Monthly Archives: जानेवारी 2012

मुक्तीसाठीं

मुक्तीसाठीं

 

रुजला पाहीजे    विचार मनांत

सारेच प्रभुचे    असे ह्या जगांत

जो वरी आहे मी   माझे येथे असे

त्या क्षणापर्यंत  स्वार्थ मनीं वसे

स्वार्थयुक्त मन   मुक्त होत नसे

मुक्ती येई पर्यंत   पुनर्जन्म असे

बिंबता मनांत   माझे नाहीं कांहीं

प्रभूचे समजता   आत्मा मुक्त होई

(कविता)

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

दासी मंथरेमधला विकल्प

दासी मंथरेमधला विकल्प

 

                     रामायण अप्रतीम कथानक आहे. आजतागायत ते अजरामर होऊन राहीले. काव्य असो वा इतिहास. प्रसंगाची गोडी केवळ अविट आहे. घडणाऱ्या घटनामध्यें दैवी चमत्कार ह्या बाबींचा शिरकाव करुन मनोरंजनाची सिमा खूप ऊंचावली गेली. कदाचित् आजच्या अधुनिक विज्ञान युगांत असल्या प्रसंगाना सत्याच्या मोजमापात मान्यता मिळणे कठीण आहे. परंतु जेव्हां कोणत्याही कथानकातील करमणूक व योजना हाच आनंदाचा गाभा असतो, तेंव्हाच त्या प्रसंगाना पुढे पुढे नेत जाणे योग्य ठरते. फक्त घटनेतील मानसिकता उलगडली पाहीजे.

रामाला आपला उत्तराधीकारी करण्याचे राजा दशरथाने ठरविले. मुहूर्त निघाला. बातमी सर्व संबंधी व प्रजाजन याना कळली. आनंद व उल्हास याचे वातावरण पसरले.

स्वर्गांत सर्व देव जरी आनंदीत झाले, तरी त्यांच्यात चिंता निर्माण झाली होती.

देवांचा संभ्रम होता की —

” रामाच्या अवताराच प्रयोजन हेच मुळी रावण व त्याच्या प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी होत. जर रामाचा राज्याभिषेक जर झाला तर तो आयोध्येचा राजा होईल. मग रावणा बरोबरच्या त्याच्या युद्धाची कल्पना बाजूस पडेल. राम हा आक्रमक नव्हता. तो इतर राजाशीं अकारण युद्ध करणार नाही. कोणाची खोडी करुन त्याचे राज्य घेणारा नव्हता. रावण भले दुष्ट असूर प्रवृत्तीचा असला, तरी राम त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याच्या स्वभावाचा होता. आपला राजधर्म तो अत्यंत सत्यबुद्धीने व विवेकाने पाळणारा होता.

जर कांही घडायचे असेल तर राम राजा बनण्यापूर्वीच होणे शक्य आहे. राम हा एक पराक्रमी योद्धा व उत्कृष्ठ  धनुर्धर होता. योद्धा आणि राजा ह्या दोन भूमिका वेगळ्या होत्या. योद्धा म्हणून घडलेल्या अन्यायाविरुद्ध लढणे, व अन्याय करणाऱ्याला तसेच त्याच वेळी शासन करणे ही संकल्पना येते. योद्धा हा प्रत्यक्ष बघतो. व त्याच क्षणी योग्य ती शिक्षा अमलांत अणतो. राजा म्हणून त्याला घटनांचे सर्व पैलू, कार्यकारणभाव, याच्या खोलांत जाऊन विचार करावा लागेल. कारण अन्याय करणारा विरुद्ध , न्याय झाला पाहीजे ही प्रथम समज. नंतर भाग येतो तो शिक्षेचा. त्यामुळे राम राजा म्हणून होण्यापूर्वीच हे घडणे जरुरीचे होते. ”

राज्याभिषेकासमयी कांहीतरी विपरीत घडणार ह्याची त्याना चाहूल होती. ते आपली शंका घेऊन ब्रह्मदेवाकडे गेले. त्याना विनंम्र अभिवादन केले.

सर्वांची शंका व व्यथा जाणून ब्रह्मदेव म्हणाले  ” मी काळ व वेळेला  आज्ञा केलेली आहे. घटनांचे सुसुत्रीकरण त्यांच्या हाती दिलेले आहे. हे सारे करण्यास ते सक्षम असतात.  माझ्या योजना विधीलिखीत म्हणून अचुक होत असतात. आपण जा व निश्चींत रहा. ”

सर्व देव जाताच   ब्रह्मदेवानी  ” विकल्प ह्याची ”  आठवण केली. तत्क्षणी विकल्प प्रकट झाला. “जा तू पृथ्वीवर जा व योग्य ती कार्यपुर्ती कर.”.

ब्रह्मदेवाला अभिवादन करुन विकल्प अन्तर्धान पावला.

आयोध्येमधील राजवाड्यांत आनंदाचे वातावरण होते. जल्लोश चालू होता. माता कैकयी सुद्धा आनंदमग्न होती. ” माझा राम हा राजा होणार. प्रजेच्या कल्यानासाठी झटणार. एक आनंदी पर्व सुरु होणार “.

तीने तीची वैयक्तीक सेवा करणारी दासी मंथरा हीला हाक दिली.  ” जा बागेंत जाऊन उमललेली ताजी सुंदर टपोरी फुले काढून आण. आज मी स्वतः हार करुन माझ्या रामाच्या गळ्यांत घालणार आहे. त्याच्या भाग्योदयासाठी आशिर्वाद देणार आहे. ” दासी मंथरा जी कैकयीसाठी प्रिय व अत्यंत विश्वासू होती. ती लगेच फुले काढण्यासाठी बागेत गेली.

बागेत आधीच विकल्प फुलझाडावर बसला होता. तो अदृष्य परंतु  प्रतापी होता. मंथरेने एक टपोरे फुल बघीतले. ते तोडले. फुलाचा आनंद घेण्यासाठी ती फार उत्सुक झाली. तीने त्या फुलाचा स्वाद घेत प्रदिर्घ गंध टिपला. विकल्प हा त्याच फुलांत विराजमान होता. त्याने  दासी मंथरेच्या स्वासाबरोबर तीच्या शरीरांत प्रवेश मिळविला. मंथरा फुले तोडण्यास सुरवांत करणार, इतक्यांत तीच्या डोक्यांत एक भावनिक कल्पना आली.

” राम हा राजा होणार. हे ठीक आहे. परंतु माझ्या राणी कैकयीच्या, स्वतःच्या मुलाचे, भरताचे काय होणार? ”  भरत हा सुद्धा राजाचाच मुलगा आहे. वंशाचा तोही दिवा आहे. राजसिंहासन हा त्याचा पण हक्क आहे. भरत फक्त थोड्याशाच अंतराने जन्मलेला. राजा दशरथाचे सर्व पुत्र यज्ञ देवतेच्या आशिर्वादाने, कृपेने, झालेले होते. तीन्ही राण्यानी यज्ञाचे पवित्र पायस ग्रहण करुन त्याना पुत्रप्राप्ती झालेली होती. कां म्हणून मग भरत राजसिंहासना पासून वंच्छीत रहावा? ”

विचारांची मालिका, मार्ग नेहमी एका दिशेने जात असतात. व्यक्तीच्या भावना विचारांना सतत वेगवेगळ्या मार्गने नेण्याचा प्रयत्न करतात. कित्येकदा एका दिशेने चाललेला विचार भावनेच्या प्रभावाने एकदम विरुद्ध दिशेला पण जाऊ शकतो. आवडणारे क्षणात नावडते होते, वा नावडणारे आवडते बनू शकते. हे सामान्य मानसिक तत्वज्ञान आहे.

रामाविषयी प्रेम व आदर हा दासी मंथरेमध्ये भरलेलाच होता. म्हणूनच ती प्रथम आनंदी झाली होती. रामासाठी फुले आणून हार करण्यास मदत करु लागली. परंतु त्याच क्षणी तीचा स्वार्थ अर्थात स्वतःचे हीत ही भावना चेतवली गेली. हे सर्व साधारण मानवी स्वभावाचेच चित्रण असते. ही तीच्या विचारांची धारणा अयोग्य वाटली, तरी व्यक्तीची मानसिकता ह्यात दडलेली असते. म्हणूनच व्यक्त आणि अव्यक्त विचार ह्यांच्या संघर्षात मनुष्य भरकटला जातो. हेच तर जगासाठी एक व मनासाठी दुसरे होऊ शकते. हे स्वाभाविक असते. मंथरेच्या ह्या विचाराला विक्षीप्त म्हणता येणार नाही.

राम आणि मंथरेमधले भावनीक सख्य अंतर , तीच्यापासून खूप खूप दुर होते. तेच तुलनात्मक भरत व तीच्यातील सख्य अंतर खूप जवळचे होते. तीच्या मालकीनीचा आपला पुत्र असणारा. दोन्हीहीमध्ये आदर व प्रेम भावना होती. भरताकडून रामापेक्षा हे सहजगत्या मिळणे दासी मंथरेसाठी सुलभ होते. स्वार्थाच्या ह्याच वैचारीक भावनेने मंथरेला झपाटले. विचारांचे चक्र  सुरु झाले. तीला रामापेक्षा भरताला राजसिंहासनावर आरुढ होताना बघावे ही इच्छा उत्पन्न झाली. ह्यांत वाईट बुद्धी नव्हती. दुष्टता नव्हती. मात्र स्वार्थ पुर्णपणे भरलेला होता. मंथरा सुद्धा अत्यंत चाणाक्ष्य होती. हूशार होती. सर्व परिस्थितीचे अवलोकन करुन आपली मालकीन राणी कैकयी हीच्याकडून कांही जमेल कां?  याचा अंदाज घेण्यासाठी उत्सुक होती. ती बागेतून फुले न आणता तशीच परत राजवाड्यांत आली.

कैकयी ही प्रथम राजकन्या होती. नंतर राजा दशरथाची राणी झाली. स्वतः कैकयी अत्यंत चतूर, दुरदर्शी व मुरलेली राजकारणी होती. राजा दशरथाला राज्यकारभारांत तीचे क्रियात्मक सहकार्य होते. अनेक युद्ध प्रसंगी देखील ती रणांगणावर गेली. तीने एका कसलेल्या योद्ध्याप्रमाणे योगदान दिले होते. एक युद्धांत तर कैकयीने राजाचे प्राण देखील वाचवले. युद्ध जिंकण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. राजा आनंदी व खूश झाला. त्याने तीला दोन वर दिले. ती मागेल त्यावेळी ते पूर्ण करण्याचे वचन दिले. ती राजा दशरथाच्या संपूर्ण विश्वास व योग्य मार्ग दर्शनासाठी पात्र ठरलेली होती. तीचा शब्द तोलामोलाचा समजला जायी.

अशा प्रभावी व्यक्तमत्वाच्या कुशल राणी कैकयीने, आपली निजी सेवक व जवळकी करण्यास योग्य असलेली व्यक्ती म्हणून दासी मंथरेला निवडावे ही साधी बाब नव्हती. ही पसंती,  मंथरेच्या चाणाक्ष्य व कर्तबगारीला बघूनच. राजभवनातील सेवकांची निवड अत्यंत काळजीपूर्वक व योग्यतेचा कस लाऊनच केली जात असे. विशेषकरुन ज्यांचा संपर्क राजा राणी अथवा त्यांच्या जवळच्या नातेसंबंधात असावयाचा. एखाद्या सामान्य दासी स्त्रीप्रमाणे वा नोकरासारखे बडबड करणे, इकडच्या तीकडच्या गप्पा मारणे, बाहेर बघीतलेल्या बातम्या सांगत बसणे, खऱ्याखोट्याचा आधार घेत चकाट्या मारणे, कुणाच महत्व मोठ वा छोट करणे, असे खालच्या वैचारीक दर्जा असलेल्या व्यक्तीना राजा वा राण्यांच्या संपर्कामध्ये केव्हांच ठेवले जात नव्हते. दासी मंथरेची वैचारीक योग्यता उच्य कोटीतीलच असणार.

एक प्रसंगात मंथरेची वैचारीक झेप लक्षांत येते. भरताला राज्य मिळण्याचा प्रयत्न करावा, ही विनंती तीने कैकयीला केली. रामाबद्दल प्रेम व आदर व्यक्त करीत हे तीने सुचविले. राम हा सर्वांचा आवडता आहे, त्याच्या विषयी कोणताही उणा शब्द  वा अनादर कैकयी सहन करणार नाही हे तीला जाणीव होती. त्याच वेळी जर कैकयीने मंथरेचे विचार एकदम धुडकावले वा फेटाळले तर निर्माण होणारा परिणाम निश्चीतच भयावह होईल. मंथराने आपल्या चाणाक्ष गुणधर्माचे योग्य प्रदर्शन केले. अतिशय हळूवारपणे व समजदारीने तीने भरताला राजसिहांसन मिळवे हा विचार  राणी कैकयीसमोर व्यक्त केला.

कैकयीला मंथरेचा विचार ऐकून प्रथम गम्मत वाटली. हासू आले. पण ती रागावली नाही. कारण मंथरेच्या हूशारपणाची तीला जाणीव होती. मंथरेमध्ये स्वार्थी विचार असला तरी त्यांत कुणाचा द्वेश नव्हता. एखादी गोष्ट मिळावी ही अभिलाशा होती. कांहीही मल्लीनाथी न करता, कैकयी त्याक्षणी शांत बसली.

एका वेगळ्याच विचारांचे दालन दासी मंथरेने उघडले होते. कैकयीला त्यावर विचार करावयास लावले. राजा दशरथाच्या निर्णयांत फेरबदल करावयास भाग पाडणे, ही अत्यंत अवघड गोष्ट होती. एक प्रकारे जीवाशीच खेळण्याचा हा प्रकार होऊ शकतो. कैकयीला प्रथम राजा दशरथारला हे पटवावे लागणार. न पटल्यास परीणाम वेगळाही होऊ शकतो. राजा दशरथाचा राग, चौकशी आणि दासी मंथरेसह सर्वाना प्रचंड शिक्षेलाही सामोरे जाणारे होऊ शकते.

खरी भूमिका होती ती राणी कैकयीकडून.  तीने राजा दशरथाबरोबर प्रदीर्घ चर्चा केली.  आपला अनुभव. राजकारण, दुरदृष्टी, रावण व इतर आसूरांचा दक्षिणेकडे चाललेला अत्याचार,  अशा निरनीराळ्या त्या काळच्या व परिस्थीतीवर भाष्य झाले. “रावणाचा नाश करणे”   ही सर्वांत महत्वाची प्राथमिकता होती. आयोध्या ते लंका हे अंतर प्रचंड दुर होते. विशेषकरुन पायी चालून वा घोडागाडीने. कदाचित् ती योजना पू्र्ण करण्यासाठी १२ ते १४ वर्षे लागू शकतील. राणी कैकयीने बघीतले की राजा दशरथाला  देखील हे मान्य होऊ लागले. त्याच क्षणी तीने सुचविले की रामाने त्यावेळी राजसिंहासन न घेता पुढील योजनेसाठी दक्षिणेकडे वनांत जावे. ज्या भागांत रावणाचे प्राबल्य असून त्याच्याशी संघर्ष होण्याची खूप शक्यता आहे. राम येईपर्यंत ती गादी राजाचा दुसरा पुत्र भरत सांभाळेल.

राजा दशरथाला ही योजना मान्य होती. परंतु स्वतःचे वाढते वय व रामा विषयी नितांत प्रेम ह्यामुळे तो अतिशय बेचैन झाला, हातबल झाला होता. कैकयीचा प्रस्ताव  मान्य करावा की अमान्य करावा  ह्या द्विधा  विचारांत तो होता. राणी कैकयी मात्र आपल्या योजनेवर ठाम होती. त्याच क्षणी तीने अतिशय चतूरपणे पूर्वी तीला मिळालेल्या दोन वरदानांची आठवण करुन दिली. आणि मागणी केली. रामाचे दक्षिणेकडे १४ वर्षासाठी जाणे व त्या काळांत भरताने राज्य सांभाळणे. ह्या संकल्पना त्यामधूनच साकार झाल्या.

विकल्पाने दासी मंथरेच्या माध्यम रुपाने वैचारीक ठिणगी चेतवण्याचे प्रभावी कार्य केले. कैकयीने त्याचे रुपांतर प्रचंड आगीत केले. वैचारीक भडका उत्पन्न झाला. सत्तांतराची उलथापालथ झाली. रावणाचा वध व खऱ्या रामराज्याचा उदय झाला.

अनेक घटना अघटीत होत गेल्या. आणि सर्व रामायण रोमांचकारी झाले.

ज्याचा शेवट चांगला व समाधानी होतो, त्यालाच विधी लिखीत म्हणतात.

(ललित लेख)

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

सोड मागणी

सोड मागणी

 

मागत होता प्रभूला    हात जोडूनी कांही

भक्तिभाव बघूनी त्याचे     मिळत ते जाई

एका मागून एक मिळे    मागणी होता त्याची

निराश करणे न लगे     इच्छा होता भक्ताची

जे जे बघे भोवती       घेतले होते मागुनी

कशांत दडले सुख     उमज येईना मनीं

देरे बुद्धि देवा मजला    योग्य मागण्यासाठी

समाधानी मी होईन      तुझ्या कृपे पोटी

ज्ञान झाले गंमतीचे   ‘ सांगे सोड मागणे ‘

न मागतां मिळाले जे    आनंदी केले जगणे.

(कविता)

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

सासरची आठवण

सासरची आठवण

 

ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची   //धृ// 

बाळ चिमुकले गोजिरवाणे, त्यांना दाखविण्याची

धन दूज्याचे म्हणूनी घेतले

परके त्यासी नाही समजले

बालपणीं जे प्रेम जमविले

क्षणांत मजला तेच मिळाले

भासली नाहीं उणीव तेथे, आईच्या मायेची   //१//

ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची

 

खट्याळ भाऊबहीण येथें 

दिर नणंद तसेच तेथे

बहीण वहीनी एकच नाते

हट्ट पुरविण्या दुजे नव्हते

पदोपदीं करुन देई, आठवण भावंडाची   //२// 

ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची

 

संसार दुःखे स्वशिरीं घेऊनी

सुख वाटले सदैव त्यानीं

मान मिळे मज पुन्हां सत्वरी, त्यांच्या सेवेची   //३// 

ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची

 

सासरीं गेले सोडूनी बालपण

दुज्यासाठीं करण्या समर्पण

फुलणें फळणें खरे जीवन

हवे निसर्गा हेच ते धन

माहेर सासर एकची मिळूनी, ठरले मी भाग्याची   //४//  

ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची

 

(कविता)

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

बाळकृष्ण

बाळकृष्ण

 

रंगले माझे मन मुरारी

नाम येई मुखीं श्रीहरी   //धृ//

 

काळा सावळा रंग

कोमल भासे अंग

हास्य खेळते वदनीं

तेज चमके नयनीं

ओढ लागतां शरिरीं    //१//

रंगले माझे मन मुरारी, नाम येई मुखीं श्रीहरी

 

कंठी माळा चमकती

मोर पिसे टोपावरती

पायीं नुपुरे घालूनी

नाचतो ताल धरुनी

हातांत त्याच्या बासरी   //२//  

रंगले माझे मन मुरारी, नाम येई मुखीं श्रीहरी

 

मुरली वाजे मधूर

नृत्य ते बहरदार

खेळातील तुझ्या लीला

छबी राही मनावरी   //३//  

रंगले माझे मन मुरारी, नाम येई मुखीं श्रीहरी

 

(कविता)

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

चतुर दूरदर्शी राजकारणी कैकयी

चतुर दूरदर्शी राजकारणी कैकयी

रामायण वाचताना वा ऐकताना, रामाबद्दल आदर, प्रेम भाव  निर्माण होतो. त्याच वेळी    त्याच्या सावत्र आई कैकयी विषयी अनादर व राग मनांत उत्पन्न होतो. अर्थात ह्या दोन्ही भावनिक बाबी आहेत. हा ज्याचा त्याचा वैयक्तीक समजण्याचा भाग आहे. आपण ह्याच्या विश्लेशनाच्या मागे सतर्कतेने जात नसतो.

आगदी बाल वयांतच रामायणातील कथा आपणास सांगितल्या गेल्या. त्यांत भव्यता, दिव्यता, गोडवा, आदर्शता, बरीच करमणूक, अनेक गुंता गुंतीच्या घटनांची उकल होती. त्यातून सर्वास मिळणारा आनंद, ह्याची आमच्या मनावर  प्रचंड पकड घेतली गेली. ती इतके वर्षे झाली, तरी आजतागायत कायमच आहे.

वाल्मिकी रामायण हे मूळ समजले गेले. त्यानी सांगीतलेले कथासार हे अजरामर झाले. सर्वानी त्यांत रुची व्यक्त केली. कांही त्याला कवीची कथा रम्यता समजले. कांही म्हणतात तो इतिहास होता. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. त्याप्रमाणे सर्वांनी आपआपल्या समजानुसार  त्याला मान्यता दिली. मात्र मुळ कथेच्या गाभ्याला कुणीच धक्का पोहोंचविला नाही. निरनीराळे विचार व वर्णने निर्माण झाली. ती फक्त त्यातील व्यक्तीरेखा वर्णन करताना. त्यांच्या स्वभावांत त्याना जे दिसून आले ते सांगीतले गेले. घटना मात्र कायम ठेवल्या गेल्या.

हेच बघना. जर रामाला परमेश्वरी रुप दिले गेले तर त्यांच्यामध्ये सारे दिव्यत्वाचे, भव्यतेचे, उत्तमातील उत्तम गुणघर्म असणारच. शेवटी महानतेची सर्व पैलू वेगवेगळ्या दिशानी रामांत असणारच. व ती होतीही. त्याचमूळे श्री रामप्रभू हे सर्वांचे आदरणीय ठरले. त्यांना वनांत पाठवण्याचे दुष्कृत्य राणी कैकयीनेच केले, हे सर्वानी मान्य केले आहे. आणि त्याच क्षणी आरोप प्रत्यारोप, वाईटपणा, दुष्टतां, स्वार्थीपणा, हट्टीपणा, इत्यादी दुर्गुण कैकयीच्या माथी मारले गेले. कथानकाच्या ओघांत व प्रसंगाच्या गुंतागुतीमध्ये हे सारे योग्य वाटू लागले. प्रत्येकजण स्वतःच्या विचार टिपणीला समाधानाची चादर घालू बघत होता. कैकयीला तिच्या कृत्याबद्दल कोणती तरी, कांही तरी शिक्षा व्हावी ही सर्व सामान्याची मानसिकता. परंतु ती खूप जुन्या काळातील घटना. आज केवळ कैकयीला दुषणे देत, कांहीजण त्यांत समाधान बघतात.

रामाच्या काळांत व त्याच्या कथेत दिव्यत्वाला फार महत्व होते. रामाचा जन्म हाच मुळी दुष्टांचा संहार करण्यासाठी होता. रावण व त्याच्याप्रमाणे जे अनेक राक्षसी वा असूरी वृत्तीचे होते, त्याना नष्ट करणे गरजेचे होते. प्रजेला सामान्य जनाना सुख देणे हे महत्वाचे. जे रामाने केले.   रावण तसा रामाच्या खूप आधीचा राजा होता. त्याचे दशरथाबरोबर देखाल युद्ध झाले होते. त्यामुळे रावणाविषयी संपुर्ण ज्ञान राणी कैकयीला होतेच. तीच फक्त राजा दशरथाला त्याच्या राजकारणांत सक्षमतेने मदत करीत असे. युद्धभूमिवर देखील अनेक प्रसंगी तीने हाती शस्त्र घेऊन लढा दिल्याचा ऊल्लेख आहे. एकदा राजा दशरथाबरोबर एका प्रसंगांत अतुलनीय शौर्य व चतुरता कैकयीने दाखविली. युद्धांत जन्म मरणाचा – मान सन्मानाचा महान प्रसंग. योग्य आणि प्रासंगीक साहस  कैकयीने केले. दशरथाला यश मिळाले. राजाने खुश होऊन राणी कैकयीला दोन वरदान देऊं केले.

२                   तीच्या कोणत्याही दोन इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले गेले. शब्दांना जीवापेक्षा जास्त जपण्याचा तो काळ होता. “ज्यान जाये पर वचन न जाये”   म्हणतात ते यालाच. पण राणी फार चतूर होती. ते वरदान त्याच क्षणी घेण्याची ती वेळ अयोग्य होती. दुर दृष्टीने परीपूर्ण व जबरदस्त महत्वाकांक्षी कैकयी हीने नम्रतापूर्वक ती जणू दोन ब्रह्मास्त्रे भावी आयुष्य व योग्य प्रसंगाचा आराखडा घेत ठेवणीत ठेऊन दिली.

कैकयी ही राज कुमारी होती. एका राजाची मुलगी. नंतर राजा दशरथाबरोबर विवाहीत झाली. तीच्या रक्तांत- स्वभावांत राजकारण, चातूर्य, दुरदृष्टी, ही मुरलेली होती. निजी स्वार्थ, त्वरीत स्वार्थ, वैयक्तीक स्वार्थ असल्या क्षुद्र गोष्टींचा ती केव्हांच विचार करु शकणार नव्हती. आज पेक्षा उद्याचे भव्य दिव्य व टिकणारे सत्य बघण्याची, जाणण्याची तीची दूरदृष्टी क्षमता होती.

लंकेचा राजा रावण लंकेत दक्षिणेत होता. त्याच वेळी राम आयोध्येत उत्तरेत होते. इतक्या दुर अंतरावर रामाला पाठविणे ही फार मोठी कामगीरी होती. रामाच्या क्षमतेचा प्रश्नच नव्हता. सदा विजयी होणारी ती शक्ती होती. यश आणि विजय रामाच्या ललाटी विधात्यानेच कोरलेले होते. फक्त त्याला त्या कार्यांत जाण्यासाठी उद्युक्त करणे, चेतना देणे हे महत्वाचे होते. त्या काळी पायीं चालणे वा घोडा गाडी हीच संपर्काची साधने होती. त्यामुळे हजारो मैलांचा प्रवास करुन, दक्षिणेकडे जाऊन परत सर्वांनी येणे हे काम १२ ते १४ वर्षाचा काळ घेणारे असणारच. हा हिशोब आपण आजही करु शकतो. त्यामुळे राणी कैकयीने रामासाठी वनी जाण्याचा काळ जो सुचविला तो अत्यंत चतुरपणाने व तर्काला साजेल असाच वाटतो. रामाला वनांत अर्थात दक्षिणेकडे पाठविण्याचा हट्ट, हाच संपूर्ण कथानकातील प्रमुख गाभा वाटतो. बाकीच्या घटना ह्या फक्त प्रसंगाची जोड करणाऱ्या वाटतात. त्यांत कैकयीची इच्छा विशेष वाटत नाही.

कैकयीने रामाच्या राज्याभिषेकांचा अत्यंत महत्वाचा क्षण साधला. हा संपूर्ण रामायण जीवनाला कलाटणी देणारा ठरला. तिच्या दुरदृष्टीने रामाने राज्यावर बसून राज्य कारभार संभाळणे हे ध्येय तीला न पटणारे होते. रावण व इतर दक्षिणेतील असूर यांचा पाडाव करणे ह्याने कैकयी पछाडली होती. हे सारे वाटेल ती किमत देऊन. वेळ पडल्यास जीव धोक्यात घालून वा नष्ट होऊन करण्यास ती प्रेरीत झाली होती. रामाला अशा राज्याभिषेकाच्या भव्य दिव्य आनंदी प्रसंगी रोकणे, सिंहासना पासून त्याला दुर सारणे आणि त्याला वनांत जाण्यास भाग पडणे, हे सारे केवळ कल्पनेच्या बाहेरचे होते. अत्यंत अशक्यप्राय गोष्ट होती. राम सर्वांचा अत्यंत आवडता, प्रेमळ. कैकयीचा देखील आदरयुक्त प्रिय असा.

भरत जो कैकयीचा आपला मुलगा, तो देखील रामावर जीवापार प्रेम करीत असे. तो कदाचित् आईच्या रामास वनांत पाठविण्याच्या संकल्पनेस कडाडून विरोध करील. ऐकणार नाही. कांहीतरी विपरीत घडेल याचा तीला अंदाज होता. म्हणूनच तीने भरताला त्या महत्वाच्या समयी त्याच्या मामाकडे पाठवण्याची चाल खेळली. यांत ती त्या क्षणी तरी यशस्वी झाली. सर्व कौटूंबीक वातावरण जणू राममय झालेले होते. ह्यावर ब्रह्मास्त्र टाकून ते वातावरण उध्वस्त करावयाचे म्हणजे केवळ अशक्य होते.

३                  कैकयीने रामप्रेमानी ओतप्रोत भरलेल्या ह्रदयावर, दगड ठेऊन अघात केला. राजा दशरथाला पूर्वी दिलेल्या वरदानाची आठवण देत कैकयीने पहीली मागणी केली.

” रामाला चौवदा वर्षे वनांत धाडा”    हा तीचा अट्टाहासी परंतु दुरदृष्टीचा जबरदस्त वार होता. दुसरी मागणी होती, जी की पहील्या मागणीसाठी पुरक होती. निर्माण होत असलेल्या प्रसंगाला मदत करणारी होती. राज सिंहासन हे रिकामे राहूच शकत नाही. त्याची अशा प्रसंगी तात्पूरती योजना करावी लागते. ती होती रामाच्या गैरहजेरीत भरताला त्या सिंहासनावर स्थानापन्न करण्याची. ही योजना व रचना तात्पुरती होती. कारण शास्त्र धर्माप्रमाणे असलेल्या राज्याचे कुळच ती राजगादी चालवावी असे असते. राजा व त्याचा प्रथम पुत्र, त्यानंतर त्याचाही पुत्र ही संकल्पना होती. हे राजमान्य व जनमान्यही होते. आयोध्येची गादी त्यामुळे दशरथानंतर रामासाठीच होती. व त्याच वंशावळीत जाणारी. प्रसंगोचीत कांही काळासाठी भरत जरी त्यावर आरुढ झाला, तरी त्यावर काळाचे बंधन असणारचय.  हे कैकयी जाणून होती. जरी हा फेरफार राजा दशरथाच्या इच्छेने,  आज्ञाने होत असला तरी ते शास्त्र संमत नव्हते. त्याला म्हणता येइल प्रासंगीक बदल. एका योजनेने बांधलेला.

घटना घडत गेल्या. इच्छीत अपेक्षीत आणि योजलेले वेगवेगळ्या मार्गानी होत गेले. कैकयीला सर्वांच्या टिकेला सामोरे जावे लागले. परंतु ती अचल होती. धीर होती. सशक्त होती. गंभीर होती. प्रासंगीक भावनेने व निरनिराळ्या विचाराच्या दबावाने हदरुन जाणारी नव्हती. तीने सारे आरोप पचविले. सारा क्रोध सहन केला.

तीने प्रथम राजा दशरथाला सर्व दृष्टीकोणातून सत्य व परिस्थीतीची जाणीव करुन दिली. रावणाचे दुषकृत्य आणि जुलमी राजवट, सामान्य प्रजेला सहन करावा लागणारा अत्याच्यार ह्या गोष्टी दशरथाला संपूर्णपणे माहीत होत्या. त्याचा नायनाट करणे हे देखील दशरथ जाणून होता. आणि त्याच वेळी त्याला रामाच्या शक्तीची दिव्यत्वाची पूर्ण जाणीव होती. विश्वास होता. थोडीशीही शंका नव्हती. राणी कैकयीची योजना दुरदृष्टीकोण हे सारे तर्काला धरुनच असल्याची खात्री राजाला पटलेली होती. दिलेल्या शब्दाचा मान राखणे हे जरी असले, तरी तत्वतः दशरथाने कैकयीचे विचार त्या क्षणी मानले होते. अत्यंत कठीण असा निर्णय त्याला घ्यावा लागला.  ह्यावेळी मात्र घटनेची तिवृता भयंकर होती. दुर्दैवाने रामपुत्र प्रेमामुळे दशरथाला  रामवियोगाचे दुःख सहन झाले नाही. भावनेच्या चक्रांत तो अडकला. त्यांतच त्याचा अंत झाला.

पूर्वी असाच एक प्रसंग झाला होता. बालक राम-लक्ष्मण नुकतेच धनुर्विद्या शिकून गुरुकुलातून आयोध्येस परत आलेले होते. बाल वय त्यांच. खेळण्या उड्या मारण्याचे. त्याच वेळी अचानक  श्रेष्ठ महर्शी विश्वामित्र राजदरबारी आले. दशरथानी त्यांचे स्वागत केले. परंतु राजाला त्यांच्या एक धक्कादायक विनंतीची सोडवणूक करावी लागली.

” राजा तुझे दोन शुर वीर पराक्रमी पुत्र राम व लक्ष्मण यांना माझ्या नियोजीत यज्ञाच्या सुरक्षतेसाठी पाठव ”  राजा दशरथ हादरुन गेला. प्रथम राजाने सारे सैन्य यज्ञ रक्षणासाठी देण्याचे सुचवीले. परंतु  महर्शी विश्वामित्रानी ते अमान्य केले. कठोर अंतःकरणानी राम लक्ष्मणाला वनी पाठवले गेले.

४                     रामराज्याभिषेकाच्या ऐन वेळी निर्माण केले गेलेले तुफान रामकथेला वा इतिहासाला कलाटणी देणारे ठरले. माता राणी कैकयीची केवळ राजकीय दुरदृष्टी. अर्थात दुर्दैवाने त्याघटनेत राजा दशरथाचे प्राण गमावले गेले.

कैकयीच्या दुरदृष्टीचा इतिहास येथेच थांबला नाही. तीच्या चाणाक्य दृष्टीने रामायण कथासारमध्ये आणखी एक मानाचा तुरा खोविला. राम रावण युद्ध संपले. रावण मारला गेला. रामाला विजय मिळाला. देवी सिता हीचा वनवास व बंधन संपले. रामाने तीला आणले. रावणाचा लहान बंधू बिभीषण ह्याला लंकेच्या राज सिंहासनावर बसविले. एक आनंदी व उल्हासीत विजय वातावरण निर्माण झाले होते. रामाने वीर हनुमानाला आज्ञा केली.

”  हनुमंता तू आत्ताच आयोध्येला जा. राजा भरत आणि माता कैकयी ह्याना येथील यशाचा सर्व वृतांत सांग. आम्ही वचना प्रमाणे १४ वर्षे पूर्ण केलेले आहेत. आमची तेथील सर्वांची भेट घेण्याची तीवृ ईच्छा झालेली आहे. त्यांची मान्यता घेऊन, तो निरोप मला सांग. त्यानंतरच आम्ही परतीच्या प्रवासाला निघूत ”

रामाची आज्ञा घेऊन, वीर हनुमानानी राम-सिता व लक्ष्मण याना अभिवादन करीत आकाशांत झेप घेतली.  हनुमान थोड्या वेळांतच तो आयोध्यानगरी पोंहोचला. तो भरत राज्याच्या दरबारी आला. त्याचे राजा व इतरांनी प्रचंड स्वागत केले. हनुमानानी आदराने भरताला सारी यशोगाथा सांगीतली. राम व देवी सिता हे येथे परत येण्याची आपली अनुमती मागत असल्याचे सांगीतले. भरताच्या डोळ्यांत राम प्रेमाने अश्रु आले होते. गळा दाटून आला होता. त्यानी त्वरीत सहमती व्यक्त केली. सर्वानी लवकर आयोध्येस यावे ही आशा व्यक्त केली. सभागृहामध्ये गंभीर शांतता पसरली होती. एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. राजमातेच्या दालनांत माता कैकयी देखील होती. ती अचानक पुढे आली. हनुमानाशी ती बोलू लागली. ” हे वीर हनुमंता, तुम्हा सर्वांच्या यशासाठी अभिनंद आणि आशिर्वाद देते. माझा एक मार्गदर्शक संदेश तू माझ्या रामाला पोहोंचता करशील कां ? ”

” राम सर्वांसह परत येत आहे त्यांच स्वागत. परंतु  माझी एक इच्छा आहे. रामाने परतीच्या प्रवासांत नागपावा   ह्या प्रदेशामधून यावे  ”    सर्व सभा स्तंभित झाली. राजा भरत तर फारच चकीत झाला. कारण कैकयीने सुचविलेला प्रस्ताव परतीच्या प्रवासाला हानीकारक होता. त्यामुळे प्रवासाचे अंतर बरेच वाढणारे असून कित्तेक दिवस घेणारे होते. आणि  नागपावा ह्या प्रदेशांत राज्य होते ते कुलतुरा ह्या असूराचे. हा रावणाचाच नातेवाईक होता. तो शूर असून अहंकारी होता. ऋषीमुनी व सामान्य जनाचा छळ करीत असे. राम जर त्या प्रदेशातून जाण्याचा प्रयत्न करील, तर त्याला विरोध होईल. कदाचित् युद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  निराशजनक वातावरण, परंतु माता कैकयीचा स्वतःचा हा प्रस्ताव. सर्वजन हातबल झाले.

” जशी माता कैकयीची आज्ञा ” म्हणत हनुमंताने तीला अभिवादन केले. तसेच इतर मातांना,  राजा भरताला आणि इतर राजदरबारातील व्यक्तीना अभिवादन केले. हनुमानाने सर्वांचा निरोप घेत आकाशांत छलांग मारली.

५                               जसे अपेक्षिले तसेच घडले.

माता कैकयीचे आज्ञा रुपी मार्गदर्शन, रामाने आदरयुक्त मानले. राम व त्याच्या सैनाला नागपावा प्रदेशांतून जाण्यास राजा कुलतुरा याने प्रचंड विरोध केला.  शेवटी त्याची परिणीती युद्धांत झाली. त्यांत राजा कुलतुरा मारला गेला. रामाने त्याच्या गादीवर तेथीलच एका योग्य व चांगल्या व्यक्तीला राज्याभिषेक करुन स्थानापन्न केले. आनंदाचा जल्लोश करीत राम आपल्या सर्व साथीदार व सैन्यासह आयोध्येस परतला.

जीवनाच्या नैसर्गिक चक्रांमध्ये अनेक घटना घडत असतात. त्यांचे परिणाम अभ्यासले जातात. सर्वांचे संकलन बनत असते. चांगल्या वाईटावर भाष्य होते, आणि इतिहास बनत असतो. कित्येकदा सक्षम व्यक्ती घटनाना वेगळीच कलाटनी देतात. ही ऐतिहासीक मंडळी समजली जातात. ती एक वेगळाच इतिहास बनवितात. कैकयीने इतिहास घडविला. रामकथेतील अत्यंत प्रभावी पात्र म्हणून तीची गणना होते. कथानकाप्रमाणे ज्या कार्यपुर्तीसाठी राम आवतार झाला ते पूर्ण करुन घेण्याचे महत्वाचे श्रेय कैकयीकडेच जाते.

रावण व इतर असुरांचा नाश करणे, हे ध्येय तीने मनांत बाळगले होते. त्यांतही कैकयीने कल्पलता दाखवली. रावणानंतर त्याच्या सहकारी, नातेसंबंधी, असूर प्रवृतीचा आणि सर्वांत महत्वाचे शेवटचा व्यक्ती राजा कुलतुरा याचा नायनाट करण्याची योजना केली. तीला संपूर्ण जाणीव होती की तो हटवादी, अहंकारी आहे. कुणालाही त्याच्या प्रदेशामधून जाऊ देणार नाही. राज्यात हस्तक्षेप करु देणार नाही. त्याच वेळी कैकयीला संपूर्ण विश्वास होता की राम अत्यंत शक्तीशाली, पराक्रमी सक्षम योद्धा आहे. जो रावणासारख्या बलाढ्य राजाचा नाश करु शकतो, तो इतर कुणाही असूर प्रवृतीचा नाश करणार. हीच माता कैकयीची यशस्वी योजना. ज्यांत आहे चतुरपणा आणि दुरदृष्टीचे आवाहन. ज्यात मुरले आहे राजकारण.

सामान्य व्यक्तीजन कोणत्याही घटनेकडे भावनीक दृष्टीने प्रथम बघत असतो. तो प्रासंगिकता व समयआधारीत मत व्यक्त करतो. त्यावेळी विचारांची प्रगल्भता तेथे नसते. कैकयीने आपल्या मुलाला भरताला आयोध्येचे राजसिंहासन मिळण्यासाठी प्रयत्न करावा. परिस्थीती तशी निर्माण करावी, शब्दवचनांचा खेळ करावा, आणि त्या सर्वांमधून वैयक्तीक स्वार्थ साधावा हे घडले. बऱ्याच जणानी रामाच्या प्रेमापोटी कैकयीला खूप नांवे ठेवली. निरनीराळी अपशब्द भाषा वापरली. कैकयी ही स्वार्थी होती असे एकदम ठरवून टाकले. हे सारे वेळेनुसार होते हे सत्य. आशाही भावनांची कदर केली जाते. परंतु कालांतरानंतर घटनांची उकल होते. शेवटचे परिणाम हाती येऊ लागतात. इतिहास उलगडू लागतो. तो बनू लागतो. त्याच वेळी वेगळे सत्य समोर येते. अप्रतीम असे प्रसंग, घटनांची गुंतागुंत व सोडवणूक. प्रत्येक व्यक्तीची भव्य रेखा आनंदी करते. रामायण हे त्याचमुळे महाकाव्य वा भव्य इतिहास समजला जातो.

(ललित लेख)

डॉ. भगवान नागापूरकर

(९००४०७९८५०)

पत्ता- अ-४ मानस सोसायटी

महात्मा गांधी मार्ग, नौपाडा ठाणे (प)

ठाणे    ४००६०२

शांतता ( Silence )

शांतता ( Silence )

शांतता हा ईश्वरी गुणधर्म आहे. ईश्वरी देण आहे. जसे चैत्यन्य तशीच शांतता. ही मुळ शक्ती समजली जाते. प्रथम निर्माण झाली ती शांतता. नंतर आला तो आवाज (Sound). ह्याचा अर्थ आवाजाच्या निर्मीतीआधी शांतता होती. आवाजाच्या वा ध्वनीच्या नष्ट होण्यानंतर असेल ती पून्हा शांतता. दोन आवाजामधली विश्रांती भरुन काढते ती शांतता. आवाज ऐकण्यासाठी देखील हवी असते शांतता. शांत असाल तरच आवाज ऐकू शकाल. ध्यान धारणा ह्या प्रक्रियेमध्ये शांततेला अनन्यसाधारण महत्व असते. शांतता म्हणजे केवळ वातावरणातील शांतता नव्हे. ती लागते मनाच्या स्थरावर देखील. शांतता म्हणजे केवळ आवाज नसणे, हे अभिप्रेत नाही. त्या वातावरणात देखील  खऱ्या शांततेचा मागोवा घ्यावा लागतो. शोध घ्यावा लागतो.  तीलाच खरी मनाची शांतता म्हणता येईल. अर्थात ” एक सत्य”  ” शांत मन ” हेच ईश्वरी तत्व असेल. त्यालाच म्हणता येईल कr ” स्वला ” जाणणे. तेच असेल परिपूर्ण.

शांतता सदैव तुमच्या सभोवती अंतरबाह्य अंगाने असते. तीची साथ तुमच्या अस्तित्वामधून निर्माण होत असते. तीला फक्त जाणावे लागते. आवाज कमी करणे वा नष्ट करणे ह्याच क्रिया तुमच्या सान्नीध्यात असलेल्या शांततेला शांततेच्या अस्तीत्वाची जाणीव करुन देतात. ध्यान धरणा करणाऱ्याना हे अनुभवते की एक विचार उत्पन्न झाला, तो छलांग मारुन येतो व त्याच झेपेने जातो. त्याच्या येण्या व जाण्यामधली वेळ अर्थात Stop gap किंवा एक विचार जाऊन दुसरा विचार उत्पन्न होतो. त्या दोन्ही विचारांमधली वेळ  ही अत्यंत महत्वाची असते. भले ती फारच क्षणीक मोजमाप करण्याच्या प्रक्रियेमध्ये अत्यंत कठीण असेल. परंतु त्या  ” मध्यंतराचे ” वा दोन विचारामधले  ” विश्रांती स्थान ” जीवन तत्वासाठी सर्वोच्य असे समजले गेले आहे. हीच  ” खरी शांततेची ”  वेळ.  हीच खरी “स्व ला”  जाणण्याची वेळ. हीच खरी ईश्वरी अस्तित्वाला समजण्याची वेळ. श्वासाची  क्रिया ही नैसर्गिक असते. ती जशी नित्य, तशीच  Involuntary  असते. तुमच्या इच्छेची मात्रा तेथे लागु पडत नसते. ती एक स्वयंस्फूर्त सततची क्रिया निसर्गाने योजलेली आहे. जीवंत असे पर्यंत शरीराच्या कोणत्याही अवस्थेत ती अविरत चालू असते. म्हणूनच तीला जीवंतपणाचे लक्षण समजले गेले आहे. हां तुमच्या इच्छाशक्ती नुसार तुम्ही त्याच्या प्रक्रियेमध्ये क्षणीक तात्पुरता बदल करु शकता. ही क्षमता तुम्हाला दिलेली आहे. जसे श्वास दिर्घ करणे, लांबवणे, आखूड करणे, वा कांही क्षणासाठी थांबवणे. कांही वेगळ्या परिस्थितीमध्ये  ” प्राणायाम ” अर्थात श्वासाच्या व्यायामाने, ह्याच तत्वाने बुद्धीच्या वैचारीक चक्राला प्रयत्न्याने वेगळेपणा निर्माण करता येतो. एक विचार उत्पन्न होतो, पसरतो, आणि  लय पावतो. लगेच त्याच्यामागे दुसरा वेगळाच विचार उत्पन्न होतो. ही सततची क्रिया नैसर्गिक Involuntary बुद्धीमनाच्या जीवंतपणाचे लक्षण समजले जाते. विचार भरकटणारे व एक समान नसतात. एखाद्या विषयावर चिंतन करणे, हा भाग वेगळा. तो Voluntary ह्या सदरांत मोडतो. परंतु विविध विचार उत्पत्ती ही नित्याची व नैसर्गिक असते. दोन भिन्न विचारामध्यें क्षणीक विश्रांतीची वेळ टिपली जाते.  हीच निर्विचार वा मनाच्या शांततेची वेळ.

तुम्ही योगीक प्रयत्न्याने, संकल्पना चिंतन शक्तीने, भावनीक स्थिरतेने, दिर्घ करु शकतात. कांही क्षणाचे, सेकंदाचे वा मिनीटाचे रुपांतर थोड्याश्या वाढीव वेळेमध्ये करु शकतात.

खऱ्या शांततेचा अनुभव केवळ त्याच क्षणी तुम्हास मिळू शकतो. ह्यालाच म्हणतात ‘ परम आनंदाचा क्षण ‘  (Ecstasy of Joy)  ह्याचे वर्णन करणे केवळ अशक्य असेल. तो फक्त एक जीवंत सर्वोच्य अनुभव समजता येईल. गरज असते ती प्रयत्न्याची. ह्याचे कुणीही मार्गदर्शन करु शकत नाही. अध्यात्मिक बैठकी विषयी मात्र अनुभवसंपन्न आनंद मिळवायचा असतो. तो प्रत्येकाला स्वतःचें प्रयत्न करुन केवळ दोन विचारामधला शांततेचा काळ प्रयत्न्याने वाढवून. येणाऱ्या वा ऊत्पन्न होणाऱ्या विचाराला थोडेसे थोपवून. जो विचार आलेला आहे त्याला नाहीसा करण्याचा प्रयत्न करुन. ह्यात जबरदस्त ईच्छा शक्तीचा भाग असतो. अंतरमनाची शांतता प्रस्थापीत करणे ह्यालाच म्हणतात.

शांतता निर्माण करता येत नाही. जी सदैव असते, तीलाच फक्त अनुभवता येते. मनाला शिकवून मनाची ठेवण करुन आवाजा विरहीत अथवा आवाजाच्या सान्निध्यांत देखील खऱ्या शांततेचा अनुभव घेता येतो. खऱ्या योगाचे हेच लक्षण असेल.

विचारांची ऊत्पत्ती व लय ह्याप्रक्रियेची सतत जाणीव Awareness  असावी. मात्र लक्ष्य केंद्रित विचारावर Thoughts वर न ठेवता त्याच्या प्रक्रियेच्या जाणीवेवर Awareness वर असण्याचा संकल्प असावा. हेच तुम्हास खऱ्या शांततेची जाणीव देत राहील. ह्यातच मनाला जे विचार विचलीत करीत असतात, त्यावर मात करणे, शक्य होते. विचारावर लक्ष्य असण्यापेक्षा लक्ष्य असणाऱ्या जाणीवेवर अर्थात स्व वर केंद्रित होणे, ह्यामध्ये डूबून जाणे, खऱ्या शांततेशी एकरुप होण्यासारखे असेल.

(ललित लेख)

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

भिकारीण

भिकारीण

 

मधूर आवाज मिळूनी, उपकार झाले तिजवर

सुंदर गाणे गाऊनी, आनंदीत करी इतर    //

हातपाय दुबळे होते, दृष्टी नव्हती तिजला

कष्ट करण्या शक्ति नव्हती, कसा मिळेल घास तिला    //

परी ती होती आनंदी, गाण्याच्या ओघांत

उचलित होती पैसे, पडता तिच्या पदरांत    //

जरी झाला देह दुर्बल, जगण्याची होती आंस मनी

मिळालेल्या आवाजाला, ऋणी समजे ती मनी   //

 

(कविता)

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०