Monthly Archives: ऑक्टोबर 2012

हे माणसा !

हे माणसा !

मानव योनी हीच महान    नको करु हा वृथा अभिमान

मानुनी प्राण्यांत श्रेष्ठ    झालास तूं अतिगर्विष्ठ

‘विवेकशक्ति’ असे ज्ञान    हेच ठरविसी परिमाण

हाच निर्णय चुकीचा    पाया ठरे गैरसमजाचा

उंच आकाशांतून घार    पाही भक्ष्य जमिनीवर

तुजला नसे तिक्ष्ण दृष्टी    निसर्गे दिली ती पक्षिसृष्टी

तंतुसी काढूनी मुखातूनी   सुंदर विणी जाळे त्यांतूनी

कोळी विणतो सुंदर जाळे    वास्तूकला ती कुणा न कळे

श्वास घेऊनी वस्तू शोधतो  मानवाला चकीत करतो

श्वानाचा तूं घेसी उपयोग    हाच तुझा पराजयाचा भाग

स्पर्शूनी आवाजांच्या लहरी   नागराज चपळाई करी

स्पर्शेंद्रियाचे हे गुढ ज्ञान    मानसा न होई अकलन

पक्षी सुंदर घरटी करती   कौशल्याचे नमुने असती

कोठून मिळे त्यांना शिक्षण    विचार करुन तूं हे जाण

डॉ.भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

बालकाच्या बुद्धीचा विकास कसा व केव्हां !

बालकाच्या बुद्धीचा विकास कसा व केव्हां !

 

रस्त्याने एक फलक बघीतला. चित्रकला स्पर्धेचे आयोजन केलेले होते. निरनिराळे वयोगट व त्यानी रेखाटलेली चित्रे यांची यादी होती. बालगट म्हणून १ ते ४ वर्षे. त्याना दिले होते चित्रविषय एखादे फळ वा प्राणी काढणे. माझी नांत दोन वर्षाची. तिला कागद पेन दिला की, रेघोट्या काढीत बसते. वाटल की तिला थोडेसे मार्गदर्शन केल की ती एखादे गोलाकार फळ रेखाटू शकेल व त्या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकेल. मी हा विचार सुनेला सांगीतला.  ती बी.एड. करीत होती. तिने लगेच त्याला विरोध केला.

‘ बाबा हे आमच्या शैक्षणिक गृहपाठानुसार चुक आहे. मुल साधारण पांच वर्षाचे होईपर्यंत त्याच्यावर कोणतीही शैक्षणिक संकल्पना लादू नये. आपणास कांहीतरी शिकवले जाते, ह्याची शिशुवयांत त्याला कल्पना होणे हे अपेक्षीत नाही. ते फक्त त्याचे खेळण्याचे, बागडण्याचे, वय. नाचण्याचे, हूंदडण्याचे, गाण्याचे, रडण्याचे, मागण्याचे, हट्ट करण्याचे, वय असते. जसे त्याला वाटत राहील तसे त्याला बागडू द्या. कोणताही ताण, कोणतीही जबाबदारी, कोणतेही त्याच्या मनाच्या विरुद्ध त्याचे मानसिक नुकसान करेल. चांगली वा वाईट संकल्पना त्यांत निर्माण होईल. अहं वा न्युनगंड त्याच्यामध्ये उत्पन्न होईल. तुलनात्मक विचारसरणी ही डोकावेल व स्थिर होण्यास मदत होईल. तेंव्हा त्या चिमुकल्या बालवयांत वैचारीक बांधीलकी नको. ‘

ह्याच क्षणी मला शेजारच्या शिक्षीत आजीपण दिसू लागल्या. त्या त्यांच्या नातवाची सतत करमणूक करताना दिसत. त्यांची एक वर्षाची नांत होती.

” चांदोबा चांदोबा भागलास का, निंबोनीच्या झाडामागे लपलास कां  ”  म्हणत असताना ती चिमुकली चंद्राकडे झेपावते.  ” Twinkle Twinkle little star ”  ऐकताना ताऱ्याच्या चमचमण्याकडे बघत डोळे मिचकावते. फुलाला कुरवाळते, पाळलेल्या कुत्र्याला वा मांजराला गोंजारते, खेळते. आजी नातीला खेळवताना ज्या क्लुप्त्या करीत होती, त्याचे चित्र मी डोळ्यापुढे आणले. चांदोबा कुठे ?, फुल कोठे ?, भू भू कोठे ?  हे प्रश्न विचारताना एक वर्षाची नात आपल्या नजरा, चेहरा, वा हात त्या गोष्टीचा वेध घेऊन आजीने पूर्वीच शिकवलेले गृहपाठ व्यक्त करीत त्या परिक्षेंत प्रथम क्रमांकात उतीर्ण झालेली दिसली. तुमच्या समजण्यांत ते त्यांच्यासाठीचे ज्ञान असते. तर बालकासाठी ते त्याची करमणूक असते. हासत खेळत ज्ञानार्जन ते हेच नव्हे का ? कोठे येतो येथे वयाचा, शिक्षणाचा आणि मानसिक तणावाचा संबंध ? एकदा रस्त्याने एक हत्ती चालला होता. आजी म्हणाली बघ बघ हा हत्ती त्याला जय जय कर. नातीने दोन्ही हात जोडून नमन केले. हत्तीचे महाकाय शरीरयष्टी दाखवित त्यातील देवत्वाची संक्लपना सांगत होती.

लहानगीला खेळविताना जे दिसले ते असे. अडगुळं मडगुळं  सोन्याचं कडगुळं, रुप्याचा वाळा

तान्हा बाळा, तीट लाऊ. चिव चिव ये, दाणा खा, पाणी पी, भूर ऊडून जा. इथ इथ बस रे मोरा- इत्यादी. ती ताई आली, मामा आला, काका आला, बाबा आला, बाळाला भूर घेऊन जाईल. झुकु झुकु झुकु आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी. छोटी छोटी गाणी, छोटी छोटी वाक्ये – – हे सारे बालकांच्या बुद्धीला चालना देणारे, वाढ करणारे खाद्यच नव्हे कां ?

एका वैद्यकीय मासिकांत डॉक्टरांच्या शोधाचा प्रबंध वाचण्यांत आला. एका आडीच/तीन वर्षाच्या बालकाला ११ निरनीराळ्या  शिकवण्यांत आल्या होत्या. प्रत्येकाचा मेंदू हा कंपुटर प्रमाणे असतो. ( अर्थात खर म्हणजे कंपुटर मेंदू प्रमाणे असतो. ) जन्मताच कोरी पाटी. सभोवताल, परिस्थीती, ह्या माध्यमातून सतत त्यावर लहरीच्या रुपाने आघात होत असतात. ज्ञानेद्रियाच्या प्रत्येक माध्यमातून त्या चेतनांचे स्वरुप मेंदूपर्यंत जावून तो Upload and Fix होत राहतो. त्या चेतनेचे स्वरुप, विश्लेशन, अर्थ, प्रयोजन इत्यादी बाबी प्राथमिक अवस्थेतील मेंदूला समजण्याच्या पलीकडच्या असतात.

आपण देखील एखादी घटना बघीतली, ऐकली तर प्रथम संकलीत करतो. नंतरच तिच्याविषयी अनुमान, माहिती, विचार, मत, उपाय, इत्यादीची यादी समोर येऊन, मेंदू तसे विश्लेषन करीत राहतो. लहान बालकाचे, शिशूचे वा नुकत्याच जन्मलेल्या बाळाचे तसेच असते. ( ” Grasping is there, Fixing is there immediately. Analysis is later on, when understanding develops ” )  असे पुस्तकातील वाक्य आहे. खर म्हणजे बालकाला काय कळते, काय समजते, काय उमगते, हे प्रश्न जेंव्हां तो बोलण्याची कला जाणून व्यक्त करतो. तेंव्हांच ते आम्हालाही कळू लागते. सत्य मात्र असे की त्याच्या मेंदूच्या ग्रहण शक्तीची

योग्यता सामान्य Normal Brain असेल तर ती जन्मापासूनच सुरु होते. नुकत्याच डेन्मार्क येथे वैद्यकीय शास्त्रातला एक प्रबंध प्रसिद्ध झाला. एक अचंबित करणारे निष्कर्श. तब्बल ६००० गर्भवती स्त्रीयांची व गर्भातील अर्भकांच्या मेंदूची तपासणी अत्यंत अधूनिक तंत्रानी केली गेली. त्या पोटातील बालकांचे विकसीत होणारे मेंदू कार्यक्षमतेमध्येही प्रगत झालेले आढळले. त्यांचे  Normal Brain Understanding Inference अर्थात ज्ञानाचा निष्कर्ष हेच सिद्ध करतात की हजारो वर्षापूर्वी महाभारत काळी अभिमन्युची कथा ही देखील तेच सुचित करते. गर्भांत असताना सुभद्रेच्या अर्थात आईच्या माध्यमातून त्याला चक्रयुहाचे ज्ञान प्राप्त झाले होते. व त्या ज्ञानाचा उपयोग पुढे झालेल्या महाभारत युद्धांत त्याने केला. ज्ञान मिळणे, आकलन करणे, व त्याचा उपयोग करणे, ह्या वेळेच्या चक्रांत कदाचित् निरनीराळ्या बाबी असतील. परंतु संपूर्ण चक्र फक्त हेच सुचविते की ही निश्चित घडणारी नैसर्गिक संकल्पना आहे. ईश्वरी कलाकृती आहे.

मुलाला शिक्षण केव्हां द्यावे व तो त्याचा व्यवहारांत उपयोग केव्हां करेल ही बाब भिन्न आहे. परंतु ती अशक्यतेच्या चाकोरीत जात नाही. शिकवताना मुलावर मानसिक तणाव पडू नये ह्याच्याशी जरी सहमती असली तरी ते ज्ञान कशा सोप्या व करमणूक प्रधान माध्यमातून साघ्य करता येते कां हे बघीतले पाहीजे. ज्ञानाचे संकल्पन होत असताना मुलाला त्याची त्या दृष्टीकोणातून मुळीच जाणीव येऊ नये.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

उदरांतील शेषशाही

उदरांतील शेषशाही

मातेच्या उदरांत झोपला, शेषशाही भगवान

वेड्यापरी त्यास शोधीतो, सागरी जाऊन

शेषशाहीचे चित्र बघतां,  साम्य ते दिसेल

उदरामधल्या बालकांतही, सारे तेच आढळेल

शेषापरी वेटोळे असुनी,  ‘ नाळ ‘ तयाला म्हणती

क्षारयुक्त पाण्यामध्यें,  बालक ते निद्रिस्त असती

बालकाच्या नाभी मधुनी,  येई कमलाकृती भाग

जीवनसत्व त्यावर असुनी,  ब्रह्मापरी दिसे अंग

‘ सो हं ‘ निनादुनी सांगे, ‘ मीच तोच ईश्वर आहे ‘

चुकीचा समज करुनी,  तयास सागरीं पाहे

विवीधतेनें सुचवी,   ‘ अहं ब्रह्मास्मि ‘ सत्य ते

कां आम्ही धांवत असतो, त्यास शोधण्या बाह्यांते

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

‘मृत्युदंड ‘ प्रक्रियेमधील एक दिलासा !

मृत्युदंड प्रक्रियेमधील एक दिलासा !

 

नुकतीच बातमी वाचण्यांत आली की बॉम्ब स्फोटामधील तीन आरोपीना न्यायालयाने मृत्युदंडाची (फाशीची) शिक्षा सुनावली.  एक विचार चक्र मनांत येऊन मी जे.जे. वैद्यकीय महाविद्यालयांतील वाचनालयांत गेलो. एका थोर जागतीक मान्यवर लेखकांचे पुस्तक न्यायवैद्यक शास्त्र Medical Jurisprudence घेतले. ते बराच वेळपर्यंत वाचले. मृत्युचे प्रकार    Mode of death व त्याचे शरीरावर होणारे परिणाम वाचले. त्यावरच्या टिपणी लिहून घेतल्या.

अनेक प्रकारे मृत्यु घडत असतो. जसे जळणे, बु़डणे, विषप्रयोग, आजार, अपघात, इत्यादी. मृत्युच्या शेवटच्या क्षणी सर्व शरीर शिथील व शांत होण्यापूर्वी होणारा प्रतिकार आणि परिणाम ह्या विषयी माझे लेखन होते.  एका प्रकरणांत असलेली टिप्पणी वाचून मी फार चकीत झालो. माझे लक्ष वेधून घेतले गेले. प्रकरण होते लटकावून घडून आणलेला मृत्यु. अर्थात  ‘ Death by Hanging. फाशीमुळे घडणारा मृत्यु ‘ प्रक्रिया नि परिणाम ‘

कोणत्याही मृत्युच्या घटनेमध्ये शेवटचा  क्षण हा भयावह वाटणारा असतो. म्हणून सर्व साधारण व्यक्ती त्याला सामोरे जाताना शरीर व मनाने प्रचंड दबावा खालती असतो. एक प्रकारची तडफड व्यक्त होत असते. वेदना आणि धक्का ( Pain and Shock) हे सर्वाना अनुभव न घेताही ज्ञात असते. व ते एक सत्य  आहे. ‘ Death by Hanging ‘

ह्या प्रकरणातील एक वाक्य होते- “Hanging is a painless form of death ”   जे सुत्र व स्पष्टीकरण वाचण्यांत आले ते खुपच विस्मयकारक व मजेदार वाटले. फाशीबद्दल प्रचलीत गैरसमजाला छेद देणारे होते. वाईटातील चांगले म्हणतात तसे ते मला समाधान देणारे वाटले.

छताला बांधलेला गळफास व्यक्तीच्या माने भोवती टाकला जातो. एकदम त्याच्या पायाखालील आधार काढून घेतला जातो. व्यक्तीच्या वजनाने तो फास त्याच्या माने भोवती आवळला जातो. ह्या प्रकारांत आवळलेल्या फासामुळे मानेतील मेंदूकडे जाणाऱ्या मोठ्या रक्तवाहिन्या व हवेची नलिका ह्यावर प्रचंड दाब येतो. मेंदूला होणारा रक्त पुरवठा एकदम खंडीत पडतो. ताच क्षणी प्राण वायु ह्याचा पुरवठा एकदम बंद पडतो. हा फक्त कांही सेकंदाचाच अवधी, ज्यांत प्राण वायुचा मेंदुला होणारा पुरवठा खंडीत होतो. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे मेंदूच्या मागील मानेजवळच्या भागांत कांही महत्वाचे केंद्रबिंदू असतात. Active brain centers in Medulla Oblongata  त्यावरही दबाव पडून त्यांचे कार्य थांबते. शरीरातील मेंदू हा अवयव प्राणवायुसाठी अत्यंत संवेदनशील असतो. (Brain tissue is Very Sensitive for Oxygen lack). त्याकारणाने प्राणवायु (Oxygen) थोडा जरी मिळाला नाही तरी मेंदू आपले कार्य एकदम थांबवितो. मेंदूचे प्रमुख कार्य हे ज्ञानेद्रियाशी संबंधीत असते. संवेदनांची जाणीव त्वरीत थांबते. शरीराला होणारा त्रास, दुःख, वेदना ह्या सर्व भावना क्षणार्धात लोप पावतात.  एकदम खुंटीत होतात. व्यक्ती त्या परिस्थितीत, त्या क्षणाला वेदना जाणीवरहीत होतो. त्याच प्रमाणे विचाररहीत होतो. न शारीरिक वेदना ना कोणते विचार अशी भावनाहीन स्थिती होते. फक्त बेशुद्धीच्या वाटेवरचे पाऊल. मृत्युच्या दाराजवळ.

मृत्यु हा शरीरापासून अजून थोडासा दुर असतो. प्रकृतीच्या शारिरीक प्रक्रिया अद्यापी चालू असतात. ज्या दिसतात. धडपड, झटक्याच्या हालचाली, होत असतात. पाय, हात, डोळे, जीभ, वा इतर अवयव ह्या प्रक्रियेमध्ये सहभागी होत असतात. बघणाऱ्याला हे सारे क्लेशदायक वा भयावह वाटत असले तरी त्या शेवटच्या १०-१५ मिनीटाच्या धडपडीत हा मृत्युला सामोरे जाणाऱ्या जीवासाठी वेदना, जाणीव विरहीत काळ असतो. हे वैद्यकीय शास्त्र सांगते. म्हणूनच वैद्यकशास्त्रज्ञाने त्या प्रक्रियेला Hanging Painless form of death

संबोधिले आहे.

जर जगाचा इतिहास जर वाचला, मृत्युदंड देण्याची प्रथा पुर्वापार चालत आलेली आहे. शिरच्छेद, उंचावरुन कडेलोट करणे, हत्तीच्या पायी देणे, जाळणे, बंदुकीच्या गोळीने मारणे, दगड बांधून पाण्यांत ढकलने, विष देणे, फाशी देणे इत्यादी. अनेक प्रकारे होते. परंतु सर्व देशानी आजतागायत मृत्युदंड ह्या संकल्पनेसाठी फक्त फासावर लटकावने ह्यास मान्यता दिलेली आहे. कारण ह्यांत मृत्युदंड साधत असतांना, त्या व्यक्तीला मृत्युप्रक्रियेच्या कोणत्याही शारिरीक इजा, वेदना, आथवा जाणीवा होणार नाहीत हे वैद्यक शास्त्राने बघीतले.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

प्राण ज्योत

प्राण ज्योत

दिवा होता छोटासा, एक मजकडे

इन्धन मिळतां तेलाचे, प्रकाश तो पडे

तळांत होती योजना, तेल सांठवण्याची

शिरीं असूनी वात ती, क्रिया चाले जळण्याची

छिद्र पडतां तळाला, व्यर्थ जाई इंधन

मंदावली ज्योत दिव्याची, शक्ती ती जावूनी

देह आहे दिव्यासारखा, चैतन्य तेज तयाचे

प्रकाश फेकी आनंदाचा, इंधन मिळतां शक्तीचे

केंद्रित होते देह उर्जा, नाभीच्या भोवतीं

व्यय टाळून प्रवाही करा, तीच प्रभूवरती

ऐहिक सुखाच्या जातां मार्गीं, गुरफटतो संसारीं

तीच उर्जा प्राणास मिळतां, चेतवी ज्योत ईश्वरी

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

* आफ्रिकन स्त्रीचे आभूषण प्रेम!

*   आफ्रिकन स्त्रीचे आभूषण प्रेम!

नुकताच  दक्षिण  आफ्रिकेला  जाण्याचा  योग  आला  होता. निसर्गच वरदान लाभलेली  भूमी.  असे वर्णन तिचे करता येईल. ऊतम हवा, भरपूर पाणी, नद्या नाले आणि नेत्रदीपक धबधबे दिसत होते. त्याच प्रमाणे प्रचंड झाडेझुडपे, वेली, क्षितिजा पर्यंत  पसरलेली जंगले,  आणि त्या जंगलात साम्राज्य गाजवणारी अनेक जंगली जनावरे. बळी तो कान पिळी, ह्या तत्वाने जगणारे पशु, काळपा काळपाने आनंद घेताना दिसत होती.  सर्व  बघताना हृदय भरून येत होत. ह्यात भर पडली ती तेथील  अतिशय प्रेमळ, लाघवी, माणुसकीने भरलेल्या, अश्या माणसांची. हवामान थंड समशीतोष्ण असून देखील तेथील लोकांना सामान्यपणे, वर्ण मिळाला तो काळा. नव्हे खूपच काळा. चेहऱ्यावर एक प्रकारे राकटपणा, तेलकट वा नितळ कातडी. केस जवळ जवळ  कुरुळे.   भारतीय स्त्रीला  लाभलेला  नाजूक गहूवर्ण वा गोरारंग त्यांच्या चेहरेपट्टीवर कधीच दिसणार नाही.अर्थात

त्यांचे ते स्वरूप त्यांच्या सौंदर्याच्या द्रीष्टीकोनानुसार  नजरेमध्ये कदाचित मोहक व सुंदर  ह्या  संकल्पनेत असेलही.

अशाच एका आफ्रिकन महिलेशी आलेला, न विसरणारा एक प्रसंग:-

आफ्रिकन सफरीच्या मार्गावर एका हस्तकला वस्तूच्या दुकानावर आम्ही थांबलो होतो. मी आणि सौ. तेथील  प्रदर्शनामधील अनेक हस्तकलेच्या वस्तू

बघत होतो. सौ.ला एक माळ खूपच आवडली. निरनिराळ्या प्राण्यांची  छोटी कोरीव कालाकृती माळेच्या मण्यामध्ये अतिशय सुरेख दिसत होती. त्या दुकानाची  प्रमुख एक आफ्रिकन महिला होती. तीने आदरपूर्वक तिच्या अनेक वस्तू आम्हाला दाखविल्या. ती आवडलेली माळ तीने दहा डॉलरला देऊ केली.  सौ. तिच्या पाकीटमधून पैसे काढीत असता, सौ.च्या हातातील काचेच्या  बांगड्यावर त्या महिलेची नजर गेली.  तिच्या चेहऱ्यावर स्मिथ हास्य दिसले. काचेच्या बांगड्या तिच्या पाहण्यात नव्हत्या. “ हे काय आहे ? व हे तुम्ही का घालता.? “  तिच्या चौकस प्रश्नात आश्चर्य वा कौतुक पण दिसून आले.  विशेष करुन जेंव्हा बांगड्या ह्या भारतीय महिलासाठी सौन्दर्य  सौभाग्याचे  लक्षण असते हे  समजल्यावर. अचानक तिने इच्छा  प्रदर्शीत् केली.  ”  तुम्ही बांगड्याचा एक जोड मला देऊ शकता? “  आम्हाला तिच्या उत्छुकतेची    गम्मत वाटाली. सौ.ने  क्षणाचाही विलब न लावता, हातातल्या दोन काचेच्या बांगड्या   तिला प्रेमाने दिल्या. तिनेही त्याचा स्वीकार ” थंक्स”  म्हणत केला, तिने आम्ही निवडलेली हस्तकलेची माळ  बांधुन दिली. ती म्हणाली ”  तुमच्या बांगड्याबद्दल आभारी. कृपा करुन ही मजकडून मित्रत्वाची सप्रेम भेट स्वीकारा. ”  आम्ही देखील हासत तिच्या प्रेमळ  भेट वस्तुचा ( Return gift चा ) स्वीकार केला.   प्रेमाच्या संस्कृतीचेही एक समीकरण असते. त्याच्या अनुशंगाने जे उत्पन्न होते, जो परिणाम होत असतो, तो निश्चितच सर्वत्र तसाच असतो. जगातील कोणत्याही देशात जा. कारण प्रेम आहे निसर्गाचा एक आविष्कार.

 

(ललित लेख)

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

शोधूं कुठे त्यास ?

शोधूं कुठे त्यास ?

शोधत होतो रुप प्रभूचें, एक चित्त लावूनी

अवंती भवंती नजर फिरवी, श्वास रोखूनी   १

शांत झाले चंचल चित्र, शांत झाला श्वास

ह्रदयनाडी मंद होऊनी, चाले सावकाश   २

पचन शक्ति ती हलकी झाली, जठराग्नीची

शिथील झाली गात्रे सारी, देह चैतन्यांची   ३

देहक्रियांतील प्राणबिंदू तो, असे ईश्वर

समरस होतां त्याच शक्तिशीं, होई ते स्थिर   ४

शोधामध्ये चिंतन करतां, ध्यान परी लागते

समाधी स्थितीत येंता प्राण, अनंतात मिसळते   ५

नाही दिसले रुप ईश्वरीं, आगळे एकटे

विश्वमंडळ ते तोच असता, सोधू तयास कोठे ?   ६

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

मला न पटलेली कथा

मला न पटलेली कथा

अनेक कथा प्रसंग पौराणिक घटनाक्रमांकांत सांगीतल्या गेल्या आहेत. वर्णन केल्या गेल्या. रोमांचित अदभूत रम्य, चमत्कारानी भरलेल्या अविट गोडी निर्माण केल्या गेलेल्या आहेत. पुन्हा पुन्हा ऐकाव्या, सांगाव्या, बघाव्या अशी जादू त्यानी निर्माण केली आहे. सत्य असत्य इतिहासीक असावी कां ? इत्यादी प्रश्नाना फारसे लक्ष दिले जात नाही. दैनिक भावना जागृत करणाऱ्या धार्मिकतेचे कवच धारण करणाऱ्या, ह्या साऱ्या कथा आहेत. फक्त आनंद देणाऱ्या, करमणूक करणाऱ्या  व काही मधून निती अनितीचा मुलायमा देणाऱ्या वाटतात. त्या फक्त ऐकावयाच्या, बघावयाच्या, असतात. शक्यतो त्याचे रसग्रहण वा तात्पर्य करण्याचा कुणी विचार करु नये.

तरी देखील कांही कथा ऐकताना, प्रसंगाची उकलन करताना, बघताना, मन विचलीत होते. सर्व कथा संग्रह थोर ऋषीमुनी, धर्मपंडीत, विद्वान, यांच्या विचार ज्ञानातून बाहेर आलेला. त्यामुळे त्याला आपल्या सारख्या सामान्यजनानी मान्यता देणे भागच पडते. रामायण कथा मधल्या अनेक कथा ऐकल्या. महान थोर गौतम  ऋषीपत्नी आहिल्येची कथा समोर आली. थोडक्यांत जे सार वर्णन केले गेले ते असे. गौतम ऋषी पत्नी पतीवृता साधवी आहिल्यासह आश्रमांत रहात होते. देवलोकीचा राजा इंद्र ह्याची वक्रदृष्टी आहिलेवर पडली. त्याने चंद्राची मदत घेऊन दुष्टपणा करुन आहिल्येला फसविले. तिचा उपभोग घेतला. ऋषीना हे कळताच त्यानी दोघाना शाप दिला. आहिल्या शिळा होऊन पडली. श्रीरामाच्या पदस्पर्शाने ती कालांतरानंतर पावन झाली. कथानक सर्वसाधारणपणे असेच घडू शकते. अनेक प्रसंगात अशा गोष्टी झालेल्या आज तागायत दिसतात. त्यांत वेगळेपणा फारसा नाही. एक बाब मात्र माझ्या वैयक्तीक मनाला खटकली. कथानकांत देवराजा इंद्र याला गोवण्याचा प्रयत्न केला. स्वर्ग मृत्यु पाताळ ही आपली संकल्पना. स्वर्ग हा देवलोक. सर्व ३३  कोटी देवांचे अस्तित्व समजले गेलेले असे विश्व. आम्ही सर्व मृत्युलोकातील मानव. आपणास निसर्गानेविचार विवेक आणि समज ह्याचे वरदान दिलेले आहे. ह्याच्याच क्षमतेने आम्ही सर्व सृष्टीचे विश्वाचे मुल्यमापन करीत असतो. निसर्ग आहे तसाच असतो. प्रत्येक मानव आपल्या क्षमतेनुसार ज्ञान विचारानुसार त्याचे विश्लेशन करतो. ह्यातच निर्माण झाले ते काव्य, ग्रंथ संपदा, ज्ञान सागर. व्यक्ति तितक्या प्रकृती, तितके विचार ह्या सत्य धबधब्यातून अनेक विवीध प्रवाहाचे उगम झाले.

मानवाने देव योनीला सन्मानाचे स्थान दिले. आदर दिला. श्रेष्ठत्व दिले. कारण त्यांच्यामध्ये होती भव्यता, दिव्यता. एक वेगळीच उर्जा शक्ती, निर्मीती व संहार करण्याची क्षमता. ज्याचा विचार मानव करु शकत नाही. ते कार्य करण्याची योग्यता त्याना प्राप्त झालेली आहे. आम्ही देवाना भजतो, पुजा करतो, त्यांचे गोडवे गातो. ते याचसाठी की त्याची आमच्यावर कृपा द्दष्टी व्हावी. आमच्या संसाराचा गाडा व्यवस्थीत चालावा.

देव योनी मधील देवतानी मानवाला नेहमी सहाय्य केलेले आहे. संकटाचे निवारण केले आहे. संकट आणली वा कोणतेही दुष्कृत्य केलेले नाही. म्हणूनच सर्व ३३ कोटी देवता आम्हास आदरणीय आहेत. इंद्र तर ह्या सर्व देवांचा राजा समजला गेला आहे. तो पर्जन्याचा, पाण्याचा अर्थांत सर्व जीवांचा आधिष्ठाता मानला जातो. म्हणूनच सर्व मानव प्राणी त्याला महान आदर देत त्याच्या कृपेसाठी पूजन करतात.  अशा महान आदरणीय देवांने पृथ्वीवर येऊन, आपला देव योनीतील अस्थित्व विसरुन, त्यांच्यापेक्षा अत्यंत भिन्न अशा मानव योनीतल एका स्त्रीशी प्रेमचाळे करणे, हे मनास मुळीच पटणारे नाही. हे केंव्हाही शक्य होऊ शकत नाही. कदाचित् येथे १ अहिल्लेचे महात्म दाखविण्याचा विचार असावा, २ इंद्राचे अवमुल्ल्यन करण्याचा उद्देश असावा, ३ श्री. रामचंद्रांचे देवत्व उजळण्याचा प्रकार असावा, अथवा इतर कोणते तरी.

तसेच  कित्येक पुराणातील कथा,  सत्यता ह्याच्या कल्पनेत टिकत नाहीत असे केंव्हा केंव्हा वाटते. विद्वान व ज्ञानी लोकांनी ह्यावर अभ्यास करुन ह्या कथामध्ये जो विक्षीप्त वाटणारा प्रसंग असेल तो काढून त्या कथांची गोडी कायम ठेवीत  दुरुस्त्या सुचवाव्यात. जे चालत आले तसेच चालू द्या. आपण त्यांत बदल करणारे कोण ही भूमिका नसावी. काळ बदलत आहे, जग बदलत आहे, तसाच कथानकामध्ये मनास न पटणारा भाग काढून टाकल्यास सर्व सामान्याना आनंदच वाटेल. मात्र ते करताना अधुनिकतेतील वेगळी विक्षीपता नसावी. ही सद् इच्छा.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०