वर्षाचे भगिनी प्रेम

बागेतील तारका

वर्षाचे भगिनी प्रेम

तप्त होतां धरणी माता, शांत करी वर्षा तिजला

प्रफुल्लतेचे झरे फुटती,   आंतूनी त्या मातीला…..१,

जलमय होती नदी नाले,  दुथडी भरूनी वाहती

धबधब्यातील खरी शोभा,  वर्षामुळेंच दिसती…२,

हिरव्या रंगीं शाल पसरते,  धरणी माते वरी

ऊब यावी म्हणून मेघांचे,  आच्छादन ती करी….३,

वर्षा धरती बहिणी असूनी,  प्रभूची भावंडे

उचंबळूनी प्रेम येतां,  धावून येते तिजकडे….७

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

नेत्रहीनता !

जीवनाच्या रगाड्यातून

नेत्रहीनता !

ठाण्याहून नाशिकला महत्वाच्या कामासाठी चाललो होतो. हायवेवर गाड्यांची प्रचंड प्रमाणात जा ये चालू होती. लवकर पोहचणे जरुरी होते. त्यामुळे गाडी वेगातच चालली होती. अचानक माझी नजर दूर अंतरावरील एका गाव फाट्यावर गेली. एक माणूस हलके हलके मुख्य रस्ता ओलाड्ताना दिसला. तो एकटाच असून, बेफिकीर भासत होता. कोणत्या क्षणी एखादे वाहन जवळ येऊन धडकेल ह्याचा भरवसा नव्हता. विशेष म्हणजे कुणीही व्यक्ती हायवे क्रॉसिंग करताना डावीकडे उजवीकडे बघेल,  स्वत:ला विश्वासात घेईल, व मग रस्ता ओलांडेल. परंतु हा कसलीही तमा न बाळगता शांतपणे इकडे तिकडे नजर न टाकता, रस्ता ओलांडत होता. दररोज  पेपरमध्ये अनेक  अपघतांच्या बातम्या वाचण्यात येतात. अशाच बेफिकीर वृतीमुळे व वाहन चालकाच्या  नजर चुकामुळे त्याक्षणाला काहीही होण्याची शक्यता असते. काळजी अर्थात दोघानीही घ्यावयाची असते.  क्षणार्धात अनेक विचारांचे काहूर मनांत येऊन गेले. मला भासणाऱ्या त्या मूर्ख माणसाला चांगलीच  हडसून खडसून समज द्यावी, झापावे, हा विचार आला. एकदम मी ब्रेक दाबून गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. अगदी मुठ वळून त्या माणसाच्या पाठीमागे घावलो.  प्रथम त्याला ग्राम्य भाषेत एक शिवी हासडली. ” ये साले तुमको क्या मरना है हायवेपर. शरम नही आती,  इस बेफिकीर ढंगसे रस्ता क्रॉस करते हो.”  मी त्याचा जवळ  धाऊन गेलो. त्याला एक लाफा देण्याच्याच पोज मध्ये होतो. माझा आवाज एकूण ऐकून तो थांबला. त्याने माझ्या आवाजाच्या दिशेने मान वळविली. मला एकदम धक्का बसला. तो माणूस नेत्रहीन होता. क्षणात माझा राग पूर्ण विरघळून गेला. आपल्याच विक्षिप्त विचारांची लाज वाटू लागली.

 प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी असतेच. नेत्रहीन  असला, द्रीष्टीहीन असला तरी मनाने केव्हांच जगण्याच्या प्रक्रीयेमध्ये बेफिकीर नसतो. आपण डोळस असूनही आपल्या विचारीनी अंध असतो. ही जाणीव झाली. मी चटकन शंभर रुपयाची एक नोट त्याचा हाती ठेवली.

” हे काय आहे?”  हे तो विचारत असतानाच मी त्याचा द्रीष्टीहीनतेचा  फायदा उठवत हळूच माघारी फिरलो.                            

डॉ. भगवान नागापूरकर 

९००४०७९८५०

फूलपाखरे नि फुले

बागेतील तारका

 फूलपाखरे नि फुले

रंगबिरंगी सुंदर ठिपके,  पंखावरी

आकर्षक छटा त्या,  मनास मोहीत करी…१,

नृत्य पहा कसे चालते,  तालबद्ध होवूनी

फूलपाखरे बागडती,  फुलाफुला वरूनी…२,

नृत्याचे आंगण त्यांचे,  ते ही सुंदर नि मोहक

मखमालीच्या पाय घड्या,  दरवाळताती सुवासिक…३,

दोघांमधली चढाओढ,  नर्तक आणि नृत्यांगणा

कोण असे अधिक मोहक, प्रश्न सोडविल कोण ?….४

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

मेडीकल येथिक्स !

जीवनाच्या रगाड्यातून

मेडीकल येथिक्स !

अमेरिकेतील अरीझोना स्टेट मधील फिनिक्स हे सुंदर व प्रशस्त  वसलेले शहर. स्वछता शिस्त व नियमांचे काटेकोर पालन ह्याचा अनुभव  तीव्रतेने  तेथील वास्त्व्यात आला. प्रत्येक संस्थांचे नियम  असतात  ते सहसा मोडले जात नाहीत.  तेथे एक मजेदार अनुभव आला. मुलगा एका कंपनीत कामाला होता. त्याच्याकडे  आम्ही दोघे गेलो होतो. त्याची बायको अर्थात माझी सून गर्भवती होती. सात  महिने झालेले. त्याच शहरात नजीकच्या मोठ्या रुग्णालयात तिची रीतसर नोंदणी केलेली होती. संबंधित स्त्री डॉक्टर  तज्ञाकडून नियमित तपासणी केली जात असे. एक दिवस सुनेच्या  पोटात दुखू लागले. आम्ही सर्वजन बेचैन  झालो.  तिला रुग्णालयात घेऊन जाऊ लागलो. रस्त्यातच त्या स्त्री डॉक्टर तज्ञाची  कन्सल्टिंग रूम  लागल्यामुळे,  मुलाने तातडी म्हणून ( Emergency ) तेथेच  तपासण्याकरिता नेण्याचा निर्णय घेतला. स्वागत कक्षात मुलगा  Receptionist  ला    भेटला. आम्ही बाहेरच्या खोलीत बसलो. Reseptionist एक वेगळ्याच विचाराची स्त्री असल्याचे जाणवले.  आमची पूर्व भेट वेळ  (Appointment)    घेतलेली नव्हती. शियाय त्यांच्या  पद्धती नुसार जर काही  यातना होत असतील तर  प्रत्येकाने रुग्णालयाच्या  Emergency विभागात  रुग्णाला घेऊन जाणे, जेथे तेथील डॉक्टर  ती केस  प्रथम   बघतील, जर गरज  पडली  तरच तज्ञाला कळवतील. Consulting  रूममध्ये असल्या केसेस  तपासत  नाहीत. आम्ही फार बेचैन झालो. ती आमचा व त्या तज्ञ डॉक्टरांची  भेट देण्यास  विरोध करीत होती. नियमाच्या चाकोरी मधून तिचे वागणे खरे असले  तरी परिस्थिती, आपत्कालची  वेळ, आणि माणुसकी याचा विचार ह्याला  अनुसरून ते अयोग्य होते. आमच्या आग्रही विचाराना मर्यादा होत्या. शेवटी आम्ही रुग्णालयात जाण्याचा 

निर्णय  घेतला. 

आम्ही जात असताना एक विचार माझ्या मनांत आला. मी एकटाच त्या Receptionist कडे गेलो. “  We are  going  to  the Hospital. Will you Please  give this my I – card to Doctor  Madam. असे म्हणत, मी  माझ्या जवळचे ओळख कार्ड तिला दिले. मी एक  डॉक्टर बालरोग तज्ञ असून  त्यावर भारता मधला पत्ता होता. तिने ते कार्ड वाचताच तिच्या  मानसिक  विचारात बदल झालेला जाणवला. ” Please wait for a while  “  म्हणत ती ते कार्ड घेऊन डॉक्टरबाई कडे गेली. एकदमच वातावरण बदलले दिसले. कार्ड वाचून मी देखील एक तिचाच व्यवसायीबंधू असल्याचे डॉक्टराना कळले.

डॉक्टर स्वत: बाहेर आली, माझ्याशी हस्तोंदल केले. माझा परीचय करून  घेतला. स्वत: चा परिचय संक्षिप्त दिला. स्वागतमय वातावरण निर्माण झाले. आता डॉक्टरबाईनीच  लक्ष घातल्यामुळे सर्व व्यवस्थित झाले. सुनेला तपासून औषधी  लिहून दिली गेली.                               

हयालाच म्हणतात मेडिकल एयेथिक्स  ( Medical Ethics ). अर्थात् वैद्यकिय क्षेत्रातील लोकांची आपापसात वागण्याची पद्धत. (Moral principles or practices in medical fields ) वैद्यकीय शास्त्र अथंग पसरलेले आहे. त्याच्या अनेक शाखा, उपशाखा, ह्या वाढतच आहे. शिवाय हे बद्लत  जाणारे  वा दर दिवशी  ज्यात  नाविन्याचा शिरकाव होत होता.  त्यामूळे त्या क्षेत्रातिल सततचा सम्पर्क,  वैचारिक देवान घेवान अत्यन्त महत्वाची ठरते. ह्याच तत्वावर वैद्यकीय व्यासाय मधल्या व्यक्ती भेटताच, एकमेका विषयी आदराची भावना उत्पन्न होते. मग हे भारतात असो  व इतर देशात असो. मेडिकल एथिक्स  म्हणतात ते ह्यालाच.                          

  डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०    

एकत्र सर्पालय व बेडूकालय !

जीवनाच्या रगाड्यातून

एकत्र सर्पालय व बेडूकालय !

दक्षिण आफ्रिकेत एक प्राणी संग्रहालय बघण्यात आले. निरनिराळ्या प्राण्यांची वेगवेगळी दालने बघितली. एकप्रचंड असे सर्पाचे दालन होते.  अति विशाल हौद, तळामध्ये दोन भाग केलेले. पाणी व जमिनिसाठ्यी. लहान मोठी झाडे,  दगडाच्या शीला, काही ठिकाणी कृत्रिम वारुळे, आणि निरनिराळे खांब रोवले होते. अनेक जातीचे सर्प, पाणी व जमिनीवर मुक्त हालचाली करताना दिसत होते. अश्च्यर्याची गोष्ट म्हणजे

 त्या पाण्यात खूप मासे सोडलेले होते, तसेच बऱ्याच संखेने बेडूक देखील होते. दोन्हीही सापांचे खाद्य. परंतु त्यांचीही प्रजनन क्रिया देखील वाढत राहावी,  ह्याचेपण वातावरण आयोजकांनी व प्रशासनांनी निर्माण केलेले होते. गंमत वाटलीकी साप व त्याचे खाद्य बेडूक व मासे एकाच वातावरणात जीवन  कंठीत होते. ज्याप्रमाणे आम्ही जंगलात वाघ सिंह आणि त्याच वेळी  हरीण झेब्रे ह्यांचेही कळप हे ही बघितले. जीवन मरणाचा आनंद व संघर्ष यांची कला निसर्ग  शिकवतच असतो. वेटोळे घालून शांत पडलेले वा  हालचाली करणारे अनेक सर्प, दिसत होते. आश्च्यर्याची गोष्ट म्हणजे कित्येक बेडूक हे तेथील सापावरही  आरूढ होऊन बसलेले  दिसले.आम्हाला मार्ग दर्शकांनी सांगितले कि सापाचे पोट रिकामे असेल, तो उपाशी असेल तरच स्वत:चे भक्ष्य म्हणून बेडकाला व माशाला खातो.  एरवी कधी नाही. शिकाऱ्याच्या भूमिकेत साप वेगळाच व चपळ बनतो, त्याचा हालचाली वेधक बनतात. भक्ष्याना त्याची  जाण येते. तेही आपला जीव  वाचवण्यासाठी धावपळ करतात. इतर वेळी तेही बेफिकीर असतात. पोट भरलेला साप हा अनेक दिवस भक्षविना राहू शकतो. ही एक चांगली रचना. जेंव्हा भूक तेंव्हाच भक्ष्य व त्यावर लक्ष.     हा प्राण्यामधला निसर्गाचा गुणधर्म असतो. मानव प्राणी हाच जेवण झाल्या बरोबर पुढच्या जेवणाची काळजी करतो, तश्या तरतुदी देखील करीत असतो. साठा करणे हा फक्त मानवाचाच गुणधर्म. ह्याचमुळे शिकारी प्राणी व त्याचे भक्ष्य  प्राणी बराच काळ पर्यंत  एकत्र राहतात. एकमेकांना हानी पोहचवत  नसतात. हा निसर्गच गुणधर्म भक्ष्य होऊ घातलेल्या प्राण्यासाठी दिलासा देणारा निश्चितच असेल. 

शिकारी अथवा शिकार दोन्हीही भूमिका त्यांच्या जीवन चक्रात सतत होत राहतात. ह्यालाच म्हणतात  

     जीवो – जीवनस्य जीवनाम.  

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

कवीची खंत

कृष्णकमळ

कवीची खंत

भटकतो आहे कवि   विचारांच्या सागरांत

वाहात चालला आहे    व्यवहारी जगांत

आधार नाही त्याला    पैशाच्या शक्तीचा

कुचकामी ठरत आहे    प्रयत्न त्याचा जगण्याचा

अर्धपोटी राहात असतो     भाकरीच्या अभावी

लिहीत चालला आहे        काव्यरचना प्रभावी

उदासपणे बघतो आहे     ” हाऊस फूलची ” पाटी

लिहीली होती नाट्यगीते     त्यानेच सर्वासाठी

टाळ्यांचा तो कडकडाट       बाहेर ऐकू येई

उपाशी होते त्याचे पोट    खिन्नतेने निघून जाई

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

भिकाऱ्याची अनमोल मदत !

जीवनाच्या रगाड्यातून

भिकाऱ्याची अनमोल मदत !

 संध्याकाळी फिरण्यास निघालो. बागेच्या दारापाशी एक ग्रंथ विक्रेत्याचे वाहन उभे होते. विशेष पुस्तकांची विक्री चालू होती. माझी नजर एका दुर्मिळ ग्रंथावर पडली. गेली कित्येक दिवस ते पुस्तक मी मिळविण्याचा प्रयत्न करीत होतो. प्रकाशक, ग्रंथ भांडार, यांच्याकडून कळले होते कि त्याची नवीन आवृती येण्यास अवधी लागेल. मी ते विकत घेण्यासाठी पाकीट काढले. चार रुपये कमी पडत होते. हतबल झालो. पुस्तक विक्रेता नोकर माणूस होता. गाडी दूर गावची असून, लगेच जाणार होती. जवळपास कुणी परिचित दिसेना. सारे मार्ग खुंटले. मी निराश झालो. विवंचनेत पडलो. त्याच वेळी एक भिकारी, हात पुढे करून  मला भिक मागू लागला. ते सहन झाले नाही. मी हात करून त्याला  जाण्याची  खून केली. तो नमस्कार करून जाऊ लागला.  अचानक  मला त्याच्या हातात काही  नाणी दिसली.  एक विचार मनात चमकला. मी त्याला बोलावले.

” आहो तुमच्याकडे किती रुपये आहेत?”  मी विचारले.

 ” फक्त सहा रुपये साहेब. माझे ह्यात पोट कसे भरणार? “ तो म्हणाला.  

” चल मी तुला जेवण देतो. प्रथम माझे एक काम कर ” मी म्हणालो.

त्याच्या चेहऱ्यावर  आनंद दिसला.   

अर्थात् त्याच्या मदतीने,  माझे काम झाले. माझ्या करीता ते दुर्मिळ  पुस्तक मला मीळाले.  मी त्याला घरी घेउन आलो. मी त्याला जेऊ घेताले.   

एका अनामिक, परन्तु   वेळेवर मदत ( Timely help )  करणाऱ्या  त्या व्यक्तीला, मी  कधीही विसरणे शक्य नाही. 

परीस्थीतिचे  वलय फक्त वेळे भोवती फिरत असते. क्षणाचे महत्व  म्हणतात  ते ह्यासाठीच. जीवनाच्या एखाद्या प्रसंगी वेळ  ही तिचे महत्व  अतिशय कौशल्याने आपल्या मनावर बिमबवते. हा क्षण चुकला, हा क्षण मिळाला असता तर असे झाले असते. हा वाक्प्रचार  त्याच मुळे झालेला वाटतो. केंव्हा केंव्हा तर तुमच्या संपूर्ण  आयुष्याचे मोल ठरविण्याचे कार्य तो एक क्षणच करतो. भिकाऱ्या कडून योग्य वेळी मिळालेल्या मदतीमुळे,  ह्यातील खरे तत्वज्ञान  मला पूर्णपणे जाणवले.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे विद्यार्थाला प्रशस्तीपत्र

जीवनाच्या रगाड्यातून

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा
यांचे विद्यार्थाला प्रशस्तीपत्र

“ आहो आश्चर्यम ! Wonderful ! Unimaginable !! चमत्कार !.” असलेच आश्चर्य चकीत करणारे उदगार केंव्हा मुखातून बाहेर पडतात, जेव्हां एखादी अघटीत घटना घडते. आपलाच आपल्यावर विश्वास बसत नाही. त्यावेळी घडणाऱ्या घटनांची थोडीशीसुद्धा, पुसटशी देखील कल्पना आपण केलेली नसते. यावेळीही असेच कांहीसे घडले आणि मन आनंदा बरोबर आश्चर्यचकीत झाले. याचे श्रेय मी ती घटना ज्याच्याबद्दल घडली, त्या व्यक्तीला देण्यापेक्षा जेथे घडली, त्या राजकीय व्यवस्थेलाच देतो.
माझा मुलगा अमेरीकेत असतो. सध्या तेथेच स्थायिक झाला आहे. १५ वर्षे झालीत. त्याला नियमांनुसार अमेरिकन नागरिकत्व देखील मिळाले. त्याचा थोरला मुलगा १४ वर्षाचा असून तो तेथेच शालेय शिक्षण घेत आहे. तो तेथील ९ वीच्या वर्गांत शिकतो. शाळा मिनियापोलीस (Plymuth) या शहरी आहे. हे शहर उत्तरेकडील मिन्नेसोटा ह्या प्रांतात आहे. शाळा प्रांतीय व देशाच्या म्हणजे USA च्या नियमानुसार चालतात. शाळेतील सर्व कार्यक्रमावर अर्थात् शासनाचे लक्ष व नियंत्रण असते.
एका राष्ट्रीय कार्यक्रमांतील चर्चासत्रांत माझ्या नातवाने, ज्याचे नांव आहे “आकाश नागापूरकर “ याने भाग घेतला होता. हा कार्यक्रम ठराविक वयोगटातला होता. त्या कार्यक्रमांत आकाशला प्रथम क्रमांक मिळाला. त्याचे सादरीकरण उत्तम झाले. शाळेने त्याचे कौतूक केले. त्याबद्दल योग्य ते पत्र व बक्षीस दिले. आम्हा नाते संबंधीना त्याबद्दल आनंद वाटला व समाधानही झाले. हे सारे नैसर्गिक होते.
दोन महीन्याचा काळ गेला, आणि अचानक ती आश्चर्यचकीत करणारी घटना नजरे समोर आली. शाळेच्या व्यवस्थापनाने आकाशला बोलावून एक लखोटा त्याच्या हाती दिला. लखोट्यावर आकाशचे नांव , C/O त्या शाळेच्या व्यवस्थापनाचे नांव ठळक लिहीलेले होते. आणि पाठविणारा कोण ? ते युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचे ( USA ) राष्ट्राध्यक्ष अर्थात् बराक ओबामा साहेब. त्यांच्या सहीनिशी हे पत्र Presidents Education Awards Programs White House, Washington येथून ३० जानेवारी २०१५ रोजी पाठविले गेले. त्याच पत्रावर दस्तूरखुद्द राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांची सही होती.
हे सारे त्याला राष्ट्रीय शैक्षणीक कार्यक्रमा अंतर्गत होते. येथे एक विचार सतत मनांत येत राहतो की “ घटना आणि दखल “ ह्याचे समीकरण बघीतले की आश्चर्य वाटू लागते. देशाच्या एका शहरातील शाळेचा एक विद्यार्थी, एका राष्ट्रीय कार्यक्रमांत भाग घेऊन बक्षीसपात्र होतो, आणि त्याची दखल थेट देशाचा राष्ट्रपती वैय्यक्तीक पातळीवर घेतो ह्याची ! साऱ्या व्यवस्थापनेचे याचमुळे कौतूक वाटते. राष्ट्रपतीनी इतक्या बारीक सारीक बाबींमध्ये लक्ष घालावे, येथेच त्यांची योग्यता वाखाणण्यासारखी वाटते. त्याच बरोबर व्यवस्थापन ह्या उत्तेजन देणाऱ्या घटनांमध्ये किती जागृतता आहे हे देखील दिसते. तरुणपिढी, युवावर्ग यांना हे सारे प्रेरणादायी असणारच ह्यांत शंकाच नाही.

सुचना- सोबत बराक ओबामांचे दिलेले त्यांच्या सहीनिशीचे प्रशस्ती पत्र व संदेशपत्र
जोडत आहे. कृपया बघणे.

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

आकाश रवि नागापूरकर
वय १४ वर्षे, प्रथम पारितोषक विजेता
मिनीया पोलीस अमेरिका ( USA )

अमेरिका अध्यक्ष श्री. बराक ओबामा यांची सही असलेले प्रशस्ती पत्र व संदेश वजा पत्र

अमेरिका अध्यक्ष श्री. बराक ओबामा यांची सही असलेले प्रशस्ती पत्र व संदेश वजा पत्र

अफलातून योजना-

जीवनाच्या रगाड्यातून

अफलातून योजना-
रस्त्याच्या वळणावर भाजी विक्रेत्याची गाडी बघीतली. बरीच गर्दी होती. एक वयस्कर ग्रहस्थ भाजी गिऱ्हाकाना देत होते. त्या ग्रहस्थाना बघताच आश्चर्याचा धक्का बसला. कल्पना करु शकत नव्हतो, विश्वास वाटेना. अतिशय परिचीत व्यक्ती होती. लगेच बाजूस झालो. त्या व्यक्तीला न्याहाळू लागलो. ते डॉ. विकास जोशी होते. २०-२२ वर्षापूर्वी निवृत्त झाले होते. शासकिय रुग्णालयाचे प्रमुख होते. कुशल सर्जन, व्यवस्थापक, व अत्यंत प्रेमळ सुस्वभावी व्यक्ती. कोणता प्रसंग आला असावा की ज्याने जीवनाच्या शेवटच्या टप्यावर भाजी विक्रेत्याचे काम करावे लागत आहे. त्यांच्या बद्दल नितांत आनंद, प्रेम भावना असल्यामुळे माझी निराशा, बेचैनी, मला अधिकच अस्वस्थ करु लागली. त्याना नमस्कार केला. त्यानाही खुप आनंद झाल्याचे दिसले. बरांच वेळ मोकळेपणाने गप्पा केल्या. त्यानी सद्य परिस्थीती बद्दल जे सांगितले, त्याची मी कल्पना देखील करु शकत नव्हतो.
डॉ. विकास जोशी यांनी कथन केले ते असे होते.
“ भाजी विक्रेता सखाराम. त्याची पत्नी व मुलगी निलीमा. दररोज एखादी भाजी आणून देत असे. कधी तो, पत्नी वा मुलगी निलीमा. सखाराम गरीब होता. चांगला स्वभाव, कुटुंबीयांच प्रेमळ वागण, हे मनाला समाधान व आनंद देणारे होते. जीवनाकडे सकारात्मक बघण्याचा द्दष्टीकोन. जीवन जगण्याची धडपड ही कौतुकास्पद वाटत होती. त्याचा तिच्या लहानग्या निलीमामध्ये फार जीव होता. तीला विलक्षण व्यक्तिमत्वाची तयार करण्याचा मानस.
एक अफलातून योजना निर्माण झाली. प्रमुख विचार होता. सखारामच्या मुलीला निलीमाला मदत करणे. तिचे व्यक्तीमत्व बनण्यास हातभार लावणे.
सेवेमधून निवृत्त होऊन २२ वर्षे झाली. निवृत्तीवेतन भरपूर व नियमीत मिळत होते. संसाराची सारी अपेक्षित कर्तव्ये पार पडली होती. सर्व मुले आपल्यापरी स्थिरावली होती. आता मजसाठी फक्त एकच काम होते. प्रकृतीची शारिरीक व मानसिक काळजी घेत उर्वरीत आयुष्य समाधान व आनंदाने पूर्ण करणे. ८० वर्षे व्यवसथीत जगलो. आता सध्यस्थितीत असे रहावे की ज्यात समाधान व आनंद लाभेल. तेच शांतता निर्माण करेल.
सखाराम बरोबर मी एक योजना सादर केली. सुरवातीचे अर्थाजन माझे . चार चाकी ढकल गाडी, भाज्या विकण्यासाठी अद्यावत इलेक्ट्रॉनिक वजन काटा, त्यांत भाज्यांचे वजन व त्याची दर्शविलेली किमंत लगेच कळत असे. सखारामच्या नांवे महानगरपालिकेमध्ये रजीस्ट्रेशन, व्यवसाय करण्याची परवानगी देखील घेतली गेली.
त्याला फक्त दोनच सुचना केल्या १- ) या पुढील सर्व खरेदी-विक्री व नफा हे सारे तो स्वतंत्रपणे करण्यास मोकळा आहे. त्यामध्ये कुणाचाही हस्तक्षेप असणार नाही.
२- ) जो नफा मिळेल, त्याचा दहा टक्के नियमीत मला द्यावा.
मी दररोज सकाळी तीन – चार तास त्याच्या भाजीच्या ( व्यवसायाच्या) गाडीजवळ बसू लागलो. व धंद्यात सक्रीय भाग घेऊ लागलो. सखारामला भरपूर वेळ मिळू लागला. मोठ्या घाऊक बाजारांत जाणे, भाज्या आणने, स्वच्छ करणे, व्यवस्थित जोडणे, अशीच अनेक धंद्यासाठींच्या कामांत तो लक्ष देऊ शकला. मला देखील बराच शारिरीक व्यायाम, हालचाल व बौद्धीक समाधान लाभत गेले. मिळणारे सारे पैसे एका पेटीत टाकून ते त्याच्याच हवाली केले जाई. त्याला मिळालेल्या पैशाची केंव्हाच चर्चा केली नाही. मी फक्त व्यवसाय करण्यामधला आनंद व समाधान घेत होतो. हीच मला जीवन शांतता देत होती. तेच तर माझे ध्येय होते.
डॉ. जोशीनी आपल्या बँगेमधून पोष्टाचे एक पुस्तक काढून दाखविले. सखाराम कडून नियमीत मिळणरी सारी रक्कम ह्या पासबुकांत जमा करतो. हे पुस्तक सखारामची मुलगी निलीमा हीच्या नांवे आहे. योग्य वेळी हे सारे पैसे तिलाच मिळण्याची व्यवस्था केलेली आहे. या पोष्टाच्या पास बुकाची माहिती कुणालाही नाही. सखारामला देखील.
कोणतेही घेतलेल्या कार्य. ” एखाद्या नाण्याप्रमाणेच ” असते. नाण्याच्या दोन बाजू ज्यांत
१ तुमचे प्रयत्न श्रम धडपड, तसेच काळजी, शंका, तगमग, यश-अपयशाची चिंता इत्यादी पैलूंचा गुंता, सतत सुख दुःखाच्या लाटा निर्माण करतात . याला जीवन ऐसे नांव. ज्याचा सखाराम कुटूंबीय अनुभव घेत होते.
२ – तेथे निखळ समाधान व शांतता वास करते. जे मी ( कल्पनेने )अनुभवण्याचा प्रयत्न करीत होतो.
कार्य योजताना तीन बाबींचा विचार केला. ध्येय, परिस्थीती,आणि योजना. योजना मी घेतली. परिस्थीती व ध्येय दोन्हीची जबाबदारी सखारामच्या अर्थात त्या भाजी विक्रेत्याच्या कुटूंबावर सोडून दिली. योजनेचे फक्त समाधान मी अनुभवत असे. परिस्थीती व ध्येयाचे सुख दुःख हे दोन्ही सखाराम कुटुंबीय अनुभवत होते.

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

असा हा खारीचा वाटा.

असा हा खारीचा वाटा.

नुकताच पावसाळा सुरु झालेला होता. पावसाच्या सरी सारख्या अधून मधून पडत होत्या. सर्वत्र हिरवळ दिसू लागली होती. थोड्याच दिवसांनंतर त्या हिरवळीचे धागे, निसर्ग दाट व पक्के करणार. आणि एक अप्रतिम हिरवागार असा गाल्लीचा सर्व उघड्या रानोमाळ जागांमध्ये पसरुन टाकल्याचा आनंद निर्माण होणार. हा गाल्लीचा, त्या वर्षाऋतूच्या स्वागता साठीच असावा. अशा हलक्या फुलक्या अगमन प्रसंगीच्या नव पावसाळी वातावरणात प्रवास करावा. खिडकीजवळ बैठक मिळालेली असावी. बाहेरील नयन मनोहर द्दष्य टिपताना मिळणारा आनंद, वर्णन करण्याच्या पलीकडला.
ठाण्याहून पुण्याला रेल्वेने चाललो होतो. खिडकीजवळची जागा. बाहेरील वातावरण वर वर्णन केल्या प्रमाणे. आणि तो आनंद लूटण्यात मग्न झालो होतो. इतक्यांत माझे लक्ष विचलीत झाले एका घटनेमुळे. माझ्या समोरच्या बाकावर एक वयस्कर बाई बसल्या होत्या. त्यांच्या शेजारी एक पंधरा वर्षाचा मुलगा देखील होता. बाईंच्या हातात एक पिशवी होती. त्यातून त्या काहीतरी काढून त्या मुलाच्या हाती देत होत्या. मुलगा बाहेर बघून, ती वस्तू जोरकस प्रयत्न करीत, बाहेर दुर अंतरावर फेकून देत असे. त्या बाई व मुलाच्या या हरकती सतत चालू होत्या. मला काहींच बोध होईना, की तो बाहेर काय फेकीत होता.
बराच वेळ पर्यंत मी हे सारे बघत राहीलो. बेचैन होऊ लागलो. त्यांच्या ह्या बागण्याचे कोडे कांही उलगडेना. शेवटी विचार मालीकेचा बांध तुटला.
मी त्या बाईनाच विचारले. “ आजी मला क्षमा करा. मी एक गोष्ट वियारुं का तुम्हाला ? मी मघापासून बघतो आहे, तुम्ही ह्या मुलाला कांही तरी देत आहांत. हा मुलगा तेच बाहेर दुर फेकून देत आहे. मला ह्याचा काहीच उलगडा होत नाही. त्या बाई एकदम हसल्या. प्रथम त्या मुलाकडे बघू लागल्या. हा माझा नातू. मुलाचा मुलगा. आम्ही सर्वजण एकत्र राहतो. नेहमी मी आपल्या मुलीकडे पुण्याला जात असते.
“ मला एक सवय म्हणा वा छंद आहे. घरांत नेहमी अनेक प्रकारची फळे आणली जातात. जसे चिकू, सिताफळ, बोर, मोसंबी,संत्री, आंबा, रामफळ, चिंचा, पेरु, पपई, कलींगड, खरबूज .इत्यादी. मी त्यांच्या बिया एकत्र करुन, एका टोपलीत जमा करुन ठेवते. गच्चीवरील टेरेसवर ठेऊन देते. सर्व बियाणे सुकतात त्याना पिशवित ठेवते. पावसाळ्याचा मोसम सुरु झाला की जेव्हां माझे पुण्याला जाणे होते, मी ती बियाने बरोबर घेते. ती मी रस्याने फेकीत जाते. बी, जमीन व पाणी याच्या संपर्कात अल्यास त्या रुजण्याची बरीच शक्यता असते. मला माहीत नाही, की काय होत असेल त्या बियांचे. अंकुरल्या, रुजल्या वा कुजल्या. न त्यांच्यसाठी पोषण, न संरक्षण, न योजना. फक्त एक अंधारामधला प्रयोग. सर्व कांही अज्ञानामध्ये. फक्त एकच हेतू मनांत ठेऊन हे केले जाते. झाडे लावा, निसर्ग वाढवा, आणि पर्यावरण सांभाळा. खारीचा हा माझा वाटा समजून समाधान मानते. “
त्या बाईंचे डोळे सर्व सांगताना पानावलेले दिसले. त्यात दिसली चमक, तगमग आणि वयाची जाण. तरी देखील काहींतरी रचनात्मक करण्याची जीद्द.
सारे एकून माझे ह्रदय भरुन आले. मी त्यांच्या वयाला व कार्याला अभिवादन केले.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com