Monthly Archives: मार्च 2012

जगाचा निरोप

जगाचा निरोप

 

काळ येतां वृद्धपणाचा,  विरक्तींची येई भावना

निरोप घेण्या जगताचा,  तयार करीत असे मना

वेड्यापरी आकर्षण होते,  सर्व जगातील वस्तूंवरी

नाशवंत त्या, माहित असूनी,  प्रेम करितो जीवन भरी

जीवनांतील ढळत्या वेळीं,  जेव्हां वळूनी बघतो मागें

मृगजळासाठीं धावत होतो,  जाणून घेण्या सुखाची अंगे

प्रयत्न केले जरी बहूत,   हातीं न लागे काहीं

पूर्ण कल्पना येई मनीं,   जगण्यात आंता तथ्य नाहीं

उर्वरीत आयुष्याची रेखा,  मर्यादेतच आखूनी काढी

समज येतां प्रभूचे सारे,   समर्पण करीत जग सोडी

(कविता)

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

ह्रदयातील ईश्वर

ह्रदयातील ईश्वर

महाभारतामधला एक प्रसंग आठवला. छोटासा परंतु जीवनातील अध्यात्म्याच्या प्रांतामधले एक महान तत्वज्ञान उलगडून सांगणारा वाटला.

द्रौपदी वस्त्रहरणाचा भयानक व तिरस्कारणीय प्रसंग. शकुनीमामा व कौरव हे वृत्तीने दुष्ट कपटी चालबाज होते. पांडव तितकेच भोळे होते. कौरवानी त्याचा पूर्ण फायदा घेतला. युद्धिष्टिर पांडवातील ज्येष्ठ बंधू. त्याला दुर्दैवाने द्युत ( सारीकापाट) खेळण्याचा नाद होता. कौरवानी त्याना कचाट्यात पकडले. शकुनी लबाडीने खेळला. पांडव  खेळांत सर्व गमावून बसले. इतके की भावनीक बेभान होऊन त्यानी जींकण्याच्या अपेक्षेने पत्नी द्रौपदी हीलाही पणाला लावले. कौरवानी द्रौपदीची विटंबना सुरु केली. हारलेले पांडव मुकपणे सारा भयावह प्रकार बघत  बसले.

द्रौपदी असाहय्य झालेली होती. तीला कुणीही मदत करण्यास सरसावत नव्हते. शेवटी तीने मानलेला भाऊ श्रीकृष्णाचा धावा केला. तो धाऊन आला. त्याने तीला त्या वस्रहरण प्रसंगातून सोडवले. सारे वातावरण शांत होऊ लागले होते.

द्रौपदी मात्र मानसिक निराशेने ग्रस्त झाली होती. ती कृष्णावर देखील रागावली. तीला एक आधीकार व प्रेम प्राप्त झाले होते.

”  कृष्णा हे सारे विक्षीप्त घडत असताना, मी तुझा धावा केला. तू आलास, परंतु तू येण्यास उशीर कां केलास ?  ”  प्रेमाने परंतु निराशेच्या स्वरांत द्रौपदीने कृष्णाजवळ तक्रार करीत विचारणा केली.       श्री कृष्णानी हासून उत्तर दिले.

” तू माझा धावा केलास. मदतीची अपेक्षा केली. ”

तू त्या क्षणी काय म्हणालीस ते आठव. तू म्हणाली होतीस  ” हे द्वारकेच्या कृष्णा मी संकटात आहे. तू त्वरीत येऊन माझी सोडवणूक कर. ”

तू जेव्हां मला हांक दिली की ” हे द्वारकेच्या कृष्णा, तेंव्हा त्याक्षणी मी तर तुझ्याच ह्रदयांत बसलो होतो. ”

जर तू मला  ” माझ्या ह्रदयातील कृष्णा संबोधून हाक दिली असतीस, तर मी तुझ्याजवळच होतो. त्याचक्षणी मला येता आल असत. परंतु तु मला द्वारकेच्या कृष्णा संबोधल्यामुळे मला प्रथम द्वारकेस जावे लागले व तेथून तुजसाठी आलो. त्यामुळे वेळ लागला. ”

आपण देखील जीवनांत ह्याच रीतीने आपली वाटचाल करतो. अशी समज आहे की तो ईश्वर हा तुमच्या आमच्यामध्येच असतो.  अहं ब्रह्मास्मि अर्थात  मीच ब्रह्म वा परमेश्वर आहे म्हणतात. मात्र आपण त्याला जाणत नसतो. समजत नसतो. “मी ”  ला ओळखत नसतो. त्याला आम्ही बाह्य जगांत शोधण्याचा सतत प्रयत्न करतो.   देवस्थळे, मंदिरे, चर्च, गुरुद्वारे, मशिदी, इत्यादी मध्ये त्याच्या अस्तित्वाचा शोध बोध घेण्याचा प्रयत्न करतो. संपूर्ण आयुष्य खर्च करतो. आम्ही ईश्वराला आमच्यातच म्हणजे “मी ” चा शोध घेण्यात कमी पडतो. त्यात वेळ खर्ची होते. ह्रदयातील त्या ईश्वराला श्री कृष्णाला जर द्वारकेत न्याल तर आयुष्याची  वेळ वाया जाईल.

(ललित लेख)

 

डॉ. भगवान नागापूरकर  

(९००४०७९८५०)

कविता स्फूर्ति

कविता स्फूर्ति

 

पूर्णणें मज पटले आतां

कविता कुणी करवून घेतो

कोण असेल तो माहित नाहीं

मजकडून तो लिहून घेतो

 

घ्यानी मनीं कांहींही नसतां

विषय एकदम समोर येतो

भाव तयांचे जागृत होऊन

शब्द फुले ती गुंफून जातो

 

एका शब्दानंतर दुसरे

आणि तिसरे, लगेच चौथे

शब्दांची ती भरुनी ओंजळ

माझ्या पदरीं कुणी टाकतो

गुंफण करुनी हार बनता

त्याजकडे मी बघत असे

फक्त प्रभूचे नाम घेऊनी

अर्पण त्याला करीत असे

(कविता)

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

बालपणीची भांडणें

बालपणीची भांडणें

 

मजेदार वाटत असती,  भावंडांची बघून भांडणें

मला पाहीजे जास्त,  हेच मुख्य मागणें

इजा नाही धोका नाहीं, नसतो तेथे तिरस्कार

दांत ओठ खाऊनी,  रागव्यक्त होणार

क्षणांत भांडती, क्षणात हसती, सारे होते प्रेमानें

दूर जाऊन जवळ येती, विसरुन जाती लोभानें

राग लोभ अहंकार, नसती असल्या भांडणीं

स्वार्थतेचा अभाव दिसे,  शत्रु येथे नसे कुणी

बालपणीच्या प्रेमामध्यें,  थोडे भांडणें परवडते

चव येण्या पदार्थाला,  तिखटमिठ लागते

लहान असतां भांडून घ्या,  तेच वय भांडणाचे

मोठे होऊन आठवाल,  रम्य दिवस ते बालपणाचे

 (कविता)

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

सिकंदरचे खंतावलेले मन

सिकंदरचे खंतावलेले मन

राजा अँलेक्झॉंडर दी ग्रेट हा ग्रीस देशाचा. ज्याला युनान म्हणत. एक परकीय आक्रमक भारतात आला होता. तो महापराक्रमी, लढवय्या, शुरवीर जसा होता, तसाच सहिष्णू, प्रेमळ व अध्यात्मिक प्रवृतीच होता. ह्याचमुळे त्याला भारतातच सिकंदर ( ज्येता व नशीबवान )ही लोकपदवी मिळाली होती. तो त्याच्या घोडेस्वार सैनिकासह होता. रस्त्यात लागणारे प्रदेश पादाक्रांत करीत, लुटालुट करीत, तो पुढे पुढे चालला होता. रस्त्यांत भेटणारे गांवकरी भितीने  पळून रानावनांत धावत होते. जे कोणी समोर आले, ते त्याला अभिवादन करुन नतमस्तक होत. ह्याचमुळे अहंकाराच खतपाणी त्याला मिळत होत. त्याची घोडदौड चालू होती.

अचानक त्याची नजर एका फकीरावर (साधूवर ) पडली. तो एका झाडाखाली दगडावर बसला होता. दोघांची नजरा नजर झाली. फकीराच्या चेहऱ्यावर एक अविचल, शांत, निर्भय, भाव होता. इतके सैन्य बघून देखील त्याच्या चेहऱ्यावर उत्सुकता वा भिती दिसून आली नाही. सिकंदरने आपला घोडा त्याच्या पुढ्यांत नेऊन थांबवला. सारे घोडेस्वार थांबले. सिकंदर घोड्यावरुन उतरला. फकीरासमोर गेला. दोघानी एकमेकाना बघीतले. सिकंदर फकीरास आपला परिचय देऊ लागला.

”  मी  अँलेक्झॉंडर अर्थात सिकंदर युनानहून भारतात आलो आहे. ”

फकीर उठून शांतपणे त्याच्याकडे टक लाऊन बघत होता. थोड्या वेळाने फकीराने चौफेर नजर टाकली. सर्व सेनिकांचे अवलोकन केले. तो सिकंदरकडे वळून विचारु लागला.

” राजा तू येथे कशासाठी आलांस ? ”

सिकंदर छद्मीपणाने हसला.   ” मी सम्राट आहे. येथील प्रदेश जिंकून घेणार. संपत्ती लूटणार .”       फकीराने हलके व शांतपणे विचारले        ” त्या नंतर पुढे काय करणार ? ”

सिकंदर उत्तरला   ” पुढे काय ?    हे लुटलेले धन युनानला घेऊन जाणार ”

” त्यानंतर काय करणार ? ”  फकीराने थोडेसे कुत्सीकतेने विचारले.

” काय करणार त्यानंतर ? कांहीही नाही. शांतपणे जगण्याचा प्रयत्न करीत, उर्वरीत सार आयुष्य व्यतीत करणार ”    सिकंदर मोठ्या गर्वाने उत्तरला.

फकीर हसला. तो सिकंदरकडे एक नजर लाऊन बघू लागला.   ”  राजा      हे सारे करुन, इतका उपद्वाप करुन, शेवटी शांततेच्याच मार्गाचा विचार करणार आहेस ना ?  मला हसू येत ते याच की तू हे सार झाल्यानंतर, जे करु इच्छीतोस,  ते तर मी आजच करीत आहे. – – – –

एका शांततेचा शोध. अनुभव जाणीव ,ज्यात फक्त असेल समाधान, प्रेम आणि नितांत आनंद. “

राजा गंभीर होऊन सारे ऐकत होता. ”  राजा तुझ्या बाबतीत एक सत्य परीणाम मला

दूरदृष्टीने दिसतो. तुझ्या शांततेच्या अंतीम प्रयोगांत, एक जाणीव तुला सदैव बेचैनी करील. तुझ्या मनाची  होणारी तगमग, उत्सुकता, आशा-निराशेचे झोके, केलेल्या शक्तीप्रयोगाचा पश्चाताप, दुखावलेल्या आत्म्यांचा अक्रोश, आणि तुझा बनलेला अहंकार. हे सारे भावनिक अविष्कार, तुझ्या मनाला त्या शांततेच्या जवळच येऊ देणार नाहीत. आनंदापासून वंच्छीत करतील ”

राजाचे डोळे पाणावले होते. कसल्याश्या अनामिक आंतरीक शक्तीने त्याच्या सद्सदविवेक बुद्धीवर फुंकार घातल्याची त्याला जाण आली. जवळची कांही फळे फकीरापूढे ठेवीत, त्याने फकीरास अभिवादन केले. खंतावलेल्या मनाने तो पुढे निघून गेला.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८४०

कोण हा कलाकार ?

कोण हा कलाकार ?

 

न पोंहचे झेप विचारांची,   टिपण्या त्याचेच सौंदर्य

अप्रतीम सृष्टीचा तो कर्ता,   शोधण्या तयासी मन जाय

थवेच्या थवे उडत जातां,   पक्षी दिसती आकाशीं

विहंगम ते दृष्य भासे,   आनंदूनी टाकती मनासी

बघतां संथ नदीकडे,   लय लागूनी जात असे

प्रचंड बघूनी धबधबा,   चकीत सारे होत असे

ऐटदार तो मयुर पक्षीं,   आकर्षक ते नृत्य दाखवी

सप्तरंगाचे इंद्रधनुष्य,   काळजाचा ठाव घेई

निसर्गातील प्रत्येक अंगी,   भरलाआहे सौंदर्य ठेवा

आंस राहते लागून मनीं,   कलाकार श्रेष्ठ तो जाणावा

(कविता)

डॉ.भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

होळीत जाळा दुष्ट भाव

होळीत जाळा दुष्ट भाव

एकत्र येऊं सारे जण   विसरुन जाऊं भेदभाव

जाळीन टाकू होळीमध्यें    दुष्ट असतील ते स्वभाव   //धृ//

ऐष आरामांत राहून    देह झाला मलीन

शरीर सुखासाठीं     करती नाना खटपटीं

आज आहे सण होळीचा   नष्ट करा आहीक भाव

जाळीन टाकू होळीमध्यें    दुष्ट असतील ते स्वभाव   //१//

मन असे चंचल भारी   सर्व दिशेनी घेई भरारी

राग लोभ अहंकार     मनाचे तर हे विकार

टाकता मलीनता मनाची   पेटलेल्या होळीमध्यें, घे धांव

जाळीन टाकू होळीमध्यें    दुष्ट असतील ते स्वभाव     //२//

विसरुन चाललो मानवता     प्रत्येक बघतो स्वार्थता

विश्वासाचे आपले नातें    विसरुन गेले सारे ते

निःस्वार्थ बुद्धीने आंता जाणा इतर मनांचे ठाव

जाळीन टाकू होळीमध्यें    दुष्ट असतील ते स्वभाव    //३//

कविता

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

जेष्ठत्व हे श्रेष्ठत्व कसे ?

जेष्ठत्व हे श्रेष्ठत्व कसे ?

ज्येष्ठ नागरिकाना श्रेष्ठ समजले जाते.

व्यवहारी जगांत बालपण, तारुण्य, प्रौढत्व आणि वृद्धापकाळ ह्या जीवन चक्रामधल्या  विवीध अवस्था. त्यांमध्ये मान्यता पावलेला शेवटचा काळ, ज्याला ज्येष्ठ नागरिक संबोधीले गेले. केवढा मोठा सन्मान हा त्या वयाचा. ज्येष्ठ नागरिक एक महान आणि सर्वांत सन्मानाची उपाधी बनलेली आहे.

ज्येष्ठ नागरिक हे वयानी श्रेष्ठ असतात. प्रचंड अनुभव हे आपल्या पाठीशी बाळगुन समाजात वावरतात. कुटूंब वत्सल असतात. जीवन व व्यवहार ह्या दोन प्रमुख मार्गावर अनेक पदे सांभाळलेली. प्रशासकीय, सामाजिक, आर्थिक, राजकीय, अशा अनेक क्षेत्राचे अद्यावत ज्ञान मिळालेली असतात. त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा योग्य फायदा समाजाच्या विकासांत व्हावा वा  त्यांच्याकडून करुन घ्यावा ही अपेक्षा.

ज्येष्ठाना अनेक सवलती शासनाकडून दिल्या गेल्या आहेत. आणि मिळतही आहेत.

एक गम्मत बघा. बस वा रेल्वेने प्रवास करा. इतरापेक्षा खर्च कमी.

यात्रीने भरलेल्या बस वा रेल्वेत अचानक शिरा. लोक तुमचा आदर करतात. लोक उठून आपली जागा तुमच्या साठी देऊ करतात. तुमचा चेहरा बघताच ती तुम्हाला मिळते. तो चेहरा असहाय्य वा मागणी करणारा नसतो. तर त्यावर किंचीत हस्याची छटा असते. एक आशिर्वाद देण्याची भावना असते. थोडेसे प्रेम व्यक्त होत असते. तुमच्या चेहऱ्यावर ज्येष्ठत्वाची झलक मात्र असते. ही व्यक्ती ज्येष्ठ नागरिक असल्याचा शिक्का त्या गर्दीत देखील तुमच्या विषयी आदर निर्माण करतो. शेजारचा विनम्र होऊन प्रेमाने हात धरीत आपले आसन मोकळे करीत तुम्हाला त्या जागेवर बसवितो. हां ! कदाचित् तुमची दुखणारी कंबर, मान, वा गुढगे, तुमचा वाकडा तिकडा करणारा शरिराचा आकार त्याच्या नजरेत आलाही असेल. पण ते कांहीही असो, तुम्हाला सन्मान पूर्वक न प्रयत्न करता, जागा मात्र निश्चीत मिळते.

आहो तुम्ही  बँकेत जा. इतरापेक्षा तुम्हाला जास्त व्याजदर मिळतो. तेथे तर तुमच्याकडे न बघता, फक्त समोरचा कागद बघत, तुमच्या वयाची कदर केली जाते.

केवढे महत्व आहे तुमच्या ज्येष्ठत्वाचे.

अनेक उपाधी (Degrees) असतात. त्या प्रत्येकजण आपल्या जीवनांत मिळवतो. परंतु त्या सहज मिळत नसतात. त्यासाठी अभ्यास, परिश्रम, व मनाचा निश्चय लागतो. मग ते ज्ञान कोणत्याही मार्गाचे असो. B.A., B.SC., B.Ed . L.L.B., M.B.B.S. C.A., B.E., B.Tech. इत्यादी. त्याच प्रमाणे निरनीराळे व्यवसाय ( Jobs) वा नोकऱ्य़ा जसे शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, अकॉन्टटंट, इत्यादी  ह्या सर्व त्यांच्या कर्तृत्वानुसार त्यांच्या उपाधी बनतात. त्यासाठी प्रत्येकाने त्या त्या प्रमाणात परिश्रम घेतलेले असतात. अभ्यास असतो, धडपड असते. कुणीतरी बाजारांत जाऊन त्या खरेदी केलेल्या नसतात. प्रत्येक उपाधी मागे दडलेली असते, त्याची त्या त्या प्रकारची तपश्चर्या आणि यश.

ज्येष्ठ नागरिक बनण्यासाठी मात्र विना श्रम, कांहीही कष्ट न घेता, कोणताही अभ्यास न करता, कोणत्याही परिक्षेला सामोरे न जाता मिळते ही उपाधी, ही डीग्री. आणि तीही अतिशय प्रतीष्ठेची.

कशासाठी ज्येष्ठाना श्रेष्ठ  समजले जाते?

प्रत्येकाच्या पाठीवर एक गाठोडे असते. ते अनुभवाने भरलेले असते व भरत जाते. हे गाठोडे जमा केले असते, जीवन दावावर लाऊन. आयुष्य खर्च करुन. निसर्गाने दिलेली पुंजी गमाऊन. Every thing at the cost of life. हे अनुभव जमा केलेले असतात. ते सहज मिळालेले नाहीत.

इतर प्रांत बदलले जातात. C.A. व्हायचे होत, डॉक्टर झालो. प्राध्यापक व्हायचे होते, वकील झालो. फुट बॉल प्लेयर व्हायचे होते, नट झालो. इत्यादी. जसे श्रम, प्रयत्न, परिस्थीती येत गेली,  व्यक्ती बदलत गेल्या.मार्ग व ध्येय बदलत गेले.  त्यांच्या उपाध्या बदलत गेल्या.

ज्येष्ठत्व मात्र कोणत्याही मार्गाने गेलांत तरी शेवटी ते मिळत गेले. ते सर्वासाठी एकच असते. सर्व उपाध्या मानव निर्मीत असतात. परंतु ज्येष्ठत्व जे प्राप्त होते, ते नैसर्गिक चक्राला अनुसरुन. आणि म्हणुन त्याचे अनन्यसाधारण महत्व असते.

जीवन मृत्युचा सतत लपंडाव चालू असतो. जीवनाच्या प्रत्येक क्षणा भोवती मृत्यु दबा धरुन बसलेला असतो. ह्याला काळ व वेळ यांचा खेळ म्हणतात. दोघे एकत्र येताच, मृत्यु  जीवनावर झडप घालतो. ते जीवन त्वरीत नष्ट होते. ह्याचसाठी आम्ही जीवनाला अनिश्चीत समजतो. आम्ही केंव्हाही, कोणत्याही क्षणी मरणार ह्याचे आम्हास इतरांचे मृत्यु बघून ज्ञान होते. परंतु मृत्युची जाणीव कुणासही केंव्हाही येत नसते. हा निसर्गाचा आशिर्वाद असतो.  निसर्ग तुम्हास सदैव जागृत राहण्याचा संदेश देत असतो. आम्ही आमच्या मनाच्या sub-conscious  अर्थात जाणीवेच्या  स्थरावर नेहमी सतर्क असतोच. ज्याचे ह्यांत थोडेशे दुर्लक्ष होते, मृत्यु त्यावर त्याच क्षणी घाला घालतो.

तुम्ही बघितले असेल. पक्षी- चिमणी वा कबुतर अंगणांत पडलेले दाणे, एकदम जाऊन टीपत नसतात. प्रथम ते सर्वत्र नजर टाकून मृत्यु कोठे लपलेला आहे कां? ह्याचा मागोवा घेतात. स्वसंरक्षणाची खात्री होताच ते दाणे टिपतात. प्रत्येक प्राण्याच्या जगण्याच्या हलचालीमधून त्याची सतर्कता सतत प्रतीत होत असते. हे त्याच्या सहज अंगवळणी पडलेले असते. एखादी चुक वा दुर्लक्ष त्याचे जीवन चक्र थांबऊ शकते.

माणसाचेही असेच दिसून येते. दैनदीन जीवनांत येत जाणाऱ्या असंख्य संकटा विषयी तो सतर्क असतो.  ती संकटे नैसर्गिक असो वा मानव निर्मीत. जीवाचा बचाव करणे, निसर्गाने जे दिले ते योग्य तऱ्हेने सांभाळणे हे सर्वात त्याचे प्रथम कर्तव्य समजले जाते. आणि प्रत्येकजण स्वतःची त्याप्रमाणे काळजीही घेत असतो. क्षणा क्षणाला मृत्युशी त्याचा संघर्ष होत असतो.

इतका कठीण आयुष्याचा मार्ग तो चालत असतो. आणि एक एक पाऊल टाकीत जेंव्हा आयुष्याची सर्व साधारण मर्यादा जी निसर्गाने अंदाजे १०० वर्षे त्याच्या वाटेला दिलेली असतात, तो ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.

अशा भयावह व क्षणा क्षणाला संकटग्रस्त वाटणाऱ्या जीवनाची ५० वर्षे तो जेव्हां पूर्ण करतो, त्याची अर्धी जीवनपाऊल वाट झालेली असते. जवळ जवळ निसर्ग अपेक्षीत कर्तव्ये संपत आलेली असतात. प्रौढत्वाचा टप्पा ओलांडून तो वृद्धत्वाकडे झुकू लागतो. त्याच्या ह्या  धडाडीपूर्ण व यशस्वी टप्यालाच ज्येष्ठत्वाची संकलपणा मानलेली असते. त्याचा ज्येष्ठत्वाचा काळ आरंभ झालेला असतो.

जीवनाचे इतर मार्ग जसे Money, Muscle, Spirit, Career. Character, Recommendations, इत्यादी यश मिळविण्यास मदत करु शकतात. परंतु ज्येष्ठत्वाच्या मार्गाला पर्याय नाही. तो एकमेव व निश्चीत आहे.

जे खचकले ते गेले. जीवनाच्या चाकोरीतून हटले. जे टिकले, खंबीरपणे झगडत राहीले, ते जीवन मार्ग चालत राहीले. आज त्याना ज्येष्ठाची उपाधी मिळाली. अनुभव घ्यावा लागत नाही. तो मिळतो. निसर्ग तुमच्या ओंझळीत टाकतो. तुमच्या पाठीवरचे गाठोडे वाढत जाते. ते जेवढे मोठे, तेवढाच सन्मान मोठा.

१०० वर्षे जे पुर्ण करतात त्याना शतायुषी ही उपाधी सन्मानाने दिली जाते. ज्या ज्येष्ठानी  ९० ते ९५ वा १०० ह्या वयाचा टप्पा गाठलेला आहे,  काय वेगळ त्यानी केल ?  ते जीवनाशी संघर्ष करीत राहीले. प्रत्येक क्षण मृत्युच्या भोवऱ्यांत गुंतलेला असतना, जीवन क्षणभंगुर असताना. ते जागृतपणे जगले. व यशस्वी झाले. मृत्यु केंव्हा व कसा घाला घालील अनिश्चीत असते. प्रत्येक क्षणाबरोबर, वातावरणाबरोबर, तुमचा सतत संघर्ष चालू असतो.

एक प्रकारचा लढा. जे जगले ते केवळ त्यांत यश मिळत गेले म्हणून. निसर्ग नेहमी जीवन मृत्युची दोन्हीही दारे उघडी करुन तुम्हास मार्ग दाखवित असतो. तुमची सतर्कता तुम्हाला जगवित असते. जीवन पुढे पुढे जाण्यात मदत करीत असतो. आपले ज्येष्ठत्व हे लढा करुनच आपण मिळविले आहे. म्हणूनच हा ज्येष्ठत्वाचा सन्मान.

येथे एक महत्वाची बाब सर्वांसमोर आणू इच्छीतो. जीवनाची वाटचाल जरी खडतर दिसत असली तरी मानवाने आपल्या बुद्धी व ज्ञान याच्या साहाय्याने तीलाच पूर्णपणे बदलून टाकलेले आहे. ते जीवन आता आनंद देणारे, हवे हवेसे वाटणारे, सुलभ, आशादायी, करमणूक प्रधान बनलेले आहे. तरी मृत्युच्या चकरा जीवनाभोवती चालूच असतात

(ललित लेख)

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०