Monthly Archives: डिसेंबर 2016

जेष्ठत्व हे श्रेष्ठत्व कसे ?

जेष्ठत्व हे श्रेष्ठत्व कसे ?

ज्येष्ठ नागरिकाना श्रेष्ठ समजले जाते.
व्यवहारी जगांत बालपण, तारुण्य, प्रौढत्व आणि वृद्धापकाळ ह्या जीवन चक्रामधल्या विवीध अवस्था. त्यांमध्ये मान्यता पावलेला शेवटचा काळ, ज्याला ज्येष्ठ नागरिक संबोधीले गेले. केवढा मोठा सन्मान हा त्या वयाचा. ज्येष्ठ नागरिक एक महान आणि सर्वांत सन्मानाची उपाधी बनलेली आहे.
ज्येष्ठ नागरिक हे वयानी श्रेष्ठ असतात. प्रचंड अनुभव हे आपल्या पाठीशी बाळगुन समाजात वावरतात. कुटूंब वत्सल असतात. जीवन व व्यवहार ह्या दोन प्रमुख मार्गावर अनेक पदे सांभाळलेली. प्रशासकीय, सामाजिक, आर्थिक, राजकीय, अशा अनेक क्षेत्राचे अद्यावत ज्ञान मिळालेली असतात. त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा योग्य फायदा समाजाच्या विकासांत व्हावा वा त्यांच्याकडून करुन घ्यावा ही अपेक्षा.
ज्येष्ठाना अनेक सवलती शासनाकडून दिल्या गेल्या आहेत. आणि मिळतही आहेत.
एक गम्मत बघा. बस वा रेल्वेने प्रवास करा. इतरापेक्षा खर्च कमी.
यात्रीने भरलेल्या बस वा रेल्वेत अचानक शिरा. लोक तुमचा आदर करतात. लोक उठून आपली जागा तुमच्या साठी देऊ करतात. तुमचा चेहरा बघताच ती तुम्हाला मिळते. तो चेहरा असहाय्य वा मागणी करणारा नसतो. तर त्यावर किंचीत हस्याची छटा असते. एक आशिर्वाद देण्याची भावना असते. थोडेसे प्रेम व्यक्त होत असते. तुमच्या चेहऱ्यावर ज्येष्ठत्वाची झलक मात्र असते. ही व्यक्ती ज्येष्ठ नागरिक असल्याचा शिक्का त्या गर्दीत देखील तुमच्या विषयी आदर निर्माण करतो. शेजारचा विनम्र होऊन प्रेमाने हात धरीत आपले आसन मोकळे करीत तुम्हाला त्या जागेवर बसवितो. हां ! कदाचित् तुमची दुखणारी कंबर, मान, वा गुढगे, तुमचा वाकडा तिकडा करणारा शरिराचा आकार त्याच्या नजरेत आलाही असेल. पण ते कांहीही असो, तुम्हाला सन्मान पूर्वक न प्रयत्न करता, जागा मात्र निश्चीत मिळते.
आहो तुम्ही बँकेत जा. इतरापेक्षा तुम्हाला जास्त व्याजदर मिळतो. तेथे तर तुमच्याकडे न बघता, फक्त समोरचा कागद बघत, तुमच्या वयाची कदर केली जाते.
केवढे महत्व आहे तुमच्या ज्येष्ठत्वाचे.
अनेक उपाधी (Degrees) असतात. त्या प्रत्येकजण आपल्या जीवनांत मिळवतो. परंतु त्या सहज मिळत नसतात. त्यासाठी अभ्यास, परिश्रम, व मनाचा निश्चय लागतो. मग ते ज्ञान कोणत्याही मार्गाचे असो. B.A., B.SC., B.Ed . L.L.B., M.B.B.S. C.A., B.E., B.Tech. इत्यादी. त्याच प्रमाणे निरनीराळे व्यवसाय ( Jobs) वा नोकऱ्य़ा जसे शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, अकॉन्टटंट, इत्यादी ह्या सर्व त्यांच्या कर्तृत्वानुसार त्यांच्या उपाधी बनतात. त्यासाठी प्रत्येकाने त्या त्या प्रमाणात परिश्रम घेतलेले असतात. अभ्यास असतो, धडपड असते. कुणीतरी बाजारांत जाऊन त्या खरेदी केलेल्या नसतात. प्रत्येक उपाधी मागे दडलेली असते, त्याची त्या त्या प्रकारची तपश्चर्या आणि यश.

ज्येष्ठ नागरिक बनण्यासाठी मात्र विना श्रम, कांहीही कष्ट न घेता, कोणताही अभ्यास न करता, कोणत्याही परिक्षेला सामोरे न जाता मिळते ही उपाधी, ही डीग्री. आणि तीही अतिशय प्रतीष्ठेची.
कशासाठी ज्येष्ठाना श्रेष्ठ समजले जाते?
प्रत्येकाच्या पाठीवर एक गाठोडे असते. ते अनुभवाने भरलेले असते व भरत जाते. हे गाठोडे जमा केले असते, जीवन दावावर लाऊन. आयुष्य खर्च करुन. निसर्गाने दिलेली पुंजी गमाऊन. Every thing at the cost of life. हे अनुभव जमा केलेले असतात. ते सहज मिळालेले नाहीत.
इतर प्रांत बदलले जातात. C.A. व्हायचे होत, डॉक्टर झालो. प्राध्यापक व्हायचे होते, वकील झालो. फुट बॉल प्लेयर व्हायचे होते, नट झालो. इत्यादी. जसे श्रम, प्रयत्न, परिस्थीती येत गेली, व्यक्ती बदलत गेल्या.मार्ग व ध्येय बदलत गेले. त्यांच्या उपाध्या बदलत गेल्या.
ज्येष्ठत्व मात्र कोणत्याही मार्गाने गेलांत तरी शेवटी ते मिळत गेले. ते सर्वासाठी एकच असते. सर्व उपाध्या मानव निर्मीत असतात. परंतु ज्येष्ठत्व जे प्राप्त होते, ते नैसर्गिक चक्राला अनुसरुन. आणि म्हणुन त्याचे अनन्यसाधारण महत्व असते.

जीवन मृत्युचा सतत लपंडाव चालू असतो. जीवनाच्या प्रत्येक क्षणा भोवती मृत्यु दबा धरुन बसलेला असतो. ह्याला काळ व वेळ यांचा खेळ म्हणतात. दोघे एकत्र येताच, मृत्यु जीवनावर झडप घालतो. ते जीवन त्वरीत नष्ट होते. ह्याचसाठी आम्ही जीवनाला अनिश्चीत समजतो. आम्ही केंव्हाही, कोणत्याही क्षणी मरणार ह्याचे आम्हास इतरांचे मृत्यु बघून ज्ञान होते. परंतु मृत्युची जाणीव कुणासही केंव्हाही येत नसते. हा निसर्गाचा आशिर्वाद असतो. निसर्ग तुम्हास सदैव जागृत राहण्याचा संदेश देत असतो. आम्ही आमच्या मनाच्या sub-conscious अर्थात जाणीवेच्या स्थरावर नेहमी सतर्क असतोच. ज्याचे ह्यांत थोडेशे दुर्लक्ष होते, मृत्यु त्यावर त्याच क्षणी घाला घालतो.

तुम्ही बघितले असेल. पक्षी- चिमणी वा कबुतर अंगणांत पडलेले दाणे, एकदम जाऊन टीपत नसतात. प्रथम ते सर्वत्र नजर टाकून मृत्यु कोठे लपलेला आहे कां? ह्याचा मागोवा घेतात. स्वसंरक्षणाची खात्री होताच ते दाणे टिपतात. प्रत्येक प्राण्याच्या जगण्याच्या हलचालीमधून त्याची सतर्कता सतत प्रतीत होत असते. हे त्याच्या सहज अंगवळणी पडलेले असते. एखादी चुक वा दुर्लक्ष त्याचे जीवन चक्र थांबऊ शकते.

माणसाचेही असेच दिसून येते. दैनदीन जीवनांत येत जाणाऱ्या असंख्य संकटा विषयी तो सतर्क असतो. ती संकटे नैसर्गिक असो वा मानव निर्मीत. जीवाचा बचाव करणे, निसर्गाने जे दिले ते योग्य तऱ्हेने सांभाळणे हे सर्वात त्याचे प्रथम कर्तव्य समजले जाते. आणि प्रत्येकजण स्वतःची त्याप्रमाणे काळजीही घेत असतो. क्षणा क्षणाला मृत्युशी त्याचा संघर्ष होत असतो.
इतका कठीण आयुष्याचा मार्ग तो चालत असतो. आणि एक एक पाऊल टाकीत जेंव्हा आयुष्याची सर्व साधारण मर्यादा जी निसर्गाने अंदाजे १०० वर्षे त्याच्या वाटेला दिलेली असतात, तो ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.

अशा भयावह व क्षणा क्षणाला संकटग्रस्त वाटणाऱ्या जीवनाची ५० वर्षे तो जेव्हां पूर्ण करतो, त्याची अर्धी जीवनपाऊल वाट झालेली असते. जवळ जवळ निसर्ग अपेक्षीत कर्तव्ये संपत आलेली असतात. प्रौढत्वाचा टप्पा ओलांडून तो वृद्धत्वाकडे झुकू लागतो. त्याच्या ह्या धडाडीपूर्ण व यशस्वी टप्यालाच ज्येष्ठत्वाची संकलपणा मानलेली असते. त्याचा ज्येष्ठत्वाचा काळ आरंभ झालेला असतो.
जीवनाचे इतर मार्ग जसे Money, Muscle, Spirit, Career. Character, Recommendations, इत्यादी यश मिळविण्यास मदत करु शकतात. परंतु ज्येष्ठत्वाच्या मार्गाला पर्याय नाही. तो एकमेव व निश्चीत आहे.
जे खचकले ते गेले. जीवनाच्या चाकोरीतून हटले. जे टिकले, खंबीरपणे झगडत राहीले, ते जीवन मार्ग चालत राहीले. आज त्याना ज्येष्ठाची उपाधी मिळाली. अनुभव घ्यावा लागत नाही. तो मिळतो. निसर्ग तुमच्या ओंझळीत टाकतो. तुमच्या पाठीवरचे गाठोडे वाढत जाते. ते जेवढे मोठे, तेवढाच सन्मान मोठा.

१०० वर्षे जे पुर्ण करतात त्याना शतायुषी ही उपाधी सन्मानाने दिली जाते. ज्या ज्येष्ठानी ९० ते ९५ वा १०० ह्या वयाचा टप्पा गाठलेला आहे, काय वेगळ त्यानी केल ? ते जीवनाशी संघर्ष करीत राहीले. प्रत्येक क्षण मृत्युच्या भोवऱ्यांत गुंतलेला असतना, जीवन क्षणभंगुर असताना. ते जागृतपणे जगले. व यशस्वी झाले. मृत्यु केंव्हा व कसा घाला घालील अनिश्चीत असते. प्रत्येक क्षणाबरोबर, वातावरणाबरोबर, तुमचा सतत संघर्ष चालू असतो.

एक प्रकारचा लढा. जे जगले ते केवळ त्यांत यश मिळत गेले म्हणून. निसर्ग नेहमी जीवन मृत्युची दोन्हीही दारे उघडी करुन तुम्हास मार्ग दाखवित असतो. तुमची सतर्कता तुम्हाला जगवित असते. जीवन पुढे पुढे जाण्यात मदत करीत असतो. आपले ज्येष्ठत्व हे लढा करुनच आपण मिळविले आहे. म्हणूनच हा ज्येष्ठत्वाचा सन्मान.

येथे एक महत्वाची बाब सर्वांसमोर आणू इच्छीतो. जीवनाची वाटचाल जरी खडतर दिसत असली तरी मानवाने आपल्या बुद्धी व ज्ञान याच्या साहाय्याने तीलाच पूर्णपणे बदलून टाकलेले आहे. ते जीवन आता आनंद देणारे, हवे हवेसे वाटणारे, सुलभ, आशादायी, करमणूक प्रधान बनलेले आहे. तरी मृत्युच्या चकरा जीवनाभोवती चालूच असतात

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

विश्वासातील शंका

विश्वासातील शंका

एक लहानशी घटना परंतु अध्यात्म जगांत एक महान तत्वज्ञान सांगून जाते.
श्री कृष्ण एकदा जेवण्यासाठी बसले होते. रुख्मिनी त्याना जेवन वाढीत होती. अचानक श्रीकृष्ण उठले व लगबगीने जावू लागले. ते घराच्या दारापर्यंत गेले. ते क्षणभर तेथेच थांबले. थोडावेळ थांबून परत आले. पुन्हा जेवण्याच्या पाटावर बसले. रुख्मिनीला हे सारे अघटीत वाटले. तीच्या लक्षांत श्रीकृष्णाच्या ह्या हालचालीचा अर्थ कळला नाही. तीने तसे विचारले.
श्रीकृष्ण हसून म्हणाले ” दुर अंतरावर मी बघीतले की माझा एक भक्त माझ्या नावाने भजन करीत होता. ‘ कृष्ण कृष्ण जय जय कृष्ण ‘ म्हणत रस्त्याने गात नाचत चालत होता. त्याच वागण, मोठ्यने हातवारे करीत गाणे म्हणने, हे कांही जवळून जाणाऱ्याना वेगळेच वाटले. ते त्याला वेडा समजून मारु लागले. तो खालती पडला तरी देखील माझे नांव न सोडता तसाच गात होता. त्याचा आर्तस्वर माझ्या कानी पडला. माझे लक्ष्य त्याच्याकडे वेधले गेले. मी त्याला सहाय्य करण्यासाठी जाऊ लागलो. दारापर्यंत आलो. अचानक मी बघीतले की त्या भक्ताला कुणीतरील दगड मारला. तो त्याच्या भाळी लागला. एकदम रक्तस्त्राव सुरु झाला. त्यानी त्याच्यावर झालेल्या हल्याचा प्रतिकार करण्यासाठी स्वतःच एक दगड उचलला. तो त्यानी त्या लोकावर फेकला. तो आपले रक्षण स्वतः करण्यास उद्युक्त होऊन करीत आहे. त्याच क्षणी त्याने माझे नांव व भजन सोडून दिले. माझे नांव सोडल्यामुळे त्याची माझ्यावरची अवलंबुनता निघून गेली. आता तेथे जाण्यांत अर्थ नाही. ”
जीवनांत देखील अनेकजण ईश्वर भक्ती करतात. त्यांच्यावर श्रद्धा ठेवतात.
मानवाची ईश्वरी संकल्पना दोन अंगाने दिसून येते.
१- ईश्वर सर्व शक्तीमान, सर्वव्यापी, व विश्व चालक ह्या प्रमुख भावनांतील भूमिकेमध्ये तो व्याप्त समजला जातो. ह्या उदात्त समजाला मन नेहमी अनुभवण्याचा प्रयत्न करीत असते. जे कळल ते जाणल पाहीजे ही भावना. त्याच्या भक्तीमार्गाचा, भजनाचा, नामस्मरणाचा स्रोत ह्याच मार्गाने व्यक्त होत असतो.
२ – तो कृपावंत, संकटविमोचन व सुखकर्ता समजला जातो.
त्याच वेळी त्याने हेही अनुभवल असत की ईश्वर खऱ्या अर्थाने व्यवहारी जीवनांत केंव्हाही कृपा करीत नसतो. संकटसमयी धावून कोणतीही मदत करीत नाही. तुमच्या मिळणाऱ्या सुखांत त्याचा प्रत्यक्ष सहभाग केंव्हाच नसतो. हे सारे सत्य असते.
ईश्वराची महानता वेगळी आणि त्याचा व्यक्तिच्या जीवनातील सहभाग समजणे हे सर्वस्वी भिन्न समज होत. निसर्गाचे निश्चित व ठरलेले नियम असतात. त्याचप्रमाणे जगरहाटी चालते. कांही मिळणे वा न मिळणे येथे मानवी इच्छेचा प्रश्न नसतो. ते सारे घडणाऱ्या परिस्थिती नुसारच होते. अनेक कथा वा प्रसंग मात्र आळवून सांगीतले जातात.
ईश्वर भक्ती फक्त मनोबल वाढवीत असते. संकटाची सोडवणूक ज्याची त्यालाच करावी लागते. हाच ह्या छोट्या कथेचा बोध नव्हे कां?

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

अधुनिक सन्यास आश्रमी जीवन

अधुनिक सन्यास आश्रमी जीवन

एक अतिशय सुंदर व भव्य शिखर असलेले देवीचे मंदीर होते. सुरवातीच्या कांही पायऱ्या व मग मंदीरांत प्रवेश. मी त्या गांवी कांही कामासाठी गेलो होतो. संध्याकाळची वेळ, देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो. सुरवातीला दोन ओटे होते. मी एका बाजूने बसून बुट काढू लागलो. माझी नजर कोपऱ्यांत बसलेल्या एका वृद्ध माणसावर गेली. ते भिंतीला टेकून बसले होते. पांढरे कपडे, धोतर व झब्बा होता. कानटोपी घातलेली होती. त्यामुळे त्यांचा चेहरा दिसत नव्हती. त्यांच्या हातात एक पुस्तक होते. ते वाचत होते. हाती माळ होती. पाण्याच्या कडीचा तांब्या, फुलपात्र, छोटी टोपली त्यांत कांही फळे, दोन-चार पुस्तकें.
मी जाण्याच्या बेतात असता, त्यांचेच लक्ष मजकडे गेले. त्यानी हात करुन मला बोलावले. त्यानी आपली कान टोपी बाजूस सारली. मला आश्चर्याचा जबरदस्त धक्का बसला. ते वसंतराव काळे होते. “ओळखलत मला? ”
” हो ओळखल की– – आपण वैद्यकीय संचालक —- —- —- मी क्षणभर थांबलो. आपण कांही चुक तर करीत नाही ना ? ह्याची मनांत कल्पना आली. त्याना बघून १५ वर्षापेक्षा जास्त काळ गेलेला होता. मी संभ्रमांत पडलो. पण लगेच त्यानीच माझी शंका दुर केली. ” होय तुम्ही मला ओळखलंत. जा प्रथम दर्शन करुन या. मग बोलूत. ”
मी ह्या प्रकाराने, त्यांच्या अशा स्थितीत व अशा ठिकाणी त्याना बघणे मनाला चटका देणारे वाटले. मी समोरच्या मंदीरातील गाभाऱ्यांत बघत होतो. श्री देवीची उज्वल प्रतिमा दुरुन दिसत होती. मी मंदीराच्या पायऱ्या चढू लागलो.
डोक्यांत विचारांचे काहूर चालू होते. खूप पूर्वीचा एक प्रसंग डोळ्यासमोर आला.
मी सर्व कुटुंबीयासह चार धाम व इतर धार्मिक स्थळ-दर्शनासाठी जाण्याचे योजीले होते. एक महीन्याच्या रजेची गरज होती. वैद्यकीय संचालक साहेब डॉ. वसंतराव काळे हेच होते. मी रजेसाठी विनंती केली. सर्व परिस्थिती व कौटूंबीक निकड व्यक्त केली. ते क्षणभर थांबले. विचार केला. ” आहो देवदर्शनाला जात आहांत. मग कसा रोकू ? मजसाठी देखील प्रसाद घेऊन या. ” किंचीत हसत ते म्हणाले. अतिशय सज्जन गृहस्थ. चांगले प्रशासक होते.
डॉ. काळ्यांना ह्या स्थितीत बघताना मला क्लेशदायक वाटू लागले. मी फार बेचैन झालो. कोणती परिस्थिती उद्भवली असेल? कोणता आघांत जीवनावर झाला असेल की ज्याने त्यांचे उत्तुंग व श्रेष्ठ जीवन एका क्षणांत बदलून टाकले. मी जगदंबेचे दर्शन घेतले. मंदीराबाहेर आलो.
मी डॉ. काळ्यांच्या जवळ जाऊन बसलो. त्यानी आनंद व्यक्त केला. मी आपूलकीने त्यांच्याविषयी चौकशी करु लागलो
“आपण कसे आहांत ? आपण काय करतां हल्ली ? ”
” मी ८५ वर्षे पूर्ण केली. काय करावे तुम्हाला वाटते ? ”
“आध्यात्म्याच्या पुस्तकातून कांही शोध बोध घेत आहांत कां? ”
“शोध घ्यावयाचा नसतो. शोध लागतो. ”
“कोणता शोध लागला ?”
” वर्णन करता येणार नाही. ”
२ काळेसाहेब सांगत होते. मी एक चित्त करुन ऐकत होतो.
” मी आजपर्यंत काय केल उमगल नाही. शरीर मनाला वाटत होत. करीत गेलो. चाकोरीत फिरत होतो. सर्व सोडून दिले. न करण्यातच समाधान मिळू लागले. कुठे बसतो, काय करतो, ह्या अस्तित्वाच्या कल्पनेपेक्षा, कुठेच नाही ही जाणीव परम श्रेष्ठ वाटते. आवाजापेक्षा शांततेत समाधान. करण्यापेक्षा न करण्यांत समाधान. ते आपली दिनचर्या सांगू लागले.
” मी मंदीर परिसरांत राहतो, जवळच एक विहीर आहे. ते पाण्याची गरज पूर्ण करते. मला निवृत्ती वेतन मिळते. दोन वेळा खानावळीतून जेवनाचा डबा येतो. त्यांत भाजी पोळी एक ग्लास दुध व एक फळ असते. मंदीर परीसर स्वच्छता आणि येथील बागेची निगा हे व्यायामाचे साधन. मुल, सुना, जावाई, नातवंड व इतर अधून मधून येऊन भेटून जातात. ”
थोड थांबून ते सांगू लागले. ” हे माझे आधुनिक सन्यासी जीवन समजा. जो मार्ग थोर ऋषीमुनी, श्रेष्ठ संत मंडळी, धर्मग्रंथ यांनी सुचविले, त्यावर जाण्याचा प्रयत्न करतो. ज्या क्षणापर्यंत माझाच अन्तरात्मा जो ईश्वर आहे, तो इतर कोणता मार्ग दाखवित नाही, तो पर्यंत प्रस्तूत वाट चालणे हे मी योग्य समजतो.
काळ्यांची दैनंदिनी, वयासाठी योग्य उपक्रम वाटला. पूर्वी सन्यास आश्रमांत लोक सर्वसंग परीत्याग करुन मंदीरी, निसर्गांत गंगातीरी, हिमालयी, आपले उर्वरीत आयुष्य व्यतीत करीत. त्यावेळी अंतःपेरणा, संस्कार धर्म संस्कृती यांचा मानसिक दबाव संकल्प होता. मनाला ह्या मार्गाने जाण्याची उपरती होत असे. काळा प्रमाणे काळ्यांच्या दैनदिनीतून जवळ जवळ हेच साध्य केले गेले. फक्त येथे सन्यासाचे अनेक जागी भ्रमण नसून, एक जागी बैठक होती. त्यांची वृत्ती एकदम सन्याशाच्या अवस्थेमधली वाटली. कदाचित् मी त्याला अधूनिक सन्यास आश्रमी म्हणेल. देहाच्या गरजा यांची त्यांनी व्यवस्था केली होती. मनाला मात्र आत्म्याशी केंद्रित करीत होते. स्वतःला विसरुन-जगाला विसरुन.
ह्यात होता ईश्वरी सतसंगाचा विचार, जीवन कार्य व ओढ यातून निवृत्ती, निजी संबंधीता पासून अलीप्तता, कांहीही न करता मिळणारा आनंद शांतता व समाधान काळे उपभोगीत असल्याचे जाणवले. जीवनाच्या परीपूर्ण शेवटाची वाट बघत.

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

जीवन रंगभूमिवरील यशस्वी कलाकार .

जीवन रंगभूमिवरील यशस्वी कलाकार .

वसंता माझा बालमित्र! शाळकरी जीवनांतला. कॉलेज मध्येही एकत्र होतो. दोघेही वैद्यकीय महाविद्यालयांत मिळून शिकलो. आज दोघेही ज्येष्ठ नागरिक म्हणून सत्तरी ओलांडलेले. तो त्याच्या गांवी मराठवाड्यांत स्थायीक झाला. तर मी शासकिय नोकरीत राहून अनेक गावांचे पाणी चाखू लागलो.
मी त्याच्या गांवी अनेक वेळा गेलो होतो. मात्र गेल्या २५ वर्षांत त्याच्याकडे जाणे झाले नाही. त्याच्या आग्रहाने मी त्याच्या गांवी गेलो. चार दिवस त्याच्या कौटूंबिक जिव्हाळ्याचा पाहूणचार घेतला. खेड्यामधले घर कौलारु म्हणतात त्याप्रमाणे एक प्रशस्त जुन्या बांधणीचा वाडा. पुढे मागे मोठे अंगण व फुलबाग होती. वसंताची ह्या सत्तरीमधली दिनचर्या बघून मी हरकून गेलो. खूप गम्मत मौज आनंद वाटला. त्याच्या प्रत्येक हलचालीने मनाची बरीच करमणूक झाली. आणि कांही प्रश्नचिन्ह मनामध्ये उत्पन्न झाले.
प्रातःसमयी चारचा सुमार असावा. माझी झोपमोड झाली, ती कानावर पडलेल्या भजनानी. वसंता तानपूरा घेवून संतांचे अभंग अतीशय तन्मयतेने ताना मारीत, आलापांत एकरुप होऊन पहाडी अवाजांत म्हणत होता. त्यानेच छेडलेले सतारीचे बोल, त्याला साथ करीत होते. मी गादीवर बसून ते सारे एकाग्रतेने ऐकत होतो. एक वेगळांच आनंद घेत होतो. वसंताची ही गायनकला माझ्यासाठी अपरिचीत होती. त्याने साठीनंतर ती आपल्यापरी आत्मसात करण्याचा प्रयत्न चालवला होता. प. भिमसेन जोशींचे आलाप व गायन त्याने तंतोतंत उभे केले होते. त्याच्या ईश्वराच्या भजनासाठी मी त्याला मनापासून धन्यवाद देत अभिवादन केले.
संध्याकाळचा चहा अटोपून आम्ही मागील अंगणात गेलो. त्याचे दोघे नातू ७-८ वर्षाचे व त्यांचे तीघे मित्र गोट्या खेळत होते. मध्यभागी गल केलेली होती. त्याच्या भवती वर्तूळ केले होते. व प्रत्येकाची एक रंगीत गोटी विखूरलेली होती. प्रतिस्पर्ध्याची गोटी रिंगणाबाहेर गोटीच्याच सहाय्याने उडविणे, व आपली गोटी रिंगणात गलीमध्ये टाकणे हा प्रत्येकाचा प्रयत्न होता. बोटाच्या कांड्यावर गोटी ठेऊन बोटाला बाक देत स्प्रिंगचा आकार व गती ने समोरची गोटी उडविण्याची कला सर्वानी साधली होती. अचुकता आणि नेम यानी तो खेळ मनास करमणूक करीत होता. आम्ही अंगणात जाताच सर्वानी गलका केला.
״ आजोबा तुम्हीपण या तुमचीच आम्ही वाट बघत होतो. ״ हे पालूपद सर्वानी लावले.
वसंताने मला बाकावर बसण्याची खून केली. व तो चक्क त्यांचा एक बालमित्र म्हणून खेळण्यांत सामिल झाला. आश्चर्य म्हणजे चार सहा गोट्या त्याच्या खिशांत आधीच होत्या. सर्वांचा खेळ खूप रंगला. वसंता आपले वय विसरुन त्यांच्यातला एक संवंगडी झाला होता. एकमेकावर आरोप करणे, ओरडणे, रागावणे, खोटेपणा करणे, खेळातील तथाकथीत नियमांना बगल देणे, व आपोआपच खरे कसे हे पटविण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करीत होता.
वसंता आजोबा म्हणून मागे पडला नाही. तो पण त्याचा सुरांत, वादविवादांत, हमरीतुमरीवर येत असे. खेळ संपला, गोट्याचे वाटप झाले. आणि आजोबांनी सर्वाना भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा दिला.


रात्रीच्या जेवणाची तयारी होत होती. गरम गरम कांदाभजी करण्याची सुचना दिली गेली होती. बैठकित मोठा गालीचा होता. मी मासिक चाळत बसलो होतो. माझे लक्ष कोपऱ्यांत बसलेल्या वसंताच्या तीन वर्षे वयाच्या नातीकडे गेले. ती तीच्या सहा वर्षाचा भाऊ दादू आणि वसंता सर्वजण समोरासमोर बसून आपडी थापडी खेळत होते. आपडी थापडी गुळाची पापडी, धम्मक लाडू तेल काढू, तेलंगीचा एकच कान, धर ग बेबी माझाच कान. धर त्या दादूचा कान. पुन्हा आपडी थापडी, आपडी थापडी गुळाची पापडी तेच पालूपद चालू. आणि दुसऱ्याचा कान धरल्या नंतर फिरण्याच्या हालचाली केल्या जातात. चाऊ म्याऊ पत्राळूतले पाणी पिऊ, हंडा पाणी गुडूप, म्हणत सर्वानी तोंडावर आपले दोन्ही हात ठेवले. किती मजेदार हलकी फुलकी आणि आनंद निर्माण करणारा हा शुशूखेळ होता.
हसणे खिदळणे आणि ओरडणे, ह्यात छोट्या नातवंडासह वसंता एकरुप होऊन आनंद लूटत होता.
” गरम गरम भजी वाढली, चला जेवायला हांक आली ” आणि आम्ही सर्वजण उठलो.

आज रविवार सुट्टीचा दिवस. वसंताचे दोन्ही मुले घरांतच होती. एक महाविद्यालयांत जाणारी नात अन्विता. सकाळचा फराळ झाला. अन्विता क्रिकेटचा पेहेराव घालून आमच्या समोर आली. ״ चला बाबा बाहेर पटांगणात ״ सर्वजण जमा झाले आहेत.
״ चला ״ म्हणत वसंता उठला व त्याने मला पण बाहेर येण्याचे सुचविले.
״ काय ? ह्या सत्तरीमध्येही तू क्रिकेट खेळणार. ? ״ मी विचारले
״ आफकोर्स परंतु खेळाडू म्हणून नव्हे, तर अँपायर म्हणून ״
वसंता मला टाळी देत मोठ्याने हसला.
दोन तासपर्यंत अन्विताच्या मैत्रीनी आणि वसंताच्या दोन्ही मुलांचे मित्रमंडळ, या सर्वानी कमीजास्त भिडूची टिम बनवत खेळांत रंगत आणली. पंचच्या भूमिकेंत वसंताने काटेकोर अट्टाहासी परंतु प्रेमळ स्वभावाने पंचगिरी चांगलीच केली. खेळ खुपच रंगला. सर्वानी त्याचा आनंद लुटला. घरांतून बेल वाजली. सर्वजण खेळ आटोपून जेवणासाठी या. बोलावले गेले.
वसंता हा पेशाने डॉक्टर होता. सतत निरनीराळ्या रोग्यांच्या सहवासांत असे. एके काळी त्याला दैनंदिनीमधून इतर बाबीसाठी थोडीशी देखील उसंत मिळत नव्हती. आता वयानुसार तो दररोज सकाळी फक्त दोन तास प्रॅक्टीस करण्यांत घालवीत असे. सामाजिक कार्यांत आता त्याचा कल वाढला होता. वैद्यकिय शिबीरे आयोजीत करणे, गरीब गरजूना मदत करणे, ह्यात त्याचा बहूतेक वेळ जाई. शासनाच्या कुटुंब कल्याण योजना, पल्सपोलीओ, माताबाल शिबीरे, अशा कार्यक्रमांत तो हिरिरीने भाग घेत असे.
आजचा माझ्या मुक्कामाचा वसंताच्या घरातील शेवटचा दिवस होता. दुपारचे जेवण आटोपून मी निघणार होतो. आज जेवणाचा स्पेशल व चमचमित बेत आखला असल्याचे कळले. त्याच बरोबर मी तेथील इतर मित्र मंडळीसमवेत गप्पागोष्टींत व्यस्त रहावे, ही वसंताची प्रेमळ सुचना होती. आज तो स्वयंपाक घरांत राहून, खाद्य पदार्थांचे मार्ग दर्शन करणार होता. मी हसतच त्याच्या उत्साहाला मान्यता दिली.


दोन अडीच तास झाले, अजून वसंता कां आला नाही. काय करतो इतका वेळ त्या स्वयंपाक घरांत. मला उत्सुकते बरोबर गम्मतही वाटली. मी उठलो व स्वयंपाक घरांत जाऊन डोकावले. मला आश्चर्याचा धक्काच बसला. स्वयंपाक घरांत फक्त वसंता एकटाच होता. आणि तो जेवणातील पदार्थ करण्यात मग्न होता. One man’s show. It was great Vasanta only. त्याच हेही रुप बघून मी चकीत झालो. भारावून गेलो. गरम गरम जिलेब्या तो तळत होता. भरलेल्या वांग्यांची भाजी, पुलाव, ताकाची अतिशय चवदार कढी हा अप्रतीम बेत त्याने एकट्याने यशस्वी केला होता.
जीवन एक रंगभूमी आहे असे म्हणतात. आपण प्रत्येकजण फक्त नटाच्या भूमिकेंत असतो. नटाला वेळोवेळी, प्रसंगाप्रमाणे मुखवटे बदलावे लागतात. त्याच भूमिकेत इतके एकरुप व्हावे लागते की ते पात्र जीवंत वाटावे. परिणामकारक भासावे. कुणी संत सज्जन बनून व्यासपिठावर येतो. सर्वांची मने प्रेमाने वा आदराने भारवून टाकतो. तोच खलनायक या भूमिकेत सर्वांच्या मनामध्ये राग तिरस्कार ह्या भावना नीर्माण करतो.
ह्याच ठिकाणी त्या कलाकाराच्या कलागुणांची कदर होते. त्यालाच प्रेक्षक नटसम्राट ही पदवी देतात. संसारातील त्याचे निजी जीवन आणि रंगभूमिवरचे जीवन ह्यात खूप तफावत असते. रंगभूमि ही नैसर्गिक जीवन कसे असते, हे दाखवितानाच, ते कसे असावे ही देखील अपेक्षा व्यक्त करते. येथेच नट वा कलाकार आपल्या भावना सुलभतेने बदलताना दिसतात. हे सारे बाह्यांगी घडत असते. बदल हा जणू मुखवटा ( Mask ) बदलण्या सारखे सहज होऊ शकते. निर्माण झालेल्या परिस्थितीची झळ त्याच्या अंतरात्म्यापर्यंत केंव्हांच पोहचत नसते. मनालाही फारसा धक्का बसत नसतो. सारे होत राहते ते वैचारीक स्थरावर. हा केवळ विचारांनी विचारांचा संवाद असतो. त्यानुसार चेहऱ्यावर भाव व हातवारे करुन भाव दर्शविले जातात. त्यांचा उगम बौद्धिक स्थरावरच असतो. त्यात खऱ्या भावनेचा ओलावा नसतो. येथे खरी भावनिक गुंतवणूक केंव्हांच नसते. हां हे मात्र सत्य असते की, व्यासपिठावर जो वैचारीक व भावनिक गुंता निर्माण केला जातो, तो कृतिम असतो. परंतु हुबेहुब नैसर्गिक वाटावा असा प्रयत्न होतो.
सत्य जीवनातील व्यक्ती कशी असते. तीच बोलण, वागण, हालचाली, वेषभूषा, इत्यादी कशा असतात ? त्याच चित्रण केल जात. सार बौद्धीक वैचारीक स्थरावरच दर्शनी project केल जात, भावना विचार दिसतात. पण ती कढ वा खोली त्यात केव्हांच नसते. खरा भावनेचा अविष्कार हा मात्र त्याच्या सत्य आयुष्याचा रंगरुपांत कार्यांत दिसतो.
वसंतानी हे भिन्नत्वाच स्वरुप साध्य करुन जीवन एक आगळ वेगळच केल होत. जीवन कस असावे, ह्यापेक्षा जीवन किती अंगांनी परिपूर्ण असावे ह्याच झलक दर्शन मला त्याच्या त्या चार दिवसाच्या सहवासांत झाले.

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com