Monthly Archives: जानेवारी 2014

दृष्टीची भ्रमंति

दृष्टीची भ्रमंति

 

बालपणीच्या काळामध्यें, दृष्टी आमची आकाशीं

लुकलुकणारे तारे बघतां, गम्मत वाटे मनी कशी       १

चमके केव्हां मिटे कधी कधी, लपंडाव तो त्यांचा वाटे

फुलवित होते आशा सारी, वेड तयांचे आम्हास मोठे      २

वाटत होते भव्य नभांगण, क्षितीजाला जाऊनी भिडले

भिंगऱ्यांचा तो खेळ खेळतां, सर्व दिशांनी नयनी भरले    ३

मोहक भासे विश्व भोवती, भिरभिरणाऱ्या दृष्टीपटाला

स्थिरावली ना दृष्टी तेव्हां, क्षणभर देखील एका बिंदूला      ४

दृष्टीला परि पडले बंधन, एका दिशेने बघण्याचे

व्यवहारातील जगामध्ये, पडता पाऊल तारुण्याचे         ५

प्रवाही होते जीवन सारे, जगण्यासाठी धडपड लागे

रम्य काय ते मधुर काय ते, विसरु गेली जीवन अंगे       ६

राग लोभ आणि प्रेम गुणांचे,  दृष्टीमध्ये मिश्रण होते

अहंकाराने ताठर करुनी, प्रेमाने कधी झुकविले होते      ७

दुजासाठी मी आहे येथे, विवेक सांगे हे दृष्टीला

शोध सुखाचा घेता घेतां, थकूनी गेलो संसाराला    ८

तन मन जेव्हां झाले दुबळे, दूर दृष्टी ही गेली निघूनी

आकाशातूनी क्षितीजावरती, आणि तेथूनी आतां धरणीं     ९

वाकूनी गेले शरीर आणि,   ह्रदय स्थरावर दृष्टी लागली

दाही दिशांनी धुंडत धुंडत,  अखेर देहा भवती वळली     १०

फिरली दृष्टी जीवनभर जी,  वैचित्र्याला शोधीत असता

डोळे मिटूनी नजीक पहा, सांगे तिजला निसर्ग आता      ११

आनंदाचे मुळ गवसले, अंतर्यामी वसले होते

आज पावतो विश्व फिरुनी, मुळ  ठिकाणी आले मग ते     १२

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

व्यस्त राहण्याचा मार्ग

व्यस्त राहण्याचा मार्ग

मराठी ब्लॉगची पध्दत, संगणाकावर नुकतीच सुरु झाली होती. थोडक्यांत वर्णन करायाचे म्हणजे हे एक प्रकारे आपल्या नावाचे एक खाते काढणे असते. ह्य़ाला करआकारणी वा फी नव्हती. आपल्या नावाचा ई-मेल काढून  ब्लॉग काढणे. एक प्रकारे वेबसाईट काढण्यासारखेच आहे. ह्य़ा खात्यावर तूम्ही लेख, कविता, माहिती, फोटो इत्यादी देऊ शकतात. वाचक वर्ग ती वाचतात. जर कुणी प्रतिक्रीया दिल्या तर त्या तुम्हास कळतात. कोणता लेख, वा साहित्य किती जणानी वाचले, ह्य़ाची जाणीव येते. मी हे सर्व जाणल्या नंतर  आपणही आपल्या नावाने एक ब्लॉग काढवा ही  ईच्छा प्रदर्षीत केली. वाचन लेखन ह्य़ांची आवड मनाच्या विरंगुळ्या बरोबर उतारवयांत वेळ घालविणे व ते कारणी लागणे हा हेतू.

” आता वय सत्तरीच्यापुढे गेलेले, तेव्हां ह्या गोष्टींत कशाला अडकवून घेता, मनाला अशांत कराल. ”  मुलानी माझ्या हलचाली बघून टोकले.

ईश्वरी चिंतन व वाचण्याचा मार्ग सुचविला.

कोणत्या वयामध्ये कोणते काम करावे ह्य़ाचे नियम नसले तरी शारीरिक क्षमता न मानसिक संतूलन हे त्या कार्यावर मर्यादा टाकतात. हे एक सत्य असते. त्या सर्वांचा विचार होवूनच कोणतेही कार्य हाती घ्यावे. मी माझ्या जीवन आराखड्यातील अनेक छोट्या मोठ्या कर्याचा आढावा घेवू लगलो. तरुणपणी कोणतीही गोष्ट मनांत येतांच ती केली जात असे. तीची योजना, कारवाई, व परिणाम  ह्याचा कोणताच गंभीरतेने विचार केला नव्हता. तडफ होती, धडपड होती. प्रौढत्व आले, तेव्हां कोणतीही गोष्ट करायची म्हणजे प्रथम त्या विचारावरच खूप विचार केला जायी. योजना आखल्या जात होत्या. सर्व अंगानी म्हणजे शारीरिक,मानसिक,आर्थिक, कौटुंबीक आणि सामाजीक, तो होइ. केव्हां यश केव्हां अपयश येत होते. मात्र हे सत्य होते की काम, प्रयत्न आणि यश ह्य़ाविषयी  एक जिद्द मनात होती. त्या धडपडीत त्या कामाचे अपेक्षीत परिणाम मिळवीण्याचीच चेतना होती. त्यामुळे समाधान व निराशा ह्याना सामोरे जावेच लागत असे.  एक कथा वाचली होती. कुण्या एका नव्वदीच्या माणसाने झाडाचे बी शेतांत लावले होते. हे महीत असून की तो स्वतःचे वय व आयुष्य मर्यादा जाणून त्याचे फळ उपभोगणार नाही. स्वतःसाठी नाही तर इतरासाठी, हीच त्याची प्रेरणा होती. फळाची अपेक्षा नसल्यामूळे फक्त आनंद होता.

सत्तरीच्या पुढे गेलेल्या वयांत संगणकावर ब्लॉग काढणे, लिखाण करणे, त्यासाठी वाचन करणे,  हे सारे सर्व साधारण अपेक्षित नसले तरी ते गैर वाटत नव्हते. येथे कोणतीही गोष्ट, वा यश मिळवण्याची धडपड नव्हती, अपेक्षा नव्हती. आगदी फळाची इच्छा न बाळगता केले जाणारे काम. ह्य़ात मला मिळणार होता फक्त एक आनंद, समाधान आणि व्यस्त राहण्याची कला वा सवय. शरीर ज्येष्ठत्वाकडे झुकताना त्याच्या गुणधर्मा प्रमाणे ते व्याधींचे शिकार बनणारच. वेळ पुढे ढकलता येते, परंतु काळाला कुणीच रोखू शकत नाही. हे सत्य आहे.

जे कराचचे होते, ज्याची क्षमता होती, ते पुर्ण झाले ही भावना ज्येष्ठ म्हणून पक्की करावी. जे होवू शकले नाही, त्या बद्दल आपण कमी पडलो कां ? हे समजले पाहीजे.

ज्याना काळ-वेळेचे भान, स्वताः च्या क्षमतेची आणि वयाच्या मर्यादाची जाण, हे सारे समजते, तोच जीवनांत खूपसे साध्य करतो. गरीबाना पैशाची किम्मत कळते, असे म्हणतात. त्याच प्रमाणे ज्येष्ठांना वेळेच महत्व कळलेले असते. ते आपल्या उर्वरीत आयुष्याचे अंदाज वर्षे, हाताच्या बोटावरुन  हेरतात. दिनदर्शीकेकडे त्यांचे लक्ष नसते. जे राहून गेले त्याबद्दल खंत न करता, उरलेल्या आयुषांचा काळ कोणत्याही चांगल्या योजनेत व्यतीत करण्याचा प्रयत्न व्हावा. नामस्मरण, ईश्वरी चिंतन, ध्यान धारणा, चांगले वाचन, लेखन, अहार, निद्रा (विश्रांति ), आणि बौद्धिक चर्चा, व्यायाम ह्य़ा अपेक्षित कार्यक्रमा शिवाय एखादा छंद जोपावा. जो मनास आनंद, समाधान, व शांतता देणारा असेल. त्यांत कोणतेही ध्येय वा फलाशा नसावी. मराठी ब्लॉग, त्यावरचे लिखाण, चर्चा, आणि रसगृहण हे मजसाठी असेच असणार नाही कां ?

तो फक्त व्यस्त राहण्याचा मार्ग असावा.    

 

डॉ. भगवान नागापूरकर    

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com                  

जुळे

जुळे

 

दोघे मिळून आलां               हातात घेऊन हात

हाताळूनी परिस्थितीला      करण्या त्यावर मात

 

दोघांची मिळूनी शक्ति         दुप्पट होत असे

सहभागी होतां,युक्ति           यशाची खात्री दिसे

 

एकाच तेजाची तुम्ही बाळे        बरोबरीने आलां जगती

रवि-किरण होऊन जुळे                 प्रकाशमान बनती

 

ओळखुनी जीवन धोके            यशाच्या मार्गांत

गाडीची बनूनी चाके              सतत रहा वेगांत

 

एकाचे पाठी जाता दुसरा      यश अल्पची मिळे

एकत्र मिळूनी काम करा        तुम्ही आहांत जुळे

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail   bknagapurkar@gmail.com

दुर्वांच्या जुड्या

दुर्वांच्या जुड्या

संध्याकाळचे फिरणे झाल्यानंतर शेजारच्या बागेत जावून शांत बसणे हे नित्याचे झाले होते.  एक प्रकारचा आनंद व समाधान मनाला त्यामुळे लाभत असे. शांत झोप मिळण्यासाठी ते गरजेचे वाटत होते.

एक गोष्ट माझ्या दररोज बधण्यात येवू लागली होती. एक वयस्कर गृहस्थ नियमीत त्याच वेळी मला बागेत दिसत होते. ते सहसा कुणाशी बोलत नसत. एकटेच शांत बसून बागेतल्या गवतातील दुर्वा काढीत असत. पिशवीत एक दोऱ्याचे रिळ असे. जमविलेल्या दुर्वांची ते जुडी बांधून ती त्या पिशवीत टाकीत असत. जवळ जवळ एक तास पर्यंत दुर्वा काढणे, जुड्या बांधणे व जमा करणे हाच कार्यक्रम ते करीत असल्याचे दिसून येत होते. कदाचित् २१, ५१, वा १०१ दुर्वांच्या जुड्या ते बांधीत असावेत. पुजेमधला मिळणारा आनंद घेण्याचा त्यांचा तो प्रयत्न असावा. हा माझा अंदाज होता. पण मी त्याना तसे कांही विचारले नाही.

एक दिवस अचानक त्यानी दुर्वा काढण्याचे थांबवून, ते माझ्याच शेजारी बाकावर येवून बसले. पिशवीतून पाण्याची बाटली काढून ते पाणी प्याले. मला त्यांचा परिचय करुन घेण्याचा अवसर मिळाला होता. ” आपली प्रकृती तर बरी आहे ना ? ”  मी विचारणा केली.

” हां, ठिक आहे. किंचीत् थकवा वाटला, म्हणून बसलो. ह्या वयांत सारे कांही अनिश्चीत. पाणी प्यालो. आता थोडी हूरहुरी वाटते. ”   ते माझ्याशी मोकळेपणाने बोलू लागले. ते एक वरिष्ठ निवृत्त शासकिय अधिकारी होते. छोटे कुटुंब. मुलीकडे रहात होते. फक्त दोन मुली त्यांना. एक परदेशांत स्थायीक झालेली. आनंदी व समाधानी वृत्तीने जीवन क्रम चालू होता. चौकस बुद्धी म्हणून मी त्याना त्यांच्या नियमीत दुर्वांच्या जुड्या जमाकरण्या बद्दल विचारणा केली.

ते हसले. “खर सांगू. ह्या दुर्वा खोडणे, जमा करणे, त्याची जुडी बांधणे आणि अशा अनेक जुड्या पिशवीत जमा करणे हे सारे मी केवळ आनंदासाठी, समाधानासाठी करीत असतो. माझे वय सध्या ८० च्या पुढे गेलेले आहे. प्रकृति सध्यातरी टिकवून आहे. त्यामुळे शरिराच्या हलचाली व्यवस्थित व ताब्यात असलेल्या आहेत. फक्त ईश्वरी नामस्मरण करतो. चिंतन करतो. ध्यान करतो. कोणतेही कर्मकांड करीत नाही. पुजाअर्चा ह्यांत मन केव्हांच रमले नाही. म्हणून ती करीत नसतो. मनाला पटले वा भावले तेच करत गेलो. कुणी सांगतो, सुचवितो म्हणून अथवा पुस्तकांत वा कोणत्यातरी ग्रंथात मार्गदर्शन आहे म्हणून मी ते मान्य करीत नाही.  हां ! ह्या दुर्वांच्या जुड्या कशासाठी ?  हे सारे फक्त मानसिक समाधानासाठीच आहे. सर्व दुर्वा अंदाजाने मी जमवून त्याची जुडी बांधतो. त्याकडे माझे लक्ष नसते. त्या गणरायाचे मात्र सतत नामस्मरण चालू ठेवतो. ह्या साऱ्या  जुड्या मी मंदिराशेजारच्या फुलवाल्याला देत असतो. तो मला त्याचे दहा रुपये देतो. बस. श्रमाच्या पैशाचा मिळणारा आनंद हा कांही वेगळाच असतो, नव्हे काय ? मंदिरा शेजारी कांही भिकारी बसलेले असतात. ते पैसे मी त्याना देवून टाकतो. त्या भिकाऱ्याची गरज, ही त्या क्षणी माझ्या आनंदाचा, समाधानाचा मार्ग निर्माण करणारी असते. ह्य़ातच माझ्या मनाची शांतता दडलेली आहे. त्याच शांततेच्या शोधांत मी उर्वरीत जीवन व्यतीत करतो. ”

एका छोट्याशा प्रसंगातून, एक रोमांचकारी भावनिक आणि जीवनाच्या महान तत्वज्ञानाचे विवरण मी त्या गृहस्थाकडून ऐकत होतो. त्यानी जे सांगीतले, त्यानी मी भारावून गेलो. जीवन म्हणजे काय ? जगायचे कसे व कां हे त्यानी जाणले असावे, हे मला उमगले. मी उठून त्याना अभिवादन केले. त्यांच्या चरणाला स्पर्ष केला.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@ gmail.com

आईचे ऋण

आईचे ऋण

मूर्तिमंत वाटे देवी लक्ष्मी          प्रेमळ स्वरूप माझे आई
धन्य जहलो जन्म मिळूनी       उदरामाजी तुझिया ठायी

प्रेमाचा तो सागर देखिला      तुझ्याच ह्रदयाजवळी जावूनी

निकटपणाचा आनंद घेत         नऊ मास मी उदरी राहुनी

दुग्धामृत पाजून मजला            वाढवी अंकुर काळजीने
घास भरवण्या काढून ठेवी         उपाशी राहून आनंदाने

निद्रा न लागे तुजला तेंव्हा           आजारी जेंव्हा मी पडलो
पाणी दिसले तुझ्या नयनी           दु:खाने जेंव्हा हळहळलो

अनंत ऋणे करुनी ठेवसी          तुच  माझ्या शिरावरी                                                                                                                            अशक्य आहे तेच  फेडणे           ह्याच जन्मी तरी

मात्रत्वाचे ऋण फेडण्या              असे वाटते, माताच व्हावे
पुनर्जन्मी त्नू पुत्र होऊनी            सेवा करण्या मजला मिळावे.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com