Monthly Archives: नोव्हेंबर 2014

नदीच्या पाण्यातील ओंडके.

जीवनातील रगाड्यातून-

नदीच्या पाण्यातील ओंडके.

अमेरीकेला कांही महीने राहण्याचा योग आला होता. मुलाकडे गेलो होतो. छोटेसे, सुंदर आणि अद्यावत शहर. नदीच्या तीरावर वसलेले सर्वत्र नैसर्गिक सौंदर्य. फक्त एकच खंत जाणवत होती. ती म्हणजे मन मोकळे करुन गप्पा मारण्यासाठी कुणी मित्र नव्हते. येथील लोक त्यांच्या आपसांत देखील गप्पा मारताना दिसत नव्हते. बागेत एकटे वा एखादा लहानसा कुत्रा बाळगणे. कुणाशी ही न बोलणे. नजरा नजर झालीच तर हाय म्हणणे. एकदम एकलकोंडे. स्वतःमध्येच राहून मनाला बंदीस्त कप्यात ठेवण्याची, कुणीही कांही न बोलण्याची विलक्षण स्वभाव शैली, ह्याना जमलेली असते. आपण भारतीय गप्पा मारणे, मन मोकळे करणे, नको त्या चौकशा करीत समर्थानाचे मार्ग शोधण्यात तरबेज असतो.  ” एक हात लाकूड, त्याची दहा हात धलपी ” ह्या प्रमाणे वेळ घालविण्याची कला साध्य केलेले.

निवृत्तीचे वय. सकाळ संध्याकाळ फिरावयास जाणे. अचानक बागेमध्ये माझ्याच वयाचे एक गृहस्थ डॉ. सुब्बुराज भेटले. दक्षिण भारतातले प्राध्यापक म्हणून निवृत्त झालेले. एकमेकाचा परिचय झाला. ते पण थोड्याश्या काळाकरीता त्यांच्या मुलीकडे आले होते. विचारांची देवान घेवन झाली. थोड्याच वेळांत लक्षांत आले की आमची वैचारीक बैठक, विषय आवडी निवडी बऱ्याचशा मिळत्या जुळत्या आहेत. वेव्ह लेंग्थ जमली म्हणतात तसे झाले. मुख्य म्हणजे दोघेजण भारतीय असून मित्र व मन मोकळे करण्यासाठी कुणाच्या तरी सहवासाची गरज पूर्ण झाली.  दोघेही आनंदी व समाधानी झालो. वेळ ठरवून दररोज भेटू लागलो. वेळ खूप मजेत जात होता. दोघांजवळ पाठीशी जीवनामधल्या प्रचंड अशा अनुभवाचे गाठोडे होते. शिवाय अध्यात्म, समाजाची कुटूंबाची बदलत चाललेली रचना वा घडी ह्यावर बोलत असू.  शिक्षण क्षेत्रामध्ये होत जाणारे बदल, राजकारण अर्थकारण ह्यात होणाऱ्या प्रचंड उलाढाली, वातावरणामधले बदल इत्यादी एक नाही अनेक विषय प्रसंगानुसार हाताळले जात होते. चर्चा होत होती. मतासाठी आग्रह होत होता. दोघांचे ही अनुभव मनाला चटका देणारे, रोमांचकारी, हसवणारे, राग आणणारे, निसर्ग वा ईश्वर अप्रतीम अस्तित्वाची जाणीव देणारे होते. आगदी थोड्याशा काळांत दोघानाही एकमेका बद्दल अस्था आदर व सहवासाचे प्रेम वाटू लागले. भेटण्याची वेळ ह्याची उत्सुकता होवू लागली. वेळेचे बंधन नसल्यामुळे पूर्ण आनंद उपभोगला जाई. कधी बागेत, कधी नदीकिनारी, जात असू. वृद्धापकाळी जे लागते ते मिळू लागले. चांगली हवा, चांगले जेवण, चांगली बौद्धीक चर्चा, शरीराला तजेले करणारे फिरणे, सारे आनंदी व समाधानी चालले होते.

अचानक कौटूंबीक वैयक्तीक कारणास्तव त्याना भारतात परत जावे लागले. ते माझा प्रेमाचा व निराशमय निरोप घेऊन ते निघून गेले.

नदीकिनारी खडकावर बसलो होतो. नदीला पूर आलेला होता. ती दुथडी भरुन वाहत होती. मन खिन्न झालेले होते. कसलीतरी निराशा मनाला बेचैन करीत होती. डॉ. सुबुराज ह्यांचा अचानक परीचय झाला. फार थोड्या दिवसाचा त्यांचा सहवास लाभला. त्या सहवासाची तिवृता, ओढ, आपूलकी, आदर,  वैचारीक प्रेमाची देवाण घेवाण, ही हा छोटासा काळ आम्ही अनेक वर्षे एकत्र होतो ही जाणीव होत होती. सहवास किती काळ असावा ह्यापेक्षा कसा असावा हेच महत्वाचे ठरते.

माझे लक्ष वेधले गेले ते दुर अंतरावरावरुन दोन दिशानी पाण्यांत वाहात येणाऱ्या दोन लाकडाच्या ओंडक्याने. पाण्याच्या लाटांनी दोन्ही ओंडके जवळ आणले. एकमेका जवळ आले. प्रवाहा मध्ये बरेच अंतर ते एकत्र राहून वाहात होते. अचानक पाण्याच्या उसळणाऱ्या लाटेने त्यांना वेगळे केले. दोघांचीही दिशा व प्रवाह बदलले. ते वेगळ्या दिशेने निघून गेले. नजरेच्या टापू आड झाले.

निसर्ग, वातावरण, परिस्थीती ही अशीच आपल्याशी खेळ खेळत असते. जीवनाच्या टप्यावर प्रत्येकजण एकमेकास भेटतो. सह चालतो. आणि एक दिवस दुर निघून जातो.  पाण्याचे अस्तित्व, लाटांचे वाहणे, आणि ओंडक्यांचे अवलंबून असणे, ह्याची जर खऱ्या अर्थाने जाणीव झाली तर जीवनचक्राचे ज्ञान झाले म्हणावे लागेल. त्यांत नसेल निराशा, न खंत, न दुःख. फक्त एक सत्य अनुभवजीवनाचा मार्ग — जीवन चक्र.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-  bknagapurkar@gmail.com

मानव-जग-परमेश्वर

जीवनाच्या रगाड्यातून-

मानव-जग-परमेश्वर

 

शरीर रचनेचा अभ्यास करताना बऱ्याच गोष्टी खूप मजेदार आणि ज्ञान देणाऱ्या वाटल्या. ह्या जगांत अनेक घटना घडत असतात. त्या स्थिर वा हलचालीयुक्त दिसून येतात. आपल्या शरीरांत देखील तशाच गोष्टी होत असतात. कदाचित् त्याचे रंग रुप वेगळे असतील. परंतु जगातील घडणाऱ्या आणि देहामध्ये घडणाऱ्या घटनामध्ये परिणामाच्या दृष्टीने विलक्षण साम्य असते.

एक आकाश आणि पोकळी सर्वत्र जाणवते. बाहेर घरांत पेटीत डबीत आणि सुक्ष्म अशा अणूमध्येही. पोकळी तेथे हवा अर्थात आकाश. विशाल वा सुक्ष्म. ह्याच माध्यमातून जगातल्या सर्व वस्तू एकमेकांच्या संपर्कात असून बांधल्या गेलेल्या आहेत. हा वायुरुप पोकळ्यांचा संपर्क असेल. माणसाच्या देहामध्ये देखील हवेचा संपर्क असतो. तसेच आकाशाच्या पोकळी असलेल्या अनेक जागा असतात. प्राणवायु तर जीवंतपणाचे लक्षण होय. वातावरणातील हवेचा सतत संपर्क येणे ह्या क्रिया फुफूसामार्फत देहात चालू असतात. अंतरदेहाचा बाह्य जगाशी ह्याच माध्यमाने संपर्क असतो.

महासागर समुद्र नदीनाले तलाव विहीरी ढग पाऊस आणि सुक्ष्म असा पाण्याचा थेंब. ह्या जगातील अस्तित्वात असलेल्या पाण्याच्या द्रवरुप माध्यमाची ही जाण आहे. जमीनीपेक्षाही प्रचंड प्रमाणात पाण्याची रचना केलेली दिसते. मानवाच्या शरिरांत देखील असेच पाण्याचे प्रमाण खूप असते. पाणी हेच जीवन समजले गेले आहे. प्रत्येक अवयवांत व त्याच्या सुक्ष्म पेशीत, सेल्समध्ये मुबलक पाण्याचे प्रमाण असते. देहाच्या जगण्यामधला पाणी हे महत्वाचे अंग असते.

पृथ्वी म्हणजे काय ?  प्रचंड प्रमाणात जीचे अस्तित्व असते तो जगाचा भाग. केवळ माती व दगड ह्यानी व्यापलेला. हलकी भुसभुशीत ती माती, व ज्याचे स्वरुप कठीण वाटते तो दगड. तसे दोन्हीही एकच. माती म्हणजे काय असते ? अधुनिक शास्त्राने त्याचे विश्लेशन केले आहे. मातीमध्ये जवळ जवळ ११० मुळ घटक पदार्थ अर्थात  Elements (धातू) सापडले आहेत. जसे सोने, चांदी, लोह, तांबे, जस्त, सोडीयम, पोट्याशियम, ऑक्सीजन, हैड्रोजन, क्लोरीन, इत्यादी. हे घटक पदार्थ निरनीराळ्या प्रमाणात मातीमध्येच असतात. वा त्याच्याच प्रमाण बद्धतेनुसार निरनीराळ्या प्रकारची माती बनत असते. माती दगडाचे दृष्य स्वरुप हे भिन्न वाटत असले तरी विश्लेशनात्मक दृष्टीने ते अन्तीमतः मुळ घटक elements  याचेच मिश्रण वा संयुक्त होय. निरनीराळे नैसर्गिक गुणधर्म बाळगुन. मानवी देह हा काय आहे ? त्याचेही घटनात्मक विश्लेषन करु लागलो तर तो सुद्धा मातीचाच बनलेला लक्षांत येते. इंद्रिये, अवयव, रक्त , मास, हाडे, कातडी, ह्या सर्व भागांचे विश्लेषन दाखविते की त्याचे गुणधर्म फक्त मातीचेच असतात. ज्यात फक्त असतात मुळ घटक पदार्थ ( Elements).  निरनीराळ्या प्रमाणे प्रमाणशील बांधलेले. मृत देह जाळला वा पुरला तर तो शेवटी मातीमध्येच एकरुप होतो. म्हणूनच विद्वानानी मानवी देहाला मातीचा घटाकार म्हटले आहे.

ह्या संपूर्ण घटक पदार्थाचे  जर सुक्ष्म रितीने विश्लेषन केले तर आपण अणू (Atom  ) ह्या संकल्पने पर्यंत जातो. मुळ घटक पदार्थ ( Elements) नैसर्गिक गुणानी भिन्न भिन्न असतात. आजच्या अद्यावत विज्ञानाप्रमाणे अणूचे विभाजन पून्हा परमाणू त्यांत धन (Positive ) व ऋण (Negative ) शक्ती इत्यादी वर्णने आहेत. ही अणूतील उर्जा शक्ती प्रचंड असते. जी उर्जा अणूत आहे तशीच ती पेशीत देखील सुप्त अवस्थेत असते. पेशीमधल्या एकत्रीत शक्तीमुळेच शरीर मनाचे कार्य़ चालू असते. मानव देहातले तेज म्हणतात ते हेच.

पंच महाभूतांचे म्हणजे आकाश वायु आप (पाणी) पृथ्वी आणि तेज ह्याचेच आस्तित्व ह्या संपूर्ण जगामध्ये , मानवामध्ये असल्याचे जाणवते. वस्तू निराळ्या, नांवे निराळी, गुणधर्म निराळे, परंतु सर्वाचे मुळतत्व एकच असल्याचे आम्हास जाणवू लागते. दिसणारा भासणारा पदार्थ आणि त्यांत असलेली शक्ती. कोणतेही कार्य ज्यातून केले जाते  त्या माध्यमाला पदार्थ संबोधले गेले. ज्यामुळे ते कार्य होऊ शकते त्याला चेतना अथवा उर्जा वा शक्ती म्हटले गेले. त्यामुळे प्रत्येक पदार्थ आणि त्यातील उर्जा हे दोन दिसत असले तरी ते एकच समजले गेले आहे. विचारांच्या लाटेत, ज्ञानाच्या सागरांत, समजण्याच्या प्रांतात हे भिन्नतेने वर्णीले जाते. पदार्थ व शक्ती ह्याना एकच स्वरुपांत मानणारे  अद्वैत संकलपनेत जातात. जे एकांतले दोन्ही गुणधर्म याना अलग अलग समजतात त्यांची द्वैत विचारसरणी असते. विचार सामान्यजनाला समजण्यासाठी असतात.

परंतु सत्य आपल्याच जागी राहते. ते केंव्हाच बदलणारे नसते. ह्यालाच तर म्हटले आहे सत्याची जाणीव Reality Consciousness. परमेश्वर जो आहे म्हणतात तो ह्याच्यापेक्षा वेगळा असू शकेल कां  ?

कोणत्याही पदार्थाचे व्यक्तीचे वा तथाकथीत देवाचे वर्णन त्याच्या फक्त गुणांत असते. कदाचित वेगळेपणासाठी प्रत्येकजण त्याला आकाररुपांत जाणू इच्छीतो. मात्र खऱ्या अर्थानी त्याची ओळख पटते ती फक्त गुणवर्णनावरुन. अंटार्टीका ह्या बर्फाछादीत प्रदेशांत राहणारा मानव (एस्कीमो ) सर्व साधारण कुणी बघीतला नाही. वा कुणी सहजतेने तेथे जावून तो बघू शकत नाही. तरी देखील तेथे राहणारा मानव कसा असेल हे आम्हास त्याच्या केवळ गुणधर्मावरुनच कळते. कारण मुख्य गुण समजल्यावर आकार,रंग रुप इत्यादी दुय्यम ठरतात. त्या परमेश्वराचा आकार,रंगरुप इत्यादी गोष्टी समजणे जाणणे ओळखणे ह्या गोष्टी देखील दुय्यम स्वरुपाच्याच नव्हे काय ?  परमेश्वराला कुणीही बघीतले नाही असे म्हणतात. ते सत्य असेल. करण गुणधर्म हे स्थीर, स्थीत, आणि सदैव असतात., म्हणूनच त्याला त्याचे हे गुणधर्म संबोधले गेले. मात्र रंग रुप आकार हे अस्थीर व बदलणारे असल्यामुळे असत्य वाटतात. पदार्थ बदलत गेला तरी मुळ गुणधर्म सदैव कायम असेल. हिंदू धर्मात ३३ कोटी देवांची संकल्पना आहे. ह्यात अनेक रंग रुप आकाराचे देव आहेत. हे जरी सत्य मानले तरी सर्वांत एक प्रमुख गुणधर्म अस्तीत्वात आहे, आणि त्याला आम्ही म्हटले ” देवत्व, Devine Power, Real Consciousness  ”  हे सर्वात एकच असते. तो सर्व व्यापी, अविनाशी, सर्वशक्तीमान, आणि  निराकार असेल तर ह्याच गुणातील अविष्काराचे जाणीवेचे अनुभव मिळणे हा प्रयत्न असावा. सत्य समजण्याचा हाच मार्ग असेल. सगुण रुपाचे दर्शन मिळाले तरी ते अपूर्ण असेल. निराकार आणि सर्वत्र जाणलेले स्वरुप म्हणजे सुक्ष्म पदार्थात अणूरेणूमधली उर्जाशक्ती. जी प्रचंड तर आहेच परंतु सर्वत्र समावलेली आहे. सुक्ष्मापासून स्थुलात. ह्या जगाच्या संकल्पनेत जेंव्हा दोन्ही अर्थात पदार्थ व शक्ती एकच समजले गेले ते परमेश्वराचे स्वरुप. अद्वैत स्वरुप.

मानव आपल्याला चांगलाच समजला आहे. दैनंदीन जीवन चक्रांत आम्ही संपूर्ण जग देखील जाणले. तो महान परमेश्वर सर्वत्र चराचरांत, अणूरेणूत, महासागरांत, नदीतलावांत, डोंगरदऱ्यांत, वनश्रीमध्ये, वन्यप्राण्यात, आगदी तुमच्या आमच्या शरीरांत देखील पसरलेला आहे. त्या परमेश्वराचा अनंत स्वरुप पसारा जाणण्याची कोणतीही शक्यता आपल्या इंद्रियामध्ये नाही. मग तो परमेश्वर कसा दिसू शकेल.

पौरानीक कथा सांगते की श्री कृष्णानी फक्त अर्जुनाला ते ईश्वरी दिव्य स्वरुप दाखवण्याचा प्रयत्न केला. अर्जुनाला ते सहन झाले नाही. त्याने स्वतःचे डोळे एकदम मिटून घेतले.

हां एक मात्र शक्य आहे . त्या परमेश्वराचा अंशात्मक अनुभव तुम्हाला मिळू शकतो. जीवनचक्रामध्ये प्रत्येकाला मिळणारा आनंद – समाधान-शांतता अर्थात सत् चित् आनंद हेच तर त्या परमेश्वराचे स्वरुप होय. ह्यालाच म्हणतात Reality of Consciousness वा  सत्याची जाणीव

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-  bknagapurkar@gmail.com

अमेरिकेतील एक – – Dating Center

जीवनाच्या रगाड्यातून-

अमेरिकेतील एक – – Dating Center

(डेटींग — मनाची उकल संकल्पना )

अमेरीकेत मुलाकडे सहा महीन्याचा मुक्काम होता. रोज सकाळी मुलगा ऑफिसला जाताना मला जवळच्या वाचनालयांत सोडून देत असे. माझी सून मला तीन तासाने घेण्यासाठी येई. दररोजचा हा कार्याक्रम शिस्तबध्द चालू होता. एक दिवस कादंबरी वाचून संपली. वाचण्याचा कंटाळा आला. आणखी एक तास तेथेच थांबणे गरजेचे होते. थोडेसे पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडलो. समोर बाग होती. तेथे फेर फटका मारला.

बागेच्या दुसऱ्या टोकाजवळ एक मॉल प्रमाणे वास्तू होती. बाहेरचा बोर्ड वाचला. Glee Dating Centre Club. मला त्या वास्तूचा व कार्यप्रणालीचा लगेच बोध झाला नाही. बराच वेळ दुरुन बघत राहीलो. क्वचित वेळी कांही स्त्री-पुरुषांची ये जा दिसून आली. आपण परकिय. त्या परिस्थितीबद्दल अज्ञानी. गम्मत म्हणून कशाचा आहे हा क्लब याची चौकशी करावी, माहिती घ्यावी हा विचार डोकावला. मनाशीच हासलो. वयस्कर असल्यामुळे जेष्ठत्वाचा फायदा घेत हिम्मत केली.

तेथे गेलो. एका भव्य टेबलाजवळ दोन कपाटे होती. तीन खुर्च्या व एक कंप्युटर, फोन इत्यादी गोष्टी दिसल्या. समोर भव्य हॉल, फर्नीचर, मासीके व वर्तमानपत्रे पडलेली दिसली.  एक वयस्कर रिशेप्शनिस्ट बसली होती. कंप्युटरवरुन ती कांही रेकॉर्ड बघून नोंद वहीत नोंदी घेत होती. मी जवळ जाताच तीने माझे स्वागत केले.    ” May I help you Sir ? ”  तीने प्रश्न करीत मला मदत करण्याचे व्यक्त केले. मी नुसते स्मित केले. तीला काय विचारावे हे मलाच माहीत नव्हते.  ” What is this club ? ”  मी विचारले.     ” It’s a Dating Centre Sir ” ती म्हणाली.  मला डेटींग विषयी मुळीच  माहिती नव्हती, फक्त इंग्रजी सिनेमातून थोडेसे कळले होते. पण माझे अज्ञान तिच्यासमोर व्यक्त होणे, हे पण खेदजनक वाटले. ” Ya ! Ya! Is it that ” म्हणत मी फक्त मान हालवली. असे का ?  परंतु मी बघीतले की मी त्या वातावरणांत अपरिचीत होतो. परकिय होतो. तीने सहकार्य केले. मी जेथून आलो, त्या भागात, डेटींग ह्या संकल्पनेविषयी कमीच माहीती असते हे तीने जाणले.

तीच्याकडून जी माहीती मिळाली, त्याची खूप गम्मत वाटली. माझ्यासाठी तो एक चिंतनाचा विषय वाटला. सर्वांत महत्वाचे म्हणजे ती संकल्पना तेथील  सामाजीक, कौटूंबीक, वातावरणात  स्थिर झालेली होती. मान्यता पावली होती, रुळली होती. आज तरी तसल्या गोष्टी भारतीय संस्कृतीमध्ये आणणे केवळ कठीण नव्हे, तर अशक्य आहे. जसे ३ हा आकडा व ६ हा आकडा आपआपले वैशिष्टे बाळगून आहेत. परंतु दोघांचे अस्तित्व एकमेकाच्या एकदम विरुद्ध दिसते. ह्याची जाणीव ठेवणे फार महत्वाचे. दोन्हीही संस्कृतीमधली पाळमुळ, मुळतत्व, वैचारीक बैठक, यांचा आधारच भिन्न आहे.

त्या रिसेप्शनिस्टकडून कळले की तेथे अनेक स्वतंत्र खोल्या व खाण्यापिण्याच्या   (विशेष करुन पिण्याच्या )  सोई होत्या. लोक फोन करुन खोल्या ठरलेल्या वेळेसाठी आरक्षित करीत. मित्रांनी, नातेवाईकांनी, अपरिचीतांनी, कुणीही, तेथे यावे ही संकल्पना.  डेटींग ह्या नावाविषयी इंग्रजी सिनेमातून थोडेसे कळले होते.

तेथील कर्मचाऱ्याकडून कांही माहिती मिळविण्याचा मी प्रयत्न केला.  थोडेफार त्यानी सांगीतलेले  ” Dating  ”  बद्दलचे वर्णन आणि मला जे समजले ते असे होते.  कदाचित् ती त्या संस्थेच्या कार्यप्रणाली व हालचाली संबंधी असेल.

Dating  ची त्यांची प्रमुख संकल्पना होती

जोडीदार आणि संवाद “.

निसर्गनिर्मीत जीवनचक्रांत केव्हांच बदल झालेला नाही. अथवा होणार नाही. मात्र जगण्याच्या संकल्पना, मार्ग, पद्धती, बदलतात. ती काळाची गरज असते. शिव पार्वती यांच्या विवाह पद्धतीपासून आजतागायत जोडीदार निवड व विवाह चालत आलेले आहेत. स्वयंवरा पासून आजपर्यंत जोडीदार पारख व निवड हे विविध पद्धतीने होत आलेले आहेत. धर्म- संस्कृती आणि समाज ह्यांचा ह्या पद्धतीवर प्रभाव पडत गेलेला आहे.

जोडीदाराची पारख, निवड आणि एकत्र सहजीवन घालवणे ह्या गोष्टी महत्वाच्या. पूर्वीच्या काळी सामाजीक संकल्पनेनुसार जोडीदार निवड ही आई-वडील, पालक, वा मित्रमंडळी यांच्या मार्फत होत असे. त्याकाळी घराणे व आर्थिक चौकट हे प्राधान्याचे पैलू होते. आज चित्र पूर्ण बदललेले दिसते. प्रत्येकजण आपला जोडीदार स्वतःच निवडतो व सहजीवन व्यतीत करतो. शिक्षण, बौद्धीक उंची, कर्तृत्व, योग्यता, व वैचारीक झेप ह्या बाबी महत्वाच्या होऊ लागल्या. पुर्वीचे कस आज दुय्यम झाले आहेत.

ह्याच वेळी एक अलिखीत परंतु अत्यंत महत्वाचा दृष्टीकोण दिसून येत आहे. जो आपला जोडीदार असेल त्याची विचारसरणी, स्वभाव ठेवण , आवडी निवडी, आपल्याशी मिळती जुळती असतील कां ? हे अत्यंत बारकाईने बघीतले जाते. समजुन घेतले जाते.

कसे साध्य व्हावे हे महत्वाचे परिक्षण ?. कारण हे स्वतःला दिसले पाहीजे, कळले पाहीजे, मान्य झाले पाहीजे. ह्यात कुणाचा दबाव, रद्-बदली नसावी. परिक्षण केवळ मानसिक समजावर न राहता, आत्मिक स्थरावर बिंबले पाहीजे.

जोडीदार     – – म्हणजे नविन मित्र निर्माण करणे. ह्यात पुन्हा आगदी सख्यातले, जवळचे, ओळखीचे आशा चौकटी असत. सख्यातल्या कुणाची तरी निवड जन्मसाथीदार म्हणून असते. अर्थात त्याच्याशी विवाहाचे बंधन अडकवणे हे होत असे. परंतु हे सहज झाले व ठरले ही संकल्पना नव्हती.  डेटिंग सेंटर मध्ये सभासद म्हणून नोंदणी नोंद केली जाई.  एखाद्याची पारख जर मनाला पटली, भावली, आणि जोडीदाराचे स्वभाव गुणधर्म आपल्या स्वभावाशी जुळतील याची खात्री वाटली तर ती व्यक्ती अशाना आपला जन्मसाथीदार म्हणून निवडत असे. इच्छुक व्यक्ती तेथे सभासद होताना आपली संपुर्ण माहिती ( Bio-data in detail ) देत असत. त्याच प्रमाणे अपेक्षीत जोडीदार कसा असावा हे ही दिले जायी.

आपसातील भेटींचा गाभा हाच मुळी जोडीदार याची निवड व पारख  ह्या ध्येयावर आधारलेला असतो. त्यात विश्वास आणि आपुलकी ह्याची निर्मिती होणे अत्यंत गरजेची अपेक्षा ठरते. कुणाचा कोणताही भावनीक अतीरेक त्या योजलेल्या भेटीला तडा देऊ शकतो. शिवाय समोरच्यामधील मानसिक, बौद्धीक, भावनीक आणि स्वभाव जाणून घेण्यासाठी एक नव्हे अनेक भेटी ह्या सहमतीने होतात. त्यामुळे परिस्थिती टिकवून ठेवण्यासाठी वागणूकीतील चांगुलपणाची काळजी घ्यावी लागते. अततायीपणा करुन चालत नाही.

परंतु त्या संस्कृतीमध्ये, संस्कारामध्ये, अधुनिकता, मोकळेपणा, हाच पाया ठरलेला आहे. तेथे भाव विचार व्यक्त होत असताना, शारीरिक हालचालीकडे सहजगत्या दुर्लक्ष केले जाते. कांहीजण तर सहविचाराने शारीरिक आवयवांची तपासणी वा चाचणी देखील करुन घेतात. अनेक वेळा

शरीरातील जन्म दोष, विकृती, Congenital Deformity  वेळीच न कळल्यामुळे त्याचा भावी आयुष्यावर विपरीत परीणाम होऊ शकतो. योग्य तपासण्यामुळे हे टळू शकते.

” थोडासा संकोच आणि जीवनभर खंत सोसणे “  हे त्यांच्या संस्कृतीला अमान्य असते.    

जोडीदाराची जीवनसाथी म्हणून  निवड हे  Dating Centre मार्फत पुर्ण केले जाते.

संवाद   – –

तसेच चांगले मित्र मिळवणे ही संकल्पना देखील तेथेच तयार होते. खरा मित्र, प्रिय मित्र ही बाब वेगळीच पडते. आगदी जीवनसाथी प्रमाणेच हा मित्रपण संपर्कांत हवा. आपल्या सुख दुःखातील प्रत्येक घटनेमध्ये सहभागी हवा. वैचारीक भावनीक वादळामध्ये खऱ्याअर्थाने सांत्वन करणारा, वा आनंदातही आपल्याला साथ देणारा असावा. त्या मित्राची जवळीक ही केवळ मानसिक स्थरावरची हवी. शारीरिक संपर्क त्यात येऊ नये. जीवनसाथीदाराच्या शारीरिक सुखाच्या अपेक्षा, त्या मित्राच्या वागण्यात नसाव्यात. ही काळजी, मित्र भेटीत Dating मध्ये घेतली जाते.

स्त्रीपुरुषांचा एकांतातील संपर्क, मोकळेपणा, भाव व्यक्त होण्याच्या प्रक्रियेत, अनेकदा वेगळे परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच वातावरणांत शारीरिक संबंध होण्याची दाट शक्यता असते. परंतु हे त्यांच्या मानसिक मान्यतेवर अवलंबून राहते. ह्यांत बळजरी होऊ शकत नाही. संस्था याची काळजी घेते. सतर्क नजर ठेऊन असते.

त्याच बरोबर पाश्चिमात्यांची स्वैर विचारसरणी वा वागणूक असते. त्यांची  तयारी, बैठक इतकी रुजलेली असते की हे त्याना कांहीच वाटत नसते. जीवनाचा त्यानी हा एक भाग स्विकारलेला आहे. त्यामुळे कुणाबरोबर भेट झाली, Dating झाले, हे सारे ते अत्यंत सहजतेने घेतात.

जोडीने, स्त्री अथवा पुरुष, मित्रांनी. नुकतीच ओळख झालेली वा एकदंम अपरिचीत व्यक्तीं तेथे  येतात. कांही काळ घालवावा, आपल्या मनातील विचार, भावना, दुसऱ्यासमोर मोकळेपणाने व्यक्त करावे. आपल्या मनातील वैचारीक तुफान अथवा आनंदी लाटा ह्या व्यक्त करुन त्या भावनाना मार्ग द्यावा. मन हलके करावे. हा प्रमुख भाग होता.

वैचारीक स्थरावर मन मोकळे करणे, ही संकल्पना आपल्याकडेही पुर्वापार चालत आलेली आहे. मानसिक स्थरावर वैचारीक देवाण घेवाण करीत आलेलो आहे. आज देखील कुणीही व्यक्ती जेंव्हा दुसऱ्या व्यक्तीला भेटतो, त्याच्या मधला जर संवाद जाणला तर ते विचार सांगणे व त्या योगे मन हलके करणे, हाच प्रकार असतो. — हे अस झाल. –तो तसा म्हणाला.—तो तसा वागला.—त्यानी असे केले.—ही घटना अशी घडली.—त्याला हे जबाबदार.—त्याच वागण चुकल.—चांगल वाटल.—इत्यादी. संसारीक घटनांचाच उहापोह करतो. आपल्या समजण्यानुसार आपली मते व्यक्त करतो. हेच सर्व साधारण घडते. घटनेतील राग लोभ प्रेम इत्यादी भावनाना शाब्दिक आकार देत त्या व्यक्त करतो.

जर त्या कुण्या विचारांचा वा भावनेचा आपल्या मनावर आघात झाला असेल तर आपण ते सारे समोरच्या व्यक्तीकडे व्यक्त करतो. आशी समज की त्याने मन हालके होते. मनावरचा ताण कमी होतो. तणाव कमी झाला की मनामुळे जे मानसिक विकार शरीरावर होण्याची शक्यता असते, त्या पासून सुटका होते.

एका शेतकऱ्याची छोटीशी गोष्ट ऐकली होती. शेतात काम करताना एकदा दुर अंतरावर त्याने एक चमत्कारीक घटना बघीतली. तो चकीत झाला. कांहीतरी अघटीत झाल्याचे त्याच्या लक्षांत आले. तो ती गोष्ट सांगण्यासाठी पळतच शेजारच्या शेतात गेला. परंतु क्षणातच त्याच्या मनांत विचार चमकला की हे मी दुसऱ्यास कसे वा कां सागू . एक भिती, एक शंका, आणि अनिश्चीतता ह्या भावनेनी तो पुरता गोधळून गेला. कांही न बोलता तो परतला. त्या बघीतलेल्या घटनाचे तुफान त्याच्या मनात सतत उठू लागले. तो बेचैन झाला. परंतु वाच्यता करण्यात हातबल राहीला. विचारांची वादळे शांत होईनात. मन तगमगत राहीले. तो आजारी पडला. गांव वैद्यानी तपासले. हा मानसिक आजार आहे. त्यानी आपले मन सतत तणावात ठेवले आहे. ते मोकळे जेंव्हा होईल, त्याला बरे वाटेल.

त्याचे विचार कसे व्यक्त होणार. कारण कोणात्यातरी अनामिक भितीत, शंकेत, ते वावरत होते. त्याचे हे द्विधा झालेले मन त्याच्या एका मित्राने जाणले. त्यानी उपाय सुचविला.

शेतकरी नदीकाठच्या एका निर्मनुष्य जागी गेला. तेथे एक मोठे रोपटे होते. वृक्ष मित्र असतो ना.

त्याला जवळ केले. त्यानी जे बघीतले होते ते सारे त्याने त्या रोपट्याला सांगीतले.

बस चमत्कार झाला. शेतकऱ्याचे मन हालके झाले. तणावमुक्त झाले. तो आनंदून गेला. त्याच्या मनात घोंगावणारे विचारांचे तुफान निघून गेले. तो चांगला झाला.

आपल्या खेडवळ शब्दात सांगायच तर गप्पा मारणे, सटाके मारणे, पुड्या सोडणे, टर्रे उडवणे, इत्यादी. येथे शब्दांत विनोदबुद्धी, गमतीने वर्णन केले असेल. म्हणतात- –  एक हात लाकूड तर नऊ हात धिलपी – – ही रचना असेल. तरी  त्यातील थोडे का होइना,  सत्य बाहेर येणे महत्वाचे ठरते. मग तो व्यक्त मार्ग कसा का असेना. मानसिक तणाव तुफान निर्माण करतो. व्याधीना कारण बनतो. ते मन हलके होत जाणे, तुमचे विचार कोंडून न राहता, प्रवाहीत होणे हीच मन मोकळे करण्याची संकल्पना.

मला बालपणीचा एक प्रसंग आठवतो. मी मामाबरोबर रेल्वेने जात होतो. समोरच्या बाकावर एक कुटूंब बसले होते. मामा बोलके. त्यानी त्या कुटूंबाचा परिचय विचारला. कोठे जाणार ? काय करता ? हे झाले. हवा, पाणी शेती पिके ह्या गोष्टी झाल्या. नंतर मामा गंभीर झाले. त्यांच्या लहान भावाचे नुकतेच निधन झाले होते. मामानी त्या भावाबद्दल, त्याच्या वागण्याबद्दल, कामाबद्दल, बरेच कांही त्या अपरिचीत कुटूंबाला सांगीतले. काय हेतू होता मामांचा  हे सारे सांगुन ?  कोणताही नाही. फक्त आपल मन हालक करण्याचा. कोणत्या तरी स्थरावर लपून बसलेला मानसिक तणाव कमी करण्याचा. मग ह्यात वर्णन करताना मिळालेला आनंद वा आठवणी, यानापण उजाळा दिला गेला.

कदाचित् हे एकतर्फी असेल. कारण त्या समोरच्या कुटुंबाला त्याचे कांही देणे घेणे नव्हते. परंतु ते ऐकणाराची भूमिका व्यवस्थीत पार पाडीत होते. मामाच्या बोलण्याकडे लक्ष देत होते. सहकार्य करीत होते. हाच तर त्यांच्या संवादाचा आत्मा होता.

बोलणे, विचार भावना व्यक्त करणे हे जेवढे गरजेचे, तेवढेच त्यांचा स्विकार कुणी तरी सतर्कतेने करावा, ही भावना अत्यंत महत्वाची. भाव- विचार व्यक्त होण्यास बोलणारा तसाच ऐकणारा असावा लागतो. पुर्वीच्या काळी प्रवासांत, बागेमध्ये, शेतात, समारंभात, कोठेही माणसे समोरच्या माणसाचा प्रथम थोडा परिचय करुन घेत. मग वैचारीक देवाण घेवाण होई. मन हालके होत असे. समाज वा कुटूंब जसजसे कार्यबाहूल्यांत व्यस्त होऊ लागले, मग्न होऊ लागले. ही विचार व्यक्त संकल्पना लोप पावू लागली. परिणामी मानसिक तणावामुळे उत्पन्न होणाऱ्या व्याधी वाढू लागल्या हे दुर्दैव.

सामान्यपणे माणसे गप्पाटप्पा, घटनांच्या विषयांची माहितीची देवाण घेवाण करतात. ह्यापेक्षा जास्त खोलवरच्या स्थरावर  आपसातील संवाद   ही  फार मोठी मानसिक संकल्पना आहे. चंचल मनाकडून अनेक घटनांचा जन्म होत असतो. मन हे विचारावर, भावनांवर, बुद्धीवर, देखील आरुढ होत असते. आवडो वा न आवडो शेवटी ते माझेच, स्वताःचेच माझ्या शरीरांतील एक भाग   असते. त्याला मान्यता द्यावीच लागते. मात्र मन मनालाच प्रश्ने विचारते. ” हे असे कां  ? ”  ”  हे योग्य आहे का ? ”  ”  हे अयोग्य आहे का ? ”  ” हे जीवनाचे व्यक्तीमत्व वाढवेल का ? ”  ”  जीवन सुखकर वा दुःखकर होईल का ? ”  ”  कुणावर मी विश्वास करावा ? ”  ”  येत असलेले विचार बदलत कां राहतात ? ”  ”   मन नेहमी संशयाच्या चक्रांत का राहते ?  ”   ”  कित्येक गोष्टी पटल्या, आवडल्या, तरी मन शासंक का असते ? ”   —- इत्यादी अनेक अनेक मनाच्या वागण्याची उकल करताना व्यक्ती खुप उत्सुक असतो. त्याच्या ह्या व अशा प्रश्नांची सोडवणूक केवळ चर्च्या करुनच होऊ शकते. मानसिक संवाद हाच याचा प्राण असतो.

ह्याचाच एक भाग म्हणजे  Dating  ची कल्पना.

एक साहित्यीक, ज्ञानी कथा कादबऱ्या मासिके वृतपत्रे वाचून अनेकांचे विचार जाणून घेतो. तर अनेकजण ते गप्पा मारुन व्यक्त करीत असतात. ह्यांत एकच नैसर्गीक साम्य दिसते. दोघानाही मनाचा करिश्मा- अविष्कार जाणण्याची ओढ असते.  गप्पाटपा विषयांची, प्रसंगांची माहिती हे सामान्य होय.  ह्याच्यापेक्षा जास्त खोल स्थरावरच्या बाबी सांगणे वा एकणे वेगळे. तसा संवाद-प्रतिसाद अपेक्षीला जातो. मनामध्ये रुजलेल्या विचारना उद्युक्त केले जाते. ज्यात निर्माण झाल्या असतील आवडी निवडी, ओढ अत्मियता, तिरस्कार घृणा, प्रेम लोभ इत्यादी भावना. सहजगत्या ज्याचे वर्णन करणे सामान्याना शक्य नसते. त्या स्थरावर देखील ऊतरुन वैचारीक भावनीक देवाण घेवाण वा मार्ग दर्शनाची छुपी अपेक्षा त्यामध्ये असते. जीवन जगण्याच्या द्दष्टीकोणाचा तेथे उहापोह होतो. जवळचा जोडीदार वा लग्नासारख्या बंधनानी बांधला गेलेल्या व्यक्तीबरोबर देखील कांही चर्चाना मर्यादा ठरतात. तुमच्या प्रत्येक शब्दामधून अप्रत्यक्ष तुमची आवड, इच्छा, व्यक्त होत असते. त्या कदाचित् तुमच्या स्वभावाची ठेवण दाखवितात.

सर्वाना अशा प्रकारचे संवाद वा मनाचा सत्य मोकळेपणा आवडतो. परंतु ज्या वेळी समोरचा जोडीदार पती वा पत्नी ह्या भूमिकेत असतो, त्याला ह्या मोकळेपणाच्या बाबी पचनी पडत नसतात. त्याना ब्रेक लागतो.  हा संस्काराचा वा धर्माचा कदाचित् प्रभाव असू असेल.

Dating  ची संकल्पना ही वैचारीक आणि एका मर्यादेपर्यंत भावनिक स्वातंत्र्याला मान्यता देते.पाश्चिमात्य लोकानी त्यांच्या संस्कृती, सामाजिक, कौटूंबीक जडन घडन इतकी बदलून टाकली की त्या ठिकाणी कुणाच्याही विचारांना, भावनेला आणि म्हणून वागण्याला पायबंद राहात नाही.    ”  मी काल माझ्या बालपणीच्या मित्राकडे Dating ला गेले होते. रात्री घरी येणे जमले नाही. ”   असे वाक्य स्वताःच्या नवऱ्यासमोर सांगते. नवरा देखील हासून  “बरी आहेस ना तूं ”   अस हासून म्हणतो. कोठेही खंत व्यक्त करीत नाही. कारण हे त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक अंग झालेल आहे.  तीकडे जर ज्यास्त चौकशीच्या मागे कुणी गेला तर एकमेकापासून ती कुटूंबे आलिप्त होण्याचा मार्ग लगेच घेतात. ही त्यांची स्वाभाविक मानसिकता झालेली असते. त्यांच्या समाजालाच नव्हे तर देशाला ते मान्य असते.

अमेरिकेतील Dating Centre  चा उद्देश, तत्वज्ञान, मानसिक विचार स्वातंत्र्याला वाहून घेतलेली संकल्पना ही योग्य व खूप पुरोगामी ( अधुनीक ) वाटते. परंतु आजतरी त्याचे दृष्य परिणाम जे दिसून येतात ते भयानक व निराशजनक वाटतात. कारण  Divorce rate in US and UK हा जवळ जवळ  90 % झालेला आहे असे म्हणतात. कदाचित् आपण त्यालाच उध्वस्त कौटूंबीक परिणाम म्हणतो ते योग्य नव्हे काय .

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-  bknagapurkar@gmail.com

आनंदी किटक.

जीवनाच्या रगाड्यातून-

 

आनंदी किटक.

 

सहसा घर सोडून जाण्याचा प्रसंग येत नसे. त्यामुळे दैनंदिन चालणारय़ा गोष्टीमध्ये बाधा येते ही खंत. असेच १५ दिवस घर बंद करुन सर्वानाच गांवाकडे जाणे भाग पडले. आज घरी परत आलो. घर सारे कड्या कुलपे लाऊन बंद करुन गेलो होतो. दारे उघडताच एक उग्र वास दरवळत असल्याचे जाणवले. थोडीशी मोकळी हवा येताच सर्व हवेचे वातावरण पूर्ववृत होऊ लागले.

वयानुसार दररोज देवपूजा हा एक परिपाठ होता. जीवनाच्या व्यवहारामध्ये अर्धातास देवपूजेसाठी राखून ठेवला होता. केवळ समाधान व मनःशांती मिळण्यासाठी. हा एक मनाच्या विश्वासाचा व श्रद्धेचा प्रश्न. मनाची एक धारणा झाली होती की कोणती तरी शक्ती, उर्जा शक्ती असते, जीच्यामुळे जगातल्या सर्व व्यवहारांचे नियमन होत असते. निसर्ग म्हणा वा ईश्वर. नांव, वर्णन हे मला सदैव गौण वाटले. मात्र परिणाम दृष्य वा अदृष्य स्वरुपांत जे सतत होतात, ते तर मान्य करावयांसच हवे. त्या शक्तीमान अस्तित्वाला अभिवादन करणे, सन्मानित करणे मनास समाधान देणारेच असेल. ती शक्तीस्वरुप म्हणून जाणने जास्त महत्वाचे. मात्र तीच्या आकार, रंग रुप इत्यादी मार्गाने गेल्यास मन सतत शासंक व अशांत असणार.

संतश्रेष्ठ श्रीतुकाराम महाराजानी म्हटल्याप्रमाणे  —

कांसेची केली अंबा      परी कांसे नव्हे जगदंबा

अंबेची पूजा अंबे घेणे    कांसे राही कासेपणे. //

पाषाणाचा केला विष्णू     परी पाषाण नव्हे विष्णू

विष्णूची पूजा विष्णूसी अर्पे     पाषाण राहे पाषाण रुपे  //

केला मातीचा पशुपती     परी मातीची काय महती

शिवपूजा शिवासी पावे   माती मातीत समावे  //

 

देवघरांत डोकावले. सर्व देवाना नमस्कार केला. देवघरांतील वातावरण बघून मन त्या क्षणी खिन्न झाले. सर्वत्र जाळे, जळमटी, दिसत होते. किडे मुंग्या झुरुळे, कोळी यांच्या हलचाली सर्वत्र दिसत होत्या. दोन आठवडे तेथे झाड झुड नव्हती. वरदळ नव्हती. स्वच्छतेची कोणतीच मोहीम नव्हती. छोट्य़ा छोट्या त्या प्राण्यासाठी एक रान मोकळे केलेले होते. अनेकांनी जसे जमेल व जसे निसर्गाने शिकवले असेल त्याप्रमाणे आपापली घरटी बांधलेली होती. स्वैर आनंदी जीवन जगण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

माझ्या दृष्टीने एक अस्वच्छ वातावरण. सर्वत्र कचरा घुळ, घाण यांचेच साम्राज्य. एका पवित्र अशा देवघरांत ईश्वराचे जेथे सान्निध्य असल्याची भावना, श्रद्धा तेथे अस्वच्छ परिसर ह्या कल्पनेने मन निराश झाले. स्नान करुन शुचिर्भूत झालो. व देवघरांत गेलो. हाती केरसुनी घेऊन सर्व स्वच्छ केले. जाळी जळमटी काढून टाकली. ओल्या फडक्याने पुसून घेतले. नंतर नेहमीच्या पद्धतीने देवांची पूजा केली. उदबत्ती दिवा लावला. नेहमीप्रमाणे पूजा झाल्यानंतर दाराशी पाटावर बसून चिंतन करणे, मंत्र श्लोक म्हणने ही सवय. एकाग्र चित्त करण्याच्या प्रयत्न्यात होतो. पण मन शांत होत नव्हते. देव घरांत सर्वत्र बघत होतो.

 

अचानक कांही कोळी, एक दोन झुरुळ कोठून तरी तेथे आल्याचे दिसले. कदाचित् त्यांची घरे जी स्वच्छता मोहीमेत काढून टाकली गेली, त्याचा आढावा ती घेत असावी. त्यांच्या भावना, त्यांचे विचार कळण्यास मार्ग नव्हता. मात्र त्यांच्या हालचालीवरुन त्यांच्या खिन्न तगमगीचा अंदाज येत होता.

माझ्या मनासाठी ते देवघर, एक मानवनिर्मित थोडीशी वेगळी व स्वतंत्र जागा. तेथे पुजेशिवाय शांत बसून ध्यान घारणा करणे, भजन करणे, नामस्मरण करणे, पाठ केलेली वा वाचलेले मंत्रविधी करणे, हे प्रमुख चालायचे. सत् चित् आनंद मिळविण्याचा प्रयत्न असायचा. समाधान आणि शांतता हे मनाचे गुणधर्म. त्यातील आनंद हेच ईश्वरी प्रतीक असते. आनंद हा लाटेत वा लहरीमध्ये वातावरणांत उत्पन्न होतो. त्या जागेत शिरताच त्याची अनुभूती येते. तो सर्वासाठी अर्थात प्रत्येक जीवांसाठी तसाच असतो. आनंदी वातावरणांत शिरतांच त्या आनंदी लाटा तुम्हास आनंदी करतातच. कारण आनंद चैतन्यस्वरुप असतो. मग तो आनंद जसा मला मिळत होता, तसाच त्या किटकांना, क्रिमीना देखील निश्चीत मिळत असावा. म्हणूनच त्या आनंदमय वातावरणांत ते सर्व तेथेच आपापली घरे, संसार त्यांच्या पद्धतीने साजरे करु इच्छीत असावे. कदाचित् त्यांच्या आनंदाला मी माझ्या स्वार्थबुद्धीने अडकाठी आणत होतो. त्याचमुळे मी समाधानाला, शांततेला वंच्छीत राहीलो असेल. मज जवळ त्याचे उत्तर नव्हते. डोळे मिटून मी त्या वातावरणामधील मिळणारय़ा आनंदाप्रमाणेंच मनास शांत करण्याचा प्रयत्न करीत बसलो.

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-  bknagapurkar@gmail.com

 

मी हे करीत नव्हतो

जीवनाच्या रगाड्यातून-

 

मी हे करीत नव्हतो

 

चार वर्षानंतर माझी मुलगी माहेरी आली होती. व्यवसायात व्यस्त असल्यामुळे तीला येणे जमले नव्हते. माझ्या नातीला म्हणजे तीच्या मुलीला घेऊन ती येणार असल्यामुळे, आम्ही सर्वजण उत्सुक होतो. मी आरामखुर्चीवर बसून त्यांची वाट बघत होतो. बेल वाजली. त्या दोघी सामानासहीत आल्या.

नातीने आत येताच माझ्याकडे कटाक्ष टाकून ” हाय ” म्हणत स्मित केले व ती आत बाथरुममध्ये गेली. हात पाय धुऊन Fresh झाली व बाहेर आली. ” हाय आजोबा ” म्हणत माझ्या जवळ आली. आपला हात पुढे करीत शेक हँड करण्याची इच्छा प्रदर्शीत केली. मी मनांत थोडासा निराशलो होतो. तीने येताच पाया पडावे व माझा आशिर्वाद घ्यावा ही मनातील इच्छा. पण कसचे काय ? ती इतक्या वेगाने आली व मला भिडली की मला तीच्या शेक हँडला प्रतिउत्तर देत स्वागत करावे लागले. ती बराच वेळ माझा हात धरुन हालवित राहीली. मग तीने माझ्या कपाळाचे चुंबन घेतले व चक्क गळ्यात पडली. ” Oh my great grand-pa- आजोबा. माझेच दोन्ही दंड हाताने धरीत म्हणाली. कसे आहात आजोबा. Health is OK आहे ना ? आहो Be active आणि Smart. माणसाने कसे टवटवित असाव आणि दिसाव. You have to reach the Century of life man. आणि ती मोठ्याने हासली. नंतर ती मजकडे मिश्किलतेने पहात राहीली.

तीच वागण माझ्या मनासारख, माझ्या कल्पनेप्रमाणे नव्हत. म्हणून ते माझ्या पचनी पडत नव्हते. परंतु ते जास्त प्रेमदर्शक, आपूलकीचे, आणि मनावर सुखकारक घावघालणारे     मात्र होते. माझ्या वैचारीक ठेवणीतील नव्हते. माझ्या स्वताःच्या, आणि वडीलोपार्जीत परंपरेनुसार नव्हते. ज्यांत निश्चीत असायचे प्रेम, व्यक्त व्हायचा आदर, वडीलधाऱ्याना भरपुर सन्मान देणारे. आणि ही नात, व्यक्त करीत होती तेच प्रेम भिन्न प्रकारे. तशीच आपुलकी जवळीक साधून. ती मनाच्या खोलीत शिरत होती. मात्र तेथे आदर, सन्मान ह्या श्रेष्ठत्वाच्या भावनीक दऱ्या नव्हत्या. ” जशी माझी आई, तसेच माझे आजोबा ”  ह्या स्थरावर तीने उडी घेतल्याचे जाणवले.

माझे डोळे तीच्या व्यक्त प्रेमाणे पाणावले. मी तीला जवळ केले. पठीवरुन डोक्यावरुन हात फिरवला. ती जवळ समोरच्या स्टूलवर बसली. ” मी आता ५ वीत गेले. English medium आहे. मराठीपण शिकते. ”

” छान. तुला एखादी कविता पाठ आहे कां ? ” मी

” अं नाही, मी पहीली पर्यंत शिकताना Twinkle   Twinkle   little star, Ba Ba Black Sheep, Humpty Dumpty , पाठ केलेले होते. ते आजूनही पाठ आहे. ते म्हणू मी आजोबा ”

” नको, त्या कविता आता नको. सध्याच्या कोणत्या कविता पाठ केलेल्या आहेत कां ? ” मी.

” नाही एकही पाठ नाही. आमच्याकडून तसे पाठांतरही करुन घेत नाहीत. ” ती गप्प झाली. मला तीच्या ह्या वैच्यारीक ठेवणीची खंत वाटली.

” अग पाठांतर तर हवेच ना. माझ्या शाळेच्या वेळी ज्या कविता आम्ही पाठ केल्या होत्या त्या आजही आठवतात. ”

मी लगेच कविश्रेष्ठ वामन पंडीताची शार्दुलविक्रीत चालीवरली कविता म्हणून दाखविली. कवितेतील शब्द, भाषा, उच्यार साधून, हातवारे करुन, ती खड्या आवाजात म्हणून दाखवली. नातीच्या चेहऱ्यावर आश्चर्य व कौतूक उमटल्याचे जाणवले. ” You are a Great आजोबा.

मी हे कधीच ऐकले नव्हते. हे वामन पंडीत कोण होते, मला माहीत नाही. पण खुप आवघड आहे सारे. मला तर कांहीच कळले नाही, ते काय म्हणाले. ”

त्याच क्षणी मीपण मनातून चरकलो. कारण माझे पाठांतर, शब्द जंजाळ, जरी परीणामकारक व भारदस्त वाटले तरी त्याचे अर्थ, काव्यभाव मला केव्हांच कळलेला नव्हता. अनेक कविता, श्लोक, रामरक्षा, भगवतगीतेमधले कांही अध्याय आम्ही मुखोद्गत केले होते. धाड धाड ते उच्चारत आम्ही म्हणत असू. सांगणारांनी पण आमची क्षमता दुर्लक्षित करीत ते पाठांतर कसे होइल ह्याकडेच लक्ष केंद्रित केले. सध्या पाठांतर करा. अर्थ समजण्याच्या मागे लागू नका. पुढे मोठे झाल्यावर सर्व अर्थ कळतील. ही त्यांची वैचारीक शैली. पाठांतर होत गेले. अर्थबोधसाठी मात्र आज तागायत वंच्छीत राहीलो.

माझी वैचीरीक तंद्री नातीनेच मोडली.

” आजोबा तुम्हाला English कवी Wordsworth माहीत आहे कां ?   ” हो ” मी म्हटले.

” आहो तो खरच काय Great Poet होता. त्याला निसर्ग कवी म्हणतात. त्याने एक Butterfly वर कविता लिहीली. टिचरनी आम्हाला सांगीतली. पण मला ती पाठ नाही. काय म्हणतो तो कवी. सांगू तुम्हाला. “- – – हे बघा किती सुंदर आहे हे फुलपाखरु. – – – कसे रंग बिरंगी त्याचे पंख आहेत. – – – त्यावर कसे टिपके टिपके काढलेले दिसतात. देवाची ही महान कला बघताना, किती आनंद होतो. आणि ते फुलपाखरु नाजुक नाजुक आहे. फुलांच्या नाजुक पाकळ्यावर किती अलगद बसते. फुलपाखरु स्वताःला जपते, तसेच त्या फुलाना देखील. कारण दोघेही नाजुक असतात म्हणून. – – – किती छान कल्पना आहे, त्या कविची आजोबा. ” नात,

तीने तीच्या टिचरकडून ऐकलेले सारे रसग्रहण, तन्मयतेने मला सांगतले. कांहीही न पाठ केलेले, परंतु संपूर्ण समजलेले. नव्हे तीने हे जाणलेले.

मी नातीकडे लक्ष केंद्रित करीत, सारे ऐकत होतो. कवितेप्रमाणेच तीलाही जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होतो. मी कवितांच्या पाठांतरा भोवती घिरटिया घालीत होतो. ती मात्र तीचे मैदान कविता सार, त्यातील भाव, त्यातील तत्वज्ञान, ह्यावर रपेट मारीत होती. हे सर्वसामान्याना सोपे नव्हते. त्यांत मेहनत, एकाग्रता, आणि समज ह्याचे प्रचंड एकीकरण होते.

माझी धाव फक्त मनापर्यंत, जेथे विचारांची गर्दी असते. तर नात अप्रत्यक्ष आत्म्यापर्यंत झेप घेत असल्याचे जाणवले जेथे फक्त भावनीक साम्राज्य होते.

बदलत्या पिढीला काय हवय असत ?

“तुमच फक्त चांगल असण ” To set an example that you are a good great.

कारण प्रत्येकजण चांगल आणि मोठ ( A good great ) होण्याचा प्रयत्न करीत असतो.

– – – मात्र तुमच चांगल बोलन, चांगला उपदेश, तत्वज्ञान, संस्कृती, धर्मज्ञान, वागणूक, घराण्याच्या परंपरा इत्यादी , ह्या सर्व गोष्टी दुय्यम ठरतात.

जीवन चक्र सतत चालते. रोजचा दिवस नवा. रोजचा विचार नवा.

कोणत्या विचाराला योग्य वा चांगले समजणार.?

फक्त श्रेष्ठत्वाचा द्दष्टीकोण बाळगत असाल, तर प्रत्येकाला त्याचेच आचार विचार आग्रही वाटतील. मग जगाला थांबावे लागेल.

निसर्गाला हे केंव्हाच मान्य नसते. कारण नाविन्य हेच जीवनाचे वैशिष्ट.

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail- bknagapurkar@gmail.com