Tag Archives: जीवनाच्या रगाड्यातून

” तन्मयता करी साकार “

” तन्मयता करी साकार ”

“नारायण” “नारायण” म्हणत श्री नारदमुनी श्री विष्णूना भेटण्यासाठी गेले. नारदानी विष्णूना अभिवादन केले. विष्णूनी हास्यमुखानी त्यांच स्वागत केल.
“हे महान ईश्वर जगदिशा आज मी माझ्या मनातली एक शंका घेऊन तुझ्याकडे आलो आहे. ” विष्णूनी हासत मानेनेच त्यांना मान्यता दिली.
“मी रात्रंदिवस सतत तुझ नामस्मरण करीत असतो. मी स्वतःला तुझा थोर परम भक्त समजतो. परंतु तुझे लक्ष्य इतर भक्तांमध्ये खूपच व्यक्त झालेले दिसते. माझ्याकडे तुझे दुर्लक्ष्य होत असावे अशी माझी आपली शंका. प्रभू मी काय करावे म्हणजे माझी शंका दुर होईल. ”
श्री विष्णू हासले. ” नारदा चल आज मी तुझी एक छोटीशी परिक्षा घेतो. त्यांत जर तु यशस्वी झालास तर तुला मी सर्वांत श्रेष्ठ भक्त ही उपाधी देईन. पाण्याने काठोकाठ भरलेले एक कटोर त्यानी नारदाच्या हाती दिले. जा ! ह्या पृथ्वी भोवती एक चक्कर मारुन ये. फक्त एकच अट. ह्या कटोऱ्यातून पाण्याचा एक थेंबही बाहेर पडता कामा नये. संभाळून ने. नारदानी कटोरे हाती घेतले. शांत मनाने कटोऱ्यातील पाण्यावर लक्ष्य केंद्रीत करीत त्यानी पृथ्वीची प्रदक्षीणा पूर्ण केली. अत्यंत आनंद व समाधानाने ते श्री विष्णूला पून्हा भेटले.
” नारदा मला खूप समाधान वाटले. तू अतिशय काळजीपूर्वक, मन एकाग्र करुन पृथ्वी प्रदक्षिणा केलीस. पाणी मुळीच हालले नव्हते. त्याचा एकही थेंब बाहेर पडला नाही. ” नारदाचे ह्रदय भरुन आले. ” परंतु खर सांगू नारदा. तू ह्या शर्यतीत हरलास. कारण जेवढा वेळ तू पाण्यावर मन एकाग्र करीत होतास, तुझ्याकडून नामस्मरणांत खंड पडला.
विष्णू लगेच नारदाला म्हणाले. “चल माझ्याबरोबर पृथ्वी लोकांत. तुला एक खरा भक्त दाखवतो. ” दोघानी साधूची वेशभूषा धारण केली. ते एका मंदीराजवळ आले. आंत चैतन्य महाप्रभू भजन करीत बसले होते. साधूना बघताच ते उठले. त्यानी दोघांचे स्वागत केले.
साधू वेषातील विष्णू म्हणाले ” तुमची भक्ती बघून आम्ही आनंदी झालो. प्रसन्नता वाटली. तुमच्या मनाची विचारांची लक्ष्य केंद्रीत करण्याची क्षमता आम्ही जाणली. तुम्ही आपले मन कसे एकाग्र करु शकता, हे आम्ही बघू इच्छीतो. त्यानी तोच साधा कटोऱ्यातील पाण्याचा प्रयोग चैतन महाप्रभूला करण्यास विनविले. मात्र येथे चक्कर फक्त त्या मंदीरा भोवती करण्यास सांगीतले. साधूना अभिवादन करुन ते अतीशय काळजीने पाण्यावर लक्ष्य केंद्रीत करीत निघाले. साधूवेषधारी दोघेजण मंदीराच्या दाराजवळ बसले.
बराच वेळ झाला. परंतु चैतन महाप्रभू मंदीर प्रदक्षिणा करुन आले नाही. दोघाना शंका वाटू लागली. ते उठले व त्यांचा मागोवा घेत मंदीराच्या मागे गेले. जे त्यानी बघीतले त्याचे दोघाना आश्चर्य वाटले. श्री चैतन महाप्रभू तो कटोरा हातात घेऊन हातवारे करुन भजन म्हणत, नाचत तल्लीन झालेले होते. कटोऱ्यातील पाणी सर्वत्र विखूरले गेले होते. हाती रिकामा कटोरा, मन ईश्वराचे चिंतन,मनन, भजन यानी भरले होते. सर्व शरीर बेभान होऊन नाचत होते. हे दृष्य बघताना नारदांच्या डोळे पाणावले होते.
ईश्वर भक्तीत ” तन्मयताच करी साकार ” ह्याची प्रचीती त्याना त्या भक्ताकडून आली.

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

उधळण

उधळण

परमेश्वरला निर्गुण निराकार, सर्वशक्तीमान, जगाचा रचैता, सर्व व्यापी, अनंत,एक सत्य, एक आनंद इत्यादी गुणानी वर्णन करीत त्याचे महात्म गायले जातात. जे चांगल दिसल, वाटल, भावल, समजल, अनुभवल, ते सर्व गुणधर्म एकत्रीतपणे त्या परमेश्वराचेच असल्याचे सांगीतले गेले. जे वाईट गुणधर्म जाणवले,ते देखील त्या परमेश्वरांतच असल्याचे म्हटले. म्हणून तो एक परिपूर्ण शक्तीस्वरुप असल्याचे व्यक्त झाले. अनेक विचार अनेक धर्म,पंथ,ग्रंथ इत्यादींचा विचार केला तर सर्वजण एक मतानी हेच मानतात की वरील प्रमाणे त्याचे सर्व गुणधर्म आहेत व तो फक्त एकच आहे. खरे बघतां त्याचे गुणवर्णन केंव्हांच पूर्ण होऊ शकत नाही. कारण तो जेवढा अमर्याद समजला गेला. तेवढेच आम्ही त्याचे वर्णन करणारे एकदम मर्यादीत असतो. एका मर्यादीत ज्ञानशक्तीने अमर्याद तत्वाचे वर्णन करताना आम्ही तोकडे पडतो.
त्या परमेश्वरानी कांही गुणधर्मांची उधळण ह्या जगांत, विश्वांत केलेली दिसते. उधळण ह्यासाठी म्हणतो की ते गुण बिंदू सर्वत्र पसरले गेलेले, विखूरलेले जाणवतात. त्यांत आहे प्रकाश, उष्णता. आर्द्रता, हवा, पाणी, तेज, पर्जन्य, विज, थंडी, वारा,आणि असेच अनेक घटक पदार्थ व उर्जाशक्ती. ह्या सर्वांचा सांघीक, एकत्र परिणाम म्हणजे जीवसृष्टी. भिन्न दिसणारी परंतु एकाच मुळ संकल्पनेतून निर्माण झालेली. प्रत्येकाचे कार्य, उद्देश, व जीवनचक्र ह्याची रुपरेखा आसून ते चालत असते. अनेक पदार्थांची निर्मीती करताना प्रत्येकाचे आपापले मुळ गुणधर्म हे देखील निश्चीत करुन ठेवलेले आहेत. याचा अर्थ निसर्गाने त्याचे आपले नियम केलेले आहेत. त्यामध्ये केव्हांच फरक पडत नसतो. सर्व नियम निश्चीत व ठरलेले आहेत. जसे दाहकता, उष्णता हा अग्नीचा गुणधर्म. तो ज्यांच्या संपर्कांत आला त्याला जाळून टाकणारा. पाण्यांत राहणारे प्राणी याना जलचर प्राणी म्हणतात. ते पाण्यांतच जगू शकतात. वा जमिनीवरील प्राणी, जमीनीवरच राहू शकतात. ज्याना जे माध्यम जगण्यासाठी दिले ते त्याच माध्यमांत आपले जीवन व्यतीत करतात. वेगळ्या माध्यमांत जगणे त्यांच्यासाठी केवळ अशक्य.
थोडक्यांत अशाच प्रकारचे अनेक अनेक नैसर्गिक नियम केले आहेत. जगाची सर्व दैनंदिन कार्ये त्याच्याच आधाराणे चालतात. उंचावरुन पडलेले फळ खालतीच येणार. परंतु पडलेले फळ आपोआप केव्हांच आकाशाकडे जाणार नाही. निसर्गाच्या नियमांमध्ये केव्हांही बदल होत नसतो. जेव्हां काहीं विपरीत घडले असे भासते, ते ही निसर्गाच्या कोणत्यातरी चौकटी नियमानुसार होत असते. कदाचित् मानवाला ते ज्ञात होत नसावे. किंवा त्याची उकल ही त्याच्या लक्षांत आली नसेल. येथेच माणसाची अवस्था संभ्रमी होते. साशंक होते. मग त्या घटनेवर अनेक तर्क वितर्क केले जातात. येथेच जन्म होतो श्रद्धा वा अंधश्रद्धा ह्या स्वभाव गुणधर्मांचा. काहींजण याला चमत्कार असे संबोधतात.
परमेश्वर जसा वर सांगीतल्या प्रमाणे अनेक गुणधर्मानी भरलेला असतो, तसाच तो
” प्रेम- दया- कृपा ” ह्या गुणानी व्याप्त असतो. आणि हे सर्व गुण सतत बरसत असतात. जेव्हां ही ईश्वरी कृपा वा दया म्हटली जाते, त्याचा अर्थ तो सतत कृपा वा दया यांची उधळण करीत असतो. हे सत्य आहे.

मात्र तो कुणावर वैयक्तीक वा प्रासंगीक उधळण केव्हांच करीत नसतो. ” ईश्वर कृपावंत आहे, दयावान आहे, वा दयाळू आहे ” असे म्हणने सत्य असते. परंतु ” ईश्वराने माझ्यावर कृपा केली वा मला दया दाखविली” हा शब्दप्रयोग चुकीच्या पद्धतीने घेतला जातो. ईश्वर कृपावंत आहे हे म्हणने जेवढे योग्य तेवढेच त्याने मजवर कृपा केली हे सांगणे चुकीचे. हां त्याच्या कृपेच्या सागरांत तुम्ही ती कृपा प्राप्त केली हे शक्य असेल.
पाऊस सर्वत्र पडतो. हे सत्य. तो बरसला. हा तसाच एक प्रकार. त्या पावसाची जाणीव येऊन तुम्ही घराबाहेर पडणे व पावसांत ओले होणे हे महत्वाचे असते. पाऊस तुमच्या अंगावर येऊन केव्हांच पडत नसतो. पावसाचा आनंद घेण्यासाठी त्या बरसणाऱ्या पावसांत तुम्हास जाणे जरुरी असते. त्याचे असेच महान गुणधर्म प्रकाश, उष्णता. आर्द्रता, हवा, पाणी, तेज, पर्जन्य, विज, थंडी, वारा,आणि असेच अनेक घटक पदार्थ व उर्जाशक्ती. इत्यादी आपल्या अंगावर झेलून ते ग्रहन करावे लागते, आनंद लुटावा लागतो. घरांत राहून, बंद खोलीत राहून, दारे खिडक्या बंद करुन ते सारे तुम्हास कसे मिळणार ?
त्याच प्रमाणे ईश्वर कृपावंत आहे, दयाळू आहे हे सत्य. मात्र त्याची कृपा, त्याची दया ही तुम्हास आपल्या कर्तृत्वाने वा क्षमतेने झेलावी लागते. असे न करता जर तुम्ही ” ईश्वराची मजवर कृपा झाली ” हा शब्दप्रयोग तरीत असाल तर तुम्ही एक अर्थाने त्या ईश्वराला दोष देणारे वाक्य उच्चारता, हे लक्षांत घ्या. उदाहरणार्थ दहा व्यक्तींनी एक गोष्ट हस्तगत करण्याचा प्रयत्न केला. एकाला ती मिळाली. त्यामुळे जेव्हां ती तुम्हाला मिळते, त्यांत अनेक कारणे असतात. जसे तुमचा प्रयत्न, इच्छा, आन्तरीक चेतना, योग्यता, धडपड, हिम्मत, आणि आणखी बरेच कांही. त्यापैकी कदाचित् ईश्वराची कृपा हेही एक त्यांत असू शकेल. परंतु तो कृपाभाग हा तर सर्वावर सारखाच बरसत असणारा असेल. जेव्हां तुम्ही
” ईश्वराची मजवर कृपा झाली ” ही उपाधी लावतां, तेव्हां त्याने इतर नऊ लोकावर अन्याय केला असे होणार नाही कां ? तो भेदभाव करतो असे त्यातून कुणाला वाटणार नाही कां ? Partiality करण्याचा ठपका त्यावर लागणार नाही कां ? तो तर सर्वासाठी न्यायी असतो. जे तुम्हाला मिळाले त्यांत ईश्वरी कृपा असेलही परंतु ती फक्त तुम्हास मिळाली असे नव्हे. तो कृपाळू, दयाळू सर्वासाठी सारखाच असतो. परंतु तो कधीही कुणावर वैयक्तीक कृपा करीत नसतो. ही समज जाणणे जरुरी असते. तो फक्त गुणांची उधळण करतो. तुम्हाला ती वेचायची असतात. तुमची क्षमता, जीद्द, प्रयत्न, आंतरीक इच्छा असे गुणधर्म त्या कृपेला हस्तगत करु शकतात. जे महान झाले असे अनेक विषयांत, प्रांतात चमकले. कांहीतरी मिळवायचे ह्या घ्येयानी ते झपाटले गेले होते. परमेश्वरी गुणघर्म ते टिपत जातात, त्याला आदर देतात, परंतु त्याच वेळी निवडलेल्या कार्यांत पूर्णपणे झोकून देता.

* जे महान झाले ते फक्त स्वकर्तत्वाने, स्वबळाने. हिमतीने, प्रयत्न्याने.
* ते फक्त गोळा करीत गेले सारे विखुरलेले ईश्वरी सद्गुणांचे मोती
* त्यानी अमोल, अप्रतीम असा मोत्यांचा हार बनवून जगाला अर्पण केला.
* हे सारे करीत असताना त्यांचा आन्तरात्मा त्या सर्वज्ञ, सर्वव्यापी सर्वशक्तीमान ईश्वराला
सतत साक्षी ठेऊन होता.


हां ! परमेश्वरा विषयी प्रेम, आदर व्यक्त करताना तो कृपावंत दयाळू ही विशेषणे लावणे चांगले. परंतु त्याची माझ्यावर कृपा झाली हा फार मोठा गैरसमज असेल. त्याची कृपा होते ही भावना तुम्हास अशक्त करेल. तुमच्या प्रयत्नामध्ये बाधा अणेल. कसेही झाले तरी तो मला दया दाखवील हा बाब केंव्हांही नसावी. ईश्वरा विषयी श्रद्धा गोष्ट वेगळी. परंतु अवलंबाची भावना, मुळीच नसावी. बरेचजण देवाची व्याख्या, त्याला मानवातील वरच्या दर्जाचा असे करतात. Some treat God as SUPERHUMAN. हे अत्यंत चुकीचे आसते. त्यांत मानवी मनाच्या आवडी, भावना, ईच्छा हे विचार त्याच्यावर थोपवले जातात. मग मला जे आवडते, भावते, ते त्याला तसेच आवडणारे समजून आपण त्याच्याशी वागण्याचा प्रयत्न करतो. हे चुकीचे आहे.
परमेश्वराशी मैत्री अर्थात सख्य हा भाव वेगळा. तो तसा असावा. अर्जून सुद्धा श्रीकृष्णाला सखा समजत होता. परंतु ही भावना येताना त्याच्या भव्यतेची, दिव्यतेची, जाणीव सतत असणे गरजेचे वाटते. तो कृपा करतो, दया करतो, हे गृहीत धरु नका. तो फक्त तुमच्या योग्य प्रयत्नाना साथ देतो. हे एकदम खरे. स्वतःच्या मनाचा, विचारांचा सतत चांगला विकास करीत रहा. यश निश्चित मिळते. प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ते याजसाठी. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असे केव्हांच घडत नसते. तो अत्यंत न्यायप्रिय असतो. निसर्गाच्या नियमांना समजून घ्या. तेथे कोणतीही चुक होणार नसते. वा मेहेरनजर नसते.
करा-मिळवा- अथवा भोगा हेच एक महान तत्वज्ञान त्या ईश्वराचे.

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

कोलीडोस्कोप

कोलीडोस्कोप

नातवाच्या खेळणीमधील एक खेळणी हाती लागली. एक गोल पुंगळी दोन्हीकडे पारदर्शक काचा.एका बाजूने बघीतले तर दुसऱ्या बाजूला अनेक लहान लहान रंगीत काचांचे तुकडे. त्यामधून अनेक कलापूर्ण डिझाईन दिसायचे. अतीशय मनोहर व मनास आनंदीत करणारे प्रक्षेपण असे. मात्र गमतीचा भाग असा की आतील रंगीत तुकड्याची हालचाल झाली की दिसणाऱ्या डीझाईनमध्ये त्वरीत बदल होत असे. प्रत्येक डिझाईन तसेच मनोहर व आकर्षक. फक्त एक गोष्ट प्रखरतेने लक्षांत आली की “दृष्य ” सतत बदलत, मनोहर असे परंतु एकदा बघीतलेले दृष्य पून्हा तेच व तसेच म्हणून केव्हांच दिसले नाही. दिसू शकणार नव्हते. रंग संगतीची सतत उधळण होत असे. विविधते मधला तो आनंद टिपला जाई. ज्यांत केव्हांच नव्हती स्थिरता. तोच तोपणा. अस म्हणतात की “आनंद ” हेच फक्त ईश्वरी सत्य आहे. आनंद म्हणजेच ईश्वरी दर्शन. आनंद हा भावनेचा सर्वात उच्य असा अविष्कार असतो. त्यांत इतर भावने प्रमाणे कोणताही विरोधाभास नसतो. आनंद हा चेतना स्वरुपांत व्यक्त होतो. कोणत्याही सभोवतालच्या दृष्य अदृष्य वस्तूमधून जाणीव देणाऱ्या, मन उल्हासीत करणाऱ्या चेतनेमध्ये आनंद असतो. कोलीडोस्कोप मधून क्षणाक्षणाला बदलत जाणाऱ्या परंतु प्रत्येक प्रक्षेपित दृष्यामध्ये आनंद समावलेला आहे. बदलते स्वरुप ही चिंतेची बाब वाटते. कारण ज्याच्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित होते. आनंदाचा ठेवा हाती लागतो. ज्याच्यात आनंद अर्थात ईश्वरी रुप बघीतले जाते. तो ढगांच्या हालचालीप्रमाणे स्वरुप बदलत जातो. मग स्थिरता समोर नसेल तर एकग्रता कशी होणार. ह्यातच त्याला समजले पाहीजे. कारण “आनंद ” याचे स्वरुप लहरी, लाटा, छटा ह्यानी अनुभवण्याचा, जाणण्याचा प्रकार आहे. ज्यांत बदलणारी संकल्पना आहे. परमेश्वरला जेव्हां निर्गुण रुपांत समजले जाते. त्याच वेळी कोणतेही रुप, कोणताही आकार, कोणते ही मोजमाप, कोणतेही वर्णन त्याला लागु पडत नाही. ज्या ठीकाणी असा प्रयत्न होतो तो निर्णय केलेला विचार असतो. असत्यात तो जाऊन बसतो. म्हणूनच असे मान्य झालेले आहे की परमेश्वर अनुभव येणे, जाणीव होणे हे शक्य आहे. परंतु प्रत्यक्ष बघणे कदापीही, केव्हांही सत्य असून शकत नाही. कारण तो फक्त आनंदमय आहे. सतत बदलणाऱ्या छटांत, गुणधर्मांत, एक उर्जा शक्तीच्या रुपांत

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

मला भाराऊन टाकल याने

बी हंग्री, बी फूलिश! हा आत्मचरित्रात्मक लेख वाचीत होतो. मनाला खूप भाराऊन गेला. परमेश्वर कांहीना ह्या जगांत पाठवतो असे म्हणतात. ते एक नमुन्यासाठी असते. These are the Sample people. म्हणतात. अशीच माणसे जगांत एक वेगळांच इतिहास करतात. निरनीराळ्या प्रंतातल्या अशा व्यक्ती आपण जगायच कशासाठी हे फक्त न बोलता करुन दाखविण्यासाठीच असतात. एकदम वेगळेच व्यक्तीमत्व. वेगळी जीवन कथा. आणि वेगळाच संदेश जगाला देत निघून जातात. मी मला आवडलेल्या टीपण्या देत आहे. तूम्हीपण आनंद लूटा.
हे सारे मी संग्रहीत केलेल आहे.

स्टीव जॉब्स
” मी तुम्हाला आज तीन गोष्टी सांगणार आहे. मोठं …भाषणबिषण देणार नाहीये. पहिली गोष्ट आहे ठिपके जुळवण्याची. मी सहा महिन्यांतच कॉलेज सोडलं. माझा जन्म झाला, तेव्हा माझ्या आईचं लग्न झालेलं नव्हतं आणि तिने मला दत्तक द्यायचं ठरवलं होतं, जन्माच्या आधीच. तिची एकच अट होती, माझे दत्तक पालक कॉलेज ग्रॅज्युएट असले पाहिजेत. काही घोटाळ्यामुळे ज्यांनी अखेर मला दत्तक घेतले ते ग्रॅज्युएट नव्हते; पण त्यांनी वेळ येताच मला कॉलेजात प्रवेश घेऊन दिला खरा. पण सहा महिन्यांतच माझ्या लक्षात आलं की माझ्या पालकांचा कष्टाचा पैसा वाया जातोय. मी कॉलेज सोडलं. नंतरचं दीड वर्ष मी कॉलेजमध्येच ड्रॉपआउट म्हणून राहिलो. या दीड वर्षातच मी खूप काही शिकलो. मला खोली नव्हती, त्यामुळे मी मित्रांच्या खोलीत जमिनीवर झोपायचो. दर रविवारी सात मैल चालत जाऊन हरे राम हरे कृष्ण मंदिरात फुकट जेवायचो. काही सेंट्ससाठी कोकच्या रिकाम्या बाटल्यासुद्धा विकायचो.

त्या वेळेस माझ्या कॉलेजमध्ये कॅलिग्राफीचे सर्वोत्तम शिक्षक होते. मी त्या वर्गात जाऊन बसायला लागलो. तिथे मी वेगवेगळे टाइपफेस आणि छपाईविषयी शिकलो. खरं तर त्या शिक्षणाचा मला प्रत्यक्ष उपयोग काहीच नव्हता; पण मी निव्वळ आनंदासाठी, मला आवडतं म्हणून ते शिकत गेलो. दहा वर्षांनंतर आम्ही जेव्हा पहिला मॅकिन्टॉश संगणक डिझाइन तयार करत होतो, तेव्हा ते सगळे मला आठवत गेले. आम्ही मॅकमध्ये ते वापरले. सुंदर टायपोग्राफी असलेला तो पहिला संगणक होता. मी कॅलिग्राफी शिकत असताना हे मला माहीत नव्हते की, याचा मला उपयोग होणार आहे. ठिपके पुढचं पाहून जुळवता येत नाहीत, ते मागे वळूनपाहूनच जुळवावे लागतात. त्यामुळे ते कधी तरी जुळतील असा विश्वास ठेवूनच जगावं. मग तुम्ही त्याला काहीही म्हणा- कर्म, आयुष्य, नशीब, गट फीलिंग, काहीही. मला या भूमिकेमुळे कधीच तोटा झालेला नाही, तर माझं आयुष्यच बदलून गेलंय.

दुसरी गोष्ट आहे प्रेम किंवा आवडीबद्दलची.

मी नशीबवान आहे, मला काय आवडतं, हे मला आयुष्यात खूप लवकर उमगलं. मी आणि वॉझने माझ्या वडिलांच्या गॅरेजमधून ‘अॅापल’ सुरू केली तेव्हा मी २० वर्षांचा होतो. दहा वर्षांनी ‘अॅंपल’ दोन अब्ज डॉलरची कंपनी झाली तेव्हा मी तिशीत होतो; पण मला ‘अॅहपल’ने हाकलून दिलं. आमच्या संचालक मंडळाचे आणि माझे मतभेद झाले.


माझ्या जाणत्या वयाचा मोठा भाग ज्याने व्यापला होता, तोच गेला होता. मी उद्ध्वस्त झालो. हे माझ्या तेव्हा लक्षात आलं नाही; पण माझी ‘अॅ पल’मधून झालेली हकालपट्टी ही माझ्याबाबतीत घडलेली सर्वोत्तम गोष्ट होती.
यशामुळे जड झालेलं डोकं नवेपणाच्या आनंदाने हलकं झालं आणि माझ्या आयुष्यातल्या सर्वाधिक सृजनशील कालखंडाला सुरुवात झाली.

पुढच्या पाच वर्षांत मी दोन कंपन्या सुरू केल्या. मुलीच्या प्रेमात पडलो. त्यातली एक कंपनी ‘अॅरपल’नेच विकत घेतली आणि मी ‘अॅनपल’ कुटुंबात परत आलो. मला या काळात एवढंच लक्षात आलं की, तुम्हाला काय आवडतं ते तुम्ही शोधलंच पाहिजे. आवडतं ते काम आणि आवडतात ती माणसं, दोन्हीला हे लागू होतं.

चांगलं काम करायचं असेल तर ते तुमचं आवडतं काम असणं अत्यावश्यक आहे. त्यासाठी तडजोड करू नका, शोधत राहा. प्रेमात पडल्यावर कसं लगेच कळतं, तसं हेही तुमच्या लक्षात येईल. एखाद्या सुंदर नात्याप्रमाणे तुमचं कामही उत्तरोत्तर चांगलंच होत जाईल.

माझी तिसरी गोष्ट आहे मृत्यूबद्दलची. – मी सतरा वर्षांचा असताना एक वाक्य वाचलं होतं, प्रत्येक दिवस तुम्ही तुमचा शेवटचा दिवस असल्याप्रमाणे जगा… त्यानंतरचं माझं संपूर्ण आयुष्य मी या तत्त्वानुसार जगायचा प्रयत्न करतोय. रोज सकाळी मी आरशात पाहून मलाच विचारतो, आजचा दिवस तुझा अखेरचा असेल तर जे तू करणार आहेस, तेच तुला करावेसे वाटेल? जेव्हा या प्रश्नाचे उत्तर सलग काही दिवस नाही येते, तेव्हा माझ्या लक्षात येते की मला बदलण्याची गरज आहे.

वर्षभरापूर्वी मला कर्करोग झाल्याचं निदान झालं. मला डॉक्टरांनी केवळ तीन ते सहा महिने दिले. त्यांनी मला घरी जायला सांगितलं. म्हणाले, आवराआवर करायला लागा. म्हणजेच निरोप घ्यायला लागा, कुटुंबाला पुढे त्रास होणार नाही अशी व्यवस्था करा.

नंतर असं निदान करण्यात आलं की, शस्त्रक्रिया करून मी बरा होईन आणि माझा कर्करोग कायमचा जाईल. या अनुभवातून गेल्यानंतर मी अधिकाराने म्हणू शकतो की कोणालाच मरायचं नसतं, अगदी ज्यांना स्वर्गात जाण्याची इच्छा असते त्यांनाही त्यासाठी मरायचं नसतं; पण तरीही ते कुणालाही चुकलेलं नाही. ते तसंच असलं पाहिजे कारण मृत्यू हा जीवनातील सर्वोत्तम शोध आहे. जुने मागे टाकून तोच नव्यासाठी जागा करतो. तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे म्हणूनच दुस-या कोणाचं आयुष्य जगून तो वाया घालवू नका. इतरांची मतं आपलीशी करू नका. तुमचं हृदय आणि मन काय सांगतायत तेच ऐकायचं धैर्य दाखवा. त्यांनाच माहीत असतं तुम्हाला खरं काय व्हायचंय. मी लहान असताना ‘दि होल अर्थ कॅटलॉग’ नावाचं मासिक निघायचं. कालांतराने ते बंद झालं. त्याच्या शेवटच्या अंकावर एका दूरवर जाणा-या रस्त्याचं छायाचित्र होतं आणि शब्द होते, ‘बी हंग्री, बी फूलिश…’ मी माझ्यासाठी कायम हाच विचार करत आलोय आणि तुम्हालाही त्याच शुभेच्छा देतो ”

संग्राहक
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

पुराणकाळातील अस्त्र

पुराणकाळातील अस्त्र

महाभारतातल्या महायुद्धाच्या कथा ऐकल्या. कौरव व पांडव ह्या दोन भावंडामध्ये झाल्या होत्या. ह्या अंगावर रोमांच उभे करतात. जर सुक्ष्म निरक्षण केले तर ते शस्त्र व अस्त्र यांचा उपयोग करुन लढले गेलेले युद्ध होते.
थोड्याच लोकाबद्दल योध्याबद्दल विरा बद्दल त्यांच्या पराक्रमामुळे त्यांची नावे सांगीतली गेली. त्यांची रणांगणातील यश वा अपयश प्राप्त म्हणून ओळखली गेली. परंतु ह्या युद्धांत अनेक अनेक विर पराक्रमी लढवये लढले. बलीदान पावले. त्यांची नांवे आपणासाठी तरी अंधारतच राहीली. फक्त श्री कृष्णला त्या प्रत्येकाबद्दल ज्ञान होते. जाणीव होती. केवळ त्या युद्धांत श्री कृष्णाची प्रत्यक्ष असण्याची भूमिका असल्यामुळे, जे तेथे त्याच्या नजरेदेखत धारातिर्थी पडले, त्यांच्याही आत्म्याना सद् गती मिळाली असावी, हे समजणे चुक ठरणार नाही.
आगदी अधूनिक पद्धती प्रमाणे त्या युद्धांत डावपेच खेळले गेले. प्रतीस्पर्ध्यातील नैपुण्य, योग्यता, अचुकपणा, शस्त्रांचा वापर, अस्त्रांचा मारा, इत्यादींचा अभ्यासपूर्वक विचार होत होता. शस्त्र म्हणजे धनुष्य बाण, गदा, तिरकमटा, भाला, तलवारीसारखे हत्यार, इत्यादी आयुधे होती. ही साधी परंतु धारदार शस्त्रे होती. पूर्वी आश्रम आणि गुरुकडून ज्ञानसाधना होत असे. त्यांत मंत्रविद्या शिकवली जाई. मंत्रशक्ती प्रभावाने निरनीराळ्या उर्जाशक्तीना आवाहन करुन आपल्या जवळच्या शस्त्रामध्येच त्या अवतरीत केल्या जात. त्याचा त्याप्रमाणे परिणाम होत असे. उदा. बाणावर अग्नीचा मंत्र म्हणून, दिव्य अग्नीअस्त्र निर्माण केले जाई. परिणाम स्वरुप अग्नीचा वनवा वा ज्वालांचा हा हा कार होत असे. त्याच वेळी त्या अग्नीच्या वनव्याचा प्रतीकार पर्जन्यास्त्र वा पवनास्त्र ह्या संकल्पनेने केला जाई. जेवढे महान गुरुज्ञान व तपस्वीता, पावित्र्य थोर, तेवढी मंत्र साधना व तपोबल श्रेष्ठ असे. अस्त्रयुद्धाचे महत्व येथेच ठरते.
दोन अत्यंत महत्वाची अस्त्रे महाभारत युद्धात वापरली गेली. एक ब्रह्मास्त्र व दुसरे नारायणास्त्र. दोन्हीही प्रचंड शक्तीची विध्वंसक. परंतु केवळ श्री कृष्णाच्या दिव्य भव्य ज्ञानशक्ती, चातूर्य, व दूरद्दष्टीमुळे त्या दोन्हीही अस्त्राना निकामी केले गेले. त्यांच्या प्रचंड विध्वंसक शक्तीवर रोक लावला गेला. तेही फारसे कांहीही न करता साध्य केले गेले. हा विषयाचा वृतांत उद् भोदक ठरेल. करमणूक करणारा वाटेल.
” ब्रह्मास्त्र ” हे नांव उचारताच प्रत्येकजण हादरुन जातो. घाबरतो. बेचैन होतो. जसे अधूनिक काळातील अँटम बॉंब ( Atom Bomb ). ह्याची सर्वाना कल्पना आहे. १९४६ साली अमेरीकेने त्याचा प्रथम वापर केला. तो जपानच्या हिरोशीमा व नागासाकी ह्या भागांवर.केवळ एका शस्त्राने प्रचंड भयानक व कल्पनेच्या बाहेर हानी पोहंचवीली. निसर्गात एक उत्पात माजला. घरदारे, मानवप्राणी, अनेक जीवजंतू, ह्याचा क्षणांत नाश झाला. विचार करता येणार नाही, असा हाहा कार त्या शस्त्राने केला. जमीनीचे अपरीमीत नुकसान झाले. झाडे झुडपे यांची वाढ बराच काळ खुरटली. जमिनीचा सुपीकपणा नष्ट झाला. अनेक लहान मोठे प्राणी नामशेष झाले. केवढा हा भयावह परीणाम. त्या एका अधुनिक शस्त्राचा.


” ब्रह्मास्त्र ” हे आगदी ह्याच पद्धतीप्रमाणे होते. मात्र ते अस्त्र होते व त्याची विध्वंसक क्षमता आजकालच्या कोणत्याही बॉंबपेक्षा अनेक पटीने जास्त होती. ब्रह्मास्त्राची योजना व त्यावरील ताबा एकदम वैयक्तीक होता. त्याचा आधार पवित्रता, एकाग्रता, ज्ञान, असा उच्य दर्जाच्या साधनेमध्ये होता. माणसाची योग्यता जर इतक्या वरच्या स्थरावर साध्य झाली, तरच त्याला ब्रह्मास्त्र शिकण्याचा व बाळगण्याचा हक्क अपोआप मिळे. त्यामुळे ते अस्त्र कुणीही घेईल वा वापरेल हे मुळीच नव्हते. आजकालचे Atom Bomb, Hydrogen Bomb, अटॉमिक शस्त्र हे कुणालाही ज्ञान घेऊन, चोरुन, लुबाडून, अर्थसहाय्य देऊन, सहज प्राप्त होऊ शकते. तसेच ह्याचा कुणीही उपयोग करु शकतो. आगदी माथेफीरु, बदमाश, वा आतंकवादी. ते जे असेल ते कुणालाही मिळणे अशक्य नाही. ब्रह्मास्त्राचे असे मुळीच नव्हते. त्याचमुळे योग्यताप्राप्त अशी मोजकी व्यक्तीरेखा होऊन गेल्या की ज्याना ब्रह्मास्त्राचे ज्ञान व उपयोग करण्याची क्षमता प्राप्त झाली होती. केवळ मंत्र तंत्र पाठ करुन हे शक्य नव्हते. त्यासाठीची बैठक ही महानता, दिव्यता, भव्यता अंगी असल्याशिवाय शक्यच नव्हते.

ब्रह्मास्त्राला आणखी एक गुणधर्म होता. ब्रह्मास्त्राच्या विध्वंसक परिणामाना जर रोकणे जरुरी असेल तर, त्यावर फक्त एकच उपाय होता. ब्रह्मास्त्राला ब्रह्मास्त्रानेच विरोध करणे. येथे अस्त्राची योजना अशी होती की टाकल्या गेलेल्या ब्रह्मास्त्रावर जर विरोधी दिशेने कुणी फक्त ब्रह्मास्त्रच फेकले तर दोन्ही अस्त्र आपसांत एक होऊन, कोणताही उत्पात न करता निकामी होऊन जात. विचार केल्यास ही अप्रतीम योजना होती. त्या काळी दिव्य उर्जा असलेली अस्त्रे होती. त्याचप्रमाणे त्याना निकामी करण्याचे ज्ञान अस्तित्वात होते. ही अत्यंत भाग्याची देण म्हणावी लागेल. समोरा समोरचा विर लढवय्या दोन्ही प्रकारचे ज्ञान बाळगुन होता. तो दिव्य अस्त्र टाकणे अथवा विरुद्ध दिशेने स्वतः वर टाकलेले अस्त्राला निकामी करणे. ज्याना हे ज्ञान अवगत नव्हते, तेच त्या अस्त्राचे बळी पडत. मात्र त्यासाठी गरज होती ती त्या अस्त्राची जाण व धारणा असलेल्या व्यक्तीची.
कौरव आणि पांडव यांच्या युद्धांत ब्रह्मास्त्राचा उपयोग केला गेला. परंतु त्याच वेळी दोन्ही पक्षातील कांही महान व्यक्तीना त्याचे ज्ञान अवगत असल्यामुळे, ब्रह्मास्त्राला निकामी करणेही शक्य झाले. कौरवाना स्वतःला ब्रह्मास्त्राचे ज्ञान मुळीच नव्हते. कारण तेथे संबंध होता पावित्र्याचा, एकाग्रतेचा. मात्र त्यांच्याबरोबर होते भिष्माचार्य, द्रोणाचार्य, ज्याना ब्रह्मास्त्र विद्या अवगत होती. अर्जून. कर्ण यानाही हे ज्ञात होते. कौरवाकडून प्रथम ब्रह्मास्त्राचा उपयोग केला गेला. परंतु सतर्क असलेल्या पांडवाना श्रीकृष्णाने त्वरीत मार्गदर्शन केले. दोन्हीकडील ब्रह्मास्त्रामुळे कसलाही विध्वंस वा हानी न होता ती नामशेष केली गेली.
दुसरे अस्त्र ” नारायणास्त्र ” . ह्या अस्त्राची तिवृता व विध्वंसक क्षमता ही देखील प्रचंड होती. कदाचित् ब्रह्मास्त्रापेक्षाही जास्त असेल. कौरवांच्या सुदैवाने त्या अस्त्राचे ज्ञान फक्त भिष्माचार्यानाच होते. पांडवाकडील कुणालाही नारायणास्त्राचे ज्ञान नव्हते. अर्थात श्री कृष्णाला ते संपूर्णपणे माहीत होते. आणि तो पांडवांच्या बाजूने होता. परंतु पांडवांच्या दु्र्दैवाने श्री कृष्णाची युद्धपूर्व अट त्यानाच जाचक ठरणारी होती.

३ “मी युद्धांत तुम्हास साथ देईन. चार शब्द युक्तीचे सांगेन.
परंतु हाती शस्त्र वा अस्त्र केंव्हांही घेणार नाही. ”
शेवटी झालेही तसेच. जेव्हां कौरवानी बघीतले की ब्रह्मास्त्र हे निकामी झाले, त्याक्षणी दुर्योधनाने पितामह भिष्माचार्य याना विनंती केली की त्यांनी शेवटचा उपाय म्हणून
“श्री नारायणास्त्र ” याचा वापर करावा. भिष्माचार्यानी ते मंत्रुन पांडव सेनेवर टकले.

काय घडले असते ? कारण प्रचंड विध्वंसक व हानीकारक क्षमताप्राप्त ते अस्त्र होते. हा हा कार माजला असता. पांडवाकडे तशाप्रकारचे अस्त्र नव्हते. ह्याच ठिकाणी, ह्याच क्षणी उपयोग झाला तो श्री कृष्णाच्या युक्तीच्या चार गोष्टींचा.
न घरी शस्त्र करी मी / सांगेन गोष्टी युक्तीच्या चार //
“श्री नारायणास्त्र ” ह्याचे संपूर्ण ज्ञान फक्त श्री कृष्णाला अवगत होते. त्याच्या विध्वंसक क्षमतेची त्याला कल्पना होती. त्याच प्रमाणे त्या अस्त्राचा एक विशेष गुणधर्म होता.
” जो त्या अस्त्राला विरोध करेल, त्याच क्षणी त्या विरोधामधली सर्व उर्जा शक्ती आपोआप नारायणास्त्र खेचून घेईल. नारायणास्त्राची आपली उर्जा व विरोधकाची उर्जा एकत्र होऊन ते नारायणास्त्र जमा झालेल्या शक्तीनीशी विरोधकाचा नाश करेल.
श्री कृष्णनी येणाऱ्या नारायणास्त्र याचा वेध घेतला. त्याच क्षणी त्यानी अर्जूनाला आणि इतर सर्व सेनेला सुचना केली की सर्वानी त्या नारायणास्त्राला नतमस्तक व्हावे. आपली हत्यारे टाकून द्यावी. कोणताही विरोध वा उलट हल्ला करु नये. सर्वानी त्याक्षणी ते मानले. कुणीही त्या नारायणास्त्राला कसलाही विरोध केला नाही. “विरोधकांची उर्जा शक्ती हानन ” हीच जर नारायणास्त्राची संकल्पना होती. तर त्याला कोताही विरोध न करता, It was Total Surrender to Narayanastra करीत त्याला मान्यता व अभिनादन केले गेले. ज्या तेजाने नारायणास्त्र चालून आले ते सर्व पांडव सैनाच्या वरुन कसलाही आघात न करता निघून गेले. नामशेष झाले. जणू ह्या अस्त्राने श्री कृष्णालाच एक प्रकारे अभिनादन केले होते.
अशा तऱ्हेने दोन दिव्य, भव्य प्रचंड उर्जायुक्त, विध्वंसक अस्त्रे ही नामशेष केली गेली. योग्य त्या धोरणामुळे व श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनामुळे.
पशुपतास्त्र- हे प्रचंड ताक्तीचे अस्त्र श्री शंकराच्या संबंधीत असते. ते शिवानी प्रसन्न होऊन अर्जूनाला दिले होते. परंतु त्या अस्त्राचा कुणाही व केव्हांही उपयोग केल्याची नोंद नाही. ते अत्यंत विनाशी अस्त्र असून त्याची विध्वंसक शक्ती ब्रह्मास्त्र, नाराणास्त्र यांच्या पेक्षाही जास्त असते. संपुर्ण जग, त्यातील सर्व जीवन उद्धवस्त करण्याची श्रमता ह्या अस्त्रांमध्ये असल्याची नोंद पुराण शास्त्रांत केलेली आहे. ते जर वापरले, टाकले तर जो विनाश घडेल त्यांत टाकणाऱ्यासहीत सर्वांचा नाश करण्याची शक्ती त्याच्या अंगी असते. म्हणूनच अर्जूनाने देखील ते अस्त्र कधीच वापरले नाही. श्री कृष्णाचा हे अस्त्र वापरण्याला विरोध होता.
आंता काळ बदलला आहे. पूर्वीचा इतिहास पुराण हे सर्व दाखविते व वर्णन करते. की भारतीयांजवळ ब्रह्मास्त्र, नारायणास्त्र, पशुपतास्त्र ही प्रचंड विनाश क्षमता असलेली अस्त्रे होती. आजच्या अधूनिक काळांत त्याच धरतीची अस्त्रे आपण बाळगीत आहोत. ज्याला ऍटम (अणू) बॉंब, नॉट्रोजन बॉंब, हैड्ऱोजन बॉंब इत्यादी संबोघीले गेले. हे आपण समजतो, अभ्यासतो. जे सारे एके काळी पूर्वीच आपणाजवळ होते. मानवाचा पूर्व इतिहास तेवढाच मनोरंजक, बोधक आणि थरार निर्माण करणारा होता. प्रत्येकानी त्याला सन्मान द्यावयास हवे. आदर करावयास हवे. आपल्या ऋषीमुनिंची शक्ती, क्षमता अभ्यासूनच आजच्या अधूनिक इतिहासांत त्याची पुनुरावृत्ती होताना दिसते. त्या ऋषीमुनीना विनंम्र प्रणाम.

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

शुर्पणखाची एक सुडकथा

शुर्पणखाची एक सुडकथा

रामायणातील एक प्रसंग आठवला. राम लक्ष्मण सीता हे वनांत होते, त्यावेळची ही गोष्ट.
लंकेचा राजा रावण, याच्या लहान बहीणीचे नांव मिनाक्षी. ती अतीशय सुंदर होती. तीचे डोळे मत्सा अर्थात माशाप्रमाणे होते, म्हणून तीचे नांव मिनाक्षी ठेवले. तीची आई केकसी ही दैत्य कुळामधली. तर वडील विश्रवा ऋषी हे ब्राह्मण कुळातले. तीचे अर्थात रावणाचे आजोबा पुलस्ती ऋषी हे अत्यंत थोर व्यक्तीमत्व होते. ब्रह्मदेवाच्या कल्पनेतून साकारलेल्या सप्त (सात) ऋषीं मंडळातील ते एक. मिनाक्षीमध्ये त्यामुळे दैत्य व ब्राह्मण ह्या दोघांचे वैचारीक व भावनिक गुणधर्म उतरले होते. सौंदर्याचा अभिमान, प्रचंड अहंकार, हट्टीपणा, आणि आवडलेली कोणतीही गोष्ट हस्तगत करण्याची जीद्द हे तीच्या स्वभावांत होते. एक गमतीची गोष्ट म्हणजे तीची नखे पसरट सुपाप्रमाणे होती ( winnow- like nails ). ती तिक्ष्ण होती. म्हणून तीचे टोपण नांव
शुर्पणखा पडले. ह्याच नांवाने ती पूढे ओळखली जावू लागली.

तीने लक्ष्मणाला बघीतले. ती लक्ष्मणावर मोहित झाली. तीने लक्ष्मणाकडून प्रेम व तीच्याशी विवाह करण्याची अपेक्षा व्यक्त केली. लक्ष्मणाने तीचा विचार फेटाळून लावला. दोघांचा वैचारीक संघर्ष झाला. लक्ष्मण हा त्याच्या विचारावर ठाम होता. तर ती अत्यंत आग्रही होती. ती असूरी वृत्तीची होती. एक गर्व, अभिमान, व अहंकार याने ती भारलेली होती. लक्ष्मण आपल्या विचाराला साथ देत नाही, हे समजताच ती आक्रमक झाली. घटनेचे रुपांतर हातघाईवर झाले. लक्ष्मणाच्या हातून तीला शारिरीक इजा झाली. तीच्या चेहऱ्यावर वार लागला. नाकाला दुखापत झाली. शुर्पणखा किंचाळत तेथून पळून गेली. ती खवळली होती. सुडाने पेटली होती. तीच्यावर वार करणाऱ्याला नष्ट करण्याचे तुफान तीच्यांत पेटले होते. पण तशी ती असाहाय्य होती.
ती त्याच क्षणी तीचाच भाऊ रावण याच्याकडे गेली. नुकताच घडलेला सर्व वृतांत त्याला सांगितला. तीने त्याच्याकडे मदतीची अपेक्षा केली. रावण लंकाघीश होता. एक पराक्रमी बलाढ्य होता. युद्धांत त्याने सर्व देवाना देखील पराजीत केले होते. नवग्रह यांना बंदी केले होते. त्याक्षणी त्याकाळी रावणाला आपल्या सामर्थ्याची जाण होती. त्याच बरोबर प्रचंड आत्मविश्वास त्याच्याजवळ होता. बहीण शुर्पणखा हीची विटंबना झालेली त्याच्या लक्षांत आली. परंतु हा संघर्ष केवळ त्यांच्यातील दोघांचा होता. एका बलाढ्य राजाने तीच्यासाठी ह्या अवहेलनेत सहभाग घ्यावा ही अत्यंत क्षुल्लक बाब त्याचासाठी होती. त्याने स्वताः कोणतीही मदत देण्यास ठाम नकार दिला. शुर्पणखा निराश झाली. रावणाकडून तीला मदत मिळण्याची शक्यता नव्हती मात्र ती चतूर होती, शाहाणी होती थोडीशी राजकारणीही होती. तीने रावणाला दुसऱ्या मार्गाने छेडण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली ” रावणा एका गोष्टीची मी तुला आज आठवण देऊ इच्छीते. रामाची पत्नी सीता ही त्यांच्या बरोबर आहे. ती अतीशय देखणी आहे. सुंदर आहे. तुला ती तुझी राणी म्हणून खूपच शोभणारी आहे. तू तीला घेऊन ये. वेळ पडल्यास तू तुझ्या बळाचा शक्तीचा वापर कर. ” रावणाला हा सल्ला मुळीच आवडला नाही. रावण एक महान राजा होता. मन्दोदरी ही त्याची पत्नी होती. महाराणी होती. तो तीला अत्यंत आदराने व प्रेमाने वागवीत असे.
२ मन्दोदरी देखील एक आदर्श स्त्री म्हणून समजली गेली. तीचे नांव पंचकन्या म्हणून प्रसिद्ध आहे. मान्यता पावलेली आहे. ( तारा, सीता, मंदोदरी, अहील्या, द्रौपदी ).
अशा महान मन्दोदरीचा रावण हा पती. रावण चवचाल, वाईट नजर असलेला कोठेही संदर्भ रामायणात नाही. शुर्पणखेच्या विचीत्र व विक्षीप्त अशा विचारसरणीला रावणाने रागाने धुडकावून लावले. शुर्पणखा निराश झाली. तरीही तीने आपला विचार सोडला नाही. ती अतीशय चाणाक्ष्य होती. तीचे सर्व वार खाली जात होते. हे जाणून तीने वेगळीच चाल खेळली. तीला हे संपूर्ण माहीत होते की रावण तीचा भाऊ जेवढा पराक्रमी तेवढाच अत्यंत अहंकारी व अभिमानी स्वभावाचा आहे. तीने शांत होत त्याला एक आठवण करुन दिली. त्याच्या मनाला छेडले. ” रावणा आठव तुझा त्या सभाग्रहांत झालेला उपमर्द. तु जनक राजाच्या मुलीच्या स्वयंवरासाठी गेला होतास. तेथे ठेवलेल्या शिवधनुष्याला प्रत्यंचा बांधणे हा पण ठेवलेला होता. दिसायला सोपा परंतु अत्यंत आवघड ही गोष्ट होती. तेथील जमलेल्या कुणालाही ते धनुष्य किंचीत देखील हालवता आले नव्हते. तू तो प्रयत्न केलास. तू ते धन्युष्य उचललेस. त्याला प्रत्यंचा लावण्याचा प्रयत्न करु लागलास. परंतु ते प्रचंड जड असल्या कारणाने तुझा तोल गेला. तू पडलास. सारी सभा, तेथील जमलेले राजे तुला हासले. त्या हासण्यांत वधू मुलगी सीता ही देखील सहभागी झाली होती. ती पण कुत्सितपणे हासली. तुझा असा अपमान झाला होता. ते अपयश हा एक डाग होता. ” मी याचा बदला घेईन ” अशी गर्जना करीत तू त्यावेळी स्वयंवर मंडप सोडून गेलास. आठव ते सारे. जागृत कर तुझ्या ठेच पोंहोंचलेल्या स्वाभिमानाला. ज्या स्त्रीने तुझी हेटाळणी केली, त्यावेळी जी तुला हासली तीच सीता मला वनांत दिसली. ती राम लक्ष्मणाबरोबर आहे. मला दिली गेलेली वागणूक कदाचित् तुला क्षुल्लक वाटेल. भले तू राम लक्ष्मण यांना कोणतीही शिक्षा करु नकोस. परंतु त्या सीतेला प्रथम लंकेत घेऊन ये. तीला बंदीवासांत ठेव. तीला योग्य ती शिक्षा कर. हेच तुझ्या जनक राज्याच्या दरबारांत स्वयंवराच्या वेळी झालेल्या अपमानाचे परिमार्जन असेल. ”
रावण हे सर्व वर्णन ऐकत होता. त्याच वेळी तो शिवधनुष्य पेलता न आल्यामुळे पडला, सभागृहातील इतर राज्यांचे हासणे, सीतेचेही कुत्सीतपणे बघत हासणे, हे प्रसंग आठवू लागला. त्याचा अहंकार चेतावला गेला. बहीणीच्या विचारामधला गर्भीत आशय त्याच्या लक्षांत आला. राम लक्ष्मणाचा येथे कोणताच सहभाग नव्हता. त्यांच्याशी संघर्ष करण्यासारखे त्याला कांहीच वाटले नाही. मात्र जो त्याचा अपमान सीतेकडून स्वयंवरप्रसंगी झाला, तो दुर्लक्ष करण्यासारखा नव्हता. तीला लंकेच्या एका महान राजाचा अपमान करण्याची सजा दिली गेलीच पाहीजे. रावणाच्या मनांत हे पक्के झाले. आत्मविश्वास, सैनबळ, युद्धनिती, ही रावणाची नेहमीची चाल असे. परंतु ह्या गोष्टी त्यानी टाकल्या. शिवाय राम लक्ष्मण ह्याना तो फक्त दोन विरपुरुष समजत होता. ते फार पराक्रमी आहेत असा कोणताच प्रभावी प्रसंग तोपर्यंत दिसण्यांत आला नव्हता. त्यांच्याशी युद्ध करण्याची संकल्पना त्याला त्याक्षणी आलीच नाही. त्याचे फक्त एकच ध्येय बनू लागले. आणि ते म्हणजे सीतेला लपून, पळवून आणणे. व बंदी करणे. राम लक्ष्मणाशी संघर्ष टाळणे. येथेच त्याने कपटनिती अनुसरली. शुर्पणखेच्या विचारांना त्याने एका दृष्टीकोणातून मान्यता दिली.
त्या तथाकथीत कुकर्मासाठी तो एकटाच निघाला. फक्त एक सहकारी त्याचा मामा मारीच ह्याला त्याने बरोबर घेतले. ते ह्या साठी की एखादे मायावी रुप घेऊन राम लक्ष्मणाला सीतेपासून तात्पूरते अलग करता यावे. आणि तसेच घडले देखील.
३ मारीच ह्याला मायावी शक्ती आवगत होती. तो सुवर्ण हरीण बनला. सातेच्या हट्टापायी राम त्याला पकडण्यासाठी धावला. रामाचा आवाज काढीत त्याने लक्ष्मणाला मदतीला बोलाऊन घेतले. अशा तऱ्हेने मारीचने राम लक्ष्मणाला सीतेपासून वेगळे केले.
रावणाने साधूचा वेष धारण केला. कारण सीतेला त्याचा विश्वास वाटावा. लक्ष्मणाने आपल्या दिव्य शक्तीने सीतेच्या रक्षणासाठी झोपडी भोवती आखलेली लक्ष्मण रेषा ह्याची पण जाण त्याला आली होती. त्यानेच सीतेला भिक्षा देण्यासाठी पद्धतशीर ती लक्ष्मणरेषा ओलांडण्यासाठी उद्युक्त केले. ह्याच दुर्दैव क्षणाला सीता फसली. ती जीवनांत येणाऱ्या संकटाला समजू शकली नाही. ती जागृत राहीली नाही. गाफील राहीली. हीच सतर्क न राहण्याची तीची चूक तीला पुढील संपूर्ण आयुष्यभर भोगावी लागली. थोड्याशा चुका, छोटासा चुकीचा अंदाज, अविच्यारी निर्णय, जीवनामध्ये कसे तुफान निर्माण करतो हे ह्याचे उदाहरण. अशीच अनेक उदाहरणे आपण सतत बघत असतो. अनुभव घेत असतो. हे सत्य आहे. आपल्या अशा चुकांचे बोल आपण नशीबाला, दैवाला लावतो. कारण ही वृत्ती व प्रवृती असते. कुणीही त्याची जीम्मेदारी स्वतःवर घेत नसतो. येथे तर सीता ही महान व दिव्य भूमिकेतली होती. मग सारे खापर रावणाच्या माथी मारणे सहज व सोपे होते.
रावणाने डाव साधला. सीतेला शक्तीनीशी उचलले. पुष्पक विमानानी आकाशमार्गे तो तेथुन निसटला. थेट लंकेत आला. रावणाने सीतेला बळजबरीने पळविले. हे सत्य होते. परंतु त्याने तीच्यावर कोणतीही जबरदस्ती केली नाही. कोणताही अतिप्रसंग केला नाही. अथवा विनयभंग केला नव्हता. लंकेला सीतेला बंदीस्त करुन वेगळे अशोक वनांत ठेवण्यांत आले. तीला राजमहलमध्ये केंव्हाच ठेवले नव्हते. ज्या परिसरांत राजा रावण स्वतः रहात होता, त्या वास्तुपासून दुर अंतरावर त्याने सीतेची राहण्याची सोय केली होती. अशोक वनांत अनेक फळझाडे, फुलझाडे, लता वेली, पशुपक्षी, पाण्याचे झरे इत्यादी यांचा विलक्षणसुंदर निसर्ग निर्मण केला होता. त्या आनंदमय वातावरणांत सीतेला प्रसन्नतेने राहता येईल याची सर्वतोपरी काळजी घेतली गेली. अनेक दासदासी यांचा पहारा तीच्या सभोवताली ठेऊन तीच्या रक्षणाची संपूर्ण काळजी घेतली जात असे. ( दुर्दैवाने ह्या दासीना राक्षसीनी ही उपाधी लाऊन त्या वातावरणाला दुषित करण्याचा प्रयत्न केला गेला. ) सीतेच्या सहवासांत असलेल्या रावणाच्या सेविकांनी सीतेला अतिशय प्रेम जीव्हाळा व आदराची वागणूक दिली. तीच्या सर्व वैयक्तीक गरजा सतत पूर्ण करण्यांत लक्ष दिले. अर्थात ह्या सर्व बाह्य सुखसोई केलेल्या होत्या. तरी सीता स्वतःला निराश, दुःखी, असहाय्य आणि सतत असुरक्षीत समजे. ती आनंदी केंव्हाच झाली नाही.
झालेल्या अपमानाचा बदला, एक सुडाची तिव्र भावना, अहंकाराला बसलेली ठेच, ह्याचा प्रचंड मानसिक परीणाम रावणाच्या मनावर होणे केव्हांही गैर म्हणता येणार नाही. ती एक मानवी जीवनाची नैसर्गिक प्रतिक्रीया म्हणावी लागेल. रावण हा कांही संतमहात्मा नव्हता.की त्याने पडती बाजू घेत उदारमनाने सर्व सहन करावे. एक बलाढ्य पराक्रमी राजा, त्याच्या हातून अशाच प्रकारे होणार हे निरीक्षण असते. परंतु तो जेंव्हा राजा ह्या भूमिकेमधून सिंहासनावरुन उतरतो व रावण ह्या भूमिकेत येतो, त्यावेळी त्याच्या स्वभाव विशेषावर प्रकाश टाकणे योग्य होईल. सीतेला त्याने अत्यंत सन्मानाने अशोक वनांत बंदीस्त केले होते. तीच्यावर केंव्हाही, व कधीही अत्याचार, अन्याय, जबरदस्ती, वा भावनीक हल्ला केला नाही. तीला केव्हांही स्पर्श देखील केला नाही. सीतेला तीच्या विचारांचे संपूर्ण स्वातंत्र दिले गेले होते.


जर सीतेचा सहकार असेल, मान्यता असेल, उत्स्फूर्त इच्छा असेल तरच रावण तीला राणी मंदोदरीच्या रांगेत बसण्याची परवानगी देणार होता. राणीचा सन्मान मिळणार होता. रावण शक्तीशाली होता. लंकाधीश राजा होता. सीतेवर बळजबरी करुन हे त्याला साध्य करणे ही क्षुल्लक बाब होती. परंतु रावणाच्या महान व अध्यात्मिक व्यक्तीमत्वाला हे केव्हांच मान्य नव्हते.
रामायणाचा शेवटचा संदर्भ समजणे महत्वाचे ठरते. घडत जाणाऱ्या सर्व प्रसंगाच्या शेवटी जी घटना घडली ती देखील चिंतनीय बाब ठरते. राम रावण युद्ध झाले. रावण मारला गेला. सीतेची सुखरुप सुटका झाली. आयोध्येला परतण्यापूर्वी रामाने सीतेच्या पावित्र्याची शंका घेत, अग्नी परीक्षा घेतली. सीता त्यांत यशस्वी झाली. ती संपूर्ण पावित्र्याची देवता ठरली. सीतेची अग्नीपरीक्षा ही जशी तीची महानता दर्शीत करते, त्याच प्रमाणे ती राजा रावण ह्याच्या बंधणात देखील किती सुरक्षीत होती व पवित्र जीवन जगू शकली हे तिव्रतेने दाखविते. राजा रावण ह्याची महानता आपण खऱ्या अर्थाने जाणली पाहीजे.

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

ह्रदयातील ईश्वर

ह्रदयातील ईश्वर

महाभारतामधला एक प्रसंग आठवला. छोटासा परंतु जीवनातील अध्यात्म्याच्या प्रांतामधले एक महान तत्वज्ञान उलगडून सांगणारा वाटला.
द्रौपदी वस्त्रहरणाचा भयानक व तिरस्कारणीय प्रसंग. शकुनीमामा व कौरव हे वृत्तीने दुष्ट कपटी चालबाज होते. पांडव तितकेच भोळे होते. कौरवानी त्याचा पूर्ण फायदा घेतला. युद्धिष्टिर पांडवातील ज्येष्ठ बंधू. त्याला दुर्दैवाने द्युत ( सारीकापाट) खेळण्याचा नाद होता. कौरवानी त्याना कचाट्यात पकडले. शकुनी लबाडीने खेळला. पांडव खेळांत सर्व गमावून बसले. इतके की भावनीक बेभान होऊन त्यानी जींकण्याच्या अपेक्षेने पत्नी द्रौपदी हीलाही पणाला लावले. कौरवानी द्रौपदीची विटंबना सुरु केली. हारलेले पांडव मुकपणे सारा भयावह प्रकार बघत बसले.
द्रौपदी असाहय्य झालेली होती. तीला कुणीही मदत करण्यास सरसावत नव्हते. शेवटी तीने मानलेला भाऊ श्रीकृष्णाचा धावा केला. तो धाऊन आला. त्याने तीला त्या वस्रहरण प्रसंगातून सोडवले. सारे वातावरण शांत होऊ लागले होते.
द्रौपदी मात्र मानसिक निराशेने ग्रस्त झाली होती. ती कृष्णावर देखील रागावली. तीला एक आधीकार व प्रेम प्राप्त झाले होते.
” कृष्णा हे सारे विक्षीप्त घडत असताना, मी तुझा धावा केला. तू आलास, परंतु तू येण्यास उशीर कां केलास ? ” प्रेमाने परंतु निराशेच्या स्वरांत द्रौपदीने कृष्णाजवळ तक्रार करीत विचारणा केली. श्री कृष्णानी हासून उत्तर दिले.
” तू माझा धावा केलास. मदतीची अपेक्षा केली. ”
तू त्या क्षणी काय म्हणालीस ते आठव. तू म्हणाली होतीस ” हे द्वारकेच्या कृष्णा मी संकटात आहे. तू त्वरीत येऊन माझी सोडवणूक कर. ”
तू जेव्हां मला हांक दिली की ” हे द्वारकेच्या कृष्णा, तेंव्हा त्याक्षणी मी तर तुझ्याच ह्रदयांत बसलो होतो. ”
जर तू मला ” माझ्या ह्रदयातील कृष्णा संबोधून हाक दिली असतीस, तर मी तुझ्याजवळच होतो. त्याचक्षणी मला येता आल असत. परंतु तु मला द्वारकेच्या कृष्णा संबोधल्यामुळे मला प्रथम द्वारकेस जावे लागले व तेथून तुजसाठी आलो. त्यामुळे वेळ लागला. ”
आपण देखील जीवनांत ह्याच रीतीने आपली वाटचाल करतो. अशी समज आहे की तो ईश्वर हा तुमच्या आमच्यामध्येच असतो. अहं ब्रह्मास्मि अर्थात मीच ब्रह्म वा परमेश्वर आहे म्हणतात. मात्र आपण त्याला जाणत नसतो. समजत नसतो. “मी ” ला ओळखत नसतो. त्याला आम्ही बाह्य जगांत शोधण्याचा सतत प्रयत्न करतो. देवस्थळे, मंदिरे, चर्च, गुरुद्वारे, मशिदी, इत्यादी मध्ये त्याच्या अस्तित्वाचा शोध बोध घेण्याचा प्रयत्न करतो. संपूर्ण आयुष्य खर्च करतो. आम्ही ईश्वराला आमच्यातच म्हणजे “मी ” चा शोध घेण्यात कमी पडतो. त्यात वेळ खर्ची होते. ह्रदयातील त्या ईश्वराला श्री कृष्णाला जर द्वारकेत न्याल तर आयुष्याची वेळ वाया जाईल.

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

सिकंदरचे खंतावलेले मन

सिकंदरचे खंतावलेले मन
राजा अँलेक्झॉंडर दी ग्रेट हा ग्रीस देशाचा. ज्याला युनान म्हणत. एक परकीय आक्रमक भारतात आला होता. तो महापराक्रमी, लढवय्या, शुरवीर जसा होता, तसाच सहिष्णू, प्रेमळ व अध्यात्मिक प्रवृतीच होता. ह्याचमुळे त्याला भारतातच सिकंदर ( ज्येता व नशीबवान )ही लोकपदवी मिळाली होती. तो त्याच्या घोडेस्वार सैनिकासह होता. रस्त्यात लागणारे प्रदेश पादाक्रांत करीत, लुटालुट करीत, तो पुढे पुढे चालला होता. रस्त्यांत भेटणारे गांवकरी भितीने पळून रानावनांत धावत होते. जे कोणी समोर आले, ते त्याला अभिवादन करुन नतमस्तक होत. ह्याचमुळे अहंकाराच खतपाणी त्याला मिळत होत. त्याची घोडदौड चालू होती.
अचानक त्याची नजर एका फकीरावर (साधूवर ) पडली. तो एका झाडाखाली दगडावर बसला होता. दोघांची नजरा नजर झाली. फकीराच्या चेहऱ्यावर एक अविचल, शांत, निर्भय, भाव होता. इतके सैन्य बघून देखील त्याच्या चेहऱ्यावर उत्सुकता वा भिती दिसून आली नाही. सिकंदरने आपला घोडा त्याच्या पुढ्यांत नेऊन थांबवला. सारे घोडेस्वार थांबले. सिकंदर घोड्यावरुन उतरला. फकीरासमोर गेला. दोघानी एकमेकाना बघीतले. सिकंदर फकीरास आपला परिचय देऊ लागला.
” मी अँलेक्झॉंडर अर्थात सिकंदर युनानहून भारतात आलो आहे. ”
फकीर उठून शांतपणे त्याच्याकडे टक लाऊन बघत होता. थोड्या वेळाने फकीराने चौफेर नजर टाकली. सर्व सेनिकांचे अवलोकन केले. तो सिकंदरकडे वळून विचारु लागला.
” राजा तू येथे कशासाठी आलांस ? ”
सिकंदर छद्मीपणाने हसला. ” मी सम्राट आहे. येथील प्रदेश जिंकून घेणार. संपत्ती लूटणार .” फकीराने हलके व शांतपणे विचारले ” त्या नंतर पुढे काय करणार ? ”
सिकंदर उत्तरला ” पुढे काय ? हे लुटलेले धन युनानला घेऊन जाणार ”
” त्यानंतर काय करणार ? ” फकीराने थोडेसे कुत्सीकतेने विचारले.
” काय करणार त्यानंतर ? कांहीही नाही. शांतपणे जगण्याचा प्रयत्न करीत, उर्वरीत सार आयुष्य व्यतीत करणार ” सिकंदर मोठ्या गर्वाने उत्तरला.
फकीर हसला. तो सिकंदरकडे एक नजर लाऊन बघू लागला. ” राजा हे सारे करुन, इतका उपद्वाप करुन, शेवटी शांततेच्याच मार्गाचा विचार करणार आहेस ना ? मला हसू येत ते याच की तू हे सार झाल्यानंतर, जे करु इच्छीतोस, ते तर मी आजच करीत आहे. – – – –
एका शांततेचा शोध. अनुभव जाणीव ,ज्यात फक्त असेल समाधान, प्रेम आणि नितांत आनंद. ”
राजा गंभीर होऊन सारे ऐकत होता. ” राजा तुझ्या बाबतीत एक सत्य परीणाम मला
दूरदृष्टीने दिसतो. तुझ्या शांततेच्या अंतीम प्रयोगांत, एक जाणीव तुला सदैव बेचैनी करील. तुझ्या मनाची होणारी तगमग, उत्सुकता, आशा-निराशेचे झोके, केलेल्या शक्तीप्रयोगाचा पश्चाताप, दुखावलेल्या आत्म्यांचा अक्रोश, आणि तुझा बनलेला अहंकार. हे सारे भावनिक अविष्कार, तुझ्या मनाला त्या शांततेच्या जवळच येऊ देणार नाहीत. आनंदापासून वंच्छीत करतील ”
राजाचे डोळे पाणावले होते. कसल्याश्या अनामिक आंतरीक शक्तीने त्याच्या सद्सदविवेक बुद्धीवर फुंकार घातल्याची त्याला जाण आली. जवळची कांही फळे फकीरापूढे ठेवीत, त्याने फकीरास अभिवादन केले. खंतावलेल्या मनाने तो पुढे निघून गेला.

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

जेष्ठत्व हे श्रेष्ठत्व कसे ?

जेष्ठत्व हे श्रेष्ठत्व कसे ?

ज्येष्ठ नागरिकाना श्रेष्ठ समजले जाते.
व्यवहारी जगांत बालपण, तारुण्य, प्रौढत्व आणि वृद्धापकाळ ह्या जीवन चक्रामधल्या विवीध अवस्था. त्यांमध्ये मान्यता पावलेला शेवटचा काळ, ज्याला ज्येष्ठ नागरिक संबोधीले गेले. केवढा मोठा सन्मान हा त्या वयाचा. ज्येष्ठ नागरिक एक महान आणि सर्वांत सन्मानाची उपाधी बनलेली आहे.
ज्येष्ठ नागरिक हे वयानी श्रेष्ठ असतात. प्रचंड अनुभव हे आपल्या पाठीशी बाळगुन समाजात वावरतात. कुटूंब वत्सल असतात. जीवन व व्यवहार ह्या दोन प्रमुख मार्गावर अनेक पदे सांभाळलेली. प्रशासकीय, सामाजिक, आर्थिक, राजकीय, अशा अनेक क्षेत्राचे अद्यावत ज्ञान मिळालेली असतात. त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा योग्य फायदा समाजाच्या विकासांत व्हावा वा त्यांच्याकडून करुन घ्यावा ही अपेक्षा.
ज्येष्ठाना अनेक सवलती शासनाकडून दिल्या गेल्या आहेत. आणि मिळतही आहेत.
एक गम्मत बघा. बस वा रेल्वेने प्रवास करा. इतरापेक्षा खर्च कमी.
यात्रीने भरलेल्या बस वा रेल्वेत अचानक शिरा. लोक तुमचा आदर करतात. लोक उठून आपली जागा तुमच्या साठी देऊ करतात. तुमचा चेहरा बघताच ती तुम्हाला मिळते. तो चेहरा असहाय्य वा मागणी करणारा नसतो. तर त्यावर किंचीत हस्याची छटा असते. एक आशिर्वाद देण्याची भावना असते. थोडेसे प्रेम व्यक्त होत असते. तुमच्या चेहऱ्यावर ज्येष्ठत्वाची झलक मात्र असते. ही व्यक्ती ज्येष्ठ नागरिक असल्याचा शिक्का त्या गर्दीत देखील तुमच्या विषयी आदर निर्माण करतो. शेजारचा विनम्र होऊन प्रेमाने हात धरीत आपले आसन मोकळे करीत तुम्हाला त्या जागेवर बसवितो. हां ! कदाचित् तुमची दुखणारी कंबर, मान, वा गुढगे, तुमचा वाकडा तिकडा करणारा शरिराचा आकार त्याच्या नजरेत आलाही असेल. पण ते कांहीही असो, तुम्हाला सन्मान पूर्वक न प्रयत्न करता, जागा मात्र निश्चीत मिळते.
आहो तुम्ही बँकेत जा. इतरापेक्षा तुम्हाला जास्त व्याजदर मिळतो. तेथे तर तुमच्याकडे न बघता, फक्त समोरचा कागद बघत, तुमच्या वयाची कदर केली जाते.
केवढे महत्व आहे तुमच्या ज्येष्ठत्वाचे.
अनेक उपाधी (Degrees) असतात. त्या प्रत्येकजण आपल्या जीवनांत मिळवतो. परंतु त्या सहज मिळत नसतात. त्यासाठी अभ्यास, परिश्रम, व मनाचा निश्चय लागतो. मग ते ज्ञान कोणत्याही मार्गाचे असो. B.A., B.SC., B.Ed . L.L.B., M.B.B.S. C.A., B.E., B.Tech. इत्यादी. त्याच प्रमाणे निरनीराळे व्यवसाय ( Jobs) वा नोकऱ्य़ा जसे शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, अकॉन्टटंट, इत्यादी ह्या सर्व त्यांच्या कर्तृत्वानुसार त्यांच्या उपाधी बनतात. त्यासाठी प्रत्येकाने त्या त्या प्रमाणात परिश्रम घेतलेले असतात. अभ्यास असतो, धडपड असते. कुणीतरी बाजारांत जाऊन त्या खरेदी केलेल्या नसतात. प्रत्येक उपाधी मागे दडलेली असते, त्याची त्या त्या प्रकारची तपश्चर्या आणि यश.

ज्येष्ठ नागरिक बनण्यासाठी मात्र विना श्रम, कांहीही कष्ट न घेता, कोणताही अभ्यास न करता, कोणत्याही परिक्षेला सामोरे न जाता मिळते ही उपाधी, ही डीग्री. आणि तीही अतिशय प्रतीष्ठेची.
कशासाठी ज्येष्ठाना श्रेष्ठ समजले जाते?
प्रत्येकाच्या पाठीवर एक गाठोडे असते. ते अनुभवाने भरलेले असते व भरत जाते. हे गाठोडे जमा केले असते, जीवन दावावर लाऊन. आयुष्य खर्च करुन. निसर्गाने दिलेली पुंजी गमाऊन. Every thing at the cost of life. हे अनुभव जमा केलेले असतात. ते सहज मिळालेले नाहीत.
इतर प्रांत बदलले जातात. C.A. व्हायचे होत, डॉक्टर झालो. प्राध्यापक व्हायचे होते, वकील झालो. फुट बॉल प्लेयर व्हायचे होते, नट झालो. इत्यादी. जसे श्रम, प्रयत्न, परिस्थीती येत गेली, व्यक्ती बदलत गेल्या.मार्ग व ध्येय बदलत गेले. त्यांच्या उपाध्या बदलत गेल्या.
ज्येष्ठत्व मात्र कोणत्याही मार्गाने गेलांत तरी शेवटी ते मिळत गेले. ते सर्वासाठी एकच असते. सर्व उपाध्या मानव निर्मीत असतात. परंतु ज्येष्ठत्व जे प्राप्त होते, ते नैसर्गिक चक्राला अनुसरुन. आणि म्हणुन त्याचे अनन्यसाधारण महत्व असते.

जीवन मृत्युचा सतत लपंडाव चालू असतो. जीवनाच्या प्रत्येक क्षणा भोवती मृत्यु दबा धरुन बसलेला असतो. ह्याला काळ व वेळ यांचा खेळ म्हणतात. दोघे एकत्र येताच, मृत्यु जीवनावर झडप घालतो. ते जीवन त्वरीत नष्ट होते. ह्याचसाठी आम्ही जीवनाला अनिश्चीत समजतो. आम्ही केंव्हाही, कोणत्याही क्षणी मरणार ह्याचे आम्हास इतरांचे मृत्यु बघून ज्ञान होते. परंतु मृत्युची जाणीव कुणासही केंव्हाही येत नसते. हा निसर्गाचा आशिर्वाद असतो. निसर्ग तुम्हास सदैव जागृत राहण्याचा संदेश देत असतो. आम्ही आमच्या मनाच्या sub-conscious अर्थात जाणीवेच्या स्थरावर नेहमी सतर्क असतोच. ज्याचे ह्यांत थोडेशे दुर्लक्ष होते, मृत्यु त्यावर त्याच क्षणी घाला घालतो.

तुम्ही बघितले असेल. पक्षी- चिमणी वा कबुतर अंगणांत पडलेले दाणे, एकदम जाऊन टीपत नसतात. प्रथम ते सर्वत्र नजर टाकून मृत्यु कोठे लपलेला आहे कां? ह्याचा मागोवा घेतात. स्वसंरक्षणाची खात्री होताच ते दाणे टिपतात. प्रत्येक प्राण्याच्या जगण्याच्या हलचालीमधून त्याची सतर्कता सतत प्रतीत होत असते. हे त्याच्या सहज अंगवळणी पडलेले असते. एखादी चुक वा दुर्लक्ष त्याचे जीवन चक्र थांबऊ शकते.

माणसाचेही असेच दिसून येते. दैनदीन जीवनांत येत जाणाऱ्या असंख्य संकटा विषयी तो सतर्क असतो. ती संकटे नैसर्गिक असो वा मानव निर्मीत. जीवाचा बचाव करणे, निसर्गाने जे दिले ते योग्य तऱ्हेने सांभाळणे हे सर्वात त्याचे प्रथम कर्तव्य समजले जाते. आणि प्रत्येकजण स्वतःची त्याप्रमाणे काळजीही घेत असतो. क्षणा क्षणाला मृत्युशी त्याचा संघर्ष होत असतो.
इतका कठीण आयुष्याचा मार्ग तो चालत असतो. आणि एक एक पाऊल टाकीत जेंव्हा आयुष्याची सर्व साधारण मर्यादा जी निसर्गाने अंदाजे १०० वर्षे त्याच्या वाटेला दिलेली असतात, तो ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.

अशा भयावह व क्षणा क्षणाला संकटग्रस्त वाटणाऱ्या जीवनाची ५० वर्षे तो जेव्हां पूर्ण करतो, त्याची अर्धी जीवनपाऊल वाट झालेली असते. जवळ जवळ निसर्ग अपेक्षीत कर्तव्ये संपत आलेली असतात. प्रौढत्वाचा टप्पा ओलांडून तो वृद्धत्वाकडे झुकू लागतो. त्याच्या ह्या धडाडीपूर्ण व यशस्वी टप्यालाच ज्येष्ठत्वाची संकलपणा मानलेली असते. त्याचा ज्येष्ठत्वाचा काळ आरंभ झालेला असतो.
जीवनाचे इतर मार्ग जसे Money, Muscle, Spirit, Career. Character, Recommendations, इत्यादी यश मिळविण्यास मदत करु शकतात. परंतु ज्येष्ठत्वाच्या मार्गाला पर्याय नाही. तो एकमेव व निश्चीत आहे.
जे खचकले ते गेले. जीवनाच्या चाकोरीतून हटले. जे टिकले, खंबीरपणे झगडत राहीले, ते जीवन मार्ग चालत राहीले. आज त्याना ज्येष्ठाची उपाधी मिळाली. अनुभव घ्यावा लागत नाही. तो मिळतो. निसर्ग तुमच्या ओंझळीत टाकतो. तुमच्या पाठीवरचे गाठोडे वाढत जाते. ते जेवढे मोठे, तेवढाच सन्मान मोठा.

१०० वर्षे जे पुर्ण करतात त्याना शतायुषी ही उपाधी सन्मानाने दिली जाते. ज्या ज्येष्ठानी ९० ते ९५ वा १०० ह्या वयाचा टप्पा गाठलेला आहे, काय वेगळ त्यानी केल ? ते जीवनाशी संघर्ष करीत राहीले. प्रत्येक क्षण मृत्युच्या भोवऱ्यांत गुंतलेला असतना, जीवन क्षणभंगुर असताना. ते जागृतपणे जगले. व यशस्वी झाले. मृत्यु केंव्हा व कसा घाला घालील अनिश्चीत असते. प्रत्येक क्षणाबरोबर, वातावरणाबरोबर, तुमचा सतत संघर्ष चालू असतो.

एक प्रकारचा लढा. जे जगले ते केवळ त्यांत यश मिळत गेले म्हणून. निसर्ग नेहमी जीवन मृत्युची दोन्हीही दारे उघडी करुन तुम्हास मार्ग दाखवित असतो. तुमची सतर्कता तुम्हाला जगवित असते. जीवन पुढे पुढे जाण्यात मदत करीत असतो. आपले ज्येष्ठत्व हे लढा करुनच आपण मिळविले आहे. म्हणूनच हा ज्येष्ठत्वाचा सन्मान.

येथे एक महत्वाची बाब सर्वांसमोर आणू इच्छीतो. जीवनाची वाटचाल जरी खडतर दिसत असली तरी मानवाने आपल्या बुद्धी व ज्ञान याच्या साहाय्याने तीलाच पूर्णपणे बदलून टाकलेले आहे. ते जीवन आता आनंद देणारे, हवे हवेसे वाटणारे, सुलभ, आशादायी, करमणूक प्रधान बनलेले आहे. तरी मृत्युच्या चकरा जीवनाभोवती चालूच असतात

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

विश्वासातील शंका

विश्वासातील शंका

एक लहानशी घटना परंतु अध्यात्म जगांत एक महान तत्वज्ञान सांगून जाते.
श्री कृष्ण एकदा जेवण्यासाठी बसले होते. रुख्मिनी त्याना जेवन वाढीत होती. अचानक श्रीकृष्ण उठले व लगबगीने जावू लागले. ते घराच्या दारापर्यंत गेले. ते क्षणभर तेथेच थांबले. थोडावेळ थांबून परत आले. पुन्हा जेवण्याच्या पाटावर बसले. रुख्मिनीला हे सारे अघटीत वाटले. तीच्या लक्षांत श्रीकृष्णाच्या ह्या हालचालीचा अर्थ कळला नाही. तीने तसे विचारले.
श्रीकृष्ण हसून म्हणाले ” दुर अंतरावर मी बघीतले की माझा एक भक्त माझ्या नावाने भजन करीत होता. ‘ कृष्ण कृष्ण जय जय कृष्ण ‘ म्हणत रस्त्याने गात नाचत चालत होता. त्याच वागण, मोठ्यने हातवारे करीत गाणे म्हणने, हे कांही जवळून जाणाऱ्याना वेगळेच वाटले. ते त्याला वेडा समजून मारु लागले. तो खालती पडला तरी देखील माझे नांव न सोडता तसाच गात होता. त्याचा आर्तस्वर माझ्या कानी पडला. माझे लक्ष्य त्याच्याकडे वेधले गेले. मी त्याला सहाय्य करण्यासाठी जाऊ लागलो. दारापर्यंत आलो. अचानक मी बघीतले की त्या भक्ताला कुणीतरील दगड मारला. तो त्याच्या भाळी लागला. एकदम रक्तस्त्राव सुरु झाला. त्यानी त्याच्यावर झालेल्या हल्याचा प्रतिकार करण्यासाठी स्वतःच एक दगड उचलला. तो त्यानी त्या लोकावर फेकला. तो आपले रक्षण स्वतः करण्यास उद्युक्त होऊन करीत आहे. त्याच क्षणी त्याने माझे नांव व भजन सोडून दिले. माझे नांव सोडल्यामुळे त्याची माझ्यावरची अवलंबुनता निघून गेली. आता तेथे जाण्यांत अर्थ नाही. ”
जीवनांत देखील अनेकजण ईश्वर भक्ती करतात. त्यांच्यावर श्रद्धा ठेवतात.
मानवाची ईश्वरी संकल्पना दोन अंगाने दिसून येते.
१- ईश्वर सर्व शक्तीमान, सर्वव्यापी, व विश्व चालक ह्या प्रमुख भावनांतील भूमिकेमध्ये तो व्याप्त समजला जातो. ह्या उदात्त समजाला मन नेहमी अनुभवण्याचा प्रयत्न करीत असते. जे कळल ते जाणल पाहीजे ही भावना. त्याच्या भक्तीमार्गाचा, भजनाचा, नामस्मरणाचा स्रोत ह्याच मार्गाने व्यक्त होत असतो.
२ – तो कृपावंत, संकटविमोचन व सुखकर्ता समजला जातो.
त्याच वेळी त्याने हेही अनुभवल असत की ईश्वर खऱ्या अर्थाने व्यवहारी जीवनांत केंव्हाही कृपा करीत नसतो. संकटसमयी धावून कोणतीही मदत करीत नाही. तुमच्या मिळणाऱ्या सुखांत त्याचा प्रत्यक्ष सहभाग केंव्हाच नसतो. हे सारे सत्य असते.
ईश्वराची महानता वेगळी आणि त्याचा व्यक्तिच्या जीवनातील सहभाग समजणे हे सर्वस्वी भिन्न समज होत. निसर्गाचे निश्चित व ठरलेले नियम असतात. त्याचप्रमाणे जगरहाटी चालते. कांही मिळणे वा न मिळणे येथे मानवी इच्छेचा प्रश्न नसतो. ते सारे घडणाऱ्या परिस्थिती नुसारच होते. अनेक कथा वा प्रसंग मात्र आळवून सांगीतले जातात.
ईश्वर भक्ती फक्त मनोबल वाढवीत असते. संकटाची सोडवणूक ज्याची त्यालाच करावी लागते. हाच ह्या छोट्या कथेचा बोध नव्हे कां?

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com