Monthly Archives: जून 2016

वाचनाललयाचा एक अप्रतीम अनुभव

वाचनाललयाचा एक अप्रतीम अनुभव

अमेरिकेत बराच काळ वास्तव्यात होतो. मुलाकडे कांही महिने राहण्यासाठी गेलो होतो. दुरदर्शनावरिल बातम्यावरुन महाराष्ट्रामध्ये घडणारय़ा घटना कळत होत्या. Shiwaji Hindu King in Islamic India by James W. Laine ह्या पुस्तकाच्या लिखानावरुन सामान्य जनतेमध्ये संतापाची भवना निर्माण झाली होती. मी पण हे सारे वाचून बेचैन झालो होतो. एका परकिय लेखकाने शिवाजीमहाराजा संबंघी लिहीलेले वादग्रस्त लिखान काय असावे हे समजण्याची उत्सुकता वाटू लागली.
मी जवळच असलेल्या एका मोठ्या वाचनालयांत गेलो. प्रचंड ग्रंथसंख्या असलेले ते ग्रंथभांडार होते. अतिशय शिस्तीत निरनिराळ्या काचेच्या कपाटांत ठेवलेली पुस्तके दिसून आली. बसण्यासाठी उत्तमप्रकारचे फर्नीचर, टेबल-खुर्च्या शिस्तीत लावलेल्या. वेगवेगळी दालने, संपूर्ण भाग एअर कंडीशनने व्यापलेला. प्रत्येक ठिकाणी Computer ची
आणि Xerox ची सोय. कागद व पेन्सचा मुबलक साठा, फोटोप्रिंटस घेण्याची सोय इत्यादी दिसून आले. सभासदाना I. Card दिलेले असून एका वेळी ३ ते ४ पुस्तके दिली जात. सभासद ती २१ दिवस घरी ठेऊ शकत होता.
कंपुटरच्या सहायाने पुस्तकांची वितरण व्यवस्था व परत मिळाल्याची नोंद अटोमँटीक होत असे. वाचनालयातर्फे देवू केलेली पुस्तके आणि वाचकांकडून परत आलेली पुस्तके फक्त वेगवेगळ्या फिरत्या Tract वर ठेऊन हे साध्य होत असे. ही सर्व पद्धती तो वाचक स्वतः करीत असत. (आगदी लहान ५-६ वर्षाची मुले देखील) लेझर दिव्याच्या झोताच्या सहायाने पुस्तकांची नोंदणी पद्धतशीर करताना, देवान-घेवान च्या नोंदी करीत. फक्त अद्यावत शास्त्रीय ज्ञान (Technical Knowledge) , आणि विश्वास ह्या दोन समजावर वाचनालयाचा व्यवहार सहज आणि सुरळीत चाललेला दिसून आला. सर्व हालचाली शांत व पद्धतशीर होत असल्याची जाणीव झाली. फक्त अडचणीच्याच वेळी तेथील मदतनिसांची मदत घेतली जाई.
मी ग्रंथपालाकडे मला हवे असलेल्या पुस्तकाची चौकशी केली. त्याने कंपुटरच्या सहायाने संपूर्ण यादी चाळली. मला ते पुस्तक मिळाले नाही. ते पुस्तक त्यांच्याकडे नव्हते. त्यानी मजकडून एक फॉर्म भरुन घेतला. त्यात माझे सभासद कार्ड नंबर, पुस्तकाचे नांव व त्याचा लेखक ह्याची नोंद केली. मला ते पुस्तक दोन आठवड्यानंतर मिळेल हे सांगण्यात आले. आणि आश्चर्य म्हणजे कांही दिवसांनी वाचनालयाने मला e-mail ने कळविले के ते पुस्तक त्यांच्याकडे उपलब्ध झाले आहे.
वाचकांच्या आवडी निवडीची इतकी कदर करणारी संस्था व यंत्रणा मी प्रथमच बघत होतो. माझे त्याना घन्यवाद.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

जेव्हां शिष्य गुरुची भूमिका करतो.

जेव्हां शिष्य गुरुची भूमिका करतो.

वैद्यकीय क्षेत्रातील अँलोपँथिक ( Allopathic Medical Science ) शास्त्राच्या डिगरय़ा व शासकीय रजिस्ट्रेषन झालेले होते. नुकताच मी दवाखाना सुरु केला होता. रोगांची हजेरी व वरदळ चांगला आकार घेऊ लागली. एक दिवस एक तरुण मुलगा माझ्या दवाखान्यांत आला. ” माझ नांव तरुणकुमार तिवारी. माझे वडील येथे मॉडेला कंपनीत नोकरीला आहेत. मला तुमच्याकडे कंपाऊंडर म्हणून काम मिळेल कां ? ” मी त्याच्याकडे बारीक नजरेने बघीतले. चेहरय़ावरुन मला तो अतिशय सज्जन, समजदार, कुटूंब वत्सल, उत्साही आणि सुस्वभावी वाटला. तशी मला कुण्यातरी सहकाऱयाची गरज होती. चर्चा करुन मी त्याला मज बरोबर काम करण्याची सम्मती दिली.
आगदी अल्प काळांत तिवारीने माझे मन जींकून घेतले. त्याला कामाची हौस दिसली. त्याच्यासाठी वैद्यकीय विषय अपरीचित् होता. परंतु त्यांत त्यांने उत्साह व गोडी असल्याचे दाखवून दिले. त्याने एक नोटबुक बाळगले होते. माझा रोग्याशी होणारा संवाद, त्यांच्या तक्रारी, विकाराची वर्णने, रोग्याने आतापर्यंत केलेले उपाय, ह्या सर्व बाबींची तो अतिशय उत्सुकतेने एकाग्र चित्त करुन माहिती गोळा करीत असे. त्याच्या सर्व नोंदी तो वहीत लगेच टिपून घेई. रोग्याला दिलेली औषधी, त्यांची नांवे, घेण्याची पद्धत, ह्याची व्यवस्थीत नोंद तो करुन घेई. रोगी गेल्यानंतर तो त्याच्या शंका-कुशंका विचारीत असे. माझा देखील त्याला सहकार्य करण्याचा दृष्टीकोण असावयाचा. माझ्याच सल्ल्याने त्याने कांही प्राथमिक वैद्यकीय
ज्ञानाची पुस्तके पण घेतली होती. प्रत्यक्ष अनुभवांत ( Practical Knowledge ) त्याच्या कल होता. औषधी देणे, तयार करणे, ड्रेसींग करणे, जखमांची काळजी घेणे, इन्जेक्क्षन देणे, हे त्याने शिकून घेतले होते. केंव्हा केंव्हा माझ्या गैर हजेरीत तोच माझा दवाखाना व्यवस्थीत चालवित असे.
काळाचा एक प्रचंड महीमा असतो. ओघ आणि बदल ही काळाची वैशिष्ठे. तो निश्चीत असला तरी जगाला त्याच्या परिणामाचे मुळीच ज्ञान नसते. म्हणूनच त्यांत रोमांच आहे, शंका आहे, आणि आश्चर्य आहे. वय व विकलांगपणा नेहमी जीवनमार्ग बदलण्यास भाग पाडतो. वाकत जाणारे शरीर विचारांनादेखील वाकवित जाते. जो मेंदू, विचार, चेतना एकेकाळी शरीरावर ताबा करुन होता, तोच आता शरीराच्या आधीन झालेला जाणवतो. डॉक्टराची भूमिका बदलून आतां रोग्याच्या भूमिकेत राहण्याचा काळ आलेला होता. खोकल्याने हैरान केले होते.
माहित असलेले सर्व उपाय संपले. तज्ञांचेही सल्ले निकामी ठरले.
समवयस्क मित्रांनी सल्ला दिला की क्रॉनिक झालेल्या खोकल्यासाठी आयुर्वेद शास्त्रामधील उपचार करावेत. त्यांनी एका क्लिनीकचे नाव देखील सुचविले. मी त्याप्रमाणे तेथे गेलो. मला तेथे जाताच आश्चर्याचा धक्का बसला. त्या क्लिनीकचा प्रमुख होता तरुणकुमार तिवारी. एके काळचा माझा कंपाऊंडर सहकारी.
माझ खूप आदरातिथ्य व स्वागत केल गेल, हे सांगणेच नको. तिवारीच्या अभ्यासू वृत्तीने त्याला शांत बसूच दिले नाही. वैद्यकीय विभागातील त्याची ओढ व रुची त्याला ज्ञानाच्या चक्रांत फिरवीत होती. त्यानी आयुर्वेद ह्या विषयाकडे आपले लक्ष केंद्रित केले. पुस्तके वाचली, सर्टीफिकीट कोर्स केला. ज्यामुळे तो स्वतंत्र व्यवसाय करु शकत होता. विषय वाचन, व त्याचे अद्यावत ज्ञान (Update Knowledge ) ह्या तत्वावर तो ठाम होता.

ह्याच विषयावर लेखन करुन त्या त्या विषयांच्या संबंधातील मासिकांना लेख, उतारे, प्रश्नोत्तरे, पाठवू लागला. आपल्या ईच्छाशक्ती व प्रचंड मेहनत यानी एक प्रकारे साम्राज्य निर्माण केले होते. निरनिराळ्या आयुर्वेदिक कंपन्यानी त्याला मार्गदर्शक म्हणून देखील मान्यता दिली होती.
वैद्यकिय शास्त्राची अ-आ-इ-ई जरी तो मजकडून शिकला, तरी य- क्ष- ज्ञ अर्थात वरच्या दर्जाचे ज्ञान हे त्याचे स्वतःचे होते. मजसाठी हे जरी नाविन्यमय होते, तरी माझ्याच अडचणीच्या काळांत मलांच आसरा देणारा तो ठरला. एक प्रकारे शिष्य म्हणून मजकडे आलेला तरुणकुमार तिवारी आता एका गुरुच्या – श्रेष्ठाच्या- भूमिकेत भासू लागला.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

भूतदया

भूतदया

एका थोर विचारवंताचे पुस्तक वाचत होतो. दया ह्या गुणधर्मावर त्यांचे भाष्य मनाचा ठाव घेणारे होते. सर्व प्राणीमात्र जीवजंतू झाडे झुडपे वृक्षलता इत्यादी. ज्यांच्यामध्ये जीवंतपणाचे लक्षण असते त्यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये दयाभाव खोलवर रुजला असतो. ह्य़ाच भावनेमधून प्रेम जिव्हाळा सख्य ह्यांचे अंकूरण होत असते. समाधान तेथेच मिळते.
अचानक एक प्रसंग डोळ्यासमोर आला. गावाकडे जात असतांना, आमची गाडी नादुरुस्त झाली. रस्त्याच्या एका झाडाखाली जवळ जवळ पांच तास थांबावे लागले. मेकँनिकलला जाऊन आणणे व गाडी पूर्वपदावर आणण्यास वेळ गेला.
एका झाडाखाली सतरंजी टाकून शांत बसलो होतो. माझे लक्ष जवळच असलेल्या एका मुंग्याच्या वारुळाकडे गेले. अनेक छिद्रे असलेले वारुळ होते. त्यातून बरय़ाच मुंग्यांची जा ये चालू होती. जवळ जवळ तीन फूटांच्या परिघामध्ये त्यांची वरदळ सारखी चालू असलेली जाणवली. मुंग्या सर्व दिशांनी फिरताना दिसत होत्या. कांही ग्रुप एका मागोमाग एक चालत होते. तर कांही निरनिराळ्या दिशांनी फिरत होते. मार्गांत आपआपसांत भेटणारय़ा मुंग्या क्षणभर थांबून, भेटून आपल्या मार्गावर पून्हा पूढे जाताना दिसत होत्या. कोणता संवाद त्या करीत असतील ते समजण्यास मार्ग नव्हता. परंतु ह्याची जाणीव होत होती की त्यांचे प्रमुख ध्येय व कार्य भक्ष शोधणे, व ते सर्वानी मिळून खाणे. कांही का असेना, परंतु त्यांची ही सर्व धावपळ दोन तासाहून जास्त काळ मी बघत होतो. त्यांचे दुर्दैव असे की त्याना भक्ष मात्र हाती लागल्याचे दिसले नाही.
माझी नजर एका लांबलचक आळीवर पडली. ती देखील त्याच वाटेने चालली होती. कदाचित् ती तीचे आपले भक्ष शोधीत असावे. एका जागेवर गवताच्या अडोशाला तीची हालचाल एकदम थांबलेली जाणवली. तेथे चार पांच मुंग्या होत्या. त्या मुंग्यानी तीला घेरले. तीच्या अवयवाच्या निरनिराळ्या भागास मुंग्यांनी गच्च धरलेले जाणवले. सर्व मुंग्या त्या अळीवर तुटून पडल्या. आळी बेचैन झाली. स्वतःला वाचविण्यासाठी तीच्या अवयवाच्या पायांच्या हालचाली वाढल्या. दोन्ही आघाडीवर द्वंद्व सुरु झाल्याचे दिसून येत होते. मुंग्यानी तीला भक्ष केले होते. आळी मात्र त्यावेळी आपला जीव वाचविण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र दिसत होते.
माहीत नाही, मुंग्यांची कोणती भाषा, कोणत्या हांका, कोणता गंध, तेथे पसरला जाऊन, अनेक मुंग्या वारुळातून त्यांच्या सहकारय़ाना मदत करण्यास येत असल्याचे दिसले. त्या आळीभक्षाच्या भोवती खूप संख्येने जमू लागल्या. सर्व एकत्रीत होऊन त्या तडफडणारय़ा आळीला खेचून वारुळाकडे नेण्याचा प्रयत्ल करीत होत्या. त्याचवेळी आपला जीव वाचविण्यासाठी त्या आळीकडून जबरदस्त हलचाली होत असल्याचे जाणवले. ती उलट सुलट होऊन मुंग्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसले. ह्या दोन्ही भक्ष व भक्षक यांच्या द्वंद्वात मुंग्याचे पारडे जड झाल्याचे जाणवले. ती आळी एक व ह्या मुंग्या प्रचंड संख्येने. हे मी सारे गंभीरतेने बघत होतो. माझ्या मनातील भूतदया जागी झाली. जो मृत्युच्या खाईत पडला त्याला वाचविणे, हा विचार मनात आला. ती आळी दयेस पात्र असल्याची जाणीव झाली.

त्या मुंग्या व ती आळी दोघांच्या संघर्षात एकाची भक्षासाठी धडपड तर दुसरा भक्ष होण्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रयत्नशील. हे चित्र दिसू लागले. मी चटकन उठलो. एक काडी घेऊन त्या आळीला सहज उचलले. त्या काडीचा स्पर्ष होताच, एखादे अनामीक संकट समजून सारय़ा मुंग्यांनी त्या आळीला सोडले व त्या मिळेल त्या दिशेने स्वतःचा जीव वाचवित सैरावैरा विखूरल्या गेल्या. मी त्या आळीला हलकेच थोड्याश्या अंतरावर, जवळपास कोणतीही मुंगी नाही, हे बघून सोडून दिले. त्या आळीचा जीव वाचविला असे समाधान व समज करीत पून्हा शांत बसलो.
कोणती भूमिका मी वठवली होती ह्या प्रसंगामध्ये ?.
एक नैसर्गिक ईश्वर रचित व निर्मीत जीवन चक्र चालू होते. माझ्या बुद्धीने, विचाराने व ऐकीव ज्ञानाने मी माझ्या विचारसरनीला मार्गदर्शन देत होतो. वारुळामधील अनेक मुंग्या त्यांच्या त्यांच्या जीवन चक्राला अनुसरुन एकत्र घर करुन रहात होत्या. भक्ष शोधण्यास बाहेर पडल्या होत्या. जगण्याचे प्रमुख साधन व गरज म्हणजे त्यांचे भक्ष. त्या सर्व दिशाने फिरुन ते मिळविण्याचा प्रयत्न करीत होत्या. जवळ जवळ दोन ते तीन तास त्यांच्या हाती कांही लागले नव्हते. हे मी बघीतले होते. हा काळ त्यांच्या आपल्या जीवनचक्रांत फार मोठा असू शकतो. त्यांच्या हाती कांहीच सापडले नव्हते. एक जीव सदा दुसरय़ा जीवावरच जगत असतो. हे तर निसर्गाचेच तत्व असते.
कुणी कस जगायच ? वा कसे मरायचे ? ह्या साठीची परिस्थिती निर्माण करण्याचे भाग्य वा दुर्भाग्य हे ज्याच्या त्याच्याच हाती ठेवलेले असते. त्यामुळे इतरानी त्याची खंत करण्याची वा त्यामध्ये दखल देण्याची मुळीच गरज नसते. ही ईश्वरी अपेक्षा असावी. परंतु बुद्धीप्राप्त, विचारविश्लेशन क्षमताप्राप्त मणूष्य प्रत्येक वेळी आपलेच सुत्र निर्माण करुन नैसर्गिक घडणारय़ा वा होऊ जात असलेल्या क्रियांमध्ये सहभागाचा विनाकारण ठेका दर्शवितो. माझी भूतदया, माझे प्राणी प्रेम हा त्यातलाच प्रकार तर नव्हे काय ? .
काय योग्य? व कोणते अयोग्य ? ह्याचाच विचर करीत मी बराच वेळ तेथेच बसलो. गाडी दुरुस्त होण्याची वाट बघत.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

आषाढी एकादशी यात्रा- एक विचार.

आषाढी एकादशी यात्रा- एक विचार.

आषाढी एकादशी. पंढरपूरची एक भव्य दिव्य यात्रा. पावसाळ्याची सुरवात. कदाचित् त्यावेळी मुसळघार पाऊस पडण्याची शक्यता असते. त्या वातावरणांत दिवस काढण्याची, राहण्याची अत्यंत गैरसोय, सर्वत्र ओलावा असतो. कॉलरा हगवण ह्या रोगांच्या फैलावाची भिती. सर्व कांही भयावह आणि निराशजनक परिस्थिती. तरी देखील ह्या सर्व बाबिना तोंड देत, प्रचंड जनसागर कोणत्याही परिणामाची तमा न बाळगता पंढरपूरला जमा होतो. केवळ त्या विठोबाचे दर्शन घेण्यासाठी.
काय मिळते त्याना शरीराला एवढे कष्ट देवून ?. आणि कित्येक भक्तगण असे आहेत की जे त्या पंढरपूरची वारी दर वर्षी न चुकता करतात. हे केवळ मानसिक समाघान आहे कां ? कां ह्याला अंधश्रद्धा म्हणतां येईल ? विठोबा कोण ?, परमेश्वर कोण ? भक्ती म्हणजे काय ?, कशाने काय प्राप्त होते ?, असे एक नाही असंख्य प्रश्न आज तागायत अनुत्तरीत राहीलेले आहेत. ज्याला जसे ज्ञान प्राप्त झाले, जसे वातावरण मिळाले, त्या परिस्थितीप्रमाणे तो प्रश्नांची उकल करीत गेला. अनेक विचार, परंतु एक वाक्यता केंव्हांच झाली नाही. विज्ञानाच्या शोध बुद्धिने इंद्रियांना जे कळले, काहींनी त्याला महत्व दिले. कल्पनेच्या विचारांच्या झेपेमुळे सत्य काय असू शकेल. त्या अज्ञात शक्तींच्या अस्तित्वाला कांहीनी महत्व दिले. गम्मत म्हणजे ज्याचा शोध घेणे, ह्यात प्रगती करण्यापेक्षा, तथाकथीत विचरवंतच आपसांत संघर्ष करताना दिसतात.
माझ्या समोर आज तरी एक प्रश्न आला. जो मी वर व्यक्त केला. कां इतक्या प्रचंड संखेने लोक पंढरपूरला यात्रेसाठी जमा होतात ? पंढरपूरलाच नव्हे तर कोणत्याही घार्मिक स्थळ यात्रेला, कुंभमेळाला लोक भक्तीभावाने जमतात. पन्नास, शंभर लोक संख्या असेल तर कदाचित अंधश्रद्धा हे नाव देवून स्वतःचे भावनिक सांतवन केलेही असते. परंतु जेंव्हा संख्या लाखोच्या घरांत जाते, तेंव्हा आश्चर्य व कौतूक पण वाटू लागते. कित्येक उच्च शिक्षित, वैज्ञानिक दृष्टीकोण बाळगणारे, विद्वान मंडळी यामध्ये सहभागी होताना दिसतात. कांही तरी या मध्ये सत्य असेल, प्रेरणा असेल, जी इतक्या समुदायाला खेचून घेते.
पुंडलीक आणि विठ्ठोबाची जी घटना घडली, त्याचा मी गांभिर्याने विचार करु लागलो. निसर्गाचा सहभाग आणि मानवी योजना ह्यांत काय असतील ह्याची उकल करण्याचा प्रयत्न केला. सारे कांही घडत असते ते निसर्गाच्या नियमाना धरुनच.
निसर्गाच्या तीन गुणधर्म वा नियममांचा मी विचार केला.
१ निसर्ग सदा सर्वकाळ निश्चीत व सत्य स्वरुपांत असतो. ( Nature is always regular and definite )
२ निसर्गाचा मार्ग नेहमी चक्रमय ठरलेला असतो. म्हणूनच आपण जीवनाला जीवन चक्र म्हणतो. चक्र याचा अर्थ नैसर्गिक अविष्कार वा घटना घडतात, व त्याची पुनरावृत्ती होत राहते. जे घडले ते पुन्हा घडणे ही किमया ह्या निसर्ग चक्रामुळेच साधली जाते. ( Nature repeats itself )
3 अत्यंत महत्वाचा गुणधर्म निसर्गांत दिसून येतो, तो म्हणजे नैसर्गिक चमत्कार .
Miracle by Nature

काय अर्थ याचा ? केव्हां केव्हां निसर्ग- चाकोरीमध्ये अशी एखादी घटना घडते की त्याचा शोध बोध कदाचित् त्या झालेल्या क्षणी होत नसतो. सामान्यजन त्या घटनेला आश्चर्य समजतात. चमत्कार समजतात. दिव्यता भव्यता समजतात. परमेश्वराची अमर्याद शक्तीच हे करु शकते हे ठरवितात. थोडक्यांत चमत्कार आणि नमस्कार हे समिकरण जन्माला येवूं लागते. ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल निश्चीतता येवू लागते. इत्यादी इत्यादी. परंतु एक मात्र सत्य दिसून येते, ते म्हणजे निसर्ग एखाद्या घटनेमधून चमत्काराचे दर्शन घडवित असतो.
पौरानीक कथांचे ग्रंथ वाचताना भक्त पुंडलीकाची कथा वाचीत होतो. पुंडलीक एक महान व्यक्तीमत्व. एका प्रेरणेने भारुन गेलेले. आपल्या जन्मदात्या आई-वडीलाना आपल्या जीवनाचे सर्वस्व मानणारा. त्यांची सेवा हेच जीवनाचे ध्येय असल्याची जाणीव समजणारा. ईश्वरी अस्तीत्वाला देखील त्याने माता पित्याच्या समोर दुय्यम स्थान दिले होते. कित्येक वर्षे त्याची माता पिता सेवा चालू होती. जीवनातील सर्वस्व त्यागुन फक्त आईवडील सेवा हे वृत त्याने धारण केले होते. त्याचे हे श्रम व प्रेम एवढे महान होऊ तागले की ते ईश्वरी दरबारांत मान्यता प्राप्त होऊ लागले.

ईश्वर नेहमी चांगल्या गुणांची सदैव दखल घेत असतो. हा अध्यात्मिक इतिहास आहे. सती सावित्रीची पतीभक्ती व सेवा ह्यानी देखील ईश्वराला झुकावेंच लागले. पुंडलीकाने केवळ माता-पिता सेवा-भक्ती केली. हेच त्यांचे सामर्थ्य परमेश्वराच्या प्रसन्नतेत झाले.
पुंडलीकाची माता पिता सेवाभक्ती यानी प्रेरीत होऊन, परमेश्वराने त्याला श्री विठ्ठलाच्या रुपांत दर्शन देऊन धन्य केले. पुंडलीकाचे ह्रदय मन भरुन आले. त्याने सविनय नमस्कार केला.परंतु हाच त्याच्या भक्तीच्या कसोटीचा क्षण होता. ज्या क्षणी पांडूरंगाने पुंडलीकास दर्शन दिले, त्यावेळी पंढरपूर नजीक चंद्रभागेच्यातीरी, त्याचे आईवडील त्याच्या मांडीचा आसरा घेत झोपले होते. समोर उभा प्रत्यक्ष परमेश्वर श्री विठ्ठल आणि मांडीवर निद्रेत आईवडील. तो त्यांची झोप मोडू शकत नव्हता. शेवटी पुंडलीकाने विठ्ठलाला नमस्कार करीत, जवळ असलेली एक विट त्याच्या पुढ्यांत टाकली. त्याला त्यावर उभे राह्यण्याची विनंती केली. आईवडीलांची झोप चाळवली गेली. ते जागे झाले. त्याना ईश्वरी दर्शन होणे शक्यच नव्हते. कारण त्यांच्यात ते दिव्य सामर्थ्य नव्हते. त्यानी जाग येताच स्नानाला जाण्याची इच्छा व्यक्त केली. पुंडलीकाने त्यांना मान देवून, तो त्यांना चंद्रभागेतीरी घेऊन गेला. जाताना त्या परमात्म्याला श्री विठ्ठलाला विनंती केली की त्याने त्याच विटेवर उभे राहून पुंडलीक येण्याची वाट बघावी. तो आईवडीलांना स्नान घालून परत येईल. आजतागायत आठ्ठाविस युगे झालेली आहेत. श्री विठ्ठल आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून, त्याच महान आईबाप सेवक भक्ताची, पुंडलीकाची वाट बघत आहे. त्याच्या वाटेवर लागलेले विठ्ठलाचे डोळे आजही आम्ही बघून, ईश्वर दर्शनाचा आनंद लुटतो. लाखो लाखोच्या संखेने तेथे जमा होतो.

निसर्गाचे वर वर्णन केलेले तीन नियम आणि पुंडलीक-विठ्ठलाची पौरानिक कथा याची कांही सांगड असेल कां ? हा विचार डोकाऊ लागला. एक चमत्कार झाला. एक आश्चर्य सर्वानी बघीतले, जाणले, अनुभवले. ईश्वर स्वरुप तर बघण्याची भव्यता कुणातच असण्याची शक्यता नव्हती. ती फक्त पुंडलीकातच होती. तोच ते भव्य दिव्य बघू शकत होता. परंतु त्या वेळच्या, त्या सभोवतालच्या अनेकांना फक्त त्या ईश्वरी चमत्कारांची चाहूल लागली असेल. एक प्रकाश, एक शितल आल्हादकारक वातावरण, बेहोष करणारा दरवळणारा सुगंध, एक उत्साहाची चैतन्याची लाट, समाधान शांतता यांच्या लहरी, हे सर्व त्या ईश्वर आगमन प्रसंगी एक झलक, नितांत आनंद म्हणून झाले असेल. ज्याचे शब्दानी कुणालाही वर्णन करता येणार नाही. अशी वातावरण निर्मिती त्या क्षणी निर्माण झाली असावी. हा अनुभव कल्पनातीत व अप्रतीम असावा. पुंडलीकाने तो बघीतला, भोगला. इतरांनी कदाचित् त्यांचा संवाद, संपर्क, हाच एखादा नैसर्गिक चमत्कार वाटला असावा. जो की तो अनुभव इतर जन केंव्हाच विसरु शकणार नव्हते. क्षण शांत झाला, परंतु तो अनुभव कुणाच्याने सोडविना.
कालचक्राप्रमाणे वर्ष सरता, पुन्हा लोक त्याच ठिकाणी, त्याच वेळी जमा झाले. चाचपडत राहीले. शोध घेत राहीले. कारण जर तो आनंद चेतनामय चमत्कारी, विलक्षण अनुभवी क्षण नैसर्गिक असेल, तर निसर्ग चक्रानुसार तो पुन्हा बरसेल. पुन्हा मिळेल. ह्या आशेत. त्याच जागी त्याच वेळी जो पुंडलीकावर बरसला. तसा कदाचित् पुन्हा बरसेल. प्रत्येकजण त्या नितांत आनंदाचा Ecstasy of Joy चा एक साक्षिदार, भागीदार, होऊ इच्छितो. त्याच्या दयेचा एखादा शिंतोडा कदाचित् आपल्याही अंगावर पडेल ह्या अपेक्षेने. त्याच भावनेने लाखोंच्या संखेने जमतात. त्याच स्थळी म्हणजे पंढरपूरला त्याच वेळी म्हणजे आषाढी एकादशीला, ज्या काळी पुंडलिकाला विठ्ठोबानी दर्शन दिले असेल. सर्व भक्त शोध बोध घेत असतात.
निसर्गाच्या नियमित, चक्रमय, आणि पुनुरावृत्ती ह्या गुणधर्मच्या शोधांत. आम्ही सर्वजण तेथे जमतो. तो निश्चीत बरसेल आणि तो बरसतो देखील. जो तो आपले नशिब आजमावतो. कुणावर तो बरसला असेल हे समजण्यास आजतरी मार्ग वा साधन नाहीत. हेच त्या स्थळाचे ( पंढरपूर ) व वेळेचे ( आषाढी एकादशी ) महात्म्य असेल कां ? अशाच अनेक धार्मिक यात्रांच्या, कुंभमेळाच्या मागे दडलेली कारणमिमांसा व नैसर्गिक चक्ररचना कारणीभूत असू शकेल कां ?

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com