Monthly Archives: नोव्हेंबर 2010

” पश्चाताप ” – – एक जाणीव !

 संध्याकाळची वेळ होती. दारावरची बेल वाजली. दारासमोर  डॉक्टर  देशमुख यांना बघून आश्चर्याचा धक्का बसला. माझ्यासाठी ते घडणे म्हणजे केवळ   चमत्कार होता.  डॉक्टर देशमुख शासनाचे  वरिष्ठ अधिकारी होते.  त्यांना निवृत्त होऊनही दहा वर्षे झाली होती. बरेच  प्रशासकीय अधिकार प्राप्त.  ते स्वत: एक कर्तबगार, हुशार, प्रामाणिक आणि  अतिशय शिस्तप्रिय व्यक्तीमत्व होते. सर्व संबधित त्यांना वचकून होते. 
मला एक प्रसंग आठवला. त्यावेळी ” कैलास मानसरोवर “   ही यात्रा केवळ भारतीय शासन आयोजित असे. वर्षातून फक्त तीन महिने ती यात्रा चाले. ३० दिवसाची यात्रा. वर्तमानपत्रे, दूरदर्शन ह्यांच्या माध्यमातून  संपूर्ण देशातून अर्ज मागविले जात. यात्रेला जाण्यासाठी थोड्याच लोकांना  प्रवेश मिळे. किचकट नियमातून प्रवेश मिळणे अत्यंत अवघड होते. मी पण अर्ज केला होता. नशिब चांगले म्हणून  नंबर लागला. तार मिळाली  ” कैलास  मानसरोवर यात्रेसाठी  तुमचा अर्ज मंजूर केला गेला. १५ दिसात फार्म भरून अनामत रक्कम पाठविणे.”  धावपळ सुरु झाली. यात्रा दोन महिन्या नंतर  सुरु होणार होती. संबंधित बाबींची पूर्तता करण्याची गरज होती. शासकीय नोकरी. तेंव्हा ३० दिवसाची रजा मंजूर करून घेणे महत्वाचे होते.
डॉक्टर देशमुख त्यावेळी संबंधित वरिष्ठ अधिकारी होते. त्यांना भेटलो व  परिस्थिती समजावून सांगितली. रजेचा अर्ज दिला. माझ्यासाठी नशिबाने ही एक मिळालेली संधी असल्याचे सांगितले. त्यांनी क्षणभर विचार केला.  प्रशासकीय कारण देत अर्ज नामंजूर केला. मी खूप निराश झालो. विनंत्या केल्या. वेळ पडल्यास बिनपगारी राजा द्यावी, हेही मागितले. परंतु डॉक्टर देशमुख यांनी निर्णय बदलला नाही. माझा अर्ज फेटाळून लावला. मिळालेली  संधी वरिष्ठांच्या हट्टापाई गमावून बसलो. 
१२ वर्षपूर्वीचा तो प्रसंग, मी केंव्हाच विसरलो होतो. आणि आज अचनक ज्याचा विचार केव्हाच मनांत येणार नाही ते घडले होते. डॉक्टर देशमुख माझे वरिष्ठ अधिकारी होते. त्यांचे मी स्वागत केले. खूप आनंद व समाधान  व्यक्त केले. मी देखील निवृत झालो होतो.
डॉक्टर देशमुख सांगू लागले.  ” मी खास तुम्हाला भेटण्यासाठी आलो आहे. माझ्या जीवनात मी अनेक वरिष्ठ जागा भुषविल्या.  अनेक निर्णय घेतले. शकतो नियमानुसार काम करण्याचा प्रयत्न केला. नियम हे फक्त मार्ग दर्शक असतात. निर्णय मात्र तुम्हाला सारासार विचार करून, परिस्थितीचा अभ्यास करून, त्याच्या परिणामाचा  विचार करून, घ्यावा लागतो. त्यात असते  तुमचे  ज्ञान, अनुभव, कार्याची क्षमता, आणि तुमचा स्वत:चा स्वभाव गुणधर्म. निर्णयात स्वभावाचा सहभाग अल्पसा असला तरी  अनेक निकालांची तो  उलट 
सुलट करु शकतो. तुमचे राग लोभ अहंकार, कुणाबद्दलचे समाज, गैरसमज ह्या बाबी तुमच्या स्वभावाला  बंदिस्त चाकोरीत टाकतात.  अजाणतेपणाने तुमच्या निर्णयामध्ये त्याचा अप्रत्यक्ष सहभाग  होऊन जातो.  अशाच  कांही मी घेतलेल्या निर्णयाचे आज मी विश्लेषण करीत आहे. कांही निर्णया बाबतीत, मला  खंत वाटते. तो भूत काळ होता. मी आता काह्नीच करु शकत  नाही. पश्चात्ताप  होणे हेच एक  प्रायश्चित असते. चुका करणे हा मानवी स्वाभव. परंतु त्याची  तीव्रतेने जाणीव होणे हा निसर्ग. त्याला मानणे हे त्या दुष्ट 
चक्रातून  केलेले  बचवात्मक समाधान.  ज्या ज्या निर्णयामध्ये जर कुणाची हानी झाली असेल तर आणि त्यात मला स्वत: ची चूक उमगली असेल, तर त्याची क्षमा मागण्यासाठी मी आलो आहे. वेळ  गेली, काळ  गेला. 
 भोगनाऱ्याने जे भोगले, त्यांच्या दु:ख निर्मितीत माझा अप्रत्यक्ष सहभाग होता. क्षमा व्यक्त करून मी मनाचे सांत्वन इच्छितो.” 
डॉक्टर देशमुख भावनीक झालेले दिसले. चुका सुधारण्यासाठी आता वेळ नसली, तरीं अंत:करणातून  निर्माण  झालेल्या प्रायश्चिताची जाणीव, हीच खरी शांतता. हाच निसर्ग व ईश्वरी संदेश नव्हे काय  ?
  
 

पूर्णेच्या परिसरांत !

 जेंव्हा ठरले गावी जाणे       हूर हूर होती  मनी  
बराच काळ गेला होता      आयुष्यातील निघुनी 
काय तेथे असेल आता          सारे गेले बदलूनी 
काळाच्या प्रवाहामध्ये        राहिलं कसे टिकूनी  
चकित झालो बघुनी         सारे जेथल्या तेथे
उणीवता न जाणली      क्षणभर देखील मानते 
बालपणातील सवंगडी     जमली अवती भवती 
गतकाळातील आनंदी क्षण    पुनरपि उजळती 
आंबे चिंचा पाडीत होतो        झाडावरती चढुनी  
आज मिळाला तोच आनंद    झाडा खालती बसूनी
मळ्यामधली मजा लुटली      नाचूनी गाऊनी 
विहिरीमधल्या पाण्यात      मनसोक्त ते डुबूनी 
ऐकल्या होत्या कथा परींच्या     तन्मयतेने बसूनी 
आज सांगे त्याच कथा मी     काका मुलांचे बनुनी 
वाडा सांगे इतिहास सारा    पूर्वज जगले कसे 
भव्य खिंडारी उमटले होते    कर्तृत्वाचे ठसे
बापू, आबा, मामा, काका,     मामी वाहिनी जमती 
कमी न पडली तसूभरही       प्रेमामधली नाती 
मीही बदललो, गांवहीं बदलले     काळाच्या ओघांत
आनंद मात्र तो तसाच होता     पूर्णेच्या परिसरांत   
 
( कविता )  
  

कुपोषण हे पोषणाचे साधन ?

रेल्वेने औरंगाबादला जाण्यासाठी उभा होतो. एक भिकारीन, अंदाजे दोन वर्षाच्या लहानग्या मुलाला कडेवरती घेऊन, भिक मागत होती. मजजवळ ती आली. मुलगा खूपच रोड अशक्त व नजरेत भरेल इतका कुपोषित  होता. निस्तेज व अस्वच्छ चेहऱ्यामुळे माशा बसलेल्या होत्या. मुलाची काहीच  हालचाल दिसत नव्हती. त्या मुलाकडे बघून मला त्याची सहानुभूती वाटली.  मी पाच रुपयाचे नाणे तिच्या हाती दिले. ती तशीच पुढे भिक मागत गेली. 
गाडी लेट होती. मी वाट बघत इकडून तिकडे फिरत होतो.  थोड्या वेळाने  माझी नजर एका वडापावच्या दुकानावर गेली. तीच भिकारीन तेथे वडापाव खाताना दिसली. नंतर  ती निघून गेली. मी तिच्या हालचालीकडे 
अभ्यासपूर्वक  लक्ष देऊन बघत होतो. गाडी लेट असल्यामुळे मला तेथे स्टेशनवर जवळ जवळ दीड तास थांबावे लागले. त्या लहन मुलाला दुध दिलेले, फळ व बिस्कीट दिलेले दिसून आले नाही. काहीही खाऊ घातल्याचे  मला त्या थोड्याश्या वेळेमध्ये दिसले नाही. एक विचित्र चित्रण बघण्यात आले होते. एक लहानगा मुलगा त्या तथा कथित आईला जगण्यामध्ये मदत करीत होता. मुलामुळे आईची कमाई होत होती. आणि आईचे पोषण होत होते. मुलाच्या कुपोषणामुळे एक दयेची लाट सभोवतालच्या जनसमुदायात निर्माण केली जात होती. त्या बाईला आंतरिक सहानुभूती त्याच मुलामुळे लाभलेली जाणवत होती. लोक भूतदयेच्या भावनेतून तिच्या ओंझळीत नाण्याची खैरात करीत होते. हेच उत्पन्न तिला जगवित होते. मुलाला ती भरवित तर असणारच. कारण त्या मुलाने जगावे, ही तिची  आंतरिक ईच्छा असेलच. परंतु जगाच्या व्यवहाराचापण तिच्या मनावर परिणाम झालेला जाणवत होता. मुलाचे कुपोषण हे तिच्या पोषणाचे एक साधन असल्याची जाणीव होत होती. 
एक दैवी संघर्ष — — निसर्ग  तिच्या मात्रत्वाची  भावना तेवत ठेऊन,  त्या मुलाला जगवण्यास उद्दुक्त करीत होता. — — तर जगरहाटी अर्थात व्यवहार त्या मुलाला कुपोषित ठेवण्यातच आपली यशस्वीता मानत होता.
  

मेडीकल येथिक्स !

अमेरिकेतील अरीझोना स्टेट मधील फिनिक्स हे सुंदर व प्रशस्त  वसलेले शहर. स्वछता शिस्त व नियमांचे काटेकोर पालन ह्याचा अनुभव  तीव्रतेने  तेथील वास्त्व्यात आला. प्रत्येक संस्थांचे नियम  असतात  ते सहसा मोडले जात नाहीत.  तेथे एक मजेदार अनुभव आला. मुलगा एका कंपनीत कामाला होता. त्याच्याकडे  आम्ही दोघे गेलो होतो. त्याची बायको अर्थात माझी सून गर्भवती होती. सात  महिने झालेले. त्याच शहरात नजीकच्या मोठ्या रुग्णालयात तिची रीतसर नोंदणी 
केलेली होती. संबंधित स्त्री डॉक्टर  तज्ञाकडून नियमित तपासणी केली जात असे. एक दिवस सुनेच्या  पोटात दुखू लागले. आम्ही सर्वजन  बेचैन  झालो. तिला रुग्णालयात घेऊन जाऊ लागलो.  रस्त्यातच त्या स्त्री डॉक्टर तज्ञाची  कन्सल्टिंग रूम  लागल्यामुळे,  मुलाने तातडी म्हणून ( Emergency ) तेथेच  तपासण्याकरिता नेण्याचा निर्णय घेतला. स्वागत कक्षात मुलगा  Receptionist  ला    भेटला. आम्ही बाहेरच्या खोलीत बसलो. Reseptionist एक वेगळ्याच विचाराची स्त्री असल्याचे जाणवले.  आमची पूर्व भेट वेळ  (Appointment)    घेतलेली नव्हती. शियाय त्यांच्या  पद्धती नुसार जर काही  यातना होत असतील तर  प्रत्येकाने रुग्णालयाच्या  Emergency विभागात  रुग्णाला घेऊन जाणे, जेथे तेथील डॉक्टर  ती केस  प्रथम   बघतील, जर गरज  पडली  तरच तज्ञाला कळवतील. Consulting  रूममध्ये असल्या केसेस  तपासत  नाहीत. आम्ही फार बेचैन झालो. ती आमचा व त्या तज्ञ डॉक्टरांची  भेट देण्यास विरोध करीत होती. नियमाच्या चाकोरी मधून तिचे वागणे खरे असले  तरी परिस्थिती, आपत्कालची  वेळ, आणि माणुसकी याचा विचार ह्याला  अनुसरून ते अयोग्य होते. आमच्या आग्रही विचाराना मर्यादा होत्या. शेवटी आम्ही रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. 
आम्ही जात असताना एक विचार माझ्या मनांत आला. मी एकटाच त्या Receptionist कडे गेलो. ”  We are  going  to  the Hospital. Will you Please  give this my I – card to Doctor  Madam. असे म्हणत, मी  माझ्या जवळचे ओळख कार्ड तिला दिले. मी एक  डॉक्टर बालरोग तज्ञ असून  त्यावर भारता मधला पत्ता होता. तिने ते कार्ड वाचताच तिच्या  मानसिक  विचारात बदल झालेला जाणवला. ” Please wait for a while  ”  म्हणत ती ते कार्ड घेऊन डॉक्टरबाई कडे गेली. एकदमच वातावरण बदलले दिसले. कार्ड वाचून मी देखील एक तिचाच व्यवसायीबंधू असल्याचे डॉक्टराना कळले.
डॉक्टर स्वत: बाहेर आली, माझ्याशी हस्तोंदल केले. माझा परीचय करून   घेतला. स्वत: चा परिचय संक्षिप्त दिला. स्वागतमय वातावरण निर्माण झाले. आता डॉक्टरबाईनीच  लक्ष घातल्यामुळे सर्व व्यवस्थित झाले. सुनेला तपासून औषधी  लिहून दिली गेली.                               
 हयालाच म्हणतात मेडिकल एयेथिक्स  ( Medical Ethics ). अर्थात् वैद्यकिय क्षेत्रातील लोकांची आपापसात वागण्याची पद्धत. (Moral principles or practices in medical fields ) वैद्यकीय शास्त्र अथंग पसरलेले आहे. त्याच्या अनेक शाखा, उपशाखा, ह्या वाढतच आहे. शिवाय हे बद्लत  जाणारे  वा दर दिवशी ज्यात नाविन्याचा शिरकाव होत होता.  त्यामूळे त्या क्षेत्रातिल सततचा सम्पर्क, वैचारिक देवान घेवान अत्यन्त महत्वाची ठरते. ह्याच तत्वावर वैद्यकीय व्यासाय मधल्या व्यक्ती भेटताच, एकमेका विषयी आदराची भावना उत्पन्न होते. मग हे भारतात असो  व इतर देशात असो. मेडिकल एथिक्स  म्हणतात ते ह्यालाच.                          
          

एकत्र सर्पालय व बेडूकालय !

दक्षिण आफ्रिकेत एक प्राणी संग्रहालय बघण्यात आले. निरनिराळ्या प्राण्यांची वेगवेगळी दालने बघितली. एकप्रचंड असे सर्पाचे दालन होते.  अति विशाल हौद, तळामध्ये दोन भाग केलेले. पाणी व जमिनिसाठ्यी. लहान मोठी झाडे,  दगडाच्या शीला, काही ठिकाणी कृत्रिम वारुळे, आणि निरनिराळे खांब रोवले होते. अनेक जातीचे सर्प, पाणी व जमिनीवर मुक्त हालचाली करताना दिसत होते. अश्च्यर्याची गोष्ट म्हणजे
 त्या पाण्यात खूप मासे सोडलेले होते, तसेच बऱ्याच संखेने बेडूक देखील होते. दोन्हीही सापांचे खाद्य. परंतु त्यांचीही प्रजनन क्रिया देखील वाढत राहावी,  ह्याचेपण वातावरण आयोजकांनी व प्रशासनांनी निर्माण केलेले होते. गंमत वाटलीकी साप व त्याचे खाद्य बेडूक व मासे एकाच वातावरणात जीवन  कंठीत होते. ज्याप्रमाणे आम्ही जंगलात वाघ सिंह आणि त्याच वेळी  हरीण झेब्रे ह्यांचेही कळप हे ही बघितले. जीवन मरणाचा आनंद व संघर्ष यांची कला निसर्ग  शिकवतच असतो. वेटोळे घालून शांत पडलेले वा  हालचाली करणारे अनेक सर्प, दिसत होते. आश्च्यर्याची गोष्ट म्हणजे कित्येक बेडूक हे तेथील सापावरही  आरूढ होऊन बसलेले  दिसले.आम्हाला मार्ग दर्शकांनी सांगितले कि सापाचे पोट रिकामे असेल, तो उपाशी असेल तरच स्वत:चे भक्ष्य म्हणून बेडकाला व माशाला खातो.  एरवी कधी नाही. शिकाऱ्याच्या भूमिकेत साप वेगळाच व चपळ बनतो, त्याचा हालचाली वेधक बनतात. भक्ष्याना त्याची  जाण येते. तेही आपला जीव  वाचवण्यासाठी धावपळ करतात. इतर वेळी तेही बेफिकीर असतात. पोट भरलेला साप हा अनेक दिवस भक्षविना राहू शकतो. ही एक चांगली रचना. जेंव्हा भूक तेंव्हाच भक्ष्य व त्यावर लक्ष.     हा प्राण्यामधला निसर्गाचा गुणधर्म असतो. मानव प्राणी हाच जेवण झाल्या बरोबर पुढच्या जेवणाची काळजी करतो, तश्या तरतुदी देखील करीत असतो. साठा करणे हा फक्त मानवाचाच गुणधर्म. ह्याचमुळे शिकारी प्राणी व त्याचे भक्ष्य  प्राणी बराच काळ पर्यंत  एकत्र राहतात. एकमेकांना हानी पोहचवत  नसतात. हा निसर्गच गुणधर्म भक्ष्य होऊ घातलेल्या प्राण्यासाठी दिलासा देणारा निश्चितच असेल. 
शिकारी अथवा शिकार दोन्हीही भूमिका त्यांच्या जीवन चक्रात सतत होत राहतात. ह्यालाच म्हणतात  
     जीवो – जीवनस्य – जीवनाम.  
    
 
 
 
 
 
 

निसर्ग व्याप्ती

उंच चढूनी हिमालयी,      झेंडा तो रोविला 
गीरीराजाचे शिरावरी,      विजय संपादिला 
 
उंचाऊनी  बघे मानव,      अथांग जगताला 
विज्ञानाच्या जोरावरती,   अंतराळात गेला  
 
युगा युगाचा चंद्रमा,       केला अंकित त्याने 
त्याच्या देही ठेवी पाऊल,   मोठ्या अभिमानाने 
 
अगणित दिसती गृहगोल,      त्याचा दृष्टीला 
सीमा न उरली आता मग,      चौकस बुद्धीला 
 
चकित होतो प्रथम दर्शनी,      विज्ञाना बघता  
दिसून येती अनेक गुढे,    एक एक उकलता
 
किती घेशी झेप मानवा,       उंच उंच गगनी 
वाढत जातील क्षितिजे,     तितक्याच पटींनी 
 
( कविता ) 

भिकाऱ्याची अनमोल मदत !

 
संध्याकाळी फिरण्यास निघालो. बागेच्या दारापाशी एक ग्रंथ विक्रेत्याचे वाहन उभे होते. विशेष पुस्तकांची विक्री चालू होती. माझी नजर एका दुर्मिळ ग्रंथावर पडली. गेली कित्येक दिवस ते पुस्तक मी मिळविण्याचा प्रयत्न करीत होतो. प्रकाशक, ग्रंथ भांडार, यांच्याकडून कळले होते कि त्याची नवीन आवृती येण्यास अवधी लागेल. मी ते विकत घेण्यासाठी पाकीट काढले. चार रुपये कमी पडत होते. हतबल झालो. पुस्तक विक्रेता नोकर माणूस होता. गाडी दूर गावची असून, लगेच जाणार होती. जवळपास कुणी परिचित दिसेना. सारे मार्ग खुंटले. मी निराश झालो. विवंचनेत पडलो. त्याच वेळी एक भिकारी, हात पुढे करून  मला भिक मागू लागला. ते सहन झाले नाही. मी हात करून त्याला  जाण्याची  खून केली. तो नमस्कार करून जाऊ लागला.  अचानक  मला त्याच्या हातात काही  नाणी दिसली.  एक विचार मनात चमकला. मी त्याला बोलावले.
” आहो तुमच्याकडे किती रुपये आहेत?”  मी विचारले.
 ” फक्त सहा रुपये साहेब. माझे ह्यात पोट कसे भरणार? ” तो म्हणाला.  
” चल मी तुला जेवण देतो. प्रथम माझे एक काम कर ” मी म्हणालो.
त्याच्या चेहऱ्यावर  आनंद दिसला.   
अर्थात् त्याच्या मदतीने,  माझे काम झाले. माझ्या करीता ते दुर्मिळ  पुस्तक मला मीळाले.  मी त्याला घरी घेउन आलो. मी त्याला जेऊ घेताले.   
एका अनामिक, परन्तु   वेळेवर मदत ( Timely help )  करणाऱ्या  त्या व्यक्तीला, मी  कधीही विसरणे शक्य नाही. 
परीस्थीतिचे  वलय फक्त वेळे भोवती फिरत असते. क्षणाचे महत्व  म्हणतात  ते ह्यासाठीच. जीवनाच्या एखाद्या प्रसंगी वेळ  ही तिचे महत्व  अतिशय कौशल्याने आपल्या मनावर बिमबवते. हा क्षण चुकला, हा क्षण मिळाला असता तर असे झाले असते. हा वाक्प्रचार  त्याच मुळे झालेला वाटतो. केंव्हा केंव्हा तर तुमच्या संपूर्ण  आयुष्याचे मोल ठरविण्याचे कार्य तो एक क्षणच करतो. भिकाऱ्या कडून योग्य वेळी मिळालेल्या मदतीमुळे,  ह्यातील खरे तत्वज्ञान  मला पूर्णपणे जाणवले.

दिवाळीचा फराळ फटाके आणि दिवे.

 ” जीवनाच्या रगाड्यातून ” ह्या मराठी ब्लॉग तर्फे
 सर्व वाचक लेखक आणि संबंधिताना  ही दिवाळी व आगामी वर्ष आनंद सुख समाधानात  जावो ही नम्र प्रार्थना.
 माझा ब्लॉग ” जीवनाच्या रगाड्यातून” सुरु करून थोडेच दिवस झाले. दैनंदिन जीवनातील टिपलेले साधे परंतु मार्मिक प्रसंग आणि कविता ह्यांचा आधार घेत माझे लिखाण असते. जवळ जवळ ५०० वाचकांनी त्याचा  आनंद घेतल्याचे दिसते. वाचक वर्ग हीच लेखकाची खरी शक्ती असते. सर्वाना त्याबद्दल धन्यवाद देतो.
                                   आधुनिक संगणक तंत्रज्ञानाने  ब्लॉग   हे दालन उघडले. जो जे लिहू इच्छितो विचार व्यक्त करू इच्छितो त्यांच्यासाठी हे एक व्यासपीठ मिळालेले आहे. व्यासपीठ ही कलाकाराची, लेखकाची प्राथमिक  गरज असते. पूर्वी प्रमाणे निर्माता संपादक प्रकाशक इत्यादींच्या छाननी मधून त्याला बाहेर पडण्याची आता गरज नाही. सर्व स्वत:च्या  जबाबदारीवरच करा.  ब्लॉग ह्या माध्यमाने वेगळीच क्रांती केलेली आहे. लेखक आणि वाचक ह्यांचा त्वरित आणि प्रत्यक्ष संबंध होऊ शकतो. तुमचे विचार, लेखन वाचक स्वीकारतात  किंव्हा  अव्हेरतात हे तुम्हाला लगेच कळून येते. येथे ना मध्यस्थी, ना प्रकाशक, ना संपादक, ना काह्नी आर्थिक बोजा. येथे हवे असते तुमचे विचार, आवड, श्रम, आणि लेखन. ह्यात वेळेचा सदउपयोग कल्याचे तुम्हास  मिळेल  समाधान.  गाणाऱ्या कलाकाराला  जसे दूरदर्शनवर   सा रे ग म प द . .  अथवा Indion Idiol मूळे व्यासपीठ मिळाले तसेच Blog  हे लेखकासाठी आहे.             
                                           जीवन ही एक निसर्गाच देण आहे. ते चक्रमय असते. प्रत्येक क्षण वा दिवस हा वेगळच  प्रसंग घेऊन येत असतो. घटनेचा गुंता करणे आणि त्याची कल्पनात्मक उकालन करणे, निसर्ग करीत असतो. बस हेच प्रसंग,  ह्याच कथा असतात. तुम्ही सतर्क असाल तर बरेच  विषय तुम्हास लेखनासाठी मिळू शकतात. 
बोल सारे अनुभवाचे         त्या बोलीची भाषाच न्यारी i
सुख दुःखाच्या गुंत्यामधला    अर्थ सांगतो कुणी तरी  II
अथवा
अनुभवाचे ज्ञान श्रेष्ठ हे        निसर्ग शिकवी क्षणोक्षणी  I
सतर्कतेने वेचून घ्यावे          दैनंदिनीच्या घटनामधुनी  II
                           ” जीवनाच्या रगाड्यातून ”  मराठी ब्लॉग  हाच धागा तुम्हास दिवाळीची भेट देऊ इच्छितो 
सतर्कतेने जीवनातील मार्मिक प्रसंग टीपा तो तुमचा असेल फराळ. लिहाणे गाणे आणि नाचणे हेच असतील फटाके.
तुमची लेखन क्षमता वा शैली  असेल दिव्याचा प्रकाश . .  . .   
धन्यवाद. पुन्हा दिवाळीच्या शुभेच्छा     

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
  
 
      
 
 
 
 
 
 
 

 

वेडा अहंकार !

एक पुरातन मंदिर दिसले माझ्या दृष्टीला
शिवलिंग ते सुंदर असुनी नन्दी दारी बैसला
 
जुनी वास्तू, पडझड दिसली अवती  भवती 
झाडे जुडपे वाढून तेथे जागा ते अडविती
 
किडे मुंग्या झुरूळ नि कोळी यांची वस्ती तेथे 
रान फुले ती उग्र वास तो दरवळीत  होते.
 
विषण्य  झाले मन बघुनी अस्वच्छ परिसर
राहील कसा ह्या वातावरणी मग तो ईश्वर 
 
पूजा नव्हती पाठ नव्हता भजन नव्हते तेथे     
पवित्र विधींचा अभाव असुनी दुर्लक्ष ते होते
 
संकल्प केला त्याचक्षणी मी आपल्या मनाशी
परिसर तो निर्मळ करुनी पवित्रता येई कशी
 
घरी जाऊनी साधने आणली स्वच्छ करण्या मंदिर 
आखू लागलो मनी योजना शांत करुनी विचार 
 
सांज असुनी संधी प्रकश तो पडला चोहीकडे
कोकिळेचा मधुर आवाज तो कानी माझ्या पडे
 
फुलपाखरे गंध शोषित फुलावरी नाचती 
मध्येच जाऊन शिवलिंगावरी मध शिंपडती  
 
चिमणी आली नाचत तेथे चोंचीत घेउनी दाना    
शिवापुढे तो टाकला तिने उंचाउनी मना 
 
गुंजन करीत मकरंद आला लिंगाभवती फिरे 
आरती कुणाची गात होता उमज ना येई बरे  
 
वाऱ्याची ती झुळक येउनी फुले तयाने उधळली
अलगद येउनी मंदिरी शिवावरती पडली
 
चढाओढ ती दिसली मजला प्रभूच्या सेवेची 
लाज वाटली मनास माझ्या वेड्या अहंकाराची         
 
(  कविता )