Monthly Archives: जुलै 2016

अशीही एक भेट

अशीही एक भेट

१९९७ सालच्या जुन-जुलै चा काळ. आम्ही उभयता कैलास-मानसरोवरच्या यात्रेला गेलो होतो. एकूण ३० दिवसांची खडतर यात्रा झाली. परंतु जीवनामध्ये एक जबरदस्त आठवण निर्माण करुन राहिली. आपल्या धार्मिक द्दष्टीकोणातून ज्या अनेक यात्रांचे वर्णन केले गेले, त्यामधील सर्व श्रेष्ठ अशी ही समजली जाते. आजच्या अधुनिक युगांत देखील, ती यात्रा यशस्वीपणे पूर्ण करणे म्हणजे एक भाग्यच वाटते. एक निसर्गरम्य साईटसीईंग ह्या दृष्टीकोणातून ती यात्रा खूपच महत्वाची वाटली. कैलास पर्वताच्या २२ हजार फूट उंचीवर आम्ही गेलो होतो. प्रथम कैलास व नंतर मानसरोवर परिक्रमा पूर्ण केली. प्रवासाला निघतांना इतर गरजेच्या वस्तूंमध्ये औषधांचे फार महत्व होते. कारण सर्व प्रवास डोंगर, दरय़ा नदी नाले पार करीत जाणारा, पायी अथवा घोड्यावर असा होता. रस्त्यावर दूर दूर अंतरावर गांव वस्ती तुरळक. चहा बिस्कीटे देखील मिळणे कठीण. तेथे औषधी ही कशी मिळणार ? आम्ही दोघेजण वैद्यकिय व्यवसायीक म्हणून बहूतेक औषधी व ईनजेक्शन्स घेतली होती.
प्रवासांत कळलेकी , त्या डोंगराळ भागांत मागास संस्कृतीचे लोक टोळ्या करुन राहतात. दरोडे, लुटालुट, खून हे नित्याचेच. आपल्याकडील चंबळ खोरय़ातल्या दरोडेखोराप्रमाणे. तरी देखील कित्येक वर्षांत कैलास मानसरोवरसाठी जाण्यारय़ा यात्रेकरुना त्रास दिला गेला नव्हता. आम्ही तसे भितीमय वातावरणांत असल्याचे जाणवत होतेच. सारेजण ‘ ॐ नमः शिवाय ‘ हा जप तोंडाने म्हणत चाललो होतो.
अचानक एक तुफान निर्माण करणारी घटना घडली. आमची दातखिळीच बसली. सात आठ दरोडेखोरांनी आम्हा यात्रीना गाठले. कांहीची तोंडे झाकलेली होती. त्यांच्या हातांत बंदुका व काठ्या होत्या. आम्ही सर्वजण एकदम थांबलो. आमच्या बरोबर चार टूरीस्ट गाईड्स दुभाषी होते. त्यानी आम्हास शांत राहून धीर धरण्यास सुचवले. दोघे गाईड्स त्या टोळीच्या म्होरक्याला सामोरे गेले. अभिवादन केले. मुखिया घोड्यावरुन उतरला. दुभाषीबरोबर त्यांचे बोलने झाले. दुभाषी आमच्याजवळ आला. त्याने विचारणा केली, ‘ तुमच्यापैकी कुणी डॉक्टर आहे कां ? ‘ प्रसंगाचे अवलोकन झाले नाही. आम्ही भित भितच पुढे गेलो. आम्ही आमचा वैद्यकीय क्षेत्राचा परिचय दिला. दुभाषीकडून कळले की त्यांच्या मुखियाचा मुलगा तापाने आजारी होता. व त्याला बैलगाडीत आणले होते. ते काळजीत होते. जवळ जवळ शंभर किलोमिटर अंतराच्या टापूत वैद्यकीय सोय उपलब्ध नव्हती. शक्तीशाली परंतु भयानक माणसे देखील केवळ परिस्थितीनुसार असाहाय्य झालेली जाणवली. एक यात्रींचा ग्रुप बघून कांही मदत मिळेल कां ? ह्या विचारांनी ते आले होते. सारे ऐकून घाम सुटला. येणारय़ा कोणत्या संकटाची ती चाहूल असेल, ह्याची भिती वाटू लागली.
मी पुढे गेलो. त्या मुखियाला अभिवादन केले. त्यानेपण मला नमस्कार केला. कांहीतरी सांगू लागला. मला कळले नाही. जवळच असलेल्या बैलगाडीत मुलगा झोपलेला होता. त्याला मी तपासले. न्युमोनिया (Pneumonia) होता. तापाने फणफणत होता. मी औषध दिले. एक इनजेक्शन पण दिले. दुभाषीतर्फे औषध घेण्याचे मार्गदर्शनही केले. मी पुन्हा अभिवादन करुन परत फिरलो. पण मुखियाने मला थांबण्याची खुण केली. मी चमकलो.

2
मुखिया त्याच्या घोड्याजवळ गेला. तेथे बांधलेल्या पिशवीतून एक मोठा खंजीर काढला. चांगले वेष्ठन, मुठ असलेला चमकदार. माझ्या जवळ येऊन तो खंजीर त्याने माझ्या हाती दिला. मी कांहीसा गोंधळलो.
दुभाषीने उलगडा केला. मुखियाने तो खंजीर मला भेट देऊ केला होता. मी संकोचलो. परंतु कांहीही न बोलता, हसत ती भेट मान्य केली. आभार मानले.
जाणीव झाली की माणसाच्या अन्तर्यामी चेतना म्हणून जे कांही असते, तेच ईश्वरी रुप असते. त्यांत सत्य प्रेम आनंद सदैव जागृत असते. त्याची शक्ती, त्याच वागणं, त्याचे विचार कितीही जहाल असले तरी खोलवर कोठेतरी प्रेमाचा झरा असतोच. कदाचित् प्रत्येक व्यक्तीचे अंकुरण हे आईच्याच उदरातून होते, जेथे केवळ प्रेमाचाच ओलावा असतो. वाढत जाणारय़ा, फोफावणाऱ्या वृक्षाच्या बाह्य वातावरणाने परिस्थितीजन्य संस्कार होऊन त्यात कठीणपणा अलेला असतो. तरीही प्रसंगानुसार त्याला त्याच्या प्रथमावस्थेतील प्रेम ओलावा, कारुण्याकडे झुकवतोच.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

विश्वासातील खोडसाळपणा ?

विश्वासातील खोडसाळपणा ?

आमच्या शेजारी वयोवृद्ध ताराबाई, ज्याना आम्ही मावशी म्हणत असू रहात होत्या. निवृत्त शिक्षिका, वय ९८ पूर्ण. जीवनाचे शतक पूर्ण करण्याचा आत्मविश्वास. ह्या वयांत देखिल आनंदी व समाधानी राहण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असे. स्मरणशक्तीपण त्याना साथ देत होती. वर्तमानपत्रातील फक्त ठळक हेडलाईन्स त्या वाचीत असे.
मी अनेक वर्षे पूजाअर्चा व ध्यानधरणा ह्या दैनदिन विधी करीत असतो. ईश्वरी साक्षात्कार म्हणजे काय ? त्याची अनुभूती, व फळ हे सारे संस्काराने मनावर बिंबवलेले विचार होते. बालपणीच संस्कारांनी रक्तांत शिरकाव केला व शरीराचे एक गुणधर्म म्हणून स्थित झालेले होते. फळाची आशा करु नकोस. कर्म करीत रहा. हा भगवंताचा संदेश तंतोतंत पाळण्याचे व्रत अनुसरीत होतो. पण चंचल मन हे जेवढे संशयी आणि दृढनिश्चयाला बाधा आणते, इतके बाह्य जगांतले कोणतेच विचार कार्य करणार नाही.
एकदा तारामावशी आल्या. त्यावेळी मी पूजा करीत होतो. एक विचीत्र व अफलातून विचार मनात चमकून गेला. मन जसे चपळ, तसेच संशयी पण असते. ते काय व कसा विचार करील हे कुणालाही सांगता येत नाही.
” हे आई जगदंबे, श्रीमती तारामावशी वयाची ९८ वर्षे जगल्या. अत्यंत सरळ व साधी बाई. त्यांच्या जीवनांत अद्यापी कोणतीही घटना अशी ऐंकवांत नाही, की ज्याचा विचार करतां तुझ्या अस्तित्वाची कल्पना मनाला वाटू शकेल. पण तू असे छोटेसे कां होईना, कांही तरी करून दाखव की ज्यामुळे ताराबाईना धन्यता वाटेल. व इतकी आयुष्याची वर्षे घलविली त्याचे समाधान होइल. ”
हे जग ईश्वराच्या श्रद्धेसाठी, विजेच्या चमकण्याप्रमाणे एखाद्या चमत्काराची का अपेक्षा करते हे कळत नाही. दुसरय़ाच क्षणी मी माझ्या तंद्रितून जागा झालो. मला हंसू आले. श्रद्धा ठेवत जा. चमत्कार वा कांही प्राप्त होईल हा स्वार्थ तुझी तप साधना कवडीमोल करेल. मी चंचल मनाला आवरत ईश्वराची क्षमा मागीतली.
कांही दिवस गेले. अचानक दोन प्रतिष्ठीत माणसे माझ्या घरी आली. त्यांत एक ठाणे जिल्हा पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष, जे माझे जवळचे मित्र होते. व दुसरे नवोदित ज्युपिटर हॉस्पिटल, ठाणे याचे संस्थापक/संचालक होते. जे माझ्या परिचयाचे नव्हते. त्यांच्याकडून कळले की ठाण्यामध्ये १५० कोटीहून जास्त बजेट असलेल्या ज्युपिटर रुग्णालयाची संकल्पना पूर्ण झालेली आहे. सामुग्रीने सुसज्ज व ज्येष्ठ डॉक्टर्स तज्ञ मंडळीनी परीपूर्ण असे अद्यावत हॉस्पिटल उभारले गेले आहे. त्यांच्या मँनेजमेंटने सामुहीक सल्ल्याने असे ठरविले आहे की ठाण्यातील जी सर्वांत वयोवृद्ध ज्येष्ठ व्यक्ती असेल, तीच्याकडून त्या हॉस्पिटलच्या उदघाटनाची फित कापली जावी. त्या व्यक्तीचे प्रथम पाऊल तेथे पडावे. हाती असलेल्या यादी प्रमाणे, श्रीमती ताराबाई यांचे नांव आम्हास कळले. त्या ठाण्यामध्ये ५० वर्षाहून अधीक काळ आहेत. सध्या त्या तुमच्या शेजारी राहतात. कृपया त्यांची अनुमती घेऊन द्याल कां ? त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, ह्याची काळजी घेतली जाईल.

आश्चर्य आणि कौतूकाने माझे ह्रदय भरुन आले.स्वप्नांत देखील ज्याचा विचार मनाला स्पर्ष करणार नाही, ती अघटीत घटना घडू पहात होती. अशा भव्य आणि दिव्य वास्तूचा उदघाटन सोहळा कदाचित् राष्ट्रपती यांच्या हस्ते पार पडेल हे ऐकत होतो. कारण त्या महाराष्ट्राच्याच म्हणून. अथवा पंतप्रधान वा मुख्यमंत्री यांच्या हस्ते. परंतु विधात्याने साऱ्याना एका वैचारीक लाटेमध्ये सहज बाजूस सारुन, श्रीमती ताराबाई ह्या ९८ वर्षाच्या शिक्षिका, एक सामान्य ज्येष्ठ नागरीक म्हणून त्यांच्या हाती उदघाटनाची फीत कापण्याची कात्री द्यावी, हे परम भाग्य सोपवावे, ह्याला काय म्हणणार ? एक दैवी चमत्कारच नव्हे ?
सारे ऐकून ताराबाईंच्या डोळ्यांत पाणी आले होते. आणि त्यांच्या भावना बघून, माझे ह्रदय भरुन आले. मी पाणावलेल्या डोळ्यानी देव्हाऱ्यातल्या मुर्तीकडे बघूं लागलो. पुन्हा मनाने संदेश दिला. श्रद्धा ठेवीत जा, फळाची अपेक्षा करु नकोस. माझा प्रत्येक क्षण मुळी चमत्कारानी भरलेला असतो. त्याला फक्त जाणत रहा. ईश्वरी प्रचिति तेथेच येईल.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

मृत्युची चाहूल

मृत्युची चाहूल

मृत्युबद्दल अनेक प्रचलीत समज वा गैरसमज आहेत. मुख्यतः मृत्युच्या भयानकते विषयी बरेच कांही ऐकले होते. मृत्युसमयी व्यक्ती अत्यंत त्रासाने ग्रासलेला असतो. एक हजार विंचवांचा दंश व्हावा, इतक्या वेदना ग्रस्त होतो. शिवाय मृत्युचा त्रास हा त्याच्या पाप-पुण्याच्या ( ?) तथाकथीत हीशोबोशी संबंधीत असतो. यमदूत येतात, यमाचा फास अवळला जातो. प्राण खेचला जातो. … इत्यादी .. इत्यादी. सर्व साधारण सामान्यजन मृत्यु प्रक्रियेबद्दल खऱ्याअर्थाने अज्ञानी असतो, असे दिसून येते. त्यामुळे बहूतेक ऐकीव माहिती वा कथानके ह्यावर विश्वास ठेवून माणसे आपली मते बनवित असतात.
मी जवळ जवळ ४० वर्षे वैद्यकीय क्षेत्रांत होतो. तेही शासकीय सेवेमघ्ये. रोगी, रोग, व उपचार ह्यांच्याच मालीकामध्ये सहभाग घेण्याचा प्रसंग. कित्येक वेळा रोग्यांचा मृत्युशी सुद्धा संबंध येणारच. अनेक गंभीर व असाध्य आजार असलेल्या रोग्यांना मृत्युशयेवर असताना त्यांच्या शारीरिक व्याधी तपासण्याचा योग येत असे. तशीच त्यांची त्याक्षणाची मानसिकता समजण्याचे बरेच प्रसंग आले. एक वैद्यकीय अभ्यासक म्हणून स्वानुभवाने त्यांच्याकडे लक्ष्य केंद्रीत करीत होतो. व्यक्ती मृत्युची चाहूल लागताना, कोणते विचार करीते.? कसे वागते ? हे गंभीरपणे बघू लागलो. त्यावर लिखाण केले. अनेक रोग्यांकडे त्या दृष्टीकोणातून अभ्यास करीत गेलो. मृत्यु अचानक येतो. मृत्यु घाला घालतो. मृत्यु अनिश्चीत असतो, परंतु निश्चीत येतो. मृत्यु कोणतीही सुचना न देता येतो. अनेक अनेक ही वाक्ये ऐकतो. ती वाचलेली होती, ऐकलेली होती. कांही व्यक्तींचे मृत्यु जवळून बघण्याचे प्रसंग आले व हाताळले गेले. मृत्यु हे जीवनाचे अंतीम सत्य आहे. त्याला माणसे त्याक्षणी कशी सामोरी जातात, ह्याचे मी सतर्कतेने अवलोकन करुं लागलो. कांही टिपणी केल्या. मात्र काय खरे असेल, ह्यावर वैचारीक साराशं काढणे कठीण गेले.
ह्या लेखांत फक्त निवडक तीनच रोग्यांचे दाखले उदाहरणासाठी दिलेले आहेत. ज्यांचा मिळून सारांशात्मक विचार व्यक्त केला आहे. हा माझा अभ्यास आहे. विचारांचा अट्टाहास नाही.
1) बबनराव कुलकर्णी यांचा मोठा मुलगा अविनाश अत्यंत हुशार आणि मेहनती. कॉलेजची डिग्री प्रथम क्रमांकात मिळवली. भारतीय Public Service Commission उतीर्ण होऊन शासनात वरिष्ठ जागा मिळाली. वय फक्त ३० वर्षे होते. सार अत्यंत आनंदमय. परंतु निसर्गाला वेगळच अभिप्रेत होत. प्रकृतिचा खांब अचानक कोसळू लागला. शक्य तेवढ्या नावाजलेल्या वैद्यकीय तज्ञाचे सल्ले झाले. अस्तित्वात असलेल्या सर्व वैद्यकीय चाचण्या घेतल्या गेल्या. Carcinoma of Intestine अर्थात अतड्याचा Cancer हे भयानक रोग निदान त्याच्यावर शिकामोर्तब झाले.
अविनाशच्या शेवटच्या चार दिवसांत, सर्व ठिकाणचे सर्व उपाय संपल्यावर हातबल झालेल्या वडीलांनी शासकिय रुग्णालयांत आणले होते. माझ्याशी त्यांचा दैनंदिन संबंध येऊ लागला. अविनाशला स्वतःला आपल्या प्रकृतिची, असाध्य रोगाची, आणि अतिशय वेगाने झेपावणाऱ्या मृत्युच्या सापळ्याची कल्पना आलेली होती. त्याची समज बुद्धी शेवटच्या घटकेपर्यंत तल्लख होती. तो शांत झाला होता. भावनारहीत होत होता.


खोलीतील वातावरण देखील शांततामय ठेवण्याचा स्वतःचा प्रयत्न होता. खोलीत कुणीही दुःखी वातावरण निर्माण करु नका. खंत करु नका. चर्चा नको. उपदेश नको. सूचना नको. ह्या त्यानेच सुचना केलेल्या होत्या. समोर टि. व्ही.. त्यावर शांत मधूर व आनंदी गाणी चालू असे. गणपतीची प्रतिमा. तेथे एक मंद दिवा व उदबत्ती असे. हे वातावरण त्याने शेवटच्या क्षणापर्यंत ठेवले.
सर्व नातेमंडळी खोलीच्या बाहेर होती. अविनाशच्या तोंडावर मास्क ठेऊन ऑक्सीजन चालू होते. तो डोळे मिटून शांत पडला होता. मी तपासणी करुन टिपणी लिहीत होतो. त्याने डोळे उघडले. मजकडे बघीतले. त्याची कांहीतरी बोलण्याची इच्छा दिसली. मी नाकावरील मास्क बाजूस केले. ‘ डॉक्टर विज्ञान पुनर्जन्म मानते कां ? – – – धर्मांत तर खुप चर्चा असते. — मला फक्त एकच शंका आहे. – – – पुनर्जन्म असलाच तर तो कोठे, केंव्हा, व कसा हे प्रश्न अनुत्तरीतच असतात ना. – – – मग माझा जन्म झाला काय किंवा नाही ह्याला महत्व रहात नाही ना.’
अतिशय गंभीर तत्वज्ञान तो त्या क्षणी व्यक्त करीत होता. हलके हलके परंतु विश्वासाने. मी त्याला त्याच्या विचारांना सहकार्य करीत होतो. ते विचार, ती सुप्त इच्छा, ती शासंकता, ही तेथेच थांबली. माझे ते त्याला तपासणे शेवटचेच ठरले होते. मृत्युचे आनंदात स्वागत करीतच त्याने डोळे मिटले. जणू तो मृत्युशी एकरुप झाला.

2) दिनकर जरीवाला ह्या व्यापाराला त्याच्या शेवटच्या आठ दिवसांत बघितले, जाणले आणि वेगळ्याच तऱ्हेने अनुभवले. अत्यंत आनंदी व परीपूर्ण कुटूंब. व्यापार वडीलोपार्जीत. मुले सुना व नातवंडे यांचा सभोवताली गराडा. नुकतीच एकष्टी (६१) झालेली. जीवनाची सर्व कर्तवे पार पाडीत आनंद लुटला होता. फक्त ‘ समाधान ‘ देहाभोवती कोठे जागा मिळेल कां ? ह्या विवंचनेत चकरा माकीत होते.
अचानक प्रकृती ढासळली. दोन महिन्यात मृत्युशय्येवर झोपवले. तपासांत निदान झाले ते Leukemia अर्थात Blood Cancer याचे. आपल्या जीवनाचा शेवटचा आठवडा ते हॉस्पिटलमध्ये होते. सर्व रुग्णालय त्यानी डोक्यावर घेतले होते. पैशाच्या ताकतीवर कांहीही साध्य करण्याची वा मिळवण्याची एक नशा लागलेली. ही सवय वा गुणधर्म रक्तांत भिनलेला होता. Blood Leukemia जरी झाला तरी त्या जन्मजात गुणधर्माला धक्का लावू शकला नाही. दररोजची आरडाओरड, स्वभावातील आरेरावी, वैचारीक गरजेची पू्र्तता त्या क्षणीच होण्यासाठी अट्टाहास, सहकारी वा अवलंबीत याना सतत सूचना अथवा उपदेश चालू असे.
” बचेंगे तो औरभी लढेंगे ” ही मगरुरी त्यांच्या प्रत्येक हालचालीमधून दिसून येत होती. जे मिळाले नाही त्यासाठी संघर्ष हे त्याचे तत्वज्ञान त्या क्षणी, आगदी मृत्युच्या दारापर्यंत ते पोहचले तोवर झालेले दिसले.
सांत दिवस ते रुग्णालयांत मृत्युशी झुंज देत होते. पहीले पांच दिवस असलेली शक्ती, हत्यार पारजीत होते. मृत्युशी देखील चार हात करुं ही जबरदस्त इच्छा आशा व विश्वास जरीवाला यांच्यामध्ये होती. परंतु विरोधी शत्रुची ताकत बघून त्यानी हार मानण्यास सुरवात केली.


मृत्युच्या दारापर्यंत धडपडत जाणारा मृत्युला विरोध करतो. त्याच्या कचाट्यातून सुटका करण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र तीच व्यक्ती त्याच मृत्युचे दार ओलांडून मृत्युच्या घरांत शिरतांच, सारे चित्र पालटते. बदलले जाते. त्याच्या मनातील विचारांची दिशा एकदम बदलते. सारे तुफान शांत होते. मानव निर्मित वैचरीक प्रभुत्व, भावनांचे कढ ढेपाळून जातात.
त्याच्यासमोर जे दिसू लागते, जे कळते, ज्याची जाण होऊ लागती. ते म्हणजे सत्य- केवळ सत्य आणि फक्त सत्य. मानवी अहंकाराचे प्रभूत्व नष्ट होते. चित्-सत्-आनंद ह्याच्या लाटांत तो त्या क्षणी आणि क्षणीक वेळेसाठी गुरपटून जातो. संपूर्ण जीवनभर तो त्या क्षणाच्या शोधांत असतो. ज्याला प्राप्त होण्यात संसाररुपी अडचणी बाधा अणीत होत्या. त्या भव्य- दिव्य ईश्वरी आनंदाचा तो क्षण उपभोगतो. परमेश्र्वरानी दिलेल्या जन्माचे समाधान व ऋण व्यक्त करीत निरोप घेतो. आश्चर्य म्हणजे ह्या साऱ्या क्षणांची त्याला समज, जाणीव होत असते. हे घडत असतानाच तो जीवनाच्या न परतणाऱ्या प्रवासाला चालू लागतो.
बालपणातील एक गोष्ट आठवते. आठ-नऊ वर्षाचा मी असेन. गांवाच्या बाहेर एक मोठे वडाचे झाड होते. झाडाखालीच एक छोटेशे मारुतीचे देऊळ होते. जवळच आम्ही दोन-चार मुले गोट्या खेळत असू. एक मित्र मला म्हणाला. ‘ ए इथ रात्री कधीच येऊ नकोस. ह्या झाडावर एक भोकाडी राहते. ‘ मी त्याच्याकडे बारीक नजरेने बघू लागलो. ‘ भोकाडी काय असते. ‘ त्याने कांहीच उत्तर दिले नाही. आता माझ्या डोक्यात त्याने सांगीतलेला भोकाडी शब्द पक्का बसला. मी त्या झाडाकडे लक्ष लाऊन बघू लागलो. मला कांही दिसले नाही. ज्या ज्या वेळी मी त्या झाडा जवळून जात असे. एक अनामिक भितीमय विचार मनात येऊन जात. ‘ भोकाडी काय करील ‘ हेही माहीत नव्हते. फक्त एक अनिश्चीत भयावह कल्पना.
ती वेळ मला आजही आठवते. मी आईसह बैलगाडीत मावशीच्या घरुन परत येत होतो. रात्र होऊ लागली होती. सर्वत्र अंघार पडू लागला होता.आमची बैलगाडी गावाच्या शिवेवर आली. अंधूक प्रकाशांत मला तो वटवृक्ष दुरुनच दिसू लागला. मित्राचे शब्द ‘ भोकाडी ‘ आठवले. मी एकदम मनातून पुरता घाबरून गेला. आईला बिलगलो. तीचा हात हाती घेतला. अचानक गाडीवानाने त्याच झाडाखाली बैलगाडी थांबवली. मला धस्स झाले.
‘ आईसाहेब आज शनिवार. मारुतीरायाचे दर्शन घेऊत कां ‘ आईन होकार दिला. तो उतरला. मारुतीसमोरचा लावलेला दिवा विजला होता. तो त्याने प्रथम लावला. सर्वत्र प्रकाश पडला. अंधःकार बाजूस हाटला. श्री मारुतीरायाची मुर्ती स्पष्ट दिसू लागली. संध्याकाळी नुकतीच कुणीतरी ताजी फुले वाहीली होती. एक हार देखील घातला होता. उदबत्तीचा सुगंध दरवळत होता. एक प्रसन्न वातावरण त्या क्षणी सर्वत्र झालेले दिसले. मी तर ती ‘ भोकाडी ‘ विसरुन गेलो होतो. भितीची भावनाही निघून गेलेली होती.
‘ भोकाडी ‘ एक तरकाप. मनाची भिती. कल्पनेची भयानकता होती. अंधःकाराने निर्माण केलेले साम्राज्य. पणतीच्या मिणमिणत्या प्रकाश किरणानी एक चमत्कारी परीवर्तन केले होते. आनंदाच्या लहरींनी भीति नष्ट करुन टाकली होती.
दिनकर जरीवाला यांच्या बाबतीत देखील ह्या साऱ्या बदलांची जाणीव होत होती. त्यांचा प्रथम असहकार दिसला. नंतर येवू घातलेल्या परिस्थितीला मान्यता दिसली. आणि शेवटी चेहऱ्यावरील समाधानात समावलेली शांतता हीचे चित्रण स्पष्ट दिसत होते. मी त्याची शब्दांनी नोंद घेतली. त्याच वेळी कँमेऱ्यांने पण चेहऱ्यावरील भासलेले भाव टिपले.

मृत्यु हा निश्चीत असून तो आपल्याला ह्या जीवनातून उचलणार. हे त्याचे ज्ञान. परंतु हा अनुभव नव्हे. जेंव्हा तो व्याधीग्रस्त होता, ह्याची जाणीव त्याला तिवृतेने होत होती. त्या रोगाबद्दल कुणीतरी त्याला सांगत. समजत. वा त्या रोगाचे ज्ञान परिणाम पूर्वीच माहीत असतात. तो मृत्युच्या अंगणात चकरा मारीत राहतो. त्यावेळी तो भितीच्या वातावरणांत, मृत्युच्या कल्पनेत वावरतो.
भारतीय तत्वज्ञानाप्रमाणे शिव अर्थात परमात्मा आणि जीव अर्थात जीवात्मा दोन्हीही एकाच महान तत्वाचे घटकभाग. व्यक्तीमध्ये जीवात्मा हा अंशनी असतो. ते जीवाचे चैतन्य स्वरुप असते. जीव निर्माण होत असतानाच्या प्रक्रियेत जीवात्मा परमात्मापासून अलग होतो. त्या क्षणापासूनच त्याला परमात्म्याच्या पुनर्मिलनाची ओढ लागुनच असते. देहातील चैतन्य हे ईश्वरी समजले गेले. मृत्यु ही घटना ह्याच चैतन्याला ( अर्थात जीवाला ) शरीरापासून वेगळा करते. मानसाच मन, त्याची बुद्धी, त्याचे विचार, त्याच्या भावना हे सारे एका देहरुपी वेष्टनांत एकत्रपणे नांदत होते, रहात होते. जीवात्मा हा त्यांच चैतन्यरुप होता. देहाचे खरे अस्तीत्वच जीवात्म्यामुळेच. त्याच जीवात्म्याचा विरह देह कसा सहन करील ?. म्हणून ही समज की हे कार्य ज्या मृत्युमुळे होते तो क्लेशदायक, दुःखद, वा भयानक वाटतो.
एका गमतीदार पहाणीत कांहींच्या बाबतीत असेही दिसले. मृत्युच्या ते खूप विरोधी होते. जगण्याची ईर्षा होती. मृत्यु येवू नये वाटत होते. आणि गम्मत म्हणजे तो त्या क्षणी टळला देखील. त्या मृत्युची त्यानी फक्त सावली बघितली असेल. भास असेल. प्रत्यक्ष मृत्यु नसेलही.फक्त थरकांप. कारण तो क्षण टळला होता हे अनुभवले. मनाची चंचलता, बेचैनी, कांहीतरी तणाव, बोझा, अनिच्छा, ही त्यांच्या चेहऱ्यावर व्यतीत होत होती. हा त्यांचा मृत्युच्या स्वागताला नकार होता. जेंव्हा प्रत्यक्षात मृत्यु तेथे आलेलाच नव्हता. फक्त भिती होती. मृत्यु हा जवळ आला आहे. केंव्हाही आणि कोणत्याही क्षणी तो झडप घालेल. आपल्यला जीवनातून उठवेल.
ही विचारसरणी कांहीच्या मनात दिसली. विचारांचे तरंग निर्माण होणे, त्याची जाणीव वा ज्ञान होणे, आणि ते सतत घोळत राहणे हे कांहीत दिसले. मृत्युचे स्वागत करण्याची त्याची अनिच्छा दिसली. त्यांच्यात भिती, जगण्याची आस, तगमग, सभोवताल वा नातेमंडळी यांच्याबद्दल खूप ओढ वा आपुलकी यांनी ही भारलेली होती. मृत्युनी त्याक्षणी येऊ नये ही त्यांची द्दढ भावना. कांही तर निराशली वा रडली देखील.
मृत्युचे ज्ञान, मृत्युचा परिणाम, सर्व जीवन संपणे, खेळ खलास अशा भयानक भावना मृत्युच्या अगमन प्रसंगी येणे, म्हणजे मृत्युची खऱ्या अर्थाने चाहूल लागलेली नसते. मृत्यु हा त्या क्षणी जवळ आलेलाच नसतो. सारी भयानकता ह्या मानवी विचार-भावनावर आधारीत असतात. एक कत्पना साम्राज्य. ह्या प्रकारातली माणसे सर्वांत जास्त बघण्यांत आली. ती भयग्रस्त होती. जीवनाविषयी प्रचंड आसक्ती होती. आणि आश्चर्य म्हणजे त्यातील कांही त्या क्षणीतरी वाचली.
( वैद्यकीय द्दष्टीकोणातून ती मृत्युच्या खूप जवळ गेलेली होती. त्यांच्या जगण्याच्या आशा मालवलेल्या होत्या. सारे उपचार हतबल झालेले होते. त्याना जगविण्याचे प्रयत्न अयसस्वी होत होते. एखाद्याचे नशीब. ह्यालाच म्हणतात की तो मृत्युच्या दारापर्यंत गेला. आंत गेला नाही. अर्थात मृत्युचे दार-घर हे सारे काल्पनीक चित्रण आहे. केवळ वर्णन करण्यासाठी वा समजण्यासाठी. यांत कुणाचाही अनुभव निर्देश नाही. )

३) मेडीकल कॉलेजचा सुरवातीचा काळ. हा एम् बी बी एस् नंतर पोस्ट ग्रॅज्युयेशनचा अभ्यासाचा काळ होता. माझ्याच वॉर्डांत माझ्याच वडीलांना दाखल केले होते. मेडीसीनचे त्यावेळचे प्राध्यापक प्रसिद्ध डॉ. आर. डी. लेले प्रमुख होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली वडीलांची तपासणी व उपचार चालू होते. Cardiogram काढले गेले. त्या काळी व त्या ठिकाणी असलेल्या सर्व चाचण्या झाल्या. वडीलांचा हा तीसरा Heart attack होता. खुप धावपळ चालली होती. मुलगा आणि डॉक्टर ह्या दोन्ही भुमिका यशस्वी पार पाडण्याचे आवाहन होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची जाणीव सर्वाना झालेली होती. मी जास्ती ज्यास्त त्यांच्या सहवासांत राहण्याचा प्रयत्न करीत होतो. अटॅक नंतर ते फक्त तीन दिवस जगले. शेवट पर्यंत शुद्ध बाळगुण होते. मात्र बोलने एकदम बंद केले होते. त्यानी जीवनात फक्त बोलण्यावर-विचारावर प्रेम केले होते. वाचन विषय आणि व्याख्यान ह्यात आयुष्य वेचले होते. कोणताही विषय समोरच्याला पटवून सांगण्याची कला होती. ते सारे बंद होत असलेले, मी त्या शेवटच्या क्षणी बघत होतो. कोणतीच भावना चेहऱ्यावर व्यक्त होत नव्हती. फक्त डोळे मिटून होते. केंव्हा केंव्हा डोळे उघडत. त्यानी मला जवळ बोलावल. सर्व जवळच्या संबंधीतना भेटण्यास बोलाव हे सुचविले. जवळ जवळ संपूर्ण दिवस वर्दळ चालू होती. ते डोळे उघडे ठेऊन सर्वांचे अभिवादन घेत. थोडेसे स्मित दिसे. बोलले कुणाशीच नाही. न सुचना, न कोणती इच्छा व्यक्त केली. न राग, न लोभ, न प्रेम. कोणताच भाव चेहऱ्यावर त्या क्षणी दिसला नाही.
खऱ्या मृत्युला त्याक्षणी ते पुर्णपणे समजले होते. मृत्यु एक सत्य असते. अटळ असते. ईश्वरी असते. त्याचे स्वागत होणे हेच जीवंनाचे अंतीम लक्ष्य असते. ध्येय असते. सार्थक असते. जीवंत असताना त्यानी हा अभ्यास केला. लक्षांत ठेवले. आणि त्या ज्ञानाला ते जागले.
मृत्युच्या आगमनाशी निगडीत दुसरी बाजू देखील अवलोकन केली आहे. ह्या व्यक्तीनी मृत्युचे स्वागत देखील केलेले आहे. अंगावरचे कपडे बदलून टाकल्याप्रमाणेच अस्तित्वात असलेल्या देहाला निरोप देताना, कांहीनी मनाची शांतता, आनंद ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जीवात्म्याचे परमात्म्याशी मिलन ही ह्या लोकानी सुखद घटना समजली आहे. देह सोडून तुमचा आत्मा ईश्वर सानिध्यात जात असल्याचे समाधान व्यक्त केलेले, मानलेले आहे. त्यांच्या देह मन, बुद्धी, मधील विचार व भावनानी देहाच्या चैतन्याला, आत्म्याला खऱ्या अर्थाने जाणत निरोप देण्यात जीवनाचे सार्थक साधले आहे. ‘ मृत्यु ‘ हा निसर्गाचे एक अंतीम सत्य. एक ईश्वरी रुप. ज्याची देवता प्रत्यक्ष भगवान महादेव. त्या ठिकाणी वास करतो फक्त ‘ सत् चित् आनंद. ‘ भयानकता, भिती, असत्य याना तेथे वाव असणे शक्यच नाही.
परंतु मृत्युची खरी चाहूल जेंव्हा लागते, काय घडते त्या क्षणी ?
मृत्युसमयी व्यक्तींच्या शारीरिक व मानसिक हालचालीवर लक्ष्य केंद्रत केले.
सर्वसाधारण शारीरिक हालचाली मंदावतात. हातपायांची हालचाल दिसेनासी होते. डोळ्यांची उघडझाप थांबते. पापण्या बंद वा अर्धबंद होतात. कुणी हाक दिली वा स्पर्श केला तर त्याला प्रतीसाद मिळेनासा होतो. ह्रदयाचे ठोके आवाजाने व संख्येने कमी होऊ लागतात. सर्वात शेवटी श्वासोच्छासावर परिमाम जाणवू लागतो. त्याची तिवृता व संख्या मंदावते. श्वास हालके व दिर्घ ( Deep and Slow Respiration- Interrupted ) .


— रोग्याच्या अवयवांचा आपापल्यापरी कार्यारत राहण्याचा झगडा चालू असतो. — आयुष्यभराच्या त्याच्या जीवनाशी संघर्ष देण्याच्या मर्यादा संपत आलेल्या असतात. — प्रचंड व बलाढ्य शक्तीशाली मृत्युसमोर त्याला हार पत्कारावी लागते. — सारे अवयव अर्थात देह मृत्युला अखेर शरण जातो.
मेंदूतर देहाचा राजा. त्याच्याच अट्टाहासापायी जीवनांत संघर्ष झाले, खेळले गेले. देहाबाहेरच्या ( संसारीक ) लढाया लढत राहीले. स्वनिर्मीत सुख दुःखांत फुलले वा होरपळले. मेंदुच्या अर्थात मन-विचार-बुद्धी यांच्या एककल्ली वागण्याचा सर्व देहावर परिणाम होणे स्वाभाविकच आहे. आज या क्षणी जर संपूर्ण देह शरणागत झाला, तर मेंदू तरी काय करणार. त्याच्या मानसिकतेने पण आपली तथाकथीत स्वाभिमानी मान मृत्युला समर्पीत केली.
ज्या क्षणी व्याधी वा बाह्य विकार देहाच्या विविध अवयवावर हाल्ले करीत होते, मेंदूला त्याची जाण येवू लागली. त्याने बचावाची भुमिका घेणे सुरु केले. प्रयत्न केले. परंतु हा नेहमीप्रमाणे संसारी संघर्ष नव्हता. हा स्वताःच्याच देहाशी संबंधीत होता. एक एक अवयव अशक्त होऊ लागले. सांघीक कार्यात बिघाड येऊ लागला. हवा-पाणी- अन्न –उर्जा मेदुला कमी मिळू लागली. प्रथम विचार प्रेरणा बाधीत झाली. क्षिण व जाऊ लागली. विचार-भावना मंदावल्या. शरीर निद्रेच्या सतत आधीन झाले. सभोवार, मित्र-नाते इत्यादींची ओळख कमी होऊ लागली. Brain tissue is most sensitive and gates affected immediately for low oxygen supply. ज्या क्षणाला श्वास मंदावतो, प्राणवायु कमी मिळतो. मेंदुचे कार्य थांबवते. जीवनाचा खेळ संपतो.
अतिशय थोडक्यांत असलेले हे वर्णन. आयुष्याच्या शेवटच्या देह-मनाच्या कार्यपद्धतीवरील टिपणी.
निसर्गाच्या मृत्युयोजनेचे आपण सर्वजण ऋणी आहोत. व असावयास पाहीजे. त्याने मृत्यु ही घटना अत्यंत सोपी, साधी, कसलाही शारीरिक वा मानसीक क्लेश, त्रास वा विवंचनारहीत केलेली आहे. तुमच्या देह-मनाच्या कार्यपद्धतीला प्रथम बाधा वा बंदी घातली जाते. अवयवांच्या कार्यांचा ग्राफ उंचावरुन एकदम पायाकडे वळतो. अत्यंत अल्प काळात ही स्थिती येते. सर्वात महत्वाचे म्हणजे व्यक्तीच्या धडघाकट व तंदुरस्त असलेल्या प्रकृतीत अनियमीततेमुळे वेगेळेच परिणाम होतात. कांही कळतात. कांही अज्ञात राहतात. परंतु एक सत्य म्हणजे निसर्ग सदा तुम्हाला तुमच्या प्रकृतीची जाण व आठवण देत असतो. नव्हे तो तुम्हाला तुमची प्रकृती तंदुरुस्त ठेवण्यासाठी भाग पाडीत असतो. सर्व हालचालीवर ब्रेक लावतो. योग्य प्रयत्नाना यश देखील देतो.
निसर्गाच्या मर्यादांनी, नियमांनी मृत्युला देखील बांधून टाकलेल असत. मृत्युला त्याचे कार्य-कर्तव्य काय असते याची जाणीव असते. व्यक्तीच्या आयुष्याची रेखा संपली, वेळ आली की काळ अर्थात मृत्यु त्याची जीवन चक्रातून त्याची सुलभतेने, सहजपणे सुटका करतो.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

दहा बोटे- दहा वर्षे !

दहा बोटे- दहा वर्षे !

आम्ही सकाळी उठतांच ईश्वराचे स्मरण करतो. रात्रभर त्याने आमचे संरक्षण केले ह्याचे आभार मानतो. आम्ही आपली बोटे चाळवतो. ‘ कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंदम प्रभाते कर दर्शनम ‘ ही प्रार्थना म्हणतो.
एक समज आहे की ईश्वराने आपणास प्रत्येकाला शंभर वर्षाचे आयुष्यमान दिलेले असते. खाणे, पिणे, झोपणे, फिरणे, गप्पा करणे, व्यायाम, दुखणे-खुपणे, शिक्षण, शाळा कॉलेज, नोकरी, व्यवसाय, संसार, मुले, नातवंडे, इत्यादी हे सर्वसाधारण जीवनाचे चक्र.
त्यातील त्याच्याच इशारय़ाने हे सारे नव्वद वर्षांत पूर्ण करण्यासाठी असते. ह्या सर्व जीवनाच्या पायरय़ा आहेत आणि सर्वजण त्या आपआपल्या ताकदीने, क्षमतेने, समजूतीने करीत असतो. त्यामुळे ह्या चक्ररुपाने असतात. नैसर्गिक असतात.
जीवनाची दहा वर्षे मात्र त्याने आम्हास आमच्या पद्धतीने, समजुतीने, खर्च करण्यास मुभा म्हणून दिलेली आहेत. जणू ते आपले पाकीट मनी. व्यक्तीचे व्यक्तीमत्व, कर्तबगारी, मोठेपण, महानता आणि जीवनांत त्यानी केलेला त्याग, संकल्पसिद्धी, इतिहासांत उमटलेला एक ठसा. हे ज्याने त्याने आपल्या पद्धतीने ठरवायचे व मिळवायचे असते. ह्यात ईश्वरी हस्तक्षेप मुळीच नसतो. ह्याचसाठी त्याला मिळालेले हे विषेश दहा वर्षे तुमच्या प्रार्थना आणि तुमची बोटे ह्याचीच सतत आठवण देतात.
एकदा प्रसिद्ध थोर वैज्ञानिक अलबर्ट आइन् स्टाईन म्हणाला होता की माणसे आपल्या क्षमतेच्या फक्त दहा टक्केच जीवनात कर्तबगारी करतात. खरे बघीतले तर त्यांची क्षमता बरेच कांही करु शकणारी असते. परंतु ते अजाणतेने आपला वेळ दवडतात.
वैद्यकियशास्त्र देखील हेच सांगते की मनुष्य प्रत्येक कामामध्ये त्याला असलेल्या मेंदूच्या क्षमतेच्या फक्त दहा टक्केच मेदूचा वापर करीत असतो.
श्री समर्थ रामदासानी म्हटले आहे की मरावे परी किर्तीरुपे उरावे. आपण स्वतःहाचा विकास किती केला, किती कमाई केली, ह्यापेक्षा आम्ही जे कांही इतरांसाठी थोडेफार करुं तेच जगाच्या आठवणीच्या कप्यांत घर करते. आयुष्याचा नव्वद टक्के काळ हा केवळ स्वतःहासाठीच असतो. दहा टक्के मात्र इतरांसाठी व्यतीत करावा ही अपेक्षा.
हा दहा वर्ष हिशोब तुमच्या शेवटच्या क्षणाला समाधानाची, शांततेची झालर निर्माण करतो. तुमचे मनच सांगते की मी जीवनांत धन्य झालो. जीवनातील दहाचे महत्व, त्या काळाची आठवण सतत यावी हाच आपल्या बोटांकडे लक्ष देण्याचा हेतू.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

ऑपरेशन थियेटरमधला १ ला दिवस

ऑपरेशन थियेटरमधला १ ला दिवस

मेडिकल कॉलेजच्या आगदी सुरवातीचे दिवस आठवतात. १९६० सालचे. त्यावेळी M.B.B.S. पांच वर्षाचा कोर्स होता. पहिले दोन वर्षे प्राथमिक विषय ( Anatomy-Physiology ) व नंतरचे ३ वर्षे, क्लिनिकल विषय सर्जरी-मेडिसीन गायनिक इत्यादी. स्टेथॉसकोप प्रथमच गळ्यांत लटके. खऱ्या अर्थाने विद्यार्थ्याला आपण डॉक्टर होत असल्याचची जाणीव त्याक्षणीच होत असे.रोग, निदान, आणि उपाय ह्या मालिकांना आरंभ होत असे.
सर्जरी अर्थात शस्त्रक्रिया ह्या विषया बद्दल एक वेगळेच कुतूहल होते. डॉ. विक्रम मारवा हे सर्जरी ह्या विषयाचे प्राध्यापक होते. एक विषय तज्ञ व उत्कृष्ट शिक्षक देखील. त्यांची शिकवण्याची पद्धत वेगळीच होती. प्रश्न-उत्तरे यांची देवाण-घेवाण करीत ते शिकवायचे. समजण्यास सोपे, चांगले व पद्धतशीर. परंतु सामान्य विद्यार्थ्याला तसे नापसंत असे. विषयाची एकाग्रता, लक्ष लाऊन ऐकणे, तत्पर असणे, विषयाची समज झालेली असावी, थोडेसे प्राथमिक वाचन. ह्या अपेक्षा विद्यार्थ्यावर एक प्रकारचा मानसिक दबाव निर्माण करीत होत्या. लक्ष नसणे, अवांतर विचार, वहीपेन्सीलीचा चाळा, नसत्या गोष्टींचा विचार मनांत चालणे, नजर चुकवुन इतर वाचन, आणि केंव्हा केंव्हा तर चक्क डूलकी घेणे, ह्या प्रकाराला आपोआप आळा बसत असे. केंव्हा प्राध्यापक कुणाला उप प्रश्न विचारतील, व तो मुलगा कसा तोंडघाशी पडेल हे सांगता येत नसे.
सर्व मुले त्यामुळे नेहमी सतर्क (अलर्ट ) असत.

वर्गातल्या मुलांचे लहान लहान ग्रुप्स केले होते. आमचा ग्रुप १० विद्यार्थ्याचा. सर्जरी विषय, प्राध्यापक विक्रम मारवा यांच्याकडे. आज ऑपरेशन थियेटरचा १ लाच दिवस. थियेटरचा एक अँटेन्डन्ट होता. आम्ही सारे त्या वातावरणांत नवखे. व तो अशिक्षित असून १५-२० वर्षाचा अनुभवी. त्यामुळे त्याच्या प्रत्येक हलचाली, बोलण्याची तऱ्हा, सुचना करण्याची ठेवण, ही एखाद्या लेक्चररप्रमाणे भासत होती. आम्ही त्याक्षणी आमच्या विषय अज्ञानाला झाकून त्याच्या अरेरावी पद्धतीला थोडेसे वचकून होतो. थियेटरच्या बाहेरील वऱ्हान्ड्यात आम्ही जमा होताच तो आला व सूचना केली. सर्वानी आपली पादत्राणे काढून, थियेटरची घालावित. आतल्या खोलीतील थियेटरचे कपडे घालावे. डोके,तोंड झाकण्याचे मास्क बांधावे. ऑपरेशन थियेटर मधल्या कपाटातील वा ट्रालीवरील कोणत्याही वस्तूना स्पर्श करु नये. ह्या सुचना अती प्रभावी व खोचक पद्धतीने तो बोलून गेला. ऑपरेशन टेबल पासून एक फूट दुरीवर उभेराहून सर्व निरीक्षण करा हे सुचविले. आम्ही न बोलता, एकमेकाकडे बघीतले. सर्व त्याच्या सुचनेप्रमाणे केले. अर्थात त्या सुचना प्राध्यापकांच्या वा थियेटर इन्चार्जच्या असतील हे मान्य करीत त्याच्या वक्तीमत्वाकडे दुर्लक्ष केले.
एक अतीशय गंभीर भयावह, मनाचा थरकाप उडवणारे ऑपरेशन थियेटरचे वातावरण होते. सर्वांचे पेहेराव, हेच प्रथम दर्शनी भयानक वाटत होते. सर्वांचे झाकलेले शरीर, फक्त लुकलुकणारे डोळे चमकत होते. बोलण्याचे आवाज येत नव्हते. हातवारे करुन सुचना दिल्या जात होत्या. निरनीराळ्या मशीन्स ठेवलेल्या. कांही चालू. वेगवेगळे आवाज येत. गँस सिलेंडरची ने आण दिसत होती. लाईटचे फोकस गरजेप्रमाणे टाकले जात होते. टेबलावर पेशंटला कव्हरकरून झोपवले होते.

ज्या भागावर शस्त्रक्रिया होणार होती, तेवढाच भाग दृष्य होता. आम्ही कुणाचेच भळभळा वाहणारे रक्त आजपर्यंत बघीतले नव्हते. तेथे आज चिरफाड बघणार होतो. अर्थात औषधांच्या माध्यमातून हे सर्व कांही शारिरीक यातना, क्लेश, त्रासारहीत होणार होते. रोग्यासाठी हे जाणीवेविणा घडणार होते. ही त्यातील समाधानाची बाब होती. ऑपरेशन थियेटर तर आम्हाला त्या क्षणी ‘ यमपूरी ‘ च असावी असे वाटत होते. जन्म मृत्युचा एक प्रकारे झगडा, द्वंद्व आम्ही बघणार होतो. समजणार होतो. आणि मृत्युच्या विळख्याची पकड त्या क्षणी तरी कशी ढिली केली जाते, हे महान शास्त्रीय ज्ञान घेण्यासाठी आम्ही उत्सुक होतो. महान ज्ञान, परंतु तेथील मार्ग अर्थात ऑपरेशन थियेटरचे वातावरण मात्र आमच्या नवख्या मनाचा थरकांप उडवणारे, भयावह व अत्यंत गंभीर असल्याचे क्षणोश्रणी वाटत होते.
सहकारी डॉक्टर, परिचारीका सर्व आल्या. ते आपआपल्या जागी ऑपरेशन टेबला भोवती स्थानापन्न झाले. आमची उत्सुकता, व एक प्रकारची मनाची धीर गंभीर पकड हे शिगेला पोंहचली होती. अनुभवाच्या एका वेगळ्याच दालनात आम्ही आज प्रवेश करणार होतो.
प्रमुख सर्जन प्राध्यापक आले,
“अरे भाई यहां इतना सन्नाटा क्यु ?. Why so Silence here. ? Enjoy Surgery. I want study the Subject Sincerely in a Joyful mood”.
मी मागे उभा होतो. माझ्याकडे बघत ते म्हणाले ” Yes Doctor ” ( प्राध्यापकांची ही पद्धत होती की ते विद्यार्थ्यालाही डॉक्टर संबोधीत बोलायचे) मी लगेच पुढे होत त्याना अभिवादन केले. ” Will you do one thing for us. ” मी चमकलो. ते Us अर्थात सर्वासाठी म्हणाले. मी त्यांच्या सुचनेची वाट बघत सकारात्मक हलचाली केल्या. “देखो आज न्युझीलंडके साथ आपना फायनल क्रिकेट मँच चल रहा है ना. I have forgotten my Transistor at home. Will you please get the same available here right now.” एकदम सर्वांमध्ये हस्याची लाट दिसून आली. सर्वांचे चेहरे फुलले. जणू प्राध्यापकानी आमची मने व आवड यांची एकदम पकड घेतली. आमच्यापैकी एकाच्या बँगमध्येंच त्यानी ट्रानझेस्टर आणलेला होता, तो बाहेर बँगेत होता. त्याने चटकन जाऊन तो आणला.
निर्माण होऊ बघत असलेल्या अशा गंभीर व भयावह वातावरणाला इतका नाट्यमय परंतु बहारदार ट्विस्ट मिळेल हे कुणालाही स्वपनांत देखील वाटले नसेल. तीन तासाचे मोठे ऑपरेशन ( Major Abdominal Surgery ) त्या दिवशी आम्ही सर्व विध्यार्थी बँचने अनुभवला.
विषयाच्या गंभीरतेबरोबर खेळातील कॉमेंटरी ऐकत, त्यावरच्या टिका टीपणी करीत, त्यामध्ये मोकळेपणाने सहभाग घेत आनंद लूटला. वातावरण हे केंव्हाच गंभीर अथवा हलकेफुलके नसते. आम्ही ते आपल्या विचारांच्या ठेवणीमधून निर्माण करीत असतो. सर्जरी सारखा रुक्ष, तणाव निर्माण करणारा विषय, केवळ प्राध्यापकांच्या हसत खेळत फुलविण्याच्या कलेमुळे बऱ्याच विद्यार्थ्यामध्ये आवड निर्माण करु शकला.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com