Monthly Archives: मे 2020

कवीची खंत

कृष्णकमळ

कवीची खंत

भटकतो आहे कवि   विचारांच्या सागरांत

वाहात चालला आहे    व्यवहारी जगांत

आधार नाही त्याला    पैशाच्या शक्तीचा

कुचकामी ठरत आहे    प्रयत्न त्याचा जगण्याचा

अर्धपोटी राहात असतो     भाकरीच्या अभावी

लिहीत चालला आहे        काव्यरचना प्रभावी

उदासपणे बघतो आहे     ” हाऊस फूलची ” पाटी

लिहीली होती नाट्यगीते     त्यानेच सर्वासाठी

टाळ्यांचा तो कडकडाट       बाहेर ऐकू येई

उपाशी होते त्याचे पोट    खिन्नतेने निघून जाई

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

भिकाऱ्याची अनमोल मदत !

जीवनाच्या रगाड्यातून

भिकाऱ्याची अनमोल मदत !

 संध्याकाळी फिरण्यास निघालो. बागेच्या दारापाशी एक ग्रंथ विक्रेत्याचे वाहन उभे होते. विशेष पुस्तकांची विक्री चालू होती. माझी नजर एका दुर्मिळ ग्रंथावर पडली. गेली कित्येक दिवस ते पुस्तक मी मिळविण्याचा प्रयत्न करीत होतो. प्रकाशक, ग्रंथ भांडार, यांच्याकडून कळले होते कि त्याची नवीन आवृती येण्यास अवधी लागेल. मी ते विकत घेण्यासाठी पाकीट काढले. चार रुपये कमी पडत होते. हतबल झालो. पुस्तक विक्रेता नोकर माणूस होता. गाडी दूर गावची असून, लगेच जाणार होती. जवळपास कुणी परिचित दिसेना. सारे मार्ग खुंटले. मी निराश झालो. विवंचनेत पडलो. त्याच वेळी एक भिकारी, हात पुढे करून  मला भिक मागू लागला. ते सहन झाले नाही. मी हात करून त्याला  जाण्याची  खून केली. तो नमस्कार करून जाऊ लागला.  अचानक  मला त्याच्या हातात काही  नाणी दिसली.  एक विचार मनात चमकला. मी त्याला बोलावले.

” आहो तुमच्याकडे किती रुपये आहेत?”  मी विचारले.

 ” फक्त सहा रुपये साहेब. माझे ह्यात पोट कसे भरणार? “ तो म्हणाला.  

” चल मी तुला जेवण देतो. प्रथम माझे एक काम कर ” मी म्हणालो.

त्याच्या चेहऱ्यावर  आनंद दिसला.   

अर्थात् त्याच्या मदतीने,  माझे काम झाले. माझ्या करीता ते दुर्मिळ  पुस्तक मला मीळाले.  मी त्याला घरी घेउन आलो. मी त्याला जेऊ घेताले.   

एका अनामिक, परन्तु   वेळेवर मदत ( Timely help )  करणाऱ्या  त्या व्यक्तीला, मी  कधीही विसरणे शक्य नाही. 

परीस्थीतिचे  वलय फक्त वेळे भोवती फिरत असते. क्षणाचे महत्व  म्हणतात  ते ह्यासाठीच. जीवनाच्या एखाद्या प्रसंगी वेळ  ही तिचे महत्व  अतिशय कौशल्याने आपल्या मनावर बिमबवते. हा क्षण चुकला, हा क्षण मिळाला असता तर असे झाले असते. हा वाक्प्रचार  त्याच मुळे झालेला वाटतो. केंव्हा केंव्हा तर तुमच्या संपूर्ण  आयुष्याचे मोल ठरविण्याचे कार्य तो एक क्षणच करतो. भिकाऱ्या कडून योग्य वेळी मिळालेल्या मदतीमुळे,  ह्यातील खरे तत्वज्ञान  मला पूर्णपणे जाणवले.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०