आज मला वेगळेच समाधान व आनंद मनास वाटू लागला होता.
ऋणमुक्ततेचा आनंद. उपकाराची परत फेड व्हावी आणि त्यासाठी एखादी नैसर्गिक घटना घडावी ह्यासारखी समाधानाची दुसरी गोष्ट असू शकत नाही. कृत्रिमरित्या व आपल्या प्रयत्नाना आपण एखद्या गोष्टीचे ऋण फेडणे, वेगळे. ते फेडण्यासाठी निसर्गाने तुम्हास मदत करणे ह्यात खूप फरक पडतो. तुमच्या अपेक्षित अंतर्मनाची तगमग ह्याची निसर्गाने दाद घेतली हा त्याचा अर्थ बनतो. ह्या ऋणमुक्तीच्या व्यहारात कुणी किती उपकार केले, आर्थिक शारीरिक वा भावनिक हा प्रश्न गौण असतो. त्याची फक्त प्रासंगिक मदत असते, त्याच्या योगदानाची कदर व्हावी हा तुमच्या वागणुकीतील मोठेपणा.
मी माझ्या नांवाचे लेटरहेड आणि विजिटिंग कार्ड ह्यांची छपाई करून घेण्यासाठीचा मजकूर श्री फडके यांच्या मुद्रणालयांत देऊन आलो. चार दिवसांनी त्याचे व्यवस्थित गठ्ठे व छपाई केलेले साहित्य त्यांनी माझ्याकडे पाठून दिले. त्याचे बिल त्यावेळी मात्र पाठविले नव्हते. अर्थात ती रक्कम मला माहित होती. मी नंतर त्यांना भेटून छपाईचे पैसे नेऊन देणार होतो. अचानक एका प्रसंगात मला गांवी जावे लागले. मला तेथेच तीन महिने राहवे लागले. त्यामुळे त्यांचे बिल देण्याचे राहून गेले.
परत आल्यानंतर मी ते बिल देण्यासाठी गेलो. एक गोष्ट बघून मी चकित झालो. फडक्यांनी मधल्या काळांत मुद्रणालय बंद करून त्यांचा व्यवसाय दुसरीकडे नेला होता. त्यांचे तेथे कुणीच नव्हते. ते कोठे गेले हे ही कळू शकले नाही. मनाला रुख रुख लागून गेली की त्यांचे पैसे देण्याचे राहून गेले. उपाय नव्हता.
जवळ जवळ तीस वर्षाचा काळ निघून गेला. निसर्गाच्या चक्रामध्ये अनेक प्रसंग, त्यांचे चांगले वाइट परिणाम हे सारे पडद्या आड होत असतात. आठवण विसरणे ही निसर्गाची एक अप्रतिम देणगी असते. मनाच्या शांततेसाठी हे फार महत्याचे असते. मनुष्य ती घटना व त्याचा आशय विसरत असला, तरी म्हणतात की हे सारे त्याच्या दैवी खात्यात नोंदविले जाते. कोणत्याही कर्म केलेल्या गोष्टीची परत फेड करावी वा तो भोग भोगावा ही निसर्गाची अपेक्षा असते.
मुलीच्या लग्नासाठी एका गांवी जाण्याचा योग आला होता. लग्न पत्रिकेचा मजकूर घेवून एका मुद्रनालयात गेलो. ते वाचून मालकाने विचरले ” आपण ठाण्याचे कां? ” पूर्वी माझ्या वडिलांचे तेथेच मुद्रणालय होते. क्षणात साऱ्या गोष्टीचा उलगडा झाला. त्यांचे वडील आजारी असल्याचे कळले. जांच्या कडून मी तीस वर्षपूर्वी माझे छपाईचे काम करून घेतले होते, तेच हेच गृहस्त होते. त्यांचे त्यावेळचे पैसे देण्याचे राहून गेले होते. ते कर्ज अर्थात अलिखित ऋण म्हणून माझ्या कपाळी शिक्का मोर्तब झाले होते. मला ते फेडण्याचा निसर्गानेच योग दिला होता. अर्थात त्या प्रसंगाची पुनरपि आठवण जागृत करीत मी हे करू शकलो. फडके तर हे सारे विसरून गेले होते. मी मात्र त्या ऋण मुक्त तेचा आनंद व समाधान घेत होतो. जागृत राहून, सतर्कतेने प्रत्येक कर्माचे फळ त्याच जन्मी भोगून सदा ऋणमुक्त असावे हाच गीतेमधला उपदेश नव्हे कां? आत्म्याचा बंधनमुक्त होण्याचा हाच संदेश असेल.
( ललित लेख )