Daily Archives: डिसेंबर 2, 2010

जगरहाटी !

काळचक्रामध्ये  दैनंदिनीच्या अनेक गोष्टीत बदल होत चाललेले दिसतात. काही बदलांनी तर वेगळ्याच वातावरणाची निर्मिती झाल्याचे दिसून येते. केव्हा केव्हा काही गोष्टी फक्त एक इतिहास म्हणून शील्लक राहतो. असल्या काही गोष्टी पूर्वी झालेल्या असतील, व होऊ शकतात ही शंका देखील 
मनांत येत नाही. कारण समाज कौटुंबिक रचना, व बाह्य वातावरण बदलले असते. 
साधी बाब बघा. मुलांची नावे. ही ठेवताना साधारण पौराणिक कथामधील देवादिकांची नावे ठेवण्याची प्रथा होती. जसे नारायण, त्रिंबक, भास्कर, भगवान, महादेव, अथवा सावित्री, रुख्मिणी, कौशल्या, लक्ष्मी, सरस्वती, भागीरथी, इत्यादी. प्रत्येक नावात कोणत्या तरी देवी वा देवाचे स्वरूप समोर येत होते. त्यात देवाची आठवण केल्याची भावना होती. नावे तशी अर्थपूर्ण होती. अशाच  प्रकारची नावे आजकाल दिलेली दिसून येत नाहीत.  आजकाल कित्येक नावांचे  अर्थही लक्षात येत नाहीत. 
ह्या संदर्भात मला माझ्या बालपणीची आईने सांगितलेले आठवण खूपच  गमतीदार वाटते. मी दीड दोन वर्षाचा असेन, आमचे घर प्रमुख रस्त्याच्या  कडेला होते. एक भिकारी भिक मागत रोज दारावरून जात असे.   ” आंधळ्याला  भाकरी दे भगवान ”   ही त्याची ललकार असे. अर्थात हे मागणे ” भगवान ”   ह्या नावाने त्या अद्रष्य अशा ईश्वराला उद्देशून होते. ह्यात संशय नसावा. त्यांनी कृपा करावी, दया दाखवावी आणि कुणाच्या तरी मध्यमातून त्याची गरज पूर्ण करावी, हा उद्देश. त्या देवाला संबोधन्यासाठी त्याच्याच नावाचा  सर्व सामान्य उपयोग केला गेला. गम्मत म्हणजे माझे नाव देखील जुन्या प्रथेप्रमाणे आई वडिलांनी  ” भगवान ” असे ठेवले. त्याच नावाने  माझ्याशी  सतत संपर्क केला जाई. ईश्वराच्या अस्तीत्वाची, भव्यतेची, कृपाद्रीष्टीची आठवण सतत राहण्याची ही योजना. अर्थात माझी बाल बुद्धीच ती. त्याची ललकार मलाच उद्देशून केली असावी, ही माझी समाज. मी घरातील डब्यामधली   भाकरी घेऊन त्या भिकाऱ्याला दिली. त्याने समाधन व्यक्त केले व तो निघून गेला. थोड्या वेळाने पुन्हा आला. पुन्हा तीच ललकार  
 ” आंधळ्याला भाकरी दे भगवान ”  मी ऐकली. मी पळत जाउन पुन्हा भाकरी आणण्यास गेलो. आईचे माझ्या हालचालीकडे लक्ष गेले. ” अरे तू त्याला भाकरी दिलीस ना ?  पुन्हा का देतोस. ”  आईने माझ्यावर रोख लावला. ” बघ तो भिकारी मलाच भाकरी मागतो आहे. दुसऱ्यांना कां नाही मागत.?”
माझ्या गमतीदार तर्काने सर्वचजन हसू लागले. मला त्याची जाण आली नाही. 
तसा विचार केला तर ते एक सत्य होते. कोणाच्याही बालवयात त्या बालकामध्ये ईश्वर असतो. ही समाज. तेच बालक वयाप्रमाणे जगाचे ज्ञान घेऊ   लागते. सत्यामधून (  ईश्वरातून ) ते असत्यात ( जगांत) ते जाऊ लागते. त्याचा निरागसपणा लोप पाऊ  लागतो. सत्य भाषा जाऊ  लागते. तो शिकतो तो व्यवहार, उद्देश्पूर्ण सहवास, खोटे व चाणाक्ष मुखवटे. ह्यालाच आम्ही म्हणतो 
जगरहाटी.