Monthly Archives: सप्टेंबर 2012

* चुकलेला अंदाज!

*   चुकलेला अंदाज!

रविवारचा दिवस होता. संध्याकाळची वेळ होती. मी नातवाना घेऊन बागें मध्ये चाललो होतो.  घराच्या  जवळच्या चौकामध्ये आम्ही आटोरिक्षा मिळेल का, ह्याची वाट बघत होतो. रिकाम्या रिक्षा उभ्या नव्हत्या. काही रिक्षा भरलेल्या येत वा निघून जात. जवळच असलेल्या पानाच्या टपरीवर चार पाच सोसायटीतील मुले गप्पा मारीत उभी होती. दोन रिक्षा रिकाम्या आल्या, पण न थांबतच निघून गेल्या. एका पाठोपाठ तीन रिकाम्या रिक्षा आल्या.  परंतु जवळच बागेत जायचे म्हणून त्या निघून गेल्या. आमच्या विनंतीला दुर्लक्ष करीत होत्या. नातवंडे कंटाळली होती. शेजारी उभ्या असलेल्या मुलांचे आमच्याकडे लक्ष होते. एक रिकामी रिक्षा आली. त्या मुलातील एकाने पुढे येऊन ती रिक्षा थांबवली. रिक्षावाला थांबण्यास नाखूष होता. त्याला वेळ नाही ही सबब सांगून, आम्हास बागेंपर्यंत सोडण्यास त्याने नकार दिला. आतापर्यंत बघितलेल्या रिक्षावाल्यांची वागणूक क्लेशदायक होती. मुलांचा अहंकार छेडला गेला.  सर्व मुले त्या रिक्षा भोवती जमली. निर्माण झालेल्या परिस्थितीचे  गांभीर्य त्या रिक्षावाल्याने जाणले. वादविवाद न करता, त्याने आम्हास रिक्षात घेतले.

आम्ही बागेच्या दिशेने जाऊ लागलो. इतक्यात त्या रिक्षावाल्याच्या खिशातील मोबाईल वाजला. रिक्षावाल्याने रिक्षा एक बाजूस घेतली. तो बोलू लागला.

” हं भास्कर ! अरे मी येतच आहे. दहा मिनिटात घरी पोहोचेन. काय म्हणालास घरी येऊ नकोस, का? “   रिक्षावाला त्या माणसाचे ऐकत होता. थोड्यावेळाने   ” बर सर्व समजल, मी सरळच त्या दवाखान्यात येतो. तू थांब आई जवळ.”   रिक्षावाल्याने मोबाईल बंद केला. मागे न वळता तो आम्हास म्हणाला  “ मघाच आमच्या शेजारच्या भास्करचा मोबाईल आला होता. माझी आई घसरून पडली. तिला बरीच दुखापत झाली सांगत होता. म्हणून मी घाईत होतो.”

मी त्याच्याकडे आश्चर्य व निराशेच्या भावनेने बघत होतो.  बाग आली, दाराजवळ त्याने रिक्षा थांबविली. आम्ही सर्वजन व्यवस्थित उतरलो. मी माझे पाकीट काढून, त्याला पैसे देण्यासाठी पुढे जाऊ लागलो. पण क्षणाचाही विलंब न करता, तो रिक्षावाला सुसाट वेगाने निघून गेला. त्याला देण्यासाठीचे पैसे मात्र माझ्याच हाती राहून गेले. मी जड अंत:करणाने त्या रिक्षा कडे, ती नजरेच्या टापूत दिसेपर्यंत बघत राहिलो. माझ्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.

जीवनाच्या दैनंदिनीत अनेक घटना घडतात. त्याकडे बघण्याचा द्रीष्टीकोन,  त्याला सामोरे जाताना भिन्न असतो. त्यामध्ये दडला असतो, लपला असतो, एक बंदिस्त त्रिकोण. ज्यात असतो स्वार्थ, प्रासंगिक भावना, आणि परिस्थिती बद्दलचे अज्ञान. ह्याची जाणीव तिव्रतेने होती. जेंव्हा आपले अन्दाज चुकतात. विशेषकरुन जे इतर अपरिचिताना अनपेक्षित हानिकारक ठरतात त्या वेळीच.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

प्रेम-स्वभाव

प्रेम-स्वभाव

 

प्रेम-स्वभाव    असे ईश्वरी गुण

मनीं ठसला हा    आत्म्यांत राहून

प्रेम करावे वाटे    आंतरिक ही ओढ

ज्याची मुळे खोल   पडने अवघड

आपसांतील प्रेम    आत्म्यातील नाते

न दिसता देखील    बांधलेले असते

सर्व जीवाविषयीं    सहानुभूती भासे

ह्रदयामध्ये ती     सुप्तावस्थेत दिसे

आमचे राग लोभ    बाह्य संबंधामुळें

षडरिपू विकार    शारीरिक सगळे

वाईट गुणधर्म   देहाशीं निगडीत

चांगले जे कर्म    आंतरीक इच्छेत

राग येऊन केंव्हां    दुष्कृत्य घडते

पश्चाताप वाटता    मन शांत होते

कितीही दुष्ट असो   प्रेम भाव असतो

आनंदाच्या प्रसंगीं    उभारुन तो येतो

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

* नातीच्या खोड्या

*   नातीच्या खोड्या

सकाळचा फेरफटका मारून घरी आलो. घरी येताच आठ महिन्याची नात मानसी रांगत रांगत माझ्याकडे आली आणि झेपावली. तिला मी लगेच उचलून घेतले. जवळ केले व तिचे पापे घेतले. किती आनंद आणि समाधान ती मला देत होती. नातवंड म्हणजे दुधावरची साय. ज्यांना त्यांचा सहवास लाभतो ते आजोबा आजी खरोखरच नशीबवान व भाग्यवान. आयुष्याची दोर पक्की करणे, आणि वाढविणे ह्या दोन्हीही गोष्टी निसर्ग त्यांच्या कडून करून घेत असतो. ह्यात शंकाच नाही.

लगेच सून बाहेर आली. ती मानसीची तक्रार  करु लागली.

” बाबा हिने आज खूप उच्छाद मांडला. तिला शिक्षा करा. “

” काय केले मानसीने?”  मी तिच्याकडे कौतुकाने बघत विचारले.

” बाबा मी स्वयंपाक करीत असताना, ती नजर चुकावून देवघरात गेली, आणि तिने देव्हाऱ्यातले देव  ओढून पाडून अस्ताव्यस्त केले.”

देवघरातील देव ज्यांना भक्तिभावाने देवत्व दिले जात होते.

आणि हे शुषु अवस्थेतील मुल, ज्यालाही एका  द्दष्टीकोनातून देवत्व दिले जाते. अशा ह्या दोन देवांचे ते एक प्रकारे द्वंदच नव्हते काय? त्यात फक्त दर्शनी अस्ताव्यस्तपणा दिसला होता. त्यांच्या त्या लढाईमध्ये मी हतबल झालो असल्याचा भास होत होता. डोळे मिटून मी क्षमा मागत प्रार्थना करीत होतो. नातीला न समजणारी व देवाला ती पोहोंचली असेल का? हे मला न समजणारी.

आज तरी ह्या जगाचा, ह्या  मिथ्या विश्वाचा तिला स्पर्श नाही.  जो पर्यंत हे सभोवतालचे  खोटे मुखवटे, आचरण, तिच्यावर आघात करून तिला तथाकथित  सुसंस्कृत मानवामध्ये बदलणार नाहीत, तोपर्यंत हे लहानगे लेकरू, म्हणजे निसर्गाचीच एक अप्रतिम देणगी  आहे.  निसर्गाचा तो ठेवा आहे. एक ईश्वरी  गुणधर्म,  असे समजण्यास  हरकत नाही.

कश्यावरून मानसीच त्या आदिमायेचे जगदंबेचे स्वरूप  नसावे? आज तरी आहे. काळाच्या ओघांत तीचातले, नैसर्गिक ईश्वरी गुणधर्म लोप पावू लागतील व त्याची जागा कृत्रिमता घेईल.

तेव्हा मीच म्हणेन – –

ती म्हणजे- – –  मानसी- – – शिकलेली शहाणी माझी नात. 

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

श्री गणेश जन्मकथा

श्री गणेश जन्मकथा

श्री गणेशा नमुनी तुला    नंतर नमितो कुलस्वामिनीला

मातापूरवासिनी रेणूकेला    कृपा प्रसादे   ।१।

तुझा महिमा असे थोर    दुःख नष्ट होती सत्वर

कृपा करिसी ज्याचेवर    पावन होत असे   ।२।

गणेश जन्मकथा सांगतो    तयाचा महिमा वर्णितो

आनंदीभाव समर्पितो    तुम्हासाठी   ।३।

सर्व दुःखे दुर कराया    तुम्हांसी सुखे द्यावया

जन्म घेती गणराया    तुम्हां करिता   ।४।

असतील देव अनेक    देवाधीदेव महादेव एक

सर्व विश्वाचा अधिनायक    तयामध्ये कैलासपती   ।५।

शिवपत्नी पार्वती    रही कैलास पर्वतीं

माता जगताची ती    उमादेवी   ।६।

उमाशंकर मिळून    सर्व जगाते सांभाळून

कैलासावरी राहून    पालनपोषण करताती   ।७।

एके दिनी सकाळी    पार्वति निघाली अंघोळी

पुष्पे घेऊन निरनीराळी    पुजेसाठी   ।८।

आनंदी उमादेवी    शिवप्रतिमा मनी वसवी

अंतःकरणी ती रमवी    रुप सदाशिवाचे    ।९।

स्नानास निघाली पार्वती    पूजासाहित्य बाहेर ठेवती

मनी विचार करि    प्रेमभरे   ।१०।

बेसोनी स्नानघराबाहेर    मनींते बहूत विचार

विचारांना देती आकार    आनंद रुपे    ।११।

हाळद घेतली हातीं    चंदन मिश्रीत गोळी करी ती

बाळरुप प्रतिमा बनविती    तयापासून   ।१२।

जगन्माता पार्वती    विश्वाची श्रेष्ठ शक्ति

कोतुके बाळ पाहे ती    हर्षभरे    ।१३।

सचेतन केला बाळ    प्रेमे आलिंगुनी जवळ

घालितसे पुष्पमाळ    कंठी ज्याचे    ।१४।

बाळाचे तेज निराळे    सुवर्णापरी रुप आगळे

तयाचा महिमा कुणा न कळे    पार्वतीविणे    ।१५।

धावूं लागला छोटा बाळ    आनंदून गेली उमा सकळ

शिरी बांधली पुष्पमाळ    पार्वतीने    ।१६।

बाळासंगे खेळली    स्नानाची तिज आठवण झाली

सांगतसे माय माऊली    बाळाते जवळी घेवूनी   ।१७।

तू एक काम करावे    दारापाशी बसून राहावे

आंत कुणा येवू न द्यावे    आज्ञा माझी    ।१८।

आनंदे लागला बागडूं    कुणासंगे ही लढू

परत जाण्या भाग पाडू    ह्या विचारी    ।१९।

आज्ञा केली मातेने    पाळीन मी आनंदानें

रोकीन तयाते बळजबरीनें    बाळ बोले    ।२०।

छोटे शस्त्र हाती देऊनी    पार्वती सांगे समजावूनी

वाट तयाची रोकूनी     धराविसी    ।२१।

पार्वती गेली स्नानासी    बैसवुनी बाळा द्वारासीं

द्वारपाल तो बनलासी    बाळ माझा   ।२२।

बाळ आनंदे फिरु लागला    तिकडून शिव आला

स्नानगृही जाऊ लागला    बाळ रोके त्यासी   ।२३।

हांसु लागला बाळ बघोनी    कौतूक तयाचे करुनी

प्रेमभरे जवळ घेऊनी    सदाशिवे   ।२४।

शिव चालला स्नानगृहात    बाळ त्याला रोखीत

तुम्ही न जावे आंत    सांगे बाळ   ।२५।

प्रथम त्याचे कौतूक केले    आंत सोडण्या विनविले

वाकून बाळ आलिंगले    विश्वनाथे   ।२६।

कोप आला शिवासी    पाहूनी बाळ हट्टासी

त्याच्या विरोधासी    बघुनिया   ।२७।

बाळ असूनी लहान    मुर्ति गोंडसवानी छान

जगन्मातेची शक्ति अंगिकारुन    प्रतिकार करु लागला   ।२८।

बाळाअंगी पार्वतीचे बळ    म्हणून झाला निश्चयी अवखळ

कांही सुचेना तये वेळ    विश्वेश्वरासी   ।२९।

असे तो जगनेमातेचे बाळ    तयामध्ये विश्वाचे बळ

कठीण वाटली शिवे ती वेळ    तयासी पाहूनी   ।३०।

बाळ हट्टाने पेटून   शिवाचा करिती अपमान

द्वारी त्याना रोखून    अडवितसे    ।३१।

राग येवू लागला मनीं    समज न येई बाळा सांगुनी

संताप आला तत्क्षणी    क्रोधाग्नी पेटला   ।३२।

हांती घेऊनी त्रिशूळ    बनता बाळाचा काळ

शिरच्छेद केला तत्काळ    बाळाचा   ।३३।

बाळ पडला धारातीर्थी    धडावेगळे शरीर होती

तत् क्षणीं निश्चेष्ट पडती    जमिनीवर   ।३४।

पार्वती आली बाहेरी    नजर आता बाळावरी

दुःख होतसे मनावरी    मृत बाळ बघूनिया    ।३५।

एकदम निराश झाली    सारी स्वप्ने धुळीस मिळाली

हूरहूर मनी  लागली      पार्वतीस     ।३६।

शोक न तिजला आवरे  मृत बाळ बघूनी गोजिरे

ज्या पाही ती प्रेमभरे   पार्वती देवी   ।३७।

खिन्न मनाने बैसली    दुःखाश्रु पडती खाली

अत्यंत निराश झाली   उमादेवी   ।३८।

शिव झाले शांत    बघूनी उमेचा आकांत

तियेसी देवूनी हात    उठवितसे   ।३९।

बघूनी शिवाचे शांत रुप   गेला होता त्यांचा कोप

सोडूनी द्यावे मनातील ताप    पार्वती बोले   ।४०।

माझ्या बाळा जीवदान द्यावे    त्याच्या बालहट्टा क्षमावे

विनवितसे जीवेभावे    पार्वतीदेवी   ।४१।

स्तुती केली ईश्वराची    पूजा करुनी शिवाची

विनंती करिसी त्याची    बाळप्राणा   ।४२।

बघूनी पार्वतीभक्ति    पावला उमापती

बाळासी जीवदान देती    सदाशिव   ।४३।

आज्ञा केली शिवगणा    कैलासतील जावे वना

दिसेल  प्राण्याचे शिर आणा    प्रथम दर्शनी   ।४४।

गेले आनंदे शिवदूत    शिर मिळवण्या वनांत

बघितला छोटा ऐरावत   सरोवरी बागडतसे   ।४५।

गजराजाचे शिर छाटले    घेवूनी शिवदूत आले

शिवचरणी अर्पिले    ऐरावत शिर    ।४६।

उठवोनी बाळ शरीर   घेऊनी गजराजाचे शिर

ठेवती तयाचे वर    बाळाचे शरिरी

शिवशक्ति प्राण घातले    पूर्ववत् ते सचेतन पावले

मानवी देही दिधले    गजराज शिव   ।४७।

नवीन बाळ जन्मास आले    गजशिर मानव देह दिधले

माता-पित्यास वंदन केले    बाळ राजे    ।४८।

शिवपार्वतीचे बाळ जाहले    गजानन तयाचे नांव ठेवले

शिवदूतें कौतूक केले    गणेशाचे ।४९।

शिवपार्वतीची अपूर्व शक्ति    गणेशाते मिळती

दोन्ही तेज एकरुप होती    गणेशामध्ये    ।५०।

महादेव आशिर्वाद दिधला    गणेशाते श्रेष्ठ ठरविला

प्रथम पुजा मान तयाला    सर्व देवांमाजी    ।५१।

प्रथम पुजा श्री गणेशाची    कार्ये होतील सार्थ नंतरची

हीच असेल प्रथा पूजेची    आज्ञा केली शिवे   ।५२।

सर्व संकटे निवारसी    कार्ये नेती सिद्धीसी

दुःखापासून मुक्त करिसी    गणेश कृपें   ।५३।

विघ्नहर्ता सुखकर्ता गणपती    कार्ये निर्विघ्न पार पडती

सुख समृद्धी घरी नांदती    त्यांचे आशिर्वादे   ।५४।

तू होशील ज्ञानदेवता    सकळजण तुज वंदिता

प्रसन्न होऊनी ज्ञान देता    विद्वान होतील ।५५।

श्री गणेश जन्मसोहळा    सर्वाना भासे आगळा

आकाशातून वाहती पुष्पमाळा    सर्व देव मिळूनी   ।५६।

पुष्पांची वृष्टी केली    पृथ्वीमाता पावन झाली

तिच्यावरील दुःखे शमली    श्री गणेशामुळे   ।५७।

गणेश दैवत सुख समृद्धीचे    ज्ञानविज्ञानाचे

कार्य सिद्ध करिसी सर्वांचे    प्रथम मान तुला   ।५८।

गणेश दैवत सुखसमृद्धीचे    ज्ञानविज्ञानाचे

कार्य सिद्ध करीसी सर्वांचे     प्रथम पुजामान तुला   ।५९।

वंदन तुज गणराया     सर्वांचे भले कराया

सर्व समभाव मनीं यावया    कृपा करावी    ।६०।

रोज  एकदा स्त्रोत्र म्हणूनी     एकविस दुर्वा लाल फूल वाहूनी

गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवूनी    गणेशा पूजावे   ।६१।

नित्यनियमे पठन करावे    चतुर्थीला एकविस आवर्तने

भक्तिभाव मनीं ठेवणे    भक्तासि पावतसे    ।६२।

भाद्रपदमासे शुक्लपक्षे चतुर्थीला    श्री गणेशाचा जन्म जाहला

आनंदे सण उत्सावूं लागला    सकळजन    ।६३।

।। शुभं भवतू  ।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

* स्वाईन फ्लूचा भस्मासुर !

स्वाईन फ्लूचा भस्मासुर !

सकाळची देवपुजा आटोपून, दारात टाकलेले वर्तमानपत्र उचलून वाचू लागलो. प्रमुख बातम्यांनी मन विचलीत केले. स्वाईन फ्लू नावाच्या नवीनच उद्भवलेल्या रोगाने सर्व देशात आणि परदेशातही थैमान  घातले होते. अनेकांचे बळी घेतले गेल्याचा वृतांत होता. खिन्न मानाने खिडकीतून उगवणाऱ्या सूर्य प्रकाशाकडे बघत होतो. एक विचार मनामध्ये डोकावला.   मी त्या नारायाणालाच प्रश्न केला.

” हे परमेश्वरा  काय चालले आहे हे तुझ्या राज्यात ?  ” बघ किती माणसे  दगावलीत,  त्या दुष्ट स्वाईन फ्लूच्या विषाणूमुळे. ? काय बिचाऱ्यांचा दोष?  तू तर ह्या जगाचा कर्ता करविता.  ही तर क्षुलक बाब तुझ्यासाठी. कर ह्यावर काहीतरी उपाय. दे त्यांना आशिर्वाद.”

अचानक प्रकाशाचे तेज वाढल्याचे जाणवले. समोर काही तरी हालचाल जाणवली. आणि शब्द ऐकू   येऊ लागले. मी एकाग्रतेने ऐकू लागलो.

” मीच ह्या सर्व विश्वाचा निर्माता. नदी नाले तलाव डोंगर वृक्ष वेली विविध वन्य प्राणी, आणि मानव. सर्वानीच आनंदाने जगावे ही योजना. माणसाला विचार करण्याची झेप  बऱ्याच वरच्या  दर्ज्याची  दिली  गेली.   हेतू हा कि त्याने माझ्या निर्मितीला सहकार्य करावे. साह्य करावे. परंतु तो स्वार्थी वा अहंकारी बनत चालला. हे सारे जग त्याचाचसाठी असल्याचा त्याने गृह करून घेतला. सर्व नैसर्गिक योजनांना  त्याने खीळ घालण्यास सुरवात केली. झाडे झुडपे, वृक्षलता, जीवप्राणी,  ह्यांची बेसुमार कत्तल चालविली, हवा पाणी अन्न ह्यांचे संतुलन बिघडून टाकण्याचा सपाटा चालविला. पर्यावरण खलास होऊ पाहत आहे. एक जीव निर्माण केला गेला.  त्यात कांही गुणधर्म दिले गेले. ते त्याच्या रक्त मास पेशीत घातले. त्यातून तसेच पुनर्निर्मिती करण्याची योजना दिली. परंतु ह्या सरळ साध्या  मार्गाची  वाट चालण्या ऐवजी  मानवाने दिलेल्या  ज्ञानाचा अहंकारी दुरुपयोग सुरु केला. त्याच रक्त मास पेशी यांच्या गुणधर्माचा  गैर उपयोग करून, संमिश्र करून एक नवीन रक्त पेशी वा मास निर्माण करण्याचे  दु:साहस केले. कोणत्याही पेशीचे एकत्रीकरण करून वेगळ्याच जीवाची निर्मिती केली. सर्वात जो सूक्ष्म विषाणू  निर्मिला  होता,  त्याचे म्यूटेषण होत होत त्यापासून विविध विषाणूची निर्मिती होत गेली. ह्याच दुर्देवी मानवी  दु:साहसात आणि त्याच्या निरनिराळ्या रासायनिक प्रयोगात स्वाईन फ्लूच्या विषाणूची निर्मिती झाल्याची  शक्यता नाकारता येत नाही. तोच आता फोफावत आहे. ” –  – –

“  मी एकदाच भस्मासुराला निर्माण केले होते, त्याची खंत आजही वाटते. पुन्हा तो तसा निर्माण झाला नाही. परंतु हा स्वार्थी अहंकारी मानव तर आपल्याच दुष्ट प्रवृतीने अनेक भस्मासुर निर्माण करीत आहे. जे ह्या माझ्या सुंदर निर्मित जगाचा नाश करतील. ह्याला मी पायबंध घालण्यास असमर्थ आहे. कारण जे मी ज्या नियमाच्या आधारे निर्मिले,  त्यात बदल मुळीच केला जाणार नाही. पुढे काय होणार हे फक्त तो मानवच जाणे. “

अत्यंत निराश मानाने मी हे शब्द ऐकत होतो

(ललित लेख)

डॉ. भगवान नागापूरकर                                                                                                     ९००४०७९८५०

प्राणीमात्रा विषयी दया

प्राणीमात्रा विषयी दया

चाललो होतो मित्रासह, सहल करण्या एके दिनीं

आनंदाच्या जल्लोषांत, गात होतो सुंदर गाणीं

वेगामध्ये चालली असतां, आमची गाडीं एक दिशेनें

लक्ष्य आमचे खेचले गेले, अवचित् एका घटनेनें

चपळाईने चालला होता, एक नाग तो रस्त्यामधूनी

क्षणांत त्याचे तुकडे झाले, रस्त्यावरी पडला मरुनी

काय झाले कुणास ठाऊक, सर्व मंडळी हळहळली

जीव घेणाऱ्या प्राण्यालाही, सहानुभूती ती लाभली

अंतःकरणी दयाभाव हा, असतो ईश्वरी गुणघर्म

जीवमात्री वसला असूनी, निर्मितो आपसातील प्रेम

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

* झाडावरले निर्माल्य !

 झाडावरले निर्माल्य !

रोज सकाळी सूर्योदयाच्या समयी फेरफटका मारणे व नंतर घराजवळच्या बागेत जाऊन शांतपणे चिंतन करीत बसने,  हे नित्याचेच व नियमित झाले होते. सकाळच्या प्रसन्न वातावरणात शरीर व मन ताजे तवाने ठेवण्यात खूप आनंद वाटत असे. बागेमध्ये विविध  रंगांची  अनेक फुलझाडे होती. प्रातःसमयी उमलणाऱ्या त्या फुलांचे सौंदर्य मनास मोहून टाकीत होते. एक दिवस माझे मित्र श्री एकनाथराव  यांची भेट झाली.  हातात पिशवी घेऊन ते हलके हलके फुले तोडून जमा करु लागले होते.  माझे लक्ष जाताच मी त्यांच्याजवळ गेलो.

” काय पूजेसाठी फुले गोळा करीत आहात वाटते? परंतु ही फुले देवाला कशी चालतील? “      माझ्या विचत्र वाटणाऱ्या वाक्याने  त्यांना एकदम आश्चर्य वाटले.  काहींच उलगडा न झाल्यामुळे त्यांनी मला त्या वाक्याचा अर्थ विचारला. मी म्हणालो ” थोड्या वेळापूर्वी मी समोर बसून मानस पूजा केली होती. ही सारी उमललेली टपोरी फुले स्पर्श न करता, त्या ईश्वराचे चरणी अर्पण केली.  मनानेच वाहिली. आता माझ्या द्रीष्टीने ती निर्माल्य झालेली आहेत. ही फुले तुम्ही कशी देवाला वाहणार? “  विचित्र आणि न पटणारे. परंतु तर्कज्ञानाच्या विश्लेषणाने मान्य होणारे हे तत्वज्ञान. एकनाथरावनी क्षणभर विचार केला व ते किंचित हसले. ” मी पण मानस पूजेचा विचार करीन. कदाचत निसर्गाच्या फुलण्यातल्या आनंदात, मला पण सहभागी होता येईल.” असे काहींसे पुटपुटत ते निघून गेले.

मला  अचानक माझ्या अमेरिकेतील काही दिवसाची आठवण झाली.  मी मुलाकडे गेलो होतो. अतिशय स्वछ  आणि सुंदर  वातावरण होते. मनाला  प्रसन्न व आनंदित करणारे.  मोठे व अरुंद सिमेंटचे रस्ते. मध्य भागात Devider असून रंगी बिरंगी फुलांनी सुशोभित केलेले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी गवताचे मखमली गालिचे असून विविध रंगांची मनोहर फुले फुलली होती. गुलाबांची टवटवीत मोठी फुले भरपूर प्रमाणात फुललेली होती. रस्त्याच्या कडेला आपल्यासारखी काश्मिरी गुलाबांची ताटवे ह्याचे मानस आश्यर्य वाटत होते. असे चित्र भारतामध्ये केव्हांच बघण्यात आले नव्हते. गुलाबाची टपोरी फुले, कुणाच्या घरातील बागेमध्ये किंवा एखद्या सार्वजनिक बागेमध्ये असतीलही. परंतु  त्याच्यावर नजर ठेवणारे, निगा राखणारे असतीलही. अमेरिकेत कुणीही केव्हाही फुले तोडताना बघितले नाही. किंवा  ” फुले तोडू नका ” ही सूचना देणारी, सूचनाफलक कोठेच दिसला नाही. इकडील सर्व सामान्या मध्ये  ही जाणीव इतकी रुजली आहे कि कुणीही रस्त्याच्या कडेलगतची फुले सार्वजनिक बागेतील फुले किंवा घरातील फुले  देखील झाडावरून काढीत नसतात.  झाडावरच फुलाने उमलणे,  बहरणे, आणि गळून पडणे ही नेसर्गिक प्रक्रिया त्यांच्यात घडताना दिसते.

मला ठाण्यात सकाळी फिरावयास गेलो असताना जे दृश दिसत होते ते आठवले. बरीचशी वयस्कर मंडळी सकाळी फिरण्यास जाताना दिसते. काही घरामधली बागेमाधली जास्वनदिची, कन्हेरीची, पारिजातकाची, गुलाबाची वा इतर काही मोठी झाडे, घर कुंपणाच्या बाहेर फांद्या वाढून बहरलेली दिसत. कित्येक महाभाग हाताला येतील तेवढी सर्व फुले तोडून पिशवीत जमा करतात. त्यांना त्यात आनंद वा धन्यता वाटते. पुजेसाठी ती सर्व फुले कशी मिळतील हे बघण्यातच ती प्रयत्नशील होती. मला अद्याप कळले नाही कि आपण  निसर्गाने अर्थात त्याच ईश्वराने  निर्माण केलेले सौंदर्याचे प्रतिक सुंदर फुल का तोडतो. तोडून ते देवमुर्तीवर वाहून त्याच परमेश्वराला आपण आनंदी वा समाधानी करतो आहोत. ही भावनाच विचीत्राशी वाटते. भावनेला जर विचाराची साथ मिळाली तर बरेच गैरसमज दूर होऊ शकतील. ईश्वरावर नितांत श्रधा असावी हे सत्य आहे. त्याच्याशी जवळीक साधण्याच्या मार्गावर चिंतन व्हावे ही अपेक्षा.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

चिंतन !

चिंतन !

ज्याचे आम्ही चिंतन करतो

तोच ” शिव ” चिंतन करतो

स्वानुभवे चिंतन करुनी

चिंतन शक्ति दाखवितो   ।१।

जीवनाचे सारे सार्थक

लपले असते चिंतनांत

चिंतन करुनी ईश्वराचे

त्याच्यांत एकरुप होण्यांत    ।२।

सारे ब्रह्मांड तोच असूनी

अंश रुपाने आम्ही असतो

जेव्हां विसरे बाह्य जगाला

तेव्हांच तयांत समावतो   ।३।

चिंतन असे निश्चीत मार्ग

प्रभूजवळ तो जाण्याचा

लय लागुनी ध्यान लागतां

ईश्वरमय होण्याचा ।४।

(कविता)

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०