Monthly Archives: ऑक्टोबर 2014

अप्पा असे कां वागले ?

जीवनाच्या रगाड्यातून

अप्पा असे कां वागले ?

 

खूप जुनी गोष्ट आठवली. मी शाळकरी विद्यार्थी होतो. माझा मित्र दिनू यांच्याकडे माझे जाणे-येणे सतत होते. बाहेर त्याची खोली. आम्ही दोघे मिळून अभ्यास करीत असू. दिनूचा मोठा भाऊ तहसील कार्यालयांत लिपीक होता. त्याच्या घरी आई वडील वहीनी व छोटा पुतण्या होता. वडील बबनराव ज्याना सर्व अप्पा म्हणत. ते शिक्षक म्हणून निवृत्त झालेले होते. शिस्तप्रिय, प्रचंड ज्ञान व माहिती असलेले. सतत जो भेटेल त्याच्याशी गप्पा गोष्टी करणे, तत्वज्ञान सांगणे, नविन गोष्टीवर चर्चा करणे, ह्याची त्याना आवड होती. त्यांच्या बोलण्यानी समोरचा प्रभावित होत असे. त्यांच्या बोलण्याचे एक वैशिष्ट्य असे. त्यांचे धार्मिक ग्रंथांचे वाचन आणि पाठांतर विलक्षण होते. बरेच ग्रंथ जसे भगवत् गीता, अथर्वशीर्ष, विष्णूसहस्रनाम, महीम्नस्तोत्र, रामरक्षा, अनेक संस्कृत श्लोक त्याना पाठ झालेले होते. कित्येक शुभाषिते, अभंग, सुमधूर वाक्ये, सुवचार त्याना मुखोद्गत होते. योग्य वेळी योग्य विचारांचा ते चपलखतेने उपयोग करीत असत. संस्कृतचे श्लोक अत्यंत स्पष्ट व पद्धतशीर ते म्हणत असत. त्यांच्या दहा वाक्यांच्या संवादामध्ये सहा वाक्ये तर भाष्यकर्त्याचे, ऋषीमुनींचे, संतमहात्म्याचे, असत. त्यांच्या चर्चेमध्ये फेकले जाणारे तत्वज्ञान जणू वाहणारा सत्याचा धबधबा पडतो आहे हे वाटत असे. ऐकणाऱ्याना अप्पाविषयी एक वेगळीच अस्था, अपुलकी व आदर वाटत असे. एक आदर्श व्यक्तीमत्वाची त्यानी छबी निर्माण केली होती.

मी त्याना अप्पाच म्हणत असे. मला त्यांच्या विषयी आदर वाटत होता. परंतु त्याच बरोबर त्यांच्या विषयी कसलीतरी अनामिक भिती वाटे. दिनू शक्यतो त्यांच्यापासून अलिप्त राहात असे.

तो दिवस मला चांगलाच आठवतो. मी दिनूकडे गेलो होतो. तो घरी नव्हता. अप्पा खोलीत कपाटातील पुस्तके चाळीत होते. वहीनी स्वयंपाक करीत होत्या. मला अप्पांनी समोर स्टूलवर बसण्यास सांगितले. अचानक बंटीचा किंचाळून रडण्याचा आवाज आला. दिड वर्षाचा तो, एकदम पडला. वहीनी स्वयंपाक सोडून धावतच मधल्या खोलीत गेल्या. बंटीला सावरले. शांत करण्याचा प्रयत्न केला. ह्या गडबडीत गॅसवरील दुधाची खीर करपून गेली व तीचा वास सर्वत्र पसरला. वहीनीने बंटीला कड्यावर घेतच स्वयंपाक घराकडे धाव घेतली व गॅस बंद केला. आप्पा एकदम वहीनीवर ओरडले. “आरे काय खुळी आहेस कां तू ? कांही अक्कल दिली नाही देवानी ? गॅसवर जर खीर होती, तर गॅस बंद करुन जाता येत नव्हते कां ? कामांत कांही लक्ष असेल तर. सतत वेंधळेपणा केला जातो. कोण खाणार ती करपलेली खीर आता ?. आई बापानी हेच शिकवले कां ? – – – – – – – ”

त्यांचा भयानक शाब्दीक मारा बराच वेळ चालला. वहीनी बंटीला घेऊन मुळमुळ रडत सारी आवरा आवर करताना दिसल्या. मी त्या अचानक निर्माण झालेल्या प्रसंगाने भेदरुन गेलो. अप्पांच ते कौटूंबीक स्वरुप अतिशय भयानक वाटल. पण ते तसे मी अनेक वेळा बघीतले होते. दिनू येताच आम्ही दोघे बाहेर पडलो.

इतक्या वर्षानी आज तो प्रसंग डोळ्यासमोर तसाच उभा राहीला. बंटूचा किंचाळून रडण्याचा आवाज आला होता. तो पडला होता. परंतु अप्पा आपल्याच कामात गर्क होते. ते थोडेसे देखील हालले नाही. नातू त्यांचाच होता. पण हे काम त्याच्या आईचेच आहे, ह्या विचारांनी कदाचित् दुर्लक्ष केले. सुन अचानक पडलेल्या मुलास Emergency म्हणून सावरण्यास धावली. स्वयंपाक घरांत गॅस चालू होता. दुध करपण्याचा वास येऊ लागला. परंतु अप्पानी स्वयंपाक घरांत जाऊन गॅस लगेच बंद केला नाही. कदाचित् पुरुषी अहंकार आड आला असेल. मात्र पद्धतशीर कसलाही सहभाग न घेता, सर्व खापर सुनेवर ते फोडीत होते.

अप्पा बद्दल मी चिंतन करु लागलो. माणसाच व्यक्तीमत्व हे सदा दुभंग, दुटपी, मुखोटे परीधान केलेले कां असते ? तो जे बाहेर जगांत, व्यवहारांत व्यक्त करतो, भासवतो, त्याच्या बरेच विपरीत त्याच मन विचार करीत राहते. बाहेर एक व आतून वेगळच अशी माणसांची विचार धारा कां असते ?.

आज पन्नास वर्षानंतर माझ्या विचारांना जो त्यांच्या विपरीत वागण्याचा बोध झाला तो असा –

अस म्हणतात की परमेश्वरानी मानव निर्माण केला,त्याला दोन उपजत स्वभाव गुणधर्म दिले. अहंकार आणि प्रेम. दोन्हीही जीवन जगण्यासाठी अत्यंत महत्वाचे.

1-जन्मतः प्रथम श्वास घेताना जी क्रिया होते ती समजणे गरजेचे आहे. त्याची सुरवात होते ती अहंकार ह्या भाननिक संकल्पनेपासून. जन्माच्यावेळी बालकाची तगमग, धडपड, रडणे, किंचाळणे, राग, शरीराची झटके देत हलचाली, कातड्यांच्या नखांच्या रंगाच्या बदलत जाणाऱ्य़ा छटा, तोंडातून चिकट बाहेर येणे, वा संडास वाटे चिकट पदार्थ बाहेर पडणे. ( muconium )ह्या सर्व साधारण नजरेत येणाऱ्या बाबी. ह्या सर्व हलचाली मध्ये एक प्रकारची अशांतता असते हे दर्शवणारी एक श्रंखला दिसते.

2- ह्या नंतर चक्र सुरु होते ते प्रेम ह्या भावनीक अविष्काराचे. मुल शांत होऊ लागते. प्रेमाचा स्पर्श जाणवू लागते. ओठांची चुंबन घेतल्या प्रमाणे हलचाल होऊ लागते. चोकणे, चिकटणे, आईने जवळ केले तर आनंदीत झाल्याची झलक दिसणे, सुक्ष्मपणे बघीतल्यास हास्याच्या छटा दिसतात. बोटांची पकड घट्ट असलेली, स्पर्शज्ञानाने प्रेमाचा संपर्क बालकांत उत्तेजीत होत असल्याचे जाणवते. आणि असेच कांही.

अप्पानी परिश्रम घेऊन एक आदर्श व्यक्तीमत्व निर्माण केले होते. ग्रथांचा प्रचंड अभ्यास. मग ते राग लोभादी विकारांना का बळी गेले ?. बाह्य जगाचे संसारीक ज्ञान ह्यात त्यांचा हातखंडा होता. परंतु त्या जीवनाच्या वाटेवर अंतरज्ञानात ते जाताना कमी पडल्याचे जाणवले. अंतरमनांत दडलेले दोन उपजत स्वभावाचे प्रतिबींब. १ अहंकार व २ प्रेम. निसर्गाला जीवाच्या जगण्यासाठी दोन्हीची अवशक्ता असते. मनुष्य जसा वैचारीक प्रगत होऊ लागला, त्याने अहंकार शिथील करण्याचा व प्रेम वाढवण्याचा प्रयत्न केला. यातून निर्माण झाली ती ज्ञानयुक्त असलेली ग्रंथ संपदा. ज्ञानवृधीचा हेतू अहंकारावर ताबा व प्रेमाला चालना देणे हे होते. अप्पानी तसा प्रयत्न केला असेल. परंतु ते मला अपयशी ठरल्याचे जाणवले. कां ? त्याना ते जमले नाही.

मानसाच ज्ञान आणि स्वभाव हे शेवटी भिन्नच राहतात. एक मानव निर्मित तर दुसरे नैसर्गिक. त्यांत संघर्ष असणारच.

 

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail- bknagapurkar@gmail.com

असेही एक गणेश विसर्जन

जीवनाच्या रगाड्यातून

असेही एक गणेश विसर्जन

 

अमेरिकेतील मिनियापोलीस शहर. अतिशय सुंदर, विस्तीर्ण आणि अद्यावत अशी बांधणी. नवीन पद्धतीने आखीव असे वसलेले शहर. मोठाले प्रशस्त रस्ते, अनेक सुंदर व आकर्षक बागा, शहराच्या मुख्य भागांत उंच उंच इमारती, स्वच्छपाण्याचा भरपूर साठा असलेले तलाव, शाळा, कॉलेजेस. व्यापारी संकुले, इत्यादी. शहराचा फेरफटका मारताना मनास खुप आनंद होतो. माझा एक मुलगा, कांही वर्षापासून एका कंपनीत तेथे कामाला आहे. पत्नी व दोन मुले हा त्याचा संसार. त्याने त्या ठिकाणी स्वतःला राहण्यासाठी नुकतीचएक वास्तू खरेदी केली. गणेश चतुर्थीचा दिवस होता. पुजेची पुस्तके, कॅसेट, सी.डी. आणि इतर पुजेचे साहित्य तेथील भारतीय दुकानामधून मिळाले. छोट्या छोट्या गणेशच्या मुर्ती पण १० ते १२ डॉलर्सपर्यंत उपलब्ध होत्या.

नव्या घरांत छोटीशी गणेश मूर्ती आणली गेली. तिकडेही महाराष्ट्र मंडळ स्थापन झालेले आहेत. मंदीरे आहेत पूजाअर्चा अथवा आन्हीके सांगणारे भटजी देखील आहेत. फक्त तुमची इच्छा हवी. भटजीच्या हस्ते गणेशाची प्रतिष्ठापना, आवाहन, पूजन, आरती, प्रसाद इत्यादी सर्व धार्मिक सोपस्कार कुटूंबीय आणि मित्रमंडळी ह्यांच्या परिवारांत पूर्ण केल्या.

दिड दिवस सर्वानी आनंद उपभोगला. गणेश विसर्जनाची वेळ आली. तेंव्हा मात्र सर्वाना एक वेगळाच मार्ग अवलंबावा लागला.कारण चौकशी करता कळले की स्थानिक शासकीय आदेशा प्रमाणे कोणत्याही तलावांत मुर्त्या, निर्माल्ये, वा इतर कोणत्याही पूजाविधीमधल्या वस्तूंचे विसर्जन करण्यावर बंदी होती. नियमांचे उल्लंघन झाल्यास जबरदस्त शिक्षेची तरतूद होती. तेथील त्या परिस्थितीला उपाय नव्हता. तेथील मुलांच्या ग्रुपने सारे नियम व बंधने आनंदाने मान्य केली. एक मोठा टब आणला व स्वच्छपाण्याने भरला. सर्वजण खूप नाचले, गायले. प्रथम खूप जल्लोश केला. आनंद व्यक्त केला. श्री. गणेशाचा जयजयकार केला. पूजा आरती झाली. गणपतीबाप्पा मोऱ्या, पुढल्या वर्षी लवकर या ह्या गर्जनेच्या नादामध्ये त्या गणेशाचे त्याच टबमध्ये विसर्जन केले गेले. गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला म्हणत सर्वजण प्रसाद घेऊन गेले.

आठ दिवसांत त्या पाण्यांत गणेशमुर्तीचे खऱ्या अर्थाने विसर्जन झालेले जाणवले. आतां तीच पवित्र माती व पवित्र पाणी घरातील अंगणामधल्या फुलझाडांना पद्धतशीर टाकले गेले. दररोज सकाळी उमललेल्या टपोऱ्या फुलाकडे बघून त्यांचा आनंद तर द्विगुणीत होऊ लागला. गणरायाच्या पाऊलखूणा ह्या त्या सुंदर फुलांमध्ये डोकावीत आहेत, असा भास होत असे.

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail- bknagapurkar@gmail.com

क्लिनिकल कॉन्फरन्स

जीवनाच्या रगाड्यातून

क्लिनिकल कॉन्फरन्स

Clinical Conference ही संकल्पना मेडीकल कॉलेज परिसरांत विद्यार्थ्याची सर्वांत आवडती आणि आनंद देणारी. मेडीकल कॉलेजचे स्वतःचे एक हॉस्पिटल असते. अद्यावत, भव्य आणि रोग्यांच्या सर्व सोईनी परिपूर्ण. अनेक वैद्यकीय विषयातील तज्ञ डॉक्टर मंडळी हे प्रमुख आकर्शन असते. ह्या लोकांचा सतत जगातील इतर आरोग्य समस्यांच्या सोडवणूकीतील अभ्यासक्रमाचा संपर्क असतो. ही मंडळी Updated latest medical knowledge बाळगून असतात. रुग्णालयाच्या अनेक वॉर्डामध्ये विवीध प्रकारचे रुग्ण उपचार घेत असतात. रुग्ण, त्यांच्या तपासण्या, वैद्यकीय रिपोर्टस, आणि सविस्तर उपचार हे तेथील वैद्यकीय विद्यार्थ्यासाठी शिकण्यासाठी महत्वाचे अंग असते. सर्व लक्ष देऊन बघणे, ऐकणे व शिकणे ह्यातूनच ते भावी चांगले डॉक्टर बनत असतात. प्राध्यापकांचे मार्गदर्शन, वाचनालयातील विद्वान लेखकांची पुस्तके त्या त्या विषयाचे ज्ञान मिळवून देतात. अनेक प्रकारचे रोग, विशीष्ट रोग्यामधली समस्या, रोग निदान करण्यांत येणारी समस्या, त्यावरील विवीध तज्ञांची भिन्न मते. हे सारे ऐकताना,समजुन घेताना, ज्ञानाबरोबर बरीच करमणूक होते. अशा निवडक केसेस ह्या क्लिनिकल कॉन्फरन्स मध्ये सादर केत्या जातात. विवीध केसेस वेगवेगळे वैद्यकीय तज्ञ हाताळतात.

आमच्या मेडीकल कॉलेजच्या वेळी देखील अशीच क्लिनिकल कॉन्फरन्स आठवड्यातून एकदा घेतली जायी. निवडक केसेस कांही तज्ञ सादर करीत असत. त्या केसेस विषयीचा संपूर्ण अहवाल, तपासणी रिपोर्ट, झालेले निदान, हे सर्व एकत्रीत एकाद्या जेष्ठ डॉक्टरलाच माहीत असे. ती केस, त्याचा नंबर, नांव, वार्ड, येवढेच चार दिवस आधी सर्वांना सांगितले जायी. बोर्डावर नोटीस लागे. सर्व तज्ञाना एक प्रकारे आवाहन केले जात असे. ज्याला जसे जमेल तसे प्रत्येकजण त्या रोग्याला तपासून अभ्यासपूर्ण तयारी करीत असे. ठरलेल्या दिवशी Clinical Conference हॉलमध्ये पेशंटला आणले जाई. सर्वजण चर्चा करुन आपापल्या टिपण्या सादर करीत. तेथे प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी प्रचंड संखेने असत. त्यांची चर्चा विद्यार्थ्यासाठी एक परवणीच असायची. अशी संधी ते केंव्हाही गमवत नसत. अनेक वेळा हास्य विनोद होऊन सभागृहांत आनंदी वातावरण निर्माण होत असे.

एकदा एक मजेदार केस ठेवण्यात आली होती. एका व्यक्तीच्या पोटात एक गोळा निर्माण झालेला होता. Abdomen is a magic box असतो असे म्हणतात. पोटात काय व कसे उत्पन्न होईल हे कोणीही सांगू शकणार नाही. अनेकजण तर्क करतात. अनुभव, वातावरण, आणि लक्षणे ह्यांच्यावरुन बरेचजण अनुमान काढतात. अशा केसेस मध्ये सोनोग्राफी, बायाप्सी, Laprotomy म्हणजे चक्क पोट फाडून तपासणे ह्या क्रिया करुन शेवटचे निदान ठरते.

त्या पेशंटच्या पोटात गोळा होता, परंतु तो कसला असावा, ह्यावरच चर्चा झाली. वेगवेगळे विचार सांगितले गेले. दोन वैचारिक तट पडल्याचे जाणवले. डॉ.मारवा म्हणत हा साधा ( Benaign ) गोळा आहे तर डॉ.सैनानी यांच्यामते तो कॅन्सरयुक्त ( Malignant ) असावा.

सर्वांच्या नोंदी संपल्यानंतर त्या केसचे इन् चार्ज शेवटचा अहवाल वाचण्यासाठी पूढे आले. त्याच क्षणी डॉ. सैनानी एकदम पुढे आले व म्हणाले.     ” One last point, not so important, but my observation. When I palpated the tumor, the patient felt pain. Tenderness is in favor of malignancy.”    लगेच डॉ. मारवा उठले व म्हणाले. ” Including yourself about 200 doctors palpated his abdomen. Without there being a tumor, he will feel tenderness. ” हास्याची एकदम लाट उमटली.

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail- bknagapurkar@gmail.com

निसर्गाची अशी एक चेतावणी

जीवनाच्या रगाड्यातून

निसर्गाची अशी एक चेतावणी

 

दररोज आम्ही वयस्कर म्हणजे सर्वजण सत्तरीच्या पुढे गेलेली, एकत्र जमत असू. गप्पा टप्प्पा होत. आज एकनाथराव फारच मुढमध्ये होते. ते गप्पीष्ट, विनोदी व टर्रेबाज.

ते फुलवून सांगू लागले ” मी आज दोन तरुण स्त्रीया बघीतल्या. अत्यंत सुंदर आकर्षक व नाजूक. माझ्या दुकानांत आल्या होत्या. मला एकदम फक्कड वाटल्या. काय करणार म्हातारे झालो ना. जेष्ठांचे लेबल पाठीमागे निसर्गाने चिटकवले आहे. ते काढू शकत नाही. ” सर्वजण दिलखुलास हासले. मी त्यांच्या गमतीदार प्रसंगावर चिंतन करीत बसलो. हा आणि असे विचार ह्या वयांत कां? म्हातारचळ म्हणतात ते ह्यालाच कां ? असे विक्षीप्त व अवेळीचे विचार कांहीत जाणवले. मात्र बऱ्यांच समवयस्क मित्र मंडळीत दिसले नाही.

कांही दिवसानंतर एकनाथरावनी मला डॉक्टरमित्र म्हणून त्यांचा एक रिपोर्ट टिपणीसाठी दाखविला होता. त्याना लघवीचा त्रास होता. वारंवार लघवीला जावे लागे. लघवी पूर्ण केल्याचे समाघान होत नव्हते. लघवी रुकून रुकून येत असे. वेदना मात्र कोणत्याच नव्हत्या. लघवीचा Pathological report, Scanning report ( Sonography ) , Surgeon’s report बघीतला. त्यांचे Prostate वाढले होते. आमची चर्चा झाली.

पुरुषांच्या बाबतीत Prostate is a male Hormonal gland. व्यक्तीच्या लैंगीक भावना ह्या त्यांच्यामध्ये उत्पन्न होणाऱ्या Hormon ह्यावर अवलंबून असतात.वाढत्या वयानुसार त्याच्या कार्यपद्धतीमध्ये शिथीलता येते. त्याचे प्रमुख कार्य Prostate Hormone ची निर्मिती कमी होऊ लागते. त्यामुळे परिणाम स्वरुप लैंगीक भावना व विचार हे कमी होतात.

जर कांही कारणास्तव Prostate ग्रंथीत विकार निर्माण झाला, तर तीचा आकार वाढू लागतो. वाढलेल्या ग्रंथीमुळे लघवीच्या उत्सर्जनामध्ये अडचणी येतात. त्याच प्रमाणे लैंगीक विचार-भावना देखील उत्तेजीत होतात. परंतु ही फसवी लैंगीक ओढ असते. खोटा उत्साह निर्माण करते. हे समजुन घेतले पाहीजे. निसर्ग ह्या द्वारे तुम्हास जागृत करतो की तुमच्यामध्ये विकार उत्पन्न होत आहे. ही वाढ साधी (Benign ) वा कॅन्सर( Malignant ) निर्माण करणारी असू शकते. आपले वाढते वय आणि प्रकृतीची सतत कळजी घेणारे बरेच असतात. एखाद्या नैसर्गिक बदला विषयी सतर्क असतात. माझ्या शरीरामध्ये अथवा मनामध्ये कां वेगळेपणा जाणवतो, ह्यावर चिंतन करुन ते योग्य वैद्यकीय सल्ला घेतात. वाढत्या वयांत उत्पन्न झालेला फसवा लैंगीक विचार हा यौवनाप्रमाणे चैतन्यमय नसून धोका देणारा असेल हे ते जाणतात. तज्ञाकडून ते निसंकोच सल्ला घेतात. Prostatic Enlargement वर योग्य इलाज करुन घेतात.

Prostate gland Enlargement चा विचार केला तर बऱ्याच वयस्कर लोकांमध्ये ह्याची लागन होते. आपण बघतो दात पडणे, केस झडणे, रंग बदलने, कातड्यावर सुरकुत्या पडणे, दृष्टी वा श्रवण दोश निर्माण होणे, इत्यादी. ही वाढत्या वयाची अर्थात वृद्धत्वाची लक्षणे. ह्या शारीरिक बदलांची देखील महत्वपूर्ण योजना निसर्गाने केलेली असते. कांही तरी साध्य करण्यासाठीची सुनियोजीतता ही आयुष्याच्या शेवटच्या प्रकरणात कदाचित् असेल.

मला गम्मत वाटते ती प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीची. एक फसवी चेतना निर्माण करुन विकलांग व अशक्त होऊ जाणाऱ्या देहांत एक चैतन्य निर्माण केले जाते. जरी ते फसवे असले तरी. फसवी लैंगीक भावना तशी अकार्यक्षम असते. त्यामुळे त्यापासून तरी दुष्परीणाम नाहीत. जीवनाला वेगळाच उत्साह मात्र दिला जातो. सतर्कांनी मात्र ह्यावर वैद्यकीय सल्ला घेत जावा.

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail- bknagapurkar@gmail.com.