Daily Archives: फेब्रुवारी 8, 2011

आमचे खेळ

या मित्रांनो सारे या, 
सर्व मिळूनी खेळू या
खेळ आमच्या देशाचे       गरिबांसाठी सोईचे
मैदान नको मोठे ते         वस्तूही अल्प लागते
              खेळांना त्या समजून घ्या – – –     1)
या मित्रांनो सारे या,  सर्व मिळूनी खेळू या
हुतुतूचा खेळ बघा       दोन गट, छोटी जागा
स्पर्श रेषा ओलांडूनी      ह्तुतू म्हणती तोंडानी
एकाच दमात भिडू मारू या – – –       2)
या मित्रांनो सारे या,  सर्व मिळूनी खेळू या 
खो खो मध्ये चपळाई      चकमा देण्याची घाई
उलट सुलट बसे           एकाच रांगेत दिसे 
मिळता खो भिडूला पकडू या  – – –      3)
या मित्रांनो सारे या,  सर्व मिळूनी खेळू या 
लपंडाव हा खेळ कसा         लपलेल्यांना शोधत बसा
राज्य येते त्यावरती           शोध घेई सभोवती
तीक्ष्ण नजर ती ठेऊया – – –        4)  
या मित्रांनो सारे या,  सर्व मिळूनी खेळू या 
आट्या पाट्या च्या खेळात       कांही घरे आखतात 
सीमेवरती दक्ष राहती           घरात येण्या ते रोकती
चपळाईने घरात शिरू या – – –      5)
या मित्रांनो सारे या,  सर्व मिळूनी खेळू या
एका पायाची गम्मत          लंगडी आहे माहित?
उड्या  मारीत पळावे        भिडू सारे पकडावे
आखल्या रेषेतच खेळू या – – –       6)
या मित्रांनो सारे या,  सर्व मिळूनी खेळू या
एक दिलाने खेळू या        आनंद सारा लुटू या
निरोगी सदा राही तो       प्रफुल्ल मन बाळगतो
शीण अभ्यासाचा घालवू या – – –       7)
मित्रांनो सारे या,  सर्व मिळूनी खेळू या 

( कविता )