Daily Archives: जानेवारी 22, 2011

वळून पहा

 
उडून गेली दूर दूर तू
झेप घेउनी आकाशी
बघू लागलो चकीत होऊनी 
पंखामधली भरारी कशी
 
नाजूक नाजूक पंखाना 
आधार होता मायेचा 
चिमुकल्या त्या हालचालींना 
पायबंध तो भीतीचा 
 
क्षणात आले बळ कोठून 
विसरुनी गेलीस घरटे आपुले
बंधन तोडीत प्रेमाचे 
आकाशासी कवटाळले  
 
कधीतरी उडणे, आज उडाली 
बघण्या साऱ्या जगताला 
किलबिल करून वळून पहा
दाणे भरविल्या चोंचीला          
 
( कविता )