Monthly Archives: फेब्रुवारी 2011

आमचे खेळ

या मित्रांनो सारे या, 
सर्व मिळूनी खेळू या
खेळ आमच्या देशाचे       गरिबांसाठी सोईचे
मैदान नको मोठे ते         वस्तूही अल्प लागते
              खेळांना त्या समजून घ्या – – –     1)
या मित्रांनो सारे या,  सर्व मिळूनी खेळू या
हुतुतूचा खेळ बघा       दोन गट, छोटी जागा
स्पर्श रेषा ओलांडूनी      ह्तुतू म्हणती तोंडानी
एकाच दमात भिडू मारू या – – –       2)
या मित्रांनो सारे या,  सर्व मिळूनी खेळू या 
खो खो मध्ये चपळाई      चकमा देण्याची घाई
उलट सुलट बसे           एकाच रांगेत दिसे 
मिळता खो भिडूला पकडू या  – – –      3)
या मित्रांनो सारे या,  सर्व मिळूनी खेळू या 
लपंडाव हा खेळ कसा         लपलेल्यांना शोधत बसा
राज्य येते त्यावरती           शोध घेई सभोवती
तीक्ष्ण नजर ती ठेऊया – – –        4)  
या मित्रांनो सारे या,  सर्व मिळूनी खेळू या 
आट्या पाट्या च्या खेळात       कांही घरे आखतात 
सीमेवरती दक्ष राहती           घरात येण्या ते रोकती
चपळाईने घरात शिरू या – – –      5)
या मित्रांनो सारे या,  सर्व मिळूनी खेळू या
एका पायाची गम्मत          लंगडी आहे माहित?
उड्या  मारीत पळावे        भिडू सारे पकडावे
आखल्या रेषेतच खेळू या – – –       6)
या मित्रांनो सारे या,  सर्व मिळूनी खेळू या
एक दिलाने खेळू या        आनंद सारा लुटू या
निरोगी सदा राही तो       प्रफुल्ल मन बाळगतो
शीण अभ्यासाचा घालवू या – – –       7)
मित्रांनो सारे या,  सर्व मिळूनी खेळू या 

( कविता )

सनसेट अपियरन्स ( sun – set appearance )

डॉक्टर जेनर जोसेफ हे प्रसिद्ध बालरोग तज्ञ व  शास्त्रज्ञ होते. निसर्ग प्रेमी होते. त्यांनी आपले घर समुद्र किनाऱ्यावर बांधले होते.  रोज सूर्यास्त समयी ग्यालरीत बसून समुद्राच्या पैलतीरी आकाशातून मावळनाऱ्या
सूर्याला बघताना त्यांना खूप आनंद वाटत असे.
एकदा त्यांच्या क्लिनिकमध्ये दोन तीन महिन्याच्या बालकाला आणले गेले. मुलाचे डोके खुपच मोठे होते. कपाळ भव्य, परंतु  नाक  तोंड डोळे  त्यामानाने लहान होते.  जन्मत: हा दोष त्या मुलामध्ये असल्याचे त्यांना कळले. त्यांचे ज्ञान व शोधक बुद्धी त्यांना शांत बसू देईना. त्याकाळी वैद्यकीय शास्त्र फार प्रगत नव्हते.  आधुनिक  उपकरणे,  यंत्रे  उपलब्ध नव्हती. विचार आणि तर्क ह्यावर जास्त भरवसा होता. ते त्या बालकावर त्याच्या रोगाची काय कारणे  असतील, ह्यावर प्रत्येक  अंगाने  टिपणी करू लागले. आपला  बराचसा  वेळ ते त्या बालक व त्याच्या रोगावर केंद्रित करू लागले. त्या बालकाच्या  मेंदू व मेंदूच्या  सभोवताली  असलेल्या द्रवाचे  ( cerebro  spinal  fluid ) प्रमाण  त्या रोगांत  बरेच  वाढलेले त्यांच्या लक्षात आले. त्याचबरोबर त्या द्रवाने मेंदूवर व इतर  अवयवावर एक दाब निर्माण केलेला त्यांना कळले. त्यांनी त्या विकाराचे  नांव Hydro  Cephalus  असे ठेवले. अशाच केसेसवर ते लक्ष  केंद्रित करू लागले. त्यावरचे आजही मान्यता पावलेले उपचार  त्यांनी सुचविले होते.  
  ह्याच Hydro -Cephalus  विषयांत  एक गमतीदार निरीक्षण त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्या बालकाच्या डोळ्याचे खूप बारकाईने पाहणी केली. जेंव्हा कोणतेही मूल आपले डोळे पूर्ण उघडते, म्हणजे डोळ्याच्या  पापण्या  उघडलेल्या असतात,  डोळ्याचा मध्य काळा भाग, ज्याला Cornia म्हणतात   व सभोवताली पांढरा भाग ज्याला Sclera म्हणतात तो  दिसतो. काळा भाग गोलाकार असून मध्यभागी असतो व इतर भाग पांढरा असतो. ह्या विकारांत मधला भाग काळा असलेला अर्ध गोलाकार असा दिसतो. ह्याचे कारण मेंदूतील वाढलेल्या द्रवाचा दाब हा डोळ्याच्या बुबुळावर पडून ती पुढे सरकतात. फिरली जातात. आणि ती काळी टिकी Cornia  अर्ध गोलाकार बनत तशी दिसू लागते. त्यांनी त्यांच्या निरीक्षणाला मावळत्या  सूर्याची  उपमा दिली. The Cornia and   slera  around  look  like  Sun -Set  Appearance   असे त्यांनी त्याचे प्रथम वर्णन नोंदविले. तेंव्हा पासूनच    अशा विकारामधली डोळ्यामध्ये होणाऱ्या बदलला कायमचे Sun -Set Appearence हेच नांव पडले.        
 
( ललित   लेख )  
 
 
     

चंद्र- ग्रहण

 
राहू केतुनो सोडून द्या तुम्ही,       मगरमिठीतून चंद्राला 
बघा बघा ह्या प्रथ्वीवरती,        काय तो हा: हा: कार मजला 
 
प्रेमिजानांचा प्रेमबिंदू तो,        सौंदर्याचा मुकुटमणी
झाकळला सारा नभात हा,      म्हणती त्यास गिळला कुणी 
 
आत्मा जाता सोडून देहा,       उरे न कांही मागे 
चंद्र चांदणे नभात नसता,       सौंदर्याची मिटतील अंगे 
 
सौंदर्यातची  बघतो सारे,       जगण्यासाठी सौंदर्य हवे  
विश्वचक्र हे फिरत रहाण्या       चंद्राचे आस्तित्व सतत हवे
 
नष्ट होतील जीवजीवाणू,      आनंद त्यांचा जाईल विरुनी 
बलिदानाच्या पुण्याईने परि        सुटेल चंद्र मगरमिठीतून 
 
( कविता )
 
 
   

चक्षु पटलावरील ती छबी

पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पंत प्रधान असतानाचा एक छोटासा परंतु माझ्या जीवनातला महान ऐतिहासिक  प्रसंग आठवतो. गुबर्ग्याला  पंडितजी  कोणत्यातरी भव्य वास्तूच्या संकल्पित  इमारतीच्या पायाभरणी समारंभाच्या उद्घाटनासाठी आलेले होते. आजकालचा दहशतवाद तेंव्हा मुळीच नव्हता. कुणीही पंत प्रधानाच्या जवळ जाण्यास फारशी आडकाठी नसे.  माझे वडील तेथे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी होते.  फक्त  निमंत्रीतानाच  आत प्रवेश दिला जात होता. तीन स्त्रीयांना तीन रंगाच्या ( भगवा पांढरा नी हिरवा ) साड्या परिधान  करून  प्रवेश  द्वाराजवळ   फुले, बुके, आरतीचे ताट घेवून  पंडीतजीच्या  स्वागतासाठी उभे केले होते. त्या तिघीमध्ये  माझी आई देखील होती. मी एक शाळकरी मुलगा होतो व थोडे अंतर सोडून मागे उभा होतो.
पंडितजी आले. हसत त्यांनी सर्वाना अभिवादन केले. त्या तिघींनी  दिलेली  फुले, बुके, आणि ओवाळणी मान्य करीत चेहऱ्यावर समाधान व्यक्त करीत ते  निघून गेले. एक क्षण , फक्त झलक,  जशी आकाशातील वीज  चमकून  सारा  आसमंत प्रकाशत व्हावा, तसाच. तो अतिशय क्षणिक व छोटा प्रसंग माझ्या डोळ्यांनी जो टिपला, तो माझ्या जीवनासाठी ऐतिहासिक म्हणून मन व हृदयावर  कोरला गेला होता.  
माझ्या डोळ्यातही एक दैवी असा  कॉम्पुटर  (Computer ) आहे. असे  मला  वाटते.  तो दैवी माऊस( Mouse )  क्लीक केल्यावर, माझ्या मनावर  कोरल्या  गेलेल्या  साऱ्या आठवणीना  उजाळा मिळतो. त्या काळाची  त्यावेळची मी माझ्या डोळ्यांत  सामावलेली ती छबी, आजही चटकन  Display अर्थात  प्रक्षेपित  होते. माझ्या अंतर मनाला ते चित्रण दिसू लागते.
मी आजही त्या प्रचंड  वेगाने  जाणाऱ्या,  विज्ञान शास्त्राच्या त्या   यशाची  आतुरतेने वाट बघत आहे. जेंव्हा ते  यांत्रिक पद्धतीने माझ्या चक्षुपटलावरची  ती छबी कागदावर प्रक्षेपित करण्यात यश मिळवितील.
ती  माझ्यासाठीची अत्यंत दुर्मिळ परंतु महत्वाची घटना असेल.  कदाचित मीच प्रथम त्या यंत्रणेचा उपभोक्ता  असेन.  
 
( ललित लेख )    
 
 
 
 

राधेचे मुरली प्रेम

 
मुरलीच्या सुरांत विसरली राधा सर्वाला 
कुज  बूज करुनी जन समजती वेडी ते तिजला
 
त्या सुरात कोणती जादू
ती किमया कशी मी वदू
सप्त सुरांचा निनाद उठुनी
खेचून घेती चित्ताला – – –
विसरली राधा सर्वाला 
 
धेनु वत्से बावरली
बाल गोपाल आनंदली
रोम रोम ते पुलकित होऊनी
माना डोलती सुरतालाला – – –
विसरली राधा सर्वाला 
 
प्रभूचा होता ध्यास मनी 
ती बघे हरिला रात्रन दिनी 
जे शब्द निघाले मुरलीतूनी
हाका मारती  ते तिजला  – – –
विसरली राधा सर्वाला 
 
हरिच्या ओठ्ची भाषा 
सुरात ऐकता येई नशा 
तो नाद एकला कानी पडता 
भाव समाधी लागली तिजला  – – –
विसरली राधा सर्वाला   
 
( कविता )