रोज सकाळी सूर्योदयाच्या समयी फेरफटका मारणे व नंतर घराजवळच्या बागेत जाऊन शांतपणे चिंतन करीत बसने, हे नित्याचेच व नियमित झाले होते. सकाळच्या प्रसन्न वातावरणात शरीर व मन ताजे तवाने ठेवण्यात खूप आनंद वाटत असे. बागेमध्ये विविध रंगांची अनेक फुलझाडे होती. प्रातःसमयी उमलणाऱ्या त्या फुलांचे सौंदर्य मनास मोहून टाकीत होते. एक दिवस माझे मित्र श्री एकनाथराव यांची भेट झाली. हातात पिशवी घेऊन ते हलके हलके फुले तोडून जमा करु लागले होते. माझे लक्ष जाताच मी त्यांच्याजवळ गेलो.
” काय पूजेसाठी फुले गोळा करीत आहात वाटते? परंतु ही फुले देवाला कशी चालतील? ” माझ्या विचत्र वाटणाऱ्या वाक्याने त्यांना एकदम आश्चर्य वाटले. काहींच उलगडा न झाल्यामुळे त्यांनी मला त्या वाक्याचा अर्थ विचारला. मी म्हणालो ” थोड्या वेळापूर्वी मी समोर बसून मानस पूजा केली होती. ही सारी उमललेली टपोरी फुले स्पर्श न करता, त्या ईश्वराचे चरणी अर्पण केली. मनानेच वाहिली. आता माझ्या द्रीष्टीने ती निर्माल्य झालेली आहेत. ही फुले तुम्ही कशी देवाला वाहणार? ” विचित्र आणि न पटणारे. परंतु तर्कज्ञानाच्या विश्लेषणाने मान्य होणारे हे तत्वज्ञान. एकनाथरावनी क्षणभर विचार केला व ते किंचित हसले. ” मी पण मानस पूजेचा विचार करीन. कदाचत निसर्गाच्या फुलण्यातल्या आनंदात, मला पण सहभागी होता येईल.” असे काहींसे पुटपुटत ते निघून गेले.
मला अचानक माझ्या अमेरिकेतील काही दिवसाची आठवण झाली. मी मुलाकडे गेलो होतो. अतिशय स्वछ आणि सुंदर वातावरण होते. मनाला प्रसन्न व आनंदित करणारे. मोठे व अरुंद सिमेंटचे रस्ते. मध्य भागात Devider असून रंगी बिरंगी फुलांनी सुशोभित केलेले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी गवताचे मखमली गालिचे असून विविध रंगांची मनोहर फुले फुलली होती. गुलाबांची टवटवीत मोठी फुले भरपूर प्रमाणात फुललेली होती. रस्त्याच्या कडेला आपल्यासारखी काश्मिरी गुलाबांची ताटवे ह्याचे मानस आश्यर्य वाटत होते. असे चित्र भारतामध्ये केव्हांच बघण्यात आले नव्हते. गुलाबाची टपोरी फुले, कुणाच्या घरातील बागेमध्ये किंवा एखद्या सार्वजनिक बागेमध्ये असतीलही. परंतु त्याच्यावर नजर ठेवणारे, निगा राखणारे असतीलही. अमेरिकेत कुणीही केव्हाही फुले तोडताना बघितले नाही. किंवा ” फुले तोडू नका ” ही सूचना देणारी, सूचनाफलक कोठेच दिसला नाही. इकडील सर्व सामान्या मध्ये ही जाणीव इतकी रुजली आहे कि कुणीही रस्त्याच्या कडेलगतची फुले सार्वजनिक बागेतील फुले किंवा घरातील फुले देखील झाडावरून काढीत नसतात. झाडावरच फुलाने उमलणे, बहरणे, आणि गळून पडणे ही नेसर्गिक प्रक्रिया त्यांच्यात घडताना दिसते.
मला ठाण्यात सकाळी फिरावयास गेलो असताना जे दृश दिसत होते ते आठवले. बरीचशी वयस्कर मंडळी सकाळी फिरण्यास जाताना दिसते. काही घरामधली बागेमाधली जास्वनदिची, कन्हेरीची, पारिजातकाची, गुलाबाची वा इतर काही मोठी झाडे, घर कुंपणाच्या बाहेर फांद्या वाढून बहरलेली दिसत. कित्येक महाभाग हाताला येतील तेवढी सर्व फुले तोडून पिशवीत जमा करतात. त्यांना त्यात आनंद वा धन्यता वाटते. पुजेसाठी ती सर्व फुले कशी मिळतील हे बघण्यातच ती प्रयत्नशील होती. मला अद्याप कळले नाही कि आपण निसर्गाने अर्थात त्याच ईश्वराने निर्माण केलेले सौंदर्याचे प्रतिक सुंदर फुल का तोडतो. तोडून ते देवमुर्तीवर वाहून त्याच परमेश्वराला आपण आनंदी वा समाधानी करतो आहोत. ही भावनाच विचीत्राशी वाटते. भावनेला जर विचाराची साथ मिळाली तर बरेच गैरसमज दूर होऊ शकतील. ईश्वरावर नितांत श्रधा असावी हे सत्य आहे. त्याच्याशी जवळीक साधण्याच्या मार्गावर चिंतन व्हावे ही अपेक्षा.