Monthly Archives: मे 2012

समाधान

समाधान

 

दाही दिशांनी फिरत होतो

मनी बाळगुनी तळमळ ती

कसे मिळेल समाधान ते

विवंचना ही एकच होती

 

धन दौलत ही हातीं असतां

धुंडाळल्या त्या बाजार पेठा

न मिळे समाधीन कोठें

थकली पाऊले चालून वाटा

 

देखिले निसर्गरम्य शिखरे

आणिक कांहीं प्रार्थना स्थळे

शिलकीमध्यें दिसे निराशा

कारण त्याचे कांहीं न कळे

 

भावनेमधली विविध अंगे

येऊं लागली मनीं दाटूनी

उसंत मिळता थोडी तेव्हां

उतरत होती काव्य रुपानी

 

धुंदीमध्यें सदैव राहूनी

लिहीत गेलो सुचले जे जे

कसा काळ तो जावूं लागला

कोडे ह्याचे कधीं न उमजे

 

शोध आजवरी घेत होतो

सांपडले परि तेच समाधान

उत्स्फूर्तपणे जे करीत आलो

त्यातच दिसली बीजे महान

कविता

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

उधळण

 उधळण

परमेश्वरला निर्गुण निराकार, सर्वशक्तीमान, जगाचा रचैता, सर्व व्यापी, अनंत,एक सत्य, एक आनंद इत्यादी गुणानी वर्णन करीत त्याचे महात्म गायले जातात. जे चांगल दिसल, वाटल, भावल, समजल, अनुभवल, ते सर्व गुणधर्म एकत्रीतपणे त्या परमेश्वराचेच असल्याचे सांगीतले गेले. जे वाईट गुणधर्म जाणवले,ते देखील त्या परमेश्वरांतच असल्याचे म्हटले. म्हणून तो एक परिपूर्ण शक्तीस्वरुप असल्याचे व्यक्त झाले. अनेक विचार अनेक धर्म,पंथ,ग्रंथ इत्यादींचा विचार केला तर सर्वजण एक मतानी हेच मानतात की वरील प्रमाणे त्याचे सर्व गुणधर्म आहेत व तो फक्त एकच आहे.  खरे बघतां त्याचे गुणवर्णन केंव्हांच पूर्ण होऊ शकत नाही. कारण तो जेवढा अमर्याद समजला गेला. तेवढेच आम्ही त्याचे वर्णन करणारे एकदम मर्यादीत असतो. एका मर्यादीत ज्ञानशक्तीने अमर्याद तत्वाचे वर्णन करताना आम्ही तोकडे पडतो.

त्या परमेश्वरानी कांही गुणधर्मांची उधळण ह्या जगांत, विश्वांत केलेली दिसते. उधळण ह्यासाठी म्हणतो की ते गुण बिंदू सर्वत्र पसरले गेलेले, विखूरलेले जाणवतात. त्यांत आहे प्रकाश, उष्णता. आर्द्रता, हवा, पाणी, तेज, पर्जन्य, विज, थंडी, वारा,आणि असेच अनेक घटक पदार्थ व उर्जाशक्ती. ह्या सर्वांचा सांघीक, एकत्र परिणाम म्हणजे जीवसृष्टी.  भिन्न दिसणारी परंतु एकाच मुळ संकल्पनेतून निर्माण झालेली. प्रत्येकाचे कार्य, उद्देश, व जीवनचक्र ह्याची रुपरेखा आसून ते चालत असते. अनेक पदार्थांची निर्मीती करताना प्रत्येकाचे आपापले मुळ गुणधर्म हे देखील निश्चीत करुन ठेवलेले आहेत. याचा अर्थ निसर्गाने त्याचे आपले नियम केलेले आहेत. त्यामध्ये केव्हांच फरक पडत नसतो. सर्व नियम निश्चीत व ठरलेले आहेत. जसे दाहकता, उष्णता हा अग्नीचा गुणधर्म. तो ज्यांच्या संपर्कांत आला त्याला जाळून टाकणारा. पाण्यांत राहणारे प्राणी याना जलचर प्राणी म्हणतात. ते पाण्यांतच जगू शकतात. वा जमिनीवरील प्राणी, जमीनीवरच राहू शकतात. ज्याना जे माध्यम जगण्यासाठी दिले ते त्याच माध्यमांत आपले जीवन व्यतीत करतात. वेगळ्या माध्यमांत जगणे त्यांच्यासाठी केवळ अशक्य.

थोडक्यांत अशाच प्रकारचे अनेक अनेक नैसर्गिक नियम केले आहेत. जगाची सर्व दैनंदिन कार्ये त्याच्याच आधाराणे चालतात. उंचावरुन पडलेले फळ खालतीच येणार. परंतु पडलेले फळ आपोआप केव्हांच आकाशाकडे जाणार नाही. निसर्गाच्या नियमांमध्ये केव्हांही बदल होत नसतो. जेव्हां काहीं विपरीत घडले असे भासते, ते ही निसर्गाच्या कोणत्यातरी चौकटी नियमानुसार होत असते. कदाचित् मानवाला ते ज्ञात होत नसावे. किंवा त्याची उकल ही त्याच्या लक्षांत आली नसेल. येथेच माणसाची अवस्था संभ्रमी होते. साशंक होते. मग त्या घटनेवर अनेक तर्क वितर्क केले जातात. येथेच जन्म होतो श्रद्धा वा अंधश्रद्धा ह्या स्वभाव गुणधर्मांचा. काहींजण याला चमत्कार असे संबोधतात.

परमेश्वर जसा वर सांगीतल्या प्रमाणे अनेक गुणधर्मानी भरलेला असतो, तसाच तो

” प्रेम- दया- कृपा  ”  ह्या गुणानी व्याप्त असतो. आणि हे सर्व गुण सतत बरसत असतात. जेव्हां ही ईश्वरी कृपा वा दया म्हटली जाते, त्याचा अर्थ तो सतत कृपा वा दया यांची उधळण करीत असतो. हे सत्य आहे.

मात्र तो कुणावर वैयक्तीक वा प्रासंगीक उधळण केव्हांच करीत नसतो. ” ईश्वर कृपावंत आहे, दयावान आहे, वा दयाळू आहे ” असे म्हणने सत्य असते. परंतु  ” ईश्वराने माझ्यावर कृपा केली वा मला दया दाखविली”  हा शब्दप्रयोग चुकीच्या पद्धतीने घेतला जातो. ईश्वर कृपावंत आहे हे म्हणने जेवढे योग्य तेवढेच त्याने मजवर कृपा केली हे सांगणे चुकीचे. हां त्याच्या कृपेच्या सागरांत तुम्ही ती कृपा प्राप्त केली हे शक्य असेल.

पाऊस सर्वत्र पडतो. हे सत्य. तो बरसला. हा तसाच एक प्रकार. त्या पावसाची जाणीव येऊन तुम्ही घराबाहेर पडणे व पावसांत ओले होणे हे महत्वाचे असते. पाऊस तुमच्या अंगावर  येऊन केव्हांच पडत नसतो. पावसाचा आनंद घेण्यासाठी त्या बरसणाऱ्या पावसांत तुम्हास जाणे जरुरी असते. त्याचे असेच महान गुणधर्म  प्रकाश, उष्णता. आर्द्रता, हवा, पाणी, तेज, पर्जन्य, विज, थंडी, वारा,आणि असेच अनेक घटक पदार्थ व उर्जाशक्ती.  इत्यादी आपल्या अंगावर झेलून ते ग्रहन करावे लागते, आनंद लुटावा लागतो. घरांत राहून, बंद खोलीत राहून, दारे खिडक्या बंद करुन ते सारे तुम्हास कसे मिळणार ?

त्याच प्रमाणे ईश्वर कृपावंत आहे, दयाळू आहे हे सत्य. मात्र त्याची कृपा, त्याची दया ही तुम्हास आपल्या कर्तृत्वाने वा क्षमतेने झेलावी लागते. असे न करता जर तुम्ही  ” ईश्वराची मजवर कृपा झाली ”  हा शब्दप्रयोग तरीत असाल तर तुम्ही एक अर्थाने त्या ईश्वराला दोष देणारे वाक्य उच्चारता, हे लक्षांत घ्या. उदाहरणार्थ दहा व्यक्तींनी एक गोष्ट हस्तगत करण्याचा प्रयत्न केला. एकाला ती मिळाली. त्यामुळे जेव्हां ती तुम्हाला मिळते, त्यांत अनेक कारणे असतात. जसे तुमचा प्रयत्न, इच्छा, आन्तरीक चेतना, योग्यता, धडपड, हिम्मत, आणि आणखी बरेच कांही.  त्यापैकी कदाचित् ईश्वराची कृपा हेही एक त्यांत असू शकेल. परंतु तो कृपाभाग हा तर सर्वावर सारखाच बरसत असणारा असेल.  जेव्हां तुम्ही

” ईश्वराची मजवर कृपा झाली ”  ही उपाधी लावतां, तेव्हां त्याने इतर नऊ लोकावर अन्याय केला असे होणार नाही कां ?  तो भेदभाव करतो असे त्यातून कुणाला वाटणार नाही कां ?  Partiality करण्याचा ठपका त्यावर लागणार नाही कां ?  तो  तर सर्वासाठी न्यायी असतो. जे तुम्हाला मिळाले त्यांत ईश्वरी कृपा असेलही परंतु ती फक्त तुम्हास मिळाली असे नव्हे. तो कृपाळू, दयाळू सर्वासाठी सारखाच असतो. परंतु तो कधीही कुणावर वैयक्तीक कृपा करीत नसतो. ही समज जाणणे जरुरी असते. तो फक्त गुणांची उधळण करतो. तुम्हाला ती वेचायची असतात. तुमची क्षमता, जीद्द, प्रयत्न, आंतरीक इच्छा असे गुणधर्म त्या कृपेला हस्तगत करु शकतात. जे महान झाले असे अनेक विषयांत, प्रांतात चमकले. कांहीतरी मिळवायचे ह्या घ्येयानी ते झपाटले गेले होते. परमेश्वरी गुणघर्म ते टिपत जातात, त्याला आदर देतात, परंतु त्याच वेळी निवडलेल्या कार्यांत पूर्णपणे झोकून देता.

*  जे महान झाले ते फक्त स्वकर्तत्वाने, स्वबळाने. हिमतीने, प्रयत्न्याने.

*  ते फक्त गोळा करीत गेले सारे विखुरलेले ईश्वरी सद्गुणांचे मोती

* त्यानी अमोल, अप्रतीम असा मोत्यांचा हार बनवून जगाला अर्पण केला.

*  हे सारे करीत असताना त्यांचा आन्तरात्मा त्या सर्वज्ञ, सर्वव्यापी सर्वशक्तीमान ईश्वराला

सतत साक्षी ठेऊन होता.

हां !  परमेश्वरा विषयी प्रेम, आदर व्यक्त करताना तो कृपावंत दयाळू ही विशेषणे लावणे चांगले. परंतु त्याची माझ्यावर कृपा झाली हा फार मोठा गैरसमज असेल. त्याची कृपा होते ही भावना तुम्हास अशक्त करेल. तुमच्या प्रयत्नामध्ये बाधा अणेल. कसेही झाले तरी तो मला दया दाखवील हा बाब केंव्हांही नसावी. ईश्वरा विषयी श्रद्धा गोष्ट वेगळी. परंतु अवलंबाची भावना, मुळीच नसावी. बरेचजण देवाची व्याख्या,  त्याला मानवातील वरच्या दर्जाचा असे करतात. Some treat God as SUPERHUMAN.  हे अत्यंत चुकीचे आसते. त्यांत मानवी मनाच्या आवडी, भावना, ईच्छा हे विचार त्याच्यावर थोपवले जातात. मग मला जे आवडते, भावते, ते त्याला तसेच आवडणारे समजून आपण त्याच्याशी वागण्याचा प्रयत्न करतो.  हे चुकीचे आहे.

परमेश्वराशी मैत्री अर्थात सख्य हा भाव वेगळा. तो तसा असावा. अर्जून सुद्धा श्रीकृष्णाला सखा समजत होता. परंतु ही भावना येताना त्याच्या भव्यतेची, दिव्यतेची, जाणीव सतत असणे गरजेचे वाटते. तो कृपा करतो, दया करतो, हे गृहीत धरु नका. तो फक्त तुमच्या योग्य प्रयत्नाना साथ देतो. हे एकदम खरे. स्वतःच्या मनाचा, विचारांचा सतत चांगला विकास करीत रहा. यश निश्चित मिळते. प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ते याजसाठी. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असे केव्हांच घडत नसते. तो अत्यंत न्यायप्रिय असतो. निसर्गाच्या नियमांना समजून घ्या. तेथे कोणतीही चुक होणार नसते. वा मेहेरनजर नसते.

करा-मिळवा- अथवा भोगा हेच एक महान तत्वज्ञान त्या ईश्वराचे.

(ललित लेख)

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

अंतर्मनाची हांक

अंतर्मनाची हांक

नसे कुणी मी श्रेष्ठ कवी, वा ज्ञानी या जगतीं

अभिमान वाटतो त्याचा मजला, जे माझ्या ललाटीं

कृपादृष्टी ही दिसून आली, काव्येश्र्वरीची थोडी

रचून कांही कविता सेविली, धुंदीमधली गोडी

आशिर्वाद जरी असला तिचा, माझी ती बालके

पितृत्वाचे नाते समजूनी, त्याना मी देखे

कौतुक करतील कांही मंडळी, ज्याना ही आवडे

उणीव दिसता त्यांत कुणाला, बाजूला ती पडे

जाईन जेंव्हा जग सोडूनी, राम राम म्हणतां

जवळी ठेवा काव्य प्रत ही, देहा अग्नी देता

विलीन होता अनंतात, मी नेईन संगे शब्दांना

भूलोकीच्या आठवणी सांगेन, स्वर्गामधल्या देवांना

 

(कविता)

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

तुझे तुलाच अर्पण !

तुझे तुलाच अर्पण !

 

तुझेच घेऊनी तुलाच द्यावे,  भासते ही रीत आगळी

उमजत नाही काय करावे,  तुझीच असतां सृष्टी सगळी             

वाहणाऱ्या संथ नदीतील,  पाणी घेऊन अर्घ्य देतो

सुंदर फुले निसर्गातील,  गोळा करुन चरणी अर्पितो

अन्न ग्रहण करण्यापूर्वी,  नैवेद्य तुजला दाखवितो

जगण्याचा तो मार्ग दोखवी,  ह्याचीच पोंच आम्ही देतो

विचार ठेवूनी पदोपदीं,  साऱ्यांचा तूं असशी मालक

दुजास देण्यातील आनंद,  हाच मिळवित असे एक

 

कविता

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

कोलीडोस्कोप

कोलीडोस्कोप

नातवाच्या खेळणीमधील एक खेळणी हाती लागली. एक गोल पुंगळी दोन्हीकडे पारदर्शक काचा.एका बाजूने बघीतले तर दुसऱ्या बाजूला अनेक लहान लहान रंगीत काचांचे तुकडे. त्यामधून अनेक कलापूर्ण डिझाईन दिसायचे. अतीशय मनोहर व मनास आनंदीत करणारे प्रक्षेपण असे. मात्र गमतीचा भाग असा की आतील रंगीत तुकड्याची हालचाल झाली की दिसणाऱ्या डीझाईनमध्ये त्वरीत बदल होत असे. प्रत्येक डिझाईन तसेच मनोहर व आकर्षक. फक्त एक गोष्ट प्रखरतेने लक्षांत आली की “दृष्य ”  सतत बदलत, मनोहर असे परंतु एकदा बघीतलेले दृष्य पून्हा तेच व तसेच म्हणून केव्हांच दिसले नाही. दिसू शकणार नव्हते. रंग संगतीची सतत उधळण होत असे. विविधते मधला तो आनंद टिपला जाई. ज्यांत केव्हांच नव्हती स्थिरता. तोच तोपणा. अस म्हणतात की  “आनंद ”  हेच फक्त ईश्वरी सत्य आहे. आनंद म्हणजेच ईश्वरी दर्शन. आनंद हा भावनेचा सर्वात उच्य असा अविष्कार असतो. त्यांत इतर भावने प्रमाणे कोणताही विरोधाभास नसतो. आनंद हा चेतना स्वरुपांत व्यक्त होतो. कोणत्याही सभोवतालच्या दृष्य अदृष्य वस्तूमधून जाणीव देणाऱ्या, मन उल्हासीत करणाऱ्या चेतनेमध्ये आनंद असतो. कोलीडोस्कोप मधून क्षणाक्षणाला बदलत जाणाऱ्या परंतु प्रत्येक प्रक्षेपित दृष्यामध्ये आनंद समावलेला आहे. बदलते स्वरुप ही चिंतेची बाब वाटते. कारण ज्याच्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित होते. आनंदाचा ठेवा हाती लागतो. ज्याच्यात आनंद अर्थात ईश्वरी रुप बघीतले जाते. तो ढगांच्या हालचालीप्रमाणे स्वरुप बदलत जातो. मग स्थिरता समोर नसेल तर एकग्रता कशी होणार. ह्यातच त्याला समजले पाहीजे. कारण “आनंद ” याचे स्वरुप लहरी, लाटा, छटा ह्यानी अनुभवण्याचा, जाणण्याचा प्रकार आहे.  ज्यांत बदलणारी संकल्पना आहे. परमेश्वरला जेव्हां निर्गुण रुपांत समजले जाते. त्याच वेळी कोणतेही रुप, कोणताही आकार, कोणते ही मोजमाप, कोणतेही वर्णन त्याला लागु पडत नाही. ज्या ठीकाणी असा प्रयत्न होतो तो निर्णय केलेला विचार असतो. असत्यात तो जाऊन बसतो. म्हणूनच असे मान्य झालेले आहे की परमेश्वर अनुभव येणे, जाणीव होणे हे शक्य आहे. परंतु प्रत्यक्ष बघणे कदापीही, केव्हांही सत्य असून शकत नाही. कारण तो फक्त आनंदमय आहे. सतत बदलणाऱ्या छटांत, गुणधर्मांत, एक उर्जा शक्तीच्या रुपांत

ललित लेख

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

क्रौंच पक्षाला मुजरा

पौराणिक कथा सांगते. क्रौंच पक्षाची जोडी रासक्रिडा करीत असता, निषादाने नेम साधला व एकास घायाळ केले. तो तडपडू लागला. जवळून त्याच वेळी महान ऋषी वाल्मिकी जात होते. ते करुण दृष्य बघतांच त्याच्या तोंडून जे शब्द बाहेर पडले ते पद्य रुपातले होते.

” मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः

यत् क्रौंचमिथुनादेकमवधीः काम मोहितम् ”

(जगातले तेच प्रथम पद्यकाव्य समजले गेले.)

क्रौंच पक्षाला मुजरा

कारुण्यामधूनी उगम पावला

आद्य काव्याचा झरा

वंदन करितो क्रौंच पक्षा

घे मानाचा मुजरा   १

गमविले नाहीं व्यर्थ प्राण ते

निषाधबाणा पोटीं

टिळा लावला काव्येश्वरीनें

मानानें तुझ्या ललाटीं   २

ह्रदयस्पर्शी जी घटना घडली

तडफड तव होतां

कंठ दाटूनी शब्द उमटले

पद्यरुप घेतां   ३

उगम पावतां काव्यगंगा ही

वाहू लागली भूलोकी

वाल्मिकी, व्यास, ज्ञानोबा,तुका

अशांचे आली मुखी   ४

काव्यप्रवाह हा सतत वाहे

कितीक जणांच्या शब्दातूनी

अंशरुपानें काव्येश्वरी ही

बरसे व्यक्त होऊनी   ५

(कविता)

 

                                                 डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

मला भाराऊन टाकल याने

मला भाराऊन टाकल याने

बी हंग्री, बी फूलिश! हा आत्मचरित्रात्मक  लेख वाचीत होतो. मनाला खूप भाराऊन गेला. परमेश्वर कांहीना ह्या जगांत पाठवतो असे म्हणतात. ते एक नमुन्यासाठी असते. These are the Sample people. म्हणतात. अशीच माणसे जगांत एक वेगळांच इतिहास करतात. निरनीराळ्या प्रंतातल्या अशा व्यक्ती आपण जगायच कशासाठी हे फक्त न बोलता करुन दाखविण्यासाठीच असतात. एकदम वेगळेच व्यक्तीमत्व. वेगळी जीवन कथा. आणि वेगळाच संदेश जगाला देत निघून जातात. मी मला आवडलेल्या टीपण्या देत आहे. तूम्हीपण आनंद लूटा.

हे सारे मी संग्रहीत  केलेल आहे.

स्टीव जॉब्स

” मी तुम्हाला आज तीन गोष्टी सांगणार आहे. मोठं …भाषणबिषण देणार नाहीये. पहिली गोष्ट आहे ठिपके जुळवण्याची. मी सहा महिन्यांतच कॉलेज सोडलं. माझा जन्म झाला, तेव्हा माझ्या आईचं लग्न झालेलं नव्हतं आणि तिने मला दत्तक द्यायचं ठरवलं होतं, जन्माच्या आधीच. तिची एकच अट होती, माझे दत्तक पालक कॉलेज ग्रॅज्युएट असले पाहिजेत. काही घोटाळ्यामुळे ज्यांनी अखेर मला दत्तक घेतले ते ग्रॅज्युएट नव्हते; पण त्यांनी वेळ येताच मला कॉलेजात प्रवेश घेऊन दिला खरा. पण सहा महिन्यांतच माझ्या लक्षात आलं की माझ्या पालकांचा कष्टाचा पैसा वाया जातोय. मी कॉलेज सोडलं. नंतरचं दीड वर्ष मी कॉलेजमध्येच ड्रॉपआउट म्हणून राहिलो. या दीड वर्षातच मी खूप काही शिकलो. मला खोली नव्हती, त्यामुळे मी मित्रांच्या खोलीत जमिनीवर झोपायचो. दर रविवारी सात मैल चालत जाऊन हरे राम हरे कृष्ण मंदिरात फुकट जेवायचो. काही सेंट्ससाठी कोकच्या रिकाम्या बाटल्यासुद्धा विकायचो.

त्या वेळेस माझ्या कॉलेजमध्ये कॅलिग्राफीचे सर्वोत्तम शिक्षक होते. मी त्या वर्गात जाऊन बसायला लागलो. तिथे मी वेगवेगळे टाइपफेस आणि छपाईविषयी शिकलो. खरं तर त्या शिक्षणाचा मला प्रत्यक्ष उपयोग काहीच नव्हता; पण मी निव्वळ आनंदासाठी, मला आवडतं म्हणून ते शिकत गेलो. दहा वर्षांनंतर आम्ही जेव्हा पहिला मॅकिन्टॉश संगणक डिझाइन तयार करत होतो, तेव्हा ते सगळे मला आठवत गेले. आम्ही मॅकमध्ये ते वापरले. सुंदर टायपोग्राफी असलेला तो पहिला संगणक होता. मी कॅलिग्राफी शिकत असताना हे मला माहीत नव्हते की, याचा मला उपयोग होणार आहे. ठिपके पुढचं पाहून जुळवता येत नाहीत, ते मागे वळूनपाहूनच जुळवावे लागतात. त्यामुळे ते कधी तरी जुळतील असा विश्वास ठेवूनच जगावं. मग तुम्ही त्याला काहीही म्हणा- कर्म, आयुष्य, नशीब, गट फीलिंग, काहीही. मला या भूमिकेमुळे कधीच तोटा झालेला नाही, तर माझं आयुष्यच बदलून गेलंय.

दुसरी गोष्ट आहे प्रेम किंवा आवडीबद्दलची.

मी नशीबवान आहे, मला काय आवडतं, हे मला आयुष्यात खूप लवकर उमगलं. मी आणि वॉझने माझ्या वडिलांच्या गॅरेजमधून ‘अ‍ॅपल’ सुरू केली तेव्हा मी २० वर्षांचा होतो. दहा वर्षांनी ‘अ‍ॅपल’ दोन अब्ज डॉलरची कंपनी झाली तेव्हा मी तिशीत होतो; पण मला ‘अ‍ॅपल’ने हाकलून दिलं. आमच्या संचालक मंडळाचे आणि माझे मतभेद झाले.

माझ्या जाणत्या वयाचा मोठा भाग ज्याने व्यापला होता, तोच गेला होता. मी उद्ध्वस्त झालो. हे माझ्या तेव्हा लक्षात आलं नाही; पण माझी ‘अ‍ॅपल’मधून झालेली हकालपट्टी ही माझ्याबाबतीत घडलेली सर्वोत्तम गोष्ट होती.

यशामुळे जड झालेलं डोकं नवेपणाच्या आनंदाने हलकं झालं आणि माझ्या आयुष्यातल्या सर्वाधिक सृजनशील कालखंडाला सुरुवात झाली.

पुढच्या पाच वर्षांत मी दोन कंपन्या सुरू केल्या. मुलीच्या प्रेमात पडलो. त्यातली एक कंपनी ‘अ‍ॅपल’नेच विकत घेतली आणि मी ‘अ‍ॅपल’ कुटुंबात परत आलो. मला या काळात एवढंच लक्षात आलं की, तुम्हाला काय आवडतं ते तुम्ही शोधलंच पाहिजे. आवडतं ते काम आणि आवडतात ती माणसं, दोन्हीला हे लागू होतं.

चांगलं काम करायचं असेल तर ते तुमचं आवडतं काम असणं अत्यावश्यक आहे. त्यासाठी तडजोड करू नका, शोधत राहा. प्रेमात पडल्यावर कसं लगेच कळतं, तसं हेही तुमच्या लक्षात येईल. एखाद्या सुंदर नात्याप्रमाणे तुमचं कामही उत्तरोत्तर चांगलंच होत जाईल.

माझी तिसरी गोष्ट आहे मृत्यूबद्दलची. – मी सतरा वर्षांचा असताना एक वाक्य वाचलं होतं, प्रत्येक दिवस तुम्ही तुमचा शेवटचा दिवस असल्याप्रमाणे जगा… त्यानंतरचं माझं संपूर्ण आयुष्य मी या तत्त्वानुसार जगायचा प्रयत्न करतोय. रोज सकाळी मी आरशात पाहून मलाच विचारतो, आजचा दिवस तुझा अखेरचा असेल तर जे तू करणार आहेस, तेच तुला करावेसे वाटेल? जेव्हा या प्रश्नाचे उत्तर सलग काही दिवस नाही येते, तेव्हा माझ्या लक्षात येते की मला बदलण्याची गरज आहे.

वर्षभरापूर्वी मला कर्करोग झाल्याचं निदान झालं. मला डॉक्टरांनी केवळ तीन ते सहा महिने दिले. त्यांनी मला घरी जायला सांगितलं. म्हणाले, आवराआवर करायला लागा. म्हणजेच निरोप घ्यायला लागा, कुटुंबाला पुढे त्रास होणार नाही अशी व्यवस्था करा.

नंतर असं निदान करण्यात आलं की, शस्त्रक्रिया करून मी बरा होईन आणि माझा कर्करोग कायमचा जाईल. या अनुभवातून गेल्यानंतर मी अधिकाराने म्हणू शकतो की कोणालाच मरायचं नसतं, अगदी ज्यांना स्वर्गात जाण्याची इच्छा असते त्यांनाही त्यासाठी मरायचं नसतं; पण तरीही ते कुणालाही चुकलेलं नाही. ते तसंच असलं पाहिजे कारण मृत्यू हा जीवनातील सर्वोत्तम शोध आहे. जुने मागे टाकून तोच नव्यासाठी जागा करतो. तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे म्हणूनच दुस-या कोणाचं आयुष्य जगून तो वाया घालवू नका. इतरांची मतं आपलीशी करू नका. तुमचं हृदय आणि मन काय सांगतायत तेच ऐकायचं धैर्य दाखवा. त्यांनाच माहीत असतं तुम्हाला खरं काय व्हायचंय. मी लहान असताना ‘दि होल अर्थ कॅटलॉग’ नावाचं मासिक निघायचं. कालांतराने ते बंद झालं. त्याच्या शेवटच्या अंकावर एका दूरवर जाणा-या रस्त्याचं छायाचित्र होतं आणि शब्द होते, ‘बी हंग्री, बी फूलिश…’ मी माझ्यासाठी कायम हाच विचार करत आलोय आणि तुम्हालाही त्याच शुभेच्छा देतो ”

संग्राहक

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

माना न माना !

माना न माना !

 हजारो वर्षाचा काळ चालत आहे व पुढे चालत राहील. हे एक सत्य आहे. ही पृथ्वी हे आकाश, वायू मंडळ, हे तेज पाणी ज्याना पंचमहाभूते म्हणून संबोधले गेले आहे. ह्यातून त्याचा कर्ता करविता ईश्वर असावयास हवा ही संकल्पना पूढे आली. जीव सृष्टीचे पसरलेले अथांग रुप प्रत्येकजण जाणतोच आहे. अनेक जीवसृष्टीचे घटक दिसले. जसे प्राणीजीव, वनस्पतीजीव. ह्याच्या संख्या खूप वाढत गेल्या. त्याचे संकलन व आकलन करणे बुद्धीमान समजल्या गेलेल्या माणसाला देखील आवघड जाऊ लागले. परंतु मानव हा सदा प्रयत्नशील व चौकस असून त्याचा हा सत्य शोध सुरु आहे.

यातूनच प्रश्नांची एक मालिका निर्माण झाली. तो कोण ? मी कोण ?  अर्थात कर्ता कोण व माझी भूमिका कोणती? हे महत्वाचे प्रश्न निर्माण होतात. अभ्यासक आले. चिंतन झाले. भाष्य झाले. अनेक विचारवंत निर्माण झाले. बघून जाणून अनूभवून वेगवेगळी सुत्रे निर्माण झाली. चौकटी आखल्या. ज्यांत त्यांचे तत्वज्ञान काठोकाठ भरविण्याचा प्रयत्न झाला. कित्येकजण साक्षात्कारी होते.  त्यांच्या मुखातून पडलेले सर्व हेच सत्य वाटून कित्येकाना ते पटत गेले. एक महान व्यक्ती म्हणून त्यांची लोकानी पाठपूरवणी केली. त्यांना मान्यता दिली. ही विद्वत्तेची किमया अनेक जणाना प्राप्त होत गेली. तसे त्यांचे विचार ऐकण्यासाठी व त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन आपणासही कांही मिळेल कां ह्या कल्पनेने बराच वर्ग त्याचा पाठ पुरावा करीत गेला.

प्रत्येक साक्षात्कारी व्यक्तीमध्ये सत्य व त्याची जागृती तीच होती. साध्य कोणते ध्येय कोणते याला सर्वानी मान्यता दिली. ते एक सत् चित् व आनंदा याचे स्रोत आहे. मात्र त्यांने ती जाणून घेण्याचा मार्ग, रचना मात्र भिन्न होत्या. येथेच एका संभ्रमी अवस्थेचा जन्म झाला. प्रत्येकाला दोन टोके दिसू लागली. जे मिळवायचे ते एक.  व ते कसे मिळवायचे ते दुसरे. मात्र भिन्नतेने जो जन्म दिला तो ते साध्य करण्यासाठी जो मार्ग आहे त्याचा. भिन्नता ही असणारच. उंच शिखरावर एक तेजस्वी मनोहर ठिकाण दिसत असेल, तर तेथे जाण्याचे निश्चितच अनेक मार्ग असणारच. ह्यांत शंकाच नाही.परंतु त्याच अनेक मार्गाच्या भिन्नतेमुळेच सर्वांच्या विचारांमध्ये विखुरता निर्माण केली गेली. कुणाचा योग्य मार्ग, चांगला, सुलभ व ध्येया जवळ त्वरित नेणारा असेल ह्यावर आपापली बुद्धी प्रगल्भतेनुसार टिपणी होऊ लागली.  सर्व खेळांची हीच गोम बनली. लोकांच्या संभ्रमामुळे प्रत्येकजण साध्याला तर नजरेसमोर ठेवीत होता. सारी शक्ती ही साधनेमध्येच घालू लागले. तेथेच घाण्याच्या बैलाप्रमाणे गोल गोल फिरु लागला. त्याचा प्रवास तर बराच झालेला परंतु त्याला कळले नाही की साध्य कोठे आहे.

आपण जे करतो ते प्रत्येकाला योग्यच वाटत असते. मग ते लहान मूल का असेना. त्याला वाटते माझेच बरोबर आहे. वरिष्ठ जाणकार हे मग कसे मागे राहतील. त्याना त्याच्या प्रत्येक कृतीचे योग्य म्हणूनच समर्थन करणे मनास उचित वाटते. जर प्रेरणेचा स्रोत हा अंतर्यामी असेल तर त्याचा उगम देखील सत्य आनंद ह्या ब्रह्मा निर्मीत शक्तीमधूनच होत असतो. म्हणूनच प्रत्येकाला आपली कृती योग्य व निश्चित व्हावी वाटत असते. त्याचे हे वाटणे एका हद्दीपर्यंत बरोबर असते.

२                                        येथे एक जाणीव व्हावी.

गंगा जेंव्हां गंगोत्री मुखातून उत्पन्न होते, ह्या भूतलावर येण्यासाठी झेप घेते, तेंव्हां ती अत्यंत पवित्र निर्मळ व पर्यावरणरहीत असते. चांगुलपणांची सारी महान तत्वे त्यांत निगडीत झालेली असतात. परंतु जेव्हां ती आपला मार्ग सागराच्या दिशेने जाऊ  लागते. तेंव्हां तीचा संबंध अनपेक्षीत मुल्यांबरोबर येतो. ज्यांत इतर नद्या, पर्वतावरचे वाहून आलेले पाणी, नाले इतकेच काय नदीकाठी वसलेले गांव वसत्यांचे नको असलेले सांडपाणी, एक नव्हे अनेक दूषित पाण्याचे साठे हे त्या प्रवाहामध्ये मिसळले जातात. गंगेच्या उगमस्थानाचे जल व महासागरामध्ये विलीन होण्यासाठी गंगासागर किनारी आलेले जल ह्यांत प्रचंड भिन्नता असणारच. कदाचित् धार्मिक पावित्र्याची संकल्पना एकच हे मान्य केले तरी  वैज्ञानिक समर्थन हे मान्य करील काय? जर जल चाचणी केली गेली तरी पाण्याच्या गुणधर्मांत खूपच तफावत असेल.

विचार आत्मिक तेजा पासून चेतावले जातात. त्यांत मुळ स्रोत म्हणून सत्याचा, तपाचा, भाग उत्पन्न झालेला असतो. त्या विचारांचा प्रवाह उगमस्थाना पासून मेंदूपर्यंत, तेथून स्वर यंत्र, जीभ इत्यादी साधनांमधून पार करीत ते बाहेर पडून इच्छीत स्थळापर्यंत पोहचतांत. त्यांत प्रचंड प्रमाणात मिश्रण होणारच. तो व्यक्त होत असतांना आजू बाजूचे, परिस्थीतीचे, संस्काराचे, दृश्य अदृष्य कल्पनांचे अनेक पैलू, अनेक अघात त्या उत्पतीत सामील होतात. त्याचे रुप हे देखील प्राथमिक सत्यापासून खूपच अंतरावर असणार. जसे गंगेच्या धार्मिक पावित्र्या बद्दलच्या कल्पना, तिचा उगम व तिचा शेवट ह्यामध्ये एकच कल्पिला गेला आहे. त्याच प्रमाणे प्रत्येकाला आपला विचारच योग्य आहे. हा जो अट्टाहास त्याच्या मनी येतो, त्याचेपण मुळ हेच आहे. कुणीही ह्यावर चिंतन करीत नाही, की माझ्या विचार शक्तीची उत्पत्ती व शेवट यांचे रुप कोणते.

जर खूप आत्मचिंतन केले, सभोवतालचे अवलोकन केले, तर प्रत्येकाच्या आग्रही मुळ स्वभावांत सुधारणा होऊं शकेल. अनेक व्यक्ति ह्या असले चिंतन करीत नाहीत. व त्याना पटेल तेच कार्य हाती घेतात. त्यांत झोकून देतात. उत्पन्न होताना जी चेतना असते तीचे रुप व्यक्त होताना व त्याहून भिन्न दुसऱ्या व्यक्ती पर्यंत पोहंचतना जाणवते. हे एक सत्य. परमेश्वरी संकेतापासून मानवी गुणधर्मामध्ये त्याचे रुपांतर होत जाते. मुळ दया क्षमा शांती प्रेम आनंद अशा बहूरुपी चक्रामधून त्यावर राग लोभ अहंकार याचा प्रभाव पडतो.

उत्पत्ती, स्थिती व लय ह्या चक्रामधील दोनच भाग – उत्पत्ती व लय हेच सत्य आहेत. स्थिती अर्थात जीवन हे सारे विचारावर, कल्पनेवर आधारलेले आहे. त्यामुळे ते सतत सुख दुःखाच्या गुंत्यात अडकलेले असते. तेच जीवन प्रवाहाचा खेळ खेळते. रोज बदलते. वेगळे होते. सभोवतालच्या परिस्थितीच्या लाटेवर आरुढ असते. आपले सारे प्रयत्न तपश्चर्या ही केवळ ह्या मार्गावरच केंद्रीत झालेली असते. कारण हा काळ प्रत्येकजण जाणतो, अनुभवतो, सत्य आहे हे समजतो.

३                   आपणाला स्वतःला केव्हांच उत्पत्तीचा व लयाचा अनुभव येत नाही. तो येणार देखील नाही. दुसरे जे केवळ बघतात, जाणतात आणि ते एक ज्ञान म्हणून व्यक्त केले जात असते. तेच आपण फक्त मानतो. ते अनुभवने शक्यच नाही. आपल्या जीवनाशी फक्त स्थितींचा संबंध येतो. उत्पत्ती व लय हे दोन भाग आपण घेण्याच्या पलीकडे म्हणूनच आपल्यासाठी काल्पनिक ठरतात. जे खऱ्या अर्थाने सत्य असते. त्यापासून आपण दूर राहतो. स्थिती हे  तत्व असत्य,भौतिक, नाशवंत ठरविले, तेच आपण अनुभवतो.

आपला प्रत्यक्ष संबध, जो सत्य भाग म्हणजे उत्पत्ती व लय आहे त्याचा आपण अनुभव घेऊ शकत नाही. तांत्रिक दृष्ट्या संबध असतो कारण ही तुमच्या जीवनाची सुरवात व शेवट असते. मान्य. परंतु ते म्हणजे तुम्हाला समज नसता व समज पूर्ण गेली असता. ज्याचा तुमचा जाणत्या काळाचा संबंध येतो तो स्थितीचा काळ फक्त सत्य सोडून असत्याचाच पाठपुराव्याशी येतो.

सत्य हे ईश्वराचे प्रतिक bवा अंशात्मक ईश्वरी चेतना आहे. ती बाजूस रहाते. तुम्ही ती घेतलेली. स्वतः असलेली नाही. केवळ चालू राहण्यसाठी ( Carry on ) बाळगलेली शक्ती आयुष्याची पाऊलवाट चालतात. सारे आयुष्य असत्याच्या संपर्कांमध्ये. कसे मिळणार सत्य त्यातून ?

तुम्ही जे अंशात्मक सत्य बाळगता त्याच्या स्फुरलेल्या लाटा ( Spiritual Waves )  जेव्हां बाहेर येण्याचा प्रयत्न होतो, त्याच क्षणी ते असत्य ह्या वातावरणाशी स्पर्श करुं लागतात. भौतिक वातावरणामध्ये त्यांचा स्पर्श होतो. कसे जाल तुम्ही त्या सत्याकडे. एक जबरदस्त कोंडी निर्माण झालेली आहे. सत्य ह्या आत्मिक केंद्र बिंदूला थोडे देखील सोडले की असत्यामध्ये गुंडाळले जातात. बाह्य स्थिती हे सर्व सत्य होऊंच शकत नाही. सत्य फक्त एकच आणि ते म्हणजे तुमचा अंतरात्मा. ह्याच केंद्रबिंदूवर लक्ष केंद्रित करावयाचे आहे. हेच एक असे सत्य जवळ आहे जे तुम्ही बाळगल्यामुळे अनुभवतां येणे शक्य आहे. ध्यान अवस्था प्राप्त करा हे म्हणतात. विचाररहीत मनाची स्थिती हेच ध्यान. अत्यंत अवघड गोष्ट आहे. सुक्ष्मात सूक्ष्म अशा चेतनेने मनाला उद्युक्त केले जाते. मनाएवढे चंचल आज पर्यंत तरी ह्या सृष्टीवर दुसरे माध्यम निर्माण झाले नाही. ही ज्ञानमार्गातील संकल्पना आहे.

मनाचे शांत होणे म्हणजेच त्या सत्याजवळ जाणे. हा साधा हिशोब केलेला आहे. याचा अर्थच असा की त्या ईश्वराला बघण्यासाठीस फक्त एकच मार्ग शांत मन. हेच त्याला बघू शकते. भेटू शकते. कां ?  फक्त शांत मनच कां ? कारण त्याच्यातला थोडासा देखील चंचलपणा हा त्या सत्याच्या केंद्र बिंदूपासून त्वरीत खूप दूर नेऊन सोडतो. किती कोंडी केलेली आहे ह्या मार्गानी. ज्ञानानी त्याला जाणा म्हणजे काय ? आत्मचिंतन करा हेच ना. हे करीत असताना मनाभोवतालची सारी वैचारीक झाकणे Covers of the Mind बाजूस करावयाची असतात.

भक्ती करा म्हणतात. येथेही भावनांची अशीच गर्दी केली जाते. मनावर एक वेगळीच छटा निर्माण होते. सत्य हे त्यानेही झाकोळते. विचाराने, ज्ञानाने, भक्तीने त्या ईश्वराजवळ गेलो. एक मात्र सत्य आहे की अनेक व्यक्तीमधून, एखादाच त्या आत्मतत्वाजवळ जाऊ शकतो.- परंतु फक्त जवळ- एकरुप होऊंच शकत नाही.

४                             शिवाय ज्ञानीजनांना, भक्ताना देखील अहंकाराच्या भिंती उभारुन अडचणी केल्याच आहे. ईश्वर एकच असून शक्तिमान, अनंत, अविनाशी, निर्गुण, निराकार आहे. तो उत्पत्ती, स्थिती लय ह्या त्रिगुणात्मक शक्तीच्या बाहेर आहे. अनेक महान गुणधर्मानी परिपूर्ण असलेला. ही धारणा जगातल्या सर्व मार्गदर्शकानी अर्थात् धर्म संस्थापकांनी, विद्वान पंडीतांनी मान्य केलेली संकल्पना. जे पिंडी ते ब्रह्माडी समजले गेले. त्याच तत्वज्ञानाने प्ररित होऊन प्रत्येकामधल्या आत्म्याला अंशात्मक त्या ईश्वरी रुपाचे स्थान मिळाले आहे. तो प्रत्यक्ष ईश्वर मात्र आपल्या वैचारिक झेपेपासून अनंत योजने दुर आहे ह्यात शंका नाही. परंतु त्यानेच ही प्रत्येकासाठी सोय करुन ठेवलेली आहे. की त्याच्यापर्यंतचा मार्ग हा जरी केवळ अशक्य असला तरी प्रत्येकजण त्याला आत्मकेंद्रात जाणऊ शकतो. त्याच्या संपूर्ण शक्तीची, अस्तित्वाची न सुटणाऱ्या कोड्याचे प्रतिबिंब समजू शकेल. प्रखर सुर्याला उघड्या नजरेने कुणीच बघूं शकणार नसलो तरी रंगीत काचा. पाण्यातील प्रतिबिंब ह्या माध्यमातून अवलोकन करणे सुसह्य ठरते. तसेच हे आत्मचिंतन त्याच्या सान्निध्याजवळ, प्रतिबिंबाजवळ घेऊन जाऊं शकते. परंतु हा मार्ग अत्यंत खडतर असतो. ज्ञान, भक्ती, कर्म मार्ग भगवतगीतेमधले मार्गदर्शन व तसा अनुभव घेण्यास मदत करील.

कित्येकजण हिमालयांत जाऊन गंगोत्री अर्थात गंगेच्या उगमस्थानी जाऊन पवित्र जलाची साठवणूक करतात. देव्हाऱ्यांत ठेवतात ह्यामागची तात्विक बैठक समजली पाहीजे. आत्मचिंतनातून अर्थात ईश्वरी प्रतिकात्मक केंद्रातून उत्पन्न झालेल्या विचारांची देखील इतक्याच तात्विक बैठकीवर स्थापना झाली पाहीजे. हे केंव्हां शक्य होइल जेव्हां सारी माध्यमे पावित्र्याचाच आधार घेतील. मन पवित्र, देह पवित्र वाणी पवित्र आणि सारा सभोवताल देखील पवित्र. हेच सत्य आणि आनंदाचे मुळ असेल. पावित्र्याची व्याख्या काय व कोणती हे अर्थात तुमचा अन्तरात्माच सांगेल. दुसऱ्याचे ऐकून होणार नाही.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०