Monthly Archives: मार्च 2016

निसर्गाची ध्यान प्रक्रिया

निसर्गाची ध्यान प्रक्रिया

खिडकीमधून बाहेर बघत होतो. झाडाच्या एका फांदीवर एक कबूतर बसले होते. त्याचे डोळे व चेहरा मला स्पष्ट दिसत होता. डोळे मिटून कसलीही हालचाल न करता ते बराच वेळपर्यन्त तेथे बसले होते. कबूतराचे शांत डोळे मिटून बसणे, मला त्याची त्याच्याच पद्घतीने केलेली ध्यान धारणा, वा समाधीयोग वाटला. ध्य़ान प्रक्रिया साध्य होण्यासाठी गुरुची अवशक्ता लागते कां ? सर्व साधारण साधकासाठी, व्यक्तिसाठी निश्चीत. परंतु शेवटी ही एक नैसर्गिक क्रिया ठरते. ज्याना उत्स्फूर्त शांतता प्राप्त करायची असते, ते शरीराला हालचालविरहीत करतात. मनाला लगाम लावतात. मग ती व्यक्ती असो वा प्राणी. प्राण्यालाही मन असते, भवना असतात. निसर्ग ही कला त्यांच्या प्रयत्नाना देतो. या प्रक्रियेत त्याना निश्चित आनंद, समाधान, आणि चेतना प्राप्त होते. एकदा सहज मिळालेला आनुभव ते सोडीत नसतात. ज्याचे आनंदी परिणाम त्यानी जाणले, त्याच गोष्टींची पुनरावृत्ती करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
जीवाच्या आत्म्यातच त्या ईश्वराचे अंशाने अस्तित्व असते. प्राण्यांच्या सर्व हालचाली त्याचा देह सुदृढ व कार्यारत ठेवण्यासाठीच असतो. निद्रा वा विश्रांति ही शरीराला तजेलेदार, उत्साहित ठेवते. खरय़ा निद्रेचे चक्र जर बघितले तर प्रथम शरीर शिथील होते. नंतर मन शांत होणे, व निद्रा लागणे हे घडते. मन शांत होण्यांत अनेक अडचणी व वेळ लागतो. कारण ते वैचारिक लाटांत धावत असते. ज्याला स्वप्नावस्था म्हणतात. ही अवस्था क्वचित् आठवणीत राहते.
ह्या सारय़ा हलचालीमधूनही एका अवस्थेतून देह व मन एकरुप होऊन त्याच्याच आत्म्याशी संवाद साधतो. येथे देह मृत स्थितीस्वरुप असतो. मन पूर्ण अविचल झालेले असते. देहमन खरय़ा अर्थाने आत्म्याजवळ गेलेले असतात. जीव संपूर्ण जगाला विसरला, पारखा झालेला असतो. हे सारे क्षणिक असते. हाच तो ईश्वरी सान्निध्याचा क्षण. ह्याच त्या अवस्थेत आत्म्याला चेतना मिळते. ज्यासाठी प्रत्येक जीव धडपडत असतो. हे जरी क्षणिक असले, तरी हे सर्व साधारण दैनंदिन असते. प्रत्येक जीवांत ह्याच पद्धतीने अजाणतेपणाने ईश्वराचे सान्निध्य मिळते व चेतना प्राप्त होते. आनंद, समाधान आणि चेतना ( उत्साह ) ह्यांचा सामुहिक परिणाम Ecstasy of Joy म्हणतात. तो क्षण गाढ निद्रावस्था Deep Sleep यानेच साधला जातो.
दुर्दैवाने त्या अनमोल क्षणाचे पकड सुटतांच, देह अस्थित्वाच्या जाणिवेमध्ये उतरतो. आठवणीची नोंद न होता, त्याची दैनंदिनी चालू होते. व्यक्त होतो तो आनंदी परिणाम-चैतन्य. ऋषी, संत महात्मे, थोर व्यक्ती, ध्यान धारणा, समाधीयोग यांची महती अनुभवाने गातात. जागृत राहून याचा आनंद घ्या म्हणतात. सत्य आहे. परंतु सामान्यांसाठी कठीण. निसर्गानेच कदाचित् सर्व जिवीत प्राण्यासाठीं गाढ निद्रेच्या मार्गातून, अवस्थेतून धान परिणाम साध्य करण्याचे योजीले नसेल कां ?

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

काळपुरुष

काळपुरुष

शहापूर जिल्हा ठाणे. शासकिय ग्रामीण रुग्णातयांत वैद्यकीय अधिकारी असतानाचा प्रसंग. शवविच्छेदनासाठी एका पन्नाशीतील व्यक्तीचा मृतदेह आणला होता. पोलीस पंचनामा रिपोर्ट वाचला. त्या प्रमाणे घटनेचा तपशील अंतर्मुख करायला लावणारा खचितच असा होता.
भास्कर बहिर व त्याचा मित्र सुनील जाधव दोघेजण बागेतील एका बाकड्यावर बसले होते. मंद मंद वारे वाहत होते. भास्करला आळस आला होता. आळेपिळे देत शरिराला शिथील करण्यासाठी त्याने तोंड उघडून वर बघत जांभई दिली. अचानक त्याचक्षणी हवेमुळे उडत आलेली एक छोटी वस्तू त्याच्या तोंडात शिरली. बघता बघता ती गिळले जाऊन घशांत शिरली. त्याने भास्कराला श्वास घेणे कठीण करून टाकले. भास्करची तगमग झाली. खोकून ओकून ते काढण्याचा प्रयत्न झाला. तोंडात बोटे घालून ते काढणे व श्वास मोकळा करणे याची घडपड केली गेली. कांही मिनीटे तडफड झाली. सुनील जाधव भास्कराला त्याच्या श्वासोच्छास करण्यासाठी आपल्यापरी मदत करु लागला. जवळचे इतरही जमले होते. कुणी वारा घाल, कुणी त्याची छाती दाबून कृत्रिम श्वासोच्छास करण्यास मदत कर, हवा घाल, तोंडावर पाणी मार हे झाले. एकाने तर कांदा आणून फोडून नाकाला लावला. परंतु सारे सारे प्रयत्न व्यर्थ गेले. कांही हलचाली वा रुग्णालयीन मदत मिळण्यापूर्वीच , एक सशक्त आणि निरोगी भास्करचा,केवळ थोड्याश्या मिनीटांत अंत झाला.
खूप बारकाईने शवविच्छेदन ( Post Mortem ) केले गेले. विच्छेदनांत त्याच्या शवनलिकेच्या सुरवातीच्या तोंडावर, स्वरयंत्राजवळ Near the Vocal Cord एक झाडाचे छोटेसे पान दबून बसलेले सापडले. त्याला व्यवस्थीत काढून बाटली मधील फॉर्म्यालीनमध्ये (Formalin) सीलबंद केले.
एका मृत्युला कारणीभूत होणारे ते पान होते. मी बारकाईने त्या पानाचे निरीक्षण करु लागलो.
माझ्या डोळ्याना दिसले नाही. परंतु निश्चीत भासले की त्या पानांत काळपुरुष लपून बसला होता. वेळेची त्याला चाहूल लागतांच त्याने अलगदपणे झडप घातली.

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

मला देव दिसला !

मला देव दिसला !

बाल वयात जेव्हा पासून सभोवतालच्या जगाविषयी समज येवू लागली, त्या ईश्वराला जाणण्याची उत्सुकता मनामध्ये निर्माण झाली. सर्व अद्भूत जग निर्माण करणारा त्यावर नियंत्रण ठेवणारा, त्याला नियमानुसार चालविणारा कुणी तरी असेल हा विचार पक्का होऊ लागला. बुध्दीमध्ये स्थीर होवू लागला. जन्म, संस्कार आणि कौटूंबीक धार्मिक आचरण ह्याचा लवचिक असलेल्या बालमनावर त्वरीत पगडा बसू लागला. जे आहे, जे बघतो, जे ऐकतो, जे वाचतो आणि त्या वयात प्राप्त झालेल्या ज्ञानाने जे समजतो ते सारे मान्यता पावू लागले. कसलाही विरोध न करता गृहण करणे, आत्मसात करणे ही मनाची ठेवण व स्वभाव बनू लागला. अनेक कविता, श्लोक, सूभाषिते ज्यांचा अर्थ त्यावेळी मुळीच कळला नव्हता, ती मुखोलगत करू लागला. त्यात महान तत्वज्ञान भरलेले आहे. चांगले विचार आहेत. भावनांचे उच्च स्तर आहेत. ईश्वरी श्रध्देचे वर्णन आहे. जीवन कशासाठी व जगायचे कशाकरीता ह्याचा अर्थ भरलेला आहे. हे सारे आम्हास सांगितले गेले. ते आम्ही जसे आहे तसेच पाठांतर करून नियमीत रूपाने व्यक्त करीत होतो, म्हणत होतो. त्यावर फारसे चिंतन केले नव्हते. कित्येक संस्कृत श्लोक मुखोलगत केले व म्हटले गेले ज्याचा आजही अर्थ व्यवस्थित कळत नाही. एक मात्र झाले की सर्वांमधून त्या ईश्वराची महानता, भव्यता, दिव्यता, अथांगपणा, शक्तीसामर्थ ह्या गुणांची प्रचिती येवू लागली. फक्त ओळख पटू लागली. ह्यातच जाणीव निर्माण होवू लागली की त्या दिव्य अशा परमात्म्याला कसे भेटावे, बघावे आणि खऱ्या अर्थाने कसे जगावे.
कौटूंबीक धार्मिक संस्काराचा पगडा मनावर बसत असताना पूजाअर्चा, मंत्र विधींचा प्रभाव पडू लागला. देवघरातील मुर्ती, तसबीरी मनाला आनंद देणाऱ्या वाटू लागल्या. कर्मकांडात मन गुंतू लागले. पूजापाठ, भजन ह्याचे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न झाला. धार्मीक पुस्तक संग्रह गोळा करू लागला. पूजा विधी कशी निटनेटकी होईल. ह्याकडे लक्ष केंद्रीत करू लागला. कोणतीही वस्तू वा साधने जर पूजाविधीत कमी पडली तर खंत वाटू लागली. त्याची योजना व काळजी घेतली जायी. समोर असलेल्या मुर्ती व तसबीरीबद्दल ज्ञान मिळण्याची उत्सुकता लागली. माहीतीसाठी अनेक पौराणीक ग्रंथाचे वाचन करू लागलो. अर्थात ते अभ्यासाने म्हणण्यापेक्षा चाळने असावयाचे. प्रचंड धार्मिक पुस्तके वाचली. देवदेवतांची वर्णने, त्यांच्या विषयीच्या अनेक कथा, त्यांची उत्पती अथवा अवतार पावने, प्रासंगीक कथा, शाप-वरदानाच्या गोष्टी वाचल्या. अनेक संस्था असलेले म्हणजे ३३ कोटी देवांची संख्या असलेले वर्णन, अनेकांची कार्ये व विश्वाची योजना इत्यादी प्रचंड प्रमाणात असलेली माहिती वाचता वाचता, संकलन करता करता, मन आनंदून जसे जात असे. त्याचवेळी मनात असंख्य प्रश्नाची गर्दी होवू लागली. कित्येक कथा प्रसंग, वर्णने आणि परिणाम मानव जीवनचक्राला समोर ठेवून केल्याचे भासले. त्यामध्ये थोडीशी भव्यता, दिव्यता प्रदर्शीत होत आहे. मानवी जीवनाचा वरचा स्थर, उच्चता फक्त प्रतीत होत होती. कित्येक प्रसंग वा वर्णने मनाच्या श्रध्येला विचलीत करीत होते. ती अंधश्रध्देच्या दालनात नेवून ठेवीत होते. मनाचा एक प्रकारे कोंडमारा होत असल्याची जाणीव होत होती.
आपलीही एक बुध्दी आहे, विचार करण्याची आपलीपण क्षमता आहे. हे वाटू लागले. एखादा विचार जो वर्षानुवर्षे चालत आलेला आहे. त्याचे मुळ अज्ञात आहे. त्यात बरेच फेर बदल झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तो विचार आजच्या घडीला स्थिर झाल्याप्रमाणे भासतो. तो आहे तसाच मान्य करावा का? ह्यामध्ये मन हेलकावे घेवू लागले. तरी आपल्या अभ्यासाच्या मर्यादा जाणल्या. ते पौराणीक चित्र, त्या कथा तशाच मान्य कराव्यात हे मनाने ठरविले. जे पूर्ण पटले, आवडले त्याला श्रध्येने मान्यता दिली. जो भाग विपरीत वाटला, त्यावर भाष्य न करता विचारांच्या दालनातून वेगळा करून दिला.
2 पौराणीक कथा व कथासार वाचण्यानी मनाच्या धार्मिक वृत्तीना, ईश्वरी सानिध्याची ओढ लागली. ईश्वरी रूप मनामध्ये दृढ होवू लागले. सगुण इश्वरी साधना मनास आनंदी देईल, समाधान देण्यासाठी मदत करेल हा विचार दृढ झाला. अनेक सगुण रूपी ईश्वरांच्या प्रतिमांनी मनात एकच गर्दी केली. ऊँ नमो भगवते वासूदेवायन् महा ह्याचे भव्यतेमध्ये महाविष्णूची प्रतिमा डोळ्यापुढे आली. जय जगदंबेच्या स्वरूपात विश्वाची जगत जननी श्री. अंबामाता तीच्या सिंहरूप वाहन व आयुध्ये यांनी मन प्रसन्न होण्याचा अनुभव आला. श्री. गजानन, श्री. कृष्ण, श्री राम, श्री सुर्यनारायण अशा अनेक भव्य आणि दिव्य देवदेवतांचे प्रतिमामय वर्णनात्मक स्वरूप मनात तरंगु लागले. त्यांची अनेक कार्ये, शक्ती महत्व आणि कृपादृष्टी यांची वर्णने धार्मिक पुस्तक संग्रहामधून होवू लागली. त्याचा मनावर पगडा बसू लागला. सर्वांविषयी श्रध्दा निर्माण होवू लागली.
पुस्तकांच्या ह्या संग्रहामधून पौराणीक जगातून आधूनिक जगामध्ये येवू लागलो. आधूनिक जगाचा ईश्वरी मार्गदर्शनाच्या इच्छेने अभ्यास होवू लागला. थोर संत मंडळी, श्री. संत ज्ञानेश्वर महाराज, श्री. संत तुकाराम महाराज, श्री. संत एकनाथ महाराज श्री. संत नामदेव महाराज आणि चरित्रे व कार्य वाचले. ह्यांनी अशाच थोर संत मंडळींनी आपल्या ज्ञानांनी, भक्तीरसांनी आणि विशेष म्हणजे आपल्या उच्चतम मानवी वागणूकींनी जो समाजात आदर्श घालून दिला. भक्तीमार्गाच्या दिशांचे मार्गदर्शन केले ते मनाला खूपच आनंद व समाधान देणारे वाटले. अनेक देवदेवतांचे वर्णन व त्यांचे दिव्यत्व ह्याचे ज्ञान होवू लागले. परमेश्वराचे एक रूप, त्याचे सर्व ठीकाणचे अस्तित्व आणि तो सर्वशक्तीमान असल्याची जाणीव त्यांच्या लेखनातून, अंभगातून तीव्रतेने होवू लागली. त्याचबरोबर तुम्ही कोणत्याही एका देवाला समर्पीत व्हा, त्याच्यावरच आपली श्रध्दा, भक्ती अर्पण करा, त्याच्या एकाच सगुणरूपामध्येच त्या निर्गुण, निराकार परमात्म्याला बघा. त्या तुमच्या इष्ठ देवामध्येच तुम्ही त्याला जाणू शकाल. तुमचे प्रेम, समर्पण व भक्ती ही शेवटी जी प्रमुख देवता शक्ती असेल तीलाच मिळते. निरनिराळ्या सगुण देवतांच्या वर्णनामुळे चंचल मनाची जी संभ्रमावस्था होत असे तीला बंधन पडले. कोणता देव मोठा, कोणता महान, कोणता कृपावंत वा कोणता आपल्या भक्तीला पावेल ह्या वैचारीक वादळाची शांतता झाल्याचे वाटले. आता भक्ती व समर्पण भावना फक्त एकाच देवाच्या चरणी अर्पण करण्याचा संकल्प मनाने घेतला. माझे गुरू श्री शंकराचार्य जैरेस्वामी महाराज यांचे संकल्प मनाने घेतला. श्री शंकराचार्य जैरेस्वामी महाराज यांचे मार्गदर्शन झाले. त्यांची पाठ्यपुजाकरून आशिर्वाद घेतले. “तुझ्या कुळाची घराण्याची देवता कोणती?” अर्थात कुलस्वामी वा कुलस्वामिनी श्री. जगदंबा रेणुकादेवी आहे. त्यामुळे त्याच श्री जगदंबेचे सतत चिंतन करणे, तीची सदैव आठवण ठेवणे, तीचे नामस्मरण करणे आणि जी विविध देवता रूप आहेत त्या सर्वाना भक्तीपूर्वक फक्त त्या जगदंबेमध्येच असल्याचे समजणे, तीच्याच रूपांत, नावात सर्व देवतांचे दर्शन झाल्याचे समाधान मनात निर्माण करणे, हा उपदेश मिळाला. वैचारीक व्दिधा परिस्थीती एकदम नाहीशी झाली. माझी इश्वरी संकल्पना जी होती तीचे स्वरूप मी फक्त श्री जगदंबेच्या, फक्त एकाच देवतेमध्ये केद्रींत करू लागलो. तीचेच नामस्मरण व आठवण सतत राहील याची काळजी जाणीवपूर्वक घेवू लागलो. काही काळानंतर जगदंबेच्या नामस्मरणाची इतकी सवय होऊ लागली की इतर कोणत्याही देवतेचे नाव जवळ जवळ विसरले जावून फक्त “जय जगदंब” हेच मनात येवू लागले. कोणत्याही देवाच्या मंदीरामध्ये जर दर्शनाला जाण्याचा योग आला तर त्या देवतेच्या मुर्तीला श्रध्दापूर्वक अभिवादन करताना, त्याचे स्तुती श्लोक म्हणण्याऐवजी फक्त “जय जगदंब” म्हणत मी त्या देवतेच्या ठिकाणी श्री जगदंबाच असल्याची भावना व्यक्त करून नमस्कार करीत असे. असल्या वागण्याची प्रथम प्रथम मनात खंत व शंका येत होती. मन बहकले असावे असे वाटे. समोर श्री गजाजनाची वा श्री. शंकराची अथवा श्री विष्णूची , रामकृष्ण यांची मूर्ती बघत असताना, त्याना अभिवादन करीत असताना मी मात्र ‘जय जगदंब’ म्हणत असे. त्या त्या
3 देवताना तीच्याच रूपात नमस्कार करीत असे. परंतू माझ्या मनाचा दृढनिश्चय आणि मी केलेला संकल्प मला सतत धीर देत होता.
थोड्याशाच काळानंतर मनाची संभ्रमी अवस्था एकदम नाहीशी झाली आणि माझ्या भक्तीची दिशा व नामस्मरण मी केवळ जय जगदंबेच्या चरणी अर्पण करण्यात यशस्वी होवू लागलो. त्या जगदंबेचे सततचे नामस्मरण व भक्तीपूर्वक आठवण हा देखील पूजा अर्चाचाच एक भाग असल्याची जाणीव होत होती. ते एक कर्मकांडच होते. जर देव दिसला, भेटला तर कदाचित श्री जगदंबेच्या स्वरूपात असेल ही मनाची पक्की खात्री झाली. परंतू ही सारी जर तर ची भाषा होती, समज होती.
त्या परमात्म्याच्या शोधात अनेक यात्रा केल्या. अनेक तीर्थस्थानाना भेटी दिल्या. जसे श्री कैलास मानसरोवर, चारधाम, दत्तधाम, सर्व ज्योतीर्लिंग स्थाने, वैष्णवदेवी अमरनाथ, रामेश्वर आणि अशी अनेक देवालये, मंदिरे यांना भेटी दिल्या. भारतातील जवळ जवळ सर्व प्रसिध्द मंदिराना भेटी दिल्या, देवदेवतांचे भक्तीभावाने दर्शन घेतले. ही सारी महान देवस्थाने, लाखो करोडो भक्तांच्या भक्तीरसांत वाहून निघालेली होती. कित्येकांनी भक्ती व तपश्चर्या तेथे जाऊन अर्पण केलेली. ती भूमि, तो परिसर पवित्र करण्यात सहभाग घेतलेला. तेथील देवदेवतांच्या मुर्तीमध्ये दिव्यत्वाच्या शक्तीची साठवणूक केलेली, अशा मंदिर परीसरांना भेट देण्याचा प्रयत्न केला गेला. यथासांग पूजा, भजन व दर्शन घेत गेलो. त्या देवतांमध्येच श्री जगदंबेला बघण्याचा प्रयत्न केला.
हे सारखे शारीरिक होत होते. मनाला, भावनेला भक्तीला समर्पण करण्याचा प्रयत्न होत होता. हे सारे क्रियात्मक, योजनात्मक (preceednral approch) होत होते. ईश्वरप्रातीसाठी काहीतरी रचनात्मक आणि परंपरागत गोष्टी करीत असल्याची भावना होत होती. समाधान मिळत होते. आनंद प्राप्त होत होता. परंतू शांतता अर्थात ‘मनाची शांतता’ मात्र मुळीच हाती लागली नाही. दैनंदिन पूजा-अर्चा, नामस्मरण, भजन-किर्तन, पवित्र स्थळांचे , मंदिरांचे दर्शन, पवित्र नद्यांचे-जलांचे स्नान ह्या सर्व बाबी मन एकाग्र करून भक्तीने करीत गेलो, परंतू खरी ‘मानसीक शांतता’ केव्हाच मिळाल्याचा भास झाला नाही. माझे गुरू श्री शंकराचार्य जेरेस्वामी 5 यांना शरण गेलो. चर्चा झाली. सान्तवन केले गेले. मार्ग सुचविले गेले. त्यावर चिंतन करून त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न झाला.
स्वभावाची ठेवण, वागणूकीची पध्दत, मनाचे विकार हे सारे ‘खरी शांतता’ मिळण्या मधल्या बाधा होत्या. आजपर्यतेचे जे प्रयत्न झाले. हे सारे बाह्यांगी होते. त्याचा आनंद व समाधान तीतकाच सिमीत होता. आत्मीक आनंद प्राप्त करायचा. असेल तर अंतरमुख होण्याची गरज होती. चांगला, प्रेमळ व निस्वार्थी स्वभावात नेहमी राहण्याची सवय ही खरी प्राथमिक महत्वाची पायरी होती. सभोवताली असलेल्या वातावरणाशी, दैनंदीन संपर्कामध्ये येणाऱ्या व्यक्तीशी संसार होत जाणाऱ्या घटनांशी मनाचा, विचारांचा सतत संपर्क येत असतो. मन त्या संपर्काला त्याप्रमाणेच प्रतिसाद देत असते. वैचारीक स्वभावाची ठेवण, राग, लोभ मोह इत्यादी पढरिपूंचा पगडा ह्याचा परिमाम प्रत्येक घटनेशी प्रतीक्रीया होण्यात होतो. ह्या ठिकाणी योग्य वा अयोग्य ह्या परिणामापेक्षा इच्छा व आवड ह्या भावनीकबाबींचा जास्त विचार मन करते. शेवटी त्या परिस्थीतीतून उत्पन्न होते ती अशांत “मनाची अवस्था” शांत मनाने विचार केला, चिंतन केले तर तुम्ही गरजेशिवाय प्रत्येक घटनेमध्ये, प्रत्येक व्यक्तीच्या संवादामध्ये, सहववासामध्ये विनाकारणच स्वत:ला गुरफटून गेत असल्याची सत्यता पटेल. जेथे सहवास तेथे विरोधाभास होण्याची खूपच शक्यता असते. हे तत्वज्ञान जर उमगले, अंगीकारले तर बऱ्याच अंशाने मनाच्या अंशात होण्याला पायबंध पडू शकतो. अभ्यासपूर्वकच आपल्या मनाची ठेवण व विचारसरणी कशी निर्माण झालेली आहे
४ त्याचे चिंतन व्हावे. त्याचबरोबर इतरांच्या विचार व योजनाबदल सजग असावे. जगाला बदलून टाकण्याचा त्यांच्यावर आपले विचार थोपविण्याच्या प्रयत्नापेक्षा स्वत:च्या मनाला विचारांना परिस्थीतीनुसार ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न व्हावा. आपण बदलेला तर जग बदलले ही बाब तुम्हाला दिसू लागले.
ईश्वर दर्शन जे सर्व प्रयत्नकरून भेटत नव्हते, दिसत नव्हते. त्याचे कारण आता लक्षात आले. असमाधानी, अशांत, लोभी, रागीट, अहंकारी, हेकेखोर, खोटे, दिशाहीन आणि अशाच दुर्गुनांनी घेरलेले, मन शांततेमध्ये राहण्याची सुतराम शक्यता नाही. ही दुर्गुणाची झाकणे प्रथम दूर व्हावयास हवीत. तरच मन शुद्ध व पवित्र स्थितीमध्ये राहील हे सत्य आहे. सत्यच फक्त ईश्वराशी एकरूप होवू शकते. इश्वरी सानिध्याच्या प्रयत्नामधील प्रमुख बाधा लक्षात आली. संकल्प तर दृढ होता, विश्वास अटळ होता. भावना ईश्वरी दर्शनासाठी प्रेरीत होत्या. त्यामुळे मनाच्या शुचिर्भूतेकडे, शुध्दतेकडे, पवित्रतेकडे जोमाने, तिवृतेने प्रयत्न करू लागलो. प्रश्न पडला केव्हा मिळणार दर्शन त्या ईश्वराचे? प्रयत्न करून आजपर्यत झाले नव्हते. जे कालचक्र भूतकाळांत गेले होते, ते कायमचे हातातून गेले होते. माझ्यासाठी तो ‘असत्य काळ’ होता.
भविष्यकाळ अर्थात येणारा, भावी काळ. निसर्गचक्रामधला एक माहित असलेला काळ, परंतू तो येवू घातलेला असल्यामुळे मानवासाठी, जीवांसाठी त्याचा प्रत्येक क्षण अनिश्चीत व अतार्कीक असा असतो. भविष्याच्या कोणत्याही अंगाची मुळीच कल्पना करता येत नाही. त्यामुळे खऱ्या विचाराने भविष्यकाळ हा देखील ‘असत्य काळ’ ह्याच सदरात जातो.परमेश्वर मला उद्या दिसेल हे हास्यापद ठरणारे आहे. कारण भविष्यकाळच जर असत्य समजला गेला तर तेथे सत्य असा तो ईश्वर कसा दिसणार?
सत्य फक्त वर्तमानकाळ हेच असते. भविष्यकाळ छलांग मारित येतो आणि क्षणातच भूतकाळामध्ये अदृष्य होतो. त्यामुळे वर्तमानकाळाचे स्वरूप क्षणाचेच भासते. येणे आणि जाणे ह्या सीमारेषांवर. मानवी विचारांच्या मोजमापांत (DIamention) ह्या वर्तमानकाळाचे अस्तित्व जाणणे ही अत्यंत कठीण बाब आहे. आश्चर्य म्हणजे फक्त हा क्षणीक वा समयशून्य वर्तमानकाळाच ‘एक सत्य’ समजला गेला. ह्याच काळांत जर झाले तर त्या ईश्वर शक्तीचे दर्शन होण्याची शक्यता असते.
श्री. गुरूंचे मार्गदशन होते की “फक्त वर्तमान काळातच तुमच्या प्रयत्नानुसार तुम्हास ईश्वर दर्शन होवू शकते.”
अध्यात्मज्ञान श्री गुरूमुळे मिळाले होते व वैद्यकीय ज्ञान जे मला संसारक्षेत्रात मिळाले त्या दोन्हींचा उपयोग घेण्याचे मनाने ठरविले. “क्षणयुक्त वर्तमानकाळ ईश्वर दर्शनासाठी फक्त मिळू शकेल” हे एक प्रचंड आवाहन होते. Challenge for my efforts and instinct desire. निसर्ग जसा मला वर्तमानकाळ देत आहे, जेवढा वेळ मला देत आहे तेवढाच वेळ स्वीकारण्याखेरीज मला गत्यंतर नव्हते. मी माझ्या इच्छेनुसार, गरजेनुसार तो काळ बदलू शकत नव्हतो. जो वेळ आहे जसा आहे, जेवढा वेळ मिळेल तेवढ्याच वेळात मला माझा इच्छीत संकल्प प्राप्त करायचा आहे.
ह्यावर मी चिंता करू लागलो. मेंदू हा एक अवयव (इंद्रिय) आहे. शरिरातील मन व बुध्दी ही मेंदूशी निगडीत असते “विचार करणे” हे मेंदूचे कार्य. हे कार्य ,सतत आणि क्षणाचीही विश्रांती न घेता मेंदू करीत असतो. हे एक जीवंतपणाचे लक्षण आहे. जोपर्यत मेंदू जीवंत आहे, विचारकार्य चालू राहते. जागृत, निद्रेत, गाढ निद्रेत, बेशुध्दावस्तेत अथवा कोणत्याही स्थीतीत जीवंत मेंदूचे ‘विचार कार्य’ अविरत चालत असते. विचार लहरी लहान असोत वा मोठ्या ह्या उत्पन्न होत राहतात. एक मात्र सत्य आहे की एकावेळी फक्त
५ एकच विचार आले त्यांची गर्दी झाली हे जरी वाटत असले तरी ‘विचार उत्पन्न’ होण्याची क्रिया आणि क्षमता एकावेळी फक्त एक विचार उत्पन्न होणे हेच असते. विचार उत्पन्न होण्याचा वेग हा मात्र कमी जास्त असू शकतो. एका मागून एक विचार चटकन येत राहणे हा निसर्ग असतो. शरीरात ‘वासना’ वा इच्छा (or Desire) हा शरीरामधला एक नैसर्गीक वा इश्वरी गुणधर्म असतो, विचार निर्मीती ही त्या वासना गुणाचाच परिणाम असतो.
विचार निर्मीती आणि त्याचा वेग ह्या दोन्हीवर लक्ष केंद्रीत केले. एकानंतर दुसरा विचार, लगेच तिसरा चौथा विचार अशी एक प्रंचड रांगच सतत चालते. विचारांचे उत्पन्न होणे, भविष्यकाळातून लगेच वर्तमानाची रेखा पार करीत भूतकाळांत जाणे ह्या विश्लेशनासाठी वा समजण्यासाठी भिन्न बाबी आहेत. त्यांच्या वेगापुढे त्यांना विभागणे तसे अवघडच. योग सामर्थ्य व विचारांच्या उत्पत्तीकडे लक्ष केंद्रीत करण्याची प्रथम कला साध्य झाली पाहिजे. गेलेल्या विचाराला जावू देणे म्हणजे त्याकडे दुर्लक्ष करणे हे आधी अवगत केले पाहिजे. त्याचक्षणी येणाऱ्या अर्थात उत्पन्न होणाऱ्या विचारावर सर्व शक्तीने लक्ष केंद्रीत करीत त्याच्या उत्पन्नावर रोख लावली पाहिजे. मनावर अर्थात विचारावर लक्ष केंद्रित करण्याची एक कला असते. एक योगीक असतो. सततच्या योग धारणेने वा प्रयत्नाने ही कला साध्य होते. विचारांचा प्रवाह थोडावेळ थांबविण्याचा प्रयत्न योग्य प्रयत्नानंतर साध्य होतो. हे अनुभवाने सांगता येते. येणाऱ्या विचाराला त्याच्या प्रवाहाला क्षणीक वा काही वेळेपर्यत थांबविणे म्हणजेच त्या विशिष्ठ वेळेत तुम्ही ‘विचार शून्य’ अशा एका स्थितीमध्ये काही वेळेसाठी जातात. गेलेला विचार दुर्लक्षीत करणे व येणारा विचार थोपवून धरणे म्हणजेच तुम्ही तुमच्यासाठीचा वर्तमानकाळातला रूंद करता आहात, वाढविता आहात. वर्तमान काळाला व्यापक करता आहात. हाच तो काळ जेथे न विचार न हालचाल न अस्तित्वाची जाण न प्रकाश न अंधकार. सर्वत्र शांततेचा भास होतो.
वर दिलेले वर्णन ‘वर्तमानकाळ’ हा तुमच्यासाठी निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे अथवा वर्तमानकाळाच्या सीमारेखा (काल्पनीक) रूंदावण्याचा प्रयत्न आहे. कारण ह्याच थोड्याशा काळामध्ये तुम्हाला त्या महान ईश्वराचे दर्शन घडणारे असमार त्यासाठीची ही वातावरण निर्मीती.
योग सामर्थ्य आणि प्राणायाम या क्रियांची शक्ती प्रचंड असते. शरीराच्या बाह्य तसेच आंतर हालचालींवर ताबा निर्माण करण्याची ही एक साधना आहे. परिणामी शरीर अर्थात इंद्रिये मन आणि बुध्दी (विचार) ह्या सर्वावर एकप्रकारे नियंत्रण करण्याची क्षमता ह्या साधनानी प्राप्त होते. ही साधना अत्यंत अवघड आहे. प्रचंड प्रमाणात केलेल्या प्रयत्नाने, नियमित दैनंदिन केलेल्या सरावाने आणि जाणीवपूर्वक अशा लक्षकेंद्रीत करण्यानेच साध्य होणारी असते. ही एक प्रकारची तपश्चर्या असते. कित्येक योगी ह्रदयाच्या, फूफ्फूसांच्या, आतड्यांचा होणाऱ्या नैसर्गीक अनैच्छीक हालचालींवरसुध्दा मर्यादीत ताबा मिळवू शकतात. हे फक्त योग साधनेमुळे, ह्याच तत्वाने मेंदूच्या हालचालींवर देखील मर्यादीत नियंत्रण करता येते. त्याच्या कार्यावर ऐच्छीक ताबा मिळवता येतो. हीच गोष्ट मेंदू अर्थात बुध्दी सतत करीत असलेल्या विचारावर मर्यादीत ताबा मिळवून त्याचे विचार उत्पन्नाचे कार्य थोडावेळ बाधीत करण्यात होवू शकते. ध्यान धारणा ही योगामधली सर्वश्रेष्ठ साधना समजली गेली. स्वत:ची ओळख जाणण्यासाठी ‘मी कोण आहे’ ‘self-realigation’ ईश्वर म्हणजे काय? जीवात्मा विषयीचे ज्ञान ह्या साऱ्या प्रश्नाची उकल केवळ ध्यानसाधनेमुळे होवू शकते.
परमात्म्याच्या (ईश्वराच्या) अस्तित्वाचा शोध, त्याच्या भव्यतेची, दिव्यतेची जाणीव होण्यासाठी, त्याला समजण्यासाठी, अनुभवण्यासाठी त्याची प्रचिती येण्यासाठीचे प्रयत्न गेली ५० वर्षे चालू होते. सर्व मार्गानी
६ जावून त्याबद्दलचे ज्ञान घेण्याचा प्रयत्न होत होता. पूजाअर्चा, पौराणीक ज्ञानकथा, देवस्थाने देवालयांच्या भेटी, भजनकिर्तन, नामस्मरण, मन-विचार आणि भावनांची शुध्दता, धार्मिक ग्रंथाचे वाचन, ध्यान साधनेचा सराव, त्या परमात्म्याच्या सगुण वा नंतर निर्गुण दिव्यतेची ओढ हे सारे मार्ग हलवले जात होते. संकल्प व दृढ निश्चयाला विश्वासाने सतत जागृत ठेवीत गेलो. वरील सर्व कार्यप्रणाली ही कर्मकांडाचाच एक भाग होती. हे खऱ्या अर्थाने मार्गदर्शन होते. दाही दिशांनी भटकणाऱ्या चंचल मनाला एक दिशेने मार्गस्त करण्याचे प्रयत्न होते. लक्ष केंद्रीत करण्याचे त्या साधनेमध्ये सामर्थ्य होते. खऱ्या अर्थाने मला नितांत आनंद असिम समाधान व मनाची प्रचंड शांतता लाभली ती ध्यान योगानेच.
बैठक – माझी ध्यान योग धारणा साधारण अशी होती. एक ठरलेली जागा असे. लहान, स्वच्छ आणि जेथे वर्दळ (अर्थात घरातील) कमी प्रमाणात असेल अशी मऊ आसन व त्यावर रोज धुतलेले धुत वस्त्र आंथरलेले असे. मागे पाठीला आधार म्हणून एक मऊ उशी घेत असे. २० मिनीटे ध्यान धारणा करण्याचा सराव करीत असे. ध्यान रोज दोन वेळा केले जाई. सकाळी उठल्यानंतर व रात्री झोपेपूर्वी. ध्यान बैठक लावण्यापूर्वी शक्य तेवढे शुचिर्भूत अर्थात शरीराने स्वच्छ होवून बसत असे. २० मिनीटांच्या बैठकीसाठी अलार्म लावून घड्याळ ठेवण्याचा सराव प्रथम केला गेला. नंतर सवय होत गेली व शेवटी वेळेचे बंधन गळून पडले. साधी मांडी घालून सहज अशा आसनांत बसत असे. पाठीचा कणा शक्यतो सरळ, त्याला उशीचा आधार होताच. दोन्ही हात समोर व मांडीवर घडी घातलेले असे. मान, दात (जबडे) थोडेसे अलग,जीभ कसलाही स्पर्श रहीत न दाताला, न ओठाला, न गालाला स्पर्श केलेली अर्थात मला जी सुलभ, सहज व सरळ वाटली तीच बैठक मी अंगीकारण गोलो. प्रत्येक साधकाला त्याच्या त्याच्या देहाच्या ठेवणी प्रमाणे, सवयीनुसार तो योग्य अशा बैठकीचा आसन म्हणून उपयोग करू शकतो. नियम हे मार्गदर्शक असले तरी स्वानुभव हेच अंतीम असावे.
संकल्प: हे ईश्वरी अनुष्ठान आहे. तो कृपा करेल का हे माहित नाही. परंतू त्याची कृपा व्हावी, दया व्हावी ही अपेक्षा करणे म्हणजेच एक विश्वास, श्रध्दा, भक्ती वा प्रेम व्यक्त केल्याप्रमाणे असेल. करू घातलेल्या कार्याच्या यशाबद्दल मनाची ती निश्चितता असेल. If shall be uplift of mind. मिळणाऱ्या आनंदाचे, समाधानाचे व शांततेचे स्वागत करण्याची ती मनाची तयारी असेल. तर करू या तसा संकल्प. हे परमेश्वरा, आई, श्री जगदंबे, परमपूज्य श्री. गुरूदेव सर्वाना प्रणाम
प्रार्थना – १) ऊँ गं गणपतये न महा……
२) सर्व मंगल मंगल शिवे सर्वाथ साधीके शरण्ये गौरी नारायणी नमोस्तुते
३)गुरूर विष्णू गुरूर देवो महेश्वरा गुरूर साक्षात परब्रम्ह तस्मैय श्री गुरूर नमह:
तुम्हा सर्वाच्या कृपेची, दयेची व आशिर्वादाची मी अपेक्षा करतो. माझं मन शांत होण्यास मदत करा. माझ ध्यान लागू द्या. चित्त एकाग्र होऊ द्या. मला ईश्वरी सहवासाचा आनंद मिळू द्या. मनाची शांती प्रदान करा.
ऊँ! ऊँ! ऊँ!
नेहमीच्या सवयीप्रमाणे मन हे शरीराच्या बाह्यांगामध्ये रममान असते. सभोवताल आणि देहाचा बाह्य स्पर्शेद्रिंय ह्याच्यामध्ये गुंतून असते. त्यामुळे सभोवतालच्या होणाऱ्या हालचाली, त्यांचे आवाज ह्याची
७ जाणीव होत राहते. शरीराला काही भागात, पाठीला, पायाजवळ, मानेजवळ वा इतर ठिकाणी कळ लागते. अवघडल्याप्रमाणे वाटते, बधीरपणा वा मुंग्या आल्याचा भास होतो. काही भागात खाज येते, तेथील हालचाली जाणवू लागतात. ह्या सर्वाचे कारण चंचल मन त्या त्या अंगाजवळ संपर्क करते व सौम्य वेदनांची (uncomfortable feeling) जाणीव होते. मनाच्या शांत करण्याच्या प्रयत्नामधली ही बाधा असते. आपल्या सहनशिलतेमध्ये मनाच्या निग्रहाने वाढ करणे गरजेचे असते. रोजच्या सवयीने हे हलके साध्य होते. बाहेरच्या मिळत जाणाऱ्या चेतना तुम्ही प्रयत्नाने घालवू शकतात. तुमची बैठक यशस्वी होते. २० मिनीटे वा अर्धातास तुम्ही केलेल्या बैठकीचा संकल्प यशस्वी होवू लागतो. ह्या सर्व वेळेमध्ये तुम्ही स्थिर बसू शकता व तुमची बाह्यांगाची जाणीव कमी होवून जाते. ही तुमची स्थीर बैठकच ध्यानाच्या दिशेने जाण्याचे पहिले पाऊल असते. मनाला तुम्ही एकप्रकारे बाह्यांगातून अंतरंगात घेवून जाण्याचा यशस्वी प्रयोग असतो. मनाचा एक चांगला गुणधर्म म्हणजे मन जरी चंचल असले तरी ते तुमच्या इच्छेला साथ देते, विरोध करीत नसते. तुमच्या ‘मन शांत’ करण्याच्या प्रयत्नाना बाधा करीत नाही.
प्रथम बैठक स्थिर होण्याचा प्रयत्न यशस्वी करणे नंतर मनाला बाह्यांगातून अंतरंगात नेणे जरूरी असते. मनाला शरीराच्या आतील प्रत्येक इंद्रियाशी समरस करण्याचा प्रयत्न करावा लागेल. ह्याच मार्गाने मन एक एक अवयवाशी एकरूप होत सर्व देहाशी तादाला पावते. मानवी (वा कोणताही सजीव प्राणी) देह ही त्या निसर्गाची वा परमेश्वराची सर्वोत्तम कलाकृती आहे. कल्पनेने आणि आयोजनानी एकदम परिपूर्ण. त्याच्या सांघीक कार्यप्रणालीची माहिती कळताच कुणीही आश्चर्यचकीत व्हावे इतके यात भव्य आणि दिव्य आहे. देहामधले अनेक अवयव (इंद्रिये) ही कोट्यावधी सेल्सनी बनलेली असतात. सेल्स अतिशय सूक्ष्म व देहाचा सर्वात लहान घटक भाग आहे आणि आश्चर्य म्हणजे जे कार्य संपूर्ण देहाकडून होत असते. तेच आणि तसेच कार्य त्या प्रत्येक सेल्सकडून केले जाते. जसे जगणे, वाढणे,मरणे,नष्ट होणे, उर्जा निर्माण करणे, तिचा उपयोग करणे इत्यादी. देह हा जशा ह्या बाबी पूर्ण करीत जीवन चक्र चालू ठेवतो, त्याच पध्दतीने ती एक स्वतंत्र सेल्स देखील अशीच चक्रमय जीवन जगते. उर्जा निर्माण करणे व जीवन चक्रासाठी देणे हाच प्रमुख जीवन उद्देश.
ध्यान? कुणाचे? कुणाचेही नाही. कारण कुणीही आणि कुणालाही हे माहित नाही. काहीही न करणे ह्यासाच ‘ध्यान’ म्हणतात. (objeectess awareness) अर्थ फार सोपा व सुलभ वाटतो. परंतू काहीही न करण्याची अवस्था शरीरात निर्माण करणे, अत्यंत कठीण गोष्ट आहे. देहाच्या हालचालीवर पायबंद घालणे एखादेवेळी काही क्षणासाठी शक्य होईल. परंतू जो मेंदू, बुध्दी वा मन हे सतत चेतनामय असते, कार्य करीत असते त्यांचे कार्य थांबवणे हे फार कठीण. त्यांचे कार्य हे नैसर्गीक जीवंतपणाचेच लक्षण असते.
‘ध्यान’ म्हणजे काहीही न करणे असते, तसेच त्या मार्गाने एक शोध घेतला जातो. ज्यांना खऱ्या अर्थाने ध्यान लागते, त्यालाच त्या शोधाचे आकलन होते. येथे अनुभव निराळे, प्रचिती निराळी, फलश्रुती देखील भिन्न असू शकते. फक्त एक मात्र सत्य सर्व साधकांना सारखेच जाणवते आणि तो म्हणजे ‘नितांत आनंद, ब्रम्हानंद (Extary of joy) संपूर्ण शांतता’ आणि ह्याच सत्याचा तो शोध असतो.
‘ध्यान’ म्हणजे काहीही न करणे हे जरी असले, तरी आम्हाला आमच्याच शरीर – मनाच्या प्रक्रीया कराव्याच लागतील. साधनाला साध्याकडे नेण्यासाठी ज्यामुळे आम्हीच आमच्या अंतरंगात अर्थात देहाच्या आत प्रवेश करून अवयवांशी संवाद साधून आणि त्या सूक्ष्म मूळ घटक ज्या भागात सेल्स आहेत त्यांच्या संपर्कामध्ये येवून प्रत्येक विश्लेशनाची एक सूक्ष्म पायरी असते. ज्यावर भव्यदिव्यतेचा डोलरा उभा
८ रहात असतो, त्या मूळ घटकांपर्यत आम्ही जाणीवेच्या माध्यमातून जाण्याचा प्रयत्न ‘ध्यानातून’ करणार आहोत. डोळे मिटून (वा उघडे – हे सवयीनंतर शक्य असते.) ध्यान धारणेच्या आसनस्थ झाल्यावर जाणीव होऊ लागते की तुम्ही शरीराने स्थीर, अचल होत आहात. शरीराच्या अस्तीत्वाची जाणीव कमी कमी होत जाते. फार प्रयत्नानंतर देहहीनतेचा भास होवू लागतो. परंतू हे सारे असत्य आहे. कारण देहहीन झाल्याचा 12 भास ही तुमची कल्पना असते. विचार असतो आणि विचाराचे अस्तीत्व मन चंचल असल्याचे दाखवितो.
आता मनला स्थीर करणे, शांत करणे हा ध्यान धारणेचा प्रमुख गाभा आहे. विचार रहित अवस्था साध्य करणे आहे. कोणतीही कल्पना द्रव्य, समाधान, हालचाली,भावनीक अविष्कार ह्या सर्व बुध्दीच्या विचार प्रणालीत निर्माण झालेल्या असतात. मेंदूचे प्रमुख कार्यच विचार उत्पन्न करणे हे आहे. वासना (वा इच्छा) (Desire) हा देहाचा नैसर्गीक गुणधर्म असतो. जो प्रत्येकाला जन्मता हा मिळालेला असतो. वासना विचारांच्या रूपाने मेंदूत चेतविल्या जातात, त्या उत्पन्न झालेल्या वासना मनावर आरूढ होवून शरीरात पसरण पावतात. त्या इंद्रियामार्फत त्यांचा कार्यभाग साधण्याचा प्रयत्न करतात. हे एक निसर्ग चक्र होते. हा एक जीवन संसार, विचारांची उत्पत्तीमात्र एका नंतर दुसरा विचार, नंतर तिसरा, चौथा ह्या अनुक्रमेतच होत जातो. मन त्यामुळे सतत चंचल अवस्थेत असते.
आम्हास प्रयत्न करून काही काळासाठी विचार रहीत स्थितीत जावयाचे आहे. म्हणजेच विचारांची उत्पती रोकावयाची आहे. प्रथम त्या विचारांचाच आसरा घ्यावा लागेल व नंतर त्यांचा त्याग करावा लागेल. स्थिर आसनस्थ झालेल्या शरीराच्या मनाला प्रथम आकाराच्या पोकळीत स्वैर प्रमाणे फिरू द्या. तुमच्या वैचारीक प्रयत्नाने हे शक्य आहे. ‘एका वेळी एक विचार’ ह्या निसर्गाच्या गुणधर्माचा फायदा घेत चला. रांगेत येणाऱ्या विचारांत इतर विचारांची घुसखोरी थांबवा. त्यांना प्रमुख विचारसरणीत येवू देवू नका. हे शक्य आहे. आकाशाच्या पोकळीत फक्त हवेचे अस्तीत्व असते. त्या हवेशी विचारांनीच एक रूप व्हा. हीच हवा तुमच्या जवळ येत आहे. ती तुमच्या नाकपुड्यातून नाकातून तुमच्या शरीरात प्रवेश करते. ह्याची जाण तुम्हास होते. ती हवा एका मर्यादेपर्यंत आंत गेलीली तुम्हास जाणवते. तीच हवा (अर्थात तीच कार्य करून) काही क्षणानंतर तुमच्याच नाकपुड्यातून शरीराच्या बाहेर जाते. एक भासणारी क्रिया, हवा नाकपुड्यातून शरीरात जाणे व नंतर तीचा मार्ग उलटा होवून ती परत शरीराबाहेर जाणे व नंतर तीचा मार्ग उलटा होवून ती परत शरीराबाहेर जाणे. हे सतत होते. तुम्हास आता फक्त ही एकच क्रिया श्वास घेणे व श्वास सोडणे लक्ष केंद्रीत करावयाची आहे. ही क्रिया देखील तुमच्या विचारांच्या टापूतीलच असणारी आहे. हे विचार रहीत होणे नव्हे. परंतू इतर विचारांना सारून चित्त एक दिशेने एकाग्र करण्याचा हा अपेक्षित मार्ग आहे. ह्याचा प्रथम दरदिवशी सराव करावा लागेल. लक्ष श्वासोश्वासावर केंद्रीत करणे. एका संथ वाहणाऱ्या नदीमध्ये तुम्ही शिरता आहात. तुमची जाण येथपर्यंतच असते हे समजा. आता त्या नदीमधल्या पाण्याशी एकरूप व्हा, प्रवाहाला साथ घ्या. शांतपणे वाहत जा. का जायचे कसे जायचे केव्हा जायचे हे विसरून जा. प्रवाह तुम्हाला त्या विशाल सागरांत घेवून जाईल, तुम्ही कोणताही प्रयत्न न करता, मात्र तुमचा थोडासा प्रयत्न देखील तुमच्या संथ वाहण्याला बाधा आणेल.
आकाशातील हवा, नाकपुड्या जवळ येणे, शरीरात शिरणे येथपर्यंत अस्तित्वाची तुम्हालाच जाणीव होत होती. कारण ती विचारांनी घेरलेली होती. आता पुढचा प्रवास म्हणजे, वाहत जाणे हे निसर्गावर सोडा. आकाशातील पोकळीतील हवेबरोबर प्रथम तुम्ही जाणीवेने शरीरात शिरता परंतू आता ती जाणीव तुम्हास सोडावी लागेल. आता कोणत्याही विचाराला जवळ येवू देवू नका. येथेच तुमची खरी परिक्षा असेल. प्रयत्न तुमचा. निसर्ग नेहमी तुमच्या प्रयत्नाना साथ देत असतो. विश्वास आणि श्रध्दा ठेवून
९ त्या नाकपुड्यातून आत जाणाऱ्या हवेशी तूम्ही एकरूप व्हा. कोणत्याही विचाराला जवळ येवू देवू नका आणि तुम्ही एका अज्ञात जागेत, वातावरणात, पोकळीत जाल. तुमचा कोणताही प्रयत्न हा विचार असेल व तो तुमच्या यशात बाधा असेल. नदीच्या पाण्याने जसे तुम्हास समुद्राच्या पाण्यात वाहून नेले, त्याचप्रमाणे आकाशाच्या पोकळीतील हवा तुम्हास शरीराच्या एका विशाल दालनांत नेईल. परंतु ही अपेक्षा नसावी ध्येय नसावे वा येथे कल्पकता नसावी, कारण मग तो तुमचा विचार असेल व विचार म्हणजे शेवटी ‘असत्य’ म्हणूनच ठरेल. तुमचे प्रयत्न रहीत, विचाररहीत हवेबरोबर वहात जावून एका विशाल दालनांत शिरल्याची जाणीव होणे म्हणजेच तुमची ध्यान धारणा यशस्वी होत असल्याचे असेल. कोलीडोस्कोपधून बघीतलेली चित्रे जशी सतत बदलत जातात, त्याचे रंग बदलत राहतात, त्यांचा आकार बदलत राहतो तरी प्रत्येक प्रक्षेपण आनंद देणारेच असते. त्याच प्रमाणे ध्यानामधले अनुभव हे बदलणारे, भिन्न भिन्न असलेले असले तरी सर्वातून आनंदाची प्रचंड निर्मिती होत जाते. हा अनुभव त्याचमुळे वर्णन करता येण्यासारखा नसतो. विचाररहीत मनाची स्थिती, काही वेळेसाठी, तुम्ही आपल्या प्रयत्नाने, योगसाधनाने निर्माण करीत आहात. ध्यान धारणा लागते. कोणती प्रक्रीया शरीरसंबधाने घडत जाते हे समजणे मनोरंजक व ज्ञानवर्धक असेल. अर्थात हे फक्त समजण्यासाठी. हवेबरोबर प्रथम विचाराचा प्रवाह नाकातून शरीरांत प्रवेश करतो. अर्थात या स्थितीपर्यत तुम्ही सतर्क असता. नंतर विचार थांबतात व तुमची फक्त जाणीव शक्ती पुढचा मार्ग आपोआप व सहज सुलभरितीने होत राहतो. तुमचा स्वताचा प्रयत्न ध्यान धारणेमध्ये फक्त डूबन्याचा असतो. येथपर्यत सिमीत. नंतर मात्र जसा प्रवाह नेईल तशी ‘जाणीव’ पूढे पूढे जात राहते.
हवा नाकांमधून छातीत फूफ्फूसात जाते. निरनिराळ्या नलीकेमधून म्हणजे मोठ्या नलीकेमधून लहान लहान फांद्या बनत जाणाऱ्या नलीकेमध्ये व शेवटी केसनलीका वा त्यापेक्षाही सूक्ष्मनलीकेमध्ये पोहचते. येथे हवेचा संपर्क सूक्ष्म सेल्सचा शरीरामध्ये प्रवाही असलेल्या रक्त पेशी वा सेल्सचा देखील अंतरभाव असतो. एकदा तुमच्या ‘जाणीव शक्तीचा’ शरीरातील सूक्ष्म सेल्स वा रक्त सेल्स शी संबध आला की त्याच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण शरीरात भ्रमण करतात. संपूर्ण अंतर शरीराची जणू तुम्हास जाणीव होवू लागते. मग ते फूफ्फूस असो, ह्रदय असो, आतड्या असोत. मेंदू असोत वा इतर कोणते इंद्रिय असोत. सर्वांशी तुमचा जाणीव शक्तीच्या रूपाने संपर्क येत जातो.
हे वर्णन फक्त समजण्यासाठी विश्लेशनात्मक पध्दतीने थोडक्यात व्यक्त केले गेले. जाणीवपूर्वक हवेचा प्रवाह प्रथम विचारांच्या माध्यमाने सुरू झालेला असतो. परंतू जेव्हा मन विचाररहीत केले जाते, तेव्हा हवेच्या मार्गाचे आकलन होत नसते. मात्र त्याचा प्रवास चालूच राहतो. नलीकेतून रक्तपेशीपर्यत व पूढे मेंदूपासून थेट नखापर्यत सर्व शरीरभर. ध्यान धारणेमधल्या प्रक्रियेमध्ये ह्या सर्व विचाररहीत प्रवासाची एक प्रकारे जाणीव होत असल्याचे भासते. हे सारे जरी स्पष्ट नसले, निश्चीत नसले, भिन्न भिन्न असले तरी त्यालाच दैवी अनुभव म्हणता येईल. जणू काही देह आणि जीव ह्या दोन्ही एकरूप असलेल्या माध्यमांशी संपर्क साधता आहात. देहांमध्ये शिरता आहांत आणि चेतनारूपी जीवाच्या सानिध्यात येत आहे. देहाचा सेल्सच्या रूपाने प्रत्येक भाग उर्जासंपन्न असतो. त्याची तुम्ही स्वत:च म्हणजे जीव हा जीवाचाच ‘जाणीव शक्ती’ मध्ये एकरूप होण्याचा प्रयत्न होतो. हे सारे तुम्ही प्रयत्नपूर्वक करीत नसतात. पण हे घडू लागते. होवू लागते. तुमची फक्त साथ, संकल्प, विश्वास, श्रध्दा, प्रेम ह्या कार्यचक्राला यशस्वी करते. देहामधल्या सर्व सूक्ष्म वा स्थूल भागांचा संपर्क, त्यांची जाणीव व त्यांच्या चेतनामय स्वरूपाशी एकरूपता एक भव्य-दिव्य अनुभव, आनंद व समाधान यांचा खजीना तुम्हास मिळालेला असतो. न इच्छा, न वासना, न भविष्य, न भूत, न आकार, न रंगरूप असा केवळ अनुभव अवर्णनीय प्रचंड शांती.
१० मी याचे नामकरण केले नाही व करू इच्छीत नाही. कारण तो अभिमानाला, वासनेला जागे करील. पुन्हा विचारचक्र सुरू होतील. मला एका सत्यमय वातावरणामधून संसारीक अर्थात मिथ्या जगांत नेईल. हे होणारच कारण मला माझ्या अल्प क्षमतेचे व अल्प अशा वर्तमान काळाची जाणीव आहे. ईश्वर जो जसा असेल, त्याला जाणण्यासाठी मानवी इंद्रिये परीपूर्ण नाहीत. त्यांच्या मर्यादा, झेप,क्षमता ह्या अत्यंत अल्प आहेत. त्यामध्ये तो दिव्यपणा प्राप्त नाही की ज्यामुळे त्या परमात्म्याची, त्याच्या भव्यतेची जाणीव होवू शकेल. जर तो सर्व चराचरामध्ये जीव जंतूमध्ये मानवी देहामध्येही अंश रूपाने असेल तर त्याला आपल्याच अंत:करणात शोधणे वा समजणे योग्य होईल. हा प्रयत्न दिशाहीन खचितच नसेल. ह्याचसाठी “मी कोण आहे?” ह्याचे ज्ञान होणे अत्यंत गरजेचे आहे. त्या मी च्या शोधासाठी अंतरंगात शिरणे हे प्रथम व महत्वाचे पंचेद्रिय हे कोणत्याही गोष्टीबद्दल ज्ञान मिळवतात म्हणजे त्यातील गुणाविषयी समरस होतात, त्याचे रंग, रूप, स्पर्श, रस, गंध इत्यादी समजतात. मग ते भव्य दिव्य असोत वा सूक्ष्म स्थितीमध्ये असोत वस्तूची वा त्या दिव्यतेची जाण येणे हे शेवटी आपल्यावर कसा परिणाम करते ह्यावरच मुख्यता अवलंबून असेल.
ईश्वर भेटला, दिसला वा जाणला गेला हे जर सत्य घडले तर तेव्हाच जेव्हा मनाच्या आनंदाची, शांततेची, समाधानाची अस्सीम बरसात तुमच्यावर होईल. ह्या संसारीक जगांत ज्या ज्या गोष्टीमुळे तुम्हास प्रसन्नता वाटते त्या त्या गोष्टीमध्ये ईश्वराचे अस्तित्व असतेच. त्या अस्तित्वाची जाणीव प्रखरतेने होते. म्हणजेच तुम्ही ईश्वराच्या सानिध्यात जात आहात असे होईल. तेच तुमचे लक्ष साध्य असावे.
जे मिळाले त्याहून आणखी काही असेल का? हा प्रश्न तुमच्या मनी येत राहणे म्हणजेच अशांत, असमाधानी मनाला जागृत ठेवण्यासारखेच होईल. त्याला अंत असणार नाही. जर ईश्वर अनंत, अमर्याद असा असेल, तर तो मनाच्याही कल्पनेच्या बाहेर भव्यता पावलेला असेल. तुम्हास तुमच्या मनाच्या बुध्दीच्या विचाराने त्याला जाणणे शक्यच नाही. हा तुमच्या जाणीवेने त्याचे जे अवलोकन झाले असेल, ज्या नितांत अशा आनंदाचा (Extary of joy) अनुभव आला असेल, तोच समजा. सभोवतालच्या आणि संसारीक जीवनामधल्या सुखमय गोष्टींनी तुम्हास आनंद मिळाला असेल. तुम्ही समाधानी झाला असेल. ह्यापेक्षा जर जास्त आनंद तुम्हास त्या ईश्वरी जाणीवांमुळे झाला असेल तर तेच तुमचे ईश्वरी दर्शन समजा. वाचलेल्या, ऐकलेल्या आणि इतरांच्या त्यांच्या स्वत: अनुभवलेल्या ईश्वरी सगुण दर्शनाची कल्पना वा इच्छा तुम्हास पूर्णपणे सोडून घ्यावी लागेल. कारण ते तसे दर्शन म्हणजे तुमचे इच्छीत, अपेक्षीत दर्शन असेल. कदाचित त्यांनी आनंद व समाधान मिळेलही परंतू त्यात मनाची शांतता नसेल. पुन्हा पुन्हा तेच दर्शन मिळेल ह्याची आस असेल. तेथेच साशंकता निर्माण होईल. आत्मीक समाधान टिकणारे नसेल.
ज्या सगुण ईश्वरी स्वरूपाची कल्पना तुमच्या मनात पक्के घर करून असेल तर कदाचित तसेच तुम्हास दिसू शकते वा जाणवू शकते. भाव तसा देव म्हणतात, त्याप्रमाणे परंतू हा प्रयत्न अपूर्ण असाच ठरणारा असेल. तुम्हास असत्याच्या दालनात नेणारा असेल. तुमचे सगुण ईश्वराबद्दलचे ज्ञान आणि त्याचे इच्छीत दर्शन हेच मग तुमचे ध्येय बनते. ईश्वराला जाणण्यापेक्षा त्याच्या दिव्यत्वाला अनुभवने, त्याच्याशी काही क्षणासाठी का होईना तादाल होणे, एकरूप होणे हे अंतीम ध्येय असावे. कारण जाणणे ह्यात कल्पनाविलास व ज्ञान ह्याचे योगदान असेल. ती अनश्चीततेबद्दलची जाण असेल. परंतू त्याला अनुभवने हा सत्याचाच शोध असेल. निर्गुण, निराकार आणि दिव्या शक्तीमध्ये मिसळून जाणे. एक नितांत आनंद, कल्पनातील अनुभव जीवनाचे अंतीम सत्य.समोर कुणीच नसते, तरी जणूकाही सर्व असते. त्यापेक्षा जास्त नसते. सर्वत्र केवळ आनंद, समाधान, शांतता. काय हवय तुम्हाला ह्या पेक्षा जास्त. ह्याचाच शोध बोध तुम्ही आपल्या प्रयत्नाने, तपश्चर्येने घेत होतात. मला फक्त त्या शांततेचा शोध होता,वेध होता,
११ तगमग होती. सारे मिळाल्याप्रमाणे भासत होते. संपूर्ण समाधान. हेच जर सगुण रूपाने मला प्राप्त झाले असते. इष्ट देवतेचे दर्शन झाले असते, इच्छीत इश्वरी रूप माझ्या दृष्टीला पडले असते, तर माझ्या आनंदापुढे इच्छेच्या वा वासनांच्या रूपांत अपेक्षा निर्माण झाल्या असत्या. समोरचा दिसणारा भासणारा सगुण ईश्वर हा जरी भव्य दिव्य असला तरी तो माझ्याच स्वरूपाचा असता, मला त्याच्याशी भावनीक संवाद करण्यामध्ये आनंद वाटला असता. एक रूची निर्माण झाली असती. कुणालाही भेटल्यानंतर मग तो संत महात्मा का असेना होणारा संसारीक संवाद ही नैसर्गीक क्रियाच बनते. मला ते टाळता आले नसते. आणि तशा तथाकथित सगुण ईश्वरी दर्शनाची सत्यता प्रश्नाकींत राहीली असती. त्या मिळणाऱ्या आनंदाला समाधानाची साथ मिळाली नसती.
मला माझ्याच कल्पनेनुसार ध्यान धारणेमध्ये जो ईश्वरी वा दिव्य म्हणा हवे तर अनुभव आला त्याचे वर्णन करणे, मिळालेल्या आनंदाचे समाधानाचे मोजमाप करणे केवळ अशक्यच ठरणारे असेल. फक्त एक झाले तो अप्रतिम मनाच्या शांततेचा क्षण पुन्हा पुन्हा घेण्याचा प्रयत्न केला गेला. मुख्य म्हणजे त्या नितांत आनंद अनुभवाचा, जाणीवेचा पुढे काही वा कोणता प्रवास असू शकेल हा विचारच नष्ट झाला. जे मिळाले, जाणले वा अनुभवले ते अंतीम सत्य आहे. हा विचार दृढ झाला. ह्याहून दुसरे आणखी काही नाही. हेच ते ईश्वरी दर्शन, अंतिम ध्येय, एक नितांत आनंद, समाधान आणि मनाची खरी शांतता. ह्याच विचारात धन्यता पावलो. कुलस्वामिनी श्री.रेणुका देवी आणि गुरू जेरे स्वामी यांचे आभार मानले. त्यांना साष्टांग दंडवत.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

मच्छरांचे साम्राज्य

मच्छरांचे साम्राज्य

नुकत्याच एका बातमीने संपूर्ण मुंबईकरांना हादरुन सोडले. डासांची संख्या प्रचंड झालेली आहे. सर्वत्र मलेरीयाचा प्रादुर्भाव झालेला आहे. मृतांची संख्याही खूप वाढलेली आहे. सर्व अधुनिक वैद्यकिय शास्त्र आपल्या शक्तिनीशी त्याचा प्रतिकार करताना दिसला. कांही दिवस यश, वा कांही दिवस अपयश अर्थात रोगाचा फैलाव जास्त झाल्याचे कळून येते. जागतीक आरोग्य संघटना
( World Health Organization ) हीने देखील मलेरीयाच्या प्रसारा बद्दल चिंता व्यक्त केली. आपल्यापरी मदतही देवू केली.
जगावर राज्य कुणाचे ? जो तो आपणच श्रेष्ठ असून आपलीच जगावर सत्ता चालते. ह्या एका विचारांत, अर्थात भ्रमात असतो. परंतु कित्तेक प्रसंग वा घटना अशा घडतात की त्यावेळी सर्व समुदाय हतबल झालेला जाणवतो. तेव्हांच प्रश्न पडतो की येथे राज्य कुणाचे ?
आफ्रिकन सफारीमध्ये गेलो होतो. सर्व कडेकोट तयारीनिशी होतो. बंद गाड्या, हत्यारबंद रक्षक सारे सारे मदतीला. प्रचंड व भयान वाटणारय़ा जंगलात शिरलो. आमच्या भिरभिरणारय़ा नजरा सर्व दिशेने बघत होत्या. त्या जंगलाचा राजा बघताना जेवढी उत्सुकता होती, तेवढीच प्रत्येकाच्या मनांत भिती देखील होती. झाडीत दूर अंतरावर त्या सिंहाची हलचाल दिसली. गाड्या थांबल्या. त्या प्रचंड शक्तिधारी सिंहाला बघून तो त्या जंगलाचा राजा आहे, ह्याची जाणीव झाली. त्याला आमने- सामने प्रतिकार करण्याची हिम्मत कोणत्याही मानवात असेल असे वाटत नाही.
आफ्रिकेत अनेक प्राण्यांचे बरय़ाच संख्येने कळप बघण्याचा योग आला. सिंहाचे, वाघाचे, हत्तीचे, गेंड्यांचे, हरिणांचे, झेब्र्यांचे, जिराफाचे, हिप्पोपोट्यामसचे, मगरीचे, सर्प अजगराचे, इत्यादी. हे कोणत्या प्राणी संग्रहालयांमध्ये नव्हे तर जंगल तलाव ह्या निसर्गरम्य परिसरांत. अगदी स्वैर, स्वतंत्र आणि निर्बंधरहीत, त्यांच्या त्यांच्या समुदायात वावरताना. आपापल्या कळपांत. प्रत्येक कळप स्वतःचे राज्य बाळगुन होता. खा, प्या, मजा करा. निसर्गाने जे देवू केले त्याचा आनंद लूटीत जगा. जीवनचक्रामध्ये संधर्ष झाला, धडपड करण्याची वेळ आली, तर तेही करा. बळी जा. नष्ट व्हा. परंतु तुम्हीच निर्माण केलेल्या सभोवतालच्या जगाकडे बघत डोळे मिटा. मी एक राजा म्हणून जगलो, ह्या भावनेत ह्या जगाचा निरोप घ्या.
समुद्रातील सहल करताना प्रचंड मोठ्या अशा व्हेल वा शार्क माशाच्या केवळ उसळी मारण्याच्या दर्शनाने सर्वजण हादरुन गेलो होतो. आम्हाला पूर्ण कल्पना आली की त्या जलमय वातावरणांत साम्राज्य जलचर प्राण्यांचेच असते. त्यांच्या समुहाचा एक राजा नसतो. तर प्रत्येकजण राजाच असतो. संघराजा म्हणा हवेतर. प्रत्येक प्राणी राजाच्या भूमिकेत वावरत असतो. जो शक्तिमान असेल तोच तथाकथीत राजा समजला जातो.
साम्राज्य कुणाचे ? ज्याची सत्ता सर्वत्र चालते, ज्याला सर्वजण भिऊन असतो त्याची. मानवासहीत सर्व प्राण्यांचा आढावा काढला तर त्यांची त्यांची सत्ता सिमीत असल्याचे, जाणवते. तो त्या प्रदेशाचा वा भागाचा वा वातावरणाचा राजा झालेला आहे हे कळते. परंतु आपला विभाग पार करुन, आपल्या शक्तिचे प्रदर्शन वा सत्ता जगभर कुणालाच स्थापित करता आलेली नाही.
फक्त एकच जीव ह्या जगांत असा आहे की तो आपली आबाधीत सत्ता हजारो वर्षापासून संपूर्ण जगावर गाजवित आलेला दिसतो. आणि तो म्हणजे मच्छर वा डास ( Mosquito ) ज्याला आपण क्षुल्लक प्राणी समजतो. अनेक जीवजंतू, किटाणू, आहेत. परंतु त्यांचा फैलाव मर्यादेत असतो. सर्वत्र नसतो. कांही प्रयत्न्याने नामशेष केले गेले आहेत. मच्छर वा डास ( Mosquito ) २ मात्र जगभर पसरलेला आपली सत्ता आणि धास्ती बाळगुन आहे. कदाचित् हस्यास्पद असेल. परंतु एक सत्य आहे. त्याच्या पासून पूर्ण बचाव करण्यांत माणसाला अजून यश मिळालेले नाही.
एक गमतीशीर वैज्ञानीक इतिहास आठवतो. ज्या जीवरोग शास्त्रज्ञाने प्रथम मच्छर वा डास
( Mosquito ) यांच्यामुळे उत्पन्न होणारय़ा रोगाचा शोध लावला, त्यानी याला मलेरिया
( Malaria ) असे नांव दिले. मराठीत याला आपण हिव-ताप म्हणतो.
त्या शास्त्रज्ञाची प्रथम अशी कल्पना झाली की डासामुळे सर्वत्र हवा दुशीत होते. त्याचा फैलाव सर्वत्र पसरतो. म्हणून त्याने त्याला डासामुळे होणारी दुषीत हवा अर्थात MAL- AIR संबोधिले. त्याचेच नंतर Malaria असे नांव प्रचलीत झाले.
खरे म्हणजे डासामुळे रक्त दोष होतो. हवेचा नव्हे. हवा हे जीवनाचे प्रमुख अंग, सर्वत्र पसरलेली. ते जीवन उध्वस्त करण्याची क्षमता बाळगणारे हे डास असतात. त्यांच्यामुळे होणारय़ा तापाला कदाचित् व्यापक अर्थाने व दूर दृष्टीने त्याला मलेरिया वा दुशीत हवा म्हटले असावे. असे हे मच्छरांचे साम्राज्य.

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com