Monthly Archives: फेब्रुवारी 2012

निसर्ग सुख!

निसर्ग सुख!

आनंदाचे झरे वाहतां, आवती भवती सारे

रे माणसा खिन्न वाटतो, जीवन उदास कां रे?

निसर्गाच्या ठेव्या मधल्या,  सर्व वस्तू सुखदायीं

निवडून घे तूं त्यातील,  आनंद देतील काहीं

केवळ तुझी दृष्टी हवी, टिपण्यास ते सौंदर्य

आनंद तो देण्याकरितां, करिते सतत कार्य

मनाचा हा खेळ जहाला,  सुख दुःख समजणें

निसर्ग प्रयत्न करितो,  सदैव सुख देत जाणें

(कविता)

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

विश्वासातील शंका

विश्वासातील शंका

          एक लहानशी घटना परंतु अध्यात्म जगांत एक महान तत्वज्ञान सांगून जाते.

श्री कृष्ण एकदा जेवण्यासाठी बसले होते. रुख्मिनी त्याना जेवन वाढीत होती. अचानक श्रीकृष्ण उठले व लगबगीने जावू लागले. ते घराच्या दारापर्यंत गेले. ते क्षणभर तेथेच थांबले. थोडावेळ थांबून परत आले. पुन्हा जेवण्याच्या पाटावर बसले. रुख्मिनीला हे सारे अघटीत वाटले. तीच्या लक्षांत  श्रीकृष्णाच्या ह्या हालचालीचा अर्थ कळला नाही. तीने तसे विचारले.

श्रीकृष्ण हसून म्हणाले   ” दुर अंतरावर मी बघीतले की माझा एक भक्त माझ्या नावाने भजन करीत होता. ‘ कृष्ण कृष्ण जय जय कृष्ण ‘ म्हणत रस्त्याने गात नाचत चालत होता. त्याच वागण, मोठ्यने हातवारे करीत गाणे म्हणने, हे कांही जवळून जाणाऱ्याना वेगळेच वाटले. ते त्याला वेडा समजून मारु लागले. तो खालती पडला तरी देखील माझे नांव न सोडता तसाच गात होता. त्याचा आर्तस्वर माझ्या कानी पडला. माझे लक्ष्य त्याच्याकडे वेधले गेले. मी त्याला सहाय्य करण्यासाठी जाऊ लागलो. दारापर्यंत आलो. अचानक मी बघीतले की त्या भक्ताला कुणीतरील दगड मारला. तो त्याच्या भाळी लागला. एकदम रक्तस्त्राव सुरु झाला. त्यानी त्याच्यावर झालेल्या हल्याचा प्रतिकार करण्यासाठी स्वतःच एक दगड उचलला. तो त्यानी त्या लोकावर फेकला. तो आपले रक्षण स्वतः करण्यास उद्युक्त होऊन करीत आहे. त्याच क्षणी त्याने माझे नांव व भजन सोडून दिले. माझे नांव सोडल्यामुळे त्याची माझ्यावरची अवलंबुनता निघून गेली. आता तेथे जाण्यांत अर्थ नाही. ”

जीवनांत देखील अनेकजण ईश्वर भक्ती करतात. त्यांच्यावर श्रद्धा ठेवतात.

मानवाची ईश्वरी संकल्पना दोन अंगाने दिसून येते.

१- ईश्वर सर्व शक्तीमान, सर्वव्यापी, व विश्व चालक ह्या प्रमुख भावनांतील  भूमिकेमध्ये तो व्याप्त समजला जातो. ह्या उदात्त समजाला मन नेहमी अनुभवण्याचा प्रयत्न करीत असते. जे कळल ते जाणल पाहीजे ही भावना. त्याच्या भक्तीमार्गाचा, भजनाचा, नामस्मरणाचा स्रोत ह्याच मार्गाने व्यक्त होत असतो.

२ –  तो कृपावंत, संकटविमोचन व सुखकर्ता समजला जातो.

त्याच वेळी त्याने हेही अनुभवल असत की ईश्वर खऱ्या अर्थाने व्यवहारी जीवनांत केंव्हाही कृपा करीत नसतो. संकटसमयी धावून कोणतीही मदत करीत नाही. तुमच्या मिळणाऱ्या सुखांत त्याचा प्रत्यक्ष सहभाग केंव्हाच नसतो.  हे सारे सत्य असते.

ईश्वराची महानता वेगळी आणि त्याचा व्यक्तिच्या जीवनातील सहभाग समजणे हे सर्वस्वी भिन्न समज होत. निसर्गाचे निश्चित व ठरलेले नियम असतात. त्याचप्रमाणे जगरहाटी चालते. कांही मिळणे वा न मिळणे येथे मानवी इच्छेचा प्रश्न नसतो. ते सारे घडणाऱ्या परिस्थिती नुसारच होते. अनेक कथा वा प्रसंग मात्र आळवून सांगीतले जातात.

ईश्वर भक्ती फक्त मनोबल वाढवीत असते. संकटाची सोडवणूक ज्याची त्यालाच करावी लागते. हाच ह्या छोट्या कथेचा बोध नव्हे कां?

(ललित लेख)

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

परावलंबी

परावलंबी

 

जीवन हर घडिला अवलंबूनी तू, आहे दूजावरी

व्यर्थ मग कां अभिमान, बाळगतोस उरी

नऊ मास होता गर्भामध्यें, जेंव्हा आईच्या

शोषण केले अन्न सारे, रक्तामधूनी तीच्या

माता पित्याच्या कष्टाचा तो, घाम गळत होता

तुझे बालपण फुलविण्या,  ओलावा देत होता

घर गृहस्थीचे सुख भोवतीं,  पत्नी मुला पासूनी

समाधान ते मिळतां तुजला, गेला बहरुनी

वृद्धत्वाला काठी लागतें, स्थिरावण्या तोल सदा

हातभार तो देईल कुणी, विवंचना हीच अनेकदा

मृतदेह जर तसाच पडला,  किडे मुंग्या खाती

त्याही क्षणी मदत लाभूनी, चिता-अग्नी देती

जन्मापासूनी मृत्युपर्यंत, परावलंबी जीवन

कुणी तरी दिले तुजसाठीं,  हे घे जाणून

(कविता)

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

पेराल तसे उगवते

पेराल तसे उगवते

रुजविता बियाणें    अंकूर फुटती

असतील दाणे जसे    तेच उगवती

पेरता आनंद      आनंदचि मिळे

प्रेमाची बियाणें    प्रेम आणी सगळे

शिवीगाळ करुनी    आदर येई कसा

शत्रुत्त्वासंगे नसे     मैत्रीचा ठसा

घृणा दाखवूनी      कसे येई प्रेम

क्रोधाच्या मोलाचे   शांती नसे दाम

पेरावे तसें उगवतें    नियम हा निसर्गाचा

सुख दुःखाला कारण   स्वभाव ज्याचा त्याचा

(कविता)

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

अधुनिक सन्यास आश्रमी जीवन

अधुनिक सन्यास आश्रमी जीवन

 

एक अतिशय सुंदर व भव्य शिखर असलेले देवीचे मंदीर होते. सुरवातीच्या कांही पायऱ्या व मग मंदीरांत प्रवेश. मी त्या गांवी कांही कामासाठी गेलो होतो. संध्याकाळची वेळ, देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो. सुरवातीला दोन ओटे होते. मी एका बाजूने बसून बुट काढू लागलो. माझी नजर कोपऱ्यांत बसलेल्या एका वृद्ध माणसावर गेली. ते भिंतीला टेकून बसले होते. पांढरे कपडे, धोतर व झब्बा होता. कानटोपी घातलेली होती. त्यामुळे त्यांचा चेहरा दिसत नव्हती. त्यांच्या हातात एक पुस्तक होते. ते वाचत होते. हाती माळ होती.  पाण्याच्या कडीचा तांब्या, फुलपात्र, छोटी टोपली त्यांत कांही फळे, दोन-चार पुस्तकें.

मी जाण्याच्या बेतात असता, त्यांचेच लक्ष मजकडे गेले. त्यानी हात करुन मला बोलावले. त्यानी आपली कान टोपी बाजूस सारली. मला आश्चर्याचा जबरदस्त धक्का बसला. ते वसंतराव काळे होते. “ओळखलत मला? ”

”  हो ओळखल की– – आपण वैद्यकीय संचालक  —-  —- —-      मी क्षणभर थांबलो. आपण कांही चुक तर करीत नाही ना ? ह्याची मनांत कल्पना आली. त्याना बघून १५ वर्षापेक्षा जास्त काळ गेलेला होता. मी संभ्रमांत पडलो. पण लगेच त्यानीच माझी शंका दुर केली.  ” होय तुम्ही मला ओळखलंत. जा प्रथम दर्शन करुन या. मग बोलूत. ”

मी ह्या प्रकाराने, त्यांच्या अशा स्थितीत व अशा ठिकाणी त्याना बघणे मनाला चटका देणारे वाटले. मी समोरच्या मंदीरातील गाभाऱ्यांत बघत होतो. श्री देवीची उज्वल प्रतिमा दुरुन दिसत होती. मी मंदीराच्या पायऱ्या चढू लागलो.

डोक्यांत विचारांचे काहूर चालू होते. खूप पूर्वीचा एक प्रसंग डोळ्यासमोर आला.

मी सर्व कुटुंबीयासह चार धाम व इतर धार्मिक स्थळ-दर्शनासाठी जाण्याचे योजीले होते.  एक महीन्याच्या रजेची गरज होती. वैद्यकीय संचालक साहेब डॉ. वसंतराव काळे हेच होते. मी रजेसाठी विनंती केली. सर्व परिस्थिती व कौटूंबीक निकड व्यक्त केली. ते क्षणभर थांबले. विचार केला. ” आहो देवदर्शनाला जात आहांत. मग कसा रोकू ? मजसाठी देखील प्रसाद घेऊन या. ”  किंचीत हसत ते म्हणाले. अतिशय सज्जन गृहस्थ. चांगले प्रशासक होते.

डॉ. काळ्यांना ह्या स्थितीत बघताना मला क्लेशदायक वाटू लागले. मी फार बेचैन झालो. कोणती परिस्थिती उद्भवली असेल?  कोणता आघांत जीवनावर झाला असेल की ज्याने त्यांचे उत्तुंग व श्रेष्ठ जीवन एका क्षणांत बदलून टाकले.  मी जगदंबेचे दर्शन घेतले. मंदीराबाहेर आलो.

मी डॉ. काळ्यांच्या जवळ जाऊन बसलो. त्यानी आनंद व्यक्त केला. मी आपूलकीने त्यांच्याविषयी चौकशी करु लागलो

“आपण कसे आहांत ?  आपण काय करतां हल्ली ? ”

” मी ८० वर्षे पूर्ण केली. काय करावे तुम्हाला वाटते ? ”

“आध्यात्म्याच्या पुस्तकातून कांही शोध बोध घेत आहांत कां? ”

“शोध घ्यावयाचा नसतो. शोध लागतो. ”

“कोणता शोध लागला ?”

” वर्णन करता येणार नाही. ”

काळेसाहेब सांगत होते. मी एक चित्त करुन ऐकत होतो.

” मी आजपर्यंत काय केल उमगल नाही. शरीर मनाला वाटत होत. करीत गेलो. चाकोरीत फिरत होतो. सर्व सोडून दिले. न करण्यातच समाधान मिळू लागले. कुठे बसतो, काय करतो, ह्या अस्तित्वाच्या कल्पनेपेक्षा, कुठेच नाही ही जाणीव परम श्रेष्ठ वाटते. आवाजापेक्षा शांततेत समाधान.  करण्यापेक्षा न करण्यांत समाधान. ते आपली दिनचर्या सांगू लागले.

”  मी मंदीर परिसरांत राहतो, जवळच एक विहीर आहे. ते पाण्याची गरज पूर्ण करते. मला निवृत्ती वेतन मिळते. दोन वेळा खानावळीतून जेवनाचा डबा येतो. त्यांत भाजी पोळी एक ग्लास दुध व एक फळ असते. मंदीर परीसर स्वच्छता आणि येथील बागेची निगा हे व्यायामाचे  साधन. मुल, सुना, जावाई, नातवंड व इतर अधून मधून येऊन भेटून जातात. ”

थोड थांबून ते सांगू लागले. ” हे माझे आधुनिक सन्यासी जीवन समजा. जो मार्ग थोर ऋषीमुनी, श्रेष्ठ संत मंडळी, धर्मग्रंथ यांनी सुचविले, त्यावर जाण्याचा प्रयत्न करतो. ज्या क्षणापर्यंत माझाच अन्तरात्मा जो ईश्वर आहे, तो इतर कोणता मार्ग दाखवित नाही, तो पर्यंत प्रस्तूत वाट चालणे हे मी योग्य समजतो.

काळ्यांची दैनंदिनी, वयासाठी योग्य उपक्रम वाटला. पूर्वी सन्यास आश्रमांत लोक सर्वसंग परीत्याग करुन मंदीरी, निसर्गांत  गंगातीरी, हिमालयी, आपले उर्वरीत आयुष्य व्यतीत करीत. त्यावेळी अंतःपेरणा, संस्कार धर्म संस्कृती यांचा मानसिक दबाव संकल्प होता. मनाला ह्या मार्गाने जाण्याची  उपरती होत असे. काळा प्रमाणे काळ्यांच्या दैनदिनीतून जवळ जवळ हेच साध्य केले गेले. फक्त येथे सन्यासाचे अनेक जागी भ्रमण नसून, एक जागी बैठक होती. त्यांची वृत्ती एकदम सन्याशाच्या अवस्थेमधली वाटली. कदाचित् मी त्याला अधूनिक सन्यास आश्रमी म्हणेल. देहाच्या गरजा यांची त्यांनी व्यवस्था केली होती. मनाला मात्र आत्म्याशी केंद्रित करीत होते. स्वतःला विसरुन-जगाला विसरुन.

ह्यात होता ईश्वरी सतसंगाचा विचार, जीवन कार्य व ओढ यातून निवृत्ती, निजी संबंधीता पासून अलीप्तता, कांहीही न करता मिळणारा आनंद शांतता व समाधान काळे उपभोगीत असल्याचे जाणवले. जीवनाच्या परीपूर्ण शेवटाची वाट बघत.

( ललित लेख)

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

जीवन रंगभूमिवरील यशस्वी कलाकार .

जीवन रंगभूमिवरील यशस्वी कलाकार .

वसंता माझा बालमित्र! शाळकरी जीवनांतला. कॉलेज मध्येही एकत्र होतो. दोघेही वैद्यकीय महाविद्यालयांत मिळून शिकलो. आज दोघेही ज्येष्ठ नागरिक म्हणून सत्तरी ओलांडलेले. तो त्याच्या गांवी  मराठवाड्यांत स्थायीक झाला. तर मी शासकिय नोकरीत राहून अनेक गावांचे पाणी चाखू लागलो.

मी त्याच्या गांवी अनेक वेळा गेलो होतो. मात्र गेल्या २५ वर्षांत त्याच्याकडे जाणे झाले नाही. त्याच्या आग्रहाने मी त्याच्या गांवी गेलो.  चार दिवस त्याच्या कौटूंबिक जिव्हाळ्याचा पाहूणचार घेतला. खेड्यामधले घर कौलारु म्हणतात त्याप्रमाणे एक प्रशस्त जुन्या बांधणीचा वाडा. पुढे मागे मोठे अंगण  व फुलबाग होती. वसंताची ह्या सत्तरीमधली दिनचर्या बघून मी हरकून गेलो. खूप गम्मत मौज आनंद वाटला. त्याच्या प्रत्येक हलचालीने मनाची बरीच करमणूक झाली. आणि कांही प्रश्नचिन्ह मनामध्ये उत्पन्न झाले.

प्रातःसमयी चारचा सुमार असावा. माझी झोपमोड झाली, ती कानावर पडलेल्या भजनानी. वसंता तानपूरा घेवून संतांचे अभंग अतीशय तन्मयतेने ताना मारीत, आलापांत एकरुप होऊन पहाडी अवाजांत म्हणत होता. त्यानेच छेडलेले सतारीचे बोल, त्याला साथ करीत होते. मी गादीवर बसून ते सारे एकाग्रतेने ऐकत होतो. एक वेगळांच आनंद घेत होतो.  वसंताची ही गायनकला माझ्यासाठी अपरिचीत होती. त्याने साठीनंतर ती आपल्यापरी आत्मसात करण्याचा प्रयत्न चालवला होता. प. भिमसेन जोशींचे आलाप व गायन त्याने तंतोतंत  उभे केले होते. त्याच्या ईश्वराच्या भजनासाठी मी त्याला मनापासून धन्यवाद देत अभिवादन केले.

संध्याकाळचा चहा अटोपून आम्ही मागील अंगणात गेलो. त्याचे दोघे नातू ७-८ वर्षाचे व त्यांचे तीघे मित्र गोट्या खेळत होते. मध्यभागी गल केलेली होती. त्याच्या भवती वर्तूळ केले होते. व प्रत्येकाची एक रंगीत गोटी विखूरलेली होती. प्रतिस्पर्ध्याची गोटी रिंगणाबाहेर गोटीच्याच सहाय्याने उडविणे, व आपली गोटी रिंगणात गलीमध्ये टाकणे हा प्रत्येकाचा प्रयत्न होता. बोटाच्या कांड्यावर गोटी ठेऊन बोटाला बाक देत स्प्रिंगचा आकार व गती ने समोरची गोटी उडविण्याची कला सर्वानी साधली होती. अचुकता आणि नेम यानी तो खेळ मनास करमणूक करीत होता.  आम्ही अंगणात जाताच सर्वानी गलका केला.

״  आजोबा तुम्हीपण या तुमचीच आम्ही वाट बघत होतो. ״  हे पालूपद सर्वानी लावले.

वसंताने मला बाकावर बसण्याची खून केली. व तो चक्क त्यांचा एक बालमित्र म्हणून खेळण्यांत सामिल झाला. आश्चर्य म्हणजे चार सहा गोट्या त्याच्या खिशांत आधीच होत्या. सर्वांचा खेळ खूप रंगला. वसंता आपले वय विसरुन त्यांच्यातला एक संवंगडी झाला होता. एकमेकावर आरोप करणे, ओरडणे, रागावणे, खोटेपणा करणे, खेळातील तथाकथीत नियमांना बगल देणे, व आपोआपच खरे कसे हे पटविण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करीत होता.

वसंता आजोबा म्हणून मागे पडला नाही. तो पण त्याचा सुरांत, वादविवादांत, हमरीतुमरीवर येत असे. खेळ संपला, गोट्याचे वाटप झाले. आणि आजोबांनी सर्वाना भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा दिला.

रात्रीच्या जेवणाची तयारी होत होती. गरम गरम कांदाभजी करण्याची सुचना दिली गेली होती. बैठकित मोठा गालीचा होता. मी मासिक चाळत बसलो होतो.  माझे लक्ष कोपऱ्यांत बसलेल्या वसंताच्या  तीन वर्षे वयाच्या नातीकडे गेले. ती तीच्या सहा वर्षाचा भाऊ दादू आणि वसंता सर्वजण समोरासमोर बसून  आपडी थापडी खेळत होते. आपडी थापडी गुळाची पापडी, धम्मक लाडू तेल काढू, तेलंगीचा एकच कान, धर ग बेबी माझाच कान. धर त्या दादूचा कान. पुन्हा आपडी थापडी, आपडी थापडी गुळाची पापडी तेच पालूपद चालू. आणि दुसऱ्याचा कान धरल्या नंतर फिरण्याच्या हालचाली केल्या जातात. चाऊ म्याऊ पत्राळूतले पाणी पिऊ, हंडा पाणी गुडूप, म्हणत सर्वानी तोंडावर आपले दोन्ही हात ठेवले.  किती मजेदार हलकी फुलकी आणि आनंद निर्माण  करणारा हा शुशूखेळ होता.

हसणे खिदळणे आणि ओरडणे, ह्यात छोट्या नातवंडासह वसंता एकरुप होऊन आनंद लूटत होता.

” गरम गरम भजी वाढली, चला जेवायला हांक आली ” आणि आम्ही सर्वजण उठलो.

आज रविवार सुट्टीचा दिवस. वसंताचे दोन्ही मुले घरांतच होती. एक महाविद्यालयांत   जाणारी नात अन्विता. सकाळचा फराळ झाला. अन्विता क्रिकेटचा पेहेराव घालून आमच्या समोर आली. ״  चला बाबा बाहेर पटांगणात ״   सर्वजण जमा झाले आहेत.

״ चला ״ म्हणत वसंता उठला व त्याने मला पण बाहेर येण्याचे सुचविले.

״ काय ?   ह्या सत्तरीमध्येही तू क्रिकेट खेळणार. ? ״ मी विचारले

״ आफकोर्स परंतु खेळाडू म्हणून नव्हे, तर अँपायर म्हणून ״

वसंता मला टाळी देत मोठ्याने हसला.

दोन तासपर्यंत अन्विताच्या मैत्रीनी आणि वसंताच्या दोन्ही मुलांचे मित्रमंडळ, या सर्वानी कमीजास्त भिडूची टिम बनवत खेळांत रंगत आणली. पंचच्या भूमिकेंत वसंताने काटेकोर अट्टाहासी परंतु प्रेमळ स्वभावाने पंचगिरी चांगलीच केली. खेळ खुपच रंगला. सर्वानी त्याचा आनंद लुटला. घरांतून बेल वाजली. सर्वजण  खेळ आटोपून जेवणासाठी या. बोलावले गेले.

वसंता हा पेशाने डॉक्टर होता. सतत निरनीराळ्या रोग्यांच्या सहवासांत असे. एके काळी त्याला दैनंदिनीमधून इतर बाबीसाठी थोडीशी देखील उसंत मिळत नव्हती. आता वयानुसार तो दररोज सकाळी फक्त दोन तास प्रॅक्टीस करण्यांत घालवीत असे. सामाजिक कार्यांत आता त्याचा कल वाढला होता. वैद्यकिय शिबीरे आयोजीत करणे, गरीब गरजूना मदत करणे, ह्यात त्याचा बहूतेक वेळ जाई.  शासनाच्या कुटुंब कल्याण योजना, पल्सपोलीओ, माताबाल शिबीरे, अशा कार्यक्रमांत तो हिरिरीने भाग घेत असे.

आजचा माझ्या मुक्कामाचा वसंताच्या घरातील शेवटचा दिवस होता. दुपारचे जेवण आटोपून मी निघणार होतो. आज जेवणाचा स्पेशल व चमचमित बेत आखला असल्याचे कळले. त्याच बरोबर मी तेथील इतर मित्र मंडळीसमवेत  गप्पागोष्टींत व्यस्त रहावे, ही वसंताची प्रेमळ सुचना होती. आज तो स्वयंपाक घरांत राहून, खाद्य पदार्थांचे मार्ग दर्शन करणार होता. मी हसतच त्याच्या उत्साहाला मान्यता दिली.

दोन अडीच तास झाले, अजून वसंता कां आला नाही. काय करतो इतका वेळ त्या स्वयंपाक घरांत. मला उत्सुकते बरोबर गम्मतही वाटली. मी उठलो व स्वयंपाक घरांत जाऊन डोकावले. मला आश्चर्याचा धक्काच बसला. स्वयंपाक घरांत फक्त वसंता एकटाच होता. आणि तो जेवणातील पदार्थ करण्यात मग्न होता. One man’s show. It was great Vasanta only. त्याच हेही रुप बघून मी चकीत झालो. भारावून गेलो. गरम गरम जिलेब्या तो तळत होता. भरलेल्या वांग्यांची भाजी, पुलाव, ताकाची अतिशय चवदार कढी हा अप्रतीम बेत त्याने एकट्याने यशस्वी केला होता.

जीवन एक रंगभूमी आहे असे म्हणतात. आपण प्रत्येकजण फक्त नटाच्या भूमिकेंत असतो.  नटाला वेळोवेळी, प्रसंगाप्रमाणे मुखवटे बदलावे लागतात. त्याच भूमिकेत इतके एकरुप व्हावे लागते की ते पात्र जीवंत वाटावे. परिणामकारक भासावे. कुणी संत सज्जन बनून व्यासपिठावर येतो. सर्वांची मने प्रेमाने वा आदराने भारवून टाकतो. तोच खलनायक या भूमिकेत सर्वांच्या मनामध्ये राग तिरस्कार ह्या भावना नीर्माण करतो.

ह्याच ठिकाणी त्या कलाकाराच्या कलागुणांची कदर होते. त्यालाच प्रेक्षक नटसम्राट ही पदवी देतात. संसारातील त्याचे निजी जीवन आणि रंगभूमिवरचे जीवन ह्यात खूप तफावत असते. रंगभूमि ही नैसर्गिक जीवन कसे असते, हे दाखवितानाच, ते कसे असावे ही देखील अपेक्षा व्यक्त करते. येथेच नट वा कलाकार आपल्या भावना  सुलभतेने बदलताना दिसतात. हे सारे बाह्यांगी घडत असते. बदल हा जणू मुखवटा ( Mask ) बदलण्या सारखे सहज होऊ शकते. निर्माण झालेल्या परिस्थितीची झळ त्याच्या अंतरात्म्यापर्यंत केंव्हांच पोहचत नसते. मनालाही फारसा धक्का बसत नसतो. सारे होत राहते ते वैचारीक स्थरावर. हा केवळ विचारांनी विचारांचा संवाद असतो. त्यानुसार चेहऱ्यावर भाव व हातवारे करुन भाव दर्शविले जातात. त्यांचा उगम बौद्धिक स्थरावरच असतो. त्यात खऱ्या भावनेचा ओलावा नसतो.  येथे खरी भावनिक गुंतवणूक केंव्हांच नसते. हां हे मात्र सत्य असते की, व्यासपिठावर जो वैचारीक व भावनिक गुंता निर्माण केला जातो, तो कृतिम असतो. परंतु हुबेहुब नैसर्गिक वाटावा असा प्रयत्न होतो.

सत्य जीवनातील व्यक्ती कशी असते. तीच बोलण, वागण, हालचाली, वेषभूषा, इत्यादी कशा असतात ? त्याच चित्रण केल जात. सार बौद्धीक वैचारीक स्थरावरच दर्शनी project केल जात, भावना विचार दिसतात. पण ती कढ वा खोली त्यात केव्हांच नसते. खरा भावनेचा अविष्कार हा मात्र त्याच्या सत्य आयुष्याचा रंगरुपांत कार्यांत दिसतो.

वसंतानी हे भिन्नत्वाच स्वरुप साध्य करुन जीवन एक आगळ वेगळच केल होत. जीवन कस असावे, ह्यापेक्षा जीवन किती अंगांनी परिपूर्ण असावे ह्याच झलक दर्शन मला त्याच्या त्या चार दिवसाच्या सहवासांत झाले.

 

(ललित लेख)

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

मी कसा जगू आता?, ते तुम्हीच ठरवायच?

मी कसा जगू आता?, ते तुम्हीच ठरवायच?

 

ईश्वराने शरीर दिलय,  ते मला वाढवायच

मी कसा जगू आता ?, ते तुम्हीच ठरवायच ?   //धृ//

**   शेजारचा छेड छाड करतो

पोलिस स्टेशनला तक्रार करण्यास गेली

पोलिसानेच बलात्कार केला ,   म्हणून रडत घरीं आली

रक्षक हाच भक्षक झाला   तर संरक्षण कुणाला मानायचं   //१//

मी कसा जगू आता ?, ते तुम्हीच ठरवायच ?

**    बापाने दिलेल्या फ्लॅटवर ,    घर बांधण्याची योजना आखली

नगरपालिकेच्या परवानग्या,      ह्यातच जीवनाची कमाई संपली

माझ्या श्रमाचा पैसा,   दुजा खर्चताना बघायचं   //२//

मी कसा जगू आता ?, ते तुम्हीच ठरवायच ?

**    पोटाच्या विकारसाठी,    हॉस्पिटलमध्ये भरती झालो,

विकार तेथेच राहिला,     चांगली किडनी मात्र गमावून बसलो,

डॉक्टरांचे स्वार्थी कर्म बघीतले, तर आरोग्यासाठी कुठे जायच  //३//

मी कसा जगू आता ?, ते तुम्हीच ठरवायच ?

**    कृत्रिम तेल तूप,     खाण्यापीण्याचीही भेसळ

न दया माया प्रेम,     आयुष्याचा करतात खेळ

निर्दयी बनलेली जीवन मुल्ये बघायचं //४//

मी कसा जगू आता ?, ते तुम्हीच ठरवायच ?

**    तुला जगायचंय ना ?

फक्त विचारावर जग

भावनेला कायमची मुठ माती दे

न सुख न दुःख, दोन्हीही सारखेच वाटतील

एखाद्या रोबाट प्रमाणे काम करीत मरुन जा

कशासाठी ? आणि   कां ?   असले प्रश्न करु नकोस

जग बदलतय, सवय करुन घे अशाच जगण्याची

तुला जगायचंय, तेंव्हां हे पण तुलाच ठरवायच //५//

तू कसा जगशील आता ?, ते तुलाच ठरवायच ?

 

(कविता)

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

 

 

दुष्टाचा मृत्यु

दुष्टाचा मृत्यु

सारे दुर्गुण अंगी असूनी,  गुंड होता तो

इतर जनांना त्रास देत,  तुच्छ लेखितो

शक्ति सामर्थ्य त्यांत असतां,  फार मातला

आया बहिणीना अपमानुनी,  त्रासू लागला

बळजबरीनें पैसे घेई, स्वार्था करिता

हतबल होऊनी देऊ लागली, निराश होता

केवळ त्याच्या अस्तित्वाने,  सारे घाबरती

पिसाट संबोधूनी तयाला,  दुर्लक्ष करिती

एके दिवशीं अवचित ती,  दुर्घटना झाली

उंचावरनी त्याची स्कूटर,  खाली कोसळली

त्याच्या देहा भोवती जमले,  सारे गांवकरी

आज शब्द जे बाहेर पडती,  स्तुती त्याची करी

निच वृत्तीची पकड होती,  त्याच्या देहाला

देहाबरोबर दुष्टपणा तो,  नाश पावला

सुटका झाली आत्म्याची,  त्याच्या  हीन देहातूनी

स्तुति सुमनें उधळली गेली,  हेच जाणोनी

जेव्हां कुणाचा मृत्यु होई,  गुण गातो त्याचे

रुप ईश्वरी उरते जातां,  वेष्टन देहाचे

(कविता)

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०