Daily Archives: जानेवारी 18, 2011

पोकळ तत्वज्ञान

 
कालेजच्या होस्टेल मध्ये  रहात होतो. सर्व विध्यार्थाना स्वत्तंत्र खोल्या होत्या माझ्या शेजारी  माझा मित्र नंदकिशोर यांची खोली होती. दुपारची जेवणाची   सुट्टी झाली की आम्ही रूमवर यायचो. माझ्याच  खोलीत आम्ही  मिळून जेवण घेत असू .घरून दोघांचे जेवणाचे डब्बे यायचे. नंद्कोशोरच्या  जेवणाची  पद्धतच कांही और होती .त्याच्या डब्ब्यात चार चपात्या असत. तो डब्यातले पूर्ण अन्न केव्हांच खात नसे. जेवण झाल्यावर एक चपाती आणि उरलेले सर्व अन्न गोळा करून चक्क खिडकीतून बाहेर फेकून देत असे. मला त्याचे हे वागणे आवडायचे नाही. ” तुला जर जेवणास कमी लागते,  तर घरच्यांना तशा सूचना का देत नाहीस? कमी जेवण मागवत जा. ”  तो  फक्त हसून उत्तर देण्याचे टाळायचा. परंतु त्याने त्याच्या आपल्या  दैनंदिनीत केंव्हाच फरक केला नाही. मी मात्र माझ्या जेवणाचा डब्बा पूर्ण संपवीत असे. जेवणाची सतत काळजी घेतली. एक दिवस माझा त्याचा विषयीचा दृष्टीकोनाचा बांध फुटला. मला त्याचे  वागणे सहन झाले नाही. नेहमी प्रमाणे त्याने एक चपाती व उरलेले अन्न  खिडकीतून बाहेर फेकून दिले. व तो हात धूउन बसला.  
 ” खर सांगू – तुला मस्ती  आलेली आहे.  तू त्या अन्नाचा न कळत अपमान करतो आहेस. माजोऱ्या प्रमाणे ते फेकून देतोस. अनेक लोकांना पोटभर अन्न मिळत नाही, तू मात्र नासाडी करतोस.  अन्न हे परब्रम्ह समजले गेले आहे. त्याचा असा  अनादर  केंव्हाच करु नये. तो पुन्हा मोठ्याने हसला.    ” अहो ब्रह्मज्ञानी !  दोन्ही हात जोडून तुम्हाला  दंडवत. भगवतगीतेमध्ये सांगितले हे की आपल्या जेवणांत एक भाग अन्न व तीन भाग पाणी असावे. तू जेवताना पाण्याचा थेंब ही घेत नाहीस. अन्न सुद्धापोटभर घ्यावयाच नसत.   पाणी हवा ह्या घटकांना भरपूर  जागा देत जाणे, हे विज्ञान देखील सांगते. तू मात्र हे सर्व जाणून  दुर्लक्ष करतोस. जेवणाचा डब्बा आला की तुला ते परब्रह्म वाटते. आणि तू त्यावर प्रेमाने  तुटून  पडतोस. पोटाला सांभाळून, प्रकृतीला जपून   अध्यात्म करीत जा.  तो हसत निघून गेला. मी माझे जेवण पूर्ण केले. हात धुतला व  खिडकीच्या बाहेर डोकावले.   मी एकदम अचिंबित झालो.  खिडकीच्या  मागील दिशेला एक  मोकळे  मैदान होते. खिडकीखालती  ज्या ठिकाणी   नंदकिशोर ह्याने अन्न फेकून दिले होते, तेथे दोन कुत्री जिभल्या चाटीत खात होती. अधाशाप्रमाणे अन्नाचा प्रतेक कण  उचलत होती. खाणे संपल्यावर  इकडे तिकडे  बघून आणखी कांही मिळतेका? ह्याचा शोध घेत होती. त्यांची नजर  माझ्या  खिडकीवर पडली. ती जणू  विचारीत  होती की आम्हाला अन्न देणारा  तो अन्नदाता कोठे आहे? इतक्या दुरून  मला  त्यांच्या डोळ्यात  काय दिसते  हे समजत नव्हते. परंतु त्यांचा चेहरा व  त्यावरचे भाव  सांगत होते की   आमच्या त्या अन्नदात्याला धन्यवाद द्या. आमचे आशिर्वाद  त्यांच्या पर्यंत पोंचवा.  माझे डोळे एकदम  पाणावले.
ऐकलेल्या वाचलेल्या महान तत्वज्ञानाचा  शब्दिक कीस  काढण्याचा मी प्रयत्न करीत होतो. आनंद घेत होतो. परंतु जाणवले की त्यामध्ये  अनुभवाचा ओलावा नव्हता. सत्य झाकोळले गेले होते. मला त्यावेळी त्याबद्दल खंत वाटली. 
 
( ललित लेख )