Monthly Archives: मार्च 2013

वेळेची एक संकल्पना

जीवनाच्या रगाड्यातून –

वेळेची एक संकल्पना

 

वेळ ही एक हालचाल ( Movement ) समजली गेली आहे. वेळ कधीच स्थीर नसते. जगाच्या चक्राप्रमाणे ती फिरत असते. प्रत्येक हालचालीसाठी वेळ लागते. त्यामुळे वेळ व हालचाल अर्थात Time and Movement ह्या एकच समजल्या गेल्या. हे शारीरिक                स्थरावर.

मानसिक स्थरावर ही संकल्पना वेगळी ठरते.

दोन प्रश्न आहेत. १) काय ?   अर्थात काय असावे .   २)  कसे ?   अर्थात कसे असावे.

स्वच्या ( Self   )  वा मनाच्या ( Mind   )  गरजा, वासना, इच्छा सतत  “काय आहे”,  हे जाणण्याचा प्रयत्न करुन, “कसे असावे”  ह्या संकल्पनेंत जातात.

” काय आहे ” हे समजण्याने वासनेचे प्रश्न सुटत नाही. वासना ( Desire  ) ही एक नैसर्गिक गुणधर्म जन्माच्या उपजत असते. “काय आहे ”  ह्या विचारांत बदल होवून स्वतःसाठी, मनासाठी   ” काय असावे ”  हा विचार येऊ लागतो. म्हणजे ” काय असावे ” ही मनाची वा स्वतःची वासना. हा बदल, हा संघर्ष हाच स्वचा मुळ पाया आहे.

वासना ( Desire) व अहंकार (Ego ) हे मुळ निसर्गानी दिलेले स्वभाव आहेत. देहाच्या जगण्यासाठी, अत्यंत महत्वाचे गुणधर्म. ह्याच चैतन्यमय गुणधर्मामुळे कोणत्याही परिस्थितीवर मात करुन, देह अर्थात जीवन जगविले जाते. निसर्ग जे देऊ करतो, त्याला ” काय आहे ” ही समज असते. जे आहे तसे. हा त्याचा सरळ व सोपा अर्थ. हे जगण्यासाठी, जीवनासाठी पूर्ण असते. परंतु आमच्या वासनेला फाटे फुटून ” काय आहे”   ऐवजी ” कसे असावे ” हा विचार पक्का होऊ लागतो. “काय आहे” मध्ये  किमान गरज असते. परंतु ” कसे असावे ” ह्याला मर्यादा नसतात. निसर्ग देत असलेले “काय आहे” व देह मनाला ( Self )  वाटते ” कसे असावे ” हाच मुळ संघर्षनात्मक मुद्दा असतो. उदा. अन्न, पाणी, हवा, जमीन, इत्यादी निसर्गाने दिलेल्या आहेत. मानवाने त्या “कशा असाव्यांत”  ह्या कल्पनेने अनेक बदल केलेत.

स्वचा ( Self ) दुसरा गुणधर्म म्हणजे इच्छा ( Will ). इच्छा होण्याची वा इच्छा  बदलण्याची. इच्छा कांहीतरी होण्याची. इच्छा कांही तरी बदलण्याची. इच्छा होत जाणे, इच्छा बदलत जाणे. हा गुणधर्म. इच्छेला आम्ही लहानपणापासून जाणले असते. आमच्या वाढीत. मग ती आर्थिक, सामाजिक, वा धार्मिक असो. आमच्या ध्येयांत इच्छेचा सहभाग असतो. एका विचारावर दुसऱ्या विचाराने ताबा करणे, एका वैचारीक हलचालीवर दुसऱ्या वैचारीक हलचालीने ताबा मिळविणे हे इच्छा करते.

” मी माझ्या विचारावर ताबा मिळवला पाहीजे ” ह्यांत मी व विचार भिन्न आहेत. म्हणजे माझा संबंध विचाराशी असतो. तसे दोन्हीही एकरुप वाटतात. विचार म्हणजे ते ज्ञान ज्यांत आठवणी ( Memaries   ) आणि   ( Experiences   )  अनुभव ह्यांची साठवण असते. एक विचार — हा सतत दुसऱ्या विचारावर ताबा करणे. (Control  ) आकार देणे ( Shape )  अथवा अमान्य करणे (Deney  )  ही क्रिया करीत असतो.

२       समजण्यासाठी थोडे भिन्न करु या. Self  म्हणजे माझ्यांत मी वेगळा असून, जो सर्व गोष्टी बघतो, जाणतो, तो वेगळा Observer अर्थात बघणारा असतो. Observer जवळ म्हणजे बघणाऱ्याजवळ गेलेल्या, जमा झालेल्या आठवणी व अनुभव होय. हीच आठवणीची विचारांची साठवणूक.

मेंदू कार्य करुन प्रत्येक क्षणाची हलचाल अर्थात विचार यांची साठवणूक करतो. जसे प्रसंग, जसा अनुभव तशा विचार लहरी उत्पन्न होऊन ज्ञानेद्रियाच्या मार्फत मेंदूत जमा होतात. आणि साठवल्या जातात. वासना ( Desire ) आणि अहंकार ( Ego ) जे मुळ गुणधर्म आहेत, ते जीवला कर्म करण्यास चेतना देतात. तरी हे सर्व शरीर गुणधर्माप्रमाणे होत जाते. येथे ” मी ” म्हणजे स्वतः ह्या भागाची भूमिका नसते. ” मी ” फक्त उर्जा देण्याचे काम करतो. म्हणून  ” मी ”  वा स्वतः  ( Self ) वेगळा आणि त्याच्या विचार लहरी,  past, memories, experiences   ह्या वेगळ्या. ज्याला आपण  ( Observer ) बघणारा म्हटले आहे. ध्यान प्रक्रियेमध्ये हा Observer ( विचार शक्ती ) देहा मधल्या ( उर्जा शक्तिला –प्राणाला ) अर्थात Observer ला जाणण्याचा प्रयत्न करतो. मी स्तः ( Self )  आणि माझा देह ह्या भिन्न संकल्पना आहेत. मी ( I ) म्हणजे आत्मा आणि देहातील मेंदू, बुद्धी, मन हे घटक येतात. त्यामुळे देहाचे कार्य वेगळे, आत्म्याचे अर्थात मीचे भिन्न. समजण्यासाठी  “तू “चे  कार्य म्हणजे देह बुद्धीचे कार्य. व “मी ” चे कार्य म्हणजे आत्म्याचे कार्य. आत्मा स्वतः कार्य करीत नसतो. तो फक्त प्राणरुपी चेतना देतो. यंत्रामधल्या विजेप्रमाणे.

म्हणजे माझी बुद्धी, मन, विचार हीच  बघणारी Observer बनते.  मी (I )  हा मलाच

( Me ) ला वेगळा करतो. मी मलाच बघतो.

माझा देह ( ज्यांत मन, बुद्धी, विचार, इत्यादीचा सहभाग आहे. ज्याला Observer म्हणजे बघणारा म्हटले आहे. हा कुणाला बघतो. तर मला स्वतःलाच. म्हणजे माझ्या प्राण शक्तीला. ज्याला आत्मा संबोधले आहे. म्हणजे मी मलाच बघण्यासारखे, जाणण्यासारखे आहे. कुणीतरी व्यक्ती आरशामध्ये स्वतःला बघतो. येथे आरशामुळे तो आपली छबी वा प्रतिमा आपणच बघत असतो. हे बाह्य झाले. मी  ” आत ”  कसा आहे, कोण आहे, याचे ज्ञान होणे हे देखील त्याच प्रमाणे म्हणजे आरशांत स्वतःची प्रतिमा बघण्या सारखेच आहेत. मी आणि आरशातील प्रतिमा वेगळ्या आहेत.तरी आपण म्हणतो की मीच मला ह्या अरशांत ( प्रतिमा रुपाने ) बघतो. जर देहांत देखील तशाच दोन प्रतिमा असल्याप्रमाणे आहेत. एक मी जो सर्व बघणारा. (Observer) आणि मला त्या बघीतल्या जाणाऱ्या observed प्रतिमेलाच बघायचे आहे. अर्थात जाणावयाचे आहे. ह्या Observed ला रंग रुप आकार नाही. त्याचे फक्त अस्तित्वच असते. ह्या अस्तित्वाला मला जाणावयाचे आहे. समजायचे आहे. म्हणजे त्या consciousness  ला अनुभवायचे आहे. जेंव्हा एखादी गोष्ट वा घटना मी बघतो, त्याच वेळी मला ह्याची पुर्ण कल्पना असते. की तीच घटना वा गोष्ट माझ्या व्यतरिक्त कुणीतरी दुसरा देखील बघत असतो. आपण म्हणताना म्हणतोकी तो ईश्वर तेच बघत असेल. ईश्वर अर्थात अज्ञात शक्ती. माझ्या बाबतीत, सर्वांच्या बाबतीत ती शक्ती माझ्यामध्येच वास करते. ती हे सारे जाणते वा बघते. म्हणजे जे मी बघतो, जाणतो, हे त्या माझ्याच मधल्या अव्यक्त व्यक्तीलाही समजते. आता माझा प्रयत्न असेल की मी त्या माझ्यातच असलेल्या मला जाणणऱ्या शक्तीला बघायचे, जाणायचे, अनुभवायाचे आहे. मी मलाच हा जाणण्याचा प्रकार आहे.  To experience the self consciousness or objectless awareness

३             एक  ” स्व ”  चा म्हणजे माझा गुणधर्म म्हणजे स्वतःलाच बघणे, जाणणे, हा. तोच बघणाराची भुमिका करतो. बघणारा म्हणजे Observer. ज्यानी बघीतले आहे. बघणारा म्हणजेच ज्यानी गेलेला काळ बघीतला. त्याचे साठलेले ज्ञान, आठवणी, अनुभव ह्या साऱ्या  गोष्टी. मी ( I )  हा मलाच ( Me ) बघतो, जाणतो हे होते. जसे मी तुला बघण्याचा, जाणण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे माझ्यातला बघणारा ( Observer ) मलाच बघतो, जाणतो. एक साक्षी भावाने मीच मलाच समजण्याचा जाणण्याचा, अनुभवण्याचा, बघण्याचा प्रयत्न करतो. बघणारा मीच आणि द्दष्य देखील मीच. Observer आणि Observed   मीच असतो. ह्याचाच अर्थ मी कोण आहे हा जाणण्याचा प्रयत्न.

जाणीव ( Awareness )  हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. आपण जे बघतले ते जाणणे. फक्त जाणणे महत्वाचे. ज्यांत तुमचे विचार, विश्लेशन, कल्पना,इच्छा ह्यांचा कोणतांच स्पर्ष नसावा. हे कठीण आहे. अशक्य देखील. कारण तुम्ही Observer असून जाणण्याचा प्रयत्न करणारे आहांत.  आणि Observer म्हणजे बघणारा, म्हणजेच अनुभव, ज्ञान, आठवणी, यांचा साठा असलेला. असे तुम्ही जाणणारे फक्त जाणणारेच रहाल कां ज्या जाणण्यामध्ये फक्त जाणणेच ( Awareness )  असेल. बघणेच असेल. परंतु जाणणारा फक्त बघूच शकत नाही. कारण जे दिसेल ते त्याला जाणण्याचा प्रयत्न हा त्याच वेळी होईल. त्याच वेळी तुम्ही  Observer व्हाल.

जाणणे ही ( Awareness )  मनाची अशी अवस्था होते की ज्यांत बघणाराला  Observer ला दुसरा मार्ग नसतो. कारण त्यांत तुम्ही व्यवहार बघता. क्रिया देता. जे जाणता, जे बघता त्याला तसाच स्विकार करीत नसता.

“मी याचे काय करु ”  ?  ”  हे मी बघीतल्या शिवाय कसा जाणू ”  ? म्हणजे तुमची लगेच क्रिया सुरु होते. तुम्ही नुसते जाणणे मान्य करीत नाही. हे काय आहे, कसे आहे, हे जाणत बघण्याचा प्रयत्न होतो. जसे एका सुंदर, सुवासीक, मोहक फुलाचे. तुम्ही फूल बघता. झाडावरुन तोडता. सुवास घेता. त्याच्या पाकळ्या वेगवेगळ्या करीत विश्लेशनात्मक त्या फुलाला बघण्याचा आणि जाणण्याचा प्रयत्न करीतात. म्हणजे ते फुल जसे आहे तसेच न जाणता, तुम्हाला वाटणाऱ्या प्रश्नांची त्या फुलासंबंधी उकलन करण्याचा प्रयत्न होतो.

”  ते काय आहे ”  ?    हेच बघणाऱ्यानी बघावे. परंतु जेंव्हा तुम्ही   ”  जाणता  ”  ( Aware ) त्यावेळी तुम्हाला वाटते     ” ह्याच्याशी मी काय करु ”  ?   म्हणजे ते काय आहे, ह्यापेक्षा ते कसे असावे, ह्यांत तुम्ही गुंततात.  फुल त्यातील   ”  सुवास Fragrance  ” हेच एक सत्य असते. तेच फक्त अनुभवायचे असते. परंतु फुल काय आहे, सुवास काय आहे, ह्याच्या पासून तुम्ही दुर जाता. सत्य जाणण वेगळ आणि तुम्हाला काय वाटत हे वेगळ.

येथेच तुम्ही  ”  परिस्थितीजन्य सदा संभ्रमी अवस्थेत राहता, हेच खरे ना ”  ?

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-   bknagapurkar@gmail.com 

 

विवीध-अंगी     ***१४

ध्यान-साधने विषयी–

** ध्यानांत आमचे शरीर व मन शांत आणि केंद्रीत बनते. ज्यात मिळतो आनंद (Joy) , शांतता (Peace), आणि सहजता( Ease). आम्ही जाणीवेत श्वास घेवू शकतो. हे ध्यानांत व इतर वेळी देखील.

**  श्वासोच्छासाच्या जाणीवेत (Awareness of breathing ) हे करणे शक्य आहे.

१.       मी शरीर मनाला शांत करतो

Breathing in- I calm my body

२.       विश्रांत होत चेहऱ्यावर स्मित उमटते

Breathing out- I smile

३.       माझ्या बैठकींत मी विचाररहीत होतो

मी फक्त बसतो. जाणतो की मी कोठे आहे

Dwelling in the present movement

४  हा क्षण आनंदाचा (Joy) आहे. स्थिर (Stable) आहे. सहज ( Ease )आहे.

आणि आमच्यांत समावणारा आहे. आमचा श्वास आमच स्मित आणि नैसर्गिक सत्य

I know this is a wonderful moment

**  श्वासोच्छास घेताना आम्ही म्हणू-

शांतता       —                   Calming

स्मित, आनंद   —                Smiling

हा क्षण            —               Present Moment

विस्मयकारक क्षण    —     Wonderful moment

**     आत  ( In )         —                  बाहेर  ( Out )

दिर्घ   (Deep )        —                 हलके  ( Slow )

शांत  ( Calm )       —                   सहज  ( Ease  )

स्मित (आनंद)  ( Smile )        —     आराम ( विश्रांत वा मुक्त)  ( Release)

आताचा क्षण ( Present moment )  — विस्मयकारक क्षण ( Wonderful moment )

हे सहजगत्या व सदैव अनुभवावे, बसता, उठता, चालता, अथवा कोणतेही कार्य करता

 

  

* निसर्ग व्याप्ती

जीवनाच्या रगाड्यातून-

*  निसर्ग व्याप्ती

उंच चढूनी हिमालयी,      झेंडा तो रोविला

गीरीराजाचे शिरावरी,      विजय संपादिला

उंचाऊनी  बघे मानव,      अथांग जगताला

विज्ञानाच्या जोरावरती,   अंतराळात गेला

युगा युगाचा चंद्रमा,       केला अंकित त्याने

त्याच्या देही ठेवी पाऊल,   मोठ्या अभिमानाने

अगणित दिसती गृहगोल,      त्याचा दृष्टीला

सीमा न उरली आता मग,      चौकस बुद्धीला

चकित होतो प्रथम दर्शनी,      विज्ञाना बघता

दिसून येती अनेक गुढे,    एक एक उकलता

किती घेशी झेप मानवा,       उंचउंचगगनी

वाढतजातील क्षितिजे,     तितक्याच पटींनी

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-  bknagapurkar@gmail.com

विवीध-अंगी     ***१३

सुनेच्या रुपांत त्याला    स्वतःची मुलगी दिसते

आणि ‘मलगी ही परक्याचे घन ‘   ह्याची जाणीव होते

सेल्स ” पिंडी ते ब्रह्माडी

जीवनाच्या रगाड्यातून –

सेल्स   पिंडी ते ब्रह्माडी״

वैद्यकीय शिक्षण काळातील सुरवातीच्या शैक्षणिक वर्षांची अचानक आठवण झाली. प्राध्यापक  शरिर रचना शास्त्र व त्याच्या क्रिया यावर भाष्य करीत होते. देह त्यातील अनेक अवयवांनी बनलेली असतात. अनेक टिशूंच्या समूहातून प्रत्येक टिशूमध्ये प्रचंड प्रमाणात सेल्स असतात. सेल्स या शरिराचा अत्यंत सूक्ष्म व शेवटचा भाग समजला गेला आहे. ज्यांची गणती करता येणे केवळ अशक्य असते. इतक्या प्रचंड प्रमाणात त्यांची संख्य असते. एका मानवाच्या देहातील सेल्सची संख्या या जगातील सर्व मानव जातींच्या संख्येहून जास्त असल्याचे दिसते इतकी ही मोठ्या प्रमाणात आहे.

या सूक्ष्म अशा सेल्सची माहिती ऐकताना खूपच मनोरंजक, वेधक व ज्ञान प्रधान वाटली. सूक्ष्म सेल्स म्हणजे साध्या डोळ्यांना दिसणे केवळ अशक्य. अद्ययावत असलेल्या सूक्ष्म दर्शक यंत्राच्या साहाय्याने तिला बघता येते. गोलाकार आकार, केंद्रस्थानी पुन्हा छोटासा भाग, ज्याला न्युक्लीयस म्हणतात. सभोवताली द्रवयुक्त पदार्थ ज्याला प्लाझ्मा म्हणतात. ढोबळ मानाने सेल्सचे गुणधर्म जाणून घेवू लागलो. या सेल्सची वाढ एकाचे दोन, दोनचे चार, चारचे आठ अशी होते. त्याचप्रमाणे त्या नाशही पावतात (disintegration). देहाला मिळणाऱ्या प्राणवायू व अन्नातून याना पण अंशात्मक प्राणवायू व खाद्य पदार्थ मिळतात व त्याचे शोषण केले जाते. या पदार्थातील ऊर्जाशक्ती ते ग्रहण करतात आणि त्यांचे जीवन चक्र ठेवतात. सेल्सच्या हालचाली मधूनच पुन्हा उर्जा निर्माण केली जाते.  सर्व सेल्समुळे एकत्रीत उर्जा अवयवांना व शेवटी देहाला मिळते व शरीर मनाचे कार्य सतत चालू राहते.

ढोबळ मानाने प्रत्येक जीवंत शरीराचे जे नैसर्गिक कार्य असते. जसे श्वासोच्छवास (respiration) पुर्नउत्पादन (Reproduction) आणि प्रतिक्रिया (Reaction) वा इतर गुणधर्म हे सारे संपूर्णपणे त्या अवयवांच्या एका छोट्याशा (Cell) सेल्स मध्येही प्रतिबींबित होतात. म्हणजे जे नैसर्गिक कार्य शरीर करते तेच कार्य ती सेल्स स्वतंत्रपणे करते. ऊर्जा मिळवणे, तयार करणे व तीचा उपयोग करणे. हे देखील देहाच्या सर्व कार्याची जणू सेल्स प्रतिकृती समजल्यास योग्य ठरेल.

शरीराच्या बाहेरील अनेक सूक्ष्मजीव जंतू जसे जीवाणू, विषाणू हे अनेक मार्गानी शरीरात प्रवेश करतात. शरीरामधल्या सेल्सशी त्यांचा संघर्ष होतो. आपसात दोघांमध्ये द्वंद होते. अर्थात बळी तो कान पिळी वा सशक्त तो जगतो, तरतो या तत्त्वानुसार केव्हा ते बाहेरुन प्रवेश करणारे जीव नष्ट केले जातात वा देहामध्ये सेल्स नष्ट होतात. संघर्ष जीवन मरणाची स्पर्धा या अविरत चालू असतात.

२             जसे बाह्य जगात सुद्धा मानवी देहाला अनेक प्राणीमात्र वा जंगली जनावरांशी सतत संघर्ष करावा लागतो. जो वरचढ त्यात ठरेल तो जगतो. हे देहाचे चक्र सतत चालू राहते. त्यात ऊर्जा घेतली जाते तशी उत्पत्ती होऊन वातावरणांत सोडली जाते.

मानव वा प्राण्यांच्या हालचाली, जमीन, जंगले, झाडे, डोंगर, नद्या, पर्वत अशा अनेक प्रकारांनी जगाचे रचनात्मक कार्य चाललेले दिसते. स्थिरता आणि चंचलता दोन्ही बाबी मानवी कल्पनेच्या प्रचंड प्रमाणात पसरलेल्या विखूरलेल्या प्रत्येकजण बघतो. जसे विश्व व त्याचा संसार असतो. तशाच प्रकारे जीवाच्या प्रत्येक देहात देखील त्याच प्रकारची रचना आणि कार्य चालते.

सूक्ष्म नजरेने जर विचार केला तर अगदी त्याच धरतीवर त्याच पद्धतीने प्रत्येक कार्य व त्याचा कार्यभाव हा त्या छोट्याशा सेल्समध्ये पण होत असल्याचे प्रखरतेने जाणवते. कदाचित यालाच म्हटले असेल ‘जे ब्रह्मांडी ते पिंडी’ संपूर्ण विश्वाच्या हालचाली केवळ त्या छोट्याशा सूक्ष्म सेल्समध्ये प्रतीत होणे व त्याची जाणीव होणे येथेच त्या परमात्म्याची महानता, कल्पकता, योग्यता आणि दिव्यता याची जाणीव होते. ‘जे स्थूलात ते सुक्ष्मांत ‘  यालाच म्हटले आहे. जर विश्वाच्या प्रत्येक योजनांची झलक सूक्ष्म सेल्स वा सूक्ष्म परमाणू (निर्जीव) या युनिट मध्ये असेल तर त्या ईश्वरी अस्तीत्वाची कल्पना समजणे सोईचे व सुखकर वाटेल. तो परमात्मा आपल्या दिव्य शक्ती रुपाने चरा चरामध्ये सर्वत्र भरलेला आहे. त्याची स्पष्ट प्रचिती येते.

देह कुणाला म्हणायचे? अनेक इंद्रियांचा (अवयवाचा) समुह, या इंद्रियांचे आकार निरनिराळे, रचना निरनिराळी आणि प्रत्येकाचे कार्य देखील एकदम भिन्न भिन्न आहेत. प्रत्येक इंद्रियामध्ये प्रचंड प्रमाणात टिश्यूज व असंख्य प्रमाणात त्यांचे सूक्ष्म घटक सेल्स या सर्वत्र स्थिरावलेल्या असतात. प्रत्येक सेल्सची (वैयक्तीक) एकमेकांशी बांधणी केलेली असते. अनेक सूक्ष्म सेल्सचा एक एक समुह बनत मोठा समुह बनतो. हे सर्व समुह सूक्ष्म अशा रेषा वा केसरेषांनी बांधलेल्या असतात. त्या सूक्ष्म नलीका असतात. त्यामुळे अवयवातील सर्व टिशू, सेल्स समुह वा थेट वैयक्तीक सेल्स या सूक्ष्म नलीकांच्या द्वारे एकमेकांच्या सतत संपर्कामध्ये येवू शकतात. सूक्ष्म नलिका या झाडांच्या फांद्याप्रमाणे वा मुळ्याप्रमाणे आकारांनी व पसाऱ्यांनी वाढत वाढत जातात व त्या मोठा समुह, अवयव व नंतर अनेक इंद्रिये यांच्याशी सहज संपर्कामध्ये येतात. शरीराचे एकूण सांघिक कार्य चालते. सुसूत्रता जाणवते (well coordinated function of body) तिचे प्रमुख कारण प्रत्येक अवयवांचा आपापसातील संपर्क. तो थेट त्याच्या सूक्ष्म भागापर्यंत (सेल्स या युनिटपर्यंत) असतो. या नलिकेमधूनच द्रवरुप पदार्थ (रक्त, प्लाझ्मा, लिम्फ इत्यादी) संपूर्ण देहामध्ये प्रवाहीत असतात. प्रत्येक अवयवांनी केलेले कार्य, सूक्ष्म पदार्थांची निर्मिती, हवा पाणी अन्नाचे घटक, ऊर्जा शक्ती इत्यादी अनेक वस्तूंचे वाहन या द्रवरुप घटकामधून याच नलीकामार्फत होतात. ३            नलीका जशा पोकळ असतात, त्याच धरतीवर भरीव नलीकांचे पण सर्वत्र जाळे पसरलेले असते. यामधून अवयवांचे कार्य संदेश याचे वाहन होत असते.

देहाचे संपूर्ण स्वरुप, रचना आणि कार्य प्रणाली म्हणजे ऊर्जा ग्रहण करणे व ऊर्जा निर्माण करणे. त्या ऊर्जाच्या लहरी सर्व देहांत व देहाबाहेरील वातावरणांत पसरतात. देह हे सर्व कार्य अर्थात ऊर्जा संबंधीचे, देहामधला सूक्ष्म घटक सर्वात शेवटचा भाग जी सेल्स असते तिच्यामार्फत करतो. खऱ्या अर्थाने देह जे कार्य करतो, असे भासते. तेच कार्य त्याच्या प्रत्येक सेल्स मार्फतच केले जाते. त्या करोडो सेल्सच्या एकत्रीत आणि सांघिक कार्य प्रणालीचा जेव्हा परिणाम दिसतो, तेव्हाच संपूर्ण देहाचे कार्य नजरेत भासू लागते.

याच संबंधाने एक गोष्ट स्पष्ट व्हावी . संपूर्ण देह, त्याची अवयवे (इंद्रीये) टिश्यूज, सेल्स, नलीका, नसा, रक्त, द्रव पदार्थ इत्यादी हे सर्व स्थूल वा सूक्ष्म असून एक रचनात्मक वेगवेगळे घटक आहेत. (केवळ समजण्यासाठी) प्राण वा जीव वा आत्मा हा देहामधला भिन्न भाग असतो. तो चैतन्य (अथवा) ऊर्जा स्वरुपात असतो. संपूर्ण शरीरभर तो पसरलेला असतो. देहाशी तो एकरुप झालेला असतो. त्याला देहापासून वा देहाला त्याच्यापासून अगल करता येत नाही. ती फक्त देहाची शक्ती असते. म्हणजे देहाचा अथवा त्या सेल्सचाही सजीवपणा हा त्या प्राण शक्तीमुळेच असतो.

जीव हा जर ऊर्जा स्वरुप असेल तर प्रत्येक सेल्सच्या अंतरंगातून पसरत जात टिशूंमधून पुढे अवयवामधून सर्व शरीरांत पसरत जात, शरीरातील प्रत्येक घटक पदार्थामध्ये एकरुप होतो. रचनात्मक पद्धतीने देह व जीव एकमेकांशी अभिन्न असले तरी दोघांचे कार्य निरनिराळे असतात. मेंदू मधल्या बुद्धी व मनाच्या संस्काराप्रमाणे, विचारांच्या वाढीप्रमाणे देहातील इंद्रिये कार्यरत असतात. जीव वा प्राण फक्त देहाला ऊर्जा देण्याचे कार्य करतो. त्यामुळे कार्य त्याचे स्वरुप व होणारा परिणाम याच्याशी फक्त देहच जबाबदार समजला जातो. देहातील जीवाशी अर्थात ऊर्जेशी याचा संबंध नसतो. हे सर्व साधारण गणीत.

देहाच्या सेल्सचे अर्थात सूक्ष्म घटकाचे, देहाचे, जगाचे आणि प्रचंड अशा विश्वाचे, एक विलक्षण नाते संबंध असल्याचे जाणवते.  गंभीर विचारांनी चिंतन केल्यास त्यातील सत्य लक्षात येते. सजीवामधील सूक्ष्म घटक सेल्स आणि निर्जीव पदार्थामधला सूक्ष्म घटक अणू हे होय. सेल्स व अणू ऊर्जा निर्मीतीचे स्त्रोत आहेत. त्यांच्या स्थरावर सतत ऊर्जा निर्माण होते.

सेल्समधील निर्मित ऊर्जा सर्व देहाच्या माध्यमांनी बाह्यांगाशी संपर्क करते. तिचा संबंध हवेच्या माध्यमाशी होतो. अशाप्रकारे प्रत्येक सजीव प्राण्यामार्फत ऊर्जा सतत निर्माण होवून वातावरणामध्ये वाहत असते. वातावरणामधल्या हालचाली, बदल, वारा, वादळ, पाऊस इत्यादी या एकत्रीत झालेल्या ऊर्जा शक्तीचा परिणाम होय. हा परिणाम सर्वांना दिसतो, भासतो. जो आपणांस दिसत नाही, भासत नाही. असे अनेक गोष्टी या जगात

४        असतात. जसे पर्वत, पठारे, दऱ्या अथांग सागर इत्यादी या सर्वांत देखील ऊर्जेची निर्मिती होत असते.

श्री कृष्णांनी ईश्वराच्या स्वरुपाचे वर्णन श्री भगवद्‍गीतेमध्ये केलेले आहे. त्यांनी अर्जुनाला आक्राळ विक्राळ अशा त्या देहाचे दर्शन देखील दिव्य दृष्टी देवून दाखविलेले आहे. सारे विश्व, जग हा सारा संसार ज्यात दिसले. हवा, पाणी, सागर, पर्वत, धबधबे, जंगल, सर्व प्राणीमात्रे, जीवजंतू, नदी नाले सारे सारे या जगांत सामान्यांना दिसतात. त्याचप्रमाणे चंद्र, सूर्य, तारे आणि या विश्वातील पोकळीत असणारे ग्रहगोल इत्यादी. हा सारा प्रचंड पसारा त्या परमात्म्याचेच स्वरुप असल्याचे श्री भगवत गीता म्हणते. हे सारे प्रचंड स्वरुप जणू त्याचाच देह आहे. आपल्या सजीव देहाप्रमाणे या जगाची (वा विश्वाची) जी ऊर्जाशक्ती सर्वत्र विखूरलेली आहे. तिच या विश्वाचा जीवात्मा वा प्राण नव्हे काय. आपला देह व जीव जसे एकरुप आहेत, तसेच हे विश्व व त्याचा जीवात्मा एकरुप असून जगाचे कार्य चालत राहते. देहजीव व त्याचा सूक्ष्म घटक सेल्स याचे कार्य जीवन चक्र आणि ऊर्जा निर्मिती व उपयोग हा आपणास जाणवतो. त्याचप्रमाणे हे विश्व (जग) त्याचा आत्मा आणि सूक्ष्म कणातील अणू ऊर्जा हे सारे त्याच प्रमाणे नव्हे काय? हे सारे विश्वच मी आहे “माझे स्वरुप आहे” ज्याला आपण परमात्मा म्हणतो. याची सत्यता पटते. जे सूक्ष्मात ते दिव्यात (स्थूलात) जे पिंडी ते ब्रह्मांडी हे तत्त्वज्ञान पटू लागते. त्याचप्रमाणे श्री शंकराचार्यानी सांगितले की फक्त ब्रह्म सत्य आहे व जग मिथ्या आहे. हे महान तत्त्वज्ञान देखील एक सत्यवचन वाटते. कारण देह नष्ट होतो. आत्मा अमर आहे. तसेच हे दिसणारे भासणारे पदार्थमय (materialstic) जग देखील नाशवंत आह. परंतु त्यातील परमात्मा अविनाशी व अनंत आहे. आपण त्या परमात्म्याला बघण्यासाठी त्याचे दर्शन मिळण्यासाठी अहोरात्र सतत प्रयत्नशील असतो. पण कसे व कोठे मिळणार त्याचे दर्शन. मी जर रोज मलाच बघतो, मी जर रोज या दृष्टीक्षेपातल्या सर्व वस्तूंना बघतो, तर हेच सारे परमात्म्याचेच स्वरुप आहे. आपण बघतो पण जाणत नाही. आम्हांला फक्त ते जाणवायचे आहे. तेव्हाच परमात्म्याचे दर्शन झाल्याचा परमानंद, समाधान मिळेल. तुमच्या शरीरामधील सूक्ष्म सेल्स जी अंशात्मक ईश्वराचे रुप आहे. तिच्याच आधारे तुम्ही त्या अनंताला जाणू शकाल.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-  bknagapurkar@gmail.com

विवीध-अंगी     ***12जीवनामध्ये आकाशांत पतंगाप्रमाणे उंच जायच असत

मात्र वारा नेयील तसं भरकटायच नसतं

 

 

निसर्गाची अशी ही खेळी

जीवनाच्या रगाड्यातून-

निसर्गाची अशी ही खेळी

एक आमेरिकेच्या वैद्यकीय मासिकांत, वैद्यकीय जीवशास्त्र Biomedical Science ह्याच्यावर आधारीत एक अहवाल वजा लेख वाचण्यांत आला. लेख मनोरंजक परंतु खुप माहीतीपर होता.

पुरुष बीज आणि स्त्री बीज ह्यांच्या संयोगाने, स्त्रीच्या गर्भांत नवीन जीवाची उत्पत्ती व वाढ होऊ लागते.  त्यांत दोन्ही लिंगांचे समसमान गुण एकत्रीत होतात. बस फक्त येथपर्यंतच दोन्ही बीजांचा सहभाग. नंतर मात्र गर्भ — बीजधारणा, बीजांकुर, त्यांची वाढ, नवजीवाला जन्मला घालणे, त्याला जगामध्ये स्वतंत्र अस्थित्व देऊ करणे ह्या सर्व स्त्री तत्वाशीच संबंधीत भाग असतो. पुरुषाचा सहभाग, पुरुष बीज जो गर्भधारणेतील एक भाग, येथ पर्यंतच मर्यादेंत कार्य रहाते. जरी महत्वाचे असले तरी. वैद्यकीय रीपोर्ट मधील Biological Science सांगते की कोणतेही मुल फक्त स्त्रीचेच. जीच्या गर्भामध्ये प्रथम रुजून, उगम पाऊन, मार्ग काढीत जगांत पदार्पण केलेले असते. त्या Biological Scientist नुसार नवबालकाच्या जन्मचक्रांत पुरुषांचा फक्त सात (७ %) टक्के इतका सहभाग असतो. ह्या वुलट बाकीचा त्र्याणव (९३ %)  टक्के इतका सहभाग स्त्रीचा असतो.

हासू येते बघा. काय ही दादागिरी पुरुष वर्गाची ? वंश निर्मीतीमध्ये त्याचा अल्प सहभाग असतो. तरी त्याने अडदांड, रानटी, व अहंकारी वर्तनाने स्त्रीयाना सतत आणि प्रत्येक बाबतीत दुय्यम ठरविले. आपला खोटा मोठेपणा प्रस्थापित करण्याचे दुःसाहस केले आहे.

पुरुष बीज , स्त्री बीज ही दोन बीजे एक होतात. दोनचे एक हे पहीले गणित. नंतर पुन्हा एकचे दोन हे दुसरे गणित. दोनचे चार, चारचे आठ, आठचे सोळा, सोळाचे बत्तीस ह्या प्रमाणे चक्र सुरु होते. व त्यांची झेप वेगाने व पटीत होत जाते. प्रचंड वाढ व आकार घेत गर्भ वाढतो.

अचानक माझ्या डोळ्यासमोर ‘सलीम’ आला. हो ओळखलत तुम्ही. तोच ‘शहींशहा जहांगीर.’  वडील थोर शांत स्वभावाचे राजे अकबर आणि आई राजपूत घराण्यातली एक आक्रमक व्यक्तीमत्व जोधाबाई. दोघांच्या मिलनातून जन्माला आला राजकुमार शहजादा  सलीम अर्थात जहांगीर. ज्याच्यामध्ये त्या Biological Scientist नुसार  होते जोधाबाईचे ९३% सळसळणारे गुणधर्म. ज्याने पुढे सुंदर युवती अनारकलीच्या प्रेमापाई जन्मदात्या बापाशीपण बगावत केली होती.

७ %  अकबर राजाचे व  ९३ % राजपुत जोधाबाईचे गुणांक.

तरी संस्कार, धर्म, परंपरा, सामर्थ्य, शक्ती, व मुख्य म्हणजे सत्ता. ह्यांच्या प्रचंड माऱ्याने त्याला राजशाही वंशावळीतच जावे लागले. ह्याला लोक मान्यता होती.

कसा टिकेल त्या रुळलेल्या वैचारीक चक्रांत तो   Medico Biological Scientist. त्याच्या अभ्यासाला, सुत्राना, पहाणीला, अहवालाला, प्रथम इतर जगांतील त्याच क्षमतेच्या शास्त्रज्ञांचा वैचारीक दुजोरा हवा. हे मात्र एक इतिहासीक वैज्ञानीक सत्य आहे. की कोणत्याही प्रचलीत गोष्टीना नव्या विचारांनी जेव्हां धक्का दिला, सामान्य जनानी त्याला विरोध केला. काळ बदलला व समज वाढली की साऱ्या परंपरा बदलू लागतात.

निसर्गाची हीच यशस्वी खेळी ठरते. अज्ञानांत हे माझे म्हणणारे, ज्ञान मिळताच हे सारे तुझेच म्हणतात. पुरुष प्रधान संकल्पनेला धक्का पोहचणारा हा एक विचार असेल कां ?.

डॉ. भगवान नागापूरकर

90040798580

e-mail –  bknagapurkar@gmail.com

विवीध-अंगी     ***११माझा वर्तमानकाळ   चुका करण्यांत जातो

कदाचित् म्हणूनच भूतकाळ सदैव निराशजनक वाटतो

अशा ह्या दोन पुजा -2

जीवनाच्या रगाड्यातून-

अशा ह्या दोन पुजा -2

१ — पुढे चालू–

दुसऱ्या मित्राची पुजा—

५              वसंतराव माझे दुसरे मित्र. त्याचे सर्व विचार पुरोगामी होते. जे जे नाविण्य समोर येत असे, ते आत्मसात करण्याचा त्यांचा प्रयत्न असे. माणसाने सतत नवीन कल्पना,           योजना यांचा प्रथम अभ्यास करावा.  होवू घातलेला बदल हा कसा आहे, यावर निरीक्षण करावे. तो फक्त केवळ बदल करावे म्हणून नसावा. कांही तरी वेगळेच करावे हा हेतू नसावा. बदलाकरीता बदल ही संकल्पना नसावी. कारण कोणतीही कित्येक वर्षे चालत आलेली कल्पना, रुढी, समज, व्यवहार याचा प्रथम अभ्यास व्हावा. काळाच्या चक्रगती प्रमाणे, वेळ, पैसा, प्रयत्न व परिणाम ह्या त्या चालू रुढीने किती व्याप्त केला, हे समजून घेतले पाहिजे. त्यामधील तत्त्वज्ञान व त्याला साध्य करण्याचा मार्ग, ह्या दोन भिन्न बाबी आहेत. ध्येय चांगले असू शकेल. परंतू त्याला प्राप्त करण्याचा मार्ग हे काळाच्या बदलाप्रमाणे बदलावेच लागतात. पूर्वी व्यवहारामध्ये गोधन, सुवर्णधन हा प्रकार असे. तो संपूर्ण बदलून गेला. व्यवहाराची कसोटी पैशावर होवू लागली. आता तर वस्तूंचे मूल्यमापन करुन त्या वस्तूंची अदलाबदल हाच व्यवहार बनू लागला. ही काळाची गरज बनू लागली. तेंव्हा जीवनाच्या चक्रगतीत बदल ही परिस्थितीची गरज बनते. मूळ हेतू, मूळ उद्देश हा धागा मात्र कायम ठेवला जातो.

मी एकदा वसंताकडे गेलो होतो,  तो बैठकीत आराम खूर्चीवर बसला होता. मला बघताच त्याने माझे स्वागत केले व बसण्यास सांगितले. आम्हास दोघांना एका कामासाठी जावयाचे होते.

“बस मी देवपुजा संपवितो. मग आपण २० मिनीटानंतर निघूत”  मी त्याची वाट बघत बसलो. परंतु वसंता तेथेच बसला होता. देवघरांत वगैरे गेला नाही. वा समोर कोणतीही मूर्ती वा देवाची प्रतीमा नव्हती. तो शांत डोळे मिटून बसला होता. त्याच्यामध्ये मला कोणत्याच हालचाली दिसल्या नाहीत. किंवा जवळपास कोणतेही दैनंदिन पुजा साहित्य नव्हते. माझे लक्ष्य त्याच्याकडे होते व त्याचे लक्ष मला माहित नाही. डोळे मिटून तो शांत होता. जवळ जवळ २० मिनिटे. नंतर त्याने चेहऱ्यावरुन देहावरुन स्वत:चा हात फिरवला व फक्त नमस्कार केला. डोळे उघडले व म्हणाला “चल आता आपण जाऊत. मी बाहेर जाण्याचे कपडे घालतो.”   मला ते सारे नाविन्य वाटले. मी तसा उत्सुक होतो.

“अरे तू देवपूजा करणार होतास ना? काय झाले त्याचे. का फक्त ध्यानच लावून बसला होतास” “नाही तीच तर माझी मानस पूजा होती. ध्यान धारणा मी सकाळी उठल्यानंतर व रात्री झोपण्यापूर्वी करतो. पूजा मात्र स्नान, फराळ ही सारी दैनंदीन गोष्टी झाल्यानंतर करतो.”     मानस पूजेबद्दल तो सांगू लागला. “माझ्या मानस पूजेला कोणतेच बंधन वा नियम नाहीत. मी प्रथम माझी व घरातील इतरांची दैनंदीन सोय बघतो, जाणतो आणि नंतरच माझ्या पूजेचा आराखडा करतो. इतर सर्व बाबी प्रथम व पूजा ही संकल्पना नंतर. आपल्या सोईनुसार.  परंतु पुजा ही नियमीत, दररोज होतेच.

६            वेळेचे त्यासाठी कोणतेही बंधन घातलेले नाही. ” आधी पोटोबा आणि मग विठोबा ” म्हणतात त्याप्रमाणे. परंतु जेव्हा ते कार्य वा पुजाविधी मी हाती घेतो, तेव्हा त्या थोड्यावेळात इतर सारे विसरुन जातो. त्याक्षणी फक्त पुजेला प्राधान्य असते. बालपणापासून देवपूजेचे संस्कार पडलेले आहेत. बघून, ऐकून, वाचून इत्यादी. इतरांचे बघत आलो. वडीलधाऱ्याकडून ते करताना बघीतले. त्यांनी बरेच श्लोक, संस्कृत वाक्ये, सुभाषिते इत्यादी पाठ करवून घेतले. पूजा विधीमध्ये ते म्हटले जाई. हे सारे माझ्या अंगवळनी पडलेले होते. आता तर ते सारे सहजगत्या मुखातून येत होते. मात्र वयाप्रमाणे आजतागायात त्यांचे अर्थ समजले नाही. कळले नाही. माझ्याकडून तसा दुर्दैवाने प्रयत्नही झाला नाही. तो व्हावयास हवा.

संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज हे नितांत ईश्वर भक्त, पांडूरंग प्रेमी होते. त्यांच्या भक्ती व प्रेमाबद्दल सर्व सामान्यांना प्रचंड आदर आहे. परंतू ते पूजा विधी, कर्मकांड कधीच करीत नसे. ते फक्त मानस पूजा करीत असत. ‘मानस पूजेची’ संकल्पना त्यांच्याच अधिकार वाणी मधून सुरु झाली. सारी पूजा, सर्व पुजाविधी मनाच्या संकल्पने मधूनच करा. प्रत्यक्ष कोणतीही कृती करण्याची गरज नाही. शेवटी देह व मनाचा हा सारा खेळ असतो ना. देहाला शुचिर्भूत करा, स्थिर करा व शांत सोईच्या आसनावर बसा. जवळपास काही नको. पूजा विधी साहित्य, न समोर कोणती प्रतिमा. सारे सारे काल्पनीक असावे. परंतु मनाच्या धारणेमध्ये त्याची गुंतवणूक इतकी व्हावी की काहीही नसून, समोर सर्व काही सभोवताली आहे ही संकल्पना, हा भास व्हावा. त्यातच मन एकाग्र करावे. मनास त्या देवपूजेच्या भावनेत संपूर्ण गुंतवून टाकावे. शेवटी शारिरीक हालचाली, तुमचे दिसणारे, ऐकू येणारे हावभाव या सर्वाहून श्रेष्ठ व महत्त्वाचे असते ते तुमचे विचार व तुमच्या भावना. जर भाव तेथे देव ही संकल्पना असेल तर सर्व पूजा विधीत फक्त भाव भक्ती प्रेम याच आत्मीक बाबी  पूर्ण कराव्यात.

मानसिक पुजेतपण पंचमोचार अर्थात पाच विधी दाखविल्या आहेत. व दुसरे शेडपषोचार अर्थात १६ विधीने युक्त. प्रत्येक विधीला त्या त्या प्रमाणे मंत्र आहेत. त्यात योग्य पाठांतर, योग्य उच्चार व नंतर त्याप्रमाणे विधीपूर्वक व्हावेत ही अपेक्षा. शिवाय प्रत्येक विधीसाठी काही पदार्थांची, सामुग्रीची आवश्यकता असते. मात्र सारे काल्पनीक. ती आहेत असे समजून. जसे हळद, कुंकू, गंध, अक्षता, पंचामृत, फुले, फळे, नैवेद्य, आरतीचे सामान इत्यादी सारे काही. ही पूजा दाखविण्यासाठी, बघण्यासाठी वा काहीतरी शारिरीक हालचालीने केलेली वाटू नये. खरा आनंद भक्ती-भाव प्रेम एकरुप होण्यातच मिळतो. जो  पूजेचा गाभा आहे. त्यातच शिरावे व ते मनानेच. फक्त मनानेच कल्पनेमध्ये सर्व परिपूर्णता असते. त्याला अंत नाही. जेवढे विचार, जेवढी इच्छा उत्पन्न होईल तेवढी कल्पनेने ती साकार करता येते.

७           मी वसंताला विचारले तू मानसपूजा करतो म्हणजे नक्की काय करतो.

तो सांगू लागला, या सर्व  विधीमध्ये अपेक्षा असती तुमचे भाव, भक्ती, एकाग्रता, मनाची शांतता आणि समर्पण. खरे म्हणजे सर्व पूजा कर्मकांडामधील हा दुसराच भाग अत्यंत महत्त्वाचा व पुजेचा पायाच आहे, गाभा आहे, उद्देश आहे.

मी या सर्व क्रियामधला फक्त दुसराच भागाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करतो. ईश्वराची प्रमुख कल्पना, निरगुण, निराकार, सर्वव्यापी, सर्वज्ञ अशा पद्धतीने केलेली आहे. प्रत्येकाच्या समज शक्ती व लक्ष केंद्रीत होण्यासाठी त्याला सगुण रुप दिलेले आहे. त्यातून या पूजा विधीची संकल्पना. ईश्वर जरी महान, भव्य, दिव्य असला तरी मी त्याला सखा वा मित्र समजतो. ज्यात असेल आदरयुक्त प्रेम व जिव्हाळा आपल्या कोणत्याही खऱ्या मित्रावर आपले          जसे कोणतीही अपेक्षा न बाळगता प्रेम करतो तसेच त्या ईश्वर सख्यावर प्रेम करावे. मित्र म्हटला तर त्याला आपण आपल्या घरी बोलावतो, त्याचं स्वागत करतो, त्याला योग्य आसन देतो, त्याला राहण्याचा आग्रह करतो. त्याच्या स्नानादी गोष्टीची व्यवस्था करतो, त्याला प्रेमाने कपडे देतो, अत्तर, सुवासिक गंधांनी त्याला आनंदीत करण्याचा प्रयत्न करतो, त्याला चांगले दुध देतो, त्याला उत्तम मिष्ठान्न असलेले जेवण देतो. त्याला प्रेमाने आलिंगन देतो. त्याचा सहवास सदैव लाभावा ही इच्छा व्यक्त करतो. हे सर्व साधारण प्रत्येकजण आपल्या प्रेमळ, आवडत्या मित्राबद्दल करण्यास उस्तुक असतो. त्याच्याविषयी असलेली आपली जवळीक व्यक्त करण्याचा हा प्रकार असतो. पुजाविधीमध्ये अजून दुसरे काय असते. ह्यात ही प्रथम ईश्वराला सगुण रुपात समजले जाते. त्याला सखा व प्रेमळ मित्र समजले जाते. समोर असलेली मूर्ती हीच त्या ईश्वराचे स्वरुप समजले जाते. कारण जर निर्गुण समजले तर समोर लक्ष केंद्रीत करण्यात अडचणी येतील म्हणून त्याला मूर्तीरुपी आकार दिला गेला. त्याच मूर्तीवर वर सांगितलेल्या विधीमुक्त बाबी करणेच पुजा ठरते. त्यात देण्याचे आवाहन, आग्रह, आसन, स्नान, कपडे (वस्त्र), आहार, नैवैद्य या सर्वांचा अर्थ तसाच होतो. माझ्या मानस पुजे मध्येसुद्धा हेच सारे १६ विधी असतील. परंतु सर्व काही विचार, कल्पना यांना जागृत ठेवून करावयाचे असते. देवाचीच कल्पना, आवाहनाचीच कल्पना, आसनाचीच कल्पना, फळ, पुष्प, नेवैद्य, उदबत्ती, आरती इत्यादी कल्पनेच्या राज्यातच करावयाचे असते. शिवाय जर हे कल्पनायुक्त असेल तर विचाराची झेपही आकाशाला भिडणारीच असावी. चांगले, वाहते पाणी, गंगाजल, समुद्रातील (रत्नाकर) पाणी, सर्व प्रकारची सुवासिक फुले, उत्तम आहार, पंचपक्वानाचा इत्यादी जर सर्व सामुग्रीची अस्तित्व कल्पनेमधून असतील तर त्यात कोणताही कमीपणा, अडचण नसावी.

सर्व विधी व समर्पण हे विचार, कल्पना करीत भाव भक्ती व प्रेम यांनी युक्त करावे. एक वेगळाच आनंद मिळतो. या सर्व क्रियांमध्ये विचारांपेक्षा भावनेला जास्त समर्पित करावे.

८            मानसपुजेचा हाच तर गाभा असेल. फक्त आनंद व समाधान प्रत्यक्ष विधी विरहीत. मात्र सारे सारे तेच तसेच. सर्वात सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती मानस पुजा तुम्ही त्या निरगुण, निराकार, सर्वसाक्षी, सर्वव्यापी, अनंत अशा मूळतत्त्वाला समर्पित करणार. त्यातून त्यांच्या मनाला पटेल तेच व्यक्त करीत पुढे जाणार.

देवपुजे विषयी वसंतराव पुढे सांगु लागले.

देवपुजा याचा मूळ गाभा कोणता तर त्या ईश्वरीशक्तीला आदर, सत्कार, भक्ती हे समर्पण करणे. ईश्वराविषयी प्रेम व्यक्त करणे. त्याच्यासमोर अहंकाराच्या भावनांची थोडी देखील छाया पडता कामा नये. जे मानवी षड्‍रिपू आहेत ते मानसाच्या मनावर ताबा करुन असतात. त्यांना दूर सारुन केवळ प्रेम व भक्ती याचा संगम करण्याचा प्रयत्न असावा. हीच भावना त्या ईश्वराचे चरणी अर्पित व्हावी. हा मूळ हेतू असावा. तुमचे मन, तुमचा विचार, तुमच्या भावना ह्या तो तुमच्यापेक्षाही सूक्ष्म रितीने जाणतो. तोच तर त्याचा करता करविता आहे ना! त्याला तुमच्या श्वासापासून प्रत्येक हालचालीची संपूर्ण जाण असते. त्याला काहीतरी देण्यासाठी गळ घालतात. कोणताही विचार वा भावना यांची पूर्तता करण्यासाठी विनवितात. आपण करीत असलेली भक्ती, पूजा, आदर हे पणाला लावतात. केल्या गेलेल्या सेवेचे मूल्य त्याच्याकडून मागतात.  काहीतरी भौगोलिक, वस्तूनिष्ठ वा संसारिक गोष्ट मिळावी हाच त्यांचा अट्टाहास असतो. सुदैवाने काही मिळाले तर आनंदीत होतात व जर न मिळाले तर निराश होतात. बोल देखील लावतात. काही तर त्याला नावे ठेवून तो दयाहीन असल्याचा ठपका पण ठेवतात. ही सारे मानवी विचारांची मानसिकता असते.  ईश्वर हा काही न मागताच योग्य ते देतो.

ईश्वरी पूजेचा हेतू काही का असेना एक मात्र होण्यास मदत होते.  ते म्हणजे मनावर चांगले संस्कार होण्याची शक्यता असते. मानवी षडरिपूना  ईश्वर प्रेम भक्ती ही सतत दाबून ठेवीत असते.

देवपूज ही मनातून अंतरात्म्यातून उत्पन्न व्हावी लागते. It Should be from the bottom of heart.  वरवरचे, देखाव्याचे नसावे. तरच त्या भक्तीच्या प्रेमाच्या लहरी, त्यांच्यापर्यंत हलक्या होऊन वर जातात. मात्र जेव्हा त्यामध्ये देखाव्याची सुप्त भावना, उद्देश, मागणी, हेतू इत्यादी असतात, त्या लहरी जड होतात.  व तुमच्याच देहाभवती घुटमळत राहतात. कशा त्या जडत्व प्राप्त लहरी ईश्वराकडे जातील. तुमच्या मग तो प्रयत्न कोणतीही साध्य न होणारी साधना बनते. फक्त वेळेचा व आयुष्याचा एक प्रकारे अपव्यय होतो. दुर्दैवाने याची जाणीव त्या व्यक्तीला केव्हाच येत नाही. त्याचे सारे श्रम वाया जातात. तो एखाद्या घान्याच्या बैलाप्रमाणे फक्त चक्रगतीने त्याच जागेवर फिरत राहतो. प्रवास खूप पण जेथल्या तिथेच. हाती केलेल्या श्रमाचे कोणतेच साध्य मिळत नाही.

९         ईश्वराला आपला सखा समजा. हेच तर धनुर्धर अर्जून समजत होता. श्री कृष्णाच्या देवत्वाची महानतेची, दिव्यत्वाची त्याला संपूर्ण जाणीव होती.  आणि तरीही तो श्रीकृष्णाला आपला सखा अर्थात मित्र समजत होता. हेच प्रेमाचे नाते त्याला मानसिक व दैवीक बळ देत होते. तो त्या ईश्वरावर जसे प्रेम करी, तसाच त्रागा वा राग पण व्यक्त करी. हेच खरे प्रेमाचे बंधन होते. प्रत्येकजण आपल्या आईला अशाच प्रेम बंधनाच्या नात्याने संबोधीत असतो. ज्यामध्ये असते प्रेम, अधिकार, आदर व हक्क ह्या समीश्र भावना. खरे आणि खूप खोलवर रुजलेले हे जिव्हाळ्याचे संबंध असतात. असेच आपले संबंध, त्या ईश्वराकडे बघण्याचा दृष्टीकोण असाच असावा. ही भावना आदराबरोबर जवळीकपणा निर्माण करते.

ही तर न संपणारी कथाच असेल ना?

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail – bknagapurkar@gmail.com

विवीध-अंगी     *** १०दुजासाठी मी जे जे केले   आनंद देई मनास ते

मजसाठी जे करीत राहीलो  आठवण त्याची कधी न येते

 

अशा ह्या दोन पुजा- 1

जीवनाच्या रगाड्यातून-

अशा ह्या दोन पुजा- 1

एका मित्राची पुजा –

प्रत्येक व्यक्तीला ईश्वर सानिध्य, ईश्वर प्राप्ती याची आस्था ही बालवयापासून असते. कौटुंबीक संस्कार, धर्म संकल्पना आणि पौराणिक कथा, यांचा त्याच्या मनावर एक प्रकारचा पगडा आलेला असतो. अविकसित विचार धारा, समोरच्याचा प्रभाव व नाविन्य यामुळे प्रथम तो सारे मान्य करतो. विश्लेषनात्मक त्याची विचारसरणी झालेली नसते, जे काही ऐकले, समजले हे तो कोणते ही प्रश्नचिन्ह न करता मान्य करतो. मात्र हेच सारे त्याच्या त्या स्तरावर, रक्तामध्ये एकरुप होते. विश्लेषनात्मक वाढ होत जाणारे ज्ञान त्याला वेगवेगळ्या विचारसरणीच्या मार्गावर घेवून जाते. कोणते सत्य वा कोणते योग्य हे तर फक्त काळ व परिस्थितीच ठरवते. विचारांनी काहींमध्ये बदल होत जातो. परंतू काहीं मिळालेले मार्ग तसेच चालू ठेवतात. हा ज्याचा त्याच वैयक्तीक स्वभाव वा समज.

माझे दोन मित्र मी ज्यांच्या सहवासांत बराच काळ व्यतीत करतो, त्यांच्या स्वभावाची ठेवण यावर मी चिंतन केले. वैचारिक मार्ग खूपच भिन्न होते. साध्य एकच. साधना मार्ग मात्र वेगवेगळे निवडलेले. सत्य काय, चांगले कोणते हे तर त्या काळाच्या पडद्यामागे असलेले आमच्या जवळ असतात. ती कल्पना रम्यता व तर्क बुद्धी ज्याला जसे पटेल तोच त्याचा व त्या विचार पंथाचा योग्य मार्ग. आम्हास फक्त मिळते व कळते ते अशांनी अंगीकारलेले भिन्न मार्ग. त्यांच्या विचारांचीच एक झलक यांचे वर्णन –

एका मित्राची पुजा विधी—

एकनाथराव माझे मित्र. त्यांच्याकडे नेहमी जाणे येणे असे. त्यांच्या जीवनाचा दैनंदीन व्यवहार अत्यंत चाकोरीबद्ध असलेला होता. सर्व जीवन ईश्वरी सेवा या संकल्पनेत त्यांनी घालविण्याचा नियमच करुन ठेवला होता. निवृत्त जीवन जगत होते. जीवनातील तथाकथीत दैनंदीन व्यवहार यामधून अलिप्त झालेले होते. दैनंदिनीचे चक्र अगदी स्वत:भोवतीच निर्माण केलेले आढळून आले. देह आणि मनाला ते या चक्रांत गुरफटून टाकण्याचा प्रचंड प्रयत्न करीत होते. ईश्वर सर्वव्यापी, अनंत, सर्व शक्तीमान व दयावान आहे. ही त्यांची दृढ विश्वास व धारणा होती. ते योग्यही होते. त्यांचा पौराणिक कथांवर प्रचंड विश्वास व आदर होता. ते श्रद्धावान होते. प्रयत्नांनी ईश्वर दर्शन व प्राप्ती  होते, ही त्यांची मानसिक संकल्पना. विज्ञान, सत्याची कसोटी असल्या वैचारिक ज्ञानाला ते चुकीचे व धर्म परंपरेविरुद्ध असलेले विचार समजत असे. देवादिकांच्या कथांना अमान्य करणे म्हणजे ईश्वराचा अवमान केल्याप्रमाणे असते ही त्यांची ठाम समजूत.

त्यांच्या दैनंदिनीवर लक्ष दिले तर त्यांच्या प्रयत्नांमध्ये अनेक गोष्टी दिसून येत असत. प्रात:काळी म्हणजे घड्याळ्यांत चारचे ठोके पडले की ते उठत. कुणाचीही झोपमोड न करता प्रात:विधी आटोपून घेत. आपणच पाणी गरम करणे व स्नानाधी गोष्टी ते नियमाने आटपून घेत असत. दांडीवर वाळवण्यासाठी टाकलेले धोतर व शर्ट हा त्यांचा पेहराव असे. सर्व कांही २            आटपून ते पाचच्या सुमारास देवपुजेसाठी मांडी घालून पाटावर स्थानपन्न होत असत. त्यांचा पूजा विधी साधारण तीन तासापर्यंत शांततेने केला जायचा.

त्यांचे देवघर हा एक संशोधनाचा विषय होता. अतिप्रचंड असे देवघर आणि त्यामध्ये मोजण्यास कठीण होतील इतकी देवाधिकांची संख्या होती. अर्थात वैयक्तीक क्षमता कमी पडत असल्यामुळे ३३ कोटी देवांना तेथे स्थानापन्न केलेले नव्हते. मात्र त्यांची वैचारिक जडण-घडण ही तशीच बनलेली होती. जर जागा असेल तर ती संकल्पना पूर्ण करण्याची त्यांची तीव्र इच्छा होती.

त्यांनी फारसा प्रवास केला नसला तरी परिसर, गांव, प्रांत ह्याच्या भोवती बरीच भ्रमंती केलेले होती. मुख्य उद्देश जे जे म्हणून देवूळ वा देवालय म्हणून माहितीच्या टापूत येईल तेथे हमखास जावून आले. प्रत्येक देवळाचे एक स्थान महात्म असते. त्याच्या मूर्ती वा देवतांच्या विषयी आख्यायिका असतात. हे अशा आख्यायिका ऐकण्यात व त्या देवळांना हमखास दर्शन देण्यात नुसतेच उत्सुक नव्हते. तर बैचेन झालेले दिसत असे. देवदर्शन, तेथे पूजा भजन, साष्टांग दंडवत प्रसाद इत्यादी विधी अतिशय उत्साहाने पूर्ण करीत. गमतीची गोष्ट म्हणजे त्या त्या देवांच्या तसबीरी अथवा मुर्त्या जे जे व जसे मिळेल ते ते जमा करुन आणणे हा त्यांचा छंद होता. अशा जमविलेल्या सर्व देवतांना ते दैनंदिन पुजेमध्ये सामील करीत असत. त्यामुळे अनेक मुर्ती अनेक फोटो तसबीरी त्यांच्या देवघरांत होत्या. त्या सर्वांना मानाचे स्थान देवून, त्यांनी त्यांना देवपूजेचा सन्मान दिला होता. भावना व श्रद्धा यांच्या ते संपूर्ण आहारी गेलेले होते. असे तुम्ही का करता? असा जर कुणी त्यांना प्रश्न केला तर ते पटकन म्हणतात, “तुम्ही नास्तिक आहात. देवाबद्दल श्रद्धा नाही आहे, विश्वास ठेवा, सर्वात तुम्हाला देव दर्शन घडेल.”  जीवनाचा फक्त एकच उद्देश व अर्थ त्यांनी गृहीत धरला होता आणि तो म्हणजे ईश्वर सेवा. त्यांच्या ईश्वर सानिध्यासमोर अनेक मूर्ती, अनेक तसबीरी होत्या. ज्या ज्या ईश्वरनामाचा व वर्णनाचा महीमा त्यांनी कोठेही ऐकला, त्याचवेळी त्याची प्रतिमा त्यांना प्राप्त केली. मग ती कोणत्याही रुपामध्ये. त्यांनी अत्यंत आदराने त्या देवतेला देवघरांत स्थान दिले होते. अशावेळी एकाच देवतेचे अनेक फोटो वा मूर्ती ह्यादेखील त्यांच्या देवघरांत होत्या. निरनिराळे आकार, जसे त्या प्राप्त होत गेल्या त्या प्रमाणे, सर्व देवगणांपैकी कुणीतरी त्यांच्यासाठी दयावान होईल ही श्रद्धा.

देवपुजा ही त्यांची १६ विधींनी युक्त असे. षोडपोशोचार पद्धतीने. मात्र त्यासाठीचे विधीवत मंत्र त्यांना पाठ नव्हते. केव्हाच म्हटले नव्हते, ते पाठांतर करावयाचे असल्यामुळे त्यांचा तो प्रयत्नही नव्हता. त्या मंत्राचा अर्थही त्यांनी जाणून घेण्याचा, केव्हाच प्रयत्नही केला नाही. फक्त त्यांची विधी जाणून घेतली व ती अत्यंत काटेकोर पद्धतीने पूर्ण करण्याचा त्यांचा कटाक्ष असे. त्यांच्या या कृतीला जर प्रश्न चिन्ह केला तर त्यांचे उत्तर असावयाचे “आहो सारे भावनेने करा, काय गरज असते तेच मंत्र म्हणण्याचे”

३                   मात्र त्यांनी बालपणी पाठ केलेली रामरक्षा, भगवद् गीतेचा पहिला अध्याय आणि काही मनाचे श्लोक, हे त्यांचे सारे विधी कर्म साधन. याच मंत्राचा ते उच्चार करीत संपूर्ण देवपूजा करीत असत. सर्व विधींच्या पायऱ्या ते व्यवस्थीत पूर्ण करीत. मात्र योग्य त्या मंत्राविणा. जर काही विसरले तर अधून मधून नामस्मरण हा आधार त्यांना अत्यंत प्रिय वाटे. नामस्मरणात प्रचंड शक्ती असून त्याच्या समोर कोणतेही मंत्र तंत्र दुय्यमच होत. अशी त्यांची संकल्पना होती. कदाचित हा त्यांचा पाठातरांचा प्रश्न असावा.

पुजा साहित्यामध्ये ते फार चोखंदळ होते, जेवढी उपलब्ध होतील ती फुले, पाने, दुर्वा ते आणीत. सर्व रंगाची फुले जमा करण्यासाठी ते प्रयत्नशील असे. अनेक देवांना अनेक रंगाची व तीच फुले प्रिय असतात. हे त्यांच्या मनाने घेतले होते. निरनिराळ्या धार्मिक पुस्तकामधून त्यांना ही माहिती मिळाली होती. ते या गोष्टीचा फार आदर करीत. मानवाप्रमाणे ईश्वराच्या देखील आवडी निवडी असतात. हा त्यांचा प्रचंड विश्वास. त्यात ते आग्रही होते.

गंध म्हणजे चंदनाच्या घर्षनातून प्राप्त झालेले असावे. सहान व खोड ही भलीमोठी त्यांनी बाळगली होती. अष्ट गंध, सुवासीक अत्तर यांचे मिश्रण करण्यात ते फार उत्सुक असत. गंधाचा कसा सुमधुर वास यावा हे त्यांना प्रिय होते. त्यासाठी ते प्रयत्नशील देखील होते. यांच बराच वेळ मात्र ते खर्च करीत. वेळ ही संकल्पना, वेळेचे महत्व, त्यांना त्यांच्या विधीसमोर दुय्यम असे. कितीही वेळ खर्च होवो, सर्व काही शिस्तीने व पद्धतशीर करण्यात त्यांचा प्रयत्न असे. नैवेद्याला दररोज एखादे फळ व दुध, गुळ खोबरे यांवरच ते भागवित असत. प्रथम प्रथम नैवेद्यासाठी कोणतातरी ताजा गोड पदार्थ मिळवण्यात ते आग्रही होते. परंतू अडचण लक्षात घेवून त्यांनी त्यात सोईचा मार्ग पत्कारला. सर्व काही विधीयुक्त करण्याचा त्यांचा कटाक्ष होता. मंत्राना मात्र त्यांनी बगल दिलेली होती. मंत्र पाठ नाहीत व आता वाढत्या वयांत ते पाठ करण्याचा प्रयत्न शक्य नसल्याचे त्यांचे विचार. परंतू सर्व विधीसुद्धा ते त्यांनी बालपणी केलेले, बघीतलेले वा कुणीतरी घरांतील वडीलधाऱ्या व्यक्तीने त्यांना सांगितलेले. पूजा अर्चा या विधीमध्ये असलेले तज्ञ वा पंडीतजी किंवा गुरुजी यांच्याकडून सर्व रितसर समजावून घेण्याचा प्रयत्न त्यांनी कधीही केला नाही.  व ते त्याबद्दल फार उत्सुकही नव्हते. जसे आपल्याला कळेल, समजेल व जमेल तसेच करावे. मात्र त्यातच शिस्त व नियमीतपणा असावा.

पूजेमध्ये मात्र त्यांनी अनेक आरत्या पाठ केलेल्या होत्या. त्या सर्वच दररोज म्हणत. परमेश्वराची नाराजी व त्यामुळे त्याची अपेक्षीत अवकृपा ही बाब त्यांच्या विचाराने, मनाने फार गंभीरतेने घेतली होती. माझे आयुष्य संसार हे सर्व त्याच्याच कृपादृष्टीने असते. त्यात कोणतीही चूक वा दुर्लक्ष होऊ नये. नसता त्याप्रमाणे परिणाम, तुम्हास भोगावे लागतात. हा त्यांचा दृढ विश्वास होता. त्यामुळे ते सतत दबावाखाली जीवन कठीत असल्याचे भासे. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सारे वागणे, व्यक्त करणे सर्व काही त्या समजल्या गेलेल्या

४          ईश्वराविषयीच फक्त. संसारातील दैनंदीन संबंध, हीतसंबंध, वागणूक, गरजा, धडपड, आशा इत्यादी बाबतीत मात्र ते अत्यंत सामान्य माणसाप्रमाणेच वागत. स्वार्थ-निस्वार्थ राग लोभ ह्या भावनिक चक्रात मात्र ते प्रसंगानुसारच वागत. येथे त्यांचा ईश्वर केव्हांच मध्यस्थी करताना त्यांना समजला नाही. ईश्वरांची सर्व कर्मकांडे विधीवत व्हावयास हवी ही त्यांचा पक्की व अंतरिक धारणा होती.

पूजा प्रारंभ हा एक बघण्यासारखा विधी होता. स्नानादी झाल्यानंतर ते पाटावर आसनस्त होत. मांडीची त्यांची पक्की व दीर्घकालीन बैठक असे. सर्व अंगाला, चेहरा, कपाळ, भूजा, छाती, पाय इत्यादी भागांत भस्माचे व्यवस्थीत पट्टे लावले जात. ते गढद व निटनिटके कसे होतील त्याकडे त्यांचे लक्ष असे. मग त्याप्रमाणे गंधाचे टिपके, लावणे होत असे. अत्यंत कौशल्याने ते हे सारे व दररोज करीत. गंध कसे ठसठशीत दिसेल ह्याबद्दल ते फार चोखंदळ होते. गंधातून कसा सुवास दरवळला पाहिजे ही त्यांची धारणा. देवघरात एक आरसा ठेवलेला होता. त्याचा ते उपयोग घेत. हे सारे करताना प्रभू रामचंद्र वा श्रीकृष्ण यांच्या विषयीचे सुभाषिते किंवा नामस्मरण चांगल्या खड्या आवाजात करीत. पूजाविधी मध्ये कोणतीही गोष्ट कमी असेल तर ते त्यांना सहन होत नव्हते. मग ते कापूर असो, गुलाल असो, बुक्का असो व कोणती फुले. तसे ते ह्या वस्तूंची स्वत: जमवा जमव करीत असत. पण जर घरातील कुणाशी त्याचा संबंध आला, तर मात्र त्रागा करुन आपल्या भावना व्यक्त करीत.

वयानुसार फिरावे, व्यायाम करावे ह्यात त्यांना रस नव्हता. हा वेळेचा अपव्यय असतो. त्यापेक्षा नामस्मरण करा. तो सारे तुम्हास देईल ही त्यांची संकल्पना. वाचनाचा त्यांना नाद होता. परंतू फक्त पौराणिक कथांच. शिवाय त्याच त्याच कथा पुन्हा वाचणे, ऐकणे यात त्यांचे मन रमत होते. पौराणिक कथा म्हणजे जीवनाला जगण्याचा एक मार्ग ही त्यांची धारणा. कुणी जर त्यांना त्यांच्या पुजाविधीमध्ये  “पूजाविधी” या पुस्तकामधील सूचना केली, तर ते त्यास केव्हाच मान्यता देत नसत. “बदल” करणे म्हणजे आपण आजपर्यंत करीत असलेले चुकले हे मान्य केल्याप्रमाणे होईल, ही त्यांची धारणा. कोणत्याही बदलास त्यांचा विरोध असे. उत्तम कृती, लक्ष लावून केलेली पूजा ही समाधान देते. ही त्यांची समज “ध्यान धारणा” ही बाब त्यांना चुकीची वाटत असे. मन चंचल असते. हा त्याचा नैसर्गिक स्वभाव असतो. तो शांत व अविचल कसा होईल. ध्यान केव्हाच लागत नसते ही त्यांची धारणा. मात्र पूजेमध्ये ध्यानस्त बसले तर श्री रामचंद्राची मूर्ती सदैव समोर येत असते. ही त्यांची भावना. स्वभावाने ते अत्यंत प्रेमळ व आदरातिथ्य बाळगून होते.

एकाची पुजाविधी संपली –      दुसऱ्याची पुढील अंकी

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail – bknagapurkar@gmail.com

विवीध-अंगी     *** ९कागदी फुलांचे सौंदर्य     मनास मोहून घेते

परि सुगंधाच्या उणीवेने    अपूर्णतेची जाण येते

 

वेडा अहंकार !

जीवनाच्या रगाड्यातून-

वेडा अहंकार !

एक पुरातन मंदिर दिसले माझ्या दृष्टीला

शिवलिंग ते सुंदर असुनी नन्दी दारी बैसला

जुनी वास्तू, पडझड दिसली अवती  भवती

झाडे जुडपे वाढून तेथे जागा ते अडविती

किडे मुंग्या झुरूळ नि कोळी यांची वस्ती तेथे

रान फुले ती उग्र वास तो दरवळीत  होते.

विषण्य  झाले मन बघुनी अस्वच्छ परिसर

राहील कसा ह्या वातावरणी मग तो ईश्वर

पूजा नव्हती पाठ नव्हता भजन नव्हते तेथे

पवित्र विधींचा अभाव असुनी दुर्लक्ष ते होते

संकल्प केला त्याचक्षणी मी आपल्या मनाशी

परिसर तो निर्मळ करुनी पवित्रता येई कशी

घरी जाऊनी साधने आणली स्वच्छ करण्या मंदिर

आखू लागलो मनी योजना शांत करुनी विचार

सांज असुनी संधी प्रकश तो पडला चोहीकडे

कोकिळेचा मधुर आवाज तो कानी माझ्या पडे

फुलपाखरे गंध शोषित फुलावरी नाचती

मध्येच जाऊन शिवलिंगावरी मध शिंपडती

चिमणी आली नाचत तेथे चोंचीत घेउनी दाना

शिवापुढे तो टाकला तिने उंचाउनी मना

गुंजन करीत मकरंद आला लिंगाभवती फिरे

आरती कुणाची गात होता उमज ना येई बरे

वाऱ्याची ती झुळक येउनी फुले तयाने उधळली

अलगद येउनी मंदिरी शिवावरती पडली

चढाओढ ती दिसली मजला प्रभूच्या सेवेची

लाज वाटली मनास माझ्या वेड्या अहंकाराची

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-  bknagapurkar@gmail.com

विवीध-अंगी     *** ८

दैवी संपत्तीचे २६ गुणरुप-

१-अभय  २-सत्वशुद्धी  ३-ज्ञानयोग व्यवस्थिती  ४-दान  ५-दम  ६-यज्ञ  ७-स्वाध्याय

८- तप  ९-आर्जव  १०-अहिसा  ११-सत्य  १२-अक्रोध  १३-त्याग  १४-शांती  १५-अपैशून्य

१६-दया  १७-अलौलुप्य  १८-मार्दव  १९-लाज  २०-अचापल्य  २१तेज  २२-क्षमा

२३-धर्य  २४-शौच्य  २५-अद्रोहत्व  २६-अमानित्व

विरुद्ध-आसुरी संपत्ती-

१- दंभ  २-दर्प  ३-अभिमान  ४-क्रोध  ५-पारुष्य ६-अज्ञान