एक समाधानी योनी

एक समाधानी योनी

रस्त्यावरील एका पुलावर बसलो होतो. एक मेंढ्या बकरय़ांचा कळप समोर चरत होता. तो कळप साधारण ३० ते ४० बकरय़ांचा असावा. एक मेंढपाळ त्याना मार्गदर्शन करीत होता. तो कांही वेळा झाडावर चढून बरीचशी पाने फान्ट्या तोडून त्या बकरय़ाना चरण्यासाठी टाकीत होता. बराच वेळपर्यंत ते दृष्य बघत मी आनंद घेत होतो. त्यांची पळापळ, बागडणे, खेळणे, एकमेकाना ढूसण्या देणे, सारे चालले होते. चरणे हा प्रमुख कार्यक्रम त्या पार पाडीत होत्या. कांही बकरय़ा आपल्या पिल्लाना चाटीत होत्या. प्रेम व्यक्त करीत होत्या. त्यातील तरुण बकरय़ा त्यांच्या पद्धतीने प्रेम व्यक्त करण्यांत व्यस्त दिसल्या. जीवन चक्रामधले जवळ जवळ सर्व उपक्रम त्या तन्मयतेने पूर्ण करीत असल्याचे जाणवले. त्याच बरोबर त्या मेंढपाळामुळे सर्वजण सुरक्षित असल्याची भावना देखील बाळगुन होते.
भरपूर खा, प्या, बागडा, मजा करा, सुरक्षित रहा, हा संदेश त्या बाळगुन होत्या. आणि हे सत्य ह्या साठी की सर्वजण वर्तमान काळांत जगण्याचा आनंद घेत होत्या. भविष्याची त्याना समज नव्हती व क्षमतांदेखील नव्हती. त्या कारणाने गरज वाटत नव्हती. त्यांचे भविष्य निश्चीत व अटळ होते. जसे तुमचे आमचे असते. ते म्हणजे मृत्यु. मृत्यु अंतीम असतो हे जरी सत्य असले, तरी त्याना खाटीकखाना ( Slaughter House ) ह्या दरवाज्यातून जावे लागणार असते. हे मानव निर्मीत सामाजिक व व्यवहारीक आधारलेले सत्य बनलेले आहे. त्यामुळेच त्यांच्या मृत्युचे विविध प्रकार वा स्थळे नाहीत. मृत्युची एकच पद्धत. अपघाती आणि कांही क्षणांतच. एक घाव आणि दोन तुकडे.
कोणता उद्देश असतो जीवन चक्राचा. काय योजना आहे त्या ईश्वराची वा निसर्गाची ? खरय़ा अर्थाने त्याची उकल आज पर्यंत निश्चीत व सर्वमान्य झालेली नाही. मानवाला बुद्धी, प्रगल्भता मिळालेली आहे. आपल्या विद्वतेच्या, ज्ञानाच्या, अनुभवाच्या शिखरावर जाऊन तो अनेक तर्क- वितर्क, प्रमेये, प्रस्थापीत करतो. तो श्रेष्ठत्व सिध्द करण्याच्या मागे लागला आहे. त्याचा संघर्ष, अविश्वास, आणि नैसर्गिक चक्रामधला विरोध हा शेवटी त्याचेच जीवन अशांत होण्यातच घडत आहे. खाण्याची चिंता, पिण्याची चिंता, विश्रांतीची चिंता, सुरक्षिततेची चिंता, थोडक्यांत म्हणजे जगण्याचीच चिंता त्याने निर्माण केलेल्या आहेत. निसर्गाला हवे असते ते एक जीवन चक्र. जन्म, वाढ, पुनर्निमिती आणि मृत्युच्या छायेत जीवनाला निरोप. पुन्हा चालत राहते ते तसेच जीवन चक्र.
हे सारे करीत होत्या त्या बकरय़ा. शिवाय आपल्या जीवाचे बलीदान देऊन इतर जीवांचे पोषण करण्यांत सहभाग देत होत्या. मानवाने मात्र त्याच्या जीवनचक्रांत बाधा आणून निर्माण केलीत अनेक दुःखे आणि अशांतता. मृत्यु अटळ असला तरी त्याचे प्रकार अनिश्चीत केले. तो वेळ घेणारा झाला. वैचारीक भय निर्माण करणारा झाला. मृत्युची जाणीव तिवृतेने करणारा झाला.
” बकरय़ानो – मेंढ्यानो निसर्गाच्या योनीतील समाधानी चक्रांत तुम्ही आहांत ” म्हणत मी तेथून घरी आलो.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s