सामान्यजनाना मिळते. विकसीत झालेल्या परदेशांत ही संकल्पना नाही. भंगार खरेदी विक्री यांचे दुकान नसते. कोणतीही वस्तू नादुरुस्त झाली की ती पुन्हा वापरणे ही क्रिया तिकडे दिसून येत नाही. Use and Throw  अर्थात वापरा आणि फेकून द्या. तेथील स्थानिक शासन अशा वस्तू एकत्र करुन त्याचे  Recycle केले जाते. भंगारवाले वा मध्यस्ती नसल्यामुळे सामान्य माणसाना साऱ्या नादुरुस्त वस्तू चक्क टाकून द्याव्या लागतात. ह्या बाबतीत आपणाकडे बरे असते. असे म्हणावे लागेल. आपला विकसनशील देश आहे. गरीबी, बेरोजगारी, यांनी अनेक कुटुंबे हैरान झालेली आहेत. त्यामुळे हा भंगार व्यवसाय देखील गुंतवणूक व कामधंदा यांना पुरकच आहेत.

कांही दिवसांत मी ती घटना विसरुन गेलो. सकाळची वेळ होती. मी फिरावयास गेलो होतो. अचानक एक अनामिक इसम माझ्या समोर उभा राहून, खाण्यासाठी दोन तीन रुपये मागू लागला. त्याच्या कपड्यावरुन, अवतारावरुन तो कदाचित् भिकारी असावा. असे वाटले. तशी त्याची शरीर प्रकृती बऱयापैकी होती. परंतु परिस्थितीने गांजला असावा. बाहेर गांवचा दिसत होता.

मला एकदम कांही दिवसापुर्वी रेल्वेमार्गावर प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या जमा करणाराची आठवण आली. ” मी तुला दहा रुपये देतो. पण त्यासाठी तुला एक काम करावे लागेल.”  तो एकदम तयार झाला. काम धंद्याच्या शोधांत होता. काम मिळत नव्हते. हतबल झालेला वाटला. परक्या ठिकाणी असल्याची जाणीव होती. ” चल मज बरोबर. मी तुला एक काम देतो.” तो मज बरोबर येऊ लागला. जवळच असलेल्या रेल्वेस्टेशनच्या परिसरांत आम्ही आलो. मज जवळ सामान आणण्यासाठी कांही पिशव्या होत्या. त्यातील एक मोठी पिशवी मी त्याला दिली.

मला रेल्वेमार्गांत कांही रिकाम्या प्लास्टीकच्या बाटल्या दिसल्या. त्याला त्या जमा करण्यास सांगीतले. ह्याच  प्रमाणे सभोवतालच्या परिसरातील पडलेल्या रिकाम्या बाटल्या गोळा करुन आणण्यास सांगितले. मी तेथे एका दगडावर बसून त्याच्या हालचालीकडे बघत होतो. त्याला हे अपरिचित असावे असे वाटले. पण आपणास दहा रुपये मीळणार ह्या आशेने तो त्या बाटल्या जमा करु लागला. अर्धापाऊण तासाने तो परत आला. त्याने जमा केलेल्या बाटल्या घेऊन आम्ही जवळच असलेल्या भंगारच्या दुकानांत गेलो. एकूण ५६ बाटल्या जमा केल्या गेल्या होत्या. दुकानदाराने त्याचे ५० रुपये दिले. मी ते पैसे त्या वेळी त्याच्या हातीं ठेवले. दहा रुपयांची अपेक्षा मनी बाळगुन असलेल्या त्या माणसाला, हाती पन्नास रुपये मिळतांच त्याचे डोळे भरुन आलेले जाणवले.

                 खरा आनंद त्याला झाला होता, ते एवढे पैसे मिळाले म्हणून नव्हे. तर असे पैसे कसे कमवावे ह्याचे अत्यंत साधे मार्गदर्शन मिळाले ह्याबद्दल. परिस्थितीने तो गांजला होता. सामाजीक घडी त्याला उदरनिर्वाह करण्यास अक्षम झाली होती.

खाण्यासाठी त्याला इतरासमोर हात पसरण्याची वेळ आली होती. अचानक भाकरीसाठी अर्थात जगण्यासाठीचा एक मार्ग त्याला मिळाला. त्याच्या आशा पुलकित झाल्या होत्या. मला अभिवादन देत तो निघून गेला.    

(ललित लेख)

मीरेची तल्लीनता

नाच नाचती तालावरती      मीरेची पाऊले

चित्त ते हरीमय जाहले. – – – धृ

लागला प्रभुचा ध्यास

हरि दिसे नयनास

चलबिचल नजर होऊन

अंग सारे मोहरले  

चित्त ते हरीमय जाहाले      – – -१

न राही आपले भान

झाली भजनी तल्लीन

तनमन प्रभुचे ठायी जाता

संसार ते विसरले.  

चित्त ते हरीमय जाहाले  –  –  – २

विषाचा घेता प्याला

हरि तो त्यातची दिसला

झेपावूनी गेली त्याच क्षणी

घट घटा प्राशन केले. 

चित्त ते हरीमय जाहाले – – –  ३

जहाल होते विष

मृत्युचा तो पाश

प्रभूभक्तीच्या शक्तीने परि

अमृत ते बनले  

चित्त ते हरीमय जाहाले  – – –  ४

(कविता)

निर्णय

रसत्यावरच्या हातगाडीवरील केळीवाल्याकडे मी केळी घेत होतो. त्याला पैशांची मोड देत असताना, त्याचे लक्ष्य नाही, हे बघून एका ९-१० वर्षाच्या मुलाने, त्याच्या गाडीवरील दोन केळी उचलून घेतली. मुलगा लपून जाऊ लागला.

“बघ त्या मुलाने तुझी केळी घेतली व तो चालला.”   सामाजिक जाणिवेने एकदंम प्रेरीत होऊन, मी ते त्या केळीवाल्याच्या  निदर्शनास आणून दिले. केळीवाला धावत गेला. त्याने त्या मुलास पकडून एक शिवी हसडली. व केळी हिसकाऊन परत आला. “फार हरामखोर असतात हो ही मुले.” पुटपुटत माझे आभार मानले.

मी केळी घेऊन निघालो. मनाला एक समाधान होत असल्याची जाणीव होत होती. एक तर त्या मुलास पकडवून शिक्षा देवविली. अप्रत्यक्षपणे चोरी करणे वाईट, ही जाणीव करुन दिली. शिवाय केळीवाल्याचे होऊ घातलेले नुकसान पण टाळले.

थोड्याश्या अंतरावर गेल्यावर, तोच मुलगा ऊभा असलेला मला दिसला. माझ्या समोर येऊन मला म्हणाला   “आजोबा काय मिळवलत मला पकडवून देवून. मी सकाळपासून ऊपाशी होतो. दुसऱ्या गावाहून येथे आलो. मजजवळ पैसे नव्हते. नाईलाज म्हणून मी हे केले.”      त्याच्या डोळ्यांत सत्याची चमक होती. परिस्थितीची जाण होती. अपराधित्वाची भावना होती. परंतु भुकेपुढे तो हतबल झालेला होता. क्षणार्धांत माझे डोळे पाणावले. मी चटकन तीन केळी काढून त्याच्या हाती दिली. 

अशांत, तरीही एका वेगळ्याच समाधानांत मी निघालो. दोन्हीही वेळचे माझे निर्णय मला समाधान देऊ बघत होते. मनाची चलबिचल वेग धरु लागली. माझा निर्णय सामाजिक चौकटीवर आधारलेला होता. जो की मानव निर्मित  होता. परंतु त्याच वेळेला निसर्गाला कांही वेगळच अपेक्षित होत.

एक जगप्रसिद्ध निसर्ग शास्त्रज्ञ डार्विन म्हणतो

” निसर्ग सदा सुचवित असतो. अस्तित्वासाठी आणि जगण्यासाठी झगडणे गरजेचे ”   

” Theory of Darwin says Struggle for Existance & Survival of fittest”   

बरेच दिवस मी माझ्या या निर्णयावर बैचेन होतो.   

(ललित लेख)

दृष्टीची भ्रमंति

बालपणीच्या काळामध्यें,     दृष्टी आमची आकाशीं

लुकलुकणारे तारे बघतां,     गम्मत वाटे मनी कशी       १

चमके केव्हां मिटे कधी कधी,     लपंडाव तो त्यांचा वाटे

फुलवित होते आशा सारी,    वेड तयांचे आम्हास मोठे      २

वाटत होते भव्य नभांगण,      क्षितीजाला जाऊनी भिडले

भिंगऱ्यांचा तो खेळ खेळतां,      सर्व दिशांनी नयनी भरले    ३

मोहक भासे विश्व भोवती,      भिरभिरणाऱ्या दृष्टीपटाला

स्थिरावली ना दृष्टी तेव्हां,      क्षणभर देखील एका बिंदूला      ४

दृष्टीला परि पडले बंधन,      एका दिशेने बघण्याचे

व्यवहारातील जगामध्ये,      पडता पाऊल तारुण्याचे         ५

प्रवाही होते जीवन सारे,      जगण्यासाठी धडपड लागे

रम्य काय ते मधुर काय ते,      विसरु गेली जीवन अंगे       ६

राग लोभ आणि प्रेम गुणांचे,      दृष्टीमध्ये मिश्रण होते

अहंकाराने ताठर करुनी,       प्रेमाने कधी झुकविले होते      ७

दुजासाठी मी आहे येथे,      विवेक सांगे हे दृष्टीला

शोध सुखाचा घेता घेतां,       थकूनी गेलो संसाराला    ८

तन मन जेव्हां झाले दुबळे,      दूर दृष्टी ही गेली निघूनी

आकाशातूनी क्षितीजावरती,      आणि तेथूनी आतां धरणीं     ९

वाकूनी गेले शरीर आणि,       ह्रदय स्थरावर दृष्टी लागली

दाही दिशांनी धुंडत धुंडत,       अखेर देहा भवती वळली     १०

फिरली दृष्टी जीवनभर जी,       वैचित्र्याला शोधीत असता

डोळे मिटूनी नजीक पहा,     सांगे तिजला निसर्ग आता      ११

आनंदाचे मुळ गवसले,        अंतर्यामी वसले होते

आज पावतो विश्व फिरुनी,       मुळ  ठिकाणी आले मग ते     १२

(कविता)

व्यस्त राहण्याचा मार्ग

मराठी ब्लॉगची पध्दत, संगणाकावर नुकतीच सुरु झाली होती. थोडक्यांत वर्णन करायाचे म्हणजे हे एक प्रकारे आपल्या नावाचे एक खाते काढणे असते. ह्य़ाला करआकारणी वा फी नव्हती. आपल्या नावाचा ई-मेल काढून  ब्लॉग काढणे. एक प्रकारे वेबसाईट काढण्यासारखेच आहे. ह्य़ा खात्यावर तूम्ही लेख, कविता, माहिती, फोटो इत्यादी देऊ शकतात. वाचक वर्ग ती वाचतात. जर कुणी प्रतिक्रीया दिल्या तर त्या तुम्हास कळतात. कोणता लेख, वा साहित्य किती जणानी वाचले, ह्य़ाची जाणीव येते. मी हे सर्व जाणल्या नंतर  आपणही आपल्या नावाने एक ब्लॉग काढवा ही  ईच्छा प्रदर्षीत केली. वाचन लेखन ह्य़ांची आवड.  मनाच्या विरंगुळ्या बरोबर उतारवयांत वेळ घालविणे व ते कारणी लागणे हा हेतू.  

           ” आता वय सत्तरीच्यापुढे गेलेले, तेव्हां ह्या गोष्टींत कशाला अडकवून घेता, मनाला अशांत कराल. “  मुलानी माझ्या हलचाली बघून टोकले.

ईश्वरी चिंतन व वाचण्याचा मार्ग सुचविला.

कोणत्या वयामध्ये कोणते काम करावे ह्य़ाचे नियम नसले तरी शारीरिक क्षमता,  मानसिक संतूलन हे त्या कार्यावर मर्यादा टाकतात. हे एक सत्य असते. त्या सर्वांचा विचार होवूनच कोणतेही कार्य हाती घ्यावे. मी माझ्या जीवन आराखड्यातील अनेक छोट्या मोठ्या कर्याचा आढावा घेवू लगलो. तरुणपणी कोणतीही गोष्ट मनांत येतांच ती केली जात असे. तीची योजना, कारवाई, व परिणाम  ह्याचा कोणताच गंभीरतेने विचार केला नव्हता. तडफ होती, धडपड होती. प्रौढत्व आले, तेव्हां कोणतीही गोष्ट करायची म्हणजे प्रथम त्या विचारावरच खूप विचार केला जायी. योजना आखल्या जात होत्या. सर्व अंगानी म्हणजे शारीरिक,मानसिक,आर्थिक, कौटुंबीक आणि सामाजीक, तो होइ. केव्हां यश केव्हां अपयश येत होते. मात्र हे सत्य होते की काम, प्रयत्न आणि यश ह्य़ाविषयी  एक जिद्द मनात होती. त्या धडपडीत त्या कामाचे अपेक्षीत परिणाम मिळवीण्याचीच चेतना होती. त्यामुळे समाधान व निराशा ह्याना सामोरे जावेच लागत असे.  एक कथा वाचली होती. कुण्या एका नव्वदीच्या माणसाने झाडाचे बी शेतांत लावले होते. हे महीत असून की तो स्वतःचे वय व आयुष्य मर्यादा जाणून त्याचे फळ उपभोगणार नाही. स्वतःसाठी नाही तर इतरासाठी, हीच त्याची प्रेरणा होती. फळाची अपेक्षा नसल्यामूळे फक्त आनंद होता.

                सत्तरीच्या पुढे गेलेल्या वयांत संगणकावर ब्लॉग काढणे, लिखाण करणे, त्यासाठी वाचन करणे,  हे सारे सर्व साधारण अपेक्षित नसले तरी ते गैर वाटत नव्हते. येथे कोणतीही गोष्ट, वा यश मिळवण्याची धडपड नव्हती, अपेक्षा नव्हती. आगदी फळाची इच्छा न बाळगता केले जाणारे काम. ह्य़ात मला मिळणार होता फक्त एक आनंद, समाधान आणि व्यस्त राहण्याची कला वा सवय. शरीर ज्येष्ठत्वाकडे झुकताना त्याच्या गुणधर्मा प्रमाणे ते व्याधींचे शिकार बनणारच. वेळ पुढे ढकलता येते, परंतु काळाला कुणीच रोखू शकत नाही. हे सत्य आहे.

जे कराचचे होते, ज्याची क्षमता होती, ते पुर्ण झाले ही भावना ज्येष्ठ म्हणून पक्की करावी. जे होवू शकले नाही, त्या बद्दल आपण कमी पडलो कां ? हे समजले पाहीजे. ज्याना काळ-वेळेचे भान, स्वताः च्या क्षमतेची आणि वयाच्या मर्यादाची जाण, हे सारे समजते, तोच जीवनांत खूपसे साध्य करतो. गरीबाना पैशाची किम्मत कळते, असे म्हणतात. त्याच प्रमाणे ज्येष्ठांना वेळेच महत्व कळलेले असते. ते आपल्या उर्वरीत आयुष्याचे अंदाज वर्षे, हाताच्या बोटावरुन  हेरतात. दिनदर्शीकेकडे त्यांचे लक्ष नसते. जे राहून गेले त्याबद्दल खंत न करता, उरलेल्या आयुषांचा काळ कोणत्याही चांगल्या योजनेत व्यतीत करण्याचा प्रयत्न व्हावा. नामस्मरण, ईश्वरी चिंतन, ध्यान धारणा, चांगले वाचन, लेखन, अहार, निद्रा (विश्रांति ), आणि बौद्धिक चर्चा, व्यायाम ह्य़ा अपेक्षित कार्यक्रमा शिवाय एखादा छंद जोपावा. जो मनास आनंद, समाधान, व शांतता देणारा असेल. त्यांत कोणतेही ध्येय वा फलाशा नसावी. मराठी ब्लॉग, त्यावरचे लिखाण, चर्चा, आणि रसगृहण हे मजसाठी असेच असणार नाही कां ? 

तो फक्त व्यस्त राहण्याचा मार्ग असावा.   

 

(ललित लेख)                            

 

 

 

जुळे

दोघे मिळून आलां               हातात घेऊन हात

हाताळूनी परिस्थितीला      करण्या त्यावर मात

दोघांची मिळूनी शक्ति         दुप्पट होत असे

सहभागी होतां,युक्ति           यशाची खात्री दिसे

एकाच तेजाची तुम्ही बाळे        बरोबरीने आलां जगती

रवि-किरण होऊन जुळे                 प्रकाशमान बनती

ओळखुनी जीवन धोके            यशाच्या मार्गांत

गाडीची बनूनी चाके              सतत रहा वेगांत

एकाचे पाठी जाता दुसरा      यश अल्पची मिळे

एकत्र मिळूनी काम करा        तुम्ही आहांत जुळे

(कविता)

दुर्वांच्या जुड्या

संध्याकाळचे फिरणे झाल्यानंतर शेजारच्या बागेत जावून शांत बसणे हे नित्याचे झाले होते.  एक प्रकारचा आनंद व समाधान मनाला त्यामुळे लाभत असे. शांत झोप मिळण्यासाठी ते गरजेचे वाटत होते.

                            एक गोष्ट माझ्या दररोज बधण्यात येवू लागली होती. एक वयस्कर गृहस्थ नियमीत त्याच वेळी मला बागेत दिसत होते. ते सहसा कुणाशी बोलत नसत. एकटेच शांत बसून बागेतल्या गवतातील दुर्वा काढीत असत. पिशवीत एक दोऱ्याचे रिळ असे. जमविलेल्या दुर्वांची ते जुडी बांधून ती त्या पिशवीत टाकीत असत. जवळ जवळ एक तास पर्यंत दुर्वा काढणे, जुड्या बांधणे व जमा करणे हाच कार्यक्रम ते करीत असल्याचे दिसून येत होते. कदाचित् २१, ५१, वा १०१ दुर्वांच्या जुड्या ते बांधीत असावेत. पुजेमधला मिळणारा आनंद घेण्याचा त्यांचा तो प्रयत्न असावा. हा माझा अंदाज होता. पण मी त्याना तसे कांही विचारले नाही.

                  एक दिवस अचानक त्यानी दुर्वा काढण्याचे थांबवून, ते माझ्याच शेजारी बाकावर येवून बसले. पिशवीतून पाण्याची बाटली काढून ते पाणी प्याले. मला त्यांचा परिचय करुन घेण्याचा अवसर मिळाला होता. ” आपली प्रकृती तर बरी आहे ना ? ”  मी विचारणा केली.

” हां, ठिक आहे. किंचीत् थकवा वाटला, म्हणून बसलो. ह्या वयांत सारे कांही अनिश्चीत. पाणी प्यालो. आता थोडी हूरहुरी वाटते. ”   ते माझ्याशी मोकळेपणाने बोलू लागले. ते एक वरिष्ठ निवृत्त शासकिय अधिकारी होते. छोटे कुटुंब. मुलीकडे रहात होते. फक्त दोन मुली त्यांना. एक परदेशांत स्थायीक झालेली. आनंदी व समाधानी वृत्तीने जीवन क्रम चालू होता. चौकस बुद्धी म्हणून मी त्याना त्यांच्या नियमीत दुर्वांच्या जुड्या जमाकरण्या बद्दल विचारणा केली.

             ते हसले. “खर सांगू. ह्या दुर्वा खोडणे, जमा करणे, त्याची जुडी बांधणे आणि अशा अनेक जुड्या पिशवीत जमा करणे हे सारे मी केवळ आनंदासाठी, समाधानासाठी करीत असतो. माझे वय सध्या ८० च्या पुढे गेलेले आहे. प्रकृति सध्यातरी टिकवून आहे. त्यामुळे शरिराच्या हलचाली व्यवस्थित व ताब्यात असलेल्या आहेत. फक्त ईश्वरी नामस्मरण करतो. चिंतन करतो. ध्यान करतो. कोणतेही कर्मकांड करीत नाही. पुजाअर्चा ह्यांत मन केव्हांच रमले नाही. म्हणून ती करीत नसतो. मनाला पटले वा भावले तेच करत गेलो. कुणी सांगतो, सुचवितो म्हणून अथवा पुस्तकांत वा कोणत्यातरी ग्रंथात मार्गदर्शन आहे म्हणून मी ते मान्य करीत नाही.  हां ! ह्या दुर्वांच्या जुड्या कशासाठी ?  हे सारे फक्त मानसिक समाधानासाठीच आहे. सर्व दुर्वा अंदाजाने मी जमवून त्याची जुडी बांधतो. त्याकडे माझे लक्ष नसते. त्या गणरायाचे मात्र सतत नामस्मरण चालू ठेवतो. ह्या साऱ्या  जुड्या मी मंदिराशेजारच्या फुलवाल्याला देत असतो. तो मला त्याचे दहा रुपये देतो. बस. श्रमाच्या पैशाचा मिळणारा आनंद हा कांही वेगळाच असतो, नव्हे काय ? मंदिरा शेजारी कांही भिकारी बसलेले असतात. ते पैसे मी त्याना देवून टाकतो. त्या भिकाऱ्याची गरज, ही त्या क्षणी माझ्या आनंदाचा, समाधानाचा मार्ग निर्माण करणारी असते. ह्य़ातच माझ्या मनाची शांतता दडलेली आहे. त्याच शांततेच्या शोधांत मी उर्वरीत जीवन व्यतीत करतो. ”

 एका छोट्याशा प्रसंगातून, एक रोमांचकारी भावनिक आणि जीवनाच्या महान तत्वज्ञानाचे विवरण मी त्या गृहस्थाकडून ऐकत होतो. त्यानी जे सांगीतले, त्यानी मी भारावून गेलो. जीवन म्हणजे काय ? जगायचे कसे व कां हे त्यानी जाणले असावे, हे मला उमगले. मी उठून त्याना अभिवादन केले. त्यांच्या चरणाला स्पर्ष केला.

(ललित लेख)

आईचे ऋण

 
मूर्तिमंत वाटे देवी लक्ष्मी          प्रेमळ स्वरूप माझे आई
धन्य जहलो जन्म मिळूनी       उदरामाजी तुझिया ठायी  

प्रेमाचा तो सागर देखिला          नऊ मास मी उदरी राहुनी
तुझ्या वाचुनी हृदया  जवळी     शिरलो नाही निकट जाऊनी  

दुग्धामृत पाजून मजला            वाढवी अंकुर काळजीने
घास भरवण्या काढून ठेवी             उपाशी राहून आनंदाने

निद्रा न लागे तुजला तेंव्हा           आजारी जेंव्हा मी पडलो
पाणी दिसले तुझ्या नयनी           दु:खाने जेंव्हा हळहळलो

 
 
 
 

अनंत ऋणे करुनी ठेवसी            माझ्या शिरावरी आई गे
तेच  फेडण्या करिता कित्येक      जन्माची सेवा लागे.

मात्रत्वाचे ऋण फेडण्या              असे वाटते, माताच व्हावे 
पुनर्जन्मी त्नू पुत्र होऊनी            सेवा करण्या मजला मिळावे.

( कविता )

ऋणमुक्त

आज मला वेगळेच समाधान व आनंद मनास वाटू लागला होता.
ऋणमुक्ततेचा आनंद. उपकाराची  परत फेड व्हावी आणि त्यासाठी  एखादी  नैसर्गिक घटना घडावी ह्यासारखी समाधानाची दुसरी गोष्ट  असू शकत नाही. कृत्रिमरित्या  व आपल्या प्रयत्नाना  आपण एखद्या गोष्टीचे ऋण फेडणे, वेगळे. ते फेडण्यासाठी निसर्गाने तुम्हास मदत करणे ह्यात खूप फरक पडतो. तुमच्या  अपेक्षित  अंतर्मनाची तगमग ह्याची निसर्गाने दाद घेतली  हा  त्याचा  अर्थ बनतो. ह्या ऋणमुक्तीच्या  व्यहारात कुणी किती उपकार केले, आर्थिक  शारीरिक वा भावनिक हा प्रश्न गौण असतो. त्याची फक्त प्रासंगिक मदत असते,  त्याच्या योगदानाची कदर व्हावी हा तुमच्या वागणुकीतील मोठेपणा.  
                      मी माझ्या नांवाचे लेटरहेड आणि विजिटिंग कार्ड ह्यांची छपाई करून घेण्यासाठीचा मजकूर श्री फडके यांच्या मुद्रणालयांत देऊन आलो. चार  दिवसांनी त्याचे व्यवस्थित गठ्ठे व छपाई केलेले साहित्य त्यांनी माझ्याकडे    पाठून दिले. त्याचे बिल त्यावेळी मात्र पाठविले नव्हते. अर्थात  ती रक्कम  मला माहित होती. मी नंतर त्यांना भेटून छपाईचे पैसे नेऊन  देणार  होतो.   अचानक एका  प्रसंगात मला गांवी जावे लागले. मला तेथेच तीन महिने राहवे लागले.  त्यामुळे त्यांचे बिल देण्याचे राहून गेले.
परत आल्यानंतर मी ते बिल देण्यासाठी गेलो. एक गोष्ट बघून मी चकित झालो. फडक्यांनी मधल्या काळांत मुद्रणालय बंद करून त्यांचा व्यवसाय दुसरीकडे नेला होता. त्यांचे तेथे कुणीच नव्हते. ते कोठे गेले हे ही  कळू  शकले नाही. मनाला रुख रुख लागून गेली की त्यांचे पैसे देण्याचे राहून गेले. उपाय नव्हता. 
                         जवळ जवळ तीस वर्षाचा काळ निघून गेला. निसर्गाच्या  चक्रामध्ये अनेक प्रसंग, त्यांचे चांगले वाइट परिणाम हे सारे पडद्या  आड  होत  असतात. आठवण विसरणे ही निसर्गाची एक अप्रतिम देणगी असते. मनाच्या शांततेसाठी हे फार महत्याचे असते. मनुष्य ती घटना व त्याचा आशय विसरत असला, तरी म्हणतात की हे सारे त्याच्या दैवी खात्यात  नोंदविले जाते. कोणत्याही कर्म केलेल्या गोष्टीची परत फेड करावी वा तो भोग भोगावा ही निसर्गाची अपेक्षा असते. 
                        मुलीच्या लग्नासाठी एका गांवी जाण्याचा योग आला होता.  लग्न पत्रिकेचा मजकूर घेवून एका मुद्रनालयात गेलो. ते वाचून मालकाने विचरले ” आपण ठाण्याचे कां? ” पूर्वी माझ्या वडिलांचे तेथेच मुद्रणालय होते. क्षणात साऱ्या गोष्टीचा उलगडा झाला. त्यांचे वडील आजारी  असल्याचे  कळले. जांच्या कडून  मी तीस वर्षपूर्वी माझे छपाईचे काम करून घेतले होते,  तेच हेच गृहस्त होते. त्यांचे त्यावेळचे पैसे देण्याचे राहून गेले होते. ते कर्ज अर्थात अलिखित ऋण म्हणून माझ्या कपाळी शिक्का मोर्तब झाले होते. मला ते फेडण्याचा  निसर्गानेच योग दिला होता. अर्थात त्या प्रसंगाची पुनरपि आठवण जागृत करीत मी हे करू शकलो. फडके तर हे सारे विसरून गेले होते. मी मात्र  त्या ऋण मुक्त तेचा आनंद व समाधान  घेत होतो. जागृत राहून, सतर्कतेने प्रत्येक कर्माचे फळ त्याच  जन्मी  भोगून  सदा ऋणमुक्त असावे हाच गीतेमधला उपदेश नव्हे कां? आत्म्याचा बंधनमुक्त होण्याचा हाच संदेश असेल. 
 
( ललित लेख ) 
 
  
  

बघूनी सू्र्यपूजा पावन झालो

हासत आली सूर्य किरणे,        झरोक्यातून देव्हाऱयात

न्हाऊ घालूनी जगदंबेला,        केली किरणांची बरसात   

 पूजा केली किरणांनी,          जगन्माता देवीची

प्रकाश स्पर्शूनी चरणाला,     केली उधळण सुवर्णाची

 तेजोमय दिसूं लागले,        मुखकमल जगदंबेचे             

मधूर हास्य केले वदनीं,     पूजन स्विकारते सूर्याचे

 रोज सकाळी प्रातःकाळीं,      येऊनी पूजा तो करितो

भाव भक्तिने दर्शन घेऊनी,      सृष्टीवर किरणे उधळितो

 कोटी कोटी किरणांनी,       तो देवीची पूजा करितो

केवळ त्याची पूजा बघूनी      पावन मी होतो. 

 

( कविता )