Monthly Archives: ऑक्टोबर 2017

अशा ह्या दोन पुजा १ — पुढे चालू– दुसऱ्या मित्राची पुजा—

अशा ह्या दोन पुजा
१ — पुढे चालू–
दुसऱ्या मित्राची पुजा—
५ वसंतराव माझे दुसरे मित्र. त्याचे सर्व विचार पुरोगामी होते. जे जे नाविण्य समोर येत असे, ते आत्मसात करण्याचा त्यांचा प्रयत्न असे. माणसाने सतत नवीन कल्पना, योजना यांचा प्रथम अभ्यास करावा. होवू घातलेला बदल हा कसा आहे, यावर निरीक्षण करावे. तो फक्त केवळ बदल करावे म्हणून नसावा. कांही तरी वेगळेच करावे हा हेतू नसावा. बदलाकरीता बदल ही संकल्पना नसावी. कारण कोणतीही कित्येक वर्षे चालत आलेली कल्पना, रुढी, समज, व्यवहार याचा प्रथम अभ्यास व्हावा. काळाच्या चक्रगती प्रमाणे, वेळ, पैसा, प्रयत्न व परिणाम ह्या त्या चालू रुढीने किती व्याप्त केला, हे समजून घेतले पाहिजे. त्यामधील तत्त्वज्ञान व त्याला साध्य करण्याचा मार्ग, ह्या दोन भिन्न बाबी आहेत. ध्येय चांगले असू शकेल. परंतू त्याला प्राप्त करण्याचा मार्ग हे काळाच्या बदलाप्रमाणे बदलावेच लागतात. पूर्वी व्यवहारामध्ये गोधन, सुवर्णधन हा प्रकार असे. तो संपूर्ण बदलून गेला. व्यवहाराची कसोटी पैशावर होवू लागली. आता तर वस्तूंचे मूल्यमापन करुन त्या वस्तूंची अदलाबदल हाच व्यवहार बनू लागला. ही काळाची गरज बनू लागली. तेंव्हा जीवनाच्या चक्रगतीत बदल ही परिस्थितीची गरज बनते. मूळ हेतू, मूळ उद्देश हा धागा मात्र कायम ठेवला जातो.
मी एकदा वसंताकडे गेलो होतो, तो बैठकीत आराम खूर्चीवर बसला होता. मला बघताच त्याने माझे स्वागत केले व बसण्यास सांगितले. आम्हास दोघांना एका कामासाठी जावयाचे होते.
“बस मी देवपुजा संपवितो. मग आपण २० मिनीटानंतर निघूत” मी त्याची वाट बघत बसलो. परंतु वसंता तेथेच बसला होता. देवघरांत वगैरे गेला नाही. वा समोर कोणतीही मूर्ती वा देवाची प्रतीमा नव्हती. तो शांत डोळे मिटून बसला होता. त्याच्यामध्ये मला कोणत्याच हालचाली दिसल्या नाहीत. किंवा जवळपास कोणतेही दैनंदिन पुजा साहित्य नव्हते. माझे लक्ष्य त्याच्याकडे होते व त्याचे लक्ष मला माहित नाही. डोळे मिटून तो शांत होता. जवळ जवळ २० मिनिटे. नंतर त्याने चेहऱ्यावरुन देहावरुन स्वत:चा हात फिरवला व फक्त नमस्कार केला. डोळे उघडले व म्हणाला “चल आता आपण जाऊत. मी बाहेर जाण्याचे कपडे घालतो.” मला ते सारे नाविन्य वाटले. मी तसा उत्सुक होतो.
“अरे तू देवपूजा करणार होतास ना? काय झाले त्याचे. का फक्त ध्यानच लावून बसला होतास” “नाही तीच तर माझी मानस पूजा होती. ध्यान धारणा मी सकाळी
2 उठल्यानंतर व रात्री झोपण्यापूर्वी करतो. पूजा मात्र स्नान, फराळ ही सारी दैनंदीन गोष्टी झाल्यानंतर करतो.” मानस पूजेबद्दल तो सांगू लागला. “माझ्या मानस पूजेला कोणतेच बंधन वा नियम नाहीत. मी प्रथम माझी व घरातील इतरांची दैनंदीन सोय बघतो, जाणतो आणि नंतरच माझ्या पूजेचा आराखडा करतो. इतर सर्व बाबी प्रथम व पूजा ही संकल्पना नंतर. आपल्या सोईनुसार. परंतु पुजा ही नियमीत, दररोज होतेच.
६ वेळेचे त्यासाठी कोणतेही बंधन घातलेले नाही. ” आधी पोटोबा आणि मग विठोबा ” म्हणतात त्याप्रमाणे. परंतु जेव्हा ते कार्य वा पुजाविधी मी हाती घेतो, तेव्हा त्या थोड्यावेळात इतर सारे विसरुन जातो. त्याक्षणी फक्त पुजेला प्राधान्य असते. बालपणापासून देवपूजेचे संस्कार पडलेले आहेत. बघून, ऐकून, वाचून इत्यादी. इतरांचे बघत आलो. वडीलधाऱ्याकडून ते करताना बघीतले. त्यांनी बरेच श्लोक, संस्कृत वाक्ये, सुभाषिते इत्यादी पाठ करवून घेतले. पूजा विधीमध्ये ते म्हटले जाई. हे सारे माझ्या अंगवळनी पडलेले होते. आता तर ते सारे सहजगत्या मुखातून येत होते. मात्र वयाप्रमाणे आजतागायात त्यांचे अर्थ समजले नाही. कळले नाही. माझ्याकडून तसा दुर्दैवाने प्रयत्नही झाला नाही. तो व्हावयास हवा.
संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज हे नितांत ईश्वर भक्त, पांडूरंग प्रेमी होते. त्यांच्या भक्ती व प्रेमाबद्दल सर्व सामान्यांना प्रचंड आदर आहे. परंतू ते पूजा विधी, कर्मकांड कधीच करीत नसे. ते फक्त मानस पूजा करीत असत. ‘मानस पूजेची’ संकल्पना त्यांच्याच अधिकार वाणी मधून सुरु झाली. सारी पूजा, सर्व पुजाविधी मनाच्या संकल्पने मधूनच करा. प्रत्यक्ष कोणतीही कृती करण्याची गरज नाही. शेवटी देह व मनाचा हा सारा खेळ असतो ना. देहाला शुचिर्भूत करा, स्थिर करा व शांत सोईच्या आसनावर बसा. जवळपास काही नको. पूजा विधी साहित्य, न समोर कोणती प्रतिमा. सारे सारे काल्पनीक असावे. परंतु मनाच्या धारणेमध्ये त्याची गुंतवणूक इतकी व्हावी की काहीही नसून, समोर सर्व काही सभोवताली आहे ही संकल्पना, हा भास व्हावा. त्यातच मन एकाग्र करावे. मनास त्या देवपूजेच्या भावनेत संपूर्ण गुंतवून टाकावे. शेवटी शारिरीक हालचाली, तुमचे दिसणारे, ऐकू येणारे हावभाव या सर्वाहून श्रेष्ठ व महत्त्वाचे असते ते तुमचे विचार व तुमच्या भावना. जर भाव तेथे देव ही संकल्पना असेल तर सर्व पूजा विधीत फक्त भाव भक्ती प्रेम याच आत्मीक बाबी पूर्ण कराव्यात.
मानसिक पुजेतपण पंचमोचार अर्थात पाच विधी दाखविल्या आहेत. व दुसरे शेडपषोचार अर्थात १६ विधीने युक्त. प्रत्येक विधीला त्या त्या प्रमाणे मंत्र आहेत. त्यात योग्य पाठांतर, योग्य उच्चार व नंतर त्याप्रमाणे विधीपूर्वक व्हावेत ही अपेक्षा. शिवाय प्रत्येक विधीसाठी काही पदार्थांची, सामुग्रीची आवश्यकता असते. मात्र सारे काल्पनीक. ती आहेत असे समजून. जसे हळद, कुंकू, गंध, अक्षता, पंचामृत, फुले, फळे, नैवेद्य, आरतीचे सामान
3 इत्यादी सारे काही. ही पूजा दाखविण्यासाठी, बघण्यासाठी वा काहीतरी शारिरीक हालचालीने केलेली वाटू नये. खरा आनंद भक्ती-भाव प्रेम एकरुप होण्यातच मिळतो. जो पूजेचा गाभा आहे. त्यातच शिरावे व ते मनानेच. फक्त मनानेच कल्पनेमध्ये सर्व परिपूर्णता असते. त्याला अंत नाही. जेवढे विचार, जेवढी इच्छा उत्पन्न होईल तेवढी कल्पनेने ती साकार करता येते.
७ मी वसंताला विचारले तू मानसपूजा करतो म्हणजे नक्की काय करतो.
तो सांगू लागला, या सर्व विधीमध्ये अपेक्षा असती तुमचे भाव, भक्ती, एकाग्रता, मनाची शांतता आणि समर्पण. खरे म्हणजे सर्व पूजा कर्मकांडामधील हा दुसराच भाग अत्यंत महत्त्वाचा व पुजेचा पायाच आहे, गाभा आहे, उद्देश आहे.
मी या सर्व क्रियामधला फक्त दुसराच भागाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करतो. ईश्वराची प्रमुख कल्पना, निरगुण, निराकार, सर्वव्यापी, सर्वज्ञ अशा पद्धतीने केलेली आहे. प्रत्येकाच्या समज शक्ती व लक्ष केंद्रीत होण्यासाठी त्याला सगुण रुप दिलेले आहे. त्यातून या पूजा विधीची संकल्पना. ईश्वर जरी महान, भव्य, दिव्य असला तरी मी त्याला सखा वा मित्र समजतो. ज्यात असेल आदरयुक्त प्रेम व जिव्हाळा आपल्या कोणत्याही खऱ्या मित्रावर आपले जसे कोणतीही अपेक्षा न बाळगता प्रेम करतो तसेच त्या ईश्वर सख्यावर प्रेम करावे. मित्र म्हटला तर त्याला आपण आपल्या घरी बोलावतो, त्याचं स्वागत करतो, त्याला योग्य आसन देतो, त्याला राहण्याचा आग्रह करतो. त्याच्या स्नानादी गोष्टीची व्यवस्था करतो, त्याला प्रेमाने कपडे देतो, अत्तर, सुवासिक गंधांनी त्याला आनंदीत करण्याचा प्रयत्न करतो, त्याला चांगले दुध देतो, त्याला उत्तम मिष्ठान्न असलेले जेवण देतो. त्याला प्रेमाने आलिंगन देतो. त्याचा सहवास सदैव लाभावा ही इच्छा व्यक्त करतो. हे सर्व साधारण प्रत्येकजण आपल्या प्रेमळ, आवडत्या मित्राबद्दल करण्यास उस्तुक असतो. त्याच्याविषयी असलेली आपली जवळीक व्यक्त करण्याचा हा प्रकार असतो. पुजाविधीमध्ये अजून दुसरे काय असते. ह्यात ही प्रथम ईश्वराला सगुण रुपात समजले जाते. त्याला सखा व प्रेमळ मित्र समजले जाते. समोर असलेली मूर्ती हीच त्या ईश्वराचे स्वरुप समजले जाते. कारण जर निर्गुण समजले तर समोर लक्ष केंद्रीत करण्यात अडचणी येतील म्हणून त्याला मूर्तीरुपी आकार दिला गेला. त्याच मूर्तीवर वर सांगितलेल्या विधीमुक्त बाबी करणेच पुजा ठरते. त्यात देण्याचे आवाहन, आग्रह, आसन, स्नान, कपडे (वस्त्र), आहार, नैवैद्य या सर्वांचा अर्थ तसाच होतो. माझ्या मानस पुजे मध्येसुद्धा हेच सारे १६ विधी असतील. परंतु सर्व काही विचार, कल्पना यांना जागृत ठेवून करावयाचे असते. देवाचीच कल्पना, आवाहनाचीच कल्पना, आसनाचीच कल्पना, फळ, पुष्प, नेवैद्य, उदबत्ती, आरती इत्यादी कल्पनेच्या राज्यातच करावयाचे असते. शिवाय जर हे कल्पनायुक्त असेल तर विचाराची झेपही आकाशाला भिडणारीच असावी. चांगले, वाहते पाणी, गंगाजल, समुद्रातील (रत्नाकर) पाणी, सर्व प्रकारची सुवासिक फुले, उत्तम आहार,
4 पंचपक्वानाचा इत्यादी जर सर्व सामुग्रीची अस्तित्व कल्पनेमधून असतील तर त्यात कोणताही कमीपणा, अडचण नसावी.
सर्व विधी व समर्पण हे विचार, कल्पना करीत भाव भक्ती व प्रेम यांनी युक्त करावे. एक वेगळाच आनंद मिळतो. या सर्व क्रियांमध्ये विचारांपेक्षा भावनेला जास्त समर्पित करावे.
८ मानसपुजेचा हाच तर गाभा असेल. फक्त आनंद व समाधान प्रत्यक्ष विधी विरहीत. मात्र सारे सारे तेच तसेच. सर्वात सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती मानस पुजा तुम्ही त्या निरगुण, निराकार, सर्वसाक्षी, सर्वव्यापी, अनंत अशा मूळतत्त्वाला समर्पित करणार. त्यातून त्यांच्या मनाला पटेल तेच व्यक्त करीत पुढे जाणार.
देवपुजे विषयी वसंतराव पुढे सांगु लागले.
देवपुजा याचा मूळ गाभा कोणता तर त्या ईश्वरीशक्तीला आदर, सत्कार, भक्ती हे समर्पण करणे. ईश्वराविषयी प्रेम व्यक्त करणे. त्याच्यासमोर अहंकाराच्या भावनांची थोडी देखील छाया पडता कामा नये. जे मानवी षड्रि पू आहेत ते मानसाच्या मनावर ताबा करुन असतात. त्यांना दूर सारुन केवळ प्रेम व भक्ती याचा संगम करण्याचा प्रयत्न असावा. हीच भावना त्या ईश्वराचे चरणी अर्पित व्हावी. हा मूळ हेतू असावा. तुमचे मन, तुमचा विचार, तुमच्या भावना ह्या तो तुमच्यापेक्षाही सूक्ष्म रितीने जाणतो. तोच तर त्याचा करता करविता आहे ना! त्याला तुमच्या श्वासापासून प्रत्येक हालचालीची संपूर्ण जाण असते. त्याला काहीतरी देण्यासाठी गळ घालतात. कोणताही विचार वा भावना यांची पूर्तता करण्यासाठी विनवितात. आपण करीत असलेली भक्ती, पूजा, आदर हे पणाला लावतात. केल्या गेलेल्या सेवेचे मूल्य त्याच्याकडून मागतात. काहीतरी भौगोलिक, वस्तूनिष्ठ वा संसारिक गोष्ट मिळावी हाच त्यांचा अट्टाहास असतो. सुदैवाने काही मिळाले तर आनंदीत होतात व जर न मिळाले तर निराश होतात. बोल देखील लावतात. काही तर त्याला नावे ठेवून तो दयाहीन असल्याचा ठपका पण ठेवतात. ही सारे मानवी विचारांची मानसिकता असते. ईश्वर हा काही न मागताच योग्य ते देतो.
ईश्वरी पूजेचा हेतू काही का असेना एक मात्र होण्यास मदत होते. ते म्हणजे मनावर चांगले संस्कार होण्याची शक्यता असते. मानवी षडरिपूना ईश्वर प्रेम भक्ती ही सतत दाबून ठेवीत असते.
देवपूज ही मनातून अंतरात्म्यातून उत्पन्न व्हावी लागते. It Should be from the bottom of heart. वरवरचे, देखाव्याचे नसावे. तरच त्या भक्तीच्या प्रेमाच्या लहरी, त्यांच्यापर्यंत हलक्या होऊन वर जातात. मात्र जेव्हा त्यामध्ये देखाव्याची सुप्त भावना, उद्देश, मागणी, हेतू इत्यादी असतात, त्या लहरी जड होतात. व तुमच्याच देहाभवती घुटमळत राहतात. कशा त्या जडत्व प्राप्त लहरी ईश्वराकडे जातील. तुमच्या मग तो प्रयत्न
5 कोणतीही साध्य न होणारी साधना बनते. फक्त वेळेचा व आयुष्याचा एक प्रकारे अपव्यय होतो. दुर्दैवाने याची जाणीव त्या व्यक्तीला केव्हाच येत नाही. त्याचे सारे श्रम वाया जातात. तो एखाद्या घान्याच्या बैलाप्रमाणे फक्त चक्रगतीने त्याच जागेवर फिरत राहतो. प्रवास खूप पण जेथल्या तिथेच. हाती केलेल्या श्रमाचे कोणतेच साध्य मिळत नाही.
९ ईश्वराला आपला सखा समजा. हेच तर धनुर्धर अर्जून समजत होता. श्री कृष्णाच्या देवत्वाची महानतेची, दिव्यत्वाची त्याला संपूर्ण जाणीव होती. आणि तरीही तो श्रीकृष्णाला आपला सखा अर्थात मित्र समजत होता. हेच प्रेमाचे नाते त्याला मानसिक व दैवीक बळ देत होते. तो त्या ईश्वरावर जसे प्रेम करी, तसाच त्रागा वा राग पण व्यक्त करी. हेच खरे प्रेमाचे बंधन होते. प्रत्येकजण आपल्या आईला अशाच प्रेम बंधनाच्या नात्याने संबोधीत असतो. ज्यामध्ये असते प्रेम, अधिकार, आदर व हक्क ह्या समीश्र भावना. खरे आणि खूप खोलवर रुजलेले हे जिव्हाळ्याचे संबंध असतात. असेच आपले संबंध, त्या ईश्वराकडे बघण्याचा दृष्टीकोण असाच असावा. ही भावना आदराबरोबर जवळीकपणा निर्माण करते.
ही तर न संपणारी कथाच असेल ना?
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

अशा ह्या दोन पुजा एका मित्राची पुजा –

अशा ह्या दोन पुजा
एका मित्राची पुजा –

प्रत्येक व्यक्तीला ईश्वर सानिध्य, ईश्वर प्राप्ती याची आस्था ही बालवयापासून असते. कौटुंबीक संस्कार, धर्म संकल्पना आणि पौराणिक कथा, यांचा त्याच्या मनावर एक प्रकारचा पगडा आलेला असतो. अविकसित विचार धारा, समोरच्याचा प्रभाव व नाविन्य यामुळे प्रथम तो सारे मान्य करतो. विश्लेषनात्मक त्याची विचारसरणी झालेली नसते, जे काही ऐकले, समजले हे तो कोणते ही प्रश्नचिन्ह न करता मान्य करतो. मात्र हेच सारे त्याच्या त्या स्तरावर, रक्तामध्ये एकरुप होते. विश्लेषनात्मक वाढ होत जाणारे ज्ञान त्याला वेगवेगळ्या विचारसरणीच्या मार्गावर घेवून जाते. कोणते सत्य वा कोणते योग्य हे तर फक्त काळ व परिस्थितीच ठरवते. विचारांनी काहींमध्ये बदल होत जातो. परंतू काहीं मिळालेले मार्ग तसेच चालू ठेवतात. हा ज्याचा त्याच वैयक्तीक स्वभाव वा समज.
माझे दोन मित्र मी ज्यांच्या सहवासांत बराच काळ व्यतीत करतो, त्यांच्या स्वभावाची ठेवण यावर मी चिंतन केले. वैचारिक मार्ग खूपच भिन्न होते. साध्य एकच. साधना मार्ग मात्र वेगवेगळे निवडलेले. सत्य काय, चांगले कोणते हे तर त्या काळाच्या पडद्यामागे असलेले आमच्या जवळ असतात. ती कल्पना रम्यता व तर्क बुद्धी ज्याला जसे पटेल तोच त्याचा व त्या विचार पंथाचा योग्य मार्ग. आम्हास फक्त मिळते व कळते ते अशांनी अंगीकारलेले भिन्न मार्ग. त्यांच्या विचारांचीच एक झलक यांचे वर्णन –
एका मित्राची पुजा विधी—
एकनाथराव माझे मित्र. त्यांच्याकडे नेहमी जाणे येणे असे. त्यांच्या जीवनाचा दैनंदीन व्यवहार अत्यंत चाकोरीबद्ध असलेला होता. सर्व जीवन ईश्वरी सेवा या संकल्पनेत त्यांनी घालविण्याचा नियमच करुन ठेवला होता. निवृत्त जीवन जगत होते. जीवनातील तथाकथीत दैनंदीन व्यवहार यामधून अलिप्त झालेले होते. दैनंदिनीचे चक्र अगदी स्वत:भोवतीच निर्माण केलेले आढळून आले. देह आणि मनाला ते या चक्रांत गुरफटून टाकण्याचा प्रचंड प्रयत्न करीत होते. ईश्वर सर्वव्यापी, अनंत, सर्व शक्तीमान व दयावान आहे. ही त्यांची दृढ विश्वास व धारणा होती. ते योग्यही होते. त्यांचा पौराणिक कथांवर प्रचंड विश्वास व आदर होता. ते श्रद्धावान होते. प्रयत्नांनी ईश्वर दर्शन व प्राप्ती होते, ही त्यांची मानसिक संकल्पना. विज्ञान, सत्याची कसोटी असल्या वैचारिक ज्ञानाला ते चुकीचे व धर्म परंपरेविरुद्ध असलेले विचार समजत असे. देवादिकांच्या कथांना अमान्य करणे म्हणजे ईश्वराचा अवमान केल्याप्रमाणे असते ही त्यांची ठाम समजूत.
2 त्यांच्या दैनंदिनीवर लक्ष दिले तर त्यांच्या प्रयत्नांमध्ये अनेक गोष्टी दिसून येत असत. प्रात:काळी म्हणजे घड्याळ्यांत चारचे ठोके पडले की ते उठत. कुणाचीही झोपमोड न करता प्रात:विधी आटोपून घेत. आपणच पाणी गरम करणे व स्नानाधी गोष्टी ते नियमाने आटपून घेत असत. दांडीवर वाळवण्यासाठी टाकलेले धोतर व शर्ट हा त्यांचा पेहराव असे. सर्व कांही २ आटपून ते पाचच्या सुमारास देवपुजेसाठी मांडी घालून पाटावर स्थानपन्न होत असत. त्यांचा पूजा विधी साधारण तीन तासापर्यंत शांततेने केला जायचा.
त्यांचे देवघर हा एक संशोधनाचा विषय होता. अतिप्रचंड असे देवघर आणि त्यामध्ये मोजण्यास कठीण होतील इतकी देवाधिकांची संख्या होती. अर्थात वैयक्तीक क्षमता कमी पडत असल्यामुळे ३३ कोटी देवांना तेथे स्थानापन्न केलेले नव्हते. मात्र त्यांची वैचारिक जडण-घडण ही तशीच बनलेली होती. जर जागा असेल तर ती संकल्पना पूर्ण करण्याची त्यांची तीव्र इच्छा होती.
त्यांनी फारसा प्रवास केला नसला तरी परिसर, गांव, प्रांत ह्याच्या भोवती बरीच भ्रमंती केलेले होती. मुख्य उद्देश जे जे म्हणून देवूळ वा देवालय म्हणून माहितीच्या टापूत येईल तेथे हमखास जावून आले. प्रत्येक देवळाचे एक स्थान महात्म असते. त्याच्या मूर्ती वा देवतांच्या विषयी आख्यायिका असतात. हे अशा आख्यायिका ऐकण्यात व त्या देवळांना हमखास दर्शन देण्यात नुसतेच उत्सुक नव्हते. तर बैचेन झालेले दिसत असे. देवदर्शन, तेथे पूजा भजन, साष्टांग दंडवत प्रसाद इत्यादी विधी अतिशय उत्साहाने पूर्ण करीत. गमतीची गोष्ट म्हणजे त्या त्या देवांच्या तसबीरी अथवा मुर्त्या जे जे व जसे मिळेल ते ते जमा करुन आणणे हा त्यांचा छंद होता. अशा जमविलेल्या सर्व देवतांना ते दैनंदिन पुजेमध्ये सामील करीत असत. त्यामुळे अनेक मुर्ती अनेक फोटो तसबीरी त्यांच्या देवघरांत होत्या. त्या सर्वांना मानाचे स्थान देवून, त्यांनी त्यांना देवपूजेचा सन्मान दिला होता. भावना व श्रद्धा यांच्या ते संपूर्ण आहारी गेलेले होते. असे तुम्ही का करता? असा जर कुणी त्यांना प्रश्न केला तर ते पटकन म्हणतात, “तुम्ही नास्तिक आहात. देवाबद्दल श्रद्धा नाही आहे, विश्वास ठेवा, सर्वात तुम्हाला देव दर्शन घडेल.” जीवनाचा फक्त एकच उद्देश व अर्थ त्यांनी गृहीत धरला होता आणि तो म्हणजे ईश्वर सेवा. त्यांच्या ईश्वर सानिध्यासमोर अनेक मूर्ती, अनेक तसबीरी होत्या. ज्या ज्या ईश्वरनामाचा व वर्णनाचा महीमा त्यांनी कोठेही ऐकला, त्याचवेळी त्याची प्रतिमा त्यांना प्राप्त केली. मग ती कोणत्याही रुपामध्ये. त्यांनी अत्यंत आदराने त्या देवतेला देवघरांत स्थान दिले होते. अशावेळी एकाच देवतेचे अनेक फोटो वा मूर्ती ह्यादेखील त्यांच्या देवघरांत होत्या. निरनिराळे आकार, जसे त्या प्राप्त होत गेल्या त्या प्रमाणे, सर्व देवगणांपैकी कुणीतरी त्यांच्यासाठी दयावान होईल ही श्रद्धा.
देवपुजा ही त्यांची १६ विधींनी युक्त असे. षोडपोशोचार पद्धतीने. मात्र त्यासाठीचे विधीवत मंत्र त्यांना पाठ नव्हते. केव्हाच म्हटले नव्हते, ते पाठांतर करावयाचे असल्यामुळे
3 त्यांचा तो प्रयत्नही नव्हता. त्या मंत्राचा अर्थही त्यांनी जाणून घेण्याचा, केव्हाच प्रयत्नही केला नाही. फक्त त्यांची विधी जाणून घेतली व ती अत्यंत काटेकोर पद्धतीने पूर्ण करण्याचा त्यांचा कटाक्ष असे. त्यांच्या या कृतीला जर प्रश्न चिन्ह केला तर त्यांचे उत्तर असावयाचे “आहो सारे भावनेने करा, काय गरज असते तेच मंत्र म्हणण्याचे”
३ मात्र त्यांनी बालपणी पाठ केलेली रामरक्षा, भगवद् गीतेचा पहिला अध्याय आणि काही मनाचे श्लोक, हे त्यांचे सारे विधी कर्म साधन. याच मंत्राचा ते उच्चार करीत संपूर्ण देवपूजा करीत असत. सर्व विधींच्या पायऱ्या ते व्यवस्थीत पूर्ण करीत. मात्र योग्य त्या मंत्राविणा. जर काही विसरले तर अधून मधून नामस्मरण हा आधार त्यांना अत्यंत प्रिय वाटे. नामस्मरणात प्रचंड शक्ती असून त्याच्या समोर कोणतेही मंत्र तंत्र दुय्यमच होत. अशी त्यांची संकल्पना होती. कदाचित हा त्यांचा पाठातरांचा प्रश्न असावा.
पुजा साहित्यामध्ये ते फार चोखंदळ होते, जेवढी उपलब्ध होतील ती फुले, पाने, दुर्वा ते आणीत. सर्व रंगाची फुले जमा करण्यासाठी ते प्रयत्नशील असे. अनेक देवांना अनेक रंगाची व तीच फुले प्रिय असतात. हे त्यांच्या मनाने घेतले होते. निरनिराळ्या धार्मिक पुस्तकामधून त्यांना ही माहिती मिळाली होती. ते या गोष्टीचा फार आदर करीत. मानवाप्रमाणे ईश्वराच्या देखील आवडी निवडी असतात. हा त्यांचा प्रचंड विश्वास. त्यात ते आग्रही होते.
गंध म्हणजे चंदनाच्या घर्षनातून प्राप्त झालेले असावे. सहान व खोड ही भलीमोठी त्यांनी बाळगली होती. अष्ट गंध, सुवासीक अत्तर यांचे मिश्रण करण्यात ते फार उत्सुक असत. गंधाचा कसा सुमधुर वास यावा हे त्यांना प्रिय होते. त्यासाठी ते प्रयत्नशील देखील होते. यांच बराच वेळ मात्र ते खर्च करीत. वेळ ही संकल्पना, वेळेचे महत्व, त्यांना त्यांच्या विधीसमोर दुय्यम असे. कितीही वेळ खर्च होवो, सर्व काही शिस्तीने व पद्धतशीर करण्यात त्यांचा प्रयत्न असे. नैवेद्याला दररोज एखादे फळ व दुध, गुळ खोबरे यांवरच ते भागवित असत. प्रथम प्रथम नैवेद्यासाठी कोणतातरी ताजा गोड पदार्थ मिळवण्यात ते आग्रही होते. परंतू अडचण लक्षात घेवून त्यांनी त्यात सोईचा मार्ग पत्कारला. सर्व काही विधीयुक्त करण्याचा त्यांचा कटाक्ष होता. मंत्राना मात्र त्यांनी बगल दिलेली होती. मंत्र पाठ नाहीत व आता वाढत्या वयांत ते पाठ करण्याचा प्रयत्न शक्य नसल्याचे त्यांचे विचार. परंतू सर्व विधीसुद्धा ते त्यांनी बालपणी केलेले, बघीतलेले वा कुणीतरी घरांतील वडीलधाऱ्या व्यक्तीने त्यांना सांगितलेले. पूजा अर्चा या विधीमध्ये असलेले तज्ञ वा पंडीतजी किंवा गुरुजी यांच्याकडून सर्व रितसर समजावून घेण्याचा प्रयत्न त्यांनी कधीही केला नाही. व ते त्याबद्दल फार उत्सुकही नव्हते. जसे आपल्याला कळेल, समजेल व जमेल तसेच करावे. मात्र त्यातच शिस्त व नियमीतपणा असावा.
पूजेमध्ये मात्र त्यांनी अनेक आरत्या पाठ केलेल्या होत्या. त्या सर्वच दररोज म्हणत. परमेश्वराची नाराजी व त्यामुळे त्याची अपेक्षीत अवकृपा ही बाब त्यांच्या विचाराने, मनाने 4 फार गंभीरतेने घेतली होती. माझे आयुष्य संसार हे सर्व त्याच्याच कृपादृष्टीने असते. त्यात कोणतीही चूक वा दुर्लक्ष होऊ नये. नसता त्याप्रमाणे परिणाम, तुम्हास भोगावे लागतात. हा त्यांचा दृढ विश्वास होता. त्यामुळे ते सतत दबावाखाली जीवन कठीत असल्याचे भासे. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सारे वागणे, व्यक्त करणे सर्व काही त्या समजल्या गेलेल्या
४ ईश्वराविषयीच फक्त. संसारातील दैनंदीन संबंध, हीतसंबंध, वागणूक, गरजा, धडपड, आशा इत्यादी बाबतीत मात्र ते अत्यंत सामान्य माणसाप्रमाणेच वागत. स्वार्थ-निस्वार्थ राग लोभ ह्या भावनिक चक्रात मात्र ते प्रसंगानुसारच वागत. येथे त्यांचा ईश्वर केव्हांच मध्यस्थी करताना त्यांना समजला नाही. ईश्वरांची सर्व कर्मकांडे विधीवत व्हावयास हवी ही त्यांचा पक्की व अंतरिक धारणा होती.
पूजा प्रारंभ हा एक बघण्यासारखा विधी होता. स्नानादी झाल्यानंतर ते पाटावर आसनस्त होत. मांडीची त्यांची पक्की व दीर्घकालीन बैठक असे. सर्व अंगाला, चेहरा, कपाळ, भूजा, छाती, पाय इत्यादी भागांत भस्माचे व्यवस्थीत पट्टे लावले जात. ते गढद व निटनिटके कसे होतील त्याकडे त्यांचे लक्ष असे. मग त्याप्रमाणे गंधाचे टिपके, लावणे होत असे. अत्यंत कौशल्याने ते हे सारे व दररोज करीत. गंध कसे ठसठशीत दिसेल ह्याबद्दल ते फार चोखंदळ होते. गंधातून कसा सुवास दरवळला पाहिजे ही त्यांची धारणा. देवघरात एक आरसा ठेवलेला होता. त्याचा ते उपयोग घेत. हे सारे करताना प्रभू रामचंद्र वा श्रीकृष्ण यांच्या विषयीचे सुभाषिते किंवा नामस्मरण चांगल्या खड्या आवाजात करीत. पूजाविधी मध्ये कोणतीही गोष्ट कमी असेल तर ते त्यांना सहन होत नव्हते. मग ते कापूर असो, गुलाल असो, बुक्का असो व कोणती फुले. तसे ते ह्या वस्तूंची स्वत: जमवा जमव करीत असत. पण जर घरातील कुणाशी त्याचा संबंध आला, तर मात्र त्रागा करुन आपल्या भावना व्यक्त करीत.
वयानुसार फिरावे, व्यायाम करावे ह्यात त्यांना रस नव्हता. हा वेळेचा अपव्यय असतो. त्यापेक्षा नामस्मरण करा. तो सारे तुम्हास देईल ही त्यांची संकल्पना. वाचनाचा त्यांना नाद होता. परंतू फक्त पौराणिक कथांच. शिवाय त्याच त्याच कथा पुन्हा वाचणे, ऐकणे यात त्यांचे मन रमत होते. पौराणिक कथा म्हणजे जीवनाला जगण्याचा एक मार्ग ही त्यांची धारणा. कुणी जर त्यांना त्यांच्या पुजाविधीमध्ये “पूजाविधी” या पुस्तकामधील सूचना केली, तर ते त्यास केव्हाच मान्यता देत नसत. “बदल” करणे म्हणजे आपण आजपर्यंत करीत असलेले चुकले हे मान्य केल्याप्रमाणे होईल, ही त्यांची धारणा. कोणत्याही बदलास त्यांचा विरोध असे. उत्तम कृती, लक्ष लावून केलेली पूजा ही समाधान देते. ही त्यांची समज “ध्यान धारणा” ही बाब त्यांना चुकीची वाटत असे. मन चंचल असते. हा त्याचा नैसर्गिक स्वभाव असतो. तो शांत व अविचल कसा होईल. ध्यान केव्हाच लागत नसते ही त्यांची
5 धारणा. मात्र पूजेमध्ये ध्यानस्त बसले तर श्री रामचंद्राची मूर्ती सदैव समोर येत असते. ही त्यांची भावना. स्वभावाने ते अत्यंत प्रेमळ व आदरातिथ्य बाळगून होते.
एकाची पुजाविधी संपली – दुसऱ्याची पुढील अंकी

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

समज

समज

आमच्या शेजारीचे दोन तरुण मित्र, भास्कर व अविनाष एका खोलीत रहात होते. सारखी विचारसरणी व स्वभाव. धर्मा बद्दल प्रचंड जागरुकता बाळगत होते. आपलाच धर्म महान व श्रेष्ठ ही संकल्पना मनांत द्रढ झालेली जाणवत होती. तसा त्यांचा मित्र परिवार मोठा असल्याचे दिसून येत होते. कोणीही धर्माबद्दल वेडा वाकडा शब्द उच्चारला तर ते मिळून त्याच्यावर हल्ला करीत. धर्म रक्षण व देवाची सेवा हे जणू त्यांचे ब्रिद होते. सारे ज्ञान फक्त कुणाकडून ऐकलेले, वा साधारण पुस्तके वाचलेले. अनुभव संपन्नता त्यांत मुळीच नव्हती. कोणतेही धर्माचे ग्रंथ वा अध्यात्म यांचा अभ्यास नव्हता.
एकदा कुणीतरी चित्रकाराने देवीचे चित्र रंगवले. त्यांत त्याने देवीला माकडाच्या पाठीवर बसून जात असल्याचे दर्शविले. अर्थांत हे अत्यंत अयोग्य व विक्षीप्त होते. झाले ते चित्र बघतांच या दोन्ही मित्रांचे टाळके फिरले. त्यानी मित्रांचे टोळके जमवून ते भितीचित्र काढून फाडून टाकले. शिवाय त्या चित्रकाराचा मागवा घेत त्याची पिटायी पण केली. पोलिसांना त्यात लक्ष घालावे लागले.
आम्ही सोसायटीची मंडळी एकत्र जमून जवळच असलेल्या एक तिर्थक्षेत्री सहलीला गेलो होतो. आमच्या सोबत भास्कर व अविनाष दोघेही होते. सहल छान झाली. एक गोष्ट मात्र खूपच खटकली. तिर्थक्षेत्राजवळ एक मोठे कुंड होते. जे पाण्याने भरलेले होते. परंतु अनेक वर्षे त्या पाण्याला उपसाच नसल्यामुळे पाणि स्थिर झालेले होते. परिणामी अत्यंत दुर्गंदीयुक्त वाईट स्थितीत होते. सर्वानी फक्त ते पायावर घेतले. दोन थेंबे डोक्यावर शिंपडले. मात्र कुणीही ते तिर्थ म्हणून समजून प्राशन केल नाही. भास्कर व अविनाष यानी तर तिथे कुंडाच्या पाण्याला स्पर्श देखील केला नाही.
कोणत्या धार्मिक भानाना ते प्रभावित करु बघत होते. कोणत्या धार्मिक तत्वाना ते साथ देत होते. धार्मिक संकल्पने मधील कोणत्या अनिष्ठ गोष्टीवर आपली उर्जाशक्ती वापरुन त्यांत सुधारणा करुं इच्छीत होते. सत्य आणि मनातील विचार यांची सांगड कोणती, ह्याचा गंभीरपणे विचीरच केलेला जाणवत नाही. फक्त मलाच वाटते ते सत्य असावे. ह्या वैचारीक व भावनेंत गुंतलेली ही मंडळी. आणि अशीच विचारसरणी बाळगणारी व्यक्ती फक्त भावनिक लाटेत वाहात जातात.
वाईट व विक्षीप्त चित्रकला ही केंव्हाही निषीद्ध. ह्यास सर्वांचीच सहमती असेल. त्याला समजदारीने, विचारानीच विरोध केला पाहीजे. त्याच प्रमाणे जर ते तिर्थकुंड समजले गेले असेल तर त्याची स्वच्छता, उपसा, सभोवताल, ह्यावर खुप विचार व्हावा. कांही माणसे कुणीतरी धर्माची, देवाची थट्टा केली हा समज करुन घेऊन आग्रेसर होतात. तोडमोड करुन सामाजीक स्वास्थ बिघडवतात. जसे आमच्यातले भास्कर वा अविनाश. अशा ठिकाणी अशानी उर्जा खर्च करण्याची खरी गरज वाटते. कोणतेही धर्म स्थळ असो तेथे स्वच्छता, टापटीपपणा नैसर्गिक आकर्शकता, प्रसन्न वातावरण याचा खूप अभाव जाणवतो. अत्यंत दुर्भाग्य व निराशजनक बाब म्हणजे त्यांच्या व्यवस्थापनेकडे लक्ष्य देण्यास कुणासच फुरसत नसते. ह्याचे कारण देवत्वाविषयी गैरसमज व अज्ञान.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

‘Percussion ‘ एक वैद्यकीय तपासनी पद्धत

‘Percussion ‘ एक वैद्यकीय तपासनी पद्धत

विचार करणे हे मेंदूचे अत्यंत महत्वाचे कार्य. त्यातही कांही व्यक्ती सतत नाविन्याचा विचार करीत असतात. निसर्ग कोणतीही गोष्ट तुमच्या समोर सोडून देतो. फक्त विचारवंतच त्याच प्रथःकरण करुन ती कोणती गोष्ट आहे, कां आहे, व त्याचा सर्वसामान्यासाठी कांही उपयोग होऊ शकेल कां ह्याचा विचार करतात. त्यानाच आपण महान, तत्वज्ञानी वा शास्त्रज्ञ म्हणतो. तुमच्या आमच्या सारखीच ती साधी माणसे. कांही वेगळी नसतात. परंतु सदैव सतर्कता व चौकसपणा बाळगुण असतात.
झाडाखाली विश्रांति घेत असलेला न्युटन. त्याला झाडावरुन पडणारे फळ दिसले. गुरत्वाकर्षनाची माहिती जगाला कळली. किंवा आर्किमेडीज स्नानासाठी पाण्याने भरलेल्या टबात उतरला. सारलेल्या पाण्याचे आणि घनरुपाचे अनेक जगप्रसिद्ध सिद्धांत मांडले. अशीच अनेक उदाहरणे असतात. क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टीमधून महान वैज्ञानिक तत्वज्ञान बाहेर येते.
डेन्मार्कचा एक वैद्यकीय विचारवंत जिब्सन. तशी त्याला दारु पिण्याची सवय. तो दारु विकत घेण्यासाठी एक दुकानांत गेला. त्या काळी दारु टिनच्या डब्यांत भरुन ठेवीत. व ग्लासाने ती गिऱ्याईकाला दिली जायी. दुकानदाराने बोटाच्या टिचक्या सर्व डब्यावर मारुन आवाज केला. रिकाम्या डब्यावर मारलेल्या टिचकीने वेगळा आवाज येई व दारु भरलेल्या डब्यावर मारताच त्याचा वेगळा आवाज येई. केवळ लहान (बारीक ) वा मोठ्या (भदा) आवाजाच्या ( पीच ) प्रतिध्वनीवरुन तो ओळखे, की कोणता डब्बा रिकामा आहे, वा भरलेला. डॉक्टर जिब्सनने त्या दुकानदाराच्या हलचाली सुक्ष्मपणे बघितल्या.
आणि वैद्यकीय तपासणीमध्ये एका छोट्याश्या पद्धतीचा जन्म झाला. ज्याला त्यानी नांव दिले गेले “PERCUSSION” . डॉक्टर लोक एक हात छाती, पोट, वा पाठ इत्यादीवर ठेऊन, दुसऱ्या हाताच्या बोटानी त्यावर टिचकी मारतात. सुक्ष्मपणे निरीक्षीण केले तर त्या ठोक्यामधून निरनीराळे ध्वनी लहरी निघून विवीध Pitch मध्ये आवाज ऐकू येतात. शरीरामध्ये जर कोणती अनपेक्षीत वाढ होत असेल, तर त्या मधून परावर्तीत होणारा ध्वनी सुचवितो की तेथे कांही घन रुपाची वा द्रवरुपाची वा वायुरुपाची वाढ होऊ लागली आहे. हे सारे अत्यंत प्राथमिक असते. परंतु रोग निदनाच्या प्रक्रियेमध्ये विचाराना चालना देणारे निश्चित असते. It is helpful in the diagnostic procedure of a disease.
शेकडो वर्षापुर्वीची ही त्या वैद्यकाची कल्पना, आजतागायत अनेक अद्यावत यांत्रकी तपासणीमध्येही टिकून राहीलेली दिसते.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

खानदानी

खानदानी

मी माझ्या नातवाला घेऊन मित्र गणपत पवार याचेकडे गेलो होतो. त्याचा नातू माझ्या नातवाशी समवयाचा. दोघेही एकाच कक्षेत शिकणारे. आम्ही दोघे मोठ्या झोपाळ्यावर गप्पा मारीत बसलो. समोर बागेत दोन्ही नातवंडे खेळत होती. अचानक आमचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. ते त्यांच्या भांडणामुळे. दोघेही हामरी तुमरीवर येऊन वाद विवाद व त्यांत मारामारी करु लागले. गणपत बेचैन झाला. तो लगेच उठून त्यांना आवरण्यासाठी जाऊ लागला. पण मी त्याला रोकले. ” आरे जाऊ दे . मुले आहेत ती. भांडू देत त्याना. थोडीशी मस्ती करतील व शांत होतील. सार विसरतील व पुन्हा खेळतील. ” तो हसला. जवळ येऊन बसला. थोड्या वेळाने जे घडले, त्यानी आम्ही चकीत झालो. गणपतच्या नातवाने माझ्या नातवाला दोन टोले लगावले. खाली पाडले. तसे दोघेही रडत होते.
गणपत मोठ्याने हासू लागला. थोडासा अहं भाव वा फुशारकी त्याच्यां चेहऱ्यावर मला जाणवली. “बघ साला नातू कुणाचा आहे. शेर का बच्चा. लेचापेचा नाही ये.” तो जरा जास्तच हासला. “आखेर खानदानी आहे तो. ” माझ्याशी टाळी देत उत्तरला.
मी त्या प्रसंगाचा विचार करु लागलो. त्याच बरोबर त्याच्या “खानदानी” ह्या उपाधीवर दिलेला जोराचा, पण विचार करुं लागलो. कारण त्या समवयी नातवांत शक्ती, युक्ती पेक्षा त्याची आक्रमकता हा गुणधर्म उठून दिसला होता. ज्याने त्याला वेगळेच दालन मिळवून दिले होते.
सिडने-ब्रेनर हा आफ्रिकन विद्वान विचारक. वैद्यकीय क्षेत्रातला शास्त्रज्ञ. त्याला नुकताच 2004 सालचा सर्वश्रेष्ठ नोबेल पुरस्कार मिळाला. त्याचा विषय होता जेनेटिक्स ( Genetics ). तसा हा अत्यंत अवघड विषय. निसर्गातील सजीवांच्या प्रकृतीसंबंधीची मुलभूत तत्वे त्यानी शोधली. प्राणी वा व्यक्ती ह्यांची स्वभाव धारणा ह्याचाच जणू त्यानी सिद्धांत मांडला.
व्यक्तीच्या आक्रमकता वा बचावात्मक पैलूवर प्रकाश पाडला.
गम्मत म्हणजे त्याच्या ह्या वैचारीक धारणेला त्याने बाल वयांतच त्याची झलक दाखविली होती. एक विचार, एक शंका त्याच्या शाळकरी विद्यार्थी दशेतील मनांत डोकावली. आणि ते रुजले गेलेले बीज पुढे फोफावत, त्याचा प्रचंड वृक्ष झाला. ज्याला नोबेल पारितोषकचे फळ लागले.
शाळकरी वयांत असताना सिडने ब्रेनरने एक चित्र बघीतले. एक भली मोठी, सशक्त गाय दाखविली गेली, जीला मोठी अनकुचीदार अशी शींगे होती. ती वेगाने धावत होती. त्याचवेळी तीच्यावर एक रोड, हडकुळा, किरकोळ प्रकृतीचा वाघ तुटून पडला होता. वाघ छलांग मारुन तीच्या मानगुटीवर आरुढ होण्याचा प्रयत्न करीत होता. हे एक नैसर्गिक सत्यावर आधारलेले चित्रण होते. परंतु सिडने ब्रेनर साशंक होता. गाय सशक्त, मोठी, अनकुचीदार मोठी शींगे बाळगुण असलेली, परंतु भित्री आहे, असे त्याला वाटले. वाघ चपळ व आक्रमक होता. त्याने त्याच्या शिक्षकाला प्रश्न केला. “ही एवढी सशक्त मोठी गाय. कां भिते ती त्या किरकोळ वाघाला.? कां ती संघर्ष करुन त्या वाघावरच तुटून पडत नाही.? कदाचित् वाघ हरेलही ”
2 शिक्षक म्हणाले “तुझा विचार तर्कला धरुन आहे. परंतु येथे शक्ती, युक्ती पेक्षा प्रकृती श्रेष्ठ ठरते. हा निसर्ग होय ”
आणि त्या क्षणापासून सिडने ब्रेनर “प्रकृती च्या अर्थात निसर्गाच्या मुळ धाग्याच्या रचनेकडे” वळला.
महाभारतामधील एक प्रसंग. कर्ण ब्राह्मणाचे रुप घेऊन, गुरु परशुराम यांच्याकडे शिक्षण घेत होता. एके दिवशी कर्णाच्या मांडीचा आसरा घेत गुरु विश्रांती घेत होते. एका भुंग्याने कर्णाची मांडी चाऊन त्याला रक्तबंबाळ केले. कर्ण तटस्थ बसला. हालचाल केली नाही. कारण त्यामुळे परशुरामाची झोप मोड झाली असती.
नंतर परशुरामाला उठताच हे कळले. त्यांचा तर्क बरोबर निघाला. कर्ण ब्राह्मण नाही. तो क्षत्रीय आहे. कारण त्याची सहनशिलता ही क्षत्रीयाची होती.
प्रकृती अर्थात स्वभाव ठेवन ही भिन्न भिन्न असते. सारे तेच. रक्त, मास, हाडे, कातडे. परंतु प्रत्येकामधल्या नैसर्गिक चेतना निराळ्या. त्यालाच सामान्यासाठी “जेनेटिक्स.” ( Genetics ) म्हणता येईल. रक्तामधला एक अत्यंत मुलभूत प्रकार “जीन्स ” असतो. शरीर मन बुद्धी ह्या धारणेच्या सर्व हालचालीवर ताबा मिळविणारा.
माणसाची शक्ती, युक्ती बुद्धीमत्ता ज्ञान समज इत्यादीच्या संकल्पना वेगळ्या असतात. ज्यांत सभोवताल अर्थात वातावरण, परिस्थीती व्यक्तीचे स्वभाव निर्माण करतात. ह्यात आठवणींचे चक्र दडलेले असते व त्या प्रमाणे परिणाम. हा सारे सत्य व द्रष्य व्यक्त भाग. परंतु खोलांत शिरले तर मुळ ताबा असतो त्याच्या जीन्सचा. ज्याला मुळ स्वभाव म्हणतात. सारे वरकरणी आत्मसांत केलेले स्वभाव त्या क्षणी बाजूस सारले जाऊन, मुळ स्वभाव त्याची जागा घेतो. ह्याला चांगले, वाईट, योग्य अयोग ह्याची जाण नसते. आणि तेच तर नैसर्गिक होय. येथेच संकल्पना येते ती वंश परंपरेची. जीन्सचा प्रवाह एकच नसतो. त्यांत सतत मिश्रण होत राहते. स्त्री वा पुरुष बीजांचे. म्हणूनच त्यात प्रसंगीक भिन्नता होत राहते. मात्र प्रवाह पुढेच जात असतो.
हे तुझ्या आई वडीलांचे , आजोबा-आजीचे , गुणधर्म तुझ्या आले आहेत असे म्हणतो. ते ह्याच मुळे. आपले सर्व साधारण वंशाचे ज्ञान आजा- आजी, पंणजोबा-पंणजी, खापर पंणजोबा-खापर पंणजी ( अर्थात दोन्ही बाजूंचे पित्र-मात्र धरुन ) येथ पर्यंतच मर्यादीत असते. कदाचित् कांही जुने रेकॉर्ड ह्या बाबतीत थोडासा प्रकाशही टाकू शकतील. मात्र सत्य कायम राहते. ते म्हणजे ” वंश परंमपरागत गुणधर्म “. अर्थात आज कालच्या पुरोगामी शब्दांत ” खानदानी गुणधर्म “. ज्याला म्हणतात मुळ स्वभाव. चांगला वा विक्षीप्त, आक्रमक वा बचावात्मक, वा इतर कोणता. हे शब्द फक्त बदललेल्या परिसिथितीला अनुसरुनच व्यक्त होत असतात.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com