Monthly Archives: नोव्हेंबर 2018

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे विद्यार्थाला प्रशस्तीपत्र

जीवनाच्या रगाड्यातून

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा
यांचे विद्यार्थाला प्रशस्तीपत्र

“ आहो आश्चर्यम ! Wonderful ! Unimaginable !! चमत्कार !.” असलेच आश्चर्य चकीत करणारे उदगार केंव्हा मुखातून बाहेर पडतात, जेव्हां एखादी अघटीत घटना घडते. आपलाच आपल्यावर विश्वास बसत नाही. त्यावेळी घडणाऱ्या घटनांची थोडीशीसुद्धा, पुसटशी देखील कल्पना आपण केलेली नसते. यावेळीही असेच कांहीसे घडले आणि मन आनंदा बरोबर आश्चर्यचकीत झाले. याचे श्रेय मी ती घटना ज्याच्याबद्दल घडली, त्या व्यक्तीला देण्यापेक्षा जेथे घडली, त्या राजकीय व्यवस्थेलाच देतो.
माझा मुलगा अमेरीकेत असतो. सध्या तेथेच स्थायिक झाला आहे. १५ वर्षे झालीत. त्याला नियमांनुसार अमेरिकन नागरिकत्व देखील मिळाले. त्याचा थोरला मुलगा १४ वर्षाचा असून तो तेथेच शालेय शिक्षण घेत आहे. तो तेथील ९ वीच्या वर्गांत शिकतो. शाळा मिनियापोलीस (Plymuth) या शहरी आहे. हे शहर उत्तरेकडील मिन्नेसोटा ह्या प्रांतात आहे. शाळा प्रांतीय व देशाच्या म्हणजे USA च्या नियमानुसार चालतात. शाळेतील सर्व कार्यक्रमावर अर्थात् शासनाचे लक्ष व नियंत्रण असते.
एका राष्ट्रीय कार्यक्रमांतील चर्चासत्रांत माझ्या नातवाने, ज्याचे नांव आहे “आकाश नागापूरकर “ याने भाग घेतला होता. हा कार्यक्रम ठराविक वयोगटातला होता. त्या कार्यक्रमांत आकाशला प्रथम क्रमांक मिळाला. त्याचे सादरीकरण उत्तम झाले. शाळेने त्याचे कौतूक केले. त्याबद्दल योग्य ते पत्र व बक्षीस दिले. आम्हा नाते संबंधीना त्याबद्दल आनंद वाटला व समाधानही झाले. हे सारे नैसर्गिक होते.
दोन महीन्याचा काळ गेला, आणि अचानक ती आश्चर्यचकीत करणारी घटना नजरे समोर आली. शाळेच्या व्यवस्थापनाने आकाशला बोलावून एक लखोटा त्याच्या हाती दिला. लखोट्यावर आकाशचे नांव , C/O त्या शाळेच्या व्यवस्थापनाचे नांव ठळक लिहीलेले होते. आणि पाठविणारा कोण ? ते युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचे ( USA ) राष्ट्राध्यक्ष अर्थात् बराक ओबामा साहेब. त्यांच्या सहीनिशी हे पत्र Presidents Education Awards Programs White House, Washington येथून ३० जानेवारी २०१५ रोजी पाठविले गेले. त्याच पत्रावर दस्तूरखुद्द राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांची सही होती.
हे सारे त्याला राष्ट्रीय शैक्षणीक कार्यक्रमा अंतर्गत होते. येथे एक विचार सतत मनांत येत राहतो की “ घटना आणि दखल “ ह्याचे समीकरण बघीतले की आश्चर्य वाटू लागते. देशाच्या एका शहरातील शाळेचा एक विद्यार्थी, एका राष्ट्रीय कार्यक्रमांत भाग घेऊन बक्षीसपात्र होतो, आणि त्याची दखल थेट देशाचा राष्ट्रपती वैय्यक्तीक पातळीवर घेतो ह्याची ! साऱ्या व्यवस्थापनेचे याचमुळे कौतूक वाटते. राष्ट्रपतीनी इतक्या बारीक सारीक बाबींमध्ये लक्ष घालावे, येथेच त्यांची योग्यता वाखाणण्यासारखी वाटते. त्याच बरोबर व्यवस्थापन ह्या उत्तेजन देणाऱ्या घटनांमध्ये किती जागृतता आहे हे देखील दिसते. तरुणपिढी, युवावर्ग यांना हे सारे प्रेरणादायी असणारच ह्यांत शंकाच नाही.

सुचना- सोबत बराक ओबामांचे दिलेले त्यांच्या सहीनिशीचे प्रशस्ती पत्र व संदेशपत्र
जोडत आहे. कृपया बघणे.

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

आकाश रवि नागापूरकर
वय १४ वर्षे, प्रथम पारितोषक विजेता
मिनीया पोलीस अमेरिका ( USA )

अमेरिका अध्यक्ष श्री. बराक ओबामा यांची सही असलेले प्रशस्ती पत्र व संदेश वजा पत्र

अमेरिका अध्यक्ष श्री. बराक ओबामा यांची सही असलेले प्रशस्ती पत्र व संदेश वजा पत्र

अफलातून योजना-

जीवनाच्या रगाड्यातून

अफलातून योजना-
रस्त्याच्या वळणावर भाजी विक्रेत्याची गाडी बघीतली. बरीच गर्दी होती. एक वयस्कर ग्रहस्थ भाजी गिऱ्हाकाना देत होते. त्या ग्रहस्थाना बघताच आश्चर्याचा धक्का बसला. कल्पना करु शकत नव्हतो, विश्वास वाटेना. अतिशय परिचीत व्यक्ती होती. लगेच बाजूस झालो. त्या व्यक्तीला न्याहाळू लागलो. ते डॉ. विकास जोशी होते. २०-२२ वर्षापूर्वी निवृत्त झाले होते. शासकिय रुग्णालयाचे प्रमुख होते. कुशल सर्जन, व्यवस्थापक, व अत्यंत प्रेमळ सुस्वभावी व्यक्ती. कोणता प्रसंग आला असावा की ज्याने जीवनाच्या शेवटच्या टप्यावर भाजी विक्रेत्याचे काम करावे लागत आहे. त्यांच्या बद्दल नितांत आनंद, प्रेम भावना असल्यामुळे माझी निराशा, बेचैनी, मला अधिकच अस्वस्थ करु लागली. त्याना नमस्कार केला. त्यानाही खुप आनंद झाल्याचे दिसले. बरांच वेळ मोकळेपणाने गप्पा केल्या. त्यानी सद्य परिस्थीती बद्दल जे सांगितले, त्याची मी कल्पना देखील करु शकत नव्हतो.
डॉ. विकास जोशी यांनी कथन केले ते असे होते.
“ भाजी विक्रेता सखाराम. त्याची पत्नी व मुलगी निलीमा. दररोज एखादी भाजी आणून देत असे. कधी तो, पत्नी वा मुलगी निलीमा. सखाराम गरीब होता. चांगला स्वभाव, कुटुंबीयांच प्रेमळ वागण, हे मनाला समाधान व आनंद देणारे होते. जीवनाकडे सकारात्मक बघण्याचा द्दष्टीकोन. जीवन जगण्याची धडपड ही कौतुकास्पद वाटत होती. त्याचा तिच्या लहानग्या निलीमामध्ये फार जीव होता. तीला विलक्षण व्यक्तिमत्वाची तयार करण्याचा मानस.
एक अफलातून योजना निर्माण झाली. प्रमुख विचार होता. सखारामच्या मुलीला निलीमाला मदत करणे. तिचे व्यक्तीमत्व बनण्यास हातभार लावणे.
सेवेमधून निवृत्त होऊन २२ वर्षे झाली. निवृत्तीवेतन भरपूर व नियमीत मिळत होते. संसाराची सारी अपेक्षित कर्तव्ये पार पडली होती. सर्व मुले आपल्यापरी स्थिरावली होती. आता मजसाठी फक्त एकच काम होते. प्रकृतीची शारिरीक व मानसिक काळजी घेत उर्वरीत आयुष्य समाधान व आनंदाने पूर्ण करणे. ८० वर्षे व्यवसथीत जगलो. आता सध्यस्थितीत असे रहावे की ज्यात समाधान व आनंद लाभेल. तेच शांतता निर्माण करेल.
सखाराम बरोबर मी एक योजना सादर केली. सुरवातीचे अर्थाजन माझे . चार चाकी ढकल गाडी, भाज्या विकण्यासाठी अद्यावत इलेक्ट्रॉनिक वजन काटा, त्यांत भाज्यांचे वजन व त्याची दर्शविलेली किमंत लगेच कळत असे. सखारामच्या नांवे महानगरपालिकेमध्ये रजीस्ट्रेशन, व्यवसाय करण्याची परवानगी देखील घेतली गेली.
त्याला फक्त दोनच सुचना केल्या १- ) या पुढील सर्व खरेदी-विक्री व नफा हे सारे तो स्वतंत्रपणे करण्यास मोकळा आहे. त्यामध्ये कुणाचाही हस्तक्षेप असणार नाही.
२- ) जो नफा मिळेल, त्याचा दहा टक्के नियमीत मला द्यावा.
मी दररोज सकाळी तीन – चार तास त्याच्या भाजीच्या ( व्यवसायाच्या) गाडीजवळ बसू लागलो. व धंद्यात सक्रीय भाग घेऊ लागलो. सखारामला भरपूर वेळ मिळू लागला. मोठ्या घाऊक बाजारांत जाणे, भाज्या आणने, स्वच्छ करणे, व्यवस्थित जोडणे, अशीच अनेक धंद्यासाठींच्या कामांत तो लक्ष देऊ शकला. मला देखील बराच शारिरीक व्यायाम, हालचाल व बौद्धीक समाधान लाभत गेले. मिळणारे सारे पैसे एका पेटीत टाकून ते त्याच्याच हवाली केले जाई. त्याला मिळालेल्या पैशाची केंव्हाच चर्चा केली नाही. मी फक्त व्यवसाय करण्यामधला आनंद व समाधान घेत होतो. हीच मला जीवन शांतता देत होती. तेच तर माझे ध्येय होते.
डॉ. जोशीनी आपल्या बँगेमधून पोष्टाचे एक पुस्तक काढून दाखविले. सखाराम कडून नियमीत मिळणरी सारी रक्कम ह्या पासबुकांत जमा करतो. हे पुस्तक सखारामची मुलगी निलीमा हीच्या नांवे आहे. योग्य वेळी हे सारे पैसे तिलाच मिळण्याची व्यवस्था केलेली आहे. या पोष्टाच्या पास बुकाची माहिती कुणालाही नाही. सखारामला देखील.
कोणतेही घेतलेल्या कार्य. ” एखाद्या नाण्याप्रमाणेच ” असते. नाण्याच्या दोन बाजू ज्यांत
१ तुमचे प्रयत्न श्रम धडपड, तसेच काळजी, शंका, तगमग, यश-अपयशाची चिंता इत्यादी पैलूंचा गुंता, सतत सुख दुःखाच्या लाटा निर्माण करतात . याला जीवन ऐसे नांव. ज्याचा सखाराम कुटूंबीय अनुभव घेत होते.
२ – तेथे निखळ समाधान व शांतता वास करते. जे मी ( कल्पनेने )अनुभवण्याचा प्रयत्न करीत होतो.
कार्य योजताना तीन बाबींचा विचार केला. ध्येय, परिस्थीती,आणि योजना. योजना मी घेतली. परिस्थीती व ध्येय दोन्हीची जबाबदारी सखारामच्या अर्थात त्या भाजी विक्रेत्याच्या कुटूंबावर सोडून दिली. योजनेचे फक्त समाधान मी अनुभवत असे. परिस्थीती व ध्येयाचे सुख दुःख हे दोन्ही सखाराम कुटुंबीय अनुभवत होते.

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com