Monthly Archives: मे 2011

श्वासाचा मागोवा आणि चित्तांतील शांतता !

श्वासाचा मागोवा आणि चित्तांतील शांतता !

श्वासोछ्वास ही शरीराची अत्यंत महत्वाची नैसर्गिक क्रिया आहे. जीवंतपणाचे ते सर्वांत प्रमुख लक्षण असते. श्वास आहे तर जीवंतपणा आहे. त्याच्या शिवाय देह केवळ मृत झालेला असेल. जगण्यासाठी प्राथमिक गरज असते ती प्राणवायुची. अर्थात ऑक्सिजनची. वातावरणात तो मुबलक प्रमाणांत असतो. शरीर तो शोषून घेतो. व त्यातून शक्ती अर्थात उर्जा प्राप्त होते. जगण्याचे ते आद्य व प्रमुख साधन. श्वासोछ्वास क्रिया म्हणजे प्राणवायू घेणे व कार्बंडाय ऑक्साईड मिश्रीत वायू शरीरावाटे बाहेर सोडणे. ह्या प्रक्रियेत फुफ्फूस, श्वास नलिका, नाक ही अवयवे सतत कार्यारत असतात. ह्या क्रियेची आपणास एका मर्यादेपर्यंतच जाणीव होत असते. तरी ही दैनंदिन क्रिया अजाणता (Involuntary Action)  सदैव होत असते. आपले त्या क्रियाकडे केंव्हाच लक्ष नसते. वा तशी गरज देखील भासत नाही. सर्वकांही नैसर्गिक, सहज, व सतत होत राहते. केवळ शरीराची हालचाल कमीजास्त प्रसंगानुरुप होते, तेव्हांच त्या क्रियेची जाणीव होऊ लागते. ज्याला Conscious Breathing अर्थात श्वासोछ्वासाची जाणीव म्हणता येईल.

श्वास घेणे व सोडणे ही म्हटले तर छोटीशीच क्रिया. परंतु हीला ध्यान धारणेत फार महत्व असते. श्वासावर लक्ष केंद्रित करणे ह्या प्रक्रियेमध्ये, मेंदूत उत्पन्न होणारय़ा विचारांच्या जाणीवेवर बाधा येते. विचारावरचे लक्ष सारले जाऊन ते श्वासावर केंद्रित करण्याच्या प्रयत्यांत, भरकटणारय़ा विचारांवरचे लक्ष त्या क्षणाला तरी टाळता येते. श्वास अर्थात हवा ही नाकाद्वारे कशी आंत जाते, घशातून छातीकडे तीचा मार्ग असतो. तुम्हास त्याच्या मार्गावरच लक्ष केंद्रित करायचे असते.  हवा नाकाद्वारे आंत खेचली जाऊन ती पून्हा त्याच वाटेने परत बाहेर टाकली जाते. आंत जाणारी हवा थोडा क्षण क्रिया थांबते. व परत हवा बाहेर पडते. ह्या सर्व क्रिया तूम्हास जाणीव पूर्वक टिपायच्या असतात. हवेचे आंत बाहेर येणे फक्त. म्हणजेच श्वासावर लक्ष केंद्रित करायचे असते. हे सुद्धा विचारावर लक्ष केंद्रित करण्यासारखेच असते. परंतु ह्यात विचाराबरोबर वाहून जाणे टाळले जाते. पून्हा येणारय़ा विचारावर लक्ष जाण्यापासून अलिप्त राहता येते. ह्यांत विचारावरचे लक्ष श्वासावरच जात असल्यामुळे लक्षाची जाणीव एक मार्गीच होते. आत घेतला जाणारा व बाहेर काडून टाकलेला श्वास फक्त केंद्रित करणे.

खरे म्हटलेतर श्वासोछ्वास ही क्रिया Involuntary  अर्थात अजाणता होणारी, परंतु तीच आता प्रथम  Voluntary जाणती करायची असते.  म्हणजे श्वास दिर्घ करुन घेणे व हलके हलके सोडणे हे ह्यात महत्वाचे.

ज्याप्रमाणे थंड पाण्याचा ग्लास भरुन पाणी पितानांच त्या पाण्याचा थंडपणा व तोंडातून घशातून पूढे जाताना जाणीव होते तशीच जाणीव तुमच्या श्वासाचीपण झाली पाहीजे. हा जाणता श्वासोछ्वास Awareness of breathing  हा शक्यतो नेहमीचा भाग असावा. ह्याकडे लक्ष केंद्रित असावे. फक्त ध्यान धारणेच्या वेळीच नसून तुमच्या दैनंदिन जीवनाच्या प्रत्येक हलचालीच्या वेळी देखील ही सवय तुमची कार्यकुशलबुद्धी वा लक्ष केंद्रित करण्याच्या वृत्तीला वाढविते.

मन चंचल असून ते कधीच शांत राहू शकत नाही. हा त्याचा नैसर्गिक गुणधर्म ठरलेला असतो. त्यांत केव्हांच बदल करुन त्याला स्थिर अवस्थेत ठेवता येणे शक्य नसते. मात्र त्याच्या सततच्या धावपळीला, उड्डानाला एकाच दिशेने राहण्याचे मार्गदर्शन प्रयत्न करुन करता येते. हे फक्त जाणीवपूर्वक सवयीने साध्य करता येते.  श्वासाच्या हलचालीवर लक्ष केंद्रित करणे ह्याने ते साध्य होते. मनाला सुद्धा  ‘ एका वेळी एकच विचार ‘    ह्या तत्वावर हलचाल करण्याची गरज असते. तो त्याचा स्थायी स्वभाव तेव्हां त्या मनाला उत्पन्न होणारय़ा विचारांच्या मागे धावू देण्यापेक्षा जाणीवपूर्वक श्वासाच्या हलचालीवर केंद्रित करणे शक्य होऊ शकते. ह्यालाच मनाची एकाग्रता साधणे  म्हणता येइल.

ह्याच श्वासांच्या हालचालीवर मनाला केंद्रित करताना शरीरांत कांही क्रिया होऊ लागतात. प्रथम चांगल्या सपाट स्वच्छ आसनावर ताठ पाठीच्या कणाने बसलेल्या शरीराला स्थिर वा अचल केले जाते. व डोळे बंद करुन प्रथम ईश्वरी चिंतन वा नामस्मरण केले जाते. थोड्या वेळाने लक्ष श्वासाकडे केंद्रित केले जाते. ह्या प्रयत्न्यात मन एकाग्र होण्यास सुरवात होते. ह्या सर्व क्रिया जाणीवपूर्वक Voluntary action  होत असतात. मात्र तुमच्या उत्स्फूर्त प्रामाणीक, आन्तरीक आणि सत्य प्रयत्नाने ह्याच जाणीवपूर्वक सूरु केलेल्या क्रियेमध्ये, लक्ष श्वासावर केंद्रित होत असताना, तुम्ही  हळू हळू स्वतःला विसरु लागतात. अर्थात शरीराला विसरतात. स्वतःकडे आंत असलेल्या एका विशाल पोकळीमध्ये जावू लागतात. हे अजाणता   Involuntary  होऊ लागते. हीच जाणता व अजाणताची सिमा रेषा असते. कदाचित् विचीत्र अशा वातावरणांत तुम्ही शिरत असल्याचा भास होऊ लागतो.  Hallucinations प्रमाणे. जाण –अजाण ही सिमा अत्यंत महत्वाची असते. कारण याच पायरीवर तुम्ही कदाचित् बेचैन होतात. भिती वाटते. एका माहीत असलेल्या अस्तीत्वामधून अपरिचीत वातावरणांत तुम्ही शिरत असल्याचा भास होऊ लागतो. हीच तुमची सत्व परिक्षेची वेळ असते. कित्त्येकजण जोराचा प्रयत्न करुन त्या सिमारेषेवरुन झटका देत, शरीर मनाला एकदम जागृत करतात. डोळे उघडतात व त्या अजाण अशा वातावरणांत जाण्याचे हमखास टाळतात. तुम्ही ध्यानमार्गाच्या दारापर्यंत पोहंचले असतात, परंतु तुमचे मन कमकुवत बनते. तुम्ही परत सामान्य व  दैनंदिन वातावरणांत येतांत. झोपेच्या क्रियेमध्ये असेच असते. प्रथम व्यक्ती विश्रांती घेते. शरीर शिथील बनते. डोळे बंद होतात. हलके हलके देहातील जाणीवधारक क्रिया बंद पडून, सहज तुम्ही झोपेच्या आधीन जातात. जागृत अवस्था व निद्रा ह्याच्या सिमा रेखा निसर्ग अतिशय कौशल्याने पार करुन, एका स्थितीमधून दुसरय़ा स्थितीमध्ये नेवून सोडतो. ह्याची थोडीदेखील जाणीव आपणास होऊ देत नाही.  कारण  ही नैसर्गिक क्रिया असते. व जन्मापासून निसर्ग तुम्हाला ह्यात साथ करीत असतो. म्हणून यात सहजता आढळून येते. दोन अवस्थेचे पदार्पण. जागृत आणि निद्रा अथवा निद्रेतून चाळविले जावून जागृत होणे. हे निसर्ग सहज साध्य करतो.

ध्यान प्रक्रिया प्रथमावस्थेत कृत्रीम असते. खरय़ा अर्थाने ती देखील नैसर्गिकच असते. परंतु तीला प्राप्त करावे लागते. आपल्या इच्छेनुसार ध्यानावस्था निर्माण करावी लागते. गाढ निद्रेचा खरा आनंद लूटण्यासाठी म्हणजे जाणीव होण्यासाठी गाढ निद्रा व जागृतावस्था  ह्या दोन भिन्न अवस्थेला एकत्र करण्याची कला साध्य झाली पाहीजे. अत्यंत अवघड ही बाब आहे. ह्यात निद्रेमुळे शरीराला संपूर्ण विश्रांतीचे जे सुख समाधान लाभते ते तर साध्य होतेच. त्याच वेळी गाढ निद्रेमधील शांत नितांत आनंद, संतोष ह्याची जाणीव पण जागृत राहून मिळणे हे अप्रतीमच नव्हे काय ?  ध्यानामध्ये हेच साध्य होते. दोन्हीही नैसर्गिक गुणधर्म जागृत अवस्था व निद्रा ह्यांचे सुख.

परंतु ध्यान धारणा सर्व सामान्यासाठी सहज व नैसर्गिक क्रिया रहात नाही. झोप वा निद्रा सहज दोन्ही अवस्थेमधले रुपांतर साध्य करते. ध्यानावस्था जागृत अवस्थेमधून ध्यान लागणारय़ा स्थीतीत जाताना त्या सिमारेषेवरुन झेप घेऊन जाते. हालके हालके निद्रेप्रमाणे जात नाही. हीच झेप अत्यंत महत्वाची असते. उडणारय़ा पक्षाने झाडाचा वा डोंगरकड्याचा आधार सोडून आकाशाच्या पोकळीत छलांग मारल्याप्रमाणे. पक्षी एकदम पडेल अथवा उडेल. निसर्ग त्याला तसे ज्ञान व कला देतो. विमानाला मात्र झेप घेवून उड्डान करावे लागते. एका मोठ्या पोकळीत शिरण्यासाठी. निद्रा पक्षाप्रमाणे व ध्यान धारणा विमानाच्या उड्डानाप्रमाणे. इस पार वा उस पार.

प्राथमिक अवस्थेमधील ध्यान धारक ह्याच  ‘ झेप ‘ अनुभवातून जातात. दोघाना एका अज्ञात वातावरणात शिरण्याचा एकदम नविन व प्रथम अनुभव घ्यावयाचा असतो. ह्यात शंका, भिती, अनिश्चीतता ह्या भावनाचा वरचश्मा होतो. म्हणून साधक घाबरुन त्याला सामोरे जाण्याचे टाळतो. येथेच कित्येक साघक हतबल होऊन ध्यानात खरय़ा अर्थाने शिरण्यामध्ये अयशस्वी होतात. ते आपले खोलात जाण्याच्या प्रक्रियेला तोडून टाकतात. निराश होतात.  सुरवातीच्या श्वासावरचे लक्ष केंद्रित होण्याची क्रिया प्रथम जाणीवपूर्वक असली तरी सवय व प्रयत्नाने ती अजाणीव अर्थात   Involuntary Action  बनू लागते. ती मग सहज साध्य क्रिया बनते. साधक श्वासावरच्या लक्ष केंद्रित करण्याच्या क्रियेस थोड्याशा प्रयत्नातच देह मनाची स्थिरता निर्माण करु शकतो.

साधकाची पुढची पायरी म्हणजे तो ध्यानावस्थेमधल्या जाण-अजाण ह्या स्थरापर्यंत तर आलेल्या असतो. आता मनाचा निगृह, आत्मविश्वास आणि संकल्पाची शक्ती एकवटून ह्या पायरय़ावरुन तसेच वाहून जावू देणे. ध्यान योगांत वा ध्यान धारणेमध्ये निसर्ग सदा तुमची साथ देत असतो. साथ देण्यास तत्पर असतो. तुम्हास कांही करावयाचे नसते. मनात कसलीही शंका वा भिती न बाळगता होवू घातलेल्या शांततेच्या अवस्थेला एकरुप व्हायचे असते. ह्यात कोणताच प्रयत्न वा हालचाल अपेक्षित नसते. जी स्थीती जी देहमनाची अवस्था निर्माण झालेली असते, त्यात झोकून द्यावे लागते. हा काळ देखील फार अल्प असतो. पण जर तुम्हास ध्यानावस्था प्राप्त झाली झाली तर मिळणारे समाधान, आनंद ह्याचे शब्दांत वर्णन करता येणार नसते. आणि त्या आनंदाची तुलना तर करताच येणार नाही. कारण तो तुमचा एकमेव  ‘एकमेवाद्वीतीयो ‘  आनंद असेल. ज्याला म्हणतात Ecstasy of Joy  अर्थात नितांत आनंद वा परमानंद

(ललित लेख )

कोणती स्फूर्ति देवता ?

कोणती स्फूर्ति देवता ?

मजला नव्हते ज्ञान कशाचे

पद्यामधल्या काव्य रसांचे

कोठून येते सारी शक्ती

काव्यरचना करवून घेती

अवचितपणें विचार येतो

भावनेशी सांगड घालितो

शब्दांचे ते बंधन पडूनी

पद्यरुप ते जातो देवूनी

सतत वाटे शंका मनीं

हे न् माझें परि येई कोठूनी

असेल कुणी महान विभूति

माझे कडून करवून घेती

तळमळ आतां एक लागली

जाणून घ्यावी ती शक्ती आगळी

अर्पिन माझे प्राण तयाला

स्फूर्तिदेवता जो मजसी झाला.

 (कविता)

घास घास घेणे

घास घास घेणे

लहान मुलांच्या जेवणाच्या संवयींविषयी वाचत होतो. लहान मुले जेवताना खूप  त्रास देतात. हट्टीपणा करतात. त्यांच्या जेवणाच्या लहरीपणामुळे तास दोन तास देखील, ती खाण्यामध्यें रेंगाळतात. लहान बालकांना जेवण भरविणे ही अत्यंत आवघड कला असते. सहनशिलता फक्त आईला समजलेली दिसते. मुल उपाशी राहू नये म्हणून ती सतत त्याच्या पाठीमागे राहून ते भरविते. आईच्या मुलाना जेवण खावू घालण्याच्या अनेक युक्त्या असतात. येनकेन प्रकारे घास भरवणे व त्याच्या पोटांत तो जाईल याचा तीचा प्रयत्न असतो.

जेऊ घालताना गोष्टी सांगणे, कड्यावर घेवून घरभर, गच्चीवर वा अंगणात फिरत त्याला भरविणे, तुला जेवणानंतर चॉकलेट वा बिस्कीट देईन ही लालूच लावणे, खेळणी देणे, किंवा  घाक दाखविणे, रागावणे, अशा अनेक प्रकारे निरनिराळ्या युक्या ती आयोजीत असते. मला येक युक्ती खुपच आवडली. आई मुलाला खिडकीबाहेर चिमणी, कावळा वा पक्षी दाखविते. ‘ तो बघ कावळा. किती उंच गेला. त्या झाडावर तो बसला ‘  मुल उत्सुकतेने व बारकाईने त्याचे निरीक्ष करते. मुलाचे लक्ष त्या पक्षाकडे लागते. हीच वेळ म्हणजे आपला मुलाचा लक्षवेध आई नेमका टीपते. ती तो क्षण साधत मुलाला घास भरवते. मुल देखील आपला हट्ट, लहरीपणा, रेंगाळू वृत्ती बाजूला ठेऊन, तोंडाचा आ करीत तोंड ऊघडते. घास भरविला जाऊन तो खाल्ला वा गिळला जातो. अर्थात ही क्रिया एक प्रकारे आपोआप होवून जाते. हालाच पुस्तकांत Distraction of Mind, method of feeding  अर्थात लक्ष विचलीत करुन घास भरवीणे म्हणतात. येथे मात्र लक्ष्य विचलीत करण्यासाठी निरनिराळे पक्षी, प्राणी, वा पदार्थ ह्यांचा कल्पकतेने उपयोग करावा लागतो.

आजकालचे वैद्यकिय  बालविकास शास्त्र अशा पद्धतीना अयोग्य समजतात. परंतु ह्या गोष्टी कालांतरापासून चालत आलेल्या आहेत. घास भरविण्याच्या पद्धतीलाच विरोध केला गेला आहे. जेवणाचे ताट मुलाच्या समोर ठेवा. ते मुल आपल्या हाताने व मनानेच खाईल. ठराविक वेळ त्याच्या जेवण्यास द्या. मुलगा खेळतो, रेंगाळतो, जेवत नाही. खाणयाच्या पदार्थांची सांडलोंड करतो. तुम्ही तुमचे  मन घट्ट करा. व ठरविलेली वेळ होताच त्याचे ताट उचलून ठेवा. लगेच त्यास देऊ नका. कोणतेही भाष्य करु नका. ठरलेल्या वेळीच पुन्हा त्याला जेवनाचे ताट द्या. कोणतेही मुल उपाशी रहात नसते. तुमच्या अशाच वागणूकीने त्याला जेवणाची जाणीव होईल. आणि मुल सहजतेने जेवण घेईल. जेवणाला एक नैसर्गिक प्रक्रिया समजा. तुम्ही त्याला जेवढे खाऊ घालण्याचे प्रयत्न कराल, आग्रही बनाल, मुल तेवढेच रेंगाळते. हट्टीपणा करते. ह्यालाच  Attention Seeking Device म्हणतात. आपल्याकडे ह्यात मुले जींकतात व पालक हारतात.

मला अचानक माझ्या बालपणीची गोष्ट आठवली. एकत्र कुटूंब पद्धत होती. काका मामा यांची सर्व मुले एकत्र जेवण्यासाठी बसत होतो.  जेवताना एक खेळ खेळत असू. प्रत्येकाने आपल्या ताटांत एका बाजूला एक घास काढून ठेवायचा. जेवण करता करता इतरांकडे लक्ष ठेवायचे. कुणाचे लक्ष नाही हे बघून तो बाजूस ठेवलेला घास चटकन खाऊन टाकायचा. इतरांचे लक्ष चुकवून आपला बाजूस ठेवलेला घास खाण्यात जो सफल होईल तो जींकला. ह्यात तुम्ही जिंकण्याच्या प्रयत्यांत तुमचे जेवण चालू ठेवता. कारण तुम्ही सरळ जेवत आहांत हे इतराना भासविणे, त्याना फसवणे, व आपला घास त्याच जेवणांच्या प्रक्रियेत खावून टाकणे ही कला ठरते. खेळ छोटासा, परंतु मनाला एक वेगळीच दिशा देत जेवण पू्र्ण केले जायचे. हा खेळ म्हणजे जेवण्यामधील Distraction Method  च नव्हे कां ?  आम्ही त्याला ‘ घास घास घेणे ‘   म्हणत असू.

ललित लेख

बाळाची निद्रा

बाळाची निद्रा

चिंव चिंव करुं नकोस चिमणे,  बाळ माझे झोपले

काय हवे तुज सांग मला ग,   देईन मी सगळे

कपाट सारे उघडून ठेवले,   समोर ओट्यावरी

मेवा समजून लुटून न्यावे,   डाळ दाणे पोटभरी

घरटी बांध तूं माळ्यावरती,   काडी गवत आणूनी

कचरा म्हणूनी काढणार नाही,   ही घे माझी वाणी

नाचून बागडून खेळ येथे,    निर्भय आनंदानें

परि शांत न बसलीस तूं तर,   जागेल बाळ तान्हें

चिंव चिंव करणे गीत आहे कां ?   अंगाई तुमची

गावूनी आपल्या पिल्ला करीतां    रमवी मने त्यांची

असे असेल तर चालू ठेव तूं     चिंव चिंव ते गाणें

शाहणा माझा बाळ तो     ठावे त्याला सोसणे

कविता

जग आणि देह – एक साम्य

जग आणि देह एक साम्य

शरीरावरील एक मोठे ऑपरेशन ( Major Surgery ) बघत होतो. छातीचा व पोटाचा भागावरील कातडी- मासाचे आवरण काढताच देहामधले निरनिराळे अवयव दिसू लागले. निरनिराळ्या आकाराचे, लहान मोठे, वझनानी कमी जास्त दिसत होते. देहामध्ये वेगवेगळ्या पोकळ्यामध्ये प्रत्येकाला पातळ पडद्यामध्ये गुंडाळून, एकमेकाजवळ  ठेवलेले होते. प्रत्येक अवयवामध्ये पोकळ्या , वाहीन्या दिसत होत्या. देहाबाहेरील नैसर्गिक रचनाचे ह्या सर्व आतल्या आवयाचे  विलक्ष साम्य असल्याचे जाणवले. पर्वत, नद्या, जंगले, तलाव, प्राण्यांची हलचाल हा जसा बाहेरचा देखावा दिसतो, आगदी तसाच रचनात्मक पद्धतीने शरीराच्या आंत दिसला. वेगळेपणा जो भासत होता तो केवळ बघण्याच्या दृष्टीकोणामुळे. दोन्हीमध्ये जसे सौंदर्य होते, तसेच भयानकता देखील जाणवत होती. वाहीन्यामधून वाहणारे द्रव, रक्त, सारे शरीरभर वाहत होते. अवयवांत जमा होत होते. मोठ्या बहीरगोल भिंगामधून (  Magnifying lens )  त्याचे चित्र जणू निरनिराळ्या लोक व प्राणीच्या वस्त्याप्रमाणे जंगलाप्रमाणे भासत होते. त्यांची जा- ये हालचाल ह्या जरी सुक्ष्म असल्या तरी जणू वस्त्या, गांव, सडक, नदी, तलाव, इत्यांदींची अगदी हूबे हूब प्रतीकृती त्या सर्व देहातील स्थुल व सुक्ष्म रचनेमध्ये अगदी स्पष्टपणे जाणवत होती. एका भागातले अन्न, पाणी, हवा, वा इतर जीवनघटक पदार्थ एका अवयवातून दुसरय़ा अवयवामध्ये वाहीन्याच्या जाळ्यामार्फत नेल्या जातात. जे त्यावेळी काढून टाकण्यात आले, त्यालाच तज्ञानी हानीकारक वा रोगाची वाढ म्हटले गेले. शरीरातील अवयव रचनेचा व ह्या रोग रचनेचा देहांत असांच सदैव संघर्ष होत असतो. शरीरातील टिश्यू नष्ट होणे, पुन्हा नविन निर्माण होणे, ह्या क्रिया सतत चालतात.   जगातील वातावरणात वा परिसरांत देखील अशाच लोक, प्राणी, झाडे, जंगले, पर्वत, ह्या सर्वांत सतत हालचाली निर्माण होणे वा नष्ट होणे चालत असतात. रचनेमधले वर्णन जरी भिन्न वाटले तरी ह्या जगामधले आणि देहामधले सर्व स्थुल वा सुक्ष्म घटक पदार्थ कार्यानी, कार्याच्या लक्ष्यानी एकच असल्याचे भासतात. ते म्हणजे उर्जा निर्मिती व सर्व प्रक्रियेसाठी त्याचा उपयोग करणे हेच नव्हे काय  ?

जगाची जशी भौगोलिक रचना असते, ती पदार्थाची अथवा निर्जीव साधनांची असते. त्याच वेळी जो इतिहास बनत असतो तो सजीव प्राणीमात्रांचा. मानवी देहांत देखील अशाच प्रकारे इतिहास भूगोलाची सतत पुनरावृत्ती होत राहते. शरीरातील अवयवांची वाढ होत जाणे आणि त्याच वेळी अनेक रोगांची देहावर आक्रमणे होणे त्याच प्रकारचे ठरते. ह्यांत तोड-मोड-जोड होत राहते. नष्ट होणे वा विकास पावने सतत घडत जाते.

शरीरामध्ये सुक्ष्म भाग हा पेशी असतो. अगणित पेशींची ग्रंथी बनते. अनेक ग्रंथींपासून अवयव बनतात. अनेक अवयव एकत्र येऊन शेवटी शरीर बनते.

पेशींच्याच स्थरावर उर्जा शक्ती निर्माण होते. बाहेरुन मिळणारे घटक पदार्थ हवा, पाणी अन्न ह्यांच्या  मदतीने उर्जा निर्मीती होते. देहाच्या सर्व हालचाली क्रिया ह्या शक्तीनेच पूर्ण केल्या जातात. जगामध्ये देखील प्रत्येक पदार्थात सुक्ष्म घटक अणू असून त्यात देखील उर्जा निर्मीत वा साठवलेली असते, जीला अणू उर्जा म्हणतात.  तीची शक्ती प्रचंड प्रमाणात असते. निसर्गामधल्या दिसणारय़ा, जाणवणारय़ा आणि न दिसणारय़ा, आद्रष्य असलेल्या सर्व हालचाली व क्रिया ह्या केवळ ह्याच उर्जेमुळे होत असतात. जगाला ह्या उर्जा शक्ती मोठ्या गृहाकडून, सुर्याकडून मिळते.  ह्यामुळे मानवी देहाचे, कार्याचे, व जीवनचक्रांचे सारखेपण साधर्म ह्या जगांप्रमाणे भासते हे म्हटल्यास चुक ठरणार नाही. म्हणूनच सत्य वचन आहे की     ” जे पिंडी ते ब्रह्मांडी ”

आणि जर देहाप्रमाणे जग असेल, जगाप्रमाणे विश्व वा ब्रह्मांड असेल तर कल्पना करता येईल की सारे  ‘विश्व’   हे एक प्रचंड, अनंत, भव्य दिव्य  ‘देहधारी’   शक्तीस्वरुप आहे. ती केवळ कल्पना असली तरी त्याचे वर्णन अवलोकन ज्ञान हे मानवी विचारांच्या कितीतरी बाहेर आहे. त्यामुळे ‘ परमात्मा ‘ आहे  येवढेच आम्ही म्हणू शकतो. तो कसा  कोठे  ह्याची उकल करणे शक्यच नाही. तो केवळ  ‘उर्जामय ‘ असल्यामुळे, त्याला जाणता येते येवढेच समाधान.

ललित लेख

भाकरी

भाकरी

भाकरीच्या पाठीवर     ठसे दिसती हातांचे

जाता तव्यावर भाजूनी    निशाण राहते कष्टांचे

एका भाकरीच्या पाठी     हात कितीक गुंतले

कण कण देती ग्वाही      मन भरुनी कसे आले

उन्हा पावसांत फिरे      शेतामध्ये शेतकरी

टप् टप् घाम गाळी      उभी करीता जवारी

पोती पोती उचलूनी      वाहून नेई मजूर

दमछाक होऊनी ही      मिळत नाही पोटभर

ओवी म्हणत मुखाने       आई थापिते भाकरी

सारय़ांच्या कष्टामध्ये    तिच्या मायेची भागीदारी

धरणीच्या पोटातून      जीवन रस येई वरी

दुजासाठी जगा तुम्ही     बघा सांगते भाकरी

(कविता )

एक समाधानी योनी

एक समाधानी योनी

रस्त्यावरील एका पुलावर बसलो होतो. एक मेंढ्या बकरय़ांचा कळप समोर चरत होता. तो कळप साधारण ३० ते ४० बकरय़ांचा असावा. एक मेंढपाळ त्याना मार्गदर्शन करीत होता. तो कांही वेळा झाडावर चढून बरीचशी पाने फान्ट्या तोडून त्या बकरय़ाना चरण्यासाठी टाकीत होता. बराच वेळपर्यंत ते दृष्य बघत मी आनंद घेत होतो. त्यांची पळापळ, बागडणे, खेळणे, एकमेकाना ढूसण्या देणे, सारे चालले होते. चरणे हा प्रमुख कार्यक्रम त्या पार पाडीत होत्या. कांही बकरय़ा आपल्या पिल्लाना चाटीत होत्या. प्रेम व्यक्त करीत होत्या. त्यातील तरुण बकरय़ा त्यांच्या पद्धतीने प्रेम व्यक्त करण्यांत व्यस्त दिसल्या. जीवन चक्रामधले जवळ जवळ सर्व उपक्रम त्या तन्मयतेने पूर्ण करीत असल्याचे जाणवले. त्याच बरोबर त्या मेंढपाळामुळे सर्वजण सुरक्षित असल्याची भावना देखील बाळगुन होते.

भरपूर खा, प्या, बागडा, मजा करा, सुरक्षित रहा, हा संदेश त्या बाळगुन होत्या. आणि हे सत्य ह्या साठी की सर्वजण वर्तमान काळांत जगण्याचा आनंद घेत होत्या. भविष्याची त्याना समज नव्हती व क्षमतांदेखील नव्हती.  त्या कारणाने गरज वाटत नव्हती. त्यांचे भविष्य निश्चीत व अटळ होते. जसे तुमचे आमचे असते. ते म्हणजे मृत्यु. मृत्यु अंतीम असतो हे जरी सत्य असले, तरी त्याना खाटीकखाना ( Slaughter House ) ह्या दरवाज्यातून जावे लागणार असते. हे मानव निर्मीत  सामाजिक व व्यवहारीक आधारलेले सत्य बनलेले आहे. त्यामुळेच त्यांच्या मृत्युचे विविध प्रकार वा स्थळे नाहीत. मृत्युची एकच पद्धत. अपघाती आणि कांही क्षणांतच. एक घाव आणि दोन तुकडे.

कोणता उद्देश असतो जीवन चक्राचा. काय योजना आहे त्या ईश्वराची वा निसर्गाची ?  खरय़ा अर्थाने त्याची उकल आज पर्यंत निश्चीत व सर्वमान्य झालेली नाही. मानवाला बुद्धी, प्रगल्भता मिळालेली आहे. आपल्या विद्वतेच्या, ज्ञानाच्या, अनुभवाच्या शिखरावर जाऊन तो अनेक तर्क- वितर्क, प्रमेये, प्रस्थापीत करतो. तो श्रेष्ठत्व सिध्द करण्याच्या मागे लागला आहे. त्याचा संघर्ष, अविश्वास, आणि नैसर्गिक चक्रामधला विरोध हा शेवटी त्याचेच जीवन अशांत होण्यातच घडत आहे. खाण्याची चिंता, पिण्याची चिंता, विश्रांतीची चिंता, सुरक्षिततेची चिंता,  थोडक्यांत म्हणजे जगण्याचीच चिंता त्याने निर्माण केलेल्या आहेत. निसर्गाला हवे असते ते एक जीवन चक्र. जन्म, वाढ, पुनर्निमिती आणि मृत्युच्या छायेत जीवनाला निरोप. पुन्हा चालत राहते ते तसेच जीवन चक्र.

हे सारे करीत होत्या त्या बकरय़ा. शिवाय आपल्या जीवाचे बलीदान देऊन इतर जीवांचे पोषण करण्यांत सहभाग देत होत्या. मानवाने मात्र त्याच्या जीवनचक्रांत  बाधा आणून  निर्माण केलीत अनेक दुःखे आणि अशांतता. मृत्यु अटळ असला तरी त्याचे प्रकार अनिश्चीत केले. तो वेळ घेणारा झाला. वैचारीक भय निर्माण करणारा झाला. मृत्युची जाणीव तिवृतेने करणारा झाला.

” बकरय़ानो – मेंढ्यानो  निसर्गाच्या योनीतील समाधानी चक्रांत तुम्ही आहांत ”   म्हणत मी तेथून घरी आलो.

(ललित लेख )

श्रेष्ठ कोण?

श्रेष्ठ कोण?

 

स्तुती मी देवा करुं कुणाची

चित्र बनविले अतिशय सुंदर

सौदर्य वाटते लोभसवाणे

खिळून राहते जेथे नजर

 

तू तर असशील कलाकार तो

ह्या विश्वाचा कर्ता महान

जिवंत चित्र जे एक बनविले

दाद तयाची देईल कोण ?

 

जमता चित्र अतिशय रेखीव

मनास घेई मोहून ते

ह्यात चित्राची आपती किमया

मला न कांही दिसून येते

 

कला पुजारी रसीक मीच तो

सौंदर्य टिपती माझे नयन

मुल्यमापन ते अचुक करिती

कलाकार, कला, रसिक ह्यातून

 

परि मी तरी आहे कोण खरा

नसा नसा ह्या सौंदर्य टिपती

कला तुझी आणि दृष्टी तूझी

तुझेच सारे माझ्यांत असती

 

(कविता )

माईल स्टोन्स ( Mile Stones )

माईल स्टोन्स ( Mile Stones )

श्री वसन्तराव व्यवसायाने शिक्षक होते. त्याना दोन मुले. एक दहा वर्षाचा व लहान चार वर्षाचा. स्वतः शिक्षकी वृत्तीचे. त्यामुळे मुलांना चांगले संस्कार कसे शिकवले जातील ह्याबद्दल फार चोखंदळ होते. एकदा ते मुलासह आमच्याकडे आले. अंगणांत खुर्च्या टाकून आमच्या गप्पा चालू होत्या. मुले आपली करमणुक स्वतःच करण्यात व्यस्त झाली होती. मोठा मुलगा तेथेच पडलेले कॉमिक पुस्तक घेऊन झोपाळ्यावर बसून वाचत होता. लहान मुलगा अंगणामधील बागेत फुलझाडे बघण्यांत व खडेवाळू गोळा करुन खेळत होता. वसंतरावांचे लक्ष लहान मुलाकडे जाताच, ते रागाने ओरडले. “चिंतू काय घाणेरडेपणा चालवला आहेस ? ” लाल विटांचे तुकडे घेऊन ते कुटून बारिक करीत होता. सारे हात पाय व कपडे त्याने लाल रंगाने माखून टाकले होते. वसंतरावांचे ओरडणे काकाना आवडले नाही. त्यानी वसंतरावाना शांत राहण्याची खूण केली. व तो लहान मुलगा चिंतू जे खेळत होता, ते तसेच खेळू दे हे सुचविले. परंतु वसंतरावाना ते रुचले नाही. आरे काय हे घाणेरडे खेळणे. अश्याच वाईट सवयी मुलाना ह्याच वयांत लागतात. व ती पुढे बेशिस्त होतात. ते काकांना समजावू लागले. काका हासले. ” वय आहे त्यांच असेच खेळ खेळू दे त्याला. त्याच्या कल्पनेनेच तो हे सारे करीत आहेना खेळू दे त्याला.” वसंतराव बेचैन झाल्याचे वाटत होते. काका हे सारे टिपत होते. ” तुला मी एक गम्मत सांगतो. तुझ्या मोठ्या मुलाला सांग की तू तूझ्या लहान भावाबरोबर तसांच खेळ व करमणूक कर. ये निशी जा आणि चिंतू बरोबर तसाच खेळ. ” निशी उठला. त्याने ते कॉमिक पुस्तक बाजूला ठेवले. व तो चिंतू जवळ आला. विटांचे कुटून पिठ काढणे व त्यांत खेळणे हे निशीला आवडले नाही. तो क्षणभर ते बघून पून्हा आपल्याच जागी गेला. व तेच पुस्तक चाळू लागला. जीवनमार्गाचा जर आलेख काढला तर त्यावर टप्या टप्याने जीवनांत शारीरिक व मानसिक बदल होत असलेला जाणवतो. ह्याला माईल स्टोन्स Mile Stones अर्थात जीवन मार्गातील मैलांचे दगड म्हणतात. ह्या खूणा तुमची जीवन पद्धती, वैचारीक जडन घडन कशी बदलत जाते. ह्याचे वर्णन करते. जन्म, बालपण, तारुण्य, प्रौढ वय, म्हातारपण, आणि मृत्यु ही जीवनाची सर्व साधारण प्रत्येकाची पाऊलवाट असते. म्हणूनच ह्याला जीवन आलेख म्हटले गेले आहे. त्याच आलेखाचा जेव्हां विस्तार केला गेला, तेव्हां प्रत्येक पायरीचा विचार समोर येतो. लहान सहान हलचाली, फरक, वेगळेपणा, वाढ, प्रगती ह्या अंगाची नोंद ह्यांत केली गेल्याचे जाणवते. आवडी निवडीचा वयाच्या वाढीव चक्राशी खूपसा संबंध असतो. सभोवतालच्या परिस्थितीतून व्यक्ती सहसा तेच उचलून घेतो, जे निसर्ग त्याला शिकवतो. निसर्ग सदा वय ( शारीरिक/मानसिक), वाढ आणि वातावरण (सभोवताल ) ह्याच्या त्रिकोणातच त्याला बंदिस्त करुन त्याचे व्यक्तीमत्व तयार करीत असतो. आवडी निवडीची मुभा मात्र त्याने प्रत्येकाला दिलेली असते. म्हणूनच वाढ सारखी परंतु व्यक्तीमत्वामध्ये फरक हा दिसून येतो. चिंतूला आवडणारे खेळ खेळण्याचे वय आतां निशीमध्ये राहीले नाही. वयाच्या थोड्याशा अंतराने आवडी निवडीचा आलेख बदलून गेला. आवड आणि बदल हा जीवन वाढीचा प्रमुख गाभा असतो. त्याचमुळे जीवनाचे अनेक रंग उधळताना व्यक्ती आनंदाच्या व समाधानाच्या सतत शोधांत असतो. आगदी शेवटच्या क्षणापर्यंत.

(ललित लेख)

धन्य ती महाराष्ट्र माऊली !

धन्य ती महाराष्ट्र माऊली !

 

धन्य ती महाराष्ट्र माऊली

अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली     //धृ//

 

ज्ञानाचा तो मुकूटमणी, ग्रंथ रचिला ज्ञानेश्वरी

ओवीबद्ध साज प्राकृतीं चढविला, भगवतगीतेवरी

तेज चमकूनी सुर्यासम, दाही दिशा उजळली    //१//

अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली

 

तुकाराम तो संत महान, अभंगाचा राजा

हासंत खेळत शिकवली, जीवनातील मजा

अभंगाची मधूर सुमने, सर्वत्र तुक्याने ऊधळली     //२//

अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली

 

संवाद करुन विठोबाशी, नामदेव नाचला

तल्लीन होऊनी भजनासी, मधूर गाऊ लागला

भक्ति अर्पून प्रभूला, भावी निरंजने ओवाळली     //३//

अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली

 

तसेच झाले एकनाथ, भागवत त्यानी लिहीले

श्री रामदास स्वामी, दासबोध रचिले

निवृती सोपान मुक्ताबाई , कित्येक झाली संत मंडळी    //४//

अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली

 

शिवरायाची बातच न्यारी, दुमदुमला प्रताप

अंबेडकरांनी न्याय देऊनी, दलितास दिले योग्य माप

प्रतिकार करुनी जुलमाचा, अन्यायाला वाचा फोडली     //५//

अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली

 

टिळक आगरकर साने गुरुजी, तसेच झाले फुले

सावरकर सेनापती बापट, ह्यानी शुरत्व दाखविले

सारय़ांनी महान होऊनी, देशाची मान उंचाविली     //६//

अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली

(कविता)